Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘मराठा’ जातप्रमाणपत्र मिळणार सेतू कार्यालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आता जातीच्या आणि जात वैधता प्रमाणपत्राचा नमुना देखील शुक्रवारच्या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सेतू कार्यालये आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातून अन्य दाखल्याप्रमाणेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या आरक्षणाद्वारे मिळणारे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला (एसबीसी) जातीचा दाखला अनिवार्य असणार आहे. हा दाखला मिळविण्यासाठीचा अर्जाचा नमुना आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या अर्जाचा नमूना सरकारने तयार केला असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयाद्वारे तो उपलब्ध करून दिला आहे. सचिव दिनेश वाघमारे यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांना निर्गमित केले आहेत.

हे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सेतू आणि महाऑनलाइन केंद्रांच्या माध्यमातूनच या दाखल्यांचे वितरण करावे लागेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. परंतु त्यासाठी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करणे अनिवार्य ठरणार आहे. आरक्षणाचा लाभ दिला जाणाऱ्या प्रत्येक जातीसाठी विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी एक क्रमांक निश्चित करावा लागेल. तो क्रमांक सेतू तसेच महाऑनलाइन केंद्रांच्या सॉफ्टवेअरमध्ये फीड केल्यानंतरच प्रत्यक्ष दाखले वितरण करणे शक्य होऊ शकेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एका होता पक्षीमित्र : बिश्वरूप राहा!

$
0
0

कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडीही दिली.

अजित बर्जे, नाशिक रोड

Top of the World...! कुठल्याही मित्राने कधीही फोन केला व हाऊ आर यू असे विचारले. की विशिष्ट लकबीत हमखास मिळणारे हे उत्तर ठरलेले. मित्रांसमवेत दिलखुलास रमणारा हा अवलिया निसर्गाचा विषय आला, की मात्र गंभीर होत परिचितांबरोबरच कुठल्याही उच्चपदस्थाला पर्यावरणाच्या दुर्गतीविषयी खडे बोल सुनवायला मागे- पुढे पाहायचा नाही. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांपासून ते देश पातळीवरील पर्यावरण क्षेत्राशी निगडित, नावाजलेल्या संस्था, संघटना व व्यक्तींना बिश्वरूप राहा माहिती नसतील असे विरळच. अशा या निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या व त्याच्या रक्षणासाठी झपाटलेपणापासून कार्य करणाऱ्या व्यक्तीचे अकाली जग सोडून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.

मित्र परिवारामध्ये 'शाँखो' नावाने परिचित असलेले हे उमदे व्यक्तिमत्त्व वयाच्या साठीतही शाळेतल्या सवंगड्यांशी ऋणानुबंध जपून होते. स्वत: अतिशय निर्मळ मनाचे असल्याने नवख्या व्यक्तीवरही चटकन विश्वास टाकून त्याला आपलेसे करून घ्यायचे. मनस्वी व दिलदार असलेला हा माणूस मुळातच साहसी व उत्साही असल्यामुळे स्वच्छंदपणे जगला. शालेय जीवन मुंबईत तर महाविद्यालयीन शिक्षण मदुराईत झाले. मसाल्याच्या बांगा असलेल्या मित्रांमुळे तमिळनाडूतील जंगलात फिरताना निसर्गाची ओळख झाली व पुढे नोकरीनिमित्त पुन्हा मुंबईत आल्यावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या रूपाने बहरली. पुढे ट्रेकिंगची आवड जोपासताना त्याला फोटोग्राफीचीही जोड मिळाली. स्वभावत:च कुठलीही गोष्ट मनापासून करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे निसर्गछायाचित्रणाला जी चिकाटी व सहनशीलता लागते, त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले व त्याचा प्रत्यय काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने आले.

कालांतराने वडिलांच्या व्यावसायिक निवृत्तीनंतर त्यांनी नाशिकला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व राहा सरांना त्या रूपाने एक वेगळे विश्व खुले झाले. टेक्स्टाइल व स्पेशालिटी फॅब्रिकशी संबंधित विविध व्यवसाय-नोकरी करताना त्यांनी नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वत:चा उद्योग सुरू केला. त्यातही पुढे ठराविक उत्पादनाची नियमित मागणी सुरू झाल्यामुळे उद्योगाचे दैनंदिन कामकाज आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवून नाशिक जिल्हा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात झाली. अल्पावधीतच काही समविचारी मित्रांबरोबर त्यांनी एका अनौपचारिक निसर्गगटाची स्थापना केली. पुढे निसर्गकार्याला ठोस स्वरूप देण्याची गरज लक्षात आल्यावर नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या नावाची संस्था २००२ मध्ये रीतसर स्थापन केली गेली, ज्याचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. त्यातून त्यांच्या कार्याची पट विस्तारला व पुढे त्यांचा नियमितपणे बीएनएचएस, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वर्ल्डवाइड फंड-नेचर, सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री आदी संस्थांशी निकटचा संबंध प्रस्थापित झाला. मध्यंतरी त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत त्यांना सरकारतर्फे नाशिक जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षकपद देण्यात आले, जे पुढे त्यांनी प्रभावीपणे वीस वर्षे सांभाळले.

