Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भुजबळ कुटुंबीय त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी सोमवारी त्र्यंबकराजाचे, संत निवृत्तिनाथ समाधीचे दर्शन घेतले. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडर चौकात त्यांचे आगमन झाले. तेथे ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहीरू मुळाणे, शहराध्यक्ष मनोज कान्नव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, बाजार समिती संचालक युवराज कोठुळे, उपसभापती रवी भोये, अरुण मेढे, विजय गांगुर्डे, गोकुळ बत्तासे उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान विश्वस्त कैलास घुले यांनी त्यांचे स्वागत केले. भुजबळ यांनी कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात अभिषेक व पूजा केली. आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ पुजेस बसले होते. संत निवृत्तिनाथ महाराज समाधीची आरती केल्यानंतर त्यांनी मंदिर कामाची पाहणी करून माहिती घेतली. ठिकठीकाणी त्यांचे औक्षण करण्यात आली. माळी समाजाच्या वतीनेही भुजबळांचे स्वागत करण्यात आले. मंदिर प्रांगणात छगन भुजबळ यांनी पुरुषोत्तम कडलग यांचा आधार घेतला तेव्हा ते थकले असल्याचे सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल चोरट्यांना ठोकल्या बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओझर शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून आठवडे बाजारातून नागरिकांचे मोबाइल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर पोलिसांना हे चोरटे पकडण्यात यश आले आहे. आठबडेबाजारात असणाऱ्या अगदी सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करून पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे.

ओझर येथे दर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारात मोबाइल चोरांची पर्वणीच ठरायची. गेल्या काही महिन्यांपासून मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, अनुपम जाधव, भास्कर पवार, बी. व्ही. हेगडे यांनी साध्या वेशात आपली गस्त वाढवली होती. मंगळवारी गस्त घालत असतांना राकेश केशव चव्हाण (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड) सचिन अरुण भोये (रा. सुर्दशन कॉलनी, नवनाथ नगर, पेठरोड नाशिक), राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड, नाशिक) हे तीन तरुण संशयीतरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेही पळून जाऊ लागले. शोध पथकाचे अनुपम जाधव व अमोल गांगोडे यांनी भर बाजारात त्यांचा पाठलाग करून सीनेस्टाइल पद्धतीने त्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाइल आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या वादात एकाची हत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

झोपडपट्टीतील मोकळ्या भूखंडाच्या वादात एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यापूर्वी याच जागेवरून एक विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल झाला होता. या गुन्ह्याची पार्श्वभूमी हल्ल्या असून, हल्लेखोर आणि मयत एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

राजू शेषराव वाघमारे (वय ४५, रा. संतकबीरनगर झोपडपट्टी, भोसला मिलिटरी स्कूलमागे) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकुतला राजू वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संतकबीरनगर), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा. गौतमनगर, गरवारे कंपनीसमोर) आणि त्यांचे तीन ते चार साथिदार एका कारमधून आले. राजू वाघमारे यांच्या ताब्यात असलेल्या झोपडपट्टीतील एका जागेवरून लाठ्याकाठ्या घेऊन आलेल्या संशयित आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपींनी वाघमारे यांना वर उचलून खाली आपटले, लाथाबुक्यांनी मारहाण केली. जखमी वाघमारे यांना लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शारीरिक तपासणी केली. कोणतीही जखम नसल्याचा रिपोर्ट दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावेळी वाघमारे व्यवस्थित बोलत होते. दुसऱ्या दिवशी मात्र वाघमारेंचा त्रास वाढत गेला. हळूहळू ते कोमात गेले. यानंतर त्यांना महात्मानगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गंगापूर पोलिसांनी लागलीच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तपासणीअंती मेंदुला मार लागल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत ऑपरेशन करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रविवारी रात्री उपचार सुरू असताना वाघमारेंना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही वार्ता समजताच नातलगांनी एकच गर्दी केली. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी हत्येचे कलम वाढवले.

--

विनयभंगानंतरचा प्रकार

गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये १५ जून रोजी एका २४ वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाचा प्रकार १ जून रोजी झाला होता. तसेच, संतकबीरनगरमधील जागेच्या वादातूनच हा प्रकार घडला होता. मात्र, युवती पुणे येथे गेल्याने गुन्हा उशिरा दाखल झाला. यात संशयित आरोपी म्हणून विजय शेषराव वाघमारे याचे नाव होते. त्यामुळे या घटनांपाठीमागे झोपडपट्टीतील तो प्लॉटच कारणीभूत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

--

महिलांचे आंदोलन

मारहाणीत मयत झालेले वाघमारे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत संतकबीरनगरमधील महिलांनी सोमवारी सकाळी गंगापूर पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले. आरोपींना नक्कीच अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वाघमारे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

--

हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून झाला असून, संशयित आरोपी फरार झाले आहेत. संबंधितास उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याची तब्येत साधारण होती. मात्र, काही तासांनी त्याची तब्येत बिघडत गेली.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथे नांदते माणुसकी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रस्त्यावर मोलमजुरी करीत हिंडणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आणि राबणारा हात थांबल्याचे दुःख आणि उपचारासाठी देखील पैसे नसल्याची वेदना उराशी बाळगत कुटुंबीय अश्रू ढाळत बसले खरे, पण मनमाडमधील माणूसपण जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी व सेवाभावी डॉक्टरने या महिलेवरील उपचारासाठी धडपड करून तिला या वेदनेतून सुखरुप बाहेर काढले. तिच्या हाताच्या वेदनेवर व दुःखावर फुंकर घातली. आता

अश्रू पुसून ती महिला मनमाडमध्ये माणुसकी नांदते, असे गौरवाने रस्त्यावरील तिच्या भाऊबंधांना सांगत आहे.

