Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहीद जवानाच्या कुटूंबाला मदत

$
0
0

जवानाच्या कुटुंबाला मदत

जेलरोड : शिंदेवाडीचे शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक सुनील आडके, अशोक सातभाई आदी उपस्थित होते. बँकेतर्फे आतापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्त, केरळ पूरग्रस्त आदी प्रसंगात बँकेतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धावत्या रेल्वेतील मोबाइलवर ‘काठी’ने डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

धावत्या रेल्वेतील प्रवाशांवर लाठीहल्ला करून मोबाइल चोरण्याचा अजब प्रकार सुरू झाला आहे. नाशिकरोड स्टेशनजवळच हा प्रकार घडत आहे. या चोरांवर कारवाई करुन धडा शिकविण्याची मागणी होत आहे.

नाशिकरोड स्टेशन परिसरात नशा करणारे गर्दुले, भुरटे चोर, गुन्हेगार यांचा त्रास वाढला आहे. गुर्दुल्ल्यांना तर पोलिसही वैतागले आहेत. नशेसाठी हे गर्दुले प्रवाशांचे किमती साहित्य चोरतात. बाहेरगावच्या गरिब प्रवाशांना ते लुबाडतात, मारहाण करतात. प्रवाशांच्या बॅगा लंपास करतात. स्टेशनवर प्रवाशांना डुलकी आली की त्यांचा मोबाइल व किमती वस्तू लांबवतात. आता गर्दुल्ल्यांबरोबरच भुरट्या चोरांनी मोबाइल चोरीची अनोखी शक्कल लढवली आहे.

नाशिकरोड स्टेशनवरून प्रवाशांना घेऊन रेल्वेगाडी मनमाडच्या दिशेने निघाली की देवीचौक पार करून रेल्वेच्या ब्रह्मगिरी गेस्ट हाऊसजवळ येते. तेथून नवले चाळ व प्रेसपर्यंत रुळाच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. चोर झाडीमध्ये काठ्या घेऊन दबा धरुन बसतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या दरवाजात प्रवासी मोबाइल घेऊन बोलण्यासाठी उभे राहतात. त्यांच्या हातावर हे चोर काठी मारुन मोबाइल खाली पाडतात. किमती मोबाइल घेऊन ते पलायन करतात. नाशिकरोड परिसरातच मोबाइल विकतात. गाडीने वेग घेतलेला असल्यामुळे प्रवाशांना खाली उतरता येत नाही. मोबाइल चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतरही मोबाइल हाती लागेल याची शाश्वती नसते.

पोलिसांकडे तक्रार

लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवासी तक्रार देण्याचे टाळतात. कारण त्यांना नाशिकरोडला कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी यावे लागते. खर्च आणि मनस्ताप वाढतो. नवले चाळ परिसरात राहणारे नाशिकरोडचे समाजसेवक जगन गवळी यांनी नाशिकरोड पोलिस, नाशिकरोड रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस येईपर्यंत चोर फरार झालेले असतात. ब्रह्मगिरी गेस्ट हाऊसपासून नाशिकरोड प्रेस, पवारवाडी या पट्ट्यात पोलिसांनी गस्त घातल्यास चोरांना पकडता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याचा नकली हार चार लाखांत विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करायचे आहे, अशी भावनिक कारणे सांगत नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एकाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला. या प्रकरणी नागपूरमधील एका महिलेसह विजय दशरथ चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संतोषकुमार त्रिवेणीसिंग यादव (रा. मिलन लाइन, साताबट्टा, देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे. एक डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत देवळालीतील रेणुकादेवी मंदिर परिसरात संशयित विजय चौधरी व एक महिला यादव यांना भेटली़ या दोघांनी घर गहाण असल्याचे, तसेच बहिणीचे लग्न करायचे असल्याची करुण कहाणी यादव यांना सांगत त्यांना भावनिक केले. यानंतर पैशांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून जवळील ७९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नकली हार देऊन तो खरा असल्याचे भासवून यादव यांच्याकडून चार लाख रुपये घेतले. यादव यांनी फार चौकशी न करता पैसे त्यांना दिले. या हाराच्या सत्यतेबाबत यादव यांनी पाठपुरावा केला असता तो नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

