Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहून गेलेल्या पाण्याचे काय?

0
0

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून गुरुवारी सकाळी पाणी सोडण्याचा आणि सायंकाळी अचानकपणे विसर्ग थांबविण्याचा निर्णय घेणाऱ्या जलसंपदा आणि महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नाशिक शहराचे पिण्याचे पाणी आणि सिंचन यातील तूट लक्षात घेता गंगापूरमधील विसर्ग तात्पुरता थांबविण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मात्र, दिवसभर वाहून गेलेल्या पाण्याचे काय आणि गंगापूर धरण समूहातील तुटीचा विचार पाणी सोडण्यापूर्वी का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गंगापूर धरणात तूट असतानाही नाशिकच्या जलसंपदा विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर उलट जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी पुढाकारच घेतल्याचे दिसून येत होते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याची याचिका फेटाळताच जलसंपदा विभागाने नियोजन करून गुरुवारी सकाळी पाणी सोडण्याचे निश्चित केले. जलसंपदा विभाग आणि महसूल यांच्यातील असमन्वय आणि गोंधळ यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा आणि तो थांबविण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली आहे. या गोंधळामुळे पाण्याचा वादही पेटणार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असतांना पाणी सोडतांना बिगर सिंचनात केलेल्या वाढीचा मुद्दा कसा सुटला याबाबतही आता तर्क व्यक्त केले जात आहेत.

पाणी सोडण्याच्या आदेशावरून आठ दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. काही जण उच्च न्यायालयात तर काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले. पण, त्यानंतरही पाण्याच्या स्थितीचे वास्तव समोर आले नाही. तसेच, जलसंपदा विभागापासून सरकारपर्यंत विविध प्रकारचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून केला गेला. आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून गुरुवारी दिवसभरही हा पाठपुरावा सुरू होता.

९.३६ दशलक्ष घनमीटरची तूट

गंगापूर धरण समूहातील आरक्षणांचा विचार करता ९.३६ दशलक्ष घनमीटरची तूट निर्माण होत असल्याचे स्पष्ट आहे. ही बाब गेल्या काही दिवसांपासून सरकारी पातळीवरही चर्चिली जात होती. मात्र, याबाबत उदासिनता दाखविल्याने अखेर गुरुवारी सकाळी पाणी सोडावे लागले आणि सायंकाळी तो निर्णय मागेही घ्यावा लागल्याचे नाट्य घडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याशी खेळ

0
0

गंगापूर धरणातील विसर्ग आठ तासांत थांबविला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शिरसावंद्य मानून गुरुवारी सकाळी दहा वाजता गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने केलेल्या पाण्याचा विसर्ग सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तात्पुरता थांबविण्यात आला. गंगापूर धरणसमूहातील पाणी आरक्षण लक्षात घेता निर्माण होणारी ९.३६ दलघमी तूट भरुन येणे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. दारणा आणि मुकणे धरणांतून मात्र विसर्ग सुरूच आहे. या तात्पुरत्या स्थगितीनंतर पाण्याचा गोंधळ आणखी वाढला असून, हा प्रश्न आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या पाण्याशी सुरू असलेला हा 'खेळ' कोणाच्या सांगण्यावरून व कशासाठी चालला आहे तसेच दिवसभर धरणातून गेलेल्या पाण्याची जबाबदारी आता कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जायकवाडी धरणात पाण्याची तूट असल्याने समन्यायी पाणी वाटपाच्या तत्त्वानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड़ आणि दारणा समूहातून ३.२४ टीएमसी पाणी सोडा असे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. मात्र, न्यायालयाने पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा या दोन्ही धरणातून गुरुवारी सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, या घटनेस अवघे आठ तास होत नाही तोच विसर्ग थांबविण्यात आला. गंगापूर धरणातील पाण्याचे आरक्षण लक्षात घेता ९.३६ दलघमी तूट दिसून येते. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदा विभाग, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार वरच्या भागातील धरणातील पाणी आणि तेथील आरक्षण यांचा विचार करता जर तूट निर्माण होत असेल तर पाणी सोडण्याची कुठलीही आवश्यकता नाही. याच निर्देशाचा आधार घेत गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान करणारे आहे आणि तूट निर्माण झाल्याने भविष्यातील टंचाई आणि संबंधित समस्यांना अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा फरांदे यांनी दिला. अखेर नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाने ही बाब गोदावरी महामंडळाच्या निदर्शनास आणून दिली. आणि सायंकाळी साडेसहा पासून गोदावरी धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. मात्र, सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहा या काळात ८० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूरमधून सोडण्यात आले आहे. गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे प्रस्तावित होते. सायंकाळी पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्याने उर्वरीत ५२० दशलक्ष घनफूट पाणी सोडणे बाकी आहे. हे पाणी कधी सोडले जाणार किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. गंगापूरमधून विसर्ग थांबविल्याने औरंगाबादमध्ये पुन्हा आंदोलन वेग घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणखी भडकण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील रस्त्यांसाठी बृहन्मुंबई पॅटर्नचा आधार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेला आता बृहन्मुंबई पॅटर्नचा आधार घ्यावा लागणार आहे.

रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व टिकाऊ स्वरूपाची होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारनाने सर्व महापालिकांना बंधनकारक केली आहे. त्यामुळे महापालिकेला बृहन्मुंबई महापालिकेच्या तज्ज्ञ समितीचा सल्ला घ्यावा लागणार आहे.

उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या देखाल व दुरुस्तीच्या प्रचलित कार्यपद्धतीचा आढावा घेऊन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक, तसेच सुधारणात्मक कार्यपद्धती सूचविण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी व बांधकामांसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करणे सर्व नागरी स्वराज्य संस्था अर्थात, महापालिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या कामांबाबत, तसेच देखभालीबाबत तज्ज्ञ व्यक्तींची स्टँडिंग टेक्निकल ॲडव्हायझरी कमिटी गठित केली आहे. या समितीमार्फत विविध सूचना बृहन्मुंबई महापालिकेस केल्या जातात. या समितीमार्फत राज्यातील अन्य महापालिकांनादेखील सल्ला देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार रस्त्यांच्या कामांबाबत नाशिक महापालिकेला आता बृहन्मुंबई महापालिकेच्या तज्ज्ञ समितीचा सल्ला घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी यावेळी केले.

