Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बैल धुण्यास गेलेलामुलगा गेला वाहून

$
0
0

येवला : पोळा सणानिमित्त बळीराजाची आपल्या 'सर्जा-राजा'स अर्थातच बैलांना साजशृंगार करण्याच्या दृष्टीने सर्वत्र लगबग सुरू असतानाच, रविवारी (दि.९) दुपारी पाटोदा ते आडगाव रेपाळ दरम्यानच्या पालखेड डाव्या कालव्यात बैलांना धुण्यासाठी गेलेला प्रसाद आण्णासाहेब तनपुरे (वय १६) हा मुलगा वाहून गेला.

प्रसाद हा आपले नातेवाईक, मित्रांसमवेत पालखेड डाव्या कालव्यावर बैल धुण्याकरिता गेला होता. हातातील कासरा सुटल्याने बैल पाण्यात गेला. बैल पाण्यात बुडेल या भीतीने प्रसाददेखील बैलाच्या मागे पाण्यात गेला. बैल कालव्याच्या पाण्यातून पलीकडे निघून गेला खरा, मात्र प्रसादला पोहता येत नसल्याने तो कालव्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. प्रसाद पाण्यात वाहून जात असताना, त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत प्रसादचा शोध लागला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडला बालगंधर्वांचा सांगीतिक प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ज्योती कलश झलके', 'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' अशा एकापेक्षा एक गीतांनी रविवारची संध्याकाळ नाशिककर रसिकांना वेगळी अनुभूती देऊन गेली. निमित्त होते 'श्री' संगीत महोत्सवाचे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा दालनात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्री संगीत प्रतिष्ठानतर्फे श्रीकांत सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ 'श्री' महोत्सव दरवर्षी होतो. महोत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. यंदा ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक व संगीत अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर यांची मैफल झाली. त्यांनी आपल्या गायनातून सुधीर फडके यांच्या सांगीतिक जीवनाचा पट उलगडला. व्याख्यानातून त्यांनी गीतरचनाही सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात आसावरी रागाने झाली. अनवट हरकती घेत त्यांनी आपल्या गायनातील कसब रसिकांपुढे पेश केले. या वेळी सुधीर फडके यांनी एका रागात किती गीते संगीतबद्ध केली हेही धनेश्वर यांनी श्रोत्यांना सांगितले. त्यांनतर 'पीयु पीय करत' ही रचना सादर केली. सुधीर फडके यांच्या रागांच्या पेशकारीबद्दल धनेश्वर म्हणाले, की विभास नावाचा राग सगळ्यांनी ऐकला आहे; परंतु फडके यांनी अनेक गीतांमध्ये आभास नावाच्या रागाचीदेखील निर्मिती केसल्याचे सांगून रचना सादर केल्या. 'हरि भक्त न के हितकारी' ही राग जोगीयातील रचना सादर केली. त्याचप्रमाणे रामचंद्र विनायक फडके यांचे सुधीर फडके असे नामकरण कसे झाले, याचाही उलगडा त्यांनी केला. 'तुला पाहते रे तुला पाहते', 'धुंद येथ मी स्वैर झेलिता मद्याचे पेले', अशा एकापेक्षा एक रचना, त्याचप्रमाणे राग भूपाळी, राग भीमपलास सादर केला. कार्यक्रमाला तबल्याची साथ निसर्ग देहूकर, सारंगीची साथ संदीप मिश्र, तर निवेदन सहाय्य पद्मजा पाटील-शिंदे यांचे होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री महोत्सवाच्या आयोजक वीणा सहस्रबुद्धे, निखिल सहस्रबुद्धे, अमरेंद्र धनेश्वर, भवाळकर काका यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वीणा सहस्त्रबुद्धे यांनी कार्यक्रमामागील आयोजनाची भूमिका सांगितली. उत्तरोत्तर रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्ञानेश्वरी’तील प्रत्येक अक्षर सुवर्ण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ज्ञानेश्वरी'चा गाभा जाणून घेण्यासाठी नामदेवांची गाथा वाचायला हवी. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधून भांबावलेल्या माणसांना शिकवण देण्यात आली आहे. जसे कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याप्रमाणे धरतीवर माणसांना ज्ञानेश्वरी सांगण्यात आली. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण सांगणे अतिशय कठीण आहे. कारण ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर सुवर्ण आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक वामन देशपांडे यांनी केले.

शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोअर्सतर्फे 'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रमांतर्गत 'ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण' या विषयावर गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात रविवारी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान झाले. लेखिका प्रज्ञा कुलकर्णी, लेखक डॉ. उन्मेष कुलकर्णी आणि राजेंद्र विद्वंस उपस्थित होते. या वेळी डॉ. कुलकर्णी यांच्या 'श्री संत गजानन महाराज यांची शिकवण' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. उपस्थितांसोबत संवाद साधताना वामन देशपांडे म्हणाले, की मी आठवीत असताना मराठीच्या अभ्यासक्रमात पद्य विभागात ज्ञानेश्वरांच्या ओव्या होत्या. या ओव्यांचा अभ्यास करताना अंतःकरणात ज्ञानेश्वर माऊलींचा प्रवेश झाल्याचे मला जाणवले. तेव्हापासून ज्ञानेश्वरांच्या कार्याचा अभ्यास करण्याचा ध्यास मी घेतला. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचे माझे स्वप्न आहे. ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण कोणते, याचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांची गर्दी पाहता असे संमेलन अन्य कुठे होणे नाही, अशी भावना देशपांडे यांनी व्यक्त केली.

