Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विनायक शिंदे यांची निवड

$
0
0

निफाड : निफाड येथील विनायक चिमणाजी शिंदे यांची नाशिक जिल्हा काँग्रेसच्या सरचिटनिसपदी निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर माणिकराव बोरस्ते, प्रकाश अडसरे, मधुकर शेलार, सुनील निकाळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संवादतर्फे गझल मुशायरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गझल पन्नास वर्षांपूर्वी गुजरातमध्ये आली. महाराष्ट्रात आल्यानंतर या काव्यप्रकाराने कवींवर गारूड केले. एकाच वृत्तातील रदीब, काफिया आणि पाच किंवा दोन ओळींचे काव्य म्हणजे गझल. गझल हे काव्य कधीही कालबाह्य होत नाही, असे प्रतिपादन संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले.

संवादतर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील स्वगत हॉलमध्ये मराठी गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सूर्यवंशी बोलत होते. या मुशायऱ्यामध्ये संतोष वाटपाडे, अनिता बोडके, संजय गोरडे, आकाश कंकाळ, श्रीकांत चावरे, विनोद राठोड आदी सहभागी झाले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संजय करंजकर, भाऊसाहेब मोरे, नानासाहेब बोरस्ते, किरण पिंगळे या मान्यवरांच्या हस्ते गझलकारांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पाच हजार गावांमधील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषिक्षेत्रात कौशल्य विकासाची आवश्यकता असून, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल. त्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांची मदत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी 'सह्याद्री'चे शिंदे यांनी कंपनीच्या कार्याविषयी माहिती दिली. अमोल बिरारी यांनी 'भविष्यातील महाराष्ट्र' या विषयावर सादरीकरण केले.

स्वतंत्र बाजारपेठेचा दर्जा देणार

शेतकऱ्यांच्या मालाची बाजार समित्यांमध्ये अडवणूक केली जाते. त्यांच्यावर विविध सेस लावले जातात. त्यामुळे आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्वतंत्र बाजारपेठेचा दर्जा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देताना शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

ग्रामीण पोलिसांचा उद्दामपणा

मुख्यमंत्र्यांच्या ओझर आणि सह्याद्री फार्म हाऊसवरील दौऱ्याप्रसंगी ग्रामीण पोलिसांनी माध्यमांशी अरेरावी करीत उद्दामपणा दाखवला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे कारण देत माध्यमांनाच वार्तांकनापासून रोखण्याचा प्रताप पोलिसांनी केला. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली माध्यमांना अडवणाऱ्या पोलिसांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. सुरक्षेचा बाऊ करीत पोलिसांनी चक्क माध्यमांच्या प्रतिनिधींचेही चित्रीकरण करण्याचा भीमपराक्रम केला. ग्रामीण पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांचे वृत्तांकन होऊ नये, यासाठी मुद्दामपणे माध्यमांना अडवणुकीची भूमिका स्वीकारली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी संशय व्यक्त केला. यामुळे कार्यक्रमावरच माध्यमांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडेच तक्रारी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांची कानउघडणी केली. ग्रामीण पोलिस प्रमुखांच्या तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेत यापुढे असे प्रकार होऊ नये, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंतांवर मोठी जबाबदारी

$
0
0

संमेलनाध्यक्ष हर्षल पाटील यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

खान्देशातील सांस्कृतिक चित्र हे गेल्या काही वर्षांत बदलले असून, गावोगावी नाटक करू पाहणारे तरुण मित्र पुढे येऊ लागले आहेत. दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम करण्याची जिद्द राहिली नसल्याने आपल्यावर कलावंत म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे, असे मत संमेलनाध्यक्ष हर्षल पाटील यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (दि. २९) अमळनेरला आयोजित युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या अख्यक्षस्थानावरून बोलत होते.

कलावंत हा सदैव समस्यांनी ग्रासलेला असतो. माझी नाळ या मातिशी जुळली हा विचार कलावंतांच्या मनात राहायला हवा. आपण जगावेगळे आहोत पण जगापासून वेगळे नाहीत, याचीही जाणीव ठेवावी, असे परखड मत पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर येथे दोन दिवसीय युवा नाट्य साहित्य संमेलनाचे शनिवारी (दि. २९) पूज्य साने गुरूजी नाट्यनगरी येथे संमेलन आयोजित केले होते. सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, सिने अभिनेत्री वीणा जामकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, ‘मसाप’ पुणेच्या कोषाध्यक्ष सुनितराजे पवार, प्राचार्य तानसेन जगताप, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष डिगंबर महाले, भाऊसाहेब देशमुख, शरद सोनवणे यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले तर नरेंद्र निकुंभ यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात ‘खान्देशच्या रंगभूमीची सद्यस्थिती व भविष्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी अध्यक्ष म्हणून चिंतामण पाटील होते. यामध्ये नागसेन पेंढारकर, ज्ञानेश शेंडे, किरण सोनार, राजेन्द्र देशमुख आदींनी सहभाग घेतला.

