Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रुग्णालयप्रश्नी पुन्हा कोर्टकज्जा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाभानगर येथील शंभर खाटांच्या महिला रुग्णालयामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिला रुग्णालय उभारण्याच्या मुद्यावर तक्रारदारांचे आक्षेप नोंदविण्यापूर्वीच महापालिकेने वार्षिक भाडेतत्त्वावर जागा देण्याचा ठराव संमत केल्याने याचिकाकर्त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्याासाठी अर्ज सादर केला आहे.

याबाबतचा ठराव अंतिम झाला नसला, तरी त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने रुग्णालयाच्या उभारणीत पुन्हा कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने २००९ मध्ये महिलांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर केले असले, तरी जागेच्या निर्णयावरून रुग्णालयाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. सर्वप्रथम विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या जागेच्या आवारात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वृक्षतोड होणार असल्याने या जागेवरही न्यायालयाच्या आदेशाने काट मारण्यात आली. त्यानंतर वडाळा गाव, भाभानगर, टाकळीरोड आणि पुन्हा भाभानगर असा जागेचा प्रवास सुरू आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सुचविलेल्या भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या आवारातील जागेच्या पर्यायाला माजी आमदार वसंत गिते यांच्यासह स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. जागेचा हा वाद थेट उच्च न्यायायलयासह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी आमदार फरांदेंच्या बाजूने निकाल दिला. मात्र, तरीही वाद सुरूच राहिला. महिला रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गायकवाड सभागृहाच्या आवारातील जागा देण्याचा निर्णय घेतला. वार्षिक शंभर रुपये भाडेतत्त्वावर तीस वर्षांसाठी जागा देण्याचा ठराव गेल्या आठवड्यात स्थायी समितीने मंजूर केला. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने महापालिकेकडे आक्षेप नोंदविण्यास सांगितले. त्यानुसार महापालिकेकडे आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या आक्षेपांवर सुनावणी होण्यापूर्वीच स्थायी समितीने केलेल्या ठरावावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश पाळला जात नसल्याबद्दल संबंधितांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली असून, अर्ज दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील अॅड. संदीप शिंदे यांनी दिली.

--

याचिकाकर्त्यांचे आक्षेप...

महापालिकेकडे सादर करण्यात आलेल्या आक्षेपावरून रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नियमानुसार रुग्णालयाच्या शंभर मीटर आवारात नो सायलेन्स झोन असावा लागतो. दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृह असल्याने तेथे वर्षभरात अनेक कार्यक्रम होत असल्याने नो सायलेन्स झोनचा भंग होणार आहे. विकास आराखड्यात पंधरा मीटर रुंद रस्ता दाखविण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात दहा मीटर रस्ता उपलब्ध आहे. त्याशिवाय दुसऱ्या बाजूने नंदिनी (नासर्डी) नदीचे पात्र असल्याने रस्ता पूररेषेत येतो. सभागृह व रुग्णालयाचे पार्किंग सामुदायिक दर्शविण्यात आल्याने ते नियमात बसत नाही, असे याचिकाकर्त्यांचे आक्षेप आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विधीच्या विद्यार्थ्यांना त्वरित प्रवेशपत्र द्या’

$
0
0

'विधीच्या विद्यार्थ्यांना त्वरित प्रवेशपत्र द्या' (फोटो)

जेलरोड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाची विधी शाखेची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होत आहे. मात्र, या परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र अद्यापही आलेले नाही. ते त्वरित देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तुषार जाधव आणि सहकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. वेळेत प्रवेशपत्र मिळाले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

--

कंत्राटी कामगार कायम

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील डायनॅमिक प्रेस स्ट्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील १०५ कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आले आहे. महामार्गावरील उड्डाणपूल बनविण्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण लोखंडी सुटे भाग बनविण्याचे काम या कंपनीमार्फत होते. येथील कामगारांनी औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले असून, सेनेचे संस्थापक तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, कंपनीचे अध्यक्ष मारुती प्रभू, चेतन प्रभू, अनिता प्रभू यांच्या हस्ते कामगारांना कायम केल्याचे पत्र देण्यात आले. युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय बुटे आदी उपस्थित होते.

--

रक्तदान शिबिर

जेलरोड : येथील छत्रपती प्रतिष्ठान शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत आहेर, उपाध्यक्ष दर्शन उगले, कैलास लभडे यांच्या नेतृत्वाखाली सय्यद पिंप्री येथे नवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासकीय रक्त संकलन केंद्रातर्फे येथे प्रथमच झालेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्राचे डॉक्टर्स, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी सदस्य भाऊसाहेब ढिकले, पोलिसपाटील कैलास ढिकले, भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले, उत्तमराव राजोळे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी चेतन लढ्ढा,उमेश उगले, कोमल लढ्ढा, चेतन ढिकलेआदींनी प्रयत्न केले.

०००००००

पॉइंटर्स...

--

लगबग दिवाळीची -२

आयुक्तांचा 'नन्ना'चा पाढा! -३

मुजोर सुरक्षारक्षकास बेड्या -४

...तरच बोला # मीटू -५

विद्यार्थ्यांसोबत अनकाई सफर -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा लाँगमार्च!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही कारभाराला कंटाळलेल्या महापौर रंजना भानसी यांनी आपल्या हक्कासह नगरसेवकांच्या निधीसाठी थेट मुख्यमंत्रीदरबारी १२६ नगरसेवकांचा लाँगमार्च नेण्याचा इशारा महासभेतच दिला.

महासभेच्या आदेशांची अवहेलना करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाल्यास कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आदेशांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू, असा गर्भित इशारा देतानाच अप्रत्यक्षपणे पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची धमकी दिली आहे. यापुढे नगरसेवकांच्या तक्रारी आल्या, तर कारवाईच करेन, असा इशारा देत नगरसेवकांना ६० लाखांचा निधी आणि महासभेवर रस्ताकामांचे प्रस्ताव आलेच पाहिजेत, असे महापौरांनी प्रशासनाला आदेशित केले. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही, तर थेट विधानभवनावर नगरसेवकांचा मोर्चा जाणार हे आता निश्चित झाले आहे.

डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी (दि. १९) महासभेत दाखल केलेल्या लक्षवेधी प्रस्तावावर रात्री अकरापर्यंत महासभेत चर्चा झाली. त्यावेळी महापौरांनी पुन्हा आयुक्त मुंढेंसह अधिकाऱ्यांच्या कामकाजावर टीकास्र सोडत, शहराच्या बिघडत्या आरोग्यास प्रशासनच जबबादार असल्याचा टोला लगावला. २५७ कोटींच्या रस्तेविकास प्रस्तावाला ब्रेक लावणाऱ्या मुंढेंमुळे शहराचा विकास खुंटल्याचा आरोप करताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच शहराचे आरोग्य धोक्यात आल्याची टीका त्यांनी केली. अधिकारी नगरसेवकांचे फोन घेत नाहीत, आयुक्तांच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याची कारणे नगरसेवकांना सांगितली जातात. यापुढील काळात दुपारच्या सत्रात सर्व बैठका बंद करायच्या, दुपारी तीन ते सहा या कालावधीत नगरसेवक व नागरिकांना अधिकाऱ्यांनी वेळ दिला पाहिजे. नगरसेवकांना दालनासमोर तिष्ठत ठेवण्याची हुकूमशाही आयुक्तांनी बंद करावी, असे सांगत, रस्तेकामांसह नगरसेवकांच्या प्रश्नांवर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी १२६ नगरसेवकांचा लाँगमार्च नेण्याचा इशारा दिला. नाशिक स्मार्ट करण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, विभागीय अधिकाऱ्यांनी महासभांना उपस्थित राहिलेच पाहिजे, वॉक विथ कमिशनरमध्ये आयुक्तांच्या मागे फिरण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी भागात जाऊन शौचालयांच्या सुविधा नागरिकांना आहेत का याची तपासणी करावी, हवेतर चार दिवस कुठल्याही बैठका घेऊ नका, परंतु डेंग्यू, स्वाइन फ्लू निर्मूलनासाठी आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी प्रभागांमध्ये दौरे करावेत, असेही महापौरांनी सुनावले. डेग्यू, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत या साथीच्या आजारांबाबतचा सविस्तर अहवाल येत्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष महासभेत सादर करण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.

-----

आम्हाला भीक नको...

नगरसेवकांना आठ महिन्यांपासून १२ लाखांच्या विकासनिधीसाठीसुद्धा भांडावे लागत आहे. त्यामुळे महापौरांनी प्रशासनाच्या या अडवणुकीवरही टीकास्र सोडत नगरसेवकांना भीक नको, विकासनिधी द्या, अशा शब्दांत महापौर भानसी यांनी आयुक्त मुंढे यांना सुनावले. १२ लाखांचा निधी नगरसेवकांनीच घेऊ नये. महासभेने अंदाजपत्रकात मंजूर केल्यानुसार प्रशासनाने नगरसेवकांना प्रत्येकी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा. लोकांच्या मागणीनुसार नगरसेवकांनी सुचविलेली रस्त्यांची कामे प्रशासनाने करायलाच हवीत, असेही महापौरांनी बजावले.

--------

महापौरांचे आदेश...

-अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव तहकूब

-अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या

-सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव

-दुपारी ३ ते ६ वेळेत अधिकाऱ्यांनी नगरसेवक, नागरिकांना भेटावे

-अतिक्रमणे काढताना कुणी दुश्मनी काढत नाही ना, ते तपासा

-हिटलरशाही पद्धतीचे कामकाज बंद करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलमध्ये किसान सभा रस्त्यावर

$
0
0

त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी किसान सभेने हरसूल येथे भर उन्हात ठिय्या अंदोलन केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश सर्व खरीप धोक्यात आला आहे. पाण्याअभावी पिके जळाली आहेत. शासनाकडून इतरत्र दुष्काळ पूर्व पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सरकारच्या यादीत त्र्यंबकेश्वर तालुका समाविष्ट नसल्याने त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करावा यासोबत विविध प्रश्नांसाठी हरसूल येथे शनिवारी दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सायंकाळी प्रांत राहूल पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

माकपचे ज्येष्ठ नेते इरफान शेख यांच्या नियोजनाखाली जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, सदस्य देवराम मौळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भावराज राथड यांच्यासह माकपचे व किसान सभेचे कार्यकर्ते, शेतकरी लाल बावटा घेऊन रस्तावर उतरले. त्र्यंबकेश्वर तहसीलदार महेंद्र पवार यांच्यासह हरसूल पोलिस स्टेशन एपीआय प्रवीण साळुंखे यांनी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. परंतु आंदोलकांनी प्रांत राहूल पाटील आल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांशी चर्चाच करणार नाही असा पवित्रा घेतल्याने सकाळी दहा वजता सुरू झालेले आंदोलन दुपारी चारपर्यंत सुरू होते.

विविध लोकप्रतिनिधींचे भाषणे झाली. त्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्यासह तालुक्यातील विविध खाते प्रमुखांना आंदोलनकर्त्यांना धारेवर धरत जाब विचारले. हरसूल मध्ये किसान सभा व माकपचे आंदोलन दरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून एपीआय प्रवीण साळुंखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

या मागण्यांसाठी रस्त्यावर

त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करावा

वनाधिकाराच्या अंमलबजावणी करताना सावळा गोंधळ थांबावावा

कसत असलेली वनजमीन नावावर करावी

तालुक्यातील निकृष्ठ कामांची चौकशी कराची

अयोग्य वीजबिलची वसुली थांबवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आता दहा दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गिरणा व आरम नदीपात्र कोरडे पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे शहराला दहा दिवासाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष मोरे यांचे अध्यक्षतेखाली शहरात सुरू असलेल्या भीषण पाणीटंचाईबाबत नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, सालाबादाप्रमाणे सोडण्यात येणारे आवर्तन उशिरा सोडण्यात येणार असल्याने तसेच गिरणा, आराम नदीपात्र कोरडे पडल्याने नगर परिषदेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे विहिरीतील उपलब्ध पाण्यानुसार दहा दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई उपाययोजना अंतर्गत कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठेंगोडा, दर्गा विहीर, अमरधाम विहीर, मळगाव बंधारा या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची खोली शंभर फुटापर्यंत वाढविणे, व आडवे बोअर करणे. शहरातील व शहरालगतच्या विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करून शहरास पाणीपुरवठा करणे, टंचाई कालावधीत हातपंप तत्काळ दुरूस्ती करणे, शहरात आवश्यक गरजेनुसार १५ इंधन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील १८ व दत्तक योजनेअंतर्गत १६ विंधन विहिरींद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असून, सदर जलपऱ्यांचा पाण्याचा दुरूपयोग करताना आढळल्यास जलपरी नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपनराध्यक्ष संगीता देवरे, पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, नगरसेवक काकाजी सोनवणे, सोनाली बैताडे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संजय सोनवणे, आनंदा सोनवणे, मनोहर बोरसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडके, गायकवाडांना पाठबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली.

सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याबद्दल कर्मयोगी पुरस्कारासाठी घरकुल या मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी कार्यरत संस्थेच्या संस्थापक विद्याताई फडके यांची, तर कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आयएएस अधिकारी तथा पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणचे संचालक शेखर गायकवाड यांची कृषी तपस्वी पुरस्कारासाठी राज्यस्तरीय समितीने निवड केली आहे. एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवारी (दि. २४) दुपारी ३ वाजता वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण आदी उपस्थित राहतील. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ अध्यक्षस्थानी राहतील. या पुरस्कारार्थींची निवड करणाऱ्या राज्यस्तरीय समितीत विविध क्षेत्रांतील नामांकित मान्यवरांचा समावेश होता. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून विविध प्रस्ताव सादर झाले होते. मात्र, पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये समितीने एकमताने निवडलेल्या नावांनुसार पुरस्कारांची अंतिम घोषणा करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी दुर्गेश वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, प्राचार्य कडवे, प्रा. संतोष वाघ व जनसंपर्क अधिकारी संजीव अहिरे यांनी दिली.

