Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वडाळागावात मृत्यूचे भय!

$
0
0

रस्ता रुंदीकरणानंतर नागरिकांचा जीव मुठीत; बंद पथदीप ठरतात अपघाताचे निमित्त

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगरहून नाशिकरोडकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या वडाळा गावातील रहिवाशी मृत्यूच्या भयाखाली आहेत. रस्ता रुंदीकरणानंतर अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. बंद पथदीप रात्री अपघातासाठी निमित्त ठरत आहेत. याच मार्गावर गर्भवती महिलेचा अपघातात मृत्यू झाला.

सिंहस्थ काळात वडाळा परिसरातून रिंगरोड तयार करण्यात आला. यासाठी काही घरे अतिक्रमणात हटविण्यात आली. परिसरातील झोपडीवासीयांना महापालिकेकडून घरकुलमध्ये घरे देण्यात आली. त्यांना महापालिकेने स्थलांतरीत करून त्यांची रस्त्यात अडथळा ठरणारी घरे जमिनदोस्त केली. मात्र, त्यानंतरच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाने गती घेतली नाही. त्यामुळे नागरिकांना तेथून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असतात. रस्त्याचे एका बाजूचे काम अर्धवट असल्याने वाहनचालक चांगल्या रस्त्यानेच ये-जा करतात आणि यातून अपघातांची संख्या वाढून स्थानिक रहिवाशांना मृत्यूशी झुंजच द्यावी लागत आहे.

ठेकेदारच जबाबदार

स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाचे या रस्त्याच्या प्रलंबित कामांबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात कमी होत नसल्याने त्यास महापालिकेने अधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती देणारा कोणताही फलक याठिकाणी नाही.

वडाळागावातील रस्त्याचे काम सिंहस्थ काळातच होणे अपेक्षित होते. मात्र तरीही ते अनेक दिवसांपासून थांबलेले आहे. मात्र, अधिकाऱ्यांना जबाबदारीचे भान नाही. त्यामुळे आता थेट आयुक्तांचीच भेट घेणार आहे.

- शाम बडोदे, नगरसेवक

अतिक्रमणाचा प्रश्न सोडविल्यानंतर येथील काम सुरू झाले. एकाबाजूने रस्ता झाला तरी दुसरी बाजू पावसामुळे रखडली आहे. याठिकाणी गतिरोधक टाकावेत अशी मागणी अनेकदा केली. मात्र, गतिरोधकांसह पथदीपही उभारलेले नाहीत. त्यामुळेच अपघात होत आहेत.

- डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

सात-आठ महिने उलटूनही रस्त्याचे काम न झाल्याने अपघाताची नैतिक जबाबदारी अधिकाऱ्यांनी स्वीकारावी. याबाबत वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही. प्रत्येक काम नगरसेवक या नात्याने सुचवित असलो तरी अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नाही.

- सुप्रिया खोडे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेलिकॉप्टरद्वारे होणार बीजारोपण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वृक्षतोडीमुळे थंड शहर व जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकला उन्हाळ्यात चटका सहन करण्याची वेळ येते. याकरिता हेलिकॉप्टरमधून येत्या १९ ऑगस्टला सपकाळ नॉलेज हब येथे २० आदिवासी विद्यार्थ्यांच्या हस्ते सीडिंग करून पाच लाख बिजारोपण केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार हेमंत गोडसे, विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत बिजारोपणाचा शुभारंभ केला जाणार आहे. सिग्नेचर इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रा. लि व सपकाळ नॉलेज हब यांच्या सहकार्याने प्रथमच असा उपक्रम राबवला जाणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे २० ते २५ मिनिटांत १० ते १५ हजार बिजारोपण होऊ शकते. बिजारोपण करण्यासाठी सीड बॉल तयार करण्यात आले आहेत. यात शेणखतात १० मोठ्या व ८ लहान बिया सीड बॉलमध्ये ठेवल्या जाणार आहेत. जवळपास ५ लाखांहून अधिक सीड बॉल अंजनेरी डोंगरावर टाकले जाणार आहेत. यामध्ये वृक्षांच्या १० विविध प्रकारची लागवड केली जाणार आहे. वड, पिंपळ, हनुमान फळ, ताम्हण, चेरी, अशोका, जांभूळ, बोर आदी वृक्षांचे बीजारोपण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ताकामास रेड सिग्नल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर फाटा ते शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजदरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी ग्रामीण भागाचे कारण देत 'रेड सिग्नल' दाखविल्याची माहिती नाशिकरोडचे प्रभाग सभापती पंडित आवारे यांनी दिली.

हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी यापूर्वी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा ते सामनगाव या रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आहे. या ठिकाणी २ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात सुमारे १४०० विद्यार्थिनींचा समावेश आहे. या कॉलेजजवळच रेल्वे पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापुढे चाडेगाव आहे. हा सर्व परिसर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील आहे. परंतु, नाशिक-पुणे महामार्ग ते या भागाला जोडणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने या भागातून नाशिकरोडकडे जाणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत धूळ खात पडून होता. मात्र, ग्रामीण भागाचे कारण पुढे करून आता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी 'रेड सिग्नल' दाखविला आहे.

