Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

योग शिबिराचा गुरुवारी समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त योग विद्या गुरुकुलच्या वतीने शहराच्या विविध भागात १ जूनपासून मोफत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप गुरुवार दि. २१ जून रोजी नाशिकरोडच्या जयभवानीरोडवर असलेल्या आरोग्यधाम येथे योग साधनेने होणार आहे. समारोपाचा कार्यक्रम योग दिनी सकाळी ६ ते ७.३० यावेळेत आरोग्य धाम शेजारी असलेल्या गार्डनमध्ये होणार आहे.

या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्राणायामांचे प्रकारदेखील सादर करण्यात येतील. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.

हे शिबिर २१ ठिकाणी सुरू होते. यानंतर ज्या शिक्षकांनी ही शिबिरे घेण्यास मदत केली त्यांच्यासाठीदेखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यधामचे सुनील जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाला साधकांनी व जास्तीत जास्त नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन योग विद्याधाम व महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेळ्यांची निर्यात सुरू

$
0
0

नाशिक : ओझरहून थेट शारजाह येथे शेळ्यांची निर्यात सुरू झाली आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आयएल ७६ या कार्गो विमानाद्वारे १४२१ शेळ्यांची निर्यात करण्यात आली आहे. येत्या बकरी ईदपर्यंत ही निर्यात होणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी निर्यात होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बुधवारच्या दिल्ली विमानाद्वारे सहा टन केशर आंबे लंडनला रवाना होणार आहेत. त्याचे बुकिंग करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस नाईक राजेंद्र मोहितेंचे अपघाती निधन

$
0
0

दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलिस नाईक राजेंद्र अंबर मोहिते (वय ५०) यांचा मंगळवारी (दि. १९) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला.

जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी राजेंद्र मोहिते हे गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. ते आपली कामगिरी बजावून मध्यरात्रीच्या सुमारास शिंदखेड्याहून धुळयाकडे येताना नरडाणाजवळ बाभळे फाट्यावर मोहिते यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती समजताच त्यांनी मोहिते यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर आज, सकाळी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे. जिल्हा पोलिस दलातील मनमिळावू आणि बोलके राजेंद मोहिते उर्फ राजू यांनी पोलिस सेवेत अनेक घटनेतील आरोपींचा शोध आपल्या बोलण्याच्या शैलीतून घेतले होता. शहरात एखाद्या घटनेतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर मोहिते कर्तव्य बजावताना परिस्थिती नियंत्रणात आणत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांना अच्छे दिन

$
0
0

प्रति क्विंटलला मिळाला हजार रुपयांचा दर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशात साठवणूक केलेल्या कांदा खराब झाला. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली. लासलगाव बाजार समितीत कांद्याने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वणी बाजार समितीत सरासरीला जिल्ह्यात सर्वाधिक ११५० रुपये तर जास्तीत जास्तही १३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. इतर सर्व बाजार समितीमध्ये हजार रुपये ते ११०० रुपये असा सरासरी भाव मिळाला.

नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने कांदा साठवणुकीची व्यवस्था नसलेले शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा लिलावाला आणावा लागतो त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी कांद्याची आवक वाढली. लासलगाव, चांदवड, वणी, दिंडोरी, पिंपळगाव, निफाड, सायखेडा, उमराणा, विंचूर या ठिकाणी असलेल्या बाजार आवारात झालेल्या लिलावात बुधवारी एकूण एक लाख १५ हजार ११७ क्विंटल आवक होती. या सर्व ठिकाणी सरासरी भाव १००० रुपये इतका होता.

लासलगाव बाजार समितीत बुधवारी १६ हजार ७७५ क्विंटल दर मंगळवारपासून (दि. १९) सरासरी भावातही कांद्याने एक हजाराचा टप्पा पार केला. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त ११९१ तर सरासरी १०८० रुपये असा भाव होता.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या २७ तारखेला उच्चांकी असा उन्हाळ कांद्याला ४ हजार २५१ रुपये तर लाल कांद्याला ३ हजार ९४० रुपये मिळाला होता; मात्र त्यानंतर कांद्याचे मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने सात ते आठ महिन्यांपासून कांदा उत्पादक हा कांदा तोट्यात विकत असल्याने त्यांचे उत्पादन खर्चही निघत नव्हते.