'घरकुल'द्वारे मायेची पखरण...

कर्मयोगिनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या घरकुल संस्थेच्या संस्थापक विद्याताई फडके यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. २००६ मध्ये त्यांनी मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी घरकुल या संस्थेची स्थापना केली. सद्यस्थितीत येथे ४५ प्रकारचे अपंगत्व आलेल्या २२ मुलींचे संगोपन आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

शेतीच्या कायद्यांबाबत जागृती...

कृषी तपस्वी या पुरस्कारासाठी निवड झालेले आयएएस अधिकारी तथा पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणचे संचालक शेखर गायकवाड यांचे कृषी क्षेत्रातील योगदान या पुरस्काराकरिता विचारात घेण्यात आले आहे. शेतीच्या कायद्यांबाबत समाजजागृती, शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठीचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढा आदी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.

\B

---------------------

कर्मयोगी अन् कृषी तपस्वी पुरस्कारांची घोषणा

--

विद्या फडके, शेखर गायकवाड यांची निवड\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू

$
0
0

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या यमुना मोतीराम अलवार (वय ६५, रा. पेठ) यांचा शनिवारी मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अलवार यांना १७ ऑक्टोबर रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अलवार यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, ते अद्याप आलेले नाहीत. दरम्यान, स्वाइन फ्लू कक्षात सध्या १० रुग्ण दाखल असून, रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घटत असल्याचा दावा सिव्हिल प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

लसीकरण कार्यशाळा

नाशिक : नाशिक महापालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, बालरोगतज्ज्ञ संघटना, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात कालिदास कलामंदिरात नुकतीच कार्यशाळा पडली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे अध्यक्षस्थानी होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर, डॉ. जयंत रणदिवे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त जगताप प्रमुख पाहुणे होते. डब्लूएचओचे अधिकारी डॉ. कमलाकर लष्करे, वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. तृप्ती महात्मे आणि डॉ. दीपा जोशी यांनी मार्गदर्शन केले. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांचे गोवर आणि रुबेला लसीकरण करणे आवश्यक आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा ‘नन्ना’चा पाढा!

$
0
0

गतिरोधकासाठी परवानगी आणा, खड्डेच बुजविणार; मुंढे यांची स्पष्टोक्ती

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमात शनिवारी (दि. २०) प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर तक्रारदारांशी संवाद साधला. याप्रसंगी उघड्यावरील कचऱ्यांच्या व पालापाचोळा रस्त्यालगत पडत असल्याच्या सर्वाधिक समस्या तक्रारदारांनी मांडल्या. सातपूरच्या प्रभागात अपघातांची संख्या वाढल्याने तक्रारदारांनी गतिरोधकांची मागणी केली. या वेळी आयुक्त मुंढे यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार गतिरोधक टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी आणा, असे उत्तर देत अनेक समस्यांबाबत 'नन्ना'चाच पाढा वाचला.

सातपूरला गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर शनिवारी झालेल्या 'वॉक विथ कमिशनर'मध्ये आयुक्त मुंढे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. याप्रसंगी अनेक तक्रारदारांनी नवीन डांबरी रस्ते करावेत, अशी मागणी केली. यावर, सध्या पैसै नाहीत रस्ते नाही केवळ खड्डेच बुजविले जातील, असे आयुक्त मुंढे यांनी सांगत तक्रारदारांना उत्तरे दिली. उघड्यावर पडणारा कचरा उचलण्याचे आदेश दिले. तर रस्त्यालगत तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर पडलेला कचराही उचलण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जात असल्याने अडथळा निर्माण होतो. तसेच रस्त्यांच्या कडेला भाजी किंवा इतर पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेशही आयुक्त मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तब्बल शंभरहून अधिक तक्रारदारांनी आपली गाऱ्हाणी आयुक्तांकडे मांडली. प्रत्येकाच्या समस्येला आयुक्त मुंढे यांनी सडेतोड उत्तरे देत होणारे काम सात दिवसांत मार्गी लागेल असे सांगितले. परंतु, जे काम अनधिकृत आहे त्याबाबत त्यांनी स्पष्ट नकारही दिला.

अपघातांवरून आयुक्त भडकले

महापालिकेने मुख्य रस्त्यांवर दुभाजक टाकले आहेत. परंतु, काही जणांकडून हट्टापायी दुभाजकाला पंक्चर केले असल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र पिंपळे यांनी केला. तसेच गतिरोधक नसल्याने अपघातांची संख्या वाढली असल्याने प्रशासनाने यावर उपाय योजना करावी अशी मागणीही पिंपळे यांनी केली. आयुक्तांनी संबधित बाब जिल्हा प्रशासनाच्या नियमात येत असल्याचे सांगूनदेखील पिंपळे बोलतच होते. या मुद्यावरून आयुक्त चांगलेच भडकले. अखेर त्यांनी पिंपळे यांना निघून जाण्यास सांगितले.

तरुण, तरुणींनी समुद्रात जायचे का?

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर बसविण्यात आलेले बाकडे काढण्याबाबत काही जणांनी तक्रारी मांडल्या. या वेळी जॉगिंग ट्रॅकवरील बेंचेसवर तरुण, तरुणी येऊन बसत असल्याच्या तक्रार जॉगिंग करणाऱ्या सदस्यांनी मांडली. यावर आयुक्तांनी, घाण, कचरा करणे योग्य नाही. परंतु, तरुण-तरुणींनी समुद्रात जायचे का, असे चोख उत्तर दिले. तुम्ही तरुण वयातून गेले नाही का, असाही खोचक सवाल आयुक्त मुंढे यांनी केला.

नदी, नाल्यांची स्वच्छता करा

ज्येष्ठ महिला सुनंदा गायकवाड यांनी नंदिनी नदी व नाल्यांतील कचरा काढून स्वच्छता करण्याची मागणी केली. महापालिकेकडून कचरा काढण्याचे काम तत्काळ केले जाईल, परंतु त्याठिकाणी घाण कचरा टाकणाऱ्यांची नावेही रहिवाशांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे द्यावी, असे आयुक्त मुंढे म्हणाले. नाशिकचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने आपल्या घरातील घाण, कचरा घंटागाडीतच टाका, असे आवाहन उपस्थितांना केले. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो, परंतु, शासकीय इमारतींमध्ये आल्यावर पाहिजे त्याठिकाणी थुंकणे अथवा कचरा टाकणे योग्य नसल्याचेही आयुक्त मुंढे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२६७ टपाल कार्यालये होणार डिजिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टपाल विभागाच्या बँकिंगला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील आणखी ३० टपाल कार्यालयांमधून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण डाक सेवकांना मोबाइल आणि बायोमेट्रीकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, जिल्ह्यातील टपाल कार्यालये डिजिटल होणार असल्याची माहिती नवी मुंबई क्षेत्रच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली.

