Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मंदिर बचाव कृती समितीचा मोर्चा

$
0
0

धुळ्यातील पांझरा चौपाटीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनारी महाकाली मंदिर, शितला माता मंदिराचे अतिक्रमण तीन दिवसांत काढून घेण्याच्या अपर तहसीलदार कार्यलयाकडून नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे आता मंदिर बचाव कृती समितीच्या नावाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बुधवारी (दि. २३) दुपारी याबाबत महाकाली मंदिरात बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढून धार्मिक भावना पायदळी तुडवल्यास आम्ही वेगळ्या पद्धतीने विरोध करू आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जिल्हा प्रशासनास सर्वपक्षीय समितीने दिला आहे.

पांझरा नदीकाठी रस्त्यांना अडथळा ठरणारे महाकाली मंदिर, शितला माता मंदिराचे अतिक्रमण तीन दिवसात काढून घेण्याच्या नोटिसा प्रशासनातर्फे मंदिरांमध्ये मंगळवार दुपारी चिकटविण्यात आल्या. मुदतीत मंदिर व्यवस्थापनाने अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून ते काढण्यात येईल व त्याचा खर्च व्यवस्थापनाकडून वसूल केला जाणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे. यामुळे याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. याची प्रशासनास जाणीव करून देण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना इशारा देण्यात आला. मंदिर बचाव कृती समितीच्या नावाखाली एकत्र आलेल्या सर्वपक्षीयांनी बुधवारी सकाळी महाकाली मंदिरात तातडीची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून मनोज मोरे, महेश मिस्तरी, हिरामण गवळी, कल्पना गंगवार आदींनी निवेदन दिले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शहरातील जनतेचा विचार करून, न्यायालयाचा आदेशाचा भंग होणार नाही. तसेच सर्व परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ प्रश्न सोडविण्यात येईल. मात्र कायदा व सुव्यवस्था बाधित झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुपोषणाची खरी माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या निर्णय आणि कारवाईद्वारे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी पेठ तालुक्यात अनोखा सत्कार करीत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कुपोषित बालकांची जास्त संख्या आढळली की त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाते. मात्र ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात कुपोषित बालकांची संख्या जास्त आली म्हणून पेठ तालुक्यातील कुळवंडी प्राथमिक केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती या सर्वांचा खातेप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सीईओ डॉ. नरेश गिते यांच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांना सुखद धक्काच दिला. खरी माहिती उपलब्ध करून देणे हे कुपोषण निर्मुलनासाठीचे पहिले पाऊल असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

पेठ पंचायत समितीची आढावा बैठक डॉ. गिते यांच्या अध्यक्षतेखाली इनामबारी येथील माध्यमिक आश्रम शाळेत झाली. नवीन सर्वेक्षणात पेठ तालुक्यातील कुळवंडी केंद्रांतर्गत सर्वात जास्त कुपोषित बालकांची संख्या आढळून आली. यापूर्वी या केंद्रांतर्गत १० तीव्र कुपोषित तर ९ मध्यम कुपोषित बालक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र नव्या सर्वेक्षणात ७९ तीव्र कुपोषित तर २४९ मध्यम कुपोषित बालक आढळले. जबाबदारीने सदरचे सर्वेक्षण पूर्ण करून खरी माहिती सादर केल्याबद्दल डॉ गिते यांनी कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी, पर्यवेक्षिका उत्तरा कुमावत, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांना व्यासपीठासमोर बोलावत त्यांचा सत्कार केला.

तिघा कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

आढावा बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निशांत पाडवी गैरहजर असल्यामुळे त्यांची खातेचौकशी करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. भुवन आरोग्य केंद्रांतर्गत टीसीएल तपासणीसाठी नमुने न पाठविणारे आरोग्य सहायक मगर, तसेच सतत गैरहजर राहणारे आरोग्यसेवक मनोहर खंबाईत यांची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंटांची निर्दयपणे वाहतूक; तिघे ट्रकसह ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने बुधवारी सटाणा रोडवर विनापरवाना निर्दयीपणे ट्रकमधून वाहतूक केले जाणारे सहा उंट पकडून कारवाई केली. गुजरातकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून ही उंट नेली जात होती. पोलिसांनी पाठलागू करून उंटांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पथकाचे पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार गुजराथकडून मालेगावच्या दिशेने विनापरवाना काही प्राण्यांची वाहतूक केली जात होती. त्यानुसार पोलिस पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात होती. दुपारी चारच्या सुमारास पथकाने सटाणाकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रक (जीजे २४, व्ही ४९०१) ला पोलिसांनी अडवले. मात्र चालकाने ट्रक जोरात पुढे नेला. अखेर पोलिस पथकाने पाठलाग करून इंदिरानगरजवळील गतिरोधकाजवळ त्यास पकडले. ट्रकची झडती घेतली असता त्यात निर्दयीपणे सहा उंट बांधून ठेवलेले होते. याबाबत चालक व त्याच्या साथीदारांना विचारपूस केली असता ही संशयास्पद वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सुरेश पराखजी ठाकूर (रा. गुजरात) त्याचे साथीदार दिनेश सोमाभाई रावत (रा. गुजरात), अजगर अख्तर तेली (रा. उत्तर प्रदेश) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, सहा उंट व ट्रक असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरा छावणी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. बारकू चिंधा देवरे (वय ४२, रा. जळकू, ता. मालेगाव) या शेतकऱ्यानेही आत्महत्या केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मंगळवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या नावे एक हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती तलाठ्याने जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आरोपींना सोमवारपर्यंत कोठडी

