Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्य नाट्य स्पर्धा यंदा ठरणार वेगळी

$
0
0

नाट्यलेखक दत्ता पाटील यांची १५ वर्षांनंतर एंट्री

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदाची राज्य नाट्य स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार असून सलग ५० वर्षे नाटक देणारे नेताजी भोईर यंदा हयात नाही; परंतु त्यांची मुलगी नंदा रायते यांनी दादांचे नाटक दिग्दर्शित केले असून ते सादर होणार आहे. तर तब्बल १५ वर्षांनी नाट्यलेखक दत्ता पाटील राज्य नाट्यमध्ये सहभागी होणार आहेत.

ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांची नाट्य कारकीर्द नाशिककरांना माहीत आहे. राज्य नाट्य स्पर्धेत प्रत्येक वर्षी त्यांनी नवे नाटक स्पर्धेला दिले असून गेल्याच वर्षी त्याचा सुवर्णमहोत्सव झाला. मध्यंतरी ९ मे २०१८ रोजी नेताजी भोईर यांचे निधन झाले, त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या नाटकाची एंट्री राहणार का, असा चर्चेचा विषय झाला होता. परंतु, राज्य नाट्य स्पर्धेची नुकतीच अंतिम यादी जाहीर झाली आणि त्यात विजय नाट्य मंडळातर्फे नाटक असे झळकल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. नेताजी भोईर यांची मुलगी नंदा रायते यांनी दादांची उणीव भरून काढली असून हा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला आहे. विजय नाट्य मंडळाचे ३ डिसेंबर रोजी 'व्हईल ते दणक्यातच' या नाटकाचे दिग्दर्शन नंदा रायते करणार असून लेखन नेताजी भोईर यांनी केले आहे.

यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी तब्बल १५ वर्षांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी राज्य नाट्य साठी शेवटचे नाटक २००३ ला लिहिले होते. त्यानंतर आता २०१८ मध्ये त्यांनी 'विसर्जन' हे नाटक राज्य नाट्यसाठी दिले आहे. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च तर्फे ५ डिसेंबर रोजी 'विसर्जन' हे नाटक सादर होणार आहे. त्याचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले आहे.

मी दादांची इच्छा पूर्ण करतेय. दादांची इच्छा होती की ५१ वे नाटक सादर करावे. ते तर मला म्हणाले होते, की दिग्दर्शन तूच करावे. मी तुला शिकवलेय, आता तू मला शिकव. त्यामुळे या नाटकाचे दिग्दर्शन मी करतेय. दादांचा वारसा वरुणने उचललाय.

- नंदा रायते, नेताजी भोईरांची कन्या

मी याला स्पर्धा मानत नाही तर हा नाशिककरांचा महोत्सव आहे, आपल्याला सर्वांनाच नाटक मोठे करायचे आहे, सर्वांच्या सोबतीने ते करायचे आहे असे मी मानतो. पंधरा वर्षांनी हे नाटक स्पर्धेसाठी देतोय, सचिनचा आग्रह होता, प्रायोगिक रंगभूमीला एक नवे नाटक मिळते आहे. त्यामुळे मी तयार झालो. २००३ ला 'खेळिया' नाटक करून मी थांबलो होतो, आता 'विसर्जन' नाटक केले आहे.

- दत्ता पाटील, सुप्रसिध्द नाट्यलेखक

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडणार किल्ला मेकिंगचे तंत्र

$
0
0

मटा कल्चर क्लब-लायन्स क्लबतर्फे उद्या कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि लायन्स क्लब ऑफ पंचवटी यांच्यातर्फे 'किल्ला बनवा आणि बक्षिसे जिंका' कार्यशाळेत रविवारी (दि. ४) किल्ला मेकिंगचे तंत्र उलगडणार आहे. खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही कार्यशाळा होईल. प्रसिद्ध मूर्तीकार आनंद तांबट सहभागार्थींना किल्ला उभारणीचे विशेष तंत्र कार्यशाळेत शिकविणार आहेत.

दिवाळीच्या सुटीत किल्ला बनविण्याची गंमत प्रत्येकालाच अनुवयाची असते. शालेय जीवनात इतिहासाच्या धडे गिरवताना सुटीत किल्ला बांधणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह मोठेही किल्ला उभारणीत रमतात. हीच मौज अनुभवण्यासाठी आणि किल्ला उभारणीचे शास्त्रोक्त तंत्र शिकण्यासाठी ही कार्यशाळा होत आहे. यात सहभागार्थींना दीड बाय दीड फूट प्लायवूड व एक बाय एक फूट बारदान किंवा गोणीचा तुकडा सहभागार्थींना आणावा लागेल. तसेच किल्ला सजावटीसाठी आइस्क्रीमच्या काड्या, काडीपेटी, काडीपेटीच्या काड्या, मावळ्यांची खेळण्यातली मूर्ती सहभागार्थींना आणायची आहे. सर्वोत्तम किल्ला साकारणाऱ्यांना आरोग्यवर्धक बक्षिसे दिली जाणार आहेत. कार्यशाळा आणि स्पर्धा वय ८ ते ११ आणि वय १२ ते १५ वर्षे या दोन गटात होईल. स्पर्धेच्या निकालाबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. दुपारी १ वाजता पारितोषिक वितरण होईल. कार्यशाळेत सहभागासाठी १०० रुपये शुल्क आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर फोन करू शकतात.

..

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

वेबसाइट - www.mtcultureclub.com

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

ट्विटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

लोगो : कल्चर क्लब आणि क्यू आर कोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाच कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता आणि कर्ज मंजुरीसाठी घेतलेले १२ लाख रुपये हडपण्याचा प्रकार समोर आला असून, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल मदनलाल जैन/बागमार असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सीमा ओमप्रकाश परदेशी (रामेश्वरनगर, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेत मार्च २०१७ मध्ये घडला. तक्रारदार परदेशी यांची सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स नावाची कंपनी असून, तेथे ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्यात येतात. व्यवसाय विस्तारासाठी परदेशी यांना भांडवलाची गरज होती. त्यामुळे त्यांनी बागमार याच्याशी संपर्क साधला. यावेळी मालमत्तेची सर्व कागदपत्रे आणि कर्ज प्रक्रियेसाठी १२ लाख रुपये देण्याची मागणी बागमारने केली. काही दिवसांनी मालमत्तेचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही संशयित आरोपीने कर्ज देता येणार नाही, असे परदेशी यांना स्पष्ट केले. तुमच्या मालमत्तेबाबत रवींद्र चौधरी नावाच्या व्यक्तीचा आक्षेप असल्याचे त्याने कळविले. परदेशी यांनी कधीही चौधरी नावाच्या व्यक्तीशी व्यवहार केलेला नसल्याने त्यांनी लागलीच अंबड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रवींद्र चौधरी ही व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे समोर आले. कारण नसताना मालमत्तेला लेटिगेशन लागत असल्याने परदेशी यांनी बागमारला सर्व कागदपत्रे परत मागितली. मात्र, त्याने ती देण्यास टाळाटाळ केली. दुसरीकडे कर्ज मंजुरीसाठी दिलेले १२ लाख रुपयेही त्याने दिले नाहीत. परदेशी यांनी तगादा सुरू केला असता बागमारने आपली वरपर्यंत तसेच मोठ्या गुंडांपर्यंत ओळख असल्याचे सांगत धमकी देण्यास सुरुवात केली. पोलिसांत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या बागमारविरुद्ध यापूर्वी जुगार अड्डा चालविल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारवाई केली होती. तर, इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये मद्यपार्टी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावात आज युतीची साखरपेरणी!

