Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुत्रवियोगाने पित्याचेही निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

घरातील कर्त्या मुलाने शेतीत काही पिकत नाही आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे अशा विवंचनेत असल्याने मृत्यूला कवटाळले. त्याच्या उत्तर कार्यानिमित्त तेराव्याच्या दिवशीच पुत्रवियोगाने वडिलांचेही निधन झाल्याची हृदयदावक घटना निफाड शहरात घडली.

विठ्ठल लहानू जाधव या द्राक्षउत्पादक शेतकऱ्याने ११ नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केले होते. निफाड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे रविवार २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंब दुखवियोगात असतानाच दशक्रिया विधी पूर्ण झाला. विठ्ठल यांचा शुक्रवारी तेराव्याचा विधी होता. मात्र, त्याच दिवशी रात्री एक वाजेच्या सुमारास विठ्ठल यांचे वडील लहानू जाधव यांचे निधन झाले आणि जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. अत्यंत शोकाकुल वातावरणात लहानु जाधव यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. लहानु जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, दोन मुली असा परिवार आहे.

लहानू जाधव यांचे मोठे पुत्र विठ्ठल यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपल्यावर २७ लाख रुपयांचे कर्ज असून शेती करणे परवडत नाही. कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न असल्याने मी जीवनाला हरलो आहे. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कुटुंबीयांना मित्र परिवाराने आधार द्यावा, अशी विनंतीही विठ्ठल यांनी चिठ्ठीतून केली होती. विठ्ठल यांची सामाईक ५९ आर जमीन आहे. त्यांनी द्राक्षबाग लावलेली होती. त्यांच्यावर निफाड नागरी सहकारी पतसंस्था आणि निफाड विकास कार्यकारी सोसायटी यांचे कर्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

$
0
0

\Bसेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा उत्साहात\B

नाशिक : भारत प्रतिभूति मुद्रणालयांतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा प्रथम स्नेहमेळावा नाशिकरोड येथे उत्साहात पार पडला. विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या. त्यानंतर दैठणकर, अग्निहोत्री, सौंदाणकर, सदावर्ते यांनी गीत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी रवींद्र पंचाक्षरी, अरुण देशमुख, श्रीधर जोशी, सुभाष सदावर्ते, विजय गंगवाणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपर ब्रेन्स’चे उद्या बक्षिस वितरण

$
0
0

'सुपर ब्रेन्स'चे उद्या बक्षिस वितरण

आयआयटी परीक्षेविषयीही मिळणार मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुपर ब्रेन्स २०१८' ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेचा निकाल व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची माहिती उद्या (९ डिसेंबर) गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत बक्षिस वितरण होणार आहे. त्याबरोबर, आयआयटी प्रवेश परीक्षेविषयी मार्गदर्शनदेखील केले जाणार आहे.

भविष्यात भारताला चांगले व कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने टाइम्स ग्रुपतर्फे 'सुपर ब्रेन्स' परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटीयन्स पेस हे या स्पर्धा, परीक्षेचे नॉलेज पार्टनर होते. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्याचे आयआयटीयन्स तयार करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात तर दुसरा टप्पा २ डिसेंबर रोजी पार पडला. जे विद्यार्थी सुपर ब्रेन्स परीक्षेच्या पहिल्या व दुसऱ्या राउंडमध्ये सहभागी झाले होते, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत उद्या होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक आहे. बक्षिस वितरणानंतर आयआयटीयन्स पेसचे सुमितेंद्र श्रीवास्तव आणि सुनील कुमार हे दोघे विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याविषयी सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

- -

बक्षिसांची लयलूट

या परीक्षेत विजेत्या होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेच्या गटातून तीन-तीन बंपर बक्षिसे दिली जाणार आहेत. दहावीच्या गटातून पहिले बक्षीस ब्रॅण्डेड लॅपटॉप, दुसरे बक्षीस ब्रॅण्डेड टॅब, तर तिसरे बक्षीस अॅमेझॉन किंडल हे असणार आहे. तर आठवी व नववीच्या गटासाठी प्रत्येकी पहिले बक्षीस अकरा हजार रुपये रोख, दुसरे बक्षीस आठ हजार रुपये रोख, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये रोख मिळणार आहेत. तसेच पहिल्या १० उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना गिफ्ट व्हाऊचर्स मिळतील. तसेच टॉप १०० स्पर्धकांना आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहेत.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजी खुलासा

$
0
0

... हे तर अंधाऱ्या खोलीत

काळी मांजर शोधण्यासारखे!