डाक तिकिटांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मधाळे नाशिकमध्ये आल्या होत्या. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मधाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, १ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये सहा पोस्ट बँक सुरू करण्यात आल्या. त्यात तीन हजारहून अधिक लोकांनी खाती उघडली आहेत. जेथे बँकांची सुविधा पोहोचू शकलेली नाही अशा ठिकाणी त्यांना पोस्टाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा भारतीय डाक विभागाचे उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात टपाल कार्यालयांच्या २६७ शाखा असून ५५ उपकार्यालये आहेत. या प्रत्येक ठिकाणी ३१ डिसेंबरपूर्वी बँकिंग सुविधा (आयपीपीबी) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मधाळ यांनी दिली. डिजिटल अॅडव्हान्समेंट ऑफ रूरल पोस्ट इंडिया (दर्पण) च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण टपाल कार्यालये डिजिटल केली जाणार आहेत. मुलींच्या भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली असून खाते उघडण्यासाठी आता केवळ २५० रुपये लागतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशा योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी तसेच त्यांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन मधाळ यांनी केले.

डाकसेवक करणार वीज उपलब्धतेचा सर्व्हे

देशातील प्रत्येक घरापर्यंत वीजेचे कनेक्शन पोहोचायला हवे याकरिता केंद्र सरकारचा उर्जा विभाग आग्रही आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात वीज आहे की नाही याचा सर्व्हे करण्यात येत असून ही जबाबदारी टपाल विभागावर सोपविण्यात आली आहे. डाक सेवक, पोस्टमन, आणि सुपरवायझर यांच्या मदतीने जिल्ह्यात देखील हे काम सुरू झाले आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम संपवायचे आहे.

-

तिकीट प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

शालीमार येथील महात्मा फुले कलादालनात जिल्हास्तरीय डाक तिकीटांच्या प्रदर्शनाला नापेक्स २०१८ सुरूवात झाली आहे. खासदार हेमंत गोडसे, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मुख्य उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात नाशिकसह मालेगावातून ५० स्पर्धक सहभागी झाले आहेत. रविवारी सायंकाळी पाच पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता निर्वाणीचा संघर्ष..!

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या दबावानंतर सत्ताधारी भाजपने आयुक्त तुकाराम मुंढेंवरील अविश्वासाचे अस्त्र माघारी घेतले असले तरी मुख्यमंत्र्यांची नाशिकमधून पाठ फिरताच दोघांनी एकमेकांविरोधात पुन्हा शस्त्रे परजली आहेत. दोघांमधील संघर्ष आता अटीतटीचा झाला आहे. महापौर रंजना भानसी यांनी तर आता दुर्गावतार धारण करत, मुंढेंना हुकूमशहा ठरवत थेट कायदाच हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंढे आणि सत्ताधाऱ्यांच्या वादात मुख्यमंत्र्यांकडून मुंढेंना मिळत असलेल्या आशीर्वादाने पदाधिकारीही दुखावले गेल्याने त्यांनी आता आरपारची लढाई सुरू केल्याचे चित्र आहे.

विनोद पाटील

vinod.patil@timesgroup.com

दत्तक नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंच्या रूपाने आपला हुकमी एक्का नाशकात आणत विकास दृष्टिपथास येईल असे स्वप्न दाखवले. भाजप पदाधिकाऱ्यांसह महापालिकेतील अधिकारशाही कारभाराला कंटाळलेल्या नाशिककरांना मुंढेंच्या रूपाने देवदूत अवतरल्याचा भास झाला. मुंढेंनीही आपल्या नावाला साजेसे आणि मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला कारभार सुरू करीत, पदाधिकाऱ्यांसह महापालिकेतील सुस्तावलेल्या यंत्रणेला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली. रस्त्यावर हातात झाडू घेतलेले सफाई कर्मचारी, नागरिकांच्या तक्रारी सोडविणारे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना बसलेला चाप बघून नाशिककरांनाही थोडेसे हायसे वाटले होते. मुख्यंत्र्यांचाच आशीर्वाद असल्याने मुंढेंनी महापालिकेत थेट प्रशासकीय राजवटीलाच प्रारंभ केल्याने भाजप पदाधिकारी आणि मुंढेंमधील संघर्षाला सुरुवात झाली. सुरुवातीला अधिकारावरून सुरू असलेला हा संघर्ष टप्प्याटप्प्याने आता अंहकारावर येऊन ठेपला आहे. लोकप्रतिनिधींबाबत मुंढेंची असलेली धारणा पाहता आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता याची परिणती मुंढेंच्या बदलीत होणार असे दिसते. लोकप्रतिनिधींची जनमानसातील खलनायकाची, तर भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी प्रतिमा. यामुळे दोघेही एकमेंकांसमोर आल्यानंतर संघर्ष होणार हे अटळ असतानाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना खास बाब म्हणून नाशिकमध्ये आणले. मात्र, मुंढेंच्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या विकासाऐवजी भाजपचे पदाधिकारी आणि मुंढेंचा वाद सोडविण्यासाठीच जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बेधुंद कारभाराला मुंढेंनी लगाम घालताना, दोन पावले आणखी पुढे जात पदाधिकाऱ्यांच्या अधिकारासह त्यांच्या कारभारालाही वेसण घालण्याचा प्रयत्न करीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यातच सत्ताधाऱ्यांना डावलून त्यांनी घेतलेला अवाजवी करवाढीचा निर्णय हा जखमी झालेल्या पदाधिकारी आणि नगरसेवकांसाठी जणू आधारच ठरला. मुंढेंच्या करवाढीच्या ओव्हरडोसमुळे जनतेमध्येही त्यांची प्रतिमा काहीशी प्रतिकूल झाली. त्यामुळे याचा आधार घेत, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी मुंढेंविरोधात पद्धतशीर वातावरण तापवले. मुंढेंनी तर स्वप्रतिमेच्या धुंदीत शेतीवरही कर लावण्याचा भीमपराक्रम केला. बजेट स्थायी समितीत मांडायचे की महासभेत या एका कारणावरून सत्ताधारी आणि मुंढेंमध्ये सुरू झालेली अधिकाराची लढाई कधी अंहकारात रूपांतरित झाली हे नाशिककरांनाही समजले नाही. सत्ताधाऱ्यांनी निर्णय घ्यायचे आणि मुंढेंनी त्यांना केराची टोपली दाखवायची हा महापालिकेतला नित्यक्रम झाला. महापौरांसह पदाधिकाऱ्यांचे चहापानाचे अधिकारही गुंडाळले गेले. उपमहापौरांसह नगरसेवकांना एनएमसी ई कनेक्ट अॅपवर तक्रारी दाखल करण्याचा सल्ला दिला गेला. पालकमत्री गिरीश महाजन यांनीही या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघेही इरेला पेटल्याने पालकमंत्र्यांनीही हात टेकले. स्वत:ला नाशिकचे विश्वस्त समजणाऱ्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मग आपले हक्काचे अस्त्र उपसत मुंढेंवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. सत्ताधाऱ्यांनी आपल्याच सत्तेतील अधिकारी घालवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ होती. मात्र, हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला डागाळणारा असल्याने मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनीही हस्तक्षेप करीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी मुंढेंच्या बाजूने फैसला देत, पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्या देत, समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे स्थिती सुधारेल असे चित्र निर्माण झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांचा थेट वरदहस्त पाहून मुंढे आणि त्यांच्या टीमकडून पदाधिकारी आणि नगरसेवकांचा पदोपदी अवमान सुरू झाला. पाच वेळा नगरसेवक राहिलेल्या महापौर रंजना भानसी यांना तर महापालिकेत कवडीचीही किंमत उरली नाही. एक रुपयाचाही अधिकार शिल्लक राहिला नाही. अधिकारी व कर्मचारीही ऐकनासे झाले, अशी बहुमतातील भाजपच्याच महापौरांची गत झाली. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये आठ महिन्यांत सत्ताधारी नगरसेवकांसह महापौरांना नारळ फोडण्याची एकही संधी मिळाली नाही. उलट सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या साडेतीनशे कोटींच्या कामांना ब्रेक लावत, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून मुंढेंनी आपली लोकप्रतियता घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता अधिकच वाढीस लागून मुंढे आणि भाजप आता एकत्र होणार नाही, असा संदेशच त्यांनी पक्षाला दिला.

पंधरवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच सर्व अधिकारी आणि नेत्यांसमोरच महापालिकेत अधिकार आणि अंहकाराचे नाट्य रंगले. 'स्मार्ट' सादरीकरणानंतर महापौर भानसी यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दोघांना समन्वयाचा सल्ला देत, ठोस भूमिका घेण्याचे टाळले. त्यातच मुख्यमंत्र्यांनी शहर बससेवेत परिवहन समिती करण्याचा दिलेला निर्णय आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांनाच सांगून फिरवल्याने महापौरांसह आमदार बाळासाहेब सानप यांच्या जखमेवर मीठ चोळले. या सगळ्या नाट्यात मुंढेंनी पद्धतशीरपणे भाजपमधीलच काही पदाधिकारी आणि आमदारांना हाताशी धरत, सोयीने कारभार हाकला. त्यामुळे भाजपमधीलच एका गटाने आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर 'मुंढेंचे आता बस्स झाले' असे धोरण स्वीकारले आहे. शुक्रवारच्या महासभेतील महापौरांचा दुर्गावतार हा त्याचाच एक भाग होता. मुंढेंची बोलबच्चनगिरी, चमकोगिरी, स्टंटबाजी, त्यांचा हुकूमशाही कारभार, माझाच माइक आणि माझेच ऐक या वृत्तीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही हल्लाबोल केला. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणार नसाल तर तुम्हाला सभागृहाची ताकद काय असते तेच दाखवते, असा सरळ दमच महापौरांनी भरला. गेले आठ महिने पदोपदी होत असलेल्या अवमानाचा बदला त्यांनी महासभेत एकाच वेळी काढून आता आपले सूर जुळणार नाहीत, असा इशारा दिला. मुंढेंना आपले मतही मांडू दिले नाही, अशी टोकाची भूमिका घेतल्याने आता महापालिकेत भाजप आणि मुंढेंचे समीकरण चालणार नाही असा संदेशच भाजपमधील एका गटाने देऊन टाकला. महापौरांच्या या दुर्गावतारात विरोधकांनीही पद्धतशीरपणे हवा भरत एका दगडात दोन पक्षी मारले. गल्ली ते दिल्ली सत्ता असलेल्या भाजपच्या महापौरांची आपबीती मुख्यमंत्र्यांसह पक्षाकडूनही ऐकली जात नाही. किरकोळ कामांसाठीही त्यांना अजिजी करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. आपल्याच पक्षाच्या महापौरांसह नगरसेवकांचा एवढा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला थेट पाठीशी घालण्यामागचे गूढ कोणालाच उलगडत नाही. मुंढे पारदर्शक, स्वच्छ व नियमानुसार काम करीत असतील आणि पदाधिकारी नालायक असतील तर पदाधिकाऱ्यांना सत्तेतूनच बाहेर काढा, परंतु मुंढेंना कार्यक्षम ठरवून आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे अनोखे उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या नव्या पॅटर्नची चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पक्षातही आहे. मुंढे प्रामाणिक असले तरी त्यांना कारभारात लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे त्यांच्या एकूणच कार्यशैलीवरून दिसते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मदतीनेच करावा लागतो, याची त्यांना जाणीव असतानाही 'सब चोर' ही त्यांची वृत्ती लोकशाहीला मारक आहे. स्वत:च्या प्रतिमेतून बाहेर येऊन मुंढेंनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम केल्यास नाशिकचा विकासाचा बॅकलॉग भरून शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. मात्र, अधिकार आणि अहंकाराच्या लढाईत आता नाशिकची जनताच चेपली जात असून, विकास नको म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याचा अंत कसा होईल हे पाहणेच आता नाशिककरांच्या नशिबी उरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जनावरांसाठी गवळी कुटुंब सोडणार गाव

$
0
0

न्यायडोंगरी परिसरात दुष्काळाची दाहकता

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळाच्या झळांमुळे शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यवसाय करणारेही होरपळून निघाले आहेत. दुभत्या जनावरांना पोटभर चारा-पाणी मिळत नसल्यामुळे नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील म्हशीपालन करणारी ९० कुटुंबांवर जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसल्याने स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. चारा-पाण्याशिवाय दीड हजार म्हशींना जगवायचे कसे?असा प्रश्न वीरशैव लिंगायत गवळी कुटुंबियांना पडला आहे. पाण्याच्या शोधात घरातील कर्ती मंडळी निफाड, नाशिक भागात जाणार आहेत. दिवाळी पाडव्यानंतर सुमारे दीड हजार म्हशींसह हे लोक स्थलांतर करणार आहेत.

पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी नांदगाव तालुकावासीयांची वणवण सुरू आहे. पाणी व चारा नसल्याने जनावरांचे पोट भरायचे कसे, असा प्रश्न आता गवळी कुटुंबापुढे आहे. न्यायडोंगरीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गवळी वाड्यात वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे वास्तव्य आहे. दीडशे कुटुंब म्हैसपालन करतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे १० ते १५ म्हशी आहेत. एकूण हजारापेक्षा जास्त म्हशींची पाण्याची सोया कशी करायची? विहिरींची अवस्था बिकट. तळ गाठलेल्या विहिरींचे पाणीदेखील दुरापास्त. त्यात चाऱ्याची वानवा. यामुळे आता गवळी परिवारातील ९० कुटुंबे गाव सोडून म्हशींसह दुसरीकडे आपले बस्तान नेण्याच्या विचारात असल्याचे गवळी कुटुंबियातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

या परिसरात अंगणवाडी व प्राथमिक शाळा सुविधा असल्याने वस्तीवरील मुले येथेच शिकतात. त्यामुळे मुलांना व वृद्धांना गावात ठेवण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे. कितीतरी वर्षांत अशी टंचाई आम्ही बघितली नाही. साखर कारखान्याच्या परिसरात आम्ही म्हशींसह स्थलांतर करू, पावसाळ्यापर्यंत तेथेच राहू. तिथल्या काही हॉटेलचालकांसोबत आमचे बोलणे झाले आहे. त्यामुळे दूधाची विक्रीही तेथेच करणार आहोत, असे

गवळी कुटुंबातील ज्येष्ठ सांगतात. मात्र गाव सोडण्याची आपल्यावर आल्यामुळे ते सारे हवालदिल झाले आहेत.

