Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चारचाकी वाहनांना देवळालीमध्ये जॅमर

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरात 'पे अॅण्ड पार्क'ची अंमलबजावणी सुरू केली असून रविवारी पहिल्याच दिवशी पार्किंगव्यतिरिक्त अन्यत्र गाड्या उभ्या करणाऱ्या चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यानंतर संबंधित वाहनधारकांना समज देऊन सोडून देण्यात आले.

वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून शहरात प्रथमच पार्किंगची योजना अंमलात आणली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवर १६ ते ३० दरम्यान मोफत पार्किंगची सुविधा दिली आहे. वाहनधारकांना शिस्त लागावी असा यामागील उद्देश आहे. एक ऑक्टोबरपासून मंजूर करण्यात आलेल्या दराप्रमाणे पे अॅण्ड पार्क सुरू होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी रविवारी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यालगत उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक दीपक पारकर, पी. बी. दोंदे, आरोग्य अधीक्षक राजू ठाकूर, मनोज गायकवाड आदींनी सदर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजचोरी बेसुमार

0
0

अनधिकृत वीज वापरणाऱ्या गणेश मंडळांना बसणार कारवाई शॉक

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी घेण्याच्या महावितरणच्या आवाहनाला शहरातील तब्बल ४१८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केराची टोपली दाखविल्याचा प्रकार उघड झाला आहे. अनधिकृतपणे वीज वापर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मोहीम आज सोमवारी (दि. १७) महावितरणर्फे राबविली जाणार आहे.

शहरात महापालिकेकडे यंदाच्या गणेशोत्सवासाठी ६६१ इतक्या गणेश मंडळांनी मान्यतेसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या ६३३ इतक्या मंडळांना महापालिका प्रशासनाने परवानगी दिली होती. तर २८ मंडळांना महापालिकेने परवानगी नाकरली. महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळालेल्या ६३३ पैकी केवळ २१५ मंडळांनी महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपातील अधिकृत वीज जोडणी घेतली, तर उर्वरित ४१८ मंडळांनी अधिकृत वीज जोडणीच घेतलेली नाही. या ४१८ मंडळांनी महावितरणचे तत्पुरत्या स्वरुपातील अधिकृत वीज जोडणीच्या आवाहनाला केराची टोपली दाखविल्याची बाब उघड झाली आहे.

महावितरणचे बोटचेपी धोरण

शहरातील तब्बल ४१८ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याचे वास्तव असले तरी महावितरण प्रशासन या प्रकाराकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आतापर्यंत महावितरणकडून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या मंडळांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी गणेशोत्सव काळात अनधिकृत वीजवापर वाढणार आहे. सर्रासपणे अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्या मंडळांवर महावितरणकडून कायदेशीर कारवाई करून अनधिकृत वीजवापरास प्रतिबंध घातला न गेल्यास अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या गणेश मंडळांच्या मानसिकतेवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

अधिकृत वीजजोडणी न घेतलेल्या गणेश मंडळांची महावितरणतर्फे सोमवारी प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. यात अनधिकृत वीजवापर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. सार्वजनिक शांततेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महावितरणतर्फे या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढला जाईल. गणेश मंडळांनी महावितरणला सहकार्य करावे.

- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता,

शहर मंडळ, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसामान्यांनी पोलिसमित्र बनावे’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये सातपूर भागात घरकुले विस्तारली आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीच पोलिसांचे मित्र बनत चुकीच्या अथवा

समाजाला घातक असलेली माहिती पोलिसांना दिली पाहिजे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केली.

अशोकनगर, राधाकृष्णनगर येथील बोलकर व्हॅली पोलिस चौकीच्या उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सीमा हिरे, नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, नगरसेवक शशिकांत जाधव, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, सातपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे व पोलिस चौकी स्वःखर्चातून उभारणारे बांधकाम व्यावसायिक गणेश बोलकर उपस्थित होते.

