Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गगन सदन तेजोमय...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकाशमान जीवनाची मंगलकामना करणारा अन् ध्येय उंच ठेवा असा संदेश देत अंगणात झळकणारा तेजोमय आकाश कंदील...दारोदारी तेवणाऱ्या लखलखत्या पणत्या म्हणजे नभांगणातील तारकांची अंगणात सजलेली आरासच जणू. विविध रंग लेऊन सजलेली मांगल्याची रांगोळी... दारावर डोलणारी उत्साहाची तोरणे अन् चैतन्याला आलेला बहर अशा मंगलमय वातावरणात नाशिककरांनी बुधवारी लक्ष्मीपूजन केले. सोनपावलांनी आलेल्या लक्ष्मीचे सुहास्यवदने स्वागत करीत समृद्धीचे दान मागण्यात आले. मांगल्य, प्रकाश आणि आनंदमय उत्सवात अबालवृद्ध नखशिखांत न्हाऊन निघाले.

दिवाळी म्हणजे वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंतच्या सणांचे स्नेहमीलन. तमाच्या तळाशी दिवे प्रज्वलित करून अंतरंगाचा गाभारा उजळविणारा सुखसोहळा. गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने दीपावलीची प्रतीक्षा करणारे नाशिककर भल्या सकाळीच आळसाची दुलई बाजूला सारून उत्साहाची शाल पांघरत लक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झाले. पणत्या पेटवून अंधार, औदासिन्य, निराशा, नकारात्मकता झटकण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरी परतलेल्या जीवलगांसह मित्रमंडळींसमवेत धमाल करतानाच सुख- दु:खाच्या गप्पांची मैफल जमली. सायंकाळी अंगणात सडाशिंपण करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी नयनमनोहारी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. तेवणाऱ्या पणत्यांची मंद ज्योत, आकर्षक आकाशकंदीलांमधून डोकावणारा दिवा आणि घरांवरील रोषणाईच्या माळा यांद्वारे सायंकाळी प्रकाशाची उधळण सुरू झाली. सुख-समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या लक्ष्मीसाठी गोडाधोडाचा स्वादिष्ट नैवेद्य करण्यात आला. फुलांची आरास करण्यात आली. नवे कपडे परिधान करून सर्व कुटुंबीयांनी लक्ष्मीची मनोभावे पूजा करीत फराळासह पुरणाचा नैवेद्य दाखविला. सुख, समृध्दी, आनंद, ऐश्वर्य, निरामय आरोग्य, मनशांतीची मंगलकामना करण्यात आली. त्यानंतर फटाके वाजविण्याची लगबग सुरू झाली. चिमुकल्यांच्या उत्साहाला भरते आले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून गेला.

शुभेच्छांचा वर्षाव

दिवाळीनिमित्त आप्तस्वकीयांसह स्नेहीजणांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शुभेच्छासंदेशांची आतषबाजी सुरू असल्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला. ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही अशा स्नेहीजणांना व्हॉटसअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यास पसंती देण्यात आली. यंदा स्टीकर्सद्वारे शुभेच्छा देण्याची नवीन क्रेझ निर्माण झाली असून, शुभेच्छांच्या आदान-प्रदानाद्वारे नाते अधिक दृढ करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या दिवाळीचे अनोखे सेलिब्रेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्न ठरण्यापूर्वीचे अनेक किस्से, कुणाचे मैत्रीतून खुललेले प्रेम तर काहींचे अॅरेंज मॅरेज. लग्नाच्या वेळच्या त्या गोड आठवणी अन् पहिल्या दिवाळीचा उत्साह. या उत्साहात सेलिब्रेटींची अचानक झालेली भेट अन् दिवाळीच्या आनंदाला आलेले उधाण. पहिल्या दिवाळीच्या या अविस्मरणीय सेलिब्रेशनचा फराळाचा गोडवा नव्या जोडप्यांनी लुटला. निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'पहिली दिवाळी सेलिब्रेशन'चे.

लग्नानंतर येणारी पहिली दिवाळी प्रत्येक जोडप्यासाठी खास असते. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे या दिवाळीचे विशेष कौतुक असते. अशा दाम्पत्यांच्या आनंद सोहळ्यात भर घालण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक कार्यालयात 'पहिली दिवाळी सेलिब्रेशन'चे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते दीपक करंजीकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री विद्या करंजीकर यांसह अभिनेते किरण भालेराव, राजेंद्र उगले या सेलिब्रेटींसोबत पहिली दिवाळी साजरी करण्याचे सरप्राइज गिफ्ट नवीन जोपड्यांना मिळाले. लक्ष्मी पूजनाच्यानिमित्ताने 'मटा'च्या कार्यालयात आलेल्या या जोडप्यांची काही महिन्यांपूर्वीच लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. नव्या संसाराला असणारी उत्साहाची अन् आनंदाची किनार ते हळूवारपणे जपत असल्याचे यावेळी जाणवले. लग्नाच्या पहिल्या दिवाळीचा आनंद, जोडीदाराची निवड आणि लग्नाची आठवण एकमेकांसोबत शेअर करताना उखाण्याचा गोडवा या सेलिब्रेशनमध्ये हिट ठरला. यावेळी अनेक गमतीशीर खेळांसोबत दिवाळीचे सेलिब्रेशन रंगले.

