Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्यसनाधीन पतीमुळे विवाहितेची आत्महत्या

$
0
0

नाशिक : पतीच्या व्यसनाला कंटाळून ३३ वर्षांच्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पुणे रोडवरील शिंदे गाव येथे घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदे गाव, ता. जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वर्षा यांचा काही वर्षांपूर्वी भरत गायधनी याच्याशी विवाह झाला होता; मात्र काही महिन्यांनंतर भरतला मद्याचे व्यसन जडले. एक मुलगा आणि मुलगी असलेल्या वर्षा मानसिक तणावाखाली होत्या. यातूनच त्यांनी गुरुवारी (दि. ६) दुपारी पावणेचार वाजेपूर्वी घरात विषारी औषधाचे सेवन करीत आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यावर तिला बिटको हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर पुढील तपास करीत आहेत.

तरुणाचा गळफास

नाशिक : आडगाव शिवारातील चौंडेश्‍वरीनगरात असलेल्या शिवालय रो-हाऊसमधील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) रात्री सव्वादहा वाजता घडली. जितेंद्र सुरेश तांबे (३१, रा. शिवालय रो-हाऊस, सम्राट बेकरीसमोर, आडगाव) असे या तरुणाचे नाव आहे. अज्ञात कारणातून जितेंद्रने वरच्या मजल्याच्या छताला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राइम जोड

$
0
0

देव नदीमध्ये

तरुणाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील मुसळगाव परिसरात देव नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. प्रशांत आण्णासाहेब तांबे, (वय २१, रा. श्रीरामपूर जि. नगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रशांत हा मुसळगाव येथील एका कंपनीत नोकरीला असल्याने मुसळगाव फाटा येथे वास्तव्यास होता. तो शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रांसोबत मुसळगाव परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेजवळ देवनदीवर असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पवन उमाकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस हवालदार टी. के. कदम करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सानप यांनी भरली थकबाकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या अधिपत्याखालील अभ्यासिकांना थकबाकीसाठी जप्तीची नोटीस बजावली होती. सानप यांनी शुक्रवारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अखेर ९ लाख रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत.

आमदार सानप यांच्या अधिपत्याखालील संत ज्ञानेश्‍वर अभ्यासिका व श्रीराम सार्वजनिक वाचनालयाने ९ लाख रुपयांचे भाडे थकवल्यामुळे जप्तचीची नोटीस काढल्यानंतर अखेर दहाव्या दिवशी संबंधित रक्कम विभागीय अधिकाऱ्यांकडे भरली. त्यामुळे या अभ्यासिकांवरील जप्तीची कारवाई टळली आहे. महापालिकेच्या मिळकतीचा गैरवापर करणे, करार संपल्यानंतरही वापर सुरू ठेवणे, भाडे थकवणे अशा प्रकारांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पालिकेच्या ९०३ मिळकती रडारवर घेत, त्याचा पहिला दणका आमदार सानप यांच्या दोन अभ्यासिकांना दिला. सानप यांच्याशी संबंधित संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक मंडळाच्या नावाने कृष्णनगर परिसरातील विद्याभवन या इमारतीत सुरू असलेल्या मिळकतीचे ९ लाखांचे भाडे थकविल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपत असतानाच सानप यांच्या आदेशानुसार संबंधित दोन्ही संस्थांनी थकबाकीची रक्कम धनादेशाच्या रुपात दिल्यामुळे कारवाई टळल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही ‘नॅचरल गॅस’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंधन आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅचरल गॅस देशभर पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत देशभरात पहिल्या टप्यात १७४ जिल्ह्यांची निवड केली असून त्यात नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यात हा पुरवठा केला जाणार आहे. घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोहचवण्याची ही योजना आहे.

पेट्रोलिमय अॅण्ड नॅचरल गॅस ऑथेरिटी बोर्ड (पीएनजीआरबी) यांनी देशभरासाठी टेंडर काढले त्यात राज्यातील सात जिल्ह्यांचे काम दोन कंपनीकडे गेले आहे. राज्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनी नाशिक, धुळे व सिंधुदुर्ग येथे काम करणार आहे. तर भारत गॅस रिसोर्सेस लि. (बीजीआरएल) ही कंपनी औरंगाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी काम करणार आहे. राज्यात या दोन कंपनी सात जिल्ह्यात सुरुवातीला पायाभूत सुविधा उभारणार आहे. त्यात घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) यासाठी स्टेशन उभे केले जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी व बीजीआरएल ही कंपनी यात अगोदर पासून काम करत आहे.

आठ वर्षांत होणार काम

पुढील आठ वर्षांमध्ये शहरात हे काम टप्याटप्याने केले जाणार आहे. त्यात ही कंपनी ३८ हजार किलोमीटर पाइपलाइन टाकणार आहे. तसेच तीन हजार ६२७ सीएनजी स्टेशन उभारणेचे कामही केले जाणार आहे. तसेच १ कोटी ५३ लाख पीएनजी कनेक्शन ते या काळात देणार आहे.

असे असेल उपक्रम

ऑक्टोबर २०१९ पर्यंत या कंपनीला ४ हजार ९०० किलोमीटरची पाइपलाइन टाकावी लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत घरगुती १५ लाख ३० हजार कनेक्शन द्यावे लागणार आहे. तसेच ५३७ सीएनजी स्टेशनही त्यांना उभारण्याचे लक्ष्य देण्यात आले. अशा पद्धतीचे लक्ष्य दरवर्षी देण्यात आले असून ते आठ वर्षांमध्ये करायचे आहे.