$
0
0

सातपूर : बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या हर्षल साळुंखे या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चौघा संशयितांना कोर्टाने सोमवारपर्यंत (दि. २८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसीतील एका बारमध्ये मद्य पिण्यावरून झालेल्या वादावरून साळुंखे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे, सुधीर भालेराव व मुकेश मगर अशी संशियतांची नावे आहेत. सातपूर पोलिसांनी त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींना २८ मे रोजी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

देवळाली कॅम्प :

येथील गोडसे मळा परिसरात राहणाऱ्या मजूर कुटुंबातील २२ वर्षीय विवाहितेने सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. वैशाली दीपक सोनवणे असे या विवाहितेचे नाव आहे.

वैशालीने मंगळवारी (दि. २२) सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान फाशी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील अर्जुन अण्णा सौंदाणे (रा. देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दीपक सोनवणे (पती), महेंद्र सोनवणे, चैताली सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीविरोधात चांदवडला निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ चांदवड येथे काँग्रेसतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तहसील प्रवेशद्वारात तब्बल तास ते दीड तास ठिय्या आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.

सात दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे पडसाद गुरुवारी चांदवड येथे उमटले. सकाळी साडेदहा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांदवड तहसील कार्यालयाजवळ जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रवेशद्वाराजवळ तास ते दीड तास ठिय्या आंदोलन केले. भाजप सरकारने इंधन किमतीत सलग सातव्या दिवशी वाढ करून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याची भावना व्यक्त करून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, मजूर वर्गाला भाजप सरकारच्या दरवाढ धोरणांचा फटका बसत असून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात त्वरित सुधारणा करण्यात यावी, दरवाढ रोखावी अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शिरीष कोतवाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, पदाधिकारी समाधान जामदार, शिवाजी कासव, उत्तम ठोंबरे, पंकज दखने, भीमराव जेजुरे, सर्जेराव शिंदे, प्रकाश कुरणे, अशोक शिंदे, साहेबराव गवळी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार शरद मंडलीक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

...तर जर्मन स्टाइलने आंदोलन

जर्मनीत सरकारच्या अशा धोरणांचा निषेध करतांना नागरिक आपली वाहने रस्त्यात उभी करून असंतोष व्यक्त करतात. भारतात देखील

या पुढील काळात केंद्र सरकारच्या निषेधार्थ वाहने रस्त्यात उभी करून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे मत शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धूरविरहित चुलींची आदिवासींसाठी भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी कुटुंबीयांचे स्वास्थ्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारतर्फे त्र्यंबकेश्वर येथील पहिने गावात स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटमधील स्वामी कंठानंद यांच्याकडे तीन धूरविरहित चुली सुपूर्द करण्यात आल्या.

सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. लायन अभय बाग यांनी अध्यक्षीय भाषण केले. चुलीवर स्वयंपाक करताना धुरापासून होणाऱ्या त्रासामुळे मानवी जीवनावर घातक परिणाम होतात. या प्रकारातील चुली पर्यावरणपूरक असून, धुरापासून रक्षण होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी परिसरातील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सेक्रेटरी संतोष कलंत्री, कोशाध्यक्ष अनिल दक्षिणी, महेश भरबत, अश्विनी बाग आदी यावेळी उपस्थित होते. गोपाळ बिरार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोपखान्याचे ब्रीद बुलंद ठेवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

 भारतीय तोपखान्याच्या जवानांनी आजपर्यंतच्या सर्व युद्धांत प्राणाची पर्वा न करता 'सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल' हे  तोपखाना विभागाचे ब्रीदवाक्य बुलंद ठेवले आहे. आपणदेखील देशसेवेत सहभागी होताना हे ब्रीद बुलंद ठेवावे. जगात भारतीय  सैन्याची प्रतिमा उंचावण्यासाठी  प्रशिक्षणादरम्यान मिळालेली  शिस्त कायम ठेवत भविष्यात आणखी उंच शिखर गाठाल, असा विश्वास  स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया यांनी  प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

 नाशिकरोड येथील तोपखाना विभागातील ५०७ प्रशिक्षणार्थींची तुकडी  अकरा महिन्यांच्या अतिशय खडतर  प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. त्यांचा शपथविधी सोहळा  गुरुवारी येथील उमराव परेड मैदानावर  विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी कमांडर सलारिया बोलत होत.

