Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भाडेवाढीचा प्रस्ताव स्थायीवर

$
0
0

वाद टाळण्यासाठी दरपत्रक जाहीर न करण्यासाठी खटाटोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून एकीकडे कलावंतामध्ये असंतोष असतांनाच प्रशासनाच्या वतीने शनिवारी भाडेवाढीसंदर्भातील प्रस्ताव अखेर स्थायी समितीवर सादर केला आहे. कलावंताच्या विरोधानंतर या प्रस्तावात भाडेवाढ कमी केल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी त्याबाबतची माहिती सार्वजनिक होऊ नये याची काळजी प्रशासनासह स्थायी समितीनेही घेतली आहे. नगरसचिव, स्थायी समिती आणि मिळकत विभागाने या दरांची जाहीर वाच्यता होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली असल्याने वाढलेल्या दरांचे गौडबंगाल कायम आहे. दरम्यान सध्याचे ६ हजारापर्यंतचे दर हे २० हजारापर्यंत वाढविल्याची चर्चा आहे.

करवाढीचा वाद शांत होत नाही, तोच महापालिकेत सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नुतनीकरण केलेल्या महाकवी कालीदास कलामंदिराच्या अव्वाच्या सव्वा दरवाढीचा वाद उफाळला आहे. सद्या सरासरी ४ ते ६ हजारापर्यंत असलेले कालिदासचे दर हे २४ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु, या निर्णयाविरोधात नाट्यप्रेमींसह कलावंतामध्ये रोष निर्माण झाला. काही निर्मात्यांनी तर नाशिकमध्ये नाट्य प्रयोग करणे परवडणार नसल्याचा सूर लावला. एवढेच नव्हे तर स्थानिक कलावंतांनी कालिदासच्या पायऱ्यावर आंदोलन केले. दुसरीकडे, २००२ नंतर कालिदासची भाडेवाढ झालेली नसून सध्याच्या अद्यावत यंत्रणेने जतन करण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचा दावा महापालिकेने केला.

या वादात आमदार देवयानी फरांदे यांनी मध्यस्थी करत, महापालिका आयुक्त तुकाराम मुढे यांच्यासोबत कलावंताची भेट घडवून आणली. यात मुढेंनी परडेल अशी दरवाढ करू, असा पवित्रा घेतला होता. तसेच कलावंताना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार स्थायी समितीवर दरवाढीचा प्रस्ताव मिळकत विभागाने नगरसचिव विभागामार्फत शनिवारी सादर केला. मात्र, संबंधित प्रस्तावातील भाडेवाढीची माहिती बाहेर फुटू नये याची काळजी मिळकत विभाग, स्थायी समिती, नगरसचिव विभागाने घेतली. सध्याचे ठेवलेले दरही ही नाट्यप्रेमींना व कलावंताना परवडणारे नाहीत. त्यामुळे याची जाहीर वाच्यता होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.

तमाशाला 'नो एन्ट्री'

मिळकत व्यवस्थापक डॉ. सुहास शिंदे यांनी दराबाबत कानावर हात ठेवत दरवाढीचे पाच विभाग यापूर्वी होते; परंतु आता तीनच विभाग केल्याची माहिती त्यांनी दिली. बालनाट्य व हौशी, व्यावसायिक नाटक आणि खासगी कार्यक्रम व आर्केस्ट्रा असे तीन विभाग करण्यात आले आहे. त्यांच्या क्रमानुसार भाडेवाढ करण्यातत्ली आहे. हौशी व बालनाट्यासाठी कमी दर असेल. तर तमाशाला पूर्णत: बंदी केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कालिदाससोबत महात्मा फुले कलादालानाचेही दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. दालनातील खालचा हॉल तसेच वरील हॉलच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छळाने सासूचा मृत्यू

$
0
0

सुनेसह नातेवाईक, वकिलावर म्हसरुळ पोलिसात खंडणीचा गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पतीसह सासूचा छळ करून सुनेने ४० लाख रुपयांची मागणी केल्याने सासू खचली. न्यायालयात चकरा मारून त्रासलेल्या सासूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथे ही घटना घडली.

