Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

यंदा मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

0
0

शेतकऱ्यांनी घेतला बोंडअळीचा धसका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्यावर्षी कापसावर आलेल्या बोंडआळी व मक्यावर आलेली बुरशीयामुळे यंदाच्या खरीप हंगामात कापूस व मक्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्याएवजी शेतकरी बाजरी, ज्वारी, कांदा पिकांना प्राधान्य देऊ शकतात. कृषी विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पेरणी लाक्षांकानुसार सर्वाधिक ३३ हजार ३४७ हेक्टरवर मक्याची लागवड होवू शकते. त्याखालोखाल बाजरी पिकाचे क्षेत्र असून २७ हजार ८७० हेक्टर इतका लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. तर कापसाची लागवड १७ हजार ८३५ हेक्टरवर होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे ढग जमू लागले असून, काही ठिकाणी वादळी हजेरी देखील लावली आहे. पावसाचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तविण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेत तयार करण्याच्या कामात वेग घेतला आहे. कृषी विभागाकडून ८२ हजार ८७७ हेक्टरवर पेरणीची उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोकुळ खैरनार यांनी दिली.

बोंडआळीचा प्रादूर्भाव गेल्यावर्षी कापसावर झाल्याने शेतकऱ्यांनी त्याचा धसका घेतला आहे. सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा हवामान खात्याने पावसाचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची शेतीकामाची लगबग सुरू आहे. बाजारातही देखील विविध बी बियाणे, खते यांचा ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

पिक सन २०१८ - १९ पेरणी लक्षांक ( हेक्टर )

बाजरी २७, ८१०

मका ३३, ३७४

एकूण कडधान्य २,०८९

भुईमुग १,०८७

एकूण तेलबिया १,१७७

कापूस १७,८३५

एकूण खरीप - ८२,८७७

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाऊसधार

0
0

त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार

​त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे​ शनिवारी सायंकाळी रोहिणीच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. अधिक महिना असल्याने त्र्यंबकेश्वरला शनिवार भाविकांची वर्दळ जास्त होती. मुसळधार पावसामुळे भाविकांची धावपळ उडाली. बसस्थानक ते मंदिर हाकेच्या अंतरावर असूनही भाविक रिक्षाने बसस्थानकापर्यंत गेले. यामुळे मंदिर परिसरात रिक्षांची रीघ लागली होती. लहान मुलांसह काही नागरिकांनी मात्र पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. येथील बळीराजा पहिला पावसाने सुखावला आहे. मात्र, भाजी व फळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. मेन रोड परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.

कळवण तालुक्यात पाऊस

कळवण : कळवण शहर व परिसरात शनिवारी दुपारी तीनदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अल्पकाळ पाऊस बरसला असला तरी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. कळवणच्या मेन रोडवर डबकी साचली. तालुक्यातील बोरदैवत व देवळीवणी भागात काही घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्या. आदिवासी बांधवांची वित्तीय हानी झाली असून, कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तहसीलदार कैलास चावडे यांच्यासह महसूल यंत्रणेने या गावांना भेट देत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय खानझोडे यांना मुद्रण स्पर्धेत रौप्यपदक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे एप्रिलमध्ये 'स्क्रीन प्रिंट इंडिया २०१८' या 'स्क्रीन व डिजिटल प्रिंटिंग' विषयावर अखिल भारतीय स्तरावरील प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शन व स्पर्धेत नाशिक येथील मे. इम्प्रेशन्स या संस्थेचे संस्थापक संचालक संजय खानझोडे यांना 'स्टिकर्स व लेबल्स' गटात रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले. 'मेसे फ्रँकफर्ट' या जर्मन कंपनीतर्फे भारतात दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या शहरांत हे प्रदर्शन भरवले जाते.

खानझोडे गेली ४० वर्षे मुद्रण व्यवसायात असून, मुद्रणतज्ज्ञ म्हणून ते परिचित आहेत. यापूर्वीही २००२ मध्ये त्यांना मुंबई येथे भरलेल्या याच स्पर्धेत रौप्यपदक, २०१४ मध्ये गोव्यातील पणजी येथील स्पर्धेत सुवर्णपदक, तर २००६ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या एफईएसपीए आशियातर्फे भरलेल्या प्रदर्शन व स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. २००४ मध्ये नाशिक जिल्हा मुद्रण संघातर्फे भरवलेल्या मुद्रण स्पर्धेत स्क्रीन प्रिंटिंग या विभागात रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. २००२ मध्ये 'स्क्रीन प्रिंट इंडिया' या अखिल भारतीय पातळीवरील स्क्रीन प्रिंटिंग या विषयाला वाहिलेल्या मासिकाने खानझोडे यांनी मुद्रण क्षेत्रात केलेल्या कामाप्रीत्यर्थ त्यांच्या मासिकात मुखपृष्ठ लेखातून गौरवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड चिंब

0
0

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शहर, परिसरात धुरळा उडाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणचे होर्डिंग्सही कोसळले. हलक्या सरींमुळे उष्णतेच्या काहिलीपासून नागरिकांची सुटका झाली. वेगवान वारे वाहत असल्याने शनिवारी सायंकाळी वीजपुरवठ्याचा पुन्हा एकदा खेळखंडोबा झाला. वारंवार वीज खंडित झाल्याने महावितरणच्या पावसाळापूर्व तयारीचा पुन्हा एकदा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संप जिल्हा एकत्र फाइल

0
0

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

शेतकरी संपावर ठाम; दुसऱ्या दिवशीही भाजीपाला, दूध संकलनावर परिणाम

टीम मटा

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील बाजार समित्यांसह कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट होता. मात्र शनिवारी जिल्ह्यात कोठेही शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले नाही. मात्र दूध, भाजीपाल्याची आवक मंदावल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये चढ्या दराने भाजीपाला विकला जात होता.

