Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘रेल्वे सुरक्षा बल’तर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

0
0

'रेल्वे सुरक्षा बल'तर्फे स्वच्छता जनजागृती रॅली (फोटो)

नाशिकरोड : रेल्वे सुरक्षा बलाच्या सामनगावरोडवरील प्रशिक्षण केंद्रातर्फे प्राचार्य रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. या स्वच्छता जनजागृती रॅलीत केंद्रातील प्रशिक्षणार्थी जवानांसह सर्व अधिकारी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सामनगावरोड, सिन्नर फाटा, नाशिकरोड, एकलहरे टी पॉइंटमार्गे एकलहरे गाव यामार्गे पुन्हा रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्र येथे विसर्जित करण्यात आली.

--

रक्तदान शिबिर (फोटो)

इंदिरानगर : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मित्रमंडळातर्फे रथचक्र चौकात रक्तदान शिबिर झाले. त्यात मंडळाच्या सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी रक्तदान केले. मंडळातर्फे वडाळा व इंदिरानगर परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण न्याहाळदे, नारायण यादव, सुनील राऊत, खलील शेख, संकेत खोडे, अरुण मुनशेट्टीवार, सचिन हरकरे उपस्थित होते. उमेश कुंदे, मयूर शिंदे, अंकुश खोडे, किरण सजनुळे, अक्षय वाघ, गौरव वाघ, कैलास विपी, मयूर सूर्यवंशी, सारथी खोडे, राहुल काशमिरे, सारंग खोडे, विराज भावसार आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवहन समितीच!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर बससेवेच्या प्रस्तावात परिवहन समितीच्या गठीत करण्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेल्या महापौर रंजना भानसी यांच्यासह भाजप शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिलासा देत परिवहन समिती स्थापन करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. शहर हितासाठी आणि नियमात बसेल त्याप्रमाणे योग्य निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. त्यामुळे बुधवारच्या महासभेत शहर बससेवेला परिवहन समितीसह मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

शहर बससेवा आणि हरित क्षेत्राच्या विकासावरून सोमवारी महापौरांचे निवासस्थान रामायणवर पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली होती. यानंतर मंगळवारी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेले होते. महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यानुसार आमदार सानप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बससेवेला मंजूरी देऊ असे सांगत, परिवहन समिती आवश्यक असल्याची सूचना मांडली. अन्य महापालिकांमध्ये बससेवा असल्याचे सांगत, नाशिकमध्ये आयुक्तांना सर्वाधिकार नको अशी भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शहर विकासाच्या हितासाठी जे काही करता येईल, ते स्थानिक स्तरावर निर्णय घ्या असे आदेश दिले. समिती नको अशी सूचना आपण मुंढे यांना केली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आमदार सानप यांनी दिली. अन्य महापालिकांमध्ये सुरू असलेल्या सेवेची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे महापालिकेत बुधवारच्या महासभेत हिरवा कंदील दिला जाण्याची शक्यता आहे. बससेवेच्या प्रस्तावात बदल करून त्यात परिवहन समितीचा समावेश होणार असल्याने मुंढेंसाठी हा मोठा झटकाच मानला जात आहे. या प्रस्तावावर आयुक्त मुंढे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे. बुधवारी सकाळी 'रामायण'वर भाजप नगरसेवकांची बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हरित क्षेत्राला १५ दिवसांचा ब्रेक

या बैठकीत स्मार्ट सिटीअंतर्गत टीपी स्किममध्ये विकसित करण्यात येत असलेल्या मखमलाबाद व हनुमानवाडी क्षेत्रातील हरित क्षेत्र विकासाच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांचा या ठिकाणी हरित क्षेत्र विकासाला विरोध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढा, असे सांगत. शेतकरी तयार नसतील तर दुसऱ्या क्षेत्रावर स्मार्ट सिटी विकसित करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. स्मार्ट सिटीत हा विषय आवश्यक असल्याने तो मंजूर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध पाहता भाजपकडून या विषयाबाबत आता 'आस्ते कदम' भूमिका घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे हरित क्षेत्राचाही विषय लटकण्याची शक्यता आहे.

परिवहन समितीबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी अन्य महापालिकांप्रमाणे समिती स्थापन करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. हरित क्षेत्र विकासाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. बुधवारी सकाळी पक्षाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतले जाणार आहेत.

- बाळासाहेब सानप, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉक विथ कमिशनर’ पुन्हा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चार महिन्यांच्या विश्रांतीनर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. शनिवारी (दि. २२) आनंदवली शिवारातील पाइपलाइन रोडवरील जॉगिंग ट्रॅक येथे आयुक्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नगरसेवकांनी आधीच मुंढेंच्या या उपक्रमावर तोंडसुख घेतले असतांना तो सुरू झाल्याने नगरसेवकांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर मुंढेंनी नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी जाणून त्यांचे तातडीने निराकरण करणारा हा उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. अनंत कान्हेरे मैदानावरून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांना आपल्या तक्रारी थेट आयुक्तांसमोर मांडता येत असल्यामुळे त्याची प्रशंसा झाली. आयुक्तांकडून तक्रारकर्त्यांनाच उपदेशाचे डोस पाजण्यात येऊ लागल्यानंतर त्यावर टीकाही होऊ लागली. नगरसेवकांनी मुंढेंच्या या उपक्रमावर आक्षेपही घेतले. पावसाळ्यामुळे हा उपक्रम बंद ठेवण्यात आला होता. शनिवारी सकाळी ६.३० वाजता नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात पालिका अधिकाऱ्यांकडे द्याव्यात. तक्रारी दिल्यानंतर टोकन क्रमांक देऊन त्याद्वारे समस्या मांडता येतील, असे प्रशासनाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

स्वाइन फ्लूने रामनगर (ता. निफाड) येथील सुशीला खैरनार (वय ५५) या महिलेचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात आतापर्यंत या आजाराने दोन जणांचा मृत्यू झाला असून, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

निफाड तालुक्यात सोनगाव येथील नवनाथ खालकर (वय ५२) या वृद्धाचा आठ दिवसांपूर्वीच स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. यानंतर सुशीला खैरनार यांचा या आजाराने मृत्यू झाला. यामुळे निफाड पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांनी रामनगर येथे स्वाइन फ्लूसंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी घ्यावयाची खबरदारी आणि आजारासंदर्भात जनजागृती करण्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी एक पथकही तयार केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत बालिका आई होऊन परतते तेव्हा...