मनमाड शहर परिसरात रस्त्यावर मिळेल ते काम करणाऱ्या गरीब पण कष्टाळू कुटुंबातील महिला अचानक रस्त्यात पाय घसरून पडली. हाताला वेदना होत असताना आता उपचाराला पैसे कुठून आणायचे? आणि उपचार नाही झाले तर पोटाची खळगी भरायची तरी कशी? या काळजीने त्या महिलेला व तिच्या हातावर पोट असलेल्या कुटुंबियांना ग्रासले. मात्र माणुसकी जपणारी माणसे त्यांच्या मदतीला धावली. मिलिंद सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी या कुटुंबाला दिलासा दिला. त्यांना तडक डॉ. भन्साळी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हाताला फँक्चर झाले असल्याचे निदान झाले. उपचार व औषधांसाठी पैसे नसल्याने ते गरीब कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले. मात्र लायन्स क्लबमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अजय भन्साळी यांनी सामाजिक भान जपत या महिलेवर विनामूल्य उपचार केले. तसेच पुढील औषोधोपचारही उपलब्ध करून दिले. या माणूसपणाबद्दल मिलिंद सामाजिक संस्थेने डॉ. भन्साळी यांचे कौतुक केले. रुग्णांकडे पैसे नसल्याने त्यांना अँडमीट करून न घेण्याच्या, उपचार नाकारण्याच्या घटना कानावर पडत असतात. मात्र डॉ. भन्साळी यांनी कोणाची ओळख, शिफारस नसतानाही रस्त्यावरच्या गरीब महिलेला विनामूल्य उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. काही दिवसांनी पुन्हा काम करता येईल, चार पैसे लेकरासाठी मिळवता येईल या आशेने ती महिला सुखावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकी दूभाजकावर आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना एबीबी सर्कल परिसरात झाली. अपघातात मृत चालकाचा जोडीदार जखमी झाला. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

नहूश कैलास कडलग (२२, रा. नवशा गणपती मंदिराजवळ, आनंदवली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, संकेत भास्कर भालेराव (२६ रा. उपेंद्रनगर, सिडको) हा युवक जखमी झाला आहे. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कडलग आणि भालेराव हे दोघे मित्र सिटीसेंटर मॉलकडून एबीबी सर्कलच्या दिशने नवीन दुचाकीवर प्रवास करीत होते. भरधाव दुचाकी मील अ‍ॅण्ड व्हिल्स हॉटेलसमोरील वळणावर दुभाजकावर आदळली. यात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील कडलग याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर भालेराव याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बुराडे करीत आहेत.

शेजाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

अंगणात वादळाने झाडीची फांदी पडल्याच्या कारणातून शेजाऱ्याने महिलेस मारहाण करीत विनयभंग केला. ही घटना काठेगल्लीत घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की श्यामसुंदर मराळकर (२८ रा. नाविन्य सोसायटी, काठेगल्ली) असे संशयिताचे नाव आहे. वादळाने झाडाची फांदी संशयीताच्या घरासमोर पडलेली होती. मात्र, माझ्या घरासमोर का फांदी टाकली, यावरून वाद घालत संशयिताने महिलेस शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात मारहाण केली. यावेळी त्याने विनयभंग केला. संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

उघड्या घरातून मोबाइल चोरी

उघड्या घरात घुसून चोरट्याने मोबाइल चोरून नेल्याची घटना रविवार कारंजा भागातील कुटेलेन भागात घडली. या प्रकरणी गौरव जोशी (रा. रिमझीम वाडा, कुटेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी जोशी कुटुंबीय आपल्या घर कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून टीव्हीसमोर ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार धात्रक करीत आहेत.

युवकावर चाकू हल्ला

रागाने पाहिल्याचा जाब विचारल्याने संतप्त टोळक्याने युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना मोठा राजवाडा परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय विजय काळे (२३ रा. मोठा राजवाडा) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री हा हल्ला झाला. जय काळे मोठा राजवाड्यातील डॉ. सुभाष काळे यांच्या घराच्या ओट्यावर बसलेला असताना हा प्रकार घडला. रस्त्याने जाणाऱ्या आयुष साळवे याने त्याच्याकडे रागाने पाहिले. त्यामुळे जयने माझ्याकडे रागाने का बघतोस, अशी विचारणा केली. यावर आयुषने त्याचे साथीदार यश साळवे, रोहन रोकडे आणि सिद्धार्थ दोंदे यांना बोलावून घेतले. या सर्वांनी जयशी वाद घालत त्यास बेदम मारहाण केली. या वेळी संशयित आयुष, यश आणि रोहन यांनी जयला पकडून ठेवले तर सिद्धार्थ दोंदे याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यात जय जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

कुलकर्णी गार्डन परिसरात तरुणाला लुटले

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणास टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना कुलकर्णी गार्डन परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चौघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील यादव पाटील (२३ रा. निर्जल अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तो कुलकर्णी गार्डनकडून कॅनडा कॉर्नरच्या दिशेने आपल्या घराकडे पायी निघाला होता. शहा हॉस्पिटल भागातील पॅनासोनिक शोरूमशेजारील शॉपिंग सेंटरजवळून तो पायी जात असताना २० ते २५ वयोगटातील चौघांच्या टोळक्याने त्यास अडविले. संशयितांनी निखिलला बेदम मारहाण करीत दगड मारून जखमी केले. तसेच खिशातील मोबाइल आणि दोन हजार रुपयांची रोकड काढून घेत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

खंडणीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पंधरा हजाराची खंडणी मागून ती न दिल्यास एकाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील गिडाप्पा चाफळकर (४४, रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत, १७ जूनला रात्री दीडच्या सुमारास संशयित बाळा उर्फ विजय उदैनकर, बाळा कदम (रा. कॅनॉलरोड) सचिन धोभे (रा. कस्तुरबा नगर) यांनी करन्सी नोटप्रेसलगत चाफळकर यांना थांबवले. तुला या भागात रहायचे असेल तर १५ हजार रुपये दे, नाही तर तुझा चॉपरने काटा काढू, असा दम दिला, असे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयीतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीधाम मौत का कुआं!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगावातील महापालिकेच्या नव्या इमारतातील नागरिकांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. दोन महिन्यांपूर्वी फ्लॅटच्या स्लॅबचा तुकडा कोसळल्याने या रहिवासी इमारतीचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतरही विविध समस्या वाढतच असल्याने ही इमारत 'मौत का कुआं' झाली असल्याची भावना येथील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

महापालिकेने चार महिन्यांपूर्वी देवळालीगावातील गवळीवाडा आणि वडारवाडीतील झोपड्या हटवून तेथील रहिवाशांना घरकुल योजनेतील देवळालीगावतच गांधीधाम या नवीन इमारतीत फ्लॅट दिले. एका इमारतीत ८० प्लॅट आहेत. अशा दोन इमारती समोरासमोर आहेत. दुसरी इमारत रिकामीच आहे. दोन्ही इमारतींचे काम अत्यंत निकृष्ट आहे. दोन महिन्यांपूर्वी ए विंगमधील २२ नंबर प्लॅटमधील प्रसादे कुटुंबीयांच्या स्लॅबचा मोठा तुकडा टीव्हीवर कोसळला होता. तोच डोक्यात पडला असता, तर जीवितहानी झाली असती. सर्वच स्लॅब, बाथरूमची अशीच स्थिती असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

या इमारतीची पाण्याची टाकी खाली आहे. त्यावर डुकरांचा वावर वाढला आहे. टाकीशेजारीच असलेल्या उकिरड्याची घाण टाकीवर येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना देवळालीगावात वणवण करावी लागते. इमारतीमागे डेब्रिस टाकलेले असून, तेथेही डुकरांचा वावर असतो. या इमारतीसमोरच दुसरी नवीन इमारत उभी आहे. तेथे रहिवासी येण्याआधीच वरील जलकुंभाला गळती लागली आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरवाजे उखडले आहेत.

रहिवाशांनी इमारतीच्या निकृष्ट कामाबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, प्रशाननाने लक्ष दिले नाही, की लोकप्रतिनिधीही फिरकले नाहीत. येथे जीव धोक्यात घालण्यापेक्षा जुन्या ठिकाणी राहण्यास जागा द्या, अशी रहिवाशांची मागणी आहे.

प्लास्टरच्या जाडीबाबत गंभीर आरोप (स्वतंत्र चौकट)

येथील समस्यांचा आलेख वाढताच असून, स्लॅब कोसळल्यानंतर निकृष्ट वायरिंगमुळे या नव्या इमारतीच्या डीपीने पेट घेतला होता. दुसऱ्या घटनेत घरातील बटण दाबताच वायरिंग जळून गेले होते. सर्व फ्लॅटमधील बाथरूम, शौचालयांचे स्लॅब गळत असून, भिंती, स्लॅबना ओल आलेली आहे. काहींच्या दरवाजांच्या चौकटी उखडल्या असून, भिंतीला खिळा ठोकल्यास दुसऱ्या फ्लॅटमधील भिंत पडते. ड्रेनेज व बाथरूमचे पाइप गळत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. गॅलरऱ्यांना सेफ्टी ग्रिल्स नाहीत, इमारतीच्या पॅसेज व आवारात लाइट नाहीत. छताला ४० एमएम जाडीचे प्लास्टर हवे असताना ९० एमएम जाडीचे प्लास्टर केल्याचा आरोही होत आहे.

--

निकृष्ट बांधकामामुळे गांधीधाम मौत का कुआं झाली आहे. कधीही दुर्घटना होऊ शकते. पावसाळा सुरू झाल्याने जीव मुठीत धरूनच राहावे लागत आहे. पूर्वीची झोपडी सुरक्षित होती, असे वाटते.

-कमला सकट, स्थानिक रहिवासी

इमारतीमागे आणि पाण्याच्या टाकीवर डुकरे असतात. टाकीचे कामही निकृष्ट आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना गावात जावे लागते. आयुक्तांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही.

-लता चांदेकर, स्थानिक रहिवासी

(सेकंड लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील चोंढी गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी पहाटे शेतकरी भास्कर जगन मवाळ (गट नं. ३१४) यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोंढी शिवारातील मवाळ वस्तीवरील भास्कर मवाळ हे रोजप्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरात झोपले होते. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला चढवून त्यास ठार केले. त्यानंतर त्याने वासरू गोठ्यातच फस्त करून शेजारच्या शेतातून पसार झाला. पहाटे भास्कर मवाळ यांना जनावरांच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे ते बाहेर आले. तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक शरद थोरात व अनिल साळवे यांनी घटनास्थळी पंचनामा. नागरिकांच्या मागणीनुसार मवाळ वस्तीवर वनविभागाने पिंजरा लावला आहे. बिबट्याचा हल्ल्यामुळे मेंढी व चोंढी मधील शेतकरी घाबरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरटे जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओझर शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून आठवडे बाजारातून नागरिकांचे मोबाइल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर पोलिसांना हे चोरटे पकडण्यात यश आले आहे. आठबडेबाजारात असणाऱ्या अगदी सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करून पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे.