'ज्ञानेश्वरी'संदर्भात बोलताना देशपांडे म्हणाले, की ज्ञानेश्वरी सर्वांसाठी सांगण्यात आली आहे. त्यावर ठराविक लोकांचा अधिकार नाही. ज्ञानेश्वरीच्या वाचनातून मानवाला दुःखातून मुक्त होण्याची प्रेरणा मिळते. संकट, तणाव आणि खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्ञानेश्वरी हे एक औषध आहे. संतसाहित्याचा अभ्यास करणे म्हणजे संतांचे चरित्र अभ्यासणे नव्हे. महाराष्ट्राची संतपरंपरा विशेष आहे. या परंपरेचा अभ्यास करण्यासाठी प्रबळ दृष्टिकोन असायला हवा. गीता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास किंवा किमान वाचन केल्यास पावित्र्य म्हणजे काय आणि सभोवतालच्या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती समजते. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर सुवर्ण आहे. ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणे, तसेच सुवर्णाक्षरांनी युक्त ओव्या फक्त एक तासात सांगणे अशक्य आहे. त्यामुळे व्याख्यानातून सुवर्णकणांबद्दल बोलणे कठीण आहे. त्यासाठी ज्ञानेश्वरी सप्ताह असायला हवा. पारायण आणि निरूपणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी सांगता येते, असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधना आणि तपावेळी आनंदी असणे गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधना, तप आणि ज्ञान यांच्या माध्यमातून माणसाला शांती प्राप्त करता येते. साधना आणि तप करताना आनंदी असणे गरजेचे आहे. सतत ताण असल्याचे सांगत राहिल्यास अधिक त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आनंद उपभोगत आनंदी असणे प्रत्येकासाठी लाभदायी आहे, असे निरूपण सुशीलकुंवरजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त रविवार कारंजा जैन स्थानक येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त रविवारी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्यांनी सांगितले, की गुरूची आराधना केल्यास प्रत्येकाला मोक्ष प्राप्त होतो. साधनेच्या सोबतीला आनंदी राहणीमान असणे गरजेचे आहे. तणावात राहून साधना किंवा तप केल्यास योग्य फलप्राप्ती होत नाही. देवाच्या आराधनेत प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. आराधनेच्या वेळेस मन शांत आणि विचाररहित असायला हवे. त्यासाठी जीवनशैली आनंदी असायला हवी. ज्ञान, तप, शांती आणि साधना या मार्गावर प्रत्येकाने स्वतःला न्यावे. कौटुंबिक व्यवस्थेत अनेकदा व्यक्ती आनंद व्यक्त करीत नाहीत. कामाचा किंवा इतर गोष्टींचा तणाव असल्यास कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करून मन मोकळे करायला हवे. अध्यात्माच्या वाटेवर शुद्ध अंतःकरणाने चालावे. त्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहावे, असे निरूपणही त्यांनी केले. यावेळी जैनबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

लोगो :

चातुर्मास प्रवचन

रविवार कारंजा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातून पाऊस गायब; चिंता वाढली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८० टक्के पाऊस झाला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर कमीच राहिला. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जिल्हावासीयांची निराशा करणारा पाऊस सप्टेंबरमध्ये आपल्या रौद्र रूपाचे दर्शन घडवेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, ही आशाही फोल ठरत आहे. सप्टेंबरचा पहिला पंधरवडा कोरडा जाण्याची शक्यता बळावली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या चारच तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी आलटूनपालटून हजेरी लावत आहेत. तेथेही रोज फार तर दोन ते पाच मिलिमीटर पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्येदेखील पाऊस असून नसल्यासारखाच आहे. उर्वरित ११ तालुक्यांकडे तर पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा हे चार तालुके वगळता दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, कळवण या तालुक्यांमध्ये पाच सप्टेंबर रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. या दिवशी जिल्ह्यात ७२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर बऱ्याच तालुक्यांमधून पाऊस गायब झाला आहे. गुरुवारी (दि. ६) १४ मिमी, शुक्रवार आणि शनिवारी सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारीही एवढाच पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्यात आतापर्यंत ८४५.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

धरणांमध्ये ८० टक्केच पाणी

जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आजमितीस ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सप्टेंबरअखेरपर्यंतच मान्सूनचा कालावधी असल्याने पुढील २० दिवसांत धरणांमधील पाणीसाठा २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही धूसर होऊ लागली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह इगतपुरीत काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे आळंदी, करंजवण, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी आणि पुनद या धरणांमधून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा खोऱ्यातील अनेक धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.

धरण-पाणीसाठा (टक्के)

गौतमी गोदावरी १००

आळंदी १००

वाघाड १००

भावली १००

वालदेवी १००

कडवा १००

हरणबारी १००

केळझर १००

काश्यपी ९९

तीसगाव ९९

ओझरखेड ९८

दारणा ९८

गंगापूर ९७

नांदूरमध्यमेश्वर ९५

चणकापूर ९३

पुनद ९३

पुणेगाव ९२

भोजापूर ८४

पालखेड ८०

मुकणे ७२

गिरणा ४९

करंजवण १८

माणिकपुंज १०

नागासाक्या ०

एकूण ८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेत्यांचे २५ ला धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केला आहे़ मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

कल्याणकारी मंडळाचे कामकाज तत्काळ सुरू करावे यासह विविध मागण्या सरकारदरबारी प्रलंबित असल्याने संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे १६ जुलै रोजी राज्य कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली होती. १५ ऑगस्टपासून नोंदणी सुरू करू, असे आश्वासन निलंगेकर यांनी दिले होते. मात्र, अजूनही कल्याणकारी मंडळाच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी सुरू करून कल्याणकारी मंडळाचे कामकाज तत्काळ सुरू करावे; अन्यथा २५ सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ सुरू करावी, मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा- सुविधा देऊन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव व आर्थिक तरतूद करावी, महाराष्ट्र राज्य असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे, मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, सरकारी घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असल्याची माहिती वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सुनील पाटणकर, बालाजी पवार, गोरख भिल्लारे, विकास सूर्यवंशी, दिनेश उके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपडणाऱ्या तरुणाईचा गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांना क्रीडासाधना राजस्तरीय युवा पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले. कैलासमठात हा कार्यक्रम झाला. मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते तरुणांना गौरविण्यात आले. देशाचे भवितव्य युवकांच्या हाती असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी सर्वस्व अर्पण करावे, तसेच देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले.

