Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिला लोकशाही दिन सोमवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील यांनी दिली आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या हक्कांचे रक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुका व जिल्हास्तरावर अर्ज केले असतील, त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नसेल अशा महिलांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या टोकननंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेना महाराज पुण्यतिथी; आज विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि. ७) शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रामकुंड येथील नाभिक वतनदार संस्थेचे संत सेना महाराज मंदिर येथे दुपारी १२ वाजता अभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. क्रांतिनगर येथून मारवाडी नाभिक समाजाच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पंचवटी बस डेपोसमोरील वैभव मंगल कार्यालयात सायंकाळी गुणवंत गौरव सोहळा होणार आहे. गंगापूर नाका येथील चिंतामणी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर होणार आहे.

सातपूरला पालखी सोहळा

सातपूर : सातपूर परिसर नाभिक समाज सेवा मंडळ व महिला मंडळाच्या वतीने त्र्यंबकरोड पपया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे विविध कार्यक्रमांचे

आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता सत्यनारायण पूजनाने कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता सप्तश्रृंगी माता मंदिर ते सौभाग्य

लॉन्सपर्यंत पालखी सोहळा, सकाळी १० वाजता दिवंगत श्रावण सैदाणे यांच्या स्मरणार्थ हभप श्री शिवानंद महाराज भालेराव यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता मान्यवरांचा सत्कार व दिवंगत एकनाथ वेडू वाघ यांच्या स्मरणार्थ संतसेना महाराज गौरव पुरस्काराचे वितरण कले जाणार आहे. दुपारी एक वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती सातपूर परिसर नाभिक समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष नाना, कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पगारे यांनी दिली.

गुणवंतांचा गौरव समारंभ

नाशिकरोड : नाशिकरोड नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने मोटवाणी रोडवरील उत्सव मंगल कार्यालयात आरोग्य शिबिरासह गुणवंतांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहाय्याने सकाळी ११ वाजता आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ होईल. संत सेना महाराज यांच्या प्रतिमापूजन केले जाणार आहे. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सायंकाळी पाच वाजता गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, आमदार योगेश घोलप यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात आता ऑडिटास्त्र

$
0
0

आर्थिक शिस्तीसाठी आयुक्तांची उपाययोजना; १ हजार कामांचे होणार ऑडिट

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नागरिकांनी कररुपाने पालिकेला दिलेल्या पैशातून योग्य कामे व्हावीत तसेच पालिकेला आर्थिक शिस्त लागावी या उद्देशाने आयुक्त संगीता धायगुडे यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पालिकेतील सुमारे १ हजार ५६६ कामांचे सोशल ऑडिट करण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला होता. आता शासनाच्या नगरविकासविभागने या कामाचे त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडिट करण्याचे निर्देश पालिका प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयास पाठबळ मिळाले असून, सर्वच विकासकामांचे ऑडिट झाल्याशिवाय बिले अदा केली जाणार नसल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्पष्ट केले आहे.

आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. शहरातील काही प्रभागात प्रत्यक्ष कामे न होताच पालिकेच्या लेखा विभागाकडे बिले सादर करण्यात आल्याचा प्रकार आयुक्तांच्या तपासणीत उघड झाला होता. बोगस बिलांचा हा प्रकार उघड झाल्यावर आयुक्तांनी थेट विकासकामांचे सोशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बोगस बिले सादर करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले होते. दरम्यान आमदार असिफ शेख यांनी देखील याबाबत नगरविकास विभागाच्या सचिवांना पत्र दिले होते. त्यामुळे नगरविकासविभागाने लेखा विभागातील प्रलंबित बिलांना स्थगिती देऊन त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयुक्त धायगुडे म्हणाल्या, धुळे येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयास पालिकेतील विकासकामांच्या बिलांचे ऑडिट करण्याचे दिले आहे. या त्रयस्थ संस्थेद्वारे प्रलंबित १ हजार ५६६ विकासकामांचे ऑडिट होणार असून, भविष्यात देखील असे ऑडिट झाल्याशिवाय बिले अदा केली जाणार नाहीत. पालिकेकडून करण्यात आलेल्या सोशल ऑडिटनंतर केवळ १६५ विकासकामांची बिले अदा करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कापडणीस यांनी दिली. आर्थिक कारभारात आर्थिक शिस्त आली पाहिजे. बोगस बिलांचा भ्रष्टाचार बंद व्हावा व नागरिकांनी कर रूपाने दिलेल्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी हे पाऊल उचल्याचे धायगुडे म्हणाल्या.