सद्या कांदा भावात गेल्या १५ दिवसात रोज ३० रु ते २०० रुपयांची वाढ झाल्याने १००० रुपयांचा टप्पा पार केला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यात ५५० रुपयांपर्यंतच्या सरासरीने कांदा विकला आहे. दिवाळी दरम्यान तीन ते चार हजार क्विंटलचा भाव होता; त्या तुलनेत सध्या मिळणारा भाव काहीच नाही या भावात कांद्याचा खर्चही भागत नाही, अशी कांदा उत्पादकांची खंत आहे.

रोख पेमेंटमुळे आवक वाढली

गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या व्यवस्थापन मंडळाने रोख पेमेंट वाटण्याचे जाहीर केल्याने पिंपळगाव बाजार समितीत लिलावाला नेणारे निफाडच्या पूर्व भागातील कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला आणला. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरापासून तीन किमी

$
0
0

सटाणा शहरापासून तीन कि.मी. अंतरावरील मुंजवाड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने घरांवर वृक्ष कोसळून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने वाहतुक खोळंबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आफ्रिकन ‘कॅजोन’वर भारतीय तालांचे बोल

$
0
0

नाशिकच्या कल्याण पांडेचे अनोखे संशोधन

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : भारतीय शास्त्रीय संगीत हे जगात सर्वश्रेष्ठ समजले जाते. याच संगीतात बुजूर्ग कलाकारांनी अनेक प्रयोग केले आहेत. मात्र मूळ आफ्रिकन असलेल्या कॅजोन या तालवाद्यावर, भारतीय संगीताचे बोल वाजविण्याची किमया नाशिकच्या कल्याण पांडे या युवकाने केली आहे. 'कॅजोन' वाद्यावर तबल्याचे कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई यासारखे बोल वाजवून अनेक देशातील रसिकांना त्याने भुरळ घातली आहे.

कल्याण पांडे याने केलेल्या प्रयोगामुळे मूळ आफ्रिकन असलेले हे वाद्य भारतीय संगीताच्या तालांवर इतके चांगले वाजू शकते, हे आफ्रिकन संगीतकारांनाही अचंबित करणारे ठरले आहे. कल्याणच्या या अनोख्या प्रयोगामुळे त्याला देश विदेशातून बोलावणे येत असून, पंडित बिरजू महाराज, कौशिकी चक्रबर्ती, पं. सुरेशदादा तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ करण्याची संधी त्याला मिळाली आहे. स्पेन सरकारने आयोजित केलेल्या स्पेन म्युझिक फेस्टिव्हलमध्ये वादन केल्यानंतर त्याने अनेक देशांचा दौरा केला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या 'बीटहोवन' फेस्टिव्हलमध्येही तो तबला आणि कॅजोन यांचे वादन करणार आहे.

(कल्याण नेतोय वारसा पुढे...???)

संगीत ही न संपणारी कला आहे. त्यात जाकीर हुसेन यांनी विविध प्रकार सादर करून तबल्याला एक वेगळा आयाम दिला. त्यात कुठल्याही घराण्याचे बंधन ठेवले नाही. त्याप्रमाणेच सत्यजीत तळवलकर हे काम करीत असून, मलाही त्यांच्याप्रमाणे प्रयोग करायला आवडेल.

- कल्याण पांडे, कॅजोनवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तो रस्ता तूर्त सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकनाका ते सीबीएस या एकाच बाजूच्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयोग बुधवारी सकाळी शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला. परंतु, या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आल्याने तूर्तास या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत.

