Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सचिन सूर्यवंशी हजर हो!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील बोगस नोकरभरती प्रकरणी फसवणूक झालेल्यांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून या प्रकरणीतील दोषींवर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शिपाई सचिन सूर्यवंशी बेपत्ता असल्याने त्यास कामावर हजर होण्याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शिपायाने बेरोजगारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभागात कार्यरत असलेल्या सचिन जिभाऊ सूर्यवंशी या शिपायाने पालिकेतील कनिष्ठ अभियंता, लेखापाल, लिपिक, शिपाई अशा विविध पदांवर नियुक्तीचे पत्र ३५ जणांची फसवणूक केल्याचे सोमवारी (६ ऑगस्ट) उघड झाले होते. सूर्यवंशी गेल्या ७ जुलैपासून बेपत्ता असून, कामावर हजर झालेला नाही. मंगळवारी पालिकेतील अधिकाऱ्यांनी सूर्यवंशीच्या घरी जावून त्यास आयुक्तांसमोर हजर केले होते. परंतु तोपर्यंत फसवणूक झालेल्यांकडून लेखी स्वरूपात तक्रारी प्राप्त न झाल्याने सूर्यवंशीवर कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली गेली नव्हती. बुधवारी फसवणूक झालेल्या आठ ते नऊ जणांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार नोंदविल्यानंतर सूर्यवंशीविरोधात चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तूर्त सूर्यवंशी कामावर हजर नसल्यामुळे त्याला आधी कामावर हजर होण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटी हब’साठी पुन्हा हालचाली

0
0

'आयटी हब'साठी पुन्हा हालचाली

उद्योजकांच्या बैठकीत आयटी कंपन्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा डिफेन्स हबचा प्रकल्प नागपूला पळवल्याचा संताप असतानाच उद्योजकांनी 'आयटी हब' नाशिकला व्हावा, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेवून याविषयावर चर्चा केली. आयटी हबसाठी लागणारे अनेक अडथळे आता दूर झाले असून, त्यामुळे नव्याने त्यासाठी प्रयत्न करुन आयटी कंपन्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, निमाचे माजी अध्यक्ष धनजंय बेळे, आयटी उद्योगातील रोहण देशपांडे, अविनाश आव्हाड, मंगेश भणगे, रोहीत कुलकर्णी, अमित शुक्ला यासह आयटी क्षेत्रात काम करणारे उद्योजक उपस्थित होते. या बैठकीत आठ दिवसात या उद्योगात असलेल्या उद्योजकांची बैठक घेवून त्यात या प्रकल्पाला कशी चालना मिळेल याबाबत चर्चा करुन 'अॅक्शन प्लॅन' तयार करण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये 'आयटी नेक्स्ट एक्झिबिशन' घेण्याच्या सूचना यावेळी खासदार गोडसे यांनी केल्या.

आयटी पार्कलाही चालना

आयटी पार्कच्या बिल्डिंगमधील गाळ्यांचे भाडे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, १६ ते १८ रुपये भाडे आकारण्याचे ठरले आहे. त्यानंतर या बिल्डिंगची दुरुस्ती करुन येथे सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. या पार्कमध्ये एका छताखाली उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करु असेही सांगण्यात आले.

अडथळे दूर

आयटी कंपन्या ब्रॉड बॅण्डचा स्पीड मिळत नाही, एअर कनेक्टीव्हीटी नाही, क्लॉलिटी ऑफ पॉवर यासारख्या गोष्टीबाबत तक्रारी करत होते. पण, आता यातील बहुतांश प्रश्न सुटले आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांनी नाशिकला यावे यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे त्यासाठी त्यांना मदत केली जाईल, असेही गोडसे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा जलसमाधी घेऊ!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आरक्षण मान्य केले असून, भाजप सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. हे आंदोलन स्वातंत्र्य दिनापर्यंत लागू करावे, अन्यथा या दिवशी गोदावरी नदीत जलसमाधी घेऊ, असा इशारा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटल्यानुसार, आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात मुस्लीम आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात २०१४ मध्ये मुस्लीम समाजाचे शैक्षणिक आरक्षण मान्य केले. परंतु भाजप सरकारने ते अद्याप दिलेले नाही. चार वर्षांपासून आमची संघटना महाराष्ट्रात आरक्षणासाठी पाठपुरावा करीत आहे. राज्यात १८ मोर्चे काढण्यात आले तसेच अनेकदा धरणे आंदोलने केली आहेत. परंतु कायदेशीर मार्गाने मिळालेले हे आरक्षण देण्यास भाजप सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी हे आरक्षण लागू करावे आणि मुस्लिम समाजामध्ये निर्माण होणारा असंतोष शांत करावा, अशी मागणी समितीने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास स्वातंत्र्य दिनी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजीज पठाण यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळवे यांच्या कार्याचा गौरव

0
0

नाशिक : विभागीय आयुक्तालयातील अपिल शाखेमधील अव्वल कारकून के. के. गुळवे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. १ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०१८ या महसूली वर्षात त्यांनी आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलमुळेच ‘एचएल’ बंद पडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राफेर करारारामुळे नाशिकच्या विमान बनवणाऱ्या ओझर येथील एचएल कंपनीचे काम बंद पडेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात व्यक्त केली. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या खासगीकरणाला विरोध दर्शवला. ओझरच्या एचएलमध्ये सुखोई विमान बनविण्याचे काम याअगोदर बंद झाले आहे. येथे आता सुखोई विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे चव्हाण यांनी व्यक्त केलेली भीती नाशिकला धक्कादायक ठरणार आहे.