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शुक्रवारी (दि. ७) रोजी नाशिक न्यायालयात हजर राहवे लागले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिर येथे प्रभूश्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी "माझ्या विरोधातील आरोप म्हणजे अंधार असलेल्या खोलीत काळी मांजर शोधण्यासारखे आहे," असे वक्तव्य केले.

न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर भिडे गुरुजी पंचवटीत दाखल झाले. काळाराम मंदिरात गाभाऱ्यात श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. महंत सुधीरदास यांनी त्यांना काळाराम मंदिराविषयी माहिती दिली. काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर आदी या वेळी उपस्थित होते. काळाराम संस्थानतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ तसेच काळारामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. ते मंदिरात आले तेव्हा मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाल शौर्य’चे पुन्हा पलायन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, रावेर

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल याने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील श्रीराम गोकूळ आश्रमातून पलायन केले आहे. मध्य प्रदेश पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. नीलेश याआधीही आपल्या भावासोबत घर सोडून गेला होता.

मुक्ताईनगर कोथळी येथील संत मुक्ताईनगर मंदिरावर बॅक वॉटरमध्ये येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी पाण्यात बुडणाऱ्या ११ वर्षीय मुलाला वाचविल्याने बाल शौर्य पुरस्कार देवून नीलेश भिल याचा केंद्र सरकारतर्फे गौरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये नीलेश त्याच्या लहान भावाला घेवून घर सोडून निघून गेला होता. आधी त्याचा भाऊ सापडला व नीलेश हा नऊ महिन्यांनी गोरखपूर येथे सापडला होता. पोलिसांनी दोघांना आईच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील गायत्री ट्रस्ट संचलित श्रीराम गोकूळ आश्रमात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणीही त्याने चौकीदाराची नजर चुकवून मंगळवारी पहाटे आश्रमातून पळ काढला. त्याच्या आईने याबाबत ब·ऱ्हाणपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीए’ अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील वणी पाचोरे येथील हॉटेल व्यावसायिकाकडून अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी विजय जयसिंग पाचपुते यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

पिंपळगाव येथील वणी पाचोरे फाट्याजवळील हॉटेलला अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल परवाना निलंबनाबाबत नोटीस काढण्यात आली होती. यावर दिलेल्या उत्तरावर या विभागाने याबाबत सकारात्मक अहवाल द्यावा यासाठी अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी वर्ग २ यांनी २० हजार लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत हॉटेलच्या मालकाने 'एसीबी'कडे तक्रार केली. त्यानुसार 'एसीबी'ने सापळा लावला. 'एफडीए'चे अधिकारी विजय जयसिंग पाचपुते यांना हॉटेल मालकाकडून नाशिक येथे महामार्ग बसस्थानक जवळ शुक्रवारी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून जिल्हास्तरीय युवक महोत्सव जानेवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जानेवारी महिन्यात जिल्हास्तरीय युवक महोत्सव होणार आहे. युवक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महोत्सवाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयाची संख्या लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यात दोन विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये जळगाव विभाग आणि एरंडोल विभाग अशा दोन विभागांचा समावेश आहे. जळगाव विभागात, जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांसह विद्यापीठ परिसराचा समावेश राहील. तर एरंडोल विभागात एरंडोल, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव आणि भडगाव हे तालुके असतील. एरंडोल विभागाचा महोत्सव ५ जानेवारी, २०१९ रोजी बी.पी.कला, एम.एम.ए. विज्ञान व के.के.सी.वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव येथे तर ७ जानेवारी रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, शिरसोली रोड, जळगाव येथे जळगाव विभागाचा युवक महोत्सव होणार आहे.

९ जानेवारी रोजी कुसुंबा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचा आणि ११ जानेवारी रोजी तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नंदूरबार जिल्ह्याचा युवक महोत्सव होईल. या जिल्हास्तरीय युवक महोत्सवातील कला प्रकारनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांचा विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव १७ ते १९ जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठात होणार आहे. या वर्षीपासून ललित कला प्रकारात मेहंदी या उपप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. युवक महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्य व काव्य यांची माहिती होण्यासाठी पोस्टर्स व विविध प्रचार साधनांद्वारे जनजागृती केली जावी असे यावेळी ठरले.

