Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मला बंड करायला भाग पाडू नका

0
0

आमदार अनिल गोटे यांचा टोला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माझ्या रक्तात भाजप असून, निवडणुका कशा लढायच्या हे आम्हाला बाहेरच्यांनी शिकवू नये. मला बंड करायला भाग पाडू नका, मी बंड केले तर सर्वांना थंड करून टाकेल, असा टोला आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांतील विरोधकांना नाव न घेता लगावला.

धुळ्यात मंगळवारी (दि. २) भाजप महानगर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार गोटे बोलत होते. माझ्या भानगडीत पडू नका, युद्धाचे काही नियम असतात ते मला माहिती आहेत. युद्ध सुरू होण्याआधी सुरुंग पेरावे लागतात. त्यामुळे मी आजपर्यंत शहरातील विविध भागांत ३३ सभांमधून जागोजागी सुरुंग पेरले आहेत, अशी मिश्किल टिप्पणीही आमदार अनिल गोटे यांनी केली. महापालिका निवडणुकीसाठी ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशी शहरातील शिवतीर्थावर सभा होईल व त्यात महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असेही आमदार गोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी शहरातील पाझंरा नदीकिनारी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, भिमसिंग राजपूत, तेजस गोटे, अ‍ॅड. अमित दुसाणे, अमित खोपडे, शिरीश शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र भाजपच्या महानगरप्रमुखांसह प्रमुख कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती. आमदार गोटे यांनी आपल्या भाषणात स्वपक्षीयांसोबत विरोधकांवरही कडव्या शब्दाचा भडिमार केला. माझ्याकडे प्रत्येक वॉर्डातून निवडणूक लढविण्यासाठी आठ ते पंधरा उमेदवार आहेत. आजपर्यंत ३१७ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत, असेही आमदार गोटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे सफाई कामगारांचा छळ थांबविण्याची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील सफाई कामगारांना केवळ सहा हजार पगार न देता करारानुसार पूर्ण चौदा हजार पगार व अन्य सुविधा द्याव्यात, भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, कामगारांचा छळ थांबवावा आदी मागण्या आम आदमी पार्टीने केल्या आहेत.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भावे यांनी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराच्या सुपरवायझरची भेट घेतली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी गिरीश उगले, संतोष राऊत, शुभम पडवळ आदी उपस्थित होते. गरीब सफाई कामगारांनी आम आदी पार्टीला आपल्यावरील अत्याचाराची माहिती देऊन न्याय देण्याची विनंती केली होती. भावे यांनी सुपरवायझरशी चर्चा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यावेळी स्थानिक गुडांना ठेकेदाराने बोलावले. त्यावरून कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांचे कार्यालय गाठले असता ते बंद असल्याचे आढळले. त्यामुळे नाशिकपासून भुसावळपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे हात या भ्रष्टाचारात गोवले असल्याचा आरोप भावे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात खांदेपालट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यू, स्वाईन फ्लूसह साथीच्या वाढलेला प्रादुर्भावामुळे महापालिकेवर होत असलेली टिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी गंभीरपणे घेतली असून, वैद्यकीय विभागात बुधवारी मोठे फेरबदल केले. महापालिकेचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी पदावरून डॉ. जयराम कोठारी यांची उचलबांगडी केली असून, मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राहुल गायकवाड यांच्याकडे आरोग्य व वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. सोबतच बिटको, मोरवाडी, इंदिरा गांधी व डॉ. जाकीर हुसैन रुग्णालयाच्या प्रमुखांचीही उचलबांगडी करत तेथे नवीन प्रमुखांची नियुक्ती केली आहे. मुंढेंनी एकाच दिवशी वैद्यकीय विभागात बदल केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरात गेल्या महिन्याभरापासून स्वाईन फ्लू, डेंग्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, पालिकेडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप केला आहे. सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लूने सात जणांचा बळी गेला आहे. तर, डेंग्यूनेही दोघांचा जीव घेतला आहे. सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही साथीच्या आजारांचा प्रकोप कायम आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. वैद्यकीय विभाग साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात अपयशी ठरला आहे. त्यातच गेल्या महासभेत महापौरांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांना निलंबित करण्याचे आदेश देत तसा ठरावही प्रशासनाला सादर केला होता. त्यामुळे आरोग्याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत मुढेंनी वैद्यकीय विभागात बदल केले आहेत. आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांचा पदभार हा मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राहुल गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

डॉ. जयराम कोठारींचे डिमोशन

बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जयंत फुलकर यांचीही उचलबांगडी करण्यात आली असून, बिटकोचा पदभार आता डॉ. सुषमा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, डॉ. जाकीर हुसैन रुग्णालयाचा पदभार डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याकडून काढून घेत, तो डॉ. फुलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. राजेंद्र भंडारींकडे मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रमुख पदाचा पदभार डॉ. शिल्पा काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर डॉ. जयराम कोठारी यांचे डिमोशन करत, त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. शहरातील वाढच्या साथींच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रानेच रचला दरोड्याचा बनाव