नैसर्गिक वायू

नैसर्गिक वायू हा कच्च्या तेलाच्या परिसरात आढळतो. रंगहीन असलेला हा वायू-गंध विरहीत व पर्यवरणपूरक आहे. ९५ टक्के हायड्रो कार्बन व ८० मिथेन त्यात असते.

उद्योजकांना माहितीचे सादरीकरण

महाराष्ट्र नॅचरल गॅसने निमा येथे या प्रकल्पाची माहिती उद्योजकांना दिली. यावेळी नाशिकमध्ये घराघरात हा गॅस पुरवला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. दोन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च या प्रकल्पाला लागणार असल्याचेही सांगण्यात आले. घराघरात, हॉटेलमध्ये व उद्योजकांना हा गॅस पाइपलाइनने पुरवला जाणार आहे. तर वाहनांसाठी स्टेशन उभारले जाणार आहे. कंपनीचे संचालक राजेश पांडे, महाव्यस्थापक मिलिंद नरहाशेट्टीवर यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिंहासन’साठी घेतले एक रुपया मानधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

'राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 'सिंहासन' या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, निळू फुले, नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज कलावंत होते. या सर्वांनी ठरवून 'सिंहासन'साठी केवळ एक रुपया मानधन घ्यायचे ठरवले होते. नाटकाच्या तारखा बाजूला ठेवून या सर्वांनी चित्रपटासाठी वेळ दिला होता', अशी आठवण 'सिंहासन'चे दिग्दर्शक व निर्माते डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे सांगितली.

प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटांचा दोनदिवसीय महोत्सव पर्सिस्टंट सभागृहात सुरू झाला. या महोत्सवात डॉ. पटेल यांचे गाजलेले चार चित्रपट आणि एक माहितीपट रसिकांना बघायला मिळणार आहे. ऑरेंजसिटी कल्चरल फाउंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व नागपूर महापालिका यांच्यावतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा प्रारंभ चाळीस वर्षांपूर्वी गाजलेल्या 'सिंहासन' या चित्रपटाने झाला. चित्रपट बघायला रसिकांनी चांगलीच गर्दी केली. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यावर डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर व चित्रपट समीक्षक समर नखाते यांची चर्चा रंगली.

अरुण साधू यांच्या 'सिंहासन' कादंबरीवर आधारित या सिनेमाची पटकथा आणि संवाद विजय तेंडुलकर यांनी लिहिले होते. डॉ. पटेलांनी या चित्रपटासाठी बँकेकडून साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि तेवढ्याच पैशांत हा चित्रपट तयार झाला. डॉ. पटेलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून सर्व कलाकारांनी एक रुपया मानधन घेतले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते त्यावेळी राज्यात निवडणुकीचे वातावरण होते आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यासंबंधीची आठवण सांगताना डॉ. पटेल म्हणाले, 'विधानभवन आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचे चित्रीकरण करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांना 'मुख्यमंत्री विरुद्ध अर्थमंत्री' असा चित्रपटाचा विषय असल्याचे सांगितले. त्यावर त्यांच्या मुख्य सचिवांनी चित्रीकरणास परवानगी मिळणार नाही, असे सांगितले. पण, शरद पवारांनी राजकीय विषय असूनही सुटीच्या दिवशी चित्रीकरणाची परवानगी दिली. नवीन राजवट आल्यानंतर चित्रपट बस्त्यात जाईल, या भीतीने अनेकांनी सढळ हस्ते मदत केली. हा चित्रपट त्यावेळी दहा आठवडे बुकिंगनेच हाउसफुल्ल चालला.'

'सिंहासन' कादंबरीचा विषय नव्या पिढीतील नवनाथ गोरे यांनी 'फिसाटी' आणि ऋषिकेश पाळंदे यांनी त्यांच्या 'भरकटेशवर' या कादंबरीत अतिशय ताकदीने मांडला असल्याचा संदर्भ यावेळी सतीश आळेकर यांनी दिला.

'सिंहासन'मध्ये सर्वच दुर्योधन

'सिंहासन' कादंबरीत 'एका फोनवर राज्य पडते', असा कुठेही उल्लेख नाही. पण, तो 'टेलिफोन' तेंडुलकरांनी कथेत टाकला. त्या फोनने चित्रपटात थरार निर्माण केला. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातील सर्वच पात्रे दुर्योधन आहेत. चाळीस वर्षांपासून हा दुर्योधनांचा चित्रपट चालतो आहे. आज प्रश्न असा पडतो की, आपण निवडून कोणाला देतो, कौरवांना की पांडवाना?', असा प्रश्न सतीश आळेकर यांनी विचारला. या चित्रपटात काय त्रुटी आहेत हेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीयपणाचा सर्व छटा

चित्रपटाला कोणता ना कोणता संदर्भ असतो. पण 'सिंहासन'मध्ये माणूस, राजकारण, समाजकारण, व्यक्तिगत आयुष्य अशा अनेक संदर्भाची सरमिसळ आढळते. तेंडुलकरांनी सम्यक भान राखून माणूस आणि समाजव्यवस्था यांच्या परिप्रेक्षातून अनेक तुकडे जोडले असल्याचे दिसते. या चित्रपटात राजकीयपणाच्या सर्व छटा बघायला मिळतात', असे समर नखाते म्हणाले. सायंकाळच्या सत्रात 'मुक्ता' हा चित्रपट दाखविला गेला व त्यानंतर अॅड. पारोमिता गोस्वामी आणि डॉ. पटेल यांच्यात चर्चा रंगली.

महोत्सवात आज...