अवजड वाहतूकही शक्य

या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास नाशिक-पुणे महामार्गावरून शहरात येणारी अवजड वाहतूक या रस्त्याने औरंगाबाद आणि मुंबई-आग्रा महामार्गालादेखील वळविता येऊ शकते. लाखलगाव ते शिंदे या कोटमगावमार्गे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण गेल्या सिंहस्थातील विकासकामांत झालेले आहे. आता सिन्नर फाटा ते कोटमगावदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यापैकी सिन्नर फाटा ते चाडेगावदरम्यानचा रस्ता महापालिका हद्दीतील आहे. या अरुंद रस्त्यामुळे परिवहन महामंडळाने पुरेशा बससेवेलाही 'ब्रेक' लावलेला आहे.

सिन्नर फाटा ते चाडेगाव या रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज असल्याने शेकडो विद्यार्थ्यांना या रस्त्याने दररोज प्रवास करावा लागतो. याच रस्त्यावर रेल्वे पोलिस प्रशिक्षण केंद्रही आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केवळ ग्रामीण भागाचे कारण पुढे करून नामंजूर केला आहे. या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे.

-पंडित आवारे, प्रभाग सभापती, नाशिकरोड

(लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉसमॉस’मुळे धोक्याचा इशारा

$
0
0

ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांत गेल्या काही दिवसांत वाढ होताना दिसून येत आहे. आधी 'एटीएम'मार्फत पैसे लुटल्याचा तक्रारी येत होत्या. आता हॅकर्सने थेट कॉसमॉस बँकेच्या हजारो खात्यांतूनच परस्पर कोट्यवधी रुपये उडविले आहेत. हा ऑनलाइन दरोडा मोठ्या धोक्याचा इशाराच आहे. दरोड्याचा हा प्रकार अत्यंत आव्हानात्मक असून, सायबर क्राइम विभागाने या प्रकरणाचा छडा लावावा अन्यथा ग्राहकांचा बँकांवरचा विश्वास डळमळीत होईल, अशा प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केल्या आहेत. सरकारने यासंदर्भात सर्वच बँकांना उपयुक्त ठरणारी एखादी सक्षम प्रणाली विकसित करण्याची आवश्यकतादेखील या प्रकारावरून निर्माण झाली आहे, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

बँकांनी सावध व्हावे

गेल्या काही दिवसांत ऑनलाइन पद्धत अतिशय घातक ठरताना दिसत आहे. मोबाइलवर येणारे संदेश, त्यातून फसवणूक होणारे ग्राहक हे नित्याचेच होत असताना आता बँकाही सायबर चोरांच्या रडारवर आलेल्या आहेत, हे आपल्या देशाच्या आर्थिक क्षेत्राला धोकादायक आहे. असे प्रकार वेळीच रोखले नाहीत, तर ग्राहकांचा बँकांवरचा विश्वास डळमळीत होऊ शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

-संजय परदेशी

समाजाची मानसिकता बदलेल

एकीकडे ऑनलाइन प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन सरकार करीत असले, तरी त्याचा वापर करताना बाळगावी लागणारी सावधानता आणि पुरेशी दक्षता घेतली जाताना दिसत नाही. परिणामी सामान्यांच्या खिशातील रक्कम अशी हॅकर्सद्वारे जाऊ लागली, तर आपल्या जुन्या प्रणालीचा वापर करणेच हितावह ठरणारे आहे, अशी समाजाची मानसिकता होण्याची शक्यता वाटते.

-विकास रायते

विश्वासाहर्ता कमी होत जाईल

सरकारमार्फत पेपरलेस कामकाज करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक ऑनलाइन बँकिंग प्रणालीकडे वळाले आहेत. मात्र, कॉसमॉस बँकेवर हॅकर्सने टाकलेला दरोडा ऑनलाइन बँकिंग प्रणालीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून गुन्हेगार शोधायला हवेत. असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रणालीत सुधारणा घडवायला हव्यात.

-संजय शिंदे

तंत्रज्ञानाचा दुरुपयोग रोखावा

ऑनलाइन व्यवहार करा असा आग्रह सरकार धरीत आहे. आतापर्यंत अनेक एटीएम कार्डधारकांचे पैसे परस्पर माहिती घेऊन लुबाडले गेलेले आहेत आणि आता तर परदेशातून भारतातील कॉसमॉस या अग्रगण्य बँकेवर ऑनलाइन दरोडा घातला आहे. ही बाब बँकिंग क्षेत्राला आव्हानात्मक आहे. यात बँकेशी संबंधित सर्व घटकांची चौकशी केल्याशिवाय खरे दरोडेखोर सापडणार नाहीत, असे वाटते.

-पंकज श्रीवास्तव

विश्वास कोणावर ठेवावा?

सर्वसामान्य नागरिक मोठ्या कष्टाने पै-पै जमा करून सुरक्षेसाठी बँकेत ठेवत असतो. आता बँकांमधूनही ऑनलाइन पद्धतीने चोरी होणार असेल, तर विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न आहे. ऑनलाइन व्यवहार करा, असे आवाहन सरकार एका बाजूला करीत आहे आणि याच ऑनलाइनचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपये चोरी होत आहेत हे सर्व संशयास्पद आहे.

