Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मालेगावातील बेशिस्तीला लगाम

$
0
0

२७ वाहनचालकांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प पोलिस ठाण्याच्या वतीने कॉलेज स्टॉप परिसरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी कॉलेज रोडवरील रोमियोंना यामुळे चाप बसला. शुक्रवारी एकूण २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून ५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती कॅम्प पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिली.

येथील पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार कॅम्प पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू केली आहे. शहरातील अन्य पोलिस ठाणे हद्दीत देखील अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कॅम्प परिसरातील कॉलेज रोडवर महाविद्यालयासह अनेक शाळा देखील आहेत. यामुळे नेहमीच येथे महाविद्यालयीन तरुण तरुणी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र अनेकवेळा वाहन चालकांकडून भरधाव वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, कर्णकर्कश्य हॉर्न वाजवणे, विनापरवाना वाहन चालवणे, बेल्ट न लावणे असे प्रकार घडतात. यास पायबंद घालण्यासाठी ही करावाइ सुरू करण्यात आली असून, पुढे देखील नियमितपणे कॉलेज स्टॉप परिसरात कारवाई सुरू राहणार आहे. यासह तरुणींची झेड काढणे, त्रास देणे यावर देखील पोलिसांनाचे लक्ष राहणार असून, अशा तरुणांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरपट्टीच्या जाचक नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पाठविलेल्या घरपट्टीच्या नोटिसा नागरिकांना मिळू लागल्या असून, त्यातील अनेक गंभीर प्रकार समोर येत आहेत. २०१६ मध्ये रहायला गेलेल्या नागरिकांना २०१२ पासून घरपट्टी आकारण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. दोन बीएचके फ्लॅट असलेल्या घरांना तब्बल ८० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र नाराजी आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील अनेक मिळकती या पालिकेच्या रडारवर नसल्याचे तसेच अनेक मिळकतींच्या वापरात परस्पर बदल झाल्याचे सांगत, शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आले. ६२ हजार मिळकतींचा वापर सुरू असला तरी मनपाच्या दफ्तरी त्याची कुठलीही नोंद नाही. त्यामुळे महापालिकेने या सर्व मालमत्तांना घरपट्टीच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारपासून या नोटिसा शहराच्या विविध भागात वितरीत केल्या जात आहेत. मात्र, हाती आलेल्या या नोटिसा पाहून रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ज्या इमारतींमध्ये नागरिक २०१६ मध्ये रहायला आले अशांना २०१२ पासून घरपट्टी आकारण्यात आली आहे. ८० हजारापासून ते सव्वा लाख रुपयांपर्यंतच्या या नोटिसांमुळे नाशिककर धास्तावले आहेत.

घरपट्टी आकारायची तर मनपाच्या घरपट्टी विभागाने त्या मालमत्तांची पाहणी करणे, मोजणी करणे आवश्यक आहे. तसे न करता घरपट्टी देणे अयोग्य आहे.

- मोहन रानडे, नगररचना तज्ज्ञ

आम्ही २०१६ मध्ये राहण्यास आलो. मग २०१२ पासून घरपट्टी का? तेव्हा तर इमारतीचे बांधकामही सुरू झाले नव्हते. महापालिकेने ही घरपट्टी मागे घ्यावी.

- विजय इंगळे, रहिवासी, कामटवाडे

आमच्या इमारतीला अद्याप बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. मग घरपट्टी कशी आकारण्यात आली? ८० ते ९० हजार रुपये एवढी भरमसाठ घरपट्टी भरणे सर्वसामान्यांना परवडणारे तरी आहे का?

- संगीता वाणी, रहिवासी, कामटवाडे

महापालिकेने अन्यायकारक आणि अवास्तव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात क्रेडाईच्यावतीने आम्ही अपिल दाखल करणार आहोत. महापालिकेने नाशिककरांचा योग्य विचार करावा

उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई

घरपट्टीच्या आकारणीबाबत अद्याप आमच्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रारी आल्यानंतर आम्ही त्याची दखल घेऊ

महेश डोईफोडे, उपायुक्त, मनपा

मालमत्ता सर्वेक्षणच वादग्रस्त

महापालिकेने ज्या मालमत्ता सर्वेक्षणाच्या आधारे या नोटिसा बजावल्या आहेत, तेच सर्वेक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. अयोग्य पद्धतीने, अप्रशिक्षित आणि पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणाचे परीक्षण मनपा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले नाही किंवा या सर्वेक्षणाच्या डाटा एंट्रीचीही फेरतपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्वेक्षणावरुन आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

त्यांनी आता काय करायचे?

