Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक पोलिसांकरिता ‘समानुभूती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहर पोलिस वाहतूक विभागासाठी २ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे 'ताण-तणाव मुक्ती जीवन' या विषयासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नाशिक शहर वाहतूक विभागातील एकूण चार युनिटच्या पोलिसांनी सहभाग नोंदवला.

विविध सर्वेक्षणांच्या निकालानुसार, भारतातील एकूण ८९ टक्के लोकसंख्या ही ताण-तणावाखाली असल्याचे आकडे समोर आले आहेत. पोलिसदेखील याला अपवाद नाहीत. पोलिसांमधील वाढता तणाव आणि आवश्यक असलेली मानसिक शांततेची गरज ओळखून स्वानुभव इंडिया या संस्थेने जानेवारीपासून पोलिस बांधवांसाठी प्रकल्प सुरू केला आहे. कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही पदावर कार्यरत असला तरी त्या गणवेषाच्या आत असलेल्या व्यक्तीला माणूस म्हणून जगता यावे आणि समाजाने त्या व्यक्तीला आधी एक माणूस म्हणून स्वीकारावे यासाठी 'समानुभूती' हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळेचा मूळ उद्देश हा, पोलिसांमधील रोज आढळणाऱ्या ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल याची ओळख करून देणे आणि त्याकारिता लागणाऱ्या मदतीसाठी पोलिसांमधेच त्यांचा स्वतःचा 'समानुभूती गट' तयार करणे, असा आहे. केवळ व्याख्यान किंवा सल्ला न देता कृतिशील पद्धतीने आणि पोलिसांमध्ये आनंदी आणि मानसिकरित्या सुरक्षित असे वातावरण तयार करीत, स्वानुभव इंडियाच्या संचालिका आणि मानसशास्त्रीय समुपदेशिका दीपाली अवकाळे व त्यांचे सहकारी यांनी ही संपूर्ण कार्यशाळा घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष मुलांचा मंगळवारी महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक मंत्रालय, केंद्र सरकार आणि देणगीदार यांच्या सहकार्याने महाकवी कालिदास कलामंदिर येथे मंगळवारी (दि. ९) सकाळी ९ ते दुपारी ४ या वे‌ळेत विशेष मुलांचा बालमहोत्सव होणार आहे. नाशिकमधील समाजकल्याण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य आहे.

विशेष गरजा असलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नाट्यशाला या सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी नाट्यशालेकडून पुणे, कल्याणसह नाशिकमध्येही बालनाट्य महोत्सव होणार आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नाशिकमधील श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाचे विद्यार्थी 'आता प्रकाश पडला' हे बालनाट्य तर प्रबोधिनी विद्यामंदिर मतिमंद मुलांची शाळा येथील विद्यार्थी 'निसर्गवेल' नावाचे बालनाट्य सादर करणार आहेत. याशिवाय, नाट्यशाला मुंबईतील विद्यार्थी किलबिल, भरारी, शहाणपण देगा देवा नाटकांचे सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवासाठी शहरातील शाळांमधील एक हजार विद्यार्थी व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजव्या कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारावा

$
0
0

नाशिक सायकलिस्टची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ३२ किलोमीटर मार्गाच्या नाशिक उजवा तट कालवा येथे सिटी बस साठी ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर सिटी बस ट्रॅकऐवजी सायकल ट्रॅक उभारावा, अशी मागणी नाशिक सायकलिस्टतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया व सदस्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात शुक्रवारी भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. उजवा तट कालव्यालगत महापालिकेने जॉगिंग ट्रॅक उभारला आहे. आता या ठिकाणी सिटीबससाठी विशेष रस्ता बनविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यासाठी येथील हजारो वृक्षांची कत्तल होईल. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल. त्यामुळे या मार्गावर सायकल ट्रॅक उभारावा अशी निवेदनात करण्यात आली आहे.

शहरात सायकल चळवळ जोर धरत आहे. पुण्यासारख्या शहरात महापालिकेने विशेष ट्रॅक तयार केला आहे. असे असताना नाशिकमध्ये मात्र सायकलिंगसाठी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उजव्या तट कालव्यालगत सायकल ट्रॅक उभारल्यास सायकल चळवळीला बळ मिळेल. सायकलप्रेमींना हक्काचा सायकल ट्रॅक मिळून सुरक्षितताही प्रदान होईल. यापूर्वी वॉक विथ कमिशनर या उपक्रमात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सायकल प्रेमींनी ही मागणी केली होती. त्यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली होती.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असून सायकल प्रेमींसाठी वरील मार्गांवर सायकल ट्रॅक उभारावा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे घालण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी नगरसेवक कुणाल वाघ, नाशिक सायकलिस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईच्या बडग्याने कचरा झाला गायब

$
0
0

कारवाईच्या बडग्याने कचरा झाला गायब (फोटो)

पंचवटी : गोदाघाटाच्या मार्गालगतच्या सुलभ शौचालयाच्याजवळील भागात कायम कचरा टाकला जातो. या ठिकाणी आता महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने फलक लावला आहे. या फलकावर येथे कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख केल्याने येथे कचरा टाकणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

--

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : राहत्या घराच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना चेहेडी पंपिंग स्टेशन येथील विजयनगर भागात घडली. येथील साईपूजा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले सोपान भास्कर गांगुर्डे (वय ३३) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५, बीक्यू २०६) त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीस गेल्याची फिर्याद गांगुर्डे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे.