रविवारी सकाळी ९.३० वाजता 'जैत रे जैत' हा संगीतमय चित्रपट दाखवला जाणार आहे. चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, संगीत, पटकथा या विषयांवर डॉ. पटेल आणि चित्रपटाचे पटकथाकार सतीश आळेकर व अजेय गंपावार चर्चा करतील. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा चित्रपट दुपारी १ वाजता दाखविला जाणार असून त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि डॉ. जब्बार पटेल यांच्यात विचारमंथन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकाऱ्याची महिलेकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वत:च्या नावावर फ्लॅट नसताना महिलेने पोलिस अधिकाऱ्याच्या फ्लॅटवर परस्पर वाढीव गृह कर्ज मिळवीत एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेमंत कल्याणराव सोमवंशी (५३, रा. गंगापूर रोड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संत्रा प्रकाश बोहोत (रा. महालक्ष्मी चाळ, द्वारका, नाशिक) असे फसवणूक करणाऱ्या संशयित महिलेचे नाव आहे. १ फेब्रुवारी २०११ रोजी संशयित महिलेने दुय्यम निबंधक कार्यालय-एक व नाशिक महानगरपालिकेत पोलिस उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मालकीच्या दिंडोरी रोडवरील मधुरम सोसायटीतील फ्लॅट नंबर नऊवर महापालिकेकडून एक लाख ३० हजार रुपयांचे वाढीव गृह कर्ज मिळविले. सोमवंशी काही कामानिमित्त सातबारा उतारा काढला असता हा प्रकार पुढे आला.

--

विद्यार्थ्यांचे मोबाइल लांबविले

पंचवटीतील अमृतधाम परिसरात एका सोसायटीत शिक्षणासाठी राहणाऱ्या सात ते आठ विद्यार्थ्यांचे मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्य टॉवरमधील फ्लॅट नंबर १०२ मध्ये राहणाऱ्या सात विद्यार्थ्यांचे एकूण ४८ हजार रुपयांचे सात मोबाईल फोन चोरट्याने उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून चोरून नेले.

बसच्या बॅटऱ्या लंपास

पंचवटी डेपोत उभ्या असलेल्या बसमधून चोरट्याने दोन बॅटरी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.३) मध्यरात्री घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयिताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गौतमपुरी शंकर गोसावी (५७, रा. दापूर, ता. सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.

--

विद्यार्थीनीचा विनयभंग

फोनवरून ब्लॉक का केले अशी विचारणा करीत एका संशयिताने युवतीचा विनयभंग केला. ही घटना कॉलेजरोडवरील एका कॉलेजच्या आवारात घडली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनसार गंगापूर पोलिसांनी राहुल गोर्डे (रा. आडगाव) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (दि.७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

--

जखमी तरुणाचा मृत्यू

राहत्या घरात भाजलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना एकलहरे झोपडपट्टी परिसरात घडली. किसन माधव बराटे (३१) असे या तरुणाचे नाव आहे. किसन हा राहत्या घरात भाजल्याने त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास किसनचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाची तत्परता; वाचविले माजी मुख्याध्यापकाचे प्राण

$
0
0

वडनेरभैरव बाजारात हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीवर केले प्रथमोचार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रक्तदाब वाढल्यामुळे वडाळीभोईच्या आठवडे बाजारात कारमधून खाली पडलेल्या माजी मुख्याध्यापकांच्या मदतीला खाकी वर्दीतील माणुसकी धावल्यामुळे संबंधित मुख्याध्यापकाचे प्राण वाचले. पोलिस हवालदार व त्यांच्या सहकाऱ्याने दाखविलेली तत्परता आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शिक्षक दिनानंतर अवघ्या दोनच दिवसात एका मुख्याध्यापकाचे प्राण वाचविल्यामुळे पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.

धोडांबे येथील माजी मुख्याध्यापक शिवाजी पवार शुक्रवारी आपल्या कारने वडाळी भोई बाजारातून जात असताना अचानक त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे कार कशीबशी थांबवून ते खाली उतरले. मात्र खाली उतरताच ते रस्त्यावरच कोसळले. त्यांच्या तोंडाला फेस आला. त्यांच्याभोवती साधारण ५० ते ६० नागरिक जमा झाले. पण मदतीसाठी कोणीही पुढे यायला तयार नव्हते. त्याचवेळी बाजारात कर्तव्यावर असलेले वडनेरभैरव पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार कल्याण जाधव पुढे आले. जाधव यांच्यासोबत असलेले रा. सु. बलाचे पोलिस मित्र मयूर गोसावी यांनीही मदत केली. हवालदार जाधव यांनी पवार यांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. पोलिस प्रशिक्षण शिबिरातील प्रात्यक्षिकाचा कौशल्याने उपयोग करीत हवालदार जाधव यांनी पवार यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर पवार यांना लगेचच डॉ. ज्ञानेश्वर उफाडे यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. उफाडे यांनी पवार यांच्यावर उपचार करून त्यांना त्वरित नाशिक येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. उच्च रक्तदाबामुळे पवार यांना ब्रेन अटॅक आल्याचे स्पष्ट झाले. पोलिस हवालदार कल्याण जाधव आणि पोलिस मित्र मयूर गोसावी यांनी वेळीच पवार यांच्यावर प्रथमोपचार केल्याने त्यांचे प्राणी वाचले.

