Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, २०१२ मधील शिल्लक असलेले ५० टक्के परिरक्षण करून अनुदानात वाढ करावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यातील १२ हजार शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी चार वर्षांपासून सातत्याने विविध मागण्या शासन दरबारी मांडताहेत. मात्र, आजवर त्यांच्या पदरी निराशाच पडली. यामुळे राज्यभरातील विविध शहरांमध्ये हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. आंदोलनात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांसह नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र काकड, सहकार्यवाह दत्ता पगार, ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे नाशिक विभागाध्यक्ष बाबासाहेब कोल्हे, कर्मचारी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष ग्रंथमित्र राजेश शिरसाठ, उपाध्यक्ष विनोद खैरनार, कार्याध्यक्ष बाळासाहेब थेटे, लक्ष्मण धोत्रे आदींनी सहभाग घेतला.

अशा आहेत मागण्या

कर्मचाऱ्यांना शासकीय नियमांनुसार सेवाशर्ती आणि वेतनश्रेणी द्यावी तसेच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालांच्या वाढीसाठी २०१२ पासून बंद करण्यात आलेली वर्ग वाढ, नवीन शासनमान्यता देण्यात यावी आदी मागण्या जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य व वैद्यकीय अधिकारी निलंबित

0
0

डॉ. कोठारींसह इंदूरकर निलंबित

पंचवटी प्रभागाच्या नगरसेविका प्रियंका माने यांचे चुलत सासरे दिलीपराव पोपट माने यांच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने व शहरातील आरोग्य, वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांना महापौरांनी निलंबित केले. त्यांच्यासह पंचवटीतल्या डॉ. सुरेश इंदूरकर यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले. प्रियंका माने यांनी त्यांचे चुलत सासरे यांना स्वाइन फ्लू झाल्याची माहिती देऊनही कोठारी आणि इंदूरकर यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप माने यांनी महासभेत केला. त्यावर आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले. परंतु, महापौरांनी 'आधी निलंबित करा, मग चौकशी करा' असे आदेश दिले.

'पेलिकन'ला दोन कोटी

गोल्फ क्लब मैदानाच्या अकरा कोटींच्या विकासकामांच्या प्रस्तावावरून नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आमदार देवयानी फरांदे यांची कोंडी केली. पेलिकन पार्कला निधी देणे आवश्यक असतानाही, गोल्फ क्लबला निधी दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. गोल्फ क्लबमध्ये सुविधा असतानाही, तेथे निधी दिल्याने आणि पेलिकनकडे दुर्लक्ष केल्याने शहाणे यांनी सभागृहातच आंदोलन सुरू केले. पेलिकनला निधी दिल्याशिवाय आपण बसणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मुंढे यांनी यावेळी पेलिकनसाठी दोन कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुसूचित जातीत समावेश करावा’

0
0

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना देण्यात आले.

नाभिक समाजाच्या अनेक मागण्या सरदार दरबारी प्रलंबित आहेत. वारंवार निदर्शने आणि आंदोलने करून या मागण्यांकडे सरकारचे लक्षही वेधण्यात आले आहे. परंतु, सरकारने अद्याप मागण्यांची दखल घेतलेली नाही. अपर जिल्हाधिकारी सागर यांची समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटल्यानुसार, नाभिक व्यावसायिकांना अत्याधुनिक स्वरुपाच्या व्यवसाय उभारणीसाठी २५ ते ५० लाखांपर्यंत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांनी सलून व्यावसायिकांसाठी गाळे राखीव ठेवावेत, नाभिक समाजाला आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी श्री संतसेना महाराज आर्थिक विकास महामंडळ गठीत करण्यात यावे.

मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा सरकारच्या धर्तीवर केशकला बोर्डाची स्थापना करण्यात यावी, शुरवीर जीवाजी महाले यांचे प्रतापगड परिसरात स्मारक उभारावे, सलूनचे दर कमी करण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुभाष बिडवई, अरुण सैंदाणे, संजय गायकवाड, केदारनाथ गायकवाड, अंबादास बोरसे, दीपक मगर, सुरेश बोरसे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी उद्योगाकडे युवकांनी वळावे’

0
0

कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारताची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगधंदे वाढीस लागणे काळाची गरज बनली आहे. ग्रामीण युवकांनी शेतीपूरक व्यवसायाच्या संधी शोधून स्वयंरोजगार उभारावा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अलीकडेच ग्रामीण युवकांसाठी १५ दिवसांचा 'रोपवाटिका व्यवस्थापन' या विषयावर निवासी प्रशिक्षण कार्यक्रम झाले. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, प्रशिक्षण संयोजक हेमराज राजपूत हे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन म्हणाले, की ग्रामीण युवकांनी आता नोकरी मागणारे न बनता नोकरी पुरविणारे अशी नवी ओळख निर्माण करावी. कृषी विज्ञान केंद्राने या व्यवसायांचे मॉडेल्स आपल्या प्रक्षेत्रावर उभारले आहेत. तसेच या व्यवसायासंबंधी कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षणेही केंद्र राबवीत असते. या संधीचा लाभ घेऊन ग्रामीण युवकांनी शास्रीय पद्धतीने शेती करून आपली नवीन ओळख निर्माण करावी. त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. प्रारंभी ग्रामीण युवकांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग व ग्रामीण व शेती विकासासाठी करावा आवाहन केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले.