बैठकीस डॉ. प्रिती अगरवाल, प्राचार्य एन. टी. थोरात, प्रभारी प्राचार्य मिलींद बिलदीकर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. ए. बी. चौधरी, अमोल मराठे, मनिषा चौधरी, प्रा. विलास चव्हाण, डॉ. राम पेटारे, डॉ. पंकजकुमार नन्नवरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्पाऊंडिंग पॉलिसीतील इमारतीही ठरल्या अनधिकृत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास नियंत्रण नियमात सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींचा भोगवटा प्रमाणपत्र तांत्रिक कारणाने रखडले असताना या सर्व रस्त्यांवरील इमारती विविध कर विभागाने अनधिकृत ठरवत त्यांना तीनपट दंड आकारणीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. कम्पाऊंडिंग पॉलिसीमध्ये सदर इमारतींचे प्रकरणे नियमीतीकरणासाठी दाखल असतानाच, विविध कर विभागाने नोटिसा पाठविल्याने मिळकतधारक हवालदिल झाले आहेत, तर महापालिकेच्या या भूमिकेमुळे व्यावसायिकही गोंधळले असून, पालिकेचे नेमके धोरण काय असा सवाल उपस्थित केला आहे.

महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मिळकतींना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु, या कारवाईत आता कपाट प्रकरणासोबतच डीसीपीआर बदलांमुळे बंधन आलेल्या सहा व साडेसात मीटरवरील इमारतीही आल्या आहेत. नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर शासनाने टीडीआर अनुज्ञेय नसल्याचे परिपत्रक काढून या इमारतधारकांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूला भूसंपादन करून नऊ मीटर रुंदीचा एफएसआय देण्याचा पर्याय समोर आला आला. शासनाने जाहीर केलेल्या कंपाऊंडिंग पॉलिसीअंतर्गत व्यावसायिकांनी प्रकरणे दाखल केल्यानंतर कपाटांचा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा आहे. सहा व साडेसात मीटर रस्त्यावरील इमारतींचे प्रकरणे नगररचनात प्रलंबित असतानाच कर विभागाने मात्र त्या मिळकती अनधिकृत ठरवून तीनपटीने कर आकारणीच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाखोंची बिले पाहून मिळकतधारक भयग्रस्त झाले असून, त्यांनी थेट बिल्डरांकडे तगादा लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मिळकतधारक आणि बिल्डरांमध्येच वाद सुरू झाले आहेत.

निलंबन करा : सैय्यद

अधिक दराने कर विभागाने पाठविलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या विरोधात राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे. स्थायी समितीचे सदस्य मुशीर सैय्यद यांनी देयके व लाखोंच्या नोटिसा पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. वाढीव बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी सैय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायीवर सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवळा तालुक्यात आज वीज नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

महापारेषणाच्या अत्यंत तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवारी (दि. ८) देवळा तालुका व परिसरात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. विजेअभावी होणाऱ्या गैरसोयीबद्दल परिसरातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणकडून भेंडी येथील २२० केव्ही अतीउच्चदाब उपकेंद्रात अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे आपत्कालीन देखभाल दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कळवण विभागांतर्गत भिलवाड, भूउर, बेज, खामखेडा, निवाने आणि खर्डा या ३३/११ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकाराचा जन्म वेदनेतूनच होतो

$
0
0

नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कलाकाराचे कलाजीवन उगाचच साकारले जात नाही तर सर्व कला समृद्ध होत गेल्यानंतर त्याचा परिपाक म्हणून तो कलाकाराची भूमिका साकारतो. कलाकाराचा जन्म वेदनेतूनच होतो, असे प्रतिपादन मराठी नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित वि. वा. शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी व बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी झाले. याप्रसंगी शिलेदार बोलत होत्या. यावेळी मंचावर नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, मध्यवर्ती परिषेदचे दीपक करंजीकर, नियामक मंडळाचे सदस्य सचिन शिंदे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, तसेच पुरस्कारमूर्ती ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आमदार हेमंत टकले यांसह कलाकारांची उपस्थिती होती.

दादासाहेब फाळके आणि वसंत शिंदे यांची आठवण निघाली असल्याने खूप छान वाटत आहे. भाषणबाजी करण्यापेक्षा त्यांचा एक किस्सा सांगणार असून वसंत शिंदे जेव्हा दादासाहेबांकडे चित्रपटात काम करण्यासाठी जात तेव्हा त्यांना स्वत: दादासाहेब अभिनय शिकवत असत. एकदा गणपती स्तवनाला नृत्य करायचे काम त्यांच्याकडे असताना ते विचित्र अंगविक्षेप करायला लागले; मात्र 'वशा, छान नाचतोय, नाच लेका' असे सांगत दादासाहेब प्रोत्साहन देत राहिले. मात्र, वसंत शिंदे बेशुद्ध पडल्यावर सर्वांच्या लक्षात आले, की गणपतीच्या मुखवट्यामध्ये विंचू होता व तो त्यांना डंख मारत होता. म्हणून कलाकाराचा जन्म वेदनेतून होतो, असे शिलेदार यांनी सांगितले.