ठेकेदारांवर दंडाची कारवाई

शहरात होत असलेल्या विकासकामांवर ठेकेदाराने विकासकामाचे नाव, खर्च, कार्यादेश दिनांक आदी तपशील असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र असा फलक न लावणाऱ्या ठेकेदाराना देखील दंड करण्यात येणार आहे. आयुक्त धायगुडे यांनी अवलंबलेल्या कठोर धोरणामुळे बोगस बिलांच्या अडून पालिकेच्या तिजोरीची लूट करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

शाळांचे रूप बदलणार

पालिकेच्या शाळांचे रूप बदलण्यासाठी नादुरुस्त उर्दू शाळा स्थलांतरित करणे, डिजिटल स्कूल, व्हर्च्युअल क्लासरूम अशा संकल्पना राबविल्या जाणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले. तसेच अनधिकृतपणे पालिकेच्या शाळा ज्यांनी हडप केल्या असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे धायगुडे यांनी निश्चित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका टी-शर्ट पेंटिंग करायला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्यावतीने शनिवारी दि. ८ सप्टेंबर रोजी टी-शर्ट पेंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. हे वर्कशॉप महात्मानगर येथील सई संघवी यांच्या फिटनेस स्टुडिओमध्ये दुपारी ३ ते ५ यावेळेत होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या क्लचर क्लब सभासदांसाठी १०० रुपये फी आकारण्यात येणार असून, सभासद नसलेल्यांसाठी ४०० रुपये फी आहे. या शिबिराला क्षिप्रा गाढे व अमृता पिंपळवाडकर या मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात सहभागी झालेल्यांनी प्लेन रंगांचे टी-शर्ट स्वत: आणायचे आहेत. शिबिरासाठी नोंदणी आवश्यक आहे. ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे अशांनी ०२५३- ६६३७९८७ व ९४२२५१३५६९ या क्रमांकावर ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनातील आरोपींचा आडनावावरून सुगावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

खुनाचा संशयित आरोपीच्या आडनावावरून तपास करीत अंबड पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत तिघा संशयितांना ताब्यात घेतले. उल्हास वसंत रत्नपारखे (३२, रा. मिशन मळा, शरणपूर रोड), प्रवीण उर्फ रवी अशोक आठवले (२७, शरणपूर रोड) व कालिदास लुभाजी खंदारे (३८, रा. खोळे मळा, सिडको) अशी त्यांची नावे आहेत.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरल्याच्या आरोपावरून झालेल्या मारामारीत सदाशिव अर्जुन भगत (५५) यांचा बुधवारी (दि. ५) खून झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता. भगत राहत असलेल्या शेजारील पेठकर यांच्या बंगल्यातील ड्रेनेजचे काम करण्यासाठी काही कारगीर आले होते. त्यांच्यातील एकाचा मोबाइल गहाळ झाला होता. हा मोबाइल चोरल्याचा संशय व्यक्त करीत झालेल्या हाणामारीत भगत यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी केली असता त्याला एका व्यक्‍तीचे फक्‍त आडनाव माहिती होते. त्याची मुलगी शिक्षण घेत असलेली शाळा माहिती होती. त्यानुसार, पोलिसांनी या आडनावाच्या मुलींची माहिती मिळविली. त्यावेळी पोलिसांनी १५ जणांची यादी मिळाली. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना खरा संशयित आरोपी सापडला.

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार चव्हाण, राकेश शेवाळे, हवालदार भास्कर मल्ले, दत्तात्रय गवारे, चंद्रकांत गवळी, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे, धनंजय दोबाडे यांचेसह पोलिसांनी या संशयितांना ताब्यात धेतले. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार

$
0
0

स्थायी सदस्यांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूच्या उद्रेकास प्रशासन आणि पेस्ट कंट्रोलचा ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप करीत मलेरिया विभागातील अपुऱ्या कर्मचारीसंख्येबाबत समिती सदस्य समीर कांबळे यांनी आरोग्याधिकारी डॉ. जयराम कोठारी यांना जाब विचारला.

मलेरिया विभागाकरिता सरकारकडून ९५ पदे मंजूर असताना केवळ २३ कर्मचारी काम करीत असून, २२ जण पर्यवेक्षकांची जबाबदारी पार पाडत असल्याने डेंग्यू नियंत्रणात येणार कसा? महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असताना सर्वसामान्यांवर कारवाई कशासाठी, असा सवालही कांबळे यांनी उपस्थित केला.

संतोष साळवे यांनी प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदारांत साटेलोटे असल्याचा आरोप केला. ठेकेदाराऐवजी नागरिकांकडून दंड वसूल करण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला. सर्वसामान्यांवर करवाढीचे ओझे लादण्यात आले असताना आता दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून त्यांना रक्तबंबाळ करायचे का, असा प्रश्न संगीता जाधव यांनी केला. मुशीर सय्यद, कोमल मेहरोलिया, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, मीरा हांडगे यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला.

