Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गंध टिळ्याची कमाई शेकड्यात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्रावणामुळे पंचवटीतील शिव मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची सध्या गर्दी होत आहे. या गर्दीत कपालेश्वर मंदिराच्या आवारात दहा-बारा छोटी मुले आणि मुली हातात प्लास्टिकचे डबे घेऊन त्यातील अष्टगंध विविध प्रकारच्या ठशांच्या डिझाइनमध्ये भाविकांच्या कपाळी लावण्याचे 'आग्रही काम' उत्साहाने करताना दिसून येत आहेत. अशा गंध टिळ्यातून दिवसभरात ते किमान शंभर रुपयांपेक्षा जास्त कमाईदेखील करीत आहेत.

सण आणि उत्सवांनी भरलेल्या व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात भक्तिरस ओथंबून वाहत आहे. मंदिरांमध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गोदाकाठाच्या परिसरात भाविक आणि पर्यटकांची होत असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन येथे विविध प्रकारचे छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे कोणत्या वस्तूला कधी किती पसंती मिळेल हे सांगता येत नाही. अशा प्रकारचा एक छोटा पण सहज नजरेत भरणारा व्यवसाय लहान मुला-मुलींनी सुरू केला आहे. गोदाकाठाच्या आसपासच्या भागात पाल टाकून राहणाऱ्या या मुलांनी त्रिशुल, ओमकार, शिवलिंग अशा विविध प्रकारच्या डिझाइन तांब्याच्या तारेपासून तयार केल्या आहेत. प्लास्टिकच्या छोट्या डब्यात अष्टगंधात बुडवून हे विविध आकाराचे ठसे आग्रह करून भाविकांच्या कपाळी लावण्याचे काम ते करीत आहेत. असंख्य भाविकही मोठ्या आवडीने कपाळावर अशा प्रकारचे गंध लावून घेत आहेत. अशा भाविकांकडून या मुलांना दिवसभरात शंभर रुपयांहून अधिकची कमाईदेखील होत आहे.

युवावर्गाकडून मिळतेय पसंती

या बच्चेकंपनीकडून भाविकांना डिझाइनमधील गंध लावल्यानंतर त्यांच्याकडून एक-दोन रुपयांची मागणी केली जाते. नाही मिळाले, तर ते थोडे नाराजही होतात. अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यास त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरची फेरी करून आलेल्या भाविकांनी विशेषतः युवावर्गाने कपाळावर अशा प्रकारचा डिझाइनमधील गंध लावून घेत त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंदही गोदाकाठाच्या परिसरात घेतला.

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मालेगाव येथील सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याने जिल्ह्यात निर्माण झालेले वादंग अजूनही शांत होऊ शकलेले नाही. या प्रकरणात संघटनात्मक दबाव टाकत कामावर हजर न झाल्याचा ठपका ठेऊन दोन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी न घेता मालेगाव येथे गंभीर तक्रारी असतानाही आढावा बैठकीस मे महिन्यात अनुपस्थित राहिलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी सहायक प्रकल्प अधिकारी मयूर पाटील व तांत्रिक अधिकारी रजनीकांत सूर्यवंशी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी सेवेतून कार्यमुक्त केले होते. परंतु, यावरून मोठा वाद निर्माण झाला. संबंधित कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने त्यांची आपसी बदली केली. परंतु, नाशिक मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे सहायक प्रकल्प अधिकारी सचिन पाटील व मयूर पाटील यांनी अर्ज तसेच निवेदन देऊन या अन्यायाविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही दोन्ही कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने संघटनात्मक दबाव टाकत प्रशासकीय कामात अडचणी निर्माण करण्याचा ठपका ठेवत त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या 'सीईओं'नी याबाबत मे महिन्यात घेतलेला निर्णय योग्य होता, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी, लुटीतील संशयितांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष पथकाने तीन सराईतांना अटक केली. यामुळे कळवण शहरातील दोन घरफोड्यांसह त्र्यंबकेश्वर येथील दाम्पत्यास लुटल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. घरफोडीत संशयिताकडून स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून, लुटमारीतील अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

