Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पेट्रोलपंपावर टोळक्याचा धुडगूस

$
0
0

द्वारकेवर रांग मोडून पेट्रोल भरण्यास नकार दिल्यामुळे मारहाण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रांगेत न आलेल्या दुचाकीस्वारास पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यास टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना द्वारका येथील बेला पेट्रोलपंपावर शनिवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मारहाणीच्या प्रकरणात कर्मचाऱ्याचे १२ हजार रुपये गहाळ झाले.

महेश आनंद गुजरे (रा. येवलेकर चाळ, पंचवटी कारंजा) असे टोळक्याच्या हल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. महेश गुजरे आणि सहकारी महेंद्र हे कामगार द्वारका पोलिस चौकीमागील बेला पेट्रोलपंपावर आपली सेवा बजावत असताना ही घटना घडली. गुजरे आपल्या पंपावर एका बाजूने ऑटोरिक्षा, तर दुसऱ्या बाजून मोटारसायकलमध्ये रांगेने पेट्रोल भरत असताना हा वाद झाला. पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने गुजरे यांच्याकडे प्रथम पेट्रोल भरण्याचा आग्रह धरला. मात्र गुजरे यांनी त्यास रांगेने पेट्रोल भरले जात असल्याचे सुनावल्याने मारहाणीचा प्रकार घडला. संतप्त झालेल्या दुचाकीस्वार युवकाने आपण माजीद पठाण यांचा भाचा असल्याचे सांगून कामगारास शिवीगाळ केली. यावेळी त्याने आपल्या मोबाइलवरून संपर्क साधत अन्य सात ते आठ साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर या टोळक्याने गुजरे याच्यासह महेंद्र यास बेदम मारहाण केली. या घटनेत फायटर आणि पंपावरील फायर फायटरचा वापर करण्यात आल्याने गुजरे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी कामगारांच्या हातातील बारा हजारांची रोकड पडून गहाळ झाली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सतीश घोटेकर करीत आहेत. या टोळक्याच्या कृत्यामुळे द्वारका परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभाकर कुलकर्णी यांची गुरुवारी श्रद्धांजली सभा

$
0
0

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलचे माजी प्राचार्य आणि स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर बळवंत कुलकर्णी (वय ९१) यांचे गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजता डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट अँड कॉम्प्युटर स्टडीज् कॉलेजच्या सभागृहात श्रद्धांजली सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक संघाचे संघचालक विजय कदम आणि संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य प्रकाश पाठक उपस्थित असणार आहेत. श्रद्धांजली सभेस संस्थेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटँकर्सची शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या दाहकतेबरोबरच टँकरची मागणीदेखील वाढू लागली आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सने शंभरी गाठली असून, अजूनही काही गावांकडून टँकर्सची मागणी नोंदविणे सुरूच आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने बहुतांश तालुक्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, ग्रामपंचायतींनी त्यावर टँकरच्या मागणीचा पर्याय अवलंबला आहे. जिल्ह्यात ३७६ गावे आणि वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २८ टँकर सिन्नर तालुक्यातील ११ गावे आणि १४३ वाड्यांमध्ये धावत आहेत. याखेरीज येवल्यात ६२ गावांमध्ये २४ टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मालेगावात ८१ गावे-वाड्यांना २२ टँकर्सद्वारे, तर बागलाणमध्ये २० गावांना १५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नांदगावमध्ये ४४ गावे-वाड्यांत सात टँकर्सद्वारे, तर देवळ्यात १३ गावांमध्ये चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याखेरीज गावे आणि टँकर्ससाठी विहिरी अधिग्रहीत करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत २६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदगावमध्ये सर्वाधिक १४, मालेगावात ११ तर येवल्यामध्ये एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.


- ३७६ गावे आणि वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

- २६ विहिरी अधिग्रहीत

- येवला, सिन्नर, मालेगाव, देवळा, नांदगावात मागणी अधिक

- टँकर मागणीत दिवसागणिक वाढ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा सदस्यांची टॉयलेट एक ‘व्यथा’!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : [

बागलाण तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचासह १२ विद्यमान सदस्यांना शौचालयाच्या वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न करणे भलतेच महागात पडले आहे. निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत व त्यानंतरही विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ नुसार या सदस्यांना अपात्र ठरविले असून, या सदस्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे 'जहाँ सोच वहा शौचालय' या स्लोगनसह स्वच्छ भारत अभियानाचा आग्रह धरणाऱ्या सत्ताधारी भाजपचेच हे लोकप्रतिनिधी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उघड्यावर शौचास बसल्याने रोगराई पसरते. पर्यावरणाचीदेखील हानी होते. म्हणूनच अनेक वर्षांपासून खेड्यापाड्यांत शौचालय वापराचा आग्रह सरकारी यंत्रणेकडून धरला जात आहे. 'घर की इज्जत बाहर न जाए शौंचालय घर में ही बनवाए' यांसारखी घोषवाक्ये असोत, गुडमॉर्निंग पथक असो किंवा अगदी 'टॉयलेट एक प्रेमकथा'सारखा चित्रपट असो, अशा विविध माध्यमांतून गावे आणि शहरे हागणदारीमुक्त करण्याचा आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान सफल करण्याचा प्रयत्न विविध स्तरावर होतो आहे. निवडणूक आयोगानेदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. लखमापूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २१ एप्रिल २०१५ रोजी जाहीर झाला. त्यानंतर ९० दिवसांच्या आत ग्रामपंचायत सदस्य रमेश केदा बच्छाव यांच्यासह १२ सदस्यांनी शौचालयाच्या वापराबाबतचे प्रमाणपत्र व ग्रामसभेचा ठराव दाखल करणे आवश्यक असतानाही तो केला नसल्याचा आक्षेप नोंदवत रहिवासी सागर पोपट दळवी यांनी विवाद अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल केला होता. निवडणुकीच्या आधीपासून आम्ही शौचालयाचा वापर करतो, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी आपली बाजू मांडताना दिली असली तरी नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र आणि ग्रामसभेच्या ठरावाची प्रत सादर न केल्याने दळवी यांचा विवाद अर्ज अप्पर जिल्हाधिकारी राऊत यांनी मान्य केला आहे.

हे ठरले अपात्र

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (ज. ५) नुसार एकूण १७ सदस्यांपैकी सरपंच किरण कांदळकर यांच्यासह रमेश बच्छाव, मालती बच्छाव, शक्ती दळवी, आशा बच्छाव, कमल धामणे, पुष्पा देवरे, मनोहर अहिरे, इंदूबाई माळी, दादाजी पिंपळसे, विमल बच्छाव, किरण बच्छाव यांना उर्वरित कार्यकाळासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकीत सापडली २३ लाखांची रोकड

$
0
0

मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान गावाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. ३) तब्बल २३ लाखांची रोकड पकडली. या प्रकरणी मुंबई व इंदूर येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या धुळे महानगरपालिकेची निवडणूक सुरू असताना शहरालगत घडलेल्या या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि निवडणुकीत पैसा वाटण्यासाठी आला असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान येथे इंदूरहून मुंबईकडे जाणारी चारचाकी कार (एमपी ०९ सीआर ६०९९) ला अडवित कारची तपासणी केली असता त्यात सिटखाली २३ लाखांची रोकड आढळून आली. ही रोकड पोलिसांनी जप्त केली असून, यातील एक मुंबई तर दुसरा इंदूरचा आहे. दरम्यान, आम्हाला हे वाहन इंदूरला पोहोचविण्यास सांगण्यात आले होते. त्यात काय याची आम्हाला माहिती नाही, असे दोघांनी पोलिसांना सांगितले. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड सापडल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, रवी राठोड, केतन पाटील, गौतम सपकाळे, संदीप थोरात, तुषार पारधी, मयूर पाटील आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश काळे यांना प्रथम पारितोषिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियन छायाचित्र स्पर्धेत बाइक रॅलीचा थरार व छायाचित्रकारांनी काढलेल्या इतर छायाचित्रांना मंगळवारी पारितोषिक देण्यात आले. या छायाचित्र स्पर्धेत अनुक्रमे 'महाराष्ट्र टाइम्स'चे सतीश काळे यांना प्रथम, लोकमतचे राजू ठाकरे यांना द्वितीय, दिव्यमराठीचे विवेक बोकील यांना तृतीय तर सामनाचे भूषण पाटील यांना चौथ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले आहे. नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियन स्पर्धेचे श्याम कोठारी व ऑस्ट्रेलियाचे शॉन वेब यांनी परीक्षण केले. आयोजक सुरज कुटे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तपदी गमेंची अखेर वर्णी

$
0
0

आयुक्तपदाच्या चर्चांना विराम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदलीनंतर अखेर बारा दिवसांनंतर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. मुंढेंच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या आयुक्तपदावर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती सरकारने केली असून, त्यांना तत्काळ आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गमे गुरुवारी पदभार स्वीकारतील. नियुक्तीपूर्वी आयुक्तपदावर गमेंसह अनेकांच्या नावांची चर्चा होती. मात्र, गमेंची नियुक्ती झाल्याने आयुक्तपदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गमे नाशिकचे जावई असून, ते मूळचे कोपरगाव तालुक्यातील मढी येथील रहिवासी आहेत. ते राज्यसेवा आयोगाचे अधिकारी असून, १९८८ पासून प्रशासकीय सेवेत दाखल झाले. २०१२-१३ मध्ये त्यांना आयएएस दर्जाचे नामनिर्देशन मिळाले. केंद्र सरकारने त्यांना २००५ चे आयएएस केडर प्रदान केले. गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वीच प्रांत, निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून नाशिकच्या समाजकल्याण विभागात जातपडताळणी प्रमुख म्हणून त्यांची बदली झाली होती. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सीईओपदी त्यांची सरकारने नियुक्ती केली होती. नंदुरबारवरून गमेंची बदली अकोल्यात महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली होती. त्यानंतर ३ मे २०१७ पासून ते उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंत्रालयात अन्न नागरीपुरवठा, तसेच महसूल विभागात उपसचिव म्हणून काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीची रक्कम मिळाली साडेसात वर्षांनी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

साडेसात वर्षांपूर्वी माजी नगरसेवकाच्या वडिलांना रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रस्त्यात अडवून, त्यांना मारहाण करून अॅक्टिवाच्या डिकीतून ११ लाख ९७ हजार ६८४ रुपयांची रक्कम पळवून नेली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खंडू केरू सानप यांनी फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार २१० रुपयांची रक्कम हस्तगत केली. ही रक्कम मंगळवारी (दि. ४) सानप यांना न्यायालयाच्या आदेशाने धनादेशाद्वारे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

पंचवटीत राहणारे खंडू केरू सानप हे मार्केट यार्डातील कामकाज आटोपून दि. ३ जुलै २०११ रोजी अॅक्टिवा या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांना शहनवाज पठाण (रा. नाशिकरोड) आणि रवी राजू निकम (रा. भगूर) यांनी रस्त्यात अडविले. त्यांना मारहाण करत दुचाकीवरून खाली पाडले. त्यांच्या दुचाकीच्या डिकीत असलेली ११ लाख ९७ हजार ६८४ रुपयांची रक्कम चोरून पळ काढला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये सानप यांनी फिर्याद केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी चोरलेल्या रकमेतील ८ लाख ३० हजार २१० रुपये हस्तगत करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार या रकमेचा भारतीय स्टेट बँकेचा धनादेश सानप यांना देण्यात आला. यावेळी पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर कड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांना शब्दाचा विसर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भाजपने राज्यात सत्तेत येण्यापूर्वी राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकारकडे मागणी करून सभागृहात सरकारची कोंडी केली होती. त्यानंतर सत्ता मिळाल्यावर खुद्द मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनीही एक महिन्याच्या आत कोतवालांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी खुद्द मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच आश्वासनाचा विसर पडला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले यांनी मंगळवारी केला.

चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या मागण्यांसाठी राज्यातील कोतवालांनी बेमुदत काम बंद ठेवून येथील विभागीय आयुक्तालयापुढे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. मंगळवारी (दि. ४) या आंदोलनाचा १६ वा दिवस होता. राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील कोतवालांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, या मागण्यांकडे आजवर शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कोतवालांनी केला आहे.

शासनाकडून चोवीस तास काम करवून घेतले जाते. मात्र, मानधन अत्यंत तुटपुंजे दिले जाते. या उदासीन धोरणामुळे कोतवालांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. महसूल खात्यातील तलाठी ते जिल्हाधिकारी असे सर्व अधिकारी कोतवालांकडून कामे करून घेतात, असेही त्यांनी म्हटले आहे. थंडीतही हे आंदोलन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीमुळे जेष्ठांमध्ये गुडघेदुखीचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थंडीने शहरात चांगलाच जोर पकडला असल्याने ज्येष्ठांच्या गुडघेदुखीत वाढ झाली आहे. अनेक ऑर्थोपेडीक सर्जनच्या दवाखान्यांमध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असून, आयुर्वेदिक तेलांच्या खरेदीतही वाढ झाली आहे.