0
0

मुंबईतील तरुणासह पिंपळगाव बहुल्यातील संशयित गजाआड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यातील मालदार व्यापारी मित्रांना लुटण्यासाठी त्यांच्याच एका मित्राने पिंपळगाव बहुला येथील काही साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट शिजविल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. अवघ्या १२ तासांत संशयितांना गजाआड करीत या मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील रहिवाशी रिकी नरेश अग्रवाल, मदनमोहन बाबुलाल अग्रवाल हे व्यापारी आहेत. मुंबईत राहणाऱ्या प्रकाश भडाले यांच्यासह ते कारने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागले असता दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांनी त्र्यंबक-नाशिक मार्गावर खंबाळे फाटा येथे कार थांबविली. मदनमोहन हे लघुशंकेसाठी गेले असता दोन दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी या तिघांना मारहाण करून त्यांच्या खिशातील रोकड, मोबाइल असा दोन लाख ६० हजारांचा मुद्देमाल हिसकावला. त्यांनतर संशयितांनी तेथून पोबारा केला. अग्रवाल यांनी या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची दखल घेऊन पोलिसांनी लगेचच तपासचक्रे फिरविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी फिर्यादी रिकी अग्रवाल यांच्याकडून घटनेची अधिक माहिती समजून घेतली. संशयित हे आसपासच्या परिसरातील असण्याची शक्यता बळावल्याने त्या दिशेने तपास करण्यात आला. काही खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव बहुला शिवारात नवनाथ गंगाराम झुरडे (वय ३०), अनिल सोनु गुंबाडे (वय ३१), लक्ष्मण छबू गुंबाडे (वय ३२, सर्व रा. भवानी चौक, पिंपळगाव बहुला) यांना ताब्यात घेतले. योगेश दादू पगारे (रा. जाधव संकुल, सातपू), बाबा यांच्या सहकार्याने हा गुन्हा केल्याची कबुली संशयितांनी दिली. तपासादरम्यान पोलिसांना भडाले याच्यावरही संशय आला. त्यामुळे त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

असा रचला बनाव

व्यापारी असलेल्या आपले मित्र अग्रवाल यांच्याकडे भरपूर पैसे असतात. त्यामुळेच त्र्यंबकसाठी दर्शनाला जाताना काही विधी तसेच खरेदीसाठी पैसे सोबत राहू द्या, असे संशयितांनी त्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी पैसे सोबत ठेवले. पिंपळगाव बहुला येथील मित्रांना माहिती देऊन लुटमारीचा कट रचला. संशय येऊ नये, यासाठी माझा फोनही घेऊन जाण्यास सांगितले. भडाले हा संशयितांच्या संपर्कात असल्याने पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, पाच मोबाइल असा ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, रामभाऊ मुंढे, राजू दिवटे, प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, वसंत खांडवी, जालिंदर खराटे आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाब विचारण्याऐवजी मुदतवाढीची खिरापत

0
0

जलयुक्त शिवार अभियानाची कामे अजूनही अपूर्णच

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षी निवडलेल्या गावांतील कामांची ढकलगाडी सहा महिन्यांनंतरही सुरूच आहे. आता तर शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नाशिक विभागात निवडलेल्या ८४५ पैकी ६६३ गावांतील कामे पूर्ण झाली असून, उर्वरित १८२ गावांतील कामे अपूर्णावस्थेत आहेत. या योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला आजवर एकदाही यश मिळालेले नाही. तरीही शासनाकडून प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी मुदतवाढीची खिरापत वाटली जात आहे.

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान योजना डिसेंबर २०१४ साली कार्यान्वित झाली. या योजनेचे पावसाचे अधिकाधिक पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करण्याचे मुख्य उद्दिष्टे आहे. या योजनेत २०१५-१६ यावर्षी नाशिक विभागातील ९४१, २०१६-१७ मध्ये ९००, २०१७-१८ मध्ये ८४५ आणि २०१८-१९ या वर्षासाठी १ हजार १२५ गावांची निवड करण्यात आली. पहिल्या दोन वर्षांतील १ हजार ८४१ गावांमधील आराखड्यांनुसारची कामे पूर्ण झाल्याने ही सर्व गावे जलपरिपूर्ण झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. मात्र २०१७-१८ या वर्षी निवडलेल्या ८४५ पैकी मुदत संपून सहा महिने उलटल्यावरही अद्याप १८२ गावांतील कामे पूर्ण झालेली नाहीत. या वर्षीच्या ६६३ गावांतील १९ हजार ६३२ पैकी ९१ टक्के म्हणजेच १७ हजार ७७९ इतकीच कामे पूर्ण झाली. तर ९ टक्के कामे अद्यापही अपूर्ण आहेत. या ६६३ गावांतील १७ हजार ७७९ कामांवर आतापर्यंत १६२ कोटी ६५ लाख रुपये इतका खर्चही झाला आहे. या वर्षीच्या कामांसाठीच्या आराखडा निधीतील अजून मोठा निधी वापराविना पडून आहे.

कारवाई शून्य

वास्तविक बघता जलयुक्त शिवार अभियान योजनेची कामे मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी शासनाकडून शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

..

वर्ष २०१७-१८ मधील कामे

निवडलेली गावे : ८४५

कामे पूर्ण झालेली गावे : ६६३

गावांतील कामे अपूर्णावस्थेत : १८२

...

वर्षनिहाय निवडलेली गावे

२०१५-१६ : ९४१

२०१६-१७ : ९००

२०१७-१८ : ८४५

२०१८-१९ : १,१२५

..

विभागातील जलयुक्त शिवार अभियान प्रगती (२०१७-१८)

जिल्हा....प्रस्तावित कामे....पूर्ण झालेली कामे

नगर.............७,९४१..........७,१०१

नाशिक........४,१८३............३,९७१

जळगाव........४,०९३...........३,७६९

नंदुरबार........१,८९५...........१,६२५

धुळे............१,५२०............१,३१३

एकूण...........१९,६३२.........१७,७७९

..

जलयुक्त शिवार अभियानच्या खर्चाचा लेखाजोखा

जिल्हा....एकूण निधी .... खर्चित निधी (कोटी रु.)

जळगाव........८९.७७...............२३.४०

नाशिक........८८.५३................३२.०८

नंदुरबार........६७.२१...............२९.३२

धुळे............४९.२८................२०.५२

नगर............२००.००..............५७.२२

एकूण...........४९४.७९.............१६२.५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कुटुंब घरकुलात

0
0

राहुलनगर, कालीकुट्टीनगरातील झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी येथील महापालिकेकडून सायने व म्हाळदे शिवारात घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेतील सुमारे सात हजार घरे तयार झाली असून, पहिल्या टप्प्यातील झोपडपट्टीधारकांच्या स्थलांतरणास २९ पासून सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसात १०० हून अधिक कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. त्यानंतर लगेचच या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले.

सन २००९पासून सुरू असलेल्या या घरकुल योजनेत अखेर ९ वर्षांनंतर झोपडपट्टीधारकांना प्रत्यक्ष घर ताब्यात मिळत आहे. याबाबत विरोधकांकडून अनेक आरोप झाल्यानंतर महापौर रशीद शेख व आयुक्त संगीता धायगुडे यांनी नुकतीच संयुक्त पत्रकार परिषद घेवून घरकुल योजना गुणवत्तापूर्ण असल्याचा निर्वाळा दिला. तसेच झोपडपट्टीधारकांनी स्थलांतरित होण्यास सहकार्य करावे तसेच विरोधकांनी यात राजकारण करू नये असे आवाहन केले.

त्यानुसार शहरातील प्रभाग दोनमधील राहुलनगर, कालीकुट्टी नगर येथील झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी पालिका आयुक्त संगीता धायगुडे, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपायुक्त नितीन कापडणीस, अतिक्रमण अधीक्षक दीपक हदगे, पाणीपुरवठा अभियंता सचिन माळवाळ आदींच्या उपस्थितीत येथील झोपडपट्टीधारकांना त्यांचे संसारोपयोगी साहित्य पालिकेच्या वाहनांमध्ये भरून देण्यात आले. त्यानंतर त्यांना सदनिकेत स्थलांतरित करण्यात आले.

रस्ता केला मोकळा

काहींनी झोपडपट्टीमधील भंगार उचलण्यास मुदत द्यावी अशी मागणी केली. मात्र पालिकेच्या पथकाने लगेचच अतिक्रमण हटवित रस्ता मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. उर्वरित झोपडपट्टी धारकांनी निर्धारित शुल्क भरून स्थलांतरित व्हावे, असे आवाहन आयुक्त धायगुडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांचे शहर व्हावे, ही मुख्यमंत्र्यांची इच्छा!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची आरोग्य व्यवस्थाच सलाइनवर गेल्यावरून शिवसेनेने थेट नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनाच आता लक्ष्य केले आहे. 'डासांची उत्पत्ती असलेले शहर म्हणून नाशिकचा लौकिक(?) व्हावा, यात नाशिक देशात प्रथम क्रमांकावर यावे' यासाठीच दत्तक पित्याने भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाला आदेश दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेशच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या हाती टेकवला असून, या पत्राची पालिकेसह भाजपात जोरदार चर्चा आहे. पत्राचा आशय असा...

महोदय, आज माझ्या दत्तक शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया यांसारखे अनेक साथीचे रोग पसरत आहेत. नागरिक मृत्युमुखी पडत आहेत व दवाखानेही ओसंडून वाहत आहेत. परंतु, या सर्व प्रकाराला विरोधी पक्ष व काही अतिशहाणे नागरिक डासांना जबाबदार धरीत आहेत. हे गरीब बिचारे डास कोणाचेही वाईट चिंतीत नाहीत. केवळ नागरिक त्यांना त्रास देत असल्यामुळे ते त्यांना चावा घेतात इतकेच. परंतु, विरोधी पक्ष व नागरिक आततायीपणा करून या डासांचा समूळ नायनाट करण्याची भाषा वापरतात. त्यामुळे माझ्या संवेदनशील मनाला अतिशय क्लेश होतोय. त्यामुळे या डासांचा नायनाट होऊ नये व त्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला पाठिशी घालून फवारणी होत असेल किंवा नसेल पण सर्व कसे नियमांत चालले आहे, याची बतावणी करावी. फवारणीसाठी दुय्यम दर्जाची औषधे वापरावी व फॉगिंगसाठी सर्रास रॉकेल वापरावे, जेणेकरुन डासांना अपाय होणार नाही आणि नाशिककर मात्र मनपाच्या कडक शिस्तीचे कौतुक करतील व त्रिसूत्रीनुसार कसे काम चालले आहे हेसुद्धा नागरिकांना पटवून देता येईल. यामुळे डासांना वाचविल्याचे आपल्याला मोठे पुण्य मिळेल. नाशिकचे सर्व दवाखाने साथीच्या आजारांच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतानासुद्धा परिस्थिती कशी नियंत्रणात आहे, हे पटवण्याची काळजी घ्यावी. अन्यथा कामात दिरंगाई केली म्हणून ताबडतोब निलंबनाचीदेखील कारवाई करावी. तसेच डासांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कासवछाप अगरबत्ती अथवा ओडोनील यांसारखी औषधे मेडिकल स्टोअर्समधून विकण्यासाठी या विक्रेत्यांना बंदी घालावी. ही उत्पादने नागरिकांना उपलब्ध होणार नाहीत, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. साथीचे आजार कितीही झाले व कितीही नागरिक मृत्युमुखी पडले, तरी आकडेवारी मात्र कमीच दिसली पाहिजे, याची काळजी घ्यावी. यामुळे निष्पाप डासांना त्रास होणार नाही. नाशिकचे आयुक्त व महापौर यांच्या 'वॉक विथ कमिशनर' व 'महापौर आपल्या दारी' या कार्यक्रमांमध्ये प्रशासन व्यस्त आहे. त्यामुळे महापालिकेला डास निर्मूलनासाठी व नाशिककरांच्या खऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळच कुठे मिळतो? त्यामुळे डासांसाठी ही अतिशय चांगली बाब आहे. यापुढे दत्तक नाशिक शहर हे प्रामुख्याने विविध रोग पसरवणारे डासांची उत्पत्ती असणारे शहर म्हणून ओळखले जावे, या दृष्टीने प्रयत्न करावे व यामध्ये नाशिक शहराचा प्रथम क्रमांक आला पाहिजे. वरीलप्रमाणे सर्व सूचनांचे आपण पालन करून डासांची उत्पत्ती वाढविण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे पत्र संपवितो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची पालिकेला ‘सुई’!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता आणि कर्तव्यदक्ष आयुक्त असतानाही शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूसह वाढत्या साथीच्या आजारांच्या प्रादुर्भावामुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष शिवसेनेने आक्रमक होत, महापालिकेत उपरोधिक आंदोलन केले. 'ही कसली भाजपची लाट, डेंग्यूने लावली नाशिकची वाट','स्मार्टसिटीची लहर, डेंग्यू,स्वाइन फ्लूचा कहर' अशा घोषणा देत, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पालिकेने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर, अधिकाऱ्यांना काळे फासू आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला.

