Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाच कोटींच्या बक्षिसाचे आमिष ठरेल कुचकामी

$
0
0

बेनामी व्यवहार खबरी पुरस्कार योजना २०१८ नावाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केलेल्या योजनेंतर्गत परदेशात दडवलेला काळा पैसा दाखविल्यास थेट पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे परदेशातील काळा पैसा आणण्यासाठी भाजप सरकारने केलेले प्रयत्न फोल ठरल्याने आता नागरिकांना बक्षिसाचे आमिष दाखविण्यात येत असावे, अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचारातून अवैध संपत्ती निर्माण होत असते. त्यावर उतारा म्हणून नोटाबंदी आणि कॅशलेस व्यवहारांचा उपचार केला गेला. मात्र, त्यात म्हणावे तसे यश आले नाही. आता थेट नागरिकांना करोडपती होण्याचे दाखविलेले आमिष कुचकामी ठरू शकेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

आणखी एक दिखाऊ घोषणा

सरकार परदेशांत गुंतविलेला काळा पैसा भारतात आणणार आहे या विश्वासावर जनतेने मते देऊन निवडून दिले. आता सरकार म्हणते, की तुम्ही आम्हाला काळा पैसा दाखवा, बक्षीस मिळवून करोडपती बना! मात्र, यावर जनता विश्वास ठेवणार नाही, असे वाटते. महागाईने कळस गाठलेला असताना सरकारने ही आणखी एक दिखाऊ घोषणा केली आहे.

-रुपाली सोनवणे

...तर यंत्रणा करते काय?

सरकारने सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या योजनांचा सुकाळ केला आहे. पूर्वीच्या सरकारने राबविलेल्या आणि खरोखरच जनतेच्या हिताच्या योजना नाव बदलवून पुढे आणल्या आहेत. तथापि, नव्याने केलेल्या योजनांची अंमलबजावणी पूर्णत: फसली आहे. यंत्रणांना बेनामी व्यवहारांची माहिती नागरिकांनी द्यायची, तर मग यंत्रणा करते काय?

-पांडुरंग आचारी

सरकारने द्यावी संरक्षणाची हमी

बेनामी मालमत्ता व व्यवहारांची माहिती देऊन जर नागरिकांना लाखो रुपये मिळणार असतील आणि त्यांचे नाव गुप्त राहणार असेल, तर काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल, असे वाटते. संपत्तीचे गैरव्यवहार करणारे त्यांना अडथळा ठरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतील. त्यांच्या संरक्षणाची हमी देणे ही सरकारची जबाबदारी राहील.

-अॅड. संतोष भोई

नियमांची व्हावी काटेकोर अंमलबजावणी

देशात बेनामी व्यवहार होतात आणि उत्पन्नावरील करचोरी होतच असते, हे लपून राहिलेले नाही. यामध्ये नियमांतील पळवाटा शोधत कर वाचविले जातात, तसेच भ्रष्ट सरकारी यंत्रणांमधून अवैध संपत्ती निर्माण होत असते. याला पायबंद घालायचा असेल, तर नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. बक्षिसाने करचोरी थांबणार नाही.

-कैलास मोरे

कुचकामी सुधारणांचा परिणाम

व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. मोठ्या प्रमाणात करचोरी होणे ही सरकारची खरी समस्या आहे. राज्य कारभाराचा गाडा चालवीत असताना निर्माण होणारी आर्थिक तूट दिवसेंदिवस वाढते आहे. सरकारने कर प्रणालीमध्ये केलेल्या सुधारणा कुचकामी ठरल्याने नागरिकांनी खबर द्यावी म्हणून बक्षिसाचे आमिष दाखविले जात आहे.

-जयराम मोंढे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरम्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी भाविक रामकुंडावर स्नानासाठी गर्दी करीत आहेत. शहरात असलेल्या मंदिरांमध्ये वाण देण्यासाठी रीघ लागली आहे.

हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत महत्व आहे. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे विविध ठिकाणांहून स्नानासाठी आलेल्या भाविकांची रामकुंडावर रोज प्रचंड गर्दी होत आहे. स्नान झाल्यानंतर भाविक परिसरात असलेल्या मंदिरांमध्ये वाण देत आहेत. या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण असल्याने विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा-अर्चा करतात. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. शहरात असलेल्या कापड बाजारातील मुरलीधर मंदिरात वाण देण्यासाठी महिलांची गर्दी होत असून, काळाराम मंदिरातदेखील वाण दिले जात आहे. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. त्याचप्रमाणे देवाला आणि ब्राह्मणांनाही दान दिले जाते. यासाठी कापड बाजारातील बालाजी मंदिराखाली बत्ताशे, अनारसे विक्रीसाठी आहेत. देवाला वाहण्यासाठी १५ रुपये व २० रुपयांचे पॅकिंगदेखील करण्यात आले आहे.

सराफ बाजाराला झळाळी

गुरुपुष्यमृताच्या मुहुर्ताप्रमाणेच अधिकमासात थोडे तरी सोने खरेदी करावे म्हणजे ते अधिक काळ टिकते व त्याचा संचय दिवसेंदिवस अधिक होत जातो, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे वाणासाठी व संचयासाठीदेखील सुवर्णखरेदी होत आहे. जावयांसाठी बाजारात विविध प्रकारच्या अंगठ्या उपलब्ध असून, यात हिऱ्याच्या अंगठ्यांना मोठी मागणी आहे. १० हजारांपासून ते लाखो रुपये किमतीच्या अंगठ्यांची विक्री होत आहे. त्याखालोखाल एम्बॉस आणि कास्टिंगच्या अंगठ्यादेखील मागणी टिकवून आहेत. चेन, गोफ, ब्रेसलेट यांचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ब्रेसलेट ५ ग्रॅम वजनापासून उपलब्ध आहेत.

मिठाईच्या दुकानात अनारसे

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासानिमित्त शहरातील मिठाई विक्रेत्यांनीही विशेष तयारी केली आहे. या कालावधीत जाळीदार पदार्थांना मागणी असल्याने म्हैसूर पाक व अनारसे यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अनारसे ३६० रुपये किलो तर म्हैसूरपाक १६० रुपये किलो भावाने विकला जात आहे. त्याचप्रमाणे वाणासाठी ३४ अनारशांचे पॅकिंग २५० रुपयांना तर अनारशांचे एक किलो पीठ तीनशे रुपयांना उपलब्ध आहे.

अधिकमास का येतो?

हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु, इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षांत मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामाजिक प्रश्नांवर जनमताची गरज हवी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सामाजिक प्रश्नांवर जनमताचे संघटन काळाची गरज निर्माण झाली आहे. भारत ज्ञान विज्ञान समुदाय संस्थेकडून विविध सामाजिक विषयांवर सुरू असलेले संघटनात्मक व विधायक कार्य अनुकरणीय व उल्लेखनीय आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांच्या भूमीत भारत ज्ञान विज्ञान समुदाय संस्थेने कृषी, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण अशा क्षेत्रात सुरू केलेले कार्य भविष्यातील क्रांती आहे, असे गौरवोद्गार नाशिक विभागाचे निधी लेखापरीक्षण सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांनी रविवारी शेवगेदारणा (ता. नाशिक) येथे काढले.

भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे नववे द्विवार्षिक जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन बाळासाहेब घोरपडे यांच्या हस्ते झाले. याप्रंगी ते बोलत होते. ग्रामीण भागात एखाद्या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या जिल्हा शाखेचे अधिवेशन भरविणे यातच मोठे यश दडलेले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर 'बीव्हीजीएस'चे आतापर्यंत केलेले कार्य क्रांतीकारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बीजीव्हीएस सर्वसामान्यांच्या जगण्याशी जोडली गेलेली संस्था असल्याचे प्रतिपादन राज्य अध्यक्ष जय परेश यांनी केले. लक्ष्मण जाधव यांनी प्रास्ताविक तर योगिता कासार यांनी सूत्रसंचालन केले.

भारत ज्ञान विज्ञान समुदाय संस्थेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत गायखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास पाटील, संस्थेचे सचिव संतोष शेंडकर, राज्य कोषाध्यक्ष अशोक गायधनी, राज्य सहसचिव राहुल गवारे,उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जायभावे, राहुल खरात, लक्ष्मण जाधव, नीता कोष्ठी, गोपीनाथ कांबळे, शेवगेदारणाच्या सरपंच सविता ढोकणे, पोलिस पाटील उज्ज्वला कासार आदी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच राजाराम कासार, सदस्य सुनिता पाळदे, किरण कासार इंदू माळी, सोसायटी चेअरमन अशोक पाळदे, जाखोरीचे सरपंच विश्वास कळमकर, सदस्य प्रकाश पगारे, माणिक कासार, अश्वमेध प्रबोधिनीचे विलास आढाव, रोहिणे मिठे, दिलीप गायधनी, प्रतिभा कडलक, शरद टिळे, कैलास म्हस्के, करुणा जाधव, प्रा. प्रतिभा भट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

$
0
0

दिंडोरी : सातपूर येथील भवानी चौकातील नीलेश दत्तात्रेय भामरे (वय ३०) याने गांडोळे (ता. दिंडोरी) शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो एका खासगी फायनान्स कंपनीत तो कामाला होता.

गांडोळे शिवारातील नामदेव भोये यांच्या शेतातील गट नं. ५० मधील आंब्याच्या झाडाला नीलेशने गळफास घेतला. नागरिकांनी ही बाब पोलिसपाटील हर्षदा चौधरी यांना सांगितली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. नीलेशच्या खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड, पर्स आदी साहित्य व एक चिठ्ठी आढळली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसाय म्हणून शब्दांचा खेळ उत्तम केला!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहाटे चार ते रात्री बारा असे सात वर्षे न चुकता काम केले. पुणे ते मुंबई रोज प्रवास केला. वडिलांना शब्द दिला होता, की पगाराइतके पैसे महिन्याच्या एक तारखेला कमवू, एक रुपया कमी कमावला तरी सारे सोडून तुम्ही म्हणाल ती नोकरी करू. त्या शब्दासाठी हे सारे करून दाखवले. व्यवसाय म्हणून शब्दांचा खेळ यशस्वीपणे केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ संवादक सुधीर गाडगीळ यांनी केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ही मुलाखत झाली. शब्दांचा खेळ करू शकतो, असे कधी लक्षात आले, या प्रश्नाचे उत्तर देताना गाडगीळ म्हणाले, की पुण्याच्या अनेक देवीदेवतांच्या मंदिरांमध्ये कथा कीर्तनाला गेलो. तेथील कीर्तनकारांनी शब्दांची गोडी लावली. सर्वप्रथम ऑर्केस्ट्रामध्ये उभा राहिलो आणि हजरबाबीपणाचे धडे मिळाले ते येथूनच. पु. ल. देशपांडे आणि प्र. के. अत्रे यांचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. शब्दांची मांडणी कशी करायची हे त्यांनीच शिकवले. माझ्यातला आत्मविश्वास वाढण्यासाठी शब्दांचा योग्य वापर कारण ठरला. भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी आता संवाद साधतोय, प्रत्येकाची काही लकब आहे, काही उणिवा लक्षात येत आहेत. आणखीही बरेच काही करता आले असते, असे वाटते.

ही मुलाखत अपर्णा क्षेमकल्याणी यांनी घेतली. प्रारंभी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांची ऑटोबायोग्राफी देऊन गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते क्षेमकल्याणी यांचा सत्कार करण्यात आला होता. गाडगीळ यांची मुलाखत ऐकण्यासाठी श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

चाबूक चित्रपट ऑगस्टमध्ये

नाटकांमध्ये व चित्रपटात काम केले आहे. माफीचा साक्षीदार, माहेरची साडी या चित्रपटात छोटी भूमिका केली; परंतु पूर्ण लांबीचा चित्रपट ऑगस्टमध्ये येत आहे. 'चाबूक' नावाचा हा चित्रपट मधुर भांडारकरच्या भावाने दिग्दर्शित केला आहे. त्यात पूर्ण वेळ काम केले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या पोलिस ठाण्यांना कायमचे टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीजचोरीला आळा बसावा आणि वीज सेवेविषयीच्या गुन्ह्यांचा निपटारा जलद व्हावा, या उद्देशाने २००६ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने राज्यात सहा पोलिस ठाणी स्थापन केली होती. ही सर्व सहाही पोलिस ठाणी कायमची बंद झाली असून, या पोलिस ठाण्यांकडे प्रलंबित गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. महावितरणच्या नाशिकरोड येथील पोलिस ठाण्याचेही कामकाज बंद झाले असून, या पोलिस ठाण्यात प्रलंबित असलेले तब्बल १३ हजार ८१४ गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांत वर्ग करण्यात आले आहेत. परिणामी, हे गुन्हे वर्ग करण्यात आलेल्या पोलिस ठाण्यांवरील गुन्ह्यांचा भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

राज्यात वीजचोरीविषयक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी २००६ मध्ये नाशिकसह कल्याण, जालना, लातूर, नागपूर आणि पुणे या सहा ठिकाणी स्वतंत्र वीज पोलिस ठाणी स्थापन करण्यात आली होती. मात्र, या सर्व सहाही पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार प्रचंड असल्याने कामकाज करणे गैरसोयीचे ठरत असल्याच्या कारणाने ही सर्व पोलिस ठाणी बंद करण्याची शिफारस महावितरण कंपनीने राज्याच्या गृह खात्याकडे केली होती. त्यानुसार पोलिस ठाणी बंद करण्यात आली. या पोलिस ठाण्यांतील प्रलंबित गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांत वर्ग करण्यात आले आहेत. नाशिक पोलिस ठाण्याकडील सर्व प्रलंबित गुन्हे ३१ मे रोजी स्थानिक पोलिस ठाण्यांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. महावितरणच्या नाशिकरोड पोलिस ठाण्यात २००६ पासून आतापर्यंत २५,०३८ इतके गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १०,४२२ गुन्ह्यांचा निपटारा करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. या बारा वर्षांच्या काळात दाखल गुन्ह्यांतून तब्बल १४ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.