सुनेसह तिच्या आई आणि भावावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत सासूचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी शनिवारी (दि. १५) रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयात घेतला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. नातेवाइकांनी दुपारी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या देत संशयीत सूनेसह वकीलावरही गुन्हा दाखल करण्याची तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्याची निलंबनाची मागणी केली. या प्रकरणी सूनेच्या नातेवाईकांसह वकीलावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेरीजवळच्या पोकार कॉलनी येथे राहणारे प्रवीण हिरामण गांगुर्डे यांचा तीन वर्षापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील राणी उर्फ स्वाती भीमराव पगारे हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. काही महिन्यातच त्यांनी घटस्फोट घेतला. राणी हिने पती व सासरच्यांवर शारीरिक व मानसिक छळाची फिर्याद दाखल केली. प्रवीणसह त्याचा भाऊ व आई यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक झाली. न्यायालय व पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्याने गांगुर्डे कुटुंबीय जेरीस आले. त्यांना ११ सप्टेंबरला जामीन मिळाला. तेव्हा राणी हिने गांगुर्डे यांना जामीन मंजूर झाल्याबाबत न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांना न्यायालयात पुन्हा जावे लागले. अशातच राणी हिने या गुन्हाची तडजोड करायची असेल तर पती प्रवीण व सासूकडे ४० लाख रुपयांची मागणी केली.

... यामुळे हृदयविकाराचा झटका

सून राणी उर्फ स्वाती गांगुर्डे, तिचा भाऊ सागर भीमराव पगारे, आई व राणीचा वकील पंकज मनोहर यांनी सासू लिलाबाई गांगुर्डे यांच्याकडे ४० लाख रुपये मागून छळ केला. त्यामुळे त्या खचून त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे गांगुर्डे कुटुंबीयाचे म्हणणे आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत लिलाबाई गांगुर्डे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जिल्हा रुग्णालयात घेतली. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, सून राणी उर्फ स्वाती प्रवीण गांगुर्डे, पंकज मनोहर, उषा पगारे, सागर पगारे, विशाखा पगारे यांच्याविरोधात खंडणी तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सीईओंनी पुसली फरशी!

$
0
0

स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात; १६ पोते कचरा गोळा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी फरशी पुसण्यापासून ते प्रशासकीय इमारतीतील थुंकलेल्या जागांची स्वच्छता करण्यापर्यंतच्या सर्व कामात पुढाकार घेत कुठलेही काम छोटे नसते याचा जणू आपल्या सहकाऱ्यांपुढे आदर्शच निर्माण केला. स्वत: डॉ गिते हे काम करीत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:ला स्वच्छता मोहिमेत झोकून दिले.

केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. शनिवारी जिल्हा परिषदेतही या अभियनाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानात सहभागी होऊन डॉ. गिते यांनी अडगळीच्या ठिकाणांची तसेच, नवीन प्रशासकीय इमारतीमधील थुंकलेल्या जागांची सफाई करून रंगलेल्या फरशांची स्वच्छता केली. इतकेच नाही तर प्रवेशद्वाराजवळील जिल्हा परिषद कॅन्टीनवर चढून घाणीची स्वच्छता केली. डॉ. गिते यांनी दीड तास या मोहिमेत योगदान दिल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेत १६ पोती कचराही गोळा करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, आरोग्य व शिक्षण सभापती यतिंद्र पगार, उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कामात लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या सोबत असून, स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिंधीचा सहभाग घेण्याच्या सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लवकरच उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतिंद्र पगार यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची अभियान काळात स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सांगितले.

..

सर्वांनी प्रभावीपणे काम करावे

स्वच्छ सर्वेक्षणात जोमाने काम करून जिल्ह्याचा सन्मान वाढवला आहे. स्वच्छता ही सेवा या मोहिमेतही जिल्ह्याचे नाव यापुढेही आघाडीवर राहील, यासाठी सर्वांनी प्रभावीपणे काम करावे.

- शीतल सांगळे, जि.प. अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी समर्थ केंद्रास अभ्यासगटाची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नीता पुणतांबेकर, डॉ. सुजाता गडाख, प्रा. शाश्वती निर्भवणे आणि तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील ५७ विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटाने श्री स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली.

भक्तीच्या पायावर साकारलेल्या या केंद्राद्वारे समाजाच्या आरोग्य विषयक, शेतीविषयक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारच्या सेवा अगदी माफक दरात पुरविल्या जातात. म्हणून या संस्थेचे कामकाज, व्यवस्थापन, प्रशासन, संघटन रचना, विविध प्रकारच्या सेवा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी या अभ्यासगटाने जवळपास चार तास थांबून माहिती जाणून घेतली.