0
0

सहा वर्षांपूर्वी अपहरण, नंतर वारंवार बलात्कार

..

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सहा वर्षांपूर्वी अपहरण झालेली १२ वर्षांची बालिका आता दोन मुलांची आई होऊन परतली आहे. एखादा चित्रपट वा मालिकेसारखे हे कथानक वाटत असले तरी सहा वर्षांत पीडित बालिकेला अनंत यातनांना सामोरे जावे लागले. दिल्लीतील एकाशी जबरदस्तीने विवाह लावून तिच्यावर वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाले. वयाच्या १३ व्या वर्षी तिच्यावर मातृत्व लादण्यात आले. आता आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आठ जणांविरोधात बलात्कारासह अपहरण, मारहाण व बाललैगिंक अत्याचारप्रतिबंधक (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------

नांदूरनाक्याजवळील जनार्दन नगरमध्ये २०१२ मध्ये पीडित मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. शेजारीच राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीची आई नंदा जाधव हिने तिला जेवणातून गुंगीचे औषध खाऊ घातले. गुंगी आल्यावर तिला रिक्षात बसवून संशयित मंगला नावाच्या महिलेच्या ताब्यात देण्यात आले. मंगलाने मुलीला महिनाभर एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर तिला पूजा नावाच्या महिलेकडे पाठविले. तेथून संशयित संगीता, रंजना, राजू व संजय यांच्यासोबत तिला दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गाव येथे नेण्यात आले. तेथे संजय नावाच्या इसमासोबत या बालिकेचे लग्न लावून देण्यात आले. त्याने २०१२ पासून २२ ऑगस्ट २०१८ पर्यंत मारहाण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. संजयसोबतच त्याचा भाऊ विनोद यानेही तिच्यावर बलात्कार केला. दरम्यानच्या काळात पीडित मुलीने दोन मुलांना जन्म दिला. आता मोठा मुलगा तीन वर्षांचा असून, छोटा दोन वर्षांचा आहे.

काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीने संजय याच्याकडे रक्षाबंधनासाठी आईकडे जाण्याचा हट्ट धरला. त्याने तिला देवळाली कॅम्प येथून ज्या महिलेकडून खरेदी केले होते तिच्याकडे आणले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यावर परतीच्या प्रवासात पीडितेने मनमाड येथे उतरून घेतले. पीडित मुलीला २४ ऑगस्ट रोजी तिच्या दोन मुलांसह तिच्या आईकडे सोडून संजयने पोबारा केला. पीडितेने मुलीने १८ सप्टेंबर रोजी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संशयित नंदा जाधव, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद अशा आठ जणांविरोधात फिर्याद नोंदविली. त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देवळाली परिसरातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

..

गुंतागुंत उलगडण्याचे आव्हान

पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, न्यायालयाने तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासासाठी एक पथक लवकरच उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे. अत्याचार झाले तेव्हा मुलगी खूपच लहान असल्याने तिला तारखांसह अनेक संदर्भ आठवत नाहीत. शिवाय, मुलीवर अत्याचार करणारे परराज्यातील असल्याने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अनेक बाबी उजेडात येतील. या गुन्ह्यातील नेमके सत्य उघडकीस आणण्यासाठी योग्य दिशेने तपास सुरू केल्याची माहिती आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विघ्नहर्त्याच्या रुपातून जागर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिंदे गावातील पर्यावरणमित्र महेंद्र पांगारकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षणप्रसार आणि टाकाऊतून टिकाऊ असा तिहेरी संदेश प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. त्यांच्या या अनोख्या गणेशोत्सवाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

सामाजिक एकात्मतेसाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजच्या आधुनिक काळातही पांगारकर कुटुंबीयांसारख्या ध्येयवेड्यांमुळे विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी हातभार लावताना दिसून येत आहे. महेंद्र पांगारकर आणि त्यांचे कुटुंब पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी त्यांच्या पुतणीच्या विवाहाच्या पत्रिकाही जुन्या रद्दी कागदाचा पुनर्वापर करून घरीच बनविल्या होत्या. या लग्नपत्रिकेतून त्यांनी पाच झाडांच्या बियाही नातेवाइकांना वितरित केल्या होत्या. लग्नपत्रिकेवर पर्यावरणविषयक संदेशही दिलेले होते. त्याच पांगारकर कुटुंबातील महेंद्र, त्यांच्या पत्नी अर्चना, कन्या श्रावणी आणि मुलगा क्षितिज या सर्वांनी मिळून जुन्या वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर करून घरीच गणेशमूर्ती बनवून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणेशमूर्तीला कोणतेही रासायनिक रंग वापरलेले नसून, घरीच तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचाच वापर करण्यात आलेला आहे. प्लास्टिक, थर्माकोलचा वापरही केलेला नाही.

--

सामाजिक संदेशाची आरास

पांगारकर कुटुंबीयांनी आपल्या घरात टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून या मूर्तीपुढे सामाजिक संदेश देणारी आरास केली आहे. शिक्षण प्रसारासाठी 'सारे शिकूया पुढे जाऊया' अशा संदेशाची इको फ्रेंडली आरास त्यांनी साकारली आहे. बाप्पांचे वाहन उंदीरमामाही जुन्या कागदाच्या लगद्यापासुन तयार केलेले आहेत. पांगारकर कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

आपल्या पारंपरिक सण-उत्सवांची सांगड आताच्या सामाजिक व नैसर्गिक समस्यांशी घालणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाची लोकप्रियता बघता हा उत्सव पर्यावरण संवर्धनासाठीचे एक माध्यम ठरू शकतो. याची सुरुवात प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून केली पाहिजे.