वर्ग झालेले गुन्हे

नाशिक जिल्हा

घोटी : ८८

मनमाड : ११११

मालेगाव : १४८७

नाशिकरोड : १००

भद्रकाली : ३७

धुळे जिल्हा

देवपूर : ३१०

शिरपूर : ५७४

साक्री : ५५०

जळगाव जिल्हा

चाळीसगाव : ३६९

जिल्हापेठ : १५८८

बाजारपेठ : १६७४

यावल : ३४३१

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार : ३६२

शहादा : २३४

अक्कलकुवा : १०९

नगर जिल्हा

नगर तालुका : ६१४

कर्जत : २६८

श्रीरामपूर : ४३४

संगमनेर : ४७४

एकूण : १३,८१४

विभागातील एकूण हस्तांतरित गुन्हे

नाशिक २८२३

धुळे १४३४

नंदुरबार ७०५

जळगाव ७०६२

नगर १७९०

एकूण १३८१४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिका महिला मंडळातर्फे वृद्धाश्रमात आमरस जेवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अधिक मासानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रुढीप्रमाणे भोजन अथवा वाणाचा कार्यक्रम न करता माहेश्वरी कालिका महिला मंडळाच्या वतीने टाकळीरोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमात जावून आमरसाचे जेवण देण्यात आले. या उपक्रमाद्वारे मंडळाने अन्य संस्थांपुढेही आदर्श उभा केला.

माहेश्वरी कालिका महिला मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. अधिक मासानिमित्त या मंडळाने पूजापाठ, दानधर्म अशा प्रथांना फाटा देत वृद्धाश्रमात जाऊन आमरसाचे जेवण देत अनोख्या पद्धतीने उपक्रम राबविला. यावेळी हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम मानसी राजहंस यांनी सादर केला. प्रास्ताविक सरिता माहेश्वरी व भारती मंडोरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा विद्या लाहोटी, प्रतिमा बाहेती, शशिकला मंत्री, जया कलंत्री, किरण जाजू, शोभा मंत्री, उज्वला लढ्ढा, विणा चांडक, विमला राठी, सारिका काबरा, प्रीती लाहोटी, शुभदा राठी यांनी विशेष प्रयत्न केले.

वडिलांचा स्मृतीदिन साजरा

जेलरोड : गंगापूररोड येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी व निवृत्त अधिकारी रमेश अय्यर यांनी आपल्या वडिलांचा स्मृतीदिन सामानगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला. वृध्दाश्रमातील ८० ज्येष्ठांना मिष्टान्न देण्यात आले. नंतर आईस्क्रिमचे वाटप करण्यात आले. मानव उत्थान मंचच्या प्रोजेक्ट खुशीतंर्गत हा कार्यक्रम झाल्याची माहिती अध्यक्ष जगबीरसिंग यांनी दिली. रमेश अय्यर आणि त्यांची पत्नी उमा अय्यर यांनी ज्येष्ठांना स्वतः प्रेमाने खाऊ घातले. पंकज जोशी, अनिष बिस्त, हेमल लढानी, धनश्री कुलकर्णी, प्रियंका बांगर, श्रृती वाघ आदींनी संयोजन केले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोरांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारने बांधलेल्या विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंव्यतिरिक्त विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने नागरिकांना येथे फिरण्यास मज्जाव केला होता. याबाबत महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्त छापून आल्यानंतर प्रशासनाने याबाबत कठोर कारवाई करणे सुरू केले होते. मात्र, या कारवाईचा राग आल्याने काही नागरिकांनी शनिवारी क्रीडा उपसंचालकांना मारहाण केली. याबाबत सर्व स्तरांतून निषेध होत असून, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

हल्ला झाल्यानंतर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जखमी उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांचा हॉस्पिटलमध्ये जाऊन जबाब घेतला. या घटनेची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दुबळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विभागीय क्रीडा संकुलात अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले होते काही टवाळखोरांनी या ठिकाणी दारुचा अड्डा केला होता. सिंथेटिक ट्रॅकचे होत असलेले नुकसान सर्वप्रथम 'महाराष्ट्र टाइम्स'ने उजेडात आणले होते. याबाबत प्रशासनाने कारवाई सुरू करून नागरिकांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. त्याचा राग येथील नागरिकांच्या मनात होता या ठिकाणी विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय आहे तेथ कर्मचाऱ्यांचा रोज राबता असतो येथील कर्मचाऱ्यांना देखील या कारवाईमुळे धमक्या दिल्या जात होत्या. 'ट्रॅक काय तुमच्या बापाचा आहे का' असे बोलून धमक्या दिल्या होत्या. यावर उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना मज्जाव केला होता.

नाशिकमध्ये कविता राऊतने धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उंचावले. यावेळी नाशिकमधून खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची ओरड केली जात होती. नाशिकमधील अॅथलेटिक खेळाडूंना सिंथेटिक ट्रॅकवर सराव करण्यासाठी मुंबई-पुण्याला धाव घ्यावी लागत होती. ही गरज ओळखून विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्र वापरण्यात आले. मात्र, तयार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्याचा दुरुपयोग सुरू झाला. या ठिकाणी परिसरातील लहान मुले खेळण्यासाठी येऊ लागली. हा ट्रॅक म्हणजे जॉगर्स पार्क झाला आहे. याबाबत विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती. या ट्रॅकचा वापर फक्त खेळाडूंसाठीच व्हावा, असे ठरविण्यात आले. मात्र, तसे घडले नाही. मध्यंतरीच्या काळात याठिकाणी हास्यक्लबदेखील सुरू करण्यात आला होता. मात्र खेळाडूंनी वेळीच आक्षेप घेतल्याने तो बंद झाला.