पोलिसातील माणूस

रस्त्यावर वाहनांची तपासणी करणारे पोलिस, दुचाकीधारकांवर हेल्मेट नसल्यामुळे कारवाई करणारे पोलिस दिसले की सर्वसामान्य नागरिक त्यांना भलेभुरे बोलतात. मात्र, त्यांच्यावरील जबाबदारी, दडपणाचा कोणीच विचार करीत नाही. शेवटी खाकी वर्दीतही एक माणूस दडलेला असतो आणि त्यामुळेच या खाकी वर्दीतील माणुसकीने आज एका मनुष्याचे प्राण वाचविले, अशा प्रकारची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

पनर्जन्मच झाला

पोलिस वेळेवर मदतीला धावून आले म्हणून मी आज आहे. खाकी वर्दीतील माणुसकी काय असते, याचा मी अनुभव घेतला. पोलिसांमुळेच आज मी माझ्या कुटुंबासोबत आहे.--शिवाजी पवार, धोडांबे

पोलिस प्रशिक्षणात मिळालेल्या मार्गदर्शनाचा आणि प्रात्यक्षिकाचा आमचे हवालदार कल्याण जाधव यांनी योग्यवेळी उपयोग केला. त्यांच्या एका कृतीमुळे आज एक कुटुंब सावरले आणि पोलिसांची प्रतिमादेखील उजळली आहे.--सचिन साळुंखे, एपीआय, वडनेर भैरव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णकारांच्या मागण्यांबाबत पंतप्रधानांना निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सुवर्णकार समाज नागपूर व आर्टीजन वेल्फेअर ऑर्गनायजेशन नागपूर या संस्थांच्या विद्यमाने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे रामलीला मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन पार पडले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र येरपुडे, उपाध्यक्ष सुरेश बागुल, धमेंद्रकुमार, लक्ष्मणकुमार वर्मा, धर्मेंद्र कुल्थीया, राष्ट्रीय सचिव अरविंद हाडे, संगठण सचिव विनायक कशेले, ऑल इंडिया हॅण्डमेड ज्वेलरी फेडरेशनचे अध्यक्ष राजन दास, स्वर्णकार सेवा परिषदेचे अध्यक्ष सौरभआर्य राधौर, प्रदेशाध्यक्ष भास्कर मैंद, उपाध्यक्ष अरविंद बागुल, रमेश लोळगे, सुरेखा लोळगे, संगिता बागुल, प्रकाश भामरे, शिवशंकर सोनी आदी उपस्थित होते. परंपरांगत सुवर्णकार व्यवसायास शासकीय संरक्षण दिले जावे, सुवर्णकारांसाठी अजमिददेव सुवर्णकला बोर्ड केंद्र शासनाच्यावतीने निर्माण करण्यात यावे, दागिण्यांवर हॉलमार्किंग ऐच्छीक ठेवावे, कलम ४११ मध्ये स्पॉट जामीन त्वरीत मिळावते, कारागिर मंत्रालयाची निर्मिती करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांना सादर करण्यात आल्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रींची मूर्ती आमची, ‘दान’ तुमचे!

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यांतर्गत यंदा 'श्रींची मूर्ती आमची, 'दान' तुमचे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाला.

गणेशभक्तांना दान करण्यासाठी सुरेख शाडूच्या गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या असून, गणेशभक्तांनी या मूर्तींचे मूल्य स्वतःच ठरवून गुप्त पद्धतीने दान स्वरूपात द्यायचे आहे. त्यातून जमा होणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वाटप केली जाणार आहे. कृषिनगर येथील ग्रीन स्पेसेस येथे या उपक्रमाचा प्रारंभ झाला. लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सचिव राजू व्यास, डी. एस. पिंगळे, किरण चव्हाण, सागर बोंडे, विलास पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्ती विसर्जनाचे आवाहन केले जाते. परंतु, लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटने यंदा प्रथमच 'श्रींची मूर्ती आमची, 'दान' तुमचे' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पेण येथून शाडू मातीच्या नैसर्गिक रंगात (हळद, गुलाल, बुक्का, गेरू) रंगवलेल्या सुबक मूर्ती आणण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांनी स्वतः मूर्ती पसंत करून तिचे मूल्य स्वतः ठरवायचे आहे. ते मूल्य लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटकडे गुप्तदान स्वरूपात द्यायचे आहे. सोबतच गणेशोत्सवात पूजेवेळी जे धान्य वापरले जाणार आहे, तेही एका वेगळ्या भांड्यात गोळा करून विसर्जनाच्या दिवशी संस्थेच्या स्वयंसेवकांकडे सर्व गोळा करणार आहेत. जमा झालेले सर्व धान्य स्वयंसेवी संस्था गरजूंना वितरित करणार आहेत. भाविकांना मूर्ती विसर्जित करावयाची असल्यास रामवाडी पूल, चोपडा लॉन्सजवळील संलग्न केंद्रात जमा करता येणार आहे. लायन्स क्लबद्वारे या मूर्तींचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे. लायन्स क्लब ऑफ नाशिकच्या मिशन इन्होवेशन २०१८-१९ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

--

जल आणि ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. मी स्वतः पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो. 'श्रींची मूर्ती आमची, 'दान' तुमचे' हा स्तुत्य उपक्रम असून, नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यावा.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

--

शाडूच्या गणेशमूर्ती महाग असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. गणेशभक्त गुप्तरूपात दान करून मूर्ती नेऊ शकतील. त्यातून उभा राहणारा निधी सामजिक उपक्रमांसाठी वापरला जाईल.

-राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत तक्रारींचा पाढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सभेत नियमित कर्जपुरवठा होत नाही, ठेवी असूनही पैसे मिळत नाहीत, सोसायट्यांना कर्जपुरवठा होत नाही अशा तक्रारींचा पाढा सभासद शेतकरी व पतसंस्थांनी वाचला. या वेळी आक्रमक झालेल्या सभासदांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करण्याची आग्रही मागणी करीत तसा ठरावच करून घेतला.