ज्यांना अवास्तव घरपट्टीची नोटीस मिळाली आहे. त्यांनी सर्वप्रथम मनपाच्या कर आकारणी उपायुक्तांकडे लेखी तक्रार द्यायची आहे. या तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या हरकतीवर मनपाकडून सुनावणी घेण्यात येईल, त्यास उपस्थित रहावे लागेल. त्याचा जो निर्णय होईल तो अंतिम राहील. हा निर्णयही मंजूर नसेल तर संबंधित नागरिकांना कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, कोर्टात अपिल दाखल करण्यापूर्वी नोटीस बजावलेली घरपट्टी भरणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

जाचक घरपट्टीबाबत कळवा

मनपाच्या वतीने देण्यात येणाऱ्या घरपट्टीबाबत आपल्याला तक्रार असेल किंवा आक्षेप असेल तर आपण आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आपल्याला आलेली घरपट्टी आणि त्यासंबंधीची माहिती आपण nashik.letters@gmail.com या ई-मेलवर पाठवू शकता. त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आवर्जून नमूद करा. किंवा महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक - ५ या पत्त्यावरही आपण लेखी देऊ शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांना सकारात्मकतेचे धडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, यासाठी शुक्रवारी उद्योजकांना 'निमा'त सकारात्मकतेने पावले उचलण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एमएसएमई सपोर्ट उपक्रमांतर्गत नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) विकासास चालना मिळावी यासाठी एमएसएमई सपोर्ट प्रोग्राम जाहीर केला आहे. याअंतर्गत १२ योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी बँका व विविध संस्थांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कागदपत्रांच्या पूर्ततेबद्दल माहिती, बँक अधिकाऱ्यांशी समोरासमोर संवाद, कर्ज प्रस्तावाबद्दल इत्थंभूत माहिती आदींसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकांनी सकारात्मकतेने पावले उचलून कर्ज प्रक्रिया पूर्ण करीत आपल्या उद्योग-व्यवसायाची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.

जिल्ह्यातील अग्रणी बँक, तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये या शिबिरांत मार्गदर्शन करीत आहेत. शुक्रवारी झालेल्या या शिबिरात निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, निमाच्या औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब टाव्हरे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे, डीजीएफटीचे रवींद्रन एन. व्ही., युनियन बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर श्याम सातपुते उपस्थित होते. शिबिरात उद्योजक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक, आयडीबीआय बँक व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

पुढील शिबिर मंगळवारपासून

उद्योजकांना पुरेशी माहिती मिळावी यासाठी दि. २७ नोव्हेंबर ते ८ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात २१ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दर मंगळवारी व शुक्रवारी ही शिबिरे नियोजित असून, त्यातील १६ शिबिरे 'निमा'च्या सातपूर येथील सभागृहात होणार आहेत. याच सत्रातील पहिले शिबिर 'निमा'त झाले. यानंतरचे शिबिर दि. ४ ते ११ डिसेंबरदरम्यान सातपूर येथील निमा सभागृहात दुपारी १ ते ४ या वेळेत होणार आहे. त्यात स्टँडअप इंडिया- वूमेन व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ५९ मिनिटांत कर्ज आणि इतर विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ कामामुळे ८०० दूरध्वनी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोक स्तंभ ते मेहेर सिग्नल या स्मार्ट रस्त्याचे काम सुरू असताना, बीएसएनएलच्या १६०० केबल शुक्रवारी सकाळी तुटल्या. रस्ता खोदकाम सुरू असताना, भूमिगत केबल तुटल्याने परिसरातील ८०० दूरध्वनी संध्याकाळपर्यंत बंद होते. त्यामुळे परिसरातील व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला दिसून आला. बुधवारीदेखील स्मार्ट रोडचे काम सुरू असताना, बीएसएनएलच्या केबल तुटल्याने सुमारे १२०० फोन बंद झाले होते. या रस्त्याचे खोदकाम करताना सतत केबल तुटत असल्याने दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांना होणाऱ्या त्रासासोबत बीएसएनएलला नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करताना केबल तुटणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ जागांसाठी १६७ उमेदवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह हबँकेच्या निवडणुकीसाठी वैध उमेदवारी अर्जांची यादी शुक्रवारी बँकेच्या सातपूर येथील मध्यवर्ती बँकेत प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी तब्बल १६७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. माघारीनंतर अंतिम यादी दि. ५ डिसेबर रोजी जाहीर होणार असल्याने आता त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या यादीत महिला राखीव गटातील दोन जागांसाठी २२ अर्ज आणि अनुसूचित जाती-जमाती गटाच्या एका जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 'नामको'च्या सर्वधारण गट, महिला राखीव गट व अनुसूचित जाती-जमातील गटातील सर्व २१ जागांसाठी उमेदवारांची संख्या आता २०० झाली आहे. या निवडणुकीसाठी ३२८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात अनेकांनी दोन, तर काहींनी तीन अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, त्यामुळे त्याची संख्या ३२६ झाली होती. त्यातूनही ज्यांनी जास्त अर्ज भरले त्यांचा एकच अर्ज वैधत्रून इतर अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळे ही संख्या २०० झाली. नव्या यादीतील ज्या उमेदवारांना माघार घ्यायची असेल त्यांच्यासाठी १ ते ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. ५ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, त्यावेळीच चिन्हवाटप केले जाणार आहे.

--

माजी संचालकांची गर्दी

सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी अनेक माजी संचालकाचे अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची गर्दी झाली आहे. यात भास्करराव कोठावदे, कांतिलाल जैन, सुभाष नहार यांसारखे अनेक वेळा संचालक असलेले उमेदवार आहेत, तर दोन ते चार वेळा संचालकपद भूषविणारे अनेक उमेदवारही आहेत. त्यात सोहनलाल भंडारी, शिवलाल डागा, गजनान शेलार, वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने, प्रफुल्ल संचेती, ललित मोदी, हरिभाऊ लासुरे, अरुणकुमार मुनोत, प्रकाश दायमा आदींचा समावेश आहे. नंदलाल पारख व महेंद्र छोरिया हे माजी तज्ज्ञ संचालकही रिंगणात आहेत. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनीही या गटात अर्ज दाखल केला आहे.