संघर्षातूनच चित्रपटनिर्मिती
जीवनाच्या संघर्षातून माझी चित्रपटाची निर्मिती साकारली गेली. सिनेमांच्या निर्मितीसाठी केलेले काम माझ्या जगण्याचा भाग आहे, असे स्पष्ट मत शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. जे शिकलो ते अनुभवातून व्यक्त करीत मोठा झालो. असा जीवन संघर्षाचा प्रवास मांडताना ‘मराठी चित्रपटनिर्मिती स्वतःसाठी करायची की लोकांसाठी’ या प्रश्नात उत्तर लोकांसाठी याबाबत स्पष्टता असणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे विचार मराठी चित्रपट दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.

आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्की
मुलींना अभिनेत्री करण्यासाठी पालक धास्तावलेले असतात. चित्रपट क्षेत्रात आज नवोदितांच्या संघर्षाच्या काळात कास्टिंग काऊचच्या निमित्ताने होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनेक चर्चा पालकांच्या कानावर पडलेल्या असतात. अशावेळी पालक, समाज, परिसर व चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी मिळून मुलींवर धीटपणाचे, धाडसाचे संस्कार करून तिला या ही क्षेत्रात पुढे पाठवायला हवे, असे आवाहन अभिनेत्री वीणा जामकर यांनी केले. या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्नांच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्कीच मिळते, असेही वीणा जामकर यांनी सांगितले. दोन्ही मुलाखत प्रा. विनय जोशी यांनी घेतल्या. शेवटच्या सत्रात ‘जून जुलै’ (जळगाव), रावीपार (अमळनेर), ‘ती सात वर्ष मतिमंद माणूसकी’ (धुळे) या एकांकिका सादर करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार अनिल गोटे यांचा ‘चले जाव’ चा नारा

$
0
0

मंत्री गिरीश महाजनांच्या नियुक्तीने भाजपमध्ये वाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नियुक्ती झाल्याचे शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अधिकृत पत्र प्राप्त झाले. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली.

शहरात अगोदरच भाजपचे दोन गट असून, त्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यात सुरुवातीपासूनच वाद होते. त्यात आता प्रभारीपदी मंत्री महाजन यांची नियुक्ती झाल्याने ठिणगी पडल्याने कोणाला उमेदवारी मिळेल, याकडे लक्ष लागून आहे.

महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये या सर्व घटनाक्रमाने आजही संभ्रम कायम असून, नेमके कोणत्या गटाकडे उमेदवारी पक्की होईल हे ठरलेले नाही. तर दुसरीकडे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार मनपासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात येईल आणि त्यात निवडणूक प्रभारी, जिल्ह्यातील मंत्री, विद्यमान आमदार, जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ संघटक, सरचिटणीस यांच्यासह अन्य जणांच्या संमतीने उमेदवार निश्चित केले जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मात्र, आमदार अनिल गोटे यांनी या सर्व प्रकाराला विरोध करीत मनपा निवडणूक प्रभारी जलसंपदा मंत्री यांना ‘चले जाव’चा नारा दिला आहे. ‘धुळ्यात याल तर याद राखा, सुरेश जैनांप्रमाणे पार्सल माघारी पाठवू’ असे खडेबोलही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सुनावले आहे. त्यामुळे आता धुळे मनपा निवडणूकीत कोणता नवीन वाद उदयास येईल याकडे शहरवासींयाचे लक्ष लागले आहे. महापालिकेसाठी योग्य उमेदवार देऊन मनपात भाजपची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाहीत. कोणत्याही नेत्या किंवा पदाधिकाऱ्यास डावलण्यात येणार नाही, असेही अग्रवाल म्हणाले. मात्र, तरीदेखील आता आमदार गोटे कोणती नवीन खेळी खेळतात आणि खरंच मंत्री महाजनांना शहरात येऊ देणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेकरांनी अनुभवले ‘युद्ध’

$
0
0

सैन्यदलाच्या प्रात्यक्षिकास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शत्रूशी सामना करताना भारतीय जवानांचा पराक्रम ‘आगे बढो’ या सैन्यदलाच्या प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांतून शनिवारी धुळे शहरवासीयांना पाहण्यास मिळाले. युद्धासाठी होणारी धावपळ, सैनिकांचा गोळीबार, बॉम्बफेक, कव्हरिंग रायफलने फायरिंग, अत्याधुनिक युद्धसामग्री आणि लष्कराचा मोठा फौजफाटा हा युद्धभूमीवर सजीव देखावाच शनिवारी धुळ्यात अवतल्याने शहरातील एसआरपीएफ मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रदर्शनाचा शुभारंभ शनिवारी सकाळी मंत्री डॉ.भामरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी शहरातील विविध शाळामधील सुमारे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते. या प्रदर्शनात सैनिकांना बचावासाठी छावणी, हेलिकॉफटर मधून दोराच्या साहायाने उतरणारे सैनिक, बॉम्बसूट घालून युद्धभूमीवर स्फोटकांचा शोध घेणारे जवान, अश्रूधुरांचे नळकांडे फोडणे, रायफली, तोफा यासह विविध आकर्षक शस्त्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तर आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शस्त्र प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांमुळे महिला जखमी