अडचणीत सापडलेल्या बँकेकडे कर्जवाटपासाठी पुरेसा निधी नसल्याने पात्र शेतकऱ्यांना इच्छा असूनही कर्जवाटप करता येत नसल्याचे अध्यक्ष केदा आहेर यांनी सांगत शेतकऱ्यांसाठी ६०० कोटींचा फेरकर्ज वाढीव प्रस्ताव सादर राज्य बँकेकडे केल्याचे सांगितले. बँक अडचणीत सापडली असली तरी सभासदांच्या ठेवी सुरक्षित असल्याची हमी त्यांनी या वेळी सभासदांना दिली. दरम्यान, या सभेत काही सभासद व संचालकांनी चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु सभासदांनीच तो हाणून पाडला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सभा शनिवारी अध्यक्ष केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीपासूनच सभासदांनी शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा केला जात नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली. नियमित कर्जभरणा करूनही पीककर्ज न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांची मागणी लक्षात घेऊन नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा ठराव सभेत बहुमताने करण्यात आला. बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवूनही आम्हाला आमचेच पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी काही सभासदांनी या वेळी अध्यक्षांकडे केल्या. विकास कार्यकारी सोसायट्यांना कर्ज दिले जात नसल्याने त्या अडचणीत सापडल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त करीत सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. नोटाबंदीनंतर माजी सैनिकांच्या पतसंस्थेत माजी सैनिकांना त्यांच्याच ठेवी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार जगन्नाथ केदार यांनी केली. पतसंस्थेची ७५ लाख रुपयांची मुदतठेव बँकेत ठेवूनही ती मिळत नसल्याची तक्रार शांतीलाल आहिरे यांनी केली. बँकेचे कार्यकारी संचालक सतीश खरे यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा मांडला, तसेच विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. सभेला उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेझ कोकणी, धनजंय जाधव, आमदार किशोर दराडे, सीमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, ॲड. संदीप गुळवे, शिवाजी चुंभळे, सचिन सावंत, डॉ. शोभा बच्छाव, ॲड. सुनील ढिकले, ॲड. नितीन ठाकरे उपस्थित होते.

सहाशे कोटींचा कर्जप्रस्ताव

संचालक शिरीषकुमार कोतवाल यांनी बँकेची सद्य:स्थिती आणि सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देत सभासदांच्या शंकांचे निरसन केले. केदा आहेर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. नोटाबंदी, कर्जमाफी धोरणातून संकटात सापडलेल्या बँकेला सावरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी राज्य बँकेकडे ६०० कोटींचा प्रस्ताव दाखल केला असून, नियमित कर्जभरणा करणाऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात येईल, तसेच बँकेच्या ठेवी सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. बँकेवर विश्वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी सभासदांना केले.

कर्मचाऱ्यांवर पैशांचा आरोप

काही सभासदांनी सभेत बँकेच्या कामकाजाबाबत तक्रारी मांडत असताना, जिल्हा बँकेतून आमचेच पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला. आरटीजीएस करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागणी होत असल्याचा आरोप एका सभासदाने केला. पैसे काढण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागल्याच्या तक्रारीही सभासदांनी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आहेर यांनी सांगितले.

बँकेचे ब वर्गात प्रमोशन

बँकेचे शेती व बिगरशेती संस्थांकडून कर्ज येणेबाकी एकूण २८८० कोटी आहे. सध्या बँकेकडे २३०० कोटींच्या ठेवी असून, बँकेने शासकीय रोख्यांमध्ये ५६० कोटींची गुंतवणूक केलेली आहे. रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निकषानुसार सर्व आर्थिक मापदंड राखण्यात यश आलेले आहे. त्यामुळे बँक क वर्गातून ब वर्गात आली आहे. त्यामुळे बँकेची परिस्थिती दिवसेन् दिवस प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचा दावा आहेर यांनी केला.

सभेतील ठराव

- नियमित कर्ज भरणाऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करा

- २०१७-१८ या आर्थिक वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

- सोसायट्यांना चार टक्क्यांनी कर्जपुरवठा करावा, यासाठी न्यायालयात दाद मागावी

- थकबाकीदारांवर तत्काळ कारवाई करून वसुली करावी

- बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये

- बँकेला २०१७-१८ या वर्षात ब वर्ग प्राप्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’ आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी नेट (नॅशनल इलिजीबिलिटी टेस्ट) परीक्षा यंदापासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या बरोबरच या परीक्षेचे नियोजन आता नव्याने रचना करण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या केंद्रीय मनुष्यबळ नियंत्रण विभागाच्या स्वायत्त संस्थेकडे देण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

जुलै महिन्यात पार पडलेल्या नेट परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत लावून यूजीसीने उमेदवारांना सुखद धक्का दिला होता. या पाठोपाठ आता एनटीएने ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर उमेदवारांना आणखी एक सुखद धक्का बसला आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने दोन टप्प्यांत आणि चार सत्रांत ही परीक्षा पार पडेल.

गेल्या काही वर्षांपासून नेटच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठीही दोनच पेपर असणार आहेत. यापैकी पहिला पेपर १०० गुणांसाठी तर दुसरा पेपर २०० गुणांसाठी घेतला जाईल. एकूण ३०० गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत दोन टप्प्यांत ही परीक्षा असून, यात दिवसभरात दोन सत्रांत परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये सकाळच्या सत्रात सकाळी ९.३० ते १०.३० पहिला पेपर, सकाळी ११ ते १ दुसरा पेपर पार पडेल. तर दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ३ पहिला पेपर व दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० दुसरा पेपर पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी www.nta.in.net/p/net.html या वेबसाइटला उमेदवारांनी भेट द्यावी.