या प्रसंगी केंद्राचे सेवेकरी ताजणे यांनी अध्यात्मावर आधारलेले हे व्यवस्थापन, प्रत्येक विभागाची माहिती दिली. विविध उत्पादने, त्यांची निर्मिती, विपणन तसेच केंद्रातील स्वयंरोजगारसंधी याविषयीची माहिती दिली. या बरोबरच अकाउंट विभागातील अंकेक्षण, करप्रणाली ,साठवण विभाग, केंद्राची बांधकाम रचना, कृषिधन विभाग, बायोगॅस प्रकल्प, चॅरिटेबल हॉस्पिटल, अन्नछत्र विभाग या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यानी व्यवस्थापन, प्रशासन व संघटन याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती घेतली. डॉ. शेटे यांनी विविध आजारांवर माफक दरात असलेली आयुर्वेदिक औषधे, सेंद्रीय शेतीचे महत्त्व, वनौषधी त्यांची गुणवत्ता, उपयोग आणि विक्री यावर अभ्यासपूर्ण माहिती पुरविली. या पाहणीतून अनेक लघु उद्योगांविषयीची विद्यार्थ्यांची उत्सुकता जागी झाली. महाविद्यालयाच्या वतीने प्रा. नीता पुणतांबेकर यांनी केंद्रातील व्यवस्थाकांचे व सेवकांचे आभार मानले.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती कारागृहाच्या उद्योग विभागाला मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरतर्फे नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील उद्योग विभागाला भेट देण्यात आली. मध्यवर्ती कारागृहातील उद्योग विभागाला भेट देऊन तेथील उद्योग व उत्पादनांची महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने माहिती घेतली.

मध्यवर्ती कारागृहातील उद्योग विभागातील उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करणे, बंदीवानांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी जॉब वर्क देणे, बंदीवानांना कुशल कारागीर बनविण्यासाठी प्रशिक्षिण कार्यक्रम घेणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मंचावर कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, महाराष्ट्र चेंबरच्या सीएसआर अँड एचआर समितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे, अग्रिकल्चर समितीच्या चेअरपर्सन सुनीता फाल्गुने, सुधीर पाटील, डॉ. उदय खरोटे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए. एस. कारकर, पी. पी. कदम, तुरुंगाधिकारी एस. आर. गायकवाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा भारताला फायदा

$
0
0

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचा आशावाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचा अधिक विकास झालेला दिसतो. नव्या तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकारचे संशोधन करण्यात विद्यार्थी रुची दाखवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेचा जोरावर आणि वाढत्या संशोधनाचा भारताला विज्ञान नक्कीच फायदा होणार आहे, असा आशावाद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

गुरू गोबिंदसिंग इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 'इंजिनीअर्स डे'चे औचित्य साधत '२०२०मध्ये भारतासाठी इंजिनीअर्सची भूमिका' या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग मंचावर होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, की नव्या तंत्रज्ञानामुळे विकासाचा स्तर वाढला आहे. नॅनो टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यामुळे विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास चालना मिळत आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित शोधनिबंध सादर करण्यासाठी कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. यातून विद्यार्थी नव्या संशोधनाकडे वळत आहेत. नव्या तंत्रज्ञानावर अधिकाधिक संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, उपप्राचार्य डॉ. एस. डी. काळपांडे, विभागप्रमुख डॉ. व्ही. एम. नटराज, प्रा. दीप्ती अनकलगी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, जिल्ह्यात आणखी एका महिलेचा या आजाराने मृत्यू झाला. या महिन्याच्या पंधरवड्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

पिंपळगाव बहूला येथील वंदना विलास नागरे (वय ४२) यांचा शनिवारी स्वाइन फ्लू मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

$
0
0

निधन वार्ता : दोन फोटो

००००००००००००००

शिवचंद ललवाणी

मनमाड : येथील जैन समाजाचे संघपती शिवचंद ललवाणी यांचे संथारा व्रतात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा भाऊ असा परिवार आहे. ५० वर्षांपासून मनमाड येथील जैन समाजाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ललवाणी बिल्डिंग, खाकी बाग, सराफ बाजार येथील विहिरी नागरिकांसाठी खुल्या केल्या होत्या.

मोतीराम गायधनी

देवळाली कॅम्प : पळसे येथील मोतीराम अर्जुन गायधनी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पळसे गावचे सरपंच देवीदास गायधनी यांचे ते वडील होत.