डिक्कीतून मोबाइल लंपास

भगूर येथील रहिवासी कुणाल भवर या तरुणाच्या दुचाकीच्या (एमएच १५/जीपी १७०६) डिक्कीत असलेला साडेसोळा हजार पाचशे रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास भद्रकाली परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी घसरून मृत्यू

मुंबई- आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराजबाबा लोणारकर (वय ७७, रा. श्रीकृष्णवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (ता. १५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़ महंत लोणारकर महाराज मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील प्रेमदानसमोरून दुचाकीवरून (एमएच १५/डीवाय ३७६६) जात होते़. अचानक त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी बाळू नेरकर (रा़ महानुभाव आश्रम, अंजनेरी) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

प्रवासात दागिने लंपास

महामंडळाच्या बसने शिर्डी येथे जात असलेल्या मुंबईतील महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली. वंदना घेगडमल (रा. सोमय्या ट्रस्ट, टिळकनगर) शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकावर शिर्डी बसमध्ये बसल्या होत्या. या वेळी चोरट्यांनी त्यांची ७० हजार रुपयांची सोन्याची पाच तोळ्यांची पोत लंपास केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दुचाकींची चोरी

शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी बुलेटसह चार दुचाकी लंपास केल्या. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. टाकळी रोडवरील शांती पार्कमधील रहिवासी समीर धोपावकर यांची ९० हजार रुपयांची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच १५/जीई ९६५३) चोरट्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमधून लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सिडकोतील राजरत्ननगरमधील रहिवासी बापू पवार यांची बजाज बॉक्सर दुचाकी (एमएच १५/एएल १५९२) ठक्कर बाजारमधील हॉटेलच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सीबीएसजवळील कान्हेरेवाडीतील राजेंद्र सुराणा (रा. रामकृपा बिल्डिंग) यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५/ईटी ४४६७) चोरट्यांनी सुराणा यांच्या घराजवळून लंपास केली. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील लोहशिंगवे येथील किसन पाटोळे यांची स्प्लेंडर प्लस (एमएच १५/सीए १६२७) चोरट्यांनी घराजवळून लंपास केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालहक्कांसदर्भात आज प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई व 'सेव्ह द चिल्ड्रेन' यांच्या सहकार्याने आज (१७ डिसेंबर) बालकांशी संबंधित प्रमुख भागधारकांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल कॅम्फोटेल, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजता यादरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

रस्त्यावरील परिस्थितीत राहणारी बालके ही शहरी भारतात सर्वत्र आढळून येतात. ही मुले ट्रॅफिक सिग्नल, रेल्वे प्लॅटफॉर्म, धार्मिक स्थळे, बस किंवा रिक्षा स्टॅण्डजवळ, पुलाखाली, फूटपाथवर आढळतात. त्यांना प्रत्येक दिवस मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रस्त्यावरील राहणारा मुलांचा गट हा भारतातील शहरी भागात वेगाने वाढणारा समूह मानता जात आहे. अशा बालकांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर लोकनेते गोपीनाथ मुंढे जयंतीनिमित्त भागवत सप्ताहालाही घुगे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळीतून एचआयव्ही जनजागृतीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड आणि यश फाउंडेशनतर्फे एचआयव्ही एड्स विषयाशी संबंधित रांगोळी स्पर्धेत सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयाच्या गौरी चव्हाण या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालयात ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालय, वस्तीपातळीवरील किशोरवयीन युवती अशा ११० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजामध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश होता. महिंद्रा आणि महिंद्राचे नामदेव येलमामे, चित्रकार मुक्ता बालिगा, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. रांगोळीची मांडणी, रंगसंगती आणि एचआयव्हीशी संबंधित संदेश अशा त्रिसूत्री निर्देशांचा विचार करून स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. गौरी चव्हाण हिने ७०१ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक पटकावले. सावतानगर येथील ऋतुजा अमोल बेहेरे हिने ५०१ रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे, तर याच विद्यालयाच्या सुमन सलगू हिने ३०१ रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याच विद्यालयाच्या पूजा सुरेश बोरसे व कोमल रवींद्र भोळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यश फाउंडेशनच्या मेघा भाबड, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंखे, कविता साठे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस११

