Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापालिकेत चौकश्यांचा जोर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्या दोषारोप सिद्ध करण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेडून चौकशीकामांसाठी बाबूराव हांगे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन दिवसापासून या अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे विभागप्रमुखांसह निलंबितानी आपली भूमिका स्पष्ट करण्याची धावपळ सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांसह कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. आयुक्तांकडून १५ पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर डझनभर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महापालिकेत निलंबन आणि बडतर्फी झाली तरी त्यांच्यावर तातडीने दोषारोपपत्र ठेवले जात नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी निलंबनाचा कालावधी उलटल्यानंतर लगेच सेवेत सामावून घेतले जात होते. मात्र, मुंढे यांनी ही कार्यपद्धती मोडून काढली आहे. निलंबनापाठोपाठ त्यांच्यावर लगेचच दोषारोप पत्र दाखल केले जात आहे. महापालिकेकडून चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले चौकशी अधिकारी बाबूराव हांगे यांच्याकडून दोन दिवसांपासून निलंबित केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची उलटतपासणी केली जात आहे. संबंधित निलंबित कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर ठेवण्यात आलेले दोषारोपासंदर्भात त्यांचा खुलासा जाणून घेतला जात आहे. या चौकशीसाठी संबधित विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून संबधित कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपाबांबत त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाघाट परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत

$
0
0

गोदाघाट परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत (फोटो)

पंचवटी : कायम गर्दीचा भाग म्हणून गोदाघाट परिसर ओखळला जातो. मात्र, आता या परिसरात माणसांच्या गर्दीबरोबरच मोकाट कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खाद्यपदार्थांमुळे ही कुत्री या परिसरात फिरताना दिसतात. ही कुत्री एकमेकांवर धावून जात असताना त्यांचे भुंकणे आणि धावणे येथे येणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणारे ठरत आहे. येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

अतिक्रमणांत वाढ

पंचवटी : शहरातील अतिक्रमण काढण्यात येत असले, तरीही गोदाकाठावर असलेल्या अतिक्रमणांत वाढ होत आहे. याअगोदर गौरी पटांगणाच्या जवळ असलेल्या मैदानावर असलेले भटक्या लोकांचे पाल आता नवीन सिंहस्थ मार्गाच्या फुटपाथवर उभारले जाऊ लागले आहेत. या पालांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे परिसराचा बकालपणा वाढून अस्वच्छतेतदेखल भर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रश्नी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बगीचाची मशागत (फोटो)

जेलरोड : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील बगीचामधील वाढलेल्या झाडांची नुकतीच मशागत करण्यात आली. त्यामुळे या बगीचाची शोभा वाढली आहे. या कार्यालयाच्या आवारात विविध झाडे लावण्यात आली आहेत. त्यात हिरवळ फुलविण्यात आली आहे. महापालिकेत कामानिमित्त येणारे नागरिक या बगीचात विसावा घेताना दिसतात. या बगीचात शोभेची झाडे लावण्याची मागणी होत आहे.

सप्ताहाचा समारोप

नाशिक : सकल सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान व्यासांनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली आहे. त्यामध्ये संपूर्ण जन्म-मरणाचे सार आहे, त्यामुळे सर्वांनी त्याचे श्रवण करावे, असे प्रतिपादन हभप विठ्ठल महाराज धोतर्डीकर यांनी केले.अमृतधाम येथील श्री गुरुदत्त मंदिरात आयोजित भागवत सप्ताहाच्या समारोपावेळी ते बोलत होते. आमदार बाळासाहेब सानप, पंचवटीच्या प्रभाग सभापती प्रियांका माने, धनंजय माने, दिलीप अहिरे, अरुण लड्डे, विलास कारेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वाटपही झाले. रमेश वानखडे, मोहन सहाणे, एकनाथ पगार, प्रवीण सोनावणे, प्रभाकर डिडोळकर, दत्तात्रेय बच्छाव, मुकुंद क्षीरसागर, प्रकाश सोनवणे आदींनी संयोजन केले.

रस्त्यांची दुरवस्था

नाशिक : मखमलाबाद परिसरातील शांतीनगर भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसामुळे येथील रहिवाशांना गुरुवारी गैरसोय सहन करावी लागल्याचे दिसून आले. पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात समस्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. आता पावसाला सुरुवात झाल्याने किमान मोठ्या प्रमाणावर खड्डे असलेल्या ठिकाणी तरी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेईई’ पूर्वतयारीबाबत श्रीवास्तव यांचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीनंतर आयआयटी इंजिनीअरिंग प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या ज्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी किंवा बारावीच्या प्रवेशाचे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. 'जेईई'च्या पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश परीक्षेस वर्षभराचा अवकाश असला तरीही त्यासाठी मुख्य पूर्वतयारीस लागण्याची हीच महत्त्वाची वेळ आहे. याबाबत शनिवारी (दि. ९) महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

'जेईई प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी' या विषयावर आयआयटीयन्स पेस या संस्थेचे सुमितेंद्र श्रीवास्तव हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. एन. बी. टी. लॉ कॉलेजच्या आरएनटी हॉलमध्ये हे व्याख्यान होणार आहे. जेईई परीक्षा म्हणजे काय, या परीक्षेची रचना कशी असते, याद्वारे कोठे प्रवेश घेता येतो, या परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी आदी प्रश्नांबाबत या व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांसाठी हे सेमिनार खुले असणार आहे.