--

दोन माजी संचालिकांचा समावेश

महिला गटात २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात शोभा छाजेड आणि रजनी जातेगावकर या दोन माजी संचालिकांचा समावेश आहे. इतर उमेदवार नवीन आहे, तर काहींना या निवडणुकीचा अनुभव आहे.

राखीव गटात नवखे

अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव गटाच्या एका जागेसाठी हरिभाऊ लासुरे सोडल्यास सर्व उमेदवार नवखे आहेत. त्यात सहकार खात्यात विविध पदांवरून निवृत्त झालेले मनोहर त्रिभुवन अनुभवी आणि सहकारातील तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबरच शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांचीही उमेदवारी या गटात आहे. एकूण ११ उमेदवार रिंगणात असले, तरी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या ५ कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराला कंटाळून अकरा कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले असून, सहा लोकांच्या भरवशावर स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

देशातील स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. यावेळी नाशिककरांची अनेक स्वप्ने पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, तो अल्पकाळ टिकला. स्मार्ट सिटी प्रोजेक्टअंर्तगत ज्या वेगाने कामे होणे अपेक्षित आहेत, तशी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटी योजनेत केंद्र सरकार १०० कोटी, राज्य सरकार ५० कोटी व महानगरपालिका ५०, असे २०० कोटी प्रतिवर्षी म्हणजे १ हजार कोटी पाच वर्षांत उभे करायचे आहेत. यातून आरोग्यसेवा, वाहतूक व्यवस्था, चांगले रस्ते अशा अनेक मुलभूत सेवा या माध्यमातून पुरवायच्या आहेत. मात्र, यासाठी पुरेसा कर्मचारी असणे आवश्यक आहे. नाशिक शहरात स्थापन केलेल्या कंपनीत एकूण ११ कर्मचारी होते. त्यातील प्रमोद रघुनाथ गुजर यांनी ९ महिने काम करून राजीनामा दिला. दुसरे कर्मचारी मनोहर किसन पोकळे यांनी ७ महिने काम करुन राजीनामा दिला, तिसऱ्या कर्मचारी अनिता दीपक घोरपडे यांनी एक महिना काम करून राजीनामा दिला. चौथे कर्मचारी अशोक विठोबा चिडे यांनी एक महिना काम करून राजीनामा दिला. पाचवे कर्मचारी प्रशांत सुभाष सूर्यवंशी यांनी ३ महिने काम करून राजीनामा दिला. एकूण अकरा कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचारी काम सोडून गेले आहेत. उरलेल्या सहापैकी दोन अधिकारी सरकारी सेवेतून आले आहेत.

चार कर्मचाऱ्यांवर धुरा

सध्या स्मार्ट सिटीच्या कामासाठी केवळ चार कर्मचारी काम करीत आहेत. या चार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर नाशिक स्मार्ट होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. नाशिक शहरात ही कंपनी स्थापन करताना महापौर रंजना भानसी, आयुक्त तुकाराम मुंढे, सीताराम कुंटे, भास्कर मुंढे, तुषार पगार, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, शाहु खैरे, गुरुमित बग्गा इत्यादींची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. सध्या संचालक नऊ आणि कर्मचारी चार अशी परिस्थिती आहे. निर्णय घेणारे जास्त आणि अंमलबजावणी करणारे कमी अशी परिस्थिती स्मार्ट सिटीच्या बाबतीत दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तांची विक्री अहवालाच्या आधारे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपली मालमत्ता विकण्याची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच बँकेने पिंपळगाव उगाव व सटाणा येथील बँकेच्या स्वमालकीच्या बखळ जागांची विक्री करण्याबाबत नाबार्डने तपासणी अहवालात घेतलेल्या मुद्याचा दाखला दिला आहे.

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४५ अन्वये सदर कायद्यातील कलम ९ मधील तरतुदीनुसार बँकेच्या अव्यावसायिक मालमत्ता बँकेस धारण करता येत नसल्यामुळे विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर जागा विकण्यासाठी सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक यांच्याकडून १३ डिसेंबर २०१७ रोजी परवानगी मिळाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ पर्यंत विक्री करण्यास मुदत दिली आहे. त्यामुळे जागाविक्रीची कार्यवाही जाहीर लिलावाने करण्यासाठी ८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला. त्यानंतर बँकेने कार्यवाही सुरू केली असून, बँकेच्या पिंपळगाव (बसवंत) जागेसाठी ८८ लाख, उगाव येथील जागेसाठी ९६ लाख आणि सटाणा येथील जागेसाठी एक कोटी ७३ लाख इतके बाजारमूल्य निश्चित करून सदर जागांचा जाहीर लिलाव दि. ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रधान कार्यालय, द्वारका सर्कल, नाशिक येथे बँकेच्या सभागृहात ठेवण्यात आला असल्याचे बँकेने म्हटले आहे.