या सेलिब्रेशनमध्ये जोडप्यांसोबत गप्पा मारताना अभिनेते दीपक करंजीकर म्हणाले की, दीपोत्सव सर्वांगाने महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पेरणाऱ्या या उत्सवाला अर्थव्यवस्थेचाही कणा आहे. खरीप हंगाम संपल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक हंगाम सुरू होतो. तसेच दीपोत्सवाच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांच्या मोठ्या उलाढाली होतात. या सोहळ्याला उत्साहाचे, आनंदाचे आणि वेगळ्या सेलिब्रेशनचे तोरण 'मटा'ने या सोहळ्याच्या माध्यमातून लावले आहे. नवविवाहित जोडप्यांची पहिली दिवाळी अधिक यादगार होण्यासाठी हा सोहळा अतिशय महत्त्वाचा ठरला. नव विवाहितांच्या विचारांची, त्यांच्या कौशल्यांची ओळख आम्हाला या सोहळ्यातून झाली. नव्या जोडप्यांसोबत दीपोत्सव साजरा करताना कमालीचा आनंद झाला. अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की, एकमेकांच्या कलागुणांना कायम प्रोत्साहन द्यायचे. तसेच संसारातील प्रत्येक विघ्न एकमेकांच्या चर्चेतून सोडवावेत. लग्नानंतर मी २३ वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या पदार्पणात मला दीपकची मोलाची साथ लाभली. जोडीदाराने प्रत्येक गोष्टीत साथ कायम ठेवल्यास संसाराचा गोडवा अधिक वाढतो. अभिनेते किरण भालेराव यांनी जोडप्यांशी बोलताना लहानपणीच्या दिवाळीतले किस्से शेअर केले. ते म्हणाले की, बालपणी दिवाळीत प्रत्येक गोष्टीचे आकर्षण असते. संसाराची नाव पुढे नेताना दिवाळीतील प्रकाशवाटेप्रमाणे लख्ख असावी. प्रत्येक जोडप्याने एकमेकांना समजावून घेत संसार प्रपंच करावा. 'मटा'च्या कार्यालयात नव्या जोडप्यांच्या साथीने दीपोत्सव साजरा करताना आनंदाला अधिक उधाण आले. नव्या जोडप्यांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. अभिनेते राजेंद्र उगले यावेळी म्हणाले की, दिवाळी हा कलेचा सण आहे. दिवाळीत महिलांच्या पाककलेला अधिक वाव असतो. संसाराचा गोडवा खुलविण्यासाठी प्रत्येकाने जोडीदाराला सांभाळून घ्यावे. या सेलिब्रेशनची रंगत खेळांतून आणि गप्पांतून अधिकाधिक वाढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १७ महसुली मंडल दुष्काळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहिलेल्या काही तालुक्यांच्या जखमेवर राज्य सरकारने फुंकर मारली आहे. संबंधित तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालेल्या महसुली मंडलांना दुष्काळी जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये येवला, निफाडसह चार तालुक्यांमधील १७ मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे या मंडलांमधील रहिवाशांना दुष्काळी सवलतींचा आणि उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.

नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी यावर्षी सरासरी इतका पाऊस होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा तीव्र कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने पावसाळ्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ सरकार आणि प्रशासनावर आली. दुष्काळाची दाहकता वाढू लागल्याने सरकारने राज्यातील १८० तालुक्यांना दुष्काळी जाहीर केले. या तालुक्यांमधील रहिवाशांना दुष्काळामुळे निर्माण झालेल्या झळांची तीव्रता कमी जाणवावी याकरिता काही सवलती देखील देऊ केल्या आहेत. परंतु या १८० तालुक्यांव्यतीरिक्त अन्य काही तालुक्यांमध्ये देखील दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असल्याने या तालुक्यांनाही दुष्काळी जाहीर करावे अशा मागणी सरकारकडे जोर धरू लागली होती. दुष्काळासाठीच्या निकषांमध्ये हे तालुके बसत नसल्याने त्यांना दुष्काळी जाहीर करण्यास मर्यादा येत होत्या. परंतु संबंधित तालुक्यांमधील काही मंडलांत टंचाईची परिस्थिती विदारक असल्याचे जिल्हा प्रशासनांनी सरकारच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच अशा मंडलांच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना देखील आठ प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसा शासन निर्णय वन विभागाने काढला आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पाऊस झालेली किंवा ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेली मंडल असा निकष ठेवण्यात आला आहे. राज्यातील अशा २६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील एकूण १७ मंडलांचा समावेश आहे. या मंडलांच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना देखील जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपांच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथीलता, टँकर्सद्वारे पाणी पुरवठा, शेतीपंपांची वीज खंडीत न करणे यांसारख्या सवलतींचा लाभ या महसुली मंडलांनाही मिळणार आहे.

-

दुष्काळी महसुली मंडल

येवला : नगरसूल, अंदरसूल, पातोडा, सावरगाव, जळगाव

निफाड : निफाड, रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदुर

दिंडोरी : दिंडोरी, मोहाडी, वरखेडा

कळवण : कळवण, नवीबेज, मोकभांगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भत्त्यासाठी महाजनांचा अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतून निवृत्तीनंतरही विविध प्रकरणांमध्ये चौकशांना सामोरे जात असलेले माजी अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या एका अर्जाने प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे. निवृत्तीनंतर महाजनांना दिला जाणारा राष्ट्रपती अग्निशामक सेवा शौर्यपदक आणि अग्निशामक सेवा शौर्य पदकापोटी दरमहा दिला जाणारा पाच हजार रुपयांचा रोख भत्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महाजन प्रशासनाकडे अर्ज करून हा भत्ता सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु, सेवा निवृत्तीनंतर रोख भत्ता देण्याची तरतूद नसल्याने अग्निशामक सेवा अकादमीच्या संचालकाकडून मार्गदर्शन मागवले आहे.

अनिल महाजन यांची पालिकेतील सेवा चांगलीच वादग्रस्त राहिली आहे. निवृत्तीच्या काळात महाजनांना अनेक चौकशांचा सामना करावा लागला होता. अग्नीशामक ना हरकत दाखल्यासंदर्भातील महत्त्वाचे परिपत्रक दडवून ठेवल्यामुळे तसेच विविध आक्षेपामुळे त्यांना १ लाख रुपयांचा दंडही आयुक्त तुकाराम मुंढेंनी ठोठावला आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ कायम राहिले. महाजन पालिकेत कार्यरत असताना त्यांना राष्ट्रपती अग्निशामक सेवा शौर्यपदक व अग्निशामक सेवा शौर्य पदक असे दोन पदक मिळाली होती. या पदकांपोटी पालिकेडून त्यांना अनुक्रमे ३ व २ हजार असे एकूण पाच हजार रुपयांचा रोख भत्ता दिला जात होता. परंतु, निवृत्तीनंतर हा भत्ता बंद करण्यात आला. परंतु, महाजन यांनी सदरील भत्ता हा जीवंत असेपर्यंत तसेच पत्नी जीवंत असेपर्यंत द्यावा, असा अर्ज महापालिकेकडे केला आहे. अशा प्रकारची तरतदू कुठेही आढळून येत नसल्याने प्रशासनाने त्यासाठी अग्निशामक अकादमीकडे दाद मागितली आहे. त्यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले असून, मार्गदर्शन आल्यानंतर त्याबाबत निर्णय आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्ही पॅट मशिन दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅलेट आणि कंट्रोल युनीटद्वारे दिलेले बहुमूल्य मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मिळाले की नाही हे दाखविणारे व्होटर व्हेरीएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्ही पॅट) मशिन जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हे मशिन आणण्याकरीता बेंगळुरू येथे गेलेले जिल्हाधिकारी प्रशासनाचे पथक नाशिकमध्ये परतले आहे.