अवघा ३४ लाखांचा दंड

ठेकेदारांना मोकळे सोडून नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करणाऱ्या आरोग्य विभागाने अनियमित काम करणाऱ्या पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारास किती दंड वसूल केला, असा प्रश्न मुशीर सय्यद यांनी केला. यावर संबंधित ठेकेदारावर जुलैमध्ये १ लाख ९३ हजार, तर दोन वर्षांत तब्बल ३३ लाख ९९ हजारांचा दंड केल्याचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. कोठारी यांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेत, हा दंड किरकोळ असल्याचा आरोप केला. १९ कोटींच्या ठेक्याच्या तुलनेत हा दंड क्षुल्लक असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

महिलांनी झळकवला फलक

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, महापालिकेची निर्बिजीकरणाची मोहीम केवळ कागदावरच असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केली. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नमूद करत स्थायी समितीच्या सदस्या मीरा हांडगे, शांता हिरे, कोमल मेहरोलिया, संगीता जाधव आदींनी सभागृहात बॅनर फडकावत प्रशासनाचा निषेध केला. त्यावर हा ठेका आताच दिल्याचे सांगत, सभापतींनी या ठेकेदाराला समज देण्याची सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग

$
0
0

जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग

…म. टा. प्रतिनिधी,नाशिक

नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस स्कूल राणेनगर, एम. एस. कोठारी शाळा, बाल विद्या मंदिर, रंगुबाई जुन्नरे शाळा, रायन इंटरनॅशनल स्कूल, राधिका इंग्लिश स्कूल (येवला), आत्मा मलिक स्कूल (येवला), न्यू इंग्लिश स्कूल (रुई), सेंट फ्रान्सिस स्कूल (तिडके कॉलनी), भोसला मिलिटरी स्कूल अशा शाळांच्या २१० खेळाडूंनी सहभाग घेतला. शहरातील शाळांबरोबर नाशिक तालुक्यातूनही खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या स्पर्धेत ३० सेकंड स्पीड, ३ मिनिट इंडूरन्स, डबल अंडर, फ्री स्टईल अशा प्रकारांचा समावेश होता. विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, कामगार सेनेचे उपाध्यक्ष अंकुश पवार, जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक निकम सचिव विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल

१६ वर्षे मुले

३० सेकंड स्पीड : १) आर्यन काळे २) आयुष कुमार ३) श्रेयश नाईकवाडी

डबल अंडर : १) रोहन देशमुख २) जितेश शेकटकर ३) ओम सोमवंशी

३ मिनिट इंडूरन्स : १) आर्यन काळे २) आयुष कुमार ३) श्रेयश नाईकवाडी

फ्री स्टाईल : १)ओम कुंभारे २) इरफान शेख ३) जिगेश शाह

१६ वर्षे मुली

३० सेकंड स्पीड : १)शिवानी भोये २) गौरी विधाते ३)ज्ञानेश्वरी घोलप

डबल अंडर : १)वसुंधरा पुरी २) पूजा गायकवाड ३) आयेशा पठाण

३ मिनिट इंडूरन्स : १)प्रगती जाधव २) कोमल गांगुर्डे ३)भक्ती गायकवाड

फ्री स्टाईल : १)तेजल चौधरी २) मानसी काटकर ३) कुंजना नेमाडे

१८वर्षे मुले

३० सेकंड स्पीड : १) काव्य पटेल २) सुयोग खंडांगळे ३) मोहमद अत्तार

डबल अंडर : १)सोहं गुरुळे २)अथर्व सुपे ३) सर्वद कर्डिले

३ मिनिट इंडूरन्स : १)श्रेय्यस वाल्हे २)मिथिलेश निकम ३) अभिषेक भावसार

फ्री स्टाईल : १)अथर्व दुबे २)वैभव पाटील ३) धम्मदीप बनसोडे

१८ वर्षे मुली

३० सेकंड स्पीड : १)सिद्धी वाणी २)रेवती पगारे ३)माही पटेल

डबल अंडर : १)तन्मयी यादव २) युगंधरा पुरी ३) अक्षा खान

३ मिनिट इंडूरन्स : १)साक्षी सोनजे २) सारा खंदारे ३) शुभी सिंग

फ्री स्टाईल : १)मिहिका पाटील २)श्रावणी पाटील ३) स्नेहा भालेराव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलारंग’च्या नृत्याविष्कारात रसिक भारावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'खेळ मांडियेला', 'जय जय विठ्ठल' अशा अभंग रचनांवर थिरकलेल्या पावलांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. निमित्त होते, कलानंद कथक नृत्य संस्थेतर्फे आयोजित 'कथक रंग' आणि 'दशावतार' या कार्यक्रमाचे. परशुराम साइखेडकर नाट्यगृहात गुरुवारी हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कलानंदच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी गणेश स्तवनाने केली. पूर्वार्धात संस्थेच्या नवोदित तसेच ज्येष्ठ विद्यार्थिनींनी कथक नृत्याचे विविध पैलू सादर केले. त्यानंतर सुमुखी अथनी व त्यांच्या नर्तक विद्यार्थ्यांनी पारंपरिक धृपद सादर केले. नंतर कलारंगच्या लहान मुलींनी तीन तालात नृत्य सादर केले. त्यानंतर रासताल व झपतालातील तराना, मल्हार मॅजिक या फ्युजन प्रकाराच्या संगीतावर सादर केलेले नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 'दशावतार' हा श्री विष्णूचे दहा कार्यक्रमांचे वर्णन करणाऱ्या वैविध्यपूर्ण नृत्यरचनांनी नटलेल्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