$
0
0

पर्स ओढण्याच्या प्रयत्नातून अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेच्या खांद्यास असलेली पर्स ओढून दोघा चोरट्यांनी दुचाकीवर धूम ठोकली. जोरात पर्सला हिसका देणाऱ्या चोरट्यांनी महिलेला ढकल्याने महिला खाली पडून जखमी झाली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीच्या घटनेप्रकरणी सुचिता बळीराम उमरजीकर (५७, रा. सावरकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. उमरजीकर यांच्या फिर्यादीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. २५) सांयकाळच्या सुमारास घडली. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उमरजीकर आकाशवाणी भाजीमार्केट येथून माणिकनगरच्या दिशेने जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी सुचिता यांच्या खांद्यावर असलेली पर्स हिसकावली. उमरजीकर यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना जोराचा हिसका मारून धूम ठोकली. यामुळे खाली पडलेल्या उमरजीकर यांच्या खांद्यास मोठी दुखापत झाली. जखमी उमरजीकर यांना लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वाघ करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी पौर्णिमा बस स्टॉप परिसरातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर चोरट्यांनी बॅग पळविण्याच्या नादात एका महिलेस दुचाकीवरून खाली पाडले होते. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गंगापूर पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येते आहे.

महिलेचे दागिने लंपास

ऋषिपंचमीनिमित्त गंगाघाटावर पूजा करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लंपास केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी बेबीताई पांडुरंग पाचवे (रा. पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी अज्ञात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. ऋषिपंचमीच्या दिवशी पाचवे या गंगाघाटावरील गोमुख येथे पूजा करीत होत्या. या दिवशी गर्दी होती. याचा फायदा घेत चोरट्या महिलेने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची पोत लंपास केली. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार शेख करीत आहेत.

घरातून दागिन्यांची चोरी

लोटलेला दरवाजा ढकलून घरात घुसलेल्या चोरट्याने २० हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना पंचवटीतील कलानगर परिसरात घडली. या प्रकरणी मोहित विकास दिंडे (३४, रा. कलानगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २५) घडली. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार डी. एम. वनवे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणीबाणीपेक्षाही आज भयानक परिस्थिती

$
0
0

आमदार भाई जयंत पाटील यांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या देशात आज वाईट परिस्थिती आहे, देशाचा इतिहासच पुसून टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तरुणाईला कोणत्या दिशेने जायचे हेच कळत नाही. आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात भाताच्या भावासाठी लढा देणारे कॉ. पुंजाबाबा गोवर्धने यांचे सुमन गोवर्धने लिखित जीवनचरित्र 'लढवय्या' या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 'मविप्र'चे कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, आमदार निर्मला गावित, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील, लेखिका सुमन गोवर्धने यांची उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, की अभ्यासक्रमात इतर अनेक गोष्टी घुसविण्यात येत आहेत. मूळ इतिहास मात्र पुसून टाकण्याचा विडा सत्ताधारी पक्षाने उचलला आहे. पुढे अत्यंत वाईट दिवस येणार आहेत; परंतु आपला विचार पक्का असेल तर काळ कितीही कठीण आला तरी त्याची फिकीर नाही. चळवळी बंद होत चालल्या आहेत. विचारांची बंधने कुणीच पाळायला तयार नाही. नव्या पिढीला प्रामाणिक माणसे कळायला हवी असेल तर लढवय्यासारखी पुस्तके लिहिली गेली पाहिजे.

डॉ. कानगो म्हणाले, की तळागाळातील लोकांशी बांधिलकी आहे तोपर्यंत शेकाप व कम्युनिस्ट एकत्र आहेत याचा विश्वास ठेवावा. या दोन्ही पक्षांच्या मूळाशी एकच विचार असल्याने समविचारी म्हणून आम्ही एकत्र आहोत. 'लढवय्या' हे पुस्तक म्हणजे सुनेने सासऱ्याला केलेला सलाम आहे. पाचवी शिकलेली सून त्यांच्या घरात येते पुढे एम. ए. बी. एड.पर्यंत तिचे शिक्षण पुंजाबाबा करतात यासाठी हा सलाम आहे. चळवळ, शिक्षण व सामाजिकीकरण एकत्र झाल्याशिवाय प्रगती होत नाही. तसेच चळवळ ही कधीही तुकड्या तुकड्याने यशस्वी होत नसते. ती एकत्रित आल्यावर समर्थ होते असेही डॉ. कानगो म्हणाले. यावेळी नीलिमा पवार तसेच आमदार निर्मला गावित यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिभा गोवर्धने यांनी सूत्रसंचालन केले. प्रांजल गोवर्धने यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली.

विचार गहाण ठेवणार नाही

आम्ही सत्तेपासून लांब आहोत, सत्तेच्या जवळ जायचे आहे, हे खरे; परंतु त्यासाठी विचार गहाण ठेवण्याची आमची तयारी नाही. आणखी कुणाचीही सत्ता येवो. भाजपला हरवल्याशिवाय मागे राहणार नाही. त्यासाठी २० तारखेला आम्ही सर्व एक विचारांचे पक्ष एकत्र येत असून लोकशाहीविरोधात सध्या जो व्यवहार सुरू आहे त्याच्याविरोधात बंड करून उभे राहणार आहोत, असेही डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांचे कोडकौतुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुटीचा दिवस असताना अनुसूचित जाती समितीच्या आढावा बैठकीमुळे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना रविवारी सुखद धक्का बसला. या समितीने जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कारही केला. याअगोदर आलेल्या अनुसूचित जाती-जमाती समितीने या जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना रडारवर घेऊन त्यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये या समितीबद्दलही भीती होती. पण, त्यांचे कौतुक झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.

शुक्रवारपासून अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी विधी मंडळाची ही समिती नाशिकमध्ये दाखल झाली. त्यानंतर गेले तीन दिवस जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या बैठका घेतल्या. शनिवारी कामांची पाहणी केली. रविवारी त्यांचा शेवटचा दिवस होता. यावेळी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी या समितीचे प्रमुख हरिश पिंपळे यांनी या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गिते, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वच अधिकारी चांगले

जिल्ह्यात सर्वच अधिकारी चांगले लाभले आहेत. त्यामुळे येथे कामही उत्कृष्ट सुरू आहे. आम्ही सर्व ठिकाणी पाहणी केली. त्यामुळे आमचे समाधान झाले. जिल्हा परिषदेचे काम तर राज्य व देशपातळीवर गेले आहे. त्याचप्रमाणे पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर इतर विभागाचे कामही चांगले आहे. समिती जिल्ह्यातील कामे बघून समाधानी आहे. त्यामुळे राज्य शासनाने नाशिकसारखे काम राज्यभर करावे, अशी शिफारस करणार आहे, असेही समितीने म्हटले. त्याचप्रमाणे दोन पायलट प्रोजेक्टसुद्धा सुचविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातून तक्रारी कमी

समितीकडे तक्रारी मोठ्या प्रमाणात येतात. पण, नाशिक जिल्ह्यात या तक्रारी खूपच कमी होत्या. त्यातील ज्या तक्रारी आल्या त्या सोडवण्याचे काम केले गेले. त्यामुळे ही संख्या कमी आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी आतापर्यंत समितीने कधी कौतुक केल्याचे घडले नाही. पण, यावेळेस हे कौतुक केल्यामुळे आमचा उत्साह वाढेल व काम करण्यासाठी शक्ती मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी वणवण...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावरील सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने सिडको परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.

अंबड लिंकरोडसह उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक आदींसह इतर ठिकाणचाही पाणीपुरवठा या कामामुळे दोन दिवस खंडित करण्यात आल्याने या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी रात्री उशिरापर्यंत येथील दुरुस्तीचे काम सुरू होते. ते रात्री पूर्ण होऊन आज, सोमवार (दि. १)पासून परिसरात नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी येथील जलवाहिनीला गळती लागली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने येथील गळती रोखण्याचे काम करण्यात आले होते. परंतु, तरीही गळती न थांबल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय सुरूच होता. त्याबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा नव्याने गळती बंद करण्याचे काम हाती घेतले. गेले दोन दिवस येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतल्याने या वाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवावा लागला. त्यामुळे सिडकोवासीयांची पाण्याअभावी गैरसोय झाली. त्याबाबत अनेकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.

सिडकोला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपूर भागातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अवजड वाहनांमुळे गळती लागल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, या कामासाठी दोन दिवस पाणीपुरवठा खंडित झाल्याने पाण्याअभावी त्रस्त झालेल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांकडे धाव घेत पाण्यासाठी वणवण करावी लागल्याची समस्या मांडली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याची सूचना केल्यानंतर अधिक गतीने हे काम मार्गी लावण्यात आले.

दरम्यान, सातपूरसह सिडको परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्याखालील जलवाहिन्या, तसेच ड्रेनेज लाइनला गळती लागण्याचे प्रकार वरचेवर घडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, यासंदर्भात संबंधित विभागांना कळवूनदेखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

--

नगरसेवकांकडे गाऱ्हाणे

या कामामुळे पाणीपुरवठा अचानक जास्त काळ का बंद केला गेला, असा सवाल सिडको परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे उपस्थित केला. नगरसेवकांनी रहिवाशांची समस्या जाणून घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. मात्र, मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जोखमीचे असल्यानेच दोन दिवस महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करवून घेत हे काम पूर्ण करावे लागत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संच मान्यता दुरुस्ती ऑक्टोबरअखेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्याचे शालार्थ आयडीचे काम महाराष्ट्रात सर्वात मागे असून, माध्यमिकच्या १७४ व उच्च माध्यमिकच्या ७१ फायली संचालक कार्यालयात पडून आहेत. केवळ कमी कर्मचारी असल्याचे कारण सांगत व फाइल उशिरा आल्यामुळे हे काम थांबले होते, अशी समस्या मुख्याध्यापक संघाकडून मांडण्यात आली होती. त्यानंतर १५ दिवसांत संच मान्यता दुरुस्ती व ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत सर्वांची शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन गंगाधर म्हमाणे यांनी मुख्याध्यापक संघाला दिले. याबरोबरच डीएड टू बीएड प्रमोशन, सुपरवायझर, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक या सर्व पदोन्नती मान्यता आठ दिवसांत मार्गी लावण्याच्या सूचना उपसंचालकांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