या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी जॉगिंगला येऊ नये. नागरिकांनी यासाठी कितीही दबाव आणला तरीही खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही. हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी आहे. ते खेळाडूंनाच मिळावे यासाठी पुन्हा कामाला लागणार.

-जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सह्याद्रीनगरचा ‘तो’ भूखंड शिवसेना कार्यालयासाठीच

$
0
0

महानगरप्रमुख बडवे यांचा दावा

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील सह्याद्रीनगर येथील भूखंड शिवसेना कार्यालयासाठीच खरेदी केला असून त्याठिकाणी असलेले बांधकाम चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आले आहे. संबंधित भूखंड शिवसेना नेते मामा ठाकरे यांच्या नावावर असला तरी त्याठिकाणी शिवसेना कार्यालयाच उभारण्याचा त्यांचाही मनोदय असून या प्रकरणचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. लवकरच त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने शिवसेना संपर्क कार्यालय उभे राहणार असल्याचे महानगर प्रमुख महेश बडवे यांनी सांगितले.

सिडकोतील सह्याद्रीनगर येथील भूखंडावर विभाग प्रमुख मयूर परदेशी यांनी शिवसेनेचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालय अतिक्रमण म्हणून हटविण्यात आले. त्यानंतर या भूखंडाची माहिती घेवून ती सर्व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यता आल्याचे बडवे यांनी सांगितले. सुमारे ३५ वर्षांपूर्वी मामा ठाकरे यांनी हा भूखंड शिवसेनेच्या कार्यालयासाठी खरेदी केला आहे. हा भूखंड सिडकोने विक्री केलेला असून त्यावर हे शिवसेना कार्यालय उभारण्यात आले आहे. असे असतांनाही महापालिकेने चुकीच्या पद्धतीने हे अतिक्रमण म्हणून काढले आहे. या अतिक्रमणाचा आम्ही निषेध करीत आहोत.

सदरचा प्लॉट हा मामा ठाकरे यांनी सिडकोकडून खरेदी केला असला तरी तो शिवसेनेच्या कार्यालयासाठीच केला आहे. नाव कोणाचे याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली आणि ठाकरे हेही याठिकाणी कार्यालय करण्यास विरोध निश्‍चितच करणार नसल्याचा विश्‍वास बडवे यांनी व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठींना हा विषय सांगण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून लवकरच यावर मार्ग निघणार आहे. या संदर्भात सिडकोशीही पत्रव्यवहार करण्यात येणार असून सिडकोची मालमत्ता नाही. त्या भूखंडाची खरेदी झालेली आहे. महापालिकेने चुकीचे अतिक्रमण काढल्याचा दावाही त्यांनी केला.

गेल्या ३५ वर्षांपासून येथे शिवसेनेचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. तेथील शिवसेना कार्यालयाचे बांधकाम अतिक्रमण ठरवून काढण्यात आले, ते चुकीचे आहे. भखंडाबाहेरील फलक प्रशासनाने काढल्याने या अतिक्रमण मोहिमेचा व सिडको प्रशासकांचा निषेध करतो. या ठिकाणी लवकरच शिवसेना संपक र्कार्यालय उभे राहणार, हे मात्र निश्‍चितच आहे.

- मयूर परदेशी, विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पकतेचा कस...

$
0
0

कल्पकतेचा कस...

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी तिडके कॉलनीत चित्रकला स्पर्धा रंगली. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत 'मी मित्रांबरोबर पतंग उडवीत आहे', 'आम्ही वृक्षारोपण करतोय', 'स्वच्छ नाशिक आमचा सहभाग' या विषयांवर आपल्या कल्पकतेचा कस लावून बोलकी चित्रे रेखाटण्यात बच्चेकंपनी दंग झाली होती. आपल्या वयापेक्षा अधिक परिपक्व विचारांचे दर्शन घडवून चित्रांद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न या स्पर्धकांनी केला…

---

सेतू कार्यालयासाठी आंदोलनाचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले नाशिकरोड येथील सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. हे कार्यालय सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाशिकरोड विभागप्रमुख तेजस शेरताटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकावर संतोष पुंड, सौरभ शेरताटे, राकेश महाजन, संतोष लाटे आदींची नावे आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत आहे. विविध वर्गांचे निकाल लागत असल्याने पुढील प्रवेशप्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्रे आदींसाठी सेतू कार्यालय हाच प्रमुख आधार असतो. परंतु, येथील विभागीय महसूल कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. या कार्यालयातून जातीचे दाखले, रहिवासाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी दाखले मिळत होते. नाशिकरोड, विहितगाव, शिंदे, पळसे आदी भागातील विद्यार्थ्यांना या कार्यालयाचा मोठा आधार होता. मात्र, आता हे कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना सायबर कॅफेत जाऊन शंभर-दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. तेथे गर्दी प्रचंड वाढली आहे. प्रदीर्घ काळ रांगेत उभे राहावे लागत आहे. सरकार नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी कार्यरत असते, तर मग येथील सेतू कार्यालय बंद का, असा सवाल नागरिक करीत आहेत.

---

बाजार समितीमधील सेल हॉलला भगदाड (फोटो)

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळभाज्यांचे लिलाव होतात त्या सेल हॉलला भगदाड पडले आहे. या सेल हॉलच्या वरच्या बाजूला असलेल्या काँक्रिटीकरणाच्या खाली टाकण्यात आलेली भर निघून गेल्यामुळे हे भगदाड पडले आहे. या भागात रोज हजारोच्या संख्येने शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी यांचा वावर असतो. अशा भागात पडलेले हे भगदाड धोकादायक बनले आहे. ते बुजविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

पुण्यतिथी सोहळा

पंचवटी : पेठरोडवरील नाळेगावचे सिद्ध नागेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. ५) सकाळी ८ वाजेपासून सद्गुरू विश्वनाथगिरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दुग्धाभिषेक, आरती, नैवेद्य, महापूजा आदी कार्यक्रम होतील. महंत व मान्यवरांचा गौरव आणि संगीत, भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आनंदगिरी महाराज यांनी केले आहे.

चोरांचा सुळसुळाट

जेलरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानक आणि बसस्थानकात मोबाइल चोर सक्रिय झाले आहेत. दर दिवसाला चार ते पाच मोबाइल चोरीस जात आहेत. नाशिकरोड व रेल्वे पोलिसांनी मोबाइल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सुट्यांचा कालावधी असल्याने रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा भुरटे चोर घेत आहेत. रेल्वे आणि बसमध्ये प्रवासी चढता-उतरताना मोबाइल, पैशांचे पाकीट लंपास केले जात आहे. पोलिस ठाण्यात गेल्यावर चोरीऐवजी मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे प्रवासी आणि रहिवासी वैतागले आहेत.