-महेंद्र पांगारकर, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे उपोषणास्त्र

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कमी पटसंख्येचे कारण दाखवत १३५ अंगणवाड्या बंद करण्याच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात कामावरून कमी केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन न देता मानसिक, आर्थिक व शारीरिक हेळसांड करणाऱ्या मनपा प्रशासनाचा निषेध केला.

आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रशासकीय काटकसरीच्या नावाखाली १३५ अंगणवाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या १३५ सेविका आणि १३५ मदतनीस अशा २७० जणींना कामावरून कमी करण्यात आले आहे. परंतु, महासभेने आयुक्तांचा निर्णय फिरवत, या सर्वांना कामावर घेऊन अंगणवाड्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंढे यांनी मात्र हा प्रस्ताव केवळ दप्तरी दाखल करून घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १९ जून रोजी अंगणवाड्या पूर्ववत करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. १९ जुलै रोजी पुन्हा थाळीनाद आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिला होता. परंतु, तरीही प्रशासनाने न ऐकल्याने ५ सप्टेंबर रोजी आक्रोश आंदोलन केले होते. तरीही मुंढे जुमानत नसल्याने अखेरीस आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. भारत हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत मागण्या

- अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निर्धारणाचे अधिकार महासभेलाच असावेत

-पटसंख्येची मर्यादा किमान १५ व कमाल २० पर्यंत केली जावी.

- लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची पुनर्रचना केली जावी

- अंगणवाड्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात.

- निवृत्तांना आर्थिक मदतीची योजना सुरू करावी

- अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी सेविका आणि मदतनिस यांना प्रशिक्षण दिले जावे.

- अंगणवाड्या कायमस्वरुपी बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली जावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपडताळणी मुदतवाढीनंतरही संभ्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधींना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांची मुदत दिली आहे. प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना या मुदतवाढीमुळे दिलासा मिळणार की नाही, याबाबतचा संभ्रम मात्र अजूनही कायम आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव गटातून लढणाऱ्या उमेदवारांना विजयी झाल्यानंतर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र, जिल्ह्यात ही मुदत उलटूनही तीन हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींनी ही प्रमाणपत्रेच सादर केली नसल्याची धक्कादायक बाब अलीकडेच पुढे आली होती. अशा ३०४९ लोकप्रतिनिधींची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याबाबतचे आदेश निर्गमित करावेत, हा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही अलीकडेच कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही पदे रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दिला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्याप याबाबतचे कोणतेही निर्देश प्राप्त झाले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना लागू असणार की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याशिवाय निवडणूक लढवितेवेळीच उमेदवारांनी सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करू, असे शपथपत्र सादर केले आहे. काही लोकप्रतिनिधींचा १२ महिन्यांचा कालावधीदेखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी येत्या चार- पाच दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या

३०१९ ग्रामपंचायत सदस्य

१७ नगरपंचायतीचे सदस्य

१० पंचायत समिती सदस्य

०३ जिल्हा परिषदेचे सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायनाला सलामीलाच धक्का

0
0

पी. व्ही. सिंधूची विजय सलामी; दुहेरीतील खेळाडूंची आगेकूच

चीन ओपन

वृत्तसंस्था, चँगझ्होयू

भारताच्या साईना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करावा लागला, तर पी. व्ही. सिंधूने विजयी सलामी दिली.

महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत कोरियाच्या सुंग जी ह्यूनने साईना नेहवालचे आव्हान २०-२२, २१-८, २१-१४ असे परतवून लावले. ही लढत ४८ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत साईना दहाव्या स्थानावर असून, सुंग नवव्या स्थानावर आहे. सुंगचा हा साईना नेहवालवरील अकराव्या लढतींतील तिसराच विजय ठरला. पहिल्या गेममध्ये एक वेळ साईनाकडे १७-१२ अशी आघाडी होती. यानंतर सुंगने सलग सात गुण घेतले. साईनाने तिला नंतर २०-२० असे बरोबरीत गाठले आणि पुढील दोन गुण घेत गेम जिंकली. मात्र, दुसरी आणि तिसरी गेम अगदीच एकतर्फी झाली. यात साईनाचा निभाव लागलाच नाही. दुसऱ्या गेममध्ये सुंगने ७-२ अशी आघाडी घेतली होती. यानंतर तिने १०-६ अशी आघाडी वाढवली होती. सुंगने सलग नऊ गुण घेत गेमचे चित्रच पालटले आणि पुढे ही गेम २१-८ अशी सहज जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये सुंगकडे ब्रेकला ११-६ अशी आघाडी होती. यानंतर सुंगने ही आघाडी १९-१० अशी वाढवली. साईनाने सलग चार गुण घेत लढतीत परतण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, पुढील दोन गुण घेत सुंगने गेमसह लढत जिंकली. साईनाने २०१४मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. जकार्ता एशियाडमध्ये साईनाने ब्राँझपदक मिळवले. यानंतर तिने पुरेशा तंदुरुस्तीसाठी जपान ओपनमधून माघार घेतली होती. मात्र, चीन ओपनमध्ये तिला चमक दाखविता आली नाही.

यानंतर एकेरीच्या दुसऱ्या लढतीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जपानच्या साएना कावाकामीवर २१-१५, २१-१३ अशी २६ मिनिटांत मात केली. जागतिक क्रमवारीत सिंधू तिसऱ्या, तर साएना ३९व्या स्थानावर आहे. सिंधूची हा साएनावरील दुसरा विजय ठरला. पहिली गेम सुरुवातीला चुरशीची झाली. मात्र, ७-७ अशा बरोबरीनंतर सिंधूने सलग सहा गुण मिळवले आणि पुढे ही गेम २१-१५ अशी सहज जिंकली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सलग सहा गुण घेतले. साएनाने ब्रेकला तिला १०-११ असे गाठण्याचा प्रयत्न केला. ब्रेकनंतर सिंधूने १५-१२ अशा आघाडीनंतर सलग पाच गुण घेतले आणि ही गेम २१-१३ अशी सहज जिंकून दुसरी फेरी गाठली. या फेरीत तिची लढत थायलंडच्या बुसाननविरुद्ध होईल. सिंधूने बुसाननला मागील आठही लढतींत पराभूत केले आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी. सुमीत रेड्डी जोडीने चायनीज तैपेईच्या लिओ मिन चून-सु चिंग हेंग जोडीवर १३-२१, २१-१३, २१-१२ अशी ३९ मिनिटांत मात केली. मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या मार्व्हिन एमिल-लिंडा एफ्लेर जोडीवर २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता पंधरवड्यात ‘ब्रह्मकुमारी’चा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छता हिच ईश्वर सेवा ही संकल्पना घेऊन समाजात कार्यरत असलेल्या ब्रह्मकुमारी संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वछता ही सेवा' या अभियानाअंतर्गत भारतभरातील विविध सेवाकेंद्रांमधून स्वच्छतेचा कार्यक्रम आखला आहे.