यात दरम्यान साधारण २००२-२००३ मध्ये माझा त्यांच्याशी परिचय झाला. आजसारखे त्या वेळी नांदूरमध्यमेश्वर, काही मोजके पक्षी मित्र व निरीक्षक वगळता, फारसे परिचित नव्हते. सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने वन विभागाला त्यावर एक माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे होते. त्या माहितीपत्रकामध्ये लागणारी छायाचित्रे राहा यांच्याकडून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना भेटायला सांगितले. त्या निमित्ताने त्यांची झालेली ओळख केवळ माझी निसर्ग जागरूकता वाढण्यात झाली असे नाही, तर पुढे निसर्ग-पर्यावरणाची कारवी रिसोर्स लायब्ररी सुरू करण्याची प्रेरणाही काहीअंशी त्यातून आम्हाला मिळाली. पुढे संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी लागणाऱ्या छपाईच्या निमित्ताने नियमित भेट घडत गेली. त्या वेळी डिजिटल फोटोग्राफीचा उदय झाला नव्हता. छपाईच्या कामासाठी राहा सरांनी काढलेल्या फोटोंच्या ट्रान्स्परन्सी वापरून आम्ही काम करत असू. त्यांच्या फोटोंचा साठा एवढा प्रचंड होता, की आम्ही त्यांच्या कारखान्यात तासन् तास प्रोजेक्टरद्वारे त्यातून योग्य छायाचित्र निवडण्यासाठी घालवायचो. त्यातूनच पुढे त्यांनी घेतलेल्या छायाचित्रांचे विषयाप्रमाणे वर्गीकरण करून ठेवण्याचे काम हातात घेण्याचे आम्ही ठरविले व अवांतर वेळ मिळेल तेव्हा आम्ही ते सुरूही केले; पण त्याचा आवाका बघता एका मर्यादेपुढे ते काम पुढे सरकलेच नाही. त्या स्लाइड्सवरून आम्ही इतर अनेक गोष्टींबरोबरच पाणथळ व गवतीमाळ पक्ष्यांवर दोन कॅलेंडरही प्रसिद्ध केली. पुढे डिजिटल तंत्रज्ञान आल्यावर काम सोपे होत गेले. त्यातूनच पुढे नाशिकमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांवर समग्र पुस्तक करण्याची कल्पना पुढे आली व आठवड्यातले तीन दिवस असे सलग दोन-अडीच वर्षाच्या प्रयत्नातून नाशिक डिस्ट्रिक्ट हे पुस्तक तयार झाले.

कुठलेही सामाजिक कार्य पुढे जाते ते प्रबोधनात्मक, रचनात्मक व संघर्षात्मक या तीन अंगांनी. थोडीच लोक अशी असतात जी याचा सर्वसमावेशक उपयोग करतात. राहा सरांनी या तिन्ही अंगांचा उपयोग तर केलाच; पण त्याला संशोधनाची जोडही दिली. त्यांनी सहकाऱ्यांबरोबर केलेल्या प्रारंभिक कामाची दखल घेत 'बीएनएचएस'नी त्यांना नाशिकबरोबरच महाराष्ट्रातील प्रमुख पक्षीस्थळांच्या निश्चिती करण्यासाठी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम दिले. त्यानंतर वन खात्याबरोबरच अन्य संस्थांच्या सहकाऱ्याने मनुष्यवस्तीजवळ राहणाऱ्या लांडग्यांचा अभ्यास, माळढोक, तणमोर, पांढऱ्या चोचीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, बर्ड रिंगिंग गवतीमाळ पक्ष्यांचे जीवनचक्र या व अशा अन्य प्रकल्पांवर त्यांनी सतत काम केले. सततच्या जंगल भटकंतीतून, तीक्ष्ण निरीक्षणातून त्यांनी नाशिक जिल्ह्यात कधीही नोंद न झालेल्या पिवळ्या गळ्याचा भारीट, रानपिंगळा, पुना स्किंक सापसुरळी अशा अनेक दुर्मिळ प्रजातींची नोंद पुराव्यानिशी दिली. त्यांच्या कार्याचा मेरूमणी म्हणता येईल, असे कार्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम संयुक्तरीत्या उभे राहिलेले ३५० हेक्टर क्षेत्रफळ असलेले बोरगड संवर्धन राखीव वनक्षेत्र स्थानिक प्रजातीची दीड लाखाहून अधिक झाडं केवळ लावली नाही तर जगवलीदेखील. सुरुवातीची काही वर्षे पाण्याची सोय नसताना उन्हाळ्यात त्यांच्या जीपमध्ये पाण्याचे ड्रम भरून स्वत: झाडांना पाणी द्यायला ते जायचे. बोरगडच्या पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा गावाला आज ते जंगल विविध अंगाने उपयोगी पडत आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचा अधिवास असलेल्या अंजनेरी क्षेत्राला राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

ग्रामीण भागात गलोलने पक्षी मारणे ही सर्वसाधारण बाब, पण त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता त्याला पायबंद घालणे गरजेचे होते. ग्रामस्थांशी व मुलांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण आणण्यात संस्थेला यश आले आहे. जनप्रबोधनासाठी ते निसर्ग चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा, सायकल रॅली, परिसंवाद, नेचर कॅम्प, स्थळभेटी यांसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवत होते. शहरी शाळांच्या नेचर क्लबच्या वर्गणीतून ग्रामीण भागातील मुलांसाठी संपूर्णत: मोफत स्थळभेटीचे आयोजन, विविध उद्योगांच्या आर्थिक व कृतिशील सहभागातून ग्रामीण भागात जनजागृतीसाठी उपक्रम राबवणे नित्यनेमाने चालू असायचे. ते गेल्यानंतर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या होत्या. पक्ष्यांचं पर्यावरणातलं महत्त्व लोकांना समजावं व त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी कायमस्वरूपी केंद्र उभारण्याची कल्पना त्यांना सुचली. गंगापूर धरण परिसरातील त्यांच्या खासगी जागेत केवळ दोन महिन्यात विहंग पक्षी परिचय केंद्र योजनेचे स्वरूप ठरविण्याआधीच त्यांनी वन्यजीव सप्ताह व गांधी जयंतीचा २ ऑक्टोबर हा मुहूर्त उद्घाटनासाठी लगोलग घोषित केल्यामुळे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी एका बाजूला त्यांनी व मी त्याच्या मांडणीसाठी व दुसरीकडे वास्तुरचनाकार व त्यांच्या चमूने दिवस-रात्र एक केले. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकला मिळालेल्या नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळालेली दाद हुरूप देणारी ठरली. यामुळे विहंग नाशिककरांपर्यंत पोहोचले.

केवळ विरोधासाठी विरोध असा त्यांचा विकासकामांना आक्षेप कधीच नव्हता; पण तो एकांगी होऊ नये याबाबत ते दक्ष असायचे. स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या गंगापूर धरण परिसरातील बोट क्लबला त्यांनी त्यासाठीच विरोध केला होता. कैकवेळा नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यापेक्षा गंगापूर धरणावर फ्लेमिंगो पक्षी अधिक संख्येने असत. त्याबरोबरच तुलनेने संख्या कमी असली तरी पक्ष्यांच्या प्रजातींचे वैविध्य धरण परिसरातील गवतीमाळ प्रदेशामुळेही समृद्ध होते. त्याचा बचाव व्हावा ही त्यांची त्यामागे तळमळ होती; पण पुढे तो प्रकल्प होणार हे निश्चित झाल्यावर स्पीड बोटऐवजी पॅडल बोट असाव्यात, यासाठी ते आग्रही होते. त्याच्या उद्घाटनाच्या ाकार्यक्रमाला जरी ते उपस्थित होते तरी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती होऊनही निषेध म्हणून ते व्यासपीठावर गेले नाहीत.