डांबरीकरणाची मागणी

देवळाली कॅम्प : परिसरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील भूमिगत गटारीचे काम अंतिम टप्प्यात असून, पाऊस पडण्याआधी महालक्ष्मी मंदिर, बालगृहरोड, धुर्जड मळा, साकूरकर चाळ, दस्तगीर बाबारोड आदी भागातील नागरी वापराच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जगदीश गोडसे, अरुण जाधव, संजय गोडसे, राजेश धुर्जड, रामेश्वर हारक, कैलास गोडसे, सुनील चव्हाणके, राहुल धुर्जड आदींनी ही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या धरणांचा सुकला घसा

$
0
0

जिल्ह्यातील १२ धरणांमधील पाणीसाठा १० टक्क्यांहून कमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना पावसाची चाहूल लागली असली तरी अजूनही मान्सूनचे आगमन होण्यास काहीसा विलंब आहे. नाशिककरांची तहान भागविणारी अनेक धरणे तळाला जात असून एकूण धरणांपैकी निम्म्या धरणांचा घसा कोरडा झाला आहे. जिल्ह्यातील २४ पैकी १२ धरणांमध्ये १० टक्क्यांहूनही कमी पाणीसाठा शिल्लक असून चार धरणे कोरडीठाक पडली आहेत.

मान्सूनपूर्व पावसाने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे नाशिककरांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत. रिती होऊ पाहणारी जलाशये देखील पाण्यासाठी आसुसली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये आजमितीस १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चार टक्के अधिक आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वरसह अनेक तालुक्यांमध्ये ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरवाऱ्या बंद व्हाव्यात, यासाठी पावसाची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात २४ धरणे असून त्यांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी आहे. परंतु आजमितीस या सर्व धरणांमध्ये ११ हजार २३२ दशलक्ष घनफुट एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७ जूनपर्यंत मान्सूनला सुरूवात झाली तर तळ गाठलेली धरणेही पुन्हा भरण्यास मदत होऊ शकेल.

१२ धरणांनी गाठला तळ

जिल्ह्यातील २४ पैकी १२ धरणांनी तळ गाठला आहे. त्यामध्ये गंगापूर धरण समूहातील गौतमी गोदावरी, पालखेड धरण समूहातील वाघाड, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, हरणबारी, केळझर या धरणांचा समावेश आहे. या धरणांमध्ये १ ते १० टक्के एवढेच पाणी शिल्लक आहे. तर भावली, मुकणे, भोजापूर, नागासाक्या आणि माणिकपुंज ही पाच धरणे अक्षरश: कोरडीठाक पडली आहेत.

गंगापूर धरणात २९ टक्के पाणी

शहर आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थितीत २९ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा २४ टक्के ऐवढा होता. त्यामुळे यंदा शहरवासियांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मान्सून सुरू झाल्यास टँकरचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

धरणसमूह........उपलब्ध पाणीसाठा(टक्केवारीत)

गंगापूर..................२८

पालखेड................१८

गिरणा...................१७

एकूण....................१७

पाणीसाठा कमी झालेली धरणे

धरण................पाणीसाठा

गौतमी गोदावरी........१०

वालदेवी................९

पुणेगाव.................९

वाघाड..................४

तिसगाव................५

हरणबारी...............३

केळझर................२

भोजापूर/ भावली / मुकणे / नागासाक्या / माणिकपुंज ........००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांअभावी उपचार थांबणार नाहीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या साडेतीन वर्षांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून साडेतीनशे कोटी रुपयांचे वाटप गरजू व्यक्तींना करण्यात आले. जवळपास १५ लाख लोकांना याचा फायदा झाला असून, पैशांसाठी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत, याची काळजी घेतली जात असल्याचे प्रतिपादन राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

एचएससी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या (बीएमटी) उद्घाटनप्रसंगी शेटे बोलत होते. उत्तर महाराष्ट्रातील पहिल्याच बीएमटी युनिटचे उद्घाटन पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी यांच्या हस्ते झाले. राज्यातील गरीब रुग्णांना उपचारासाठी योग्य वेळी आर्थिक मदत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. कॅन्सरसारख्या रोगावरदेखील उपचारासाठी मदत केली जात असल्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णाला धर्मादाय संस्थांच्या मदतीनेदेखील साडेसहाशे कोटी रुपयांची मदत मागील साडेतीन वर्षांत झाल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले. आजवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीही मदत झालेली नसल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले. या वेळी शेटे यांनी काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा-सुविधा उपलब्ध होत असल्याबाबत डॉ. अडवाणी यांनी समाधान व्यक्त केले. १९८१ मध्ये मुंबईत पहिले बीएमटी युनिट सुरू झाले होते. भारतात टीबी व इतर आजाराचे आव्हान कायम असताना अशा दुर्मिळ आजारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा का, अशी टीका आमच्यावर झाली. मात्र, एका लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीवर पहिली सर्जरी झाली. ती मुलगी आज पुण्याच्या तळेगाव येथे असून, कधी तरी भेटली की आपण केलेल्या कामाचे फळ आपल्याच डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य मिळत असल्याचे डॉ. अडवाणी यांनी स्पष्ट केले. एचएससी सेंटरचे प्रमुख डॉ. राज नगरकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. बीएमटी युनिटचे प्रमुख डॉ. नीलेश वासेकर यांनी युनिटबाबत माहिती दिली. मेडिको अँकोलॉजिस्ट डॉ. निरजंन राठोड, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, उपजिल्हाधिकारी सरिता नरके, रतन लथ आदी उपस्थित होते.

'मुस्कान'मध्ये समावेशाची शक्यता

राज्य सरकारने मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरासाठी मुस्कान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नुकताच एक करार केला. मात्र, नाशिक यात कोठेही मागे पडू नये, याची काळजी आपण घेणार असून, या योजनेसाठी पाचवे शहर नाशिक असेल, असे आश्वासन शेटे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हेच ‘दुखणं’

$
0
0

टॉक टाइम

ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातदेखील अपुऱ्या वैद्यकीय सुविधा सर्वच पातळ्यांवर डोकेदुखी ठरत असून, लोकसंख्येच्या मानाने त्यात आताच वाढ करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट असणे महत्त्वाचे असल्याचे मत पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी डॉ. अडवाणी आले असता त्यांच्याशी केलेली बातचीत.

--

कॅन्सरसह रक्तदोषाचे प्रमाण वाढते आहे. त्यात तरुणांचा टक्का किती आहे?