$
0
0

जिवा पांडू गावित

आमदार, कळवण-सुरगाणा

विजय ओहोळ

माजी नगरसेवक

मुक्तेश्वर मुनशेट्टीवार

ज्येष्ठ कामगार नेते

प्रदीप भुतडा

वकील

सुभाष पाटील

समन्वयक, एमकेसीएल

सुभाष सोमवंशी

बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिनेचोरास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वयोवृद्धांसह एकट्यादुकट्या महिलेला गाठून पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अटक केला. त्याच्या ताब्यातून साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अटकेने शहरातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

कुर्बान अली परवेज अली (वय ४५, रा. नांदुरा, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत शहरात पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. त्यामुळे पोलिस संशयिताच्या मागावर होते. युनिट एकचे निरीक्षक आनंदा वाघ आणि सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. नांदुरा (जि. बुलडाणा) येथील संशयित शहरात येऊन वयोवृद्धांसह एकट्या महिलांना गाठून अलंकार हातोहात लंपास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने त्याला नांदुरा येथे अटक केली. त्याने शहरातील गंगापूर, सरकारवाडा आणि भद्रकाली हद्दीत पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास केल्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून तीन लाख ४८ हजार ७५० रुपयांची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पालकर, पोपट कारवाळ, हवालदार रवींद्र बागूल, जिवाजी महाले, प्रवीण कोकाटे, बाळासाहेब दोंदे, वसंत पांडव, संजय मुळक, पोलिस नाईक आसीफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, संतोष कोरडे, शिपाई विशाल देवरे, शांताराम महाले, रावजी मगर, विशाल काठे, नीलेश भोईर, स्वप्निल जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, प्रतिभा पोखरकर, चालक दीपक जठार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारपणाला नकारात्मकता कारणीभूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वर्तनावर आपसूक होत जातो. त्यामुळे आपली मानसिकता खालावत जाते. मानसिकतेत कायम नकारात्मक विचारांचे आदानप्रदान होत राहिल्यास तणाव अधिकाधिक वाढू लागतो. हाच तणाव पुढे आजारपणाला कारण ठरतो. याचाच अर्थ, नकारात्मक विचार आजाराचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन सत्याचार्या वैशाली दराडे यांनी केले. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे टिळकवाडी येथे 'तणावमुक्त राहण्याचे तंत्र' या विषयावर शिबिर झाले. शिबिरात सत्याचार्या दराडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी निरोगी आयुष्यासाठी कायम सकारात्मक विचारांचे सान्निध्य गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. विजय घाटगे आणि डॉ. विद्या शिंदे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोतवालांचे आजपासून ‘भीक मांगो’ आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील कोतवालांनी सोमवारपासून (दि. १७) भीक मांगो आंदोलनाचा प्रशासनाला लेखी इशारा दिला आहे. राज्यातील कोतवालांनी कामबंद ठेवून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या २८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली १९ नोव्हेंबरपासून येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे कोतवालांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी राज्यातील कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांकडून चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या मागण्या शासनदरबारी सातत्याने केल्या जात आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी कोतवालांनी यापूर्वी वेळोवेळी आंदोलनेही केली. परंतु, सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. दुसरीकडे एकछत्री योजनेत समावेश करून कोतवालांची राज्य सरकारने दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने केला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. एकछत्र योजनेचा अहवाल प्राप्त झालेला असतानाही सरकार ठोस निर्णय घेण्यासही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कोतवालांच्या संघटनेने केला आहे. गेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेल्या कोतवालांच्या आंदोलनाची सरकारकडून सकारात्मक दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत कोतवाल सोमवारपासून (दि.१७) भीक मांगो आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात लेखी निवेदन आयुक्तालय प्रशासनाला दिले आहे.