जंगलातील अवैध वृक्षतोड असो, गाळ काढण्याच्या नावाखाली धरण परिसरातील बेकायदा मुरूम उत्खनन असो, अवैधरीत्या बाळगलेले पक्षी-प्राणी असो वा इतरही अनेक गोष्टी, आपली व वन्यजीव संरक्षकपदाची जबाबदारी दिवसाच्या कुठलाही प्रहर असो, त्यांनी असोशीने पाळली. रात्री-बेरात्री लागणाऱ्या वणव्यांबरोबरच पर्यावरणाच्या अनेक प्रश्नांवर स्थानिक गावकरी, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वयकाची भूमिका ते समर्थपणे निभावत. ज्या दिवशी त्यांना पक्षाघाताचा झटका आला, त्याच दिवशी दोन तास अगोदर ते जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटले होते. अंजनेरी राखीव क्षेत्रात होऊ घातलेल्या हेलिकॉप्टर राइडच्या व्यवसायिक उपक्रमाचा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांच्या अधिवासावर होऊ शकणाऱ्या आघाताचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी ती भेट होती.

आजारपणाच्या काळात तब्येतीत चढ-उतार होत असताना पक्षाघाताची तीव्रता जाणून घेण्याची चाचणी म्हणून डॉक्टरांनी त्यांना पक्ष्यांची शास्त्रीय नावे विचारली तेव्हा त्यांच्या अचूक उत्तराने डॉक्टरही अचंबित झाले होते. 'पक्ष्यांनी आज त्यांचा सच्चा मित्र गमावला' ही गिरीश टकले यांची राहा सरांबद्दलची प्रतिक्रिया अधिक बोलकी ठरते. हिमालयाच्या शिखररांगेतील एक असलेल्या पुमोरी शिखराच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले होते. शेरपा भाषेत त्याचा अर्थ होतो 'डोंगरकन्या'. अशा या डोंगराएवढ्या विशाल मनाच्या माणसाची स्मृती वटवृक्षाच्या रोपट्याच्या रूपाने बोरगडच्या पायथ्याशी जरी सांकेतिक रूपाने जपली असली तरी त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी परिस्थितीचा अहवाल लवकरच सादर करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून दुष्काळ निवारणासाठी लवकरात लवकर केंद्राकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पथकाने गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये दिली.

राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये आले होते. मालेगाव येथील जळगाव (निं.) आणि मेहुणे या गावातील दुष्काळ परस्थितीची पाहणी करून आलेल्या पथकासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री ओझर विमानतळावर चर्चा केली. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छावी झा, संचालक ए. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या घरफोड्यांत ‘एमपी’तील गँगचा हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवसभर टेहळणी करून रात्री सिन्नर शहरात घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेश राज्यातील टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. संशयितांनी सिन्नर शहरात बांधकाम साईटवर काम करीत असताना सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली.

ठाकूर उर्फ कालू हारू मण्डलोई (२३, रा. सिंगाचोरी, जि. धार) आणि करमसिंग कालू भुरिया (३२, रा. गुरडीया, जि. धार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथिदार मुन्ना हरी सिंग, अजयसिंग व करणसिंग (रा. सर्व सिंगाचोरी, जि. धार) हे फरार आहेत. सिन्नर शहरात मागील काही दिवसात सातत्याने घरफोडी सुरू होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या चोरांची चोरीची पद्धत लक्षात घेतली. त्यानुसार चोरटे परप्रांतातील असल्याचा निष्कर्ष काढला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून तपास करणारे पोलिस पथक मध्य प्रदेश येथे रवाना झाले. या पथकाने सिंगाचोरी गावात मजुरांच्या वेशात तीन दिवस तळ ठोकून दोघा संशयितांना पकडले. या दोघांनी फरार संशयितांच्या मदतीने सिन्नर शहरातील सरदवाडीरोड, शिवाजीनगर, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन आदी भागात सहा घरफोड्या केल्या होत्या. सिन्नर येथे नव्याने सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामावर काम मिळवून ही टोळी दिवसभर बंद घराची टेहळणी करायची आणि रात्री घरफोड्या करून पसार होत असे.

घरफोडीनंतर संशयिताची टोळी हायवेवर पोहचायची. तेथे मध्य प्रदेशात रजिस्टर असलेल्या वाहनास थांबवून शिर्डीमार्गे पसार व्हायचे. संशयितांच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. ही कारवाई निरीक्षक करपे यांच्या मार्गदर्शनाखीली सहाय्यक निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार दिलीप घुले, हेमंत गिलबिले, संदिप लगड, प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तात्या टोपेंच्या स्मारकासाठी निविदा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तालुक्यातील बाभूळभाव (बु) येथे होणारे स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत हे स्मारक साकारले जाणार आहे. ९ कोटी ४३ लाख ८४ हजार ४७ रुपये खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी येवला नगर परिषदेने जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे. ४ जानेवारीला ही निविदा उघडल्यानंतर या स्मारकाचे काम कंत्राटदाराला दिले जाणार आहे. केंद्राने या स्मारकासाठी १९ जुलै २०१६ रोजी निधी दिला होता. पण, दीड वर्षांत हे काम सुरू झाले नाही. आता राज्य शासनाचे पंधार टक्के व नगर पालिकेच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. बाभूळगाव शिवारातील सर्व्हे नंबर ४९,५० मध्ये हे स्मारक ३ .५० हेक्टरमध्ये बांधले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील ठाणगावपासून अवघे पाच किलोमीटर अंतरावरील घुटेवाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने शेळीचा फडशा पाडला.

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.