खातेदारांत होती चर्चा

बँकेने मालमत्ता विक्रीचा निर्णय का घेतला, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. बँकेकडे या जागा पडून होत्या. त्यामुळे त्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी सांगत होते. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत सभासद आणि खातेदारांमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण पसरत होत असल्याने बँकेने तातडीने आपली बाजू मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वकांक्षा टिपेला नेणारे ‘डार्लिंग’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिशय महत्त्वाकांक्षेपोटी टोकाच्या भूमिकेत जाऊन काही व्यक्ती मार्गात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आपल्या आयुष्यातून दूर करतात आणि आपले इप्सित साधून घेतात अशा आशयाचे 'डार्लिंग' नाटक शुक्रवारी सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा प. सा. नाट्यगृहात सुरू आहे.

सुबोध हा मोठा इंडस्ट्रियलिस्ट, पिढीजात बिझनसमेन तो रागिणी नावाच्या एका सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि वयाच्या अंतराचा विचार न करता तिच्याशी लग्न करतो. रागिणीचे लग्नापूर्वी एका तरुणाशी संबंध असतात; परंतु त्याच्याकडे पैसा नाही म्हणून ती त्याला काही कारणाने एका गुन्ह्यात अडकवते. तो जेलमध्ये गेल्यावर ती सुबोधशी लग्न करते. सुबोधच्या बिझनेस गिळंकृत करून सुबोधला देशोधडीला लावायचे स्वप्न ती रंगवत असते. परंतु, तेथे नेमका तिचा पूर्वायुष्यातील प्रियकर राज तेथे येतो. रागिणी पुन्हा एकदा त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि सुबोधला मारण्याचा कट करते. मात्र, सुबोध ऐनवेळी राजला समजावून सांगतो आणि खुनापासून त्याला परावृत्त करतो. रागिणीचा प्लॅन उघड झाल्यावर ती चिडते; परंतु सुबोध व राज आधीच घर सोडून गेलेले असतात. हाच तर रागिणीचा खरा प्लॅन असतो. कारण ती तिसऱ्याच एका व्यक्तीच्या संबंधात असते. ते दोघे मिळून हे नाट्य घडवून आणत असतात, असे उलगडा शेवटी होतो, अशा आशयाचे हे नाटक होते.

नाटक शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने प्रस्तुत करण्यात आले. लेखन विजय साळवी यांचे तर दिग्दर्शन व नेपथ्य विक्रम गवांदे यांचे होते. निर्मिती प्रमुख राजश्री गोरे, संगीत संदीप महाजन, प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अंकिता मुसळे, केतकी कुलकर्णी यांची होती. नाटकात पल्लवी ओढेकर, आशिष गायकवाड, समीर मोगल, श्रीराम गोरे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

एक होता बाबूकाका

आर. एम. ग्रुप

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सकाळी ११ वाजता

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहवेदीवर चढण्यापूर्वी एचआयव्ही तपासणी

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : विवाहवेदीवर चढण्यापूर्वी उपवर-वधूची एचआयव्ही तपासणी ही अत्यावश्यक बाब असली, तरी अजूनही अनेक घटकांकडून त्याबाबत गांभीर्य दाखविले जात नाही. अशा नवदाम्पत्यांना खऱ्या अर्थाने वैवाहिक सौख्य लाभावे अन् त्यांची संसारवेल बहरावी यासाठी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या तरुण-तरुणींची एचआयव्ही तपासणी करवून घ्यावी, असा ठराव एकमुखाने मंजूर करीत १० ग्रामपंचायतींनी अन्य जिल्हावासियांसमोर आदर्श घालून दिला आहे. इतकेच नव्हे तर या ठरावाच्या अंमलबजावणीबाबतही या ग्रामपंचायती आग्रही आहेत.

'जहाँ विश्वास भरा नाता, वहा एड्स नही आता', 'एडस कळे संकट टळे' यांसारख्या घोषवाक्यांद्वारे गेली अनेक वर्षे एचआयव्ही संसर्ग आणि एड्सबाबत जनजागृती सुरू आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमधून एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थादेखील एचआयव्ही तपासणीबाबत आग्रही असतात. विशेषत: विवाहापूर्वी उपवर-वधूने एचआयव्हीची तपासणी करवून घ्यावी, असे आवाहन सातत्याने केले जाते. सुशिक्षित वर्ग या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसाद देऊ लागला आहे. परंतु, अजूनही मोठा वर्ग या तपासणीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने 'माहितीयुक्त गाव' अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये एचआयव्ही संसर्गाची कारणे, त्यापासून बचावासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत समुपदेशकांमार्फत माहिती दिली जात आहे. विवाहापूर्वी तरुण-तरुणींनी एचआयव्ही तपासणी करवून घेण्याचे आवाहन ग्रामीण रहिवाशांना केले जाते.