ओझर येथे दर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारात मोबाइल चोरांची पर्वणीच ठरायची. गेल्या काही महिन्यांपासून मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, अनुपम जाधव, भास्कर पवार, बी. व्ही. हेगडे यांनी साध्या वेशात आपली गस्त वाढवली होती. मंगळवारी गस्त घालत असतांना राकेश केशव चव्हाण (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड) सचिन अरुण भोये (रा. सुर्दशन कॉलनी, नवनाथ नगर, पेठरोड नाशिक), राहुल भिकन कासार (रा. मायको दवाखाना, दिंडोरी रोड, नाशिक) हे तीन तरुण संशयीतरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेही पळून जाऊ लागले. शोध पथकाचे अनुपम जाधव व अमोल गांगोडे यांनी भर बाजारात त्यांचा पाठलाग करून सीनेस्टाइल पद्धतीने त्यांना जेरबंद करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाइल आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदोरीत पाऊस, इतरत्र उघडीप

$
0
0

निफाड : गेल्या आठवड्यापासून लांबलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात दमदार हजेरी लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस लांबल्याने शेतकरी पावसाची रोज आतुरतेने वाट पाहत आहे. ढगाळ हवामान असूनही पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल होते. सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान चांदोरी ते गोंडेगाव फाटापर्यंत दमदार पाऊस झाला. पावसाचा वेग इतका होता की शेतामध्ये पाणी साचले होते. ऊस व भाजीपाला या पिकांची भरणी या पावसाने झाली. चांदोरीपासून पुढे निफाड व नाशिककडे असणाऱ्या गावांना मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तालुक्यात दमदार पावसाची गरज असून शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण अहवाल पडला महागात

$
0
0

विस्तार अधिकाऱ्यास नोटीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय खाते चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे खाते चौकशीत दोषमुक्त ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चांदवड येथे ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेल्या विस्तार अधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा समर्पक खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

इगतपुरी पंचायत समितीमधील ग्रामपंचायत विभागात कार्यरत एका विस्तार अधिकाऱ्याने आपल्या पदाचे कर्तव्य बजावताना गंभीर स्वरुपाची कसुरी केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विभागीय खातेचौकशी सुरू करण्यात आली होती. यासाठी चौकशी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सुनील पाटील होते. या प्रकरणी प्राप्त झालेले आरोपपत्र व त्यानुसार कार्यवाही केलेली नसल्याचे निदर्शनास आले. सादरकर्ता अधिकारी म्हणून चुकीचे स्वरुपात व अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यास दोषमुक्त करण्यात आलेले आहे.

या प्रकरणी सादरकर्ता अधिकारी व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तत्कालीन विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) या नियमानुसार नोटीस बजावण्यात आली असून, याबाबत समर्पक खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावोगावी मिळणार शुद्ध अन् सुरक्षित पाणी

$
0
0

जलकुंभ, टाक्या, स्वच्छतेचे काम सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारपासून ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. गिते यांनी असे नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी निफाड तालुक्यातील चाटोरी, सोनगाव, चांदोरी, शिवडी, विंचूर, रानवड, दारणा सांगवी, दिंडोरी-चास, औरंगपूर, ठाणगाव थडी, पाचोरे बु., टाकळी विंचूर, भुते, महाजनपूर आदी ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये देखील ही मोहीम राबविण्यात आली. तसेच त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख नमूद करण्यात येऊन अंगणवाडी व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली. ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच, हातपंपांचेही शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जलसुरक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

.

ग्रामसतरीय यंत्रणेला आदेश

पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आधारकार्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातून आधार नोंदणी व नूतनीकरण केले जात असले तरी टप्प्याटप्प्याने हे केंद्र बंद करण्याचे संकेत युआयडीने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सध्या सरकारी कार्यालयांमध्ये मुक्काम असलेले आधार केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, बँका आणि टपाल कार्यालयांमधूनच आधार नोंदणी व नूतनीकरणाची तयारी सुरू झाली आहे.

आधारकार्ड ही भारतीयत्वाची ओळख ठरणार आहे. प्रत्येकाला आधारकार्ड काढणे आणि ते सोबत बाळगणे अनिवार्य असून, जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू केले आहेत. महाऑनलाइन केंद्र आणि सीएससी सेंटर्सचालकांना सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्र चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात १३५ ठिकाणी आधार नोंदणी आणि नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ बँका आणि टपाल कार्यालयांमध्येच आधार केंद्र देण्याचे युआयडीच्या विचाराधीन असून, त्या अनुषंगाने युआयडीने कार्यवाहीला सुरुवातही केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून नवीन ऑपरेटर्सची नेमणूक थांबविण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने महाऑनलाइन केंद्रांकडील आधारचे काम काढण्यात येणार असून, ते राष्ट्रीयीकृत बँका आणि टपाल कार्यालयांमधूनच सुरू ठेवण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

