Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धुळे, नंदुरबारला साखरेचे वाटप

$
0
0

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पेट्रोल-डिझेलच्या भडकलेल्या दरांमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत शहरातील श्रीराम पेट्रोल पंपावर युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानहून आयात केलेली साखर वाटून अनोखे निषेध आंदोलन केले.

एकीकडे सीमेपार पाकिस्तानकडून गोळीबार केला जाता आहे. भारतीय जवान त्यात जखमी होऊन अनेक नागरिक जायबंदी झाले आहे. देशप्रेम दाखविणाऱ्या भाजपने महिनाभरासाठी बंद केलेल्या दहशतवादविरोधी कारवाई आणि शस्त्रसंधीच्या घोषणेचा फायदा घेत पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. मात्र, आपले केंद्र सरकार त्याच पाकिस्तानची साखर आयात करून देशाला कोणता नवीन संदेश देत आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, उपाध्यक्ष सुरेखा बडगुजर, प्रभा परदेशी, संगीता देसले, बानुबाई शिरसाठ, योगेश विभुते, रफिक शाह, इम्तियाज पठाण, महेश कालेवार आदी उपस्थित होते.

नंदुरबारलाही निषेध
देशाच्या जनतेला मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केवळ आश्वासने दिली आहेत. एकीकडे देशातील महिलांवर अत्याचार वाढत आहे. तरुणांची फसवणूक होत असून ते बेरोजगार होत आहेत. शेतमजूर, शेतकरी हैराण होऊन आत्महत्या करीत आहेत. याच्या निषेधार्थ नंदुरबारात शनिवारी सकाळी ११ वाजेला धुळे चौफूलीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला. या वेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. आंदोलनात दत्तू चौरे, सभापती विक्रमसिंह वळवी, बी. के. पाटील, डॉ. सयाजी मोरे, कैलास पाटील, रवींद्र पवार, लकी रघुवंशी, कुणाल वसावे, हिरालाल चौधरी, भरत पाटील, पुरुषोत्तम पाटील, अंकुश पाटील, गोपाल पवार, नरेश पवार आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामकुंड भागातील पार्किंगमध्ये कचरा

$
0
0

पंचवटी : रामकुंड भागातील पार्किंगमध्ये कचऱ्याचा ढिगारा साचलेला आहे. होळकर पुलाच्या दक्षिणेच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील कचरा गोळा करून टाकण्यात आलेला आहे. या ढिगाऱ्यात पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, शहाळे, कपडे आदी वस्तू आहेत. साचलेल्या कचऱ्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा त्वरित उचलून घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. (फोटो)

--

तात्पुरत्या शेडची उभारणी

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसाळ्यात उघड्यावर शेतमालाची खरेदी-विक्री करणे शक्य होत नसल्यामुळे तात्पुरत्या शेडची उभारणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या पार्शभूमीवर होणारे हे शेड वॉटरप्रूफ करण्यात येते. त्यात शेतमालाचे लिलाव करणे सोयीचे होते. पावसाळ्यानंतर हे शेड काढून घेण्यात येतात.

--

सिग्नल धोक्यात

पंचवटी : औरंगाबादरोडवर उभारण्यात आलेल्या कैलासनगर येथील सिग्नलची सुरक्षितता धोक्यात आहे. अगदीच रस्त्यालगत असलेल्या या सिग्नलच्या खांबांच्या सुरक्षतेसाठी काहीच सुविधा नसल्यामुळे त्यांच्यावर वाहने आदळून सिग्नल मोडून पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पडलेले खांब पुन्हा उभे करण्यात आले असले, तरी ते ज्या ठिकाणी आहेत, त्यावर पुन्हा वाहने आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

(थोडक्यात)

----------

(पॉइंटर्स)

हवे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ -२

निवारा केंद्र 'वाऱ्यावर' -३

सरप्राइज देणारी 'हरिभक्ती' -४

अखेर घरी पोहोचलो -५

महिलांसाठी आवाज बुलंद -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही पॅनलतर्फे आरोप-प्रत्यारोप

$
0
0

जातीयवादी प्रचार, धमक्या दिल्याचेही आरोप

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या २९ मे रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात रविवारी दोन्ही पॅनलने पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप केले. या निवडणुकीत २६ पैकी २५ जागांची बिनविरोध निवड झाली असली तरी अध्यक्षपदाच्या निवडीमुळे दोन्ही गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपही होऊ लागल्याने उद्योजकांच्या संघटनेतील हे 'उद्योग' चर्चेचे ठरले आहेत.

या निवडणुकीत एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी वरुण तलवार, तर विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांच्यात लढत आहे. सुमारे १५०० सदस्य असलेल्या या औद्योगिक संघटनेमध्ये सर्व जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसल्यामुळे अध्यक्षपदासठी ही निवडणूक होत आहे. रविवारी दोन्ही गटांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. एकता पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वरुण तलवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आयमाचे माजी अध्यक्ष धनजंय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील, पी. एस. पाटील, राधाकृष्ण नाईकवाडे, जितेंद्र आहेर, सचिन शर्मा हे उपस्थित होते. विरोधी गटाचे उमेदवार तुषार चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेला संजय महाजन, कैलास आहेर, हिमांशु कणानी, बाळासाहेब गुंजाळ, राजेंद्र नागरे, जयंत पवार, नीलेश पवार उपस्थित होते.