पालकमंत्र्यांवरही नाराजी

राज्यभरातील कोतवालांचे नाशिकरोड येथे २८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कोतवालांनी खेद व्यक्त केला आहे. या जिल्ह्यात पालकमंत्री आहे की नाही, असा प्रश्न करीत कोतवालांनी पालकंमत्र्यांविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. महाजनांच्या केटूके मोहिमेची अमेरिकेत नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी दहा दिवस, दहा तास आणि एक मिनिटात पूर्ण केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी (केटूके) या ३ हजार ८५० किलोमीटरच्या मोहिमेची अमरिकेतील वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनच्या (डब्ल्यूयूसीए) विक्रमांच्या वहीत नोंद झाली आहे. याबाबतचा ईमेल डॉ. महाजन यांना प्राप्त झाला असून, डब्ल्यूयूसीएच्या संकेतस्थळावरही याबाबत नोंद झाली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ८५० किमीचे अंतर ५ डिसेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान अवघे १० दिवस १० तास आणि १ मिनिटात एकट्याने पूर्ण करण्याचा विक्रम डॉ. महेंद्र महाजन यांनी केला होता. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी डब्ल्यूयूसीए तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांना कळविण्यात आले होते. विशेष म्हणजे ही मोहीम विक्रमी काळात पूर्ण करण्यासाठी डब्ल्यूयूसीए आणि गिनिजकडून जास्तीतजास्त १२ दिवसांचा कालावधी मिळाला होता.

मोहीम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण माहिती डब्ल्यूयूसीएला पाठविण्यात आली. त्याची दखल घेत माहितीची सत्यता पडताळून डब्ल्यूयूसीएने विक्रमाची खातरजमा करून अखेर क्रॉस कंट्री प्रकारात 'इंडिया नॉर्थ टू साऊथ' या नावाने विक्रमाची नोंद घेतली आहे.

नाशिकचा अभिमान

या विक्रमाची नोंद करताना विक्रम पूर्ण करणाऱ्याचे मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र अशी केली गेल्याचा खूप अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. महाजन यांनी दिली. डब्ल्यूयूसीएने मोहिमेबाबतचा संपूर्ण अनुभव नोंदपत्रिकेवर नोंदवून घेतला आहे. त्यांच्या संकेतस्थळावर हा अनुभव वाचण्यास उपलब्ध असल्याचे महाजन यांनी सांगितले.

या मोहिमेत 'खेलो इंडिया' आणि 'तंबाखू बंद' अभियानाला समर्थन करण्यात आले. या विक्रमाच्या नोंदीचे संपूर्ण श्रेय डॉ. महाजन यांनी त्यांच्या या मोहिमेतील क्रू मेंबर्स किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे, सागर बोंदार्डे आणि संदीप परब तसेच भाऊ सायकलिस्ट हितेंद्र महाजन, प्रवीण पाटील, प्रशिक्षक मितेन ठक्कर, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खबिया आणि सायकलिस्ट परिवाराला दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहार फेरफारप्रकरणी कारवाईचे आदेश

$
0
0

मंत्री जयुकुमार रावल यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत प्रशासनाकडेदेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात ही बाब तपासण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांनी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील छात्रालयाला भेट दिली. या भेटीत मंत्री जयकुमार रावल यांनी शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थांचा फेरफार करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करण्याची आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री जयकुमार रावल हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक धडगाव तालुक्यातील वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट दिली. या वेळी शालेय पोषण आहारातील वेळापत्रकानुसार मुलांना जेवण मिळत आहे की नाही याची पाहणी मंत्री रावल यांनी केली. तसेच पोषण आहारातील खिचडी स्वतः खाऊन खाद्य पदार्थांचा दर्जाही तपासला. यामध्ये छात्रालयात खिचडी तर दिली जात होती. पण वेळापत्रकानुसार मटकी ऊसळ मात्र दिली गेली नव्हती. याबद्दल रावल यांनी नाराजी व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांना पोषण आहार न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