--

रामकुंडात निर्माल्य (फोटो)

पंचवटी : पितृपक्षात रामकुंडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. येथे श्राद्धविधी पूजा झाल्यानंतर, तसेच गोदावरीची पूजा केल्यानंतर निर्माल्य टाकले जात आहे. निर्माल्य गोदापात्रात सोडू नये असे सांगण्यात येत असले, तरी अनेकांकडून सर्रासपणे ते रामकुंडात टाकले जात असल्यामुळे त्याचा खच नदीपात्रात पडलेला दिसून येत आहे.

--

काकस्पर्शासाठी गर्दी

पंचवटी : पितृपक्षात रामकुंडावर पिंडदान करण्यात येते. मात्र, या ठिकाणी कावळ्यांची कमी झालेली संख्या लक्षात घेऊन काकस्पर्शासाठी पंचवटी अमरधामच्या स्मृतिवन उद्यान परिसरात पिंडदानासाठी गर्दी होत. येथे रामकुंडाप्रमाणेच गर्दी वाढू लागली आहे. दाट झाडीमुळे येथे कावळ्यांची संख्या जास्त असल्याने येथे पिंडदान केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारणासाठी १५ कोटींची मागणी

$
0
0

ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचा मानस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक स्तरावर राबविण्यासह ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम येत्या काळात युद्धपातळीवर हाती घेण्याचा मनोदय या आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला. या कामांसाठी १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असून हा निधी मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता बळावली आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून या योजनेंतर्गत झालेल्या कामांचे फायदे भविष्यात शेतकरीवर्गालाच मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. काही वर्षांपासून जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. यांतर्गत होणाऱ्या कांमामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होते आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून तो शेतांमध्ये टाकल्यास जमिनींची सुपिकता वाढण्यासही मदत होते आहे. गतवर्षी २०१७-१८ मध्ये या योजनेंतर्गत ३५ लाख क्युबीक मीटर काळ काढण्यात आला होता. यंदा म्हणजेच २०१८-१९ मध्ये दुप्पट अर्थात ७० लाख क्युबीक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी पीपीपी तत्वावर टाटा ट्रस्ट आणि शेतकऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाळ काढण्यासाठी टाटा ट्रस्ट मशिनरी पुरविणार असून एकूण खर्चाचा ४५ टक्के वाटा उचलणार आहे. जिल्हा प्रशासन इंधनाचा खर्च करून ४५ टक्के भार उचलणार आहे. तर हा गाळ शेतांपर्यंत वाहून नेण्याकरीताचा १० टक्के खर्चाचा भार शेतकरी उचलणार आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

चार तालुक्यांना फायदा

जलसंवर्धनासाठी जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यावर १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सिन्नर, नांदगाव, मालेगाव आणि येवला या चार तालुक्यांमधील एकूण १७० बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्याचा मानस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला. तीन वर्षांसाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून त्यामध्येही लोकसहभाग घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाराम मंदिर भागात तरूणावर चाकू हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मित्राची भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या टोळक्याने चाकू हल्ला केल्याची घटना काळाराम मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये पाच संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

मयूर राजेंद्र डोंगरे, सिद्धेश राजेंद्र डोंगरे (रा. दोघे पूर्व दरवाजा), शशिकांत रवींद्र भोईर आणि संजय राजेंद्र भोईर (रा. भोईर चाळ, अंधेरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. राजेंद्र दशरथ डोंगरे (रा.पूर्व दरवाजा, काळाराम मंदिर) हे अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे (रा.कृष्णनगर, पंचवटी) हा युवक जखमी झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. तक्रारदार खाडे याचा मित्र अर्जुन बोरकर याचा संशयित मयुरच्या भावाशी वाद सुरू होता. यावेळी खाडे हा वाद मिटविण्यासाठी गेला असता संशयितांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून चॉपरने त्याच्यावर वार केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेगर करीत आहेत.