-बाळासाहेब कमानकर

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास अडकला पाचशे मीटरच्या बंधनात!

$
0
0

तीन वर्षांपासून स्थायी सल्लागर समितीच्या स्थापनेकडे दुर्लक्ष

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कारागृहापासून पाचशे मीटर अंतरावर नवीन विकासकामांसह पुनर्विकासाबाबत नगरविकास विभागाने काढलेल्या एका परिपत्रकामुळे नाशिकरोड कारागृहाभोवतालच्या नवीन इमारत निर्माणासह जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची कोंडी झाली आहे. कारागृहापासून पाचशे मीटर अंतरामध्ये बांधकाम परवानगी देण्यासाठी स्थायी सल्लागार समितीची परवानगी सक्तीची असताना गेल्या तीन वर्षांपासून नगरविकास विभागाने या समितीचीच स्थापना केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांना परवानगीसाठी महापालिका, नगररचना कार्यालय, कारागृह प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडे चकरा माराव्या लागत आहेत.

राज्याच्या नगररचना विभागाने कारागृहांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी १२ एप्रिल २०१३ मध्ये एक पत्रक काढून कारागृहाभोवती संबंधित नियोजन प्राधिकरणांना त्यांचे कार्यक्षेत्रात ५०० मीटर अंतरामध्ये बांधकाम परवानग्यांवर बंधन घातले. याचा सर्वाधिक फटका नाशिकरोड कारागृहाभोवतालच्या परिसराला बसला आहे. कारागृह होण्यापूर्वीच या भागात मोठी वस्ती वसली आहे. नव्याने मोठ्या प्रमाणावर हा भाग विकसित होत आहे. परंतु, विकासात पाचशे मीटरचे बंधन अडसर ठरत आहे. जुन्या इमारतींचाही पुनर्विकास या आदेशामुळे अडकला असून, नव्याने इमारती उभ्या करण्यासाठी नगररचना विभागाकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी या संदर्भातील तक्रारी लोकप्रतिनिधींकडे केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ६ ऑगस्ट २०१५ रोजी एक आदेश काढून यात शिथिलता आणली. कारागृहापासून दीडशे ते पाचशे मीटर दरम्यानच्या बांधकामांना परवानगी देण्यासाठी स्थायी सल्लागार समितीची स्थापना करण्याचे निर्देश देत या समितीसमोर पुनर्विकासासह नव्या बांधकाम परवानग्या देण्याचे प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश दिले. या समितीने सुरक्षेचा आढावा घेऊन नियम व मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे या बांधकामांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, नगर विकास विभागाच्या या आदेशाला तीन वर्षे लोटले तरी अद्यापही या सल्लागार समितीचीच स्थापना झालेली नाही. त्यामुळे बांधकाम परवानग्यांचा विषय प्रलंबितच आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे प्रशासन आणि नगररचना विभागाने यात तातडीने तोडगा काढणे अपेक्षित असतानाही समितीच्या स्थापनेकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या भागाचा संपूर्ण विकासच खुंटला आहे. जुन्या इमारती कोसळल्या तरी, त्यांच्या पुनर्विकासाचा निर्णय होत नाही, तर नवीन इमारतीच्या बांधकामांनाही परवानगी मिळत नाही. त्यामुळे आहे त्याच पडक्या इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून स्थानिकांना वास्तव्य करावे लागत आहे.

-

नियमांनी वेढला परिसर

कारागृहाचा परिसर हा सर्वात मोठा आहे. त्यातच कारागृहाची भिंत ही २१ फूट उंच असून, दीडशे फुटापर्यंत बांधकामावर आधीच मर्यादा आहेत. त्यामुळे दीडशे ते पाचशे मीटरपर्यंत बांधकामाला परवानगी देण्यासाठी अडथळ्यांची गरज नाही. कारागृहासोबतच एकीकडे इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि रेल्वेच्या परिसराने हा भाग वेढला गेला आहे. त्यामुळे रेल्वेचाही शंभर मीटर बांधकामाना परवानगीचा जाच आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमुळे या भागातील बांधकामांना मर्यादा आल्या आहेत. यामुळे या भागाच्या विकासाला ग्रहण लागले आहे.

...

तीन वर्षात नगरविकास विभागाने सल्लागार समितीची साधी स्थापनाही केलेली नाही. त्यामुळे कारागृह परिसरातील विकास पूर्णपणे खुंटला आहे. त्यामुळे तातडीने समितीची स्थापना करून नवीन बांधकाम परवानग्यांसह पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा.