सातपूर भागात वाढलेली लोकवस्तीत सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांचे मित्र बनले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पोलिसच पोहचतील असे नाही, यासाठी टवाळखोर अथवा समाजात घातक असणाऱ्यांची माहिती पोलिस मित्र होऊन नागरिकांनी दिली पाहिजे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केले. पोलिस चौकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरच नेमणूक केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, यावेळी खान्देश मराठा मित्र मंडळाच्या वतीने आयर्न मॅन शर्यत पूर्ण केल्याबद्दल डॉ. सिंगल यांचा सुधाकर शिसोदे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजेच्या साहित्यातून साकारले गणराय!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेदांत किशोर मुंदडा या इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पूजेच्या साहित्यापासून गणराय साकारले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तो विविध आकारांतून गणेशाची मूर्ती साकारत आहे.

दर वर्षी विविध वस्तूद्वारे वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती साकारणाऱ्या वेदांतने यावर्षी पूजेला लागणाऱ्या साहित्यापासून बाप्पांची मूर्ती साकारली आहे. बाप्पांचा चेहरा नारळात साकारला असून, पोटासाठी कलश वापरला आहे. समोरचे हात म्हणून अगरबत्तीचा वापर केला असून, मागच्या हातांसाठी अत्तराची बाटली आणि दुसऱ्या हातासाठी गुलाबजलची बाटली वापरली आहे. सोंड म्हणून धूप आणि दात म्हणून काजूचा वापर केला आहे. डोळ्यांसाठी सुपाऱ्या वापरण्यात आल्या आहेत.

या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीचे पाय तयार करण्यासाठी मोळीचे बंडल वापरले असून, बाप्पांच्या बैठकीसाठी दगडी सहाण वापरली आहे. बाप्पांच्या भल्या कानांसाठी खोबऱ्याच्या वाट्या वापरल्या असून, कानातील कुंडलांसाठी बदाम लावण्यात आले आहेत. एका हाताचा पंजा म्हणून दिवा आणि दुसऱ्या हाताचा पंजा म्हणून हळद-कुंकुवाचा करंडा वापरला आहे. कापुराची माळ आणि कापसाचे जानवे बाप्पाला घातले आहे. पायाच्या बोटांसाठी हळकुंड आणि अंगठ्यासाठी खारीक वापरली आहे. बाप्पांचे वाहन असलेला उंदीर गोपीचंदनाद्वारे तयार केला आहे. या उंदराच्या शेपटीसाठी दिव्याची वात वापरली आहे. नागवेलीचे पान उंदराचे आसन म्हणून वापरले आहे. उंदराचे खाद्य म्हणून तांदूळ व डोळे म्हणून लवंग वापरली आहे.

या मूर्ती ठरल्या लक्षवेधी...

दर वर्षी विविध प्रकारचे गणपती साकारण्यासाठी आई-वडिलांची मदत होते, असे तो म्हणतो. विविध वस्तूंपासून बाप्पा बनविण्याचे हे त्याचे आठवे वर्ष आहे. यापूर्वी वेदांतने प्लास्टिक बॉटल गणेश, स्टील डबा गणेश, बांबू गणेश, कोरुगेटेड बॉक्स गणेश, काच गणेश, इलेक्ट्रॉनिक्स गणेश, दप्तर गणेश आदी प्रकारच्या त्याने साकारलेल्या मूर्ती लक्षवेधी ठरलेल्या आहेत.

…--

गणेशाची विविध रुपे साकारताना कल्पनाशक्तीचा कस लागतो. तासन् तास वस्तूंशी खेळल्याने त्यातील आकार दृष्टिक्षेपात येतात. या कल्पनाशक्तीची मला अभ्यासातदेखील मदत होते.

-वेदांत मुंदडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या वृषाली ‘मिस इंडिया इम्प्रेस’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथील हॉटेल हयात येथे झालेल्या दिया मिस इंडिया इम्प्रेस ऑफ द नेशन २०१८ या कॉन्टेस्टमध्ये नाशिकच्या वृषाली तायडे यांनी 'मिस इंडिया इम्प्रेस ऑफ द नेशन' हा किताब पटकाविला. त्यांना मिस वर्ल्ड युक्ता मुखी आणि बिझनेस आयकॉन विनय अरान्हा यांच्या हस्ते मानाचा मुकूट देऊन गौरविण्यात आले.