गोटेवाडी येथे गट नंबर २७४ मध्ये लक्ष्मण बहीरू मंडोळे कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घराशेजारीच जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. पहाटे चारच्या सुमारास गोठ्यातील जनावरांचा हंबरण्याचा आवाज आल्याने सर्व कुटुंब बाहेर आले. ते गोठ्याकडे जाताच गोठ्यातून बिबट्याने धूम ठोकली. मात्र तोपर्यंत बिबट्याने हल्ल्यात शेळीचा फडशा पाडला होता. मंडोळे कुटुंबासह नागरिकांनी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. वनविभागाने प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगड किल्लेदारांचे वंशज आज सादर करणार शोध निबंध

$
0
0

हातगड किल्लेदारांचे वंशज

सादर करणार शोध निबंध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इतिहास संशोधन मंडळातर्फे रविवारी, ९ डिसेंबरला सकाळी १०.१५ वाजता आनंद क्लासेस, किंगफिशर सभागृह, निलमय हाइट, जुनी पंडित कॉलनी गंगापूर रोड नाशिक येथे इतिहास, पुरातत्त्व व त्या अनुषंगाने येणारे विषयांवर शोध निबंध वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हातगडचे किल्लेदार गंगाजी गोबाजी मोरे-देशमुख यांचे तेरावे वंशज मनोहर मोरे-देशमुख हातगड, मोरे घराणे व त्यांच्याकडील ताम्रपटांविषयी माहिती देणार आहेत. वाचन कार्यक्रमात मोरेंसह चारजण शोध निबंध वाचन करणार आहेत. यात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. जी. बी. शहा हे 'माधवराव पेशवे व सिंहस्थ कुंभमेळा', हस्तलिखित तज्ज्ञ अनिता जोशी या 'नाशिकमधील आतुर संन्याय' तर रमेश पडवळ 'शोध निफाडचा' या विषयावर शोध निबंध सादर करणार आहेत. यावेळी नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गिरीष टकले व ज्येष्ठ सल्लागार इतिहास अभ्यासक डॉ. व्ही. पी. बिरार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रॉस वोटिंग’ची भीती

$
0
0

नवखे उमेदवार चिंतेत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चन्ट बँकेच्या २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रंगत वाढली असून, दुसरीकडे सभासदांचा गोंधळ वाढला आहे. या निवडणुकीत तीन पॅनल असल्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणत्याही एकाच पॅनलला एकतर्फी मते मिळतील, असे चित्र तूर्त नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या क्रॉस वोटिंगचा फटका नवख्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

सुमारे एक लाख ७६ हजार मतदान असलेल्या या निवडणुकीत सर्वाधिक मते ही नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या उमेदवारांमध्येही बहुतांश परिचीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जात, पक्ष, स्थानिक उमेदवार यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सभासदांची मते विभागली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल रिंगणात आहे. या पॅनलमध्ये ७५ टक्के उमेदवार हे माजी संचालक आहेत. या पॅनलच्या विरोधात भास्करराव कोठावदे, गजानन शेलार, अजय ब्रह्मेचा, ललित मोदी यांनी सहकार पॅनल उभे केले आहे. यातील उमेदवार सहकार क्षेत्रात काम करणारे आहे. अजित बागमार यांचे नम्रता पॅनल या रणधुमाळीत आहे. पण, यातील बरेच उमेदवार नामको निवडणुकीसाठी नवखे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत प्रगती व सहकार या दोन पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नम्रता पॅनलचे काही उमेदवारही या दोन्ही पॅनलमध्ये आपले बळ राखून आहे.

...

सभासदांचे पॅनल

निवडणुकीला वेळ असला तरी सर्वच उमेदवार परिचीत असल्यामुळे सभासदांनी आपले पॅनल तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. या क्रॉस वोटिंगमध्ये दोन पॅनललला अर्धे, अर्धे तर एका पॅनलचा एक असा फॉर्म्युलाही काही सभासदांनी तयार केला आहे. काही सभासदांनी पॅनलपेक्षा आपल्या जवळचे उमेदवार निवडले आहेत.

...

सहकाराच्या जाणकारांना स्थान

एकीकडे जात, पक्ष व स्थानिक उमेदवारांना बघून मतदान होणार असले तरी काही सभासदांनी मात्र बँकेत कोण चांगले काम करू शकतो, बँकेविषयी किती ज्ञान आहे, किती अनुभव आहे, हे निकष तयार करून त्याच उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

प्रचाराची रणधुमाळी

गेल्या काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी वाढली असून, प्रत्येक पॅनल आपल्या परीने सभासदांपर्यंत पोहचण्याचे काम करीत आहे. काहींनी गटागटाने, तर काहींनी वैयक्तिक संपर्कावर भर दिला आहे. कार्यालयाचे उद्घाटन, रॅली, बैठका यावर जोर दिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिवशाही’ पुन्हा घसरली

$
0
0

चांदोरीजवळ पिकअपला धडक; तीन जखमी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

औरंगाबाद डेपोची शिवशाही बसने पिकअप व्हॅनला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात व्हॅनमधील तीन प्रवासी जखमी झाले. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर चांदोरी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी हा अपघात झाला.

औरंगाबाद-नाशिक ही शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०५१७) निफाड येथील थांबा घेऊन नाशिकच्या दिशेने निघाली. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास चांदोरीजवळ निफाडहून नाशिककडे जाणारी महिंद्रा पिकअप (एमएच १६ क्यू ४२८०)ला शिवशाहीने पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे पिकअप रस्त्याच्या बाजूला उलटली. या व्हॅनमध्ये श्रीराम सिटी फायनान्सच्या दुचाकी होत्या. त्यामुळे या दुचाकींचेही नुकसान झाले. तर शिवशाही दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात घसरली. पिकअपमध्ये बसलेले रावसाहेब टर्ले, किरण मोगल, किरण चव्हाण (रा. कोठुरे) हे जखमी झाले असून, त्यांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सागर गडाख व मित्रपरिवाराने चांदोरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.

वाहक-चालक पोलिसात, प्रवासी वाऱ्यावर

या अपघातात पिकअप व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. शिवशाही बसचाही पत्रा कापला गेला. अपघात झाल्यानंतर बसचे चालक व वाहक यांनी सायखेडा पोलिस स्टेशन गाठून तिथे अपघात झाल्याचा प्रकार सांगितला. बसमधील प्रवासी आपापल्या सोयीने दुसऱ्या वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

अधिक तपास सायखेडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिपालीनगरला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र पल्सरस्वारांनी ओरबाडून नेले. ही घटना दिपालीनगर भागात घडली असून, या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आशा दत्तात्रेय शिंदे (५८, रा. हरिओम बंगला, दिपालीनगर) यांनी या घटनेबाबत तक्रार दिली. गुरुवारी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शिंदे यांच्या बंगल्यासमोरच पल्सरवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

चार मोलकरणींवर गुन्हा

घरकाम करणाऱ्या चार मोलकरणींनी घर मालकीनीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पाइपलाइनरोड भागात घडली असून, चोरीत रोकड व दागिने असा सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे. माया विष्णू निगोचकर, राणीबाई भगवान वाकळे (रा. दोघी प्रबुद्धनगर, सातपूर), सविता गणेश खरात (रा. संत कबीरनगर) व तृप्ती महेंद्र वानखेडे (रा. आनंदवल्ली शिवार, गंगापूररोड) अशी संशयित महिलांची नावे आहेत. पाइपलाइनरोडवरील मेनलो पार्कमध्ये राहणाऱ्या लिना पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पाटील यांच्याकडे घरकाम करण्यासाठी येणाऱ्या या महिलांपैकी एकीने १६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर ही चोरी केली. अज्ञात महिलेने पाटील यांच्या व त्यांच्या आईच्या बेडरूममधून ६५ हजाराची रोकड आणि सुमारे चार लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने असा पाच लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कंडारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवलेंच्या धक्काबुकीच्यानिषेधार्थ रेलरोक आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कल्याणजवळील अंबरनाथ येथे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना समाजकंटकाने धक्काबुकी केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी रात्री अंबरनाथ येथे एका व्यक्तीने धक्काबुकी केली. या घटनेचे पडसाद नाशिकसह राज्याच्या विविध भागात उमटले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रविवारी नाशिकरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घोषणाबाजी करीत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर सर्व कार्यकर्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात गेले. भुसावळ-मुंबई पॅसेजरसमोर उभे राहून घोषणाबाजी करीत रेलरोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील वाघ, नगरसेविका दीक्षा लोंढे, समीर शेख, भारत निकम, अमोल पगारे, पवन क्षीरसागर आदी उपस्थित होते. रेल्वे व बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिकरोड पोलिस, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यनृत्याविष्कारांचा बहर

$
0
0

'इंद्रधनुष्य'मध्ये रसिक मंत्रमुग्ध

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आवारात सुरू असलेल्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य' चा तिसरा दिवस गाजला तो विविध शास्त्रीय नृत्ये, भारतीय व पाश्चात्य गीत-संगीत, मुकाभिनय, मृद्कला, भिंतीचित्रे, वक्तृत्व व विविध विषयांनी सजलेल्या एकांकिकांनी. त्यामुळे राज्यातील विविध प्रांतातील लोककलांसोबतच भारतीय व पाश्चात्य अशा त्रिवेणी कलाविष्कारांच्या आस्वादाने रसिक समृद्ध झाले.

'इंद्रधनुष्य'च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात 'ताक-धिना-धीन, धिना धिन धा'च्या स्वरांनी झाली. एकापेक्षा एक अशा सरस 'ताल से ताल मिला' अशा सादरीकरणांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना बसल्या जागेवरच ताल पद्धतीने ठेका धरण्यास भाग पाडले. विविध विद्यापीठातील १२ स्पर्धकांनी सादर केलेल्या नृत्यांपैकी कृष्ण-गोपिका, शिवशंकर भावप्रकट करणारे कथ्थक नृत्य, तीन ताल नृत्य यांनी मने जिंकली. याच सभागृहात दुपारी मुकाभिनय स्पर्धा झाली. त्यात १५ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी प्रामुख्याने भारतीय वीर जवानांचे शौर्य व त्याग, बेसुमार वृक्षतोड व कमी होत जाणाऱ्या पर्जन्यमानामुळे उद्भवलेला व वाढत जाणारा मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष,प्रयत्नांती परमेश्वर असा यशाचा सकारात्मक संदेश देणाऱ्या मूकनाट्यांनी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचे प्रबोधनही केले.

विद्यापीठातील यश इन सभागृहात 'इतके का पुतळे ?' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेत १८ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी विषयास अनुसरून मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातून आपले मत प्रदर्शित केले. विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्त्रोत केंद्रात सकाळी भिंतीचित्र रेखाटन स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी 'पर्यावरण व समृद्ध भारत' हा विषय देण्यात आला. त्यात १७ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. येथेच दुपारी विषयमुक्त 'मृद्कला' मूर्तरूप स्पर्धा झाली. त्यात १७ विद्यापीठाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी संस्कृती, स्त्रीमुक्ती, वन्यप्राणी संघर्ष, क्रीडा आदी विषय हाताळले.

...

आधुनिक संगीताचा साज

विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात दिवसभर पाश्चात्य वाद्यवृंद, एकल व समूह गीत संगीताचा धुमधडाका सुरू होता. विविध प्रकारची विदेशी वाद्ये आणि त्यासोबत इंग्रजी गीतगायन यामुळे परिसरास आधुनिक संगीताचा साज चढला होता. या स्पर्धेतील एकल गीत गायनात ९,तर समूह गीत गायनात १० विद्यापीठांनी सहभाग घेतला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दादासाहेब फाळके सभागृहात एकांकिका स्पर्धा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुवारी बारा गाड्यांची यात्रा

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

गुरुवारी बारा गाड्यांची यात्रा

चंपाषष्ठीनिमित्ताने खंडेराव महाराज यात्रोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांच्या पंरपरेनुसार यंदाही पेठरोड येथे अतिप्राचीन मल्हारी राजा देवस्थानच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्ताने दोन दिवसीय खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवात गुरूवारी (१३ डिसेंबर) पहाटे ५ वाजता खंडेराव महाराजांचा अभिषेक आणि महाआरती होणार असून सकाळी ८ वाजता घोडा-काठी आणि ध्वजांसहित खंडेराव महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

गंगाघाटावरील खंडेराव कुंड ते पेठरोड परिसरातील खंडेराव महाराज मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. दुपारी २ वाजता गणेश पूजन, होम आणि देवता पूजन होणार असून, संध्याकाळी ५ वाजता बारा गाड्या ओढण्यात येणार आहेत. या गाड्या ओढण्याचा मान देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र निकम यांच्याकडे असून, संध्याकाळी ७ वाजता खंडेराव महाराजांची महाआरती होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजेपासून भाविकांना चंपाषष्ठीनिमित्ताने महाप्रसादाचा लाभ घेता येणार असून, रात्री ९ वाजेपासून जागरण गोंधळाचा कार्यक्रम देवस्थानाच्या ठिकाणीच होणार आहे. शुक्रवारी (१४ डिसेंबर) सकाळी ७ वाजता पुन्हा खंडेराव महाराजांची पालखी काढण्यात येणार असून, सकाळी १० वाजता या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शाहू पवार, उपाध्यक्ष गणेश मते, खजिनदार मयूर डोंगरे यांसह इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला होणार शेतकरी प्रशिक्षण केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील ओझर येथे ५९ लाख ७० हजार रुपये खर्च करून पहिले शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ई-निवदा प्रसिद्ध केली असून, नावीन्यपूर्ण कामातून हे शेतकरी केंद्र उभारले जाणार आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांसाठी काय सुविधा असले याची माहिती अद्याप दिलेली नसली तरी हे शेतकरी केंद्र शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून हे काम दिले आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले आहे. या ई टेंडरची विक्रीसाठी ७ ते २१ डिसेंबर ही मुदत दिली आहे. त्यानंतर ७ ते २१ डिसेंबरपर्यंत टेंडर भरण्यासाठी मुदत दिली आहे. २९ डिसेंबर रोजी या निविदा उघडून त्यानंतर कंत्राटदाराला हे काम दिले जाणार आहे. या टेंडरला किती प्रतिसाद मिळतो यावरही बरंच अवलंबून आहे. या टेंडरसाठी ५ हजार फी असून, डीजिटल सही व निविदा फी व इसारा रक्कम ही इंटरनेट बँकिंगने भरायची अट आहे.

शेतकरी केंद्राची आवश्यकता

शेतकऱ्यांना शेतीविषयी शास्त्रीय माहिती देण्यापासून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी शेतकरी केंद्र आवश्यक आहे. त्यातून बाजारभाव, शाश्वत शेती, आधुनिक शेती यासारख्या अनेक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खते, जमिनीचा पोत, हवामान, आधुनिक तंत्राचा वापर याची माहितीसुध्दा या केंद्रातून देणे गरजेचे आहे.

''नावीन्यपूर्ण योजनेतून ओझरला शेतकरी प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्याची ई निविदा प्रसिद्ध झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र उपयोगी आहे.'' - अनिल कदम, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपर ब्रेन्स’मध्ये राज जैन प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'सुपर ब्रेन्स २०१८' या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत बुद्धीमत्तेची चुणूक दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना घवघवीत बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. दहावीच्या गटातून राज जैन याने लॅपटॉप हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर प्रतीक पुरी हा विद्यार्थी टॅब या दुसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरला.

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी हा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर आयआयटीयन्स पेसचे सुमेन्द्र श्रीवास्तव, सुनील कुमार यांच्यासह प्रदीप नहार, अंकुर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात देशाला चांगले व कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने टाइम्स ग्रुपच्या वतीने 'सुपर ब्रेन्स' परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटीयन्स पेस या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर होते. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेत ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दहावीच्या गटात राज जैन प्रथम बक्षिसाचा, तर प्रतीक पुरी हा द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. गार्गी बक्षी या विद्यार्थिनीला अॅमेझॉन किंडल हे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नववीच्या गटात वेदांत पाटील (प्रथम), अनन्या बाघेल (द्वितीय), तर उदयन पवार यास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आठवीच्या गटात ध्रुव वर्मा (प्रथम), सिध्दी गुंजाळ (द्वितीय) आणि इशान गाढवे (तृतीय) यांनी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे ११ हजार रुपये, आठ हजार रुपये व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. आयआयटीयन पेसच्या काउंसेलर मृणाल कापसे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. पहिल्या १० उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना गिफ्ट व्हाऊचर्स, तर टॉप १०० स्पर्धकांना आकर्षक स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

यावेळी सुनील कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जेईईच्या स्पर्धेत ३६० पैकी ३६० गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य तेवढ्या लवकर तयारी सुरू करणे महत्वाचे ठरते, असा कानमंत्र दिला. आयआयटी प्रवेश परीक्षेसह जेईई, नीट, एनटीएसई, केव्हीपीवाय, होमीभाभा, ऑलिंपियाड या परीक्षांमध्ये चमकदार यश मिळविण्यासाठी काय तयारी करायला हवी याची माहिती त्यांनी दिली. सृजन कन्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी होण्यासाठी सब कुछ चलता है ही मानसिकता झटका, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र केसरीसाठी२० कुस्तीपटूंची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहर तालिम संघाच्या मखमलाबाद येथील जय बजरंग तालिम संघातर्फे रविवारी (दि. ९) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लाल मातीवरील कुस्ती प्रकारात १० आणि मॅटवरील कुस्ती प्रकारात १० अशा २० कुस्तीपटूंची निवड करण्यात आली.

मखमलाबाद येथे ही निवड चाचणी घेण्यात आली. जालना येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हे निवड झालेले कुस्तीपटू सहभागी होतील. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून या निवड चाचणीस प्रारंभ झाला. जिल्हाभरातून शेकडो कुस्तीगिरांनी या निवड चाचणीस हजेरी लावली होती. या चाचणी प्रसंगी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेवक संजय चव्हाण, दामोदर मानकर, हिरामण वाघ, जय बजरंग तालिम संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या सायकली कुणीकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची 'सायकल सिटी' ओळख कायम व्हावी यासाठी 'स्मार्ट सिटी'अंतर्गत शहरात मोठ्या थाटामाटात सायकल शेअरिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. महापालिकेकडून ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा दोन महिन्यातच पूर्णतः गोंधळ उडाला आहे. शेअरिंग सायकली आहेत, पण दिसत नसल्याची चर्चा शहरात रंगत आहे. शेअरिंग सायकलचे कंट्रोल असणाऱ्या हेक्सी अॅपवर शेअरिंग सायकल मोठ्या संख्येने दिसत असून, वास्तवात सायकल पॉइंटवर ती उपलब्ध नसल्याचे दिसून येते. यामुळे सायकलप्रेमी नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल १०० ठिकाणी 'पब्लिक बायसिकल शेअरिंग' या प्रकल्पाचे लोकार्पण १० ऑक्टोबर रोजी केले. दोन महिन्यांतच या प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरात डॉकिंग स्टेशनवर (सायकल पॉइंट) अल्प प्रमाणात सायकली उभ्या असल्याचे दिसते. काही ठिकाणच्या सायकली नादुरूस्त झाल्या आहेत. या सायकलींची देखभाल होत नसल्याचे दिसून येत आहे. सायकल वापरण्यासाठीचे हेक्सी अॅप एक लाखांहून अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले असून, त्यावर दाखविल्या जाणाऱ्या सायकली मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी नसल्याचे दिसते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पाचा लाभ घेण्याची इच्छा असूनही, नागरिकांचा हिरमोड होत आहे.