- राजू टर्ले, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचे अर्थमंत्र्याना साकडे

$
0
0

१७ महिन्यांपूर्वी सहा कर्मचारी केले होते कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रिटिंग शाखेतील पदवी नसल्याने भारत प्रतिभूती मुद्रणालयामध्ये दहा महिने काम करून सहा कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर आता एका कामागाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे घातले आहे. त्यासाठी त्याने आपली कैफियत मांडणारे पत्रही त्यांना पाठविल्याने या कामगारांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

कैलास खेलूकर यांनी पाठवलेल्या या पत्रात त्यांनी आपली कैफियत मांडतांना सांगितले की, भारतीय प्रतिभूती मुद्राणालयाने २०१५ साली पर्यवक्षक व कार्यालयीन सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली. त्यात छपाई पर्यवक्षकाच्या २० जागा होत्या. सदर पदासाठी पात्रता प्रिटिंग शाखेतील पदविका होती. तर डिसिरायबल पात्रता प्रिटिंग, पेपर, मेकॅनिकल, मटॅलर्जी, इलेक्ट्रिक, संगणक, आयटीआय या शाखातील पदवी अशी होती. त्यामुळे या सगळयाच शाखातील पदवीधारक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. सदर पदासाठी ऑनलाइन परीक्षा आयबीपीएसद्वारे २०१६ च्या फेब्रुवारीत घेण्यात आली. त्यात पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत मार्चमध्ये झाली. मुलाखत घेणाऱ्या कमिटीमध्ये महाप्रबंधक, उपमहाप्रबंधक, प्रबंधक मानवसंसाधन, यांचा समावेश होता. मुलाखतीत यशस्वी उमेदवारांना एप्रिलमध्ये कामावर रुजू करण्यात आले. त्यानंतर त्यांनी १० महिने काम केल्यानंतर १ मार्च २०१७ मध्ये सहा कर्मचाऱ्यांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्याचे कारणही त्यांना दिले नाही.

चार कर्मचाऱ्यांची कोर्टात धाव

सेवेत कमी केल्यानंतर सहा पैकी चार कर्मचाऱ्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मुद्रणालयातर्फे सदर उमेदवारांकडे प्रिटिंग शाखेतील पदवी नसल्याने सेवेतून कमी केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या कर्मचाऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी कारवाई केल्याचे सांगत हा दावा निकाली काढला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या म्हणणे ऐकून घेतले. त्यांना चुकून पर्यवक्षकांच्या जाहिरातीत पात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे कैलास यांनी सांगितले.

धक्कादायक बाब

कैलास यांनी या पत्रात अजून एक धक्कादायक बाब मांडली आहे. या प्रकरणात सतकर्ता विभागाने केलेल्या चौकशीत असे आढळून आले की संबंधित पदासाठी प्रिटिंग व्यतिरिक्त इतर शाखातील उमेदवारांना पात्र ठरविण्याची परवानगी 'एसपीएमसीआयएल'च्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने मुद्रणालयाच्या प्रबंधकांना दिली होती. त्यानंतर संबंधित पदासाठी ऑनलाइन परीक्षा व मुलाखत घेण्यात आली.

एकीकडे भारत सरकार साफ नियत, सही विकासचा दावा करत असतांना दुसरीकडे मात्र केंद्राच्या या कंपन्यामध्ये प्रशांसनाची नियत साफ नाही. आम्हाला कमी करून मर्जीतील उमेदवारांना घेण्याची चर्चा आहे.

- कैलास खेडूलकर, निलंबित कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून अकरावीची विशेष फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आजपासून (दि. १८) विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. अद्याप कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात 'अलॉट' न झालेले विद्यार्थी व प्रथम पसंती क्रमांकाव्यतिरिक्त इतर पसंती क्रमांकाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट होऊनही अद्याप कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी घेण्यात येणार आहे. २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना याअंतर्गत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

विशेष फेरीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये चौथ्या फेरीअखेर रिक्त असणाऱ्या जागा, अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांनी समर्पित केलेल्या अल्पसंख्यांक इनहाऊस व व्यवस्थापन कोट्यातील जागा, प्रवेश रद्द केल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागा आदींमध्ये प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी झालेल्या चार नियमित फेऱ्यांमध्ये कोणत्याही फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालेले विद्यार्थी व घेतलेला प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी मात्र या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत. या विद्यार्थ्यांना विशेष फेरीनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीत सहभाग घेता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी आज सकाळी ११ वाजता प्रवेश प्रक्रियेच्या nashik.11thadmission.net या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.

\Bफेरीसाठी एकूण जागा

\Bशाखा-रिक्त जागा

कला-३५०

वाणिज्य-१०५९

विज्ञान-१६७१

एचएसव्हीसी -१२३

एकूण-३२०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

$
0
0

कलावती छाजेड

नाशिक : येथील कलावती छाजेड (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अभयकुमार छाजेड यांच्या त्या पत्नी होत. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या त्या नातेवाईक होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये आज श्रद्धांजली सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. १८) भाजपतर्फे श्रद्धांजली सभा होणार आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. आदर्श आणि मुत्सद्दी राजकारणी कसा असावा, याचा आदर्शपाठ घालून देत वाजपेयी यांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जोपासली. नाशिकनगरीशीही त्यांचे आपुलकीचे नाते होते. अनेक नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय होता. त्याच्या निधानाचे वृत्त कळल्यानंतर नाशिककरांनाही मोठा धक्का बसला. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी दुपारी चार वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात शोकसभा होणार आहे. नाशिक महानगर भाजपच्या संयोजकांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेबाबत नगरसेवकांची अनास्था