२९ महाऑनलाइन केंद्र काळ्या यादीत

आधार सेंटर्स सरकारी कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आल्यामुळे या सेंटरचालकांवर वेळेच्या मर्यादा आल्या आहेत. सरकारी कार्यालयांच्या कामकाजाच्या दिवशी आणि कामकाजाच्याच वेळेत आधारची कामे करणे त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. सुटीच्या दिवशी किंवा सायंकाळी सहानंतर आधार नोंदणी किंवा आधार नूतनीकरण करणाऱ्या २९ सेंटरचालकांना युआयडीने काळ्या यादीत टाकले आहे. आधार नोंदणीसाठी पैसे आकारले जाऊ नयेत किंवा आधार दुरुस्तीसाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जाऊ नयेत याकरिता ही दक्षता युआयडीकडून घेतली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंगळेनगर चौकात सिग्नलमुळे गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

येथील इंगळेनगर चौकातील सिग्नलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. हा दोष त्वरित दूर करण्याची मागणी होत आहे. अपघात झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वाढत्या अपघातांनंतर बसविलेल्या सिग्नलमध्ये वर्षभरातच दोष निर्माण झाला आहे. एकाच वेळी चारही सिग्नल ग्रीन होतात. दोन दिवसांपूर्वी रात्री असा प्रकार घडला. दिवसाही कधीकधी सिग्नलमध्ये अशीच समस्या उद्भवते. पूर्वेकडील सिग्नलचा टायमर खराब झालेला असून, तोदेखील दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. या चौकात वाहतूक पोलिस नसतो. चौकात नाशिकरोड अंकित पोलिस चौकी आहे. परंतु, ती क्वचित उघडी असते. सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईच होत नाही. त्यामुळे बेशिस्त निर्माण झाली आहे. त्यातच सिग्नल खराब झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे सिग्नल दुरुस्तीची मागणी विजय परदेशी, तुळशीदास इंगळे आदींनी केली आहे.

पुलाखालील पाण्यावर तरंगतोय कचरा (फोटो)

पंचवटी : संत गाडगे महाराज पुलाच्या खालच्या बाजूला गोदावरीच्या पात्रात कचरा साचला आहे. वाहून आलेला कचरा येथे पाण्यावर तरंगत असून, त्यावर तेलाचा तंवग असल्यासारखे दिसत आहे. गोदापात्रात प्रदूषण करण्यास मनाई असतानादेखील गोदापात्र अस्वच्छ करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागल्यापासून ही समस्या गंभीर बनू लागली आहे.

फळे, मिठाईवाटप

देवळाली कॅम्प : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या लामरोड भागात आज, मंगळवारी (दि. १९) सकाळी १० वाजता मिठाई व फळेवाटप करण्यात येणार आहे. जगदीश गोडसे यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेना शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पेठरोडवर अस्वच्छता (फोटो)

पंचवटी : पेठरोडला कालव्याजवळ लावण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेटच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी येथे कचरा टाकत असल्यामुळे ही जागा कचराकुंडी बनली आहे. मोबाइल टॉयलेटच्या आडोशाला लक्षात येत नसल्यामुळे येथे कचरा टाकला जात आहे. हा कचरा उचलला जात असला, तरी पुन्हा येथे कचरा टाकला जात असल्यामुळे कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत.

स्क्वॅश निवड चाचणी

नाशिकरोड : नाशिक जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनतर्फे दि. २१ जून रोजी दुपारी ४ वाजता विभागीय क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे जिल्हास्तरीय स्क्वॅश रॅकेट निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. त्यात नाशिक जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. ११, १३, १५,,१७ व १९ वर्षे वयोगटाची मुले /मुली, तसेच सीनिअर पुरुष व महिला या गटांसाठी निवड चाचणी होत आहे. सहभाग व माहितीसाठी स्पर्धा सचिव संजय होळकर (९८९०८१५९९७), प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी (९०४९०८४४९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आनंद खरे, कार्याध्यक्ष अशोक दुधारे, नितीन हिंगमिरे, प्रा. माणिक गायकवाड यांनी केले आहे.

नांदूरला पाणीगळती (फोटो)

पंचवटी : नांदूर नाक्यापासून जवळच असलेल्या नाल्यावरून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. या व्हॉल्व्हमधून पाण्याचे तुषार उडत असून, वेगाने उडणाऱ्या या फवाऱ्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून, हे पाणी नाल्यात साचत आहे. येथे त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

गुणवंतांचा सत्कार

जेलरोड : पंचक येथील कै. गणेश धात्रक संस्थेच्या एंजल इंग्लिश स्कूलमध्ये ९२ टक्के गुण मिळवून दहावीत प्रथम आलेल्या खुशवंत बोरसे याच्यासह अन्य गुणवंतांचा नुकताच सत्कार झाला. शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय धात्रक आणि मुख्याध्यापिका मनीषा दराडे यांच्या हस्ते सत्कार झाला.

अमरधामरोडवर डेब्रिस (फोटो)

पंचवटी : अमरधामरोडवर डेब्रिस टाकण्यात येत असल्यामुळे त्याचे मोठे ढिगारे साचत आहेत. पंचवटी अमरधामच्या उत्तरेला असलेल्या महापालिकेच्या जागेत हे डेब्रिस टाकण्यात येत आहे. त्याच्यावर कुणाचेही निर्बंध नसल्यामुळे त्याचे ढिगारे वाढत चालले आहेत. शहरातील जुने वाडे, घरे पाडल्यानंतर त्यांचे डेब्रिस सर्रासपणे येथे फेकण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा योगोत्सव २१ जूनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय योगदिनी (२१ जून) नाशिक योग विद्या केंद्रातर्फे योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून, हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर सकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत होणार आहे. येतांना सोबत योगामॅट किंवा सतरंजी आणावी.