या सोहळ्याच्या प्रारंभी मैदानावर लष्करी बँडने 'कदम कदम बढाये  जा'ची धून वाजवून  प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या सशस्त्र संचालनादरम्यान उपस्थितांनादेखील सलामी दिल्यामुळे मैदानावरील वातावरण स्फूर्तिदायी बनले होते. त्यानंतर  लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया, आर्टिलरी सेंटरचे कमाडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा या दोन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींच्या सहाही तुकड्यांचे  अभिनंदन केले. वेगवेगळ्या राज्यांतून निवड झालेल्या या ५०७ प्रक्षिक्षणार्थींना नाशिकरोड येथील तोफखाना विभागातर्फे ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले. त्यात फिजिकल, ड्रील, वेपन ट्रेनिंगसह असॉल्ट व ट्रेडमधील अत्याधुनिक प्रशिक्षणाचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर आता हे जवान सैन्य दलाच्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये दाखल होणार आहेत.

हे प्रशिक्षणार्थी ठरले 'बेस्ट'

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अरविंद यादव (बेस्ट इन ड्रील), शुभम (बेस्ट इन फिजिकल ट्रेनिंग), उग्रसेन (बेस्ट इन वेपन ट्रेनिंग), इंद्रवीर सिंग (बेस्ट इन गनर्स), गगन (बेस्ट इन टीए), मनीष कुमार (बेस्ट इन ऑपरेशन), आशिष कुमार (बेस्ट इन ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्स्पोर्ट), महादेव माळी व हेमंत कुमार (बेस्ट इन स्टीवर्ड), यांच्यासह इंद्रवीर सिंग यांना ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मर म्हणून सन्मानित करण्यात आले.     

पालकांचाही झाला सन्मान

या शपथविधी सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थींच्या पालकांनादेखील निमंत्रित करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यानंतर आपला मुलगा देशसेवेसाठी पाठविल्याबद्दल त्यांच्या माता-पित्यांचादेखील पदक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान होत असताना  त्यांच्या  डोळ्यात आनंदाश्रू  दाटून आले होते. खडतर प्रशिक्षण संपल्यावर मोठ्या कालावधीनंतर भेटलेल्या आपल्या पालकांना आपल्या हाताने घास भरविण्याचा मोह यावेळी प्रशिक्षणार्थींना आवरता आला नाही.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ उंटांची रवानगी गोशाळेत

$
0
0

तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशेष पोलिस पथकाने बुधवारी सटाणा रोडवर विनापरवाना निर्दयीपणे ट्रकमधून वाहतूक केली जाणारी १३ उंटांची सुटका केली. या प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुजरातकडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून ही उंट नेली जात होती. पोलिसांनी पाठलाग करून उंटासह तिघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वाहनचालक सुरेश पराखजी ठाकूर (रा. गुजरात), दिनेश सोमाभाई रावत (रा. गुजरात), अजगर अखतर तेली (रा. उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी दिली. दरम्यान उंट मालक अद्याप फरार आहे. जप्त करण्यात आलेल्या १३ उंटाना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या संस्कृतीचे चिमुकल्यांना दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी नदीचे पात्र, रामकुंडावर अधिकमासाठी स्नानाची झालेली गर्दी, गोदाघाट, तेथील मंदिरे, मंदिरांचे वास्तुशास्त्र, कोरीवकाम आदींची पाहणी आणि त्यांची सखोल माहिती घेत चिमुकल्यांनी गुरुवारी (दि. २४) नाशिकच्या संस्कृतीचे दर्शन घेतले. चला, नाशिक बघूया या उन्हाळी सुटीतील उपक्रमांतर्गत 'नाशिक सफर'द्वारे सकाळच्या वेळी सलग तीन दिवस राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सांगता झाली. मुला-मुलींनी माहिती आणि मनोरंजन यांचा आनंद या उपक्रमाच्या माध्यमातून घेतला.

नाशिकची ओळख, येथील संस्कृती, परंपरा, येथील व्यक्तींचे नाशिकच्या लोकांच्या आणि लोकसंस्कृतीच्या बाबतीतील योगदान, नदीसंवर्धनाबाबतीतील कार्य यावर 'नाशिक सफर'मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोदामित्र राजेश पंडित यांनी नाशिकच्या गोदावरीचे महत्त्व, नदीची सध्याची स्थिती, ती बदलण्यासाठी नाशिककर म्हणून आपली जबाबदारी, गंगेचे घाट, त्यांची रचना, उपयोग, महत्त्व, त्यासंबंधीत पुराणातील गोष्टी, मंदिर, त्यांच्या आख्यायिका, इतिहास याची माहिती दिली.

नाशिक शहराची संस्कृती अनुभवत असताना मुलांच्या आजच्या जीवनाशी असलेला संबंध यावर विचार करण्यात आला. महादेवाने नंदीला गुरू मानल्यामुळे कपालेश्वर मंदिरात नंदी नाही, यातून आपल्या गुरूंविषयी आदर बाळगला पाहिजे हा विचार करा, असे सांगण्यात आले. गोदावरीमुळे नाशिक आहे. त्या नदीची कशी काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे सांगण्यात आले. बालाजी मंदिर हे सांस्कृतिक केंद्र असून, त्याची जोपासना कशी केली जाते, याचीही माहिती देण्यात आली. बासरीवादक मोहन उपासनी यांनी बासरीवादन केले. समारोपप्रसंगी मुलांनीही आता नाशिकबद्दल अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.   