प्लॅनेट कॅम्पस व्याख्यान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपेत तिघांना मारहाणकरून २४ हजार लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील मिरगाव शिवारातील हुलगुंडे यांच्या वस्तीवर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिघांना बेदम मारहाण करून २४ हजारांचा ऐवज लंपास केला. दगु हुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुलगुंडे वस्तीवर बुधवारी रात्री राजेंद्र हुलगुंडे, दगु हुलगुंडे, रखमाबाई हुलगुंडे हे बाहेर अंगणात झोपले होते. गुरुवारी पहाटे तीन वाजता अज्ञात चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून चोवीस हजारांचा ऐवज लंपास केला. दगु हुलगुंडे यांना मारहाण करीत त्यांच्या पत्नी रखमाबाई यांच्या कानातील पाच ग्रॅम सोन्याची कर्णफुले व गळ्यातील पाच ग्रॅमचे डोरले ओरबाडून नेले. हुलगुंडे यांच्या वस्तीजवळच राहणारे किसन मिसकर व सखाहारी मिसकर यांना शेजारून आरडाओरड आवाज ऐकू आल्यावर त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. तीनही जखमींनी शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. वावी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपनिरीक्षक अधिकारी अतुल झेंडे, सहाय्यक रणजित आंधळे, हरिभाऊ कोल्हे, उपनिरीक्षक एम. जे. सैय्यद पुढील तपास करीत आहेत.

000

करंजगावात चोरी

१८ तोळे सोने, ८० हजारांची रोकड लंपास

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शिक्षकाच्या घरी जबरीचोरी घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मविप्र संस्थेत शिक्षक असलेल्या विलास कर्डक हे बुधवारी संध्याकाळी नाशिक येथे पाहुण्यांकडे मुक्कामी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी गुरुवारी पहाटे कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून कपाटातील १८ तोळे सोन्याचे दागिने, ८० हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. करंजगाव गावात मध्यवस्तीत झालेल्या या चोरीच्या घटनेने करंजगावसह परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, पेठ उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी दोन पथके तपासासाठी रवाना केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभायात्रेने वाढणार ‘कलासंगम’ची शोभा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तारपाच्या डोलावर नाचणारी तरुणाई... आदिवासी डफ, हलगीच्या नादावर थिरकणारे पाय... अशा आदिवासी रंगांनी न्हाऊन निघत 'कलासंगम'ची शोभायात्रा खऱ्या अर्थाने 'मटा'च्या वर्धापन दिनाची शोभा वाढविणार आहे. कलासंगम महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. विद्याविकास सर्कल ते कुसुमाग्रज स्मारकापर्यंत ही कलाकारांची मांदियाळी येणार आहे. यात उद्घाटक, प्रमुख पाहुणे तसेच नाशिकमधील मान्यवर व कलाकारांचा समावेश असेल.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून शनिवार दि. ९ व रविवार दि. १० जून रोजी कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन उद्या ९ रोजी सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर कोलते (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरते कलाकार प्रणव कोंटुरवार व ऋतुजा चव्हाणके या कलाकारांचे संबळवादन होणार आहे.

दि. ९ व १० या दोन दिवसांत चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे सादरीकणरही यावेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही सादरीकरणे होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हॅण्ड फाऊंडेशनचेही सहकार्य लाभले आहे.

--

शस्त्रास्त्रे व दुर्मिळ नाणी प्रदर्शन

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना खुला होणार आहे. ९ व १० जून हे दोन्ही दिवस कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत.

स्पर्धांचे निकाल उद्या

महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या 'चटक-मटक यम्मी टिफिन स्पर्धा', चित्रकला स्पर्धा तसेच फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल शनिवारी सकाळी १० वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉल येथे जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच आणि बक्षीस वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातील ४० हजारांवर डल्ला

$
0
0

धनादेशावर बनावट स्वाक्षरी घेत महिलेची नातेवाइकाकडूनच फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून नातेवाइकाने महिलेच्या बँकखात्यातून परस्पर ४० हजार ५०० रुपये काढून घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी रसिका चांडक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश रामनाथ चांडक (रा. गोविंदनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताची नातेवाईक असलेल्या महिलेचे वकिलवाडीतील एका बँकेत बचत खाते आहे. १ मे २०१६ ते १७ एप्रिल २०१८ दरम्यान संशयिताने महिलेच्या सहीच्या अर्जाद्वारे बँकेतून धनादेश पुस्तक मिळविले व त्यानंतर बनावट स्वाक्षरी करून त्याद्वारे ४० हजार ५०० रुपयांची रोकड परस्पर काढल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बागूल करीत आहेत.

महिलेस २० लाखाचा गंडा

बीअर बार आणि वाइन शॉपीचा परवाना काढून देण्याच्या नावाखाली एकाने महिलेस तब्बल २० लाखास गंडविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी सातपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नबी पठाण (रा. दुर्गा मंदिराजवळ, सातपूर कॉलनी) असे ठकबाजाचे नाव आहे. आज्ञा रामकृष्ण तुपलोंढे (रा. लक्ष्मीनगर, अमृतधाम) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तुपलोंढे यांच्याशी ओळखत वाढवित संशयिताने हा गंडा घातला. राज्य उत्पादन शुल्क विभागात आपली ओळख असल्याची बतावणी करीत महिलेस १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान वेळोवेळी आपल्या घरी बोलावून घेत हॉटेल, बीअरबार, वाइन शॉप आणि शॉप अ‍ॅक्ट परवाने काढून देण्याच्या मोबदल्यात तब्बल १९ लाख ६१ हजार ३१० रुपयांना गंडविल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अनेक वर्ष उलटूनही परवाने न मिळाल्याने महिलेने संशयीताकडे तगादा लावला असता ही घटना उघडकीस आली. संशयिताने दिलेले कागदपत्र आणि पैश्यांची मागणी केली असता संशयिताने शिवीगाळ करीत तू मला ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर स्वाक्षरी करून दे; नाहीतर तुझ्या घरी माणसे पाठवून ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे महिलेने म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अवतारे करीत आहेत.

