Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नेहरू गार्डनजवळ अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी 'नो हॉकर्स झोन' असलेल्या नेहरू गार्डन परिसरात हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना समाधान व्यक्त केले आहे.

नेहरू गार्डन परिसरात विक्रीला बंदी असतानाही येथे मोठ्या प्रमाणावर हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. त्यामुळे रस्त्याची कोंडी होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी येथे उभ्या असलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे येथील हातगाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांसह महापालिकेने हातगाड्या जप्त केल्या आहेत. सोबत कालिका मंदिराच्या मागे एका घराचेही अतिक्रमण महापालिकेने जमीनदोस्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखले वितरणात नाशिकच अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे महिनाभरात विविध प्रकारचे तब्बल ५९ हजार ९७० दाखले वितरित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तो कायम ठेवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला आगामी काळात पेलावे लागणार आहे. दाखले वितरणात अहमदनगर दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये याकरीता जिल्हा प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्राद्वारे ऑनलाइन दाखले वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल ८३ केंद्रही सुरू करण्यात आली आहेत. शिवाय महाविद्यालयांमध्येही लवकरच आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात नाशिक जिल्ह्याने दाखले वितरणामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. १ ते ३१ मे या ३१ दिवसांमध्ये नाशिक महसूल विभागाने तब्बल ५९ हजार ९७० ऑनलाईन अर्ज वितरीत केले आहेत. त्याखालोखाल अहमदनगरमध्ये ५१ हजार ५९६, पुणे ४२ हजार ५७९, यवतमाळ ४० हजार ८४०, सोलापूर ३४ हजार ३१९ दाखले वितरीत करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने वितरीत केलेल्या ५९ हजार ९७० दाखल्यांमध्ये उत्पन्नाचे ३१ हजार ९२९, जातीचे दाखले ९ हजार ९१३, वय व अधिवास प्रमाणपत्र ८ हजार ९९६, नॉन क्रिमेलियर ६ हजार ५३८, प्रतिज्ञापत्र ११४४, रहिवास दाखले १७६, महिला आरक्षण ८१ अशी विविध प्रकारचे दाखले वितरीत करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी सायकलस्वार बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वार बालकाचा मृत्यू झाला. हिरावाडीतील कमलनगरमध्ये २४ मे रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समीर तुकाराम राऊत (वय १०, रा. फडबाई चाळ, शक्तीनगर, हिरावाडी) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास समीर हा कमलनगर येथील मंथन स्वीट्स समोरून सायकलवरून जात होता. मागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्याला धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्कॉर्पिओसह दुचाकीची चोरी

नाशिक : शहरात वाहनचोरीचे प्रकार सुरूच असून सिडकोतून स्कार्पिओ तर रामवाडीतून दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश गोविंदराव गायकवाड (रा. लक्ष्मीनगर, कामटवाडा रोड) यांची स्कार्पिओ (एमएच १८ बीसी २९९५) सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. ती चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना रामवाडीत घडली. जयेश गणेश लोढा (रा. स्नेहल अपार्टमेंट, साळुंखे क्लासेस शेजारी) यांची दुचाकी २८ मे रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.

तडीपार गुंड गजाआड

नाशिक : शहर पोलिसांनी तडिपार केले असतानाही शहरात वावरणाऱ्या सोन्या उर्फ वैभव गजानन खिरकाडे (रा. मेहरधाम, पेठरोड) यास पोलिसांनी अटक केली आहे. दिंडोरी रोडवरील एका दारू दुकानाजवळ तो आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव खिरकाडे याच्या विरुद्ध शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यास पोलिसांनी दोन वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, तडिपारीच्या कारवाईनंतरही तो शहरात वास्तव्यास होता. दिंडोरी रोडवरील एका वाईन शॉपजवळ मंगळवारी (दि. ५) सायंकाळी त्याला पकडण्यात आले.

विषारी कीटक चावल्याने तरुणीचा मृत्यू

नाशिक : कॉलेजच्या आवारात काम करताना विषारी किटक चावल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. रासबिहारी शाळेजवळील एका कृषी महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडली. म्हसरूळ पोलिसांनी मृत्युची नोंद केली आहे.

उषा नारायण तरोटे (रा. सिद्धिविनायक टाउनशिप, हिरावाडी) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरोटे ही मंगळवारी (दि. ५) कृषी महाविद्यालय आवारात काम करीत असताना ही घटना घडली. विषारी किटकाने तिच्या उजव्या हातास चावा घेतला. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान असताना तिचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.

..