$
0
0

उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी पिंपळगाव बसवंत येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे एकाच व्यासपीठावर येणे येत्या काळात भाजप आणि शिवसेना युतीसाठी मोठे सूचक मानले जात आहे. आज, शनिवारी पिंपळगावात निवासी शाळेचे भूमिपूजन आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त हे दोन्ही दिग्गज नेते येत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पिंपळगाव येथे शनिवारी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आरोग्य मंत्री दीपक सावंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

बनकरांच्या होमपीचवर कदमांचे शक्तीप्रदर्शन

युतीसाठी साखरपेरणी ठरू पाहणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी झाली आहे. आमदार अनिल कदम यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पिंपळगाव बसवंत या होमपीचवर कदमांना या निमित्ताने शक्तिप्रदर्शन दाखवण्याची संधी चालून आली आहे.

राज्यात भाजप-सेनेचे सरकार असूनही या दोन्ही पक्षात रोज वाकयुद्ध रंगत असते. शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊनही युती होणारच असे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील जाहीरपणे सांगत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते नेमके काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

निफाड मतदार संघावर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचा भगवा आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला अनिल कदम यांनी १६ हजार मतांवर रोखले होते. भाजपच्या उमेदवारामुळे आमदार कदम यांना विजयासाठी झुंजावे लागले होते. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये युती झाली तर त्यात त्यांचा फायदा असल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मनसुबे रचले गेले आहेत.

असे आहेत कार्यक्रम

शनिवारी पिंपळगाव बसवंत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळेचे लोकर्पण होणार आहे. सकाळी दहा वाजता पिंपळगाव हायस्कूच्या येथे जाहीर सभा होणार आहे. तसेच पिंपळगाव-निफाड-सिन्नर रस्त्याचे भूमिपूजन, कुंदेवाडीजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या दान्ही बाजूने पोहोचमार्ग, निफाड ते चांदवडमार्गाचे भूमिपूजन, क्रातीज्योती सावित्रिबाई फुले ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिफेन्स इनोव्हेशन’चा लवकरच श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या डिफेन्स इनोव्हेशनमध्ये चाळीस टक्के आऊटसोर्सिंगची गरज भासणार आहे. त्यासाठी नाशिकच्या स्टार्टअपची मोठी मदत लागेल. त्यामुळे नाशिककरांना खास 'दिवाळी गिफ्ट' म्हणून येत्या काही दिवसांत डिफेन्स इनोव्हेशन हबचा प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केली.

'सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सबलीकरण' या विषयावर शुक्रवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात संवादपर कार्यक्रम झाला. त्यावेळी डॉ. भामरे बोलत होते. गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाचे मॅनेजिंग डायरेक्टर कुणाल कुमार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर रमण मूर्ती यांच्यासह शहरातील महत्त्वाच्या औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांसोबत संवाद साधताना डॉ. भामरे म्हणाले, की सध्या नाशिकमध्ये डिफेन्स इको सिस्टिमची गरज आहे. एचएएल कंपनीच्या माध्यमातून येत्या काही महिन्यांत जिल्ह्यात अनेक स्टार्ट अप प्रोजेक्ट्सना चालना मिळणार आहे. 'एचएएल'सारख्या महत्त्वाच्या कंपनीला आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून उत्पादकांची गरज भासते. त्यासाठी जिल्ह्यात डिफेन्स इको सिस्टिम असणे गरजेचे आहे. त्याकरिता हे हब उपयुक्त ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. नाशिकचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. छोट्या उद्योगांची संख्या वाढू लागल्याने त्याचा नाशिकच्या विकासासाठी हातभार लागत आहे. वाइन सिटीपाठोपाठ फूड पार्क म्हणून ओळख झालेल्या नाशिकची औद्योगिक क्षेत्रातली भरारी वाढविण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल.

कुणाल कुमार म्हणाले, की ग्रामीण भागात औद्योगिक प्रगतीची गरज आहे. शहरातील स्टार्टअपची संख्या वाढती असली, तरी ग्रामीण भागातही स्टार्टअप वाढायला हवेत. त्यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. उद्योगांच्या उभारणीसाठी नवउद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यायला हवा. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून फक्त औद्योगिक क्षेत्रास झळाळी प्राप्त होते असे नव्हे, तर या माध्यमातून रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा.

--

देशातील १०० जिल्ह्यांत नाशिक!

जिल्हाधिकारी म्हणाले, की केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंद्यांसाठी सहाय्य आणि संपर्क हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. देशातून शंभर जिल्ह्यांची यासाठी निवड झाली असून, त्यापैकी नाशिक एक आहे, ही अभिमानस्पद बाब आहे. नाशिकच्या औद्योगिक प्रगतीचा वाढता आलेख यामुळे अधिकाधिक उंचावणार आहे. त्यासाठी सर्व उद्योजकांचे पाठबळ जिल्ह्यातील सर्व उद्योगांना असणे महत्त्वाचे आहे. येत्या शंभर दिवसांत जिल्ह्यातील उद्योजकांच्या सर्व अडचणींचे निराकरण या माध्यमातून करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

--

\Bपंतप्रधानांचा \Bउद्योजकांशी संवाद\B

\Bसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सहाय्य आणि संपर्क या प्रकल्पाचे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या सोहळ्याचे व्हिडीओ वेबकास्टद्वारे प्रक्षेपण दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले. या वेबकास्टाद्वारे पंतप्रधान मोदी यांनी देशातील ८० जिल्ह्यांतील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योगांच्या उभारणीसाठीच्या सरकारी योजनांची माहिती उद्योजकांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार भिंतीतल्या विषयावर ‘चौकट’द्वारे प्रकाश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण हा आदिवासी व ग्रामीण तालुका असला तरी या भागातील कलाकारांच्या कल्पकता आभाळाला गवसणी घालणाऱ्या आहेत. नववधूला पूजेच्या दिवशी मासिकधर्म आल्यानंतर तिला घरातूनच मिळणाऱ्या वागणुकीवर आधारित ग्रामीण भागातील आजचे वास्तव 'चौकट' या लघुचित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचे काम कळवणचे डॉ. धिरज देवरे आणि त्यांच्या टीमने केले आहे. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवताना 'सैराट'सारखा सिनेमा सिनेमाप्रेमींमुळे किती उंचीवर गेला हे अनुभवले असताना 'चौकट'सारखा लघुपट नक्कीच सिनेमाप्रेमींना आवडेल, असा विश्वास डॉ. देवरेंसह त्यांच्या टीमला आहे.