..

शंभर रुपयांसाठी भोसकले

हात ऊसनवार म्हणून शंभर रुपये दिले नाही म्हणून परिचिताने बापासमोर मुलास धारदार चाकूने भोसकल्याची घटना डॉ. होमी भाभा पेट्रोल पंप परिसरात घडली. या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम लहानू कोकाटे (रा. येवलेकर चाळ, पंचवटी कारंजा) असे चाकू हल्ला करणाऱ्या संशयिताचे तर अरुण पोपट दीक्षित असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गंजमाळ, सहकारनगर भागात राहणाऱ्या अरुणचे वडिल पोपट सोनू दीक्षित यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दीक्षित हे अरुण याच्यासमवेत बुधवारी (दि. ६) सायंकाळी डॉ. होमी भाभा पेट्रोल पंप परिसरातील ऑइल दुकानाजवळ उभे असताना ही घटना घडली. यावेळी परिचित असलेल्या संशयित कोकाटेने बापलेकांना गाठले. त्याने पोपट दीक्षित यांच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली; मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या कोकाटेने अरुणला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील धारदार चारूने त्याच्या पोटावर वार केला. तसेच स्व:ताच्याही मांडीवर वार करून घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.

..

दुचाकीस्वारांनी खेचला मोबाइल

नाशिक : मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या बुलढाणा येथील तरुणाच्या हातातील महागडा मोबाइल अ‍ॅक्टिव्हास्वारांनी हिसकावून नेल्याची घटना वर्दळीच्या कुलकर्णी गार्डन भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन निवृत्ती तायडे (रा. वरखेड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तायडे हे ७ मे रोजी कुलकर्णी गार्डन भागात आले होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास ते पंचम हॉटेल येथून देवांग कुल्फीच्या दिशेने पायी जात असताना ही घटना घडली. मोबाइलवर बोलत रस्त्याने जात असताना पाठीमागून (एमएच १५ ९३५६) या अ‍ॅक्टिव्हावर आलेल्या चौकडी पैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे ६५ हजार रुपयांचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव करीत आहेत.

बसप्रवासात मोबाइल चोरी

द्वारका ते रविवार कारंजा दरम्यानच्या बस प्रवासात भामट्यांनी मोबाइल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश बबनराव जगताप (रा. पाटीदार भवन, जनरल वैद्यनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उमेश जगताप द्वारका येथून रविवार कारंजा येथे जाण्यासाठी शहर बसमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील एक हजार ५०० रुपयांचा मोबाइल चोरून नेला. अधिक तपास जमादार धात्रक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ लुटीचा पर्दाफाश

$
0
0

सहा तरुणांना अटक; कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडीतील सिटी सेंटर मॉलसमोर झालेल्या २० लाख रुपयांच्या लुटीचा गुन्हा अखेर पोलिसांनी उघडकीस आणत सहा जणांना अटक केली. यात एका अल्पवयीन युवकाचा समावेश असून, उर्वरित पाच जणाचे वय अवघे २० ते २४ वर्षांदरम्यान आहे. ज्या कंपनीच्या पैशांची लूट करण्यात आली होती त्याच कंपनीतून बाहेर पडलेल्या तरुणाच्या माहितीनुसारच संशयितांनी गुन्ह्याचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे.

लूट प्रकरणी आतिष उत्तम कराटे (२४), सनी मन्सूर शेख (२४), जितेंद्र रवींद्र शेटे (२२), शुभम हिराशंकर यादव (२१), प्रशांत काशिनाथ कानडे (२४) यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकास पोलिसांनी अटक केली आहे. लुटीची घटना २८ मे रोजी सिटी सेंट मॉलजवळ घडली होती. ब्रिक्स इंडिया प्रा. लिमिटेड या फायनान्स कंपनीचे कर्मचारी अक्षय बागूल आणि विशाल महेंद्र निकुंभ असे दोघे २० लाख ४५ हजार ३९८ रुपयांचा भरणा करण्यासाठी निघाले होते. मॉलजवळील वृदांवन अपार्टमेंटसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकी सुरू करीत असताना तिथे तिघे संशयित आरोपी आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तसेच पिस्तुलाने डोक्यात मारून पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला होता. भरदिवसा झालेल्या लुटमारीच्या या गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने सुरू केला. माहितीगार माणसाशिवाय हा प्रकार होणार नाही, असा संशय पोलिसांना सुरुवातीपासून होताच. त्यामुळे सध्या कार्यरत आणि सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करीत पोलिसांनी काहींवर लक्ष ठेवले. यातील आतिष कराटे याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यात लुटीचा उलगडा झाला. संशयितांना ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१४ लाखांची रोकड जप्त

लूट केल्यानंतर संशयित आरोपींनी काही पैशांतून खरेदी केली. उर्वरित १४ लाख एक हजार रुपयांची रोकड तशीच होती. पोलिसांनी लागलीच गुन्हा उघडकीस केल्याने या मुलांकडे पैसे मिळाले. संशयितांकडून दोन दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली एअर गन, लुटीच्या पैशांमधून खरेदी केलेल्या वस्तू असा १५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी विशेष अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते हरवले चिखलात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

रोहिणी नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास झालेल्या यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसाने देवळाली कॅम्पमधील अंतर्गत रस्त्यांची पुरती दैना उडवली. बहुतांश रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना त्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डासह संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाचे कुठलेही वातावरण नसताना अचानक मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सुरू झालेला जोरदार पाऊस पहाटे ५ पर्यंत कोसळला. परिणामी रात्रभर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुवठ्याने हैराण झालेल्या देवळालीवासीयांना सकाळी भूमिगत गटारींच्या कामांमुळे खोदलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे उद्भवलेल्या चिखल अन् डबक्यांच्या समस्येला सामोरे जावे लागले. सुमारे चार तास सलग पडलेल्या पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. ऐन सकाळच्या वेळी ही परिस्थिती उद्भल्याने पादचारी व वाहनचाल त्रस्त झाले होते. शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आगामी पावसाळा लक्षात घेत याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाला पावसाळ्याआधी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याबाबत सुचविले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. लामरोडच्या विविध भागात पर्यटक म्हणून आलेल्या जैन बांधवांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येथे येणारे बहुतांश पर्यटक स्वतःची वाहन घेऊन येत असल्याने त्यांना अंतर्गत रस्त्यांवर प्रवास करणे जिकिरीचे बनले होते.