$
0
0

एकाही महासभेला पूर्ण नगरसेवकांची उपस्थिती नाही

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महासभेबाबत अनास्था दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या २५ महासभांमध्ये एकदाही १२७ नगरसेवकांनी पूर्णवेळ हजेरी लावली नसल्याचे समोर आले आहे. करवाढ रद्द करण्यासंदर्भात बोलावलेल्या महासभेलाच सर्वाधिक १२२ नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक नगरसेवक महासभांना हजेरीपटावर सह्या करतात परंतु, महासभेत उपस्थित राहणे टाळत असल्याचे दिसून आले आहे.

महासभेच्या कामकाजाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओस्तवाल यांनी माहिती अधिकारातून नगरसचिवांकडून माहिती मागवली होती. ओस्तवाल यांना मिळालेल्या माहितीतून नगरसेवकांमध्ये महासभेबद्दल असलेली अनास्था दिसून आली आहे. गेल्या दीड वर्षातील भाजपच्या सत्तेत आतापर्यंत एकूण २५ महासभा झाल्या असून, त्यात पाच महासभा विविध कारणांनी तहकूब झाल्याचे म्हटले आहे. या २५ पैकी ३१ मार्च २०१८ रोजी झालेल्या महासभेत सर्वाधिक १६११ विषय, प्रस्ताव होते तर सर्वात कमी प्रस्ताव ३ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या महासभेत फक्त तीनच प्रस्ताव होते. करवाढ रद्द करण्यासंदर्भात १९ जुलै रोजी झालेल्या महासभेत १२७ पैकी १२२ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. ही महासभा तब्बल बारा तास चालली होती. सर्वात कमी म्हणजे ४२ नगरसेवकांची उपस्थिती १९ मे रोजी झालेल्या महासभेत होती. एकूण २५ महासभांना गैरहजर नगरसेवकांची संख्या ४३३ इतकी असून, विद्यमान नगरसेवकांच्या संख्येच्या ३११ टक्के अनुपस्थितीचे प्रमाण आहे. ४११ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांचे २५ महासभेत अनुपस्थित राहण्याकामी रजेचे अर्ज नगरसचिव विभागाला प्राप्त झाले आहेत.

-

शंभर रुपये भत्ता

नगरसेवकांना एका महासभेसाठी १०० रुपये भत्ता दिला जातो. जेवढ्या महासभांना नगरसेवक उपस्थितीत राहतात त्याच महासभेचा भत्ता मिळतो. सलग तीन महासभांना अनुपस्थित राहणारा नगरसेवक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चा कलम ११(क) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरतो, अशी माहिती अधिकारात ओस्तवाल यांना दिली. परंतु, महापालिकेत सलग तीनवेळा एकही नगरसेवक अनुपस्थित राहिला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक केवळ सह्या करून महासभेला उपस्थित राहणे टाळत असल्याचे चित्र आहे.

-

नगरसेवक सभागृहात नाशिककरांचा आवाज बुलंद करण्याच्या नावाखाली मते मागतात. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतर सभागृहात उपस्थित न राहणे ही चिंताजनक आहे.

- सुनील ओस्तवाल, माहिती अधिकार कार्यकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक फेरीसाठी तरुणी झाल्या सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'श्रावणक्वीन' स्पर्धेचा मानाचा झळाझळता मुकुट पटकवण्यासाठी प्राथमिक फेरीपासूनच स्पर्धकांनी कंबर कसली आहे. प्राथमिक फेरीत परीक्षकांवर छाप पाडण्यासाठी स्पर्धकांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. रविवारी होणाऱ्या प्राथमिक फेरीत सौंदर्यासोबतच बुद्धिचातुर्य आणि कलागुणांचा प्रभाव पाडत 'सिटी फिनाले'त प्रवेश मिळविण्यासाठी तरुणी सज्ज झाल्या आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत, पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि रेजेन्सी ग्रुप, चॅनेल पार्टनर झी युवा 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (१९ ऑगस्ट) रोजी रंगणार आहे. यामध्ये रॅम्पवॉक, सेल्फ इन्ट्रोडक्शन, परफॉर्मन्स आणि टॅलेंट राउंड होणार आहे. या सर्व राउंडमध्ये अग्रेसर ठरणाऱ्या लावण्यवती स्पर्धकांना सिटी फिनालेत एंट्री मिळणार आहे. यात निवडलेल्या स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन होणार आहे. या ग्रुमिंगमध्ये स्पर्धकांचे इन्ट्रोडक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, शोरूम व्हिजिट, फॅशन डिझायनिंग, फिटनेस हेल्थ केअर, फोटोशूट होणार आहे. सिटी फिनाले नाशिकमध्येच होणार आहे. यातून निवडण्यात आलेल्या अंतिम तीन विजेत्या श्रावणक्वीन्सना मुंबईत होणाऱ्या ग्रँड फिनालेत सहभागी होता येणार आहे. ग्रँड फिनालेसाठीचे ग्रुमिंग मुंबईत होणार आहे. ग्रँड फिनालेत नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील विजेत्या श्रावणक्वीन्समध्ये 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' स्पर्धा रंगेल. यात विजयी होणाऱ्या स्पर्धकाला श्रावणक्वीनचा झळझळता मुकुट मिळणार आहे. या रंगतदार कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी युवा वाहिनीवर होणार आहे.