नांदगाव तालुक्याची भयाण दुष्काळ स्थिती काळीज पिळवटून टाकणारी आहे. बोअरवेल आटल्यात. विहिरींनी तळ गाठला. हिरवा चारा दिसत नाही. निदान दुसरीकडे तरी म्हशींना पोटभर खायला मिळेल. म्हणून स्थलांतर करण्याचा विचार आहे.

- वाल्मीक गवळी, न्यायडोंगरी

म्हशींना घेऊन दहा ते १५ जणांचा एक गट याप्रमाणे बाहेर पडणार आहोत. दसऱ्यानंतर जागा आणि पाण्याची सोय पाहून येऊ. त्यानंतर दिवाळी पाडवा झाला की आम्ही म्हशींसह गाव सोडू.

-शंकर गवळी, न्यायडोंगरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुजोर सुरक्षारक्षकास बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फोन उचलला नाही म्हणून एका मुजोर सुरक्षारक्षकाने तरुणीस भररस्त्यात अडवून चावा घेत तिचा विनयभंग केल्याची घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. संशयितास पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

लखन प्रकाश ससाणे (वय २२, रा. सावळा, जि. बुलडाणा) असे संशयिताचे नाव असून, तो तिबेटियन मार्केटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. कॅनडा कॉर्नर परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणी आपल्या घरी जात असताना ही घटना घडली. परिसरातील विशाल पावभाजी सेंटरसमोर संशयिताने तिचा रस्ता अडवून, 'तू माझा फोन का उचलत नाही', असा जाब विचारत, 'तुझे फोटो माझ्या मोबाइलमध्ये आहेत, ते मी तुझ्या नातेवाइकांना पाठवून बदनामी करेन,' अशी धमकी दिली. त्यावेळी संबंधित तरुणीने त्याला दाद न दिल्याने संतप्त झालेल्या संशयिताने या तरुणीच्या हातास चावा घेत तिचा विनयभंग केला. या घटनेत तरुणीच्या हाताला दुखापत झाली असून, तिच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक पिंपरे करीत आहेत.

--

खिडकीतून मोबाइल लांबविला

घराच्या उघड्या खिडकीतून हात घालून चोरट्यांनी मोबाइल लांबविल्याची घटना जुनी तांबट लेन भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय नारायण गाडे (रा. कासार कालिका मंदिराशेजारी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घराच्या उघड्या खिडकीतून हात घालून सुमारे सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

--

तिडके कॉलनीत घरफोडी

तिडके कॉलनीतील रौनक कॉलनीत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोने-चांदीचे दागिने आणि गॅस सिलिंडरचा समावेश आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत निवृत्ती गुंबाडे (रा. रौनक पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुंबाडे कुटुंबीय दि. १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील १२ हजारांची रोकड, गॅस सिलिंडर व सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ३६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

--

तरुणास लुटणारे तिघे गजाआड

मित्राच्या आईला रिक्षात बसवून परतणाऱ्या तरुणास गाठून बेदम मारहाण करीत मोबाइल घेऊन पोबारा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांचा एक साथीदार अद्याप फरारी असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी परिसरात घडली होती. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील दिलीप वळवी, गणेश गौतम गायकवाड (रा. दोघे अवधूतवाडी, दिंडोरीरोड) आणि हेमंत ऊर्फ आकाश भीमसेन बच्छाव (रा. गंगाघाट) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. विक्की राजू आव्हाड (रा. म्हसरूळ लिंकरोड) हा संशयितांचा साथीदार अद्याप फरारी आहे. मौले पेट्रोलपंप परिसरात राहणारे राजू मुकेश विटकर गुरुवारी रात्री मित्राच्या आईला रिक्षात बसविण्यासाठी पपया नर्सरी भागात गेले होते. महिलेस रिक्षात बसवून ते मित्राच्या तवेरा वाहनाकडे पायी जात असताना ही घटना घडली होती. रस्ताने पायी जाताना संशयितांनी त्यांना अडवून कुठलेही कारण नसताना बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी विटकर यांच्या खिशातील १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल काढून घेत रिक्षातून पोबारा केला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघा संशयितांना जेरबंद केले असून, अधिक तपास उपनिरीक्षक कऱ्हे करीत आहेत.

--

जातीवाचक शिवीगाळ

किरकोळ कारणातून एकास जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मेळा बसस्थानक आवारात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये निफाड तालुक्यातील एकाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव माधवराव बोरस्ते (रा. मिग साकुरे, ता. निफाड) असे संशयिताचे नाव आहे. पाथर्डी फाटा भागातील प्रवीण दत्तात्रेय देंढे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. मंगळवारी दुपारी मेळा बसस्थानक परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये देंढे उभे असताना ही घटना घडली. संशयिताने तेथे येऊन किरकोळ कारणातून देंढे यांना जातिवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गालावर चापट मारून पसार झाला. अधिक तपास सहाय्यक आयुक्त बापू बांगर करीत आहेत.

--

तीन दुचाकींची चोरी

शहरातून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा, गंगापूर आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हसरूळ येथील विशाल रामदास लष्करे गुरुवारी सायंकाळी राजीव गांधी भवन भागात कामानिमित्त गेले होते. सुयोजित संकुल येथे त्यांनी आपली दुचाकी (एमएच १५, सीडब्ल्यू २१६७) पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत. दुसरी घटना आकाशवाणी टॉवर भागात घडली. राहुल भाऊसाहेब तांबे (रा. परशुराम अपार्टमेंट, प्रमोदनगर) यांची दुचाकी (एमएच १४, ईजे ४२६१) ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार गोवर्धने करीत आहेत. दरम्यान, जेलरोड भागातील कॅनॉलरोड येथील स्वप्निल मिलिंद जाधव (रा. लक्ष्मीदीप सोसायटी, सुयोगनगर) यांची दुचाकी (एमएच १५, सीएन ३८७७) ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सानुग्रह अनुदानाबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला असून, साडेचार हजार रुपयांपर्यंत वेतनश्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