प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील १८ युवकांनी सहभाग घेतला. यात फळे, भाजीपाला व शोभीवंत फुलझाडांची रोपे, कलमे, त्यांची निगा, देखभाल व विक्रीव्यवस्था यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक व डहाणू (कोसबाड) परिसरातील व्यावसायिक रोपवाटिकांना भेट आणि अभ्यासदौराही झाला होता. सहभागी युवकांनी या प्रशिक्षणातील ज्ञान व कौशल्याचा वापर भाजीपाला, शोभीवंत झाडे व फुलझाडांची रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास आपल्या मनोगतात व्यक्त केला. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व आवश्यक माहिती पुस्तिका केंद्रातर्फे देण्यात आली. या वेळी केंद्रातील कृषी विज्ञान केंद्राचे राजाराम पाटील, संदीप भागवत, डॉ. श्याम पाटील, अर्चना देशमुख, डॉ प्रकाश कदम, संतोष साबळे उपस्थित होते. हेमराज राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश व्यवहारे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’तील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेमध्ये कामचुकार व गैरप्रकार करणाऱ्यांवर बुधवारी झालेल्या कारवाईतून अधिकारी, शिक्षक व वाहनचालकांवर गंडातर आले. यात येवला येथील शाखा अभियंत्याला निलंबित तर इगतपुरी येथील वाहनचालकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. तर बागलाण तालुक्यातील दगडपाडा येथील शिक्षकांवर बालकांचा लैगिक अत्याचार कायद्यानुसार अटक झाल्याने त्यास निलंबित करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकरी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी आतापर्यंत १०० हून अधिक कारवाई केली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. डॉ. गिते यांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणात केलेल्या कारवाईत येवला येथील प्रकरणात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील दिनेश चौबे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कामचुकार करणे, टंचाईग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करून सरकारची दिशाभूल करण्याचा ठपका ठेवण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक गौतम वाघ यास सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. अनधिकृतपणे गैरहजर राहणे, अनुपस्थितीचा शेरा खोडून हजेरीपत्रकात खाडाखोड करणे व स्वाक्षरी करणे, रुग्णवाहिका चालविण्याचे टाळून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सुविधेपासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

शिक्षकाचे निलंबन

बागलाण तालुक्यातील दगडपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा शिक्षक सुनील शांताराम अहिरे (वय ४४) याच्यावर बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असल्याने व त्यास अटक झाल्याने निलंबित करण्यात आले आहे. फूस लावून अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असून गुन्हाही दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंम पाटीलचीजलतरण स्पर्धेसाठी निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुकेत (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंडरवॉटर जलतरण स्पर्धेत फिन स्विमिंग प्रकारात स्वयंम पाटील या नाशिकच्या जलतरणपटूची निवड झाली आहे. अंडर वॉटर असोसिएशन इंडियातर्फे ही निवड झाली आहे.

स्वयंम पाटील हा ११ वर्षीय खेळाडू डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असून, त्यावर मात करीत त्याने हे यश मिळवले आहे. या अगोदर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल यामध्ये त्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेश आग्रा येथे झालेल्या नॅशनल अंडरवॉटर फेडरेशन कप २०१८ या स्पर्धेत ५० मीटर अंडर वॉटर फिन स्विमिंग या प्रकारात १७ वर्षाआतील वयोगटात स्वयंम पाटीलने तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले होते. तसेच अंडर वॉटर हॉकी आणि अंडर वॉटर रग्बी या प्रकारात देखील त्यांने कौतुकास्पद कामगिरी केली होती. स्वयंम हा नाशिक महानगरपालिकेच्या जलतरणतलावावर मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक हरी सोनकांबळे, गोरव तेजाळे, माया जगताप, राजेंद्र निंबाळते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी त्याचा सत्कार करुन भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. स्वयंम राणेनगर येथील शेठ रामनाथ नारायणदास जाजू माध्यामिक विद्यालय या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकल स्पोर्ट

0
0

ज्युदो खेळाडूंचे यश

…नाशिक : भारतीय ज्युदो संघटना आणि हिमाचल प्रदेश ज्युदो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकेश सानप, इशान सोनवणे आणि इशिता सोनवणे यांनी कांस्यपदक पटकावले. तर वैष्णवी खलाणे, आकांक्षा शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत आपला सहभाग नोंदविला. या खेळाडूंना योगेश शिंदे, पवन कस्तुरे, तेजस पोतले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे नाशिक जिल्हा असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, रवींद्र मेतकर, माधव भट, स्वाती कणसे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबातील चौघांना जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्केस्ट्रासाठी वर्गणी दिली नाही, या कारणावरून घरावर दगडफेक करून संबंधित कुटुंबातील सदस्यांना मारहाण व एकाचा तलवारीने वार करून खून करणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. खटी यांनी बुधवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. देवळाली येथील रोकडोबावाडीत ९ मे २०१५ रोजी हा प्रकार घडली होता.