शिवराज वहाडणे, तन्मय घोडके, सोनम बिडवे, प्रतीक्षा ढगे (अहमदनगर), भूषण जाधव (ठाणे), शुभम जाधव (सांगली), प्रफुल्ल दुमाल, उमेश पाटील, रोहित प्यामाल, दीपक क्षीरसागर (कोल्हापूर), अंकित गजभिये (नागपूर), विशाल शिंदे (चंद्रपूर), विनित रानमाळ, सुशील जोरगेकर (परभणी), दामिनी झाडबुके, पवन भोसले, अक्षय माने (सोलापूर), अजय त्रिभुवन (औरंगाबाद), श्रीराम निळे, वैभव लोंढे, सुचित्रा साखरे, अक्षय गोलाने (बुलडाणा), विजय गाडेकर (जालना), अवधूत ढोरे (अकोला), पिराजी कुसले (बीड), अविनाश वाघ, प्राजक्ता देशपांडे, मयूर गुरव, डॉ. नारायण वनराज, अमोल आहेर, ऐश्वर्या पवार, प्रकाश फुलारे, उमेश सेनभक्त, सायली सूर्यवंशी, वैभव खवले, गणेश कल्लुन्नल, राजू जाधव, बबन बोडके (नाशिक), दीपक वाडे (जळगाव), सुचित्रा साखरे (बुलढाणा), उमेश पाटील (शहादा), प्रल्हाद बेदरकर (नंदुरबार), पेरीस्वामी रावण (मुंबई), काजी मोहम्मद (लातूर), अनिल रावळे (हिंगोली), जयेशकुमार राजपूत, विशाल पवार (धुळे), प्रल्हाद अलाणे, संदेश पवार (वाशीम) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अशोक दुधारे, आनंद खरे, ब्राह्मदत्त शर्मा, राजू माने, दिलीप घोडके, विलास वाघ, नैना नायर, राजू जाधव, विक्रम दुधारे आदी उपस्थित होते. दीपक निकम यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा काठे यांनी पुरस्कार यादीचे वाचन केले. पांडुरंग गुरव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम क्षेत्रावर आज परिसंवाद

$
0
0

नाशिक : मीर इंडिया या नव्या प्रॉपर्टी शॉपी वेबपोर्टलतर्फे प्रारंभानिमित्त 'नाशिकचे बांधकाम क्षेत्र : आव्हान आणि संधी' या विषयावर आज, सोमवारी (दि. १०) परिसंवाद होणार आहे. दुपारी ३ वाजता तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे होणाऱ्या या परिसंवादात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आर्किटेक्ट संजय पाटील, क्रेडाईचे सेक्रेटरी उदय घुगे, क्रेडाईचे माजी अध्यक्ष अविनाश शिरोडे, नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग सहभागी होतील. नाशिककरिता जुन्या-नव्या प्रॉपर्टीसाठी आता www. propertyshopy.com हे वेबपोर्टल सुरू होत आहे. त्यामुळे रहिवासी व व्यावसायिक जागा एका क्लिकवर सहज शोधता येणार असल्याची माहिती मीर इंडियाचे संचालक नावेद ए. एस. यांनी दिली.

--

'चालिहा'चा आज सांगता (फोटो)

देवळाली कॅम्प : सिंधी समाजातील पवित्र पूज्य चालिहा साहिब जो मेलो (श्रावणव्रत) व्रताची सांगता आज, सोमवारी (दि. १०) होणार आहे. देवळाली कॅम्पसह शहर परिसरात सिंधी बांधवांनी या व्रताचे आचरण केलेले असून, त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टतर्फे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत विधिवत मटकीपूजन व भजन करून अक्खापूजन करण्यात येईल. ४० दिवस स्थापन करण्यात आलेल्या पूज्य बेहराणा व मटकीची मिरवणूक दुपारी संसरी येथील दारणा नदीपर्यंत काढण्यात येईल. नदीपात्राजवळ जलामध्ये ज्योत प्रवहन, मटकीपूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावनमंत्र, पल्लव असे विधी झाल्यावर व्रताची सांगता करण्यात येईल. रात्री ८ ते १०.३० वाजेदरम्यान भंडारा होईल. ट्रस्टचे अध्यक्ष वासुदेव श्रॉफ, आनंद कुकरेजा, वासुदेव बत्रा, अमित रोहेरा, नगरसेवक भगवान कटारिया, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला आदींनी समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.

--

जवानांची स्वच्छता मोहीम

जेलरोड : नोट प्रेस येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे (सीआयएसएफ) नोट प्रेस ते सोमेश्वर अशी सायकल रॅली काढण्यात आली. या जवानांतर्फे सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कमांडंट के. के. भारद्वाज, डेप्युटी कमांडंट रितेश कुमार, असिस्टंट कमांडंट परमजीत सिंग, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

--

भरतीबाबत आजपासून शिबिर

देवळाली कॅम्प : मध्य रेल्वेमध्ये ग्रुप डीकरिता होणाऱ्या नव्वद जागांच्या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आज, सोमवारी (दि. १०)पासून बुधवार (दि. १२)पर्यंत मोफत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. युनिवर्सल फाउंडेशनच्या सहकार्याने मांडे लॉन्स येथे हे शिबिर होणार असल्याची माहिती नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे यांनी दिली. शिबिरात दररोज दोन सत्रांमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. या परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर शिवसेना\R, शिवनेरी स्पोर्ट्स क्लब व लामरोड युवक मित्रमंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राइम फास्ट

$
0
0

टेम्पोच्या धडकेत

रिक्षाचालक ठार

नाशिक : पान दुकानाबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाचा टेम्पोच्या धडकेमुळे मृत्यू झाला. कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूरकडून त्र्यंबक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला. बापू नामदेव उशिरे (४० रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. उशिरे शनिवारी (दि. ८) दहा वाजेच्या सुमारास रिक्षा घेऊन कॅनडा कॉर्नर भागात गेले होते. पॅनासोनिक शोरूमजवळ बॅटरी दुकनाजवळ रिक्षा उभी करून नजिकच्या पानस्टॉल समोर ते उभे असतांना भरधाव आलेल्या पिवळ्या रंगाचा मिनी टेम्पोने (एमएच १५ एफ ३२१०) उशिरे यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