प्रशांत दळवी यांना वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन तर मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशांत दळवी यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती असल्याने निर्माता दिलीप जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमात हेमंत टकले यांना बाबुराव सावंत पुरस्कार तसेच डोमेन एक्पर्ट कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने दीपक करंजीकर आणि विजय साळवे, नंदा रायते, सुनील देशपांडे, मुरलीधर तांबट, आनंद बापट, सुगंधा शुक्ल, सुनील भास्कर, प्रकाश नन्नावरे, डॉ. राजेश आहेर, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजीव पाठक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी बागेश्री वाद्यवृंदाच्या वतीने नांदी सादर करण्यात आली. सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले.

कानेटकर पुरस्कार मिळणे भाग्याचे लक्षण आहे. रायगडाला जाग येते तेव्हा नाटकात मी संभाजीची भूमिका करीत असे तेव्हा कानेटकरांनी मला 'तुम्ही शोभता' अशी पावती दिली होती. ती माझ्यासाठी आजही आनंददायी आहे.

- मोहन जोशी

नाटककारांची मांदियाळी एकत्र आल्याने खूप आनंद होत आहे. आयुष्याच्या सायंकाळी मिळालेला हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा आहे.

- आमदार हेमंत टकले

बक्षिसे वाटण्याचा कंटाळा

नाट्य संमेलनाची अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक गावाला जाऊन बक्षिसे वाटणे आणि रंगकर्मींना भेटणे हेच काम राहिले असून माझे गाणे बासनात गुंडाळून ठेवले आहे. खरे तर या गोष्टीचा मला वैताग आला आहे. पुन्हा आता नाशिकमध्येही तेच करायचे, यामुळे मला काय करावे सुचत नाही. परंतु हरकत नाही, असे म्हणून कीर्ती शिलेदार यांनी भाषणास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेलगंगा पॅटर्न’ कारखानदारीसाठी प्रेरक

$
0
0

गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे सुतोवाच

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

बेलगंगा पॅटर्न राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखाणदारीसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केला. तब्बल १० वर्षांनंतर चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा कारखान्याचा गाळप हंगाम शुक्रवारी सुरू झाला. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.

लोकसहभागातून सुरू झालेला हा राज्यातील पहिलाच कारखाना आहे. कारखान्याचे गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगाम शुभारंभ झाला. यावेळी श्री. शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्वर माऊली (बेलदारवाडी), स्वामी केशवानंद सरस्वती, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, सहकारराज्य मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार डॉ. सतीष पाटील यांच्या हस्ते उसाची मोळी टाकून गव्हाणपूजन करण्यात आले.

उसाला २ हजार रूपये भाव देणार

कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी कारखाना उभा करताना अनेक अशक्य बाबींवर कशी मात केली? याचे अनेक दाखले देऊन लोकसहभागातून स्थानिक भूमिपूत्रांनीच कारखाना सुरू केल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. कारखाना सुरू करण्यासाठी माजी मंत्री सुरेश जैन, आमदार एकना‌थ ‌खडसे, बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे तसेच शेतकरी, भागभांडवलदार यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगत भविष्यात कारख‌ान्याच्या जागेवर दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचे तसेच कारखान्यातील डिस्टेलरी सुरू करण्यासाठी २० कोटी रुपयांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकरीच आमचा केंद्रबिंदू असून, सुरुवातीला शेतकऱ्यांच्या उसाला २ हजार रुपये भाव देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

खडसेंची आमदारांवर टीका

बेलगंगा कारखाना सुरू करतो, असे सांगून ज्यांनी संपूर्ण तालुक्यात पदयात्रा केली, कारखान्यावरच्या नावावर शेतकरी-कामगारांच्या भावनांशी खेळ करून ज्यांनी निवडणुका लढल्या, निवडूनही आले त्यांनी नंतर कार‌खाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची टीका खडसे यांनी केली. कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार ए. टी. पाटील व आमदार उन्मेष पाटील अनुपस्थित असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींना जामीन