मेहेर सिग्नल ते सीबीएस चौक या रस्त्याला स्मार्ट करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सीबीएस ते मेहेर चौक सिग्नल याच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता स्मार्ट करावयाचा असल्याने याही रस्त्याचे खोदकाम करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन होते. यासाठी पोलिसांनी सीबीएस ते त्र्यंबक नाका हा रस्ता बंद करण्याचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ ते दुपारी १ अशा दोन तासांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार होता. त्यानुसार सकाळी ११ वाजता बॅरिकेडींगद्वारे हा रस्ता बंद करण्यात आला. त्र्यंबकनाका ते सीबीएस या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने कोंडी होऊ लागली. त्यामुळे अवघ्या तासाभरातच हा प्रयोग गुंडाळून दोन्ही रस्त्यांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. येथील एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे तूर्तास तरी शक्य नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. अजय देवरे यांनी दिली. त्यामुळे पर्यायी मार्गांचा विचार होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला कोसळली झाडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड परिसरात बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी फांद्या तुटून नुकसान झाले. नारायणबापू चौकातील गोदावरी सोसायटीत कारवर झाड पडले. तसेच शेजारी असलेला पथदीप कोसळला. जेलरोडच्या मॉडेल कॉलनी चौकात दुचाकीस्वार बचावला. दुचाकी गेल्यानंतर लगेच फांदी कोसळली. सुदैवाने जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

नाशिकरोडला साडेतीन-चारच्या सुमारास पाऊस झाला. तत्पूर्वी, वादळी वारे सुटले होते. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. बिटको चौकातील आशानगर, जेलरोड, कॅनलरोडच्या श्रमिक नगरमध्ये तसेच पंचक मलनिस्सारण केंद्र या ठिकाणी झाडे कोसळली. डीजीपीनगरमधील टागोरनगरच्या ओरिएन्ट बंगल्याजवळ आणि जेलरोडच्या सिद्धेश्वर मंदिराजवळ झाड कोसळले. जेलरोडची कोयना सोसायटी, सैलानीबाबा चौक, मॉडेल कॉलनी, जेलरोड तसेच नांदूरनाका आदी ठिकाणी फांद्या कोसळल्या. नारायणबापू चौकातील गोदावरी सोसायटीत कारवर झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने झाड हटवले. नाशिकरोड अग्निशमन दलाचे एम. एन. मधे, पी. जी. कर्ड़क, आर. के. मानकर, बी. व्ही. आहिरे, आर. आर. काळे, व्ही. के. ताजनपुरे, एस. एस. पगारे आदी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करीत होते.

जेलरोड येथे तळे

जेलरोड येथील चंपानगरीमध्ये प्रांजल बंगल्याजवळ पावसाचे पाणी साचल्याने रस्ता बंद झाला होता. चंपानगरीत महापालिकेचे गार्डन आहे. त्याच्या सुरक्षा भिंतीजवळ पाणी साचते. जोरदार पाऊस झाल्याने येथे तलाव झाला होता. येथे एका बाजूला उंच इमारत आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिका गार्डनची सुरक्षा भिंत आहे. पाणी जाण्यास जागा नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते. बुधवारच्या पावसाने येथील रस्ता बंद झाला होता. गेल्या दहा वर्षांपासून ही समस्या आहे. ती कायमची सोडवण्याची मागणी महेंद्र साळवे, तुळशीदास इंगळे, शशीकांत शिरसाठ, सुरेश भालेराव, गौतमी शिरसाठ, माया शेजवळ, मनोज खैरनार, देवीदास खैरनार, संदीप जाधव आदी रहिवाशांनी केली आहे.

सातपूरला तासभर सरी

सातपूर : परिसरात बुधवारी दुपारी पावसाने एक तासभर हजेरी लावत सातपूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सुखद अनुभव दिला. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने त्याचा नेहमीप्रमाणे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. दुपारच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे घरी जाताना हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच गोवंशांची वडाळ्यात मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी सकाळी सुटका केली. जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या संशयितालाही पोलिसांनी अटक केली आहे.

इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना वडाळागावातील मांगीरबाबा चौकातून कत्तलीसाठी जनावरे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक विकास लोंढे यांना ही माहिती देण्यात आली. सकाळी सातपासून मांगीरबाबा चौकात पोलीस कर्मचारी सानप, शेख, शिरसाट, सोनार यांनी सापळा रचला. संशयित छोटा हत्ती टेम्पोचालक सद्दाम अन्वर पाटकरी (वय २६, रा. भद्रकाली) याला अडविण्यात आले. पोलिसांनी टेम्पोचे शटर उघडले असता त्यामध्ये जिवंत तीन गाई व दोन गोऱ्हे आढळून आले. पोलिसांनी जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याची तूट अन् चिखलात बूट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ता 'स्मार्ट' करण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाच्या यातना शालेय विद्यार्थ्यांना नाहकच भोगाव्या लागत आहेत. शाळेत जाण्यासाठी व शाळेतून बाहेर पडण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी की काय म्हणून आता पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामनाही विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. पायवाटेवरुन चालताना चिखलाने जड झालेले बूट सावरत आता त्यांना घरचा रस्ता शोधावा लागत असल्याने रस्त्याच्या निर्माण झालेल्या तुटीचा त्रास कमी होता की काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

अशोकस्तंभापासून त्र्यंबक नाक्यापर्यंत स्मार्टरोडचे काम सुरू असल्याने या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना पायवाटेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या वाटेवरदेखील सर्वत्र चिखल झाला होता. यातून वाट काढता काढता विद्यार्थ्यांची दमछाक तर झालीच शिवाय, बुटाला चिकटलेला चिखल काढण्यासाठीही वेळ द्यावा लागला. केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही हे अडथळे पार करून शाळेतून ये-जा करावी लागत आहे.

\Bएम. जी. रोडवर कोंडी

\Bस्मार्ट रोडचे काम सुरू असलेल्या परिसरातील शासकीय कन्या विद्यालय, बिटको शाळा आणि कॉलेज, रत्नप्रभा वैशंपायन रात्र शाळांमध्ये सुमारे साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे हाल पाहता त्यांना शिवाजी स्टेडियमचे एम. जी. रोडवरील गेट खुले करून देण्यात आले आहे. या मार्गाने विद्यार्थी शाळेत ये-जा करू शकतात. पण एम. जी. रोडसारख्या वाहतुकीने गजबजलेल्या ठिकाणी आता विद्यार्थ्यांचीही भर पडल्याने या परिसरात आणखी कोंडी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट शेळ्यांची दुबईला निर्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथून शारजाह येथे हवाई मार्गे होणारी शेळ्यांची निर्यात सुरू झाली आहे. या शेळ्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी केली जात नसल्यामुळ‌े या शेळ्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. परिणामी, दुबईमध्ये भारताचे नाव बदनाम होणार आहे. शिवाय भारताला ब्लॅकलिस्ट केले जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने योग्य ती शहानिशा करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