विठाबाई झाल्टे

जेलरोड : वडाळी नजिक (ता. निफाड) येथील विठाबाई शिवाजी झाल्टे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. अॅड. माधवराव कोकाटे, अॅड. बाळासाहेब मत्सागर यांच्या त्या सासू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक रोडवर भरदिवसा घरफोडी

$
0
0

दोन घटनांमध्ये १८ तोळे सोने लंपास

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबक रोडवरील पपाया नर्सरी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक असलेल्या इमारतीतील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा चोरी करीत १५ तोळे सोन्यासह रोकड लुटून नेली. यानंतर त्याच परिसरात दुसऱ्या घरामध्येही चोरट्यांनी हात साफ करीत तीन तोळे सोन लंपास केले. या दोन्ही घटनांमुळे सातपूरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सातपूर परिसरातील पपया नर्सरीजवळ इंदिरा लक्ष्मण अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर डॉ. मोहन अनंतराव पवार व डॉ. सुवर्णा पवार हे दाम्पत्य राहतात. डॉ. मोहन पवार यांचे श्रमिकनगरला तर डॉ. सुवर्णा पवार यांचे अंबडलिंकरोड परिसरात स्वत:चे क्लिनिक आहे. पवार दाम्पत्य शुक्रवारी (दि. १४) दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामासाठी घराबाहेर पडले. त्यांनी मुख्य दरवाजाऐवजी बाहेरील सेफ्टी डोअरलाच कुलुप लावले. डॉ. पवार दोन वाजता घरी आले असता त्यांना सेफ्टी डोअरचे कुलुप तोडलेले दिसले. घरातील कपाट अस्ताव्यस्त आढळून आले. चोरट्यांनी कपाटातील सुमारे १५ तोळे सोने व २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची माहीती डॉ. पवार यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांच्या इमारतीत एक वॉचमन आणि आठ सीसीटीव्ही कॅमेरे आहे.

दरम्यान, याच इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अवतार सोसायटीत चोरीची दुसरी घटना घडली. तेथे भाडेतत्वाने राहत असलेले अशोक वसंत मानकर यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत तीन तोळे सोने लंपास केले. मानकर कुटुंबीय दुपारी घराबाहेर असतांना चोरांनी संधी साधली. दरम्यान, दोन्ही घटनांची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक निरीक्षक संदीप वऱ्हाडे, उपनिरीक्षक सरिता जाधव यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञ व डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले. मात्र, पाचशे मीटरपर्यंतचा मार्ग डॉग स्कॉडने दाखविला. त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नटनाद ढोल ताशा पथकातर्फे होणार २०१ ध्वजांचा जागतिक विश्वविक्रम

$
0
0

'नटनाद' करणार :

जागतिक विश्वविक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये सार्वजनिक उत्सवात वादन करणाऱ्या नटनाद ढोल पथकाच्या वतीने वादनात २०१ ध्वजांचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे. दिंडोरी रोड येथे गेल्या दोन वर्षांपासून या पथकाद्वारे सतत ढोलचे विविध उपक्रम राबवले जात असून या पथकात सुमारे दोनशे वादकांचा समावेश आहे. या पथकात वकील, शिक्षक, व्यापारी, विद्यार्थी, शासकीय उच्चपदस्थ अधिकारी यांचा समावेश आहे. नटनाद ढोल ताशा पथकच्या वतीने नवीन आडगाव नाका मित्र मंडळ येथे आज (१६ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता नवीन आडगाव नाका, नाशिक येथे जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये एकाच वेळी नोंद होणार आहे. ढोलच्या तालावर आपल्या हिदू संस्कृतीचा मान असलेल्या २०१ ध्वजांना १ तास सतत नाचवून हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. नाशिकच्या ढोल पथकाच्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी व सर्व ढोल वादक ध्वजधारक यांचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे अवाहन नवीन आडगाव नाका मित्र मंडळ पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारचालकावर टोळक्याचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोपेड बाजूला घेण्यास सांगितल्याने कारचालकावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना राका कॉलनीत घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

महेश मधुकर हिंगमिरे (रा. विद्याविकास सर्कल, गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी सायंकाळी हिंगमिरे कारने (एमएच ०५ बीएस १९६९) राका कॉलनी येथून जात असताना ही घटना घडली. जैन मंदिर परिसरात भररत्यात मोपेड (एमएच १५ एफएक्स ४६०१) उभी करून दुचाकीवरील तरुण अन्य तिघांशी गप्पा मारीत होता. यावेळी हिंगमिरे यांनी दुचाकी बाजूला घेण्याची विनंती केली असता पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत दगडाने व लोकंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्यात हिंगमिरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