शहरात सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, रुग्णालयांमध्ये पेशंटना दाखल करण्यासाठी जागा नसल्याचे चित्र आहे. व्हायरल फिवरने संपूर्ण शहरच आजारी असताना, महापालिकेकडून मात्र शहर स्वच्छतेचा दावा केला जात आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे आणि हवामानातील बदलांमुळे रोगराई वाढत असताना, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत. शहराचे आरोग्य बिघडले असताना सत्तारूढ भाजप आणि प्रशासन ढिम्म राहिल्याने महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने बुधवारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात ठिय्या मांडत उपरोधिक आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सत्तारूढ भाजप आणि प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा लिहिलेल्या टोप्या सेना नगरसेवकांनी परिधान केल्या होत्या. स्वाइन फ्लूमुळे जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २५ जणांचे बळी गेले असून, त्यात शहरातील ९ तर पालिका हद्दीबाहेरील मात्र शहरात उपचार घेणाऱ्या १६ जणांचा समावेश आहे. गत नऊ महिन्यांत १५५ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सप्टेंबर महिन्यातीलच १३६ जणांचा समावेश असल्याने या आजाराचा प्रादूर्भाव किती मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे स्पष्ट होते. या आजारांच्या साथींमुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले असताना सत्तारूढ भाजप पदाधिकारी आणि आयुक्त केवळ प्रभाग दौरे आणि 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमातच व्यस्त आहे. नाशिककरांच्या आरोग्याविषयी ना सत्ताधाऱ्यांना काळजी आहे, ना प्रशासनाला, असा आरोप करत बोरस्ते यांनी अतिरिक्त आयुक्तांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करणारे उपरोधिक पत्र सादर केले. डेंग्यू तसेच स्वाइन फ्लू निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त बोर्डे यांनी यावेळी जीवशास्त्रज्ञ डॉ. राहुल गायकवाड यांना दिले.

..तर अधिकाऱ्यांना काळे फासू!

स्वच्छतेच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून शहरात फोटोसेशन केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी यावेळी केला. साथीच्या आजारांचे रुग्ण इतके वाढले की रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागाच उरली नाही, अशी वस्तुस्थिती नगरसेवक संतोष गायकवाड यांनी मांडली, तर डास निर्मूलनासाठी जंतुनाशक फवारणी, धुरळणी केवळ कागदावरच असून ठेकेदार मुजोर बनल्याचा आरोप गटनेते विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी दिलीप दातीर, संतोष साळवे, भागवत आरोटे यांनी केला. बिटको रुग्णालयातील औषधांच्या कमतरतेविषयी प्रशांत दिवे यांनी प्रश्न उपस्थित केला. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा, प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशाराही यावेळी बोरस्ते यांनी दिला.

घोषणांनी दणाणली पालिका

- सत्ताधारी मदमस्त, डेंग्यू,स्वाइन फ्लूने नाशिककर त्रस्त

- डेंग्यू,स्वाइनची साथ, हाच का भाजपचा विकास

- स्मार्ट सिटीची लहर, डेंग्यूने केला शहरात कहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेकअप’चे तंत्र त्वचेनुसार वेगवगळे