कळवण शहरात गेल्या आठवड्यात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चोरट्यांच्या मागावर असतांना विशेष पथकाचे उपनिरीक्षक अविनाश गडाख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विजय उर्फ विजू निंबाजी बाविस्कर (रा. अकलाडे - मोराणे, ता. जि. धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने कळवण सरकारी दवाखाना भागात भिका सदू भोई (रा. लोंढानाला ता. जि. धुळे) या साथिदाराच्या मदतीने मेडिकल आणि अ‍ॅटोमोबाइल दुकान फोडल्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एमएच १५ ई ७६७० ही स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. संशयिताचा जोडीदार भिका भोई सध्या साक्री (ता. धुळे) पोलिसांच्या ताब्यात असून, त्यास घरफोडीच्या गुह्यात अटक करण्यात आली आहे. तिकडचा तपास पूर्ण होताच कळवण पोलिस त्यास ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, पथकाच्या रविवारी (दि. २६) हाती लागलेल्या मयुर दत्तू बोडके (२०, रा. तळवाडे ता. त्र्यंबकेश्वर) व तुषार मंगळू टोपले (१९, रा. राजेवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी अनिल रंगनाथ भगत (रा. मुळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) आणि भूषण कसबे (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांच्या समवेत दुसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकश्वर येथे एका दाम्पत्यास लुटले होते. संशयितांनी चाकूचा धाक दाखवित महिलेच्या अंगावरील दागिण्यांसह रोकड आणि मोबाइल पळविला होता. पोलिस संशयितांच्या उर्वरित साथीदारांचा माग काढीत आहे. ही कामगिरी उपनिरीक्षक गडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक प्रमोद मंडलिक, अहिरराव, शिपाई कुणाल मराठे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिणींवर अत्याचार; चार वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रेमलाल छोटेलाल राजपूत (५५, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) यास कोर्टाने दोषी ठरवत चार वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी मंगळवारी हा निकाल सुनावला. अत्याचाराची घटना ६ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. आरोपी प्रेमकुमार राजपूत हा गल्लीतील चार व सात वर्षांच्या दोन बहिणींना खेळविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरामध्ये बोलावून घ्यायचा व त्याच्यासोबत लैंगिक चाळे करायचा. हा प्रकार या मुलींच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी राजपूतविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक संध्या तेली यांनी केला. या खटल्यात सरकारी वकील योगेश कापसे यांनी काम पाहिले. पीडित मुली, त्यांची आई व अन्य पाच असे आठ साक्षीदार सरकारी पक्षाने तपासले. सबळ साक्षी पुरावे कोर्टासमोर आल्याने राजपूतला दोषी ठरवत कोर्टाने चार वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची रक्कम ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलींच्या आईला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पैरवी अधिकारी हवालदार के. के. गायकवाड, एम. के. माळोदे यांनी कोर्टातील कामकाजाची बाजू सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएनआयचा उद्या वर्धापनदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय) या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेच्या नाशिक शाखेचा पहिला वर्धापनदिन गुरूवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सातपूर येथील हॉटेल बीएलव्हीडी येथे सायंकाळी साडेसात वाजता साजरा करण्यात येणार आहे. ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लिमिटेडचे सीओओ राजीव पपनेजा या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष सुमीत तिवारी यांनी दिली. नाशिकमध्ये एका वर्षात १२ कोटींची उलाढाल करणारा बीएनआय अॅबंडन्स हा सर्वात पहिला चॅप्टर असल्याची माहिती भावेश पटेल आणि संदीप पालवे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अविश्वासा’ला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भरमसाठ करवाढीसह पदाधिकारी व नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ सत्तारुढ भाजपनेचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ महापालिकेतील सर्वात मोठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना मैदानात उतरली आहे. अविश्वास प्रस्तावाला कर्मचारी संघटनेसोबचत सफाई कर्मचाऱ्यांच्या वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींपाठोपाठ पालिकेतील कर्मचारी संघटनाही आयुक्तांचया विरोधात गेल्याने मुंढेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

महापालिका आयुक्त मुंढेंनी नाशिकवर लादलेल्या अवाजवी करवाढीच्या मुद्यावर सत्तारूढ भाजपने आयुक्त मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून, त्यावर येत्या शनिवारी (दि. १) होणाऱ्या विशेष महासभेत चर्चा होणार मुंढेंचा फैसला होणार आहे. तुर्तास सत्तारुढ भाजपसह, काँग्रेस, मनसे या पक्षांचा थेट पाठिंबा असला तरी, शिवसेना सभागृहात आपली भूमिका मांडणार आहे. लोकप्रतिनिधींनी आयुक्तांविरोधात अविश्वासाचे हत्यार उपसल्यानंतर पालिकेतील दोन मोठ्या संघटनाही या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेने याआधीच आयुक्तांविरोधात दंड थोपटत संपाचा इशारा दिला होता. कामाच्या ताणामुळे जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली पालिकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समितीची स्थापना करीत प्रशासनाविरोधात संपाचे हत्यार उपसले होते. प्रशासनाने या कर्मचारी संघटनांच्या मागण्याची आश्वासनावर बोळवण केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु, आता लोकप्रतिनिधींनी मुंढेंविरोधात पुकारलेल्या अविश्वासाचे या कर्मचारी संघटनांकडून समर्थन केले जात आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे, वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुरेश मारू यांनी मंगळवारी (दि. २८) महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांची भेट घेत अविश्वासाला पाठिंब्याचे लेखी पत्र सादर केले. आयुक्तांविरोधात थेट अविश्वास प्रस्तावाला कामगार संघटनांनी पत्र देण्याची महापालिका इतिहासातील पहिलीच घटना असून, या संघटनांनी घेतलेल्या भूमिकांमुळे आयुक्तांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हॉकर्स संघटनांही मुंढेंविरोधात

भाजपने आणलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने हॉकर्स-टपरीधारक कृती समितीही मैदानात उतरली आहे. कृती समितीचे पदाधिकारी सय्यद युनूस, शशिकांत उन्हवणे, शिवाजी भोर यांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेत मुंढेंविरोधातील अविश्वासाचे समर्थन केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांनुसार महापालिकेने हॉकर्स, टपरीधारकांना संरक्षण देण्याची गरज असताना तसेच त्यांच्यासाठी सुयोग्य हॉकर्स झोन उभारण्याची गरज असताना आयुक्त मुंढे यांनी एकतर्फी कारवाई करत गोरगरीब हॉकर्स, टपरीधारकांचे संसार उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली. शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करून विक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्याला शासकीय सेवेत राहण्याचा अधिकार नाही. नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला कौल देऊन तो पारित करावा, असे आवाहन केले आहे.