चांदवडमध्ये कांद्याची आवक घटली

मनमाड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व त्यांचा सात बारा कोरा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे अस्त्र उपसले आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदवड बाजार समितीत कांद्याची आवक घटली. एरवी ५०० ते ६०० ट्रॅक्टर कांदा आवक असलेल्या चांदवड समितीत शनिवारी अवघे २२ ट्रॅक्टर आले. त्यामुळे बाजार समितीत दिवसभर शुकशुकाट होता. मोठ्या प्रमाणावर आवक घटल्याने संपाचा प्रभाव दुसऱ्या दिवशीही जाणवला. मात्र चांदवडमध्ये कोणतेही आंदोलन झाले नाही. दरम्यान मनमाड, नांदगाव बाजार समिती शनिवारी बंद असल्याने शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला नाही.

000

मालेगाव बाजार समितीत लिलाव थंडावले

मालेगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाचा शनिवारी दुसरा दिवस होता. शहर व तालुक्यात अद्याप तरी या संपाचा फारसा परिणाम झालेला नाही. मात्र बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे. भुसार मालाचे लिलाव थंडावल्याने बाजार समितीत शनिवारी शुकशुकाट पहायला मिळाला. भाजीपाल्याची २५० क्विंटल आवक झाली. शनिवार, रविवार मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्र बंद असल्याने कांदा आवकही कमी होती. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बाजार समिती सचिव अशोक देसले यांची भेट घेवून बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १ ते १० जून दरम्यान संप पुकारला असून, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रा. के. एन. अहिरे, शेखर पगार, संजय जाधव, राजेंद्र वाघ, सुकदेव चौरे, अंकुश जगताप आदी उपस्थित होते.

0000

दूध संकलनावर परिणाम

निफाड : गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले असून, सलग दुसऱ्या दिवशीही या भागातील दूध डेअरी, आठवडे बाजार, सायखेडा बाजारात शुकशुकाट होता. गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेला गोदाकाठात यंदाही शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संपात सहभाग घेतला असून, एकाही शेतकऱ्याने शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध घरीच ठेवले. त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंद्र बंद होते. परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात आहे. शेतीमाल तोडणी करण्याचे काम सुरू आहे, परंतु तोडलेला माल मार्केटमध्ये आणण्याचे शेतकऱ्यांनी टाळले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला. दूध उत्पादनातही सायखेडासह गोदाकाठ भाग आघाडीवर आहे. या भागात अमूल, पंचमहाल, गोवर्धन, थोरात, पराग, वारणा, प्रभात इत्यादी दूध खरेदी-विक्री कंपन्यांच्या संकलन केंद्रावर परिणाम झाला आहे. नियमित सुमारे ४५ हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या डेअरी पॉवरमध्ये शुक्रवारी केवळ दोन हजार लिटर, शनिवारी तीन हजार लिटर दूध संकलन झाले, असे डेअरीचे संचालक भगवान सानप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमालाची आवक ३० टक्क्यांनी घटली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात दिसू लागला आहे. जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्यासह भाजीपाल्याची आवक घटली. जिल्ह्यात सुमारे २३ ते ३० टक्के आवक घटल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शेतकऱ्यांनी सोमवारी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणावा. त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली.

शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असल्याने राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी संपाची हाक दिली आहे. १ जूनपासून या शेतकरी संपाला सुरुवात झाली असून, त्याचे परिणाम जिल्ह्यात जाणवू लागले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी कांद्यासह भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. पिंपळगाव बसवंत येथे दररोज साधारणत: १८०० ट्रॉली ट्रॅक्टरची आवक होते. परंतु आज केवळ २२ ट्रॉली ट्रॅक्टरची आवक झाली. लासलगाव बाजार समितीमध्ये तर याहूनही कमी आवक झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शेतमालाची आवक घटत चालल्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह पोलिस अधीक्षक संजय दराडे आणि सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. फळे, भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीला अडथळा झाल्यास तो रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक बाजार समित्यांमध्ये बैठका घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून, आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरविण्याची तयारी देखील पोलिसांनी ठेवली आहे.

मुंबईकरांची कोंडी

या आंदोलनाचा परिणाम मालवाहतुकीवरही होऊ लागला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला जातो. मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना होणाऱ्या पालेभाज्यांची निर्यात ५० टक्क्यांनी घटली आहे. बाजारसमितीमधील व्यवहार बंद असल्याची अफवा शनिवारी पसरली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातून आज शेतमालाची विशेष आवक होऊ शकली नाही.

..कोट..