जस जशी थंडी पडू लागते तसे ज्येष्ठांच्या प्रकृतीबाबतच्या तक्रारीमध्ये वाढ होते. काहींना पोटाचे विकार होतात तर काहींना सांधेदुखीचा त्रास होतो. यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेतात. शहरात असलेल्या अनेक सांधेदुखी तज्ञांकडे ज्येष्ठांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्टकडेही गर्दी होते आहे. या कालावधीत आहार व विहार यांच्यावर नियंत्रण ठेवल्यास आजाराची तीव्रता काही अंशी कमी होण्यास मदत होईल, असे आहार तज्ञांचे म्हणणे आहे. याकाळात मध्यमवयीन स्त्री- पुरुषांना देखील स्पॉन्डेलिसेसचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याच प्रमाणे मुळव्याधीच्या देखील तक्रारी वाढल्या आहेत. याकाळात ज्येष्ठ नागरिकांनी थंड पाणी पिणे टाळावे, कोरडे अन्न खाऊ नये, भाताचे प्रकार जास्त खावेत, तुपाचा वापर जास्त प्रमाणात करावा. तेलात बुडवलेला कापसाचा बोळा कानात ठेवावा, आंघोळीच्या अगोदर सांध्यांना तेलाने मालीश करावी, जेवणात तळलेला लसून खावा, संपूर्ण घराने सुंठ टाकून गरम पाणी प्यावे, जेवणात तिळाच्या व खुरसणीच्या चटणीचा वापर करावा. चण्याचे पदार्थ खाऊ नये असा सल्ला वैद्य विक्रांत जाधव यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रीम प्रोजेक्टच अडकला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असतानाही, सत्ताधारी भाजपने अडीच महिने उलटूनही महासभेचा ठराव प्रशासनाकडे सादर केलेला नाही. ठरावाला येत्या २० डिसेंबर रोजी ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होत असून, या मुदतीत महासभेचा ठराव प्रशासनाला प्राप्त न झाल्यास आयुक्तांचा प्रस्ताव सरसकट मंजूर समजला जाणार आहे. त्यामुळे शिल्लक १५ दिवसांत बससेवेचा ठराव प्रशासनाकडे पाठविण्याचे आव्हान महापौरांसमोर आहे. परिवहन समिती की कंपनी याचा पेचही सोडवावा लागणार आहे.

शहर बससेवा महापालिकेनेच चालवावी असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा नाशिककरांच्या माथी मारली जात आहे. तुकाराम मुंढे यांनी शहर बससेवेचा प्रस्ताव सादर करीत, त्यात परिवहन समितीऐवजी कंपनीचा समावेश केला होता. महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालविण्याचा प्रस्ताव २० सप्टेंबर रोजीच्या महासभेत आयुक्त मुंढे यांच्याकडून मांडण्यात आला होता. 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर खासगीकरणातून बससेवा चालविण्याचा प्रस्ताव भाजपने मंजूर केला होता. परंतु, यात कंपनीऐवजी समिती गठीत करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. यानंतर आयुक्तांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन समितीऐवजी कंपनीच करा, असा हट्ट धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समितीऐवजी कंपनी स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी बससेवेचा ठरावच रोखला होता. मुंढे यांनी अनेकवेळा ठराव मागितला. परंतु, भाजपने हा ठरावच सादर केला नाही. येत्या २० डिसेंबर रोजी बससेवेचा प्रस्ताव महासभेला सादर होण्यास ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील प्रकरण दोनमधील कलम १ (स) नुसार आयुक्तांचा कोणताही प्रस्ताव महासभेत सादर झाल्याच्या ९० दिवसांत निकाली न काढल्यास अशा प्रस्तावाला महासभेची मंजुरी असल्याचे गृहीत धरले जाते. तसा अहवाल आयुक्त थेट शासनाला पाठवून, आहे त्याच प्रस्तावाचे रुपांतर ठरावात करू शकतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. पंधरा दिवसांत कंपनी की समिती याचा निर्णय भाजपला घ्यावा लागणार आहे.

भाजपची कोंडी

शहर बससेवेच्या संचालनासाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत सर्वमताने घेण्यात आला. त्यामुळे ठराव बदलल्यास भाजपचीच अडचण होणार आहे. कंपनीचा निर्णय घेतल्यास विरोधकांकडून भाजपला जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे कंपनी की समिती या पेचात भाजप पदाधिकारी अडकले आहेत. एकीकडे कंपनी की समितीचा पेच असताना दुसरीकडे मात्र ९० दिवसांचे बंधनही भाजपला पाळावे लागणार आहे. त्यामुळे या पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास आयुक्तांना थेट अधिकार बहाल होणार आहेत. त्यामुळे सर्वांकडून भाजपचीच कोंडी होत असल्याने याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार साजीदच्या शिक्षेत वाढ

$
0
0

मुंबईतील पुरकायस्थ हत्या प्रकरण

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील पल्लवी पुरकायस्थ या युवा वकिलाच्या हत्या प्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी पॅरोलवर सुटताच पसार झाला होता. मूळ जम्मू-काश्मीर येथील असलेल्या आरोपीस मंगळवारी (दि.४) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मथुरा यादव यांनी फरार झाल्याबाबत एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीने पूर्वीची शिक्षा भोगल्यानंतर ही शिक्षा भोगावी, असा आदेशच कोर्टाने दिला आहे.

सज्जाद अहमद अब्दूल अजीज मोगल उर्फ पठाण (मूळ रा. सलामाबाद, जि. बारामुल्ला, जम्मू-काश्मीर) असे या आरोपीचे नाव आहे. सन २०१२ मध्ये मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या सज्जादने पल्लवी पुरकायस्थ या युवा वकिलाची निघृर्ण हत्या केली होती. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले. या हत्येप्रकरणी कोर्टाने दोषी ठरवत त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यानंतर त्याची रवानगी नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये झाली. सन २०१६ मध्ये आई आजारी असल्याच्या विनंतीवरून त्यास २६ फेब्रुवारी २०१६ रोजी विभागीय आयुक्तांनी पॅरोल रजा मंजूर केली होती. मात्र कारागृहाबाहेर पडताच तो पसार झाला होता. एक महिन्याचा कालावधी उलटूनही तो हजर झाला नाही. यानंतर जेल प्रशासन सावध झाले. कारागृह रक्षक नितीन शेरताठे यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकरोड पोलिसांच्या पथकाने जम्मू येथे तपास केला. मात्र, सज्जादचा मागमूस लागला नाही. ११ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई पोलिसांनी त्यास अटक केली. सहाय्यक निरीक्षक महेश मजगर यांनी या गुह्याचे दोषारोप पत्र कोर्टात सादर केले. सरकारी वकील अ‍ॅड. अनिल बागले यांनी आठ साक्षीदार तपासले. समोर आलेल्या साक्षीपुराव्यानुसार कोर्टाने कलम २२४ नुसार सज्जादला दोषी ठरवित एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने पूर्वीच्या गुह्यातील शिक्षा भोगून झाल्यानंतर ही शिक्षा भोगण्याबाबत कोर्टाने आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोवरील जप्ती तूर्त टळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर घरकुल योजना उभारणाऱ्या सिडकोने मोबदला न दिल्याने संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने सिडको कार्यालयातील साहित्यांच्या जप्तीचे आदेश दिले. मात्र, त्यावर मंगळवारी सुनावणी न झाल्याने सिडकोला जप्तीच्या संकटातून पुन्हा अल्पसा दिलासा मिळाला आहे.

सिडको प्रशासनाकडून मोरवाडी येथील बऱ्याच जमिनी व प्लॉट १९८२ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. त्याबाबत संपादनाचा निवाडा १९८६ साली जाहीर करण्यात आला. सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून सुमारे १ कोटी ६१ हजार रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम न भरल्यास सिडको कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मागील आठवड्यात सिडकोचे प्रशासक अनिल झोपे यांनी प्रकल्पग्रस्तांचे वकील ॲड. अनिल आहुजा यांची भेट घेऊन मुदत मागितली होती. त्यानुसार न्यायालयात याबाबत मंगळवारी सुनावणी होणार होती. सिडकोने ही रक्कम भरण्याची तयारी दर्शविली असून त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यालयात पाठविला आहे. मुख्य कार्यालयातून आदेश आल्यानंतर ही रक्कम न्यायालयात भरण्यात येणार असून सिडकोकडून ही रक्कम परत देण्याबाबत कारवाई सुरू झाली असल्याचे प्रशासक झोपे यांनी सांगितले. परंतु, सुनावणी न झाल्याने सिडकोवरील जप्ती टळली आहे.

दीड कोटीचे देणे बाकी

सिडकोवरील जप्ती तूर्त जरी टळली असली तरी जप्तीची टांगती तलवार अद्याप कायम असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी, सिडको प्रशासकांनी प्रकल्पग्रस्तांच्या वकिलांकडे दोन महिन्यांच्या मुदतीचे पत्रही दिले आहे. या प्रकरणात सिडकोतील ५९ भूधारकांना उर्वरित एकूण १ कोटी ६१ लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत. न्यायालयात आता याबाबत होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्या उत्पादकाच्या गांधीगिरीची चौकशी

$
0
0

मनीऑर्डरची पीएमओ कार्यालयाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी २९ नोव्हेंबर रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात साडेसात क्विंटल कांदा विक्री केलेल्यानंतर हाती आलेल्या एक हजार ६४ रुपयांची मनीऑर्डर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली होती. त्यांच्या या गांधीगिरीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. पीएमओ कार्यालयाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला संबंधित शेतकरी आणि एकूणच नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी संजय साठे यांची सोमवारी रात्री फोनवरून चौकशी केली.

राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार निफाड येथे विक्रीसाठी आणला त्याला. त्यांच्या कांद्याला दीड रुपया किलो असा भाव मिळाला होता. त्यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने हताश झालेल्या साठे यांनी गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कांद्या विक्रीतून आलेले एक हजार ६४ रुपये २९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नावे मनीऑर्डर केले. हताश शेतकऱ्याच्या या मनीऑर्डरने दिल्लीतील पीएमओ कार्यालयात देखील चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्लीहून तातडीने संबंधित शेतकऱ्याची चौकशी करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सोमवारी रात्री उशिरा साठे यांची कांद्याला मिळालेल्या बाजार भावाची चौकशी केली. साठे यांच्यामागे काही राजकीय पाठिंबा आहे का याची खात्री करण्यासाठी नैताळे येथील माजी सरपंच व पत्रकारांकडून साठे यांची चौकशी करण्यात आली.

'उन्हाळ कांदा' पडलेलाच

मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. कमीत कमी १५१, जास्तीत जास्त ६११ तर सरासरी ३५० रुपये असा भाव मिळाला. लाल कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२९२ व सरासरी ९२५ रु भाव मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी प्रॅक्टिसवर दंडाचा ‘उपचार’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सेवेत कार्यरत असतानाही खासगी प्रॅक्टिस करणारे पालिका सेवेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांना प्रभारी आयुक्तांनी दणका देत, त्यांच्याकडून २ लाख ३९ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. बिटको रुग्णालयात कार्यरत असतानाही डॉ. फुलकर हे खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचा आरोप नगरसेवक मुशीर सैय्यद यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर विभागीय चौकशीत डॉ. फुलकर दोषी आढळून आले.

डॉ. फुलकर हे सध्या कथडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असून, त्याअगोदर बिटको रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. बिटको रुग्णालयात कार्यरत असतानाही, ते खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार स्थायी समितीत मुशीर सैय्यद यांनी केली होती. सैय्यद यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. फुलकर यांची विभागीय चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, सैय्यद यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सेवेत कार्यरत असतानाही, त्यांनी खासगी प्रॅक्टिस केली म्हणून त्यांच्याकडून दोन लाख ३९ हजारांचा दंड वसूल करण्याची शिफारस चौकशी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यासंदर्भातील कारवाईची फाइल आयुक्त कार्यालयाकडेही पाठवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात तुकाराम मुंढे यांची बदली झाली. त्यामुळे फुलकरांवरील कारवाईला उशीर झाला. परंतु, मंगळवारी प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी डॉ. फुलकर यांच्यावरील दंडात्मक कारवाईच्या फाइलवर सही केली. त्यामुळे फुलकर यांच्याकडून आता दोन लाख ३९ हजारांची वसुली होणार आहे.

अन्य डॉक्टरांना चाप

महापालिका तसेच सरकारच्या सेवेत कार्यरत राहून अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालय व मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टर सर्रास प्रॅक्टिस करीत असतानाही, त्यांच्यावर कारवाई होत नसे. परंतु, सैय्यद यांच्या तक्रारीनंतर डॉ. फुलकर यांच्यावर झालेली कारवाई ही अन्य डॉक्टरांसाठी धडा ठरणार आहे. निदान या कारवाईनंतर तरी मनपा रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर पूर्णवेळ पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देतील, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचव्या मजल्यावरून पडून महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने वॉचमन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकरोडच्या आशीर्वाद बस स्टॉपसमोरील इमारतीत घडली. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आशीर्वाद बस स्टॉपसमोर निर्माणाधिन सोसायटी आहे. या सोसायटीत काम करणारी गोपाळ कांबळे (३६, रा. आशीर्वाद बस स्टॉप) ही महिला इमारतीला पाणी मारत होती. पाचव्या मजल्यावर पाणी मारत असताना नळीला पीळ बसला होता. हे तिच्या लक्षात आले नाही. तिने जोरात नळी ओढल्याने तिचा तोल गेला. पाचव्या मजल्यावरून ती खाली कोसळली. नागरिकांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. परिसरातील अलिकडची अशी दुसरी घटना आहे. जयभवानीरोडला दिवाळीच्या आधी साफसफाई करताना एक महिला तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

$
0
0

मालेगाव : दहिदी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मंगळवारी एक शेतमजूर जखमी झाला. समाधान कचवे यांच्या शेतात काम करणाऱ्या लक्ष्मण धनाजी सोनवणे (वय २५) असे जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. दुपारी लक्ष्मण काम करीत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तहसीलदार ज्योती देवरे यांनी पिंजरा लावण्याच्या सूचना केल्यानंतर वनविभागाने दहिदी परिसरात पिंजरा लावला आहे.

...