आयुक्तांशी चर्चा केल्यानंतरही त्यांच्या कामगारविरोधी धोरणात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्यांच्या वागण्यामुळे कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व कामगार अविश्वास ठरावास जाहीर पाठिंबा देत आहोत.

- प्रवीण तिदमे, अध्यक्ष, कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज रक्तदान शिबिर

$
0
0

संस्थेचे आजी, माजी खेळाडू, क्रीडाशिक्षक घेणार सहभाग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे क्रीडापटूंचे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. आज, बुधवारी (दि. २९) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

हॉकीचे जादुगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय क्रीडादिन. गेल्या पाच वर्षांपासून मराठा विद्या प्रसारक समाज व नाशिक जिल्ह्यातील खेळाडू रक्तदानाने हा दिन साजरा करीत आहेत. या शिबिरात संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील आजी, माजी, आंतरराष्ट्रीय, राज्य, राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये भाग घेतलेले खेळाडू, क्रीडाशिक्षक रक्तदान करून एका आगळ्यावेगळ्या सामाजिक बांधिलकीने राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करणार आहेत. शिबिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कैलास चव्हाण, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी. दरेकर, संस्थेचे क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त खेळाडू, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. आडगाव येथे होणाऱ्या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची ने-आण करण्यासाठी संस्थेने बसची व्यवस्था केली असून, गंगापूररोड येथील संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय येथून या बस शिबिरस्थळी जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीबीटीविरोधात एसएफआयचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वसतिगृहांमध्ये निवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना नको असलेला डीबीटी (डायरेक्ट टू बेनिफिट) निर्णय विद्यार्थ्यांवर लादण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांपाठोपाठ मंगळवारी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) आदिवासी विकास आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी आदिवासी विद्यार्थी याच मागणीसाठी एकवटले असताना सरकारकडून त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याने हे आंदोलन पुन्हा हाती घेण्यात आले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी याच मागणीसाठी केलेले आंदोलन सरकारने चिरडून काढल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यभरातून एकजूट साधत विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. मात्र, हा निर्णय मंत्रालय स्तरावरून बदलला जाऊ शकतो, असे सांगत आयुक्तालयाने केवळ विद्यार्थ्यांच्या भावना शासनाला पोहचविण्याची भूमिका घेतली होती. पुढील मंत्री आणि सचिवांच्या भेटीत विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली होती. यानंतर ढिल्या पडलेल्या आंदोलनात आता या संघटनेने उडी घेतली आहे.

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेकडो विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर गर्दी करीत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी परिसरात त्वरित पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. आंदोलकांना आदिवासी विकास भवनच्या आवारात येण्यास प्रशासनाने मज्जाव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी गेटजवळच ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली. काही वेळाने आंदोलकांनी गेट तोडून भवनच्या आवारात प्रवेश केला. त्यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीस वेढा घालून पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण दिले.

सरकारच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये अनेक बाबींची कमतरता आहे. येथील निवासी विद्यार्थ्यांना देय असणारा मासिक निर्वाह भत्ता वर्षानुवर्षे मिळत नाही, वसतिगृहात शैक्षणिक साहित्यासाठी सुरू असणारी थेट लाभाची योजना अपयशी ठरली आहे आदी आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांशी भेट घेत चर्चा केली. हा प्रायोगिक तत्त्वारील निर्णय असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा शासन विचार करू शकते. आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भावना शासनाला कळविल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

घोषणाबाजी अन् गीतांचा जागर

आंदोलनकर्ते भवनच्या आवारात गेट तोडून शिरले त्यावेळी कार्यालयात प्रशासकीय बैठका सुरू होत्या. त्यामुळे संघटनेच्या शिष्टमंडळाला त्वरित अधिकाऱ्यांची भेट दिली गेली नाही. या आवारातच विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली. संघटनेच्या नेत्यांनी शासनाच्या धोरणांचा यावेळी जोरदार निषेध केला. आंदोलकांनी डफाच्या तालावर विद्यार्थी चळवळीतील गाणी सादर करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यावर झुकलेल्या फांदीने अपघातास आमंत्रण

$
0
0

रस्त्यावर झुकलेल्या फांदीने अपघातास आमंत्रण (फोटो)

सातपूर : त्र्यंबकेश्वररोडवरील व्हिक्टर बसथांबा परिसरातील जुन्या वृक्षाची फांदी अगदी रस्त्यावर झुकली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, महापालिकेचा उद्यान विभाग याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या अगदी समोरच अशी स्थिती असतानाही उपाययोजना होत नसल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त होत असून, उद्यान विभागाने ही फांदी त्वरित हटवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

--

'अत्तदीप'तर्फे वृक्षारोपण

जेलरोड : अत्तदीप भव: मेडिकोज सोशल वेल्फेअर संस्थेतर्फे फाळके स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पिंपळ आणि वडाची झाडे लावण्यात आली. संस्थेचे अध्यक्षा डॉ. मनीषा जगताप, डॉ. रेश्मा घोडेराव, डॉ. अनंत भुजबळ, डॉ. नानासाहेब खरे, डॉ. परिक्षित निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, डॉ. विशाल जाधव, डॉ. विशाखा तायडे, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. नीलेश फुलझेले, डॉ. हेमंत पवार यांच्यासह निवृत्ती साळवे आदींची उपस्थिती होती.