याबाबत घेतली माहिती

गोदावरीसह रामकुंडावरील गंगा गोदावरी मंदिर, कपालेश्वर मंदिर, मुठ्यांचा गोराराम, कार्तिक स्वामी मंदिर, काळाराम मंदिर, नारोशंकर, सांडव्यावरची देवी, बालाजी मंदिर येथे जाऊन मुला-मुलींनी या मंदिरांचे वास्तुशास्त्र, कोरीवकाम त्या काळात आणि आताच्या काळात मंदिराचे समूह केंद्र म्हणून असलेले स्थान याविषयीची माहिती देण्यात आली.

--

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात तंरगतेय निर्माल्य

$
0
0

रामकुंडात तंरगतेय निर्माल्य

अधिकमासानिमित्त गर्दी; स्वच्छतेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अधिकमासामुळे सध्या रामकुंडात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत स्नानासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अधिकमासात पवित्र तीर्थस्थानावर स्नानाचे महत्त्व असल्याने अधिकमासाच्या सुरुवातीपासूनच रामकुंडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. भाविकांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत असून, स्नानाबरोबरच गोदावरीची पूजा आणि दीपदान करण्यात येत असल्यामुळे रामकुंडात फूले आणि दिवे सोडण्यात येत आहेत. येथे ठेवण्यात आलेले दीपदानाच्या पात्र कमी पडू लागल्याने परिसरात इतरत्र निर्माल्य साचत असून, रामकुंडातही निर्माल्य तरंगताना दिसत आहे.

स्नानासाठी येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त असते. या महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी अडचण होते. वस्त्रांतरगृह असले तरी त्याच्यावर फलक नसल्यामुळे ते कळत नाही. वस्त्रांतरगृहाविषयी बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांना माहिती दिली जात नाही. गांधी ज्योतीच्या खालच्या बाजूला असलेल्या भागात साड्या बांधून आडोसा करून त्याच्याआड कपडे बदलण्यात येत आहेत.

शेवाळाने पडण्याची भीती

सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात आलेले नसल्यामुळे रामकुंडातील पाणी स्थिर आहे. दिवसभरात हजारोंच्या संख्येने भाविक रामकुंडात स्नान करीत आणि पूजा करीत असतात. हे पाणी स्थिर असल्यामुळे या पाण्याला दुर्गंधी पसरलेली आहे. रामकुंडातील दगडी पायऱ्यांवर स्थिर पाण्यामुळे शेवाळ साचले असल्याने त्यावरून पाय घसरून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकमासात नदीपात्रात दीपदान करण्यात येते. त्यासाठी लागणारे दिवे रामकुंड परिसरात द्रोणात फुले, बत्तासे, तेलात भिजविलेली वात, दुर्वा, तळशीपत्र ठेवण्यात येते. दहा रुपये किमतीचे हे दिवे स्नान करण्यासाठी येणारे भाविक स्नान झाल्यानंतर आवर्जुन पाण्यात सोडतात. काही येथे असलेल्या दीपदान पात्रात ठेवतात तर काही दिवे पात्रात वाहत जातात.

दिवे पाण्यात सोडू नका असे सांगण्यासाठी येथे सुरक्षारक्षक असले तरी सध्या वाढलेली भाविकांच्या गर्दीत ही सूचना कुणाकुणाला द्यायची हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पूजा करताना फुलेही पात्रात टाकली जात आहेत. पात्रातील कडेला असलेली फुले काढण्याचा प्रयत्न होतो. मात्र, मध्यभागी असलेली फुले काढणे मुश्किल होत असल्याने ते पाण्यावर तरंगत राहतात. तर बाहेर काढलेले निर्माल्याचे ढिगारे तयार होत आहेत. ते त्वरित उचलून घेण्याची व्यवस्था नसल्यामुळे रामकुंडाच्या बाहेरच्या भागात सर्वत्र निर्माल्य नजरेस पडत आहे.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात ‘न्यूड’ सर्वोत्कृष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात 'न्यूड' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले असून, नाशिकची कल्याणी मुळे ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

अठरावा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या व्हिलेज इस्ट सिनेमा येथे ७ ते १२ मेदरम्यान पार पडला. त्यात रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या चित्रपटाने अनेक चित्रपटांना बाजूला सारत बाजी मारली. त्याचबरोबर मूळच्या नाशिकच्या असलेल्या कल्याणी मुळे या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन 'न्यूड' या चित्रपटानेच करण्यात आले होते. महोत्सवाचा समारोप राजकुमार रावच्या ओमेर्ता या चित्रपटाने झाला.

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी सिनेमांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात 'न्यूड'ला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर बराच वादही निर्माण झाला. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनालाही विरोध करण्यात आला होता. मात्र, अशातही या चित्रपटाने महत्त्व पटवून दिले आहे. नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कल्याणी मुळे, छाया कदम आणि मदन देवधर यांच्या यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

नावावरून आणि त्यातील काही दृश्यांवरून हा सिनेमा तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या कचाट्यात सापडला होता. पण, आता सिनेमाला मिळालेल्या यशाने त्यावर घेतलेले आक्षेप आणि आरोपातील फोलपणा लक्षात उघड होत आहे. कारण, चित्रकलेचे शिक्षण घेताना नग्न देहाचे रेखाटन हा एक विषयच असतो आणि त्याचे शिक्षण समोर एक नग्न मानवी देह बसवूनच दिले जाते. तो देह पुरुषाचा असेल किंवा स्त्रीचा, तो रेखाटताना विद्यार्थ्यांची मनावर ताबा ठेवण्याची कसोटी असते. ज्यांना ते जमते ते या सिनेमात दाखवलेल्या जयरामप्रमाणे (ओम भुतकर)मोठे चित्रकार होतात.