तिघांना अटक

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटण्याच्या इराद्याने त्यांना जादूचे प्रयोग वा वेगवेगळ्या क्लृप्त्या दाखवून गुंगवून ठेवणाऱ्या तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रंगेहाथ अटक केली. तिघांची कसून चौकशी केली असता, हा सर्व लुटीचा व बनवाबनवीचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी अयूब हसन मदारी, अफजल नवाब मदारी, जाकीर नवाब मदारी (रा. लक्कडकोट, ता. येवला) या तिघांना अटक केली आहे.

...

अनोळखी बॅग सापडली

मनमाड : पुणे-भुसावळ एक्स्प्रेसमध्ये अनोळखी बॅग सापडली होती. मनमाड रेल्वे पोलिसांनी बॅगमालकाचा शोध घेऊन त्यास परत केली. ही बॅग के. एम. मेमाणे (कोची) यांची असून, ती याच एक्स्प्रेसमधून पुणे ते पनवेल प्रवासात हरवली असल्याचे तपासात समोर आले. रोख रक्कम, मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे या बॅगमध्ये आढळून आली.

....

सिन्नरला घरफोडी

सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जय मल्हार कॉलनीत राहत असलेल्या अलका माधव भोईर (वय ३९) यांच्या राहत्या घरात १ ते ३ डिसेंबर दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. त्यात नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व १२ हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याबाबत अलका भोईर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

..

स्कॉर्पिओतून रक्कम लंपास

सिन्नर : स्कॉर्पिओची काच फोडून अज्ञात चोरट्याने साडेतीन लाखांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी घडली. शिवडा येथील व्यापारी प्रभाकर तुकाराम हारक यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर शहरातील बँकेतून साडेतीन लाखांची रक्कम काढून ती स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवली. त्यानंतर ते कारसह शासकीय विश्रामगृहाजवळील अपना गॅरेज वाहनांचे पार्ट घेण्यासाठी गेले. कारमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून पैशांची बॅग लंपास केली. याबाबत त्यांनी सिन्नर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात उद्या दुष्काळ पाहणी

$
0
0

केंद्रीय पथक मेहुणे गावाला देणार भेट

...

नाशिकची स्थिती

- चार तालुक्यांत गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ

- १७ महसुली मंडळांतही दुष्काळी जाहीर

- १०१ टँकर ३७६ गाव-वाड्यांची भागवताहेत तहान

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक बुधवार (दि. ५) पासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. गुरुवारी (दि. ६) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबा आणि मेहुणे या दोन गावांना हे पथक भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुंबईत बैठक घेऊन केंद्र सरकारला अहवाल सोपविणार आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी येत असल्याने भरीव मदतीद्वारे दुष्काळी परिस्थितीवर फुंकर घातली जाईल, अशा आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवीत झाल्या आहेत.

राज्यात बहुतांश भागात सरासरीहूनही कमी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यांना दुष्काळी जाहीर केले आहे. राज्यात ११२ तालुक्यांमध्ये गंभीर, तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी ४ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याखेरीज १७ महसुली मंडळांतही दुष्काळी जाहीर केली आहेत. पाणीटंचाईवर प्रशासनाने टँकरचा उतारा शोधला असून, १०१ टँकर ३७६ गाव-वाड्यांची तहान भागवित आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे. तेथील जळगाव निंबा आणि मेहुणे गावातील पीक परिस्थितीची, भूजल पातळीची पाहणी हे पथक करणार आहे. गुरुवारी दुपारी साडेतीन ते सव्वापाच या कालावधीत ही पाहणी होणार असून, त्यानंतर हे पथक नाशिकच्या सरकारी विश्रामगृहात मुक्कामासाठी येणार आहे. या पथकामध्ये आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना आणि छावी झा यांचा समावेश आहे. हे पथक ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल सादर करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेतकरी पत्नीला मिळणार विम्याची रक्कम

$
0
0

दोन लाखांची भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघात झाला त्यावेळी चूक नव्हती. मग, वाहन परवाना होता की नव्हता किंवा परवान्याची मुदत संपली अशी तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारदास व्याजासह दोन लाख रुपये अदा करण्याचे आदेश इन्शूरन्स कंपनीला दिले.

