म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या तक्रारींची संख्या गतवर्षीपेक्षा यंदा वाढते आहे. तक्रारी दाखल करून घेतल्या जात असल्याचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरात मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत विनयभंगाच्या ६९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यंदा हा आकडा जुलै महिन्याअखेरीस १२० इतका झाला आहे. विशेषत: शाळकरी मुली किंवा अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की १२० गुन्ह्यांपैकी ११७ गुन्ह्यांमध्ये तपास करून संशयितांना अटक करण्यात यश मिळाले आहे. तक्रारदाराची तक्रार दाखल होत असून, त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या विचार उपयोगी पडणार नाही. मोबाइल, इंटरनेट यामुळे तसेच सोशल साईड्सच्या माध्यमातून देखील विनयभंगाचे प्रकार घडतात. मागील दोन वर्षांपासून शाळा कॉलेजमध्ये पोहचून पोलिस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. दोन कुटुंबातील वादांमध्ये महिला विनयभंगाची तक्रार करतात. बऱ्याचदा एकमेकांची जिरवण्यासाठी तक्रारी येतात. -- वाढदिवसाच्या बहाण्याने अपहरण अन् विनयभंग वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने इंदिरानगर परिसरातील युवतीला पळवून डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रवी बेंडकुळे (रा. आनंदवल्ली) असे संशयिताचे नाव आहे. ओळखीचा फायदा घेत १३ ऑगस्ट रोजी संशयित युवतीला इंदिरानगर येथील सुखदेव शाळेजवळ भेटला. तेथून वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवरून मांजरमाळ (हरसूल) येथे त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवून मावशीला लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर गेल्या बुधवारी (ता.१५) रात्री दोन वाजता संशयित आला आणि त्याने तिला, तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरडाओरडा केला तर डोंगरावरून फेकून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात अपहरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. .... अल्पवयीन मुलीचा विनयभंग दुचाकीवरून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयितांविरोधात पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास युवती एबीबी सर्कलकडून पवननगरकडे येत असताना संशयित कुणाल (पूर्ण नाव नाही) याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तसेच, तिच्याकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली. युवतीने त्यास नकार दिला असता संशयिताने तिचा हात धरून दुचाकीवरून ओढत अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. -- वर्ष - गुन्हा दाखल - गुन्हा उघड २०१७- ६९ - ६५ २०१८- १२० - ११७ (आकडेवारी जुलै महिन्यापर्यंतची)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट