Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सरकारी निकषानेच गमावली नोकरी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्य लोकसेवा आयोगामार्फत मिळालेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाच्या शासकीय नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर उमेदवारांवर आली आहे. जानेवारी २०१७ मधील जाहिरातीनुसार झालेली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची भरती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकषांच्या मुद्द्यावर रद्द ठरविल्याने मोठ्या कष्टाने हाती आलेली नोकरी गमावण्याची वेळ या उमेदवारांवर आली आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि निफाडचे आमदार अनिल कदम यांची भेट घेऊन त्यांना याप्रश्नी साकडे घातले.

जानेवारी २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार राज्यातील हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मार्च २०१८ मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. आयोगाने ८३३ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिफारसपत्रही पाठविले होते. त्यानुसार १४ जून रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे नियोजनही उमेदवारांना देण्यात आले. मात्र, त्यापूर्वी दोन दिवस आधीच १२ जून रोजी नागपूर खंडपीठाने याविषयी दाखल याचिकेच्या आधारे या भरतीप्रक्रियेला स्थगिती दिली होती. या याचिकेवर नागपूर खंडपीठाने २८ सप्टेंबरला अंतिम निकाल दिला असून, जुन्या नियमांप्रमाणे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि वाहन परवाने आहेत, अशाच उमेदवारांना या पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, नियुक्तीपत्र प्राप्त होऊनही या उमेदवारांना नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

सरकारचे धोरण कारणीभूत

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदासाठी केंद्र सरकारच्या निकषांनुसार जड वाहन चालविण्याचा परवाना, सरकारी गॅरेजमधील कामाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असे. मात्र, डिसेंबर २०१६ मध्ये राज्य सरकारने या निकषांत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जानेवारी २०१७ मधील आयोगाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपद भरतीच्या जाहिरातीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. राज्य सरकारच्या या धोरणालाच न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पूर्वीचेच निकष कायम ठेवण्याची याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयाने मान्य केल्याने या पदासाठी निवड होऊनही नोकरी गमावण्याची वेळ या उमेदवारांवर आली आहे. सरकारने न्यायालयात आपली भूमिका योग्य प्रकारे मांडली नसल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे.

समाजाला तोंड कसे दाखवणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदावर निवड झाल्याने या यशस्वी उमेदवारांचे जाहीर सत्कारही झाले आहेत. होर्डिंग्स लावून ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. मात्र, आता ऐनवेळी त्यांची निवड रद्द झाल्याचे समजताच आता समाजात तोंड कसे दाखवणार, असा सवाल या उमेदवारांनी केला आहे.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाच्या भरतीसाठीचे पूर्वीचे केंद्राचे निकष राज्य सरकारनेच बदलवले होते. बदललेल्या निकषांच्या आधारेच परीक्षा होऊन आमची निवड झाली; परंतु आता सरकारचे निकष बदलाचे धोरणच न्यायालयाने रद्द ठरविल्याने आम्हाला नोकरीवर पाणी सोडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या प्रकारास सरकारचे धोरणच जबाबदार आहे. आमचे सर्व कष्ट व दोन वर्षांचा काळही वाया गेला. या नोकरीसाठी काही उमेदवारांनी पूर्वीची नोकरीही सोडली. आता समाजात आम्ही कसे तोंड दाखवणार?

- भूषण मोरे

उमेदवार, ओझर

या प्रकारात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही. या प्रकरणी पुढील न्यायालयात सरकारने वकील देऊन हस्तक्षेप करावा व या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल.

- आमदार अनिल कदम

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लेक्चररची नोकरी सोडली. परीक्षा उत्तीर्ण होऊनही अजून नियुक्ती मिळाली नाही. मोठा कालापव्यय झाला असून आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया जात आहेत. आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.

- गोरक्ष कोरडे

उमेदवार, नाशिक

राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत नमूद सर्व निकष पूर्ण झालेले असल्यानेच आमचे अर्ज स्वीकारले गेले होते. आता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा पात्रता निकषांचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असतानाही राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे आमच्या भविष्याची वाताहत होण्याची वेळ आली आहे.

- निकिता जाधव

उमेदवार, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांत कचरापेटीची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन नाशिकच्या कार्यक्षेत्रातील सर्व टुरिस्ट कॅब, मोटार कॅब, ऑटो रिक्षा आणि सर्व प्रकारच्या प्रवासी बसमध्ये प्लास्टिकव्यतिरिक्त बंद कचरापेटी किंवा कापडी पिशवी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नाशिकने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील २५ हजार प्रवासी वाहनांमध्ये कापडी पिशवी किंवा बंद स्वरुपाची कचरापेटी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. गाडीतील प्रवासी अनेकदा चालू वाहनातून रिकामे पुडे, कागद, खाद्यपदार्थ बाहेर टाकतात. महामार्गावर सफाईची व्यवस्था नसल्याने हे पदार्थ कुजल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हे थांबविण्यासाठी गाडीतच कचरा टाकण्याची सुविधा आवश्यक आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणारे कलम ८६/१७७ अन्वये तडजोड शुल्क रुपये २०० भरण्यास पात्र राहतील. या कामास वाहनचालकांनी प्राधान्य द्यावे. याची सुरुवात २ ऑक्टोबरपासून नूतनीकरणास येणाऱ्या वाहनांपासून करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कळविले आहे.

--

असा असावा आकार

कचरापेटी किंवा पिशवी चालकाच्या मागच्या बाजूस लावावी. प्रवासी बससाठी पिशवीचा आकार ४५ बाय ४५ सेंटिमीटर, तर इतर वाहनांसाठी ३० बाय ३० सेंटिमीटर असावा, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामस्मरणानेच थांबते मनाचे रडगाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संसारात सर्व सुख मिळाले, तरी मानवी मनाच्या इच्छा आणि अपेक्षा संपत नाहीत. हे हवे, ते हवे असे मनाचे रडगाणे सुरूच राहते. नामस्मरणामुळे समाधानाची आणि आनंदाची अनुभूती मिळते. त्यामुळे मानवी मनाचे रडगाणे केवळ नामस्मरणामूळेच बंद होऊ शकते, असे प्रतिपादन साध्वी हिराजी यांनी गरुडपुराण ज्ञानयज्ञाच्या समारोपात केले.

एकवेळ कासवाच्या पाठीवर केस उगवतील, आकाशात फुले उमलतील, परंतु मानवी मन नामस्मरणाशिवाय अन्य कोणत्याही उपायाने आटोक्यात येऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीद्वारे आयोजित गरुड पुराण ज्ञानयज्ञाचा समारोपात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर साध्वी मुक्तिकाजी, साध्वी त्रिलोकीजी, साध्वी उत्तमजी, साध्वी सावित्रीजी, महात्मा कुलदीपजी उपस्थित होते. यावेळी साध्वी हिराजी यांनी गरुड पुराणात कथन केलेले दान आणि सेवेचे महत्त्व सांगतानाच चंचल मानवी मनाला स्थिर करण्यासाठी काय करावे याबाबतही निरुपण केले. दान का द्यावे, असा प्रश्न गरुड महाराजांनी श्रीहरी विष्णूंना केला. त्यावेळी विष्णूंनी दान आणि सेवेचे महत्त्व सांगितले आहे. केलेले दान हे प्रारब्ध बनून पुन्हा आपल्याकडेच येते. ते पुण्यकर्म म्हणून गणले जात असल्याने त्याचे फळही निश्चितच मिळते. स्वर्ग आणि नरक अन्य कोठे नसून दोन्हींचा अनुभव येथेच घेता येतो. जो मानवाच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असतो. आपण अनेक धनिकांना सर्वप्रकारचे सुख उपभोगताना पाहत असतो. हे सुखच स्वर्ग असते. एकीकडे काही श्वान हे सुख अनुभवतात, तर काहींना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते. ही सर्व संबंधितांच्या कर्माची फळे असतात. त्यामुळे मानवाचे कर्म चांगले असायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. महाप्रसादाने या ज्ञानयज्ञाची सांगता झाली.

-

मानवधर्मप्रेमींकडून स्वच्छता

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मानवधर्मप्रेमींनी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगरसमोरील परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयापासून श्री हंस कल्याणधाम आश्रमापर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. साध्वी त्रिलोकीजी, साध्वी उत्तमजी, साध्वी सावित्रीजी, महात्मा कुलदीपजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये मानवसेवा दलाचे स्वयंसेवक, युवा कार्यकर्ते, मानवधर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरातील वाढलेले गवत काढून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचराही संकलित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसा हवाला, की बँकमार्गे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल सिक्युरिटी आयडीशी गुन्हा लिंक झाल्याचा व्हॉइस मॅसेज पाठवून त्याद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतराराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातून दोघांना अटक केली आहे. या दोन सूत्रधारांमार्फतच नाशिकमध्ये बल्क मोबाइल क्रमांक पाठविले जात होते. या गुन्ह्यात भारतातील दोन, तर अमेरिकेतील रिचर्ड जॉन्सन या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

दीपेक्स चंद्रकांत मोदी आणि धीमंत रावल (दोघे रा. गुजरात) अशी पोलिसांनी गुजरातमधून अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना २९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (दि. १ ऑक्टोबर) संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांच्या कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. संशयितांपैकी मोदी हा या गुन्ह्याची महत्त्वाची कडी ठरला आहे. अमेरिकेतील जॉन्सन रिचर्ड हा संशयित मोदीला पैसे आणि अमेरिकन नागरिकांचे मोबाइल क्रमांक पाठवत होता. मोदी हे मोबाइल क्रमांक नाशिकच्या कॉल सेंटरला ब्लास्ट करण्याचे अर्थात, पाठविण्याचे काम करीत होता. अमेरिकेतून मोदीला मोठ्या प्रमाणावर पैसा मिळाल्याचा सायबर पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हा पैसा हवालामार्गे आला, की थेट बँक खात्यातून याविषयी मोदी काहीही बोलण्यास तयार नाही. याबाबत बोलताना सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर जाधव यांनी सांगितले, की मोदीच्या बँक खात्यांमधील व्यवहारांबाबत माहिती मिळविण्यासाठी बँकेस पत्र देण्यात आले आहे. ही माहिती लवकरच उपलब्ध होईल. या गुन्ह्यात मोदी आणि रावलसह यापूर्वी अटक केलेल्या संशयितांपैकी ऋषिकेश माळवे आणि नजीम खान असे एकूण चौघे पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, भारतातील अन्य दोन आरोपी अद्याप फरारी आहेत.

--

काय आहे प्रकरण?

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. नाशिकरोड परिसरातील पासपोर्ट ऑफिसच्या वर असलेल्या एका कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ११ जणांना अटक केली होती. कॉल सेंटरमध्ये बसलेली मुले एकाच वेळी हजारो अमेरिकन नागरिकांना सोशल आयडीशी संबंधित व्हॉइस मॅसेज पाठवत होती. हा व्हॉइस मॅसेज वाचून अमेरिकन नागरिकांनी संपर्क केला, की त्यांना वॉलमार्टसह इतर काही ठिकाणांवरील ५०० डॉलर्सचे कूपन घेऊन त्याचा क्रमांक पाठविण्यास सांगण्यात येत होते. अमेरिकेत अशा गिफ्ट कूपनचे पैशांमध्ये रूपांतर करता येणे शक्य असल्याने संशयितांचे फावत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदरसूलला गावठी कट्टा विक्रेता अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

--

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपीस ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

भाऊसाहेब छबू मोरे (वय २५, रा. करंजी बु. ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि. २) एक तरुण अंदरसूल येथे गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय दराडे व मालेगावचे अप्पर अधिक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. संशयित दुपारच्या सुमारास पोलिसांच्या हाती लागला. ही कारवाई निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र शिलावट, हवालदार दीपक आहिरे, पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, भरत कांदळकर, अमोल घुगे, शिपाई प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, इम्रान पटेल, लहू भावनाथ आदींच्या पथकाने केली.

शेतजमीन व्यवहारात फसवणूक; एकास अटक

मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ शिवारातील शेतजमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत निंबा वाघ यास छावणी पोलिसांनी मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली. सन २०१६ मध्ये याप्रकरणी नितीन वसंतराव शिंदे (रा. दहिवाळ) यांनी फिर्याद दिली होती. दहिवाळ शिवारात शेट गट नं १७४/५ या मिळकतीवर मामको बँक, सेंट्रल बँक व सोसायटीचे कर्ज होते. मात्र, या जमिनीवर कोणताही बोजा नसल्याची खोटी कागदपत्रे तत्कालीन तलाठी यांच्या संगनमताने वाघ यांनी तयार केली होती. तसेच फिर्यादी नितीन शिंदे यांना सदरची २ हेक्टर जमीन विक्री करण्यात आल्याची घटना घडली होती. येथील छावणी पोलिस ठाण्यात वाघ तसेच तत्कालीन तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी दोन वर्षांनंतर चंद्रकांत वाघ यास अटक केली आहे.

खंबाळे खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यातील खंबाळे येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धायटीपाडा येथील जानू लक्ष्मण मोकशी (वय ६०) यांचा तालुक्यातील खंबाळे येथे मारहाणीत मृत्यू झाला होता. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पाच संशयीतांना अटक करण्यात आली आहे.

तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

मनमाड : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील महिला सरपंचांनी ग्रामसभा लवकर का आटोपली याचा जाब विचारून शिवीगाळ व उद्धट वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर सरपंच महिलेने गावातील तरुणाने आपल्याला अश्लील शिवीगाळ व दमदाटी करून विनयभंग केल्याची फिर्याद चांदवड पोलिस ठाण्यात दाखल केली असून, पोलिसांनी पठाण नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज पडून मुलाचा मृत्यू

घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवारेवाडी येथील चौदावर्षीय युवकाचा सोमवारी रात्री वीज पडून मृत्यू झाला. काळूस्ते परिसरात सारुक्तेवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या बैलही वीज पडून गतप्राण झाला. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास इगतपुरी परिसरातील मानवेढे शिवारातील आवारेवाडी येथील रवींद्र आनंदा पोकळे हा युवक अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यास इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता त्यास मृत म्हणून घोषित करण्यात आले. काळूस्ते शिवारातील सारुक्तेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल गतप्राण झाला आहे. भगवान मधे यांनी तत्काळ तहसीलदार इगतपुरी यांच्याशी संपर्क करून सबंधित कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली.

चोरट्यांनी लांबवली सोन्याची पोत

सिन्नर : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत लांबविल्याची घटना सोमवारी सरद्वाडी रोड परिसरात वाजे लॉन्स येथे घडली. छाया निवृत्ती वारुगंसे या दुचाकीवरून जात होत्या. दुसरीकडून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पोबारा केला. या वेळी छाया आरडाओरड केले मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. छाया यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चातून ‘आठवण’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रात भाजपची सत्ता आल्यास १०० दिवसांच्या आत ईपीएफ पेन्शनर्सना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन आणि सोबतच महागाई भत्ता अदा करण्यासह डॉ. भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी लागू करण्याचे तत्कालीन भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्याासठी नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्सच्या वतीने मंगळवारी भाजप कार्यालयावर आठवण मोर्चा काढला. शंभर दिवसांचे आश्वासन साडेचार वर्षांतही पूर्ण न केल्याबद्दल पेन्शनर्सनी वसंत स्मृती कार्यालयावर धडक देत गांधीगिरी मार्गाने आश्वासन पाळा अन्यथा 'नो कोशियारी, नो वोट'असा इशारा भाजपला दिला. आमदार बाळासाहेब सानप यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले.

देशात १६ नोव्हेंबर १९९५ पासून अंसघटीत क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून 'ईपीएफ ९५' पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत देशातील औद्योगिक कामगार, एसटी, साखर, एफसीआय, सहकारी बँका, विकास सोसायटी कर्मचारी, वीज कामगार, एचएएल, मायको बॉश, विडी कामगार आदी १८६ आस्थापनांतील ६० लाख सेवानिवृत्तांना मिळणारी पेन्शन अल्प आहे. २०१३ मध्ये वर्धा येथील मेळाव्यात तत्कालीन भाजप प्रवक्ते व विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रात भाजपची सत्ता आल्यास १०० दिवसांत दरमहा तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करू, डॉ. कोशियारी कमिटीच्या शिफारस लागू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, केंद्रात भाजपची सत्ता येऊन साडेचार वर्षे पूर्ण होत आली, तरी हे आश्वासन पाळले गेले नाही. याची आठवण करून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पतंप्रधान नरेंद्र मोदींकडून ज्येष्ठ पेन्शनर्सची फसवणूक केली जात असल्याने संतप्त झालेल्या पेन्शनर्सनी थेट भाजप कार्यालयात धडक देवून आश्वासनाची आठवण करून दिली. संघटनेचे संस्थापक निमंत्रक राजू देसले, जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी आणि कार्याध्यक्ष सुभाष काकड, विलास विसपुते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 'आश्वासन पाळा', 'नो कोशियारी, नो वोट' अशा घोषणा यावेळी पेन्शनर्सनी दिल्या. पेन्शनर्सना नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह दिली जावी. तोपर्यंत डॉ. कोशियारी समितीच्या अहवालानुसार तीन हजार रुपये पेन्शन, तसेच महागाई भत्ता दिला जावा. हायर सॅलरी, हायर पेन्शन सर्वांना मिळावी. सर्वांना २ इयर वेटेजचा लाभ फरकासह मिळावा. अन्न सुरक्षेचा फायदा ईपीएफ ९५च्या पेन्शनर्सना लागू करावा, पेन्शनरला दर्जेदार आरोग्य सेवा मोफत देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन आमदार सानप यांना सादर करण्यात आले.

'सरकारदरबारी प्रयत्न करू'

भाजप कार्यालयावरच थेट आठवण मोर्चा आल्याने भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. पेन्शनधारकांच्या प्रश्नांची आपणास जाणीव असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार बाळासाहेब सानप यांनी दिले. यावेळी माजी आमदार वसंत गिते, महापौर रंजना भानसी, नगरसेवक जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दवाखान्यांत जागाच नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात प्रथमच डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि चिकुनगुनिया या आजारांनी एकत्र थैमान घातले असून, शहरातील बहुतांशी हॉस्पिटल्स गर्दीने ओसांडून वाहत आहेत. छोट्याच नव्हे तर मोठ्या हॉस्पिटल्समध्येदेखील या आजारांचे पेशंट दाखल करून घेण्यासाठी जागा अपुरी पडते आहे. नागरिकांनी हे आजार टाळण्यासाठी जागरूक असणे आवश्यक असून, त्याद्वारेच त्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.

शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यू या आजारामुळे १५ ते २० जणांचा बळी गेला असून, या आजाराच्या संशयित पेशंटमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच परतीचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून, यामुळे ऑक्टोबर हिट ओसरून हवेत गारवा निर्माण झाला आहे. दुर्दैवाने साचलेले पाणी आणि थंड हवामान स्वाइन फ्लू तसेच डेंग्यूचा पसार करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आजमितीस शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये या पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसते. उपनगरांमधील लहान दवाखान्यांपासून शहरातील मोठे हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स यांच्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दाखल होत आहेत. काही हॉस्पिटलमध्ये तर बेड शिल्लक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच प्रशासनाने बेड शिल्लक नसल्याचे बोर्डही लावले आहेत. काही हॉस्पिटलच्या ओपीडी बाहेर तर पेशंटला बसायलाही जागा नसल्याचे निदर्शनास येत आहे.

याबाबत बोलताना रक्तविकार, कॅन्सर व अस्थिमगज प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी सांगितले की, डेंग्यू या आजारात पेशंटच्या प्लेट्सलेटसचे प्रमाण ५० हजारांच्या खाली येते. साधारणत: हे प्रमाण दीड ते साडेचार लाख असणे आवश्यक असते. बऱ्याचदा डेंग्यूची लागण झाली की दोन दिवस ताप येतो. यानंतर ताप उतरतो, मात्र शरिराची प्रतिकार क्षमता कमी होते. ताप येऊन गेल्यानंतर अगदी सहाव्या ते आठव्या प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे अशा पेशंटने सातव्या दिवशी प्लेट्सलेट्सचे प्रमाण तपासून घ्यायलाच हवे. दुर्दैवाने असे झाले नाही तर पेशंटच्या प्लेट्सलेट्स अगदीच १० हजारापर्यंत पोहचतात. यामुळे शरीरातर्गंत रक्तस्त्राव होतो किंवा अगदी लिव्हरदेखील निकामी होते. डेंग्यूची लागण झालेल्या १० टक्के पेशंट या अवस्थेपर्यंत पोहचतात. सध्या डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, ऑक्टोबर हिट वाढल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे डॉ. जुनागडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एम. डी. मेडिसिन असलेल्या डॉ. वैभव पाटील यांनीदेखील या आजारांच्या पेशंटमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे स्पष्ट केले. आजमितीस शहरातील बहुतांश हॉस्पिटल्समध्ये या तीन साथरोगांच्या पेशंटना दाखल करून घेण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. दरवर्षी या तीनपैकी एक साथ जोरात असते. यंदा या तीनही आजारांनी डोकेवर काढल्याने ही परिस्थिती उद्भवली. डेंग्यूसाठी डास कारणीभूत असून, स्वाइन फ्लूचा फैलाव वातावरणावर तसेच व्यक्तीच्या सवयींवर अवलंबून असतो, असे पाटील म्हणाले. हस्तांदोलन, गर्दीत जाणे टाळल्यास तसेच फ्लूची साधारण लक्षणे दिसून आल्यास त्याची काळजी घेतल्यास स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवणे शक्य होते, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काय आहे निकाल?

$
0
0

सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाची पात्रता केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८८ कलम २१३ (४) नुसार ठरल्याने त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही याचे उल्लंघन करून राज्य सरकारने नव्याने सेवाप्रवेश नियम तयार केले. त्यानुसार परीक्षेसाठीचे पात्रतेचे काही नियम शिथिल करण्यात आले. त्यानुसार राबविलेल्या परीक्षाप्रक्रियेतून ८३३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, नागपूर खंडपीठाने केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ कलम २१३ (४) नुसार जे उमेदवार पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असतील, त्यांचीच निवड करण्याचे आदेश २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिल्याने या भरतीप्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये मात्र आनंदाचा माहोल आहे. राज्य सरकार आणि लोकसेवा आयोग न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतील, अशी आशाही या उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदवड तालुक्यात अर्धा तास गारपीट

$
0
0

द्राक्षबागांसह टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान

..

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवरगाव (ता. चांदवड) परिसरात वादळी वारा आणि त्यानंतर गारांचा पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांसह, टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.

परतीच्या पावसाने चांदवड भागातील काही गावांना झोडपले. यामध्ये देवरगाव, भोयेगाव या गावांच्या परिसरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास गारपीट झाली. या परिसरात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. पालवी फुटण्याच्या स्टेजला असलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. तसेच, या भागामध्ये टोमॅटो आणि झेंडूच्या फुलांची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. गारांच्या पावसाने झेंडूची शेतीचेही नुकसान झाले आहे. झेंडूची झाडे आडवी पडली आहेत. टोमॅटो पिकाचेही अतोनात नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटांत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हसरूळ परिसरातील शिवाजीनगर भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत धारदार चाकूचा वापर करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांपैकी पाच जणांना अटक केली आहे.

विजय दत्तात्रेय उगले (वय २६, रा. श्रीराम पार्क सोसायटी, शिवाजीनगर) आणि नागेश ओंकारनाथ मरकड (२२, हिरावाडी) अशी जखमींची नावे आहेत. विजय उगले याने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी साडेदहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील बजाज शोरूम पाठीमागे तो उभा असताना गंजपथ परिसरातील भुऱ्या ऊर्फ अनिकेत रमेश बागूल, भूषण देशमुख, नागेश मरकर (दोघेही राहणार हिरावाडी) आणि पुष्पक माने आदींनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून पोबारा केला. त्याचप्रमाणे अनिकेत बागूल याच्या तक्रारीनुसार, दुकानातून घराकडे जात असताना विशाल चंद्रमोरे म्हणाला, की भुऱ्याभाई आला आहे, आता मिटून जाईल. यावेळी अनिकेतने कशाला थट्टा करतो, असे म्हटल्याने चंद्रमोरेसह तुषार भोसले, विशाल झांजरे, विजय उगले (रा. शिवाजीनगर) आदींनी मारहाण करीत विजय उगले याने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने मित्र नागेश मरकड याच्या डोक्यास दुखापत केली. या घटनेत पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जामीन दिला असून, हवालदार पगार व कांगणे तपास करीत आहेत.

--

रोकड लांबविली

अंगावर घाण पडल्याचे सांगत मदतीच्या बहाण्याने भामट्याने रोकडसह धनादेश असलेली बॅग लांबविल्याची घटना भक्तिधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सत्यनारायण गौड (रा. तेली गल्ली, रविवार पेठ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी आप्पाची मिसळ या हॉटेल परिसरात ही घटना घडली. राजेंद्र गौड सोमवारी दुपारी भक्तिधाम परिसरात गेले होते. या हॉटेलसमोरून ते पायी जात असताना वाटेत त्यांना एक तरुण भेटला. पँटला घाण लागल्याचे सांगून त्या तरुणाने हॉटेलमधून पाणी घेऊन घाण धुवून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गौड हॉटेलमध्ये गेले असता हॉटेलमधील बाकड्यावर ठेवलेली बॅग घेऊन सदर तरुणाने पोबारा केला. बॅगेत ८२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि एक लाख रुपयांचा धनादेश होता. घटनेचा अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.

--

वृद्धेमुळे चोरटा गजाआड

घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे. वृद्धेने वेळीच आरडाओरड केल्याने हा प्रकार घडला असून, सजग नागरिकांनी पकडून चोरट्यास बेदम चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना काझीगढी भागात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गंगाधर बाविसे (२०, मूळ रा. वाशीम, हल्ली गाडगे महाराज पुलाजवळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दमयंती आत्माराम कराळे (७५, रा. शीतळा देवी, काझीगढी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. दमयंती कराळे या घरात एकट्या असल्याची संधी साधून संशयिताने चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कराळे आपल्या घरकामात व्यस्त असताना संशयिताने उघड्या घरात प्रवेश केला. यावेळी काही कळण्याच्या आत त्याने कराळे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेने वेळीच गांभीर्य ओळखून आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी मदतीला धावून आले आणि संशयित त्यांच्या हाती लागला. नागरिकांनी संशयितास बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला उपनिरीक्षक अनवणे तपास करीत आहेत.

--

जमिनीच्या वादातून हल्ला

जमिनीच्या वादातून टोळक्याने एकावर हल्ला केल्याची घटना कोकणीपुरा भागात घडली. टोळक्याने लोखंडी सळई आणि फायटरचा वापर करीत संबंधितास बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी १३ संशयित आरोपींविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रफ अल्लाउद्दिन, अल्लाउद्दिन अब्दुल कादिर, मोबतसीर अल्लाउद्दिन कोकणी, नजीम गयाउद्दिन कोकणी, शहनवाझ अब्दुल कादिर, गयाउद्दिन अब्दुल कागीर, सल्लाउद्दिन अब्दुल कादरी, शहानवाज मेहमूद कोकणी, अब्दुल्ला अल्लाउद्दिन कोकणी, उसामुद्दिन शब्बीर कोकणी, मोईन शब्बीर कोकणी, शहानवाज सईद कोकणी आणि गुलामउद्दिन गयास कोकणी (रा. सर्व फाळकेरोड, भद्रकाली) अशी संशयितांची नावे आहेत. इफ्तियार गुलाम गौस कोकणी (रा. कोकणीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी इफ्तियार कोकणी मालाबाबा दर्गा परिसरात असताना जमिनीच्या वादातून संशयितांनी लोखंडी रॉड व फायटरने मारहाण केली. या प्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.

--

दुचाकीस्वाराचा मोबाइल खेचला

जमिनीवर पडलेला कागद उचलत असल्याची संधी साधत चोरट्यांनी दुचाकीस्वाराचा मोबाइल खेचून पोबारा केला. ही घटना मायको सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गणपतराव आहिरे (रा. पाटीलनगर, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शनिवारी रात्री मायको सर्कल येथून आहिरे दुचाकीने घराकडे जात असताना ही घटना घडली. रस्त्यात आहिरे यांना फोन आला. त्यामुळे दुचाकी थांबवून ते बोलण्यात व्यस्त झाले. त्यावेळी खिशातील कागद पडल्याने तो उचलण्यासाठी आहिरे खाली वाकले असता दुचाकीच्या सीटवर ठेवलेला त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल पाठीमागून दुचाकीवर आलेल्या त्रिकुटाने पळवून नेला. हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.

--

चार दुचाकींची चोरी

शहरात चार दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरून नेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा अंबड, इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवननगर येथील विजयकुमार सुरेश तिवारी शनिवारी कामानिमित्त राजीव गांधी भवन परिसरात आले होते. सुयोजित संकुल येथे पार्क केलेली त्यांची दुचाकी (एमएच १५, डीजे ८५२५) चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार सातभाई तपास करीत आहेत. दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. डोमू रतिलाल यादव (रा. एमआयडीसी, अंबड) यांची दुचाकी (एमएच १५, जीडी ५७२७) चोरीस गेली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. सिडकोतील साईबाबानगर भागात राहणारा परवेज अलिम इस्माईल शेख हा युवक शुक्रवारी (दि. २८) दुपारी पांडवलेणी भागात गेला असता त्याची दुचाकी (एमएच १५, ईएन २७६८) चोरट्यांनी हातोहात लांबविली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विजयनगर येथील सोपान भास्कर गांगुर्डे (रा. साईपूजा अपार्टमेंट, चेहेडी पंपिंग) यांची दुचाकी (एमएच १५, बीक्यू ०२०६) रविवारी रात्री त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगर, कासवांची चेन्नईतून तस्करी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मगर आणि दुर्मिळ कासवाच्या पिलांची तस्करी चेन्नई येथून होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संशयितांकडून समोर येत असलेल्या या माहितीची खातरजमा सुरू असून, वन विभाग कशा पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करते त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

क्राईम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने सोमवारी दुपारी सारडा सर्कल येथे सापळा रचून फय्याज गयासउद्दिन कोकणी (वय २०, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) आणि सौरभ रमेश गोलाईत (२०, रा. मराठानगर, जेलरोड) या दोघांना अटक केली. कॉलेजचे शिक्षण घेणाऱ्या आणि घरची परिस्थिती अगदीच सधन असलेल्या या दुकलीकडून पोलिसांनी अतिसंरक्षणाची गरज असलेल्या शेड्युल वन गटातील मार्श जातीच्या आठ मगरींची आणि ब्लॅक पॉड जातीची दोन कासवांची पिले हस्तगत केली. संशयितांविरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले, की हा गुन्हा आता वन विभागाकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास याच विभागामार्फत करण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांची तस्करी चेन्नई येथून होत असल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. मात्र, संशयितांनी दिलेल्या या माहितीची खातरजमा लागलीच करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गोड पाण्यात राहणाऱ्या मगरी आणि कासवे यांचे मूळ ठिकाण शोधण्यासाठी त्यांची तपासणी कोलकाता येथील एका संस्थेत करावी लागणार आहे. परराज्यातून दुर्मिळ प्राण्यांची नाशिकमध्ये तस्करी होते. ही तस्करी कोणत्या मार्गे होते, किती दिवसांपासून सुरू होती, तसेच याचे ग्राहक नेमके कोठे आहेत, अशा प्रश्नांचा तपास वन विभागाला करावा लागणार आहे.

--

वन्यजीवांच्या तस्करीत वाढ

मागील काही महिन्यांपासून शहर, तसेच ग्रामीण पोलिसांनी सातत्याने मांडूळ या बिनविषारी सर्पाची तस्करी करणाऱ्या चारहून अधिक टोळ्यांना अटक केली आहे. काही वर्षांपूर्वी शेड्युल वन वर्गात मोडणाऱ्या कासवांची सुटका करण्यात आली होती. आता हा प्रकार समोर आला असून, वन विभागाकडून दाखल गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याने तस्करांचे फावत असल्याचा आरोप प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे. किमान दुर्मिळ प्राण्यांच्या तस्करीच्या गुन्ह्यात वन विभागाने पोलिसांची मदत घेणे आवश्यक झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाखांचा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी जयंतीनिमित्त असलेल्या 'ड्राय डे'च्या पार्श्वभूमीवर परप्रांतातून आलेला चार लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. म्हसरूळ परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, एकास अटक करण्यात आली आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त असलेल्या 'ड्राय डे'च्या पार्श्वभूमीवर सोमवारी दादरा-हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील व राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा मोठ्या प्रमाणात शहरात येणार असून, त्याची वाहतूक गिरणारे-म्हसरूळ मार्गाने होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक मधुकर राख यांच्या नेतृत्वाखालील पथक मद्याची वाहतूक करणाऱ्यांच्या मागावर असताना पहाटेच्या सुमारास दोन वाहने पथकाच्या नजरेस आली. पथकाने वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही वाहनांतील चालकांनी आपली वाहने मखमलाबादच्या दिशेने पुढे नेली. या वाहनांचा पथक पाठलाग करीत असताना संशयितांनी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करीत दिशा बदलली. त्यामुळे एक वाहन पसार होण्यात यशस्वी झाले, तर म्हसरूळ परिसरातील गंजपथ येथे दुसऱ्या कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फसली. पाठीमागून आलेल्या पथकाने तात्काळ धाव घेत चालक पारसला ताब्यात घेतले. या वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये परराज्यात निर्मित आणि राज्यात विक्रीस बंदी असलेल्या चार लाख १९ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा सापडला. घटनेचा पुढील अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान विलास कुवर, विजेंद्र चव्हाण, सुनील पाटील, विष्णू सानप, पूनम भालेराव आदींच्या पथकाने केली.

वाहनांचा सिनेस्टाइल पाठलाग

भरारी पथकाची चाहूल लागताच पसार होण्याच्या प्रयत्नातील वाहनचालकास सिनेस्टाइल पाठलाग करून पकडण्यात आले. संशयिताची कार खड्ड्यात फसल्याने मोठा मद्यसाठा विभागाच्या हाती लागला. या कारवाईदरम्यान संशयिताचा साथीदार वाहनासह पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. पारस देवा वन (वय २९, रा. नांदवा, जि. राजसमंद, राजस्थान) असे मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयित चालकाचे नाव आहे. संशयिताच्या ताब्यातून एमएच ०६, टी ७१५४ या कारसह मद्यसाठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून गांधीजींची बाराफुटी काठी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या महात्मा गांधी मार्ग उपक्रम राबविण्यात आले. यावेळी त्यांच्या काठीची १२ फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. ही काठी शहरवासीयांना पाहण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ठेवली होती. या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी केले होते. काँग्रेसच्या वतीने गेल्या वेळी गांधींच्या चष्म्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती.

यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर, मनपा गटनेते शाहू खैरे, हेमलता पाटील, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेवक समीर कांबळे, सेवादल शहर अध्यक्ष वसंत ठाकूर ज्युली डिसुझा, बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलग, विजय पाटील, सिरोजिद्दिन कोकणी, लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फार्मासिस्ट रुग्णांचे हितचिंतक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात फार्मसी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास औषधांचा अतिरेक व त्याचे दुष्परिणाम यापासून रुग्णांची सुटका होऊ शकते. रुग्णांना शाश्वत औषधोपचार मिळावेत याकरिता सरकारी हॉस्पिटल्समधील फार्मासिस्ट निश्चितच चांगले काम करतात, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटना नाशिक शाखेतर्फे रविवारी सिटी सेंटर मॉल येथील ग्रँड बॉलरूम येथे फार्मासिस्टदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष विजय देवरे, दशरथ वाणी, जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष एफ. टी. खान, सचिव सचिन अत्रे, कार्याध्यक्ष हेमंत राजभोज आदी उपस्थित होते. सांगळे, तसेच आमदार अनिल कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी सांगळे म्हणाल्या, की बदलत्या काळाचा अंदाज घेऊन प्रत्येक घटकाने बदल स्वीकारायला हवेत. औषधनिर्माण क्षेत्रात येणारे नवनवीन संशोधन आत्मसात करणे काळाची गरज आहे. जी. पी. खैरनार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात धुळे, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटल्समध्ये उल्लेखनीय कार्य करणारे औषधनिर्माण अधिकारी प्रकाश भंडारी, तुकाराम सांगळे, जयवंत कुलकर्णी, दिलीप बोंदार्डे, सुनील तेलधुणे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणात जिल्हा परिषदेचा दिल्लीत गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्लीत मंगळवारी हा सन्मान स्वीकारला.

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ऑगस्टमध्ये देशभरात ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाअंतर्गत शौचालय उपलब्धता व वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जाणीव जागृती, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारीमुक्ततेची टक्केवारी आणि पडताळणी, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे, मंदिरे- यात्रास्थळे, घनकचरा व्यवस्थापन, गावातील द्रव कचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अॅप एसएसजी २०१८ द्वारे देशात सर्वाधिक दोन लाख २२ हजार ५५१ प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याने नोंदविल्याने राज्य सरकारने औरंगाबाद येथील कार्यक्रमात जिल्ह्याचा सन्मान केला होता. स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षणात जिल्ह्याला पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. जिल्ह्यात स्वच्छताफेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली असून, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक केंद्र, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतींच्या सुशोभीकरणावरही भर देण्यात आला असून, या चांगल्या कामाची दखल घेऊन आज जिल्हा परिषदेला दिल्लीत सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे आणि सीईओ डॉ. गिते यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय प्रधान सचिव परमेश्वर अय्यर, अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल आदी उपस्थित होते.

पोषण आहार अभियानाचाही गौरव

देशभरात एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले. या अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन नाशिक जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त इंद्रा मालो, सचिव असीम गुप्ता उपस्थित होते.

जिल्हा परिषदेसह ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे हे सर्वांचेच यश आहे.

शीतल सांगळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पितृपक्षात गुरुपुष्यामृताचा दुर्मिळ योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पितृपक्षात येणारा गुरुपुष्यामृत मुहूर्त सोने खरेदीसाठी महामुहूर्त असल्याने त्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची उलाढाल होणार असल्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे. सोने खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नियोजन केले आहे.

सराफ व्यावसायिकांकडे साडेतीन मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, तसेच सोने खरेदीसाठी अनेकदा उत्तम मुहूर्त निवडले जातात. दसरा, गुढीपाडवा अशा मुहूर्तांवर सोने खरेदी केली जाते. काही ग्राहक सोने खरेदीसाठी वार, मुहूर्त पाहून खरेदी करतात. अनेकदा अशुभ नक्षत्रावर सोने खरेदी टाळली जाते. त्याचप्रमाणे काही श्रद्धाळू ग्राहक पितृपक्षात सोने खरेदी करणे टाळतात, तर काही ग्राहक याच काळात सोन्याचे भाव कमी असल्याने मुद्दाम सोने खरेदीला प्राधान्य देतात. मात्र, उद्या येणारा गुरुपुष्यामृत मुहूर्त सर्वांसाठी लाभदायक ठरणारा आहे, असे म्हंटले जात आहे. या वेळी खरेदी केलेले सोने चिरकाल टिकते, असाही समज आहे. पितृपक्षात गुरुपुष्यामृत हा योग अत्यंत दुर्मिळ समजला जातो. त्यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदी करावीच, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या काळात सोने खरेदीसाठी पाटल्या, बांगड्या, अंगठी, चेन, गोफ, टॉप्स, नेकलेस तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मागील महिन्यापेक्षा या महिन्यात सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे खरेदी चांगली होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पितृपक्षात गुरुपुष्यामृत हा मुहूर्त वारंवार येत नाही. अनेक वर्षातून तो येत असतो. त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने खरेदी करावी.

- उल्हास शुक्ल

हा मुहूर्त अनेक वर्षांनी आला असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. पूर्वीप्रमाणे पितृपक्षात सोने खरेदी करू नये, असा समज आता कालबाह्य होतो आहे. त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात उलाढात होणार आहे.

- चेतन राजापूरकर, सराफ व्यावसायिक

सोने भाव

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) : ३१,२०० रुपये

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) : ३० हजार रुपये

चांदी (प्रतिकिलो) : ४० हजार रुपये किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधूवर मेळाव्यासाठी नावनोंदणी सुरू

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे २१ वा राष्ट्रीय वधू-वर मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी वधू-वरांची निःशुल्क नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या मेनरोड येथील बिवलकर लेनमधील दुसानीसवाडा येथील कार्यालयात नावनोंदणी उपलब्ध आहे. २३ डिसेंबर २०१८ रोजी समाजाच्या वतीने भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात वधू-वर मेळावा होईल. संस्थेचे अध्यक्ष श्यामशेठ बिरारी यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी सवलतींचा लाभ देण्याची मागणी

$
0
0

नाशिक : वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधून त्यांना सरकारी सवलतींचा फायदा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये केली जावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्तिवेतनात ६०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य विमा योजना त्वरित लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू करावे, ६० वर्षांवरील शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, त्याकरिता फेस्कॉम संघटनेच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवावे आदी मागण्या महासंघाचे अध्यक्ष द. तु. चौधरी, धनंजय चतुर, केदुपंत भालेराव, श्रीराम काकडे आदींनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यू झाल्याचे भासवून हॉस्पिटलकडून लूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पसरलेल्या स्वाइन फ्लू व डेंगीच्या साथीचा खासगी रुग्णालयांकडून गैरफायदा घेण्याचे उद्योग सुरू झाले असून, साथीच्या आजाराआडून पेशंटची आर्थिक लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला केवळ ताप असताना, डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले. परंतु, दक्ष रुग्णाने दुसऱ्या लॅबमधून रक्तचाचणी केल्यानंतर त्याला डेंग्यू झाला नसल्याचे समोर आल्यानंतर त्याने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्याने थेट महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रार केल्यानंतर वैद्यकीय विभागाने रुग्णालयाच्या कागदपत्रांची पाहणी करीत, तक्रारीत तथ्य असल्याचा दावा केला आहे.

शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून, स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या महिन्यात शहरात डेंग्यूचे १६५ तर स्वाईन फ्लूचे १३६ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या साथीच्या आजारांमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, रुग्णांमधील या भीतीचा गैरफायदा खासगी रुग्णालयांकडून घेतला जात असून, थेट रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. व्हायरल फिवर असला तरी त्याला डेंग्यू किंवा स्वाइन फ्लू असल्याचे सांगून त्यांच्यावर उपचार केला जात असल्याचा प्रकार घडत आहेत. पंचवटीतील मार्केट यार्डालगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये १ ऑक्‍टोबरला मुन्ना उर्फ पप्पू शेख हा उपचारासाठी दाखल झाला. डेंग्यू असल्याचा संशय व्यक्त करून रुग्णालयाकडून रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असता अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे शेख यांना संशय आल्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन एका लॅबमध्ये तपासणी केली. त्यात डेंग्यू नसल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने प्रशासनाला जाब विचारला. परंतु, रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे आल्याने त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे धाव घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांनी रुग्णालयाला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली असता, तक्रारीत तथ्य आढळून आले. विशेष म्हणजे अशा प्रकारचे चार ते पाच रुग्ण असल्याचे समोर आले असून, रुग्णालयाला नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन नगरसेवकांचा दबाव

ही घटना घडल्यानंतर हॉस्पिटलच्या बचावासाठी भाजपच्या दोन नगरसेवकांनी वैद्यकीय विभागाच्या पथकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एका नगरसेविकाच्या नातेवाईकाकडे दुर्लक्ष केल्यावरून थेट वैद्यकीय अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी चक्क रुग्णांचा बचाव सोडून हॉस्पिटलच्या बाजूने उभे राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुग्णाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात तपासणी केली असता सदरील तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. आयजीएम टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरच डेंग्यू बाधित असल्याचे निष्पन्न होते. परंतु, रुग्णालयाने तापाच्या आधारावरच डेंग्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. सदरील रुग्णालयाला नोटीस दिली जाणार असून, मंगळवारपासून शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे.

- डॉ. जयराम कोठारी, वैद्यकीय व आरोग्य अधीक्षक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांची अंतरे-नाशिक

$
0
0

गांधीजींची शिकवण हृदयात!

महात्मा गांधी हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले. त्यांनी दाखवून दिले की अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गानेही देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येते. त्यांची शिकवण आणि आयुष्य जगातील अनेक नेत्यांना प्रेरणादायी ठरले. महात्मा गांधी यांनी आपल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाच्या रूपाने प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत. आपण त्यांचे बलिदान केव्हाच विसरू शकत नाही.

प्रियदर्शनी प्रकाश, नाशिकरोड

शरद पवार दुटप्पी

काँग्रेसने राफेलचा मुद्दा उचलून धरला आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येतात तसे तसे राहुल गांधी अधिकच आक्रमक पवित्रा घेत आहेत. पण शरद पवार हातचे राखून खेळी खेळत आहेत. युती काँग्रेससोबत करायची आणि जास्तीच जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या. त्यानंतर आपले बहुसंख्य खासदार निवडून आणले की निवडणुकीनंतर भाजपशी वाटाघाटी करायला मोकळे! अशी दुटप्पी भूमिका पवारांची असते. एकीकडे त्यांनी राफेल विमान करारत पंतप्रधान मोदीजींना क्लीन चिट दिली आणि दुसरीकडे प्रकरणाची चौकशी संसदीय समितीकडे देण्याची मागणी करून काँग्रेसला पाठिशी धरलं आहे.

विकास जोग, नाशिक

पाकला अद्दल घडवा

पाकिस्ताने मागील काही वर्षांत सीमा भागात खूपच धुमाकूळ घातला आहे. खरेतर या प्रकाराबद्दल पाकिस्तानला धडाकेबाज प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवून सतत भारताची हानी केली जाते. भारताचे अनेक निरपराध नागरिक, जवान, पोलिस कर्मचारी निष्कारण बळी पडतात. भारताने पाकिस्तानला शेकडो वेळा इशारे दिले; पण पाक त्याला भीक घालत नाही. पाकिस्तानात कोणताही पक्ष निवडून आला, तरी तेथे सत्ता फक्त लष्करच चालवीत असते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी तयार करून, त्यांचा पुरवठा भारतासह अनेक देशांत केला जातो. पाकिस्तान व चीनची छुपी, अभद्र युती आहे. त्या जोरावर 'पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज आहे, त्यामुळे आमची कुरापत काढून नका; अन्यथा भारताला धडा शिकवू,' अशी त्या देशाची गुर्मीची भाषा असते. त्यामुळे आता १९६५, १९७१ प्रमाणे पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

- सतीश शिंदे, नाशिक

शास्त्रीजींचे स्मरण

महात्मा गांधी यांच्या जयंतीसोबत दोन ऑक्टोबरला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती देशभरात साजरी होत असते. शास्त्री यांच्यासारखा विद्वान आणि सालस पंतप्रधान आपल्या देशाला लाभला, हे आपले भाग्यच! शास्त्रीजींची मूर्ती लहान असली, तरी १९६५ च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता आणि आपले काळीज पोलादाचे असल्याचे दाखवून दिले होते. देशातील जनतेला पुरेसे अन्न खायला मिळत नाही, म्हणून स्वत: एक वेळ जेवून राहणारा हा नेता होता. लालबहादूर शास्त्रींचे गुण अंगी बाणवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

- सुरेखा दिघे, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images