कळवण शहरातील डॉ. धिरज देवरे व डॉ. शेषराव पाटील, डॉ. रश्मी काळे तसेच मोरपीस एंटरटेनमेंट, पुणे यांच्या माध्यमातून कळवणला नुकतीच फिल्ममेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. यात कळवणसह परिसरातील युवक, युवतींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कळवण तालुक्यातील युवा कलाकारांना पहिल्यांदाच असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. या कार्यशाळेचे फलित म्हणून 'चौकट' हा लघुपट बनविण्यात आला. दिग्दर्शन डॉ. शेषराव पाटील यांनी केले. संकलन डॉ. रश्मी काळे यांनी केले. लघुपटातील सर्व कलाकार आणि सहायक तंत्रज्ञ कळवण परिसरातील आहेत. या लघुपटाचे छायाचित्रिकरण गौरव जैन यांनी तर मेकअप पूजा राठोड यांनी केले.

'चौकट'चे दिग्दर्शक डॉ. शेषराव पाटील म्हणाले, अवघ्या तीन दिवसांत ऑडिशन, सराव, रेकी व शूटिंग हे फार अवघड काम होते. मात्र अतिशय कमी बजेटमध्ये हा लघुपट करावयाचा असल्याने गत्यंतर नव्हते. डॉ. धिरज देवरे व स्थानिक लोकांच्या मदतीने हे सुसह्य झाले. मोरपीस एंटरटेनमेंट ने डोमेस्टिक व्हायलेन्स, भ्रूणहत्या, अंधश्रद्धा आणि सामाजिक दृष्टीने समाजाची हरवत चाललेली संवेदनशीलता असे अनेक सामाजिक विषय हाताळता लघुचित्रपट बनवले आहेत. चौकट हा लघुचित्रपट नववधूला पूजेच्या दिवशी मासिकधर्म आल्यानंतर तिला घरातून मिळालेली वागणूक या विषयावर आहे. या लघुपटाच्या सहायक दिग्दर्शिका व संकलक डॉ. रश्मी काळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला पडद्यावर पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य सात्विक समाधान देणारे होते. 'चौकट'च्या प्रदर्शन सोहळ्याप्रसंगी तहसीलदार तथा साहित्यिक कैलास चावडे, विनोद जाधव, मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे, रवींद्र देवरे, अॅड. परशुराम पगार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. धीरज देवरे यांनी सांगितले की, या लघुपटाच्या प्रतिसादानुसार कळवण परिसरातील कलाकारांना घेऊन मराठी चित्रपट निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये दुफळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीत कोट्यवधींच्या विकासकामांच्या मंजुरीवरून शुक्रवारी भाजपमधील विसंवादाचा प्रकार समोर आला. बजेटमध्ये तरतूद असलेले विषय महासभेच्या पुनर्मान्यतेशिवाय स्थायीवर आणल्याचा आरोप भाजपचे सदस्य उद्धव निमसे यांनी केला असून, सदरचे प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

विकासकामांशी संबंधित दोन विषय स्थगित करण्याची मागणी भाजपच्या अन्य सदस्यांनी केली. परंतु, प्रशासनाने सदरील विषय आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर सभापतींनी या सर्व विषयांना मंजुरी देत उद्धव निमसे यांचा विरोध नोंदवून घेतल्याने भाजपमधील दुफळी उघड झाली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत विकासकामांशी संबंधित ७९ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात विशेषत: रस्ते आणि मलनिस्सारण कामांशी संबंधित प्रस्ताव होते. त्यातील १३५ क्रमांकापासून १४६ क्रमांकांपर्यंतचे विषय महासभेची मान्यता न घेता सादर केल्याचा दावा करीत उद्धव निमसे यांनी याबाबतचा प्रस्तावच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. बजेटमध्ये अनेक विषयांसाठी तरतूद केली जाते. परंतु, गरजेनुसार निधी अन्यत्रही वळविला जात असल्यामुळे संबंधित प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवणे क्रमप्राप्त असते, असे सांगत या विषयांबाबत लेखी आक्षेप घेतला. एकदा मंजुरी घेतल्यानंतर संबंधित प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी आल्यास त्यावर नगरसेवक चर्चा करून बदलही सुचवू शकतात, असे सांगत महासभेला डावलून थेट स्थायीवर प्रस्ताव पाठविले जात असल्याची बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप निमसेंनी केला. परंतु, आयुक्त मुंढेंनी बजेटला महासभेनेच मंजुरी दिल्याचे सांगत एकही प्रस्ताव बेकायदेशीर नसल्याचा दावा करीत निमसेंचा आरोप खोडला. प्रशासनाने मांडलेले जलवाहिनीचे ३७ लाख ४१ हजारांचे आणि अडथळामुक्त रस्त्यांचे २ कोटी ७२ लाखांचे प्रस्ताव अभ्यासासाठी तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली. परंतु, मुंढेंनी सदरचे विषय गरजेचे असल्याचे सांगत मंजुरीची मागणी केली. त्यावर सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी सदरील विषयांना मंजुरी दिली.