--

पूरग्रस्तांना मदत

सातपूर : नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनने मदतीचे आवाहन केल्याने नाशिककरांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करीत गृहोपयोगी वस्तू व खाण्याचे पदार्थ जमा केले. सिडकोतील माऊली लॉन्स येथून या वस्तू केरळला पाठविण्यात आल्या. गेल्या ३५ वर्षांपासून मल्याळी असोसिएशन कार्यरत असून, नाशिककरांना मदतीचे आवाहन केल्यावर भरभरून मदत केरळच्या पूरग्रस्तांसाठी दिली असल्याचे अध्यक्ष गोकुलम पिल्ले यांनी सांगितले.

--

मदतफेरीस प्रतिसाद

नाशिक : केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मविप्रच्या ओझर कॉलेजतर्फे मदतफेरी काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी भरभरून मदत केली. फेरीमध्ये प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, एनएसएसप्रमुख प्रा. डी. एस. बोराडे, विद्यार्थी कल्याणप्रमुख प्रा. आर. डी. पाटील, सिनेट सदस्या डॉ. कल्पना आहिरे, उपप्राचार्य प्रा. एन. टी. दाते, प्रा. स. ल. वाघ, प्रा. एस. ई. ब्राह्मणकर, प्रा. एस. डब्ल्यू. संधान, प्रा. पी. सी. गांगुर्डे, प्रा. भास्करराव हलध यांच्यासह एनएसएस आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांवर स्पर्धा, पण एकही प्रवेशिका नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये घोळ होणे ही नवी बाब नाही. परंतु, यंदा या स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका पोहोचली नसल्याने स्पर्धा कशी होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे नाशिकमधून अद्याप एकही अर्ज पोहोचला नाही. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या १५ नोव्हेंबरपासून दरवर्षीप्रमाणे राज्य नाट्य स्पर्धा होणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी रंगकर्मींनी १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रवेशिका पाठविणे गरजेचे आहे. या स्पर्धेत दरवर्षी शहरातील २० ते २२ संस्था सहभागी होत असतात. यापूर्वी अर्ध्या लिहून झालेल्या संहितांच्या आधारे दाखल केलेल्या प्रवेशिकाही ग्राह्य धरल्या जात होत्या. मात्र, यंदा स्पर्धेच्या प्रवेशिकेसोबतच नाटकाची संपूर्ण संहिता सादर करणे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक संस्थांची नाटके अद्याप लिहून झालेली नाहीत. काही रंगकर्मींच्या संहिता तयार झाल्या असल्या, तरी त्यांना संस्थांची शोधाशोध करावी लागत आहे. या सगळ्या कसरतीत अनेक रंगकर्मींना सांस्कृतिक खात्याकडे प्रवेशिका पाठविण्यास उशीर झाला आहे. परिणामी, अद्याप एकही प्रवेशिका सांस्कृतिक खात्याला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सांस्कृतिक खात्याकडून स्थानिक समन्वयकांना विचारणा करण्यात आली. त्यावर समन्वयक राजेश जाधव यांनी चौकशी केली असता, शहरातील आठ ते दहा नाट्य संस्थांनी आपण प्रवेशिका पाठविल्याचे सांगितले. मात्र, त्या सांस्कृतिक खात्यापर्यंत का पोहोचल्या नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्य संस्थांनी टपाल वा कुरिअरद्वारे प्रवेशिका पाठविल्या असून, मधल्या काळात शासकीय सुट्ट्या आल्याने प्रवेशिका पोहोचल्या नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या गोंधळामुळे यंदा स्पर्धेत किती नाटके सादर होतील, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. प्रवेशिका सादर करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे मुदत वाढवून दिली जाण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

अटी-शर्तींमुळे होतोय उशीर

स्पर्धेतील संहितांविषयी यंदापासून बदललेले नियम, रंगकर्मींना करावी लागणारी संस्थाची शोधाशोध आदी कारणांमुळे अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. या सावळ्या गोंधळामुळे येत्या राज्य नाट्य स्पर्धेत किती नाटके सादर होतील, याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

काही रंगकर्मींनी अद्याप संहिता लिहीत असल्याचे सांगितले आहे. बहुतेकांनी शेवटच्या आठवड्यात प्रवेशिका पाठविल्या असून, शासकीय सुट्ट्या आल्याने त्या मुंबईला पोहोचल्या नसाव्यात. त्या ३१ ऑगस्टपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

- राजेश जाधव, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसर्तकतेमुळे फसली चेन स्नॅचिंग

$
0
0

कोणार्कनगरला संशयित ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास सर्तक नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष प्रकाश खैरनार (३४, रा. चंदनपुरी, ता. मालेगाव) असे संशयित चेन स्नॅचर्सचे नाव आहे. चेन स्नॅचिंगची घटना कोणार्कनगर भागात घडली. ज्ञानेश्वर सोसायटीत राहणाऱ्या वर्षा संतोष कोठुळे या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास परिसरातील आशादीप बंगल्यासमोरून पायी जात असतांना संशयित संतोषने हात साफ करण्याचा प्रयत्न केला. संशयिताने पाठीमागून येत कोठुळे यांच्या गळ्यातील सुमारे २४ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. ही घटना लक्षात येताच कोठूळे यांनी आरडाओरड केला. संशयित पोबारा करीत असतांना महिलेच्या आवाजामुळे सावध झालेल्या पुढील चौकातील नागरिकांनी त्यास पकडले आणि बेदम चोप दिला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

