Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोक्का आरोपींचा धिंगाणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक येथील मोक्का न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी आणलेल्या मोक्काच्या तीन आरोपींनी कैदी पार्टीला शिविगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. या तीन आरोपींपैकी दोघांनी शासकीय वाहनाच्या छताला डोके आपटून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याने काही काळ पोलिसांचीही मोठी धांदल उडाली. नाशिकरोडऐवजी धुळे कारागृहात दाखल करण्याची या आरोपींची मागणी असल्याची माहिती आहे.

या घटनेप्रकरणी धुळे जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी तुकाराम नामदेव सोनवणे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आरोपी गुरू अर्जुन भालेराव (वय २७, रा. येवला), सागर गणेश मरसाळे (वय २७, रा. मनमाड) आणि विनोद गणेश मरसाळे (वय ३२, रा. धुळे) या तिघांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार या तिघा आरोपींविरोधात धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात हे तिघेही आरोपी धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होते. या तिघांना गुरुवारी नाशिकच्या मोक्का न्यायालयात हजर करण्याकामी फिर्यादी सोनवणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. एस. जोशी, पोलिस नाईक एस. पी. कोतवाल आणि पोलिस कॉन्स्टेबल जी. ए. बागूल हे पोलिस कर्मचारी एम. एच. १८, जी १७४ या शासकीय वाहनाने धुळे येथून घेऊन आलेले होते. गुरुवारी नाशिकच्या मोक्का न्यायालयात या तिघा आरोपींना दुपारी अडीच वाजता सुनावणीसाठी हजर केल्यानंतर मोक्का न्यायालयाने या तिघांपैकी गुरू अर्जुन भालेराव या आरोपीस पोलिस कोठडी तर उर्वरित सागर मरसाळे आणि विनोद मरसाळे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सागर व विनोद मरसाळे या दोघा आरोपींना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याचेही आदेश दिले होते.

वाहनातून उतरण्यास नकार

मोक्का न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीने या तिघा आरोपींना त्यांच्याकडील शासकीय वाहनाने सायंकाळी ५ वाजता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणले. येथे आल्यावर कैदी पार्टीने सागर मरसाळे आणि विनोद मरसाळे या दोघा आरोपींना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले असता त्यांनी कैदीपार्टीतील पोलिस कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. गुरू भालेराव याने पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय वाहनाच्या छताला डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती कैदीपार्टीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी धुळे शहराचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांना दिल्यावर त्यांनी या आरोपींविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या तिघांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणल्यावर येथेही खाली उतरण्यास नकार देत या तिघा आरोपींनी पोलिसांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. सागर मरसाळे व विनोद मरसाळे या आरोपींनी वाहनाच्या छताला डोके आपटले. या प्रकारामुळे पोलिसांची काही काळ मोठी धांदल उडाली होती. या प्रकारानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात या तिघाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिकरोड कारागृहाचे वावडे का?

या प्रकरणातील मोक्का आरोपींना मोक्का न्यायालयाने नाशिकरोड कारागृहात दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाशिकरोडऐवजी अगोदरच्या धुळे कारागृहातच दाखल करण्याची या आरोपींची मागणी असल्याचे समजते. या तिघा आरोपींविरोधात मोक्का कायदयानुसार कारवाई झालेली असल्याने त्यांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघड आहे. त्यामुळे या आरोपींना नाशिकरोड कारागृहाचे वावडे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारणा, मुकणेतून जायकवाडीसाठी पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील दारणा, मुकणे, भावली, भाम वाकी या धरणातून जायकवाडी धरणासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी सोडले. यावेळी माजी आमदार मेंगाळ, माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात नेत्यांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इगतपुरी तालुक्यातील धरणातील पाणी व शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जायकवाडीसाठी दारणा व मुकणे धरणातून अद्याप प्रशासनाने पाणी सोडलेले नाही; मात्र भावली, भाम व वाकी या धरणातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या तीनही धरणांचे पाणी दारणा धरणात जलसाठा संचित करण्यात आला. दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून जायकवाडीला पाणी देण्याबाबत प्रशासन आग्रही आहे; त्यास इगतपुरी तालुकावासीयांचा विरोध आहे.