या प्रकरणी ग्राहक मंचात मागील वर्षापासून सुनावणी सुरू होती. नांदगाव येथे राहणाऱ्या त्र्यंबक गोसावी (वय ४५) या शेतकऱ्याचा १ मे २०१६ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या दुचाकीस दुसऱ्या एक वाहनाने धडक दिल्याने गोसावी यांचा मृत्यू झाला होता. त्या दरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे अपघात विमा काढला होता. या विम्यास गोसावी पात्र असल्याने गोसावी यांच्या पत्नी सुनीता यांनी संबंधित नॅशनल इन्शूरन्स कंपनीकडे मोबादला मागितला. मात्र, गोसावी यांच्या लायसन्सची मुदत संपल्याचे कारण पुढे करीत कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सुनीता गोसावी यांनी अॅड. हार्दिक देसाई यांच्यावतीने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. यात देसाई यांनी हायकोर्ट आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगात झालेल्या आदेशांची कारणमीमांसा केली. एखादा व्यक्ती परवाना नसताना किंवा परवान्याची मुदत संपली असताना वाहन चालिवताना अपघात झाला आणि त्यात या व्यक्तीची कोणतीही चूक नसले तर त्यास दोषी ठरविण्याचा वा त्याची मदत नाकरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे अॅड. देसाई यांनी स्पष्ट केले. या युक्तिवादानुसार ग्राहक मंचाने गोसावी कुटुंबास दोन लाख रुपये आणि दावा दाखल झाल्यापासून त्यावरील व्याज तसेच खर्चापोटी १२ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाश्वताकडे नेणारे ‘अखेरचं बेट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हिंसा, शह, सत्तासंघर्ष, एकमेकांच्या संस्कृतीवर होणारे हल्ले, स्वार्थापोटी निसर्गाची केलेली अपरिमित हानी, अतिरेकी धर्मांधता, जगावर राज्य करण्याची पिपासू इच्छाशक्ती, त्यातूनच जन्मणारा उन्माद यामुळे संपूर्ण मानवजात तिच्या विनाशाकडे चालली आहे. कुठे निसर्गाचा कोप होऊन महाप्रलय आलाय, कुठे धार्मिक हिंसाचार झालाय तर कुठे बंडखोरी त्यामुळे एकमेव असे सुंद्रज बेट उरले आहे, हे अखेरचं बेट आहे. असा अशय घेऊन आलेले नाटक मंगळवारी सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत विजय शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था प्रस्तूत, सक्षम क्रिएशन्स निर्मित दोन अंकी प्रायोगिक नाटक अखेरचं बेट सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही नाट्यस्पर्धा सुरू आहे. सुंद्रज बेटावर अनादी काळापासून विवेकी, नीतिमान सत्ता करणारी म्हातारी असून, तिला आदि-अंत नाही. ती निसर्गाचे एक रूप आहे. महाप्रलयानंतर हे बेट उद्ध्वस्त झाले. परंतु, तरीही या बेटावर राज्य करण्यासाठी उत्सुक असलेला आतंकी बंडखोर डारोबा आणि म्हातारी दोघेच जीवंत आहेत. दोघांमध्ये संघर्ष उडून म्हातारी डारोबाला कुत्रा बनवते. त्याचवेळी बेटावर एक गर्भवती मृगजा व म्हातारा आपले प्राण वाचविण्यासाठी येतात. म्हातारी त्यांना आधार देते. पुढे या मृगजाचे डारोबावर प्रेम जडते, ती त्याला सांगते की या म्हाताऱ्याने तिचे अपहरण करून आणले आहे. त्याच्या लक्षात येते की हा म्हातारा बंडखोर सेनापती कुर्यासूर आहे, त्यामुळे तो जास्त घाबरतो. परंतु, म्हातारीला हरविण्यासाठी ते दोघे एकत्र येतात. मृगजा त्याची पत्नी आहे हे डारोबाच्या लक्षात येते. कुर्यासूर म्हातारीचा काटा काढतो, त्यामुळे डारोबा माणूस होतो. घाबरून कुर्यासूर त्याला पुन्हा कुत्रा बनवतो. याचवेळी मृगजा मागून हल्ला करीत कुर्यासूराचा खातमा करते. आता मृगजामध्ये म्हातारीचा संचार झालेला असतो कारण ती शाश्वत असते. पुढे मृगजा अनेक आदिवासींचा जीव वाचवते आणि हे अखेरचे बेट सुंदर, समृध्द करते.

नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुधीर कुलकर्णी यांचे होते. नेपथ्य सुयोग देशपांडे, प्रकाशयोजना बाळकृष्ण तिडके, संगीत दिग्दर्शन केदार रत्नपारखी, वेशभूषा मोनाली ठाकूर, भाग्यश्री पाटील, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात समीक्षा कुलकर्णी, प्रतिभा वाघ, गौरव वाघ, सानिका गांगुर्डे, सविता जोशी, गुणवंत वाघ, प्रतीक विसपुते, तेजस्विनी गायकवाड, कृतार्थ कन्सारा, अजय तारगे, भैरवी कुलकर्णी यांनी भूमिका केल्या.

---

आजचे नाटक

विसर्जन

विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च सेंटर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images