बँक ऑफ इंडियाला ४४ लाखांचा गंडा

नाशिक : बनावट दस्तऐवज सादर करून बँक ऑफ इंडियाला तब्बल ४४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोन दाम्पत्यांसह महिला वकिलावर सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

धनंजय रोहिदास पगार, विजयश्री धनंजय पगार, कविता विश्वास थोरात, विश्वास वसंत थोरात यांसह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका महिला वकीलाचा समावेश आहे. २०१२-१३ मध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला. संशयितांनी वेगवेगळे दोन बनावट साठेखत व खरेदीखत बनवून हा गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही दाम्पत्याच्या नावे वेगवेगळी कर्ज काढण्यात आली आहेत. संशयितांनी बनावट दस्तऐवज आणि खोटा सर्च रिपोर्ट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजी उद्यान शाखेत सादर केला. त्याआधारे प्रत्येकी २२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचा परतावा न झाल्याने या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेस्ट्र कंट्रोलच्या बहाण्याने दागिने लंपास

नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या बहाण्याने घरात घुसलेल्या महिलेच्या कानातील दागिने हातोहात लांबविण्यात आले. गोविंदनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती नंदकिशोर कोठावदे (रा. न्यू इरा स्कूलजवळ, गोविंदनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती कोठावदे या शनिवारी (दि. २) दुपारी घरात एकट्या होत्या. संतोष केरबा कांबळे हा संशयित एका साथीदारासह त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने मोफत पेस्ट कंट्रोल करून देतो, असे म्हणत बळजबरीने घरात प्रवेश केला. कोठावदे यांनी काम करण्यास मनाई करूनही संशयितांनी साफसफाईचे काम हाती घेतले. यानंतर काही वेळाने दोघांनी पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्या स्वयंपाक घरात गेल्या. त्याचवेळी टीव्हीजवळ काढून ठेवलेले सुमारे नऊ हजार रुपयांचे दागिने संशयितांनी हातोहात लांबविले.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेनसाठी चौकट

$
0
0

वाहनतळावर अस्वच्छता

त्र्यंबक नगरपालिकेच्या वाहनतळावर असलेल्या अस्वच्छतेने भाविक हैराण झाले आहेत. अधिक महिना आता शेवटच्या चरणात आला आहे. भाविकांची गर्दी उसळली असतांना त्र्यंबक नगरपालिकेने वाहनतळाबाबत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. वाहनतळाच्या विकसित झालेल्या लगतच्या जागेवर कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. तेथेच माळा रूद्राक्ष शंख विकणाऱ्यांनी झोपड्या-पाल उभे केले आहेत. प्रवासी भाविक वाहने उभी करतात आणि या जागेतून वाट काढत मुख्य रस्त्याला येतात. येथे माळा विक्रेत्यांमध्ये कधीकधी हाणामाऱ्या होतात. ते आपसात एकमेकावर दगडही भिरकावतात. येथील अस्वच्छता आणि बकालपणा यांचे बिभित्स चित्र भाविकांपुढे उभे राहत आहे. वाहनतळ फी म्हणून पालिका वाहनाप्रमाणे कर आकरते. यामध्ये ३० रुपयांपासून १०० रुपये आकारणी होत असते. यातून गेल्या पंधरवड्यात पालिकेला दिवसाकाठी ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. जून महिन्यापासून वाहनतळाचा ठेका देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना आयुक्त संगीता धायगुडे यांनी नोटीस बजावली आहे. पालिकेतील संजय ठाकूर, कमल सुरसे, बाबुराव जाधव, जगदीश बडगुजर, शेख शकील अह. कमरूद्दीन अशी त्या पाच कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमणूक आदेशानुसार सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते. कागदपात्रांची पूर्तता केली नसल्याचे समितीच्या पत्रातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांना सात दिवसात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा नेमणूक आदेशातील अटी शर्तीचा भंग केल्याने त्यांच्या सेवा संपुष्टात आण्यात येतील अशी नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्न वाढले, सुविधांचे काय?

$
0
0

अधिकमासात त्र्यंबकर पालिका, ट्रस्ट मालामाल; भाविकांमध्ये मात्र नाराजी

केशव ढोन्नर, त्र्यंकेश्वर

अधिकमास त्र्यंबक नगर परिषद आणि देवस्थान यांना चांगलाच फलदायी ठरला आहे. अधिकमासाच्या पूर्वीपर्यंत वर्षभर येथील भाविकांची संख्या यथातथा राहिल्याने नगर पालिकेला वाहनतळ फीमधून आणि देवस्थानला देणगी दर्शनातून झालेली कमाई सरासरी तुलनेत खास नव्हती. तथापि १५ मे रोजी अधिक महिना सुरू झाला आणि तो बक्कळ आर्थिक कमाई करून देणारा ठरला आहे. कमाई वाढली तरी भाविकांच्या सेवा सुविधांच्या बाबत असलेली बोंबाबोंब कायम आहे.