आयमामध्ये एकाधिकारशाही : तुषार चव्हाण

आयमा निवडणुकीत एकाधिकारशाही व घराणेशाहीने प्रवेश केला आहे. त्यामुळे मनमानी वाढली आहे. गेल्यावेळेस अध्यक्षपदासाठी मला शब्द दिला होता. तो पाळण्यात आलेला नाही. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात उपाध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण, त्यालाही मान्यता दिली नाही. त्यामुळे निवडणूक लढवत आहोत. संस्थेचा फायदा व्हावा म्हणून केलेल्या तक्रारीमुळे आयमाला फायदा झाल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

जातीयवादी प्रचार व धमक्या : वरुण तलवार

आयमाच्या निवडणुकीत जातीयवादी प्रचार केला जात आहे. ही उद्योजकांची संघटना असून, येथे जातीवर काहीच ठरत नाही तर कतृत्व व कामावर त्याची निवड केली जाते. गेले अनेक वर्षे मी संस्थेसाठी काम केल्यानंतर मला ही संधी मिळाली असल्याचे एकता पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार वरुण तलवार यांनी सांगितले. विरोधी गट जातीयवादी मेसेज पाठवून निवडणुकीला जातीयतेचा रंग देत आहे. त्याचप्रमाणे काही उद्योजकांना धमक्या सुध्दा दिल्या जात आहेत. धनजंय बेळे यांनी सांगितले, की तुषार चव्हाण यांना आतापर्यंत कोणताच शब्द दिला नाही. ही खासगी संस्था नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता अभियंत्याचा लागेना थांगपत्ता...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या ताणतणावाला कंटाळून जीवन संपवीत असल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठी ठेवून शनिवारी बेपत्ता झालेल्या महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक अभियंत्याचा रविवारी दुसऱ्या दिवशीदेखील थांगपत्ता लागलेला नाही. संबंधित अभियंत्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

रवींद्र प्रेमनाथ पाटील (वय ४२, रा. डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड) हे शनिवारी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके पाटील यांना शोधण्यासाठी तैनात केली आहेत. मात्र, ठिकठिकाणी तपास करूनही रविवारी सायंकाळपर्यंत त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील आपला मोबाइल वाहनातच ठेवून निघून गेलेले आहेत. शनिवारपासून त्यांचा शोध घेतला जात असून, त्यांचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे.

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जाण्यासाठी म्हणून रवींद्र पाटील शनिवारी पहाटे घराबाहेर पडले होते. काही वेळाने कामानिमित्त त्यांच्या पत्नी घराबाहेर आल्या असता पाटील यांची कार घराजवळच असल्याचे आढळून आले. त्यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही कारमध्ये असल्याचे दिसून आले. कारचे दरवाजे उघडले असता मोबाइलसह कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. या चिठ्ठीमध्ये आपण जात आहोत, कोणाचे वाईट केलेले नाही, तसेच आपला शोध घेऊ नये, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.

--

शहरासह अन्यत्रही शोध

पोलिसांच्या एका पथकाने रविवारी पुन्हा एकदा गोदावरी नदीवरील धरण ते रामकुंड या परिसरात शोध घेतला. दुसऱ्या पथकाने शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके, तेथील सीसीटीव्ही, शहरानजीक असलेली पर्यटनस्थळे अशा ठिकाणी पाटील आढळतात का, या दृष्टीने तपास केला. पोलिसांनी धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, मुंबई, तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांचे छायाचित्र पाठवून शोध घेण्याची विनंती केली आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंतही पाटील यांचा पत्ता लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

--

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पाटील हे सर्वांत शेवटी नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे शनिवारी सकाळी दिसले होते. तेथील, तसेच शहरातील बस स्थानकांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यानंतर यादरम्यान आलेल्या व गेलेल्या सर्व रेल्वे गाड्यांबाबत पोलिसांनी माहिती घेतली. पोलिसांनी लागलीच मुंबई येथेही पाटील यांच्याबाबत कळविले आहे.

--

सर्व बाबी घेणार रॅकार्डवर

याबाबत सूत्रांनी बोलताना सांगितले, की कार्यालयीन त्रासामुळे पाटील यांनी घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हायकोर्टाने नुकताच महापालिकेविरोधात निकाल दिला. या सर्व घटना-घडामोडी या केसशी संबंधित असून, तपासाच्या दृष्टीने त्या रेकार्डवर घेतल्या जाणार आहेत. पाटील सापडणे महत्त्वाचे असून, त्यांचे धागेदोरे सापडण्याबाबत अद्याप एकही क्लू समोर आला नसल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्रा चावल्याने बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काही महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या बालकाचा शनिवारी (दि.२६) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अनिल दत्ता बोराडे (वय १२ रा. इंदिरानगर, जेलरोड) असे या बालकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या घरासमोर खेळत असतांना त्यास कुत्र्याने चावा घेतला होता. या घटनेत जखमी झाल्याने त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी अचानक त्याची प्रकृती खालवली. वडील दत्ता बोराडे यांनी त्यास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुपारच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

संशयितास अटक

नाशिक : चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या सतीश संजय खरात (वय २३, रा. महाकाली चौक, मंदिराजवळ, सिडको) यास पोलिसांनी अटक केली. इंदिरानगर पोलिस स्टेशनचे गस्ती पथक शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना संशयित आरोपी पाथर्डी फाटा परिसरातील शांती निकेतन सोसायटीच्या भिंतीलगत लपलेला दिसला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप देवराम लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशला गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रहीन बांधवांकडून रक्तदानरुपी ‘अंजन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटीत भासणारा रक्ताचा तुटवडा ध्यानात घेऊन राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या दहा नेत्रहीन बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सुदृढ डोळस व्यक्तींच्या डोळ्यांत जणू अंजनच घालताना इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले आहे.

'ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहात चलो' असा संदेश नेहमीच सर्वांच्या कानी पडत असतो. मात्र, त्याचे अनुकरण करणारे फार कमी असतात. विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना उन्हाळ्यात रक्ताची तीव्र गरज असते, ही गरज ओळखून नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या दहा नेत्रहीन बांधवांनी रक्तदान करून जणू समाजापुढे अनुकरणीय आदर्शच उभा केला आहे.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन, हौसला फाऊंडेशन, अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ मे) दिवंगत समाजसेवक जेम्स अँथनी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत असून, यंदा संस्थेचे मार्गदर्शक हरीश बैजल यांच्या नेतृत्वाखाली योगा हॉल, अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबकेश्वररोड येथे सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनतर्फे दहा नेत्रहीन बांधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य, हौसला फाउंडेशन, जेम्स अँथनी यांची फुटबॉलप्रेमी मित्रमंडळी यांच्यासह १५० हून अधिक व्यक्तींनी या शिबिरात रक्तदान केले. या व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठीच्या भावनेतून रक्तदान करू शकतात, तर सामान्य नागरिकांनी नक्कीच रक्तदान करायला हवे, असे आयपीएस अधिकारी हरीश बैजल म्हणाले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुटी आणि पर्यावरणीय बदल यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा भासतो. म्हणून या दिवसांत रक्तदान शिबिरे आयोजित व्हायला हवीत, असेही बैजल म्हणाले.

...यांनी घेतला पुढाकार

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर व्यायामासाठी येणाऱ्या अनेकांनी या शिबिरात सहभाग घेतला आणि शिबिर याच ठिकाणी घेण्याचा निर्णय सार्थकी लागल्याची भावना यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी व्यक्त केली. एकूण १५० हून अधिक रक्तपिशव्या संकलित झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सचिव नितीन भोसले, उपाध्यक्ष योगेश शिंदे, मार्गदर्शक शैलेश राजहंस, सदस्य वैभव शेटे, नीता नारंग, पल्लवी पवार यांच्यासह ब्लाइंड वेल्फेअरचे अरुण भारस्कर, हौसलाचे तेजस चौहान, अक्षय जोंधळे, अनिल सिंग आदींनी रक्तदान करीत इतर दात्यांना रक्तदान करण्यास मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारच्या ४० टक्के शाळा महिला शिक्षकांविना!

$
0
0

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अजबगजब अहवाल

पंकज काकुळीद, धुळे

राज्य सरकारच्या बदली धोरणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ४० टक्के शाळा महिला शिक्षकांविना राहणार असून, जिल्हा परिषदेने केलेल्या अवास्तव निर्णयामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रचंड असंतोष खदखदत आहे. चक्क तालुक्याच्या शाळेवरही महिला काम करू शकत नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

वर्षानुवर्षे नंदुरबार तालुका जिल्हा मुख्यालयाजवळ ठाण मांडून बसलेल्या संघटनेच्या तथाकथित पुढाऱ्यांना विस्थापित करण्यासाठी आणि दुर्गम भागात हयात खपविणाऱ्या दुर्लक्षित शिक्षकांना न्याय देण्याचा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ग्रामविकास सचिव असीम गुप्ता व टीमने अत्यंत परिपूर्ण असे नवीन बदली धोरण २०१७ मध्ये तयार केले. मात्र, प्रत्येक वेळी त्यातून पळवाटा शोधणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांना हे धोरणही चांगलेच पथ्यावर पडलेले दिसत आहे. राज्य सरकारच्या नवीन बदली धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात अवघड व सोपे क्षेत्र ठरविण्यात आले. यामध्ये ज्या गावांना सहज पोहचणे शक्य नाही अशा शाळा अवघड म्हणून घोषीत करणे आवश्यक असताना चक्क राज्य मार्गावरच्या शाळा अवघड क्षेत्रात गणण्यात आल्या. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील १३०० पैकी तब्बल ५५० म्हणजे सुमारे ४० टक्के शाळा अवघड म्हणून जाहीर केल्या गेल्या.

हा एक गैरप्रकार झालेला असतानाच ५५० शाळांपैकी महिला कर्मचाऱ्यांना प्रतिकूल शाळा निवडण्याचा दुसरा फतवा सरकारने काढला. त्याचाही चुकीचा अर्थ लावत नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने त्यापैकी ५४२ शाळा महिला शिक्षकांसाठी प्रतिकूल असल्याचा अजब अहवाल तयार केला. याच ५४२ गावांमध्ये जिल्हा परिषदेचेच शेकडो कर्मचारी काम करत असताना फक्त महिला शिक्षकांच्या बाबतीतच ते प्रतिकूल कसे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. अर्थात सरकारच्या बदली धोरणातील मार्गदर्शक सूचना कोणत्याही प्रकारे पालन न करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने हा प्रकारही दोन-चार तथाकथित शिक्षक पुढाऱ्यांना जवळ बसवून आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुविधा अनुकूल; अहवाल प्रतिकूल
जिल्हा परिषद प्रशासनाने महिला शिक्षकांसाठी प्रतिकूल म्हणून घोषित केलेल्या शाळांच्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य विभागाच्या शेकडो महिला कर्मचारी काम करत असताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हा अहवाल कोणते निकष लावून तयार केला. अगदी तालुक्याचे गाव आणि राज्य मार्ग क्रमांक एकवरील गावे महिला शिक्षकांसाठी प्रतिकूल कसे असू शकतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. गेली ७० वर्षे दुर्गम भागात महिला काम करत असताना या गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारच्या सर्वच सुखसोई उपलब्ध करून दिलेल्या असतानाही हा अजब अहवाल कसा तयार करण्यात आला. महिला शिक्षकांना प्रतिकूल असलेली गावे जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांनाही लागू होऊन या ५४२ गावांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही ही गावे प्रतिकूल घोषित केली जातील काय? असाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

महिलांसाठी प्रतिकूल शाळांची आकडेवारी

तालुका.....................शाळा संख्या
शहादा.....................२६
तळोदा.....................२७
अक्कलकुवा............२०४
धडगाव...................२८५
एकूण.....................५४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहादा तालुक्यात दोन बालिकांचे अपहरण

$
0
0

पंधरा दिवसांत दुसरी घटना; पोलिसांना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा शोध लागत नाही ताचे दि. २२ मे रोजी पुन्हा दोन बालिकांचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून, यामागे मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामधील गुन्हेगारांचा शोध घेणे पोलिसांपुढे कडवे आव्हान ठरणार आहे.