विशारदप्राप्त गुणवंतांचा सत्कार

कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन कलानंद संस्थेच्या संस्थापिका संजीवनी कुलकर्णी व सुमुखी अथनी यांनी केली होती. कार्यक्रमाला व्यंकटेश तांबे (तबला), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), पुष्कराज भागवत यांनी साथसंगत दिली. कार्यक्रमात विशारद ही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी, आमदार सीमा हिरे यांची उपस्थिती होती.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपल्या भाषेतील लिखाणातून सेवा

$
0
0

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रादेशिक भाषेत आंतरराष्ट्रीय घडामोडींसंबंधी लिखाण होत नाही. विदेशी सेवेविषयी फारसे लेखन झाले नाही. विदेशी भेटीविषयी लिहिणारी आपली भाषा विसरत चाललो आहोत, ती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या भाषेत लिहिणे हीच खरी सेवा आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील विदेश मंत्रालय सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात 'माझे विदेश मंत्रालयातील अनुभव' या विषयावर डॉ. मुळे गुरुवारी बोलत होते. गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे झालेल्या व्याख्यानप्रसंगी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे, 'मविप्र'चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आशिष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, जनतेला जिवंत प्रशासन काय आहे. हे कळल्याशिवाय जनतेला शासनाविषयी आत्मियता आणि विश्वास वाटत नाही. जे प्रशासकीय सेवेत काम करतात, त्यांनी कामाविषयी लिहणे आवश्यक आहे. जनतेला प्रशासनाविषयी विश्वास असेल तर गुन्हेगारी कमी होईल, कायद्याचे पालन होइल आणि शिस्त येईल. जेव्हा लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडतो तेव्हा ते वेगळ्या वाटा निवडतात. जनतेत विश्वास बांधणे प्रशासनाचे काम आहे. शासनावर विश्वास बसला पाहिजे असे करावे.

डॉ. मुळे यांनी भेटी दिलेल्या जपान, रशिया, अमेरिका आदी देशांमधील अनेक अनुभव सांगितले. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : पंकज चांडोले

कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी नियोजनावर वादळी चर्चा

$
0
0

फाइली अडविल्याच्या आरोपानंतर सभात्याग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेची स्थायी सभा व जलव्यवस्थापन समितीची सभा गुरुवारी विविध कारणांनी वादळी ठरली. जलव्यवस्थापन बैठकीत धनश्री केदा आहेर यांनी सभेवर बहिष्कार टाकत आपला संताप व्यक्त केला. निधी येऊनही नियोजन होत नाही. फाइल अडवल्या जातात, असा आरोप त्यांनी केला. सभेनंतर झालेल्या स्थायी समितीमध्येही निधी नियोजनावर वादळी चर्चा झाली. लोकसभेच्या निवडणुकीमुळे कामे रखडतील ही भीती व्यक्त केल्यानंतर अध्यक्षा शीतल सांगळे यांनी गणेशोत्सवापर्यंत निधीचे नियोजन करण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले.

दोन वेगवेगळ्या सभा होऊनही निधीचे नियोजन हाच प्रमुख विषय होता. धनश्री आहेर यांनी बहिष्कारस्त्र वापरल्याने जलव्यवस्थापन समितीची बैठक काही काळ तकहूब करण्यात आली. यावेळी आहेर यांनी पदाधिकारी आपली काम करून घेत आहे. पण, सदस्यांची कामे होत नसल्याचे सांगत राग व्यक्त केला. तीन महिन्यांपासून बंधाऱ्यांची फाइल फिरत आहे, ती वारंवार अडविली जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी अमृता पवार, धनराज महाले, रमेश बोरसे यांनीही त्यांना साथ दिली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत साडेचार कोटींचा निधी मंजूर होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही अनुदान ग्रामपंचायतींना वर्ग झालेले नसल्याची तक्रारही डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली. तर, जनसुविधातंर्गत कामांचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग झालेला नसल्याचे यतिन कदम यांनी सांगितले. तसेच निधी खर्च होत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी मांडले. २०१७-१८ चा निधी अखर्चित असल्याचे डॉ. भारती पवार यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी अध्यक्षा सांगळे यांसह उपाध्यक्षा नयना गावित, सभापती यतिंद्र पगार, मनीषा पवार, सुनिता चारोस्कर यांनी नियोजन सुरू असल्याचे सांगत, सदस्यांना विश्वासत घेऊन काम सुरू असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूच्या प्रादुर्भावास नागरिक जबाबदार नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती घरात आढळल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आरोग्य व वैद्यकीय विभागाचा प्रस्ताव स्थायी समितीने एकमताने फेटाळून लावला आहे.

महापालिका सामान्य माणसाचा खिसा रिकामा करायलाच बसली आहे का, असा आरोप करीत ठेकेदारांकडून दंड वसूल करण्याऐवजी नागरिकांना जबाबदार धरण्याच्या या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी विरोध केला. डेंग्यू निर्मूलनाची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाचीच असल्याचे नमूद करीत डासांची उत्पत्ती रोखण्यास अपयशी ठरलेल्या पेस्ट कंट्रोल ठेकेदारावर जबर दंडाची कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर आडके यांनी दिले आहेत. सोबतच सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असक्षम ठरलेले प्रभारी आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही दिले आहेत.