त्र्यंबक नगरपालिकेला १५ मे पूर्वी वाहन प्रवेश फी माध्यमातून दिवसाला १० ते १५ हजार रुपये वसुली होत होती. मात्र गेल्या २० दिवसांपासून दिवसाकाठी ३५ ते ४० हजारांपर्यंत पोहचली आहे. सुटीचे दिवस आल्यास दोन ते तीन दिवसांचा एकत्रित भरणा लाखांच्या घरात असतो. मागच्या आठवडयात शुक्रवार, शनिवार आणि रविवारचा भरणा सोमवारी करण्यात आला. तो दीड लाखांपर्यंत होतो. वाहनतळातून बक्कळ कमाई सुरू आहे. नगरपरिषद वाहन प्रवेश फीची पावती देत असते. याची फी वाहनाच्या प्रकाराप्रमाणे आहे. साधरणत: ३० रुपये ते १०० रुपयांपर्यंत पैसे आकारणी होत असते. पालिका प्रशासन रोजंदारीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ही वसुली करीत आहे. यामध्ये रोजंदारीचा खर्च वगळता अधिकचा काही नसल्यामुळे पालिकेला रोकड उत्पन्नाचे साधन आहे. अर्थात वाहनतळावर भाविकांना सवलती देण्यास मात्र प्रशासनाने नेहमीच हात आखडलेला दिसून येतो.

पेड दर्शनातूनही कमाई

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांना थेट दर्शन देण्यासाठी २०० रुपये देणगी पावती दर्शन सुरू केले आहे. या देणगी दर्शनातून दिवसाला ५ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. उत्तर दरवाजातून २०० रुपये घेऊन थेट दर्शनासाठी सोडले जाते. परतीची घाई असलेल्या भाविकांसाठी रांगेत प्रतिक्षा करण्यापेक्षा हे देणगी दर्शन सोयीचे ठरत आहे. तथापि अधिक महिना सुरू झाल्यापासून २०० रुपयांच्या दर्शनासाठी देखील एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

दर्शनाचे सुखही नाही

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना पूर्व दरवाजातून रांगेतून प्रवेश देण्यात येतो. या रांगेत किमान तीन ते चार तास उभे राहावे लागते. हजारो कि. मी. प्रवास करून आलेल्या आणि चार तास रांगेत उभे राहिलेल्या भाविकास गर्भगृहासमोर येताच अक्षरश: काही सेकंदात बाजूस व्हावे लागते. दर्शनाचे समाधान मिळत नाही. याबाबत भाविक वारंवार त्रकार करीत असतात. येणाऱ्या भाविकांना दर्शन घेतल्यानंतर निदान खडी सारखरेचा खडा तरी प्रसाद म्हणून दिल्यास काही अंशाने समाधान मिळेल. मात्र देवस्थान याचा गांभिर्याने विचार करीत नाही.

स्कॅनर धूळ खात

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रांगणात मोबाइल, बॅग, कॅमेरा नेता येत नाही. तसे फलकही लावलेले आहेत. त्यामुळे भाविक मोबाइल आणि बॅग लॉकरमध्ये ठेवतात. अशा प्रकारची खासगी लॉकर सेवा व्यवसायीकांनी सुरू केली आहे. देवस्थान ट्रस्ट मात्र वारंवार मागणी करून देखील याकडे गांभिर्याने पाहत नाही. येथे आलेल्या भाविकांना यासाठी दोनशे रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागले. ट्रस्टने दोन वर्षांपूर्वी बॅग स्कॅनर मशीन २५ लाख रुपये खर्च करून विकत घेतले. ते विनावापर पडून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी

$
0
0

मुख्य वनसंरक्षक मोहन यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या भोवतालच्या पर्यावरण रक्षणात आपली जबाबदारी प्रत्येक सूज्ञ नागरिकाने ओळखली पाहिजे. त्यानुसार कृती करून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्याचे संवर्धन देखील करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक व्ही. के. मोहन यांनी येथे केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित 'पर्यावरणपूरक वृक्ष व लोक सहभाग' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफ.डॉ. ई. वायुनंदन होते. मंचावर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. दिनेश भोंडे, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ. सूर्या गुंजाळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण संयोजक रावसाहेब पाटील उपस्थित होते.

मोहन म्हणाले, की मानवाचे शरीर हे पंचमहाभूत तत्वांनी बनलेले आहे. मनुष्यासह कुठलाही जीव हा हवा-पाणी व अन्न याशिवाय जगू शकत नाही. हवा-पाणी व अन्न यांची निर्मिती ही निसर्गातूनच होत असते. त्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. निसर्गातील प्रत्येक वनस्पतीचा काही ना काही उपयोग होत असतो. रासायनिक खतयुक्त शेतीमुळे मात्र जमीन-पाणी व हवेचे मोठे प्रदूषण होऊन त्यांचा ऱ्हास होत आहे. मानवी स्वास्थ्यासह संपूर्ण जीवसृष्टीवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. अनेक नवीन प्रकारचे असाध्य रोग निर्माण होत आहेत व त्यास मनुष्य बळी पडत आहे. नव्या युगात मानवाची प्रगती केवळ औद्योगिक विकासावर नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आनंदावरही मोजली जात आहे. ज्यात भारतासारख्या देश खूपच पिछाडीवर आहे. त्यामुळे देशात केवळ पर्यावरणपूरक कायदे करून चालणार नाही तर प्रत्येक नागरिकामध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे.

पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील सफाई कर्मचारी व महिला सुरक्षा रक्षक यांना कागदी पिशव्या व पाकिटे तयार करण्याचे दोन दिवसाचे प्रशिक्षण विद्यापीठातर्फे देण्यात आले. या महिलांचा कार्यक्रमात सत्कार झाला. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या शिक्षिका वसुंधरा शिवणेकर, स्वाती वानखेडे व अर्चना देशमुख यांनाही सन्मानित करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण संयोजक रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानानंतर विद्यापीठ वाचनालयाशेजारील जागेत मान्यवरांच्या हस्ते पाच पिंपळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वत:पासून करा सुरुवात

पर्यावरण बचावासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कृषी विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्री. सूर्या गुंजाळ यांनी मानवाने ६०० वर्षांमध्ये सेंद्रीय शेती करून जी सुबत्ता प्राप्त केली होती ती गेल्या साठ वर्षात रासायनिक शेतीमुळे गमावल्याची खंत व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत वाढली गुन्हेगारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार यांनी अंबड पोलिस स्थानकात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत यांनी तांबे यांनी उद्योजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तलवार यांच्यासोबत 'आयमा'चे सरचिटणीस ललित बूब, खजिनदार उन्मेष कुलकर्णी, सचिव योगिता आहेर, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, विनायक मोरे, दिलीप वाघ, गोविंद झा, जितेंद्र आहेर, राममूर्ती आदी उपस्थित होते. अंबड पोलिस स्टेशनला नुकतीच नियुक्ती झालेले वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांचा यावेळी 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टेक फेअर’चे शनिवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि मेक इन इंडियासाठी उत्कृष्ट अभियंते तयार व्हावे यासाठी एमएसबीटीई (महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ) आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने शनिवारी (दि. ९) करिअर फेअर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील पॉलिटेक्निकमध्ये 'मेट टेक फेअर २०१८' या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाच्या माहितीबरोबरच विविध शाखांमधील मूलभूत प्रात्यक्षिकेही करवून दाखविली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःलाही निरनिराळी यंत्रे व उपकरणे वापरण्याची संधी देण्यात येणार आहे. या शिबिरातील प्रवेश हा पूर्णपणे विनामूल्य आहे. शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असेल. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी निमाणी, बिटको पॉइंट, नाशिकरोड, सिटी सेंटर मॉल, ओझर या विविध ठिकाणांहून मोफत बस तसेच दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रा. मंगेश गोखले (८३८००८७६७०) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’मध्ये बहरणार विविध कला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स' नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जून रोजी कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होणार आहे. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या महोत्सवात कलाकारांची मांदियाळी राहणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन ९ जून रोजी सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर कोलते (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. विविध कलाप्रांतात चमकदार कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे सादरीकरणही यावेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हॅण्ड फाऊंडेशनचेही सहकार्य लाभत आहे.

शस्त्रास्त्रे व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना खुला होणार आहे. ९ व १० जून हे दोन्ही दिवस कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोईंगवर पोलिसांचा वॉच

$
0
0

वादाचे प्रसंग उद्भवू लागल्याने प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टोईंग व्हॅनवरील पोलिस आणि अन्य कर्मचारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात, अशा नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यातूनच पोलिस आणि नागरिकांमध्ये वादाच्या ठिणग्याही उडू लागल्या आहेत. नेमकी कारणे समोर यावीत यासाठी टोईंगची कारवाई होते, त्या मार्गांवर साध्या वेषातील पोलिस अधिकारी नेमण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून टोईंगची कारवाई केली जाते. त्यासाठी अद्ययावत टोईंग वाहनेही पोलिसांनी आणली आहेत. जागेवर वाहन सोडविल्यास २०० तर वाहतूक शाखेच्या कार्यालयातून वाहन सोडविण्यासाठी नागरिकांकडून ६५० रुपये दंड आकारण्यात येतो. या कारवाईमुळे टोईंग व्हॅनवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वादाचे प्रसगं निर्माण होऊ लागले आहेत. उद्घोषणा न करताच टोईंग कारवाई केली जात असल्याचा आक्षेप घेत काही नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी टोईंगवरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. राजीव गांधी भवन समोर हा प्रकार घडला. यावेळी पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकात धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. संतप्त नागरिकांनी चुकीच्या कारवाईबाबत जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी टोईंग व्हॅनसह तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर धक्काबुक्की करणाऱ्या नागरिकाविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली. टोईंगवरील कर्मचारीच नियम धाब्यावर बसवून कारवाई करीत असल्याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याबद्दलच्या तक्रारी पोलिसांकडे वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच या टोईंगच्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

तर होणार कारवाई

टोईंग व्हॅन ज्या भागात फिरेल त्या भागात व्हॅनवरील कर्मचारी व्यवस्थित कारवाई करतात की नाही, याकडे या पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. व्हॅनवरील वाहतूक विभागाचे तसेच खासगी कर्मचारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असतील तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