याचाच भाग म्हणून नाशिकच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वरिष्ठ संचालिका राजयोगिनी वासंती दिदींच्या मार्गदर्शनाखाली येथील मुख्य सेवाकेंद्र प्रभूप्रसाद येथील परिसरात स्वच्छतेचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संस्थेच्या ७५ ते ८० जणांनी मिळून श्रमदान केले. त्यांनी परिसरातील गवत, कचरा, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जमा झालेली घाण इत्यादी झाडून परिसर स्वच्छ केला. या अभियानात नगरसेवक अरुण पवार व शालिनी पवार आवर्जून सहभागी झाले. तसेच महापालिकेचे स्वच्छता आधिकारी माळेकर व सहयोगी गायकवाड यांनीही हिरीरीने सहभाग नोंदविला. ब्रह्मकुमारी केंद्रतर्फे ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी अभियानाचा पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

.. अन् ‘बोलक्या भिंती’ सुन्या जाहल्या

0
0

चिपळूणकरांना अभिवादन करताना नाशिककरांची खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्मास देव मानून त्याप्रमाणे शब्दश: जगणाऱ्या थोड्या कृतीशील व्यक्तिमत्वांपैकी एक असे वि. वि. चिपळूणकर यांचे व्यक्तिमत्व होते. अभ्यासू, मितभाषी, साधेपणाचा अंगीकार केलेला हाडाचा शिक्षक अशी वि. वि. यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट सांगता येतील. त्यांच्या जाण्याने शाळा-शाळांमधील 'बोलक्या भिंती' खऱ्या अर्थाने सुन्या झाल्या आहेत, अशी श्रद्धांजली नाशिकमधील वि. वि. यांची काराकिर्द जवळून बघणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी त्यांना वाहिली.

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी निधन झाले. मूळचे मुंबईकर असणारा वि. वि. हे निवृत्तीनंतर औरंगाबाद शहरात स्थायिक झाले. मात्र, नाशिकशी त्यांनी हयातभर ऋणानुबंध जपला. या निमित्ताने शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही ज्येष्ठ जाणत्यांनी वि. वि. यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय भार्गवे म्हणाले, की स्वत: मितभाषी आणि अंतर्मुख वृत्तीचे असणाऱ्या चिपळूणकर सरांनी राज्यात राबविलेला 'बोलक्या भिंती' हा अभिनव प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला. हजारो शाळांच्या भिंतींवर चिपळूणकर सरांच्या संकल्पनेतून ज्यावेळी अंक-मुळाक्षरे आणि चित्र खेळू लागली तेव्हा महाराष्ट्रातील शाळा खऱ्या अर्थाने बोलक्या झाल्या. मुलांशी इतक्या ताकदीच्या संवेदनेतून या प्रयोगाअगोदर क्वचितच कुणी बोलले असेल, अशा अभिनव प्रयोगांमधून त्यांच्यातील हाडाच्या शिक्षकाचे वेळोवेळी दर्शन होत गेले. चित्रा नाईक, वा. ना. दांडेकर, डॉ. उपासनी या शिक्षणतज्ज्ञांच्या रांगेतील तितक्याच दराऱ्याचे अन् आदरयुक्त नाव म्हणून वि. वि. चिपळूणकर यांचा उल्लेख त्यांच्या शिक्षणासाठीच्या समर्पित वृत्तीमुळे आवश्यकच ठरतो.

गुरुस्थानाने नाशिकशी ऋणानुबंध

राज्याचे शिक्षण संचालक म्हणून नाशिकमध्ये चिपळूणकरांचे येणे-जाणे सातत्याचे राहिले. पण या कार्यालयीन वर्तुळापलिकडे नाशिकवर त्यांचे असणारे प्रेम म्हणजे त्यांचे गुरूस्थान नाशिकचे होते, या मुद्द्याकडे ज्येष्ठ खगोल अभ्यासक रमाकांत देशपांडे यांनी लक्ष वेधले. देशपांडे म्हणाले, की राज्याच्या शिक्षण संचालकपदापर्यंत पोहचल्यानंतरद्धा आपल्यातील हाडाचा शिक्षक कसा जागृत ठेवावा याचे उदाहरण म्हणून केवळ चिपळूणकरांचे उदाहरण देता येईल. अतिशय साधेपणाने वावरणारे त्यांचे व्यक्तिमत्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या शब्दांना अमृतवाणी असेही संबोधता येईल. त्यांची शिक्षण संचालक पदावरील काराकीर्द ही शिक्षण विभागासाठी सुवर्णकाळ होती. त्यांची धोरणे दूरदृष्टीची व अचूक असत. मुख्य म्हणजे प्रत्येक गुरुपौर्णिमेस ते नाशिकमधील गुरुगृही येत. मेरी परिसरात त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांच्या गुरू परंपरेबद्दल फारशी माहिती नाही; पण अध्यात्मिक अधिष्ठान असणारा अतिशय साधे, सरळ आणि पारदर्शी-दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी पाटील