स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी डेंग्यू आजाराला कारणाभूत ठरणाऱ्या डासांची घरांमधील पाण्याच्या साठ्यांत उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या या प्रस्तावावर संताप व्यक्त करत, डेंग्यूच्या उद्रेकाचे तीव्र पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे नमूद करत सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे नागरिकांवर दंड करण्याच्या प्रयत्नांवर आता पाणी फेरले गेले आहे.

डेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक दुर्बलांना बचतीचे धडे

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : हातावर पोट असणाऱ्या दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक साक्षर करण्यासाठी गॅस वितरक कंपन्यांनी स्वयंस्फूर्तीने पाऊले उचलली आहेत. सिलिंडर खरेदीइतकी राशीही अनेक कुटुंबांकडे नसल्याचे वास्तव उज्जवल गॅस योजनेच्या अंमलबजावणीत निदर्शनास येताच अशा कुटुंबांना धनसंचय डबे पुरविण्यास सुरुवात केली आहे. व्यसनाधिनता किंवा तत्सम बाबींवर होणारा व्यर्थ खर्च टाळून हे आर्थिक दुर्बल घटक पै-पै जोडू लागल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावू लागला आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने 'बीपीएल' कुटुंबांना गॅस कनेक्शन घेणेही कठीण ठरते. त्यामुळे केरोसीन किंवा सरपणाद्वारेच ते वर्षानुवर्षे चूल पेटवित आहेत. अशा कुटुंबांसाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात १ लाख ४६ हजार लाभार्थींना त्याद्वारे गॅस कनेक्शन मिळाले आहे. १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांना हे कनेक्शन मिळाले असले तरी गॅस सिलिंडर खरेदीसाठी त्यांनाही अन्य ग्राहकांप्रमाणे आठशे ते साडेआठशे रुपये मोजावे लागतात. ग्रामीण भागातील अशा दुर्बल घटकांना या पैशांची तजवीज करणेही मुश्किल होत असल्याचे निरीक्षण वितरकांनी नोंदविले आहे. दोन-तीन महिन्यांनी नवीन सिलिंडर खरेदी करतानाही अशा ग्राहकांना आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यास सुरुवात झाली आहे.

मोलमजुरी करून चरितार्थ चालविणाऱ्या अशा घटकांकडे रोजच्या रोज किंवा आठवड्याला थोडेफार पैसा येतात. घरखर्च भागवून काही पैसे शिल्लक टाकणे शक्य असताना हा पैसा व्यसनाधिनता, जुगारासारख्या निरर्थक कारणांसाठी खर्च होतो. पैसे बचतीची त्यांना सवय लागावी आणि त्याद्वारे आर्थिक चणचण दूर होऊन त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचवावा यासाठी ग्रामीण भागातील वितरकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांना सिलिंडरचीच प्रतिकृती असलेले धनसंचय डबे वितरित केले जात असून पैसे बचतीसाठी प्रोत्साहित करण्यात येते आहे. बचतीची सवय त्यांनी अंगीकारावी यासाठी कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. गॅसची सबसिडी म्हणजे काय, ती केव्हा जमा होते हे देखील त्यांना समजावून सांगितले जात आहे. त्यामुळे बँक व्यवहारांशीही त्यांचा परिचय होऊ लागला आहे.

अत्यावश्यक दूरध्वनींचीही माहिती

गॅस कनेक्शन वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना या धनसंचय डब्यावर करण्यात आल्या आहेत. कुटुंबातील साक्षर सदस्यांना त्या सूचना समजावून सांगितल्या जातात. या डब्यांवरच अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक देण्यात आले असून गरज भासल्यास या क्रमांकांवर संपर्क साधून मदत घेण्याचे आवाहनही त्यांना केले जाते. त्यामुळे अधिक आत्मविश्वासाने ते गॅस कनेक्शनचा वापर करू लागल्याचे निरीक्षण वितरकांनी नोंदविले आहे.

सुरुवातीला सिलिंडर खरेदीसाठी काही ग्राहकांकडे पैसे नसत. त्यामुळे गॅस कनेक्शन घेऊनही त्याचा वापर होत नव्हता. पैसा बचतीची सवय नसल्याने त्यांची आर्थिक ओढाताण व्हायची. त्यामुळे त्यांना धनसंचय डबे देऊन पैसे बचतीचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. पैशांची बचत करू लागल्याने या ग्राहकांची आर्थिक चणचण काहीअंशी कमी होऊ लागली आहे.