--

एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा

घरातील शिळा भात खाल्ल्याने कुटुंबातील तिघांना विषबाधा झाली. ही घटना इंदिरानगर भागात रात्री सव्वाबारा वाजता घडली असून, तिघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इंदिरानगर भागातील सदिच्छानगर येथे उदमले कुटुंब राहते. रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास वैष्णवी सुनील उदमले (१५), किरण सुनील उदमले (१३) आणि नवनाथ सुनील उदमले यांनी घरातील शिळा भात खाल्ला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तिघांनाही अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षण दिसू लागताच सुनील उदमले यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

--

शालिमारला महिलेचा विनयभंग

घराच्या पायरींवर बसलेल्या महिलेस अश्लिल चाळे करून दाखविणाऱ्यास जाब विचारला असता त्याने विनयभंग केल्याची घटना शालिमार परिसरातील किस्मत बाग भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. मेहबुब मोहम्मद शेख असे विनयभंग प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शहाजहान मशीद परिसरातील महिला गुरूवारी सायंकाळी आपल्या घराच्या पायरींवर बसलेली असतांना ही घटना घडली. रस्त्याने जाणाऱ्या संशयिताने महिलेकडे बघून अश्लिल चाळे केले. याबाबत महिलेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला शिवीगाळ व दमदाटी करीत विनयभंग केला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

--

सिडकोत तरूणाची आत्महत्या

सिडकोतील त्रिमुर्ती चौक परिसरातील ३५ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

योगेश फकिरा ठाकरे (रा.दत्तमंदिर स्टॉप, त्रिमुर्ती चौक) असे मृत युवकाचे नाव आहे. योगेश ठाकरे याने बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यास तात्काळ उपचारार्थ सिडकोतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना गुरूवारी त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव करंडक एकांकिका महोत्सव आज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई महापालिका कलावंत संघाच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रत्येक विजेत्यास स्मृतीचषक, प्रशस्तीपत्रे आणि एकूण २,१५,००० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

नाशिकसह मुंबई, पुणे, नगर आणि कणकवली या पाच केंद्रात स्पर्धा होणार असून नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी शनिवारी (दि. ६) दिवसभर पलुस्कर नाट्यमंदिर, इंद्रकुंड, पंचवटी येथे होणार असून अंतिम फेरी गुरुवारी, १८ ऑक्टोबरला मुबंईतील दिनानाथ नाट्यमंदिरात होणार आहे, अशी माहिती नाशिक केंद्रप्रमुख विनोद राठोड यांनी दिली. नाशिकमधील प्राथमिक फेरीचा निकाल शनिवारी सायंकाळी ६ वाजता निकाल जाहीर केला जाईल. या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, प्रवेश विनामूल्य आहे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक

सकाळी ९ वाजता : एडिसन (जनरेशन २०००), सकाळी ९.४५ : पुन्हा एक प्रवास (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, आहुर्ली), सकाळी १०.३० : पाऊसपाड्या (जनरेशन २०००), सकाळी ११.१५ : क्षितीजाच्या पलीकडे (कलाकुंभ बहुउद्देशी संस्था), दुपारी १२ : तो, ती आणि नाटक (नाट्यसेवा), दुपारी १२.४५ : स्त्रीभ्रूण हत्या (ओम सिद्ध गायत्री), दुपारी दीड ते दोन भोजनासाठी विश्रांती. दुपारी २ वाजता : भडभुंजी (के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्-रंगश्रेय), दुपारी २.४५ : वेटिंग फॉर सेन्सेशन (सौंदर्य), दुपारी साडेतीन : बाहुल्या (विजीगिषा), सायंकाळी ४.१५ : हे रंग जीवनाचे (विजय नाटय मंडळ), सायं. ५ : अपूर्णांक (व्हाईट शॅडो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीचोरी करणाऱ्यांना दणका

$
0
0

माणिपुंज धरणातून ३०० वीजपंप जप्त

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट गडद झाले असून, दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. सध्या पाणी साठा असलेल्या माणिकपुंज, गळमोडी, चांदेश्वरी या धरण परिसरातून शेतीसाठी पाणी उपसा करण्यास प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांनी बंदी केली आहे. या आदेशानुसार शुक्रवारी नांदगावच्या तहसीलदार भारती सागरे यांनी धडक मोहीम राबवित तब्बल ३७५ वीजपंप जप्त केले. नांदगाव तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. या परिस्थितीत पिण्यासह, जनावरांसाठी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना शर्थ करावी लागत आहे. अशा स्थितीत प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांनी गुरुवारी नांदगाव परिसरातील धरण परिसराला भेट देऊन पाणी उपसा

तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता तहसीलदार भारती सागरे यांनी माणिकपुंज, गळमोडी, चांदेश्वरी येथील धरण परिसरातून तब्बल ३७५ वीजपंप जप्त केले. दरम्यान वीजपंप जप्तीच्या कारवाईमुळे या पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रांत अधिकारी दराडे यांनी व्यक्त केला आहे. माणिकपुंज धरण परिसरातून

३०० तर चांदेश्वरी, गळमोडी धरण परिसरातून ७५ वीजपंप जप्त करण्यात आले आहेत.

नांदगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. पाणीसाठ्याचा योग्य वापर व्हावा, लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, जनावरांना पाणी मिळावे यासाठी यापुढील काळात पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी प्रयत्न आहेत.--भीमराज दराडे, प्रांत अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिटको रुग्णालयात रुग्णांचा पूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातलेले असतानाही नाशिकरोड प्रभागात मात्र महापालिकेकडून साथीच्या आजारांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचे येथील पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरुन उघड होत आहे. बिटको रुग्णालयात दररोज उपचारांसाठी रुग्णांच्या रांगा लागत असून, सध्या या रुग्णालयात १ हजार ३१६ रुग्ण भरती करण्यात आलेले आहेत. गेल्या महिन्यात या रुग्णालयात तब्बल २१ हजार ८७७ इतक्या विक्रमी रुग्णांनी ओपीडीत हजेरी लावली. रुग्णांची दररोज गर्दी उसळत असल्याने शहर साथीच्या आजारांनी पुरते गलितगात्र झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेच्या बिटको रुग्णालयात साथीच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या रांगा रुग्णालयाबाहेरच्या रस्त्यापर्यंत येत आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात या रुग्णालयात २१ हजार ८७७ रुग्णांनी ओपीडीला हजेरी लावली, तर एक हजार ३१६ रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड रुग्णांनी ओव्हरफ्लो झाला आहे. सोनोग्राफी कक्ष, रक्त तपासणी प्रयोग शाळा, औषधे वितरण कक्ष ओव्हरफ्लो झालेले आहेत. औषधांचा साठा पुरेसा असल्याचे या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी, या रुग्णालयात उपचार घेतलेल्या शेकडो रुग्णांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या मेडिकल्समधून औषधे खरेदी करावी लागत आहेत. मलेरिया विभागाकडूनही डासप्रतिबंधक धुरळणी पुरेशा प्रमाणात होत नसल्याची ओरड महापौरांच्या दोन दिवसांपूर्वीच्या दौऱ्यात झाली होती. सिन्नरफाटा येथील पालिकेच्या रुग्णालयातही ओपीडीत रुग्णांची गर्दी होत आहे. गोरेवाडीचे व पंचकचे रुग्णालय बंद झालेले असल्याने या भागातील नागरिकांनाही बिटको रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

ओपीडी ओव्हरफ्लो

बिटको रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णांची गर्दी मावेनाशी झाली आहे. फ्लूचे रुग्ण जास्त असल्याचे या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दररोजच्या ओपीडीत सरासरी ८०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यापैकी बहुतांश रुग्णांची रक्ततपासणीही केली जात आहे. खासगी लॅबमध्ये तपासणी महागडी असल्याने रुग्णांकडून बिटको रुग्णालयालाच प्राधान्य दिले जात आहे. ताप थंडीबरोबरच अतिसाराच्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. स्वाइन फ्लूचे ३० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही. १ ते ३ ऑक्टोबर या तीन दिवसांत ९० रुग्णांना या रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

महिनाभरापासून सर्दी-खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, स्वाइन फ्लू, डेंग्यू यांसारख्या आजाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. स्वाइन फ्लू व डेंग्यूची स्क्रीनिंग सुरू आहे. संशयितांना पालिकेच्या कथडा रुग्णालयात पाठविले जाते.

- डॉ. जयंत फुलकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

थंडी, ताप, सर्दी व खोकला या आजारांनी संपूर्ण कुटूंब त्रस्त आहे. पालिकेकडून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत.

- उत्तम कदम, रुग्ण

पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून शहरातील ब्लॅक स्पॉट पूर्णपणे हटविले असून, मोकळ्या भूखंडांवर वाढलेले गवत काढण्याचेही काम सध्या सुरू आहे. डेंग्यूच्या अळ्यांची निर्मिती होऊ नये यासाठी शहरातील नागरिकांचे प्रबोधन सुरू आहे.

- संजय गोसावी, (विभागीय स्वच्छता निरीक्षक, नाशिकरोड

दररोज सकाळी गटारी, उघडे नाले, नदी काठावर डास प्रतिबंधक फवारणी केली जाते. मलेरिया सुपरवायझर घरोघरी जाऊन डेंग्यूच्या डासांच्या ब्रीडिंगची तपासणी करून नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत.

- डॉ. राहुल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईप्रश्नी बहिष्कारास्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर भागात महापालिकेच्या काही निष्काळजी अधिकाऱ्यांनी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून, ही टंचाई जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सभागृहात बसणारच नाही, असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी घेतला. त्यामुळे अन्य पक्षांच्या नगरसेवकांनीदेखील सभात्याग करून निषेध नोंदवला.

महापालिकेच्या पूर्व प्रभागाची सभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवकांनी विषयपत्रिकेवर मागील तीन महिन्यांपासून एकही विषय न आल्याने नाराजी व्यक्त केली. विषयपत्रिकेवर विषय न येण्यावरून अधिकारी कामच करीत नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अधिकारी साथींच्या रोगांबाबत काहीही कारवाई करीत नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. इंदिरानगरमधील प्रभाग क्रमांक तीस आणि लगतच्या भागात अधिकाऱ्यांनी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. जोपर्यंत इंदिरानगरचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सभागृहात बसणार नाही, असा पवित्रा नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ दीपाली कुलकर्णी व श्याम बडोदे यांनी घेतला. या तिघा नगरसेवकांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे उर्वरित सदस्यांनीदेखील सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पूर्व प्रभागाची गुरुवारची सभा अधिकाऱ्यांवर तक्रारींचा भडिमार करीत संपली.