कोणार्कनगरला घरफोडी

नाशिक : आडगाव, कोणार्कनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. यात रोकडसह सोने-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी बाळू संभाजी आहेर (४०, रा. सदगुरू कृपा अपा. सयाजी पॅलेस हॉटेल जवळ) यांनी तक्रार दिली आहे. आहेर कुटुंबीय शनिवारी (दि. ८) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी बनावट चावीने लॅच लॉक उघडले आणि घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली ८० हजारांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

तरुणीचा विनयभंग

नाशिक : कुटुंबीयांना शिवीगाळ व मारहाण करीत तरुणाने घरात घुसून तरुणीचा विनयभंग केला. सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर भागात घटना घडली. राहुल नंदू वाघ (रा. नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. तो तरुणीसह कुटुंबियांचा परिचित आहे. घटना घडली त्यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशमध्ये विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मला एकांतात तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत राहुलने तरुणीला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र, तरुणीसह तिच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने संतापलेल्या राहुलने तरुणीचा भाऊ तसेच वडिलांसह मुलीच्या मामास शिवीगाळ व मारहाण केली तसेच युवतीचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावीन्यपूर्ण मखर तेजीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थर्माकोल आणि प्लास्टिकबंदीमुळे यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी कापडी व कागदी मखरांचा खास पर्याय नाशिककरांना उपलब्ध झाला आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींसोबतच बाप्पांसाठी खास कापडी आणि कागदी मखर आणि मंदिरांनाही भक्तांकडून मोठी मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. यंदा मखरांची किंमत वधारली असली, तरीही नागरिकांची नवीन पद्धतीच्या मखरांना अधिक पसंती मिळत आहे.

पुठ्ठ्यापासून तयार केलेली विविध मंदिरे, सिंहासन, कापडी पडदे, कापडी तोरण आणि कापडी मंदिरांचे मखर यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. जुने नाशिक परिसरासह डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम व शहरातील इतर बाजारपेठांत कापडी मखर उपलब्ध आहेत. पुठ्ठ्यापासून तयार केलेले मुकूट, हार, दूर्वा, जास्वंदीचे फूल, मूषक सजावटीसाठी खरेदी केले जात आहेत. कापडी मखरास लाकडाचा आणि लोखंडाचा साचा तयार करण्यात आला आहे. त्यावर चमचमत्या कपड्यापासून तयार केलेल्या मंदिरांसह गणपतीसाठीच्या पाळण्यांना मागणी जास्त आहे. हे मखर अधिक आकर्षक करण्यासाठी लटकन, फुले, कुंदन, क्रिस्टल माळा, घंटी यांचा वापर करण्यात आला आहे. दर वर्षी मखरांची किंमत पाचशे ते पाच हजार रुपयांहून अधिक असते. यंदा कापड, लाकूड, कागदांपासून मखर तयार केल्याने दोन हजार ते दहा हजार रुपयांहून अधिक किमतीला त्यांची विक्री होत आहे. मात्र, मखरांची किंमत वधारली असली, तरी नव्या मखरांच्या खरेदीला नाशिककरांकडून मोठी मागणी दिसत आहे.

..

'स्मोक फाउंटन'चे आकर्षण

गणेशोत्सवानिमित्त बाजारात स्मोक फाउंटन स्टॅच्यू सर्वांचे आकर्षण ठरत आहे. स्मोक कोन धूपसाठी वापरला जात आहे. यामध्ये गजाननाच्या मूर्तीच्या स्टॅच्यूशेजारी स्मोक धूप लावला जातो. या धूपाचा धूर खालच्या बाजूने पसरतो. त्यामुळे या स्टॅच्यूला आकर्षक रूप प्राप्त होते. हा स्मोक फाउंटन मखर सजावटीसाठी आकर्षण ठरत आहे. सातशे रुपयांपासून हा स्टॅच्यू उपलब्ध आहे. त्यासोबतच यंदाही लाँग स्टिक अगरबत्तीलाही मागणी आहे. चाफा आणि मोगरा या लाँग स्टिक अगबत्तींना पसंती मिळत आहे. साडेतीनशे रुपयांपासून या अगरबत्ती बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

..

थर्माकोल बंदीवर उपाय म्हणून यंदा कापडी मंदिरे आणि मखर तयार केले आहेत. नव्या पद्धतीच्या या मखरांना नागरिकांची पसंती मिळत आहे. घरगुती गणपतींपासून मंडळांच्या गणपतींसाठी ही कापडी मंदिरे उपलब्ध आहेत.

-भैरवनाथ भालेराव, विक्रेता

---

(फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुंगरमाळा वाजे खळाखळा…...

$
0
0

टीम मटा

श्रावण महिन्याच्या अमावास्येला बैलांचा सण पोळा साजरा करण्यात येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलांची संख्या घटलेली असली, तरी बैलपोळ्याचा सण तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने रविवारी शहर परिसरात साजरा झाला. ठिकठिकाणी पूजन करून काढण्यात आलेल्या मिरवणुकींची रंगत सर्जा-राजाच्या घुंगरमाळांच्या निनादाने चांगलीच वाढली होती.

--

पंचवटीत सर्जा-राजाचे पूजन

पंचवटी : पंचवटी परिसरात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा झाला. गावातील ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, त्यांच्याकडे जाऊन बैलांचे पूजन करण्यात येत होते. ज्यांना तेही शक्य झाले नाही त्यांनी मातीच्या बैलांची पूजा केली. पंचवटी परिसरातील मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर या गावांमध्ये उत्साह दिसून आला. ज्यांच्याकडे बैल आहेत, त्या शेतकऱ्यांनी सकाळी बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली. त्यांच्या अंगावर विविधरंगी नक्षी काढली. शिंगे साळून त्यांना रंग लावले, बेगड चिकटविले. शिंगांना गोंडे लावले. मानाचे चौर बांधले, घुंगरमाळा बांधल्या. या सजविलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील हनुमान मंदिरासमोर दर्शन, मंदिराची प्रदक्षिणा करून परतणाऱ्या बैलांना मार्गात सुवासिनी औक्षण करीत होत्या. बैलांना पुरणपोळ्यांचे नैवेद्य खाऊ घालीत होत्या. बैलांची संख्या कमी असल्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. घरोघरी मातीच्या बैलांची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा करण्यात आली.