- एतेशाम शेख, गॅस वितरक, हरसूल

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंगळवादातूनच पर्यावरणाचे नुकसान

$
0
0

आयटी तज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चंगळवादी संस्कृतीपुढे आज आपल्या समाजाने शरणागती पत्करली आहे. माणसाच्या जीवनशैलीद्वारे त्याच्या जीवनासह निसर्गावर चंगळवाद सद्यस्थितीत अखंड प्रहार करतो आहे. चंगळवादाने पर्यावरणाचे जितके नुकसान केले तितके क्वचितच दुसऱ्या कुठल्या घटकाने केले आहे, असे प्रतिपादन आयटी तज्ज्ञ व ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर महोत्सवाचे दिग्दर्शक विरेंद्र चित्राव, लार्ज इंजिन्सचे उपाध्यक्ष शीतल कोठारी, फॅक्टरी मॅनेजर जगदीश गदगे, वरिष्ठ जीएम मकरंद देवधर, अमित टिल्लू आदी मान्यवर उपस्थित होते.

चंगळवाद आणि पर्यावरण यांचा संबंध समजावून घेताना अगोदर चंगळवादाचे स्वरूप आपण समजावून घ्यायला हवे. केवळ उपभोगाच्या वस्तू खरेदीचे प्रमाण वाढणे म्हणजे चंगळवाद असा चुकीचा समज आहे. याला चंगळवाद म्हणता येणार नाही. गरजेची म्हणून नव्हे तर केवळ संपत्तीच्या प्रदर्शनासाठी एखाद्या वस्तूची खरेदी, यातून चंगळवादाचा उदय होतो, असे गोडबोले म्हणाले. हा नियम जैविक किंवा अजैविक अशा दोन्हीही वर्गातील वस्तूंना लागू पडतो. गरजेपेक्षा जास्त अन्न तयार केल्यास त्याच्या वाया जाण्यातून जैविक कचऱ्याचा निर्माण होणारा प्रश्न पर्यावरणास त्रासदायक आहे. याशिवाय संगणक, मोबाइल, वॉशिंग मशिन, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स यासारख्या वस्तूंची स्क्रॅबमार्केटमध्ये पडणारी भरही ई-कचऱ्याचा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. आवश्यक त्या ठिकाणी वस्तूच्या वापरास ना नाहीच पण आवश्यकतेच्या पलिकडे केवळ दिखाव्यासाठी आपण ओरबाडण्याची जीवनशैली स्वीकारतो तेव्हा ही जीवनशैली चंगळवादी प्रवृत्तीकडे झुकलेली असते. अप्रत्यक्षपणे असा चंगळवाद पर्यावरणासाठीच हानीकारक आहे. यावर असणारा मुख्य उपाय म्हणजे आपण समतोल ग्राहक बनण्याची गरज आहे, असे गोडबोले म्हणाले.

निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या व्यक्तींना वसुंधरा पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या सोहळ्यात वसुंधरा सन्मान पुरस्काराने उमाकांत निखारे, वसुंधरा मित्र पुरस्काराने संग्राम गोवर्धने आणि शिवानी गणेश यांना गौरविण्यात आले.

महोत्सवाचा आज समारोप

वसुंधरा महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (दि. ७) होणार आहे. पेठे विद्यालयात सकाळी १० ते ११ या वेळेत पर्यावरण विषयक चित्रपट दाखविण्यात येईल. एकलहरे येथील एनटीपीएस केंद्रास भेट देण्यात येईल. अंबड येथे महोत्सवाचा समारोप होईल. समारोपाच्या दिवशीही विविध चित्रपटांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.

फोटो : पंकज चांडोले ........... कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोगराईचा अहवालदेण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व स्वाइन फ्ल्यूसह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाला जाब विचारला आहे. रोगराई आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रभावीपणे मोहीम राबवून जनजागृती करण्याच्या सूचना भानसी यांनी केल्या आहेत. याबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

ऐन सणासुदीचा कालावधीतच शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यू बाधितांचा आकडा दीडशेवर गेला आहे. डेंग्यूची संख्या या वर्षात सर्वाधिक असून, आतापर्यंत १,१३३ डेंग्यू संशयित आढळले तर ३६८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चिकणगुणिया, मलेरिया यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाल्याने त्यापार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाची विशेष बैठक गुरुवारी बोलाविली. स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर, सभागृहनेते दिनकर पाटील, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी आरोग्यांसदर्भात विविध सूचना केल्या. महापौर भानसी यांनी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध फवारणीच्या सूचना दिल्या. डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी गप्पी मासे सोडणे, डेंग्यू , घरांमध्ये विशेषत: झोपडपट्टी भागात जावून रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीटा’ करणार स्टार्टअपचा विकास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात तीनशेपेक्षा अधिक आयटी कंपन्यांनी एकत्र येत 'नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन' (नीटा) स्थापन केल्याने शहरातील आयटी सेक्टर ठळकपणे समोर आले आहे. शहरात स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी 'नीटा'ने स्टार्टअप सिरीजचे आयोजन केले आहे, जे नाशिकमध्ये एकमेव असणार आहे. आयटी उत्पादक कंपन्या त्यांना मार्गदर्शन करेल. तसेच गुंतवणूकदारांसमोर केस स्टडी कसा सादर करावा, यांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. स्टार्टअप सल्लागार व गुंतवणूकदारांना नाशिकमध्ये आणून त्यांना आयटी उद्योगाच्या क्षमतेबद्दल माहिती दिली जाणार आहे.