दुचाकींची ढकलगाडी

शहरातील संसरी लेन, बालगृहरोड, महालक्ष्मी मंदिररोड, सहा नंबर नाका, शिगवे बहुला, हाडोळा परिसर, रवी सोयायटी आदी भागात भूमिगत गटारींच्या कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केल्याने या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी चेंबर उभारण्यात आले आहेत, अशा ठिकाणी रस्ता जवळजवळ पूर्णच खोदल्याने तेथे अधिकच चिखल पसरला होता. त्यामुळे पादचाऱ्यांची कसरत, तसेच दुचाकीदेखील चिखलातून ढकलून न्याव्या लागत असल्याचे चित्र सकाळी सकाळी दिसून आले.

मुरूम पसरविला की माती?

लामरोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर भूमिगत गटारींचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असताना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मुरूम टाकण्यात आला आहे. त्यात मातीच अधिक असल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली. सकाळी नागरिकांचे होणारे हाल नगरसेवक व प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधत जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने निर्माण झालेला चिखल काढण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांतील संताप काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.

टेम्पो फसला खड्ड्यात

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हौसनरोड व मेन स्ट्रीटदरम्यान भूमिगत गटारीचे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात शहरात साखरेची पोती घेऊन येणारा टेम्पो सकाळी फसला. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांनीदेखील भूमिगत गटारींच्या कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला. प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर उलट टेम्पोचालकानेच चुकीच्या पद्धतीने गाडी चालविली, असे अकलेचे तारे तोडण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाच्या आधीच शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना गुरुवारी चिखलमय रस्त्यांचा सामना करावा लागला. ही समस्या तातडीने सोडवावी.

-प्रवीण पाळदे, स्थानिक रहिवासी

शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर निर्माण झालेल्या चिखलामुळे गुरुवारी सकाळी चारचाकी वाहने चालविणे तर सोडाच, पण दुचाकीदेखील चालविणे अवघड झाले होते. आहे. त्यामुळे अनेकांची चांगलीच कसरत झाली.

-अजिज शेख, स्थानिक रहिवासी

०००००००००००००००००००००००००

सातपूरवासीयांची कसरत

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश रस्ते जलमय झाले होते. अनेक रस्त्यांवर चिखल पसरल्याने गुरुवारी सकाळी नागरिकांचे चांगलेच हाल झाले. त्यानंतर महापालिकेकडून तातडीने रस्त्यांवरील चिखल हटविण्यास प्रारंभ करण्यात आला. महापालिकेने यंदा नैसर्गिक नाल्यांची सफाई केली असली, तरी पावसाचे पाणी पावसाळी गटारींत कसे जाईल, याची व्यवस्थाच केलेली नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला.

दमदार पावसामुळे मुख्य रस्त्यांवर उताराच्या ठिकाणी साचलेला चिखल हटविण्याचे काम महापालिकेकडून दिवसभर सुरू होते. त्र्यंबकेश्वररोडवरील पपया नर्सरी सर्कल, पवार पेट्रोलपंपासमोर, आयटीआय़ सिग्नल, आयटीआय पूल व खुटवडनगरच्या मुख्य रस्त्यांवरील चिखलामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. खुडवडनगर येथे जलवाहिनीसाठी खोदलेला रस्ता नुकताच बुजविण्यात आला होता. त्याची माती मोठ्या प्रमाणावर पसरल्याने दुचाकी घसरण्याच्या घटनाही घडल्या. त्यानंतर महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यांवर साचलेला चिखल हटविण्याचे काम हाती घेतले. रस्त्यांच्या कडेला टाकलेल्या चिखलावर मुरूम टाकावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खुटवडनगर येथे महापालिकेने नवीन जलवाहिनीचे काम नुकतेच केले. परंतु, खोदण्यात आलेला भाग व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने परिसरातील रस्त्यावर चिखल पसरला होता. त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

-विलास खुटवड, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोसावी कॉलेजचा ८२ टक्के निकाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंग शाखेचा निकाल शंभर टक्के तर कॉलेजचा ८​२​​ टक्के लागला.

कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंगमध्ये प्रथम वर्षातील अश्विनी सलवाडगीने (८६ टक्के) प्रथम तर स्वाती टिळेने (८५.८८) व्दितीय क्रमांक मिळवला. अश्विनीने एलेमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विषयात शंभरपैकी ९९ गुण मिळविले. दुसऱ्या वर्षातील मेकॅनिकल इंजिनीरिंगमध्ये महेश चौधरी याने प्रथम (८४.७८) तर इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगमध्ये थूम उमामहेश्वर राव याने (८१.४१) दुसरा क्रमांक मिळवला. प्राचार्य प्रा. प्रदीप देशपांडे, उपप्राचार्य प्रा. पूनमचंद जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्री कर्मचाऱ्यांचा संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषध विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करावेत, महागाई भत्त्यात वाढ करावी, भ्रष्ट ट्रेडिंगवर चाप लावावेत, या मागण्यासाठी महाराष्ट्रातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची संस्था असलेल्या महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रतिनिधी या संपात सहभागी झाले.