शेतमालाची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी कुणी विरोध करीत असेल तर त्यांनी जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या १०७७ किंवा ०२५३२३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिस बंदोबस्तात शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणला जाईल.- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएसपी’ला कर नाहीच

0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या इंडीयन सेक्युरीटी प्रेस (आयएसपी) ला घरपट्टी लागू करण्याचा महापालिकेचा अट्टाहास पालिकेच्या अंगलट आला असून, उच्च न्यायालयाने आयएसपीला घरपट्टी लागू करता येत नसल्याचे सांगत, महापालिकेला दणका दिला आहे. इंडिया सेक्युरीटी प्रेस महामंडळ असले तरी, केंद्र सरकारसाठीच काम करत असल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पिठाने हा दावा फेटाळून लावला. यामुळे महापालिकेला तब्बल साडेसहा कोटींच्या घरपट्टीवर पाणी सोडावे लागले असून, नाचक्कीही सहन करावी लागली आहे.

नाशिकरोड स्थित इंडिया सेक्युरीटीची प्रेस आणि नोटप्रेस केंद्र सरकारची कंपनी असल्याचे सांगत महापालिका कर देण्यास नकार दिला होता. जुलै २०१६ मध्ये इंडिया सेक्युरीटी प्रेसचे रुपांतर हे सेक्युरीटी प्रिटींग अँड कॉर्पोरेशन असे झाले आहे. त्यामुळे महामंडळाला कर लागू होत असल्याचे सांगत महापालिकेने २००८ पासूनची थकबाकी काढत, आयएसपीला साडेसहा कोटींच्या थकबाकीची नोटीस पाठवली होती. या नोटीसी विरोधात आयएसपीने राज्य सरकारकडे अपील केले होते. परंतु राज्य सरकारने कर घेण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे सांगत आयएसपीला उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी ही गेल्या सव्वा वर्षापासून उच्च न्यायालयात सुरू होती. उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीत कराचा वाद लोकअदालतीकडे सोपवला होता. लोकअदालतमध्ये संबंधित न्यायाधिशांनी यावर महापालिकेच्या आयुक्तांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. आयएसपी हे आता महामंडळ झाले असून, ते केंद्र सरकारला विविध प्रकारच्या नऊ सेवा देत असल्याचा दावा कर संकलन विभागाने केला होता. तसेच आयुक्त तुकाराम मुंढेंही करवसुलीवर ठाम होते. त्यामुळे आयएसपीने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी न्या. अभय ओक यांच्या पिठासमोर सुनावणी झाली असून, उच्च न्यायालयाने महापालिकेचा दावा फेटाळून लावला आहे. आयएसपीचे रुपांतर महामंडळात झाले असले तरी, सदरील महामंडळ हे केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने त्यावर कर लावता येणार नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेला या आदेशाने मोठा झटका बसला आहे. महापालिकेला या प्रकरणात मोठी मानहानीही सहन करावी लागली आहे.

साडेसहा कोटीचा फटका

महापालिकेने करवसुली वाढीसाठी केंद्र व राज्यातील सरकारी कार्यालयानाही वसुलीसाठी जप्तीच्या नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार नोटप्रेसकडे जवळपास साडेपाच कोटी तर इंडिया सेक्युरिटी प्रेसकडे एक कोटींची थकबाकी होती. या थकबाकी वसुलसाठी महापालिकेने थेट जप्तीची नोटीसही बजावली होती. परंतु तरीही आयएसपीने त्याकडे दुर्लक्ष करत, उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने आयएसपीच्या बाजुने निकाल दिल्याने महापालिकेला तब्बल साडेसहा कोटीचा आर्थिक फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमितीकरणासाठी मुदतवाढ?

0
0

शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे आमदार फरांदेना आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेलादेखील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या धोरणाला सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ महापालिकेने असा प्रस्ताव पाठविल्यास अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी मुदतवाढ दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली आहे. त्यामुळे या धोरणाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता बळावली आहे.

राज्यभरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी राज्य सरकारने प्रशमन संरचना धोरण २०१७ जाहिर केले असून, त्या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामे दंडात्मक शुल्क अर्थात कंपाउंडिंग चार्जेस आकारून नियमित करता येणार आहेत. यासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरीता ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे अडीच हजार प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाला प्राप्त झाले आहेत.

सध्या या दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, महापालिका क्षेत्रातील 'कपाट'बाधित बांधकामांची संख्या लक्षात घेता दाखल प्रस्तावांची संख्या सुमारे चार ते साडेचार हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या धोरणाला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

भिवंडीच्या धर्तीवर निर्णय घ्यावा

राज्य सरकारने अशा प्रकराच्या मुदतवाढीचा प्रस्ताव भिवंडी-निजामपूर महापालिकेने पाठविल्यानंतर त्याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे भिवंडीच्या धर्तीवर नाशिकमध्येही मुदतवाढ मिळावी, अशी बांधकाम व्यावसायिकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अनधिकृत बांधकामांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापालिकेकडून प्रस्ताव आल्यास मुदतवाढ देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांची दिल्याचे आमदार फरांदे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलासंगम महोत्सवात कलाकारांची मांदियाळी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जून रोजी कलासंगम महोत्सव होणार आहे. कुसुमाग्रज स्मारकात हा महोत्सव होईल. प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ म्हणजे कलासंगम महोत्सव. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या महोत्सवात कलाकारांची मांदियाळी असेल. महोत्सवासाठी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते (मुंबई), प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे प्रमुख पाहुणे असतील.