--

दोन नामांकनांत बाजी

'न्यूड'ला मिळालेल्या या सन्मानामुळे पुन्हा एकदा मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. बेलेकम्पा, ज्यूझ, लाइट इन द रूम, टेक ऑफ या विदेशी चित्रपटांना धोबीपछाड देत मराठीच्या 'न्यूड'ने बाजी मारली. या महोत्सवात 'न्यूड'ला दोन नामांकने होती. त्या दोन्ही नामांकनामध्ये चित्रपटाने पुरस्कार मिळविले आहेत. या चित्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात बाजी मारल्यानंतर मराठी सिनेसृष्टीत आनंद व्यक्त होत आहे.

--

या चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले हा खूप मोठा सन्मान आहे. माझ्याबरोबर ज्या अभिनेत्रींना नामांकने मिळाली होती, त्याही दिग्गज होत्या. या सन्मानाने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.

-कल्याणी मुळे, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वर पक्षांची लॉन्ससाठी भटकंती

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : नवीन विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा थेट फटका लॉन्स आणि मंगल कार्यालयमालकांना बसला आहे. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी विवाह सोहळ्यांचे बुकिंग घेणे थांबविले असून, शुभकार्य योजलेल्या वधू-वरांकडील मंडळींना हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी आता चांगलीच कसरत करावी लागत असून, मंगल कार्यालयांची शोधाशोध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

अधिक महिना संपला, की शहरात पुन्हा लग्नांचा बार उडणार आहे. जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांमध्ये लग्नाच्या अनेक तिथी आहेत. या तिथींवर लग्नकार्य उरकता यावे, याकरिता वधू-वरांकडील मंडळींची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. परंतु, हा हंगाम पावसाचा असतो. त्यामुळे शुभकार्यात विघ्न नको म्हणून लग्नकार्य योजलेल्या मंडळींनी मंगल कार्यालय अथवा लॉन्स बुकिंगला प्राधान्य दिले आहे. एकीकडे वधू-वर पक्षांकडून मंगल कार्यालयांकडे बुकिंगबाबत विचारणा होत असताना लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या मालकांना मात्र तारखा बुक कराव्यात की नाहीत याची चिंता सतावू लागली आहे. अनेकांनी तर बुकिंग घेणेही थांबविले आहे.

महापालिकेने शहरातील तब्बल १६६ लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर अनधिकृत असल्याचा ठपका ठेवला आहे. या लॉन्सवर हातोडा पडण्यास सुरुवात झाली असून, काहींनी महापालिकेला सहकार्य करीत स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ही कारवाई रोखण्यासाठीचा समर्थ पर्याय व्यावसायिकांना उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी लॉन्समालकांचा जीव टांगणीला लागला असून, कारवाईच्या अनिश्चिततेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. कोणत्याही क्षणी कारवाईची शक्यता असल्याने विवाह सोहळ्यांच्या तारखा बुक कराव्यात की नाही, अशी त्यांची द्विधा स्थिती झाली आहे. परिणामी 'वेट अँड वॉच'चे धोरण अवलंबित अनेकांनी तूर्तास बुकिंग घेणे टाळले आहे. बुकिंग घेऊन प्रसंगी वधू-वर पक्षाला अडचणीत आणण्यापेक्षा काही गोष्टी वेळेवर सोडून देणे त्यांनी पसंत केले आहे. या प्रकारामुळे अनेकांना लग्नकार्यासाठी हव्या परिसरात योग्य लॉन्स किंवा मंगल कार्यालय उपलब्ध होत नसल्याने त्यांना वणवण करावी लागत आहे.

--

'त्यांचे' बुकिंग मात्र फुल्ल!

लॉन्स अथवा मंगल कार्यालयांवर अनधिकृत असा शिक्का नसलेल्या मालकांनी मात्र बिनदिक्कतपणे विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू केले आहे. जून महिन्यात १८, २१, २३, २५, २७ आणि २८ या तारखांना लग्नतिथी आहे. जुलै महिन्यात ५, १०, ११ तारखांना विवाहाचे मुहूर्त आहेत. अनधिकृत असा ठपका नसलेल्या बहुतांश लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये एव्हाना अनेक तारखांचे बुकिंग फुल्ल झाले असल्याची स्थिती आहे.

--

मटा मालिका

शुभमंगल 'सावधान'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची व्हॉट्सअॅप कन्क्टेव्हिटी!

$
0
0

पोलिसांची व्हॉट्सअॅप कन्क्टेव्हिटी!