भावली धरणातून शहापूरला पाणी देऊ नये म्हणून आमदार निर्मला गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोरख बोडके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणाचे पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारणा, भावली धरणावर मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

धरण...........पाणीविसर्ग (क्युसेस)

भावली.........२५०

भाम............४००

वाकी...........५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जया दिवेसह साथीदारांची धिंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दोन दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर सुटलेला गुन्हेगार जया दिवे याच्या सुटकेचा आनंद साजरा करण्याची योजना त्याच्या साथीदारांनी आखली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (दि.२५) इंद्रकुंड येथील सिद्धी टॉवरच्या गच्चीवर फटाके फोडले. त्यांच्या या प्रकाराची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. पोलिस त्या ठिकाणी पोहचताच जया दिवे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी जया दिवेसह व त्याच्या पाच साथीदारांसह दोन महिलांना अटक केली. दिवे आणि त्याचे साथीदार यांची शुक्रवारी (दि. २६) पंचवटी परिसरात पोलिसांनी धिंड काढली.

गुन्हेगार जया हिरामण दिवे (२९, रा. पेठ नाका, एरंडवाडी) हा गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड कारागृहात खुनाच्या खटल्यात दाखल होता. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केल्याने, गुरुवारी (दि. २५) कारागृहाबाहेर आला. 'भाई' बाहेर आल्याने त्याचे साथीदार इंद्रकुंड परिसरातील सिद्धी टॉवरमधील दिवेच्या घरी सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी पोहचले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या सर्वांनी इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाके गच्चीवरून खाली फेकले. याची गुप्त माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. त्यांनी याची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांना अन्य पोलिस कर्मचारांसह पाठविले. गुन्हेगार दिवेने गिरमे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करीत त्यांचा शर्ट फाडला. यातच दिवेने मेहुणीच्या पंजाबी ड्रेसचा टॉप फाडला व गिरमे यांच्यावर धावून जात माझ्या मेहुणीवर हात का टाकला, असे विचारत पुन्हा धक्काबुक्की केली व पोलिसांना तसेच न्यायालयाला पुन्हा अर्वाच्च शिवीगाळ केली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी जया दिवेसह विकी कीर्ती ठाकूर (२४, रा. गाजवे भवन चाळ, शनी मंदिर जवळ, पेठरोड), भूषण कपिल चौधरी (१९, रा. राधाकृष्ण मंदिरामागे, इंद्रकुंड), गणेश नंदू परदेशी (२४, रा.शिवाजी नगर, सातपूर), मयूर शिवाजी खैर (१९, रा.जाणता राजा कॉलनी, पंचवटी), अक्षय सुधीर बोराडे (२७, रा. सी फोर अनमोल पार्क रो हाऊस, लोखंडे मळा, उपनगर), दिवेची मेहुणी प्रियंका मस्तकीन शेख (२६, रा.घर नं.६, दत्त नगर, पेठरोड) व सासू विजया राजेंद्र खरात (४५, रा.फ्लॅट नं.२०२, सिद्धी टॉवर, इंद्रकुंड) यांना घटनास्थळी अटक केली. दिवेचे अन्य साथीदार आकाश जाधव, नकुल परदेशी (पूर्ण नाव व पत्ते उपलब्ध नाही) व अन्य दोघेजण फरार झाले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाल्मीक शार्दुल करीत आहेत. दरम्यान या सर्व संशयितांना न्यायालयासमोर शुक्रवारी (दि. २६) हजर केले असता दि. १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पंचवटी परिसरात फिरविले

अटक करण्यात आलेला जया दिवे व त्याच्या साथीदारांची शुक्रवारी (दि.२६) पंचवटी परिसरातून धिंड काढण्यात आली. दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, इंद्रकुंड व मालेगाव स्टँड या मार्गाने पंचवटी पोलिसांनी या सर्वांना पायी फिरवून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटबंधारेवर हल्लाबोल

$
0
0

युती होणारच! (मुख्य अंक पान १)