ज्योती बुक स्टोअर्स व शंकराचार्य न्याय या संस्थतर्फे सुरू असलेल्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात चव्हाण यांची मुलाखत रविवारी आमदार हेमंत टकले यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. या कार्यक्रमात चव्हाण यांच्या बालपणापासून तर मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तीन टप्प्यात उलगडत नेण्यात आला. त्याला चव्हाण यांनी दिलखुलास उत्तर देत हा प्रवास रंजक पध्दतीने रंगवत नेला. यावेळी त्यांनी इंदूर येथे माझा जन्म झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वडील अनंतराव चव्हाण एलएलएम झाल्यानंतर त्यांना इंदूरमध्ये घटना लिहिण्याचे काम कसे मिळाले. त्यांचे लग्न कसे झाले, हा प्रवास सांगितला. त्यानंतर कराडच्या मराठी शाळेत पहिल्यांदा गेल्यानंतरचा अनुभवही कथन केला. या शाळेत मी पहिल्या दिवशी बाबा सूट व कॅनव्हान्सचे बुट घालून गेलो. त्यामुळे हा कोणत्या प्रांतातून आला अशा नजरेने सर्वांनी बघितले. कारण त्या शाळेत मुलांच्या पायात चपलाच नव्हत्या. त्यानंतर मी येथे रुळलो व पाचवीपर्यंत चपलाच घातल्या नाही, असा अनुभवही सांगितला. वडील दिल्लीत खासदार असताना सातवीचे शिक्षण दिल्लीत घेण्याचा निर्णय घेतला. पण, मराठी शिवाय दुसरी भाषाच येत नसल्यामुळे अदबीने सर्व शाळांनी वडिलांना नकार दिला. त्यामुळे दिल्लीतील नूतन मराठी शाळेत प्रवेश मिळाला. पण, येथेही मराठीत काहीच नव्हते. त्यामुळे पुढे शिक्षण घेण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. पण, वर्षभरानंतर मी यशस्वी झालो. त्यानंतर इंजिनीअर झालो. जर्मन व अमेरिकेत शिक्षण घेतले, असेही त्यांनी सांगितले.

राजकारण येण्याची इच्छा नव्हती. पण, घरातील वातावरणामुळे त्यात आलो. त्यानंतर कराडमधून खासदार झालो. नंतर मंत्रीपदही मिळाले. पीएमओसारखे महत्त्वाचे खाते मिळाले व त्यातून खूप काही शिकायला मिळाले. यानंतर वेगवेगळ्या जबाबदारी आल्याचे त्यांनी सांगितले. यातून मला मुख्यमंत्रीपदावर अचानक पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कम्प्युटरमध्ये मराठी

कम्युपटरचा जन्म झाल्याचा साक्षीदार मी अमेरिकेत होतो. पण, दिल्लीत आल्यानंतर मराठी फॉन्ट कम्प्युटरमध्ये यावे, यासाठी प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले. त्यात माझा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

रात्री तीनला खासदारकीचे तिकीट!

लोकसभा निवडणुकीत कराडमधून राजीव गांधी उभे राहणार होते. त्यामुळे अखेरपर्यंत या जागेवर निर्णय झाला नाही. पण, ही जागा लढवण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर राजीव गांधीचा रात्री ३ वाजता फोन आला. त्यावेळेस आम्ही पुणे येथे होतो. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी या जागेसाठी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत मी विजयी झालो व पहिल्यांदा खासदार झालो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुविचार’चे आज वितरण

0
0

'सुविचार'चे आज वितरण

नाशिक : सुविचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज, सोमवार १३ ऑगस्ट रोजी येथील रावसाहेब थोरात सभागृहात सांयकाळी ५ वाजता होणार आहे. यात अभिनेते स्वप्निल जोशी व अभिजित खांडकेकर, डॉ. रविंद्र सपकाळ, दिपक बागड, डॉ. आशुतोष साहु, विश्वास ठाकूर, माया सोनवणे, डॉ. विनोद गोरवाडकर यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणं तहानलेलीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणं तहानलेली आहेत. जिल्ह्यात आठ धरणं निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात २४ धरणे असून, ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. आजमितीस धरणांमध्ये ४१ हजार १९२ मिलीमीटर म्हणजेच ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने येथील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आळंदी धरणातील पाणी साठा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून, परतीचाही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गही करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती पालखेड धरण समूहामधील देखील आहे. इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने दारणा, भावली या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरण समूहात ७६ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. भावली, नांदुर मध्यमेश्वर ही धरणे १०० टक्के भरली असली तरी पालखेड, तिसगाव, मुकणे ही धरणे निम्मी देखील भरू शकलेली नाहीत. गिरणा खोऱ्याकडेही पावसाने पाठ फिरविली आहे. गिरणा, पुनद, माणिकपुंज आणि नागासाक्या या धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