सुरत, एमपीसह नाशिक पोलिसांचा गुन्ह्यांच्या माहिती अदानप्रदानासाठी व्हॉट्सग्रुप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याची हद्द असलेल्या गुजरातमधील सुरत, मध्यप्रदेशातील खारगाणे आणि नाशिक परिक्षेत्राशी संलग्न असलेल्या ठाणे व बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी पार पडली. यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून माहितीचे अदानप्रदान जलदगतीने करून आंतरराज्यीय गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विचारविनमय करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या गडकरी चौकातील कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीला सुरत परिक्षेत्राचे महानिरीक्षक ग्यानेंद्रसिंग मल्लिक, खारगोणे परिक्षेत्राचे डीआयजी ए. के. पांडे, नाशिक शहराचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह गुजरात राज्यातील डांग, वलसाड, तापी, नवसारी, नर्मदा, मध्यप्रदेशातील निर्मन, वाडवाणी, नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्याचे तसेच बुलढाणा आणि ठाणेचे पोलिस अधीक्षक किंवा अपर पोलिस अधीक्षक हजर होते. दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाचे पोलिस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून आंतरराज्यीत टोळींचे प्रस्थ वाढले असून, देशी कट्टे, मद्य, मानवी तस्करी यात त्यांचा सहभाग आढळून येतो. अगदी घरफोडी वा चेन स्नॅचिंग करणाऱ्या अशा टोळ्या कार्यरत असल्याचे यापूर्वी निष्पण्ण झाले आहे. दळणवळण आणि संपर्क साधनांची उपलब्धता गतीने झाली असून, त्याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो आहे. तुलनेत पोलिस यात मागे असून, एका जिल्ह्यातून अथवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गुन्हेगार सहजतेने जातात. या पार्श्वभूमीवर आयजी चौबे यांनी बॉर्डर मिटिंगचे आयोजन केले. बैठकीत सर्वांनीच आपल्याकडील पाहिजे असलेले, फरार गुन्हेगारांची, गुन्ह्यांची, तसेच मोडस ऑपरेडींबाबतची यादी एकमेकांना हस्तांतरीत केली. दुसरीकडे अनेक वर्षांपासून मिसिंग असलेल्या तसेच अनोळखी मृतदेहांबाबतच्या माहितीचे अदानप्रदान करण्यात आली.

चौबे म्हणाले,'दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही बैठक पार पडली. यापुढे बॉर्डर मिटिंग दरवर्षी आयोजित होणार असून, पोलिस स्टेशन पातळीवर दर तीन महिन्यांनी तर सहायक पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी तर सहा महिन्यांनी भेटून एकमेकांना माहिती देतील. माहितीचे अदानप्रदान अथवा इंटेलिजेन्स गुन्हेगारांइतकेच वेगवान होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्यात आला असून, याआधारे गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती वेगाने शेअर करणे शक्य होणार आहे.' मद्य, अंमली पदार्थ, हत्यारे, जनावरे तस्करी याकडे विशेष लक्ष याद्वारे पुरविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक परिक्षेत्रात अनधिकृत हत्यारांबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. यात ६० कट्टे पकडण्यात आले असून, यातील काहींची निर्मिती मध्यप्रदेशात झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून भिन्न राज्यातील दोन जिल्ह्यांचे पोलिस मिळून गुन्हेगारांना वठणीवर आणू शकतील, असा विश्वास चौबे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साठ दाम्पत्यांकडून श्रीविष्णू, श्रीकृष्णपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच अधिकमासाचे औचित्य साधून श्रीविष्णू व श्रीकृष्णाची महापूजा झाली. साठ दाम्पत्यांनी या पूजेचे यजमानपद भूषविले.

या पूजेप्रसंगी अष्टभुजा देवीसमोर महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राणी भवन संस्थेच्या कार्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. लक्ष्मीनारायण जोडपी, स्वतंत्र नारायण आणि एकेका लक्ष्मीनेही स्वतंत्रपणे पूजा केली. या पूजेचे पौरोहित्य राणी भवन संस्थेच्या महिला पौरोहित्य वर्गाने केले. या संस्थेचे वसतिगृह सर्वाधिक विश्वसनीय मानले जाते. या वसतिगृहाच्या नियोजित बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. शोभा गोसावी, विद्या चिपळूणकर, मंगल सौंदणकर, सुमित्रा गायधनी, भाग्यश्री पाटील आणि सर्व कार्यकारिणी मंडळातील सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाकाचे कुलूप काढले

$
0
0

१५ ऑगस्टपर्यंत सर्व देणी देणार; आमदार डॉ. आहेर यांचे उत्पादकांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व ऊस उत्पादकांची थकित देणी दिली जातील, असे ठोस आश्वासन 'वसाका'चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शुक्रवारी

त्यांच्या आश्वासनानंतर दहा दिवसांपासून कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकलेले टाळे काढण्यात आले. गुरुवारी 'वसाका'चे प्राधिकृत मंडळ, आजी-माजी संचालक, सभासद व कामगारांच्या उपस्थितीत हे टाळे उघडण्यात आले. पुन्हा वसाका बंद करण्याची वेळ येऊ देवू नका, असे भावनिक आवाहन शेतकऱ्यांनी यावेळी केले.