--

रिक्षा प्रवासात महिलेचे दागिने चोरी

रिक्षात प्रवास करीत असताना चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील रोकड आणि दागिने हातोहात लंपास केले. ही घटना गडकरी सिग्नल ते वासन आय केअर हॉस्पिटल दरम्यान घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे. सविता विष्णू शिंदे (रा. वीर सावरकर चौक, शिवाजी चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिंदे सीबीएस येथून आपल्या घराकडे परतत असताना ही चोरी झाली. अ‍ॅटोरिक्षात प्रवास करीत असताना अज्ञात सहप्रवाशाने त्यांच्या निळ्या बॅगेतील रोकड व दागिने असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अलगद काढून पोबारा केला.

--

जुगार अड्ड्यांवर कारवाई

पंचवटी आणि वडाळागावातील संजीरी मार्ग भागात सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारून सात संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शुक्रवारी रात्री पंचवटीतील वाघाडी भाऊ उर्फ रवी पाटील याच्या इमारतीतील वरच्या मजल्यावर छापा मारला. त्यावेळी मनोज सोनवणे व त्याचे दोन साथीदार जुगार खेळताना सापडले. संशयिताच्या ताब्यातील पाच हजार ४०० रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई वडाळागावातील संजीरी मार्ग भागात करण्यात आली. इंदिरानगर पोलिसांना नईम शेख याचे घराच्या मागच्या मोकळे जागेत शेख (रा. वडाळागाव) व त्याचे तीन साथीदारांना जुगार खेळताना पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परदेशात राहत असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवत ऑनलाइनद्वारे एका भामट्याने तरुणीकडून तब्बल पाऊणे दोन लाख रुपये उकळले. कस्टम ऑफिसमध्ये कागदपत्र अडकल्याचे सांगून संशयिताने तरुणीची फसवणूक केली. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसरातील ३१ वर्षांच्या युवतीने तक्रार दिली आहे. या तरुणीने विवाह जमविणाऱ्या वेबपोर्टलवर नाव नोंदले होते. त्यानुसार संशयिताने व्हॉट्स अॅप नंबर आणि इमेल मिळवून युवतीशी मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखविले. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत संशयिताने वारंवार संपर्क साधत युवतीचा विश्वास संपादन करून हा गंडा घातला. महिनाभरातील ओळखीनंतर संशयिताने लग्नाची बोलणी करण्यासाठी भारतात येत असल्याची बतावणी केली. त्यानंतर भारतात येत असताना प्रवासात कतार या अरब देशातील कस्टम कार्यालयाने ताब्यात घेतल्याचे सांगितले. बॅगेतील सामान रोकड आणि महत्त्वाचे कागदपत्र सोडविण्यासाठी संशयित आरोपीने युवतीकडे एक लाख ६७ हजार ७०० रुपयांची मागणी केली. त्यानुसार तरुणीने बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत संशयिताच्या खात्यात पैसे वर्ग केले. पैसे खात्यात जमा होताच संशयिताचा संपर्क तुटला. अनेकदा प्रयत्न करूनही संशयिताकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणीने पोलिसात धाव घेतली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

नायजेरीयन फ्रॉड

अशा प्रकाराच्या फसवणुकीस नायजेरीयन फ्रॉड असेही म्हणतात. या गुन्ह्यातील आरोपी मुंबई, दिल्ली येथे वास्तव्य करतात. मात्र, आपण परदेशातून बोलत असल्याचा बनाव तयार करून नवनवीन पद्धत वापरून पैसे उकळतात. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध साठ्याचा ट्रक लुटला

$
0
0

नाशिक : औषधांचा साठा घेऊन बिहारच्या दिशेने जाणारा ट्रक वाडीवऱ्हे हद्दीत लुटण्यात आला. ट्रक आणि औषधे मिळून हा मुद्देमाल एक कोटींच्या घरात पोहचतो. या प्रकरणी चालक ललूराम धुमळ हरजण याने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. चालक आयशरमध्ये (एमएच ०४, जेके १८२०) भरलेला औषधसाठा बिहारमधील पाटणा येथे घेऊन जात असताना ही घटना घडली. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास एका वाहनाने आडवे जाऊन थांबविले. यानंतर हरजण यास मारहाण करून त्याचे हातपाय बांधून शेतात फेकले. तब्बल ९५ लाख रुपयांचे औषधे असलेला ट्रक घेऊन चोरटे पसार झाले. घटनेचा अधिक तपास वाडीवऱ्हे पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुठ्ठ्यापासून साकारला 'शनिवार वाडा'