या घटनेत सलीम इब्राहिम शेख याचा खून करण्यात आला होता. शेख त्यांचे भाऊ अमजद व कुटुंबियांसह रोकडोबावाडीत राहावयास होता़ ८ मे २०१५ रोजी आरोपी जयद्रथ प्रल्हाद काकडे, गजानन प्रल्हाद काकडे, आकाश जयद्रथ काकडे, धनंजय जयद्रथ काकडे हे ऑर्केस्ट्राकरीता वर्गणी मागण्यासाठी शेख यांच्या घरी गेले होते. परंतु शेख कुटुंबियांनी वर्गणी देण्यास नकार दिला़. याबाबतचा राग मनात ठेऊन काकडे यांनी ९ मे २०१५ रोजी पहाटे शेख कुटुंबियांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे शेख कुटुंबीय घराबाहेर आले. आरोपींनी शेख कुटुंबियांना मारहाण सुरू केली. सलीम यांच्यावर तलवारीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अमजद शेख, त्यांच्या बहिणी व अन्य कुटुंबीय गंभीर जखमी झाले होते. अमजद यांनी याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील योगेश कापसे यांनी या खटल्यात ९ साक्षीदार तपासले़. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व वैद्यकीय पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले़ न्यायाधीश खटी यांनी आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कामगार वेतनापासून वंचित

0
0

रेल्वे ठेकेदारावर कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील ६५ सफाई कामगारांना २० दिवस उलटून गेल्यानंतरही ठेकेदाराकडून वेतन मिळू शकलेले नाही. तसेच आठ महिन्यांचे ६० टक्के वेतन कापून घेत ठेकेदार त्यांची कोंडी करीत आहे. या असह्य कोंडमाऱ्यामुळे ज्योती अशोक तायडे या महिला कामगाराने कास्टिंग सोड्याचे प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच कामावर असताना साप चावल्याने तरुण कामगाराला रुग्णालयात दाखल करावे लागले. या दोन्ही घटनांमुळे संतापलेल्या कामगारांनी ठेकेदावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

ज्योती तायडे ही नाशिकरोडच्या सुभाषरोड येथे राहते. पती नसलेल्या ज्योती हिला मुलगा व मुलगी आहे. रेल्वेस्टेशनवर फक्त सहा हजार वेतनावर ती सफाईचे काम करून घर चालवते. वेतनही वेळेत मिळत नसल्याने ती तणावात आहे. कर्ज काढून संसार सुरू होता. किराणा दुकानदारानेही उधारी बंद केली होती. त्यातच ठेकेदाराने वेतन दिले नाही. भुसावळचे वरिष्ठ अधिकारी स्टेशन परिसरात पाहणी करत असतानाच ज्योतीने कास्टिंग सोडा प्राशन केला. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांपासून लपवून ठेवल्याचा कामगारांचा आरोप आहे.

नाशिकरोड स्टेशनवर ६५ कंत्राटी सफाई कामगार आहेत. पहल स्वयंम सर्व्हिसेसने तीन वर्षांसाठी साडेपाच कोटीचा स्वच्छतेचा ठेका घेतला. कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार १४ हजार देण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. मात्र, ठेकेदार फक्त सहा हजार रुपये वेतन देतो. वेतनाची साठ टक्के रक्कम ठेकेदार गडप करीत आहे. सहा महिन्यांपासूनची वेतनाची पूर्ण रक्कम मिळावी, वेतन तातडीने द्यावे, ठेका रद्द करावा, ठेकेदारासह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, साप्ताहिक सुटी द्यावी आदी मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन केले आहे. रेल्वे अधिकारी ठेकेदाराच्या भ्रष्टाचाराकडे कानडोळा करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे.

मंगळसूत्र गहाण

तुटपुंजा का होईना, सहा हजार पगार मिळत होता, पण ठेकेदाराच्या भ्रष्टाचारामुळे २० दिवसांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले. मुलांच्या शाळेच्या फी भरता आलेल्या नाही. कुटुंबीयांच्या आजारपणासाठी पैसे नाहीत, किराणा दुकानदाराने उधारी बंद केली. ऐन गणपतीत कोंडमारा होत आहे. मंगळसूत्र गहाण ठेवून तीन हजार व्याजाने आणले. त्यानंतर कुटुंबीयांवर औषधोपचार केले, अशी हृदय पिळवटून टाकणारी प्रातिनिधिक तक्रार एका महिला सफाई कामगाराने केली आहे.