0
0

'मटा कल्चर क्लब' सभासदांना तज्ज्ञांच्या टिप्स

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रात दांडिया आणि गरबाच्या कार्यक्रमात आकर्षक वेशभूषेसह चांगल्या दर्जाचा मेकअप करणे देखील तरुणींसाठी महत्त्वाचे असते. घागराचोली किंवा साडीचा रंग आणि चेहऱ्याची ठेवण याप्रमाणे मेकअप करावा. नवरात्रीच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमात जाताना तसेच घराबाहेर पडताना थोडासा का होईना मेकअप करा. मेकअपच्या विविध रंगांच्या शेड्समधून स्वतःला अधिक प्रेझेंटेबल करण्यासाठी मेकअप महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाच्या त्वचेनुसार मेकअपचे तंत्र वेगळे असते, असे सांगत मेकअपच्या अनेक महत्त्वपूर्ण टिप्स मेकअप आर्टिस्ट रोहित आणि नूतन मिस्त्री यांनी महिलांना दिल्या.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने त्र्यंबक रोडवरील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था येथे मंगळवारी मेकअप वर्कशॉप झाला. नवरात्रात गरब्यासाठीचा मेकअप करतांना काळजी घ्यावी लागते. कारण गरबा खेळतांना घाम अधिक येतो. घामामुळे मेकअप खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे परफेक्ट मेकअप करणे गरजेचे असते. गरब्यासाठीचा मेकअप करताना वॉटर बेस पॅन केकचा वापर करावा. तसेच फाउंडेशनचा वापरही करता येईल, अशा टिप्स देतांना रोहित मिस्त्री यांनी मेकअपचे प्रात्यक्षिक करून दाखवले. वर्कशॉपमध्ये मिस्त्री यांनी गरब्यासाठीच्या वेगवेगळ्या स्टाइलच्या हेअर स्टाइल आणि राजस्थानी, बंगाली, गुजराती प्रकारच्या साड्या नेसण्याचे तंत्र महिलांना शिकविले. गरबा किंवा कोणत्याही कार्यक्रमात फक्त चेहराच नव्हे तर संपूर्ण बॉडी मेकअपकडे लक्ष द्यावे, मेकअपमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडतेच; शिवाय तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होते, असे त्यांनी सांगितले.

अशा मिळाल्या टिप्स

- चेहऱ्याच्या रंगानुसार कॉम्पॅक्ट शेड्सचा वापरा.

- चेहरा चकचकीत दिसण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ फिरवा. त्यानंतर चेहरा पुसू नका, आपोआप कोरडा होऊ द्या.

- मेकअप करताना ग्लो येण्यासाठी शिमर पावडर वापरा.

- लिपस्टिक खरेदी करताना हाताच्या त्वचेवर टेस्टिंग करू नका.

- ओठांची आणि हाताची त्वचा वेगळी असते; त्यामुळे हातावर टेस्टिंग केल्यास लिपस्टिकची योग्य शेड समजत नाही.

- मेकअप करताना बॉडीसाठी मॉश्चरचा वापर करावा.

- चेहऱ्याला प्रायमर लावूनच मेकअप करावा.

- सनस्क्रिनचा नियमित वापर करा.

- दिवसा लाइट शेड्सच्या लिपस्टिक व आय शॅडो वापरा.

- मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचाच वापर करा.

- आयर्न किंवा ड्रायर वापरण्यापूर्वी सिरम लावल्यास केसांची हानी होत नाही.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराची नवी नोट बाजारात दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शंभराची नवी नोट बाजारात दाखल झाली आहे. जांभळ्या रंगाची ही नोट नागरिक व व्यावसायिकांच्या उत्सुकतेची बाब झाली आहे. त्यांनी तिचे स्वागत केले आहे.

शंभराची नवी नोट स्टेट बँकेच्या शाखांमधून चलनात आली आहे. मात्र, वितरण कमी असल्याने सामान्यांपर्यंत ती अजून पोहचलेली नाही. या नोटेवर पुढील बाजूस महात्मा गांधीजींचे चित्र आहे. तर मागील बाजूस राणी का वाव हे महालाचे चित्र आहे. स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छता की और असा संदेश आहे. नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये या नोटांची छपाई करण्यात आली आहे. मध्यंतरी नाशिकरोडच्या प्रेसमधून शंभराच्या नोटेचे छपाई थांबविण्यात आली होती. हे काम अन्यत्र देण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरू झाले आहे. शंभराची जुनी नोट चलनात कायम राहील, ती रद्द केली जाणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने पूर्वीच स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेमळा चौफुली अपघातकेंद्र

0
0

गतिरोधक, सिग्नलच्या मागणीसाठी नागरिकांचा रास्ता रोको; पूर्तता होत नसल्याने संताप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या गंगापूर नाक्याहून मखमलाबाद नाक्याकडे जाणाऱ्या मोरे मळा चौफुली रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, ही चौफुली अपघातकेंद्र बनली आहे. या परिसरातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गतिरोधक, सिग्नल बसवण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार करूनदेखील त्याची दखल घेतली न गेल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी (दि. ३) सकाळी रास्ता रोको केला.

रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत्या वाहतुकीबरोबर वाढत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशीच घटना, मंगळवारी (दि. २) जुन्या गंगापूर नाक्याहून मखमलाबाद नाक्याकडे जाणाऱ्या मोरे मळा चौफुली रस्त्यावर घडली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच बुधवारी (दि. ३) सकाळीही याठिकाणी अपघात झाला. लागोपाठ होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांनी गतिरोधक व सिग्नलची मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही न झल्यानेचे बुधवारी सकाळी नागरिकांनी संतप्त होत चौफुलीवर रास्ता रोको केला.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परिसरातील नागरिक सातत्याने गतिरोधक, सिग्नलच्या मागणीसाठी आग्रही आहेत. अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याची दखल न घेतली झाल्याने हा संताप उसळला. या घटनेची दखल घेण्यासाठी आलेल्या पोलिसांशीही नागरिकांची बाचाबाची झाल्याने तीन व्यक्तींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत दुपारी त्यांना सोडून देण्यात आले. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एका ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक करण्याचा शब्द सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी या वेळी स्थानिकांना दिला.

मोकाट कुत्र्यांमुळेही अपघात

या परिसरात लॉन्स, शेती असल्याने काही रस्ता दोन्ही बाजूंनी मोकळा आहे. त्यामुळे वाहनाचा वेगही जास्त असतो. यात भरीस भर म्हणजे मोकाट कुत्र्यांचा येथे प्रचंड वावर असून, अचानक वाहनांसमोर येणाऱ्या कुत्र्यांमुळे दर दिवसाला अपघात होत आहेत. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताही मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली आहे.