--

ठोस तोडग्याची अपेक्षा

प्रभाग तीसमधील सर्व नगरसेवक सत्ताधारी भाजपचे आहेत. या नगरसेवकांनी यापूर्वी पाण्यासाठी विविध आंदोलनेसुद्धा केलेली आहेत. मात्र, असे असतानादेखील महापालिकेचे संबंधित अधिकारी सिडकोच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने का पाहत नाहीत, असा प्रश्न सध्याच्या टंचाईसदृश स्थितीमुळे निर्माण झाला आहे. याप्रश्नी ठोस तोडग्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

--

वादात अडकला पाणीप्रश्न

इंदिरानगरमधील पाणीप्रश्नाबाबत यापूर्वी महापौरांनीसुद्धा बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सिडको विभागाकडून हा पाणीपुरवठा होत असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सिडको आणि पूर्व विभागाच्या वादात या परिसराचा पाणीप्रश्न अडकल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेल दीड रुपयांनी स्वस्त!

$
0
0

मुख्यमंत्री म्हणाले

- पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यासाठी प्रयत्न

- सामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सोसणार आर्थिक बोजा

- इंधन दर नियंत्रणासाठी केंद्राचे लवकरच धोरण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल दरातील कपातीपाठोपाठ डिझेल दरातही जनतेला दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी केल्यानंतर राज्य सरकारही थोडा भार उचलत दीड रुपया कमी करणार आहे. यामुळे डिझेल एकूण चार रुपयांनी स्वस्त होणार आहे. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, याचा अध्यादेश शुक्रवारी रात्रीपर्यंत निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये दिली.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्याने शुक्रवारी पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करण्यात आले. इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या क्रूड ऑइलच्या किमतीचा हा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑइल कंपन्यांच्या दर नियंत्रणासंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करीत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्यामुळे केंद्रासह महाराष्ट्रावर मोठा आर्थिक बोजा पडणार असला तरी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा बोजा उचलण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने दीड रुपया एक्साइज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल कंपन्याही पेट्रोल आणि डिझेलवरील एक रुपया कमी करणार आहे. यामुळे ग्राहकांना एका लिटरमागे अडीच रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय केंद्र सरकार राज्यातील सरकारांनादेखील अडीच रुपयांपर्यंत व्हॅट कमी करण्याची विनंती करणार आहे. इंधन दर कमी करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेणे अपेक्षित असून, जीएसटीत इंधनाचा समावेश केल्यास देशभरात एकसमान दर होतील, तसेच इंधन अधिक स्वस्त होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहर) रणजित पाटील, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेचे खुलतेय रुपडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे पितृपक्षाची लगबग सुरू असतानाच नवरात्रोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे. नवरात्रीसाठीचे पूजेचे आणि इतर साहित्य, तसेच तरुणाईचे विशेष आकर्षण ठरणाऱ्या टिपऱ्या, गरब्याचे साहित्य अन् बहुढंगी पोशाखांमुळे बाजारपेठेचे रुपडेच खुलल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी टिपऱ्यांसह अनेक वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. बाजारपेठेत गरबा आणि रास दांडियासाठी लागणारे दागिने आणि इतर वस्तूंसह घटस्थापनेच्या साहित्याची दुकाने थाटण्याला वेग आला आहे. घटस्थापनेसाठी लागणारी टोपली आणि फुलोरा टांगण्यासाठी लागणाऱ्या जाळीची विक्री सुरू झाली आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाने सुरुवातदेखील केली आहे.

येत्या बुधवारी (दि. १०) नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटनेस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री होत आहेत. घटस्थापना करताना लाकडी टोपलीचा वापर केला जातो. या टोपल्यांना रंग देत त्यांची विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. चाळीस रुपयांपासून, तर दोनशे रुपयांपर्यंत या टोपल्यांची विक्री केली जात आहे. रविवार कारंजा, भांडीबाजार, मेनरोड यासह उपनगरातील बाजारपेठांत टोपल्यांची विक्री होत आहे. फुलोरा बांधण्यासाठीची वैशिष्ट्यपूर्ण जाळी आणि घटस्थापनेसाठीच्या टोपल्यांच्या खरेदीला सध्या वेग येत आहे. येत्या तीन दिवसांत घटस्थापनेसाठीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांची आणखी गर्दी होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

फुलोरा जाळीचे आकर्षण

यंदा नवरात्रोत्सवात फुलोरा बांधण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण फुलोरा जाळी उपलब्ध झाली आहे. ही जाळी घटाच्या वर बांधण्यासाठी लोखंडी साखळी लावण्यात आली आहे. या जाळीच्या खालील बाजूस लोखंडी हूक लावण्यात आले आहेत. या हुकांच्या आधारे फुलोरा टांगता येणार आहे. नव्या पद्धतीच्या या जाळीला महिलावर्गाकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. शंभर रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत ही जाळी उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळंत महिलेच्या पतीचा सिव्हिलमध्ये धिंगाणा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीने महिला कक्षाच्या दरवाजाच्या काचा फोडून धिंगाणा घातला. यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. यामुळे महिला कक्षासह हॉस्पिटलमध्ये दहशत पसरली. सुरक्षारक्षक, तसेच पोलिस कर्मचाऱ्याची वेळीच मदत मिळाली नाही. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी समितीद्वारे तपास सुरू केला आहे.