ठेकेदारावर होणार कारवाई

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील कंत्राटी सफाई कामगारांना पूर्ण वेतन दिल्याशिवाय ठेकेदाराला पेमेंट दिले जाणार नाही. त्याचे पेमेंट रेल्वेने रोखल्याची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी दिली. त्याला दोन आठवडे झाले तरी ठेकेदाराने वेतन दिलेले नाहीत. रेल ठेका मजदूर युनियनने आंदोलन केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना जाग आली. कामगार नेते आनंद गांगुर्डे, सचिव भारत पाटील, अध्यक्ष अनिल दराडे, उपाध्यक्ष मनोज नागरे आदींनी स्टेशनमास्तर आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्याशी चर्चा केली. ठेकेदाराच्या भ्रष्टाचाराची भुसावळचे अधिकारी येऊन चौकशी करतील. अहवाल आल्यानंतर ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन कुठार यांनी दिल्याचे भारत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित-कृषकांसाठी मुक्त विद्यापीठ वरदानच

0
0

मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समाजातील वंचित आणि गरजूंपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वरदान आहे. नोकरदार, व्यावसायिकांपासून ते कामगार, शेतकरी, शेतमजुरांपर्यंत प्रत्येकासाठी येथे खुली असलेली शिक्षणाची कवाडे ही आधुनिक विचारांच्या महाराष्ट्राची खरी संपदा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि 'नाम'चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.

मुक्त विद्यापीठाला मकरंद अनासपुरे यांनी अनौपचारिक भेट देत शेतकरी तसेच वंचितांसाठी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्ञानदानाच्या कार्याबाबत माहिती घेतली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई वायूनंदन यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या कार्यबाबत माहिती देऊन 'नाम'च्या कार्याबाबत माहिती घेतली. 'नाम'च्या माध्यमातून विश्वासाने जोडला गेलेला शेतकरी, शेतमजूर सशक्त करायचा असेल, तर त्यास शेती तथा कौशल्य विकासाचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे अनासपुरे यावेळी म्हणाले.

विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन गरजू शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची अनासपुरे यांनी माहिती घेतली. या विद्यापीठाच्या उपक्रमांशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातला माणूस जोडण्याची गरज आहे. शिक्षणासोबत जगण्याचे साधन देऊ पाहणारे मुक्त विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्वच निभावत असल्याचेही अनासपुरे म्हणाले. विविध विद्या शाखांची माहिती देऊन कौशल्य विकास अभ्यासक्रमांवरही विद्यापीठाचा भर असल्याचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण संयोजक डॉ. रावसाहेब पाटील, नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महापौर आपल्या दारी’ने ‘वॉक विथ’ ला उत्तर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर'ला उत्तर म्हणून 'महापौर आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात आपण स्वत: आयुक्तांना सोबत घेऊन दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

गरज, तांत्रिक व्यवहार्यता व निधीची तरतूद या त्रिसूत्रीनुसार मुंढे यांनी काम सुरू करीत, नगरसेवकांच्या अतिरिक्त विषयांना फाटा दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पालिकेत नगरसेवक फिरकत नसल्याची खंत व्यक्त करीत, आयुक्तांविरोधात सर्वपक्षीय एकजूट दर्शविली. त्यातच आयुक्तांनी नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करीत, 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे नगरसेवकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. पावसाळ्यात हा उपक्रम बंद झाल्यानंतर शनिवारपासून तो नव्याने सुरू होणार असतानाच, बुधवारच्या महासभेत भानसी यांनी दुर्गावतार धारण केला. तब्बल पाच तास जोरदार गरमागरमी झाल्यानंतर भानसी यांनी 'यापुढे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये आपण स्वतः आयुक्तांना सोबत घेऊन दौरा करणार आहोत' अशी घोषणा केली. अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नगरसेवक आणि नागरिकांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेणार असून, त्याची सुरुवात नाशिकरोडपासून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निधीची अडचण सांगणाऱ्या मुंढेंनाही खडे बोल सुनावत वीस वर्षांत आपण अनेक बजेट बघितली आहेत. स्पिलओव्हर अर्थातच दायित्वाचा विचार न करता यापुढे जेथे गरज आहे, तेथे रस्त्यांची कामे करणारच असे त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. नवीन कामांचे प्रस्ताव पुढच्या महासभेत ठेवण्याचे आदेश देत, असे केले नाही तर थेट अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अधिकाऱ्यांची होणार धावपळ

अधिकाऱ्यांना एकाच वेळी आयुक्तांच्या बैठका, 'वॉक विथ कमिशनर' सोबतच पालिकेचीही कामे करावी लागणार असून, दुसरीकडे महापौरांच्या या उपक्रमालाही हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे या नव्या वादाची भर पालिकेत पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांच्या ऊर्जेतून लिहिते राहिले पाहिजे

0
0

डॉ. विष्णू खरे यांच्या निधनाने साहित्य वर्तुळावर शोककळा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील ज्येष्ठ कवी, पत्रकार डॉ. विष्णू खरे यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. कवी डॉ. खरे यांचे कुसुमाग्रजांमुळे नाशिकशी दृढ संबंध होते. पुस्तके ऊर्जा देतात, या ऊर्जेतून लिहिते राहिले पाहिजे, असे त्यांनी मांडलेले विचार नाशिककरांच्या अजूनही स्मरणात आहेत.