रक्तदोष हा बहुतांश अनुवांशिक असतो. विशेषत: एकाच अनुवंशाच्या स्त्री-पुरुषांचे विवाह त्याच त्याच पिढीत होत गेल्यास हे प्रमाण वाढू शकते. मात्र, कॅन्सरची कारणे वेगळी असून, त्यात तरुणांचे प्रमाण वाढल्याची खंत वाटते. कॅन्सरसाठी असा वयोगट ठरविता येणार नाही. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही यास बळी पडू शकतो. राहणीमानातील बदल, व्यसने, झोपणे आणि उठण्याच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात.

तरीही नव्या रुग्णांचे प्रमाण किती असू शकते?

आजमितीस दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे २०० जणांना वेगवेगळ्या स्वरूपाचा कॅन्सर होतो. दरवर्षी भारतात १५ लाख नवीन रुग्ण समोर येतात. यात गरीब- श्रीमंत अथवा शहरी वा ग्रामीण, लहान- मोठा असा भेद करता येणार नाही. कॅन्सरच नव्हे, तर वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढते असून, लोकसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शहरी भागतील हॉस्पिटल्समध्ये प्रचंड गर्दी असून, या सुविधा ग्रामीण भागात दिसत नाहीत.

यासाठी सरकार कमी पडते काय?

सरकार काम करते आहे. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. यासाठी सरकारसह सर्वांनाच एक मिशन हाती घ्यावे लागणार आहे. आज अमेरिकेत दहा हजार लोकसंख्येमागे ५०० बेड्स उपलब्ध आहेत. भारतात मात्र हे प्रमाण ५० इतके कमी आहे. एकूणच डॉक्टर आणि हॉस्पिटल्सची संख्या कमी असून, सरकारी हॉस्पिटल्सची परिस्थिती फारच हलाखीची आहे.

यात सुधारणा कशी होऊ शकते?

गुणवंत आणि ध्येय असलेली युवा मंडळी या क्षेत्राकडे आकर्षित होणे अपेक्षित आहे, तसे धोरणच सरकारने ठेवावे. आज नवीन डॉक्टर खासगी क्षेत्राकडे वळतात. त्यामुळे उपचारांच्या दृष्टिकोनातून हे क्षेत्र विकसित होताना दिसते. मात्र, सरकारी क्षेत्राबाबत उदासीनता असून, ही उणीव भरून काढण्यासाठी सरकारने नवीन मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. त्यातील कमतरता दूर केल्याशिवाय हे शक्य नाही.

दूषित पाणी आणि त्यावर उगवणारा भाजीपाला ही मोठी समस्या ठरते काय?

दूषित पाणी, पण ते कोणत्या स्वरूपाचे, यावर बरेच काही ठरते. अनेकदा सांडपाण्यावर भाजीपाला केला जातो. मात्र, सांडपाण्यातील योग्य घटक घ्यायचे अन हानिकारक सोडून द्यायचे ही प्रक्रिया निसर्गानेच सर्व प्रकारच्या वनस्पतींना घालून दिली असून, त्याचे पालन भाजीपाला वनस्पतीही करतात. प्रश्न आहे तो मनुष्याच्या सवयींचा. मनुष्याने आपल्या आहार-विहारातील बदल समजून घेतले नाही, त्या दृष्टिकोनातून जगण्याच्या सवयी बदलल्या नाहीत तर कोणता तरी आजार मागे लागणारच. एकदा की आजार मागे लागला, की त्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची जगण्याची लढाई वेगळ्या अर्थाने सुरू होते.

(शब्दाकंन : अरविंद जाधव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिकोणी गार्डनची दैना

$
0
0

वडाळा-पाथर्डीरोड

त्रिकोणी गार्डनची दैना

इंदिरानगर-वडाळा-पाथर्डीरोड येथील श्रीजयनगरला लागून असलेले त्रिकोणी गार्डनजवळील पादचारी फलक कोलमडला असून, गार्डनमधील पुतळाही झाडांमध्ये हरवला आहे. कचराकुंडी स्टँडचीही दुरवस्था झालेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रश्नी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

-हेमंत साळी

नांदूरमध्यमेश्वर

धरणातील पाणवेली नदीत!

नांदूरमध्यमेश्वर धरणाचा काही भाग पाणवेलींनी व्यापल्याचे दिसून येत आहे. सायखेडा येथील पुलाजवळील काढलेल्या पाणवेली नदीपात्रातच टाकल्या जात आहेत. त्यामुळे येथील पाणी दूषित होत आहे. मात्र, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा.

-गणपत हडपे

सिडको

...तर देवपूजाच अर्थहीन

अनेक लोक देवाची पूजा करून भक्ती दाखवतात आणि नंतर देवाच्या मूर्ती, फोटो असे रस्त्यावर आणून टाकतात. आपल्या अशा कृतीमुळे देवपूजा करण्याला कोणताच अर्थ राहत नाही, याचे भानदेखील अशा व्यक्तींना राहिल्याचे दिसत नाही. संबंधितांनी असे करताना याबाबत विचार करायला हवा.

-सागर कर्डिले

आडगावरोड

बसथांब्याचे शेड कचऱ्यात

सुस्थितीत असलेल्या बसथांब्यांची गरज असताना उपलब्ध बसथांब्यांचे शेड चक्क कचऱ्यात पडल्याचे चित्र काही ठिकाणी दिसते. आडगावरोडवरील बळी मंदिराच्या समोरील बाजूस असेच एक शेड कचऱ्यात पडले आहे. ते पुन्हा व्यवस्थित लावल्यास परिसरातील प्रवाशांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल.

-गोविंद जैन

मखमलाबादरोड

सिग्नल पाळणे गरजेचे

शहरात पोलिसांकडून सिग्नल पाळणे, हेल्मेट वापरण्याविषयी वारंवार प्रबोधन केले जात असले, तरी अनेक शहरवासीय सिग्नल पाळणे गरजेचे मानतच नाहीत. मखमलाबादरोडकडून गंगापूररोडकडे येण्याच्या मार्गावर ड्रीम कॅसल चौकात असलेल्या सिग्नलचे नागरिक सर्रास उल्लंघन करतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावे.

-योगिता जाधव

शहर परिसर

प्लास्टिकबंदी गेली कुठे?

काही दिवसांपूर्वी गाजावाजा करीत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी आणि ठिकठिकाणी तपासणी केली गेली असली, तरी अनेक पार्सल पॉइंट, शीतपेयांच्या दुकानात सर्रास प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याचे दिसते. त्यामुळे प्लास्टिकबंदी गेली कुठे, असा प्रश्न पडतो. बंदीचा नियम कठोर केला पाहिजे.