वृषाली तायडे या नाशिकच्या असून त्यांची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. सात वर्षांपासून नाशिकच्या विविध कार्यक्रमाचे त्या सूत्रसंचालन करतात. त्यांना 'मिस इंडिया इम्प्रेस ऑफ द नेशन' या किताबासोबतच 'स्टाइल आयकॉन' हा किताब देखील मिळाला. या सौदर्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच झाली. संगीत व नृत्य अशा वातावरणात एकूण ३२ स्पर्धकांनी प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी चुरशीने स्पर्धा लढवली. महाअंतिम फेरीसाठी बॉलिवूडमधील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

सौंदर्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून युक्ता मुखी, आदिती गोवित्रीकर, शिबानी काश्यप, सोनल चौहान, शरहान सिंग यांनी काम पाहिले. त्यांना विनय आरान्हा, सपना आनंद, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास यांचीही साथ लाभली. प्रसिध्द दूरचित्रवाणी अभिनेता अमन वर्मा याने दिमाखदार व मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

शिबानी काश्यपने आपल्या मधूर आवाजात तिची देशभर प्रसिद्धी झालेली गाणी सादर करून प्रेक्षकांना डोलायला लावले. दिवा सौंदर्य स्पर्धेतील चैतन्यशील जोडी असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात सिल्व्हर (वय २० ते ३४) व गोल्ड (वय ३५ पुढे) अशा दोन श्रेणीमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या १२ स्पर्धकांमधून सहा सर्वोत्तम विजेते निवडण्याचे आव्हान प्रेक्षकांपुढे होते. अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना दिवा स्पर्धेतील विजेत्यांकडून तीन दिवस मार्गदर्शन मिळाले. त्याच्या बळावर या स्पर्धकांनी आत्मविश्वासाने सौदर्य, शैली व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवत विजेतेपदाचा मुकूट पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांमुळे रविवार सत्कारणी...

0
0

बाप्पांमुळे रविवार सत्कारणी...

गणेशोत्सवातील एकमेव रविवार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह बच्चेकंपनीने सत्कारणी लावला. सुटीच्या मुहूर्तावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इंदिरानगरमधील श्री राजसारथी सोसायटीतील मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत विविध वयोगटातील मुलांनी असा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदेनी गाळा हडपल्याची तक्रार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांनी कॅनडा कॉर्नर येथील इमारतीतील गाळा बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने हडप केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार आरपीआयचे (आठवले गट) महानगरप्रमुख पवन क्षिरसागर यांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कागदपत्रांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएल कार्यालयासमोरील सिल्व्हर प्लाझा इमारतीत त्यांचा गाळा क्रमांक सात असून, क्षिरसागर आणि कांदे २००७ मध्ये येथे एकत्रित काम करीत होते. व्यावसायातील मतभेदांमुळे दोघांमध्ये वाद होता. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुहास कांदे हे दुकानात आले. तिथे त्यांनी रिव्हॉलरवरचा धाक दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देवून क्षिरसागर यांच्याकडून कोऱ्या कागदावर तसेच काही हिरव्या लेझर पेपरवर सह्या घेतल्या. या गाळ्यास कुलूप लावून कांदे यांनी त्यावर मालकी हक्क सांगितला. यानंतर जवळपास १० वर्षांपासून क्षिरसागर गाळा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. सर्व प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.

त्यानुसार, पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासाबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले की, हा गुन्हा १० ते ११ वर्षाभरापूर्वीचा असून, दोन्ही बाजुंनी विविध कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील तथ्य शोधून काढण्यात येतील. क्षिरसागर यांचे नाव महापालिकेच्या रेकॉर्डवर असून, आवश्यकतेनुसार संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असे भगत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव ऑक्टोबरमध्ये

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई महापालिका कलावंत संघाच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार असून, प्रत्येक विजेत्यास स्मृतीचषक, प्रशस्तीपत्रे आणि एकूण दीड लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती अरुण कदम व राम दौंड यांनी दिली.