कोलते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. ते मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील नेरूरपार येथील असून, त्यांचे चित्रकला क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. कोलते यांनी नवी दिल्ली ललित कला अकादमी, नवी दिल्ली नॅशनल गॅलरी मॉडर्न आर्ट यांच्या समितीमध्ये काम केलेले आहे. बॉम्बे सोसायटीचे ते गोल्ड मेडलिस्ट असून, राज्य सरकारचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यांना दुर्गा भागवत अॅवॉर्ड, तसेच कवी कुसुमाग्रज अॅवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आलेले आहे. दुसरे प्रमुख पाहुणे प्रमोद कांबळे आहेत. त्यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासूनच मिळाले. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. त्यामुळे कांबळे यांच्या कलाशिक्षणास लहानपणीच सुरुवात झाली. सातवीत असताना त्यांना मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. अहमदनगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून त्यांनी फाउंडेशन कोर्स आणि कलाशिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. मूर्तिकार बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेली. तेथे त्यांनी मूर्तिकलेचा आणि मॉडेलिंगचा डिप्लोमा मिळवला. शैक्षणिक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. याच काळात त्यांनी विविध कला दिग्दर्शकांसोबत कामही केले. नंतर त्यांनी अहमदनगरला येऊन आपला स्टुडिओ सुरू केला.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमॉन्स्ट्रेशनही या वेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म या वेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हँड फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

शस्त्रास्त्रे व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना खुला होणार आहे. ९ व १० जून या दोन्ही दिवशी कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शन होणार आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत.

हौशी कलाकारांनो, सहभागी व्हा!

महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यात येणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे, की गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट, तसेच आणखीही संबंधित आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील, त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करावा. नावनोंदणी आवश्यक आहे.

सात ठिकाणी हेरिटेज वॉक

आज, ३ जून रोजी हेरिटेज वॉक होणार आहे. गोपिकाबाईंचा तास, अहिल्याराम मंदिर, अजगरेश्वर महाराज समाधी, कपालेश्वर महादेव मंदिर, गोरेराम मंदिर, कृष्ण मंदिर आणि नारोशंकर मंदिर अशा सात ठिकाणी हा हेरिटेज वॉक होईल.

लोगो : ७ वा वर्धापनदिन

लोगो : कलासंगम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त नियुक्तीची सूचनेकडे त्र्यंबकरांचे लक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक मंदिर विश्वस्त नियुक्तीची जाहीर सूचना येत्या दोन दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत नाशिक धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात दूरध्वनीने विचारणा होत असून, त्यांनी दोन दिवसात शनिवारी अथवा रविवारी जाहीरात प्रसिद्ध होईल असे सांगितल्याचे वृत्त आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकरिता जून २०१३ मध्ये भाविकांमधील चार सदस्य नियुक्त झाले होते. त्यांची पाच वर्षांसाठीची मुदत या आठवड्यात संपली आहे. आता त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांना नवीन सदस्यांची

नियुक्तीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सूचना कधी निघणार अशी चर्चा होत आहे. इच्छुकांनीही मोर्चेबांधणीसाठी हालचाली गतीमान केल्या आहेत. याकरिता वरिष्ठ पातळीवरील राजकीय मान्यवरांकडे स्वत:च्या नावाचा आग्रह धरतांनाच इतरांचा पत्ता कट कसा करता येईल, यासाठी इच्छुकांनी डावपेच आखले आहेत. विद्यमान विश्वस्तांना पुन्हा संधी देऊ नका, तसेच आमुक एक व्यक्ती या पदासाठी पात्र नाही असे किमान ४५० ते ५०० अर्ज मुंबई आणि नाशिक धर्मदाय आयुक्त कार्यालयांकडे पाठविण्यात आल्याचीही शहरात चर्चा आहे. दरम्यान जाहीरात निघाल्यास कागदपत्रांची अडचण नको म्हणून जुळवाजुळव पूर्ण झाल्याचे छातीठोकपणे सांगणारे इच्छुक शहरात जनसंपर्क वाढविण्यात मग्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रातील पहिले बोन मॅरो ट्रान्सप्लांट नाशिकमध्ये

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील पहिले बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट नाशिकमध्ये सुरू होणार असून, याचा थेट फायदा कॅन्सरग्रस्तांसह थॅलेसेमिया, सिकलसेल अॅनेमिया, लिम्फोमा यांसारख्या रक्तदोष असलेल्या रुग्णांना मिळणार आहे. थॅलेसेमिया अथवा सिकलसेल अॅनेमियाग्रस्तांना ठराविक दिवसांनी रक्त बदलावे लागते. बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे वारंवार रक्त बदलण्याची प्रक्रिया पूर्णत: बंद होऊ शकते. त्यामुळे रुग्णांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट (बीएमटी) एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे रविवारी सुरू होणार आहे. नाशिक विभागात विविध रक्तदोष असलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. विशेषत: थॅलेसेमिया अथवा सिकलसेल अॅनेमिया हा आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. हा आजार अनुवांशिक असतो. या आजारांमुळे पेशंटला ठराविक दिवसांनी वारंवार रक्त बदलण्याची गरज भासते. सिव्हिल हॉस्पिटलसह काही रक्तपेढ्यांमध्ये अशा पेशंटसाठी रक्त राखीव ठेवण्यात येते. मात्र, सतत रक्त बदलावे लागत असल्याचा मोठा फटका रुग्णांना बसतो. यामुळे इतर आजार बळवण्याचे प्रमाण वाढते.