-सुनील शेवाळे

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतर राज्यातील दूध होणार लक्ष्य

$
0
0

दोन दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या महानंदा आणि अमूलसारख्या दुधामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडील दुधाला अपेक्षित भाव मिळत नसल्याचा राष्ट्रीय किसान महासंघाचा दावा आहे. त्यामुळे संपामध्ये उतरलेल्या संघटनांनी अशा अन्य राज्यांमधून येणाऱ्या दुधाच्या गाड्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

बळीराजाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असल्याने राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी संपाची हाक दिली आहे. देशभरातील २२ राज्यांमध्ये या संपाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील संपाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काही शेतकरी संघटनांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये देखील गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. राज्यात भाजीपाल्याची आवक २७ ते ६४ टक्क्यांनी रोडावल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील भाजीपाल्याची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गत दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी आवक चांगली होती. परंतु, ती पुढील आठवड्यात या संपाचे परिणाम अधिक प्रखरपणे दिसतील, असा विश्वास संघटनांकडून व्यक्त होऊ लागला आहे. पुढील दोन दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून, जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी त्यामध्ये उतरतील, असा दावा संघटनांकडून केला जाऊ लागला आहे.

१० जूनला देशभर चक्काजाम

आतापर्यंत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन सुरू होते. हळूहळू हे आंदोलन तीव्र केले जाईल. ७, ८ आणि ९ जूनला आंदोलन अधिक तीव्र होईल. त्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर १० जून रोजी देशभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्या पकडला, भीती कायम!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगाव परिसरातील रोकडोबावाडी येथील डोबी मळ्यातील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तथापि, शेजारी लष्करी भागात दाट जंगल असल्याने बिबट्यांची भीती कायम आहे. या परिसरात वारंवार बिबट्या येतो हा अनुभव असल्यामुळे रहिवासी दहशतीखालीच आहेत.

डोबी मळ्यात बिबट्या दिसल्याच्या तक्रारी आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने पाहणी केली, तेव्हा बिबट्याची पावले आढळली होती. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. वन परिमंडळ अधिकारी रवी सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उत्तम पाटील, बाळू मोरे, सुनील खानजोडे, डी. पी. जगताप, रोहिणी पाटील यांनी डोबी मळ्याला भेट देऊन पाहणी केली होती. शनिवारी रात्री हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, हा प्रश्न सुटलेला नाही. कारण, बिबट्या पुन्हा येतोच असा येथील अनुभव आहे. डोबी मळ्यात गोरखनाथ बुवा, विश्वनाथ बुवा यांची शेती आहे. त्यांच्या शेतात आतापर्यंत चार-पाच वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. आता अनिल बुवा यांच्या शेतात हा बिबट्या आढळला होता.

नाशिक शहरात बिबट्याने घुसखोरी केल्याच्या घटना वरचेवर घडत असतात. अडीच वर्षांपूर्वी उपनगर नाक्याजवळील जय भवानीरोडच्या बंगल्यात बिबट्या घुसला होता. मोटवानी रोडवरील रोझा कॉलनी, पाथर्डी फाटा, तसेच इंदिरानगरमध्येही बिबट्या घरात प्रविष्ट झाला होता. देवळालीगावाशेजारीच रोकडोबावाडी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्यालगतच लष्कराचे प्रचंड मोठे क्षेत्र असून, त्यामध्ये दाट जंगल आहे. तेथील बिबटे डोबी मळ्यात येतात. तीन वर्षांपूर्वी डोबी मळ्यातील उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते. तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे बिबटे व वन्यप्राणी पाण्यासाठी नागरी वस्तीकडे वळत असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

देवळाली व गांधीनगर लष्करी हद्दीतील जंगलात बिबट्या, तरस, मोर, डुक्कर, मुंगूस, घोरपड, रानडुक्कर, ससे आदी प्राणी आजही मोठ्या प्रमाणावर आढळतात. जय भवानीरोडला रात्री तरस, लांडगे दिसतात. म्हसरूळ, मखमलाबाद, जेलरोड येथे मोर मोठ्या संख्येने आढळतात. सिमेंटची जंगले वाढल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा आवाज, समस्या कोणी जाणूनच घेत नाही. नाशिकरोडला पश्चिमेकडे देवळाली कॅन्टोन्मेंट, गांधीनगर येथे लष्कराची हद्द आहे. येथे दूरपर्यंत दाट जंगल आहे. तेथे जंगली प्राण्यांचा वावर आहे. वडनेर दुमाला, लहवित, भगूर, वंजारवाडी, कोकणगाव, चांदगिरी, जाखोरी, शिंदे, पळसे भागात दाट झाडी, शेती, तसेच नद्या-नाले आहेत. त्यामुळे तेथेही बिबट्या आढळत असतो. नाशिकशेजारील निफाड तालुक्यातही गोदावरीला पाणी असते. तेथे शेती परिसर मोठा असल्याने बिबट्या आढळतो.

--

ही खबरदारी घेण्याच्या सूचना...

डोबी मळ्यातील बिबट्या पकडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे प्रबोधन केले. बिबट्याला पळवून लावण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शनही त्यांनी केले. लहान मुलांना सायंकाळी एकटे सोडू नका, घराच्या परिसरात विजेचा दिवा सुरू ठेवा, शेकोटी करून त्यात वाळलेली लाल मिरची टाकावी, त्या उग्र वासाने बिबट्या दूर जातो, जुने ऑइल मिरचीच्या पोत्याला चोपडावे, त्यावर मिरची लावावी, ज्या दिशेने बिबट्या येणार असेल, त्या दिशेला हे पोते लावल्यास त्याच्या वासाने बिबट्या येत नाही. शेतकऱ्यांनी रात्री पिकांना पाणी देण्यास जाऊ नये, जायचेच झाल्यास गटागटाने जावे, काठी किंवा शस्त्र जवळ बाळगावे, बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे आदी सूचना वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : आडगाव परिसरातील धात्रक फाटा येथील विद्यानगर सोसायटी, बिल्डिंग क्रमांक तीन, रूम क्रमांक ३० येथे राहणाऱ्या भालचंद्र जगतराव देशमुख (वय ४५) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. देशमुख यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, हवालदार लोहकरे तपास करीत आहेत.

मद्यपीवर कारवाई

नाशिक : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या नितीन आनंद मेढे (कामटवाडे) या वाहनचालकावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्रिमूर्ती चौक परिसरात मेढे मद्य प्राशन करून शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागमोडी कार (एमएच १५ एफटी ४०४९) चालविताना आढळून आला होता. या प्रकरणी कॉन्स्टेबल व्ही. बी. शिंदे यांनी फिर्याद दिली असून, अंबड पोलिस तपास करीत आहेत.