या ग्रामपंचायतींचा समावेश

जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींनी विवाहापूर्वी एचआयव्ही तपासणीचा ठराव एकमुखाने संमत केला आहे. त्यामध्ये पिंपळगाव बसवंत, ओझर, सायखेडा, पिंपळस रामाचे, कोठुरे या निफाड तालुक्यातील गावांसह दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, तीसगाव, बागलाण तालुक्यातील ताहाराबाद, चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव आणि कळवण तालुक्यातील ओतूर या गावांचा समावेश आहे. विवाहापूर्वी एचआयव्ही तपासणी करवून घेणे हितावह असल्याने तालुक्यातील जवळच्या सरकारी रुग्णालयांमध्ये तरुण-तरुणींनी ही तपासणी करवून घ्यावी असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. केवळ ठराव करून न थांबता गावात विवाह जमत असल्याची सुवार्ता कानी पडली की संबंधित उपवर-वधूंना एचआयव्ही तपासणीचा सल्लाही दिला जाऊ लागल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण पथकातील सूत्रांनी दिली आहे.

गावाला भेदभावमुक्त करण्याचा संकल्प

केवळ विवाहापूर्वी एचआयव्ही तपासणीचा ठराव करून या ग्रामपंचायती थांबलेल्या नाहीत. तर गावात एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यास ती व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाला समाजाकडून हीन स्वरुपाची वागणूक दिली जाण्याची शक्यता अधिक असते. असे कुटूंब उपेक्षेचे धनी ठरते. संबंधित व्यक्तींना ग्रामस्थांकडून सापत्न, भेदभावयुक्त वागणूक दिली जाऊ नये अशा आशयाचा ठरावही ग्रामपंचायतींनी एकमुखाने मंजूर केला आहे.

वर किंवा वधूपैकी कुणा एकालाही एचआयव्हीची लागण झाली असली तरी त्यामुळे त्या दोघांचे नव्हे तर दोन्ही कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठीच विवाहापूर्वी एचआयव्ही तपासणी व्हायला हवी. खरेतर आरोग्याबाबत प्रत्येकाने सजग राहून ही तपासणी करून घ्यायला हवी. परंतु, तसे होत नसल्याने आमच्या ग्रामपंचायतीने हा ठराव केला.

- आशिष मोगल, सरपंच, कोठुरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर, नाशिककरांना हुडहुडी!

$
0
0

तापमानाचा पारा ९ अंशांपर्यंत घसरणार

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, चालू हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी नाशिकमध्ये झाली. किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नगरमध्ये झाली. गारठा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शुध्द हवा आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिक प्रचलित आहे. हिवाळा सुरू झाला असला तरी नाशिककर सातत्याने तापमानात चढ उतार अनुभवत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी १६.८ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान गेल्या आठ दिवसांत तब्बल सहा अंशांनी खाली उतरत १०.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. नाशिकमधील हे चालू वर्षातील सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यात ९.८ अंश सेल्सियस ऐवढे नीचांकी किमान तापमान नोंदविण्यात आले. त्या खालोखाल नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात १०.८ अंश सेल्सिअस ऐवढे तापमान नोंदविले गेले. ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत तापमानाचा पारा अधिक घसरत जाऊन ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरूवात झाली असून, उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली जाऊ लागली आहे.

....

कमाल तापमान

नगर : ९.८ अंश

नाशिक : १०.८ अंश

औरंगाबाद : १०.८ अंश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘त्या’ ४२ जणांना वंदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मराठा क्रांती मोर्चाच्या लढ्याने ऐतिहासिक असा आरक्षणाचा लढा विजयी केला, हा लढा लढत असताना ४२ तरुणांनी आपला जीव गमावलेला आहेत. म्हणून आरक्षण मिळण्याचा मराठा समाजाला दिलासा मिळाला असला, तरी नाशिक सकल मराठा समाजाने कोणताही आनंदोत्सव साजरा न करता रामकुंड याठिकाणी ४२ तरुण समाज बांधवांना सर्व हुतात्म्यांना दिवे लावून स्मरण करून आरक्षणाच्या विजयाची श्रद्धांजली अर्पण केली.

कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज मतभेद बाजूला करून एक मराठा, लाख मराठा हे घोषवाक्य घेऊन लाखोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक तसेच वृद्धही रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरून ऐतिहासिक मोर्चे काढले. जस-जसे मोर्चे पुढे गेले तस-तसे आंदोलन वेगवेगळ्या वळणावर गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक तरुण आंदोलनाच्या आगीत ओढल्या गेले. १५ हजार आंदोलनकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ४२ तरुणांनी आपला जीव गमावला याला तत्कालीन परिस्थिती आणि सरकारची भूमिका निमित्त ठरली. म्हणून आरक्षण निर्णय स्वागतार्ह असला तरी अनेक बांधव गमावलेले आहेत. या सर्वांच स्मरण करून अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी राज्य समन्वयक शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, सचिन पवार, विलास जाधव, उमेश शिंदे, नीलेश मोरे ,चेतन शेलार, सोमनाथ जाधव, शिवाजी मोरे, विजय खरजुल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

$
0
0

नाशिक : २०१९ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत संभाव्य प्रश्नांवर आणि चालू घडामोडींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युनिक अॅकॅडमीतर्फे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात हॉलमध्ये शनिवारी (१ डिसेंबर) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. देवा जाधवर हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर मार्गदर्शन करणार असून, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येणार आहे. अकॅडमीचे संचालक मल्हार पाटील यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरूणा ढेरे यांचा सत्कार

$
0
0

नाशिक : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि 'शब्दमल्हार' प्रकाशनाच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री मधु मंगेश कर्णिक भूषविणार आहेत. रविवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि 'शब्दमल्हार' च्या वतीने देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीए’वर ड्रोनच्या घिरट्या

$
0
0

पोलिसांसह प्रशासनाची भंबेरी; महात्मानगरच्या दिशेला धावपळ

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए) या संवदेनशील इमारतीच्या व परिसरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका संशयास्पद ड्रोनने तब्बल पाच मिनिटे घिरट्या घातल्या. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच धावपळ उडाली. पोलिसांनी लागलीच त्या ड्रोनचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे त्यांच्या हाती लागले नाहीत.