--

'मनमानी कारभार बंद करा'

सदस्यांनी जलवाहिनी आणि अडथळामुक्त रस्ते असे दोन विषय अभ्यासासाठी तहकूब करण्याची मागणी केली. परंतु, त्यावर आयुक्त मुंढेंनी आक्षेप घेत मंजूर करा, असा आग्रह धरला. त्यावर स्थायीचे सदस्य अधिकच संतप्त झाले. सभापतींच्या अधिकारात कोणी मध्ये बोलू नये, असे खडेबोल दिनकर पाटील यांनी आयुक्तांना सुनावले. कायदेशीर कामकाज सुरू आहे. त्यामुळे सभागृहाच्या अधिकारात हस्तक्षेपाची नवी पद्धत रूढ झाली का, असा सवाल संतोष साळवे यांनी केला. मनमानी कारभार बंद करा, असा टोलाही यावेळी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनवर साखर, डाळी उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ घेणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी अधिक फलदायी ठरणार आहे. दिवाळीनिमित्त लाभार्थींना साखर आणि तूरडाळीबरोबरच चनाडाळ, उडीदडाळ, आणि आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांवर या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोडधोड पदार्थांशिवाय दिवाळीचा गोडवा वाढत नाही. दिवाळी गोड करता यावी याकरिता राज्य सरकारच्या पुरवठा विभागाकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना साखर पुरविली जाते. यंदाही सरकारने लाभार्थ्यांकरिता साखर उपलब्ध करून देत गरिबांप्रतीची बांधिलकी जोपासली आहे.

नियमित मिळणाऱ्या साखरेव्यतिरिक्त रेशन दुकानांवर लाभार्थ्यांना २० रुपये किलो दराने अतिरिक्त एक किलो साखर उपलब्ध करून दिली जाणार असून, जिल्ह्यासाठी ५७१० क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रमातील लाभार्थ्यांना ही साखर दिली जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेत एक लाख ८० हजार ९३९ लाभार्थी असून, प्राधान्य कुटुंबातील ५ लाख ७६ हजार ९५१ लाभार्थी आहेत. तूरडाळीबरोबरच लाभार्थ्यांसाठी आता चनाडाळ आणि उडीदडाळीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी कोणत्याही दोन डाळींची ३५ रुपये किलोप्रमाणे दोन किलो खरेदी प्रत्येक ग्राहक करू शकणार आहे. आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आयोडिनयुक्त मीठदेखील रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा योजनेमधील जिल्ह्यातील ७ लाख ५७ हजार ७१ रेशनकार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना या अन्नधान्याचे वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या असून, रेशन दुकानांमधून वितरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ६,४५७ क्विंटल तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली असून, ३८१ टन चनाडाळ, १९१ टन उडीदडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. चनाडाळ आणि तूरडाळ ३५ रुपये किलो दराने, तर उडीददाळ ४४ रुपये प्रतिकिलोने लाभार्थींना दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिडे गुरुजींचे वकील हजर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो,' असे वक्तव्य करीत कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी दि. ३० नोव्हेंबरच्या सुनावणीस हजर राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या खटल्यात शुक्रवारी प्रथमच भिडे यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली.

नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान संततीप्राप्तीबाबत बोलताना, 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो,' असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर राज्यभर टीका झाली. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीदेखील झाली. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिडेंवरील कारवाईचा फैसला हा नऊ सदस्यीय 'पीसीएनडीटी' समितीवर सोपविण्यात आला. या समितीने भिडेंना पीसीपीएनडीटी अॅक्ट २२ मध्ये गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व लिंग निश्चित करणे यांच्याशी निगडित जाहिरातीवरील प्रतिबंध आणि उल्लंघनाबाबत दोषी ठरविले. त्यामुळे या कायद्यांतर्गत भिडेंच्या विरोधात थेट कोर्टात फिर्याद देण्यात आली. त्यावर १० ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्याकडे सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने भिडेंना नोटीस पाठविली, तसेच हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर तीन ते चार वेळा सुनावणी झाली. मात्र, कोणत्याही सुनावणीदरम्यान भिडे अथवा त्यांचे वकील हजर राहिले नाहीत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भिडे गुरुजींच्या वतीने अॅड. अविनाश भिडे कोर्टात हजर राहिले. दि. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान गुरुजी हजर राहतील, असे त्यांनी कोर्टाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे इंजिनाखाली तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म तीनवरील स्टार्टर सिग्नल जवळ एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

महानगरी एक्स्प्रेस बुधारी (दि. ३१) सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडे निघाली होती. एका तरुणाने इंजिनाखाली उडी मारली. त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन नाशिकरोड किलोमीटर नंबर १८६/३२ जवळ हा प्रकार घडला. अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असलेला आत्महत्या केलेला तरुण गौरवर्ण, दाढी वाढलेली, डोक्यावरी केस मध्यम वाढलेले, असा आहे. शरारीने मजबूत असलेल्या त्याने अंगात निळसर जांभळट रंगाचा शर्ट, त्यावर पांढरी डिझाईन, काळी पॅन्ट, परिधान केलेली आहे. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सदर तरुणाची माहिती असलेल्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यातील हवालदार आर. डी. वाघमारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आज पोचणार जायकवाडीला

$
0
0

नांदूर मध्यमेश्वर धरणातून ११ हजार क्युसेक वेगाने पाणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्ह्यातील दारणा व मुकणे धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर ते पाणी या नद्यांच्या संगमावरील नांदूरमध्यमेश्वर धरणात (ता. निफाड) उशिरा रात्री आठ वाजता पोहोचले. त्यानंतर ११ हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. निर्धारित केलेले पाणी शनिवारी (दि. ३) सायंकाळपर्यंत जायकवाडीला पोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दारणा व मुकणे धरणातून सोडलेल्या पाण्याने जायकवाडीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासातील २४० किलोमीटरच्या टप्प्यातील अर्धा म्हणजेच सुमारे १२० किलोमीटर अंतर कापत नगर जिल्ह्यातील कोपरगावपर्यंतच्या प्रवास पूर्ण केला आहे. कोपरगाव ते जायकवाडीचे ११० ते १२० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या पाण्याला दीड दिवसाचा अवधी लागणार असल्याचे समजते.

मराठवाड्याला पाणी देण्यासाठी दारणा आणि मुकणे धरणातून गोदावरी पात्रातून सोडलेले पाणी गुरुवारी (दि. १) रात्री आठ वाजेपासून नांदूरमध्यमेश्वर धरणातून सोडले जात आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ३५० दशलक्ष घनफूट पाणीविसर्ग झाला होता. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी उशिरापर्यंत पाणी सोडले जात होते.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमिवर कोणतीही अनुचित घटना घडून नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. निफाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक आणि १२५ पोलिसांचा बंदोबस्त होता. याच ठिकाणी वैजापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यू. के. पठाण, शाखा अभियंता एस. आर. वाईकर, सहायक अभियंता डी. सी. महाले, एच. एम. शार्दूल, पी. बी. साबळे, कालवा चौकीदार एस. बी. पायमोडे, नाशिकचे ढोकणे, उपअभियंता नागपुरे शाखा डोखळे, संदेशक के. एन. कातकाडे यांच्यासह बांधकाम विभागाचे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी व चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख व टीम उपस्थित होती.