सन २०१७- १८ च्या गाळप हंगामात वसाकाला ऊस उत्पादकांनी पुरवठा केला होता. मात्र साखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणींमुळे व्यवस्थापनाकडून वेळेवर ऊस देणे शक्य न झाले नाही. त्यामुळे १५ मे रोजी ऊस उत्पादकांच्या वतीने वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार आहेर यांनी गुरुवारी वसाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक, सभासद, पुरवठादार व कामगार यांच्या संयुक्त बैठक बोलावली होती.

आमदार डॉ. आहेर म्हणाले, वसाकाची सर्वस्वी जबाबदारी आपण घेतली आहे. अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीत वसाका चालू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दिवंगत आरोग्यमंत्री तथा वसाकाचे माजी चेअरमन दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देवून वसाकाचा कोणताही रुपया खर्च न करता रात्रंदिवस मी व माझे कुटुंब झटत आहे. सभासदांना दिलेल्या शब्दाला आपण बांधील आहोत. इतर कारखान्याच्या तुलनेत वसाकाही चांगला भाव देईन. त्यासाठी सभासदांनी निश्चिंत रहावे. साखरेचे कोसळते भाव व आर्थिक अडचणी यामुळे उत्पादकांचे पैसे देण्यासाठी उशीर झाला. साखर विक्रीतून येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व देणी देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोसळत्या साखर भावामुळे आगामी हंगाम सुरू करणे 'वसाका'पुढे एक आव्हान आहे. सर्व ऊसत्पादक सभासद, कामगार व शेतकरी यांनी वसाका व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. आहेर यांनी केले. यावेळी नितीन पाटील, गौतम जैन, बापूसाहेब राजपूत, कारभारी पवार, गोविंद पगार, सुनील देवरे, पंडितराव निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेस माजी आमदार शांताराम आहेर, जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, सहाय्यक निबंधक संजय गीते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद-कामगार उपस्थित होते. वसाकाचे कार्यकारी संचालक बी. डी. देसले यावेळी अनुपस्थित होते.

नुकसानीस जबाबदार कोण?

कारखान्याला गेल्या १० दिवसांपासून कुलूप लावल्याने सुमारे ४० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल डॉ. आहेर यांनी केला. केंद्र सरकारकडून आजारी व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वसाका कारखान्यास सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, त्यातून प्राधान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे देणे, कामगार, ऊसतोडणी व इतरांचे देणे दिले जाईल.

आम्ही झळ सोसली

कसमादेसह नवापूर, शहादा, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव आदी भागातील शेतकरी सकाळपासून हजर होते. वसाका चालू ठेवा, बंद कारखान्याची झळ आम्ही सोसली आहे, कृपया वसाका बंद ठेवू नका असे भावनिक साकडे उत्पादकांनी आहेर यांना घातले.

पवारांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

वसाका कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठक असतानाही कार्यकारी संचालक बी. डी. देसले गैरहजर असल्याने उपस्थितीतांपैकी अनेकांनी त्याच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच वसाकाचे माजी चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या कार्यकाळातील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरणाने पावसाची चाहूल...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्याच्या तप्त उन्हाच्या चटक्यांमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. दुपारी बारा वाजेपर्यंत सूर्याचे दर्शनही न झाल्याने पाऊस पडणार की काय, अशी चर्चा नाशिककरांमध्ये सुरू झाली होती. परंतु, बारा वाजेनंतर मात्र सूर्यदर्शनाने कडाका वाढला. या विरोधाभासी वातावरणामुळे उकाड्यात पुन्हा वाढ झाली. मात्र, या प्रकारामुळे पावसाची चाहूल लागल्याची चर्चा नागरिकांत रंगली होती.

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने नाशिकमधील ढगाळ वातावरण पाहता पाऊस पडणार असल्याच्या चर्चा सामान्यजनांमध्ये रंगतात. गुरुवारीही असेच चित्र शहरात होते. उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळी नऊ वाजेपासूनच बाहेर पडताना एरवी टोपी, रुमालाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गुरुवारी नाशिककर निर्धास्तपणे शहरात फिरू शकत होते. गेल्या आठवडाभरापासून नाशिकमधील तापमानात तीन ते चार अंशांची घट झाली आहे, तसेच दि. २३ मे रोजी ३३ टक्के असलेली हवेतील आर्द्रता गुरुवारी (दि. २४) ६१ टक्के म्हणजे जवळपास दुपटीने वाढली होती.

--

\Bछत्र्या, रेनकोट बाहेर!

\Bउन्हाळा, हिवाळ्यात ठेवून दिलेले रेनकोट, छत्र्या ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी बाहेर काढून ठेवल्या. ऐन पावसात फजिती नको या उद्देशाने या वस्तू सोबत बाळगण्यास अनेक जण प्राधान्य देऊ लागले आहेत. तसेच, पावसाळ्यात छत्र्या, रेनकोटचे दर वाढतील, या विचाराने अनेक जण आताच पावसाळ्याच्या खरेदीला प्राधान्य देऊ लागले आहेत.