डॉ. खरे हे २०११ तसेच २०१६ मध्ये नाशिकला आले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार डॉ. चंद्रकांत देवताले यांना प्रदान करण्यासाठी २०११ मध्ये तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी २०१६ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते नाशिकला आले होते. त्यावर्षी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केलेले भाषण प्रचंड गाजले होते. सरकारी अधिकाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली होती.

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार स्वीकारताना, बदलत्या काळात अन्य राज्यांची संस्कृती लोप पावत असल्याने आता देशपातळीवर संस्कृती रक्षणासाठी महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने केंद्रीय नेतृत्व स्वीकारण्याची गरज आहे. साहित्यिकांची साहित्यिकता सामाजिक नसेल तर तिचा समाजाला काही एक उपयोग नाही, असे मत डॉ. खरे यांनी व्यक्त केले होते. यावेळी खरे यांनी प्रशासकीय आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांच्या कार्यशैलीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले. सध्याच्या काळात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे संस्कृती, कला, भाषा, संगीत, साहित्य आणि परंपरा टिकून असल्याचे त्यांनी नमूद केले होते. ते नाशिककरांच्या अद्याप स्मरणात आहे.

'सावाना'च्या शतकोत्तरी अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त २४ जुलै २०१६ रोजी डॉ. खरे यांचे काव्यवाचन झाले होते. 'विश्वकवितेत भारतीय कविता मला कोठेच दिसत नाही कारण भारतीय कविता व्यापक नाही, तिला विषयांची बंधने आहेत. विज्ञानासारखा महत्त्वाचा विषय तिच्यात कोठेच डोकावताना दिसत नाही,' असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले होते. या कार्यक्रमात खरे यांनी वृंदावन की विधवाएँ, बेटी, कोशिश, डरो, प्रतिरोध अशा काही गाजलेल्या कविता सादर केल्या होत्या.

वाचनालय माझे मक्का-मदिना

'सावाना'च्या २५ जुलै २०१६ रोजी झालेल्या सोहळ्यात त्यांनी 'मी आणि माझी वाचनालये' या विषयावर छोटेखानी मनोगत व्यक्त केले होते. वाचनालय हे माझे मक्का मदिना आहे, माझे व्यक्तित्त्व संपूर्णपणे महाभारतावर आधारित आहे. मला छिंदवाडाच्या वाचनालयाने मोठे केले. पुस्तके तुम्हाला प्रेरित करतात. पुस्तके ऊर्जा देतात, ती ऊर्जा ओळखून तुम्ही लिहित गेले पाहिजे असे ते म्हणाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून मध्यरात्रीपर्यंत धामधूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी (दि. २१, २२, २३) गणेशोत्सवाची धामधूम मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांना दिलासा मिळाला असून, रात्री उशिरापर्यंत नागरिकांना देखावे पाहता येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत नाशिककर देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. सर्व गणेशभक्तांना शहरातील मंडळांनी साकारलेले देखावे पाहता यावेत, यासाठी शुक्रवारी व शनिवारी गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रविवारी अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठीदेखील रात्री बारा वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. शेवटच्या तीन दिवसांत आता गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढणार आहे. उपनगरातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेवटचे तीन दिवस मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे गावठाणातील गणेश मंडळे रात्री बारा वाजेपर्यंत देखावे खुले ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे गणेशोत्सवाची धामधूम कमी झाली होती. उद्यापासून रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या भक्तीत तल्लीन होता येणार असल्याने प्रत्येकात उत्साह संचारला आहे. शनिवारी शेवटचा दिवस असल्याने देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी या परिसरातील रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बसेस व जड वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. त्याऐवजी पर्यायी मार्गावरील रस्त्यांचा वापर वाहनचालकांनी करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुटीमुळे आज गर्दीची शक्यता

आज, गुरुवारी मोहरमची सुटी असल्याने गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने भक्तांमध्ये देखावे पाहण्याची उत्कंठा निर्माण झाल्याचे दिसते. आज, सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्यास गावठाणातील महत्वाच्या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. शनिवारी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी गणेश मंडळांनी आणि पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूमाफिया अद्याप मोकाटच

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना शिवीगाळ करून धमकावणारा वाळूमाफिया तुषार सानप (रा. कऱ्हे, ता. सिन्नर) याच्या मुसक्या आवळण्यात नाशिकरोड पोलिसांना चौथ्या दिवशीही अपयश आले आहे.