स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम २५,००० रुपये, द्वितीय २०,००० रुपये, तृतीय १५,००० रुपये, सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये, तृतीय २,००० रुपये, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये, तृतीय २,००० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे

सर्वोत्कृष्ट अभिनय प्रथम (पुरुष) ५,००० रुपये, द्वितीय (पुरुष) ३,००० रुपये, तृतीय (पुरुष) २,००० रुपये, सर्वोत्कृष्ट अभिनय प्रथम (स्त्री) ५,००० रुपये, द्वितीय (स्त्री)३,००० रुपये, तृतीय (स्त्री) २,००० रुपये, विशेष लक्षवेधी अभिनेता १,००० रुपये, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम ३,००० रुपये, द्वितीय २,००० रुपये, सर्वोत्कृष्ट प्रकाश प्रथम ३,००० रुपये, द्वितीय २,००० रुपये, सर्वोत्कृष्ट संगीत प्रथम ३,००० रुपये, द्वितीय २,००० रुपये, प्राथमिक फेरीसाठी पाचही केंद्रांवर प्रत्येकी तीन अभिनय प्रशस्तीपत्रे आणि ५०० रुपये दिले जातील.

ही स्पर्धा नाशिक, मुंबई, पुणे, नगर आणि कणकवली या पाच केंद्रात होणार असून, नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी ६ व ७ ऑक्टोबरला होणार असून, अंतिम फेरी १८ ऑक्टोबरला दिनानाथ नाट्य मंदिर, मुंबई येथे होणार आहे. नाशिक केंद्राकरिता प्रवेशासाठी स्पर्धा प्रमुख विनोद राठोड (९२७०४८१८४४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालक्ष्मी फोटो

0
0

नाशिक येथील कमल श्रीधर धात्रक यांच्या निवासस्थानी शनिवारी महालक्ष्मींचे आगमन झाले. त्यानिमित्त कैलास पर्वताचा देखावा करण्यात आला आहे. रविवारी दिवसभर रंगलेल्या विविध कार्यक्रमांमुळे या सोहळ्याची रंगत वाढली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगाली बांधवांचे विश्वकर्मा पूजन

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सृष्टीच्या विविध कलांचा निर्माता मानल्या जाणाऱ्या विश्वकर्माचे बंगाली बांधवांनी सोमवारी पूजन केले जाते. दरवर्षी १७ सप्टेंबरला बंगाली कारागीरांकडून त्यांच्या दुकानांमध्ये विश्वकर्माची पूजा मांडली जाते. विश्वकर्माची मातीच्या मूर्तीची स्थापना करून तिचे दुसऱ्या दिवशी रामकुंडात विसर्जन केले जाते. तीळभांडेश्वर लेनमधील सोन्याच्या विविध वस्तू बनविणाऱ्या बंगाली कारागिरांनी ही पूजा मांडली.

विश्वकर्मा पूजनाला मूर्ती पूजनाबरोबरच कारागीर वापरत असलेल्या ऐरण, हातोडा, पक्कड, कात्री या अवजारांचेही पूजन केले जाते. सोन्याच्या नेकलेस, पोथी, एअररिंगस, ब्रेसलेट आदी वस्तूंची बनविणारे बंगाली कारागिर या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. या दिवशी सर्व काम बंद करून केवळ पूजेसाठी वेळ दिला जातो. मूर्तीची स्थापन करून मूर्तीसमोर होमहवन केले जाते. पूजेचा मान घरातील दाम्पत्यांना देण्यात येतो. बंगाली पूजारींनी या पूजेचे पौरोहित्य केले. प्रसाद म्हणून फळे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. विश्वकर्मा मूर्तींची विसर्जनप्रसंगी मोठी मिरवणूक काढण्यात येते. सनातन पंजा, नेपल पंजा, प्रसन्नत खरा, शशिधर पंडल, नीलेश गाजरे आदी कारागिरांनी विश्वकर्मा पूजन केले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपालेश्वर मंदिरात सापडला शिलालेख