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यात अग्रेसर असलेल्या कालिका देवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या संघाच्या अध्यक्षपदी परमानंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वरी पारायणाचा सांगता समारंभ झाला. कार्यकारिणी २०१८ ते २०२१ पर्यंत कार्यरत असणार आहे. उपाध्यक्षपदी पुष्पलता ठाकूर, शिवाजी देशमुख, कार्याध्यक्षपदी भिकाजी शिंदे, दिलीप कुक्कर, सचिव मारुती शिंदे, जयसिंग मकवाणा, कोषाध्यक्ष रवींद्र पवार, सहकोषाध्यक्ष भीमराव चिखले यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून अनुराधा कर्णिक, राजश्री लिमये, एकनाथ सुर्वे, सुभाषचंद्र वाघ, मंगला चौधरी, अरुणा जोशी, विभाकर विमलवार, रामदास बागड यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गंत हिशेब तपासणीस म्हणून मिलिंद मोडक तर कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. नंदकिशोर मुंदडा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंता देशमुख, निर्मळ यांचा लायन्स क्लबतर्फे सन्मान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभियंतादिनाचे औचित्य साधून शहरातील अभियंता टी. डी. देशमुख, अभियंता प्रभाकर निर्मळ यांचा लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीमतर्फे अभियंता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अभियंता वसंतराव बर्वे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

हा कार्यक्रम नाशिकरोड येथील हॉटेल सेलिब्रिटा येथे मान्यवरांच्या उपस्थित झाला. देशमुख यांनी माणिकडोह, सीना, वाकी, गौतमी-गोदावरी या धरणांवर हायड्रो प्रणालीचे, तसेच घाटघर जलविद्युत प्रकल्पातदेखील यशस्वी काम केले आहे. त्यांनी 'मेरी'तर्फे कॉँक्रीट संशोधनाचा प्रबंध सिंगापूर येथील जागतिक केंद्र असलेल्या संस्थेत सादर केला होता. त्यात ८७ देशांनी भाग घेतला होता. निर्मळ यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात वायघोळ पाडा, शिंदे, सोळमुख व श्रीमंती या लघु पाटबंधारे धरणांचे काम पूर्ण केले, तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, पालखेड, भोजापूर कडवा, भंडारदरा, मुळा, अढळा, घाटशीळ व पाडगाव या धरणांच्या पाणीवाटप व्यवस्थापनाचे २५ वर्षे यशस्वीपणे काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. या पुरस्काराचे नियोजन देवळाली नाशिकरोड लायन्स क्लबचे सीनिअर लायन संजय पगारे व राजेश कोठावदे यांच्या सहयोगाने पार पडले. या कार्यक्रमाला माजी प्राचार्य भट, विलास पाटील, सोनजे व जिल्ह्यातील सर्व लायन्स क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व संचालक, संचालिका आदी उपस्थित होते.

---

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ ट्रॅफिक अॅम्बेसिडर’ला आरतीचा मान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव कालावधीत 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे पर्यावरणपूरक गणेश, ग्रीन गणेश आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि समाजात विधायक काम करणाऱ्या व्यक्तींना 'मटा'च्या गणरायाच्या आरतीचा मान देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याअंतर्गत गणेशोत्सवातील सहाव्या दिवशीच्या आरतीचा मान वाहतूक सिग्नलवर उभे राहून वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या सतीश महाजन यांना देण्यात आला.

वयाची ६३ वर्षे पूर्ण करणारे सतीश महाजन रोज नित्यनेमाने गंगापूर नाक्यावरील सिग्नलवर उभे राहून वाहनचालकांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न करीत असतात. सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास या उपक्रमासाठी ते वेळ देतात. हा उपक्रम मार्च महिन्यापासून सुरू असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनीही त्यांना ट्रॅफिक अॅम्बेसिडर म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या या रोजच्या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी हेल्मेट परिधान करणे सुरू केले आहे. अनेक रिक्षाचालक झेब्रा क्रॉसिंगच्या आत वाहने उभी करीत असतात. सकाळी दोन तास काम केल्यानंतर आपल्या पिढीजात शिवणकामाच्या व्यवसायाला ते वेळ देतात. वयाच्या साठीत त्यांनी सायकलवरून पंढरपूरवारीदेखील केली आणि तीही कमी वेळात करण्याचा विक्रम केला. इतरांपेक्षा वयाने जरी सीनिअर असले, तरीही मनाने आपण तरुण असल्याचे त्यांनी सायकलवारीतून दाखवून दिलेले आहे.

महाजन यांना लहानपणापासूनच सायकलचे वेड होते. नुसती सायकलच चालवायची नाही, तर आठवड्यातून एक दिवस सायकलवरून जिल्ह्याच्या एका भागात जायचे आणि तेथील भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करायचा, असा त्यांचा रिवाज होता. मुले करती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सायकल चालविण्यास सुरुवात केली. सायकल चालविण्याच्या दृष्टीने ते नाशिक सायकलिस्ट असोसिएशनशी संलग्न झाले आणि पुन्हा एकदा त्यांचे सायकलचे वेड बहरत गेले. नाशिक सायकलिस्टशी संबंध आल्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या मोहिमा फत्ते केल्या. त्यावेळी वयाने जास्त असल्याने लोक विचारत दमले का? परंतु, महाजन यांचा ठाम विश्वास असल्य़ाने ते म्हणत, मला काही झाले नाही, मी सायकलवरून जगाची सफरही करू शकतो!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ तबलावादक रत्नपारखी यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ज्येष्ठ तबलावादक सुनील वसंत रत्नपारखी (वय ५९) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी अंजली, मुलगा नीरज, मुलगी राधिका व दोन बंधू असा परिवार आहे.