... सविस्तर वृत्त- २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी नदीवरील पुलासाठी ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबकेश्वररोडवरील कुबेर स्वामी पेट्रोलपंपामागील नंदिनी नदीवरील पुलासाठी महापालिकेने दीड कोटीहून अधिक रकमेचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच या पुलाचे काम हाती घेण्यात येईल, असे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

मळे परिसरात जाणारा नंदिनी नदीवरील हा पूल पूर्णपणे ढासाळला होता. मागील वर्षी पूल वाहून गेल्याने तत्कालीन प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देत पुलाची मागणी केली होती. नगरसेविका हर्षदा गायकर यांनीदेखील नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती. 'मटा'नेदेखील वेळोवेळी या पुलाच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर या पुलासाठी निधी मंजूर केला आहे.

कुबेर स्वामी पेट्रोलपंपामागील पुलाचा सातपूर, पिंपळगाव व चुंचाळे शिवारात असलेल्या मळे परिसरात जाण्यासाठी वापर केला जातो. परंतु, अनेक वर्षांपासून या पुलाची दुरवस्था झालेली असल्याने येथे नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून केली जात होती. गेल्या वर्षी या पुलाचा भराव वाहून गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करीत तो वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, यावर्षी पुन्हा झालेल्या जोरदार पावसात पुलाला मोठे भगदाड पडले आहे. पर्यायाने तीन गावांतील रहिवाशांना मळे परिसरात जाण्यासाठी अंबड लिंकरोडवरील जाधव टाऊनशिपच्या रस्त्याने फेरा मारून जावे लागत आहे.

मागील वर्षी नंदिनी नदीवरील पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. महापालिकेकडे संबंधित पुलालासाठी प्रस्तावही सादर केला. आता महापालिकेने निधी मंजूर केल्याने नवीन पूल झाल्यावर त्याचा फायदा परिसरातील रहिवाशांना मिळणार आहे.

-माधुरी बोलकर, नगरसेविका

(लोगो : शुभ वार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल आयुक्तालयासमोर कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दिल्लीत भारतीय संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच अन्य मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येथील विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वासमोर निदर्शने करण्यात आली. पक्षातर्फे महसूल उपायुक्त डॉ. दिलीप स्वामी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले.

दिल्लीत भारतीय संविधान जाळल्याची घटना नुकतीच घडली. संविधान जाळणाऱ्यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला लेखी निवेदन दिले. राज्यघटनेबाबत देशभरातील शाळा-महाविद्यालयांत जनजागृती करण्यासाठी आणि राज्यघटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी खास उपक्रम सरकारतर्फे राबविण्यात यावा, अशी मागणीही यावेळी या निदर्शकांनी केली. याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनात आंदोलकांवर कलम ३५३ नुसार गुन्हे दाखल करून या कलमाचा दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले गेले आहे. या कलमाखालील गुन्हे मागे घेण्यात यावेत, नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्ब बनविण्याच्या साहित्याच्या गुन्ह्यांतील संशयित संबंधित असलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही यावेळी या निदर्शकांनी केली. या आंदोलनात पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य राजू देसले, शहर सचिव महादेव खुडे, प्रताप भालके, विमल पोरजे, राजपालसिंग शिंदे, जिल्हा सहसचिव दत्तू तुपे, व्ही. डी. धनवटे, ज्योती नटराजन, शिवनाथ जाधव, सुभाष गवारे, नामदेव बोराडे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग १० ‘ड’च्या रिक्त जागेसाठी होणार पोटनिवडणूक

$
0
0

राज्य निवडणूक आयोगाला मनपा पाठविणार अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० 'ड' या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी प्रभाग क्र. १३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्र. १० 'ड' मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेक सुदाम नागरे यांचे २९ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. नागरे यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्या संदर्भातील अहवाल महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी स्थानिक नेत्यांसह भाजपची इच्छा आहे. परंतु, नुकत्याच प्रभाग क्र. १३ 'क' मधील मनसे नगरसेविका सुरेखा भोसलेंच्या निधनानंतर तेथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले होते. ही निवडणूक बिनविरोध झाली नसल्याने प्रभाग क्र. १० चीही पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजा पुरे‘पूर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरणासह हरणबारी आणि केळझर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीसह मोसम आणि आरम नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यात काश्यपी, आळंदी, हरणबारी, केळझर, भावली, वाघाड, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा पावसाने जोरदार कमबॅक केल्यामुळे धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होऊ लागली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० वाजता १०१२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत २०२४ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. काश्यपी धरणातील पाणीसाठाही १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने तेथूनही दुपारी एक पासून ४०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गंगापूर, काश्यपीसह दारणा धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी पात्रातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून सकाळी सहा वाजेपासूनच ४ हजार १७२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. तर भावली धरणातूनही २०८ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. नांदूर मध्यमेश्वर येथून ६ हजार ३८३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