राजधानी चौकात सोनसाखळी लंपास

बहिणीसमवेत रस्ताने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना नाशिकरोड येथील राजधानी चौकात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आकांक्षा संदीप पाटील (रा. विजयनगर, देवळाली कॅम्प) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पाटील आपल्या दोन बहिणींना सोबत घेऊन सोमवारी (दि. २७) नाशिकरोड येथे आल्या होत्या. तिघी बहिणी सायंकाळी राजधानी चौकातील दत्त मंदिरासमोरून पायी जात असताना समोरून काळ्या दुचाकीवर चोरटे आले. चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंद्याविरोधात पंचवटीमध्ये कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

फुलेनगर, लक्ष्मणनगर, भराडवाडी, गौंडवाडी, गजानन चौक, तेलंगवाडी, शेषराव महाराज चौक या भागात पंचवटी पोलिसांनी छापे टाकून अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. कालिकानगर येथील गल्ली नं. १ येथे १२ हजार रुपयांचे ८०० लिटर दारू बनविण्याचे रसायन व ७२०० रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण १९२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाघाडी परिसरात अवैध जुगार खेळणाऱ्यांविरोधात मोहीम राबवून चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील ६६४० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली. रामकुंड गंगाघाटावरील गोदावरीच्या पात्रात वाहने धुणाऱ्यांवर कारवाई करीत त्यांची वाहने ताब्यात घेतली. गोदापात्रातील पाण्याचे प्रदूषण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडूच्या मूर्तींनाच पसंती!

$
0
0

शाडूच्या मूर्तींनाच पसंती!

विक्रेत्यांकडूनही पीओपीवर फुली; जीएसटी नसल्याने खरेदी आवाक्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंधरा दिवसांनी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध रूपातील आकर्षक गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी खरेदीला आता उधाण येऊ लगाले आहे. दरवर्षी पीओपीच्या गणेश मू्र्ती खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. पण, यंदा पीओपीच्या मूर्तींची संख्या कमी झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या हेतूने विक्रेत्यांनीच यंदा सर्वाधिक शाडू मातीच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत.

१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. हा मंगलमय उत्सव साजरा करण्याची तयारी आता सुरू झाल्याचे दिसते. शहरातील अनेक ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरेदीकडे भक्तांची पसंती असते. यामुळे यंदा ४० टक्क्यांहून अधिक शाडू मातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्ती खरेदी करू नका, याबाबत दरवर्षी प्रबोधन करण्यात येते. यानुसार यंदा पीओपींच्या मूर्तीच्या तुलनेत शाडू मातीच्या सर्वाधिक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा शाडू मातीच्या सुबक आणि आकर्षक मूर्तींची खरेदी करता येणार आहे.

पारंपरिक मूर्ती हव्यात

दरवर्षी विघ्नहर्ताच्या विविध रूपातील किंबहुना नव्या पद्धतीच्या मूर्तींना मागणी असते. मात्र, सामाजिक प्रबोधनातून गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे बाल गणेश, खंडेराय या अवतारातील गणेश मूर्तींची संख्या यंदा कमी आहे. दगडूशेठ, लंबोदर, सिद्धीविनायक यांसह गणपतीच्या पारंपरिक मूर्तीं हव्यात अशी मागणी यावर्षी होत आहे.

नाशिकच्या मूर्तींना पसंती

शहराबाहेरील मूर्तींपेक्षा नाशिकच्या मूर्तींना मागणी यंदा अधिक मागणी आहे. दरवर्षी शहरात पेण, पनवेल आणि अहमदनगरच शहरात तयार झालेल्या गणेश मूर्तींची विक्री होत असते. यावर्षी नाशिकमध्ये तयार केलेल्या गणेश मूर्तींना मागणी जास्त आहे. जिल्ह्यातील सिन्नर, लासलगाव, ओझर यांसह इतर भागातील मूर्तीकारांनी तयार केलेल्या सुबक आणि आकर्षक मूर्तींची विक्री होत आहे.

..

शाडू मातीच्या मूर्ती यावर्षी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पारंपरिक गणेश मूर्तींना मागणी जास्त असल्याने यंदा विविध रुपातील मूर्ती कमी आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टिकोनातून यावर्षी मूर्ती मागविण्यात आल्या आहेत.

- शैलेश कर्णिक, गणेश मूर्ती विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेटलॉस ग्रुप’तर्फे रविवारी व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढलेल्या वजनावर मार्ग काढण्यासाठी 'नाशिक वेटलॉस ग्रुप'च्या वतीने रविवारी, २ सप्टेंबर रोजी कालिदास नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते व संशोधक डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे 'विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या कार्यक्रमास महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व जिल्हा परिषदेचे 'सीईओ' डॉ. नरेश गिते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय श्रीकांत जिचकार यांनी सांगितलेल्या 'आहार पद्धती'मधून प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर संशोधन करून डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांनी स्वत:ची अशी संशोधन पद्धती विकसित केली आहे. या संशोधन पद्धतीनुसार कोणत्याही प्रकारचा डायट प्लॅन न करता, शारिरीक व्यायाम न करता विनासायास वजन कमी करणे सहज शक्य आहे. याबाबत या कार्यक्रमात सादरीकरणाच्या माध्यमातून, साध्या व सोप्या भाषेत डॉ. दीक्षित मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानाच्या विनामूल्य पासेससाठी विश्वास सहकारी बँकेच्या सर्व शाखा, कोकण पर्यटन, रेल्वे आरक्षण केंद्राजवळ, कॅनडा कॉर्नर व प्रसाद मिठाई, पंचवटी कारंजा येथे संपर्क साधावा, असे आवाहन समन्वयक संदीप सोनवणे, राजेंद्र कलाल, दत्ता भालेराव व संजय बारसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० दिवसाच्या आत दाखला घ्या!