घराजवळ देतात सोडून

महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड, जेहान सर्कल, गोल्फ क्लब, राजीव गांधी भवन, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या सायकल पॉइंटवर कायम चार ते सहा सायकली उभ्या असल्याचे दिसते. यासंदर्भात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या पॉइंटवरील सायकल घेऊन गेलेली व्यक्ती दुसऱ्या पॉइंटवर सायकल लावत असल्याचे दिसते. पहाटे ४ ते ६ च्या सुमारासही या पॉइंटवर फक्त चार ते पाच सायकली उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणच्या सायकली जातात तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सायकल पॉइंटवर सायकल पार्किंग करण्याऐवजी घराच्या परिसरात सायकल पार्किंगला प्राधान्य दिले जात असल्याचे सध्या दिसत असून, सायकल पॉइंटव्यतिरिक्त इतरत्र सायकल पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

\Bतुटक्या सायकली बेवारस

\Bशहरातील अनेक ठिकाणी या सायकली बेवारस सोडून दिलेल्या आढळतात. गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालय कार्यालयाच्या समोरील बस स्टॅँडच्या मागे गेल्या आठ दिवसांपासून एक सायकल मोडक्या अवस्थेत तशीच सोडून देण्यात आली आहे. गणेशवाडी आणि गोल्फ क्लब मैदान येथील सायकल पॉइंटवर उभ्या असलेल्या एका सायकलचे सीट तुटल्याचे दिसते आहे. या मोडक्या आणि बेवारस सायकलींकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. \B

'या' पॉइंटवर एकही सायकल नाही

\Bप्रमोद महाजन गार्डन, पशु वैद्यकीय रुग्णालय आणि मॅरेथॉन चौक या शेअरिंग सायकल पॉइंटवरील सायकल गायब झाल्याचे चित्र आहे. पहाटे ४.३०, सकाळी ६, सकाळी १०, दुपारी २, संध्याकाळी ५ आणि रात्री ११ वाजता या पॉइंटवर गेले असता, कोणतीही सायकल दिसत नाही. जुना गंगापूर नाका ते अशोक स्तंभ परिसरातील एकाही पॉइंटवर सायकल उपलब्ध होत नसल्याने सायकली कुठे गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाचे सायकल शेअरिंग प्रकल्पाकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असून, ट्रॅकिंग सिस्टिमवर योग्य नियंत्रण नसल्याने सायकल पॉइंटवरील सायकली गायब होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

\Bतरुणांकडून अधिक वापर

\Bअशोक स्तंभ, जुना गंगापूर नाका, कॉलेज रोड, पंडित कॉलनी, विद्या विकास सर्कल या परिसरात बाहेरगावाहून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले तरुण मोठ्या संख्येने राहतात. तसेच या परिसरात कॉलेज व खासगी होस्टेलचे प्रमाणही अधिक आहे. या विद्यार्थ्यांकडे वाहने नसल्याने ते शेअरिंग सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे दिसून येते. कॉलेज, क्लास आणि नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी या सायकलचा वापर करत असल्याचे हे विद्यार्थी सांगतात. पण ही तरुण मंडळी सायकल पॉइंटवर पुन्हा सायकल आणून उभी करणे टाळत असल्याने या ठिकाणच्या पॉइंटवरील सायकलची संख्या कमी असल्याचे दिसते.

शेअरिंग सायकल हा अतिशय चांगला प्रकल्प असून, व्यायामासह जवळपासच्या कामांसाठी या सायकलींचा उपयोग होतो. नाशिककरांच्या हितासाठी राबविण्यात आलेला हा प्रकल्प कायमस्वरुपी जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

- कैवल्य एखंडे, सायकल वापरकर्ता

कॉलेज आणि क्लासमध्ये जाण्यासाठी शेअरिंग सायकलचा फायदा होतो. अतिशय अल्प किमतीमध्ये चांगल्या दर्जाची सायकल वापरण्यास मिळते. पण अनेक सायकल पॉइंटवर सायकली उपलब्ध होत नाहीत. सायकल नेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी किंवा इतर पॉइंटवर उभी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने कटाक्षाने पाळायला हवी.

- सूरज बोरसे, सायकल वापरकर्ता

जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीचा वापर करण्यापेक्षा स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. कुठल्याही सायकलिस्टसाठी शेअरिंग सायकल ही नवीन संकल्पना फायदेशीर आहे.

- वैभव दीक्षित, जॉगर

शहरात सुरू करण्यात आलेला शेअरिंग सायकलचा उपक्रम कौतुकास्द आहेत. यामुळे व्यायामाच्या दृष्टीने नागरिक मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर करतात. दररोज ट्रॅकवर फिरायला येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट सायकलचा उपयोग करताना दिसतात.

- अभिराम भोळे, जॉगर

शेअरिंग सायकलचा आम्हाला फायदा होत असून, सकाळी सायकल पॉइंटवर सायकल्स असतात. मात्र, वर्दळ वाढल्यानंतर पॉइंटवरील सायकलची संख्या कमी होत जाते. सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, होस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये या सायकली वापरण्याचे प्रमाण अधिक आहे.

- नीरज बोरस्ते, सायकल वापरकर्ता

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना, शेअरिंग सायकलचा नवा पर्याय अतिशय उत्तम आहे. व्यायामासोबतच इंधन बचतीसाठीदेखील याचा फायदा होत असून, नाशिककरांनी या शेअरिंग सायकलचा योग्य वापर करायला हवा. अनेकदा सायकल पॉइंटवर सायकल्स उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.

- नरेंद्र झाडगे, सायकल वापरकर्ता

सायकल शेअरिंगचा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साह आहे. पण ज्या संख्येने सायकल पॉइंटवर सायकल उभ्या असायच्या, ती संख्या आता कमी होऊ लागली आहे. अनेकजण घराजवळ तसेच कामाच्या ठिकाणी कुठेही सायकल उभी करत असल्याने सायकल पॉइंटवर सायकल उपलब्ध होत नाही.