वीजपुरवठा खंडित

गोदावरीच्या पात्रातून जायकवाडीला पाणी जात असल्याने गोदाकाठवरील काही गावे व वस्त्यावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. गोदावरी नदीपात्रात आधीच काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याच्या निसर्गाला वेग होता. त्यामुळे जायकवाडीला वेळेत पाणी जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी शाळेचा आज लोकार्पण सोहळा

$
0
0

निवासीचे शाळेचे आज लोकार्पण

पिंपळगाव बसवंत येथे होणार कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपळगांव बसवंत (ता. निफाड) येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा उभारण्यात आली असून तिचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पिंपळगांव येथील जोपूळ रस्त्यावरील २ एकर जागेत ७ कोटी ७५ लाख रपये खर्च करून भव्य, टोलेजंग अशी निवासी शाळेची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज (३ नोव्हेंबर) रोजी पिंपळगांव बसवंत येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

स्वत:च्या इमारतीत सुरू होण्यापूर्वीच 'आयएसओ' नामांकन प्राप्त करणारी पिंपळगांव बसवंत निवासी शाळा राज्यातील पहिली निवासी शाळा आहे. या निवासी शाळेला २०१७ मध्ये 'आयएसओ' नामांकन मिळाले आहे.

या निवासी शाळेची प्रवेश क्षमता २०० विद्यार्थी ऐवढी आहे. सध्या १०६ विद्यार्थी या ठिकाणी आहेत. केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर या शाळांत निवासाची सोय, भोजन, शिक्षण साहित्य आणि अन्य मुलभूत सुविधा मोफत देण्यात येतात. शाळेच्या परिसरातच वसतिगृहाची व्यवस्था, संगणक कक्ष, एलसीडी प्रोजेक्टरद्वारे 'ई-लर्निंग' आदी सुविधा या शाळेत असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

$
0
0

नाशिक जिल्हा शिक्षक समन्वय समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेत मुलाला मारल्याच्या रागातून संजय हरी गवळी या शिक्षकावर पालकाने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा नाशिक जिल्हा शिक्षक समन्वय समितीने निषेध केला. संबंधित पालकावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. चांदवड तालुक्यातील शिंगवे शाळेतील गुणवंत जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त संजय हरी गवळी यांच्यावर गुरूवारी, १ नोव्हेंबर रोजी पाठीमागून डोक्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुलाला का मारले, असे विचारण्यास आलेल्या भाऊसाहेब सोपान बोरसे या पालकाने हल्ला करुन गवळी यांना जखमी केले. या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा शिक्षक समन्वय समितीने एकत्र येऊन शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची शुक्रवारी भेट घेतली. शिक्षकांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार या पालकाने केला असून त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कडक कारवाई करून शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. या समितीच्या शिष्टमंडळाने गवळी यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे-पाटील, पदवीधर संघटनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठल धनाईत, राज्य संघटक नंदू आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष साहेबराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष बुध्देसिंग ठोके, यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- -

मनमाडमध्ये निवेदन

मनमाड : शिक्षक गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नांदगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक नेते राजेंद्र पाटील, राजेंद्र कदम, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी जगणराव सूर्यवंशी व नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना शुक्रवारी मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लॅपटॉपची कार्यालयातून चोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वडाळा-पाथर्डी रोडवर असलेल्या श्री व्यंकटेश बंगला येथील एका कार्यालयातून चोरट्यांनी चार वेगवेगळ्या कंपन्यांचे लॅपटॉप घरफोडी करून लांबविले आहेत. याबाबत इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अंनतप्रसाद मुकुंद गोसावी (आंनद कुटिर, श्रीजयनगर, वडाळा पाथर्डीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडाळा-पाथर्डी रोडवरील निसर्ग परबमागे असलेल्या व्यंकटेश बंगल्याजवळील कार्यालयातून ३५ हजार रुपये किंमतीचा एचपी कंपनीचा २३ हजारांचा एक लॅपटॉप, एक चार हजार रुपयांचा कॉम्पॅक लॅपटॉप, पाच हजार रुपयांचा एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एक हजार रुपयांचा लॅपटॉप असे ६८ हजारांचे लॅपटॉप चोरून नेले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दांडगे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेक्यांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची बिघडलेली आरोग्यस्थिती, घंटागाड्यांची अनियमितता, करारनाम्यातील अटी शर्तींचे पालन ठेकेदाराकडून केले जात नसल्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल दोन तास वादळी चर्चा झाली. घंटागाडी ठेकेदारांनी करारनाम्यातील अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप करीत सहा विभागांतील घंटागाडीचे ठेके रद्द करून ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची आग्रही मागणी सदस्यांनी केली. ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत, ठेका रद्द करण्याचा ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अखेर घंटागाडी ठेक्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले.

शहरात पसरलेल्या डेंग्यू, स्वाइन फ्लूसह विविध आजार आणि अनियमित घंटागाड्यांवरून स्थायी समिती सभेत शुक्रवारी वादळी चर्चा झाली. प्रवीण तिदमे, मुशीर सैय्यद यांनी सभेत पत्राद्वारे घंटागाडी ठेकेदारांकडून केल्या जात असलेल्या करारनाम्यातील अटीशर्तींच्या भंगाविषयी तक्रार केली. शहरातील सर्व सहाही विभागांतील ठेकेदारांकडून अनियमितता सुरू असून, अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांची पाठराखण केली जात असल्यानेच शहरात अनारोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप सैय्यद यांनी केला. अनियमिततेप्रकरणी घंटागाडीचे ठेके रद्द करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदारांवर तसेच त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची आग्रही मागणी सय्यद यांनी केली. घंटागाडीविषयी प्रशासनानेच माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीचा उल्लेख करीत स्थायीच्या ठरावाची प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यास उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारादेखील सय्यद यांनी दिला. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी करारनाम्यातील तरतुदींनुसार घंटागाड्यांची संख्या नसल्याचा दावा करीत घंटागाड्यांची पडताळणी करण्याची सूचना मांडली. पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे, मीरा हांडगे, संगीता जाधव, शांता हिरे, सुषमा पगार यांनीदेखील सात-आठ दिवस घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी करीत, प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असल्याचा आरोप केला.

ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केवळ कागदावरच राहिले असून, अधिकाऱ्यांचे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची क्रमवारी घसरल्याचा आरोप समीर कांबळे यांनी केला. घंटागाडीतील भ्रष्टाचाराविरोधात आता आयुक्तांनीच मोहीम हाती घ्यावी, अशी मागणीदेखील कांबळे यांनी केली. सभापतींच्या निर्देशांनुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे संचालक डॉ. सचिन हिरे यांनी प्रभागनिहाय घंटागाड्यांची संख्या आणि त्यावर जीपीएस यंत्रणेद्वारे होणाऱ्या नियंत्रणाविषयी माहिती दिली. परंतु, डॉ. हिरे सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत, सदस्यांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करारनाम्यानुसारच घंटागाडी ठेक्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत सदस्यांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक झाले. सभापतींनी चौकशीची तयारी दाखवत प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबरच स्थायी सदस्यांची समिती स्थापन करून एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

अन् करारनामा फाडला

बेकायदा काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार नसेल तर कराराचा उपयोगच काय, असा सवाल करीत मुशीर सय्यद यांनी करारनाम्याची प्रत सभागृहात फाडून फेकली. तिदमे यांनीही पुढाकार घेत करारनाम्याच्या प्रती सभागृहात फाडल्या, तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दण्याचा इशारा दिला. बहुमताच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत ठेका रद्दचा ठराव केला जाणार नसेल तर सभागृहात ठिय्या आंदोलन केले जाईल. हवे तर दिवाळीही सभागृहातच आंदोलनाद्वारे साजरी करू, असा इशारा यावेळी सदस्यांनी दिला. त्यामुळे प्रशासनानेही नरमाईची भूमिका घेत चौकशीची तयारी दर्शवली.

आयुक्तांनी आरोप फेटाळले

सदस्यांच्या तक्रारी आणि आरोपांनंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी घंटागाडी ठेक्याचे कामकाज करारनाम्यातील अटीशर्तींनुसारच सुरू असल्याचा दावा करीत ते फेटाळून लावले. करारनाम्यातील अटी ‌व शर्तीनुसार काम झाले नाही तर संबंधित घंटागाडी ठेकेादारांकडून नियमानुसार दंड वसूल करणे सुरू असून, जीपीएस प्रणाली सक्षमरीत्या हाताळली जात आहे. ठेकेदारांना कचऱ्याच्या वजनानुसार देयक अदा केले जाते. घंटागाडीसाठी मार्ग व वेळापत्रकाचे नियोजन पालिकेकडून केले जात असून, त्यात आवश्यकतेनुसार बदल केले जात असल्याचे सांगत घंटागाड्यांची सुरुवातीची संख्याही २२० वरून २५७ पर्यंत वाढविल्याचा दावा केला. ठेका पाच वर्षे मुदतीसाठी देण्यात आल्याने दंडाच्या रकमेची टक्केवारीची गणना वार्षिक पद्धतीने करता येणार नाही, असे सांगत, ठोस कारणाशिवाय ठेके रद्द करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तक्रारी असल्यास त्यासंदर्भात चौकशी करता येईल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

जैविकचा ठराव विखंडित

जैविक प्रकल्पाच्या ठेकेदारानेही कराराचा भंग केल्याने ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून का झाली नाही, महापालिकेची बदनामी करणाऱ्या या ठेकेदारावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्याचे काय झाले, असे सवाल दिनकर पाटील यांनी केले. यावर सदर ठराव शासनाने विखंडित केल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

'मीच सहन होत नाही'

घंटागाडी ठेकेदारांवरील कारवाईवर चर्चा करताना समीर कांबळे यांनी सदरील विषय गंभीर असल्याचे सांगत नागरिकांचा कचरा उचलण्याऐवजी बिल्डरांचा कचरा उचलला जात असल्याचा आरोप केला. ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने मुंढे होण्याची गरज असल्याचा टोला लगावला. त्यावर मुंढे यांनी 'येथे मी एकटाच सहन होत नाही, अजून कुठे अधिकारी वाढवता?' असा टोमणा मारला. तुम्ही लोकप्रतिनिधींचा मान ठेवत नाही, त्यामुळे तुम्ही सहन होत नसल्याचा प्रतिटोला त्यांनी आयुक्तांना लगावला. आपण एकमेकांवर उपकार करीत नाही, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपोत्सवावर दुष्काळाची काजळी

$
0
0

मनमाड, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड तालुक्यावर संकट

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दरवर्षी दिवाळीच्या आठवडाभर आधी फुलणारा मनमाड, नांदगाव, चांदवड येथील बाजारपेठ दिवाळी दोन दिवसावर आली तरी ठप्प आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या गर्दीने गजबजणारी बाजारपेठ दुष्काळजन्य स्थितीमुळे यंदा अजूनही सामसूम आहे. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवावर दुष्काळची काजळी पडली आहे.

दुष्काळामुळे मनमाड, नांदगाव, चांदवड, येवला, निफाड भागातील किराणा व कापड व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर मनमाडला बाजारासाठी येतात. तसेच येवला येथेही पैठणीसाठी मोठी गर्दी होते. सणावाराला मनमाडमध्ये ग्रामीण भागातील ग्राहकांची जणू जत्रा भरते. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रोजच्या खाण्याचे व जगण्याचे वांदे झाल्यामुळे सणवार साजरे करणे दूरच आलेला दिवस कसा काढवा अशी अवस्था ग्रामीण जनतेची झाली आहे. कापडाच्या बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

मनमाडच्या बाजारात दिवाळी उंबरठ्यात येऊन पोहचली तरीही मंदीचे सावट आहे. किराणा व कपडे याना दिवाळीत अधिक ग्राहक असल्याचे व्यापारी संघटनेचे किशोर नावरकर सांगतात. मात्र यंदाच्या दिवाळीत किराणा व कपडे व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर माल आणूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने या व्यावसायिकांवर ग्राहकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. किराणा माल व कपडे या व्यतिरिक्त इतर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे दिवाळीत लोकांचा कल असतो. मात्र यंदा कोणत्याच बाजारपेठेत चहलपहल दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही संकटात सापडले आहेत.

दुष्काळामुळे फर्निचर, मोबाइल इतर गृहोपयोगी वस्तू विकल्या जातील की नाही, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. मिठाई व फराळाच्या दुकानात देखील यंदा अद्याप शुकशुकाट असून, ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली व आर्थिक संबंध असणारी मनमाडची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलणार कधी? याकडे व्यापाऱ्यांचे डोळे लागले आहेत.