नाशिकची ओळख मंत्रभूमी, यंत्रभूमी व वाइन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे; पण आता तिची ओळख तंत्रभूमी म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नाशिक ग्लोबल आयटी प्रॉडक्ट नॉलेज हब बनावा हा 'नीटा'चा उद्देश असेल. यावेळी 'नीटा'ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक वाघ, उपाध्यक्ष शशांक तोडवाल, मानद सचिवपदी अरविंद कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी गिरीश पगारे, सहसचिवपदी अमर ठाकरे, तर सदस्यपदी हृषिकेश वाकडकर, वक्रीम बोडके, सोनाली गोराडे यांची निवड करण्यात आली.

स्थानिकांना रोजगार

शहरात २० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर संस्था आहेत. या संस्थांमधून वर्षाला ८ हजार आयटी पदवीधर उपलब्ध होतात. मात्र, यातील २० टक्के तरुणांना चांगले जॉब मिळतात, तर ८० टक्के लोकांना काम मिळत नाही. दुसरीकडे नाशिकच्या कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना आयटी कंपन्यांना काय लागते हे सांगून कौशल्य वाढवण्यासाठी 'नीटा' प्रयत्न करणार आहे.

जगभर काम

नाशिकच्या आयटी कंपन्यांचे देशांतर्गत व जगभर काम सुरू आहे. त्यातील काही कंपन्यांचे इतर राज्यांत, तसेच परदेशातही कार्यालये आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून ४० ते ४५ टक्के परकीय चलन भारताला मिळते. यातील काही उत्पादक तर काही सर्व्हिस सेक्टरमधील कंपन्या आहेत.

'नीटा'ची वेबसाइट

संघटना स्थापनेच्या कार्यक्रमात www.nashikit.com ही वेबसाइट सुरू करण्यात आली. वर्ल्ड मॅपमध्ये नाशिक असायला हवे, यासाठी हा प्रयत्न आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून नाशिकच्या आयटी कंपन्यांची माहिती, सदस्यांची माहिती असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोवर, रुबेलाचा उच्चाटन करा

$
0
0

आरोग्य उपसंचालिका डॉ. रावखंडे यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिओप्रमाणे गोवर व रुबेला आजाराचे निर्मूलन करून कायमचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले. या मोहिमेत शाळा, अंगणवाडी या महत्त्वाच्या विभागांप्रमाणे इतर सर्व विभागांचा सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवर व रुबेला आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे गोवर व रुबेला लसीकरण कार्यक्रमाविषयी एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यात रावखंडे बोलत होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटनही त्यांनी केले. कार्यशाळेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर लष्करे, जिल्हा परिषदेचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मनपा कार्यक्षेत्रातील शिक्षण व तसेच महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आदि उपस्थित होते.

नोव्हेंबरमध्ये लसीकरण

केंद्र सरकारने गोवर व रुबेला लस नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार असून यामध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महापालिका, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, जागतिक आरोग्य संघटना सहभागी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्दीबळ स्पर्धा

$
0
0

दृष्टिबाधित खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धा

0

कवळेकर, चुडासमा, वाघमारे आघाडीवर

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व राष्ट्रीय दृष्टिहीन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय खुल्या मानांकित बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर गोव्याचे संजय कवळेकर (१८५१), गुजरातचे सुजित चुडासमा (१५९१), महाराष्ट्राचे सचिन वाघमारे (१५४७) आदी सीडेड खेळाडूंनी विजय नोंदवत आघाडी घेतली. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ असंख्य बुद्धिबळ प्रेमींच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. या स्पर्धा ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथील कालिकादेवी सभागृहात आयोजित करण्यात आल्या आहेत. तब्बल ४७ आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ खेळाडूंसहीत १५० दृष्टिबाधित खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेस लाभला आहे.

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या आयटीला संघटनात्मक झळाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये तीनशेपेक्षा अधिक आयटी कंपन्या असताना त्यांची संघटना नसल्यामुळे या कंपन्या आता एकवटल्या असून, त्यांनी 'नाशिक आयटी ब्रँड' प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेने 'नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोशिएशन' (नीटा) या नावाने अधिकृत संघटना स्थापना केली असून, संघटनेत १७० हून अधिक कंपन्यांचे मालक सदस्य झाले आहेत. नाशिक ग्लोबल आयटी प्रॉडक्ट नॉलेज हब बनावा हा उद्देश असल्याचे नीटाने स्पष्ट केला असून, यामुळे नाशिकच्या आयटी ब्रँडला झळाळी मिळणार आहे.