केंद्रातील पंतप्रधान भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चातर्फे सुराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे नाशिकमध्ये वसंतस्मृती कार्यालय येथे शहरातील नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत अटल पेन्शन, आयुष्यमान, उज्ज्वला गॅस कनेक्शन, स्किल इंडिया, पंतप्रधान आवास, सुकन्या समृद्धी, जनधन आणि जनसुरक्षा, शेतकऱ्यांना नाममात्र दारात विमाकवच, मुद्रा योजना आदी विविध योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. मोदी सरकारची चार वर्षांची कामगिरी अत्यंत दमदार असून, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सुराज्य यात्रेद्वारे होत आहे. मुंबई येथून निघालेली सुराज्य रथयात्रा आतापर्यंत विविध जिल्ह्यांत फिरून नाशकात आली. स्वागतावेळी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, सुजाता करजगीकर, भरती बागूल, पुष्पा शर्मा, नगरसेवक जगदीश पाटील, अरुण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, माणिकराव देशमुख, गणेश कांबळे, सुखदेव ढिकले, संदीप जोशी आदी उपस्थित होते.

नाशिकमध्ये उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात असून, ते मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि केंद्रात पुन्हा भाजपाप्रणीत सरकार सत्तेवर येईल, असे महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष चिराग गुप्ता, सचिव शैलेश मिश्रा, महानगर अध्यक्ष सुभाष श्रीवास्तव आणि योगेश भगत आदींनी सांगितले. यात्रेत प्रद्युम्न शुक्ला, अर्जुन शुक्ला, नितीश वर्मा, प्रदेश उपाध्यक्ष भुवाल सिंह, सरदार रघुवीर सिंह, सचिव कमलेश्वर त्रिपाठी, अरविंद पाठक, कृपाशंकर सिंह, दिनेश शर्मा, विवेक यादव, जय गोविंद पांडे, रामप्रकाश सिंह, द्वारका तिवारी, अनुज सिंह, शशी मिश्रा, प्रकाश तिवारी, मोर्चाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अमरनाथ मिश्रा सहभागी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालिकाविजयाचा षटकार

0
0

वेस्ट इंडिजला ९ विकेटसनी नमवून

भारताने मालिका जिंकली

वृत्तसंस्था, तिरुवनंतपुरम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना हा दिवसरात्र वन-डे असला तरी पूर्ण प्रकाशझोतात खेळण्यापूर्वीच भारताने पाहुण्या विंडीजवर नऊ विकेटनी मात करून पाच सामन्यांची ही मालिका ३-१ अशी जिंकली. यासह भारताने मायदेशातील सलग सहावा मालिकाविजय साजरा केला. विंडीजला अवघ्या १०४ धावांत गुंडाळून भारताने १ फलंदाज गमावून १४.५ षटकांतच निर्धारित लक्ष्य पार केले.

भारताचा डावखुरा गोलंदाज रवींद्र जडेजाने घेतलेल्या चार विकेटमुळे वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या १०४ धावांतच आटोपला. केवळ ३१.५ षटकांतच विंडीज फलंदाजांनी गुडघे टेकले. या मालिकेत यशस्वी ठरलेल्या खलिल अहमद आणि जसप्रीत बूमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. वेस्ट इंडिजने ठेवलेले हे १०५ धावांचे लक्ष्य भारतासाठी अगदीच मामुली ठरले. सलामीवीर रोहित शर्मा (ना. ६३) आणि कर्णधार विराट कोहली (ना. ३३) यांनी शिखर धवन बाद झाल्यानंतर भारताला सहज विजय साध्य करून दिला.

वेस्ट इंडिजने अखेरच्या वन-डे सामन्यात सपशेल शरणागती पत्करली. पहिल्या तीन वन-डेंत त्यांनी जबरदस्त प्रतिकार केला होता; पण अखेरच्या दोन वन-डेत त्यांची कामगिरी अत्यंत खराब झाली. शेवटच्या वन-डेत जर विंडीजने बाजी मारली असती तर मालिका २-२ अशी बरोबरीत संपली असती; पण विंडीजने गुडघे टेकले आणि भारताने ही मालिका सहज जिंकली. २०१५मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून २-३ असा मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र मायदेशात भारतीय संघाने मालिका गमावलेली नाही.

रोहितने या सामन्यातही आपला फॉर्म कायम ठेवत अर्धशतकी खेळी केली. २०१८मधील त्याच्या १००० धावांचा टप्पाही यावेळी पूर्ण झाला. शिवाय, वन-डे क्रिकेटमधील त्याचे २०० षटकारही या सामन्यात पूर्ण झाले.

रोहितला १८ धावांवर असताना जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलत पाच चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत वेस्ट इंडिजच्या आव्हानातली हवाच काढून टाकली.

त्याआधी, वेस्ट इंडिजची चांगलीच त्रेधा उडाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि भुवनेश्वरने भारताला चौथ्याच चेंडूवर कायरन पॉवेलला झेलबाद केले. त्यानंतर विंडीजचा आधार असलेला होप दुसऱ्या षटकात बाद झाला आणि विंडीजची स्थिती २ बाद २ अशी वाईट झाली. मर्लन सॅम्युएल्सने थोडा प्रतिकार केला; पण पहिला चौकार मारण्यासाठी विंडीजला चौथ्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. १२व्या षटकात सॅम्युएल्सचा अडथळा दूर झाला. जडेजाने त्याला २४ धावांवर बाद केले. कर्णधार होल्डरचा झेल केदार जाधवने घेतला. खलिल अहमदला हा बळी मिळाला. तो विंडीजतर्फे सर्वाधिक धावा (२५) करणारा फलंदाज ठरला.

धावफलक

वेस्ट इंडिज - कायरन पॉवेल झे. धोनी गो. भुवनेश्वर ०, रोव्हमन पॉवेल झे. धवन गो. खलिल अहमद १६, शाय होप त्रि. गो. बुमराह ०, मर्लन सॅम्युएल्स झे. कोहली गो. जडेजा २४, शिमरॉन हेटमायर पायचीत गो. जडेजा ९, जेसन होल्डर झे. केदार गो. खलिल २५, फॅबियन अॅलन झे. केदार गो. बुमराह ४, किमो पॉल झे. रायुडू गो. कुलदीप ५, देवेंद्र बिशू नाबाद ८, केमार रोच झे. केदार गो. जडेजा ५, ओशेन थॉमस पायचीत गो. जडेजा ०; अवांतर - ८; एकूण - ३१.५ षटकांत सर्वबाद १०४.