रस्त्यावर थांबविलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये हा टोईंगचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांकडून दंड वसूल करणे हा टोईंगचा उद्देश नाही. टोईंगच्या कारवाईची कार्यपद्धती काय असावी याचे परिपत्रक या टोईंगच्या वाहनावर लावले आहे. या कार्यपद्धतीनुसार कारवाई होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी आता साध्या वेषातील पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

- डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस आयुक्त

पोलिसाला मारहाण झाल्याची तक्रार

नाशिक : टोईंग कारवाई करीत असताना कारचालकाने वाहतूक पोलिसास शिवीगाळ करीत कानशिलेत लगावल्याची घटना राजीव गांधी भवन परिसरात घडली. वाहतूक शाखा युनिट दोनचे कर्मचारी शिवाजी कडाळे यांनी फिर्याद दिली आहे. टोईंग वाहनावर ते सेवा बजावत असताना मंगळवारी हा प्रकार घडला. राजीव गांधी भवन समोरील व्होडाफोन स्टोअर्ससमोर 'नो पार्किंग'मध्ये उभी असलेली इंडिका कार कडाळे व सहकाऱ्यांनी टोईंग केली. शेजारी उभ्या असलेल्या स्कोडा (एमएच १५ सीक्यू ७००७) चालकाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत कारवाईबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त चालकाने कडाळे यांना धक्काबुक्की करीत कानशिलेत लगावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा बंदोबस्तात दूध टँकर रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या शेतकऱ्यांचा संप सुरू आहे विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर असल्याने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व तसेच दुधाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव येथून पोलीस बंदोबस्तात दूध टँकर गुजरातमधील सुमूल दूध डेअरीसाठी रवाना करण्यात आला आहे.

शेतीमालाला भाव मिळत नसल्याने काही वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी नागरिकांची रसद थांबवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची कमतरता भासू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त देऊ केल्याने त्याचा फायदा लासलगाव येथील एका दूध संकलन केंद्राच्या संचालकाने घेत पोलिस बंदोबस्तात २० हजार लिटर दूध टँकर सूरत येथील सुमूल दूध डेअरीसाठी पाठवला आहे. हे दूध तेथे पोहोचल्यानंतर पॅकिंग करून मुंबईसह अन्य शहरांसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती दूध संकलन केंद्राचे संचालक दत्ता क्षीरसागर यांनी दिली.

लासलगाव ते सूरत दरम्यान दूध टँकर पिंपळगाव बसवंत, वणी सापुतारा मार्गे सूरत येथे जाणार आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीतील कार्यक्षेत्रात पोलिस बंदोबस्त राज्य सरकारच्या वतीने दिला जाणार असल्याचे लासलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले. त्यानुसार दुपारी चार वाजता लासलगाव येथील बायपास येथून निघालेल्या दूध टँकरला लासलगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक तनपुरे, सहाय्यक उपनिरीक्षक धोंडीराम आहेर, कर्मचारी प्रदीप अजगे, योगेश जामदार यांनी पोलिस गाडीसह शस्त्रधारी बंदोबस्त दिला.

कांद्याची आवकही वाढली

शेतकरी संपादरम्यान कांद्याची आवक रोडावली होती. मात्र, लासलगाव बाजार समिती आवारात बुधवारी वाढली. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने पोलिस बंदोबस्त देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी बाजार समितीत आणला. लासलगाव बाजार समितीत ६,०९४ क्विंटल कांद्याची बुधवारी आवक होती. त्यास ७५१ सरासरी भाव होता तर पिंपळगाव बाजार समितीत अवघी २५५० क्विंटल कांदा आवक होती तर त्यास ७०१ रुपयांचा भाव मिळाला.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पुतळ्याची विटंबना

$
0
0

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची मंगळवारी (दि. ५) रात्री काही समाजकंटकांनी विटंबना केली. मात्र, धुळे शहरवासीयांनी संयम दाखविल्याने समाजकंटकांचा डाव फसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहरात परिस्थिती नियंत्रणात आणली.

शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असून, अज्ञात माथेफिरुने मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुतळ्याची विटंबना केली. हा प्रकार बुधवारी (दि. ६) सकाळी जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अध्यक्ष शिवाजी दहिते यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ धुळे जिल्हा परिषद गाठले आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क करीत पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या विरोधात जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या आदेशाने काळा दिवस पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यामुळे बुधवारी विटंबनेच्या घटनेने जिल्हा परिषदेचे कामकाज दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. तर संभाजी ब्रिगेडचे अमोल मिटकरी हे व्याख्यानानिमित्त धुळ्यात आले असता त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन विटंबनेचा निषेध नोंदविला.