नाशिकमधील या कंपन्यांची ५ हजार कोटींहून अधिक उलाढाल आहे, तसेच या कंपन्यांच्या माध्यमातून दहा हजार रोजगार शहरात उपलब्ध आहेत; पण त्याची नाशिककरांना फारशी माहिती नाही. त्यामुळे या कंपन्यांनी आता अधिकृत संघटना स्थापन केल्यामुळे शहरातील आयटीचे महत्त्वही अधोरेखित होणार आहे. गंगापूर रोडवरील हॉटेल शिवसागर फर्न येथे गुरुवारी आयटी कंपन्यांच्या संचालकांनी एकत्र येत 'नीटा' स्थापन केली. संघटनेचे अध्यक्ष अरविंद महापात्र यांनी पत्रकारांशी संवाद साधत संघटनेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. शहरातील या कंपन्यांची कार्यालये जगभरात आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी आपले प्रश्न आपणच सोडवावे, यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

'नीटा' करणार स्टार्टअपचा विकास...

चौकट

आयटी कंपन्यांची वाटचाल

३०० आयटी कंपन्या

१०,००० रोजगार

५,००० कोटींची गुंतवणूक

४०-४५ टक्के परकीय चलन

कोट

नाशिकमध्ये आयटी सेक्टरला जे हवे ते सर्व उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटी कंपन्यांची २० टक्के वाढ झाली आहे. स्कील नसेल तर नाशिकची ग्रोथ होणार नाही. त्यामुळे स्कीलही डेव्हलप केले जाणार आहे. एअर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची होती. तीसुद्धा आता झाली आहे. त्यामुळे पुढील काळात नाशिकचा आयटी ब्रँड विकसित करण्यावर भर राहील.

- अरविंद महापात्र, अध्यक्ष, नीटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हीही बजावणार मतदानाचा हक्क!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिव्यांग बांधवांनी मतदार नोंदणीला आवर्जून हजेरी लावली. भाभानगर येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मतदार नोंदणी अभियानामध्ये शहरातील तब्बल ५०० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला. यंदा आम्हीही मतदान करणारच, असा निश्चयच जणू दिव्यांगांनी केल्याचे दिसून आले.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिव्यांग बांधवांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ६) दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी १० वाजता या नोंदणीला सुरुवात झाली. नाशिकचे प्रांताधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यावेळी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी गायकवाड सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच एक टेबल लावण्यात आला होता. संबंधित बांधव कोणत्या परिसरात वास्तव्यास आहेत, याबाबत विचारणा करून तेथील कर्मचारी त्यांना संबंधित टेबलवर जाऊन नाव नोंदणी करावी याबाबत मार्गदर्शन करीत होते. येथे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार टेबल लावण्यात आले. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीमध्ये असलेल्या माहितीत दुरुस्तीकरीता दिव्यांग बांधवांनी अर्ज भरून दिले. ४२२ बांधवांनी अर्ज भरून ते आवश्यक त्या कागदपत्रांसह सादरही केल्याची माहिती नायब तहसीलदार आवारी यांनी दिली. तर ११० बांधव अर्ज घेऊन गेले आहेत. आठ दिवसांत हे अर्ज जमा होतील. त्यामुळे या शिबिराचा ५०० दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. दुपारी ३ वाजता या शिबिराची सांगता झाली.

संघटनांनी केले सहकार्य

हे शिबिर यशस्वी व्हावे यासाठी दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संघटनांनीदेखील परिश्रम घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दिव्यांग बांधवांना रांगेत उभे करणे, त्यांचे अर्ज भरून देणे, कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही हे तपासणे यांसारख्या कामांमध्ये आम्ही मदत केल्याची माहिती प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिली. त्यासाठी प्रत्येक टेबलवर स्वयंसेवक नेमण्यात आले होते. त्यांनी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शक्य ती मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमित व्यावसायिक हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिकरोड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळा ते देवीचौक या रस्त्यावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. अचानकपणे पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात दाखल झाल्याचे बघून व्यावसायिकांची त्रेधा उडाली. महिनाभरात याठिकाणी दुसऱ्यांदा मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमणे पुन्हा 'जैसे थे' होतात.

शुक्रवारी सायंकाळी शिवाजी पुतळा येथे पोस्टाच्या इमारतीभोवती असलेले अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले. यावेळी काही व्यावसायिकांनी या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध केल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पोलिसांनाही प्रथम विरोध करण्याचा काही व्यावसायिकांनी प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच व्यावसायिकांची फजिती उडाली. या रस्त्यावरील मीना बाजार पूर्णपणे उठविण्यात आला. ज्या व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वतःहून काढून घेतली नाहीत, त्यांचे दुकानातील साहित्य पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्त केले. या मोहिमेत अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी, विद्युत विभागाचे कर्मचारी, पोलिस पथक, तीन वाहनांसह एका जेसीबीचा सहभाग होता. काही व्यावसायिकांच्या दुकानांचे शेड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

व्यावसायिकांची धावपळ

शिवाजी पुतळा येथे सायंकाळी पोलिस फौजफाटा घेऊन पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोहचताच देवी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. काही व्यावसायिकांनी आरडाओरडा करीत साहित्याची आवरासावर करण्यास सुरुवात केली. काहींनी दुकानातील विक्रीचे साहित्य वाचविण्यासाठी थेट पुलाखाली नेऊन ठेवले. काहींनी तर आपले साहित्य पोस्ट कार्यालयाच्या भिंतीवरून आत फेकले. या धावपळीमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images