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी 'श्री गणेशाय नम: श्री कपालेश्वर' असा देवनागरीतील शिलालेख आढळला आहे. शिलालेखातील काहीच अक्षरे वाचता येत नसल्याने तज्ज्ञांकडून याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले. शिलालेखाचा काळ पेशवाईच्या आधीचा असल्याचे शिलालेखांचे तज्ज्ञ अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी सांगितले. यामुळे कपालेश्वर मंदिराच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक शहराची माहिती असलेला 'की टू नाशिक- त्रंबक १९४१-४२' या पुस्तकावरून देवांग जानी यांना असा शिलालेख मंदिराच्या कळसाजवळ असल्याचे समजले. तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याच पुस्तकाच्या आधारे व नोंदीनुसार प्राचीन कपालेश्वर मंदिराचे बांधकाम तीन ते चार वेळा करण्यात आले आहे. पुस्तकाच्या नोंदीनुसार, इ. स. ११०० मध्ये स्थानिकांच्या विनंतीवरून तत्कालीन गवळी राजाने पाच हजार रुपये खर्च करून या मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनी विकत घेऊन कपालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. यानंतर इ.स. १७३८ मध्ये कोळीराजा नाशिक मुक्कामी असताना, गवळी राजाने बांधलेल्या मंदिरात अधिक सुधारणा करीत बांधकाम केले आणि याच कोळीराजाने कपालेश्वर मंदिराच्या व्यवस्थेसाठी व पूजा विधीसाठी शैव-गुरवांची नेमणूक केली असल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. यासह इ.स. १७६३ मध्ये मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार यांनी बांधून दिल्या, तर मंदिराचा मूळ सभामंडप जगजीवनराव पवार यांनी इ.स. १७६३ मध्ये बांधून दिल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे, अशी माहिती जानी यांनी दिली.

'की टू नाशिक' या पुस्तकाच्या आधारे जानी यांनी पाच दिवसांपूर्वी मंदिराची पाहणी सुरू केली आणि अखेर मंदिराच्या कलशाजवळ छताला प्राचीन शिलालेख असल्याचे आढळले. या शिलालेखाचा उल्लेख या पुस्तकात असून, सध्या हा शिलालेख मंदिराच्या छताचे वॉटर-प्रूफिंग करताना दुर्लक्ष केल्याने खराब झाला आहे. यावर प्लास्टिकसारख्या केमिकलचे आवरण असल्याने, शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत. जीर्ण स्थितीत असलेल्या या शिलालेखाचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून, त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचे जानी यांनी सांगितले.

शिलालेखाच्या अक्षरांवरून तो प्राचीन वाटतो. मात्र शिलालेख अर्धवट असून, अनेक अक्षरे अस्पष्ट असल्याने त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. शिलालेख कळसाच्या ठिकाणी असल्याने, तसेच त्यावर कपालेश्वर असा स्पष्ट उल्लेख असल्याने हा मंदिरासंबंधितच शिलालेख आहे.

- महेश तेंडुलकर, शिलालेखांचे अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यातील टोळीस गुजरातहून अटक

0
0

धुळे पोलिसांची कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील सोनगीरजवळ दोन महिन्यांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर गुजरातच्या व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील तीन कोटींची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेली १ कोटींची रोकड, गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसांसह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सोमवारी माहिती दिली.

गेल्या महिन्यात दि. २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पाटण गुजरात येथील प्रवीणसिंग दरबार हे त्यांच्या दोघा व्यावसायिकांबरोबर इंदूरकडून सुरतला जात असताना मुंबई-आग्रा महामार्गवर सोनगीर गावच्या शिवारात त्यांना दरोडखोरांनी लुटले होते. यामध्ये तिघे व्यापाऱ्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल दरोडेखोरांनी पळविले होते. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व ज्ञानेश्वर वारे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करीत तपास सुरू केला. त्यात अनिल कृष्णा सुवर्णा (रा. गांजेगार, ता. पालघर), संजय अमृतलाल पटेल (रा. सुंडीया ता. वडनगर गुजरात) यांच्या टोळीने हा दरोडा टाकल्याचे तपासात लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहचविण्यासाठी सापळा रचून पथकातील कर्मचाऱ्यांनी अखेर धनाजी पांडूरंग शिंदे, अनिल शंकर वेताळ (दोघे रा. मनोरमा नगर, कोलशेतरोड, ठाणे) आणि कासिम अब्दुल शेख (रा. कासार वडोली, घोडबंदर रोड, ठाणे) या तिघांना ताब्यात घेतले.