'सेट' ऑफलाइनच

दरम्यान, 'नेट'च्या धर्तीवर सेट (स्टेट इलिजीबिलिटी टेस्ट) या परीक्षेतही मोठ्या प्रमाणावर बदल केले जाणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होती. याबाबत काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही अशा बदलांची शक्यता वर्तविली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, २०१९ च्या सुरुवातीला पार पडणारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणाऱ्या सेट परीक्षेत यंदापासून दोनच पेपर असणार आहेत. तिसऱ्या पेपरचा समावेश दुसऱ्या पेपरमध्ये करण्यात आला आहे. मात्र, ही परीक्षा सद्यस्थितीत ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. एकूण ३०० गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेत पहिला पेपर हा १०० गुणांसाठी तर दुसरा पेपर हा २०० गुणांसाठी असणार आहे. या परीक्षेबाबतची सूचना नवीन वर्षात विद्यापीठाच्या वतीने देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतराळ सप्ताहाची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंतराळ क्षेत्राविषयी अधिकाधिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक भारतीय शाखा व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक अंतराळ सप्ताह-२०१८' निमित्त विविध उपक्रमांची पर्वणी नाशिककरांना मिळणार आहे.

नाशिकमधील सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ क्षेत्राविषयी व्याप्ती, माहिती, वाव व संधी याविषयी जागृती आणि ज्ञानसंवर्धन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होणार असून, विविध स्पर्धा, उपक्रम यानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाचा मानवतेच्या कल्याणासाठी वापर करण्याच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जगभरातील सुमारे ७० देश दर वर्षी ४ ते १० ऑक्टोबर हा कालावधी जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा करतात. यंदा आंतरराष्ट्रीय अंतराळ सप्ताह समितीने २०१८ वर्षासाठी 'अंतराळ क्षेत्राद्वारे जागतिक ऐक्य साधणे' ही संकल्पना जाहीर केली आहे.

नाशिक जिल्ह्यात या सप्ताहाची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी जागतिक अंतराळ सप्ताह, अंतराळ विज्ञान व क्षेत्र, इस्रोची अभिमानास्पद कामगिरी, अंतराळ क्षेत्रात कार्यरत संस्था याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य शोभायात्रेद्वारे करण्यात येणार आहे. सुमारे १००० विद्यार्थी, प्रतिष्ठित मान्यवर हातात उद्बोधक फलक, इस्रोने खास पाठविलेले विविध मॉडेल्स घेऊन त्यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सप्ताहाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ५ ते १० ऑक्टोबर या काळात इस्रोचे दिग्गज शास्त्रज्ञ, इंजिनीअर्स, 'नासा'चे शास्त्रज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्यान व विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे असा संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील देश-विदेशांतील उपक्रम, संशोधन, सद्य व भविष्यातील योजना, शिक्षण व नोकरी, उद्योजकतेच्या संधी याविषयी विस्ताराने माहिती घेण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या सप्ताहातील उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अविनाश शिरोडे, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले आहे.

'आयएमआरटी' येथे प्रदर्शन

गंगापूररोड येथील मविप्रच्या आयएमआरटी कॉलेजमध्ये विशेष प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अंतराळ क्षेत्राविषयी विविध संकल्पना मांडणारी पोस्टर्स, मॉडेल्स आणि इस्रोने खास पाठविलेले मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ते पाहण्याची संधी विद्यार्थी व नागरिकांनी साधावी. हे प्रदर्शन सप्ताहभर दररोज दुपारी ४ ते सायंकाली ७ वाजेदरम्यान खुले राहणार आहे, असे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता : श्रीरंग गायकवाड

$
0
0

श्रीरंग गायकवाड

नाशिक : आडगाव येथील श्रीरंग पांडुरंग गायकवाड (ह. मु. कळवण) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. कळवण येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कदमांच्या पुतळ्याला कळवणमध्ये ‘जोडे मारो’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

'मुंबईत दहीहंडीच्या दिवशी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम उर्फ रावणाचे करायचे काय? खाली डोके वर पाय' अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त करीत कळवण शहरात शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला 'जोडे मारो' आंदोलन केले.

शनिवारी सकाळी ११. ३० वाजता शहरातील बसस्थानक परिसरात दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक कारभारी आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, शहरप्रमुख साहेबराव पगार व महिला संघटक प्रिती मेणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. आमदार राम कदम यांच्याविरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. कळवण विधानसभा सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव, डॉ. दिनेश बागुल, राजू वाघ, प्रकाश भालेराव, वसंत देसाई, विभाग प्रमुख शितलकुमार अहिरे, डॉ. पंकज मेणे, ग्राहक कक्ष ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय रौंदळ, मोतीराम पगार, उपशहरप्रमुख अजय पगार आदींसह शिवसैनिक उपस्थीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात पोलिसांचा सराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी पिपळगाव बसवंत येथे सराव शिबिर घेतले. यात फायर अटॅक, अश्रू फायर, लाठी चार्ज आदींचा सराव करण्यात आला. शुक्रवारपासून सोमवार ११ सप्टेंबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या आवारात पिंपळगावचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे, ओझर येथील पोलिस निरीक्षक उपासे, सायखेडा पोलिस निरीक्षक मोरे, भारत चौधरी आदींनी यात सहभाग घेतला. पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या मैदानावर कवायत निर्देशक पोलिस नाईक पावरा यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवण्यात जिल्हा देशात पहिला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षणात ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्यातील तब्बल सव्वादोन लाख नागरिकांनी सहभाग घेतला. या विक्रमी प्रतिक्रियांमुळे नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने जिल्ह्याला शनिवारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या पुरस्कार वितरण जिल्ह्याचा गौरव झाला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेलकंदे यांनी हा सत्कार स्वीकारला.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येऊन स्वच्छतेविषयक मोठे काम करण्यात आले. यामध्ये ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्याचे सांगण्यात आले होते. त्यात जिल्ह्याने आघाडी घेतली. या पुरस्काराबरोबरच २०१६-१७ च्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय विशेष पुरस्कार मिळालेल्या दिंडोरी तालुक्यातील आवनखेड ग्रामपंचायतीलाही या वेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या माळेगाव (ता. सिन्नर), द्वितीय आवनखेड (ता. दिंडोरी) व ओढा (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये केंद्र सरकारच्या वतीने 'संकल्प ते स्वच्छ सिद्धी'अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नाशिकच्या चेतना जाधवला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