धरण उपलब्ध पाणीसाठा (टक्के)

गंगापूर ८२

काश्यपी ९१

गौतमी गोदावरी ८१

आळंदी १००

पालखेड २०

करंजवण ८९

वाघाड ९४

ओझरखेड ५३

पुणेगाव ७४

तिसगाव २२

दारणा ९२

भावली १००

मुकणे ५०

वालदेवी १००

कडवा ७८

नांदूर मध्यमेश्वर १००

भोजापूर ३३

चणकापूर ६६

हरणबारी १००

केळझर ८१

नागासाक्या ०

गिरणा २९

पूनद ४७

माणिकपुंज ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य टेबल टेनिसमध्ये तनिषाला विजेतेपद

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ज्युनीयर, सबज्युनीयर, कॅडेट आणि मिडजेट या चारही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये सब ज्युनीयर मुलींच्या गटात नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि तीया वाघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात तनिषाने ४-२ असा फरकाने विजेतेपद पटकावले.

मिडजेट मुलांच्या गटात चौथा मानांकित परभणीचा वरद लोहट आणि पुण्याच्या चवथा मानांकित अभिराज सकपाळ यांच्यातील सामन्यात वरद लोहाटने विजेतेपद पटकावले. मिडजेट मुलींमध्ये दुसरे मानांकित नभा किरकोले (पुणे) आणि प्रथम मानांकित अकोल्याच्या रिया कोठारी यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेल्या निर्णायक गेममध्ये नभा किरकोलेने संयमाने खेळ करून विजेतेपदावर आपले नाव पक्के केले.

कॅडेट मुलांच्या गटात अक्षत जैन (मुंबई उपनगर) आणि नील मुळे (पुणे) यांच्यात सामना रंगला. अक्षतने ४-२ अशी लढत जिंकून विजेतेपद मिळविले.

मुलीमध्ये केईशा झवेरी (मुंबई शहर) आणि सना डिसुझा (मुंबई उपनगर ) यांच्यात झालेल्या सामन्यात सनाने विजय मिळविला.

सबज्युनियर मुलांच्या गटात मुंबय उपनगरच्या हार्वेश असराणी, मनुश्री पाटील, रेगन अल्बुकर्क विजय पटकावला.

स्पर्धेच्या पारितोषिक समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आमदार हेमंत टकले, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल प्रकाश तुळपुळे, मानद सचिव यतीन टिपणीस, राधेश्याम मुंदडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील शिवमंदिरे सजली

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील सोमेश्वर, कपालेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांप्रमाणेच गोदापात्रातील अनेक दुर्लक्षित शिवमंदिरांतही सजावट करण्यात आली आहे.

रामकुंड परिसरात लहान-मोठी अनेक सुंदर मंदिरे जुन्या दगडी बांधकामातील आहेत. त्यात उघड्यावरील शिवलिंगांची संख्याही खूप आहे. रामकुंडाच्या उत्तरेला तांब्यापासून बनविलेले बाणेश्वर शिवलिंग आहे. रामकुंड आणि लक्ष्मण कुंडाच्या मधल्या प्रवाहाजवळ कर्पूरेश्वर महादेव हे मोठे तर त्यागेश्वर महादेव हे छोटे मंदिर आहे. गांधीच्या दक्षिणेला आणि रामकुंडाच्या पुर्वेला दोन छोटी शिवमंदिरे आहेत. गांधी तलावाच्या पूर्वेला सिद्धपाताळेश्वर महादेव मंदिर आहे. यशवंतराव महाराज पटांगणाच्या दक्षिणेला नीलकंठेश्वर हे मोठे मंदिर दगडी बांधकामातील आहे. या मंदिराच्या उत्तरेला दोन छोटी पण आकर्षक अशी मंदिरे असून त्यात दगडी शिवलिंग आहेत. तर दक्षिणेला उघड्यावर मोठे शिवलिंग आहेत.

रामसेतूपूलालगत तारकेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या उत्तरेला उंच चबुतऱ्यावर शिवलिंग स्थापित करण्यात आलेले आहेत. रोकडोबा मैदानालगतच्या गोदापात्रात मुक्तेश्वर महादेवाचे शिवलिंग उघड्यावर आहे. गोदावरीच्या पात्राच्या पूर्वेला प्रसिद्ध नारोशंकर महादेव मंदिर आहे. अहिल्यादेवी मैदानावर विश्वेश्वर महादेव मंदिर हे दगडी बांधकामातील मोठे मंदिर आहे. रामकुंडाच्या पूर्वेला अर्धनारी नटेश्वराची सुबक मूर्ती असलेले मंदिर आहे. टाळकुटेश्वर पुलाजवळील टाळकुटेश्वर महादेव आणि रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर महादेव ही मंदिरे गोदापात्रातील आहेत.