$
0
0

कोर्टापुढे लावली हजेरी; पुढील सुनावणींना हजर राहण्याची अट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्ट कारवाईस समोरे जावे लागणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अखेर आज शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर झाले. यापुढील प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर कोर्टाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. साधारणत: तीन ते चार महिन्यांपासून या प्रकरणाची नियमीत सुनावणी सुरू असली तरी भिडे गुरुजी हजर झाले नव्हते. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहाटेच्या सुमारास भिडे गुरूजी आपल्या फौजफाट्यासह शहरात दाखल झाले. साधारणत: ११ वाजेच्या दरम्यान गुरुजी धारकऱ्यांसह कोर्टात पोहोचले. सरकारी पक्षातर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. आर. वाय. जाधव यांनी भिडे गुरुजी यांनी मांडलेली भूमिका शासन व मुलींविरूध्द असल्याचे स्पष्ट केले. 'बेटी बचाव बेटी पढाव' या अभियानालाच विरोध वक्तव्य भिडे यांनी केले असून, त्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन यामुळे झाले असून, त्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका अॅड. जाधव यांनी मांडली. बचाव पक्षातर्फे अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला. संभाजी भिडे यांचा सरकारच्या कोणत्याही अभियानास व धोरणास विरोध करण्याचा उद्देश नव्हता. प्रथमदर्शनी त्यांच्याकडून कोणताही गुन्हा झाल्याचे निदर्शनास येत नाही. या खटल्याशी संबंधित पुरावे यापूर्वीच कोर्टात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भिडे गुरूजी या पुराव्यांबाबत ढवळाढवळ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या वयाचा विचार करताना त्यांना जामीन मंजूर करण्याची विनंती अॅड. भिडे यांनी कोर्टाकडे केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने भिडे यांना जामीन मंजूर केला. यापुढे होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्ट देईल त्या आदेशावेळी हजर राहण्याचे फर्मान कोर्टाने दिले. दरम्यान, संभाजी भिडे यांना सुनावणीवेळी हजर राहण्याबाबत सूट मिळावी, अशी विनंती बचाव पक्षाने कोर्टाकडे केली असून, त्यावर १४ तारखेच्या सुनावणीवेळी निर्णय होऊ शकतो, असे अॅड. भिडे यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांना टाळले!

कोर्टातील सुनावणी पूर्ण होताच भिडे गुरुजी यांनी अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या चेंबरमध्ये जाऊन चर्चा केली. यानंतर पोलिस संरक्षणात ते सांगलीकडे रवाना झाले. कोर्टातील धारकऱ्यांची गर्दी आणि भिडे गुरूजी यांना होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांनी कोर्टात चोख बंदोबस्त तैनात केला होता. कोरेगाव भीमा तसेच नाशिकमधील त्या वक्तव्या प्रकरणी भिडे यांचे मत जाणून घेण्याचा सर्वच माध्यमप्रतिनिधींनी प्रयत्न केला. मखमलाबाद नाक्यावरील राजपाल नगर येथे आणि कोर्टातही भिडे यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या शेकडो धारकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना विरोध केला. कोर्टात हा वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत सर्व धारकऱ्यांना बाहेर काढले.

काय आहे प्रकरण?

पंचवटीत १० जून २०१८ रोजी झालेल्या एका सभेत मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच जन्माला येतात, असे विधान केले होते. याबाबत 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, हे प्रकरण महापालिकेकडे आले. महापालिकेच्या एका समितीने केलेल्या चौकशीनुसार कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या खटल्यास भिडे यांनी हरकत घेतली. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्हा कोर्टाने ही हरकत फेटाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊत म्हणतात, युती नाहीच!

$
0
0

शिवसेना स्वबळावरच लढणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या अयोध्या वारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळकीमुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती होईल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी युतीच्या चर्चा फेटाळून लावत शिवसेना स्वबळावर ठाम असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगतानाच, महाराष्ट्रात राजकीय बदल होवून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावाही राऊत यांनी केला आहे. बॉडीगार्ड घेवून केंद्रीय पथकाला दुष्काळाची पाहणी करावे लागणे दुर्दैवी असल्याचे सांगत दुष्काळाच्या गंभीर विषयाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युतीचे वृत्त फेटाळले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलणारे भाजपचे नेते हे शिवसेनेचे प्रवक्ते नसून, त्यांची युती व्हावी अशी इच्छा आहे, तर सन २०१४ मध्ये त्यांची इच्छा कुठे होती, असा सवाल राऊत यांनी केला. सन २०१४ आणि २०१९ मध्ये असा काय बदल झाला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात आम्ही सत्तेत असून, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले म्हणजे युती होईल असा त्याचा अर्थ नाही. शरद पवार यांच्यासोबतही उद्धव ठाकरे व्यासपीठावर असतात. त्यामुळे राजकीय लढाई आम्हीच लढतच असून, काही वेळा एकत्र ढोल वाजता वाजता फुटतोही, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे. उद्धव ठाकरे येत्या २८ डिसेंबरपासून राज्यात दौरे सुरू करणार आहेत. दुष्काळी पाहणी करण्यासोबतच उद्धव ठाकरेंची जानेवारी महिन्यात नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. सोबतच गोदावरी नदीवर शरयू नदीच्या धर्तीवर राम मंदिरासंदर्भात कार्यक्रम करण्याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दैवी संचाराने दुष्काळाचे निवारण!

गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये दैवीसंचार असल्याचे केलेले वक्तव्य हे अधंश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने अंनिसने या वक्तव्याचा अभ्यास करावा. मुख्यमंत्र्यांच्या अंगात दैवी संचार असेल तर त्यांचा वापर दुष्काळ निवारणासाठी करावा, असा टोलाही राऊत यांनी लगावला. महाजन यांच्या गावातच पंधरा दिवसांनी पाणी येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाजपच्या पक्ष कार्यालयात बसवून राज्यातील सर्व प्रश्न दैवी संचाराने मिटवावेत, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानभरपाईसाठ आठ तास टॉवरवर

$
0
0

धर्मा पाटलांच्या मुलाचे पुन्हा आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने आणि याप्रकरणातील दोषींवर अद्यापर्यत कोणतीही कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने विखरण गावातील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. रात्री आठ वाजता शिंदखेड्याचे तहसीलदार उल्हास देवरे यांनी लेखी आश्वसन दिल्यानंतर नरेंद खाली उतरले. नरेंद पाटील तब्बल आठ तास टॉवरवर होते.

धर्मा पाटील यांची जमीन विखरण गावाच्या शिवारात वीज प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शासनानेकडे दाद मागण्यात आली. परंतु शासनाने याकडे दुलक्ष केल्याने धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने २२ जानेवारी २०१८ रोजी मंत्रालयात विषप्राशन केले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असतांना २८ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. पाटील यांच्या मृत्यूनंतर मध्यस्थी करून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. मात्र ते फोल ठरले असून या तीनही मंत्र्यांवर कारवाई करून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते.

..तर मुख्यमंत्री जबाबदार

नरेंद्र पाटील यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी शुक्रवारी विखरण गावातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढून देखील नरेंद्र आपल्या मागण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्महत्या करणार आणि याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींना जामीन

$
0
0

नाशिक : माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्ट कारवाईस समोरे जावे लागणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अखेर आज शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर झाले. यापुढील प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर कोर्टाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

सविस्तर वृत्त...३

धारकऱ्यांचा वेढा...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्या करणाऱ्यांत प्रौढ शेतकरी सर्वाधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सर्वाधिक आत्महत्या प्रौढ शेतकऱ्यांनीच केल्या आहेत. ४० ते ४९ या वयोगटातील ३१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून आत्महत्या करणारे ३० शेतकरी ३० ते ३९ या वयोगटातील आहेत. २० ते ४९ या वयोगटातील तब्बल ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असून अशा घटनांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखणे हे सरकारसह जिल्हा प्रशासनापुढे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात जिल्ह्यात १७ वर्षांच्या युवकासह ७५ वर्षांच्या आजोबांपर्यंत विविध वयोगटातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तिींनी आत्महत्या केली आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ शेतकरी ४० ते ४९ या वयोगटातील आहेत. ३० ते ३९ वयोगटातील ३० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्याखालोखाल २१ ते २९ वयोगटातील १६ तसेच ५० ते ५९ या वयोगटातील १५ आणि ६० ते ६९ या वयोगटातील सहा तर ७० हून अधिक वयोगटातील तीन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्या करणारे दोघेजण २० पेक्षाही कमी वयाचे आहेत.

५४ शेतकरी मदतीस अपात्र

शेतकरी आत्महत्यांच्या १०३ पैकी सुमारे निम्म्या घटनांमध्ये शेतकरी कुटुंब मदतीस अपात्र ठरले आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा आणि तत्सम कारणांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. परंतु, ५४ शेतकरी कुटुंबांना ही मदत नाकारण्यात आली आहे. ३४ शेतकरी कुटुंब मदतीस पात्र ठरले असून १५ प्रकरणांवर अद्या निर्णय होऊ शकलेला नाही.

..