प्रतिनिधींची संघटना असलेल्या महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनीधींच्या वतीने शहरातील गोळे कॉलनी भागात निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, की जानेवारी महिन्यात चंद्रपूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्य सरकारकडून मान्य करून घेण्याच्या संदर्भात ठराव पास करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मंत्र्यांना नागपूर अधिवेशनात या संबंधी निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, कामगार मंत्र्यांनी या निवेदनाची दखल न घेतल्याने विक्री प्रतिनिधींना संपावर जाण्याचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, की वैद्यकीय प्रतिनिधींना आठ तास काम देण्यात यावे, तसेच सेल्स टार्गेट देताना मॅनेजरकडून होणारी अर्थिक पिळवणूक थांबवावी. किमान वेतनात सुधारणा व्हावी सेल्स प्रमोशन एम्प्लॉई अॅक्टनुसार व्हावे सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या औषधाच्या किंमती कमी व्हाव्यात, ऑनलाइन औषधविक्री बंद व्हावी, औषधांवरील जीएसटी काढून टाकावा या मागण्या करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची कंपन्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रिक्षाने धडक दिल्याने रस्ता ओलांडणारा एक जण ठार झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर प्रेसगेटसमोर हा अपघात झाला. रिक्षाचालक फरार झाला असून उपनगर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रमेश रंगनाथ आवारे (रा. उपनगर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आवारे हे घरातून वडाळा येथे कामावर जाण्यासाठी पायी निघाले. गांधीनगर येथे आल्यावर प्रेसगेटसमोरून रस्ता ओलांडत असताना रिक्षाने (एमएच १५ एके ५३१७) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आवारे गंभीर जखमी झाले. रिक्षाही उलटली. त्यातील प्रवासी गोपाळ काळे हा गंभीर जखमी झाला. आवारे यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालक फरार झाला आहे. दीपराज भगवान गायकवाड यांनी उपनगर पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

$
0
0

गिरणा धरणाचा ठेका खाजगी कंपनीला दिल्यामुळे नाराजी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील गिरणा धरणात वर्षानुवर्ष मासेमारी करून सुमारे ८०० हून अधिक मच्छिमार आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या स्थानिक प्रकल्पग्रस्त आदिवासी, भोई, कोळी समाजाच्या मच्छीमारांना डावलून शासनाने गिरणा धरणातील मासेमारीचा ठेका खाजगी कंपनीस दिला असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने हा ठेका रद्द करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील जयदुर्गा मच्छीमार सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मालेगावी आयोजित पत्रकार परिषदेत या स्थानिक मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी संस्थेचे सदस्य पांडुरंग गांगुर्डे, दिलीप गायकवाड, सचिव सुकदेव पाटील, मनोहर शिवदे आदींसह मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गांगुर्डे यांनी सांगितले की, गिरणा धरणात बुडालेल्या आठ गावांतील आदिवासी, भोई व कोळी समाजातील मच्छीमारांनी जुलै १९६८ला जयदुर्गा संस्थेची स्थापना केली. त्यात ८५४ सभासद असून ५० वर्षांपासून ते या धरणात मासेमारी करतात. शासनाच्या सुधारित धोरणानुसार मत्स्य व्यवसाय विभागाने २४ ऑगस्ट २०१७ रोजी गिरणा जलाशयातील मासेमारी हक्कासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यात स्थानिक मच्छीमारांनी भरलेली २१ लाखांची निविदा डावलून एका खाजगी कंपनीला मासेमारीचे हक्क दिले. मात्र ही निविदा प्रक्रिया सलग तीन दिवस सुटी असताना राबविण्यात आल्याने त्यात महामंडळाची भूमिका संशयास्पद ठरते असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा ठेका रद्द न केल्यास आदिवासी एकता परिषद आंदोलन उभारून मंत्रालयापर्यंत धडक मारण्याचा इशाराही देण्यात आला.

00

गिरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

मालेगाव : शहरातील गिरणा नदी पुलाजवळ पोहायला गेलेल्या एका तरुणाचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. नईम अहमद इसतेबुद्दीन (वय १७ रा. गुलशन नगर,

झंजेशवर मंदिरासमोर) असे या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी चार वाजता गिरणा पूल येथे पोहण्यासाठी गेलेला असता तो पाण्यात बुडाला. यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न नदीवर असलेल्या तरुणांनी केला. त्यास बाहेर काढण्यात येऊन महंमद अखतर अब्दुल मलिक यांनी सामान्य रूग्णालय आणले. उपचारा दरम्यान मयत झाल्याचे घोषित डॉक्टरांनी घोषीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणता झेंडा घेवू हाती?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले असले तरी, या निवडणुकीत टीडीएफ (महाराष्ट्र लोकशाही शिक्षक आघाडी) मधील गटबाजी मोठ्या प्रमाणावर समोर आली आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या टीडीएफमध्ये राजकीय पक्षांचा शिरकाव झाल्यानंतर टीडीएफमध्ये जवळपास चार गट पडले असून, टीडीएफच्या उमेदवारीचा जवळपास पाच उमेदवारांनी दावा केला आहे. त्यामुळे टीडीएफचा नेमका उमेदवार कोण, असा प्रश्नचिन्ह मतदारांसमोर पडला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यातील २५ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत या मतदारसंघावर टीडीएफचा वरचष्मा होता. परंतु गेल्या वेळेस या मतदारसंघात डॉ. अपूर्व हिरेंनी निवडणूक जिंकली. त्यानंतर हिरेंनी भाजपची साथ धरल्याने या मतदारसंघातील राजकीय प्रवेशाला सुरुवात झाली. शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी स्थापन झालेल्या टीडीएफमध्ये मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली आहे. शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तात्यासाहेब सुळे, प्रकाश मोहाडीकर, शिवाजी पाटील, फिरोज बादशहा यांनी ही संघटना स्थापन केली होती. परंतु आता या संघटनेचा उद्देशच भरकलटा असून, या संघटनेतल्या नेत्यांनी राजकीय पक्षांना दारे उघड करून दिल्यानंतर संघटनेचीच शकले उडाली आहेत.