बाद क्रम : १-१, २-२, ३-३६, ४-५३, ५-५७, ६-६६, ७-८७, ८-९४, ९-१०३, १०-१०४.

गोलंदाजी : भुवनेश्वरकुमार ४-१-११-१, जसप्रीत बुमराह ६-१-११-२; खलिल अहमद ७-१-२९-२, रवींद्र जडेजा ९.५-१-३४-४, कुलदीप यादव ५-१-१८-१.

भारत - रोहित शर्मा नाबाद ६३, शिखर धवन त्रि. गो. थॉमस ६, विराट कोहली नाबाद ३३; अवांतर - ३; एकूण - १४.५ षटकांत १ बाद १०५. बाद क्रम : १-६.

गोलंदाजी : केमार रोच ५-२-१३-०, ओशेन थॉमस ४-०-३३-१, किमो पॉल २-०-२२-०, जेसन होल्डर १-०-१५-०, देवेंद्र बिशू १.५-०-१६-०, फॅबियन अॅलन १-०-५-०.

सामनावीर : रवींद्र जडेजा; मालिकावीर - विराट कोहली.

---------

खेळ आकड्यांचा...

२ - वन-डे क्रिकेटमध्ये षटकारांचे द्विशतक साजरे करणारा रोहित हा भारताचा दुसराच फलंदाज ठरला. रोहितने आतापर्यंत १९३ वन-डे सामने खेळले असून, त्याने आतापर्यंत २०२ षटकार ठोकले आहेत. भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीने ३२९ सामन्यांत २११ षटकार ठोकले आहेत. वन-डेमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या (३५१) नावावर आहे.

६ - भारताने मायदेशात सलग सहावी वन-डे मालिका जिंकली. ऑक्टोबर २०१५मध्ये मायदेशात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका गमावली होती. त्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोनदा वन-डे मालिका जिंकल्या, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आता वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने वन-डे मालिका जिंकल्या.

१०४ - भारताविरुद्ध वन-डेतील विंडीजची १०४ ही आतापर्यंतची नीचांकी धावसंख्या. यापूर्वी, १९९७मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला भारताने विंडीजचा डाव १२१ धावांत गुंडाळला होता. ही आतापर्यंतची विंडीजची भारताविरुद्धची नीचांकी धावसंख्या होती.

१०३० - वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने या वर्षात हजार धावांचा टप्पा पार केला. रोहितने या वर्षी खेळलेल्या १९ वन-डेंमध्ये ७३.५७च्या सरासरीने १०३० धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या वर्षी विराट कोहली आणि इंग्लंडचा बेअरस्टो यांनी आतापर्यंत हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराटने १४ सामन्यांत १३३.५५च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहे. त्यात सहा शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. बेअरस्टोने २२ सामन्यांत ४६.५९च्या सरासरीने १०२५ धावा केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूर मध्यमेश्वरवर चोख पोलिस बंदोबस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि मुकणे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर धरण परिसरात विरोध होऊ नये याची दक्षता घेत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक आणि १२५ पोलिसांचा बंदोबस्त होता. याच ठिकाणी वैजापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यू. के. पठाण, शाखा अभियंता एस. आर. वाईकर, सहायक अभियंता डी. सी. महाले, एच. एम. शार्दूल, पी. बी. साबळे, कालवा चौकीदार एस. बी. पायमोडे, नाशिकचे ढोकणे, उपअभियंता नागपुरे शाखा डोखळे, संदेशक के. एन. कातकाडे यांच्यासह बांधकाम विभागाचे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी व चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख व टीम उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्राची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर

0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet- @sanchetigMT

नाशिक : औद्योगिक कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण यासाठी असलेले औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नाशिकमध्ये आहे. मात्र, या विभागात चार जिल्ह्यांचा समावेश असूनदेखील येथे अवघे अकरा अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अत्यंत तोकडी कर्मचारीसंख्या असल्याने औद्योगिक कामगारांची सुरक्षा हा विभाग कसा साधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्यांची संख्या वाढलेली असून, त्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या विभागावर मोठी जबाबदारी असतानाही सरकारचे या विभागाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिक विभागात चार जिल्ह्यांचा समावेश असून, त्यात नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हे अंतर्भूत आहेत. या विभागात फॅक्टरी अॅक्टच्या नियमात बसणाऱ्या ३ हजार ९२ कारखान्यांचा समावेश आहे. यातील कामगारांची संख्या १ लाख ७२ हजार १२५ असून, त्यात काही कारखाने आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगारांचे प्रश्न त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी असलेले कार्यालयाल मात्र अधिकारी व कर्मचारी कमी असल्यामुळे कामगारांचे प्रश्न व सुरक्षा कशी सुटेल हा कळीचा मुद्दा आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग कारखाने अधिनियम १९४८ व त्यातील तरतुदींची अमंलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत खात्री करण्याचे काम या विभागाचे आहे. त्याचप्रमाणे कामगारांचे कामकाजाचे तास, कामाच्या जागेची परिस्थिती, अपघातांची आणि धोकादायक घटनांची संख्या कमी करणे, सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र सरकारने तयार केलेल्या धोरण व कार्यक्रमानुसार उपाययोजना करण्याची जबाबदारी या विभागावर आहे.

विभागात अवघे सात कर्मचारी

नाशिक विभागाचे मुख्य कार्यालय नाशिक येथे उद्योग भवनात आहे. त्याचप्रमाणे या विभागाचे जळगाव व धुळे येथे कार्यालय आहे. विभागीय कार्यालयात अवघे सात अधिकारी व कर्मचारी आहेत. जळगाव येथे तर एका लिपिकावरच सर्व कार्यालयाची जबाबदारी आहे. येथील कार्यालयाचा कारभार नाशिकचे अधिकारीच पाहतात.

अशी आहेत रिक्त पदे

नाशिक विभागात उपसंचालकांचे एक, सहसंचालकांची तीन, अधीक्षकांचे एक, लिपिकांची दोन पदे रिक्त आहेत. जळगावमध्ये दोन सहाय्यक संचालक व एक उपसंचालकांचे पद रिक्त आहे. धुळे येथे एका लिपिकाची कमतरता आहे.