पोलीस घटनास्थळी आल्यानंतर काही क्षणात दहिते हे आल्यावर काहींनी त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत दहिते यांना मारहाण करण्यात आली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याचे परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर पुतळ्याची साफसफाई करून पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात माथेफिरूविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञाताने विटंबना केली असली तरी याला काही समाजकंटकांनी हेतूपुरस्सर केलेला प्रकार आहे. तसेच माजी मंत्री रोहिदास पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून धुळे लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार आहे. तर वेळेवर जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते यांना उमेदवारी जाहीर होण्याचे संकेत आहेत, अशीही चर्चा त्या ठिकाणी होती. याबाबत काही विरोधक समाजकंटकांनी प्रकार करून बदनाम करण्याचे कारस्थान रचले असण्याची शक्यता अध्यक्ष दहिते यांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांची हेळसांड

$
0
0

बँकांमध्ये स्वतंत्र सुविधा नसल्याने ज्येष्ठांचे हाल

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात गेल्या काही वर्षांत निवृत्त झालेल्या सरकारी, निमसरकारी व खासगी आस्थापनांमधील धारकांची संख्या वाढली आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारचे निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची पेन्शन राष्ट्रीयिकृत बँकांमध्येच जमा केली जाते. यामुळे सहाजीकच महिन्याची जमा झालेली पेन्शन घेण्याकरीता राष्ट्रीयिकृत बँकांमध्ये पेन्शनधारकांची मोठी गर्दी होते. वय वाढले असल्याने पाय थरथरत वयोवृद्ध बँकांच्या बाहेर चक्क खाली बसून बँक उघडण्याची वाट बघत असतात. यामुळे पेन्शन धारकांची हेळसांड सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शहरात तब्बल दोन लाखांहून अधिक पेन्शनधारकांची संख्या आहे. नाशिकरोड, पंचवटी, मध्य नाशिक, नवीन नाशिक सिडको व सातपूर भागात असलेल्या निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना राष्ट्रीयिकृत बँकांमध्ये पेन्शन घेण्यासाठी जावे लागते. यामुळे सहाजीकच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खात्यात पेन्शन जमा झाल्यावर वयोवृद्धांची मोठी गर्दी बँकेत पहायला मिळते. विशेष म्हणजे, अनेक पेन्शनधारक आजाराने ग्रस्त असतानादेखील केवळ पेन्शनसाठी त्यांना बँकेत ताटकळत बसण्याची वेळ येते. याबाबत राष्ट्रीयिकृत बँकांनी किमान पेन्शनधारकांना स्वतंत्र सुविधा करून दिल्यास त्यांचा त्रास कमी होईल, असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले आहे.

स्वातंत्रसैनिकही बेहाल

एकीकडे सरकारने सन २००५ नंतर सरकारी सेवेत लागलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची पेन्शनच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू दुसरीकडे खासदार व आमदार यांना देण्यात येणारी पेन्शन मात्र बंद केलेली नाही. शासनात ३० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्यांची पेन्शन बंद आहे. परंतु खासदार, आमदारांची का नाही, असाही प्रश्न पेन्शनधारक उपस्थित करीत आहेत. यामुळे पेन्शन घेण्यासाठी खासदार, आमदारांचीच चलती असलेल्या बघायला मिळते. एकदाच आमदार, खासदार झालेल्यांना वेळेवर पेन्शन प्राप्त होते. परंतु, देशासाठी आपले रक्त सांडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आजही पेन्शन घेण्यासाठी हेळसांडच होत आहे.

राष्ट्रीयिकृत बँकांमध्ये खात्यात जमा झालेली पेन्शन घेण्यासाठी जाणाऱ्या निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत बँकांना लेखी निवेदन देत किमान पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. परंतु, याबाबत बँक अथवा सरकारकडून योग्य निर्णय घेतला जात नसल्याने वयोवृद्धांची हेळसांड सुरूच आहे.

चंद्रकांत शिंदे, निवृत्त अधिकारी, एच. ए. एल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार देण्याऐवजी नोकरभरती करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे तणावात असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी सरसावलेल्या भाजप नगरसेवकांवर म्युनिसिपल कर्मचारी सेनेने टिका केली आहे. तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधार देण्यासह भाजपने महापालिकेत स्वतंत्र कर्मचारी संघटनेची चाचपणी सुरू केल्यानंतर कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमेनी भाजपवर हल्लाबोल केला. मनपा कर्मचाऱ्यांविषयी एवढी आस्था असेल तर भाजपा सरकारने पालिकेत नोकर भरतीला परवानगी द्यावी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा, अशी मागणी अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी केली आहे.

सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाल्यानंतर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची घुसमटसमोर आली आहे. या प्रकरणात म्युनिसिपल कर्मचारी संघटना दबावाखाली असल्याचे सांगत भाजप नगरसेवकांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना आधार देवून भेटीगाठी सुरू केल्या होत्या. तसेच स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तिदमेंनी भाजपवर पलटवार केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात नगरसेवक तिदमे यांनी म्हटले आहे की, 'भाजपाची दुटप्पी चाल मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळते आहे. आधी नाशिक दत्तक घेऊन मनपा आयुक्त बदलले. आयुक्तांना पुढे करून नाशिककरांवर अवाजवी कर वाढ लादली. मनपातील कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा अतिरिक्त ताण असताना आयुक्तांमार्फत त्यांच्यावर प्रचंड दहशत निर्माण केली. कामगार, कर्मचाऱ्यांची एकजूट सहन होत नसल्याने भाजपाच्या काही लोकांनी आता कामगार चळवळ खिळखिळी करण्याचा डाव रचला आहे. त्यांनीच मारायचे आणि त्यांनीच गोंजारायचे हा डाव मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलाच कळतो. मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविषयी एवढी आपुलकी आहे तर भाजपाने मनपात नोकर भरतील परवानगी आणावी आणि कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा भार कमी करावा. मागासवर्गीय कामगारांना पदोन्नती देण्यासाठी राज्य शासनाकडे आपली ताकद वापरावी,' असे आवाहनही म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण तिदमे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये भीषण अपघातात १० ठार

$
0
0

नाशिक:

चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रसजवळ आज पहाटे वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्स दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण ठार झाले असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अपघातातील सर्वजण कल्याण, उल्हासनगर आणि नाशिक येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं.

आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर जखमींवर चांदवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. हे सर्वजण कल्याण, उल्हासनगर आणि नाशिक परिसरातील असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

64488228

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमातर्फे ‘इएचएस’ प्रदर्शन

$
0
0

उद्योगक, व्यावसायिकांची भेट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निमातर्फे आयोजित इएचएस प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंबड येथील नाशिक इंजिनीअरिंग येथे सुरू असलेल्या प्रदर्शनाला ५०० हून अधिक उद्योगक, व्यावसायिक, औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील जाणकार, अभ्यासकांनी प्रदर्शनास हजेरी लावली. या प्रदर्शनाचा शुक्रवारी (दि. ८) शेवटचा दिवस आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक डी. बी. गोरे, 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा'चे उपाध्यक्ष हिरामण आहेर व सी. जी. पॉवर ॲण्ड इंडस्ट्रियल सोल्युशन्सचे उपाध्यक्ष मुकूल श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात स्टॉलधारक भेट देणाऱ्या मान्यवरांना आपल्या उत्पादन व सेवांविशयी माहिती देऊन त्याचे महत्त्वही पटवत होते. निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर व अन्य पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्यांनी या प्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

प्रदर्शनास नाशिक थर्मल पॉवर स्टेशन, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, बॉश, शुभदा पॉलिमर, आर्किटेक्ट शेखर देशपांडे, एफएसएएल चे सहसचिव कोतवाल, क्रॉम्प्टन गिव्हज् या व अशा अनेक प्रतिष्ठीत उद्योगांच्या वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली. त्यांनी स्टॉलधारकांशी हितगूज करत उत्पादन व सेवांविषयी माहिती घेतली. प्रदर्शनाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल निमाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. औद्योगिक सुरक्षेसाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर व निमा इएचएस समितीचे अध्यक्ष सुधीर अवलगांवकर यांनी सांगितले.

प्रदर्शनात करम इंडस्ट्रिज यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या पीपीई व्हॅनमधील सुविधांची माहिती देणारा डेमो स्टॉलधारकांसाठी व भेट देणाऱ्यांसाठी सादर करण्यात आला. या डेमोचे उद्घाटन निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर व निमा इएचएस समितीचे अध्यक्ष सुधीर अवलगांवकर यांच्यातर्फे झाले. व्हॅनमधील विविध जीवनोपयोगी उपकरणांची सखोल माहिती स्टॉलधारकांनी व भेट देणाऱ्यांनी जाणून घेतली. या प्रदर्शनात संबंधित उद्योजक व व्यावसायिकांनी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन निमा अध्यक्ष पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, उपाध्यक्ष उदय खरोटे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी व कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकेशनवरून सूचना पाठवा!

$
0
0

झेडपी सीइओंचे डॉक्टरांना आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी कामावर जातात की नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्वांना दररोज ऑनलाइन लोकेशन पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असल्याचे लोकेशन पाठविले, तर अनेक अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत तत्काळ चौकशी करून हजर नसलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून वेतन कपात करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात येते. यासाठी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रातबंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याच्या तक्रारी असून याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतदेखील जिल्हा परिषद सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याची तत्काळ दखल घेत डॉ. गिते यांनी सर्व बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दररोजचे लोकेशन पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ३३ पैकी १७ जणांनीच सदरचे लोकेशन पाठविले आहेत. तांत्रिक कारण वगळता जे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर होते, त्यांची वेतन कपात करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले आहेत.

दरम्यान, हवामान खात्याच्या सूचनेनुसार राज्यात ११ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीवर लक्ष ठेवून व आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश सर्व तालुक्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा पाऊस एकत्र

$
0
0

निफाडला दीड तास पाऊस

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड शहर व परिसरातील गावांमध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस झाला. सुमारे दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. बुधवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता.

हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. रात्री झालेल्या पाऊस हलका व मध्यम स्वरूपाचा असल्याने नुकसानीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. काडी तयार होण्याच्या स्टेजला असलेल्या काही द्राक्षबागांना मात्र या पावसाचा फटका बसणार आहे. गोदाकाठ भागातील ऊस आणि भाजीपाला पिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचे वातावरण होते, मात्र नंतर पुन्हा वातावरण बदलले आणि दिवसभर उन्हाचा तडाखा होता.

000

दिंडोरीत जोरदार हजेरी

दिंडोरी : तालुक्यात बुधवारी मध्यरात्री जोरदार वारा व मेघगर्जनेसह वळवाच्या पावसाने जोरदार लावली. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दिंडोरी, मोहाडी, खेडगाव, लखमापूर, वणी परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. तालुक्यात एकूण ६७ मीमी पाऊस झाला.

0000

मालेगावी रिमझिम

मालेगाव : शहर व तालुक्यात जूनच्या पहिल्या दोन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र शहर व तालुक्यात मुख्यतः ढगाळ वातावरण कायम आहे. बुधवारी सायंकाळी व मध्यरात्री शहरात व तालुक्यातील दाभाडी, करंजगव्हाण, झोडगे, कळवाडी, वडनेर, कौळाणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हलक्या सरी व ढगाळ वातावरणाने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळालेला असला तरी उकाडा मात्र कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याने ८ ते १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शहर व तालुक्यात देखील लवकरच मान्सून दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील अनधिकृत हॉटेल तोडले

$
0
0

व्यावसायिक अतिक्रमणे पालिकेच्या रडारवर; निवासी अतिक्रमणांवरील कारवाईला तुर्तास ब्रेक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याची सुरूवात होताच महापालिकेने निवासी अतिक्रमणांवरील कारवाईला तुर्तास ब्रेक दिला असून, व्यावसायिक अतिक्रमणे रडारवर घेतली आहेत. गुरुवारी महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे टेरेस आणि बेसमेंटमध्ये उभे राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला असून, मुंबई-आग्रा महामार्गावर एका टेरेसवर उभारलेले हेमराज बार या हॉटेलवर हातोडा चालवला. राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करणासाठी सुरू केलेल्या कम्पाउंडींग चार्जेस योजनेत ज्या हॉटेल्स चालकांनी अर्ज केले नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे व्यावसिक अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे धणाणले आहे.

सध्या पावसाळा असल्याने महापालिकेने निवासी व रस्त्यावरील अतिक्रमणांवर सुरू केलेला हातोडा तुर्तास थांबवला आहे. मात्र व्यावसायिक अतिक्रमणांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार पहिली कारवाई टेरेस आणि बेसमेंट वर उभारण्यात आलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर होणार आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहीदास बहिरम यांच्या पथकाने गुरुवारी मुंबई-आग्रा महामार्गावर एका इमारतीच्या टेरेसमध्ये उभारण्यात आलेल्या हेमराज बार या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई केली. संबधित हॉटेल्स चालकाने अनधिकृतपणे टेरेसेवर लोखंडी गज उभारत, संपूर्ण टेरेस बंदीस्त करून बार सुरू केला होता.

४६ हॉटेल अनधिकृत

शहराती टेरेस आणि बेसमेंटवर जवळपास ४६ अनधिकृत हॉटेल्स सुरू आहेत. त्यात सर्वाधिक हॉटेल्स हे नाशिकरोड विभागात २०, नाशिक पूर्व-९, सिडको-सातपूर ४, नाशिक पश्चिम ५ आणि पंचवटीत ८ हॉटेल्स सुरू आहेत. या हॉटेल्स चालकांचे संपूर्ण बांधकाम हे राज्य सरकारच्या प्रशंमित संरचना धोरणात न बसणारे होते. त्यामुळे बहुसंख्य हॉटेलचालकांनी या धोरणात अर्ज केलेला नाही. त्यामुळे नगररचना विभागाने आता या फाईल्स अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठवल्या असून अतिक्रमण विभागाने गुरूवारपासून अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे.

गुन्हा दाखलची धमकी

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक सकाळी साडेअकरा वाजता हेमराज बार वर कारवाईसाठी पोहचले. यावेळी हॉटेल चालकाने हॉटेलला कुलूप लावून तेथून पाय काढला. हॉटेल चालकाचा पवित्रा पाहून अतिक्रमण विभागाच्या पथकाने भ्रमणध्वनीवर संपर्क साधत, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी थेट धमकी दिली. हॉटेल्स खुले करा, अन्यथा कारवाई करू अशी इशारा दिल्यानंतर संबंधित हॉटेल्स चालकांने कुलूप उघडून दिले. त्यांनतर पथकाने दिवसभर कारवाई करीत हॉटेलचे बांधकाम तोडून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images