असा मिळाले अव्वल स्थान

देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत गावाची तपासणी १ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छताफेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमधील भिंती रंगविण्यात येऊन सुशोभीकरण करण्यात आले.

ऑनलाइन सव्वादोन लाख प्रतिक्रिया

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्ह्यात कुटुंब संपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी देण्यात आल्या, तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाइल ॲप एसएसजी २०१८ द्वारे नाशिक जिल्ह्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्हा आज देशात सर्वाधिक प्रतिक्रिया नोंदविण्यात यशस्वी ठरला. नाशिक जिल्ह्यातून २ लाख २१ हजार ३२१ ग्रामस्थांनी ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीने ‘भडका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंधन दरवाढीच्या झळा सर्वसामान्यांना असह्य होऊ लागल्याने काँग्रेसने सोमवारी (दि. १०) भारत बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यात अन्य राजकीय पक्षांनीदेखील या बंदला सक्रिय पाठिंबा देत त्यामध्ये उडी घेतली आहे. भाजप सरकारला वठणीवर आणण्यासाठी नागरिकांनीदेखील या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीयांनी केले आहे.

इंधनाच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल ८८ रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७६ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसने भारत बंदची हाक दिली असून, शिवसेनावगळता अन्य राजकीय पक्षांनी त्यास जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन पक्ष पदाधिकाऱ्यांनी इंधन दरवाढीविरोधातील भूमिका मांडली. या परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अनिल मटाले, सलीम शेख, माकपचे डॉ. डी. एल. कराड, सुनील मालुसरे, श्रीधर देशपांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले, विजय दराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद लभडे, नाना बच्छाव, समाजवादी पक्षाचे सय्यद रफिक महंमद यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. इंधन दरवाढीविरोधातील संतप्त प्रतिक्रिया दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही भारत बंदची हाक देण्यात आलेली असून, सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केले आहे. इंधनाचा वापर करणारी ६७ टक्के वाहने मालवाहू वाहतूक करणारी असून, त्यांना या इंधन दरवाढीची मोठी झळ बसते आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढला, की महागाई वाढून सामान्य नागरिकांनाही त्याची झळ बसते. इंधनाच्या दरांवर सरकारचेच नियंत्रण असून, ही दरवाढ रोखण्यासाठी हा बंद असल्याचे डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले. जनता संकटात असून, महागाई वाढतच आहे. सरकारला जनतेच्या भावनांची कदर नसल्याने सामान्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठीच बंदमध्ये सहभागी होत असल्याचे मनसे, राष्ट्रवादी, माकप, भाकप आणि समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

--

दुपारी चारपर्यंत असणार बंद

इंधन दरवाढीची झळ सर्वांनाच सोसावी लागत असल्याने सर्वांनीच या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीयांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी सहापासून दुपारी चारपर्यंत हा बंद असणार आहे. स्कूल बसचालकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे यासाठी त्यांना यापूर्वीच आवाहन केले आहे. बंदला हिंसक वळण लागले, तर सर्वाधिक नुकसान बसेसचे होते. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसे बंद ठेवाव्यात, असे आवाहनही या पक्षांनी केले असून, रिक्षाही बंद ठेवण्याचे आवाहन संघटनांना करण्यात आले आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली असून, त्यांच्याशी संलग्न संघटनांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ वैद्यकीय सेवा या बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिली. शाळा बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले असून, या बंदला १०० टक्के प्रतिसाद अपेक्षित असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

--

शिवसेनेला सहभागाचे आवाहन

पत्रकार परिषदेला भाजप-शिवसेनावगळता सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या भारत बंदमध्ये शिवसेनेनेही सक्रिय सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड यांनी केले.

--

यूथ वॉक अन् घोषवाक्यांद्वारे निषेध

इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहरात शनिवारी कॅनडा कॉर्नरपासून भोसला मिलिटरी स्कूलपर्यंत यूथ को-ऑर्डिनेशन समितीने यूथ वॉक केला. सकाळी १० वाजता या वॉकला सुरुवात झाली. पेट्रोल और रुपये की लगी है दौड की कौन करेगा पुरी सेंच्यूरी पहले, शेतीमालाचे भाव, रोजगार, कामगारांचे किमान वेतन वाढवा इंधनाचे दर नाही, १५ लाख द्या नाही तर पेट्रोलचे दर कमी करा, सरकार तेरा अनोखा खेल डेटा सस्ता, महंगा तेल यांसारखी घोषवाक्ये असलेले फलक आंदोलनकर्त्यांनी हाती घेतले होते. त्यामध्ये कुणाल पाटील, भूषण काळे, समाधान भारतीय, विश्वास वाघ यांच्यासह अनेक तरुण सहभागी झाले होते.