दसरा मेळाव्यात शिवसेनेने हिंदुत्वाचाच पुरस्कार केला असून, देशात हिंदुत्वावर काम करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. एकमेकांचे तोंड न पाहणारे लालूप्रसाद यादव व नितीश कुमार, मायावती व मुलायम एकत्र येऊ शकतात, तर शिवसेना आणि भाजप, जे जन्मभर एकत्र राहिले, ते एकत्र येतीलच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

--

पाटबंधारेवर हल्लाबोल (मुख्य अंक २ लीड)

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयामुळे नाशिकवर अन्याय झाल्याचे सांगत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, अपक्ष या विरोधी पक्षांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. त्यांनी मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांना घेराव घालत निषेधाच्या घोषणा देत सिंचन भवन दणाणून सोडले.

--

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे (प्लस पान ५ चटकमटक)

गेल्या आठवड्यात चटकमटकमध्ये आपण अंडा भुर्जी, अंडा करी, अंडा रोल, तसेच अंड्याचे विविध प्रकार चाखले. या आठवड्यातही आपण पुन्हा अंड्याचे लज्जतदार प्रकार चाखणार आहोत. चला, तर मग मित्रविहारचे फेमस टोस्ट ऑम्लेट, 'आरके'वरची अंडा भुर्जी, गोलूज् अंडा रोल अशा चविष्ट ठिकाणांची अंडा भुर्जी आणि अंडा रोलची चव चाखायला...

००००००००००००००००००००

दुरुस्त सुखोई हवाई दलात (मुख्य अंक पान ३)

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान शुक्रवारी हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचा शानदार सोहळा ओझर येथील केंद्रात पार पडला. सुखोईची निर्मिती ओझरच्या 'एचएएल'मध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही 'एचएएल'मार्फतच होते.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कशीश डगळेची राज्य डॉजबॉल संघात निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत येथील भिकुसा हायस्कूलच्या संघाने नाशिक विभागाचे नेतृत्व करीत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत कशीश शरद डगळे हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दुसऱ्यांदा 17 वर्षाआतील मुलींच्या डॉजबॉल संघात तिची निवड झाली. मागील राष्ट्रीय स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचा अनुभव लक्षात घेता तिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार असून, विद्यालयाच्यावतीने कशीश डगळे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे यांची ती पुतणी असून, तिला क्रीडा शिक्षक रामनाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवीपासून दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत भिकुसा हायस्कूलच्या मैदानावर ती सराव करते. कशिशच्या यशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, डॉ. दिप्ती देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सिन्नर केंद्राचे अधीक्षक शशांक गंधे, मुख्याध्यापिका एस. एस. दारोळे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकता दौड वाढविणार एकात्मता अन् सलोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ग्रामीण पोलिसांतर्फे बुधवारी (दि. ३१) जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी जिल्ह्यातील १८ ठिकाणी या एकता दौडचे नियोजन केले आहे. या दौडमध्ये शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता पोलिस ठाणेनिहाय सर्व तालुका स्तरांवर आणि ओझर, पिंपळगावसह मनमाड शहरात या दौडला प्रारंभ होईल. विविध गटांत वयोमानानुसार ही स्पर्धा पार पडणार असून, प्रत्येक सहभागी धावपटूस पोलिस दलाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. धावपट्टूंसाठी प्राथमिक उपचार केंद्र, सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स सुविधांचे पोलिस दलाने नियोजन केले आहे. सर्व जाती-धर्मीयांनी एकत्र येऊन या राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभाग नोंदवावा. त्यासाठी नागरिकांनी नजीकच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक दराडे यांनी केले आहे.

--

राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता मुलांना मैदानांकडे वळविणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून, त्यादृष्टीने एकता दौड महत्त्वाची ठरते.

-संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

चौहान हायस्कूलमध्ये

पणती सजावट उपक्रम

नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाशिकरोड येथील श्रीमती र. ज. चौहाण (बि) गर्ल्स हायस्कूल येथे विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी दिवाळीनिमित्त पणती सजावट या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी विविध रंग व सजावट साहित्य वापरून पणत्यांची आकर्षक सजावट केली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी धामणे यांच्यासह सुरेश दीक्षित, माधव मुठाळ व प्रतिमा खैरनार व सुषमा वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

-----

आकाशकंदिल कार्यशाळा

नाशिकरोड : द्वारका येथील रवींद्र विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत शाळेचे कलाशिक्षक राजेश मालवी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक आकाशकंदीलाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व पटवून देत आकाशकंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, उपाध्यक्ष वसंत राऊत, कार्यवाह वासंती गटवे, मुख्याध्यापक केशव चव्हाण आदींनी विशेष कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉकचा ग्रामीण प्रवाशांना फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी येथे मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई अप आणि डाऊन पॅसेंजर तसेच गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे इगतपुरी - भुसावळ दरम्यान स्वतंत्र पॅसेंजर सुरू करावी तसेच मनमाड-देवळाली धावणारी पॅसेंजर घोटी, इगतपुरीपर्यंत आणावी, रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत लवकर सुरू करण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख अंबादास धोंगडे, नांदुरवैद्य सरपंच दिलीप मुसळे, दिनेश गव्हाणे, संतोष गुळवे, बाबा शेट्टी आदींनी केली आहे.

सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. तसेच शालेय, महाविद्यायलीन परीक्षा सुरू आहेत. अस्वली स्टेशन, पाडळी, घोटी परिसरातील अनेक ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिक येथे जातात. तसेच दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि आता दीपावलीसाठी महिलांची खरेदीची लगबग सुरू आहे. या भागातील वरील सर्वांना रेल्वेची पॅसेंजर गाडी उपयोगात येते. एसटी बसेस या भागात सध्या येतच नसल्यामुळे ग्रामीण प्रवाशी अनेक गैरसोयींना तोंड देत आहेत. सरपंच दिलीप मुसळे, अंबादास धोंगडे यांनी आज अस्वली रेल्वे स्थानक स्टेशन मास्तरांची भेट घेऊन प्रवाशांची बाजू मांडली. मात्र रेल्वेचे सर्व निर्णय मनमाड व भुसावळ वरून वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, असे सांगितले. तसेच इगतपुरी स्थानकात युद्धपातळीवर प्लॅटफॉर्म नूतनीकरण काम सुरू असून त्यामुळेच मेगाब्लॉक घेऊन वरील गाड्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात आता ई-टॉयलेट्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गर्दीच्या ११२ ठिकाणी 'पीपीपी' तत्त्वावर ई-टॉयलेट्सची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे यात महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

शहरात पार्किंगसह सार्वजनिक शौचालयांची समस्या अत्यंत गंभीर आहे. महापालिकेची जवळपास दीडशे शौचालये आहेत. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे ही शौचालयेही आता अपुरी पडत आहेत. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी रस्तेविकासाला प्राधान्य दिल्याने पार्किंगसह शौचालये, स्वच्छतागृहांची उभारणी आदी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या ई-टॉयलेट प्रकल्पाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

बाजारपेठेच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने प्रामुख्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. १०० टक्के हागणदारीमुक्त शहर संकल्पनेत नाशिक केंद्राच्या निकषांवर खरे उतरले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिक शहरात ई-टॉयलेट्सची संकल्पना राबविण्याचा मनोदय स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्याची अंमलबजावणी आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केली आहे.

--

वापर राहणार सशुल्क

शहरात 'पीपीपी' तत्त्वावर ११२ ठिकाणी ई-टॉयलेट्सची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेला एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही. ई-टॉयलेट्स उभारणीसाठीचा संपूर्ण खर्च ठेकेदाराला उचलावा लागणार आहे. ई-टॉयलेट्सचा वापर सशुल्क राहणार असून, त्यातून मिळणारा महसूल व ई-टॉयलेट्सवर उभारण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून ठेकेदाराला परतावा मिळणार आहे. शहरातील गर्दीच्या, तसेच बाजारपेठाच्या ठिकाणी हे ई-टॉयलेट्स उभारले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समितीची बैठक