त्‍यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्याची कबूली देत, अनिल सुवर्णा, संजय पटेल, हसमीत उर्फ गोपाल पटेल, जसीन पटेल यांना गुजरात राज्यात जावून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५ हजारांची रोकड, ७ लाख रुपये किमतीची गाडी, ५ हजार रुपये किमतीची १ गावठी बनावट पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली. याप्रकरणी ज्ञानेश्वर वारेंसह कर्मचारी जाकीर शेख, अतुल निकम, संजय पाटील, सुनील पाटील, अमोल जाधव, राजेश सैंदाणे आदींनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे बुजविण्यासाठी‘प्रहार’चे आंदोलन

0
0

खड्डे बुजविण्यासाठी

'प्रहार'चे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील खड्डे बुजविण्यासाठी अल्टिमेटम देऊनही ते न बुजविल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खड्ड्यांमध्येच ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजविले जात नसतील तर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, अशी विचारणा करीत जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला. विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले.

जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे असून ते बुजवावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. १ सप्टेंबररोजी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतू जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आंदोलकांचा आक्षेप आहे. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी पोलिसांना आंदोलनाबाबतचे निवेदन देण्यात आले. शहरातील खड्ड्यांना मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्र्यांची नावे देण्याचा इशारा त्याद्वारे देण्यात आला. यास आठवडा उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रहार संघटनचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, नितीन गवळी, जगन काकडे, शाम गोसावी, अमजद पठाण आदी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आट्यापाट्या अजिंक्यपदस्पर्धेचे आज उद्घाटन

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा भारती नाशिक व आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने नाशिक येथील सहजयोग ध्यान केंद्र, चौक नं. ४ येथे २७ वी मुले व २० वी मुली सबज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नाशिकचे प्रदीप केतकर, नगरसेवक प्रवीण तिदमे, महाराष्ट्र आट्यापाट्या असो. चे सचिव दीपक कविश्वर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, मुक्त विद्यापीठाचे अभिजित पाटील, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागाचे संजय वसावे, नाशिक भाजपचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांचे उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यायाचे मुले व मुलींचे संघ सहभागी होत आहे. स्पर्धा १८ ते २० सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलाची काठेमळ्यात आत्महत्या

0
0

नाशिक : काठेमळा भागात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

ऋषिकेश रवींद्र काठे (रा. पोद्दार शाळेजवळ, काठेमळा) असे या मुलाचे नाव आहे. ऋषिकेशने सोमवारी (दि. १७) सकाळी साडेदहा वाजेपूर्वी आपल्या घरात नॉयलॉन दोरीने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच आई जयश्री काठे यांनी त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले असता डॉक्टरांनी सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

स्वाईन फ्लू

संशयिताचा मृत्यू

नाशिक : स्वाईन फ्लूसदृश्य तापावर उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. राजेंद्र बारकू पागे (४५, रा. आंबेगण, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे या व्यक्तीचे नाव आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वाईन फ्लू कक्षात २२ रुग्ण दाखल असून त्यातील आठ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवी प्रमाणपत्र अर्ज नोंदणीस प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत झालेल्या एप्रिल-मे २०१८ परीक्षेत पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीग्रहण समारंभात पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. यासाठीच्या अर्ज नोंदणीस मंगळवारपासून (दि. १८) सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज नोंदणी करण्याबाबतची सूचना विद्यापीठाने वेबसाइटवर जाहीर केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या ११४ व्या पदवीग्रहण सोहळा लवकरच होणार आहे. पदवीधर विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचे वाटप कॉलेज स्तरावर तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वाटप विद्यापीठाच्या पदवीग्रहण समारंभात केले जाणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदविणे अनिवार्य आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर या काळात convocation.unipune.ac.in या वेबसाइटवर अर्जनोंदणी करता येईल. अर्ज केल्यानंतर ऑनलाइन फी भरण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात जाऊन अर्ज नोंदवण्याची गरज भासणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सातपूरचा राजा’चे आकर्षण