$
0
0

पुणे विद्यापीठाची कॉलेजांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास दुसऱ्या विषयास किंवा अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यावेळी पूर्वीच्या कॉलेजचा दाखला जमा करण्यास विद्यार्थी टाळाटाळ करतात. तसेच तात्पुरता प्रवेश द्यावा, नंतर दाखला जमा करतो, असेही ते सांगतात. या माध्यमातून विद्यार्थी दोन्ही विषय किंवा अभ्यासक्रमाची परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. असे गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रवेशानंतर ३० दिवसांच्या आतच विद्यार्थ्यांना दाखला जमा करून घ्या, अशी सूचना पुणे विद्यापीठाने कॉलेजांना केली आहे.

काही विद्यार्थी अभ्यासक्रमात एक किंवा अधिक विषय अनुत्तीर्ण झाल्यास दुसऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची परीक्षा देणे शक्य नसते. तरीही काही विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमासोबतच अनुत्तीर्ण विषयाच्या परीक्षांसाठी अर्ज करतात. हा गैरप्रकार होऊ नये. त्याची नोंद सर्व कॉलेजांनी घ्यावी. कोणताही विद्यार्थी एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार नाही. तसेच दोन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणार नाही, याची दक्षता कॉलेजांनीच घ्यायला हवी. असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्राचार्यांनी स्वतः खबरदारी बाळगावी, अशी सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक पात्रता विभागाने संलग्नित सर्व कॉलेजांना केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी नव्याने दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. त्यांच्याकडून ३० दिवसांच्या आतच पूर्वीच्या कॉलेजचा दाखला घ्यावा. या नियमाची काटेकोरपण अंमलबजावणी सर्व कॉलेजांनी करावी, अशी सूचनाही विद्यापीठाने केली आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थी नव्याने प्रवेश घेतात तेव्हा त्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या कॉलेजचा दाखला ३० दिवसांच्या आत जमा करावा, असे कॉलेजच्या वतीने सांगितले जाते. परीक्षा काळात दाखला जमा केला नसेल तर विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनातर्फे सूचित केले जाते.

- व्ही. एन. सूर्यवंशी,

प्राचार्य, एचपीटी-आरवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी सहा अब्ज वर्षे सौरऊर्जा राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाशातून मिळालेल्या या ऊर्जेचा वापर करणे आपली जबाबदारी आहे. सौर ऊर्जा अविरत राहण्याजोगी आहे. अजूनसहा अब्ज वर्षे तरी सौर ऊर्जा राहणार आहे, असा आशावाद 'नासा'च्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी 'आकाशगंगा एक रहस्य' या विषयावर 'नासा'च्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांचे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये व्याख्यान झाले. सध्या तरुणांना अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याची तसेच खगोलशास्त्रात करिअर करण्याची इच्छा प्रकर्षाने जाणवते. या हेतूने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

जाखडी म्हणाल्या की, खगोलशास्त्र जगातले सर्वात जुने आणि प्रभावी शास्त्र आहे. या शास्त्रात फक्त पृथ्वीचाच अभ्यास केला जातो असे नाही. ब्रह्मांडातील आकाशगंगा शोधण्यापासून तर अनेक नवीन ग्रह, तारे तसेच अवकाशसृष्टीचा गाढा अभ्यास खगोलशास्त्रातून केला जातो. खगोलशास्त्राची पदवी घेतल्यास तरुणांना नोकरीच्या अनेक नामी संधींची कवाडे खुली होतात. हे शास्त्र नेहमी अपडेट होत असते. नव्याने होणारे संशोधन, वातावरणातील बदल, ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती यावरून खगोलशास्त्रातील संज्ञा बनतात. या क्षेत्रात तरुणांना सरकारी कार्यालये, संरक्षण मंत्रालय आणि अवकाश संशोधन संस्थेत नोकरीची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. व्याख्यानास रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सुधीर जोशी, सुजाता राजेबहादूर, सुधीर वाघ यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रह्मांड व्यापक संकल्पना

ब्रह्मांड ही अतिशय व्यापक संकल्पना आहे. ब्रह्मांडात अनेक आकाशगंगा, ग्रह आणि तारे आहेत. अंतराळवीर सतत या ग्रह आणि ताऱ्यांबाबतची नवीन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नातून पृथ्वीच्या आकाशगंगेचा मुख्य स्त्रोत असलेल्या सूर्य ताऱ्याच्या किरणांपासून सौर ऊर्जेचा नवा ऊर्जा स्त्रोत मिळाला. यामुळे जगभरात सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे तयारी होऊ लागली. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी सर्वजण आता अग्रेसर होत आहेत, असे अपूर्वा जाखडी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वान दंशाचे रोज ५० बळी!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात दिवसाला सरासरी ५० जणांना श्वान दंश झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. हे प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक ठरले. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात श्वानांनी तब्बल पाच हजार १४४ नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहचवले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिन्याकाठी साडेतीनशे ते चारशे व्यक्ती श्वान दंश झाल्यामुळे येतात. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण थेट सतराशेच्या घरात पोहचले. जुलै महिन्यात सुद्धा जवळपास चौदाशे जणांना श्वान दंश झाला. एकीकडे श्वान आक्रमक होत असताना सर्पदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली. जुनमध्ये १५८ तर जुलै मध्ये ८२ शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सर्पदंशाला सामोरे जावे लागले. इतर महिन्यात हे प्रमाण ३५ ते ४५ इतके कमी असते.

याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले की, श्वान या दिवसांमध्ये आक्रमक असतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या एकूण केसेसपैकी ५० टक्के केसेस शहरी भागातील असतात. श्वानांची संख्या वाढण्यासाठी आवश्यक ते वातावरण शहरी भागात निर्माण होते. भटक्या श्वानांची संख्या यामुळे झपाट्याने वाढते आहे. महापालिकेने सुरू केलेल्या निर्बीजीकरणासारख्या प्रकल्पांची शहरी आणि ग्रामीण भागात संख्या वाढणे आवश्यक असल्याचे मत डॉ. जगदाळे यांनी नोंदवले. भटक्या श्वानांची आक्रमकता त्यांच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुद्धा याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

सापांचे डंख वाढले

जानेवारी ते जुलै या कालावधीत सर्पदंशाचे तब्बल ४२९ प्रकार घडलेत. पावसाळ्यात जमिनीमध्ये पाणी गेल्यास सर्प जमिनीतून बाहेर पडतात. यानंतर ते कोरड्या जागेच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहचतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात सुद्धा सर्पाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दिसून येते. चांदशी येथील वेदिका मुरलीधर ठोमरे या चार वर्षांच्या बालिकेचा २३ ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे मृत्यू झाला. अंगणात खेळत असताना वेदीकाचा विषारी सर्पावर पाय पडला होता.

महिना- श्वान दंश- सर्प दंश

जानेवारी-४१६-३३

फेब्रुवारी-४०२-४५

मार्च-४०२-४५

एप्रिल-४१६-३३

मे-४१०-३०

जून-१७१६-१५८

जुलै-१३७३-८२

श्वान आणि सर्पदंशाचे प्रमाण पावसाळ्याच्या सुमारास वाढते. या पार्श्वभूमीवर औषधांचा मुबलक साठा ठेवण्यात येतो. एखाद्या ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे औषधसाठा उपलब्ध नसल्यास स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे,

आरोग्य उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रधानमंत्री आवास’अंतर्गत घरे द्या

$
0
0

नवापूर भेटीत मंत्री रावल यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नवापूर शहरात अचानक रंगावली नदीला आलेल्या महापूरामुळे नदीकाठावरील बऱ्याच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये नुकसान झालेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरे देण्यात यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृह नवापूर येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर तालुक्यातील रंगावली नदीच्या महापूरामुळे नुकसान झालेल्यांना मदत व पुनर्वसन करण्यासाठी बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरुपसिंग नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, शिरीष नाईक, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रातांधिकारी अर्चना पठारे, कार्यकारी अभियंता अनिल पवार, नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तहसीलदार सुनिता जऱ्हाड उपस्थित होते.

महापूरामुळे नुकसान झालेल्यांचे राहिलेले पंचनामे तातडीने करावे. पंचनामे करण्यासाठी कर्मचारी कमी पडत असतील तर महसूल व कृषी विभागाने तातडीने शहादा, तळोदा येथून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे व एकही आपादग्रस्त व्यक्ती नुकसान भरपाई वाचून राहणार नाही याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावे असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

पुलांचे ऑडिट करावे
नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील बाधीतांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु आता या आपादग्रस्तांना नगरपालिकेने व जिल्हा प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून शेड उभारून यांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शहरातील पुलांचे आठ दिवसांत तज्ज्ञांतर्फे ऑडिट करुन पूल वाहतुकीस लायक आहेत किंवा नाही नसतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मंत्री रावल यांनी रंगावली नदीत वाहून गेल्यामुळे मृत्यू पावलेल्या सैईदा हसन काकद या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची सांत्वन केले व त्यांना पुरेपूर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नवापूर येथून जाणारा सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम अतिशय धीम्यागतीने सुरू असून, या कामाबाबत मंत्री रावल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर

$
0
0

५६ गटांपैकी २८ गट महिलांसाठी आरक्षित

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात एकूण ५६ गटांपैकी २८ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकूण ५६ गट येतात. या आरक्षण सोडतीनुसार १५ गट खुल्या वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे तर, ३ अनुसूचित जाती, २३ अनुसूचित जमाती, १५ मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच, खुल्या वर्गांतील १५ गटांपैकी ६ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील १५ गटांपैकी ८ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या आरक्षण सोडतीत एकूण २८ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिग्गजांनी आपल्या मतदारसंघात कामाला सुरुवात केली होती. कोणता गट कोणासाठी आरक्षित होतो, याकडे दिग्गजांचे लक्ष लागून होते. आता आरक्षण सोडतीनंतर काहींना माघार घ्यावी लागणार असल्याचेही चित्र पाहायला मिळेल.