२०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा बार उडणार असून, त्याकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी प्रशासनाच्या निवडणूक शाखेने जोरदार तयारी सुरू केली आहे. बॅलेट आणि कंट्रोल युनीट यापुर्वीच जिल्ह्यात दाखल झाले असून, व्हीव्ही पॅट आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक ३१ ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे गेले होते. हे पथक ४ हजार ५७९ व्हीव्ही पॅट मशिन घेऊन मंगळवारी (दि. ६) नाशिकमध्ये दाखल झाले. अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात हे मशिन ठेवण्यात आले आहेत. यंदा देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर नवीन इव्हीएम मशिनद्वारे मतदान घेतले जाणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता रहावी आणि ईव्हीएम मशिनमध्ये सेटिंग केली जात असल्याची ओरड निकाल जाहीर झाल्यानंतर होऊ नये याकरीता व्हीव्ही पॅट मशिनची मदत घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. जिल्ह्यातील ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, प्रत्येक केंद्रावर हे मशिन असणार आहेत. दिवाळीनंतर या मशिनची तपासणी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून करण्यात येणार आहे. महिना अखेरपर्यंत ही तपासणी पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

खेडोपाड्यांत होणार प्रात्यक्षिक

अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात या मशिन्सची तपासणी घेतल्यानंतर त्याची प्रात्यक्षिके दाखविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यामुळे हे व्हीव्ही पॅट मशिन नेमके कसे काम करेल याची प्रात्यक्षिके ग्रामीण आणि शहरी भागात दाखविली जाणार आहेत. त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलिस, पत्रकार या घटकांनाही या मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. निवडणूक प्रणालीविषयी आणि प्रशासनाविषयी विश्वासार्हता वाढावी हा या प्रात्यक्षिकांचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा वर्धापनदिनाची परंपरा खंडित

$
0
0

आयुक्त गैरहजर; महापौरांच्या हस्ते लक्ष्मीपूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर रंजना भानसी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्षाचा फटका पालिकेच्या ३६ व्या वर्धापन दिनालाही बसला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी नाशिक महापालिकेचा वर्धापनदिन साजरा करण्याची गेल्या ३६ वर्षांची परंपरा बुधवारी खंडीत झाली. लक्ष्मीपूजन आणि वर्धापन दिनाकडे आयुक्त तुकाराम मुंढेंनी पाठ फिरवली. त्यामुळे आयुक्तांच्या गैरहजेरीत महापौर रंजना भानसी यांनी लक्ष्मीपूजन केले. यानंतर त्याच ठिकाणी वर्धापनदिनाच्या सत्यनारायण पूजनाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.

आज, बुधवारी नाशिक महापालिकेचा आज ३६वा वर्धापनदिन होता. लक्ष्मीपूजन आणि वर्धापनदिन असा दुहेरी योग पालिकेच्या इतिहासात प्रथमच जुळून आला होता. वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. सोबतच आदर्श काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही गौरव केला जातो. लोकप्रतिनिधी आणि आयुक्त मुंढें यांच्यातील संघर्षात मात्र यंदा वर्धापनदिन साजरा करण्यात आला नाही. वर्धापनदिनी एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. लक्ष्मीपूजनाची पुजाही आयुक्तांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. परंतु, यंदा आयुक्तांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनातील कोषागारात महापौर रंजना भानसी, पोपटराव भानसी, अतुल भानसी, दिपाली भानसी यांच्या हस्ते विधीवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते सलीम शेख, अतिरीक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त तथा मुख्य लेखा परिक्षक महेश बच्छाव, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, शिवाजी आमले, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, सहाय्यक आयुक्त ए.पी.वाघ, नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, प्रभारी अग्निशमन दल प्रमुख बैरागी, आदी उपस्थित होते.

अधिकारी गेले रजेवर

आयुक्त मुंढे यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. सुहास शिंदे हेही या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. ते रजेवर गेल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षणमंत्री सीतारामन आज नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन भाऊबीजेच्या दिवशी (९ नोव्हेंबर) नाशिकमध्ये येत आहेत. देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये एका राष्ट्रीय समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकन बनावटीची होवेत्झर आणि कोरियन बनावटीची वज्र या दोन तोफा सीतारामन यांच्या हस्ते लष्कराला सुपूर्द केल्या जाणार आहेत. याप्रसंगी संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच निर्मला सीतारामन नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी मे २०१६ मध्ये तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी देवळाली, भगूर येथील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यानंतर आता सीतारामन या दौऱ्यावर येत आहेत. १९८० मध्ये भारताने स्वीडनची कंपनी बोफोर्स कडून बोफोर्स तोफांची खरेदी केली होती. ही खरेदी वादात सापडली. आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण गाजले. त्यानंतर भारताने लष्करासाठी तोफा खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या तीन दशकात संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले.

आज प्रात्यक्षिक

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या तोफा आणि संरक्षणसामग्री उपलब्ध झाली आहे. अखेर भारताने अमेरिकेबरोबर करार करून अत्याधुनिक अल्ट्राव्हायलेट होवेत्झर आणि दक्षिण कोरियाशी करार करून वज्र अशा दोन तोफा लष्करासाठी दिल्या आहेत. या दोन्ही तोफा लष्कराला पर्यायाने देशाला समर्पित करण्याचा सोहळा शुक्रवारी स्कूल ऑफ आर्टिलरी सेंटरमध्ये होत आहे. याप्रसंगी या तोफांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच, संरक्षणमंत्री उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये जवानांना तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या तोफा येथेच लष्कराच्या हवाली केल्या जाणार आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर या तोफा येत्या काळात तैनात होणार असून त्याद्वारे अचूक लक्ष्य भेदण्यात लष्कराला मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराच्या ताफ्यात आधुनिक होवित्झर, वज्र तोफा

$
0
0

नाशिक:

अमेरिकन बनावटीची होवेत्झर आणि कोरियन बनावटीची वज्र या दोन तोफांबरोबरच तोफांचे वहन करणारा आधुनिक ट्रक भाऊबीजेच्या मुहूर्तावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लष्कराला सुपूर्द केला. येत्या दोन वर्षांत आणखी काही तोफा आणि युद्धसामग्री लष्कराला मिळणार असून त्याद्वारे लष्कर अधिक बलशाली होणार आहे. परिणामी, देशाची सुरक्षा व्यवस्था कणखर होईल, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांसह लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.

देवळाली फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारी हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. तब्बल तीन दशकांनी लष्कराला आधुनिक तोफा मिळाल्या आहेत. 'आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. लष्कराचे सशक्त होणे म्हणजे देशाच्या सीमा अभेद्य होणे आहे,' असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. २००६ पासून तोफा खरेदी करण्यासाठी वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, गेल्या सरकारने त्यासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षात आम्ही वेगाने वाटाघाटी पूर्ण केल्या आणि लष्कराला आधुनिक करण्यासाठी करार केला. ७३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीच्या १४५ होवेत्झर तोफा लष्कराला मिळणार आहेत. यातील १२० तोफा या भारतात तयार केल्या जाणार आहेत. जिथे रस्ते नाहीत आणि समुद्रसपाटीपासून अधिक उंची आहे अशा ठिकाणी या तोफा देशाच्या सीमा संरक्षित करतील, असे सीतारामन म्हणाल्या. तर, कोरियन बनावटीची वज्र ही तोफ ४३६६ कोटी रुपये किंमतीची आहे. सध्या १० तोफा उपलब्ध झाल्या असून आणखी ९० तोफा भारतात तयार केल्या जाणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना या तोफांच्या निर्मितीत सहभागी करुन घेतले जात आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

सध्या वज्र या तोफाची जुळणी केवळ भारतात होणार आहे. मात्र त्यानंतर ही तोफ भारतातच निर्माण केली जाईल. त्याचे तंत्रज्ञान आधुनिक आहे. त्यामुळे येत्या काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असे सीतारामन यांनी सांगितले. तर, दर १५ दिवसाला संरक्षणाच्या विविध प्रश्नांवर समितीची बैठक होत असून सरकार लष्कराला अधिक शक्तीशाली करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. येत्या दोन वर्षात धनुषसह आणखी इतरही आधुनिक तोफा लष्कराला मिळणार असल्याचे लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले. या दोन्ही तोफांचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. या तोफा लवकरच सीमेवर तैनात होतील, असेही ते म्हणाले.

प्रात्यक्षिके सादर

सद्यस्थितीत लष्करात असलेल्या बोफोर्ससह आणखी काही तोफांची प्रात्यक्षिके संरक्षणमंत्र्यांसह मान्यवरांना दाखविण्यात आली. त्यानंतर नव्याने रुजू होत असलेल्या होवेत्झर आणि वज्र या दोन तोफा आणि आधुनिक ट्रक यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. लक्ष्य अचूक भेदण्यात या तोफा किती सक्षम आहेत हे लष्कराने दाखवून दिले. याप्रसंगी शत्रूच्या गोटात धडकी भरतानाच आपल्या गोटात मात्र ऊर भरुन येईल, अशी कामगिरी या तोफा करणार असल्याचे स्पष्ट झाले.

वीर पत्नी-मातांची भेट

समारंभानंतर संरक्षण मंत्री, राज्यमंत्री आणि लष्करप्रमुख यांनी नाशिक जिल्ह्यातील वीर पत्नी आणि मातांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. आपल्या कुटुंबामुळेच देश सुरक्षित आहे, अशी भावना संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांची गर्दी

$
0
0

(फोटो आहे)

पर्यटकांच्या गर्दीने गजबजली धार्मिक नगरी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिवाळी सणासाठी मिळालेल्या सुट्ट्यांच्या कालावधीत पर्यटनाची पर्वणी साधण्यासाठी झालेल्या पर्यटकांच्या गर्दीने नाशिकमधील धार्मिकनगरी अशी ख्याती असलेला पंचवटी परिसर सध्या गजबला आहे. धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे रामकुंड, काळाराम मंदिर, कपालेश्वर, सीतागुंफा आणि तपोवन परिसर गर्दीने फुलून गेला आहे. दिवाळीच्या सुट्टीत आनंद स्नान आणि देवदर्शनासाठी घालविण्यासाठी भाविकही पंचवटीत दाखल झाले आहेत. या गर्दीने धार्मिक स्थळे गजबजली आहेत.

वसू बारसपासून सुरू झालेला दिवाळी सण भाऊबीजपर्यंत चालला. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत दिवाळीचा आनंद लुटल्यानंतर पर्यटन आणि दर्शन घेण्यासाठी सहकटुंब निघालेले अनेक पर्यटक शनिवारी (दि. १०) रोजी पंचवटीत आले होते. त्यांच्या गर्दीमुळे रामकुंड परिसरासह पंचवटीतील सर्वच मंदिरांचे परिसर फुलून गेले आहेत. रामकुंडावर स्नानासाठीही गर्दी झाली होती. स्नान करून कपालेश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविक जात होते. तेथून काळाराम मंदिर आणि सीतागुंफा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

भाविक आणि पर्यटकांच्या वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, कपूरथळा, जुन्या भाजीबाजाराची जागा, रामकुंड पार्किग आदी मैदाने भरून गेली आहेत. तपोवनातील कपिला संगमाच्या रम्य ठिकाणी आणि रामसृष्टी उद्यानात फेरफटका मारण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दिसत होते. कपिला संगमावरील खडक आणि त्याचा परिसर, लोखंडी पुलावरून दुसऱ्या बाजूला जाण्याची कसरत करताना पर्यटक दिसत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून सुन्या वाटत असलेल्या पंचवटी परिसराला वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे जणू काही चैतन्य आले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत ही गर्दी अशीच वाढत राहणार असल्याचे शक्यता या भागातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके वाजले; कुणी नाही ऐकले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके उडवा, हा सर्वोच्च न्यायालयाने आदेश नाशिकमध्ये पायदळी तुडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादांकडे दुर्लक्ष करून नाशिककरांनी सालाबादाप्रमाणे यंदाही पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात धन्यता मानली. सुतळी बॉम्बपासून ते डबल बारसारखे मोठे फटाकेही अभिमानाने फोडून न्यायालयाच्या आदेशाचाच भंग करण्यात आल्या. सणासुदीच्या काळात पहाऱ्यावर असलेल्या शहर पोलिसांना मात्र तो ऐकूच गेला नसल्याचेही स्पष्ट होत आहे. नाशिक शहर पोलिसांत वेळेच्या मर्यादेपलीकडे तसेच मोठे आवाज करणारे फटाके फोडल्याबद्दल एकही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