--

जिल्हानिहाय स्थिती

--

जिल्हा - कारखाने - कामगारसंख्या

नाशिक - १८४६ - १ लाख १० हजार ६०६

जळगाव - ८७३ - ४३ हजार ५०५

धुळे, नंदुरबार - ३७३- १८ हजार १४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या पाण्याची जायकवाडीकडे धाव

0
0

ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जायकवाडीला नाशिकच्या गंगापूर, दारणा व मुळा धरणातून कडेकोट बंदोबस्तात गुरुवारी सकाळी १० वाजता पाणी सोडण्यात आले. या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी नांदूर मध्यमेश्वर धरणात सायंकाळी एकत्र आले; त्यानंतर ते पाणी जायकवाडीच्या धरणात सोडण्यात आले.

जिल्ह्यातील सकाळी दारणा व मुकणे धरणातून ३ हजार क्युसेकने हे पाणीविसर्ग करण्यात आले. त्यानंतर गंगापूर धरणातून सुरुवातीला एक हजार क्युसेकने पाणीविसर्ग करण्यात आले. त्यानंतर दोन तासाने दोन हजार क्युसेसने सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता तीन हजार क्युसेसने हे पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणावर पाणी सोडतांना विशेष काळजी घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाण्याची तूट असल्याने समन्यायी वाटपाच्या तत्त्वानुसार ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने २३ सप्टेंबर दिले. त्यानंतर नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला. ठिकठिकणी आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर काही जणांना उच्च न्यायालयात धाव घेतली. पण, येथे स्थगिती मिळाली नाही. त्यानंतर विखे पाटील साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दोन दिवस सुनावणीमुळे पाणी सोडणे लांबणीवर गेले. पण, बुधवारी त्यावर निकाल आला व ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे पाणी सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता हे पाणी सोडण्यात आले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या धरणावर ठेवण्यात आला. कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. जलसंपदा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. रॅपिड अॅक्शन फोर्सला येथे बोलवण्यात आले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाचे पथकही तैनात करण्यात आले होते. तसेच धरणात दोन स्पीड बोटही निरीक्षणासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

असे सोडले पाणी

गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट तर दारणा व मुकणे धरणातून २.४० टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडतांना गंगापूर धरणात ४ हजार ७८४ दशलक्ष घनफूट पाणी होते. तर पाण्याची पातळी ८३.८४ होती. दारणा धरणात ७ हजार ६६४ दशलक्ष घनफूट पाणी होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाईला स्थगिती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील ५७५ अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला हायकोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली असून, या सर्व धार्मिक स्थळांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना पालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी दिला नसल्याबद्दल हायकोर्टाने पालिकेची कानउघडणी केली. या स्थळांबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना नगररचना विभागाने ऐकून घ्याव्यात, तसेच मोकळ्या भूखंडावर १० टक्क्यांपर्यंत बांधकाम अनुज्ञेय असल्याने सदरील स्थळे नियमित करून घेण्याचे तोंडी आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने ऐन सणासुदीच्या कार्यकाळात शहरातील मोकळ्या भूखंडावरील ७२ आणि कॉलनीअंतर्गत रस्त्यावरील ५०३ धार्मिक स्थळांच्या निष्कासनाची प्रक्रिया सुरू करीत त्यांना नोटीसा दिल्या होत्या. त्याविरोधात धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने या ७२ धार्मिक स्थळांवरील कारवाईला यापूर्वीच स्थगिती दिली होती. त्यापाठोपाठ पालिकेने पुन्हा उर्वरित ५०३ धार्मिक स्थळांवरील कारवाईला सुरुवात केली होती. या कारवाईच्या विरोधात सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद थोरात, कैलास देशमुख, प्रवीण जाधव, अमोल पाटील आणि नंदकुमार कहार यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने २६ ऑक्टोबर रोजी पालिकेला कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. या याचिकेची सुनावणी गुरुवारी(दि. १) ठेवली होती. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एक आदेश दिला असून त्याद्वारे या स्थळांसाठी एक समिती स्थापन करावी, त्यांनी यादी तयार करावी, त्या यादीला इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्धी द्यावी, त्यासंदर्भात कुणाची तक्रार, हरकत किंवा सूचना असल्यास त्यावर सुनावणी घ्यावी आणि निर्णय द्यावा असे आदेश दिले होते.

गुरूवारी न्या. बी. आर. गवई यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. राम आपटे, प्रवर्तक पाठक यांनी हायकोर्टात बाजू मांडत पालिकेने केलेल्या त्रुटींवर बोट ठेवले. धार्मिक स्थळांची वर्गवारी नीट न करणे, नागरिकांना संधी न देणे अशा त्रुटींकडे बोट दाखवले. त्यामुळे हायकोर्टाने ७२ आणि ५०३ अशा एकूण ५७५ धार्मिक स्थळांवरील कारवाईस स्थगिती दिली आहे. या सर्व धार्मिक स्थळांची फेरतपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत. लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत नागरिकांच्या हरकती व तक्रारी ऐकून घ्याव्यात, तसेच नगररचना विभागाने मोकळ्या भूखंडावर असलेली धार्मिक स्थळे १० टक्के बांधकाम अनुज्ञेयाअंतर्गत बसत असल्यास त्यांना परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नसल्याबद्दल पालिकेची खरडपट्टीही काढली. त्यामुळे शहरातील धार्मिक स्थळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बोरस्तेंकडून पाटलांचे अभिनंदन

शहरातील धार्मिक स्थळांवरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षनेते दिनकर पाटील यांनी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घेत परिश्रम घेतले होते. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांमुळेच कारवाई थांबल्याचा दावा करीत बोरस्तेंनी पाटील यांचे अभिनंदन केले. भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र बोलघेवड्याची भूमिका बजावल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे धार्मिक स्थळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देऊन न्यायालयाने महापालिकेच्या मनमानी कारभाराला चपराक दिली आहे. सरसकट सर्वच धार्मिक स्थळांवर हातोडा मारण्याच्या महापालिकेच्या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.