तहसीलदार आवळकंठे यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या सानप या वाळूमाफियावर रविवारी (दि. १६) कारवाई केली होती. यावेळी सानपने आवळकंठे यांना धमकावले होते. यानंतर आवळकंठे यांनी नाशिकरोड पोलिसात रविवारी रात्री उशिरा वाळू तस्कर सानप याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या घटनेला चार दिवस उलटले तरी नाशिकरोड पोलिसांना सानप याचा शोध घेण्यात यश मिळालेले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपर्वाईला दणका

0
0

बेरोजगार भत्त्यापोटी ग्रामसेवकाकडून मजुरांना एक लाख रुपये देण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागणी करूनही मजुराला रोजगार हमी योजनेंतर्गत १५ दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून न दिल्याची बेपर्वाई वृत्ती एका ग्रामसेवकाच्या चांगलीच अंगलट आली आहे. ३४ मजुरांचा बुडीत बेरोजगार भत्ता अदा करण्यासाठी त्याच्याकडून एक लाख रुपये वसूल करण्याचे आदेश 'मनरेगा'च्या सह गट कार्यक्रम अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर होऊ नये, मोलमजुरी करणाऱ्यांना त्यांच्या घराजवळच रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने अनेक वर्षे रोजगार हमी योजना कार्यान्वित आहे. या योजनेत नोंदणीकृत मजुरांनी मागणी केल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत गावात किंवा गावाजवळील पाच किलोमीटरच्या परिसरात रोजगार उपलब्ध करून देणे ही संबंधित ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. परंतु, पेठ तालुक्यातील पिंपळवटी ग्रामपंचायत क्षेत्रातील ३४ मजुरांनी ग्रामसेवक डी. के. पाचोरे यांच्याकडे कामाची मागणी केली होती. परंतु, १५ दिवसांच्या आत त्यांनी काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये त्यांनी यंत्रणेकडे तक्रार अर्ज केला. लक्ष्मीकांत जाधव यांनी १६ मे रोजी आपले सरकार पोर्टलवर याबाबतची तक्रार दाखल केली. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाचोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, समाधानकारक खुलासा झाला नाही. मजुरांनी कामाची मागणी करूनही कुठलीही कार्यवाही न करता पाचोरे यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरविण्यात आला असून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित मजूरांना देय असलेली बेरोजगार भत्ता रक्कम एक लाख ३ हजार ४३९ रुपये तात्काळ पेठ पंचायत समितीच्या अर्थ विभागाकडे भरावेत असे आदेश पाचोरे यांना देण्यात आले आहेत. त्यांनी ही रक्कम अदा न केल्यास त्यांच्या पगारातून हे पैसे कापून घेतले जातील असा इशारा रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे.

कामाची मागणी २६ जानेवारी २०१८ रोजी केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली गेलीच नाही. म्हणून आम्ही नियमानुसार मे २०१८ मध्ये बेरोजगार भत्याची मागणी केली. त्यानंतरही यंत्रणेने दखल घेतली नाही. म्हणून आपले सरकार पोर्टलची मदत घेऊन प्रशासनातील वरिष्ठांपर्यंत तक्रार पोहोचवली. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकावर प्रशासनाने कारवाई केली आहे.

- लक्ष्मीकांत जाधव, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसीलदारासह चौघांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहिण असल्याचा दावा करीत एका महिलेने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारसा हक्काचा बनावट दस्तऐवज तयार करून एका वृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एक तहसीलदार, रेकॉर्ड अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुक्ताबाई एकनाथ मोटकरी, भूषण भीमराज मोटकरी (दोन्ही रा. मोटकरी वाडी) यांच्यासह तहसीलदार गणेश राठोड अशी संशयितांची नावे आहेत. रमेश बाळू मंडलिक (वय ६७, रा. मंडलिक मळा, आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित मुक्ताबाई व भूषण मोटकरी यांनी संगनमत करून २०१४ आणि १५ या कालावधीमध्ये मुक्ताबाई या रमेश मंडलीक यांची बहीण असल्याचा दावा केला. मंडलिक यांच्या मिळकतीमध्ये वारसा हक्क प्रस्थापित करण्यासाठी दोघांनी तहसीलदार राठोड व तत्कालीन रेकॉर्ड अधिकाऱ्याला हाताशी धरल्याचे आनंदवली शिवारातील शेतजमिनीचा खोटा दस्तऐवज तयार केला. या बनावट दस्तऐवजामार्फत वारसा हक्क प्रस्थापित करून मंडलिक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे वारसा हक्क लावल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न