$
0
0

पुठ्ठ्यापासून साकारला 'शनिवार वाडा'

मंगेश गुळवेंचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्रीज, सायकल आणि इतर वस्तू खरेदी केल्याने जमलेल्या पुठ्ठ्याचा गणेशोत्सवाच्या देखाव्यासाठी वापर करण्यात आला आहे. घरातल्या टाकाऊ पुठ्ठ्यापासून साडे दहा फूट उंचीचा 'शनिवार वाडा' आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा गेल्या दहा वर्षांपासून ध्यास घेतलेल्या मंगेश गुळवे यांनी साकारलेला शनिवार वाडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अॅनिमेशनचा व्यवसाय असलेले मंगेश गुळवे गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. कॅनडा कॉर्नर येथील विसे मळा परिसरात अभिषेक बंगल्यात गुळवे कुटुंबीय राहते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून नावीन्यपूर्ण देखावा ते साकारतात. यंदा घरातील टाकाऊ पुठ्ठ्यांचा वापर करत मंगेश यांनी शनिवार वाड्याची प्रतिकृती तयार केली आहे. दहा फूटाच्या या देखाव्याने मंगेश यांच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पांचे रुप अधिक विलोभनीय दिसत आहे. हा देखावा साकारण्यासाठी त्यांना घरातील प्रत्येक सदस्याची मदत झाल्याचे ते सांगतात. पुठ्ठ्यापासून शनिवार वाडा तयार करण्यासाठीचे डिझाइन करण्यासाठी तीन आठवडे ते काम करत होते. साकारलेल्या प्रतिकृतीला रंग देण्यासाठी प्लास्टिक कलरचा वापर त्यांनी केला. त्यामुळे विविध रंगातल्या लाइटच्या प्रकाशात ही प्रतिकृती अधिक आकर्षक दिसते. कलेची आवड असल्याने दरवर्षी गणेशमूर्ती आरास करताना नवीन प्रयत्न करतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. बाप्पांची मूर्ती शाडू मातीची असली तरी आरासदेखील पर्यावरणपूरकच असावी. त्यासाठीच दरवर्षी घरातील टाकाऊ वस्तूंपासून बाप्पांची आरास करतो, असे मंगेश गुळवे सांगतात. शनिवार वाड्याची ही प्रतिकृतीसाठी तयार करण्यासाठी व इतर आरास सजावटीसाठी त्यांना दोन हजार रुपये खर्च आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केल्या जाणाऱ्या देखाव्यातून आणि आरास सामग्रीतून पर्यावरणाला हानी पोहोचू नये. म्हणून, पुठ्ठा चिटकविण्यासाठी त्यांनी कागदी टेपचा वापर केला. गेल्या गणेशोत्सवात कपड्यापासून जहाज त्यांनी तयार केले होते. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून मंगेश यांनी साकारलेला शनिवार वाडा पाहण्यासाठी गर्दी केली जात आहे.

--

देखाव्याचा असाही उपयोग

मंगेश गुळवे दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे तयार करतात. विशेष बाब अशी की, गणेशोत्सवात साकारलेले पर्यावरणपूरक देखाव्यांची ते जपणूक करतात. साकारलेल्या प्रत्येक प्रतिकृतीचा सदूपयोग व्हावा. म्हणून, गणेशोत्सवानंतर ज्या व्यक्तिला प्रतिकृती किंवा देखावा हवा असेल. त्यांना मंगेश तो देखावा देऊ करतात. गेल्या दहा वर्षांपासून तयार होणाऱ्या प्रत्येक प्रतिकृतीचा अजूनही त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून विविध कार्यक्रमांत आणि गणेशोत्सवात वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पैसे घेऊन फरारी झालेल्या मित्राच्या नावे खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना जेलरोडला घडली. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांपैकी दोघांना अटक केली आहे.