कोट

१९७२ पेक्षा भयानक दुष्काळस्थिती नांदगाव तालुक्यात दिसत आहे. मनमाडच्या बाजारपेठेत दिवाळी दिसत नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे बाजारपेठेत पैसा नाही. मनमाड बाजारपेठेत शेतकरी हाच मोठा ग्राहक असल्याने दुष्काळामुळे दिवाळीत मंदीची लाट आहे.-

शांतीलाल गांधी, व्यापारी मनमाड

नांदगाव तालुक्यातील दुष्काळामुळे मनमाडच्या बाजारपेठेत सन्नाटा आहे. दिवाळीत ग्रामीण भागात अंधार आहे. पर्यायाने मनमाडचा बाजार ठप्प आहे.--किशोर नावरकर

जनावरांना चारा नाही. पिकपाणी नसल्यामुळे कसली दिवाळी आणि कसले काय? आल्या दिवसाची आम्हाला चिंता आहे. - सुधाकर थोरमिसे,

भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

येवला : यंदा दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या येवला व निफाड तालुक्याचे नाव राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत न घेतल्याने तालुक्यात सर्वदूर संतापाची लाट उसळली आहे. आमदार छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यासह निफाड हे दोन तालुके दुष्काळी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळ यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दुष्काळी परिस्थितीची आठवण करून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच ३१ ऑक्टोबरला राज्यातील दुष्काळी तालुक्यांची घोषणा केली. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा, तर देवळा, इगतपुरी, नाशिक व चांदवड या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असूनही येवला व निफाड या दोन तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशी खंत आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

गिरणातील पाण्यासाठी निवेदन

मनमाड : नांदगांव मतदार संघात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. नांदगाव तालुक्यातील गावे वाड्या, वस्त्या, तांडे, नांदगाव मतदार संघात समाविष्ट असलेली मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. त्यामुळे नांदगांव मतदार संघाला टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गिरणा धरणात पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष रोजगार मेळाव्यात १६ पोलिस पाल्यांना नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस पाल्यांसाठीच आयोजित विशेष रोजगार मेळाव्यात १६ पोलिस पाल्यांना आयोजक कंपनीने नोकरी देऊ केली. ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव मुख्यालयात या मुलाखती झाल्या. या वेळी अधीक्षक संजय दराडे यांनी संबंधितांना शुभेच्छा देत संघर्षाशिवाय यश शक्य नाही. गुणवत्ता, कौशल्य आणि कष्ट करण्याची मानसिकता असल्यास निश्चित यश प्राप्त करता येत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या रोजगारनिर्मित कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पोलिस दल, अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्था आणि निम संस्थेच्या वतीने मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉलमध्ये १६ पोलिस पाल्यांना अधीक्षक दराडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मेळाव्यात सुमारे ६४ पोलिस पाल्य उपस्थित होते. पुणे शहरातील नामांकित डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट स्कील फाउंडेशनने संबंधितांना नोकरी मिळवून दिली, तर उर्वरीत पाल्यांनाही दुसऱ्या टप्यात बोलावून ऑनलाइन पद्धतीने नियुक्ती दिली जाणार आहे. मेळाव्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर झाले. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार करण्यात आले. अधीक्षक दराडे, अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक सुरेश जाधव, अनुलोम संस्थेचे अमित डमाळे, उमेश पवार, तौफिक शेख, सागर भामरे, डेक्कन मॅनेजमेंटचे सतीश माळी उपस्थित होते. आरोग्य शिबिरात हदयरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश काळे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल काळे यांनी तपासणी व उपचार केले. शिबिरास पोलिस व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरचा भार दारणावर!

$
0
0

नाशिककरांना दिलासा; इगतपुरी तालुक्यावर मात्र टंचाईचे सावट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीसाठी नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर अखेर जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय कायम केला आहे. आता उर्वरित पाणी दारणा धरण समूहातून दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळणार असला तरी इगतपुरीच्या हक्काच्या पाणी जायकवाडीसाठी दिले जाणार असल्याने टंचाई निर्माण भीती व्यक्त केली जात आहे.

गंगापूर धरणातून पाणी सोडण्याला गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, शुक्रवारी पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भाजपचे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला. तब्बल ७ तास त्या शेतकऱ्यांसह सिंचन भवनच्या कार्यालयात ठाण मांडून बसल्यानंतर सायंकाळी हा निर्णय घेण्यात आला.

गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफुट पाणी देण्यात येणार होते. गुरुवारी सकाळी १० वाजता हे पाणी सोडण्यात आले. पण, सांयकाळी स्थगिती आल्यानंतर ते थांबवण्यात आले. या काळात ८० दशलक्ष घनफुट पाणी गेले. पण, या निर्णयामुळे आता ५२० दशलक्ष घनफुट पाणी वाचणार आहे. नाशिकला भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दिवसभर त्यासाठी संघर्ष सुरू होता. सकाळी ११ वाजता गंगापूर धरण परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले. या आंदोलनात आमदार फरांदे या सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी मुख्य अभियंतांच्या दालनात आपला मोर्चा वळवला. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला नकारघंटा वाजवल्यानंतर त्या आक्रमक झाल्या. त्यानंतर प्रशासनाने नमते घेत टंचाई भासू नये, असा निर्णय घेण्यात आला.

पूर्ण पाणी देणार

जायकवाडी धरणाला ८.९९ टीएमसी पाणी पूर्ण देणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. फक्त ते दारणा समुहातील धरणातून दिले जाणार आहे. हे समुहातील बहुतांश धरण हे जायकवाडीसाठी बांधण्यात आल्याने त्यातून जिल्ह्याच्या पाण्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

कार्यालयात नाट्यमय घडामोडी

जलसंपदा विभागात सकाळी आल्यानंतर अधिकाऱ्यांना गोदावरी मराठवाडा महामंडळाचे खरमरीत पत्र हाती पडले. त्यामुळे दिवसभर अधिकारी तणावात होते. त्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने कार्यालयातील तणाव अधिक वाढला. सायंकाळपर्यंत हे अधिकारी पाण्याची आकडेमोड करताना दिसून आले. त्यानंतर सायंकाळी दारणातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर एकमत झाले आणि अधिकाऱ्यांचा तणावरही कमी झाला.

जिल्ह्याला दिलासा

जायकवाडाली पाणी सोडण्यासाठी पालखेड व गंगापूर धरण समुहाचा समावेश केला होता. मात्र, पालखेड धरण समूह अगोदरच वगळण्यात आले. गंगापूर धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यात आले. पण, नंतर त्याला सायंकाळी स्थगिती देण्यात आली. आज हा निर्णय कायम करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याला यातून दिलासा मिळाला आहे.