समुद्रमार्गे होणारी बकऱ्यांची निर्यात पावसाळ्यात बंद राहते. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वी या स्थितीवर हवाई मार्गे निर्यातीचा पर्याय शोधण्यात आला. ओझर येथून शारजाह येथे जिवंत शेळ्यांची प्रथमच निर्यात झाली. गेली दोन वर्षे ही निर्यात यशस्वीरित्या होत आहे. मात्र, यंदा अजमेर आणि राजस्थान येथील बाजारातील आजारी शेळ्या स्वस्त दरात खरेदी केल्या जात आहेत. तसेच, त्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता या शेळ्या शारजाह रवाना होत आहेत. पावसाळा असल्याने शेळ्यांना विविधप्रकारच्या रोगांची लागण झालेली असते. शेळ्यांची रक्त तसेच शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. परिणामी, शारजाह-दुबई परिसरात निकृष्ट दर्जाच्या शेळ्यांची निर्यात होते. परिणामी, भारतीय बाजारपेठ बदनाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन या शेळ्यांची योग्य ती तपासणी करावी आणि त्यांना निरोगी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे खासदार चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नाशिकसह राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरात हत्येतील संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मेव्हण्याचा खून करून गुजरात येथील उंबरगाव (जि. बलसाड) येथील दोन संशयित फरार झाले. त्यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. या दोन्ही संशयितांना बुधवारी गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गुजरातमधून खून करून आलेल्या दोघांपैकी एक संशयित फुलेनगर परिसरात लपून बसलेला असल्याची माहिती पंचवटी पोलिस स्टेशनमधील सहाय्यक निरीक्षक रघुनाश शेगर व उपनिरीक्षक महेश इंगोले यांना मंगळवारी (दि. १९) मिळाली. त्यांनी निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली फुलेनगर परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना निर्जनस्थळी भगवान किसन पवार हा संशयित सापडला. त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा मित्र भागवत सुखलाल पवार (रा. उंबरगाव) याचा मेव्हणा बाळू जाधव याचा खून केल्याची कबुली दिली. बाळू हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून रविवारी (दि. १७) रोजी दुपारी त्याला आंब्याची वाडी येथील जंगलात नेऊन दारू पाजली आणि त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह तेथेच खड्ड्यात टाकून ते फरार झाल्याचे त्याने सांगितले.

दुसरा फरारी भागवत पवार हा गुजरातवरून रेल्वेने नाशिकला येत असल्याची माहिती भगवान पवार याने पोलिसांना दिली. या माहितीनुसार पंचवटीतील पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ, गुन्हे शोध पथकाचे विलास बस्ते आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड परिसरात सापळा रचून भागवत पवार याला ताब्यात घेतले. हे दोन्ही संशयित आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर त्यांची उंबरगाव पोलिस स्टेशनमध्ये कळविण्यात आली. तेथील पथक पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आले. त्यांनी त्या दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन ते रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार

$
0
0

सप्तशृंग गडावरील जलस्त्रोतांचा प्रश्न बिकट

म. टा. वृत्तसेवा, कळवण

स्वच्छता सर्वेक्षणात सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीचे सदस्य सचिव तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेलकंदे यांनी गडावरील सर्व ११ स्रोतांची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याच्या स्रोत जर व्यावसायीकांमुळे दूषित होत असतील तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा त्यांना दिला.

शेलकंदे यांनी तालुका पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समिती, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व सरपंच यांची संयुक्तीक बैठक घेवून फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. गेल्या आठवड्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलकंदे यांच्या आदेशान्वये कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, डॉ. सुधीर पाटील यांनी गडावरील सर्व जलस्रोतांची पाहणी केली होती. त्यांना काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यातील काही त्रुटी ग्रामपंचायतीने दूर केल्याने शेलकंदे यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित त्रुटी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन उपसरपंच राजेश गवळी, ग्रामसेवक रातीलाल जाधव यांनी दिले. तसेच जर कोणी जलस्त्रोत दूषित करतांना सापडला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाना गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. गडावरील सर्व जलस्रोतांचे फेर सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल आठ दिवसात द्या, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य, कर्मचारी यांना टीसीएलचे प्रमाणाबाबत सूचना देवून तत्काळ नियोजन करण्यास सांगितले. पुन्हा ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.