फटाके आणि दिवाळीचे नाते दृढ आहे. फटाके फोडणे ही आपल्या पूर्वजांनी बाटलीबंद भावना मोकळ्या करण्यासाठी घालून दिलेली परंपरा मानली जाते. साचलेल्या भावना, नैराश्य, राग, तिरस्कार यांचा कायमस्वरूपी निचरा व्हावा आणि माणसाचे आयुष्य फटाक्यांचा स्फोटाप्रमाणे प्रकाशमान व्हावे हा फटाके उडविण्यामागील उद्देश मानला जातो. परंतु, फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनिप्रदूषण होत असल्याने फटाके उडविण्याच्या वेळेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत. त्यानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या कालावधीव्यतीरिक्त अन्य वेळेत फटाके उडविल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही गृह विभागानेही दिले होते. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रत गृह विभागाने राज्याचे पोलिस महासंचालक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलिस प्रमुखांना पाठविली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील आपल्या अधिपत्याखाली कार्यरत घटक कार्यालयांना त्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या. ठरवून दिलेल्या वेळेव्यतीरिक्त अन्य वेळेत फटाके उडविणाऱ्यांवर मुंबईसारख्या महानगरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. न्यायालयाचा आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, नाशिक शहरात मात्र पहाटे पाचपासून रात्री १२ पर्यंत बिनदिक्कतपणे फटाके उडविण्यात आल्याचा पहावयास मिळाले. रात्री आठ ते १० ही फटाके वाजविण्यासाठी ठरवून दिलेली वेळ असली तरी त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर फटाके उडविण्यात येत असल्याचा अनुभव जागरूक नागरिकांनाही आला. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला असला तरी पोलिसांकडून त्याबाबत कुणावर अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

असाही वर्ग

फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होते. सजग नागरिकही प्रदूषण रोखण्यात खारीचा वाटा उचलू लागले आहेत. म्हणूनच दरवर्षीपेक्षा यंदा नाशकात कमी प्रमाणात फटाके उडविण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवले. यंदा फटाक्यांना मागणी कमी होती. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास बहुतांश नागरिकांनी प्राधान्य दिले.

उपनगरांमध्ये सर्वाधिक जोर

यंदा दिवाळी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आली. याच काळात पगारदार वर्गाचे वेतन होत असल्याने अनेकांचा उत्साह द्विगुणित झाला. उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कामगार वर्गाला भरघोस बोनसही मिळाल्याने त्यांचा खरेदीवर सर्वाधिक जोर होता. सातपूर, अंबड, सिडको, उपनगर, या भागांमध्ये सर्वाधिक फटाके फोडण्यात आले. ध्वनि आणि वायू प्रदूषणही या भागात अधिक झाल्याचे जाणवले.

मटा भूमिका

संसद आणि न्याय व्यवस्थेने नियम-कायदे करायचे आणि सामान्यांनी ते सपशेल पायदळी तुडवायचे हा प्रघातच आपल्याकडे पडला आहे. बऱ्याचदा न्यायालयाचा आदेश अडचणीचा वाटत असेल तर सरकार आणि पोलिस-प्रशासकीय यंत्रणाही सामान्यांच्या अशा कृत्यांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करून अप्रत्यक्षपणे त्यांना पाठबळच देत असतात. अशा वेळी ना पर्यावरणाची चिंता केली जाते, ना पुढल्या पिढीची. नियम पाळणारे बोटावर मोजण्याइतके आणि मोडणारे ढीगभर असे चित्र सर्वदूर दृष्टीस पडते. फटाक्यांच्या बाबतीतही थेट सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. नागरिक ऐकतच नाहीत म्हटल्यावर कुठलीच यंत्रणा त्यांच्यापुढे टिकाव धरू शकत नाही म्हणून मूग गिळून गप्प बसणे योग्य नाही. पोलिसांनी नियमांची पायमल्ली करीत फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असता तर जनसामान्यांपर्यंत योग्य तो संदेश नक्कीच गेला असता आणि किमान पुढल्या खेपेला तरी नागरिकांनी दक्षता घेतली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्ट्या पैशांच्या वादातून हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सरदार चौकात सुट्ट्या पैशांच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सईद अहमद अब्दुल हमीद (वय ५३, रा. कुंभारवाडा) असे मृताचे नाव आहे.

शुक्रवार रात्री ९ वाजेच्या सुमारास सरदार चौक येथे थंड पिण्याच्या पाण्याच्या ठेला गाडीवर काही अज्ञात व्यक्ती व गाडीचालक सईद यांच्यात पाणी पिल्यानंतर सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत गाडीचालक सईद यांना गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांना धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील सईद यांना पोलिसांनी सामान्य रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अधिक तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

..

मोटारसायकल्ससह टीव्ही, कपड्यांची चोरी

निफाड : सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी दोन टीव्ही, दोन मोटारसायकल, कपडे चोरून नेले. हिमालय सोसायटीत मध्यवर्ती ठिकाणी डॉ. आबा पाटील यांच्या घरात सोनगाव येथील प्राथमिक शिक्षक संतोष भुसे भाडेकरू म्हणून रहातात. भाऊबीजेच्या निमित्ताने ते दुपारी बारा वाजता सिन्नर येथे बहिणीकडे गेले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरांनी मुख्य दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट, कोठी यातील सामान अस्तव्यस्त केले. घरात कोणताही ऐवज मिळाला नसल्याने दोन टीव्ही आणि काही कपडे चोरनू नेले. घराच्या अंगणात लावलेल्या पॅशन आणि मॅक्सो मोपेड या दोन गाड्या घेऊन पोबारा केला. सायखेडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

...

मुलीची छेडछाड, गुन्हा दाखल

घोटी : देवगाव (ता. इगतपुरी) आश्रमशाळेच्या गेटवर अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक तालुक्यातील व घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव शासकीय आश्रमशाळेच्या गेटवर एका अल्पवयीन विधिसंघर्षित युवक या मुलीची नेहमी छेड काढीत असे. या जाचाला कंटाळून विद्यार्थिनीने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून संशयित युवकाविरुद्ध फिर्याद दिली.