0
0

'सातपूरचा राजा'चे आकर्षण (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील ओम साई मित्रमंडळप्रणीत सातपूरचा राजाची भव्य अन् आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आठ हजार लोकवस्तीतील नागरिकांच्या आग्रहास्तव १८ फूट उंचीच्या भव्य मूर्तीची येथे दर वर्षी स्थापना करण्यात येते. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभरातील धार्मिक सणांचे महत्त्व सांगून हा उत्सव साजरा केला जातो. गणपती अथर्वशीर्ष पठणासाठी सातपूर कॉलनीतील महिलांची मोठी गर्दी होत असते. रोजच शासकीय, राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते. सातपूर पंचक्रोशीतील भाविक सातपूरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून भेट देत असतात. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी ही माहिती दिली.

---

महिलांचे आगळेवेगळे मंडळ (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सार्वजनिक गणेश मंडळे अथवा राजकीय मंडळे खूप असतात. परंतु, केवळ महिलांनीच एकत्र येत महिला गणेश मंडळ स्थापन करीत गणेशोत्सवाची आगळी भेट श्रमिकनगरवासीयांना दिली आहे.

कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात श्रमिकनगर येथील महिलांनी एकत्रित येत गणपती मंडळाची स्थापना केली असून, या छोटेखानी महिला मंडळातर्फे गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. श्रमिकनगरच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या महिलांनी हे गणेश मंडळ स्थापन केले आहे. या मंडळात बच्चेकंपनीचा मोलाचा वाटा उचलीत आहे. येथे दररोज आरतीनंतर पारंपरिक येणारे सण, उत्सव याबाबत महिलांकडून माहिती दिली जात आहे. या मंडळात विमल मोहिते, मीनाक्षी पवार, लता नाथे, वैशाली थोरात, जयश्री निकम यांच्यासह अनेक महिलांचा सक्रिय सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनी प्रदुषणाला आवरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गणेशोत्सव हा आनंदोत्सव असला तरी त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचता कामा नये. उत्सव काळात कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण थांबवा,' असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. ध्वनीप्रदुषणाद्वारे पर्यावरण संवर्धनाला बाधा आणणारी गणेश मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सण आणि उत्सव हे मांगल्याचे प्रतिक असले तरी उत्साहाच्या भरात पर्यावरण संवर्धनाला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी देखील सुजान नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. परंतू ग्रामीण भागात उत्साहाला उधान आल्यानंतर गणेश भक्त पर्यावरण संवर्धनाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळते. म्हणूनच या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाची काळजी वाहण्याबाबत जिल्हा प्रशासन आग्रही आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांना ध्वनीमापक यंत्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तपासणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षकांना देण्यात आले आहे. ध्वनी प्रदुषणाचे निकष न पाळणाऱ्या मंडळावर दंडात्मक तसेच अन्य कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

तीन दिवस वाजवा रे वाजवा

गणेशोत्सव काळात २१ ते २३ सप्टेंबर असे तीन दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास आणि देखावे सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. रविवारी २३ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे मिरवणुकांमध्ये रात्री १२ पर्यंत मर्यादीत आवाजात ध्वनीक्षेपके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज २१ आणि २२ सप्टेंबर रोजी देखील गणेश भक्तांना देखावे पहाता यावेत याकरीता रात्री १२ पर्यंत देखावे सुरू ठेवण्यास मंडळांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वीचे शेवटचे दोन दिवस गणेश भक्त रात्री १२ पर्यंत देखाव्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याची दुगावमध्ये आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विघ्न दूर होण्याची चिन्हे नाहीत. वैफल्यग्रस्त शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असून जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे.

लखन दत्तू दिवे (वय २५, रा. दुगाव, ता. नाशिक) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या नावे सामायिक क्षेत्र असून ओझरखेडे आदिवासी बिगर कार्यकारी सहकारी संस्थेचे कुठलेही कर्ज नसल्याचे संबंधित तलाठ्याने अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची ही चालू वर्षातील ७१ वी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता २

0
0

नाशिक- निधनवार्ता २ ( फोटो आहे)

सीताबाई इघे

नांदगाव : येथील सीताबाई किसनराव इघे (वय १०८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक भास्कर किसनराव इघे यांच्या त्या मातश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images