राज्यातील महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या 'एमपीए'वर सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी हे ड्रोन पाहण्यास मिळाले. 'एमपीए'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच मिनिटे हे ड्रोन 'एमपीए' परिसरात घिरट्या घालत होते. यानंतर संशयास्पद ड्रोन महात्मानगरच्या दिशेने गेले. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी महात्मानगरच्या दिशेने धाव घेतली. वेगवेगळ्या पथकाने महात्मानगरसह सर्वच परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत ड्रोनचे कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही. पोलिसांनी शहरात ज्या व्यक्ती ड्रोनचा वापर करतात त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केली.

रेकी की चुकीने कृती?

१०० एकर जागेत असलेल्या 'एमपीए'मध्ये ८०० प्रशिक्षणार्थी व पोलिस अधिकारी नेहमीच प्रशिक्षण घेण्याच्या कामात व्यस्त असतात. सुरक्षेच्या दृष्टीने 'एमपीए' संवेदनशील ठरते. २०११ च्या सुमारास बिलाल शेख या संशयित दहशतवाद्याने 'एमपीए'ची रेकी केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. सातपूरमध्ये अटक केलेल्या बिलालकडे स्फोटके व एमपीएसह शहरातील काही संवदेनशील ठिकाणांचे फोटोग्राफ्स मिळाले होते. यानंतर 'एमपीए'च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र, आजच्या घटनेने 'एमपीए'च्या सुरक्षेबाबत नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अनेक फोटोग्राफर्स तसेच हौशी व्यक्ती ड्रोनचा वापर करतात. त्यापैकी कोणी हे कृत्य केले का याचा शोध पोलिस घेत आहे. मात्र, ड्रोनचा वापरकर्ता सापडल्याशिवाय यावर प्रकाश पडू शकणार नाही.

'एमपीए'चे पोलिसांना पत्र

'एमपीए'मध्ये शुक्रवारी सकाळी खात्यातंर्गत पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा होणार होती. त्यामुळे 'एमपीए'मध्ये मोठी गजबज होती. त्यामुळे या ड्रोनवर कोणाची तरी नजर पडली. या घटनेची गंभीर दखल घेत 'एमपीए' व्यवस्थापनाने शहर पोलिसांना सुरक्षेबाबत पत्र दिले आहे. यात आजच्या घटनेची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. आज झालेला प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी काय उपाययोजना राबविण्यात याव्यात यावर वरिष्ठ पातळीवर खल सुरू झाला आहे.

ड्रोन वापराच्या नियमांकडे दुर्लक्ष

ड्रोन्स खरेदीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. अगदी ऑनलाइन सुद्धा ते खरेदी करता येतात. ड्रोन्समधील कॅमेऱ्यांच्या मदतीने होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोग्राफीला मागणी असल्याने ड्रोन्सचा बाजारही तेजीत आला आहे. मात्र, ड्रोन्स हवेत उडविण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावीच लागते. आज झालेल्या घटनेत अशी कोणतीही परवानगी गंगापूर पोलिस, 'एमपीए' किंवा पोलिस आयुक्तालय यांच्याकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे ड्रोन 'एमपीए' येथे दिसून येताच पोलिसांनी कार्यवाही सुरू केली.

सदर घटनेचा तपास शहर पोलिसांसह राज्य अन्वेषण विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांच्या पथकांनी 'एमपीए'च्या आजुबाजुला तपास केला. मात्र, ड्रोनचा पत्ता मिळाला नाही. 'एमपीए'बाबत हा प्रकार पुन्हा घडणार नाही, याबाबत काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाच्या ९ डिसेंबरच्यापरीक्षा १६ डिसेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शुक्रवारी (दि.९) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १६ डिसेंबर रोजी या परीक्षा होणार आहेत. धुळे महापालिकेच्या निवडणुकीमुळे हा बदल करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ च्या सत्रातील लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. ९ डिसेंबर २०१८ रोजी विविध विद्याशाखांच्या विविध विषयांच्या लेखी परीक्षा आहेत. ९ डिसेंबर रोजी धुळे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आयोजित केली असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावे, विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून या परीक्षा आता रविवारी १६ डिसेंबर रोजी मूळ वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेवर व ज्या-त्या परीक्षा केंद्रावर आयोजित पूर्व नियोजित वेळेनुसार व सत्रानुसार होणार आहेत, तशी माहिती संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात आली. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक भ. प्र. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीए बटालियन’मध्ये १६ पासून सैन्य भरती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लष्कराची प्रमुख छावणी असलेल्या देवळाली कॅम्प भागातील टेरिटोरियल आर्मी (टीए)च्या ११६ इन्फ्रट्री बटालियनमध्ये ७४ सोल्जर व १० ट्रेडमनच्या पदांसाठी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मेजर आकाशदीप सिंग यांनी ही माहिती दिली.