भाविकांची मांदियाळी

पंचवटी : श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस हा रविवार असल्याने पंचवटी परिसरात पहिल्याच दिवस भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. रामकुंडात स्नान आणि परिसरातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने भक्तीमय वातावरण तयार झाले. रामकुंड पार्किंग, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण आणि भाजीबाजार पटांगण भाविकांच्या वाहनांनी भरून गेले होते. ऑगस्ट महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार या सलग दोन सुट्या आल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी पंचवटी परिसरात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक, रुद्रा, रचना व शिवशक्ती अंतिम फेरीत

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर-किशोरी आमदार चषक अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या किशोर गटात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ व रुद्रा क्रीडा मंडळ, ब्राह्मणवाडे तर किशोरी गटात रचना स्पोर्ट्स क्लब, नाशिक व शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ ऑगस्ट दरम्यान मनमाड नगरपालिकेच्या महर्षि वाल्मिकी क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत किशोरांच्या ५४ संघांनी तर किशोरींच्या १४ संघांनी सहभाग घेतला. किशोरांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनमाडच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाने सोनू निकम, हरिष केकान व दर्शन बारे यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर कै. उत्तमराव ढिकले संघाचा ३६ विरुद्ध ३१ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रुद्र क्रीडा मंडळ ब्राह्मणवाडे या संघाने जय बजरंग, शिंगवे या संघाचा ५२ विरूध ४४ गुणांनी पराभव करून पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. किशोरी गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे शिवशक्ती आडगाव या संघाने राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा लभडे, अंकिता जाधव यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर श्री साई स्पोर्ट्स क्लब नवीन नाशिकचा २७ विरुद्ध ५ असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रचना स्पोर्ट्स क्लब नाशिकने क्रीडा प्रबोधिनी नाशिकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षांची पालवी औट घटकेची

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची विद्यमान कार्यकारिणी २०१९ पर्यंत कार्यरत असून, नवीन घटनेनुसार त्यानंतर काम होणार आहे. नवीन सदस्य नेमण्याचा अधिकार कार्यकारिणीला असून, सर्वसंमतीने ते नेमण्यात येतील असे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत चार जणांची नेमणूक होणार या मुख्य आकर्षणाच्या विषयाला कलाटणी मिळाली आणि अनेकांच्या पल्लवीत झालेल्या आशा क्षणार्धात मावळल्या.

कालिदास कलामंदिरात नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास नकार देण्यात आल्याने शनिवारी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये ही सभा झाली. यावेळी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सचिन शिंदे, सुरेश गायधनी, प्रकाश साळवे, रवींद्र ढवळे, आदिती मोराणकर, मुकुंद गायधनी यांची उपस्थिती होती.

सायंकाळी ५ वाजता नाट्य परिषदेची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, पुरेशा गणसंख्येअभावी ही सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर प्रारंभी ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर तसेच इतर दिवंगतांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 'देवबाभळी', 'मून विदाऊट स्काय' नाटकांना पारितोषिके तसेच डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी, दत्ता पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मागील इतिवृत्ताचे वाचन मुकुंद गायधनी यांनी केले. तसेच वार्षिक अहवाल वाचन अदिती मोराणकर यांनी केले. वार्षिक हिशेब तसेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. सुयोग कदम यांची सनदी लेखापाल म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १५ जणांची कार्यकारिणी कार्यरत राहणार असून कार्यकारिणीवर चारजण घेण्याबाबत अध्यक्ष कदम यांनी काही निकष सांगितले. कार्यकारिणीतील सदस्यांच्या संमतीने सर्वानुमते ही चार जण घेण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. नाट्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खडाजंगी होणार, अशा आशयाची चर्चा सांस्कृतिक वर्तुळात असल्याने सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावणमासानिमित्त पंचवटीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील काही रस्ते दर सोमवारी तसेच शनिवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतुकीला व्यत्यय येऊ नये म्हणून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या श्रावण मासाची सुरुवात रविवारपासून (दि.१२) झाली आहे. श्रावण मासादरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंचवटीत भाविकांची झुंबड उडते. कपालेश्वर, काळाराम मंदिर, रामकुंडासह गंगाघाटावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या भागात गर्दी वाढली की त्याचा थेट परिणाम कपालेश्वर तसेच रामकुंड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर होतो. वाहतूक कोंडीमुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने सदर ठिकाणी दर शनिवारी आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन आखले आहे. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता, खांदवे सभागृहाकडून कपालेश्वराकडे येणारा रस्ता आणि सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर ही बंदी घालण्यात येणार आहे. श्रावणातील सर्व सोमवारी आणि शनिवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. वाहनांची संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळासाठी धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता

0
0

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचा सल्ला

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुद्धिबळ खेळात प्रगती करायची असेल तर जीव तोडून मेहनत करणे आवश्यक असते. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास देखील तितकाच महत्त्वाचा असतो. ज्या खेळाडूंना खेळात करियर करायचे आहे, अशा खेळाडूंनी धाडसी निर्णय घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे पहिले ग्रॅँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी केले.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या क्रीडा प्रशिक्षकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. गंगपूर रोडवरील अर्थव मंगल कार्यालयात रविवारी हा सोहळा झाला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, माजी अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते. प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक शहरातील विविध खेळांच्या ११ प्रशिक्षकांचा सत्कार ठिपसे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठिपसे पुढे म्हणाले, जिंकण्यापेक्षा खेळाडूला पराभवातून जास्त शिकायला मिळते. पराभवातून खचून न जाता जास्तीत जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. आमच्या काळात मार्गदर्शन नव्हते. तुम्हाला चांगले प्रशिक्षक लाभले आहेत. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. पालकांना उद्देशून ते म्हणाले, पालकांनी आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज आहे. पालकांनी मुलगा प्रशिक्षकाच्या ताब्यात दिल्यानंतर कामात हस्तक्षेप करायला नको. मुलांना स्वतंत्र विचार करण्याची सवय लावली पाहिजे.

रवींद्र नाईक म्हणाले, नाशिक शहरात खेळाला चांगले वातावरण आहे. पूर्वी ठराविक खेळांकडे लक्ष केंद्रीत केले जात होते. आता तसे राहिले नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असल्याचे सांगितले.

संघटनेच्यावतीने ५० विद्यार्थी दत्तक

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने शहरातील शाळांचे ५० विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. त्यांना तीन वर्ष बुद्धिबळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कृतीबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

यांचा झाला गौरव

मोनाली गोऱ्हे, मंदार देशमुख, यशवंत जाधव, संदीप शिंदे, प्रबोधन डोणगावकर, राजीव जोशी, मकरंद देव, प्रकाश फडके, मकरंद ओक, प्रवीण व्यवहारे, राजेद्र निंबाळते.

या शाळांचाही सन्मान

माध्यमिक विद्यालय उंटवाडी, फ्रावशी अकॅडमी, विस्डम हाय स्कूल, जेम्स इंग्लिश मीडियम, इस्पॅलियर स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल, सीडीओ मेरी हायस्कूल, सिम्बॉयसिस हायस्कूल, वाय. डी. बिटको हायस्कूल, डी. डी. बिटको हायस्कूल, के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूल, अशोका स्कूल चांदसी, काकासाहेब, किशोर सूर्यवंशी स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर, रचना हायस्कूल, मॉडर्न स्कूल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राँगसाईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील समृद्धी हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी सागर तुकाराम चंदनशिव (रा. उगले सदन, दत्तनगर, पेठरोड) यांनी तक्रार दिली आहे.

चंदनशीव हे गुरूवारी (दि. ९) रात्री आपल्या बहीण व पुतणीसह दुचाकीवरून (एमएच १५ एफझेड ६००४) जात असताना, त्यांना समोरून राँगसाईडने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात तिघे जखमी झाले असून, संशयित दुचाकीस्वार फरार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन दुचाकी लंपास

शहरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या प्रकरणी मुंबई नाका तसेच पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. हेमंत रघुनाथ चव्हाण (रा. कालिकानगर, अमृतधाम, पंचवटी) यांची ३० हजार रुपयांची दुचाकी (एमएच ४१ एसी ९६२१) शनिवारी, ४ ऑगस्ट रोजी चोरी झाली. चव्हाण राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संजय गुलाब पाटील (रा. शताब्दी हॉस्पिटल) यांची २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १८ एएफ ४८०४) कमोद कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री चोरीला गेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकू बाळगणारे दोघे गजाआड

मोठा चाकू बाळगून दहशत निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी म्हसोबा पटांगणावर अटक केली. प्रशांत अनिल लोंढे (२१, रा. सहाचाळी, देवळाली कॅम्प) आणि संतोष पोपट वलकर (१९, रा. मोरे मळा, पंचवटी) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. दोघे संशयित म्हसोबा पटांगणावर असताना पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यात त्यांच्याकडून एक चॉपर सापडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल हिसकावला

पानटपरीवर थांबलेल्या तरुणाचा मोबाइल अज्ञात चोरट्याने हिसकावून धूम ठोकली. ही घटना अंबड एमआयडीसीत घडली. या प्रकरणी ज्ञानेश्‍वर राजेंद्र पाटील (रा. लक्ष्मीनगर, जीडीपीनगर, नाशिक) या तरुणाने तक्रार दिली आहे. एमआयडीसीतील शिंपी मळ्यातील पानटपरीवर ज्ञानेश्वर बिस्किटे खाण्यासाठी शुक्रवारी (दि.१०) थांबला. यावेळी एका अज्ञात २५ वर्षांच्या चोरट्याने त्याची नजर चुकवून १० हजार ९९० रुपयांचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी अन् अपेक्षांचा भडिमार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठाणातील रस्ते छोटे असल्याने तेथे अग्निशमनच्या छोट्या वाहनांची व्यवस्था करा, वाडा पडल्याने बळी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना शहरातील प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्याचे मानधन द्यावे, जुन्या नाशिकातील नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. भाजप सरकारने कमी केलेला एफएसआय पुन्हा वाढवून द्यावा, अशा एक ना अनेक तक्रारी आणि सूचनांचा पाऊसच रविवारी जुन्या तांबट लेनमधील कासार समाज कालिका माता मंदिर सभामंडपात पडला.