- दिनकर पाटील, सभागृहनेते, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला उद्या ‘वॉक विथ कमिशनर’

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उद्या शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नाशिकरोड येथील शिखरेवाडी जॉगिंग ट्रॅक येथे अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या महापालिका संदर्भातील व्यक्तिगत तक्रारी, अडचणी, परिसरातील समस्या, शहर विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना आदी आयुक्त जाणून घेतील. त्यांच्या सूचना व प्रस्तावांचा स्वीकार करतील. योग्य कार्यवाही करण्याबाबत प्रशासनास सूचना देतील. आपल्या तक्रारी, सूचना, संकल्पना महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यासाठी त्या साध्या कागदावर लिहून उपक्रमस्थळी संबंधित विभागीय कार्यालय प्रतिनिधींकडे द्याव्यात. त्याठिकाणी सकाळी सहापासून उपस्थित असणाऱ्या महापालिका विभागीय कार्यालय प्रतिनिधींकडून आपला टोकन क्रमांक घ्यावा. टोकन क्रमांकानुसार आयुक्तांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ हजार क्युसेक पाणी दारणा धरणातून रवाना

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

दारणा आणि मुकणे धरणातून गुरुवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशामुळे पाणी सोडले जात असल्याने आतापर्यंत विरोधाची भूमिका घेणाऱ्यांपैकी कुणीही धरणावर फिरकले सुद्धा नाही. मात्र, तरीही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दारणा धरणाच्या सहा स्वयंचलितपैकी सुरुवातीला डाव्या आणि उजव्या बाजूच्या दोन दरवाजांमधून तीन हजार पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यानंतर अकरा वाजता हा विसर्ग ५ हजार ८०० करण्यात आला होता. दुपारी बारा वाजेनंतर हाच विसर्ग सुमारे ११ हजार क्यूसेक प्रतिवेगाचा करण्यात येऊन उर्वरित चारही दरवाजे अर्धे उघडण्यात आले. मुकणे धरणातूनही १००० क्युसेकने पाणीविसर्ग करण्यात आला आहे.

सकाळी साडेआठ वाजेपासूनच पोलिस, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी धरणावर हजर होते. प्रांत अधिकारी राहुल पाटील, उपविभागीय पोलिस अधीक्षक उत्तमराव कडलग, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पी. एम. कुलकर्णी, दारणा धरणाचे शाखा अभियंता एस. बी. पाटील, शीतलकुमार नाईक, वाडीवऱ्हेचे निरीक्षक सुहास देशमुख, उपनिरीक्षक शांताराम देशमुख, मंडळ अधिकारी नितीन बाईकर, कर्मचारी संदीप मते व सुमारे शंभरपेक्षा अधिक पोलिसांनी धरणावर प्रथम येऊन पाहणी केली. सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी दारणाचा पश्चिमेकडील बाजूचा दरवाजा उघण्यात आला. त्यानंतर पूर्व बाजूचा ही दरवाजा तितकाच उघडला गेला अन जायकवाडीच्या दिशेने दारणा समूहाचे पाणी अखेर निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण संस्थेच्या नावाखाली १० हेक्टर जमीन लाटली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण संस्था काढण्याच्या नावाखाली महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन सात जणांनी तिची वडिलोपार्जित १० हेक्टर जमीन परस्पर स्वत:च्या नावावर करून घेतल्याची बाब समोर आली आहे. हे २००९ मधील प्रकरण असून, संशयित आरोपींमध्ये 'मविप्र'चे माजी संचालक मोहन पिंगळे यांचा समावेश आहे. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहन पोपटराव पिंगळे (रा. पेठरोड), प्रभाकर पोपटराव पिंगळे (पंचवटी), ज्ञानेश्‍वर पोपटराव पिंगळे (गंगापूररोड) हे तिघे मुख्य संशयित असून, इतर चार अनोळखी संशयितांचाही समावेश आहे. या प्रकरणी रंजना सदाशिव शिंदे (५७, धरतीधन रो-हाऊस, रोहिणीनगर, पेठरोड) यांनी फिर्याद दिली. शिंदे यांच्या फिर्यादीत, मोहन पिंगळे, प्रभाकर पिंगळे व ज्ञानेश्‍वर पिंगळे हे दि. १ एप्रिल २००९ रोजी रंजना शिंदे यांच्या घरी गेले. कै. पोपटराव महादेव पिंगळे यांच्या नावाने शिक्षण संस्था काढावयाची आहे, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्या दोन कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या. त्यानंतर शिंदे यांच्या मखमलाबाद शिवारातील सर्व्हे नंबर ३२/१७, ३२/१७, ३२/२२, ३२/२३, ३२, १३, ३२/२३ अ, ब आणि ३२/२१ या सर्व्हे नंबरमधील वडिलोपार्जित एकूण १० हेक्टर ३० गुंठे शेतजमीन खोटी कागदपत्रे व नोटरी तयार करून विकसन करारनामा आणि जनरल मुखत्यारपत्र तयार करून नोंदविण्यात आले. त्यानंतर संशयितांनी रंजना शिंदे यांच्या सहीच्या आधारे, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८५ लाख रुपयांची शेतजमीन परस्पर नावे करून घेतली, असे म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक के. डी. वाघ करीत आहेत.

--

मी स्वत: एका शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याने अशी कोणतीही वैयक्तिक शिक्षण संस्था काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. जमीन खरेदीचा व्यवहार नियमानुसार झालेला असून, त्यात काहीही बनावट नाही.

-मोहन पिंगळे, माजी संचालक, मविप्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेच्या जलवेढ्यात अडकली वाहने

0
0

दिवाळी खरेदीसाठी आलेल्या चालकांना फटका

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यात आल्याने दुपारी अचानक वाढलेल्या पाण्यामुळे गोदावरीच्या पात्राजवळ ठिकठिकाणी पार्क केलेली सुमारे १४ वाहने पाण्यात अडकली आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी येणारे बहुतांशी नागरिक गोदाघाटाच्या परिसरात वाहने पार्क करतात. नेहमीप्रमाणे वाहने पार्क करून गेलेल्या वाहनधारकांची वाहने गोदावरीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अडकून पडली. गोदाघाटाच्या म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण आदी भागात ही वाहने अर्धेअधिक पाण्यात बुडाली होती.

शहरात विविध कामासाठी चारचाकी वाहनांवरून येणारे नागरिकांच्या दृष्टीने वाहने पार्क करण्यासाठी गोदाघाट परिसर सोयीचा वाटतो. येथे जुन्या भाजीबाजाराची जागा, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपुरथळा, रोकडोबा पटांगण या भागात वाहने पार्क केली जातात. दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या कापड बाजार, सराफ बाजार, मेनरोड या बाजारपेठेच्या जवळची सर्वच रस्त्यावर ग्राहकांची गर्दी वाढलेली असल्याने या भागात वाहने नेणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्याय म्हणून गोदाघाटाच्या परिसरात वाहने पार्क केली जातात.

दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी

नेहमीप्रमाणे गुरुवारी या भागात वाहने पार्क करण्यात आली होती. गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर दुपारी दोन वाजेनंतर पाण्याची पातळी अचानक वाढत गेली. दुपारी चारच्या सुमारास पाणी वाढून गोदावरीच्या पाण्याची पातळी दाखविणारे परिमाण म्हणून ओळखणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आले. त्यामुळे गोदाकाठवर विविध वस्तू, फळे आणि खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना हलविण्यात आले.

स्थानिकांची मदत

गोदावरीला पाणी सोडण्यात येणार असल्याने रामकुंड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्त म्हसोबा, गौरी, रोकडोबा आदी पटांगणाच्या भागात नसल्याने पाणी वाढणार असल्याची कल्पना येथे वाहने पार्क करणाऱ्यांना आली नाही. वाहने पार्क करून गेल्यानंतर येथे वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे त्यांची वाहने पाण्यात अडकली. दुपारी चारच्या सुमारात या पटांगणाच्या भागात १४ चारचाकी वाहने अडकून पडली होती. स्थानिक तरुणांच्या मदतीने यातील काही वाहने सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर काढण्यात आली

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुवार ठरला ‘आंदोलनवार’

0
0

साक्रीला दुष्काळी जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको; साहुरला विविध मागण्यांसाठी आंदोलक पाण्यात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य सरकारने राज्यातील दुष्काळी तालुके जाहीर केले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला वगळण्यात आले. याचा निषेध म्हणून शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. त्यासोबतच शिंदखेडा तालुक्यातील साहुरजवळ रस्ते दुरुस्ती, बस सुरू करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. त्यामुळे गुरुवार जिल्ह्यात ‘आंदोलनवार’ ठरला.

राज्य सरकारकडून जाहीर दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे नाव नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजता शिवसेनेकडून साक्री तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनात जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली करपलेल्या पिकांचे तोरण साक्री तहसील कार्यालयाला बांधले होते. यानंतर साक्री शहराजवळील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. मात्र, वेळीच पोलिसांचा फौजफाटा आंदोलनाठिकाणी दाखल होऊन महामार्गवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून सायंकाळी सुटका केली.

शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा तालुका गंभीर दुष्काळ तालुके म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. मात्र, यात साक्री तालुका वगळण्यात आला आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करीत जिल्हा शिवसेनेकडून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

करपलेल्या पिकांचे तोरण तहसीलच्या दारावर
या आंदोलनात पावसाअभावी करपलेल्या फळे, पीक, अन्न-धान्यांचे तोरण बनवून ते तहसील कार्यालयाच्या दरवाज्यावर बांधण्यात आले. आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाने साक्री तालुक्यालादेखील दुष्काळी तालुका घोषीत केला नाही तर शिवसेनेकडून तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा दिला. सकाळी शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शिवसैनिकांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

तालुक्यात पाणीटंचाईची समस्या
हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार व तहसील कार्याल्याने दिलेल्या अहवालानुसार शासनाने साक्री तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करण्यास नकार दर्शविला आहे. मात्र, दुष्काळामुळे तालुक्यातील गहू, बाजरी, मका, डाळींब, कापूस यांसह अन्य पिकांचे नुकसान होऊन पिके करपून गेली आहेत. तर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. असे असतानादेखील शासनाने जाणीवपूर्वक साक्री तालुक्यावर अन्याय केला आहे, अशा आशयाचे निवेदन या वेळी तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, तालुकाप्रमुख विशाल देसले, पंकज मराठे, भूपेश शहा, हिंमत साबळे, चंद्रकांत देवरे, पंजाबराव गांगुर्डे, भरत जोशी, त्रिलोक दवे, प्रकाश पाटील, अविनाश देवरे, वना जाधव, सचिन शेवाळे, पंकज गवळी यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुष्काळी जाहीर करण्यासाठी पाठपुरावा
जिल्ह्यात चारही तालुक्यात अतिशय भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तीन तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, साक्री तालुक्यात पहिला पाऊस चांगला झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटले आहे. येत्या काळात साक्री तालुकादेखील दुष्काळी जाहीर करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून, लवकरच दुष्काळाच्या सर्व सवलती तालुक्यात लागू होणार असल्याची माहितीही मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस, रस्त्यांसाठी जलसमाधी आंदोलन

0
0

शिंदखेडा तालुक्यात साहुरला पालकांसह विद्यार्थी आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या साहुर गावाजवळ विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १) सकाळी ९ वाजता जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, साहुर ते दोंडाईचा एसटी बस सुरू करावी, दोंडाईचा जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने त्यामुळे वाहने गावात दाखल होत नाहीत, यासाठी रस्ता तत्काळ करण्यात यावा, यांसारख्या मागण्या यावेळी आंदोलकांनी मांडल्या.