येथील धोंडीरोडवरील टीए पॅराच्या मैदानावर होणाऱ्या भरतीप्रक्रियेत आठ राज्यांसह तीन केंद्रशासित प्रदेशांतील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील. दि. १६ रोजी महाराष्ट्राबाहेरील झोन ४ मधील उमेदवार, दि. १७ रोजी नाशिक वगळता महाराष्ट्र, तर दि. १८ रोजी केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना सहभागी होता येईल. दिलेल्या तारखेनुसार संबंधित भागातील उमेदवारांसाठी देवळालीच्या आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे सकाळी ६ वाजता प्रक्रिया सुरू होईल. या भरतीप्रक्रियेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथील उमेदवारांना सहभागी होता येईल. सोल्जर व ट्रेडमन पदासाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे असून, सामान्य सोल्जरसाठी किमान दहावी उत्तीर्ण, ४५ टक्के सरासरी गुण, तर क्लार्क पदासाठी बारावी किंवा दहावीमध्ये इंग्रजी, गणित, अकाउंट, बुककीपिंग विषयांमध्ये सरासरी ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. पदवीधर उमेदवारांनादेखील वरील निकष व टायपिंग टेस्ट आवश्यक आहे. हाऊसकीपर (आठवी) वगळता स्वयंपाकी, हेअर ड्रेसर, धोबी या पदांसाठी दहावीसह संबंधित कामामध्ये प्रावीण्य असले पाहिजे. निर्धारित शारीरिक पात्रताही अनिवार्य असून, इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे व २० पासपोर्ट फोटो सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय ठेवीदारांसाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय फसवणूक प्रकरणी माहिती देण्यासाठी हजारो ठेवीदारांची रोज गर्दी होत आहे. त्यातच अर्ज मिळवण्यापासूनच ठेवीदारांची वणवण होत असल्याने हा अर्ज व त्यासंबंधी माहिती ऑनलाइन देण्याबाबत 'मटा'ने पाठपुरावा केला. त्यानुसार शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा अर्ज https://nashikpolice.com या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यामुळे ठेवीदारांना घरबसल्या फॉर्म मिळणार असून, अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह तो सादर करता येईल.

गंगापूर रोडवरील पोलिस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १७ येथे ठेवीदारांकडून हे अर्ज तपासून स्वीकारण्याचे काम सुरू आहे. मैत्रेय गुन्ह्यातील मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॅटर्सस अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रियल्टर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक असलेले ठेवीदार येथे अर्ज सादर करू शकतात. मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपनीचे अर्ज ग्रामीण पोलिस दलाच्या आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा ठेवीदारांना जमा करायचे आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य पातळीवर सुरू असून, ठेवीदारांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे व जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना काही महिन्यांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ठेवीदारांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू होताच वरील दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तान्त 'मटा'ने प्रसिद्ध केला. ठेवीदारांची गर्दी लक्षात घेता विहित अर्ज ऑनलाइन असावा, यासाठी 'मटा'ने पाठपुरावा केला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तातडीने याबाबत विचारविनिमय करून तो अर्ज नाशिक पोलिसांच्या https://nashikpolice.com या वेबसाइटवर टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा अर्ज आता या वेबसाइटवर डाव्या बाजूला दिसतो आहे. हा अर्ज भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून ठेवीदार घरूनच तयारीत येऊ शकतात. यामुळे ठेवीदारांचा वेळ वाचेल, शिवाय पोलिसांवरील ताणही कमी होऊ शकतो. आजमितीस अर्ज स्वीकारण्यासाठी चार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अनेक एजंट आपल्याकडील ठेवीदारांचे अर्ज संकलित करून थेट जमा करीत आहे. शनिवारी दिवसभरात जवळपास १००० ते १२०० अर्ज दाखल करून घेण्यात आले. आजसुद्धा ठेवीदारांची मोठी गर्दी पोलिस मुख्यालयाच्या आवारात उसळलेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसलेला प्रयोग म्हणजे ‘एक होता बांबुकाका’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यक्ती या जीवनाला घाबरत नाहीत, तर मरणाला घाबरतात. त्या पैकी एक असलेला बांबुकाका हा मरणावर प्रेम करणारा असतो विनोदी अंगाने प्रेमाला जवळ करणारा बांबुकाका कसा आहे हे 'एक होता बांबुकाका' या नाटकातून दाखवण्यात आले. मात्र, तांत्रिक अंगाचा आभाव, शासनाकडून स्टेज मिळते म्हणून नाचून घ्यायचे त्यातला प्रकार व कोणतीही तयारी नसताना सादर केलेला प्रयोग असे या नाटकाबद्दल म्हणता येईल. तांत्रिक अंगासाठी तीन-तीन लोक कार्यरत असताना लेव्हलला मास्किंग लावणे जमू नये, ही या नाटकाची शोकांतिका ठरली.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू आहे. आर.एम ग्रुपच्या वतीने हे नाटक गुरूवारी सकाळी सादर करण्यात आले. 'टवाळा आवडे विनोद' असे कायम म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षात राज्यनाट्य स्पर्धेत विनोदी नाटक सादर झालेच नव्हते त्याची सर 'एक होता बांबुकाका' या नाटकाने भरुन काढली. 'एक होता बांबुकाका' हे नाटक पूर्णपणे विनोदी असून, नाटकाचे कथानक हे बांबुकाका नामक एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या विविध घटनांचे पैलू उलगडणारे आहे. आपल्या अवतीभवती जगण्यावर प्रेम करणारी अनेक माणसे असतात. पण मरणावर प्रेम करणारी मोजकीच असतात. त्यातलाच एक म्हणजे, हा बांबुकाका!