टीडीएफ कडून उमेदवारी मिळाल्याचा दावा तब्बल पाच उमेदवारांनी केला आहे. त्यात संदीप बेडसे, भाऊसाहेब कचरे, शालिग्राम गिरूड, किशोर दराडे, कुणाल दराडे या पाच उमेदवारांनी आपणच टीडीएफचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. या संघटनेचे कार्याध्यक्ष असलेले फिरोज बादशहा यांनी भाऊसाहेब कचरेंचा अर्ज दाखल करताना हजेरी लावली, तर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी संदीप बेडसेंच्या पाठीशी बळ उभे केले आहे. किशोर दराडेंच्या पाठीशी संभाजी पाटील उभे राहिले आहेत. तर शालिग्राम भिरुड यांच्या पाठीशी ज्ञानेश्वार कानडे उभे राहिले आहेत. टीडीएफचे नेते वेगवेगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिल्याने नेमका उमेदवार कोण, असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणाला मतदान करायचे अशा पेचात मतदार पडले आहेत.

प्रतापदादांची एंट्रीने अस्वस्थता

दरम्यान, शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सोनवणे यांच्या अर्जामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने अनिकेत पाटील यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली असून, तीन मंत्र्याच्या उपस्थितीत अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे भाजपचा अधिकृत उमेदवार असताना, प्रतापदादा सोनवणेंच्या अर्जामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालाधी शिल्लक आहे. त्यात सोनवणे यांची अर्ज माघारीसाठी मनधरणी केली जाणार आहे. परंतु त्यांनी अर्ज कायम ठेवला तर भाजपच्या उमेदवाराची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायर चोरीप्रकरणीआठ संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी कारखान्यात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात मुसळगाव वसाहतीतील पोलिसांना आले आहे. आठ संशयित आरोपींना अटक करून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ३ जून रोजी केएसबी पंप्स कारखान्यातून ४ लाख ५४ हजार रपये किंमतीचे पंचवीस वायडिंग वायरचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. कंपनीचे व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या पथकाने आठ संशयितांना मुद्देमालासह व संशयित चोरट्यांचा तीन दुचाकी मोहदरी घाटाजवळील वनविभागाच्या जंगलातून हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी गोरख माळी, संजय माळी, सोमनाथ पिंपळे, गौतम माळी, नितीन बर्डे, अजय चव्हाण, रतन माळी, समाधान बर्डे यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्ताचे थारोळे, अन् मृतदेहांचा खच

$
0
0

सोमा टोल नाक्यावरील कर्मचारी धावले मदतीला

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

उज्जैन येथून कल्याणकडे परतणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला गुरुवारी पहाटे चांदवडजवळ अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांसह सोमा टोल नाक्यावरील कर्मचारी मदतीला धावून गेले. घटनास्थळी पडलेले मृतदेहांचे खच पाहून अनेकांच्या अंगाला शहारे आले. या भीषण अपघातात १० ठार तर १३ जण जखमी झाले.

गुरुवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास चांदवडनजीक सोमा टोल नाक्यावर नेहमीप्रमाणे कर्मचारी आपापल्या कामात गर्क होते. २४ तास सुरू असलेला हा टोल नाका गुरुवारी सकाळीही व्यस्त होता. अचानक टोलनाक्याच्या फोनवर कोणीतरी भीषण अपघाताची खबर दिली. या मार्गावर कुठेही अपघात झाला की टोलनाक्याची इमर्जन्सी

टीम मदतीसाठी तत्पर असतेच. गुरुवारी सकाळी मिनीबस वाळूच्या ट्रकवर आदळल्याच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच सोमा टोलचे कर्मचारी

आपल्या पेट्रोलिंग कार, रुग्णवाहिकासह घटनास्थळी धावले. त्यांच्यासोबत भाबड वस्तीसह चांदवड परिसरातील माणूसपण जपणारे ग्रामस्थ, नागरिक, संघटनेची

मंडळीही धडकली. ट्रकमध्ये आरपार घुसलेली मिनी बस आणि बसमध्ये अडकलेले, दबलेले मृतदेह, तसेच गंभीर जखमी अवस्थेत विव्हळणारे, मदतीसाठी याचना करणारे प्रवासी पाहून साऱ्यांच्याच जीवाचा थरकाप उडाला. मात्र तरीही या सर्व माणुसकीच्या देवदूतांनी बसच्या काचा फोडून, सीट उखडून, हाताला लागणाऱ्या रक्ताची व सुन्न झालेल्या मनाची तमा न बाळगता मदत कार्य सुरू केले. वाहनांची व्यवस्था करून जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात हलविले. काही प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमींना वाचवण्यासाठी मोठी धडपड करण्यात आली. अपघातात ८ जण जागीच ठार तर दोन जण नाशिकला

उपचाराला नेताना मृत झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक अपघात घडतात. मात्र गुरुवारचा अपघात हा खूप भीषण होता असे, सोमा टोल कंपनीचे प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.