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरातील रहिवाशी संपाराम मोज्या ठाकरे हे भाऊ गणपत मोज्या ठाकरे यांचे लग्न असल्याने नातेवाइकांकडे लग्नपत्रिका देण्यासाठी गेले होते. दि. २१ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संपाराम ठाकरे दुसऱ्या दिवशी घरी परत आल्यावर पत्नी सुरमीबाई ठाकरे यांनी दोघा मुलींचे अपहरण झाल्याचे सांगितले. अपहरण झालेल्या संदना व योगिता यांच्यासह सुरमीबाई झोपडीत झोपलेल्या असताना पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास जाग आल्यावर संदना व योगिता दोघीही दिसल्या नाहीत. दरम्यान, जवळीलच दगा महाराज आश्रम, गौशाळा येथील बबन भिमा पावरा (रा. तुळोजा ता. तळोदा) हा दिसून आला नाही. या प्रकरणी दगा महाराज गौशाळेत देखरेख करणाऱ्या बबन पावरा याने केल्याच्या संशयावरून शहादा पोलिस ठाण्यात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित बबन पावरा व बालिकांच्या शोधासाठी गुजरातकडे पथके रवाना झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्याने देश दु:खी

$
0
0

धर्मसभेत संभाजी भिडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आज देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीअभावी देश रक्तबंबाळ होत आहे, राष्ट्रीयत्वाची कमतरता असल्याने देश दु:खी आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा अभिमान जोपर्यंत आपल्या रक्तात येत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ‘वांझ’ आहोत, असेही भिडे यावेळी म्हणाले. शहरातील सरदार वल्लभदास वालजी सभागृहात रविवारी (दि. २७) आयोजित ‘३२ मण सुवर्ण सिंहासन व खडा पहारा’ याविषयी ते बोलत होते.

आजपर्यंत आपल्या भारत देशावर अनेक राष्ट्रांनी आक्रमण केली. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांचीच संख्या जास्त होती. याची आठवण करून देत भिडे यांनी आजच्या युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याची गरज असल्याचे मत भिडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात धर्मप्रार्थनेने सुरुवात झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आपल्या पूर्वजांचा इतिहास जो समाज वाचत नाही, आत्मसात करत नाही, तो समाज देश-विश्वसंघर्षात वाचणार नाही. छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगडावरील सुवर्ण सिंहासन नाहीसे झाले. शिवरायांच्या मनाला झालेल्या वेदना पुसून टाकणे व महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच हे सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प ४ जून, २०१७ रोजी लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावर घेण्यात आला. ज्या सिंहासनावर बसून महाराजाचा राज्यभिषेक झाला, ते ठिकाण अखंड हिंदुस्थानासाठी पवित्र आहे. म्हणूनच राजदरबारात ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापित करणे गरजेचे आहे, असेही भिडे शेवटी म्हणाले.

पोलिसांकडून बंदोबस्त
शहरातील या धर्मसभेबाबत अनेक बहुजन संघटनांनी विरोध दर्शवत निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या धर्मप्रार्थना सभेला महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच पोलिसांकडूनही या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सभेच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर सभेच्या रस्त्यालगत बॅरिकेड्सही लावण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांपासून दुरावलेल्या चिमुकलीस मदतीचा हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नांदेडहून नाशिकला आलेल्या अन् मामाच्या निष्काळजीपणामुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात एकटीच बसून असलेल्या चारवर्षीय चिमुकलीस वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांनी मदतीचा हात देत पोलिसांकडे सुपूर्द केले. तनुश्री अशोक दीक्षित असे या चिमुरडीचे नाव असून, ती तिच्या मामासोबत नांदेडहून येथे गोदास्नानासाठी आली होती.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगच्या जागेत तनुश्री शुक्रवारी दुपारी काही तास एकाच जागेवर एकटीच बसून होती. तिच्याजवळ तिच्या कुटुंबाचे साहित्यही होते. सायंकाळपर्यंत तिचे कुटुंबीय परत न आल्याने चिमुरडी तनुश्री घाबरली. हा प्रकार रेल्वे स्टेशन रिक्षाथांब्यावरील काही रिक्षाचालक आणि वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांच्या लक्षात आला. गौतम सोनवणे व काही रिक्षाचालकांनी आस्थेने चौकशी करून तिला नाव विचारले असता तिने तिचे नाव तनुश्री दीक्षित असे सांगितले. तिच्यासोबत तिचा मामा आलेला असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे रिक्षाचालकांनी आजूबाजूला तिच्या मामाचा शोध घेतला असता तिचा मामा सतीश शर्मा रेल्वे स्टेशन परिसरात मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याच्याकडे काहीही माहिती उपलब्ध न झाल्याने शेवटी गौतम सोनवणे आणि इतर रिक्षाचालकांनी तनुश्रीला नाशिकरोड बसस्थानकावरील पोलिस चौकीत आणले व पोलिसांच्या ताब्यात दिले. सायंकाळी या मुलीला गौतम सोनवणे यांनी आपल्या घरी नेऊन जेवण दिले व पुन्हा पोलिस चौकीत आणले.