या नाटकाचे लेखन राजेंद्र पोळ यांनी केले. दिग्दर्शन आणि नेपथ्य विक्रम गवांदे यांचे होते. नेपथ्य सहाय्य मोहन ठाकरे, दिपक लोखंडे, पार्श्वसंगीत संदीप महाजन, प्रकाश योजना रवी रहाणे यांनी केली. रंगभूषा-स्वराली गर्गे, केशभूषा-अपूर्वा देशपांडे, वेषभूषा केतकी कुलकर्णी, अंकिता मुसळे, दिपीका मारु यांची होती. या नाटकाची निर्मिती प्रकाश साळवे व धृवकुमार तेजाळे यांची होती. रंगमंच सहाय्य मनोज खैरनार, संतोष झेंडे, जितू चव्हाण व सुनील तांबे यांचे होते. सौदामिनी- स्वराली गर्गे, रामा हेलपटवार- राहुल साबळे, बांबुकाका- रोहीत भारती, गांवकरी- केतकी कुलकर्णी, संपदा कानवडे, रेश्मा गवळी, अपूर्वा देशपांडे, आश्विनी काकडे, शशी भरत, मोहीत कुलकर्णी, अमेय कुलकर्णी, प्रतीक डबीर, जयप्रकाश पुरोहीत, मयुर जावळे, आर्चित बाविस्कर यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लस-तीन फास्ट

$
0
0

खंडेराव टेकडीवर

यात्रोत्सवाची तयारी

देवळाली कॅम्प : देवळालीतील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव होणार आहे. टेकडीवरील मंदिराची रंगरंगोटी सिरू असून, गाभारा, खंडेराव महाराज, म्हाळसा-बाणाईच्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. उत्तम पाटील अनेक वर्षांपासून सेवाभाव जपत रंगकाम करीत आहेत. मंदिराचे विश्वस्त आमले परिवाराच्या वतीने यात्रेच्या दिवशी सकाळी विश्वस्तांच्या हस्ते पूजाअभिषेक झाल्यानंतर भगूर येथून आमले यांच्या निवास्थानापासून पालखीची मिरवणूक काढण्यात येते. त्या नंतर मंदिरात महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.

उपनगरमध्ये गुटखा जप्त

जेलरोड : उपनगर पोलिसांनी २३ लाख ६५ हजारांचा गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. आयशर ट्रकमधून (जीजे २७/व्ही ८०२८) ५० पोत्यांमधून विमल नावाचा हा गुटखा गुजरातहून पुण्याकडे नेला जात होता. तो पुण्याला कोणाच्या ताब्यात देण्यात येणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. या कारवाईने गुटखा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. ट्रकचालक संतोष परमानंद यादव (वय २५, रा. ओधव सर्कल सोन्याची चाळ, अहमदाबाद) याची चौकशी केली असता ट्रकमध्ये केशरयुक्त विमल पानमसाल्याची १९,८०० पाकिटे, व्ही-१ तंबाखूची १०,२०० पाकिटे असा एकूण २३ लाख ६५ हजारांचा गुटखा जप्त केला.

करवसुली बारगळली

नाशिकरोड : राखेची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांच्या तीव्र विरोधामुळे विशेष स्वच्छता कर आकारणी मोहीम गुंडाळण्याची नामुष्की एकलहरे ग्रामपंचायत प्रशासनावर शनिवारी आली. राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून ग्रामपंचायत कर अधिनियमानुसार विशेष स्वच्छता कर आकारण्याचे नियोजन एकलहरे ग्रामपंचायतीने केले होते. स्थानिक राख व्यावसायिकांचा कर आकारणीस झालेला विरोध आणि पोलिसांनी बंदोबस्त देण्यास दिलेला नकार या कारणांनी ग्रामपंचायतीचे कर आकारणीचे मनसुबे पहिल्याच दिवशी उधळले. आता ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरावर ढगाळ वातावरणाचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. किमान तापमानातही मोठी घसरण होत असून थंडी, गारठ्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाचे सावट निर्माण झाल्याने थंडीत अजूनच वाढ झाली असून, शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे.

शहरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी या ऋतुतील १०.८ किमान तापमानाची नोंद झाली. १ डिसेंबरला कमाल तापमान २६.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस इतके होते. २८ नोव्हेंबर रोजी कमाल तापमान २९.८ तर किमान तापमान ११.६ इतके होते. या तापमानांमध्ये अल्प फरक असला तरी शनिवारी दिवसभर शहरावर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीमध्ये वाढ झाली होती. एरवी पहाटे व रात्री येणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव शहरवासीयांना दिवसभर येत होता. ढगाळ वातावरणामुळे पचनशक्ती कमी होत असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images