(लीड २ फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस शरीर सौष्ठव संघ जाहीर

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य पोलिस शरीर सौष्ठव संघ निवडण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली.

रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या चाचणीत राज्यभरातील ९ पोलिस विभागातील ५९ खेळाडू सहभागी झाले होते. यापैकी १७ खेळाडूंची ९ वजनी गटातून अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हे खेळाडू येत्या जानेवारी २०१९ मध्ये जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करतील. पोलिस स्पर्धेत या क्रीडा प्रकाराचा प्रथमच समावेश झाला आहे. यासाठीची संघ निवड नाशिक येथे व्हावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे पहिला मान नाशिक पोलिस आयुक्तालयाला मिळाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवड चाचणीला निवड चाचणीचे स्वरूप न राहता भव्य स्पर्धेचे स्वरूप आले होते. अतिशय सुंदर नियोजनामुळे सर्व सहभागी खेळाडू आनंदीत झाले. पोलिस आयुक्तांसह नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, पोलिस अधीक्षक संजय दराडे, सर्व पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा बेमिसाल मैफलीस दाद

$
0
0

लगीनघाई नको! -2

अंतराळ सप्ताहाची पर्वणी-३

शोध गोंधनापूर किल्ल्याचा -४

---

आशा बेमिसाल मैफलीस दाद

नाशिक : चेरीबेरी लाइव्ह मुंबई, ज्ञानेश वर्मा प्रस्तुत, रोटरी क्लब नाशिकरोड, सुसंस्कृती फांउडेशनच्या डी. जे. कराओके हब आणि ऋषभ होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'आशा बेमिसाल' मैफलीस रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये ही मैफल पार पडली. ग्यानेश वर्मा, अश्विनी सरदेशमुख, समीर भावे, रोहिणी पांडे, जिशान शेख, धनंजय जैन यांनी आशाताईंची सुरेल गीते सादर केली.

--

आज वधू-वर मेळावा

नाशिक : सोनवणे फाउंडेशनतर्फे आज, रविवारी (दि. ९) उच्चशिक्षित बौद्ध, चर्मकार, मातंग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ११ वाजता हॉटेल सेलिब्रिटा, जुनी अंधशाळा, नाशिकरोड येथे होणार आहे. या मेळाव्याचा विवाहेच्छुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांनी केले आहे. माहितीसाठी ९४२३०७१२७७ किंवा ९४२११६७३६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

--

आज सांगता

नाशिक : कालिका देवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, नाशिक यांची सर्वसाधारण सभा, तसेच श्रावणमासानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचा सांगता सभारंभ आज, रविवारी (दि. ९) सकाळी १० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम कालिमा देवी सभागृहात होणार असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

--

आरोग्य तपासणी

सिडको : शिवरुद्र प्रतिष्ठान व नवसंजीवनी सेवाभावी संस्थेतर्फे श्रीगणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १४) माऊली लॉन्स येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. एस. व्ही. जावळेंसह विविध तज्ज्ञ डॉक्‍टर रुग्ण तपासणी करणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणरक्षणास सरसावली ‘पालवी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करीत असलेल्या पालवी फाउंडेशनतर्फे यंदाही विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, 'माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव' स्पर्धाही रंगणार आहे. पर्यावरणपूरक वस्तूंपासून गणेश कलाकृती, सजावट व पर्यावरणपूरक पद्धतीनेच विसर्जन अशा स्पर्धांचाही या उपक्रमांत समावेश राहणार आहे.

गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता शाडू मातीच्या मूर्ती वापराविषयी प्रचार-प्रसार केला जात आहे. परंतु, शाडू मातीच्या अतिउपशामुळे त्या परिसरातील पर्यावरण संतुलन बिघडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आता शाडू मातीचा वापर थांबविणेदेखील गरजेचे झाले आहे. याविषयी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बसविण्याविषयी जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर मूर्तिदान न करता विसर्जन हे घरच्या घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आवश्यक असून, घरी केलेली सजावटदेखील नैसर्गिक साधनांपासूनच करणे आवश्यक असणार आहे. अशा मूर्ती, तयार केलेल्या कलाकृती व सजावटीचा फोटो दि. १३ ते १५ सप्टेंबरपर्यंत ९८३४५६४४५४ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्याबरोबरच गणेश कलाकृती व सजावटीची माहिती १०० शब्दांत सोबत देणे आवश्यक आहे. या मूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनेच करणे गरजेचे असून, विसर्जनाचा फोटो व २५ शब्दांत माहिती आयोजकांना पाठविणे बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धकांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, शाळा, कॉलेजही यात सहभाग घेऊ शकणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रशस्तिपत्रकाने गौरविण्यात येणार आहे.

यापासून केलेली सजावट अपेक्षित

कापूस, धान्य, नारळ, लाकूड, सुपारी, फुले, फळे, सुकामेवा आदी नैसर्गिक घटक, साहित्यापासून बनविलेल्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्यासाठी 'माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या मूर्ती, सजावटींनाच यात प्राधान्य दिले जाणार आहे. नैसर्गिक साहित्याबरोबरच हळद, कुंकू, बीट, फुलांचे रंग, वॉटर कलर अशा नैसर्गिक रंगांपासून केलेली सजावट स्पर्धेसाठी अपेक्षित असणार आहे.

----------------

गणपतीची इमेज वापरणे.

----

(बातमी आजच्या अंकात वापरली आहे.) पेंडिंग (सुधारित)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images