सुनील रत्नपारखी हे सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त खालावली. मंगळवारी पहाटे ४.४५ वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गंगापूररोड येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शहराच्या सासंकृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ तबलावादक नवीन तांबट, गुरू बंधू नितीन पवार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, विवेक केळकर, मोहन उपासनी, सचिन चंद्रात्रे, रवींद्र अग्निहोत्री, गिरीश पांडे आदींसह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रत्नपारखी हे लहानपणापासून तबलावादनात निपुण होते. पं. सत्यशील देशपांडे, डॉ. मिलिंद मालशे, मंजिरी कर्वे यांसारख्या अनेक कलावंतांना त्यांनी साथ केली होती. आजवर सुमारे दीड ते दोन हजार संगीत मैफिली त्यांनी गाजविल्या. शास्त्रीय व सुगम अशा दोन्ही संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. नाट्यगीते वाजविण्यात ते निपुण होते. त्यांचे तबल्याचे शिक्षण पं. भानुदास पवार व विजय हिंगणे यांच्याकडे झाले. तबलावादनासाठी सदैव तयार असलेल्या रत्नपारखी यांचा स्वभाव विनम्र व मनमिळावू होता. व्यावसायिक व्याप व प्रकृतीच्या कारणामुळे दोन वर्षांपासून त्यांनी तबलावादन थांबविले. अनेक गायकांना साथीसाठी ते हवे असायचे, त्यांच्या निधनामुळे शहरातील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्तृत्वाची होणार चित्रनोंद

0
0

नाशिक पोलिसांच्या कार्यावर रेखाटण्यात येतेय भित्तीचित्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणे आणि दंडात्मक कारवाईसह प्रबोधनपर कार्यक्रम राबविणे अशी अनेक उपक्रमांनी पोलिसांप्रती नवी प्रतिमा नाशिककरांच्या मनात निर्माण होत आहे. पोलिसांच्या याच विशेष कार्यावर आधारित भित्तीचित्र पोलिस मुख्यालयाच्या भिंतीवर रेखाटले जात आहे. पोलिसांमुळे नाशिककर सुरक्षित असून पोलिसांची कायदा व सुव्यवस्था जतनासाठी उचलेल्या प्रत्येक कामाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी भित्तीचित्र रेखाटले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या उपक्रमांची व कार्याची आठवण कायमस्वरूपी स्मरणीय राहणार आहे.

शहरात पोलिस आयुक्तालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या विविध उपक्रमांनी नाशिककरांमध्ये पोलिस मित्र भावना दृढ केली. नागरिकांसाठी वाहतूक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, महिला आरोग्य, महिला सुरक्षा, कॉलेजियन्सचे प्रश्न, बेघर असणाऱ्यांचे पुनर्वसन, पोलिस मॅरेथॉन, सायबर सुरक्षा यासह अनेक उपक्रम गेल्या तीन वर्षांत पोलिस आयुक्तालयाने केले आहेत. तसेच पोलिस कुटुंबीयांसाठी सिनेमा, रंगपंचमी, खेळ, करमणूक आणि सहल अशा विविध कार्यक्रमही वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. त्यामुळे पोलिसांप्रती आदर, आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. या सर्व कार्याची आठवण नाशिककरांसह इतरांनाही कायम रहावी, यासाठी पोलिसांच्या सर्व उपक्रम व कार्यावर आधारित भित्तीचित्रे गंगापूर रोडवरील मुख्यालयाच्या भिंतीवर रेखाटली जात आहेत. आयुक्त डॉ. सिंगल यांनी पोलिस मित्र संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. याची जबाबदारी आर्किटेक्ट शीतल सोनवणे सांभाळत आहेत. आर्ट ऑफ शीतल ग्रुपची संपूर्ण टीम सर्व भित्तीचित्रे रेखाटत आहे. पुढील काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार आहे. १७२ बाय ७ फूट भिंतीवर चित्रे रेखाटली जात आहे.

या उपक्रमांवर चित्रे

नाशिक पोलिसांच्या प्रमुख भूमिकेत झालेला सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक पोलिस मॅरेथॉन, वाहतूक सुरक्षा उपक्रम, हेल्मेट जनजागृती, महिला सुरक्षा, पोलिस मित्र अॅप, सायबर क्राइम सुरक्षा सेल, पोलिस बंदोबस्त, नाकाबंदी, नो हॉर्न ऑल डे, बालमजुरी, रिमांड होम, ज्येष्ठ नागरिक संघ यावर आधारित नाशिक पोलिसांच्या उपक्रमांचे प्रातिनिधिक चित्र या भिंतीवर रेखाटले जात आहे. यासह सायकलिंग, मेडिटेशन व शहरातील निसर्गाचे चित्रही भिंतीवर असणार आहे. विशेष बाब अशी, की चित्राच्या सुरूवातीला हाताच्या ओंजळीत सर्व नाशिककर 'सेफ नाशिक' म्हणताहेत आणि त्यांच्यासमोर पोलिस अधिकारी उभे आहेत, असे चित्र रेखाटले गेले आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि नागरिकांना मिळणाऱ्या सहकार्याने नाशिककर सुरक्षित झाले आहेत, ही भावना यातून दृढ होणार आहे.

लोगो : चर्चा तर होणारच

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी परतीचा ‘मंगलवर्षा’व

0
0

त्र्यंबक, निफाड, कळवण, सटाण्यात हजेरी; पिकांना जीवदान

टीम मटा

यंदा सुरुवातीपासून असमानता ठेवलेल्या पावसाच्या परतीच्या आशाही धुसर असतानाच मंगळवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांसाठी मंगलमय ठरला. कळवण, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. गणपती बाप्पा आल्यावर पाऊस पडणारच या आशेवर असलेले शेतकरी या 'परतीच्या प्रसादा'मुळे आनंदित झाले आहेत.

000

निफाडच्या उत्तर भागात हजेरी

निफाड : गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवात निफाड तालुक्यातील उत्तर भागातील काही गावांमध्ये हजेरी लावली. तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. या मोसमात निफाड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

तालुक्यातील शिरवाडे वणी, पालखेड, दावचवाडी, कुंभारी या गावांमध्ये दुपारी एकच्या दरम्यान तासभर पाऊस झाल्याने द्राक्षबागांमध्ये पाणी साचले होते. टोमॅटो काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे हाल झाले. लासलगाव परिसरात पावसाने फक्त शिडकावा दिला. निफाड शहरासह तालुक्यात पावसाचे वातावरण होते. पाऊस मात्र झाला नाही.

निफाड तालुक्यात पावसाने यावर्षी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन आणि मका या पिकांच्या विक्रमी लागवडीसोबतच लाल कांद्याची लागवड व उन्हाळ कांद्याचे रोपे टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाची गरज असून, पाऊस गायब झाल्याने मार्केटमध्ये शांतता पसरली आहे. पोळ्याला पाऊस होण्याची आशा फोल ठरली होती. मात्र गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रविवारदेखील निफाडमध्ये जोराचा पाऊस झाला होता.