--

नाशिकरोड परिसरात उत्साह

जेलरोड : नाशिकरोड परिसरासह विहितगाव, एकलहरे, जेलरोड, गाडेकर मळा, भगूर, शिंदे, पळसे, जाखोरी, सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर आदी ठिकाणी पारंपरिक उत्साहात पोळा साजरा झाला. सुवासिनींनी बैलजोड्यांची पूजा करीत त्यांना नैवेद्य अर्पण केला. सायंकाळी बैलजोड्यांची मिरवणूक काढून गावातील मारुती मंदिरात नेण्यात आली. तेथे देवाला सलामी दिल्यानंतर मिरवणूक विसर्जित झाली.

मध्यवर्ती कारागृहात औक्षण (फोटो)

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बंद्यांनी बैलांना संजवून, झूल पांघरून आणले होते. कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, कारागृह शेती विभागप्रमुख पंडित धुळे, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर, कारखानाप्रमुख पल्लवी कदम, रोहिदास गोळे आदींच्या उपस्थितीत बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून औक्षण करण्यात आले. या कारागृहाची खुली शेती असून, त्या शेतीसाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या बैलजोड्यांप्रति या सोहळ्याद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

---

सातपूरला मिरवणुकीने रंगत (फोटो)

सातपूर : सातपूर पंचक्रोशीत बैलपोळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी विविध आभुषणांनी सजविलेल्या सर्जा-राजाची गावातून मिरवणूक काढली. पिंपळगाव बहुला गावात या मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून आला. अगदी लहान वासरांसह बैलांची मारुती मंदिराला वळसा घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी महिलांनी बैलांची पूजा केली. सातपूर भागातील मळे परिसरात विशेष उत्साह दिसून आला. चुंचाळे गाव व अंबड गावातील बैलपूजन कार्यक्रमात नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकपचे डॉ. कांगो आज नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळात निवड झाल्याबद्दल डॉ. भालचंद्र कांगो यांचा सोमवारी (दि. १०) नाशिकमध्ये सत्कार करण्यात येणार आहे. जानकी प्लाझा खरबंदा पार्क, द्वारका येथील वीज कर्मचारी पतसंस्था हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता भाकप व आयटक नाशिकतर्फे त्यांचा सत्कार होईल. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणाची जबाबदारी डॉ. कांगो यांच्यावर आहे. महाराष्ट्रात बारा वर्षे भाकपचे राज्य सरचिटणीस, तसेच आयटक नेते म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

आयटक महाराष्ट्रचे १८ व्या राज्य अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष वीज कामगार नेते कॉम्रेड व्ही. डी. धनवटे, भाकप राज्य सचिव मंडळावर निवड झालेले व आताच राष्ट्रीय बिरसा मुंडा पुरस्कार मिळाल्याबद्द्ल कॉम्रेड राजू देसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आयटक कामगार केंद्राच्या कार्यालयात मंगळवारी, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसीतर्फे दुपारी चार वाजता 'राफेल, एचएएल आणि देशाची सुरक्षा?' या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा होणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होईल. महादेव खुडे, ज्योती नटराजन, अॅड. राजपाल शिंदे, दत्तू तुपे, प्रताप भालके, अरुण म्हस्के, रावसाहेब डेमसे, सखाराम दुर्गुडे, राजू नाईक, विमल पोरजे, कैलास भांगरे, दत्तू गायधनी, राजू सावंदे, एस. आर. खतीब, जी. एच. वाघ, भिका मांडे, विजय दराडे, सुधाकर गुजराथी आदी सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढवळ्या-पवळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त!

$
0
0

पारंपरिकतेने जिल्ह्यात पोळा सण उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या ढवळ्या-पवळ्या प्रति रविवारी शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शेतकऱ्यांकडून सकाळपासून आपल्या बैलांना सजवून पूजा करीत मिरवणूक काढण्यात आली. तर शहरी भागात मातीच्या प्रतीकात्मक बैलांची पूजा करून त्यांना नैवद्य दाखविण्यात आला.

शेतकऱ्याच्या सुख-दुखा:त नेहमी सोबत राहणारा ढवळ्यापवळ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण. यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी शेतकऱ्यांमध्ये पोळ्यासाठी उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पहाटे आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावण्यात आला. गळ्यात घंटांच्या माळा तर कपाळावर रंगबिरंगी गोंडे लावण्यात येऊन पाठीवर आकर्षक अशी झूल पांघरून सर्जाराजाची अगदी नवरदेवाप्रमाणे सजावट केली. यानंतर त्याला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून गावातील मंदिरांमध्ये देवदर्शन घेण्यासाठी हलगीच्या तालावर थाटात मिरवणूक काढण्यात आली.

बैलांच्या शर्यतींचा उत्साह
बैलांची सजावट झाल्यानंतर त्यांना घरोघरी भोजनाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी पुरणपोळीसह पंचपक्वान्नाचा नैवद्य अर्पण करण्यात आला. पोळ्याला ठिकठिकाणी बैलांच्या शर्यती रंगल्या साधारणत: गावातील प्रवेशद्वारापासून ते गाव पारापर्यंत अशा अंतरावर शर्यती लावण्यात आल्या. मेहरूणमधील साईबाबा मंदिराजवळ पोळा साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रशांत नाईक, गजानन वंजारी, रामेश्वर पाटील, दिनेश घुगे, सागर तायडे, राहुल सानप, अमोल सोनवणे, शेखर लाड, महेश घुगे आदींसह नागरिक उपस्थित होते. जुने जळगाव, पिंप्राळा, हरीविठ्ठल नगर भागातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इम्पिरिअल स्कूलमध्ये कार्यक्रम
इम्पिरिअल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोळा सणाचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना असलेले महत्त्व सांगण्तया आले. पोळा सण कसा साजरा केला जातो, याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे चेअरमन नरेश चौधरी, संचालक विजय चौधरी, समन्वयक गजानन पाटील आदी उपस्थित होते.