गउावरील स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायत व सप्तशृंगी ट्रस्टच्या माध्यमातून नाशिक येथील अस्तित्व संस्थेला दरमहा पाच लाख रुपये दिले जातात. मात्र त्याचा फारसा फायदा होत नसल्यचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळील परिसरही 'अस्तित्व'ने स्वच्छ करायला हवा. --- राजेश गवळी, उपसरपंच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणकेश्वर मंदिरावर वीज कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील झोडगे येथे बुधवारी पावसाने हुलकावणी दिली असली तरी येथील ऐतिहासिक माणकेश्वर हेमाडपंती मंदिरावर वीज कोसळल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे. यामुळे गावातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या झोडगेकरांना विजेचे भयंकर रूप पाहायला मिळाले. सायंकाळी अचानक विजेचा मोठा कडकडाट झाल्याने क्षणभर हादरून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. विजेचा कडकडाट इतका भयानक होता की त्या हादऱ्याने मंदिराच्या कळसाकडील तकलादू झालेला दगडांचा काही भाग खाली कोसळा. मंदिरातील वीजप्रवाह खंडित होऊन मीटर जळाले. सायंकाळी हेमाडपंती मंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थ गेले असता हा प्रकार समोर आला. तसेच गावातील माणकेश्वरनगरमधील काही घरातील टीव्ही देखील जळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मंदिरावर वीज पडल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

कोठुरेला जोरदार पाउस

तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी मात्र बागलाणसीमेवरील वडनेर-कोठुरे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरा झालेल्या या पावसाने परिसरातील नाले पाण्याने भरून वाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांचे नुकसान केल्यास कारवाई’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बियाणे, दर्जा नसलेली बियाणे तसेच खते व कीटकनाशक छापीलपेक्षा अधिक किमतीत विक्री होत असल्यास भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी कोणतीही कृती केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक बुधवारी रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महाबीजचे प्रतिनिधी, विविध कंपनीचे प्रतिनिधी यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील कृषी निविष्ठाची मागणी, पुरवठा, दर्जा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनीदेखील यावेळी खरीप हंगामात करावयाच्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगावर वीज पडल्याने सिन्नरमध्ये दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज कोसळून सिन्नर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. मिठसागरे व हिवरगाव येथे या घटना घडल्या. तसेच, झोडगे (ता. मालेगाव) येथे वीज कोसळून हेमाडपंती मंदिराचे नुकसान झाले.

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मिठसागरे या गावातील तरुण प्रवीण गणपत कासार (वय २५) याच्यावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. घरासमोरील साचलेले पाणी काढण्यासाठी प्रवीण बाहेर गेला असता, त्याच्यावर वीज कोसळली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. दुसरी घटना हिवरगाव येथे घडली. येथील संजय विठोबा पोमणर (वय २६) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच बारगाव पिंप्री येथे एका म्हशीचाही विजेमुळे मृत्यू झाला.

झोडगे (ता. मालेगाव) येथे बुधवारी पावसाने हुलकावणी दिली असली तरी वीज पडल्याची घटना घडली. यामुळे येथील ऐतिहासिक माणकेश्वर हेमाडपंती मंदिराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

- सविस्तर वृत्त....?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्लिश पाठिराख्यांना रशिया सुखद

$
0
0

यजमानांनी ठेवली जुनी भांडणे बाजुला

वृत्तसंस्था, व्होलगोग्रॅड (रशिया)

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंग्लंडच्या वर्ल्डकप सलामीच्या लढतीमुळे चाहत्यांमध्ये मागे रंगलेल्या द्वंद्वाची कटू आठवण ताजी झाली. मात्र हॅरी केनने ज्यादा वेळेत गोल केल्याने इंग्लंडने ट्युनिशियावर मात केली अन् चाहते सुखावले. रशिया आणि इंग्लंडमधील फुटबॉल संबंध सहाजिकच सुखद नाही. त्यात इंग्लंडमधील लंडन आणि रशियाच्या मॉस्कोमध्ये छत्तीसचा आकडा आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या पाठिराख्यांना मायदेशातून सावधगिरीचा इशारा देत रशियात जाण्यापासून रोखले जात होते. मात्र प्रत्यक्ष रशियात वेगळेच चित्र अनुभवायला मिळत आहे. 'तुम्ही रशियाला जाऊ नका, कारण तुम्ही इंग्लंडला जीवंत परतण्याची शक्यता कमीच आहे', अशा शब्दात इंग्लिश पाठिराख्यांना मायदेशी ताकीद मिळाली होती. रशियाने मात्र जुनी भांडणे आणि वाद किमान वर्ल्डकपपुरता बाजुला ठेवण्याचा विचार केला आहे.