'क' व 'ड' वर्गातील कर्मचाऱ्यांऐवजी सरसकट वेतनश्रेणीची अट निश्चित करण्यात आल्याने महापालिकेतील साडेपाच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार असले, तरी 'अ' व 'ब' वर्गांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे. महापालिकेच्या हजेरीपटावरील साडेपाच हजार कर्मचाऱ्यांसह मानधनावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्राह अनुदान देण्याचा ठराव महासभेने सप्टेंबर महिन्यात केला होता. प्रशासनाला तो ठराव प्राप्त झाल्यानंतर लेखा विभागाने त्यावर सकारात्मक शेरा मारत आयुक्त मुंढे यांच्याकडे पाठविला होता. परंतु, महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे कारण देत आयुक्तांनी सानुग्रह अनुदान फक्त क आणि ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार केला होता. या निर्णयामुळे दोन ते अडीच हजार जणांनाच लाभ होणार होता. आयुक्तांच्या आर्थिक शिस्तीमुळे सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु, प्रशासन आणि लेखा विभागाला त्यांचे मन वळविण्यात यश आले आहे. आयुक्तांनीही मधला मार्ग काढत लेखा विभागाकडून प्राप्त झालेल्या सकारात्मक अहवालानुसार अ व ब वर्गातील अधिकारी व कर्मचारी वगळून क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये सानुग्राह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. चार हजार ४०० रुपयांपर्यंतचे ग्रेड पे असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही आता सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

०००

संघटनांना हवेत २१ हजार

दरम्यान, महापालिकेतील कामगार संघटनांना मात्र या निर्णयावर समाधानी नाही. सफाई कामगार संघटनांनी सुरेश मारू यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन २१ हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा मागणी केली आहे. कामगाारांना २१ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले नाही, तर कामबंद आंदोलनासह संप करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी यावेळी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ संघर्ष करण्याचाही इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्या झाल्या, कार्यमुक्ती कधी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहाय्यक पोलिस आयुक्तांना पोलिस उपायुक्तपदी सरकारने पदोन्नती दिली. दुसरीकडे पोलिस उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांची बदलीप्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, या दोन्ही प्रक्रियांदरम्यान कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी दुसरा अधिकारीच सरकारने दिलेला नाही. त्यामुळे बदल्या अथवा पदोन्नतीने बदल्या होऊनही बहुतांश अधिकाऱ्यांना आहे त्या जागीच काम करावे लागते आहे.

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी राज्यातील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या केल्या. हे अधिकारी आपल्या कार्यस्थळी येऊन स्थिरस्थावर होत नाही तोच त्यातील २९ जणांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पोलिस उपायुक्त म्हणून नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. बदलीनंतर अवघ्या एकदीड महिन्यातच पदोन्नती देण्याच्या निर्णयामुळे या अधिकाऱ्यांना दोन ठिकाणी जावे लागले. यातील काहींच्या बदलीनंतर तर नवीन अधिकारीच देण्यात आलेला नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने नवीन अधिकारी हजर होईपर्यंत संबंधितांना नवीन ठिकाणी रुजू होता येणार नाही. ग्रामीण पोलिस दलातील अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांची रत्नागिरी येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी कोणताही अधिकारी देण्यात आलेला नाही. गायकवाड यांनी चांदवड शस्त्रसाठा प्रकरणाचा सखोल तपास केला. तळेगाव दंगल, तसेच ग्रामीणमधील समृद्धी महामार्ग आंदोलन, दूध आंदोलन इत्यादी प्रश्न यशस्वीपणे हाताळले. नाशिक शहरामध्येही दोन सहाय्यक पोलिस आयुक्त अद्याप हजर होण्याची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजव्यांमुळे डाव्यांची प्रतिमा मलीन

$
0
0

इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाव्या विचारसरणीची प्रतिमा उजव्या विचारसरणींच्या लोकांनीच मलीन केली. विध्वंसक, धर्मद्रोही, देशद्रोही म्हणण्यापर्यंत उजव्यांची मजल गेली. परंतु, देशविकासात डाव्यांचे योगदान कायम मोलाचे राहिले. चार-पाच वर्षांत देशात घडलेल्या घटना पाहता संविधान तसेच महिलांचाही अनादर करणाऱ्यांमध्ये उजव्या विचारसरणीच्याच व्यक्ती आहेत. मुलींना पळवून नेण्याची भाषा, सैनिकांबद्दल वाईट गोष्टी सत्ताधारी नेते करत असून हीच उजव्यांची परंपरा आहे, अशी टीका इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केली.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व आयटक नाशिक जिल्हा यांच्या वतीने कॉ. दत्ता देशमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रावसाहेब थोरात सभागृहात झाले. यावेळी 'महाराष्ट्रातील समकालीन आंदोलने व श्रमिक चळवळीची दिशा' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक कामगार संघटनेचे सचिव कॉ. मोहन शर्मा होते. डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी भारताची संस्कृती, इतिहास, कामगार आदींच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. तरीही आम्हीच कसे सुसंस्कृत नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, असा निर्णय दिला असला तरी तो प्रत्यक्षात उतरवू दिला जात नाही, महिलांनी प्रवेश केला तर आम्ही त्यांना फाडून टाकू, अशा शब्दात धमक्या दिल्या जातात. जे धर्म, संस्कृती महिलांना अधिकार नाकारते, दुय्यम स्थान देते ती संस्कृती नाही. तसेच डावे-उजवे हा भेद अतिशय चुकीचा असून विषमतावादी मानसिकतेचे हे लक्षण आहे, असेही कोकाटे यावेळी म्हणाले.

राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. देशात सद्यस्थितीत जे काम सुरू आहे, ते सामान्यांची दिशाभूल करणारे असून नोटबंदी, जनधन बँक खात्यामार्फत लावलेला दंड, जीएसटी, डगमगलेले बँक व्यवहार यावरुन सिद्ध झाले आहे. देशात बेरोजगारी वाढत असून केवळ स्टार्टअपचे नाव पुढे करून चुप्पी साधली जात आहे. देशातील वातावरणावरून हुकूमशाहीप्रमाणे वाटचाल सुरू असून त्यामुळे लोकशाही टिकणार का, असा प्रश्न उपस्थित करत थोरात यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. तसेच कॉ. दत्ता देशमुख यांच्या भाषणांवर आधारित पुस्तक होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. महादेव खुडे यांनी सूत्रसंचालन तर जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आयटकचे राज्य सचिव राजू देसले, ज्योती नटराजन, दीपक गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

डाव्यांनीच मांडले खरे शिवराय

कोणत्याही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीने इतिहास योग्यपणे मांडला नाही, अशी टीकाही इतिहासकार कोकाटे यांनी व्याख्यानात केली. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबतही असेच घडत आले असून केवळ कॉ. गोविंद पानसरे, शरद पाटील यांनी मांडलेले शिवाजी महाराजच खरे आहेत. हे कष्टकऱ्यांचे शिवाजी महाराज आहेत, असे ते म्हणाले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंकेथॉनमध्ये धावल्या शेकडो महिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती व्हावी यासाठी पाच देशांतील शंभरावर शहरांत आयोजित केलेल्या पिंकेथॉनला नाशिक शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उंटवाडी येथून सुरू झालेल्या स्पर्धेमध्ये शेकडो महिला यावेळी सहभागी झाल्या.