पंचायत समितीसाठी सोडत जाहीर
धुळे पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात धुळे पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत काढण्यात आले. धुळे पंचायत समितीअंतर्गत ३० गण येतात. या सर्व गणांमध्ये महिलांसाठी काही गण राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४, खुला प्रवर्ग ६ असे गण आरक्षित करण्यात आले आहेत.

पंचायत समिती आरक्षणानुसार गण
यापैकी अनुसूचित जाती........२
अनुसूचित जमाती................७
नागरिकांचा मागास प्रवर्ग........८
खुल्या गटासाठी...................१३
एकूण गण...........................३० गण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहंकाराची लढाई

$
0
0

अहंकाराची लढाई

-दिलीप फडके

सध्या नाशिक आणि नाशिककर अस्वस्थ आहेत. मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या महापालिकेत सुदोपसुंदी सुरू झालेली आहे. एकूणच सगळा घटनाक्रम दुर्दैवी आहे आणि तो टाळता आला असता. नुसती झलक म्हणून गेल्या चारपाच महिन्यांच्या वर्तमानपत्रांमधल्या बातम्या जरी चाळल्या तरी हे कुणाच्याही लक्षात येईल. तुकाराम मुंढे यांची राजवट सुरुवातीला खूप चांगली वाटत होती. सफाई कामगार काम करायला लागले, कार्यालयाला शिस्त आली वगैरे लोकांना आकर्षित करणारे होते. पण हे एवढे व्हायलाच हवे होते. व्यवस्थापन शास्त्रात ज्याला हायजीन फॅक्टर्स म्हणतात असेच हे मुद्दे होते. लोकांची प्रशासनाकडून ही किमान अपेक्षा होती. ते झाले हे चांगलेच पण ह्याच्या आधारावर आपण सगळ्यात श्रेष्ठ आहोत आणि व्यवस्थेच्याही वर आहोत असा भाव निर्माण झालेला पहायला मिळू लागला. गावातले अतिक्रमण असो, सिडकोमधली विनामंजुरी बांधकामे असोत, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा विषय असो, निवृत्तिनाथाच्या यात्रेच्या वेळचा असो की कालिदासच्या उद्घाटनाचा विषय असो एक गोष्ट सातत्याने लोकांसमोर येत राहिली की लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून आपणच काय ते सदगुणी आणि इतर सगळे अप्रामाणिक आणि भ्रष्ट अशा चुकीच्या गृहीतकांवर आधारलेली कार्यपद्धती लोकांसमोर येत गेली. आणि मग सुरू झाली अहंकाराची लढाई. एकाच्या 'अरे' ला दुसऱ्याने 'का रे' म्हणणे आणि मग पहिल्याने 'अरे जा रे गेलास उडत' म्हणत चालवलेला संघर्ष. यात ना नाशिकचे भले ना नाशिककरांचे! करवाढीमुळे ठिणगी पडली आणि त्यात भर पडली अनेक विषयांची अगदी गणेशोत्सवाच्या एरवी महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेची, भालेकरच्या जागेत गणेशोत्सवाला परवानगी नाकारण्यासारख्या विषयांची. आज कर कमी करण्याची लवचिकता दाखवणाऱ्या आयुक्तांना हे पाऊल या अगोदर आणि अविश्वासाचा ठराव येण्याअगोदरच सुचायला हवे होते. बऱ्याचदा निर्णय चुकीचे नसतातदेखील. पण ते सांगण्याचीही एक सलोख्याची पद्धत असणे आवश्यक असते. त्यासाठी परस्परांबद्दल आदरभाव बाळगणे आणि आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेप्रमाणेच दुसऱ्याची विशेषतः लोकप्रतिनिधींची प्रतिमा त्यांना खूप महत्त्वाची वाटत असते. त्यांचे प्रतिमाभंजन सातत्याने व्हायला लागले तर त्याचा कधी ना कधी स्फोट होणारच. संघर्षच्या वातावरणात ते जे चांगले काम करू इच्छितात ते करणे जमण्याची फारशी शक्यता नाही. कुठेही गेले तरी मुंढेसाहेब जोपर्यंत प्रशासनात आहेत, तोपर्यंत त्यांना लोकप्रतिनिधींना पूर्णपणाने टाळून काम करता येणार नाही. अनेकदा पांढरा आणि काळा ह्या दोन रंगांमध्येच जगाला विभागण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्या दोन टोकांच्यामध्ये खूप रंगछटा असतात. ह्याचे भान असणे आवश्यक असते. सगळे लोकप्रतिनिधी सरसकट टुकार आणि भ्रष्ट असतात असे मानणारा एक वर्ग असतो. आणि त्या नेत्यांना वठणीवर आणणारा 'सिंघम' लोकांपैकी अनेकांना आवडतोच पण ते नेहमीच खरे नसते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ह्या दोन चाकांवर लोकशाही व्यवस्थेची गाडी चालत असते. त्या दोन चाकांमध्ये समन्वय असला तरच ती चालते. नाहीतर अपघात ठरलेला असतो. अजून वेळ गेली नाही. ह्या समन्वयासाठी लागणाऱ्या लवचिकतेची आणि तडजोडीची आज सर्वांत जास्त गरज आहे. पण अहंकाराच्या लढाईमुळे हे होणे अवघड आहे असे वाटते आहे.

(लेखक ग्राहक पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images