...अन् पालकांशी झाला संपर्क

पोलिसांनी तनुश्रीच्या मामाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यातील कागदपत्रांवरील फोन नंबरवर फोन केला असता तनुश्रीच्या आजीशी संपर्क झाला, तेव्हा तनुश्री नाशिकमध्ये कशी आली याचा उलगडा झाला. परंतु, या चिमुरडीचा मामा सतीश शर्मा मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो तिला एकटीला सोडून का गेला होता, याचे कारण समजू शकले नाही. पोलिस कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे आणि इतर रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानाने चार वर्षांच्या तनुश्रीचा घरी परतण्याचा मार्ग सुकर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे

$
0
0

चिंचखेडचे तिडके यांची चौकशीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत शहरालगत असलेल्या चिंचखेड (ता. दिंडोरी) या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी दगडी सोलिंग न करता केवळ काम उरकण्याचा प्रयत्न होत असून, या निकृष्ट कामाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी चिंचखेड येथील जागरूक नागरिक शंकर मधुकर तिडके यांनी केली आहे. शंकर तिडके यांनी या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिकचे जिल्हाधिकारी, दिंडोरीचे तहसीलदार, तसेच दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

चिंचखेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नानासाहेब तांबे यांचा मनमानी कारभार सुरू असून, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. येथील दलित वस्तीत पूर्वी झालेल्या रस्त्यावरच पुन्हा काँक्रिटीकरण सुरू केले असून, ते ही निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर दगड सोलिंग केलेले नाही तसेच, रस्त्याखालून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपबाबत कोणतेही नियोजन न करताच रस्त्याचे काम होत आहे. रस्त्यासाठी वापर करण्यात येणारे सिमेंट, वाळू यांचे प्रमाण अल्प व निकृष्ट आहे. त्यामुळे दलित वस्तीतील रस्ता काँक्रिटीकरण केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरतेच झाल्याचे लक्षात येते, असे शंकर तिडके यांनी निवेदनात म्हटल आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष असून, या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शौचालयामुळे आरोग्य धोक्यात

ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत बांधलेल्या सुलभ शौचालयाला पाणीपुरवठा होत नाही. त्यातच शौचालय रस्त्यालगत असून, शेजारी बालवाडी आहे. शौचालयाची दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे बालवाडीतील मुलांबरोबरच परिसरातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय अनुदानातील सुलभ शौचालयाचे वाटप करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगीत शंकरा’ची रसिकांसाठी पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि विप्रा क्रिएशन्स आयोजित संगीत शंकरा या संगीत नाटकाची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

येत्या बुधवारी (दि. ३० मे) सायंकाळी ५.३० वाजता आणि रात्री ९.३० वाजता या नाटकाच्या दोन प्रयोगांचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत नाटकात चारुदत्त आफळे, गौरी पाटील, अद्वैत केसकर शिरीष घाग, संजीवनी समेळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे.

कल्चर क्लब सदस्यांना या नाटकाचे तिकीट सवलतीच्या दरात मिळणार आहे. सदस्यांना ३०० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री मिळणार आहे, तर नवीन सदस्य होणाऱ्यांना ३०० रुपयांचे एक तिकीट फ्री मिळेल. मात्र, ही सवलतीच्या दरातील तिकिटे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात मिळतील. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

(बातमीत कल्चर क्लब च्या सोशल मीडियाच्या लिंक, लोगो आणि वेबसाईट घ्यावी.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जनरल वैद्यनगर येथील ब्यूटीपार्लर चालविणाऱ्या महिलेने महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ग्राहक महिलेकडून एक लाख ६० हजार रुपये उकळले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गीतांजली सराफ (राधेय संकुल, जनरल वैद्यनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मीनाक्षी बोराळे (वय ३९, रा. कल्याणी अपार्ट. काठे गल्ली) यांनी फिर्याद दिली. मेकअप करण्यासाठी बोराळे सराफ यांच्या सखी ब्यूटीपार्लरमध्ये वरच्यावर जात होत्या. यातूनच दोघींची ओळख झाली होती. नाशिकरोड कोर्टात स्टेनो म्हणून काम करते. माझी मंत्रालयात ओळखी असल्याचे भासवत सराफ यांनी बोराळे यांना महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. बोराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी सराफ यांच्यावर विश्वास ठेवला. नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सराफ यांनी बोराळे यांच्याकडून १ फेब्रुवारी २०१७ ते ९ मे २०१७ या दरम्यान दोन ते तीन वेळा मिळून एक लाख ५० हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याचे पाहून बोराळे यांनी चौकशी केली. मात्र, सराफ यांनी पैसे परत न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बोराळे यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पीएसआय पवार करीत आहेत.

नगरसेविकेसह इतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हा

पोलिसांच्या परवानगीशिवाय धरणे आंदोलन करणाऱ्या नगरसेविकेसह इतर २० ते २२ आंदोलनकर्त्यांवर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मुंबई अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पूनम मोगरे, वैभव ढिकले, योगेश बेलदार, अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, अंबादास जोशी, विश्वास तांबे, बब्बू गोसावी, ज्योती देवरे, मंगला भास्कर यांच्यासह इतर १० ते १२ आंदोलनकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास पंचवटीतील पंजाब पेट्रोल येथे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनचे कर्मचारी चंद्रकांत शेलार यांनी फिर्याद दिली असून, घटनेचा अधिक तपास हवालदार बोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्गो विमानाची चाचणी यशस्वी

$
0
0

Bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : तब्बल ११० टन क्षमता असलेले बोइंग ७४७-२०० या जेट कार्गो विमानाची यशस्वी चाचणी ओझर विमानतळावर घेण्यात आली. यापुढे मोठे एअर कार्गो विमान येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच ओझर हे कार्गो वाहतुकीसाठी मुंबईजवळचे सर्वोत्तम ठिकाण असल्याचा संदेशही जगभरात या निमित्ताने जाणार आहे.

ओझर येथे एचएएलच्या मालकीचे विमानतळ आहे. लढाऊ विमानांची चाचणी घेण्यासाठी विकसित असलेले हे विमानतळ काही वर्षांपासून प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले आहे. ओझर येथेच विमानतळालगत एचएएल आणि कॉनकॉर यांनी संयुक्तरीत्या हॅलकॉन कंपनीची स्थापना करून २०११ पासून कार्गो व्यवसाय सुरू केला. ओझर ते दुबई ही शेळ्यांची निर्यात वगळता अन्य मालाची थेट निर्यात अद्याप येथून झालेली नाही. यापूर्वी एक रशियन कार्गो विमान २०१२ मध्ये ओझर विमानतळावर आले होते. मात्र, व्यावसायिक स्तरावरील सर्वांत मोठे कार्गो विमान अद्याप येथे आले नव्हते.