नागरिकांच्या रास्त अपेक्षांची दखल घेऊ, असे आश्वासन देतानाच क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे नाशिक गावठाणचे रुपडे पालटणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. शहराचा चहुबाजूने विकास होत असताना नाशिकची मुख्य ओळख असलेला गावठाण भाग मात्र विकासापासून वंचित आहे. कुठल्याही मूलभूत आणि पायाभूत सूविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनाही जगणे कठीण झाले आहे. शहराच्या उपनगरांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून येथील रहिवाशांना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी नाशिक गावठाणातील रहिवाशांची बैठक बोलावली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरविकासच्या अधिकारी प्रतिभा भदाणे, विजय साने, सुहास फरांदे, हरिभाऊ लोणारी आदी उपस्थित होते.

क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे जुन्या नाशकातील रहिवाशांच्या अशा पल्लवीत झाल्याची भावना प्रास्ताविकातून व्यक्त करण्यात आली. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असताना नागरिक धोकादायक अवस्थेतील वाड्यांमध्ये रहात आहेत. त्यांना स्वमालकीच्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरीत करणे आणि शाळा, उद्याने, मैदान, वाचनालये, प्रशस्त रस्ते यासारख्या सुविधा याच परिसरात उपलब्ध करून देऊन रहिवाशांचा रहाणीमानाचा दर्जा सुधारणे म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट असल्याचे आमदार फरांदे यांनी दिली. भदाणे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष सांगितले. त्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना ऐकण्यात आल्या.

इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट तीन महिन्यांत मिळावा

पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिकमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाणार असून चार ते साडेचार टक्के एफएसआय मिळविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. गावठाणाच्या धाटणीचा विचार करून आपण क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करीत असल्याचे रहिवाशांना सांगण्यात आले. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी एक एजन्सी नेमावी लागणार असून महापालिकेने तीन महिन्यांत हा रिपोर्ट सादर केला तर त्यावर त्यापुढील महिनाभरात नागरिकांना सूचना आणि हरकती मांडता येतील. त्यामुळे याबाबत महापौर आणि सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये लक्ष घालावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आठ फेब्रुवारी रोजीच दिल्याची माहितीही फरांदे यांनी यावेळी दिली.

आमच्या भावनांशी खेळू नका

आम्ही २० वर्षांपासून क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत ऐकत आहोत. नाशिक गावठाणातील नागरिक गरीब आणि भोळसर आहेत. त्यांना क्लस्टर डेव्हलपेंटची आश्वासने दिली जातात. परंतु, ते प्रत्यक्षात होणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे मत नंदन भास्कर या तरुणाने मांडले आणि बैठकीचा नूर पालटला. तुम्ही चार टक्के एफएसआय मिळेल, असे सांगत आहात. याच सरकारने नाशिक गावठाणचा एफएसआय दोनवरून दीडवर आणला असल्याकडेही त्यांनी लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांचे लक्ष वेधले. त्यानंतर सुरू झालेला सूचना आणि अपेक्षांचा सिलसिला सुरूच राहिला.

नाईलाजाने वाड्यात राहतो

वाडा कोसळल्याने ज्या दोन तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक नगरसेवकाने एक महिन्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी शंकर बर्वे यांनी केली. पूररेषेमध्ये असल्याचे कारण सांगत वाड्यांच्या डागडुजीकरीता बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव धोकेदायक वाड्यांमध्ये रहावे लागते. बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी काही करा अशी अपेक्षा स्वाती कुलकर्णी यांनी व्यक्त केली. जुन्या नाशकातील रहिवाशांना टुकार समजून बँका कर्ज प्रकरणे फेटाळून लावतात, याकडे दिनेश चव्हाण यांनी लक्ष वेधले. सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून पुन्हा प्रशस्त ठिकाणी बैठक बोलवा, अशी मागणी काही नागरिकांनी केली. तर काहींनी गावठाणाचा कमी केलेला एफएसआय पूर्ववत करावा अशी मागणी केली.