$
0
0

शिक्षक समितीची बैठक

जेलरोड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज (२८ ऑक्टोबर) शालीमार येथील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये होणार आहे. प्रदेशाध्यक्ष उदयराव शिंदे, शिवाजीराव साखरे, कार्याध्यक्ष किरण गायकवाड, कोषाध्यक्ष केदू देशमाने, उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे आंदोलन-न्यायालयीन लढा, मुख्याध्यापक-शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन कामाबाबत चर्चा, कमी पटाच्या नावाखाली शाळा बंद करण्याच्या शासनाच्या भूमिकेवर चर्चा, जिल्हानिहाय शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आदींबाबत भूमिका निश्चित केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर गमावणार तीन महिन्यांचे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यातील जनतेची आणि पिकांची तहान भागविण्यासाठी नाशिकमधील धरणांमधून विसर्ग करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे २० लाख लोकसंख्येची ८४ दिवसांची पाण्याची गरज भागेल एवढे पाणी जायकवाडीत सोडले जाणार असल्याने ऐन दुष्काळाच्या तोंडावर नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणसमूहातून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे, असे महामंडळाचे आदेश आहेत. नाशिक शहरासह आसपासच्या परिसराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर दारणा धरणातूनही नाशिककरांसाठी दर वर्षी ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण केले जाते. महामंडळाच्या आदेशामुळे नाशिक शहरवासीयांसाठी उपयुक्त ठरणारे एकूण १००० दशलक्ष घनफूट म्हणजेच एक टीएमसी पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणामध्ये सोडावे लागणार आहे. महामंडळाच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य असल्याने प्रशासनही पाणी सोडण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले असून, नाशिककरांना सुमारे ९० दिवस पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे.

--

रोजची उचल ३४ कोटी लिटर!

नाशिक शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला दररोज १२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता भासते. गंगापूर आणि दारणा धरणामधून एकूण दररोज १२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३४ कोटी लिटर पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या जवळपास असून, एवढ्या रहिवाशांची तहान या पाण्यातून भागविली जाते. दररोज १२ दशलक्ष घनफूट याप्रमाणे १ हजार दशलक्ष घनफूट पाणी ८४ दिवस शहराकरिता पुरू शकते. म्हणजेच हे पाणी जायकवाडीला गेल्यास सुमारे तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा नाशिककरांना गमवावा लागणार आहे. गंगापूर आणि दारणा अशा दोन्ही धरणांमधून केवळ शहरवासीयांची तहान भागविण्याकरिता उपयोगात आणले जाणारे दोन हजार ८३१ कोटी लिटर पाणी जायकवाडीला सोडले जाणार आहे. एकट्या गंगापूर धरणातून शहराला ५० दिवस पुरेल एवढे, तर दारणातून शहराला ३४ दिवस पुरेल एवढे पाणी मराठवाड्याकरीता सोडण्यात येणार आहे.

सिंचनालाही बसणार फटका

जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा सिंचनाच्या आवर्तनालाही फटका बसणार आहे. पालखेड धरणातूनही ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले आहेत. हे पाणी सोडल्यास पालखेडचे सिंचनासाठीचे एक आवर्तनच गमवावे लागणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सर्वाधिक फटका दिंडोरी, निफाडसह चार तालुक्यांमधील द्राक्षबागांना बसणार आहे. पालखेड धरणसमूहातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड आणि तिसगाव या धरणांमधून हे पाणी सोडले जाण्याची शक्यता असून, या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. पाणी सोडल्यास डाव्या कालव्यातून होणारे सिंचनाचे एक आवर्तन कमी होणार आहे. त्यामुळे दिंडोरी, निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यांतील द्राक्षबागांना त्याची झळ बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. गंगापूर धरणातूनही नाशिक आणि निफाड तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी पाणी दिले जात असल्याने या सिंचनालाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेने मैदानाबाबत फेरविचार करावा

$
0
0

मनमाडमधील पालकांची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगचा बोर्ड लावल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. रेल्वेने या बाबत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळवायला हवे होते, असा सूर व्यक्त करीत मैदान मुलांना खेळण्यासाठी राहू द्या अशी मागणी जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी मैदाने आवश्यक असल्याने रेल्वेने याचा गांभीर्याने विचार करावा असे मत पालक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, रेल्वेच्या या पार्किंग झोन संदर्भात संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा होऊन विचार विनिमय करण्यात आला. रेल्वेने अंधारात ठेवले, फसवणूक केली, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे

शालेय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान रेल्वेने केवळ फलक लावले आहेत. पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या बाबी अजून पूर्ण केलेल्या नाहीत. मैदानात त्याबाबत हालचाली अद्याप सुरू नाहीत असे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावर पहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरसह अन्य धरणांमधून सोमवार (दि. २९)पासून केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग गंगापूर धरण परिसराची पाहणी करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथे काही कर्मचारी तैनात केले असून, आज, रविवारी (दि. २८) सायंकाळपासून येथे खडा पहारा ठेवण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध यंत्रणांच्या समन्वयाची बैठक घेतली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठा विकास महामंडळाने दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार असून, ते सोडण्यास दोन्ही जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीनही धरण समूहांमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले असताना आणि अन्य तालुक्यांमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसताना पाणी सोडण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, तसेच अन्य सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. पाणी सोडल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारपासून धरणांमधून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने या विरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

--

वहन मार्गावरही बंदोबस्त

पाणी सोडण्याचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून, जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील पाणी सोडण्याबाबतचे लेखी आदेश अद्याप दिलेले नाहीत. परंतु, रविवारनंतर कधीही जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वहन मार्गासह धरण परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरणाचा परिसर अधिक संवेदनशील असल्याने पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गंगापूर धरण परिसराला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी दुपारी पुन्हा ग्रामीण पोलिसांचे पथक गंगापूर धरण परिसरात दाखल झाले. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून, बॅरिकेडिंगचेही नियोजन केले जात आहे. गरज भासल्यास रविवारी सायंकाळपासून बंदोबस्त वाढविण्याचे संकेत पोलिसांकडून दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा तहसीलवर मोर्चा

$
0
0

सटाणा : बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, तसेच अन्य मागण्यांसाठी सटाणा येथेही बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार प्रदीप हिले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.त्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदीं यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफूर मलिक शेख, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, यतिन पगार, खेमराज कोर, संजय पवार, विजय वाघ, काकाजी सोनवणे, जिभाऊ खंडू, डॉ. विठ्ठल येवलकर, जनार्दन सोनवणे, सुरेखा बच्छाव, अॅड. रेखा शिंदे, गायत्री कापडणीस, शमा मन्सुरीआदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरट्यांच्या हाती ठोकल्या बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहरातनू पाच सराईत मोटारसायकल चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. गुरुवारी २५ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरणारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी येवला व मनमाड परिसरात गस्त घालत असताना मनमाड शहरातील काही संशयित बनावट नंबर प्लेट लावून मोटारसायकल वापरत आहेत, अशी गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी मनमाड शहरातून सराईत गुन्हेगार गणेश राजेंद्र खैरनार (वय २७ रा. निंबाळकर चाळ, मनमाड) राजू रमेश सपकाळ (वय २३ रा. विवेकानंदनगर, मनमाड), अमोल पोपट वाघ (वय २५ रा. विवेकानंदनगर, मनमाड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बनावट नंबरप्लेट असलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर मोटारसायकल या चोरट्यांनी येवला शहरातून चोरल्याची कबुली दिली. सदर आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार गोरख कदम (वय २२), वाल्मिक भाऊसाहेब पिंपरकर (वय २८ दोघे रा. सोमठाण देश, ता. येवला), रवींद्र उर्फ भैय्या वसंत बेलेकर (रा. विंचुरकरवाडा, विंचुर ता. निफाड) यांच्यासह येवला, मनमाड, लासलगाव, चांदवड, निफाड परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळवण पंचायत समिती विभागात द्वितीय

$
0
0

यशवंत पंचायतराज अभियानात उत्कृष्ट कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

यशवंत पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कळवण पंचायत समितीने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक (सन २०१७-१८साठी)पटकावला आहे. आठ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामविकास विभागचे सचिव अश्विन गुप्ता आदी उपस्थित होते.