लंडनचा रहिवासी जोनाथन फिलिप्स वर्ल्डकप बघण्यासाठी रशियात दाखल झाला आहे. तो म्हणतो, 'इथे रशियन शहरांमधील रस्त्यांवरून फिरताना सुरुवातीला धाकदूक होती. मात्र अनुभव वेगळाच आला. आमचे खुल्यादिलाने स्वागत करण्यात आले. मी जेव्हा वर्ल्डकप इथे रशियात येऊन बघायचे ठरवले तेव्हा मला इंग्लंडमधील लोकांनी जाण्यापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला'. रशियातील सूसंवाद पाहून आता जोनाथन उघड इंग्लंडचा झेंडा अंगावर घेऊन फिरतो आहे. लंडनलाच राहणाऱ्या २८ वर्षीय उझी अलाननेही जोनाथन यांची री ओढली. 'रशियन खरोखरच भन्नाट आहेत. त्यांच्याकडे फुटबॉलची संस्कृती आहे', असे तो म्हणाला.

मद्यप्राशनाचा फटका

जोनाथन व उझी यांची स्वतःची वागणूकही उत्तम असल्याने रशियात त्यांचे प्रेमाने स्वागत झाले; पण व्होगलोगोगार्ड येथे दोन इंग्लंड समर्थक मद्यपान करून ट्रेनने प्रवास करत असल्याचे आढळले. यामुळे त्यांना प्रवासातून मध्येच उतरवरण्यात आले अन् त्यांना थोडाफार दंडदेखील झाला. रशियन पोलिसांच्या सांगण्यानुसार या दोघांपैकी एकाला मद्याच्या नशेत दुखापतही झाली होती. ट्रेनमध्ये त्याचा हात कापला गेला, ज्यामुळे त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये नेले.

इंग्लिश उपस्थिती कमी!

इंग्लंड-ट्युनिशिया सामन्याला इंग्लंडच्या पाठिराख्यांची संख्या कमीच होती. आकडेवारीवर नजर टाकल्यास इंग्लंडच्या पाठिराख्यांनी खरेदी केलेल्या तिकिटांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती, असे इंग्लंड फुटबॉल सपोर्टर फेडरेशनकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस कमी, हाल जास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बहुतांश भागात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडविली. शहरात विविध भागांत १७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरावर ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेसावध नागरिकांची त्रेधा उडाली. शहरात पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूरसह मध्यवर्ती भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली. झाडे उन्मळून पडल्याच्या तसेच फांद्या तुटून पडल्याच्या १७ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. या फांद्या हटविण्याचे काम अग्निशमनच्या जवानांकडून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

दिवसभरात २६.४ मिमी पाऊस

शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांमध्ये २६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणक्षेत्रात अवघ्या अर्ध्या तासात सुमारे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बुधवार बाजारातील व्यापाऱ्यांचे हाल

गोदाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. बाजारातील व्यावसायिकांची पावसाने धांदल उडाली. वादळामुळे पथारीवाल्यांचे कागदी तसेच कापडी शेड उडून गेले. त्यामुळे आवरासावर करताना व्यावसायिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गितेंच्या गांधिगिरीने ग्रामसेवक खजिल

$
0
0

घरकुलांचे काम अपूर्ण ठेवणाऱ्यांचा गुलाब फुल देऊन पाहुणचार

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा अधिकारी व कर्मचारी यांनी धसका घेतलेला असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाईबरोबरच गांधीगिरी सुरू केली आहे. बुधवारी डॉ. गिते यांनी घरकुलाचे काम असमाधानकारक असलेल्या ४५ ग्रामसेवकांना आपल्या कक्षात बोलावून स्वत: चहा व गुलाबपुष्प देत त्यांचे आदरातिथ्य केले. तसेच, ग्रामसेवकांसमोर हात जोडत काम पूर्ण करण्याची विनंती केली.