क्लस्टर डेव्हलपमेंटचे निकष

किमान ३० वर्षे जुन्या इमारती, घरांचा यामध्ये समावेश

वाडेमालक, इमारतमालक क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतात

अनधिकृत परंतु इमारतींची मालकी असलेल्या रहिवाशांनाही सहभागाची संधी

परिसरातील २५ टक्के स्लम एरियाचाही यात समावेश

१२ वर्षांहून अधिक वास्तव्य असलेले भाडेकरूही लाभार्थी

भाडेकरूंना किमान ३० चौरस मीटरचे घर देणे बंधनकारक

घरमालकाला स्वत:ला इमारत बांधून एफएसआय विकणे शक्य

घरमालकांना घर आणि दुकानमालकांना दुकानच मिळणार

को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापून किंवा विकसकावर जबाबदारी सोपवून विकास शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एकलहरे’ला लागणार टाळे!

0
0

उत्तर महाराष्ट्रातील वीज प्रकल्प दोन वर्षांत होणार बंद

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे येथील प्रस्तावित ६५० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प भुसावळला पळविल्यानंतर आता आहे त्या वीज निर्मिती प्रकल्पाला देखील येत्या दोन वर्षांत टाळे लागण्याची शक्यता आहे. खुद्द महानिर्मिती कंपनीनेच राज्य विद्युत नियामक आयोगाकडे लेखी स्वरुपात तसे कळविले असल्याने एकलहरे येथील वीज निर्मितीची ओळख कायमची पुसली जाणार आहे. महानिर्मितीच्या मुंबईतील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकलहरेसोबतच भुसावळचाही वीज निर्मिती प्रकल्प कायमचा बंद करून विदर्भातील उमरेडला नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

एकलहरे आणि भुसावळ या दोन्ही वीजनिर्मिती प्रकल्पांना २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने टाळे लावण्याचा निर्णय महानिर्मिती कंपनीने घेतला आहे. तसे लेखी पत्रच कंपनीने राज्य विद्युत नियामक आयोगाला दिले आहे. या दोन्हीही ठिकाणचे वीज निर्मिती प्रकल्प बंद करून विदर्भातील उमरेड येथे नव्याने ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. एकलहरे वीज निर्मिती प्रकल्पाची मुदत २०१९ मध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यात नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारावयाचा झाल्यास त्यासाठी एकलहरेलाच प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन विद्यमान ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच भुसावळ येथे नवीन वीजनिर्मिती प्रकल्पाचे अनावरण झाले. त्यामुळे एकलहरेच्या नवीन वीज निर्मिती प्रकल्पाचे आश्वासन केरात गेले आहे.

..

एकलहरे व्हेंटीलेटरवर

एकलहरे वीज निर्मिती केंद्र सध्याच व्हेंटीलेटरवर आहे. या वीज निर्मिती केंद्राला गेल्या काही महिन्यांपासून कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरेशा कोळशाचा साठा नसल्याने या वीज निर्मिती केंद्राची स्थिती सुपर क्रिटीकल झाली आहे. त्या कोळशापैकी काही कोळसा विदर्भातील खासगी कंपनीला विकण्याचा व त्या कंपनीकडून वीज खरेदीचा करारही यापूर्वीच झालेला आहे. सध्या केवळ एकाच संचातून वीजनिर्मिती सुरू आहे. दोन संच काही वर्षांपूर्वीच कायमस्वरुपी बंद करण्यात आलेले आहेत. एक संच देखभाल दुरुस्तीसाठी कायमच बंद असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून मद्यतस्करी; पाच लाखांचा माल जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आषाढी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधमार्गाने होणाऱ्या मद्यतस्करीवर कारवाई करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी क्रमांक तीनच्या भरारी पथकाने तब्बल ४ लाख ९० हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण-सुरगाणा रोडवर ही कारवाई केल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

दिनेश महाले आणि माणिराम पवार या दोघा मद्य तस्करांना वाहनांसह अटक करण्यात आली आहे. ओम्नी कार (एमच १५ डीएस ९३८६) आणि मारुती कार (जीजे ०५ एफएफ ५०६५) या दोन वाहनांमधून मद्यतस्करी केली जात होती. या वाहनांमधून जॉन मार्टिन व्हिस्किच्या ७२० बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ५४ बाटल्या, मॅकडोल एक व्हिस्किच्या ९६ बाटल्या, बॅकपाईपर व्हिस्किच्या ९६ बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्किच्या ९६ बाटल्या, हायवर्डस स्टॉग बियरच्या ४८० बाटल्या, नॉकआऊट स्टॉग बियरच्या १४० बाटल्या, टुबर्ग स्टॉग बियरच्या १२० बाटल्या असा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग दिंडोरी भरारी पथक क्रमांक तीनचे दुय्यम निरिक्षक एस. बी. शिंदे, महेश सातपुते, लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, सुनिता महाजन या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी ऊंबरठाण येथे कारवाई केली. यावेळी केवळ दमण या ठिकाणी विक्रीसाठी परवानगी असलेली व महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेल्या मद्याचा साठा या पथकाने हस्तगत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्टिलरी स्कूलमध्ये ‘वेपन इंजिनीअरिंग’

0
0

युजीसाठी ४००, तर पीजीकरिता १०० जागांना मंजुरी

..