000

कळवणमध्ये जोर'धार'

कळवण : मोठ्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी पावसाने कळवण परिसरात जोरदार हजेरी लावली. सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता जोरदार पाऊस पडण्यास सुरवात झाली. तब्बल एक तास चाललेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले.

0000

सटाण्यात तुरळक सरी

सटाणा : शहरासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हजेरी लावून गणेशोत्सव कालावधीत पावसाचा पुन्हा एकदा 'श्री गणेशा' केल्याने समाधान व्यक्त होत आहे. सटाणा शहरासह तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तालुक्यातील पश्चिम भागात तुरळक सरी पडत असल्या तरीही शहर व परिसरात पाऊस लांबला आहे. गणपती व नवरात्रीत परतीचा पाऊस येत असल्यामुळे मंगळवारच्या पावसाने परिसरात चैतन्य पसरले आहे. मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात काही मिनिटे आलेल्या पावसाने शहरवासीय समाधानी झाले आहेत.

000

मालेगाव, नांदगाव कोरडेच

मालेगाव : यंदा पावसाने कसमादेकडे पाठ फिरवल्यामुळे यर परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहे. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात अधूनमधून परतीचा पाऊस बरसत आहे. मात्र मालेगावकडे परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कापूस, मका, भुईमूग या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असल्यामुळे येत्या आठवड्यात दमदार पाऊस पडायला हवा. चांदवड, नांदगाव तालुक्यातील मंगळवारी उघडीत होती. मनमाड शहरातसह परिसरात सोमवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. मात्र मंगळवारी मनमाडही कोरडे होते.

000

इगतपुरीतील भात शेती संकटात

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अखेरच्या टप्प्यांत असलेली भात शेती संकटात सापडली आहे. त्यातच रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाची दडी व त्यात रोगांचा प्रादुर्भाव यामुळे भात उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यात परतीच्या पावसाच्याही आशा धूसर आहे.

भात उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले संकट टाळण्यासाठी वीज मंडळाने शेतकऱ्यांना भात शेतीला पाणी भरण्यासाठी जवळपास १५ दिवस अखंडित वीजपुरवठा करावा अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मेंगाळ यांची भेट घेऊन भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा एकूण तालुक्यातील करपाग्रस्त भात शेतीची पाहणी केली.

इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेला भात पाण्याअभावी करपू लागला आहे. त्यातच तापमानातही वाढ झाल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. इगतपुरी तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या फटक्यामुळे यावर्षीही भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावेळी रमेश धांडे, कुंडलिक जमधाडे, रामचंद्र गायकर, मोहन भोर, संदीप शिरसाठ, भाऊसाहेब भोर, दिगंबर शिरसाठ, बलवंत वारघाडे, दिगंबर पाटील, हिरामण कवटे आदी उपस्थित होते.

0000

सिन्नरमध्ये सरी

सिन्नर : शहर परिसरात मंगळवारी दुपारी तुरळक सरी बसरल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्याती अनेक वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाकडे डोळे लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशकन्या ‘क्रांती’ची बर्लिनमध्ये विक्रमी धाव

0
0

बर्लिनला नऊवारी परिधान करून पूर्ण केली शर्यत

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

खान्देशकन्या क्रांती प्रमोद साळवी (शिंदे) यांनी नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन (जर्मनी) पार पडलेल्या जागतिक मॅरेथानमध्ये नऊवारी साडीत सहभाग घेत गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदचा विक्रम केला आहे. त्यांनी नऊवारी साडी परिधान करीत ही ४२.१९५ किलोमीटरची शर्यत तीन तास ५७ मिनिटे सात सेकंदात पूर्ण केली. या विक्रमाने क्रांती यांनी खान्देशच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.

बर्लिनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मॅरेथॉनमध्ये क्रांती साळवी (शिंदे) यांनी ज्येष्ठ वयोगटात नऊवारी परिधान करीत ही विक्रमी वेळ नोंदविली. याअगोदरही त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशानंतर क्रांती यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रोजेक्ट मॅनेजर लीना अस्साना जेन्सन यांनी सन्मानित केले. क्रांती यांनी यापूर्वी मुंबईला झालेल्या आयआयटी मॅरेथानमध्ये नऊवारी परिधान करून स्पर्धा पूर्ण केली होती. मूळच्या खान्देशातल्या क्रांती यांचे शालेय शिक्षण धुळ्यातील जयहिंद विद्यालयात झाले. पुढे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर लग्न आणि पुढे त्या मुंबईत स्थायिक झाल्या. कॉलेजमध्ये असताना ८०० मीटर्स शर्यतीत क्रांती यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती. धुळे येथील कीर्ती शेन्द्रे, चेतना आणि रेखा यांनी खास नऊवारी या मॅरेथॉनसाठी क्रांती यांना शिवून पाठवली होती. ती परिधान करून त्यांनी ही रेस पूर्ण केली हे विशेष. क्रांती साळवी या धुळे येथील निवृत शिक्षक जयराम नत्थू शिंदे (रा. टागोर कॉलनी, धुळे) यांच्या कन्या आहेत.

अनेक नामांकित स्पर्धांमध्ये पदके
२०१२ मध्ये पहिल्यांदा मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये धावून क्रांती यांनी ‘टॉप फाइव्ह इंडियन वूमन’चा मान मिळवला आहे. इंडियन नेव्ही हाफ मॅरेथॉन, आयडीबीआय मॅरेथॉन, पिंकथॉन, मिरची मान्सून हाफ मॅरेथॉन, मॉरिशस मॅरेथॉन, मिलो मनिला फिलिपाइन्स मॅरेथॉन अशा अनेक महत्त्वाच्या मॅरेथॉन्समध्ये त्यांनी पदके कमावली आहेत. क्रांती मुंबईत एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. आपले पती पती कॅप्टन प्रमोद साळवी व मुलासोबत त्या मलबार हिलला वास्तव्यास आहेत.