कैलास मैंद (रा. नारायणबापूनगर, जेलरोड), संदीप पिंगळे (शिवशक्तीनगर, जेलरोड), संतोष शहाणे व आबा चौधरी अशी संशयितांची नाव आहेत. त्यांच्यापैकी कैलास मैद व संदीप पिंगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक मानकचंद जैन (४०, अनमोल बिल्डिंग, तिडके कालनी, गोविंदनगरजवळ, नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. जैन यांचा मित्र राजकुमार संचेती याने एप्रिल २०१८ च्या सुमारास कैलास मैंद याच्याकडून १० लाख रुपये घेतले होते. ते परत न करता संचेती परागंदा झाला. हे पैसे मिळविण्यासठी चौघांनी संचेतीचा शोध घेतला. तो न सापडल्याने चौघा संशयितांनी संचेतीचा मित्र अभिषेक जैन यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी सुरू केली. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान या चौघांनी जैनसह त्याच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. धाक दाखवून सहा लाख वीस हजार रुपयांची खंडणी उकळली. जैन यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्री संत सेन महाराज पुण्यतिथी अमृतमहोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजस्थान सेन समाज नाशिक यांच्या वतीने श्री संत सेन महाराज पुण्यतिथी अमृतमहोत्सव पंचवटी, हनुमानवाडीतील भावबंधन मंगल कार्यालयात झाला. यावेळी शोभायात्रा, पादुकापूजनासह विविध कार्यक्रम झाले.

जालना येथील गायक योगेश टाक व समूहाने सुमधुर भजने गायली. या कार्यक्रमात अभिषेक व महापूजा, यानंतर महाराजाच्या पालखी मिरवणूक व शोभायात्रा झाल. शोभायात्रा पंचवटी परिसरात आल्यानंतर श्रींच्या पादुकापूजन करण्यात आले. शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रा सांगतेनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक विषयांवरील चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर झाले.

सेन समाजाच्या विकासासाठी १९४३ पासून योगदान देणाऱ्या व आजपर्यंत अध्यक्षपद भूषविलेल्या समाजबांधवांचा राजस्थान सेन समाज युवक मंडळाच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजस्थान सेन मंडळ ट्रस्ट, सेन युवक मंडळ, सेन महिला मंडळ व सर्व स्तरातील समाजबांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून समाजबांधव आले होते.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पाऊरधारा

$
0
0

शहरात दहा मिनिटे हजेरी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने शनिवारी नाशिकमध्ये अवघे १० मिनिटे जोरदार हजेरी लावली. पण, नंतर हा पाऊस गायब झाला. हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. पण, दोन दिवस अगोदरच पावासाने हजेरी लावत हवामान खात्याचा अंदाजही चुकवला.

यावर्षी पावसाने जोरदार सुरुवात केली. पण, नंतर दांडी मारत पाऊस गायब झाला. त्यामुळे परतीच्या पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष आहे. पिकांना जीवदान देणारा हा पाऊस असल्यामुळे तो कसा बरसेल याची उत्सुकताही वाढली आहे. शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. पाऊस जोरात असल्यामुळे अनेकांनी आडोसाही शोधला. पण, काही मिनिटांतच पाऊस थांबल्यामुळे सगळ्यांचा हिरमोडही झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा घरफोडींमध्ये दहा लाखांचा मुद्देमाल चोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चोरट्यांनी तब्बल सहा ठिकाणी घरफोडी करून पोलिसांना थेट आव्हान दिले. यात गंगापूर, मुंबईनाका, उपनगर, सातपूर आणि अंबड परिसराचा समावेश असून, शहरात पुन्हा सुरू झालेल्या अवैध धंद्यांमुळे चोरटे सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवाजीनगर येथील भवर टॉवर भागात राहणाऱ्या लताबाई गोरख शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिंदे कुटुंबिय गुरुवारी बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आनंद छाया रो हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या तीन लाखाच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे तीन लाख ९६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना गोविंदनगर भागात घडली. अजय दुर्गादास ठाकूर (रा. वैष्णव रॉयल अपा. महेश हॉस्पिटल जवळ) हे कुटुंबियासह बुधवारी बाहेरगावी गेले. अज्ञात चोरट्यांनी लॅच लॉक तोडून कपाटातील रोकडसह दागिने असा सुमारे ८४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी कुटुंबिय घरी परतल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची तिसरी घटना दत्तमंदिर सिग्नल भागात झाली. चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून एक लाख ४१ हजार रूपयांचे मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी सौरभ राजेंद्र जानेराव (रा.चव्हाटा, जुने नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. जानेवार यांचे दत्तमंदिर सिग्नल परिसरातील वैथारा कॉम्प्लेक्समध्ये मोबाइल शॉप आहे. चोरट्यांनी बुधवारी रात्री बंद दुकानाच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून एक लाख ४१ हजार रुपये किमतीचे मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागातील डॉ. मोहन अनंतराव पवार (रा. इंदिरा लक्ष्मण अपार्ट.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. पवार व शेजारी अशोक वसंत मानकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख १० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात दोन लाख ८५ हजार ५०० रूपयांच्या रोकडचा समावेश आहे. ही घरफोडी शुक्रवारी दुपारी भरदिवसा झाली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ फार्म भागात राहणारे प्रेमराज एकनाथ नेरकर (रा. लक्ष्मीनारायण बंगला) आणि त्यांचे कुटुंबिय गुरुवारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या मंडळांच्या संख्येत घट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मंडळांची संख्या कमी झाली आहे. विशेषत: मौल्यवान आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ही घट दिसत आहे. शहर पोलिसांकडून घेतल्या गेलेल्या मंजुरीच्या आधारे हा फरक दिसून येतो.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला यंदा सुरुवातीपासून वादाचे ग्रहण लागले. महापालिका आणि पोलिसांच्या कात्रीत सापडलेल्या आणि लोकप्रतिनिधींकडूनही उपेक्षित राहिलेल्या मंडळांनी यंदा गाशा गुंडाळण्यास प्राधान्य दिले. सन २०१७ मध्ये शहरात ३९ मौल्यवान गणेश मंडळे होती. ज्या गणेश मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीस सोन्या-चांदीचे आभूषणे घातली त्या मंडळांची मौल्यवान गणेश मंडळ म्हणून पोलिस नोंद करतात. यंदा या मंडळांची संख्या चारने कमी होऊन ३५ इतकी झाली आहे. मोठ्या स्वरूपातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या गतवर्षी १९२ होती. यंदा ती १७२ इतकी झाली. लहान मंडळांची संख्या ५९८ वरून ५९४ पर्यंत पोहचली. वर्गणी मिळण्यास येणाऱ्या अडचणी, त्यानंतर नियम व अटींचा झालेला मार आणि पुढे होणारे वाद यामुळे ही उलटी गंगा वाहत असल्याची प्रतिक्रिया गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