- रमन साळुंके, जॉगर

शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वजण शेअरिंग सायकलचा वापर करत आहेत. व्यायामासोबतच कामावर, कॉलेजमध्ये तसेच शाळेत जाण्यासाठी या सायकलचा वापर होत आहे. या प्रोजेक्टमुळे नाशिककरांना फायदा होत असून, त्याची जबाबदारी नाशिककरांनी देखील पेलण्याची गरज आहे.

- निखील गायकवाड, जॉगर

(संकलन - सौरभ बेंडाळे, कल्पेश उघडे, हर्षल भट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगात रंगली रंगोत्सव स्पर्धा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ निसर्गचित्रकार स्व. शिवाजीराव तुपे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबाबत यथोचित आदर व्यक्त करण्यासाठी कला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी अक्षय डांगे याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक चित्रकला महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन काळे, तर तृतीय क्रमांक अभिनव कला महाविद्यालयाचा विद्यार्थी रूपेश सोनार याने मिळवला. उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये स्वप्नील पाने व राहुल सातपुते यांचा समावेश आहे.

स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांसाठी प्रथम ७ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार ५ हजार व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार ३ हजार व प्रमाणपत्र तर प्रत्येकी १ हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. ही स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी होती. याचवेळी स्केचिंग स्पर्धादेखील घेण्यात आली. त्यात हृषिकेश भंडारे प्रथम, हेमंत पाटील द्वितीय तर चिराग शिवांगे तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे १०००, ७०० व ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. स्केचिंग तसेच प्रत्यक्ष निसर्गचित्रण या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण चित्रकार अमोल पवार यांनी केले. स्पर्धेत ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मालेगाव, गुलबर्गा या ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ता बालिगा यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात योगेश गुप्ता या सायकलिस्टचा सत्कार चित्रकार पंडित सोनवणी यांच्या हस्ते करण्यात आला. अमोल पवार यांचा परिचय अशोक ढिवरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ज्योती अष्टपुत्रे यांनी केले. स्पर्धेसाठी संयोजक प्रसिध्द चित्रकार मुक्ता बालिगा, अनिल तुपे, अशोक ढिवरे, धनंजय गोवर्धने यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालभवन प्रथम सत्र पारितोषिक वितरण

$
0
0

बालभवनतर्फे पारितोषिक वितरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या साने गुरुजी कथामाला- बालभवनचा प्रथम सत्रातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. सुभाष देशमुख व राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाला. याप्रसंगी सपान निर्मित सचिन शिंदे दिग्दर्शित व सुषमा देशपांडे लिखित 'व्हय मी सावित्रीबाई' हा एकल नाट्य प्रयोग दामिनी जाधव यांनी सादर केला.

यावेळी बोलताना प्रा. सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक वाचनालयाचे बालभवन म्हणजे विद्यार्थ्यांचे कलागुण प्रदर्शित करण्याचे हक्काचे व्यासपीठच आहे. मुलांनी मोबाइलपासून दूर राहून उच्च ध्येय ठेवावे असे सागितले. राहुल सूर्यवंशी यांनी विद्यार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बालभवन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते हे नक्कीच अभिमानस्पद आहे असे सांगितले व कल ओळखून त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवनप्रमुख संजय करंजकर यांनी व सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले. यावेळी सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, शंकरराव बर्वे, वसंत खैरनार, डॉ. शंकर बोऱ्हाडे, संगीता बाफणा, गिरीश नातू, समिती सदस्य अर्चना सूर्यवंशी, ज्योती फड, सुनील बस्ते, वैभव पाटील, कुशारे, बस्ते, प्रा. सोमनाथ मुठाळ, विविध शाळांचे विद्यार्थी व पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेला ग्राहक न्यायमंचचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चुकीचे तिकीट देऊन रिफंड देण्यासाठी उशीर लावल्यामुळे रेल्वेला ग्राहक न्यायमंचाने दणका देत १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या दंडात मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व पाच हजार रुपये अर्जाच्या खर्चाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ११ महिन्यानंतर रिफंड केलेल्या रकमेवर व्याज देण्याचेही निर्देश दिले आहेत.

जेल रोडवरील आशियाना संकुल येथे राहणाऱ्या कल्याणक्रिष्ण एन. नायर यांनी मध्य रेल्वेच्या नाशिकरोड स्टेशनवरील तिकीट रिझर्व्हेशन सुपरवायझरविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. या तक्रारीत नायर यांनी म्हटले आहे की, नाशिकरोड स्थानकावर मी एर्नाकुलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन काढण्यासाठी गेलो होतो. तेथे मी, मुलगा व पत्नीचा रिझर्व्हेशन फॉर्म भरून त्यात एर्नाकुलम ते नाशिकरोड असे तिकीट मिळण्याचे नमुद केले. पण, मला एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन दिल्ली असे ७१२० रुपयांचे तिकीट देण्यात आले. त्यामुळे मला २६०० रुपये जास्त मोजावे लागले. सदरची रक्कम क्रेडिट कार्डमधून दिली होती. ही गोष्ट मी बुकिंग करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तिकीट रद्द केले. मात्र, तिकिटाची रक्कम परत करण्यासाठी मोठी प्रक्रिया असून, वेळ लागेल असे सांगितले. त्यानंतर वारंवार त्यासाठी पत्रव्यवहार करावा लागला. चकरा माराव्या लागल्या.

रेल्वेची बाजू

या तक्रारीनंतर रेल्वेने आपली बाजू मांडताना सांगितले की, रेल्वेने अशा प्रकारणात न्यायनिवाडा करण्यासाठी रेल्वे ट्रिब्यूनल आहे. त्यामुळे न्यायमंचास ही केस चालविण्याचा अधिकार नाही. पण, न्यायमंचाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम ३ नुसार प्रस्तुत केस चालवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायमंचाने या तक्रारीवर हा निकाल दिला. या निकालात सेवा देण्यास रेल्वेने कमतरता केली असून रेल्वे प्रशासनाने भविष्यात घडणाऱ्या यासारख्या घटनांची त्वरित दखल घेऊन तत्काळ रिफंड द्यावा, असे सांगितले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्य सचिन शिंपी यांनी दिला. नायर यांच्यातर्फे अॅड. सुमेधा कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images