भारत स्काऊट गाइड नाशिक कार्यालयात सभा पार पडली. शिक्षकांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलने करुनदेखील प्रश्न सुटत नसल्याची तक्रार यामुळे निर्माण झाली आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मेडिकल बिले व फरक बिलांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल, डीसीपीएस योजना हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असून, याबाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. विना अनुदानितवरून अनुदानित शाळेवर बदली मान्यता देण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहे, त्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही, अनुकंपा तत्वावरील मान्यतेचा २० जून २०१६ च्या शासन निर्णय आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याबरोबरच वादग्रस्त संस्थांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढून अशा संस्थांवर प्रशासक बसविण्याची शिफारस उपसंचालकांनी त्वरित करण्याचे आदेश म्हमाणे यांनी दिले. जिल्हाभरातून तीनशे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. तर आभार राजेंद्र सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर यांनी केले. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ३ ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक संघाला या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.

\Bअनुदानाचे काम युद्ध पातळीवर

\B२० टक्के अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे यावेळी शिक्षण संचालक म्हमाणे यावेळी म्हणाले. पायाभूत पदांना मान्यता उच्च माध्यमिक शाळांचा अनुदानाचा प्रश्न मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान, ग्रंथपालांना कालबद्ध पदोन्नतीची वेतन निश्चिती व वेतन सुरू करणे, एटीडी टू एटीडी स्केल मिळणे, संच मान्यतेत कला क्रीडा पद दिसण्याची तरतूद करण्यासाठी कारवाई चालू आहे, कालबाह्य मेडिकल बिलांचे अधिकार उपसंचालकांना देणे या सर्व विषयावर सकारात्मक तोडगा काढत सर्व प्रश्न १५ दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन संचालकांनी उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा नदीपात्रात युवतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथून पांढुर्लीकडे जाताना असणाऱ्या दारणा नदी पुलावरून नाशिक पोलिस वसाहतीत राहणाऱ्या १८ वर्षीय गायत्री विष्णू पालवे या युवतीने आत्महत्या केली. याबाबत राहुरीचे सरपंच संपत रामचंद्र घुगे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास युवतीने दारणा नदीपात्रात आत्महत्या केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार यू. जे. जगदाळे करीत आहे.

सातपूर कालनीत

तरुणाचा गळफास

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर कॉलनीत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर बाळकृष्ण बनकर (वय ४०) असे तरुणाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून नैराश्येत असल्याने कमलाकरने घरात गळफास घेत आपले जीवन संपविले. अधिक तपास पोलिस हवलार सैय्यद करत आहेत. प्रवीण बनकर यांनी पोलिसांनी माहिती दिल्यावर आत्महत्या केल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाई विरोधात शुक्रवारी शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढती इंधन दरवाढ सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असून, आर्थिक नियोजन करणे कठीण झाले आहे. या विरोधात सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ५) शिवसेनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.

शालिमार येथील शिवसेना कार्यालयात रविवारी (दि. ३०) दुपारी ४ वाजता शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली. इंधनासह इतरही वस्तूंचे भाव सध्या वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याचा विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत असताना जिल्हा संपर्क प्रमुख चौधरी म्हणाले, की शुक्रवारी केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे चोख नियोजन करावे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी करावे. जिल्ह्याभरात आंदोलन करण्यासाठीची दिशा ठरवावी. या बैठकीत शिवसेना दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख पदावर सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंदा दातीर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेरी आवाज’ची रसिकांवर मोहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

'अजीब दास्ता है ये ...' , 'कहीं दीप जले कही दिल..', 'वो भूली दास्तान ...' अशा एक से बढकर एक लता मंगेशकर यांनी मूळ गायलेल्या रचनांच्या सादरीकरणास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाह... वा आणि उदंड टाळ्यांच्या कडकडाटात या गाण्यांना रसिक श्रोत्यांकडून 'वन्स मोअर' मिळाला. निमित्त होते भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त विविध गीतकारांच्या हस्ते लिखीत व लतादीदी यांनी गायलेल्या 'मेरी आवाज ही पहचान है ' या गीत मैफलीचे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये आयोजित या उपक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वाढती गर्दी लक्षात घेता प्रतिष्ठानला मोठ्या पडद्याचीही व्यवस्था हॉलबाहेर करावी लागली. लतादीदींनी गायिलेल्या सुमारे २५ ते ३० गीतांचे सादरीकरण यावेळी गायिका रागिणी कामतीकर यांनी केले. आदित्य कुलकर्णी यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली. ऑक्टोपॅडवर अभिजीत शर्मा, संवादिनीवर अॅड. प्रमोद पवार यांनी साथ दिली. तर कोरससाठी नेहमूर्ती आणि रंजनी गेहानी यांनी साथ दिली. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले. तुषार बागूल यांनी ध्वनी व्यवस्था केली.