..

घरगुती बाप्पांचे प्रमाणही कमी?

पोलिसांच्या नोंदीनुसार गतवर्षी सुमारे एक लाख १२ हजार ७८३ घरांमध्ये बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण सुमारे एक लाख दोन हजार १३४ इतके झाले आहे. शाडू मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण यंदा वाढले. मात्र, या मूर्त्यांची खरेदी-विक्री होत नसल्याने त्याची माहिती उपब्लध होत नाही. परिणामी यंदा कमी दिसत असलेले हे प्रमाण या मूर्तींमुळे भरून निघाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.

...

मौल्यवान गणेश मंडळ

सन २०१७ ... ३९

सन २०१८ .... ३५

...

सार्वजनिक गणेश मंडळ

सन २०१७ ... १९२

सन २०१८ .... १७२

...

लहान मंडळांची संख्या

सन २०१७ ... ५९८

सन २०१८ .... ५९४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार खेळणारे तिघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या तिघांना क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. हे संशयित शालिमार येथे रौलेट/ बिंगो जुगार खेळताना सापडले.

संकेत शिवाजी शेलार (२२, रा. वावरेलेन, शिवाजीरोड), सूरज पंढरीनाथ उगलमुगले (२४, रा. दत्तराज बंगला, विद्यानगर, मखमलाबाद रोड) आणि कैलास जोगेंद्रप्रसाद शहा (२८, रा. निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ, गंगापूररोड) अशी या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. शहरात ऑनलाइन जुगाराचे पेव फुटले असून, त्यास प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या गुन्ह्यांचा माग काढताना क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक बी. बी. पालकर आणि पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना शालिमार चौकातील राजरतन ऑनलाइन लॉटरी दुकानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत काहीतरी सुरू असल्याचे समजले. अधिक माहिती घेतला असता या ठिकाणी काही व्यक्ती कैलास शहा यास पैसे देऊन मोबाइलवर ऑनलाइन जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले. एक आयडी आणि फनरिप टेप या वेबसाइटवरून लोकांकडून पैसे घेतले जातात. पैशांच्या बदल्यात पॉईंट ट्रान्सफर केले जातात. एका रुपयाच्या बदल्यात ३६ रुपये असा रौलेटचा भाव दिला जातो. पोलिसांनी माहितीची खातरजमा केली असता वरील तिघे संशयित जुगार खेळताना सापडले. या तिघांकडून तीन मोबाइल फोन आणि पल्सर मोटारसायकल असा एक लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images