जखमींना नाशिकला हलविले

हा अपघात एवढा भीषण होता की मिनी बसमध्ये काही प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत अडकलेले होते. बसमध्ये रक्ताचा सडा पडला होता. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी महामार्गावरील सगळ्यांनीच मदत केली. चांदवड उपजिल्हा रुग्णालयातही नागरिकांची गर्दी उसळली होती. काही गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अखेरचा चहा

मध्यप्रदेशातून नाशिकमार्गे कल्याणकडे जात असलेल्या या बसमध्ये २३ ते २५ प्रवासी होते. अपघात होण्यापूर्वी चांदवड टोल नाक्याच्या अलीकडे वाहनचालक व काही प्रवाशांना चहाची तल्लफ आली. गुरुवारी सकाळी साडे पाच-पावणे सहाच्या सुमारास त्यांनी चहासाठी गाडी थांबवली. काहींनी चहा घेतला, मात्र अनेकांसाठी हा अखेरचा चहा ठरला. चहा घेऊन पुढे निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हा अपघात झाला, असे चांदवडचे पोलिस उपनिरीक्षक जगताप यांनी सांगितले.

अपघातातील मृत

किसनबाबा चव्हाण (वय ५८), लक्ष्मीबाई परमार (वय ६५), काऊ चव्हाण (वय ४८), जागृती घावरी (वय ३५), गुंजन वलोदरा (वय २४), पवन घावरी (वय ७), निशा घावरी (वय १८), गीता नरसी परमार (वय ४५), प्रकाश घावरी (वय ३६), गीता मोहन परमार (वय ४०).

अपघातातील जखमी

पालू बरडीया, धनू परमार, राधा राठोड, विजय वलोदरा, अजय वानदरा, जयुणा चव्हाण, गीता वलोदरा, दसू दुधनिया, मंजू गुजराथी, कशिश चव्हाण, छाया परमार, प्रगती गुजराथी, प्रतिज्ञा गुजराथी, पुनम माळी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदवडजवळ अपघात; बालकासह १० जण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मागचे टायर फुटल्याने मिनी बस ट्रॅव्हल रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कल्याण, उल्हासनगरमधील दहा ठार, तर १४ जण जखमी झाले. चांदवडनजीक सोग्रस फाट्यावर गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये सात वर्षीय बालकासह सहा महिलांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथून ज्योतिर्लिंग दर्शन आटोपून मालेगावमार्गे कल्याणकडे परतत असताना ट्रॅव्हल बसचे (एमएच ०५/आरओ ३५७) टायर चांदवडजवळ फुटले. भरधाव बस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकवर (एमएच १५/ ८४२२) आदळल्याने मिनी बसमधील दहा जण ठार झाले. यातील दोघांचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बसचालक बचावला असून, त्याने चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

मृत व जखमींची नावे...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुंद रस्ता धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव मेडिकल कॉलेज ते म्हसरूळ गावठाणापर्यंतचा अरुंद रस्ता धोकादायक बनला असून, या रस्त्यालगत असलेले खोल नाले आणि पावसाळ्यात या रस्त्यावरून जोराने वाहणारे पाणी यामुळे हा रस्ता पावसाळ्यात जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यासह येथील नाल्यांसंदर्भातही योग्य उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

वाढत्या नववसाहती, तसेच हा रस्ता परिसरातील सर्वच प्रमुख ठिकाणांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरत असल्याने अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. मुळातच हा रस्ता अरुंद असून, वळणावळणाचा आहे. त्यातच आता रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हा रस्ता चांगलाच धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी या रस्त्यालगत खोल नाले असल्यामुळे अशा ठिकाणी धोका आणखी वाढला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून जोराने पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना नाल्यांचा अंदाज येणे अवघड होते. परिणामी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात पुरेशा उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आडगाव आणि म्हसरूळ या दोन्ही गावांच्या मळे परिसरातून जाणारा हा रस्ता पूर्वी कच्चा होता. बैलगाड्या, ट्रॅक्टर या रस्त्यावरून जात असत. या रस्त्याचे खडीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली नाही. समोरासमोरून वाहने आल्यास त्यांना मार्ग काढण्यास अडचणी येतात. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी नाले असल्यामुळे वाहने फारच काळजीपूर्वक चालवावी लागतात. काही भागात या रस्त्याच्या कडेला दाट झाडी असल्यामुळे त्या झाडांच्या फांद्याही अडचणीच्या ठरत आहेत. त्यातच या रस्त्यावरील वळणावळणांतून वाहने चालविताना वेगमर्यादा पाळली जात असली, तरी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.

रुंदीकरण ठरेल फायदेशीर

हा रस्ता रुंद झाल्यास मुंबई-आग्रा महामार्गावरून पंचवटीतून वळसा घेऊन दिंडोरीरोडला जाणारी वाहने या मार्गाने जाऊ शकतील. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची वर्दळ काहीअंशी कमी होईल. या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला काहीसा आळा बसू शकेल. दिंडोरीरोडने आडगावकडे येणारी, तसेच आडगावकडून दिंडोरीरोडला जाणारी वाहने कमी वेळेत पोहोचू शकतील. पर्यायाने वेळ अन् इंधन बचतही होऊ शकेल. त्यामुळे हा रस्ता रुंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादळाने कोसळले १६ वृक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जवळपास १६ झाडे कोसळली आहेत. एका वृक्षासह पानटपरीला शॉर्टसर्कीटमुळे आग लागण्याची घटना घडली. हे वृक्ष वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावरच उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला रात्री १६ कॉल आले. आपत्कालीन पथकानेही तातडीने रात्रीच हे वृक्ष हटवण्याची कामगिरी केली. महापालिकेने रात्री आणि गुरुवारी दिवसभर कारवाई करीत, हे वृक्ष हटवून रस्ते मोकळे केले. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला.