२४ तासांत ८१४ मिमी पाऊस

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वाधिक १०१ मिलीमीटर पाऊस पेठ तालुक्यात पडला. सुरगाण्यात ८६, इगतपुरीत ६५, मालेगावात ६४, नांदगावात ६०, येवल्यात ५९, कळवण आणि बागलाणमध्ये प्रत्येकी ५७, चांदवड आणि निफाडमध्ये प्रत्येकी ५४ तर त्र्यंबकेश्वरला ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. देवळ्यात ४३.४ मिलीमीटर पाऊस झाला असून नाशिक तालुक्यात २७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिन्नर आणि दिंडोरीत मात्र पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून, अनुक्रमे २६.४ आणि १४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शहरात ३९.१ मिमी पाऊस

शहरात गुरुवारपासून पावसाने मुक्काम ठोकला असून, गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये शहरात ३३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ५.६ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरूच होता. बागलाण आणि मालेगावातही पावसाचा जोर अधिक असल्याने आरम आणि मोसम नदीला पुर आल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा कर्मचारी रस्त्यावर उतरतील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित करण्याच्या शासनपातळीवर हालचाली चालू आहेत. समाज कल्याण विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित झाल्यास कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे मूळ आस्थापना समाज कल्याण विभागाकडून हस्तांतरित करण्यात येऊ नये] अन्यथा समाजकल्याण कर्मचारी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन पुकारतील असा इशारा समाज कल्याण कर्मचारी संघटनचे प्रदेशाध्यक्ष शांताराम शिंदे यांनी दिला. सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना विजाभज, इमाव, विमाप्र या विभागाला जोडण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. पूर्वीचा समाज कल्याण विभाग, गेल्या काही वर्षांपासून सामाजिक न्याय विभागाच्या नावाने ओळखला जात आहे. या विभागामार्फत पूर्वीपासूनच मागासवर्गीय कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात. वरचेवर आवश्यकतेनुसार योजनांमध्ये वाढ होत गेली. त्यामुळे योजना राबविण्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी या विभागाचे अनेकवेळा विभाजन केले आहे. त्यामुळे आता पुन्हा विभाजन केल्यास त्याला विरोध केला जाणार आहे.

शासनाने जर सामाजिक न्याय विभागाची मूळ आस्थापना हस्तांतरित केल्यास त्यास समाज कल्याण कर्मचारी संघटना कडाडून विरोध करणार आहे. संघटना महाराष्ट्र राज्यात या शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी व मूळ आस्थापना सामाजिक न्याय विभागाकडेच ठेवण्याकरिता तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

शंभर कर्मचाऱ्यांची 'ब्रह्मगिरी' प्रदक्षिणा

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाचे १०० पुरुष व महिला अधिकारी, कर्मचारी रविवारी १९ ऑगस्ट रोजी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणार आहेत. सन २०१२ पासून सातत्याने समाज कल्याण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल हे समाज कल्याण विभागात उत्साह वाढावा व चैतन्य निर्माण व्हावे यासाठी गेल्या सात वर्षांपासून विविध उपक्रमाचे आयोजन करतात. समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी २०१२ पासून 'ब्रह्मगिरी' ची प्रदक्षिणा करत आहेत. पहिल्या प्रदक्षिणेच्या वेळेस अवघे २० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर यात सातत्याने वाढ होऊन १०० अधिकारी, कर्मचारी या वर्षीच्या प्रदक्षिणेत सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे यांचे (वय ५९) मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यापासून गोडसे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवार सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवार (दि. १८) सकाळी ११ वाजता संसरी येथील दारणा नदीकाठी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. उत्कृष्ट मल्ल म्हणून लहानपणापासून गोडसे यांची कारकीर्द बहरात गेली. चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने शिवसेनेचे त्यांना बाळकडू मिळाले. संसरी गावचे शाखाप्रमुख ते खासदार असा त्यांच्या जीवनप्रवास झाला. तरुणपणीच त्यांचे उमदे व भारदस्त नेतृत्व बघून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची (१९८४-१९९६) जबाबदारी सोपविली होती. नाशिक पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. याच दरम्यान शिवसेना संपर्कप्रमुख छगन भुजबळ यांचे नेतृत्त्वाखाली त्यांची जिल्ह्यात खेडोपाडी शिवसेनेच्या अनेक शाखा उघडल्या. शिवसेना प्रत्येक घरात घरात पोचविण्याचे काम त्यांनी केले. आपल्या बुलंद आवाज व भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे जिल्ह्यातील राजकारणात राजाभाऊंनी वेगळाच ठसा उमटविला होता.