नााशिक : रद्द विसारपावतीचा गैरवापर करून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच चहामध्ये गुंगीचे औषध देऊन बनावट साठेखत करारनामा करून फसवणूक केल्याचा प्रकार सिडकोमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांवर फसवणुकीसह अॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवीणचंद दत्ताराम देठे (वय ४९, रा. पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यकांत सुधाकर सोनवणे (रा. पेठरोड), संदीप चांगदेव बेंडाळे (रा. उपनगर), हेमंत यशवंत गायकवाड, मयूर साहेबराव ताजणे, प्रवीण गायकवाड आणि प्रशांत शेवाळे (सर्व रा. खांडे मळा, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. डिसेंबर २०१५ ते १० सप्टेंबर २०१८ या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला. प्रवीणचंद यांचा प्लॉट बळकावण्यासाठी संशयितांनी रद्द झालेल्या विसारपावतीची मदत घेतली. त्यांना चहामधून गुंगीचे औषध देऊन सिडकोच्या घराऐवजी प्लॉटचे साठेखत तयार केले. प्लॉटवर उत्कर्ष बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचा फलक लावून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केला. प्रवीणचंद यांनी फलक काढण्याचा प्रयत्न केला असता संशयितांपैकी काहींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. सहायक पोलिस आयुक्त आडके तपास करीत आहेत.

.............

चोरी प्रकरणी तिघांना अटक

पादचारी व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मोबाइल हिसकावून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. श्रावण उर्फ चिना पूंजा मोंढे (वय २१), आकाश उर्फ सोनू शालिक भालेराव (१८) आणि शुभम देवराम निंबाळकर (तिघे रा. आनंदवली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बालाजी सोपानराव कांबळे (वय ३४, रा. पाइपलाइन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ते मंगळवारी (दि. १८) रात्री बारा वाजेच्या सुमारास घराकडे पायी जात होते. त्यावेळी तिघा संशयितांनी बालाजी यांना अडविले. त्यांच्याकडील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. बालाजी यांनी विरोध केल्याने संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीच पूड टाकली तसेच त्यांना मारहाणही केली. यात बालाजी जखमी झाले. त्यांना तेथेच सोडून संशयित पळून चालले होते. बालाजी यांनी पोलिसांना सांगितलेल्या वर्णनानुसार संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना शुक्रवारपर्यंत (दि.२१) पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंगावर कचरा टाकून १४ हजार लांबविले

अंगावर खाज येईल, असा कचरा टाकत संबंधित व्यक्तीचे लक्ष विचलित करून चोरट्याने रोकड लांबविली. भद्रकालीतील ठाकरे रोडवर मंगळवारी (दि. १८( रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज दौलत तेली (वय ३६, रा. गुलमोहर कॉलनी) यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते दुकान बंद करून घराकडे चालले असताना संशयिताने खाज येईल अशी घाण त्यांच्या अंगावर टाकून लक्ष विचलित केले. त्यांच्याकडील १४ हजार रुपयांची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे लांबविले.

सहा जुगारींवर गुन्हा

गंगापूर रोडवरील मोतीवाला कॉलेजसमोरील इमारतीच्या मागील परिसरात रात्री पथदीपांच्या उजेडात जुगार खेळणाऱ्या सहा संशयितांवर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून १७०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

..

'ओटीपी'ची मागणी करून फसवणूक

डेबिट कार्ड सुरू करून देतो असे सांगत एका संशयिताने युवकाच्या बँक खात्यामधून परस्पर दोन लाख रुपये काढल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हनुमान राममोहन विश्‍वकर्मा (वय ३२ , रा. बीडी कामगारनगर) यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. विश्‍वकर्मा यांना २१ जुलै रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान अज्ञात संशयिताने फोन केले. बँकेतून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. तुमचे बंद डेबिट कार्ड सुरू करून देतो, असे सांगत संशयिताने विश्‍वकर्मा यांच्याकडे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मागितला. विश्‍वकर्मा यांनी त्याला 'ओटीपी'ची माहिती दिली. त्यामुळे संशयिताने दोन लाख ८ हजार ७४६ रुपये परस्पर विश्‍वकर्मा यांच्या खात्यातून काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॅपटॉप, मोबाइल लांबविला

अमृतधाम येथील कालिका विहार परिसरात घरफोडी करून चोरट्याने ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. अमोल छबू बोडके (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्याने लॅपटॉप आणि दोन मोबाइल लांबविल्याची फिर्याद आडगाव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ लोकप्रतिनिधींना दिलासा

0
0

\B

जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत पूर्वलक्षी प्रभावाने लाभ

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव गटातून निवडून येऊनही मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक उमेदवारांचे पद शाबूत राहणार आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा फायदा पूर्वलक्षी प्रभावाने एप्रिल २०१५ पासून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मिळणार असल्याने जिल्ह्यातील ३०४९ लोकप्रतिनिधींवरील टांगती तलवार दूर होईल, असे संकेत जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत.

ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मैदान मारूनही जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीत सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३०४९ लोकप्रतिनिधींचे पद धोक्यात आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून नगरपालिकांमधील नगरसेवक आणि नगराध्यक्षांचाही समावेश होता. पद वाचविण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु याबाबतच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे ही पदे रद्द होण्याची शक्यता बळावल्याने लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांसह नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील १७ नगरसेवकांचाही समावेश होता. याखेरीज पंचायत समितीच्या दहा तर ग्रामपंचायतींच्या ३०१९ सदस्यांनाही या आदेशामुळे आपले पद गमवावे लागणार होते. परंतु, अपात्रतेची टांगती तलवार दूर झाल्याचे संकेत मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे मिळू लागले आहेत.