रविवारी सकाळी साडेसहा वाजता पिंकेथॉन रन ला उंटवाडी येथून सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व सामाजिक कार्यकर्ते एन. सी देशपांडे यांच्या हस्त या स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला. ही संस्था प्रख्यात मॉडेल मिलिंद सोमण यांनी सुरू केली असून, भारतातील ६३ शहरांत एकाचवेळी ही 'रन' आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात १० हजारांवर महिला सहभागी झाल्या. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढावी यासाठी ही रन दरवर्षी आयोजित केली जाणार आहे. यंदाचे हे पहिले वर्ष होते. उंटवाडी येथून सुरुवात झालेली ही स्पर्धा जेहान सर्कल येथून पुन्हा उंटवाडी येथे संपली. नाशिकमध्ये पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ४५० च्यावर महिला यात सहभागी झाल्या होत्या. सहभागी महिलांना जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते मेडल देण्यात आले. सहभागी सर्व महिलांना टी शर्ट व ऑनलाइन प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. ही संस्था महिलांसाठी विविध उपक्रम मोफत राबवित असते. जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या ब्रँड अॅम्बेसेडर पूनम शर्मा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्या मालमत्तेशी ‘त्याचा’ संबंध नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या मिरजकर सराफ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईक याच्या कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा येथील मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली. मात्र, या मालमत्तेशी हर्षलचा काहीही संबंध नसल्याचा दावा त्याच्याच कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या मालमत्तेशी नाईकचा संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना संकलित करावे लागत आहे.

मिरजकर सराफच्या संचालकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत शेकडो गुंतवणूकदारांकडून रोख आणि सोन्याची गुंतवणूक घेतली. संचालकांकडून जानेवारी २०१८ पासून पैसे परत करण्याचे प्रमाण घटत गेले. अखेर या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये २० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बारापेक्षा अधिक संशयितांपैकी काहींना अटक करण्यात आली. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईक, भागीदार अनिल चौगुले अद्याप फरार आहेत. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांकडून दोन कार आणि १६ किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, यानंतर फारसे काही हाती आले नाही. मुख्य सूत्रधार नाईक मूळचा कर्नाटकमधील असल्याने पोलिसांनी तेथे तपास केला. त्यात त्याची स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही मालमत्ता रेकॉर्डवर घेतली. मात्र, काही दिवसांपूर्वी नाईकचे भाऊबहीण नाशिकला आले. या मालमत्तेशी हर्षलचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा हर्षल नाईक व त्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यातील व्यवहाराकडे वळवला आहे. हर्षल नाईकचा संबंध नसेल तर त्याने त्यांना पैसे पुरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. या व्यवहारांबाबत बँकांकडून माहिती येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँक व्यवहारात सर्व समोर येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे मगर म्हणाले.

या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी क्राइम ब्रँचसह इतर पथके तैनात आहे. सर्व शक्यतांनुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप ते आमच्या हाती लागलेले नाहीत.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवनी, मोनिकाने जिंकली दिल्ली!

$
0
0

दिल्ली मॅरेथॉनवर नाशिकचे वर्चस्व

...

प्रथम : संजीवनी जाधव

द्वितीय : पारूल चौधरी

तृतीय : मोनिका आथरे

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. या मॅरेथॉनमध्ये संजीवनी जाधव हिने प्रथम क्रमांक, तर मोनिका आथरे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनसाठी नाशिकच्या खेळाडूंनी कंबर कसली होती. यासाठी भोंसला स्लकूच्या मैदानावर कसून सराव केला जात होता. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे रविवारी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. महिलांच्या २१ किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सुरुवातीपासूनच चुरस पहायला मिळाली. नाशिकच्या संजीवनी जाधवला पारुल चौधरी व मोनिका आथरे यांच्याबरोबर तीव्र स्पर्धा करावी लागली. शेवटच्या २०० मीटर अंतरात स्पर्धेची रंगत अधिकच वाढली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या अंतिम काही मिनिटांत संजीवनीने मात्र प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत बाजी मारली. संजीवनी जाधव हिने २१ किलोमीटरचे अंतर १ तास १३ मिनिटांत पूर्ण करीत प्रथम क्रमांक मिळवला. पारुल चौधरी हिने हेच अंतर १ तास १४ मिनिटांत पूर्ण करीत द्वितीय स्थान मिळवले. एलआयसीकडून खेळणारी नाशिकच्या मोनिका आथरे हिने हे अंतर १ तास १६ मिनिटांत पूर्ण करीत तृतीय क्रमांक मिळवला. प्रथम विजेत्याला चार लाख रुपये, द्वितीय विजेत्याला तीन लाख रुपये, तर तृतीय विजेत्याला दोन लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित बोडस यांच्यागायनाने रसिक मुग्ध

$
0
0

नाशिक : गायिका प्रिया फडके-ठकार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विख्यात गायक पंडित केदार बोडस यांच्या सुश्राव्य गायनाची मैफल आयोजित करण्यात आली. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ही मैफल झाली. या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. मैफलीचा प्रारंभ यमन रागातील एका बंदिशीने झाला. संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर, तर तबल्यावर दत्तात्रेय भावे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर आकाश पंडित, सिद्धार्थ निकम होते. प्रारंभी फडके व ठकार घरातील मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदूर घराण्याच्या गायकीने ‘कानसेन’ तृप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राग यमन कल्याण, विलंबित झुकरा तालातील 'कजरा कैसे डारूं' हा ख्याल सभागृहात पेश झाला आणि रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान व के. के वाघ कला अकादमीतर्फे आयोजित आलाप या मैफलीचे. या वेळी इंदूर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. नरेशकुमार मल्होत्रा यांचे गायन झाले. कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे ही मैफल झाली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे महामेरू उस्ताद आमिर खाँ साहेबांच्या इंदूर घराण्याशी नाते सांगणाऱ्या गायकीचा आविष्कार पंडित मल्होत्रा यांनी सादर केला. 'कजरा कैसे डारूं' नंतर द्रुत तीन तालात 'ऐसो सुंदर सुधरवा बालमवा' या आमीर खाँ साहेबांच्या प्रसिद्ध बंदिशी सादर केल्या. त्यानंतर राग कलावती मध्यलय रूपक तालात 'ओ बलमा कब घर आवेंगे' आणि तीन तालात 'अनमानी पियासो रहेत है' सादर केले. त्यानंतर राग अभोगी सादर केला. अतिशय संथ, भरदार आणि मिंडयुक्त आलापी घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या मेरखंड प्रकारातील ताना आणि सरगम आणि रागाची सौंदर्यपूर्ण मांडणी करून रागाचे स्वरचित्र उभे केले. तबल्यावर नितीन पवार, तर संवादिनीवर आनंद अत्रे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर अजिंक्य जोशी, केतन इनामदार होते. प्रारंभी कलाकारांचे स्वागत पंडित जयंत नाईक यांनी केले. पंडित मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images