नकाणेत रंगली शर्यत
धुळे : शहरालगत असलेल्या नकाणे गावात पारंपरिकरित्या बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी लवकर उठून आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून तयार केले. मणीमोत्यांसह विविध रंगांनी सजावट केली. शिंगावर सोनेरी शमी, गळ्यात पितळी घुंगरूच्या गेज (घुंगरू माळ), पायात पैंजण, अंगावर रेशमी झूल असा शृंगार करून शेतकऱ्यांनी बैल गावातून मिरवले. प्रथेप्रमाणे गावाच्या वेशीवर बैलांना नेत उभे करून पोळा फोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. यामध्ये गावदरवाज्यातून पहिला जाणाऱ्या बैलास सर्वोत्कृष्ट बैल व पोळा फोडण्याचा मान देण्यात आला. तसेच गावकऱ्यांच्या वतीने बैल व बैल मालकास एक ढेपचे पोते, शेती साहित्य, शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंपुढे शिष्टमंडळ निरूत्तर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विराट मोर्चाद्वारे महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनावर धडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागण्या घेऊन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करायला गेलेल्या शिष्टमंडळाला मुंढेंनी आपल्या प्रशासकीय प्रतिवादाने टोलवले. करवाढ कशी आवश्यक आहे, सिडकोचे कोणते अतिक्रमण काढणार, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय कसा योग्य आहे, बससेवा कशी आवश्यक आहे, क्लस्टर डेव्हलपमेंटची स्थिती आपल्या भाषेत मोर्चेकऱ्यांना समजून सांगताना सर्व मागण्या धुडकावून लावल्या. शिष्टमंडळातील नेत्यांची बोलती बंद केली. मोर्चातून यशस्वी करून लढाई जिंकणारी राष्ट्रवादी मुंढेंबरोबरच्या तहात हरल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती.

महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त मुंढे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. अन्यायकारक करवाढीने सर्वसामान्य नाशिककर भरडला जात आहे. करवाढ रद्द करण्यासह, सिडको अतिक्रमण, अंगणवाड्या बंद संदर्भातील भूमिका मांडण्यासह शहर बससेवा महापालिकेने हाती घेऊ नये, आदी मागण्या मुंढे यांच्यासमोर भुजबळ व शिष्टमंडळात सहभागी पदाधिकाऱ्यांनी मांडल्या; मात्र, मुंढे यांनी या मागण्या साफ फेटाळून लावल्या. शहरातील अन्य बड्या शहरांच्या तुलनेत नाशिकमधील मालमत्ता करांचे दर कमी असल्याने विकासासाठी करवाढ योग्यच असल्याचा पुनरुच्चार मुंढे यांनी केला. सिडकोत ड्रेनेज आणि रस्त्यांवर असलेल्या घरांच्या अतिक्रमणांवरच आपण पहिल्या टप्प्यात कारवाई करणार असून, मजल्यावर, मजल्यांच्या अनधिकृत बांधकामांकडे सध्यातरी आपण लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले. गावठाणात क्लस्टर योजना राबविण्यासाठी शासनाकडे आघात मूल्यमापन अहवाल पाठविला जात आहे; मात्र, एमआरटीपी कायद्यातील तरतुदी बघता, सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांलगतच्या घरांसाठी क्लस्टर योजना राबविता येणार नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी चालविणे महापालिकेचे काम नसल्याचा शासन निर्णय असल्यामुळेच पटसंख्या कमी असलेल्या अंगणवाड्या आपण बंद केल्या. झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एसआरए योजना राबविली जाईल, असे नमूद करताना शहर बससेवा महापालिकेमार्फत चालविण्याचा प्रस्ताव योग्यच असून, येत्या महासभेत हा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या भूमिका मांडाव्यात. आता त्यावर चर्चा नको, अशा शब्दांत मुंढे यांनी आपली बाजू मांडली. त्यामुळे मोर्चानंतरही मुंढे आपल्या सर्व निर्णयांवर ठाम राहिले. शिष्टमंडळाने मुंढेंना अल्टिमेटम देण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ घालवून आपलीच फसगत करून घेतल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक वसाहती स्मार्ट हव्यात

$
0
0

चेंबर्स अध्यक्ष मंडलेचा यांची सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक वसाहती या स्मार्ट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. एमआयडीसीमध्ये सोलर लाइट, सीइटीपी प्लॉण्ट, डिजिटल बोर्ड असावेत, प्रकल्पग्रस्तांसाठी सुटसुटीत धोरण असावे, पायाभूत सुविधांही अत्यंत चांगल्या दर्जाच्या असाव्यात यासह विविध सूचना अंर्तभूत करण्याची सूचना महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली.

राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण या विषयावर मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. यावेळी मंडलेचा यांनी अशा सूचना मांडल्या. याप्रसंगी मंचावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त सचिव सतीश गवई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सेठी, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

उपस्थितांनी मांडलेल्या सुचनांचा नक्कीच विचार करू, त्यांचा नवीन औद्योगिक धोरणात समावेश केला जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्योग मंत्रालय राज्यातील उद्योगांना पोषक असेच औद्योगिक धोरण तयार करेल. महाराष्ट्र अग्रेसर राहील यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

उद्योजकांशी वैयक्तिक चर्चा

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सेठी यांनी उद्योजकांशी वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेऊन सविस्तर चर्चा केली. उद्योग सहसंचालक विकास जैन यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस महाराष्ट्र चेंबरच्या एमएसएमई समितीचे चेअरमन आशिष नहार, 'निमा'चे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, प्रदीप पेशकर यांच्यासह राज्यातील औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१३ रायडर्सने पूर्ण केली ‘बीआरएम’

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातून आयोजित करण्यात आलेली '६०० किलोमीटर बीआरएम राईड' १३ सायकलिस्टसने यशस्वीपणे पूर्ण केली. नाशिक सायकलिस्टससह भारतातून विविध शहरांतून एकूण १७ सायकलिस्टसने यात सहभाग नोंदविला होता. ही राईड मुंबई नाका, नाशिक-धुळे-राष्ट्रीय महामार्ग तीनवरून इंदौर मार्गावरील घुलानिया (३०२ किमी) ते पुन्हा धुळे आणि नाशिक (६०४ किमी) या मार्गावर झाली. राईड यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी चाळीस तासांचा अवधी देण्यात आला होता. या राईडमध्ये एकमेव महिला असलेल्या नीता नारंग यांनी ही राईड यशस्वीपणे पूर्ण केली आहे. नाशिकमधून सहभागी झालेले सर्व रायडर्स नाशिक सायकलिस्टसचे सदस्य आहेत.

चांदवडचा घाट, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर पालसनेर परिसरातील बिजासन माता मंदिर घाट पूर्ण करण्याच्या आव्हानास सायकलिस्टस सामोरे गेले. या रेसमध्ये अनेक रायडर्सला मध्य प्रदेशमध्ये उन्हाचा त्रास झाला. मोठी राईड असल्यामुळे अनेक ठिकाणी टायर पंक्चर झाले. कठीण प्रसंगात शारीरिक व मानसिक तयारी आणि जिद्द, चिकाटीचा कस लागतो असे मत या राईडचे आयोजक आणि रायडर डॉ. महेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. हर्षल पवार, देवीदास आहेर आणि नितीन वानखेडे यांची मदत लाभली. यांच्यासह सर्व फिनिशर रायडर्सचे नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आणि सदस्यांनी स्वागत केले.

या सायकलिस्टसने पूर्ण केली बीआरएम

अभिषेक दिवाळकर (मुंबई), दत्तात्रेय चाकोर (नाशिक), बाळासाहेब वाकचौरे (नाशिक), डॉ. प्रमोद जाधव (मेहकर, बुलढाणा), मोहिंदर सिंग (नाशिक), नीता नारंग (नाशिक), निलेश झंवर (नाशिक), राजेश सावंत (मुंबई), रामबाबू (विजयवाडा, आंध्र प्रदेश), रतन अंकोलेकर (नाशिक), सचिन शेटे (नाशिक), सतीश शर्मा (मुंबई), डॉ. महेंद्र महाजन (नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य बाजारपेठ बंद;उपनगरांमध्ये संमिश्र

$
0
0

मुख्य बाजारपेठ बंद;

उपनगरांमध्ये संमिश्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेचा वेग सोमवारी सकाळपासूनच मंदावला होता. शहरातील पंचवटी, जुने नाशिक, भद्रकाली परिसरातील दुकाने अल्प प्रमाणात उघडली होती. संपूर्ण बाजारपेठेत सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता. पंचवटी परिसरातील अनेक पेट्रोल पंप बंद होते. सायंकाळी दुकाने पुन्हा उघडल्यानंतर गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली होती.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर विरोधी राजकीय पक्षांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात भारत बंद पुकारला होता. बंदचा सर्वाधिक परिणाम शहरातील मुख्य बाजारपेठेवर जाणवला. गुरूवारी गणेशोत्सवाला सुरूवात होणार असून, त्याच्या खरेदीची लगबग भक्तांमध्ये सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत अनेक वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. त्या सर्व वस्तूंच्या विक्रीचा वेग सोमवारी सकाळी बंदमुळे मंदावला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक, भद्रकाली, शालिमार, पंचवटी, रविवार कारंजा, मेनरोड या भागातील ठराविक दुकाने उघडण्यात आली होती. पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत राजकीय पक्षांची निदर्शने सुरू झाल्यावर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून व्यावसायिकांना करण्यात आले. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. दुपारी अडीच वाजेनंतर मात्र बाजारपेठेतील दुकाने हळूहळू उघडली गेली.

गणेशोत्सवाची आणि हरितालिकेची खरेदी करण्यासाठी सायंकाळी पाच वाजेनंतर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ लागली. मेनरोडसह शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी परिसरात गणेश मूर्ती, आरास करण्यासाठीच्या वस्तू, हरितालिकेसाठीची फुले व इतर वस्तू खरेदीला वेग आला. सायंकाळी बाजारपेठेतील दुकाने उघडल्याने नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

उपनगरांमध्ये अल्पप्रतिसाद

भारत बंदचा फारसा परिणाम शहराबाहेरील उपनगरांमध्ये जाणवला नाही. गणेशोत्सावाच्या निमित्ताने ठक्कर डोम, इंदिरानगर, उपनगर, सातपूर तसेच इतर परिसरात गणेश मूर्ती व आरास विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने सुरळीत सुरू होती. दुपारपर्यंत मुख्य बाजारपेठ बंद असली तरीही शहरातील इतर परिसरातील दुकानात गणेशोत्सवाच्या खरेदीचा उत्साह दिवसभर कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी रिक्त जागांसाठी द्या लढा

$
0
0

आरक्षण प्रश्नावर भाकप राष्ट्रीय सदस्य भालचंद्र कांगो यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी नोकरीत आरक्षणाद्वारे काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी विविध समाज एकवटत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा उभारला जात आहे. देशभरात सरकारी नोकऱ्यांमध्ये २४ लाख २५ हजार रिक्त पदे असून खरेतर ही पदे भरण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. या जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला तर आरक्षणाद्वारे कोणाला किती जागा मिळाव्यात याबाबत लढता येईल, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य भालचंद्र कांगो यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केले.