रविवारी, २७ मे रोजी बोइंग ७४७-२०० हे जम्बो जेट कार्गो विमान अफगाणिस्थानातील काबूलहून निघाले आणि अवघ्या तीन तासांत म्हणजेच दुपारी बाराला ते ओझरमध्ये दाखल झाले. या विमानाची तब्बल ११० टन क्षमता आहे. दुबईच्या जीएसएस सोल्युशन या आंतरराष्ट्रीय कंपनीचे हे विमान आहे. अमेरिकन कॅप्टन ख्रिस्तोफर फॉक्स या पायलटसह एकूण सात कर्मचारी या विमानासोबत आले आहेत. कार्गोसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा आदींची चाचपणी घेतली जाणार आहे. या सर्वांची निवासव्यवस्था, तसेच विमानतळावरील पायाभूत सुविधा हे सारे जोखण्यात आले आहे. हे विमान सोमवारी, २८ मे रोजी सकाळी सात वाजता पुन्हा काबूलच्या दिशेने झेपावणार आहे. कार्गो विमानाच्या यशस्वी लँडिंगबाबत कंपनीचे संचालक मनोज अजवणी यांनी समाधान व्यक्त केले. या विमानाच्या आणखी आठ-नऊ चाचण्या ओझरमध्ये घेतल्या जाणार असल्याचे अमिगो एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक साजीद खान यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. खान यांनीच यासाठी प्रयत्न केले आहेत. व्यावसायिक मोठे कार्गो विमान ओझरला आल्याने हा संदेश पूर्ण जगभरात जाईल आणि यापुढे अन्य कार्गो विमानेही ओझरला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा आशावाद निर्यातदार हेमंत सानप यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळोशे किलो गांजा पकडला

$
0
0

भुवनेश्वर एनसीबीची कारवाई

पाळेमुळे शोधण्याचे कोलकाता एनसीबीचे संकेत

नाशिकला येणारा होता गांजा

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : आंध प्रदेश आणि ओडिसा राज्याच्या सीमावर्ती भागातून नाशिकला येणारा तब्बल सोळाशे किलो आणि अडीच कोटी रुपयांचा गांजा भुवनेश्वरच्या अॅण्टी नार्कोटिक्स विभागाने पकडला. अतिदुर्गम आणि नक्षली भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा गांजा नाशिकला कोठे आणि कोणासाठी येत होता, हे शोधण्याचे काम कोलकाता अॅण्टी नार्कोटिक्स विभागाने हाती घेतले आहे.

या कारवाईबाबत बोलताना पूर्व विभागाच्या कोलकाता नार्कोटिक्स कंट्रोल युनिटचे प्रमुख दिलीपकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, की आमच्या विभागीय कार्यालयामध्ये भुवनेश्वरचा समावेश होतो. शुक्रवारी (दि. २५) भुवनेश्वर युनिटने हा गांजा हस्तगत केला. सीमावर्ती भागातील ओडिसा राज्यातील ओरॅकल पोलिस स्टेशन हद्दीतील मलकानगिरी येथील बालीमेळा चौकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी युनिटने मुगी व्यंकेटेश वल्ल (वय ३६) आणि चांटी सुरेश (दोघे रा. करणूर, आंध प्रदेश) यांना अटक केली. एका ट्रकमध्ये गांजा आणि मीठ घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. दोन राज्यांचा सीमावर्ती भाग नक्षलग्रस्त असून, येथून हा गांजा नाशिकला रवाना होणार होता, अशी माहिती अटक केलेल्या संशयितांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे तपासाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे लक्ष नाशिककडे वळविले असल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

नाशिकला यापूर्वी रेल्वेमार्गे गांजाची तस्करी होत असल्याची बाब पोलिसांनी शोधून काढली होती. दक्षिणेला जोडणारे येवल्या तालुक्यातील नगरसूल हे महत्त्वाचे स्टेशन असून, शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत तस्कर सहभागी व्हायचे. गांजाचा उग्र वास कमी करण्यासाठी उदबत्ती पुड्यांचा आसरा घेतला जायचा. रेल्वेतून उतरल्यानंतर तस्कर खासगी वाहनाने गांजा वितरीत करायचे. ग्रामीण तसेच शहर पोलिसांनी मोठ्या स्वरूपात कारवाई केल्यानंतर हे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र मोठ्या प्रमाणावर गांजा वेळेवरच पकडण्यात यश मिळाले असून, तस्करांसह खरेदीदार देखील अटक होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिकवर लक्ष केंद्रित

एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकला येणारा गांजा कोठे वितरीत होणार होता तसेच, येथून पुढे दुसऱ्या ठिकाणी तस्करामार्फत जाणार होता काय, याकडे आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मलकानगिरी येथूनच २७०० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. नाशिकमधून देशभरातील मोठ्या महानगरांमध्ये मॅफेड्रोन (एमडी) वितरीत होत असल्याची बाब कोलकत्ता अॅण्टी नार्कोटिक्स विभागाने शोधून काढले होती. यानंतर शहर पोलिसांनी नुकतेच एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका बड्या टोळीचा पर्दाफाश केला. या पार्श्वभूमीवर नाशिककडे येणाऱ्या सोळाशे किलो गांजाचे महत्त्व अधोरेखीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरणतलावातून मोबाइल चोरीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील तरणतलावावर आलेल्या मुलाचा १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी झाला. ही घटना १६ मे रोजी बिटको कॉलेजच्या पाठीमागे, तरणतलाव येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भौमिक प्रशांत शिंदे (वय १४, रा. प्रल्हाद आर्केड, अशोकामार्ग) या मुलाच्या फिर्यादीनुसार १६ मे रोजी भौमिक तरणतलाव येथे आला होता. यावेळी त्याने आपल्याकडील मोबाइल बॅगेत ठेवला होता. यानंतर भौमिक पोहण्यासाठी गेला. तो परत येईपर्यंत अज्ञात चोरट्याने भौमिकच्या बॅगमधील मोबाइल काढून पोबारा केला. घटनेचा पुढील तपास हवालदार आर. बी. विंचू करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

आडगाव येथील २७ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

योगेश शांतीलाल बैरागी (वय २७, रा. न्यू इंग्लिश स्कूलजवळ, आडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात कारणातून योगेशने राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना उघडकीस येताच कुटुंबीयाने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार माळी करीत आहेत.