या गीतांनी आणली रंगत

यावेळी गायलेल्या गीतांमध्ये 'नक्श फरियाद है..', 'बहारो मेरा जीवन', 'तुम न जाने', 'ये समां समां है प्यार का', 'ये मुलाकात इक गीना है', 'एक प्यार का नगमा है', 'कुछ ना कहो', 'एहसान तेरा होगा मुझपर', 'वो भूली दास्तान', 'रजनीगंधा फूल तुम्हारे', 'आएगा आनेवाला', 'कान्हा बजाए' , 'बजे पायल छुमछुम', 'तू जहां जहां चलेगा' आदी गीतांनी या सादरीकरणात रंगत आणली.

\B(फोटो : सतीश काळे)

\Bकल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे

$
0
0

भाजपविरोधात एकजूट राखण्याचे प्रा. कवाडे यांचे विरोधी पक्षांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरएसएस प्रणित भाजप सरकारचे आव्हान समस्त विरोधी पक्षांनी स्वीकारावे. पक्षापेक्षा देशहिताचा विचार करावा. देशातील संकट दूर करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून एकास एक उमेदवार द्यावा, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. यावेळी त्यांनी ज्या मतदारसंघात ज्यांचे मतदार जास्त असेल तेथे त्या पक्षाला संधी द्यावी, असेही त्यांनी सूचिविले.

अनुसूचित जाती समितीच्या आढावा बैठकीसाठी नाशिकला आल्यानंतर प्रा. कवाडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार हल्ला करत भाजपचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजपला फक्त ३७ टक्के मतदान मिळाले. विरोधी पक्षांना त्यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे विरोधी मतांची ताकद जास्त आहे. ती एकजुटीने समोर येण्याची गरज आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षासह इतर पक्षांच्या एकत्रित बैठका झाल्याची माहिती प्रा. कवाडे यांनी दिली.

मनसेची भूमिका महत्त्वाची

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याची शिफारस 'राष्ट्रवादी'ने केली आहे. पण, 'मनसे'ला आपली परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनाच तो निर्णय घ्यावा लागेल. राज्यात सर्वच ठिकाणी परप्रांतीयाची संख्या मोठी असल्याचेही प्रा. कवाडे यांनी सांगितले.

'एमआयएम'ने देशाचे प्रश्न घ्यावे

'एमआयएम'ने आपल्या भूमिका बदलून देशाच्या प्रश्नांचा विचार करायला हवा. याअगोदर 'एमआयएम'ने नांदेडसह इतरत्र यश मिळाले पण, नंतर ते मिळाले नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाला कळू लागले आहे की या पक्षाची मदत करून भाजपला मदत होत आहे. त्यामुळे जनताही हुशार झाली आहे, असेही प्रा. कवाडे यांनी सूचित केले.

हुकूमशाही पद्धत

देशात भाजप सरकार जनतेला गुलाम करण्याचे काम करत आहे. ही प्रवृत्ती मोदीच्या रुपात देशात हुकूमशाही प्रस्थापित करत असून लोकशाही नष्ट होत असल्याचे कवाडे यांनी सांगितेल. देशात लोकशाही टिकली पाहिजे. त्यातून देशाचा विकास होणार आहे, असेही ते म्हणाले.

जातीय उन्माद

देशात धार्मिक व जातीय उन्माद तयार केला जात आहे. देशाची जनता उद्विग्न झाली आहे. ही परिस्थिती देशाच्या एकसंघाला व एकात्मतेला मारक ठरणारी आहे. देशात भाजपचा चार वर्षांचा कारभार बघितला तर देशाला कोणत्या वळणार देश हा पक्ष नेत आहे हे दिसते. ही देशासाठी चिंतणीय बाब आहे, असही प्रा. कवाडे म्हणाले.

धर्मनिरपेक्षता महत्त्वाची

भाजप सरकार भारतीय संस्कृतीचे अवमूल्यन करण्याचा प्रकार करत आहे. धर्मनिरपेक्षतेशिवाय देश एकसंघ राहू शकत नाही. पण, या देशात धार्मिक व जातीय उन्माद सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यातून मानवी मूल्यांची अवहेलना होत आहे. या सरकारला आरक्षण, संविधनाचे वावडे असून मनुस्मृतीवर प्रेम आहे. सरकार जातीयव्यवस्थेचे समर्थक असल्याचाही आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बिनतारी संदेश’तर्फे वृक्षारोपण