....

खेरवाडीत दोन दुकाने आगीत खाक

निफाड : खेरवाडी (ता. निफाड) येथील सायकल व इलेक्ट्रिक दुकानाला आग लागून दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाले. या घटनेत सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. चांदोरी येथील प्रभाकर विश्वनाथ पठारे यांचे खेरवाडी येथे सायकल व इलेक्ट्रिक दुकान आहे. दीपावलीमुळे दोन दिवसांपासून दुकान बंदच होते. दुकानात सायकल, मोटारसायकलचे नवे ट्यूब, टायर इतर स्पेअरपार्ट तसेच पठाडे हे इलेक्ट्रिक फिटिंगचे कामे करीत असल्याने विक्रीसाठी ठेवलेले वायर, भरण्याचे मशिन होते. सागवानी दुकानाला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळगाव येथील अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र बंब येईपर्यंत दुकान बेचिराख झाले होते. त्यानंतर दहा मिनिटांनी ओझर एअर फोर्स व नाशिक महापालिकेच्या दोन गाड्या आल्याने आजूबाजूच्या घरांना आग लागण्याचा धोका टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आणि काशिनाथ घाणेकर’ला प्राइम टाइमची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त दाखविणाऱ्या '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटास प्राइम टाइमचे शोज देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पीव्हीआर मल्टीप्लेक्सचे व्यवस्थापक सचिन चौधरी यांना देण्यात आले.

यावेळी महत्त्वाच्या मराठी चित्रपटाला अन्यायाने डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिल्यास ते सहन केले जाणार नाही. येत्या चोवीस तासात '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'ला स्क्रीन्स आणि शोज द्या, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी मनसे चित्रपट सेनेचे जिल्हा संघटक निखील सरपोतदार, आशुतोष सूर्यवंशी, चित्रपट सेनेचे जिल्हा सचिव शिवराज चव्हाण, शहर उपसंघटक अक्षय खांडरे, मनसे शहर सरचिटणीस नीलेश सहाणे, मनसे कार्यालयीन अध्यक्ष मनोज कोकरे, प्रतीक गोवर्धने, सतीश गटकळ, स्वप्निल शिसोदिया, गौरव राजपूत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलताशांच्या गजरात निघाल्या रेड्यांच्या मिरवणुका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करीत विविध रंगांच्या छटा काढून सजविलेल्या रेड्यांच्या मिरवणुका पंचवटीतील दिंडोरीरोड परिसरात काढण्यात आल्या. दिवाळी पाडव्याला रेड्यांच्या मिरवणुका काढण्याची परंपरा वीरशैव लिंगायत गवळी समाजाने सुरू ठेवली आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात २२ रेडे सहभागी झाले होते. या मिरवणुकांनी पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, दिंडोरी रोड, निमाणी रोड आदी भाग ढोल ताशांचा गजराने आणि फटाक्यांच्या आतषबाजी दुमदुमून गेला.

श्रावणात ज्याप्रमाणे बैलाला पूजले जाते, त्याला सजविण्यात येते, त्याप्रमाणे रेड्याला दिवाळी-पाडव्याला पूजले जाते. दिवाळीच्या अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रेड्यांना स्वच्छ धुवून अंघोळ घालण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या रंगछटा काढण्यात आल्या होत्या. तसेच अंगावर विविध नावे, स्लोगन लिहिण्यात आली होती. त्यांच्या पायात पैंजण, गळ्यात साज घालून शिंगांना शेंदूर फासण्यात आला होता. अशा प्रकारे सजविलेल्या रेड्यांना सुवासिनींनी ओवाळून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. त्यानंतर गोठ्यांपासून ते दिंडोरी रोडवरील म्हसोबा महाराज मंदिरापर्यंत त्यांची ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या उत्साहात या मिरवणूका काढल्या. या मिरवणुकांमध्ये यंदा २२ रेड्यांचा समावेश होता. मिरवणुकीच्या मार्गात ठिकठिकाणी रेड्यांचे पूजन करण्यात येत होते. आमदार बाळासाहेब सानप, अनिल कोठुळे, सुनील कोठुळे, प्रकाश येवलेकर, अण्णासाहेब कोठुळे, चंद्रकांत कोठुळे, उल्हास धनवटे, महेश कल्याणकर, नाना शिंदे, काशिनाथ कोठुळे, शंकर धात्रक, अरुण चौघुले, वैभव डेअरी, गुरुकृपा डेअरी, गायत्री डेअरी आदी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा म़त्यू

$
0
0

निफाड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चेहडीजवळ फकिरा गणपत रुमने यांच्या वस्तीजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झाला. ही घटना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दशरथ रुमने यांनी येवला वन विभागाला कळवली. त्यानंतर नाशिकचे सहायक वन संरक्षक राजेंद्र कापसे, येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल जी. बी. वाघ, विंचूरचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भय्या शेख यांनी घटनेचा पंचनामा केला. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. सायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी धाव घेऊन हायवेवरील वाहतूक सुरळीत केली. मृत बिबट्या हा नर असून, तो चार ते पाच वर्षांचा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची ‘दिवाळी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सणात घरामध्ये आणून ठेवलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडले आहेत. चोरीच्या घटनांत नागरिकांनी लाखो रुपयांचा ऐवज गमावला आहे.

गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जेहान सर्कलजवळील एका घरातून चोरट्याने तब्बल १३ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. माला किशोर ठक्कर (वय ५१, रा. ३०२/अ रुषिराज, जेहान सर्कलजवळ, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्याने ठक्कर यांच्या घरातील लोखंडी कपाटातून ५०० रुपयांच्या २,३०० नोटा आणि दोन हजार रुपयांच्या १०० नोटा अशी १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याच पोलिस स्टेशनच्या हद्दीत आणखी एक चोरीची घटना घडली. लक्ष्मी गार्डन समोरील तेजोप्रभा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एकनाथ हरी माळी (वय ४९, रा. भालचंद्र अपार्टमेंट) यांच्या घरातून चोरट्याने एक लाखाहून अधिक किमतीचे दागिने चोरून नेले. गुरूवारी (दि. ८) सकाळी सहा ते नऊ या कालावधीत चोरट्याने सोन्याची पोत, सोन्याचे डोरले, दोन मोबाइल, २५०० रुपयांची रोकड असा एक लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तिसरी घटना म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. तानाजी नामदेव पेखळे (वय ५०, रा. स्वामी पार्क सोसायटी, स्नेहनगर, पंचवटी) यांनी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साडेअकरा ते गुरुवारी सकाळी साडेसहा या कालावधीत चोरट्याने पेखळे यांच्या घरातील बेडरूमची खिडकी उघडून लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली सोन्याची चेन, सोन्याचे पेंडल असा सुमारे चार तोळे सोन्याचा ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

राजीवनगर परिसरात तर चोरट्याने मंदिरातून देवीचा मुकुट आणि दागिने चोरून नेले आहेत. मानवेंद्र आर. रॉय (वय ७९, रा. लेखानगर) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ८) रात्री १० ते शुक्रवारी पहाटे पाच या कालावधीत कालीबेरी मंदिराच्या बंद दरवाजाचा कडी कोयंडा आणि कुलूप तोडून चोरट्याने देवीच्या मस्तकावरील मुकुट व गळ्यातील दागिने असा ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला.

नाशिकरोडला लाखाचे कपडे चोरले

नाशिकरोड येथील शास्त्रीपथ परिसरात बंद टपरीचे कुलूप तोडून चोरट्याने ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी (दि. ८) रोजी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी १० या कालावधीत चोरट्याने टपरीचे कुलूप तोडून लहान मुलींचे १०८ फ्रॉक, ७७ फॅन्सी ड्रेस, प्लास्टिचे ५८ पुतळे, दोन जम्बो बॅग, हातातील घड्याळ, कंबरेचे बेल्ट असा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद महेंद्र सुरेश आहिरे (वय ३८, रा. दुर्गा निवास जयभवानी रोड) यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनला दिली आहे.

बंद घरे हेरली

सुटी वा कामा निमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे हेरून चोरट्यांनी हाथ की सफाई केल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नागरिकांनी केलेल्या खरेदीवरच चोरट्यांनी ताव मारल्याचेही आढळून आले आहे. पुढील काही दिवस सुट्या असल्याने बाहेरगावी जाताना आपले घर आणि ऐवजाची आवश्यक खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे. पोलिस यंत्रणेलाही रात्रीची गस्त वाढवावी लागणार आहे.

इंदिरानगरला सोनसाखळ्या चोरल्या

इंदिरानगर : दिवाळीच्या सुटीचा फायदा घेवून इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांसह सोनसाखळी चोरांनी दिवाळीच साजरी केल्याचे दिसून आले आहे. येथील रथचक्र सोसायटीत भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मनीषा सतीश कोतकर या दुकान बंद करून रात्री दहा वाजेच्या सुमारास परबनगर येथील स्वामी समर्थ केंद्राकडून जात असताना २५ ते ३० वयोगटातील दोघे दुचाकीवरून समोरून आले. मागे बसलेल्या व्यक्‍तीने कोतकर यांच्या गळ्यातील सुमारे नव्वद हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. हा प्रकार घडण्यापूर्वी अर्धा तास आधी प्रशांतनगर येथील कोमल सुशांत साळवे यासुद्धा स्वामी समर्थ केंद्राकडून जात असताना गाडीवरून आलेल्या दोघांनी सुमारे ६० हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातून चार मोटरसायकली चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे शहरवासी दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यात मश्गूल असताना चोरट्यांनी चार मोटारसायकली चोरून दिवाळी साजरी केली आहे. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी जोरात असली तरी अनेकांचे दिवाळे निघाले आहे. मुंबई नाक्यासह सरकारवाडा, गंगापूर आणि अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

रविवार कारंजा येथील भिकुसा गल्ली या वर्दळीच्या परिसरातून चोरट्याने विजय रामजी चव्हाण (वय २१, रा. तारवालानगर) याची २० हजार रुपये किमतीची पॅशन मोटरसायकल चोरून नेली. दुसरी वाहन चोरीची घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. महात्मानगर येथील शामला अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्याने २० हजार रुपये किमतीची बजाज डिस्कव्हर चोरून नेल्याची फिर्याद अमोल पुंजाजी गवई (वय २८) यांनी दिली आहे. सिडकोतील मोरवाडी परिसरातील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलजवळून रतनलाल देवीदास कुऱ्हाडे (वय ३८) यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरट्याने चोरून नेली. तर मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुरुद्वारा रोड परिसरात चोरट्याने भैरवी विलास भगूरकर (वय २२, रा. सिल्व्हर हाइटस) यांची २० हजार रुपये किमतीची अॅक्सिस मोपेड चोरट्याने चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट फोन, सोशल मीडिया दिवाळीमय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर ही सध्या व्यक्त होण्यासाठी, शेअरिंगसाठी पसंतीची माध्यमे आहेत. या माध्यमांमुळे यंदाची दिवाळी नेटिझन्ससाठी स्पेशल ठरली. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेचे फोटो शेअर करण्यात आल्याने सोशल मीडिया दिवाळीमय झाले होते. यंदा ऐन दिवाळीतच व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स लाँच झाले. हे स्टिकर्स तर नेटिझन्सना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. हॅशटॅग दिवाळी वापरून अनेकांनी आपल्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला.

सोशल मीडियामुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे. दुसऱ्या देशातील व्यक्तीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासोबत सहजपणे दिवाळी साजरा करतात. काही जण गावी जातात, शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले दिवाळीनिमित्त एकत्र येत हा सण आनंदात साजरा करतात. नवनवीन कपडे, फटाके फोडण्याची धमाल, खुसखुशीत फराळाचा आनंद कुटुंबासमवेत लुटण्याची मजा या दिवसांमध्ये पुरेपूर लुटण्यात येते. पूर्वी एकत्र कुटुंबामुळे सर्वजण नेहमी सोबत असत. परंतु, आज नोकरी, शिक्षण, गावातून शहरात झालेले स्थलांतर अनेक कारणांमुळे कुटूंबातील व्यक्ती सोबत नसतात. त्यांना एकत्र आणण्याचे काम सणांद्वारे होते. दिवाळी हा सण तर त्यातील अतिशय महत्त्वाचा आहे. या सणाचा आनंद आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करून द्विगुणित करण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले. घराची सजावट, आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्यांचे फोटो शेअर करत दिवाळीचा आपल्या घरातील उत्साह सोशल मीडियावर शेअर केला. दिवस उजाडल्यापासून ते रात्रीपर्यंत आतषबाजी करण्यापर्यंतचे सगळ्या पोस्ट्स, फोटोस व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये नेटिझन्स अपडेट करताना दिसत आहेत. या स्टेटसला अन्य युझर्सकडून दाद मिळत असून, सोशल मीडियावरही दिवाळी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