आम्ही तीन वर्षांपासून सिग्नल, गतिरोधकाची मागणी करून त्याचा पाठपुरावा घेत आहोत. पण प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. परिसरात शाळांची अनेक मुले असून, त्यांच्यासाठी तर या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

- योगेश पाटील, स्थानिक

या परिसरात वारंवार अपघात होतात. आम्ही नगरसेवकांद्वारे महानगरपालिकेत पत्र, स्मरणपत्र दिले तरीदेखील काहीही उपाय करण्यात आला नाही. मनपा अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता अधिकारी टेंडर निघाल्यानंतर मागणी पूर्ण होईल म्हणतात.

- युवराज पेखळे, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर आजपासून प्रभागांच्या दारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून नागरिकांशी संवाद करण्यासाठी सुरू केलेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाला उत्तर देण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनीही गेल्या महासभेत महापौर आपल्या दारी उपक्रमांची घोषणा केली होती. महापौरांच्या या उपक्रमाची गुरुवार (दि.४) पासून सुरुवात होत असून, नाशिकरोड स्थित प्रभाग क्र. १९ व २२ मध्ये जावून त्या प्रभागाची पाहणी व नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्तांसह पालिकेचेही अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या महासभेत नगरसेवकांनी विकासकामांवरून आयुक्त तुकाराम मुंढेंचीच कोंडी केली होती. प्रभागात समस्या व प्रश्न असतानाही, मुंढेंच्या त्रिसुत्रीमुळे कामे होत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप असून, नगररसेवकांनी महासभेत यासंदर्भातील खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे महापौरांनी नगरसेवकांसह नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी वॉक विथ कमिशनरच्या धर्तीवर महापौर आपल्या दारी या उपक्रमाची घोषणा केली होती. प्रभागातील रस्त्यांच्या कामांसाठी महापौरांनी प्राकलन तयार करण्याच्या सूचना दिल्या असून, नगरसेवकांकडून प्रभागातील कामे ऐकून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता नाशिकरोड सभापती पंडित आवारे यांच्या प्रभागापासून पाहाणी दौरा सुरू केला जाणार आहे. या दौऱ्यास आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजप गटनेता संभाजी मारूस्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी असणार आहे. दौऱ्याच्या निमित्ताने सध्या नागरिकांमध्ये भाजपमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रभागातील कामे ऐकून घेतल्यानंतर त्यांची यादीही तयार केली जाणार असून, या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेसह अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्ती फाउंडेशनतर्फे ‘स्वच्छ किल्ला’ मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वप्नपूर्ती फाउंडेशन व के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रामशेज किल्ला स्वच्छ मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यांचे जतन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक पर्यटक किल्ल्यावर मौजमजेसाठी जातात व कचरा करतात. यामुळे किल्ल्यांचे पावित्र धोक्यात येते. हे लक्षात घेऊन स्वप्नपूर्तीच्या स्वयंसेवकांनी अशा किल्ल्यांची स्वच्छता व त्याबाबत जनजागृती करण्याचे ठरविले आहे.

स्वप्नपुर्तीतर्फे या उपक्रमासह वृक्षारोपण, शालेय भेट, गणेश मूर्ती संकलन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व स्वयंसेवक हे त्यांच्या पॉकेटमनीमधून स्वप्नपूर्तीचे उपक्रम पार पाडत असतात. या उपक्रमात चाळीशहून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तरित्या आपला सहभाग नोंदविला. यासाठी स्वयंसेवकांना के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य. डॉ. के. एन. नांदूरकर, कॉलेज एनएसएस युनिटचे प्रमुख डॉ. एन. बी. गुरुळे, स्वप्नपुर्ती स्वयंसेवक अथर्व पाटील, जयेश पोकर, तन्मय छुरी, श्रुतिका देवरे व तेजस कंगने यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू लशीचा तुटवडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात साथीचे आजार आणि स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. राज्यभरात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक संशयित नाशकात असल्याचे दिसून आले आहे. असे असताना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लशीचा नाशकात तुटवडा असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलने मागणी करुनही त्यांना लस उपलब्ध न झाल्याने पेशंटला बाजारातून लस खरेदी करावी लागत आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतरही साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. सिव्हिलसह खासगी हॉस्पिटलमधील बेड रुग्णांसाठी शिल्लक नसल्याचे एकीकडे वास्तव आहे, तर दुसरीकडे सिव्हिलने मागणी केलेल्या स्वाइन फ्लूच्या लशी अद्याप उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. शहरात साथीच्या आजारांमध्ये जवळपास प्रत्येक घरात तापाचा एक पेशंट आहे. काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेऊन स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला. नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूचे पेशंट असल्याची बाब त्यात निदर्शनास आली. असे असतानाच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लशीचा तुटवडा असल्याची बाब स्पष्ट होत आहे. दरवर्षी सिव्हिलमध्ये १० ते १५ हजार स्वाइन फ्लू लस मागविण्यात येतात. यंदा पाच हजार लशी सिव्हिल हॉस्पिटलने मागविल्या. यंदा प्रादूर्भाव अधिक असताना लशींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सध्या पंचवीसहून अधिक पेशंटवर उपचार सुरू आहेत. तर, खासगी हॉस्पिटलमध्येही स्वाइन फ्लूचे पेशंट उपचार घेत आहेत. मात्र, सिव्हिलकडे तुटवडा असल्याने तब्बल १५०० रुपयांना लस विकत घेण्याची वेळ पेशंटवर आली आहे.