$
0
0

नाशिक : पोलिस उपअधीक्षक बिनतारी संदेश विभाग यांच्या वतीने राणेनगर परिसरातील मोकळ्या जागेवर पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या ७० वृक्षांच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक किशोर उतळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्ट्यांमध्ये महिला आरोग्याचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वंचित घटकांसाठी विविध स्तरावर काम करणाऱ्या ह्युमन फॉर ह्युमॅनिटी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये 'वॉश' हे अभियान राबविण्यात आले. मासिक पाळी काळात महिलांनी घ्यावयाची काळजी या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देतानाच महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. विविध भागातील ५०० महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

ह्युमन फॉर ह्युमॅनिटी (एचएफएच) ही स्वयंसेवी संस्था देशभर विविध क्षेत्रात काम करते. सार्वजनिक स्वच्छता, शिक्षणाचा प्रसार, स्मार्ट रस्ते, पर्यटन स्थळांचे संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने महाराष्ट्रात महिलांसाठी 'वॉश' हा उपक्रम हाती घेतला आहे. अजूनही मासिक पाळीबाबत महिलांमध्ये अनेक समज, गैरसमज आहेत. त्यामुळे महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष होते. महिलांमध्ये जनजागृतीसाठी संस्थेने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कार्यशाळांचे आयोजन सुरू केले आहे. दमयंती विठलानी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात नाशिकमधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या राज्यातील संचालक जलपा विठलानी यांनी दिली. या उपक्रमांतर्गत गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात सहा कार्यशाळा घेण्यात आल्या. महालक्ष्मीनगर, म्हसरूळ, आंबेडकरनगर, गुलाबवाडी, रमाबाई आंबेडकरनगर आणि विडीकामगारनगर या भागातील महिलांसह अंगणवाडी सेविकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये मासिक पाळीच्या बाबतीतील शंकांचे निरसन करतानाच त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आले.

आहाराबाबतही मार्गदर्शन

महिलांनी आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत डॉक्टर्स तर संतुलित आहाराबाबत आहारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रियंका टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या महिलांनी अंगणवाडी सेविका, त्यांच्या सहाय्यक आणि मोलमजूरी करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण दिले. महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी विद्या गायकवाड यांनी या उपक्रमाला सहकार्य करीत अधिकाधिक महिलांना या कार्यशाळांचा लाभ मिळवून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचे संकेत!

$
0
0

- आतापर्यंत झालेला पाऊस - ८५ टक्के

- गेल्या वर्षी झालेला पाऊस - १०६ टक्के

- सद्यस्थितीत धरणसाठा - ७८ टक्के

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी आरक्षणाबाबतची मागणी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक बोलाविण्यात आली आहे. शुक्रवारी (५ ऑक्टोबर) ही बैठक होणार असली तरी यंदा सरासरीच्या १५ ते २० टक्के पाऊस कमी झाल्याने पाणीकपातीचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा पाण्याचे वाटप करताना जिल्हा प्रशासनालाही कसरत करावी लागणार आहे.

जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा हंगाम संपला की ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी आरक्षणाची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये विविध विभागांची पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पाणी आरक्षित केले जाते. यंदा पावसाने नाशिककरांची काहीशी निराशा केली आहे. यंदाच्या पूर्ण हंगामात अवघा ८५ ते ८७ टक्के पाऊस झाला आहे. त्यातही अनेक तालुक्यांमध्ये ५० टक्केदेखील पाऊस पडू शकलेला नाही. त्यामुळे यंदा धरणेदेखील ७८ टक्केच भरली आहेत. याउलट गतवर्षी जिल्ह्यात ११६ टक्के पावसाची नोंद झाली होती. धरणांमध्येही पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला होता. परंतु, यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचा आतापासूनच काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी नाशिककरांवर येऊन पडली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महापालिकेसह विविध विभागांची पाण्याची मागणी समजावून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि धरणांमध्ये उपलब्ध जलसाठा याचा विचार करूनच विविध विभागांना यंदा पाण्याची मागणी नोंदवावी लागणार आहे. आरक्षणात कपातीचे धोरण अवलंबिले जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच महापालिका प्रशासनाला दिले असून, त्यामुळे अन्य विभागांनाही मागणी करताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करणे अनिवार्य ठरणार आहे.

..

आवर्तनाची मागणी धरणार जोर

पाण्याच्या अभावाचा थेट फटका आतापासूनच पिकांना बसू लागला आहे. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके वाचविण्यासाठी धरणांमधून पाणी आवर्तन द्यावे, ही मागणी येत्या काळात जोर धरू शकते. विशेषत: सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस झालेल्या निफाड, सिन्नर, देवळा, चांदवड, कळवण आणि नांदगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता अधिक आहे.

..

प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅँकर्स धावत आहेत. त्यामुळेच दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून होऊ लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणी आरक्षणाबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण जिल्हावासीयांचेच लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणसाठ्यात १० टक्के घट

$
0
0

गतवर्षीच्या तुलनेत ७,१३७ दलघफू पाणी कमी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबरच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा ७८ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. मान्सूनचा हंगाम संपला असून, या पाणीसाठ्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नसून, आहे त्या पाण्यावरच भागवावे लागणार आहे.