स्लॅब कोसळून तिघे जखमी

पंचवटी : मध्यरात्री अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी नव्याने सुरू असलेल्या स्लॅबच्या आश्रयाला गेलेले तिघे स्लॅब कोसळल्याने जखमी झाले. पेठरोड येथील तेलंगवाडी परिसरात महिनाभरापूर्वीच स्लॅबचे काम करण्यात आले होते. बुधवारी (दि. ६) रोजी रात्री दीडच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. त्याचवेळी पेठरोडने जाणारे सोमनाथ भवर, श्याम सोनवणे आणि सुरेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे पावसापासून बचाव करण्यासाठी या घराच्या स्लॅबखाली थांबले. मात्र, जोराचा वारा आणि पावसामुळे हा स्लॅब कोसळला. स्लॅब पडल्याच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना स्लॅबखाली काही लोक अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी अग्निशामन दलाला आणि पोलिसांनी या घटनेचे माहिती दिली.

पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे, पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आदींसह अग्निशामक दल, पोलिस आणि क्युआरटी टीम तातडीने घटनास्थळी पोहचली. कोसळलेल्या स्लॅबचे लोखंडी गज कापून आणि सिमेंटचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची हूल अन् बत्ती गूल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शहरात बुधवारी मध्यरात्री विजांच्या कडकडांसह मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत वीजपुरवठा पूर्ववत केला. पुढील दोन-तीन दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने महावितरणची कसोटी लागणार आहे.

शहरात महावितरणचे शहर एक व शहर दोन अशा दोन विभागात कार्य चालते. नाशिकरोड ते द्वारका परिसर शहर दोनमध्ये समाविष्ट होतो. बुधवारी रात्री जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला. सिन्नरफाटा येथे लाइटनिंग अरेस्टर यंत्रणा निकामी झाल्याने दोन तास वीजपुरवठा खंडित होता. विभागीय महसूल कार्यालय आवारातील 'मित्रा' या संस्थेशेजारी झाडाची फांदी तारांवर पडून वीजपुरवठा ठप्प झाला. जेलरोडलाही अर्धा तास वीज नव्हती.

खंडित विजपुरवठ्याबाबत महावितरणच्या नाशिकरोड कार्यालयात दररोज दहा ते पंधरा तक्रारी येतात. पावसाळ्यात त्यांचे प्रमाण वीस ते पंचवीस असे होते. तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात. त्यामुळे रात्री वीजपुरवठा खंडित झाला तरी ते प्रयत्नांची शर्थ करून पुरवठा सुरळीत करतात. तथापि, पुरेसे मनुष्यबळ आणि साधनांचा अभाव असल्याने त्यांच्या कामात अडथळे येतात. पथदीप दुरुस्तीसाठी महापालिकेकडे शिडी असलेले वाहन आहे. तसे वाहन महावितरणकडे नाही. त्यामुळे भरपावसात खांबावर चढून जीवाशी खेळत कर्मचाऱ्यांना दुरुस्तीची कामे करावी लागतात. त्यामध्ये अपघातांना सामोरे जावे लागते.

यामुळे जाते वीज

वीजपुरवठा खंडित होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये वीजेच्या तारांवर फांद्या पडणे, इन्सुलेटर उन्हामुळे तापणे किंवा त्यात पावसाचे पाणी जाऊन तो बंद पडणे, वीज कोसळून लाइटनिंग अरेस्टर निकामी होणे आदींचा समावेश आहे. वीज अवरोधक म्हणजेच लाइटनिंग अरेस्टर ट्रान्सफॉर्मरजवळ असते. अवकाशात वीज हे अरेस्टर आर्थिंगसारखे कार्य करते. काल पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर निकामी झाले. शहरासह नाशिकरोडला वीजेच्या तारांवर आलेल्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. तरीही काही ठिकाणी फांद्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला.

येथे गेली वीज

शहर भाग एक- उंटवाडी, मलिका पार्क, कर्मयोगी नगर (एक ते तीन तास), मुख्य शहर (पाच ते तीस मिनिटे), गंगापूर, महापालिका, मखमलाबाद, अश्वमेघ, कर्णनगर, विद्यानगर आदि ठिकाणी वीजेचा खेळखंडोबा झाला. नाशिक शहर विभाग दोनमध्ये सिन्नरफाटा, समता नगर, जयभवानीरोड परिसर, नांदूर, मानूर, दत्तगाव, पंचक, जेलरोड, गोवर्धननगर, लामरोड, देवळाली मार्केट, देवी मंदिर, वडनेररोड, भगूर, संसरी, विजयनगर, बेलतगव्हाण, लहवित गाव, पांढुर्ली, विंचूर दळवी, धोंडेवाडी, मुंबई रोड, पुणे रोड, शंकरनगर, पाथर्डी, वडनेर, राजीवनगर, इंदिरानगर, भारतनगर, दीपालीनगर, भाभानगर या भागांत पाच मिनिटे ते सुमारे चार तास अशी वीज गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरगडजवळ तरुणावर गोळीबार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवरील बोरगडजवळील एकतानगर परिसरात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन ते चार संशयितांनी एका तरुणाच्या डोक्यात कट्ट्यातून गोळी झाडत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्याचे नेमके कारण समजले नाही. तो तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. म्हसरूळ पोलिसांनी वाघाडीतील एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नितीन दिलीप परदेशी (वय २५) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन बुधवारी (दि. ६) रात्री साडेदहानंतर घरातून बाहेर पडला होता. तो साती आसरा देवीच्या मंदिराजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्याला अडविले. त्याला काही कळण्याच्या आतच संशयितांपैकी एकाने त्याच्या डोक्यात कट्ट्यातून गोळी झाडली. यानंतर संशयित पसार झाले. परिसरात गोळी झाडल्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी बाहेर जाऊन पाहिले असता नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला म्हसरूळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला द्वारकावरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. म्हसरूळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी एकतानगर भागात दाखल होऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी जितू पवार या संशयिताला वाघाडीतून ताब्यात घेतले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्यासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images