- - -

\Bआठवडाभरातील तापमान

\Bदिनांक कमाल किमान आर्द्रता

१९ मे ३९.० २२.६ ५५ टक्के

२० मे ३९.३ २२.६ ५१ टक्के

२१ मे ३७.८ २२.२ ६८ टक्के

२२ मे ३६.३ २२.४ ४६ टक्के

२३ मे ३६.८ २४.४ ३३ टक्के

२४ मे ३६.३ २४.४ ६१ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मायबाप’ने प्रेक्षकांना केले अंतर्मुख

$
0
0

वसंत व्याख्यानमालेत कवितांचा एकत्रीत कार्यक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसे पोटार्थी होऊन खेड्याकडून शहराकडे लोंढे घेऊन निघालीत. त्यांना आपल्या गावाचे संस्कार, एकत्र कुटुंबपध्दती, आचार-विचार या बंद फ्लॅटच्या अरूंद खोलीत अडगळ वाटू लागली. त्यामुळे त्यांनी ते गावाकडेच सोडून देणे पसंत केले. काहींनी सोबत आणले पण, त्यांना ते झेपवेनासे झाले. आई-वडील कामाला आणि मुले पाळणाघरात, अशी नवी संस्कृती उदयास येऊ लागली. त्यातून अरूणराज ग्रुपने मायबाप हा कार्यक्रम निर्माण केला. या कार्यक्रमात आई आणि वडील यांच्याबद्दल ज्या-ज्या कवींनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या त्यातल्या काही काळजाला हात घालणाऱ्या कवितांचा एकत्रीत कार्यक्रम म्हणजे मायबाप होय.

वसंत व्याख्यानमालेत चोविसावे पुष्प राजेंद्र उगले व अरूण इंगळे यांनी गुंफले. 'माय बाप : एक कृतज्ञता' हा आई-वडिलांबद्दल संगीतावर आधारित कार्यक्रम गुरूवारी सादर झाला. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर हे व्याख्यान सुरू आहे. गुरूवारचे व्याख्यान शांतारामबापू वावरे यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते.

'मह्या मायमुळे थिटं, समदं देऊळ राऊळ... तिच्या पायाच्या चिऱ्यात, माहे अजिंठा वेरूळ' ही कविता मनाचा ठाव घेऊन गेली. 'काय देऊ पोरी तुला, नाही माझ्यापाशी काही...दिल्या घेतल्याचं जग, कुणी कुणाचं गं नाही' या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. यात प्रशांत असनारे, अशोक बुरबुरे, विजयकुमार मिठे, कमलाकर देसले, गौरवकुमार आठवले, राजेंद्र उगले, अरूण इंगळे, प्रशांत मोरे यांच्या कवितांचा समावेश होता. सूत्रसंचालन दत्ता अलगट यांनी केले. सिंथेसायझरवर नरेंद्र जाधव तर तबल्यावर प्रणव कोंटूरवार यांनी साथसंगत केली.

आजचे व्याख्यान

वक्ते : ब्रह्मकुमार सुरजभाई

विषय : जीवनविषयक शंका समाधान

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या दौऱ्यासाठी मैदान झाले चकाचक!

$
0
0

आयुक्तांच्या दौऱ्यासाठी मैदान झाले चकाचक! (फोटो)

जेलरोड : वॉक विथ कमिशनर या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी (दि.२६) नाशिकरोडला येणार आहेत. मुक्तिधाममागील आनंदनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर ते नागरिकांशी संवाद साधतील. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी या मैदानाची साफसफाई करण्यात आली. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी मैदानाचा प्रत्येक कोपरा साफ केला. स्वच्छतेपासून व्यवस्थापनापर्यंत काहीही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी वरिष्ठ अधिकारी घेत आहेत.

कालव्यात मृतदेह

पंचवटी : गंगापूर डाव्या कालव्यास सध्या आवर्तन सुरू असून, गुरुवारी (दि. २४) औरंगाबादरोडवरील नीलगिरी बागेलगत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशिष पांडुरंग बांडे (वय २१, रा. हनुमानवाडी) याचा मृतदेह सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. तपासात पंचवटी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २३) आशिष हरविल्याची तक्रार दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

वृक्षांवर कुऱ्हाड (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील लोखंडे मळ्यात गुरुवारी सकाळी रहिवाशाने अंगणातील झाडे तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. टाकळी रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी सव्वाशे झाडे तोडण्यात आल्यानंतर जागामालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडे मळ्याच्या शेवटच्या टोकाला अशोका व आंब्याची हिरवीगार झाडे आहेत. या झाडांमुळे लोखंडे मळ्याला शोभा आली असताना त्यातील काही झाडांवर संबंधिताने कुऱ्हाड चालवली. नागरिकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

७८ विद्यार्थ्यांना रोजगार

सातपूर : आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सातपूरच्या आयटीआयमध्ये रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील लघु उद्योजकांनी आयटीआय उत्तीर्ण ७८ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. रोजगार मेळाव्यात आयटीआयचे प्राचार्य व शिक्षकही सहभागी झाले होते. दि. २८ मे रोजी पुण्यातील बड्या कंपन्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

अफवांवर उतारा -२

रामकुंडात तरंगतेय निर्माल्य -३

ब्रीद ठेवा बुलंद… -४

नंदनवनातील अनामिक -५

भाषेपेक्षा भूमिका महत्त्वाची -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images