नाशिकमध्ये एक लाख लोकसंख्येमागे थॅलेसेमियाचे १०, तर सिकलसेल अॅनेमियाचे १५ रुग्ण आढळून येतात. याबाबत बोलताना एचसीजीचे डॉ. राज नगरकर यांनी सांगितले, की ब्लड कॅन्सरसह इतर रक्तदोष विकारांमध्ये रक्त बदलणे किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे हे पर्याय आहेत. बीएमटीची सुविधा पुणे, मुंबईत आहे. मात्र, ऑपरेशनपूर्वी आणि ऑपरेशननंतर रुग्णाला जवळपास सात ते आठ महिने उपचार द्यावे लागतात. यामुळे महानगरांमध्ये मोठा खर्च येतो. नाशिकमध्ये याच उपचारासाठी सात ते आठ लाख रुपये अपेक्षित असून, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, टाटा फाउंडेशनसह इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्णाला एक रुपयाही खर्च येणार नाही, याकडे कटाक्ष देणार असल्याचे नगरकर यांनी स्पष्ट केले. या युनिटचा प्रारंभ ३ जून रोजी सकाळी ११ वाजता पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी यांच्या हस्ते होणार असून, या वेळी राज्याचे पर्यटन विकास व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल उपस्थित राहतील. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, हेमॅटॉलॉजी आणि अस्थी मज्जा प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. निरंजन राठोड प्रमुख पाहुणे असतील.

नाशिकमध्ये एक लाख लोकसंख्येमागे

१० रुग्ण थॅलेसेमियाचे, तर १५ रुग्ण सिकलसेल अॅनेमियाचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विभागीय चौकशी’चा आता जलद निपटारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्य सरकारच्या विविध विभागांतील भ्रष्टाचार वा अन्य शिस्तभंगविषयक विभागीय चौकशीच्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सध्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यास गती मिळणार आहे. नाशिक विभागात आजमितीस अशाप्रकारची विविध स्तरांवर ५० प्रकरणे प्रलंबित आहेत.

या नियुक्तीसाठी इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असावी. त्याप्रमाणे सेवानिवृत्त कंत्राटी चौकशी अधिकारी यांना विभागीय चौकशी प्रकरणात निर्धारित केल्यानुसार प्रकरणनिहाय १८ हजार, तीन हजार रुपये याप्रमाणे कमाल ३० हजार रुपये इतकी रक्कम अनुज्ञेय राहील. त्यासाठी इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या दि. २१ मे २०१८ रोजीच्या शासननिर्णयात देण्यात आलेला आहे. सदर शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी दहा दिवसांत आपले अर्ज उपायुक्त, रोजगार हमी योजना शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अशा स्वरूपाची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली निघण्यास मदत होणार असल्याने प्रशासकीय कामकाजातील अडथळेदेखील दूर होण्यास हातभार लागणार आहे. मात्र, या निर्णयाची त्वरेने आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

निवृत्त अधिकाऱ्यांचे पॅनल

या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासननिर्णयानुसार गट अमधील अधिकारी ज्यांची वेतन श्रेणी रुपये ७६०० पेक्षा कमी आहे व गट बमधील अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशीची नव्याने उद्भवणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंत्रालयीन उपसचिव वा समकक्ष अथवा त्यावरील वेतन संवर्गातील पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. या पॅनलमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त, नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या डीपी, वीजतारा दुरुस्त करण्याची मागणी

0
0

नाशिकरोड : शहरासह ग्रामीण भागातही उघड्या डीपी आणि लोंबकळणाऱ्या वीजतारांचे मोठे प्रमाण नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याने उघड्या डीपींची व लोंबकळणाऱ्या वीजतारांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी छत्रपती युवा सेनेतर्फे महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली. हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी छत्रपती युवा सेनेचे गणेश कदम, विलास गायधनी आदींनी केली आहे.

--

हत्तीरोग निर्मूलन मोहीम

नाशिक : हत्तीरोग सर्वेक्षण पथक नाशिकमार्फत दि. ५ जून रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत व जिल्ह्यातील हत्तीरोगप्रवण क्षेत्रात जागतिक हत्तीरोगदिन साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत दि. १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये नवीन हत्तीरोग रुग्णांची नोंद केली जाणार आहे. हत्तीरोगाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना डीईसी गोळ्यांचा औषधोपचार करण्यात येतो. अंडवृद्धी झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे आवश्यक असल्याचे सहाय्यक संचालक डॉ. पी. डी. गायकवाड यांनी कळविले आहे.

--

संरक्षक भिंतीला तडा (फोटो)

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या पूर्व बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराजवळच्या संरक्षक भिंतीला तडा गेल्याने ती धोकादायक झाली आहे. मूळ इमारतीला लागून आलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम मुख्य इमारतीलगत आहे. त्याला तडा गेला असून, ही भिंत कधीही पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या आवारात अन्यत्रही अशीच स्थिती झाली आहे.

--

'माण देशी'ची शाखा

जेलरोड : म्हसवड (सातारा) येथील माण देशी उद्योगिनीच्या जेलरोड शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले. महिलांनी उद्योजक व्हावे यासाठी आर्थिक साक्षरता, व्यवसायवृद्धी, संगणक, ब्यूटिपार्लर, फॅशन डिझाइन आदींचे प्रशिक्षण संस्थेतर्फे अल्प शुल्कात दिले जाते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सहाय्य या उपक्रमांसाठी लाभते, असे संयोजकांनी सांगितले.