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या

तालुका शेतकरी आत्महत्या

बागलाण १९

दिंडोरी १६

मालेगाव १६

निफाड १४

नांदगाव १०

सिन्नर ०८

नाशिक ०५

त्र्यंबकेश्वर ०४

चांदवड ०३

देवळा ०३

येवला ०३

इगतपुरी ०१

कळवण ०१

एकूण १०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतीनगर हत्या प्रकरणाचा उलगडा

$
0
0

मृतदेहाची ओळख पटविण्यात यश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड परिसरातील शांतीनगर झोपडपट्टी येथे झालेल्या निर्घुण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश मिळाले आहे. जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले असून, या हत्येप्रकरणात एकूण तीन आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यापैकी एकास रात्री उशिरा अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

देवीदास कसबे (२३, रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शांतीनगर झोपडपट्टीतील बुद्धविहारसमोर मंगळवारी रात्री (दि. ४) देवीदासची डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली. तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो पेटवून देण्यात आला होता. मृतदेहाची कोणतीही ओळख मागे नसताना पोलिसांनी तपास सुरू केला.

याबाबत अंबड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी सांगितले, की या हत्येत एकूण तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. देवीदास कसबे बेपत्ता असल्याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली होती. तसेच हत्या झालेला तरुण देवीदास असल्याबाबत पोलिसांना समजले होते. त्यामुळे लागलीच देवीदासच्या भावास पाचारण करण्यात आले. हत्येच्या घटनास्थळी पोलिसांना एका चष्माची फ्रेम सापडली होती. या फ्रेमच्या आधारे देवीदासच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाची ओळख पटली असली तरी डीएनए टेस्टच्या आधारेच सर्व स्पष्ट होईल, असे पीआय जाधव यांनी स्पष्ट केले. देवीदास हा मोलमजुरीचे काम करायचा. घटनेच्या रात्री काय झाले याचे चित्र समोर आले असले तरी आरोपींच्या अटकेनंतरच ते अधिक स्पष्ट होईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. हत्या प्रकरणातील संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत आज वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भद्रकालीतील साक्षी गणपती मंदिर परिसरात शनिवारी (दि. ८) विश्व हिंदू परिषदेचे संत संमेलन होणार आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून विहिंपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भद्रकालीसह परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वच प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेची सभा गणपती पटांगणात होणार आहे. या सभेला गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावर प्रवेश बंद

पिंपळपार बाजूकडून सोमवार पेठमार्गे बुधा हलवाईकडे जाणारा रस्ता

मोदकेश्वर गणपती नवा दरवाजा बाजूकडून बुधा हलवाईकडे जाणारा रस्ता

दहीपूल बाजूकडून कानडे मारुती लेनकडे जाणारा रस्ता

दहीपूल बाजूकडून हुंडीवाला लेनकडे जाणारा रस्ता

टाकसाळ लेन बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

जुनी तांबट लेन बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

शिवाजी चौक, बडीदर्गा रोड बाजूकडून सभेच्या मुख्य मार्गावर जाणारा रस्ता

पर्यायी मार्ग

प्रवेश बंदी काळात नागरिकांनी ठाकरेरोड, बादशाही कॉर्नर, दूधबाजार किंवा मेनरोड दहीपूलामार्गे यशवंत महाराज पटांगण तसेच गोदाकाठावरून मोदेकेश्वर गणपती मंदिरामार्गे पाटील गल्ली अशा पर्यायी रस्त्यांचा वापर करायचा आहे.

दुपारी ३ ते रात्री १० प्रवेश बंद

वाहतूक पोलिसांनी सात रस्त्यांवर दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सर्वच वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यातील बहुतांश भाग भर मध्यवस्तीत आणि बाजारपेठेचा असल्यामुळे नागरिकांसह ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांना पोलिस कसा दिलासा देणार, असा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपात औषधांचा खुला बाजार

$
0
0

चौघां संशयितांसह मेडिकल स्टोअर्स विरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना सरकारवाडा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. ६) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यातील एक संशयित मेडिकलमध्ये काम करतो. या प्रकरणी आणखी एक आरोपी फरार असून, संशयित आरोपींमध्ये बोरगड येथील मेडिकल स्टोअर्सचाही समावेश आहे.