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता सहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. याकरीता काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून, लवकरच या निर्णयाचा अध्यादेश निघेल, असे मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मंत्रीमंडळाचा हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच ७ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या जिल्ह्यातील ३०४९ लोकप्रतिनिधींना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यांनी लवकरात लवकर ही प्रमाणपत्र सादर करावीत.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूररोडला लागून आनंदवली गावाच्या शिवारात संतकबीरनगरला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने बुधवारी हटविली. तसेच कॅनॉलवरील पत्र्यांच्या शेडचेही हटविण्यात आली.

शासकीय भूखंडांवर वसलेल्या संतकबीरनगर झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत. तसेच गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावरही पत्र्यांचे शेड उभारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संतकबीरनगर भागात बुधवारी कारवाई केली. कॅनॉलवरील पत्र्यांचे शेड हटविण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी अडथळा आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने रस्त्यात अडथळा ठरणारी सर्वच अतिक्रमणे हटविली. मोहिमेत महापालिकेच्या सातपूर विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेने संतकबीरनगर येथील मुख्य रस्त्यांवर येणारे शेड व कॅनॉलवरील अतिक्रमण काढले. तब्बल २३ किलोमीटरवरील कॅनॉलरोडवरील सर्वच अतिक्रमणे महापालिकेने हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या मध्य भागातून गेलेल्या कॅनॉलरोडवर बेसुमारे अतिक्रमणे वाढली आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनीच पाहणी करून कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या सरींनी दिलासा

0
0

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने मंगळवार पाठोपाठ बुधवारीही शहरात हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाची नोंद झाली. तर राज्यात नाशिकसह जळगाव, नगर आणि पुण्यातही पावसाने उपस्थिती लावली. अद्यापही जिल्ह्याला चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

वातावरणात बुधवारी सकाळपासूनच उष्मा वाढला होता. शहरात कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसवर होता. पावसाने बुधवारी दुपारनंतर शहरात काहीवेळ जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात देवळा, त्र्यंबकेश्वर, मनमाड आदी भागात पावसाने हजेरी लावली. शहर व जिल्ह्यात झालेल्या पावसाची सरासरी १५.७ मिमी इतकी नोंद करण्यात आली. देवळा तालुक्यात पावसाने चांगली उपस्थिती दिली आहे. देवळ्यात ३४.६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली. सिन्नर तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र सायंकाळपर्यंत तेथे पावसाच्या सरी कोसळ्याच नाही. शहरात सलग दुसऱ्या दिवशीही झालेल्या पावसाच्या परिणामी गणेशोत्सवाचे देखावे बघणाऱ्यांच्या गर्दीवरही परिणाम झालेला दिसून आला. जिल्ह्याला परतीच्या पावसाची ओढ लागली आहे. खरिपाची पिके संकटात आली असून परतीच्या पावसासाठी वरुणराजाची आळवणी शेतकरी करताहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरा दिवसही पावसाचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवाचे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्याची ओढ गणेश भक्तांना लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुपारी पावसाच्या धारा कोसळत आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता येत नाही. बुधवारी दुपारी शहरात पावसाच्या सरी कोसळ्याने सायंकाळी गणेशोत्सवावर त्याचा परिणाम जाणवला. शहरातील गणेश मंडळांत बुधवारीदेखील गणेशोत्सवाची धामधूम कमीच होती.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांवर देखावे साकारले आहेत. शहरातील बी. डी. कामगार, शालिमार, मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी या भागातील पारंपरिक गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करतात. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी हवी तशी दिसत नसल्याचे मंडळांचे कार्यकर्ते सांगतात. दोन दिवसांपासून शहरात दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे भक्तांचा हिरमोड होत आहे. रविवारी सुटी असूनही अनेकांच्या घरी महालक्ष्मी असल्याने भक्तांना देखावे पाहण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे इतर दिवशी सवडीप्रमाणे देखावे पाहण्यासाठी जाण्याचा प्लॅन अनेकांनी आखला होता. पण, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने गणेश भक्त देखावे बघायला जाणे टाळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेले देखावे भक्तांच्या गर्दी अभावी ओस पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

मंडळांच्या उत्साहावर विरजण

ऐन गणेशोत्सवात पावसाच्या सरी कोसळत असल्याने मंडळांचा उत्साहदेखील कमी झाला आहे. पावसामुळे अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे बाप्पांच्या मंडपातील रोषणाई आणि परिसरातील गणेशोत्सवावर पावसाचे सावट दिसते. बुधवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने कॉलेजरोड, शालिमार, सातपूर, सिडको, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, पंचवटी, पेठरोड परिसरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी काही भक्तांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images