सुरेश राऊत असे या व्यक्तीचे नाव आहे. या तरुणाची पत्नी पाच दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत झाली असून, तिच्या बाळावर एनआयसीयू या अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. हा तरुण रोज रात्री हॉस्पिटलमधील व्हरांड्यातच झोपत असे. शुक्रवारी (दि. ५) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास या तरुणाचे संतुलन बिघडून त्याने अचानक शिवीगाळ सुरू करीत गोंधळ घातला. हॉस्पिटलच्या प्रसूती विभागानजीकच्या प्रायव्हेट रूम परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका परिचारिकेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला. त्यामुळे भेदरलेल्या परिचारिकेने त्या विभागाचा दरवाजा लावून घेत बचावाचा प्रयत्न केला. यावेळी पारिचारीकेने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र पहाटेची वेळ आणि बहुतांश सुरक्षा यंत्रणा साखर झोपेत असल्यामुळे कोणीही मदतीस धावून आले नाही. दरम्यानच्या काळात या तरुणाने प्रसूती विभागाच्या दरवाजाची काच फोडली. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत वेगवेगळ्या पॅसेजमध्ये कधी उड्या मारीत, तर कधी पळत त्याने गोंधळा घातला. रक्तस्त्रावामुळे भोवळ येऊन तो जमिनीवर पडला. परिचारिका आणि प्रसूत महिला कक्षातील नातेवाईक महिलांनी त्याला तळमजल्यावरील मायनर ओटी कक्षाजवळ आणले. या कक्षात येताच तरुणाने पुन्हा हॉस्पिटलबाहेर पळ काढला आणि हे नाट्य थांबले. सकाळी राऊत हॉस्पिटल आवारात जखमी अवस्थेत मिळून आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याने गोंधळ का घातला, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वारंवार असे प्रकार होतात. यामुळे सुरक्षा रक्षकाच्या दिमतीला स्वतंत्र शस्त्रधारी पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेत कोणाचीही मदत मिळू शकली नाही. प्रवेशद्वाराच्या केसपेपर सेंटरमध्येच रात्रपाळी आणि दिवसपाळीसाठी स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, पहाटे घडलेल्या या घटनेप्रसंगी एकच पोलिस या सेंटरमध्ये उपस्थित होता. तोही साखरझोपेत असल्याने गोंधळ घालणाऱ्या राऊतला थांबवता आले नाही.

चौकशी समितीतर्फे तपास

सकाळी या घटनेचे पडसाद उमटले. परिचारिका संघटनांसह कर्मचाऱ्यांनी सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेत संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत डॉ. जगदाळे यांनी तत्काळ समिती गठीत करून चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित सुरक्षा रक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईबाबत संबंधितांना कळविले जाणार आहे. या तरुणाचे अचानक मानसिक संतुलन बिघडले की मद्यसेवनामुळे ही घटना घडली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजस्थानी लेडीज’तर्फे डॉ. सिंगल यांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्रान्समध्ये आयोजित 'आयर्न मॅन' स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा राजस्थानी लेडीज सर्कलतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ. सिंगल व त्यांना या कामी मार्गदर्शन केलेल्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कुणाल गुप्ते यांचे अनुभव जाणून घेता यावे, यासाठी राजस्थानी महिला सर्कलतर्फे संवादरुपी कार्यक्रमही यावेळी झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. दत्तकगाव योजना, शाळेसाठी इमारत बांधून देणे, पाण्याच्या टाकीची व्यवस्था करणे, कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णवाहिका देणे यासारखी कामे त्याअंतर्गत केली जात असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी आशा कटारिया, करुणा चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. राजस्थानी लेडिज सर्कलच्या अध्यक्षा अनिता अग्रवाल व सेक्रेटरी दक्षा बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी व ज्ञानवर्धक झाल्याचे मत उपस्थित महिला सदस्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पेट्रोल @८७.४० पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दररोज वाढत जाणाऱ्या इंधनांच्या दरांपासून नाशिककरांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर चार रुपये ३० पैशांनी, तर डिझेलचा दर दोन रुपये ५९ पैशांनी कमी झाला. यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात इंधनाचे दर आणखी कमी होतील, असे संकेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच शुक्रवारी नाशिकमध्ये दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचे दर सातत्याने वाढत आहेत. अगदी १० पैशांपासून एक रुपया प्रतिलिटरपर्यंत हे दर वाढत गेल्याचा अनुभव नागरिक महिनाभरापासून घेत आहेत. नाशिकमध्ये ९१ रुपये ७० पैसे प्रतिलिटरपर्यंत पेट्रोलचा दर गेल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक बजेट कोलमडून पडत असताना सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ४ रुपये ३० पैशांनी, तर डिझेलचा दर २ रुपये ५९ पैशांनी कमी झाला आहे. शहरात शुक्रवारी (दि. ५) पेट्रोल ८७ रुपये ४० पैसे तर डिझेल ७६ रुपये ७० पैसे प्रतिलिटर दराने विक्री केले गेले. गुरुवारी हाच दर अनुक्रमे ९१ रुपये ७० पैसे आणि ७९ रुपये २६ पैसे होता. इंधनाचे दर आणखी कमी होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ लॅबची चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूचे चुकीचे निदान केल्याचा आरोप झाल्या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. रक्ताचे नमुने तपासणाऱ्या लॅबची चौकशी करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली. पंचवटीतील एका रुग्णाला केवळ ताप असताना, डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती या परिसरातील सर्व खासगी हॉस्पिटल्सची तपासणी करणार आहे. त्याचप्रमाणे बाधित रुग्णाला पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोन्ही लॅबची चौकशी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपतींना आमंत्रण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