या प्रकरणी 'एफडीए'चे औषध निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली आहे. एम. जी. रोडवरील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणारा संशयित आरोपी मेडिकल मालकाच्या अपरोक्ष परस्पर गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपी कीट विक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांना समजली. त्यानुसार, दोन्ही विभागाच्या पथकाने पंचासमक्ष गुरुवारी सायंकाळी मेडिकलजवळ सापळा रचला. यावेळी मेडिकलमध्ये गेलेल्या बनावट ग्राहकाने संशयित आरोपी रमेश तुळशीराम पगारे (४८, रा. सावतानगर, सिडको) याच्याकडे औषधांची मागणी केली. त्यावर संशयिताने बनावट ग्राहकाकडून २४०० रुपयांची मागणी करून पैसे स्वत:च्या खिशात ठेवले. तसेच १५ ते २० मिनिटांनी मेडिकल बाहेर औषध घेण्यासाठी बोलविले. यावेळी पोलिसांचे पथक तिथेच थांबले होते. थोड्या वेळातच औषधे घेऊन आलेल्या पगारेस पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता यात मनोज (पूर्ण नाव नाही), स्वप्नील शिवाजी देशमुख, विकास दिनकर चौधरी आणि बोरगड येथील एका मेडिकल स्टोअर्सचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले. पगारेचे मित्र असलेले हे संशयित एकमेकांच्या मदतीने गर्भपात औषधांची अनाधिकृतपणे विक्री करीत होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत देशमुख, पगारे आणि चौधरी या तिघांना अटक केली. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची जामीनावर मुक्तता केली.

मुंबई कनेक्शन

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री करताना पक्के बिल करावे लागते. तसेच डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय ही औषधे मेडिकल स्टोअर्सचालकांना विक्री करता येत नाही. अनैतिक संबंधांमुळे गर्भधारणा झाल्यानंतर या व्यक्ती अशा ठिकाणांहून अवैध पद्धतीने गर्भपाताची औषधे मिळवितात. यात युवा वर्गाचा मोठा भरणा असून, 'एमआरपी'पेक्षा जास्त किंमतीत या औषधांची विक्री होते. दरम्यान, संशयित आरोपींनी या औषधांचा साठा मुंबई येथून घेतल्याचे समोर आले असून, पोलिस सर्वच बाजुने या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

गर्भपात औषधांची अवैध पद्धतीने विक्री करण्याचे हे रॅकेट असून, यात तिघांना अटक करण्यात आली. ही संख्या आणखी वाढू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांची विक्री करणे बेकायदेशीर आहे.

- अशोक भगत,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाचा उद्वेग!

$
0
0

बागलाणमध्ये दोन तर नाशिकसह देवळा, त्र्यंबकमध्ये प्रत्येकी एक आत्महत्येची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात विविध समस्यांनी ग्रस्त शेतकरी मृत्यूला कवटाळत असून एकाच दिवसात चार शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या आत्महत्यांमुळे जिल्हा प्रशासनही हादरले असून शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शंभरी ओलांडली. बागलाण तालुक्यात दोन तर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि देवळा तालुक्यात एका आत्महत्येची नोंद झाली आहे.

नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथे बबन विठोबा सांगळे (वय ३९) यांनी १ डिसेंबर रोजी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. बबन यांच्या नावे शेती नसली तरी त्यांच्या वडिलांच्या नावे शेतजमीन आहे. दुसरी घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३ डिसेंबर रोजी घडली. सावरपाडा येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र काळू चौधरी (वय ७५) यांनी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे २ हेक्टर ४४ आर एवढी जमीन आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर येथील सागर अशोक पवार (वय २५) या तरुणाने ४ डिसेंबर रोजी घरात गळफास घेतला. सागर यांच्या नावे गट क्र. ६०३/२/१ चे काही क्षेत्र असून त्यांच्या नावे नामपूर विविध कार्यकारी सोसायटीचे १५ हजार रुपयांचे कर्ज आहे. याच तालुक्यातील भडाने येथे तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय ४४) यांनी घराजवळील कांदा चाळीत गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या नावे गट क्र. २२/२ येथे २.१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यांनी देवळा येथे एचडीएफसी बँकेत कर्जसाठी अर्ज दाखल केला होता अशी माहिती प्राथमिक अहवालातून पुढे आली आहे. याखेरीज देवळा तालुक्यातील कापशी येथे गंगाराम भिला भदाणे (वय ५५) यांनी शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या पाचही घटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद झाली असून सातत्याने घडणाऱ्या अशा घटना रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

वर्षभरात १०४ घटना

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक मालेगाव तालुक्यात गुरुवारी (दि. ६) येऊन गेले. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समस्यांचे दुष्टचक्र भेदून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, बँकांचा तगादा यासारख्या कारणांसह व्यक्तिगत कारणांमधूनही शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढू लागल्या आहेत. जानेवारी ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात ९९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. परंतु, ७ डिसेंबरला आणखी पाच शेतकरी आत्महत्या नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून १०४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

टँकर्सची तात्पुरती मलमपट्टी!

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत आहेत. पाण्याचे प्रवाह आटत चालल्याने जिल्हावासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीटंचाईच्या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून अशा टॅंकर्सच्या संख्येने देखील शंभरी ओलांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images