स्पर्धा या माणसाच्या आयुष्यात येत असतात त्या आपण खेळ भावनेने खेळायला हव्या. जर असे झाले तर जीवनात अनेक संघर्ष येऊनही त्यातून आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो. आणि आपले जीवन अधिकाधिक सुंदर करू शकतो.
- क्रांती साळवी(शिंदे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगत सजीवांचे परग्रहावरून संदेश मिळालेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

७२ फास्ट रेडिओ बर्स्टने नुकत्याच पकडलेल्या संदेशांवरून असे वाटते, की हे परग्रहावरील प्रगत सजीवांकडून आलेले संदेश असावेत, असा दावा संशोधकांकडून केला जात आहे. हे ७२ 'एफआरबी'चे संदेश म्हणजे नजीकच्या काळातच परग्रहावरील जीवसृष्टी संशोधनातील महत्त्वाचे यश मानले जाईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक डॉ. निवास पाटील यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विज्ञानमंडळाचे उद्घाटन डॉ. निवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे होत्या. तर प्रा. सुरेश देवरे, प्रा. माधव खालकर, प्रा. दीपाली पडोळ, प्रा. राजश्री शिंदे, प्रा. स्नेहल कतवारे, प्रा. योगिनी पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

परग्रहावरील जीवसृष्टी हा संशोधकांसाठी नेहमीच आवाहनाचा व कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहांवरही जीवसृष्टी असावी हे संशोधन करतांना कोपर्निकसने, ग्रहतारे सूर्याभोवती फिरतात हे सिद्ध केले. न्यूटनच्या गतीविषयक नियमाचे महत्त्व आपण जाणतोच, आइनस्टाइनच्या सापेक्ष गतीनियमाचे ई-एमसी २ हे जगातील सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे, असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच एलसीडी प्रोजेक्टद्वारे खगोलशास्त्र संशोधनाचा प्रवास त्यांनी समजावून सांगितला.

प्राचार्या डॉ. थिगळे म्हणाल्या की, अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही जीवनरथाची दोन्ही चाके बरोबर चालायला हवीत. दोन्हींचा उपयोग अभ्यास आणि प्रगतीसाठी व्हावा, विद्यार्थ्यांनी नवनवीन शोधांच्या अभ्यासाबरोबरच संस्कृती टिकविण्यासाठी माणूसपण जपणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी काही विज्ञानकथांच्या आधारे स्पष्ट केले. डॉ. शरद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अजित नगरकर यांनी करून दिला. प्रा. सी. डी. खैरनार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत झळकल्या दूषित पाण्याच्या बाटल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्र.१७ मधील आम्रपाली झोपडपट्टीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनची गेल्या दहा महिन्यापासून दुरुस्ती केली नाही. प्रशासनाचा या हलगर्जीपणाची पोलखोल शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी महासभेत दूषित पाणीपुरवठ्याचे पुरावे सादर करत प्रशासनाला खडे बोल सुनावले. महापौरांनी तातडीने हे काम करण्याचे आदेश दिले असून, यापुढे अत्यावश्यक कामे केली नाही तर अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

नागरिकांना गेल्या दहा महिन्यापासून दूषीत पाणी प्यावे लागत असताना, प्रशासनाच्या नीडबेस कारभारावर हल्लाबोल करताना आणि नागरिकांच्या समस्या मांडतांना दिवे भावूक झाले होते. अधिकारी दूषित पाणी पिणार का, असा सवाल करत, अनुसूचित जमातीच्या योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा ठपका त्यांनी प्रशासनावर ठेवला. दिवेंच्या तळमळीच्या भाषणांने सभागृह अवाक झाले. अनुसूचित जाती वस्ती नियोजन आराखड्यावरून नगरसेवक प्रशांत दिवे यांनी प्रशासनाच्या कारभाराची महासभेत अक्षरशा चिरफाड केली. महापालिकेच्या बजेटमध्ये ५ टक्के निधीची तरतूद असतानाही, तो खर्च करण्याऐवजी प्रशासनाने या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचा आरोप करत, अनुसूचित जातीच्या नागरिकांकडे अधिकाऱ्यांच्या बघण्याच्या दृष्टीकोनावर तोफ डागली. प्रभाग क्र.१७ मधील आम्रपाली झोपडपट्टीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनची गळती झाल्याची तक्रार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. या ठिकाणी पाण्याची गळती होवून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दिवेंनी पाठपुरावा करून साडेपाच लाख रुपयांचे इस्टीमेट तयार करून मंजूर करून घेतलेही होते. परंतु या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने हे काम प्रलंबित राहिले. अत्यावश्यक काम असतानाही त्याची तातडीने दुरुस्ती केली नाही. अधिकाऱ्यांनी हे काम करण्याऐवजी ते अन्य कामांमध्ये क्लब करुन त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या दिवेंनी या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात दाखवत प्रशासनाचे डोळे उघडले.

गेल्या दहा महिन्यापासून हा समाज दूषित पाणी पित असताना अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल करत आता नीडबेस काम कुठे गेले, असा हल्लाबोल केला. अनुसूचित जमातीसाठी विकासासाठी असलेला निधी हा मेंटेनन्सच्या कामासाठी खर्च करत असताना त्यांच्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांची अनास्था आणि नागरिकांच्या वेदना मांडतांना दिवे भावूक झाले होते. त्यामुळे सभागृह ही शांत झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही कसली निड आणि कसला बेस असा हल्लाबोल करत, अत्यावश्यक कामांसाठी क्लब टेंडरीगची वाट का पाहता, असा सवाल केला. त्यावर महापौरांनी अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे आदेश देत, यापुढे हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई करू असा इशारा दिला. आयुक्त तुकाराम मुंढेंनीही सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत काम तातडीने घेण्याच्या सूचना केल्या.

पाईपलाइनला लावल्या पिशव्या

नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाईपलाइनची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी चक्क या पाईपलाइनला प्लास्टीकच्या पिशव्या गुंडाळल्याचा आरोप दिवेंनी सभागृहात केला. हा विषय महासभेत गाजणार यापार्श्वभूमीवर मंगळवारी अधिकाऱ्यांनी या पाईपलाइनचे तात्पुरती डागडुजी केल्याचा आरोप करत मंजूर काम करायला एवढा वेळ का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images