--

ज्येष्ठांचा वाढदिवस

जेलरोड : येथील श्री दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश ढगे, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र चव्हाण, शिवाजी भोर, संघाचे सचिव रमेश डहाळे, अरविंद भालेराव, राजेंद्र जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भागवत गुरव यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. १० जूनला सहस्रचंडी महायज्ञ होणार असून, त्याबाबत शिवाजी भोर यांनी माहिती दिली.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी’च्या पगार वाढीवर जिल्ह्यात समिश्र प्रतिक्रिया

0
0

'एसटी'च्या पगार वाढीवर

जिल्ह्यात समिश्र प्रतिक्रिया

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी कामगारांच्या पगार वाढीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात कामगारांच्या समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही कामगारांनी या पगारवाढीचे स्वागत केले असले तरी काही कामगारांनी ही पगारवाढ तुटपुंजी असल्याचे म्हटले आहे. तर काही कामगार मात्र संभ्रमात आहे.

एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली. त्यानंतर विविध संघटनांनी या पगारवाढीविरोधात नाराजी व्यक्त करुन संप व आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे कामगार सेनेने मात्र या पगारवाढीचे स्वागत केले. पण, सामान्य कामगारांना या पगारवाढीविषयी काय वाटते हे जाणून घेतल्यानंतर हा कामगार आता विभागला गेला आहे. संघटनेच्या मतांप्रमाणे त्याला ही पगारवाढी तुटपुंजी वाटत असली तरी त्याची संघर्ष करण्याची तयारी नाही. रखडेलली ही पगारवाढ आहे. तशी स्विकारण्याची त्याची मानसिकता आहे. तर दुसरीकडे या पगारवाढीविरोधात पुन्हा संघर्ष करण्याची मानसिकता असणारेही आहेत.

एसटीची अधिकृत असलेल्या कामगार संघटनेला बाजूला सारुन या पगारवाढीची घोषणा परस्पर केल्याचा रागही कामगार संघटनेत असल्याचेही पुढे आले आहे. तर इंटकचे नेतेही या पगारवाढीच्या परस्पर घोषणेमुळे नाराजी आहे.

एसटीही पगारवाढ ही ऐतिहासिक आहे. या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंद आहे. पण, काही संघटना यात विरोध करुन दिशाभूल करत आहेत. आतापर्यंत झालेल्या करारात ही पगारवाढ सर्वात मोठी आहे. ३२ ते ४८ टक्केपर्यंत असणारी ही वाढ सर्वांना लाभदायी ठरणार आहे.

- सुभाष जाधव, एसटी कामगार सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वळीव बरसला

0
0

टीम मटा

मालेगावसह निफाड, येवला तालुक्यात वळवाच्या पावसाने वादळवाऱ्यासह जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, ब्राह्मणगावात गारा कोसळल्याने डिपिंगच्या स्टेजला आलेल्या द्राक्षबागांचा खर्च वाढणार आहे, तर विंचूर परिसरात खळ्यांत पाणी साचल्याने कांद्याचे नुकसान झाले. अन्य भागांतही सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले, वृक्ष कोसळले, तर काही ठिकाणी विजेचे खांब कलले. पावसामुळे अनेक भागांत वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

निफाड तालुक्यात गारपीट

निफाड : निफाड व परिसरातील पूर्व व उत्तर भागासह गोदाकाठ भागातही शनिवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसाला वेळेवर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील खेडलेझुंगे, ब्राह्मणगाव येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या भागातील अनेक झाडे उन्मळून पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. गारांच्या पावसामुळे डिपिंगच्या स्टेजला असलेल्या द्राक्षबागांच्या खर्चात वाढ होणार आहे. लासलगाव भागातही दमदार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, मका, भुईमूग आदी रोपांना लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता बी- बियाण्यांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे, तर शेतीच्या कामांची लगबग सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे. निफाड शहर व परिसरात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

विंचूरमध्ये कांदे भिजले

विंचूर, बोकडदरे, नैताळे, शिवरे या गावांमध्येही शनिवारी दुपारी पाऊस बरसला. विंचूर परिसरात कांद्याच्या खळ्यांमध्ये पाणी साचल्याने कांद्याचे नुकसान झाले. गोदाकाठ भागातील सायखेडा, करंजगाव, शिंगवे आदी भागात दुपारी वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊण तास पाऊस झाला. त्यानंतरही रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. या भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने पाऊस पथ्यावर पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भाजीपाल्यालाही या पावसाचा फायदा होणार आहे.

वीजपुरवठा खंडित

निफाड शहर व परिसरात वादळवारा सुरू झाल्याने लगेचच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे दोन तास वीज खंडित होती. शुक्रवारीही रात्री साडेआठ ते रात्री आठपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. खंडित विजेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दुंध्ये गावात साचले तळे

मालेगाव : तालुक्यातील कळवाडी, सायने, चाळीसगाव फाटा, दुंध्ये परिसरात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मालेगावात दुपारपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाने हुलकावणी दिली. दुंध्ये परिसरात झालेल्या पावसाने काही घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. तालुक्यातील अन्य भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.