गंगापूर धरण परिसरातील आंदोलक

गंगापूर धरण परिसरातील वेगवेगळ्या गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जलसिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले. यात अनिल ढिकले, यशवंत ढिकले, नितीन गायकर, योगेश तिडगे, यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दारणातील विसर्ग थांबणार

गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या आदेशान्वये दारणा धरण समूहामधून गुरुवारी सकाळी १० वाजता पाणी सोडण्यास सुरूवात झाली. दोन टीएमसी आणि ४० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात येत असून शनिवारी सायंकाळपर्यंत पाण्याचा हा विसर्ग सुरू राहणार आहे. शनिवारी सायंकाळनंतर हा विसर्ग थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरमध्ये फेरफार

$
0
0

सर्व्हे क्रमांक २९५ मध्येही तीनपटीपेक्षा अधिक आकारणी; स्थायीकडून चौकशीचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपनेच सर्व्हे क्रमांक ७०५ च्या संशयास्पद रोखीच्या मोबदल्यावर आक्षेप घेतला असताना, देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मध्ये अॅमेनिटी पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेचा टीडीआर स्वरुपात मोबदला देताना रेडिरेकनरचा दर सात हजार रुपयांचा असताना तब्बल २४ हजार रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे टीडीआर दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीत उघड झाला. आयुक्तांनीही या विषयात तथ्य आढळल्याचे सांगितल्याने सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी टीडीआरच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले.

गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रालगतच्या सर्व्हे क्रमांक ७०५ च्या जागामालकाला घाईगडबडीत २१ कोटीचा मोबदला देण्याचा विषय शुक्रवारच्या स्थायीच्या बैठकीत दिनकर पाटील यांनी उपस्थित केला. सोबतच देवळाली शिवारातील रेल्वे स्टेशनच्या बाजुला सर्व्हे क्रमांक २९५ मध्ये अॅमेनिटी पार्कसाठी आरक्षित जागेचा टीडीआर स्वरुपात दिलेल्या मोबदल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. महापालिकेने संबंधित जागा मालकाला टीडीआर स्वरुपात मोबदला देण्याचा निर्णय घेतला. याबाबत २०१७ मध्ये करारही झाला. मात्र, या ९ चौरस मीटर जागेचा तिथला रेडिरेकनर दर सात हजार रुपये होता. त्यामुळे त्या जागेच्या टीडीआरचा दर सात हजार रुपये चौरस मीटर असताना संबधित जागा मालकाला नाशिकरोड भागातील मुक्तीधाम येथील मुख्य रस्त्यावरील २४ हजार रुपये प्रतिचौरस मीटर रेडिरेकनरचा दर आकारण्यात आला. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व्हे क्रमांक ७०५ मधील जागेचा रोख स्वरुपात दिलेला मोबदला व देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील संशयास्पद टीडीआर वाटपाबाबत खुलासा मागितला. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी दे‌वळालीच्या जागेबाबत झालेल्या चुकीच्या व्यवहाराची सभेत कबुली दिली. तर आयुक्त मुंढे यांनी याप्रकरणाबाबत तथ्य आढळल्याने तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. या सर्व व्यवहारांची गंभीर दखल घेत, सभापतींनी अशा संशयास्पद व्यवहारांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

ऑडिओ रेकॉर्डिंगचा गौप्यस्फोट

दिनकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक ७०५ मधील जागेच्या रोख स्वरुपाच्या मोबदल्याचा प्रश्न उपस्थित करत, सदरची रक्कम न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत देण्याचे आदेश दिले असताना मोबदल्यासाठी तीन वर्षे वाट का पाहिली, असा सवाल उपस्थित केला. तसेच या फाईल्स प्रकरण हाताळणारा वाघ नावाचा व्यक्ती कोण, असा जाबही त्यांनी विचारला. वाघ नावाचा व्यक्ती कोण, त्याचा महापालिकेशी असलेला संबंध व बाहेरचा व्यक्ती फाईल मंजुरीसाठी दबाव कसा आणू शकतो, अशा प्रश्‍नांचा भडीमार यावेळी पाटील यांनी केला. प्रशासनाने याविषयावर बोलणे टाळल्यानंतर पाटील यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र, आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण दिले. सर्व आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी साडेचार हजार कोटींची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थीतीत टीडीआर, समावेशक आरक्षण व नवीन भूसंपादन कायद्यानुसार रोख मोबदला अशा तीन पर्यायात भूसंपादन करावे लागणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. सर्व्हे क्रमांक ७०५ चा रोख स्वरुपात मोबदला दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना हुलकावणी देण्याच्या नादात अपघात

$
0
0

दुचाकीस्वाराचा मृत्यू; अन्य दोघे जखमी

म. टा. खास तिनिधी, नाशिक

पोलिस वाहनाला पाहून भरधाव वेगात निघालेल्या दुचाकीची भिंतीला धडक बसून झालेल्या अपघातात १७ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन आणखी दोन युवक जखमी झाले आहेत.

तबरेज खान (१७, रा. अंबड लिंकरोड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. नितीन जैस्वाल आणि सलमान सोहेलअली खान अशी अन्य दोन मुले या घटनेत जखमी झाली आहेत. याबाबत माहिती देताना गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक के. जी. मोरे यांनी सांगितले, की आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोरे यांच्यासह त्यांचे पथक गस्तीवर असताना दुचाकीवर (जे जी १५, २१६२) तीन मुले भरधाव वेगात जाताना दिसली. यातील पाठीमागे बसलेल्या दोन्ही मुलांनी तोंडावर स्कार्फ बांधलेला होता. वाहनाचा क्रमांक आणि मुलांची स्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिस वाहन त्यांच्या मागावर निघाले. पोलिस मागे असल्याचे दुचाकीवर सर्वात मागे बसलेल्या मुलाने पाहिले. यानंतर त्याने दुचाकी चालविणाऱ्यास जोरात घेण्याची खूण केली. भोसला मिलीटरी स्कूलच्या पाठीमागे असलेल्या संतकबीरनगर येथून जाणाऱ्या एका रस्त्यावरून दुचाकी भरधाव वेगात गेली. पुढे हा रस्ता अरुंद होत गेला. एका ठिकाणी दुचाकी रस्त्याच्या खाली उतरून भरधाव वेगात भिंतीवर जाऊन आदळली. यात तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. पाठीमागून आलेल्या मोरे यांच्या पथकाने तिघांनाही लागलीच आपल्या वाहनात घालून श्री गुरुजी रूग्णालयात दाखल केले. मात्र, तबरेजची स्थिती नाजूक असल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायंकाळच्या सुमारास मात्र मृतकाच्या नातेवाइकाने या घटनेस पोलिस जबाबदार असल्याचा दावा करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. हा वाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images