गंगापूर, दारणा आणि गिरणा धरण समूहांमध्ये एकूण २४ धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. गतवर्षी या धरणांमध्ये आजमितीस ५८ हजार २४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, यंदा केवळ ५१ हजार १०८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार १३७ दशलक्ष घनफूट पाणी कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गतवर्षी ८८ टक्क्यांवर असलेला सरासरी पाणीसाठा यंदा ७८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी नाशिककरांना पार पाडावी लागणार आहे.

-

गिरणात ४८ टक्केच पाणी

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले गिरणा धरण यंदा निम्मेही भरू शकलेले नाही. या धरणाची पाणी साठवण क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आहे. गतवर्षी धरणात १२ हजार १०७ दलघफू म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यामध्ये ८ हजार ८६० दलघफू म्हणजेच ४८ टक्के एवढाच पाणीसाठा आहे.

-

सहा धरणेच भरली १०० टक्के

गतवर्षी जिल्ह्यात २४ पैकी तब्बल १८ धरणे १०० टक्के भरली होती. त्यामध्ये गंगापूर धरण समूहातील चार, पालखेड धरण समूहातील नऊ, तर दारणा धरण समूहामधील पाच धरणांचा समावेश होता. परंतु, यंदा २४ पैकी केवळ सहाच धरणे १०० टक्के भरू शकली आहेत. त्यामध्ये गौतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी आणि हरणबारी या धरणांचा समावेश आहे.

-

धरण समूहांमधील तुलनात्मक पाणीसाठा टक्केवारीत

धरणसमूह २०१७ २०१८

गंगापूर १०० ९५

पालखेड ९५ ८६

गिरणा १०० ७९

एकूण ८८ ७८

-

धरणांमधील तुलनात्मक पाणीसाठा टक्क्यांत

धरण २०१७ २०१८

गंगापूर १०० ९१

काश्यपी १०० ९९

गौतमी गोदावरी १०० १००

आळंदी १०० १००

पालखेड ९९ ५२

करंजवण १०० ९४

वाघाड १०० १००

ओझरखेड १०० ९०

पुणेगाव ९९ ९२

तिसगाव १०० ९६

दारणा १०० ९३

भावली १०० १००

मुकणे ८७ ७४

वालदेवी १०० १००

कडवा १०० ८५

नांदूरमध्यमेश्वर १०० ५९

भोजापूर ९५ ७६

चणकापूर १०० ९७

हरणबारी १०० १००

केळझर १०० ९९

नागासाक्या ४५ ०

गिरणा ६५ ४८

पुनद १०० ९५

माणिकपुंज १०० १९

एकूण ८८ ७८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कार्यक्रमांचा ब्रह्मोत्सवामध्ये बहर

$
0
0

१० ते २३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री बालाजी व्यंकटेश मंदिरात १० ते २३ ऑक्टोबर दरम्यान ब्रह्मोत्सव रंगणार असून त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम गंगापूर रोडवरील सोमेश्वरजवळील बालाजी मंदिरात होणार आहेत.

शंकराचार्य न्यासच्या श्री बालाजी व्यंकटेश मंदिरातर्फे आयोजित ब्रह्मोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. १०) पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेत ब्रह्मोत्वसाच्या शुभारंभाची महापूजा होणार आहे. महापूजा १० ते २३ ऑक्टोबर दरम्यान, पहाटे ५.३० वाजता होईल. बुधवारी (दि. १०) सकाळी ८.३० वाजता तुलसी अर्चना व सकाळी साडेनऊ वाजता ध्वजपूजन होईल. गुरुवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजता पुष्पार्चना आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मीना परुळकर यांचा गोविंद-कला-संगम कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी मंदिरात महावस्त्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. १३) सकाळी ८.३० वाजता कुंकम अर्चना, सकाळी ९.३० वाजता कुमारिका पूजन आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत दीपा मोनाक्षी व शिष्यवृंद यांचा रास कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि.१४) सकाळी साडेआठ वाजता हिरण्य अर्चना व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत तबला वादक नितीन वारे यांच्या शिष्यांचा तबला वादनाचा कार्यक्रम होईल.

सोमवारी (दि. १५) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत कल्याणम् (बालाजी विवाह) होणार आहे. मंगळवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजता फलार्चना होईल. गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेआठ वाजता लड्डूपेड अर्चना होईल. शुक्रवारी (दि. १९) दुपारी ४ ते ७ यावेळेत सुंदरकांड सत्संग समितीच्या वतीने गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता गोदातीरी अवभूत स्नान होणार असून रात्री ८ ते ९.३० यावेळेत अमृता रहाळकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. २१) सकाळी ८.३० वाजता अक्षदा अर्चना व दुपारी १२.३० ते २ यावेळेत ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने भंडारा (महाप्रसाद) होणार आहे. मंगळवारी (दि. २३) रोजी सकाळी ८.३० वाजता गरुड पूजन, सायंकाळी ६ वाजता दीपार्चना आणि रात्री ८ नंतर - दुग्धपानाचा कार्यक्रम होणार आहे. ब्रह्मोत्सवातील सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शंकराचार्य न्यासतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images