येवल्यात वळवाची सलामी

येवला : मान्सूनपूर्व 'रोहिणी'च्या वळवाच्या पावसाने शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार सलामी दिली. सायंकाळी अर्धा-पाऊण तास सरी बरसल्या. या वेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक घरांना फटका बसला, तर झाडे उन्मळून पडली. जवळपास अर्धा तास जोरदार वारे वाहत होते. यात अनेक घरांचे छप्पर, पत्रे उडाले. या वाऱ्याचा 'महावितरण'लाही फटका बसला. शहरातील सायंकाळी पाचपासूनच वीज खंडित झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. शहरातील काही भागांत रात्री दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला, तर अनेक भागात त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता. पावसाने दोन- सव्वादोन तासांच्या विश्रांतीनंतर रात्री आठनंतर तालुक्यात ढगांचा गडगडाट अन् विजांच्या काहीशा कडकडाटात वळवाच्या दमदार सरी बरसल्या.

मनमाडमध्ये तारांबळ

मनमाड : शहर व परिसरात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ उडाली. मनमाड शहरात दुपारी अडीच वाजता पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

चांदवड, नांदगावला रिमझिम

चांदवड व नांदगाव शहरात शनिवारी दुपारी हलक्या सरी कोसळल्या. नांदगाव तालुक्यात पळाशी व नस्तनपूर येथे शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही काळ पाऊस सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला. पावसाच्या जोरदार सलामीमुळे बळीराजा सुखावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारखान्यांना करवाढ अमान्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कारखान्यांना ठोक अंशदानाऐवजी कलम १२४ नुसार कर लावून वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्यामुळे ग्रामीण भागातील कारखान्यांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून, त्याची अमंलबजावणी आता ग्रामपंचायत करणार आहे. असे असले तरी कारखानदारांनी या करवाढीला विरोध केला आहे. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने कारखान्याने ही भूमिका घेतली आहे.

यापूर्वी एकूण कराच्या मूल्यांकनात ग्रामपंचायत व कारखानदार यांच्यात करार होऊन त्याचे प्रमाण ठरवले जात असे. त्यामुळे कारखान्याला ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळण्याची संधी होती. आता ही संधी जाणार आहे. त्यामुळे कोणतीही सवलत कारखान्याला मिळणार नाही. ग्रामपंचायतीकडून कारखान्याला कोणत्याही सुविधा दिल्या जात नसताना हा पूर्ण कर भरण्यास कारखानदारांचा विरोध आहे. कारखान्याला आकारण्यात येणारे कर आता रेडिरेकनरनुसार असल्यामुळे तोसुद्धा आता जास्त असणार आहे. ग्रामपंचायतींकडून मिळणाऱ्या या सवलतींमुळे कारखान्यांचे जाळेही ग्रामपंचायत क्षेत्रात वाढत होते. मात्र, आता यामुळे त्यांच्यावही परिणाम होणार आहे. इगतपुरीतील वाडिवऱ्हे ग्रामपंचायत व तेथील कारखानदार यांच्यात झालेल्या ठोक अंशदान करारनाम्याबाबत मंजुरीसाठी ग्रामपंचायत विभागाने पाठवण्यात आला होता. तो फेटाळण्यात आल्यामुळे ही बाब समोर आली आहे.

कोट

उद्योग अडचणीत असताना राज्य सरकारने अंशदानाऐवजी कलम १२४ नुसार कारखान्यांवर कर लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यभरातील कारखान्यांना भुर्दंड बसणार आहे. औद्योगिक संघटनेला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चेंबरतर्फे अगोदरच पत्र दिले असून, याबाबत पाठपुरावा करणार आहोत.

- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंथेटिक ट्रॅक फक्त खेळाडूंसाठीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलातील ट्रॅक नक्की कोणासाठी आहे, हे तेथील नागरिकांना माहिती नाही. हा ट्रॅक जॉगिंगसाठी नाही, ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. राज्य सरकारने सहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ट्रॅकचे नुकसान झाल्यास खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया मंदावणार आहे.

शहरातील अनेक खेळाडू मातीच्या ट्रॅकवर सराव करतात, परंतु; राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज भासते. नाशिकमध्ये एकमेव सिंथेटिक ट्रॅक आहे. हा खराब झाला तर नाशिकमधील खेळाडूंचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे.

सीसीटीव्हीचे काम अर्धवट

या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी वायरिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून निधी येणे बाकी असल्याने कॅमेरे बसवता आले नाही. कॅमेरे बसवले गेले असते तर या घटनेतील आरोपी लक्षात आले असते. सिंथेटिक ट्रॅकवर नागरिकांनी येऊ नये यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने स्वतंत्र जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, तेथे नागरिक जात नाहीत. या ठिकाणी नागरिक गेल्यास खेळाडूंना सराव करणे सोयीचे होईल.

खेळाडूंसाठी असलेल्या जॉगिंग ट्रॅकची सुरू असलेली वाताहत पाहवत नाही. पुण्याच्या ट्रॅकनंतर नाशिकचाच ट्रॅक सुस्थितीत आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनीही बाजूला असलेल्या जॉगिंग ट्रॅकचा वापर करावा व खेळाडूंना सहकार्य करावे.

- अविनाश खैरनार, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात दूषित पाणीपुरवठा

0
0

सटाण्यात दूषित पाणीपुरवठा

पाण्याला दुर्गंधी; नागरिक संतप्त

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील नववसाहतीमधील काही भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून गढूळ व दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.