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

पाण्याचा भरलेला जार घेऊन दुचाकीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील कासलीवाल हॉस्पिटल समोर घडली.

मुमताज दिलावर पठाण (वय ४६, रा. ग्रीन अपार्ट. भाभानगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मुमताज पठाण उभ्या असलेल्या दुचाकीवर भरलेल्या पाण्याचा जार घेऊन बसल्या होत्या. अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच समोरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार एस. डी. आहिरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅश ग्रुपची तक्रार खोटी

$
0
0

सीटू संघटनेचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नॅश ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सीटू संघटनेने कामगारांना सभासद केले होते. यामुळे नॅश ग्रुपला कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे लागल्याने, त्यांच्या नफ्यात मोठी तफावत झाली. केवळ या कारणास्तव नॅश ग्रुपच्या वतीने सीटू संघटनेविरोधात पोलिसात खोटी तक्रारी दाखल केली असल्याचा आरोप सीटू युनियनचे नाशिक कमेटी अध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

नॅश ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये संघटना स्थापन केल्यानेच बदनामी करण्याचे षडयंत्र कंपनीमालकाकडून रचण्यात आल्याचा आरोप सीटू संघटनेने केला आहे. सोमवारी सीटू संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक खुटवडनगर येथील सीटू भवनात होणार आहे. यानंतर कामगारनेते डॉ. कराडांवर दाखल केलेली खोटी केस मागे न घेतल्यास मंगळवारी सीटू संघटनेच्या आस्थापनांमध्ये कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कामगार मारहाणीच्या गुन्ह्याबाबत सातपूर पोलिसांनी तीन कामगारांना अटक केली असली, तरी संशयित म्हणून गुन्हा दाखल केलेले डॉ. कराड यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नॅश ग्रुपच्या नाशिकमध्ये १० कंपन्या आहेत. दहा कंपन्यांमध्ये तब्बल एक हजारांहून अधिक कामगार काम करीत आहेत. त्यांना किमान वेतन दिले जात नसल्याने काही कामगारांनी सीटू संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते. चार कंपन्यातील कामगार सीटू संघटनेचे सभासद झाल्याने व्यवस्थापनाकडून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे सीटूविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. कामगार कायद्यानुसार किमान वेतन कामगारांना दिले गेल्याने कंपनी व्यवस्थापनाचा नफा कमी झाला. केवळ हाच राग मनात ठेवत एकाच ग्रुपच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वादात अडकवत

खोटी तक्रार पोलिसांकडे दिली असल्याचा आरोप अॅड. श्रीधर देशपांडे यांनीही केला आहे.

कंपनी व्यवस्थापनाचा बोलण्यास नकार

या प्रकरणाबाबत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. काही माहिती घ्यावयाची असेल, तर पोलिसांकडून घ्या असे उत्तर त्यांनी दिले. कामगार मारहाणप्रकरणी कामगारनेते डॉ. कराड यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याविषयी तपास अधिकारी संदीप वऱ्हाडे यांना विचारले असता, सर्व जबाब नोंदवल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीटू युनियनसाठी कामगाराला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सीअर्स डाईस अॅण्ड मोल्ड्स प्रा. लि. या सातपूर स्थित कंपनीत मागील काही महिन्यांपर्यंत येथे इंटरनल युनियन कार्यरत होती. या युनियनचे काम प्रवीण मेतकर पाहतात. काही महिन्यांपूर्वी वैभव जगताप, अनंत पुणेकर, अनिल समदूर तसेच कौशल कुमार सिंग यांनी सीआयटीयुची युनियन सुरू करण्याबाबत मेतकरकडे चौकशी केली. मात्र, व्यवस्थापन चांगले काम करीत असताना बाहेरील युनियनची गरज नाही, असे मेतकरने स्पष्ट केले. यामुळे वरील संशयितांनी मेतकरला जबर मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

संशयितांनी मिळून मेतकरला पैसे देण्याचे आमिष दाखवत धमकीही दिली होती. तरीही मेतकर आपल्या म्हणण्यावर कायम राहिल्याने २३ मे रोजी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या मेतकरला कार्बन नाका येथे संशयित दीपक पाटीलने थांबवले. तिथे जगताप, पाटील, समदूर, वैभव जगताप आदींसह सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. अंतर्गत युनियन संपविण्यासाठी मेतकरला संपवणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी मेतकरला जबर मारहाण केली. यात मेतकरच्या मणक्याला दुखापत झाली. यानंतर सर्व प्रकार कंपनीचे मालक अजय केवलरमाणी यांना सांगितला. त्यानुसार केवलरमाणी मेतकरला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर मेतकरने पोलिसांना फिर्याद दिली असून, यात डॉ. कराड यांच्या सांगण्यावरून आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संशयित दीपक पाटील, अनिल समदूर आणि रोहित भालेराव यांना अटक केली. कोर्टाने या सर्वांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, युनियनच्या वादात डॉ. कराडांचे नाव आल्याने पोलिस काय कारवाई करणार याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांची आवक अन् दरही कमीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कोवळ्या लुसलुशीत पालेभाज्यांची वाढ उन्हाच्या तीव्रतेमुळे मंदावली आहे. अतिउष्णतेमुळे पालेभाज्या शेतात तग धरू शकत नाही. पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असलेल्या भागातच पालेभाज्यांचे उत्पादन होत असल्याने सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी झाली आहे. आवक कमी असूनही पालेभाज्यांचे दर कमी आहेत. नाशिकच्या पालेभाज्यांना इतर भागातून येणाऱ्या पालेभाज्यांशी स्पर्धा करावी लागत असल्यामुळे मुंबईच्या मार्केटमधील मागणी कमी असल्याने पाऊस पडेपर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज बाजार समिती सूत्रांनी व्यक्त केला आहे.