आंदोलन सुरू होऊन तब्बल दोन तासांनी तहसीलदार आणि पोलिस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदार सुदाम महाजन व पोलिसांनी प्रशासनास्तरावर सर्व विषय मार्गी लागण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले त्यानंतर हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले. गेल्या महिनाभरापासून वेळोवेळी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत असून, गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने रस्त्याची रुंदी वाढवून प्रश्न मार्गी लावण्यात यावा. एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळावी. रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करावेत, अशी मागणीही या वेळी आंदोलकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज बदलणार नाशिकचा माहोल?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विदर्भ-मराठवाड्याच्या बहुचर्चित दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीनंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात राजकीय फटाके फोडणार आहेत. मागील खेपेस तीन आमदार तसेच महापालिकेवर झेंडा फडकविणारे राज हे मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये तळ ठोकून मतदारांना पुन्हा साद घालणार आहेत. त्यासाठीच्या तयारीचा श्रीगणेशा पक्षातर्फे करण्यात आला असून, जिल्ह्यात तालुकावार मेळावे घेतले जात आहेत. दत्तक जावूनही पदरी निराशाच पडल्याने नाशिककरांमध्ये असलेली मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी तसेच भाजपच्या ओसरलेल्या लाटेचा फायदा घेण्यासाठी राज पुन्हा सज्ज होत आहेत. राजकीय माहोल बदलण्याची क्षमता असलेल्या राज यांच्या संभाव्य मोर्चेबांधणीने भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची चलबिचल झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाशिककरांचे एक अतूट नाते आहे. शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचा नाशिकशी घनिष्ट संबंध होता. त्यामुळे मनसेची स्थापना झाल्यानंतर राज यांना नाशिककरांनी सर्वप्रथम साथ देत, एकाच वेळी तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता त्यांच्या हाती सोपवली. विकासाच्या ‘ब्लू प्रिंट’ला भूलून राज यांच्या पारड्यात मते टाकण्यात आली. परंतु, ही ‘ब्लू प्रिंट’ काही नाशिककरांना पहायलाच मिळाली नाही. ठाकरे यांनी उभारलेल्या गोदाघाट प्रकल्पाचीही नंतर वाट लागली. मनसेच्या तीनही आमदारांनी ठाकरेंसह नाशिककरांचाही भ्रमनिरास केला, तर आमदारांमधील संघर्ष आणि महापौरांच्या चुकीच्या निवडीने राज यांना फटका बसला. मनसेला गडातच ओहोटी लागली. प्रथम महापौर, प्रथम आमदार तसेच प्रथम जिल्हाप्रमुखासह अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. महापालिकेत शेवटच्या काही महिन्यांमध्ये मनसेने सीएसआर फंडातून शहरात चांगली विकासकामे केली असली तरी त्यांचे ब्रँडिंग करण्यात अपयश आल्याने महापालिकेतही या पक्षाला सपाटून मार खावा लागला. विधानसभा आणि महापालिकेतला पराभव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे ठाकरेंनी नाराज होत नाशिककडे पाठ फिरवली. परंतु, नाशिककरांनी ज्या अपेक्षेने मनसेसोडून भाजपला साद दिली, त्या अपेक्षांची पूर्ती करण्यात भाजपला अपयश आले आहे. महापालिकेतला कारभार दीड वर्षातच भरकटल्याने भाजपपेक्षा मनसे कित्येकपटीने बरी होती, अशी नागरिकांची भावना झाली आहे. भाजपचे आमदारही समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर विकासाऐवजी नाशिकचे एक एक प्रकल्प येथून पळवले जात असल्याने नागरिक नाराज आहेत. त्यामुळे हा टायमिंग साधून ठाकरेंनी नाशिकमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून त्यांनी मनसेचे पुन्हा नवनिर्माण करण्याचा चंग बांधला आहे. दीड महिन्यापूर्वी नाशिक दौऱ्यातच ठाकरेंनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्याप्रमाणे आता पक्षाच्या नेत्यांनी शहरासह ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अन्य पक्षातील नाराजांचीही चाचपणी सुरू असून, काही प्रवेश घडवून आणत राजकीय फटाकेही फोडले जाणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या या दौऱ्याकडे मनसेसह अन्य पक्षीयांचेही लक्ष लागून आहे.

ठाकरेंकडून लोकसभेची तयारी

गेल्या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात असलेल्या ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. लोकसभा निवडणूक न लढवण्याचा फटका त्यांना शेवटी बसलाच. पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रत्येक निवडणूक लढणे गरजेचे असते, अशी आता त्यांची धारणा झाली असून, त्यांचे मोदीप्रेमही कमी झालेले आहे. त्यामुळे ठाकरेंकडून येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिले जाऊ शकतात. त्यासाठीच नाशिक शहरासह ग्रामीण भागात पक्षाचे मेळाव्यांचा धडाका लावण्यात आला आहे. नाशिक मतदारसंघात ७० टक्के शहरी भाग असल्याने लोकसभेसाठी पक्षाकडून तयारी करण्यात आली आहे. मनसेच्या या तयारीचा धसका मात्र शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांसह इच्छुकांनीही घेतला आहे. मनसेची लोकसभा निवडणुकीत एन्ट्री झाल्यास राजकीय गणिते निश्चितच बदलणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रोक्त शिक्षणातून घडताय बांधकाम कारागीर

0
0

सम्राट ग्रुपचा 'स्किल वर्कर' घडविण्यास पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गवंडी काम शिकण्यासाठी शास्त्रोक्त शिक्षण किंवा कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे सरावातून किंवा दुसऱ्या कारागिराचे काम पाहून गवंडी काम शिकले जाते. मात्र, या गवंडी कारागिरांना शास्त्रोक्त शिक्षण दिल्यास बिल्डर व्यवसायास अधिक चालना मिळेल. तसेच गवंडी कारागिर तंत्रशुद्ध कार्यप्रणाली अंमलात आणतील. याचा फायदा संपूर्ण बिल्डर क्षेत्रास होईल. या उद्देशाने शास्त्रोक्त शिक्षणाचे धडे शहरातील गवंडी कारागिर गिरवत आहेत. यासाठी पुढाकार घेतलाय 'सम्राट बिल्डर्स'ने.

फ्लॅट खरेदी करताना त्याच्या इन्फ्रास्टक्चरचा विचार प्रामुख्याने केला जातो. त्यासाठी मजबूत बांधकामाच्या मागे गवंडी कारागिरांचे कौशल्य अधिक प्रभावी असणे गरजेचे असते. हीच गरज ओळखून सम्राट बिल्डर्सनी कौशल्य योजनेच्या अंतर्गत गवंडी कामगिरांना शास्त्रोक्त शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पंचवटीतील हिरावाडी भागात 'गोकुळधाम' हे सेंटर कार्यान्वयित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये गवंडी कारागिरांना आणि त्यांच्या ठेकेारांना तंत्रशुद्ध शिक्षण देण्यात येत आहे. सध्या या सेंटरमध्ये ३० पेक्षा अधिक कारागीर शिक्षण घेत आहेत. एक महिन्याचे प्रशिक्षण या सेंटरमध्ये कारागिरांना देण्यात येते. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कारागिरांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात येते. या सेंटरमधील प्रशिक्षणार्थी दीपक वर्मा सांगतात, की 'वाळू, सिमेंट आणि पाणी यांचे मिश्रण करतानाचे तंत्र शिकायला मिळाले. एखादी वीट विशिष्ट पद्धतीने ठेवल्यास मजबूत बांधकाम कसे होते, हे शास्त्र शिकायला मिळाले. तसेच बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून अनेक महत्त्वाच्या बाबी शिकायला मिळाल्या. याचा फायदा आता काम करताना होतो आहे'. असे अनेक प्रशिक्षणार्थी बिल्डिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून शिक्षण घेत आहेत.