\Bसेल्फीची क्रेझ कायम\B

सेल्फीचा आनंद एरवीही उत्साहाने लुटला जातो. त्यात सण, उत्सव असेल तर त्याची मजाच वेगळी असते. सेल्फी चांगले यावेत, म्हणून मोबइईल कंपन्यांनीही फ्रंट कॅमेरा चांगल्यात चांगला देण्यावर भर दिला आहे. दिवाळीच्या सणात सेल्फीची क्रेझ यंदाही कायम होती. घरातील सजावट, कुटुंबातील व्यक्तींसोबत काढलेले सेल्फी अनेकांनी शेअर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार-बस अपघातात पाच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर- शिर्डी मार्गावर खासगी प्रवासी बस आणि इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पांगरीलगतच्या देवपूर फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृत प्रवासी मुंबईचे रहिवासी असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मुंबई येथील मीरा रोड परिसरातील २८ भाविक वेगवेगळ्या वाहनांतून शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. शिर्डीहून सिन्नरकडे परतत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ या वाहनांपैकी एक असलेली इनोव्हा (एमएच ०४/जेबी ७०९०) कार आणि नाशिकहून शिर्डीकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसची देवपूर फाट्याजवळील भोकणी शिवारातील साईशोभा पेट्रोलपंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता, की त्यामध्ये इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. कारमधील सहापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नाशिकमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, पवनाज जोशी (वय १२), ऋषी वराळे (वय १३) यांचा वाटेतच मृत्यू झाला. पवनी जोशी (वय १०) गंभीर जखमी असून, तिच्यावर मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य तिघांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही वाहने भरधाव होती. चालकांना ही वाहने नियंत्रित करता न आल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांनी व्यक्त केला.

वाहतूक कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका

जखमींना सिन्नरमार्गे नाशिककडे आणण्यात येत होते. त्या वेळी शिंदे-पळसे मागार्वर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने वेळेत पोहोचण्यात अडथळे आल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवनीसाठी आज नाशिकमध्ये रॅली

$
0
0

नाशिक : अवनी वाघिणीला निर्दयपणे मारल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी शहरातील प्राणीप्रेमी रॅली काढणार आहेत. अवनीच्या पिलांचे पुनर्वसन करावे आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये रविवारी शरण फॉर अॅनिमल्स, गिव्ह आणि इको इको यांसारख्या स्वयंसेवी संस्थांनी शांततेत रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी चार वाजता कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटपासून या रॅलीला सुरुवात होईल. कॉलेजरोड मार्गे भोसला कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत ही रॅली येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

$
0
0

\Bपिकअप जाळून नुकसान\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पिकअप व्हॅन जाळल्याची फिर्याद एका तरुणाने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता पेठरोडवरील हमालवाडी मार्केटच्या मागील बाजूस हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. सागर रामदास येलमामे (वय २३, रा, हमालवाडी, पेठरोड) असे त्याचे नाव आहे. अर्जुन विठ्ठल धात्रक (वय ३४, रा. हमालवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचे पूर्ववैमनस्य आहे. या वैमनस्यातून पिकअप व्हॅन जाळून सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विनयभंगप्रकरणी एकास अटक

नाशिक : भांडणाची कुरापत काढून मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याची फिर्याद एका महिलेने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्रपाली झोपडपट्टीत हा प्रकार घडला. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. दत्ता लक्ष्मण हिरोडे (वय २४) असे त्याचे नाव आहे. संशयित फिर्यादीच्या घराजवळ आला. पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांच्या सासूला शिवीगाळ केली, तर दीर अनिल यास चाकू दाखवून तुझा आता मर्डर करतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

धारदार हत्यार बाळगणाऱ्यास अटक

नाशिक : लोखंडी पाते असलेली धारदार २७ इंच लांब तलवार बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. मालधक्का गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. सचिन विलास चौधरी (वय २८, रा. शिवमल्हार हौसिंग सोसायटी, चेहडी शिव) असे संशयिताचे नाव आहे. जनार्दन पंडीत गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. टाटा इंडिगो कारच्या डिक्कीमध्ये ही तलवार आढळून आली. पोलिस उपायुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जुगार प्रकरणी १० जणांना अटक

रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉस चौकाजवळ तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चौघांना, तर उपनगर येथे वैदुवाडीत जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नरेश डाया सुमरा (वय ५३) याच्यासह अन्य तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेडक्रॉस येथील बिल्डींग क्र. दोन जवळ बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथे छापा टाकून कारवाई केली. उपनगर येथे आगारटाकळी परिसरातील वैदुवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून संशयित दीपक बापू लोखंडे (वय २८) याच्यासह आठ जणांना अटक केली.

कैद्याचा मृत्यू

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कैद्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. राहुल तुळशीराम आहिरे (वय ३२, रा. मध्यवर्ती कारागृह, जेलरोड) असे त्याचे नाव आहे. आहिरे आजारी असल्याने त्याला कारागृहातील कर्मचारी नितीन रामचंद्र शेरताटे यांनी बुधवारी (दि.७) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. औषधोपचारादरम्यान गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

तरुणावर जीवघेणा हल्ला

बहिणीच्या घराकडे का गेले अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सिडकोतील शिवाजी चौक बसस्थानकाजवळ बुधवारी हा प्रकार घडला. राजेंद्र नामदेव आठवले (वय ३७, रा. इंदिरा गांधी वसाहत, जुने सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश दांडेकर (वय ३०), सुनील पुंडीराम काळे (वय २७, रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर), शरद जाधव, गणेश कुऱ्हाडे (वय २७), स्वप्नील सुभाष कळमकर (वय ३०, रा. आदर्श सोसायटी, सिडको) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी काळे, जाधव, कुऱ्हाडे आणि कळमकर यांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी चौक बसस्टॉप जवळ संशयित आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. या रागातून संशयितांनी त्यांना स्टीलच्या रॉडने, फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images