योग दिवस फक्त शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये किंवा योगसंस्था यांच्यापुरताच मर्यादित न रहाता सर्वसामान्य नाशिककर नागरिकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी नाशिकमधील 'नाशिक योग विद्या केंद्र' या संस्थेच्या वतीने येणारा योगदिन हा 'नाशिकचा योगोत्सव' या नावाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात नाशिकमधील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देत नाशिकमधील विविध संस्था २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनात सहभागी होणार आहेत. यामध्ये महिला पतंजली समिती, जैन सोशल ग्रुप, गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, (डी.टी.एस.), देशस्थ ऋग्वेदी संस्था, नीमा, डॉक्टरांची जिल्हा संघटना, बुकसेलर्स असोसिएशन, जीतो लेडीज विंग नाशिक चॅप्टर, आयुष विभाग नाशिक, लायन्स क्लब, नाशिक विभाग, रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्था सहभागी होत आहेत. ज्या संस्थाना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संयोजक उमेश निफाडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषण मुक्तीसाठी शेवगाच्या बियाभेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही हातभार लागावा या सामाजिक भावनेतून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ७५ वर्षाच्या एका शेतकऱ्याने आज जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचेकडे सुपूर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून, कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात लोकचळवळ निर्माण झाल्याचे अनिल लांडगे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेचे सूत्रे घेतल्यापासून कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी जिल्ह्यात नव्याने सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली आहे. जिल्हाभरात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्रामस्तरावर बाल ग्राम विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी आहार तसेच औषध याबरोबरच गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालक यांचेसाठी शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबत डॉ गिते यांनी माहिती देत जिल्हा शेवगामय करण्याचा निर्धार केला आहे. अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी शेवगा लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोफत बियाणे उपलब्ध करून देत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (ता. शेवगाव) येथील श्रीराम धूत या ७५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्याकडील ४० किलो शेवगा बियाणे जिल्हा परिषदेला मोफत उपलब्ध करून दिले आहे. आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अनिल लांडगे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे आदींच्या उपस्थितीत श्रीराम धूम यांनी ४० किलो शेवगा बियाणे सुपूर्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग एकाच छताखाली

$
0
0

मटा विशेष

vinod.patil@timesgroup.com

Twit : VinodPatilMT

नाशिक : शहरासह आजूबाजूला असलेल्या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, पर्यटन विभाग, महापालिका आणि पुरातत्त्व विभागामध्ये एकवाक्यता नसून, त्यांच्याकडे या पर्यटनस्थळांबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा गोधळ दूर करण्याचा विडा स्मार्ट सिटी कंपनीने उचलला आहे. शहर आणि परिसरातील सर्व पर्यटनस्थळांबाबत असलेल्या माहितीबाबत एकवाक्यता आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनी या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एकत्रित करून सर्व संकेतस्थळांसाठी एकच दिशादर्शक माहिती उपलब्ध करून देणार आहे. सोबतच देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पर्यटनस्थळांचा गुगलवर इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार केला जाणार आहे.

धार्मिक, सांस्कृतिक शहर अशी नाशिकची ओळख आहे. उत्तम भौगोलिक स्थिती, अनुकूल हवामान आणि कनेक्टिव्हिटीची त्याला जोड मिळाल्याने नाशिकचा डंका जगभर वाजला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची तर जागतिक वारसायादीत नोंद झाली आहे. नाशिकच्या आजूबाजूला असणारे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना फक्त पावसाळ्यापुरतेच आकर्षित करते, तर मंदिरांचे शहर अशी नाशिकची ओळख असली तरी अन्य राज्यांतील पर्यटनस्थळांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद नाशिकच्या पर्यटनस्थळांना मिळत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नाशिकचे ब्रँडिंग एकाच छताखाली न होणे. राज्य सरकारचा पर्यटन विभाग, महापालिका, पुरातत्त्व विभाग आणि इतिहासातील पुस्तकांमध्ये या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत एकवाक्यता नाही. सोबतच खासगी संस्थांकडून या पर्यटनस्थळांबाबत असलेल्या माहितींमध्ये तफावत आढळून येते. पर्यटनासाठी आवश्यक मॅप कोणत्याही संकेतस्थळावर नाही, तसेच या पर्यटनस्थळांचा डिजिटल कंटेंटही उपलब्ध नाही. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा गोधळ होतो.

देश-विदेशातून नाशिकमध्ये येऊ पाहणाऱ्या पर्यटकांचा हा गोंधळ दूर करण्याचा विडा स्मार्ट सिटी कंपनीने आता उचलला आहे. स्मार्ट सिटी कंपनी नाशिकच्या अंतर्गत पर्यटनस्थळांचा विकास व प्रसारासाठी प्रयत्न करणार आहे. शहरासह आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या पर्यटनस्थळांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येणार असून, त्यासाठी इतिहासतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या सर्व पर्यटनस्थळांची एकत्रित माहिती संकलित करून ती माहिती अधिकृत केली जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून हा संकलित केलेला मजकूर केंद्र, राज्यासह पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर एकाच वेळी झळकणार आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांच्या माहितीमध्ये असलेली तफावत दूर होणार आहे. खासगी संस्थांना गाइड पुस्तके छापण्यासाठीही हाच अधिकृत कंटेंट वापरता येणार आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या माहितीबाबत असलेली तफावत दूर होऊन नाशिककडे पर्यटकांचा ओढा वाढेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

स्टोरी टेलिंग कंटेंटही...