शहरात पालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाण्यात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे शहरात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र निव्वळ शोभेची वास्तू म्हणूनच उरले आहे की काय, असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून होत आहे. दरम्यान, आरम नदीला केळझर धरणातील आवर्तन सोडूनही शहरात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील नववसाहतीमधील सीमा नगर, गणपत नगर, परशुराम कॉलनी, सदा नगर, पाठक मैदान, नामपूर रोड, आदी परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असून, आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी करून सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंग-रेषांच्या दुनियेत रंगले चिमुकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक तापमानवाढीची समस्या कमी करायची असेल तर वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही मोठी गरज आहे. वृक्षांनी सजलेला आपला प्रदेश किती सुंदर दिसू शकतो, याचे चित्रण शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा कस लावत केले. निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे. तिडके कॉलनीतील ऋग्वेद हॉल याठिकाणी रविवारी सकाळी ही स्पर्धा पार पडली. वृक्षसंवर्धनाबरोबरच स्वच्छतेचे महत्त्वही बच्चेकंपनीने रंगांच्या माध्यमातून पटवून दिले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीतर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये बच्चेकंपनीलाही विशेष स्थान देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटाला विषय देण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या गटासाठी 'मी मित्रांबरोबर पतंग उडवीत आहे', पाचवी ते सातवीच्या गटासाठी 'आम्ही वृक्षारोपण करतोय', तर आठवी ते दहावीच्या गटासाठी 'स्वच्छ नाशिक आमचा सहभाग' असे विषय देण्यात आले होते. विषयांना अनुसरून तसेच वॉटर कलर, ऑइल पेस्टल, रंगीत स्केचपेन, रंगीत पेन्सिल्सचा वापर करून आकर्षक रंगसंगतीत विद्यार्थ्यांनी चित्र चितारली. डी. व्ही. मुळे, एस. एम. टिळे, एस. एन. गवळी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

\Bचित्रांतून प्रबोधन

\Bपतंग उडविणाऱ्या मुलांचे क्षण, निसर्ग चित्र आणि पतंगोस्तव एंजॉय करणारी मुले, वृक्षारोपणांचे महत्त्व पटवून देणारी चित्र, वृक्ष संवर्धनबाबत प्रबोधन करणारी चित्र, तसेच स्वच्छ नाशिकअंतर्गत स्वच्छ गोदाकाठ, स्वच्छता मोहीम, स्वच्छ रेल्वे स्टेशन, स्वच्छ परिसरांचे दर्शन स्पर्धकांनी चित्रांतून घडवले. विशेष म्हणजे आपल्या वयापेक्षा अधिक परिपक्व विचारांचे दर्शन घडवत सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्नही स्पर्धकांनी केला.

\Bस्पर्धेचा निकाल 'कलासंगम'मध्ये

\B'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे वर्धापन दिनानिमित्त 'कलासंगम' या कार्यक्रमाचे ९ व १० जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

स्पर्धा मुला-मुलींनी खूप एन्जॉय केली. मनाला भावतील असे चित्र त्यांनी रेखाटले होते. 'मटा'ने या स्पर्धेतून बालकांच्या कलागुणांना वाव दिल्याने पालकांमध्येही आनंदाचे वातावरण होते.

सुनील गवळी, परीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीनंतरच्या करिअर संधींबाबात उद्या व्याख्यान

0
0

प्रमोद पाटील यांचे लाभणार मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलिकडील कालावधीत बारावीनंतर करिअरची मुख्य वाट शोधण्यावर भर दिला जातो. बारावीची परीक्षा झाल्यानंतर अनेकजण या विचाराला सुरुवात करतात. मात्र, बऱ्याचदा येथेच गल्लत होते. भविष्यातील करिअरची दिशा दहावीच्या वळणानंतर निश्चित करता आली तर करिअरलाही अपेक्षेइतका चांगला आकार देणे शक्य होऊ शकते. यामुळे दहावीनंतरचा करिअरचा टप्पाही तितकाच महत्त्वाचा आहे. 'दहावीनंतरच्या करिअर संधी' या विषयावर स्मार्ट एज्युकेशन या संस्थेचे संचालक प्रमोद पाटील हे मंगळवारी (दि. ५) मार्गदर्शन करणार आहेत. कॉलेजरोडवरील एनबीटी लॉ कॉलेजच्या आरएनटी हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थी व पालकांना प्रवेश खुला असणार आहे.

अनेकदा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणती शाखा निवडावी, विशिष्ट शाखाच का निवडावी, कोणत्या शाखेनंतर कुठल्या करिअरसंधी उपलब्ध असतात, त्यासाठी सुरुवातीपासून पूर्वतयारी कुठल्या स्वरूपाची करावी, विशिष्ट विद्याशाखेत निभाव लागण्यासाठी स्वत:जवळ कोणते गुण-कौशल्य असायला हवे, शाखा किंवा दीर्घकालीन करिअरची वाट निवडताना स्वत:चा कल कसा ओळखावा, करिअरचे नियोजन करताना कुठले-कुठले मुद्दे विचारात घ्यावेत, करिअर निवडीच्या वाटेवरील धोके कसे टाळावेत आदी प्रश्नांचे निराकरण या व्याख्यानात केले जाणार आहे.

स्मार्ट एज्युकेशनचे संचालक प्रमोद पाटील हे यावेळी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. एनबीटी कॉलेजमधील आरएनटी हॉलमध्ये होणाऱ्या या व्याख्यानात पालक व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांनाही तज्ज्ञांच्या वतीने उत्तर दिले जाणार आहे. या संधीचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images