श्री क्षेत्र मांगीतुंगी (ऋषभदेवपुरम् ता. बागलाण) येथे सोमवार (दि. २२)पासून सुरू होणाऱ्या जागतिक अहिंसा 'विश्वशांती अहिंसा संमेलन' महोस्तव धार्मिक कार्यक्रमनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रपती मांगीतुंगीला येणार असल्याचे विश्वसनिय वृत्त असून, याबाबत स्थानिक प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती १०८ फूट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी अध्यक्ष, पिठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.

ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले. राष्ट्रपती मांगीतुंगी येथे येणार असल्यामुळे जैन समाजाच्या मुख्य प्रवर्तक ज्ञानमती माता, चंदनामती माताजी, कर्मयोगी रवींद्र कीर्ती स्वामी, कार्याध्यक्ष अनिल जैन, मुख्य अधिष्ठाता सी. आर. पाटील, महामंत्री संजय पापडीवाल, डॉ. जीवन प्रकाश जैन, विजयकुमार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी गणेश गुरव यांनी ऋषभदेवपुरम येथे बैठक घेऊन मुख्य विषयांबाबत चर्चा केली. अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, बागलाण तहसीलदार प्रमोद हिले, वनपरीक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांनीही कार्यक्रम नियोजानाबत माहिती घेऊन संबंधित सुरक्षा विभाग, ट्रस्ट विभागाला कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना दिल्या.

00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक बांधिलकी जपणारी ‘श्री बल्लाळेश्वर’

$
0
0

कामगारनगरी अशी ओळख असलेल्या सातपूरमधील अशोकनगर परिसरातील शिंदे मळ्यात सात वर्षांपूर्वी श्री बल्लाळेश्वर अपार्टमेंट उभे राहिले. येथील कुटुंबे एकोप्याचे दर्शन घडवितात, एकमेकांच्या सुख-दुःखात समरस होतात. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या उमद्या तरुणांची मोठी संख्या हे या सोसायटीचे वैशिष्ट्य आणि बलस्थानदेखील आहे. सर्व सण साजरे करतानाच दिवाळीत घरी तयार केलेले फराळ आदिवासी पाड्यांवर आवर्जून वाटप करणारी ही सोसायटी सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविते.

संकलन : नामदेव पवार

---

अशोकनगरच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर पिंपळगाव बहुला शिवारात शिंदे मळा आहे. याच परिसरात श्री बल्लाळेश्वर अपार्टमेंटची इमारत दिमाखात उभी आहे. या सोसायटीच्या आवारात तीस सदनिका आहेत. त्यामध्ये १२ ड्युप्लेक्स रो बंगलोज् आणि १८ सदनिका आहेत. स्वतःचे घर असावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या धडपड्या तरुणांनी या सोसायटीमध्ये घर घेऊन हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. बल्लाळेश्वर सोसायटीत तरुणांची अधिक संख्या आहे. राज्याच्या विविध भागातून रोजगारानिमित्ताने आलेले लोक येथे स्थायिक झाले आहेत. त्यापैकी काही जण औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत.