सध्या विविध विभागांच्या संकेतस्थळांसह खासगी संस्थांकडे पर्यटनस्थळांची माहिती कंटेंट स्वरूपातच उपलब्ध आहे. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने या पर्यटनस्थळांचा इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार करण्याचा निर्णय घेतला असून, दृ्श्य स्वरूपातील व्हिडीओ तयार केले जाणार आहेत. हा डिजिटल कंटेंट सर्व संकेतस्थळांवर टाकण्यासह विविध देशांच्या वेबसाइटवरही लिंक केला जाणार आहे. गुगलवरही हा डिजिटल कंटेंट उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोबतच स्टोरी टेलिंग कंटेंटही तयार केला जाणार असून, जगभरातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा त्यामागचा उद्देश आहे.

शहर आणि आजूबाजूला असलेल्या पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करण्यासाठी माहितीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी पुढाकार घेणार असून, एकत्रित माहितीसह इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स तयार केला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढेल.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा बेमुदत बंद

$
0
0

सीटूचे पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई झाली असून, गुन्हा मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा सीटू पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नाशिक वर्कर्स युनियन आणि सीटू संलग्न कामगार संघटनांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना निवेदन सादर केले.

कामगार मारहाणीच्या घटनेनंतर दोन दिवसांनी हेतूपुरस्सर डॉ. कराड यांचे नाव गोवण्यात आले. सीटू प्रणित विविध कामगार संघटनांमुळे कामगारवर्गाला जास्त पैसे द्यावे लागतात. यामुळे कारखानदारांनी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना बरोबर घेऊन हा उद्योग केला आहे. नॅश ग्रुपच्या मालकास मदत करण्यासाठी म्हणून सीटू प्रणित कामगारांनी मारहाण केल्याचा खोटा गुन्हा सातपूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्याचा आरोपदेखील पदाधिकाऱ्यांनी निवदेनात केला आहे. २३ मे रोजी मारहाणीची घटना झालेली असताना गुन्हा २५ मे रोजी दाखल करण्यात आला. न घडलेल्या गुन्ह्याबाबत डॉ. कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे लक्ष्मीकांत पाटील यांना निलंबित करण्याचीही मागणी निवेदनात केली आहे. सीटू जिल्हाध्यक्ष एस. के. ठोंबरे, उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, नगरसेवक तानाजी जायभावे तसेच पदाधिकारी कल्पना शिंदे, संतोष काकडे, सिंधू शार्दुल, भागवत डुंबरे, एन. डी. सूर्यवंशी, अ‍ॅड. भूषण सातळे, खंडेराव झाडे यांच्यासह कामगारांनी पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, या ठिकाणी साखळी उपोषण करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. कराडांविरोधात २० पेक्षा अधिक गुन्हे

सीटू संघटनेकडून होत असलेल्या आरोपाबाबत पोलिसांनी सांगितले, की डॉ. कराड यांच्याविरोधात हत्या, हत्येचे प्रयत्न यासारखे तब्बल २० पेक्षा अधिक गुन्हे नाशिक शहरासह ग्रामीण आणि परजिल्ह्यात दाखल आहेत. सातपूर येथील कामगारास झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर ते समोर आलेले नाहीत. चौकशी पूर्ण होईपर्यंत एखाद्या व्यक्तीचे नाव तपासाच्या यादीतून कसे वगळणार असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्याने उपस्थित केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्वच बाबी स्पष्ट होतील. मात्र, ते टाळून आंदोलने व मोर्चे काढले जात असल्याबाबत पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीसाठी रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षणासाठी मागासवर्गीय प्रवर्गातून प्रवेश घेताना २७ जुलैपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. परिणामी, समाजकल्याण विभागात अर्ज सादर करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत आहेत. विहीत मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास खुल्या प्रवर्गात प्रवेश घेण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्याच्या समाजकल्याण विभागाचे सचिव नंदकुमार वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, हे प्रमाणपत्र मिळणार का, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाशिक विभागातील अनेक पालकांनी नासर्डी पुलाजवळ असलेल्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी होत असून, ती पूर्ण करताना नाकीनऊ येत आहेत. या ठिकाणी जातपडताळणीसाठी हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी लावावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी विभागात विद्यार्थी व पालक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. फार्मास्युटिकल, आर्किटेक्चर, इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाची नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने कागदपत्रे दाखल करता येत नाहीत. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हजारो लोकांनी अर्ज केले आहेत. या कागदपत्रांची छाननी करून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. प्रमाणपत्र देणे हे जोखमीचे काम असल्याने अधिकारीदेखील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच प्रमाणपत्र देत आहेत. मात्र, अचानक पालकांचा ओघ वाढल्याने प्रमाणपत्र कसे द्यायचे, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीसंख्येच्या साठ टक्के विद्यार्थ्यांकडे जातपडताळणी प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे प्रमाणपत्र न मिळाल्यास हजारो विद्यार्थांना सर्वसाधारण गटात प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याची झळ बसणार आहे. नवीन निर्णयानुसार इंजिनीअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत जातपडताळणीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज दाखल केल्याची पावती फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जमा करावी लागेल. फार्मसीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख २२ जून देण्यात आली आहे. आर्किटेक्टसाठी २४ जून, हॉटेल मॅनेजमेंटसाठी २६ जून ही तारीख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे २७ तारखेपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्रे कशी मिळतील, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र द्या

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी राज्यातील जातपडताळणी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी अर्ज सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जातपडताळणी प्रमाणपत्र संबंधिताला देण्यात यावे, असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. जो कर्मचारी कामात कुचराई करील त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आज असलेली पेंडन्सी दुसऱ्या दिवशी संपली पाहिजे. शून्य पेंडन्सी काम करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात अवघी तीन प्रकरणे पेंडिंग असल्याने या विभागाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. येत्या तीन दिवसांत राज्यात एकही प्रकरण शिल्लक रहायला नको, असेही ते म्हणाले.