द्वारका परिसरातील खरबंदा पार्क येथे महावितरण कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'भाकप'च्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य राजू देसले, व्ही. डी. धनवटे, अॅड. दत्ता निकम, भास्करराव हिरे, ज्योती नटराजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सचिव मंडळावर निवड झाल्याबद्दल कांगो यांचा भाकप आणि 'आयटक'च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कांगो म्हणाले की, ही निवड म्हणजे राज्यातील चळवळीचा सत्कार आहे. मोदी सरकार कामगारविरोधी धोरणे अवलंबित असून ते संघटित होऊच नयेत यासाठी सरकार चाणाक्षपणे खेळी खेळत आहे.

सत्ताबदलासाठी संघर्ष

डावे पक्ष सध्या प्रतिकूल परिस्थितीमधून जात असून कामगारवर्गासह जनतेला पुन्हा बरोबर घेऊन पुढे जाण्याचे आव्हान डाव्या पक्षांसमोर आहे. परिस्थिती बदलण्यासाठी वाट पहात घरात बसणे कम्युनिस्टांच्या रक्तात नाही. म्हणूनच सरकार बदलण्यासाठी आमचा संघर्ष आहे. सरकारने काय करायला हवे, यावर पुढील लढाई लढली जाणार असल्याचेही कांगो यांनी सांगितले.

खोटेपणात मोदी सरकार पटाईत

देशात धनिकांकडे ७३ टक्के पैसे जातात. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी ५३ टक्के पैसे धनिकांकडे जात असत. त्यामध्ये २० टक्के वाढ झाली आहे. भांडवलशाहीमुळ बेरोजगारी आणि असमानता वाढते आहे. खोटी आकडेवारी देण्यात मोदी सरकार पटाईत आहे. खाली मान करून काम करणे ही देशभक्ती तर प्रश्न विचारणे हा देशद्रोह असल्याची टीका कांगो यांनी केली.

देशबचावासाठी व्हा सज्ज!

उद्योजकांनी पंतप्रधान ताब्यात घेतला असून मोदी यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्र्यांऐवजी निवडक उद्योगपतीच परदेश दौऱ्यांवर का जातात, असा सवाल कांगो यांनी उपस्थित केला. येत्या निवडणुकीत वर्चस्ववादी विचारसरणीचा पराभव व्हायला हवा, असा आमचा उद्देश आहे. प्रत्येक राज्यात कामगार कायदे बदलण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. त्यामुळे कामगारासह घटना आणि देश वाचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कांगो यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅलेट-कंट्रोल युनिटची आज प्राथमिक चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांसाठी आणण्यात आलेल्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्रथम चाचणी (फर्स्ट लेव्ह चेकिंग) मंगळवारी (दि. ११) केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या चाचणीसाठी निवडणूक शाखेने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असून त्यांना हे युनिट्स कसे काम करतात, हे दाखविले जाणार आहे.

पुढील वर्षी केंद्रात आणि राज्यात निवडणुका होणार असून त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने सुरू केली आहे. नाशिकसाठी ५ हजार ४७९ कंट्रोल तर ९ हजार ४२२ बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. अद्ययावत करण्यात आलेली ही मतदान यंत्र नेमकी कशी काम करतात याची प्रथम चाचणी अंबड औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या (वेअर हाऊसिंग) गोदामात घेतली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी घोळ असल्याच्या शंका उपस्थित केल्या गेल्या. ही यंत्र कसे काम करतात, त्यामध्ये काय करता येते, काय करता येऊ शकत नाही, अशी सर्व माहिती यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रमाणित २० इंजिनीअर्स नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही पगारी मातृत्व रजा

$
0
0

'मुक्त'च्या कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांची पगारी मातृत्व (प्रसूती) रजा देण्यात येईल, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी येथे केली.

विद्यापीठात सफाई , बागकाम , सुरक्षा रक्षक यासह विविध कंत्राटी कामे करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ही कंत्राटी कामे करून विद्यापीठातच सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्रात जिद्दीने शिकणाऱ्या या महिलांना शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश अतकरे होते.

कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन म्हणाले की, विद्यापीठ आवारातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्राच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी आपले काम सांभाळून पुन्हा यशस्वीपणे शिक्षणाची वाट धरली आहे, हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात या कर्मचाऱ्यांना व्यावसायिक वा उद्योजकीय कौशल्य विकसित करून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले केंद्र आदर्श अभ्यास केंद्र म्हणून उदयास आले असून इतर केंद्रासाठी ते 'रोल मॉडेल' असल्याचे प्रा. डॉ. अतकरे म्हणाले. वर्षभरापासून सुरू असलेला हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी वाढली असून हे कार्य पुढे नेण्याची गरज आहे, असे मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. उमेश राजदेरकर यांनी सांगितले.

यावेळी संगणक विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद खंदारे, संगणक विद्याशाखेचे प्रा. माधव पळशीकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण समन्वयक प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, ग्रंथालय व माहितीकेंद्राचे ग्रंथपाल प्रा. डॉ. मधुकर शेवाळे यांनीही मार्गदर्शन केले. कर्मचारी विद्यार्थ्यांपैकी सारिका वाघेरे-मौळे यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम देशमुख यांनी प्रास्ताविक केले. निशिगंधा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.

गुणवतांचा गौरव

यशस्वीपणे शिक्षणक्रम पूर्ण केल्याबद्दल मूलभूत संगणक शाखेच्या नऊ व पूर्वतयारी शिक्षणक्रमाच्या १६ विद्यार्थ्यांना कुलगुरुंच्या हस्ते गौरवण्यात आले. अभ्यास केंद्राच्या पुढील शैक्षणिक उपक्रमासाठी प्रवेशित कर्मचारी-विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभ्यास साहित्याचे वाटप झाले. केंद्रात ५६ कर्मचारी मूलभूत संगणक प्रशिक्षण तर २५ जण एमए मराठी, एक जण एमए हिंदी, ३५ जण बीए, नऊ जण संगणक ऑफिस टूल्स, व ६ कर्मचारी पूर्वतयारीसाठी शिकत आहेत.

शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images