विविध सण-उत्सवांमध्ये महिला आणि बच्चेमंडळींचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असतो. सोसायटीतील सभासद आणि त्यांच्या पाल्यांचा वाढदिवसही एकत्रितरीत्या साजरा करण्याचा अभिनव उपक्रम सोसायटीने सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून त्यांनी येथे उद्यान व ग्रीन जिमची सुविधादेखील करवून घेतली आहे. त्यामुळे गृहिणींना फावल्या वेळेत व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी घेणेही शक्य होऊ लागले आहे. नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सोसायटीमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. सोसायटीमधील काही सभासद शिक्षक आहेत, ते त्यासाठी धडपड करतात. तरुणांनी सोसायटीत विविध वृक्षांची रोपटी लावून ती वाढविली आहेत. या माध्यमातून ही सोसायटी वृक्षसंवर्धनाचा संदेश देते. महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर उद्यानाची उभारणी करण्यात आली असून, तेथील रोपांची काळजी सोसायटीतील महिलावर्गाकडून घेतली जाते. गेल्या सात वर्षांमध्ये सोसायटीत कुठल्याही प्रकारचा वाद अथवा तंटा झालेला नाही. त्यामुळे पोलिसांनीही सोसायटीतील शांतताप्रिय आणि एकोपा राखणाऱ्या सभासदांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. महापालिकेने सर्व आवश्यक सुविधा येथे पुरविल्या असल्या, तरी मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने करावा, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.

आनंदी जीवन जगण्याचा संदेश

या सोसायटीत सर्व सण आणि उत्सव अत्यंत हर्षोल्हासात साजरे केले जातात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात तर येथे धम्माल असते. सोसायटीतील रहिवासी लोकवर्गणीतून हे उत्सव साजरे करतात. विशेष म्हणजे केवळ तेवढ्यावरच न थांबता सामाजिक बांधिलकीचे भानही जपतात. परिसरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात ही सोसायटी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कुठल्याही प्रकारचे हेवेदावे न करता गुण्यागोविंदाने राहणारे सोसायटीतील सभासद एकोप्याचे दर्शन घडवितात. आनंदी जीवन जगण्याचा संदेश ही सोसायटी देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकटकाळी धावणाऱ्या व्यक्तीची जाण ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संकटात आपल्या मदतीसाठी धावून आलेल्या व्यक्तीचे उपकार प्रत्येकाने लक्षात ठेवावेत. अशा व्यक्तीप्रति कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाने कर्तव्य मानावे, असे निरूपण सुशीलकुंवरजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघातर्फे चोपडा लॉन्स येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू असून, त्यात शनिवारी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्यांनी सांगितले, की संकटाच्या वेळी कोणीतरी प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. स्वतःवरील संकट दूर झाल्यानंतर व्यक्ती इतरांना मदत करणे विसरते. अनेकदा ज्याने आपल्याला संकटात मदत केली होती, त्याच्याच मदतीला जाणे आपण टाळले जाते, हे अतिशय चुकीचे आहे. आताची तरुणपिढी आई-वडिलांचे ऋणदेखील फेडत नाही. स्वतःच्या मातापित्यांबाबतचा आदर कमी होत आहे. बदलत्या काळानुरूप तरुणांची विचारक्षमता खालावत आहे. हे बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यात्माकडे वळविले पाहिजे. त्यासाठी मातापित्यांनीदेखील दातृत्वाची भावना ठेवत कृतज्ञतेने वागायला हवे. तरुणांना अध्यात्म, आराधना यांची शिकवण देण्यासाठी प्रत्येकाने सत्संग व कीर्तनात सहभागी व्हावे, असे निरूपण त्यांनी केले. यावेळी जैनबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकपच्या मोर्चाला नाशिकहून ‘रसद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात २०१ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, सरकारने दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मोर्चाची हाक दिली आहे. सोमवारी, ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावर निघणार असलेल्या या मोर्चासाठी नाशिकमधूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारने दुष्काळी संहितेत २०१६ मध्ये बदल करून दुष्काळ निवारणाची जबाबदारी झटकली आहे. या दुष्काळी संहितेनुसार महाराष्ट्र सरकारने ७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धतीत मोठे बदल केले आहेत. परिणामी आणेवारी व दुष्काळ घोषित करण्याचा संबंधच मोडीत निघाला आहे. राज्यात दुष्काळ निवारण व उपाययोजना हा नेहमीच आस्थेचा विषय राहिला आहे.

स्वातंत्र्यानंतर आजतागायत दुष्काळाचे योग्य मापन करण्यासाठी उत्तरोत्तर अचूकतेकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्न केला गेला आहे. अनेकांनी सखोल चिंतन केले आहे. यातून गाव स्तरापर्यंत अचूक मापन करण्याच्या प्रयत्नातून गाव स्तरीय पीक कापणी प्रयोगावर आधारित आणेवारी व महसूल मंडळस्तरावर पर्जन्यमापन वगैरे प्रयत्न केले जात आहेत. परंतु ही सर्व प्रक्रिया मोडीत निघाली असून, तालुका हा निकष धरण्यात येत असल्याने पुन्हा एकदा ब्रिटीशकालीन शेतकरी विरोधी पद्धती दुष्काळाबाबतीत सरकार लादत आहे. यास भाकपने ठामपणे विरोध दर्शविला असून, दुष्काळ घोषित करण्याच्या पद्धती ठरविणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करा ही मागणी ८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाकप राज्यसचिव मंडळाचे सदस्य राजू देसले यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images