पुण्यातून लशी आल्या नाहीत

शहरात स्वाइन फ्ल्युने प्रकोप केला असताना पुण्यातील आरोग्य विभागाच्या ऑफिसमधून या लशी सिव्हिलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या लशींबाबत सिव्हिल हॉस्पिटलकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. सिव्हिलमधील स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस मुख्यत्वे गरोदर महिलांना आणि सिव्हिलमधील कार्यरत डॉक्टर व इतरांना देण्यात येते. रुग्णांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाच लस उपलब्ध होत नसेल तर सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम कोण असणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्काराने वाढते जबाबदारी

0
0

आमदार किशोर दराडे यांचे प्रतिपादन

किनो शिक्षा गौरव पुरस्कार वितरण संपन्न

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बदलत्या काळात शिक्षकांनी ज्ञानरचनावादाचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शाळांचा गुणवत्ता आलेख उंचावतो आहे ही कातुकास्पद बाब आहे. पुरस्काराने शिक्षकांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो व सामाजिक जबाबदारी देखील वाढते, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी येथे केले.

येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य व जिल्हा स्तरीय किनो शिक्षा गौरव पुरस्कार देऊन गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. मंगळवारी येथील माळी समाज मंगल कार्यालयात किनो शिक्षा गौरव पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी आमदार दराडे बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शांताराम भामरे, ज्येष्ठ पत्रकार एल. बी. चौधरी, संस्थेचे सचिव रईस शेख, उपाध्यक्ष सोहेल कुरेशी, विश्वस्त मतीन कुरेशी, नितीन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी सचिव रईस शेख यांनी प्रास्ताविकातून पुरस्काराची भूमिका मांडली. आमदार दराडे म्हणाले, किनो संस्थेकडून शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पुरस्कार्थींमध्ये विनोद राठोड, कुऱ्हाडे, विनोद भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थी शिक्षक व शाळांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक नवीद कुरेशी, मोहम्मद रियान, खालीक कुरेशी, अन्सारी नेइम, रोहित चव्हाण, अर्चना गरुड आदींसह संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक हिरे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक रोहित चव्हाण यांनी आभार मानले.

पुरस्कारार्थी शिक्षक व शाळा

राज्यस्तरीय पुरस्कार - विनोद राठोड (जिल्हा अमरावती )

जिल्हास्तरीय पुरस्कार - महारू निकम, अरुण इंगळे, भरत पाटील, नानासाहेब कुऱ्हाडे, आशा चिने, सीताराम कदम, राजेंद्र लोंढे, रामदास शिंदे, दीपक व्याळीज, दीपक देशमुख, गजानन उदार, गोरखनाथ जाधव, संजय पाटील, वैशाली सूर्यवंशी, हेमंत बिरारी, सिद्धार्थ सपकाळे, राजेंद्र निकुंभ, गजानन भामरे, अनिल सावंत.

जिल्हा गुणवंत शाळा पुरस्कार - भोयगाव (ता. चांदवड), तालुका गुणवंत शाळा साजवहाळ (ता. मालेगाव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेल्या मानधनासाठी ‘धडक’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह अन्य बिटमधील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मीनीकार्यकर्ती यांचे जून २०१७ पासूनचे मानधन मिळालेले नसल्याने संतप्त अंगणवाडी कर्मचारी यांनी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देत आंदोलकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

बागलाण तालुक्यातील प्रकल्प १ व २ च्या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी शहरातून मोर्चा काढण्यात आला. गटविकास अधिकारी यांच्या दालनात आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मुल्हेर बिटातील अंगणवाडी कार्यकर्तींना गेल्या दीड वर्षांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना जुन्या पद्धतीने मानधन देण्याचे आयुक्तलायाचे आदेश असताना अद्यापपर्यंत ते देण्यात आले नाही. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारने मानधनवाढ दिलेली आहे. ती देखील देण्यात आलेली नाही. तसेच पर्यवेक्षीका अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचेकडून बिले अदा करण्यासाठी चिरीमिरी घेतल्या शिवाय बीले अदा करीत नसल्याचा आरोप उपस्थितांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे सचिव राजेशसिंह, जिल्हाध्यक्ष राजश्री पानसरे, तालुकाध्यक्ष रजनी कुलकर्णी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी शरण जाणे शिकवतात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांधी समजणे इतके सोपे नाही, मलाही समजलेले नाहीत. मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण गांधी पूर्ण समजले आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही. मला गांधी समजले आहे असे जे म्हणतात ते ढोंगी असतात. गांधी साधे राहणे शिकवतात, शरण जाणे शिकवतात. त्यामुळे अहंकार नष्ट होतो हे गांधींनी शिकवले, असे प्रतिपादन मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष जयंतीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्त सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्यावतीने महात्मा गांधी विचारमालेचे आयोजन करण्यात आले होते. या विचारमालेचा प्रारंभ कांबळे यांच्या 'महात्मा गांधी समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानाने झाला. कांबळे पुढे म्हणाले की, गांधींचे जीवन म्हणजे स्वत:ला समजावून घेण्याचा महायज्ञ होता. गांधींना कधीच कुणी मित्र मानले नाही. खुद्द काँग्रेसनेदेखील नाही. नेहरू हे गांधीजींचे सर्वात मोठे टीकाकार होते. काँग्रेसला गांधी फक्त निवडणुकांपुरताच लागतो, नंतर नाही. खरे तर गांधींना पाठराखण फक्त शासकीय भिंत आहे, हे कुसुमाग्रजांचे म्हणणे आपल्याला तितकेसे पटलेले नाही, असेही कांबळे म्हणाले.