डॉ. गिते यांच्या या अनपेक्षित पाहुणचाराने ग्रामसेवक चांगलेच खजिल झाले. मी कुणाचे नुकसान करण्यासाठी काम करीत नसून, आपल्या हातून एखाद्याच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असेल तर त्यासारखे पुण्याचे काम नाही. त्यामुळे सर्व ग्रामसेवकांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत चांगले काम करून देशात १०६ क्रमांक मिळविला आहे. मात्र सन २०१६-१७ पासून अनेक घरकुल अपूर्ण आहेत. याबाबत वारंवार आढावा घेऊन, सूचना देऊनही संबंधित ग्रामसेवकांच्या कामात सुधारणा होत नसल्याने डॉ. गिते यांनी गांधीगिरीच्या मार्गाने त्यांना कामास लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त घरकुल शिल्लक असलेल्या ४५ ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेत आमंत्रित केले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपला आढावा घेतील व कार्यवाही करतील, अशी भीती मनात घेऊन आलेल्या ग्रामसेवकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. डॉ. गिते यांनी सर्व ग्रामसेवकांना गुलाबाचे फुल व चहा देत काम कमी असल्याबाबत त्यांच्या जागेवर जाऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, बाबा देसले आदी उपस्थित होते.

यापुढेही करणार पाहुणचार

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कृतीने खजिल झालेल्या ग्रामसेवकांनी घरकुल कधी पूर्ण करणार याबाबत लेखी लिहून दिले. यापुढेही कोणत्याही योजनेत कमी काम असलेल्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचा पाहुणचार करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय प्रवेश होणार सोपा!

$
0
0

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अॅपची निर्मिती

vijay.mahale@timesgroup.com

Tweet : vijay.mahaleMT

नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या आजच्या तरुणाईला हाताळण्यास अतिशय सोपे असलेले हे अॅप लाभदायी ठरणार आहे.

आयटीआय प्रवेशाच्या वेळी सर्व्हर डाउन होणे, फॉर्म डाउनलोड न होणे, वेबसाइट ओपन न होणे, अॅडमिशन फॉर्म अपडेट करण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही यश न येणे, असे एक ना अनेक अनुभव गेल्या दोन वर्षांपासून इच्छुक विद्यार्थ्यांना येत होते. त्यावर वेळोवेळी मात करण्याचा प्रयत्न करूनही परिस्थितीमध्ये बदल घडत नव्हते. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या तांत्रिक अडचणींवर मात करताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचीही पुरती दमछाक झाली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेशाच्या वेळापत्रकात वारंवार बदल करावा लागला. गेल्या वर्षी तर ऑगस्ट महिना उलटून गेल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया सुरूच ठेवावी लागली होती. आता ही गैरसोय दूर करण्यासाठी 'महा आयटीआय' या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप बुधवारीच लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपमुळे विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सायबर कॅफेमध्ये धाव घेण्याची गरज राहणार नाही. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण आली तर ती दूर करण्यासाठी या अॅपवर हेल्पलाइन व टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. तसेच तक्रार निवारणासाठी इमेलही दिलेला आहे.

काय आहे अॅपमध्ये?

प्रवेशासाठी dvet च्या वेबसाइटवरून लॉगइन करता येईल

प्रवेशासाठी ट्रेडनुसार उपलब्ध आयटीआय शोधणे

अॅपद्वारे अॅडमिशनचे स्टेटस तपासता येईल

ऑप्शन फॉम सबमिट करता येतील

मेरिट लिस्टमध्ये नाव शोधणे

अॅप्लिकेश फॉर्म डाउनलोड करणे

अॅडमिशन कर्न्फरमेशन स्लिप मिळविणे

आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी 'डीव्हीइटी'च्या पुढाकाराने मोबाइल अॅप लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल तसेच प्रवेशप्रक्रिया सोपी होऊ शकेल.

- योगेश पाटील, सहसंचालक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images