निवड समितीच्या बैठकीत राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून प्रथम, द्वितीय आणि तृतीय जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागीय पातळीवर राहता पंचायत समिती (प्रथम), कळवण पंचायत समिती (द्वितीय) व शेवगाव पंचायत समिती (तृतीय ) यांना पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

या अगोदरही कळवण पंचायत समितीला २०१३-२०१४ व २०१४-२०१५ मध्येही राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत गौरविण्यात आले होते. तर २०१५ मध्ये अनुसूचित जाती जमाती क्षेत्र विभागातून कळवण पंचायत समितीला राज्य सरकारचा द्वितीय तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा व २०१६-१७ मध्ये विभागात दुसरा असे पुरस्कार मिळाले आहेत. सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, डी. एम. बहिरम, एस. एस. जाधव, नरेंद्र पोतदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकांमध्ये मुंढे नकोच!

$
0
0

महापौर परिषदेत ठराव; अधिकार वाढवण्याची रंजना भानसींची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या हुकूमशहा आणि द्वेषबुद्धीने कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देवू नये, अशा मागणीचा ठराव नागपूर येथील राज्यस्तरीय महापौर परिषदेत आज संमत करण्यात आला.

मुंढेंसारखे एककल्ली अधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत न घेताच, लोकशाहीने मिळालेल्या अधिकाऱ्यांवर गदा आणतात अशी चर्चा या परिषदेत झाली. यासोबतच त्यासंदर्भातील ठराव पारित करीत, मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. गरज पडल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचीही तयारी या परिषदेत दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशा मागण्या या वेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी परिषदेत मांडल्या.

नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्यासह राज्यातील १९ महापालिकांच्या महापौरांची परिषद नागपूरमध्ये सुरू असून, वनामती येथे आयोजित १८ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे शनिवारी (दि. २७) उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सत्रानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांची परिषद झाली. यात ७४ व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी दिल्यानंतरही महापालिकांची अवस्था दयनीय असल्याने नगराध्यक्षांच्या धर्तीवर महापालिकांच्या महापौरांना आर्थिक अधिकार मिळावेत. लोकप्रतिनिधींचा सन्मान न राखणाऱ्या आयुक्तांविरोधात कारवाईचे अधिकार महापौरांना असावेत, यांसह विविध मागण्यांचे निवेदन महापौर भानसी यांनी परिषदेचे अध्यक्ष महाडेश्वर यांना सादर केले.

यानंतर अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या वागणूकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुंढे यांच्या कार्यशैलीबाबत महापौर भानसी यांनीही मत व्यक्त केले. परिषदेत नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मुंढेंसारखे अधिकारी हे राज्यातील कोणत्याही महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून पाठवू नये, असा ठराव यावेळी पारित करण्यात आला.

महापौर भानसी यांच्या मागण्या

- महापौरांना राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा

- महापौरांना आर्थिक-प्रशासकीय अधिकार प्रदान करावेत

- दोषी आयुक्तांवर कारवाईचा अधिकार महापौरांना मिळावा

- बजेटमधील मंजूर विषय महासभेवर यावेत

- महापौर परदेश दौऱ्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी

विकास आराखडा हेच महत्त्वाचे साधन

'शाश्वत विकास करताना अस्तित्वाची लढाई प्रत्येक शहराला लढायची आहे. त्यासाठी अधिकाराचा योग्य तो वापर करताना त्याचे नियोजनही महत्त्वाचे आहे. आज लोकप्रतिनिधींना उपविधीची माहितीच नाही, वा वाचलीच जात नाही. अधिकार दिले, तरी त्यावर काही अंकुश हवेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय हवा. विकास आराखडा मंजूर केला असताना स्वसामर्थ्यवान होण्याची महापालिकांची तयारी नाही. उत्पन्नाचे स्रोत शोधले गेले पाहिजे. परिस्थितीची गरज हेरून विकासाकडे बघण्याची गरज आहे. तरच, दिलेल्या अधिकाराचा व निधीचा योग्य तो वापर होऊ शकतो,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील महापौरांना कानपिचक्या देत सल्लाही दिला. मुख्यमंत्री म्हणाले, 'दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पुढील काळात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. विकसनशील राष्ट्रांत सर्वाधिक प्रश्न उद्भवतील. २०३०पर्यंत पंतप्रधान मोदींनी शाश्वत विकासाचे संदर्भ निवडले आहेत. वाहतूक व्यवस्था विजेवर चालणारी असली पाहिजे. द्रव व घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन व्हायला हवे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत इंधनाच्या अनिर्बंध वापराने प्रदूषण वाढले आहे. कार्बन उत्सर्जनाने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे या शहरांनी इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका

$
0
0

सायकल प्रकल्पापाठोपाठ होऊ घातलेला ई-टॉयलेट प्रकल्प नाशिककरांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. शहरात सार्वजनिक शौचालयांची कमरता आणि उपलब्ध शौचालयांची दुरवस्था, तसेच त्यांच्या अस्वच्छतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची होणारी कुंचबणा थांबण्यास यामुळे मदत होणार आहे. कमीत कमी जागेत पर्यावरणपूरक सेटअप, स्वयंचलित सफाई यंत्रणा आदी वैशिष्ट्यांमुळे हा प्रकल्प शहरवासीयांच्या पसंतीस उतरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नसल्याने ही आणखी एक चांगली बाब. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी हातभार लावणाऱ्या अशा प्रकल्पांचे स्वागतच करायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीची साधणार पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोनस आणि पगाराची रक्कम हाती पडल्याने आज दिवाळीपूर्वी येणाऱ्या रविवारी (दि. २८ ऑक्टोबर) ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत.

शहरातील बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या असून, विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सवलतींचा वर्षाव ग्राहकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे आज शहरातील मुख्य बाजारपेठात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विविध साहित्य खरेदीची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यामुळे पणत्या, पूजा साहित्य, केरसुणी, लक्ष्मी मूर्ती, रांगोळ्या, कपडे अशी विविध प्रकारची खरेदी करण्यात कुटुंबेच्या कुटुंबे व्यस्त असल्याचे दिसून आले. शहरातील मेनरोड, शालिमार, नाशिकरोड, कॅनडा कॉर्नर अशा विविध परिसरांमध्ये दुकाने थाटण्यात आली असून, ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. पुढील रविवारी वसुबारस आहे. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वीच खरेदी पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असल्याने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील विविध मॉल्समध्येही दिवाळीसाठी अनेकविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कपड्यांपासून ते आकाशकंदील, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा सर्व वस्तूंवर या ऑफर्स मिळत असल्याने मॉल्सकडेही नाशिककरांचा मोठा कल दिसत आहे. याशिवाय खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनेही आयोजित करण्यात आली असून, फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी येथे गर्दी होत आहे. रविवारी गर्दीच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीचे तांडव

$
0
0

मालेगावातील गोल्डननगरात ५० झोपड्या खाक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील गोल्डननगर भागातील झोपडपट्टीत शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. पूर्वभागातील अत्यंत चिंचोळी गल्ली असलेल्या परिसरात ही आग लागल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे ५० झोपड्या जळून खाक झाल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टी परिसरात ही आगीची घटना घडली. अग्निशमन दलास माहिती मिळताच अधीक्षक संजय पवार व त्यांचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चिंचोळ्या गल्ल्या व बघ्यांची गर्दी यामुळे अग्निशमन दलास मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने आगीची भीषणता लक्षात येत होती. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर ७ बंब घटनास्थळी मागविण्यात आले. तब्बल एक तासभर हा आगीचा थरार सुरू होता. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

सिलिंडरचा स्फोट?

आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आगीची भीषणता लक्षात घेता सटाणा, मनमाड व धुळे येथून सायंकाळी उशिरा बंब मागविण्यात आले. घटनास्थळी प्रांत अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पालिका उपायुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त कमरुद्दीन शेख, विलास गोसावी आदी हजर होते. सायंकाळी अंधार पडल्याने आग विझविण्यात अडथळा निर्माण झाला होता.

दोन तासांनंत आग अटोक्यात

दाट लोकवस्ती व चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग वाढत असल्याचे लक्षात घेता प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी नसल्याचे वृत्त होत. सुमारे दोन तासांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत पालिका, महसूल, पोलिस प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images