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

..

- या शैक्षणिक वर्षापासूनच अभ्यासक्रला सुरुवात

- विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकणार

- इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा बंधनकारक

नाशिक : देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर 'वेपन इंजिनीअरिंग' अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे या संस्थेत यंदापासून 'वेपन इंजिनीअरिंग'चा अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे.

'वेपन इंजिनीअरिंग' या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी 'एआयसीटीई' आणि 'डीटीई' या संस्थांनी आर्टिलरी स्कूलला अगोदरच मान्यता दिली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी देवळाली आर्टिलरी स्कूलमध्ये पदवीस्तरावर (युजी) ४०० जागा, तर पदव्युत्तर स्तरावर (पीजी) १०० जागांना मान्यता देण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) या संस्थांच्या मान्यतेनंतर केवळ राज्य शासनाच्या परवानगीची या अभ्यासक्रमाकरिता प्रतीक्षा होती. तो अडसरही आता दूर झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून या अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत संलग्न असणार आहे. सद्यस्थितीत देवळाली आर्टिलरी स्कूलमध्ये 'वेपन सिस्टीम' संदर्भात प्रमाणपत्र आणि पदविका हे पुणे विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

..

संस्थास्तरावरच प्रवेश प्रकिया

या अभ्यासक्रमासाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे शासनाकडून शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना होऊ शकणार नसल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. याशिवाय हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा आदी सुविधा अभ्यासक्रम सुरू करण्याअगोदरच उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या अविष्कार, वेदांतची आघाडी

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या सलग्नतेने 'द अमॅच्युअर चेस असोसिएशन नाशिक' यांच्यातर्फे आयोजित २५ वयोगटाखालील बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या अविष्कार वानखेडे व वेदांत पिंपळखरे यांनी आठव्या फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील एकूण ९ फेऱ्यांपैकी ७ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, अविष्कार वानखेडे (६. ५ गुण, नाशिक), रोहन जोशी (६.५ गुण, पुणे), इंद्रजीत महेंद्रकर (६ गुण, औरंगाबाद), हिमांशू छाब्रा (६ गुण, अमरावती), वेदांत पिंपळखरे (५.५ गुण, नाशिक) या खेळाडूंनी आठव्या फेरीत प्रवेश केला आहे.

शहरातील व्ही.एन. नाईक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथजी मुंढे कॉलेज येथे ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी यातून संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन के. व्ही. एन. शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक शरद बोडके, अॅड. तानाजी जायभावे, प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे तसेच बुद्धिबळ संघटनेचे सचिव संदीप नागरे, अध्यक्ष भरत वानखेडे, उपाध्यक्ष ओंकार जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेसाठी राज्यातून ३१ जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले असून, १८५ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावीत आहेत. स्पर्धेत ११५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू खेळत असून, या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांचे चेहरे फुलले स्मितहास्याने

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

''माझ्याकडे वह्या नाहीत. तीन विषयांसाठी मी एकच वही वापरते. मिशन एज्युकेशन उपक्रमात आम्हाला वह्या आणि अन्य शालेयोपयोगी साहित्य मिळाले. आता मी अधिक मन लावून अभ्यास करेन'', ही प्रातिनिधिक भावना आहे सातवीत शिकणाऱ्या पुष्पा बेंडकोळी या विद्यार्थिनीची. नव्हे गाळोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २५० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही हीच भावना झळकत होती. निमित्त होते मिशन एज्युकेशन उपक्रमांतर्गत आयोजित शालेय साहित्य वाटपाचे.

सद्गुरू देव श्री सतपालजी महाराज प्रणित मानव उत्थान सेवा समितीतर्फे आणि विभुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर मिशन एज्युकेशन उपक्रम राबविला जात आहे. नाशिक तालुक्यातील गाळोशी इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेतही हा उप्रकम राबविण्यात आला. पहिली ते आठवीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री हंस कल्याण धाम आश्रमाच्या प्रमुख साध्वी हिराजी, साध्वी मुक्तिकाजी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

मिशन एज्युकेशन या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये रिकामे बॉक्स ठेवण्यात आले. त्यामध्ये जमा झालेले शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. गाळोशी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी काश्यपी धरणात गेल्या असून मोलमजुरी करून हे धरणग्रस्त चरितार्थ चालवितात. त्यांच्या मुलांना वह्या, पाटी, पेन्सिल, पेन यासारख्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने आमचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याची भावना आठवीतील गौतम धोंडे याने व्यक्त केली. श्रीनिवास बुद्धलवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी मानवधर्म प्रेमी, मिशन एज्युकेशनचे युवा पथक आणि शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अभ्यासासह योगाही शिकवा

यावेळी मार्गदर्शन करताना साध्वी हिराजी म्हणाल्या, की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत योगाही शिकवावा. सत्याच्या मार्गावर चालण्याचा आग्रह धरायला हवा. विद्यार्थ्यानी दररोज आई-वडिलांना नमस्कार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images