व्यासपीठावर देवदत्त जोशी, बी. जी. वाघ, वसंत खैरनार, गिरीश नातू यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संगीता बाफणा यांनी केले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. संपूर्ण वर्षभर दर महिन्याच्या २ तारखेला महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर महनीय विचारवंतांची व्याख्याने महात्मा गांधी विचारमालेमध्ये आयोजित करण्याचा निर्णय सावानाच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे.

गांधींच्या जीवनावरील पुस्तक प्रदर्शन

महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष जयंतीनिमित्त गांधीजींच्या जीवनावरील दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी आयोजित करण्यात आले. सुमारे १५० पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली. येथे नोंदणी करणाऱ्या जिज्ञासू वाचकांना ती पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात स्वतः गांधीजींनी लिहिलेली पुस्तके, अरविंद ताटके, तिनप्पा नायक, वा. ना. गोखले, मनुबेन गांधी, मृणालिनी देसाई, सोमनाथ शुक्ल, एन. आर. अभ्यंकर, त्र्यं. र. देवगिरी, चिं. ना. देशमुख, ग. भा. निरंतर, अलिम वकील यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात -

0
0

सुर्वे वाचनालयातर्फे

पुरस्कारांचे वितरण

नाशिक : क्रांतिकारी कवी नारायण सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या नारायण सुर्वे वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या वर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी चंद्रपुरचे कवी इरफान शेख यांच्या 'माझ्यातला कवी मरत चाललाय' या कविता संग्रहाची निवड केली आहे. सांगलीतील लेखिका मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या कादंबरीची तसेच बुलढाणा येथील लेखक मिलींद जाधव यांच्या 'लल्लाट' कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

आज शांती यात्रा

नाशिक : अहिंसा, प्रेम आणि भारतीय संविधानाच्या रक्षणार्थ गुरुवारी (दि.४) देशव्यापी संवाद शांती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थिनींसोबत हक्क, अहिंसा या विषयावर संवाद साधण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता गडकरी चौक येथील रमाबाई आंबेडकर ज्युनिअर कॉलेज व सकाळी ११ वाजता व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये विद्यार्थिंनींसोबत संवाद साधला जाईल. दुपारी १ वाजता उत्तमनगर येथील शिवपुरी चौक येथे भारतीय महिला फेडरेशनतर्फे मेळावा घेण्यात येईल. यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन फेडरेशनच्या सचिव ज्योती नटराजन यांनी केले आहे.

आरटीओला सुटी

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयास बुधवारी (दि.१०) रोजी घटस्थापनेनिमित्त सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यादिवशी शिकाऊ लायसन्स व पक्के लायन्सनची चाचणी ११ ते २० ऑक्टोबरमध्ये शासकीय सुटी वगळता घेण्यात येईल. तसेच लासलगाव येथील मासिक शिबिर दौरा देखील ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

उद्या स्पर्धा परीक्षा मेळावा

नाशिक : राजहंस प्रकाशनतर्फे सीईटी, जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.५) रोजी गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये हा मेळावा होईल. मेळाव्यात माधव देशपांडे आणि संदिप कुलकर्णी हे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मेळाव्यासाठी विद्यार्थी व पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - उदय सामंत करणार पाहणी

0
0

सामंत करणार पाहणी

नाशिक : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते दुपारी १२ वाजता म्हाडा अंतर्गत आडगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करणार आहे. त्याचबरोबर ते शिर्के कनस्ट्रक्शन कंपनीने बांधलेल्या गृहप्रकल्पाची पाहणी करणार आहे. दुपारी ३ वाजता ते गडकरी चौक येथील कार्यालयात अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवसेना कार्यालयात भेट देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री उद्या नाशकात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस शुक्रवारी (दि. ५) नाशिक दौऱ्यावर येत असून, सरकारी योजनांच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. आठवडाभरातील हा मुख्यमंत्र्यांचा दुसरा दौरा असून, त्यामुळे जिल्ह्यातील संबंध सरकारी यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लागून नाशिकच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी आठ वाजता त्यांच्या मुख्य उपस्थितीत महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये दीक्षांत संचलन समारंभ होणार आहे. त्यानंतर महसूलसह, विविध सरकारी यंत्रणांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झाला नसला तरी ही आढावा बैठक नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.

मुख्यमंत्री या बैठकीत पंतप्रधान आवास योजना, पेयजल योजना, कृषी सिंचन योजना, रस्ते विकास, जलयुक्त शिवार, कायदा आणि सुव्यवस्था, समृध्दी महामार्ग याबाबतचा आढावा घेणार असून, या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला महसूलसह जिल्हा परिषद, नाशिक महापालिका यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

नाशिककरांचे भूमिकेकडे लक्ष!

नागपूर बालेकिल्ला असलेल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गत महापालिका निवडणुकांवेळी नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्यावर विश्वास टाकत नाशिककरांनी महापालिकेच्या चाव्या भारतीय जनता पक्षाच्या हाती दिल्या. परंतु अलीकडच्या काळात महापालिकेने नागरिकांवर लादलेली करवाढ, बससेवेचे भिजत पडलेले घोंगडे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमध्ये उडणारे खटके हे नाशिकमध्ये चर्चेचे विषय ठरले आहेत. यातच स्वाईन फ्लू आणि डेंग्यूने शहर सलाईनवर गेले असून, प्रशासनासह भाजप विरोधाला धार चढते आहे. त्यामुळे महापालिकेच्या बिघडलेल्या कारभाराच्या वारूला मुख्यमंत्री लगाम लावणार का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर महापालिकेतील यंत्रणाही तयारीला लागल्याचे बुधवारी पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images