वाहनचोरी

नाशिक : गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन येथे पार्क केलेली दुचाकी (एमएच १५/सीयू २५८०) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी नीलेश भगवान नेरकर (रा. आदर्शनगर, रामवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरीची घटना महिनाभरापूर्वी घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सलग दोन दिवस हजेरी लावणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने रविवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, पावसाने शनिवारी हुलकावणी दिली. दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे नाशिककर सुखावले आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने येवल्यात वादळी वाऱ्यासह बॅटिंग केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले. दिंडोरी आणि पेठ हे दोन तालुके वगळता जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये शनिवारी पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात १७३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत १९५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ७६ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल बागलाणमध्ये २५, तर चांदवडमध्ये २४.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १५ मिमी पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिक, मालेगाव आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी पाच मिलिमीटर, येवल्यात ३, देवळ्यात २.६, तर कळवणमध्ये २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरगाण्यात ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३.२ मिलिमीटर पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौस्तुभला एमएच-सीईटीत १८८ गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी विद्याशाखेतील प्रवेशासाठी राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएच- सीईटी परीक्षेच्या निकालात शहरातील कौस्तुभ भार्गव या विद्यार्थ्याने २०० पैकी १८८ गुण मिळविले. रविवारी सायंकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ हा सीईटीतील टॉपर विद्यार्थी होता. सीईटीच्या निकालानंतर आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष 'नीट' आणि 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे. हे निकाल अनुक्रमे ५ आणि १० जून रोजी जाहीर होणार आहेत.

१० मे रोजी झालेल्या एमएच-सीईटी निकालात नाशिकमधील विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळविले. २०० पैकी १५० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. नाशिकमधून २२,४०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात मॅथ्स ग्रुपसाठी १७,१९७, तर बायोलॉजीसाठी १६,९९१ विद्यार्थ्यांनी नाशिकमधून परीक्षा दिली.

नाशिकमधून या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कौस्तुभ भार्गव (१८८ गुण), अभिषेक पाटील (१७८), यश सारडा (१७७), मानव मेहता (१७५), पल्लवी कोचर (१७३), ध्रुव धिंग्रा (१७१), प्रीतेश सेठ (१७०) आणि सिद्धिका बेजेकर (१६९) यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विभागात नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यातून ३९,१७० विद्यार्थ्यांनी एमएच- सीईटी परीक्षा दिली. विभागात एकूण ३८,५७३ विद्यार्थी मॅथ्स ग्रुपच्या, तर बायोलॉजी ग्रुपसाठी विभागातून ३८,१७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

\Bविद्यार्थ्यांना पाच गुणांचा लाभ

\Bसीईटी परीक्षा झाल्यानंतर २५ ते २७ मेदरम्यान प्रश्नपत्रिकेबाबत सीईटी सेलने आक्षेप मागविले होते. यानुसार सेलकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांनुसार, मॅथेमॅटिक्स आणि केमेस्ट्री या दोन विषयांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच गुणांचा लाभ झाल्याचे सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जाहीर केले आहे. मॅथ्सच्या प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांची संख्या दोन होती. या प्रत्येक प्रश्नास दोन गुण होते. यानुसार मॅथ्सच्या चुकीच्या प्रश्नांसाठी चार, तर केमेस्ट्रीच्या एका गुणाच्या चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण असे एकूण पाच गुण मॅथ्स आणि केमेस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना देत असल्याचे सीईटी सेलने जाहीर केले. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता नीट प्रवेश परीक्षेचा निकाल ५ जून रोजी लागण्याची शक्यता आहे, तर जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे.

\Bअभिजित व आदित्य राज्यात पहिले \B

'पीसीबी' विषयामध्ये २०० पैकी १८८ गुण मिळवित अभिजित कदम याने प्रथम क्रमांक पटकावला. 'पीसीएम' या विषयात २०० पैकी १९५ गुण मिळवत आदित्य अभंग याने प्रथम क्रमांक मिळविला. 'पीसीबी' गटात मागासवर्गीय उमेदवारांमधून प्रशांत वायाळ (१८२ गुण), तर पीसीएम गटात आदित्य अभंग (१९५ गुण) याने प्रथम क्रमांक मिळविला. पीसीबी गटात मुलींमधून जान्हवी मोकाशी हिने १८३, तर पीसीएम गटात मुलींमधून मोना गांधी हिने प्रथम क्रमांक पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडावरील पर्यटकांच्या दागिन्यांवर डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देवदर्शनासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकडवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास रामकुंड येथे घडली. चोरट्यांनी तब्बल एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अधिक मासानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

तिरुमल्ला शेट्टी रामकृष्ण (वय ६४, रा. नेताजी रोड, अरविंदनगर, कटप्पा, आंध्र प्रदेश) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. उन्हाळी सुट्या आणि अधिक मास यामुळे पर्यटनासह देवदर्शनासाठी रोज हजारो भाविक रामकुंडावर येत आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला यादेखील शनिवारी आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत स्नानासाठी आल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तिरुमल्ला यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या लक्षम्मा मंगला व्यंकट यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हातोहात लंपास केला. सध्या भाविकांची मोठी गर्दी येथे होत असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार आर. आर. घोरपडे तपास करीत आहेत.

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षातील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डीजीपीनगर ते साईनाथ चौफुलीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवरील आयटी पार्कसमोर झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार झालेल्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रंजना सुभाष खुळे (५७, रा. धुळे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संजय राजाराम पाटील (वय ४५, रा. अयोध्या चौक, पवननगर, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची बहीण रंजना खुळे नाशिकरोडहून सातपूर येथे जाण्यासाठी रिक्षात (एमएच १५/एके ६२४७) बसली होती. डीजीपीनगर ते साईनाथ चौफुलीच्या दिशेने जात असताना आयटी पार्कसमोर १० चाकी ट्रकने (एमएच १५/एफव्ही ५००२) रिक्षाला डाव्या बाजूने धडक दिली. त्यात खुळे यांना गंभीर मार बसल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. शिंदे तपास करीत आहेत.

जखमी वृद्धाचा मृत्यू

कारच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गेल्या महिन्यात अपघाताची घटना घडली होती. प्रकाश श्रीधर निर्मल (वय ६७, रा. सिडको) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी प्रकाश निर्मल आणि त्यांच्या पत्नी आशा सिडको ते वाढणे कॉलनी असे दुचाकीने जात असताना कन्सारा माता चौकात एका कारने (एमएच ०१/एम २४५) त्यांना धडक दिली. डोक्यास मार लागल्याने प्रकाश निर्मल यांना कॉलेज रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून २५ मे रोजी सिव्हfल हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी निर्मल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार विसे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images