जात पडताळणी बाकी असलेली प्रकरणे

नाशिक १ हजार २००

धुळे ३ हजार

अहमदनगर ८००

जळगाव १ हजार २००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचे अनोखे रंग बनले चर्चेचे विषय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

एरव्ही खडू अन् फळा ही साधने हाताशी घेऊन विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या गुरुजींची प्रतिमा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी नव्हे ते यंदा राजकीय पक्षांनी स्वारस्य दाखविल्याने या निवडणुकीस आता अस्सल राजकारणाचे रंग चढले आहेत. मतदार म्हणून गुरुजींनाही मुरलेल्या राजकारणी उमेदवारांनी गळ घातल्याने काही गुरुजींचे अनोखे रंग आता गावोगावी चर्चेचे विषय बनले आहेत.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तशी मूळ राजकीय प्रवाहापासून दूरचीच मानली जात होती. परिणामी, या निवडणुकीत इतर निवडणुकींसारखे लक्ष्मीदर्शन, प्रलोभनांचे फास अन् मतदारांचे चोचले पुरविण्यावर कधी विशेष भर दिला जात नव्हता. पण यंदा प्रमुख राजकीय पक्षांसह तोलामोलाच्या उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने हे सगळे आजवर न टाकले गेलेले फासे मतदारांसाठी टाकले जात आहेत. परिणामी, आजवर कागदावरच सक्रिय असणाऱ्या गुरुजींच्या अर्धा शेकडा संघटना आणि त्यांचे अंतर्गत गट-तटही रात्री-बेरात्रीपर्यंत प्रचार आणि श्रमपरिहारात व्यस्त आहेत. राजकीय समीकरणांसाठी आपसांतील वैर विसरून काही पुढारी गुरुजींनी गळ्यात-गळे घातले आहेत. काही कार्यकर्ते गुरूजी दिवसभर निवडणुकीची समीकरणे सोडवित आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या गतवेळच्या निवडणुकीतही लक्ष्मीदर्शन घडले होते. यंदा मात्र हा ट्रेण्ड पारंपरिक निवडणुकांप्रमाणे जोरात आहे. विद्यार्थ्यांना नीतिमत्ता अन् संविधान शिकविणाऱ्या गुरुजींच्या तोंडीच आता गिफ्ट, पार्टी अन् लक्ष्मीदर्शनासारखे शब्द रूळत असल्याने जनसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको महाविद्यालयात वर्धापनदिनी गुणगौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध केंद्रांतील दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 'नामदार गोपाळकृष्ण गोखले : जीवन व कार्य' यावर प्रकाश पाठक यांचे भाषण झाले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, प्राचार्य एस. बी. पंडित, डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. धनेश कलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाठक म्हणाले, की ना. गोखले यांनी सरस्वतीच्या दालनात ज्ञानाचे अमृतग्रहण करून इतरांनाही आपल्या ज्ञानाचा परिपाठ दिला. गोखले यांच्या ज्ञानसाधनेचे विचार, सूत्रांचे दर्शन, मुक्ती अनेक कृतींतून दिसत होती. डॉ. गोसावी म्हणाले, की बाळासाहेब देशमुख यांच्या सहकार्यातून व प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांच्या शिक्षणाचा वसा व प्रेरणेतून नाशिकरोडमध्ये संस्थेची स्थापना झाली. संस्थेतून अनेक विद्यार्थी घडले. डॉ. दीप्ती देशपांडे म्हणाल्या, की दहावीच्या निकालात २१ पैकी ३ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर संस्थेचा एकूण निकाल ८६ टक्के लागला आहे. बारावीचा निकाल ९४ टक्के लागला असून, त्यात बीवायके व सर डॉ. मो. स. गोसावी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. डॉ. विजया धनेश्‍वर यांनी सूत्रसंचालन केले. महेश औटी यांनी आभार मानले.

विविध ग्रंथांचे प्रकाशन

वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रंथांचे प्रकाशन झाले. गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणेच देणगीदार नटवरलाल चव्हाण, विजय चव्हाण, अतुल चांडक, अमर कलंत्री, महेश कलंत्री, मोहनशेठ लाहोटी यांचा सत्कार झाला. माजी प्राचार्य एस.बी. पंडित, डॉ. एस. ए. कुलकर्णी, डॉ. एस. डी. कुलकर्णी, डॉ. एस. एस. लव्हेकर, डॉ. राम कुलकर्णी, प्रा. बी. डी. कुशारे, व्ही. व्ही. मोरजकर, बी. बी. बावधनकर, जी. पी. धोंडगे, सुरेखा पूरकर, विजय संकलेचा, राजू पत्की, विनोद दाणी, दीपाली कुलकर्णी, अजय कनकईकर यांचाही सत्कार झाला.

--

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images