याचे मिळते प्रशिक्षण

- बांधकाम करताना वाळू आणि सिमेंटचा योग्य वापर

- वीट रचनेमागचे शास्त्र, त्याचे मोजमाप

- अत्याधुनिक यंत्राचा वापर

- बांधकाम करताना बाळगायची सुरक्षितता

- संवाद कौशल्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी खळाळले; गोदा झळाळली!

0
0

वेगवान प्रवाहामुळे पात्राची स्वच्छता

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने गेली तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून स्थिर झालेले गोदावरीचे पाणी खळाळून वाहिले. या पाण्याने साचलेली घाण वाहून नेली. काळ्याकुट्ट प्रवाहाने काही प्रमाणात गोदावरीच्या पाण्याची स्वच्छता झाली. पाण्याचा प्रवाह शुक्रवारी (दि. २) पुन्हा संथ झाला.

जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून गाजत होता. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गुरुवारी (दि.१) गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी रामकुंडावर पोहचताच गोदाघाटावर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहने अडकून पडल्याचा प्रकार घडले. या वाहनात काळेकुट्ट पाणी शिरले. गोदेला पाणी सोडले नसल्याने गोदाचा प्रवाह काळ्या पाण्याचा झाला. गोदापात्रातील पाणी स्थिर झाल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ, शेवाळ यांची घाण साचली होती. सोडलेल्या पाण्यामुळे ही घाण वाहून जाण्यास मदत झाली. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोदेच्या या पाण्यामुळे नकळत स्वच्छता झाली. दिवाळीच्या सुट्टीत वाढणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने ही चांगली बाब असली तरी हे पाणी सुट्टीच्या कालावधीपर्यंत स्वच्छ राहील याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

गोदेला सोडण्यात आलेल्या पाण्याने गुरुवारी (दि.१) थांबविण्यात आलेले रामकुंड परिसरातील व्यवहार शुक्रवारी (दि.२) सुरळीत सुरू झाले. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. पाणी सोडणे बंद केल्याने गोदापात्र पुन्हा जैसे थे वाहत असल्याचे पाहायला मिळाले. तर तीच्या काठी व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यावसायिक नेहमीप्रमाणे आपले व्यवहार करीत होते. त्यांना तर हे पाणी कशासाठी सोडण्यात आले हे देखिल माहित नव्हते. दिवाळीनिमित्त पाणी सोडण्यात आले असावे असा त्यांचा समज होता. एकूणच का तर काल खळाळून वाहत असलेला गोदेचा प्रवाह शुक्रवारी स्थिर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रालयावर धडकणार जनजाती बांधवांचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनजाती बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांची सरकारकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचा दावा वनवासी कल्याण आश्रमातर्फे करण्यात आला आहे. या सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी जनजाती समाजाचे सर्व बांधव दि. १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडकणार आहेत.

वनवासी कल्याण आश्रमातर्फे दि. २३ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदान येथे प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, सटाणा, इगपुरी व त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदारांना जनजाती समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. सरकाराने जनजाती समाजाच्या विकासासाठी प्रशासकीय रचना व अर्थसंकल्पात तरतूद केलेली असूनही जनजाती समाजाच्या अपेक्षेप्रमाणे विकास होत असल्याचे दिसत नाही. समाजाच्या विकासाची गती वाढावी, त्यासाठी आंदोलन करण्यात आले. आता या मागण्यांची सरकारदरबारी विशेष दखल घेतली जावी म्हणून राज्यभरातील २४ जिल्ह्यांतून सुमारे २० हजार जनजातीबांधव मंत्रालयावर धडकणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सर्व समाजबांधव एकत्रित येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सरकारने लवकरात लवकर जनजाती बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी विराट मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चैतराम पवार, पश्चिम क्षेत्र हितरक्षाप्रमुख रामदास गावित, जयराम चौधरी यांनी दिली.

...या आहेत प्रमुख मागण्या

राज्यातील बोगस आदिवासींची चौकशी करणे, वनहक्क कायद्यानुसार सामुदायिकक वनाधिकार बहाल करावा, वनाधिकाराच्या मंजुरीस वेग द्यावा, जनजाती समाजाच्या परंपरांची माहिती कागदोपत्री संकलित करावी, जनजाती समाजातील क्रांतिकारकांची स्मारके उभारावीत, जनजाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण भत्ता याबाबतचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावेत आदी प्रमुख मागण्यांप्रश्नी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपुत्रच निघाला तोतया पोलिस...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आम्ही स्पेशल क्राईम ब्रँचचे पोलिस आहोत, असे सांगून दोघांनी अशोकनगर येथे राहणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघा संशयित युवकांना अटक केली आहे. त्यातील एक संशयित पोलिसाचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले असून, दोघा संशयितांना कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेमंत शांतिलाल परदेशी (वय २३, रा. पोलिस मुख्यालय, नाशिक) आणि प्रशांत सुदाम नवले (२२, आडगाव) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ऋषिकेश विनोद काळे (२३, अशोकनगर, सातपूर) या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ऋषिकेश व्ही. एन. नाईक कॉलेजजवळ असताना संशयित त्याच्याजवळ आले. आम्ही स्पेशल क्राईम ब्रँचमध्ये पोलिस आहोत, अशी ओळख करून देत त्यांनी ऋषिकेशला कॉलेजच्या गेटवर आणले. संशयित प्रशांत नवले याने ऋषिकेशला आपल्या बुलेटवर बसवून सरकारवाडा पोलिस स्टेशन, केटीएचएम कॉलेज परिसर येथे फिरविले. त्यानंतर या दोघा तोतया पोलिसांनी त्याला अशोकस्तंभाजवळील एका सहकारी बँकेजवळ नेले. तेथे त्याचा मोबाइल फोन व दुचाकीची चावी काढून घेण्यात आली. त्यानंतर या तोतया पोलिसांनी त्याला एटीएम सेंटरमधून हजार रुपये काढण्यास पाठविले. याच वेळी ऋषिकेशला संशय आल्याने त्याने सतर्कता दाखवीत शहर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता हे दोघे तोतया पोलिस पळून गेले. बुलेटच्या आधारे सरकारवाडा पोलिसांनी दोघा संशयितांची ओळख पटविली. याबाबत बोलताना वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की दोघा संशयित आरोपींना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित स्पष्ट दिसत असून, कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images