अन् मिळाले खासदारकीचे तिकीट

नाशिकला १९९४ मध्ये शिवसेनेचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन राजाभाऊंच्या कारकिर्दीत झाले. या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांनी आई जगदंबेला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'बाई दार उघड' अशी हाक दिली होती. १९९४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी १९९६ मध्ये खासदारकीचे तिकीट दिले. डॉ. वसंत पवार यांचा पराभव करून ते खासदार झाले. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते.

गावाशी नाळ जुळलेली

ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला जिल्हाप्रमुख म्हणून राजाभाऊंची महाराष्ट्रासह देशात ओळख होती. त्यांच्या कारकीर्दीत सहकार क्षेत्रातही मुसंडी मारली अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, बाजार समिच्या, ग्रामपंचायत, सहकारी बँकांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे काम त्यांनी केले. अल्पावधीत ते बाळासाहेबांचे लाडके झाले. मीनाताई ठाकरे तर त्यांना मानसपुत्र मानत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय पध्दतीने डांगी गायींचे संवर्धन

$
0
0

राज्यभर संवर्धन चळवळ उभारण्याचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी गुजरातमधील गीर गायीचा वापर वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींकडे दुर्लक्ष होत आहे. डांगी गायींचे योग्य संगोपन झाले नाही तर काही डांगी गायींची संख्या कमी होऊ शकते. असे होऊ नये, म्हणून राज्यातील तीनशे गायींचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन केले जाईल. तसेच डांगी गायींच्या संवर्धनासाठी राज्यभरात चळवळ उभारली जाईल, असा निर्णय राज्यव्यापी महासंमेलनात घेण्यात आला.

सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे डांगी गायींच्या संवर्धनासाठी शुक्रवारी कालिका मंदिर हॉलमध्ये राज्यव्यापी महासंमेलन झाले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पशुसंवर्धन सहआयुक्त धनंजय परकाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे आणि निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी संभाजी आव्हाड उपस्थित होते. यावेळी सहआयुक्त परकाळे यांनी उपस्थितांना डांगी गायींची माहिती सांगितली. राज्यातील डांगी गायींची संख्या वाढविण्यासाठी चळवळ उभी रहावी. यामध्ये शेतकरी तसेच दूध उत्पादकांचा लक्षणीय सहभाग असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील डांगी गायींचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन झाल्यास या गायी दिवसाला १० ते १२ लिटर दूध देऊ शकतात. सध्या महाराष्ट्रातील डांगी गायींचे संगोपन होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरातमधील गीर गायींचा वापर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डांगी गायींची संख्या कमी होऊ शकते, अशी भीती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिक, अहमदनगर, ठाणे या भागातील शेतकरी, दूध उत्पादक या महासंमेलनास उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी योगेश सामृत, जगमोहन परदेशी, संदीप सोनवणे, सत्यजित शहा, हेमंत काकडे यांनी महासंमेलनाचे संयोजन केले होते.

पशुवैद्यांची मदत घेणार

सह्याद्री डांगी गो संवर्धन संस्थेतर्फे पहिल्या फेजमध्ये ३०० पैकी ५० डांगी गायी दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना संगोपनासाठी देण्यात येणार आहेत. या गायींचे डाएट प्लॅन आखले जाणार आहे. त्यासाठी पशु डाएटिशिअन नेमला जाणार आहे. तसेच डांगी गायींच्या तब्येतीची तपासणी व काळजी घेण्यासाठी पशुवैद्यांची मदत घेतली जाणार आहे. संस्थेच्या कार्यालयात प्रत्येक गायीची संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. त्यातून गायींची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जातील, असे संस्थेतर्फे संमेलनात सांगण्यात आले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने गरोदर महिला ठार

$
0
0

इंदिरानगर : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने वडाळा गावातील रिंगरोडवरून रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे या अपघातात महिलेच्या पोटातील नऊ महिन्याचे अर्भकही बाहेर पडले. त्याचाही मृत्यू झाला.

वडाळा गावातील पांढरी आई देवी चौकात गुरुवारी (दि. १६) रात्री अपघात झाला. इरोम इरफान शेख (१९) असे यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वडाळा गावमार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या ट्रकने (एम. एच. १८ बी. ए. ००४८) तिला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून महिला ती काही फुटापर्यंत चिरडली गेली. या घटनेने वडाळा गाव हादरून गेला. अपघाताची माहिती पोलिस व रुग्णवाहिकेला देण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद शेषराव बुधवंत (३८) ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा शोध घेत अटकही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा देणार स्वच्छतेचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साकारण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छ भारत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ ते १५ सप्टेंबर या काळात विविध माध्यमांतून हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या असून स्वच्छता शपथ, स्वच्छ भारत गीतांचे प्रसारण, वादविवाद स्पर्धा आदी उपक्रम होणार आहेत. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत.

'स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे', असा संदेश देत ही सवय पुढील पिढीमध्ये रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ सप्टेंबर रोजी शाळा व शिक्षण संस्थांनी स्वच्छता शपथ घ्यायची आहे. पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, पालक, शिक्षक यांच्या बैठका घेण्यात येणार असून, स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत 'विद्यार्थी राजदूत'ची नेमणूक करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांवर त्यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. या पंधरवड्याअंतर्गत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर, शौचालय स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images