नाशिकच्या पालेभाज्या या मुंबईच्या मार्केटमध्ये पाठविल्या जातात. मुंबईला सर्वाधिक पालेभाज्या पुरविणारी नाशिकची बाजारपेठ आहे. असे असताना उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक कमी होऊनही नाशिकच्या पालेभाज्यांना मुंबईत खेड, मंचर, लातूर, इंदूर येथून येणाऱ्या पालेभाज्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. या स्पर्धेमुळे पालेभाज्यांचे दर सध्या स्थिर आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर या भागातून होणारी पालेभाज्यांची आवक कमी होणार आहे. नेमक्या त्याचवेळी नाशिकच्या कळवण भागातून पालेभाज्यांची आवक वाढते. पोयट्याच्या गाळपेऱ्याच्या जमिनीतील पालेभाज्या आदिवासी भागात उत्पादित केल्या जात असल्यामुळे जून व जुलै या महिन्यात या पालेभाज्या बाजारात येतात. सिन्नर या कमी पाऊस असलेल्या भागात पावसाच्या सुरुवातीला पालेभाज्यांची लागवड होते. या पालेभाज्या दोन महिन्यानंतर बाजारात येतात. त्यामुळे भर पावसाच्या काळात नाशिकमधूनच मुंबईला मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा पुरवठा होतो. याचकाळात पालेभाज्यांच्या दरांचा विक्रम होत असल्याचे दरवर्षी अनुभवायला येतात.

नाशिक बाजार समितीत सायंकाळी होणाऱ्या पालेभाज्यांच्या लिलावात गावठी कोथिंबीर, मेथी, शेपू यांचा तुटवडा जाणवत आहे. छानी ही संकरीत कोथिंबीर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असली तरी तिची मागणी गावठी कोथिंबीरीपेक्षा कमी आहे.

पालेभाज्यांचे दर

गावठी कोथिंबीर : १५ ते ४०

छानी कोथिंबीर : १२ ते १७

मेथी : १५ ते ३०

शेपू : १० ते २५

कांदापात : ७ ते ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर अंडरपास येथे वाहतूक पोलिसास मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील अंडरपासच्या नो एंट्रीमधून जाणाऱ्या दाम्पत्यास थांबविल्याने त्यांनी वाहतूक पोलिसास मारहाण केली. शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या महिलेने आपण महाराष्ट्र पोलिस अकादमीत कार्यरत असून, एक फोन लावला तर तुझी नोकरी घालवेल, अशा भाषेत उद्धट वर्तन केले.

जयश्री सचिन उगले (वय ३०) आणि सचिन रमेश उगले (३४, दोघेही रा. जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई गणेश बाळासाहेब झनकर यांनी फिर्याद दिली आहे. इंदिरानगर येथील अंडरपास येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी वन वे करण्यात आला असून, गोविंदनगरकडून येणाऱ्या वाहनांना हायवेने पुढे जाऊन प्रकाश पेट्रोलपंप येथे वळून यावे लागते. या दृष्टिकोनातून येथे वाहतूक पोलिस सतत तैनात करण्यात आलेले असतात. शनिवारी दुपारच्या सुमारास झनकर येथे कर्तव्यावर असताना उगले दाम्पत्य एमएच १५, ईआर ८९८३ या दुचाकीवर गोविंदनगरच्या दिशेने आले. मात्र, त्यांनी आपले वाहन थेट नो एंट्रीत टाकले. त्यावेळी झनकर यांनी दाम्पत्यास थांबवून नियम मोडला म्हणून लायसन्स व वाहनाची कागदपत्रे मागितली. यावेळी जयश्री उगले यांनी झनकर यांच्याशी, मी एमपीए येथे काम करते, मला पावती फाडायला सांगतो का? अशा उद्धट भाषेत अरेरावीस सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर एक फोन केला तर तुझी नोकरी घालवीन, इथपर्यंत आपले संबंध असल्याची धमकी दिली. यावेळी झनकर यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता उगले दाम्पत्याने झटापट करीत झनकर यांना गणवेश पकडून खाली पाडले, शिवीगाळ करीत मारहाण केली. झनकर यांनी लागलीच मदत बोलावून घेतली. या प्रकरणी उगले दाम्पत्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्यासह कलम ३३२, ५०४, ५०६, १८६ आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका वाहनचालकाने उपनगर येथे वाहतूक पोलिसास मारहाण केली होती.

--

पोलिस घडविणारी संस्था

याबाबत बोलताना मुंबई नाका पोलिसांनी सांगितले, की सदर महिला महाराष्ट्र पोलिस अकादमीतील डिटेक्शन ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्युनिअर क्लर्क पदावर काम करते. महिलेची शारीरिक स्थिती आणि ती शासकीय ठिकाणी नोकरी करीत असल्याच्या कारणास्तव तिला अटक करण्यात आलेली नाही. यासाठी काही तांत्रिक अडथळे असून, सोमवारी ते पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. पोलिस अधिकारी घडविणाऱ्या संस्थेतील कर्मचारी रस्त्यावर असे वर्तन करीत असतील, तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार, अशी भावना वाहतूक पोलिस कर्मचारी यानिमित्ताने व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images