शालेय पोषण आहाराची आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी अचानक वडफळ्या गावातील नरेंद्र नवोदय छात्रालयाला भेट दिवून पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या अचानक दिलेल्या भेटीमुळे स्थानिक नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी जयकुमार रावल यांनी स्थानिक पालक, नागरिकांशी संवादही साधला. पोषण आहारातील खिचडीही खाल्ली. स्वयंपाकखोली, शाळेची पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जर यापुढे विद्यार्थ्याच्या कोणत्याही तक्रारी असतील याबाबत संबंधित विभागाने सोडविल्या नाहीत तर मी स्व:ता येवून प्रश्न मार्गी लावेल, कोणताही विद्यार्थी शालेय शिक्षण व पोषण आहारापासून वंचित राहीला तर याला शिक्षण विभाग जबाबदार असेल, असेही मंत्री रावल यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईएनटी

$
0
0

ईएनटीबाबत जनजागृती व्हावी

डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाक, कान व घसा या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची खूपच गरज आहे. या क्षेत्रातील डॉक्‍टरांनी एकत्र येऊन या आजारांबाबतच्या नवनवीन शोधांबाबत जे प्रात्यक्षिके केले आहेत त्यावरून या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. या सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन नाशिकला मिळाले यातच आनंद असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मानद उपकुलगुरु डॉ. दिलीप म्हैसकर यांनी केले.

कान नाक घसा तज्ज्ञांची सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषद मेंटकॉन २०१८ च्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. म्हैसकर बोलत होते. कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पन्नासाव्या वार्षिक राज्यस्तरीय परिषदेचे यजमानपद नासिक शाखेला मिळाले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या या परिषदेत नाक कान व घश्यांच्या विकारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यावर दिवसेंदिवस होणाऱ्या संशोधनावर देशभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या डॉक्‍टरांनी मत व्यक्‍त केले. मानवाला या तीनही अवयवांमधून खूप मोठी दैवी देणगी मिळाली असून या ज्ञानेंद्रियांचा अभ्यास व चर्चा होण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्‍त करण्यात आले. या परिषदेत शासकीय संस्थेतील तसेच खासगी सेवेतील जवळपास आठशे तज्ज्ञांचा सहभाग नोंदविला होता.

यावेळी या परिषदेसाठी देशविदेशातील बार्सिलोना येथील डॉ. प्रो. मॅन्युअल स्पेर्केलसन, इंग्लंड येथील डॉ. ख्रिस्तोफर अल्ड्रेन व डॉ विनिध पालेरी यांचेसह जयपूर येथील डॉ. सतीश जैन व त्रिची येथील डॉ. जानकीराम या तिन्ही अवयवांच्या विविध आजारांवर कशा पद्धतीने उपचार पद्धती निघाली आहे याची सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या परिषदेला खास परदेशातील काही डॉक्‍टर आले होते. या परिषदेसाठी शोधू जाता संवेदनांची पाळंमुळं या ज्ञानकुंभाचे घोषवाक्य असल्याचे डॉ. पुष्कर लेले यांनी यावेळी सांगितले.

परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. शब्बीर इंदोरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष डॉ. शिरीष घन, खजिनदार डॉ. राजेंद्र पगारे, अभ्यास समिती प्रमुख डॉ. उमेश तोरणे व सहसचिव डॉ श्रीया कुलकर्णी यांच्यासह नाशिकमधील कान नाक घसा तज्ज्ञ प्रयत्नशील होते. यावेळी नाशिक शाखेच्या वतीने डॉ. प्रदीप गोंधळे व डॉ. एस. बी. ओगले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांकडून हत्या

$
0
0

पेट्रोलवरून वाद; तीन संशयित सातपूर पोलिसांच्या ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शिवाजीनगरमधील दोन मित्रांमध्ये चक्क पेट्रोलच्या किरकोळ वादातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर एमआयडीसीत घडली. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन संशियत तरुणांना अटक केली आहे. भाईगिरी करणारे कुठल्या स्तराला जाऊ शकतात याचेच हे उदाहरण मानले जात आहे.

अमोल अशोक बागले (वय २५, रा. साईबाबा उद्यानाजवळ, शिवाजीनगर) असे घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोकेश अशोक थोरात (वय १८), किरण मधूकर बिन्नर (वय २१) आणि सुनील पंडित खरात (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. अमोल हा त्याचा चुलत भाऊ सचिन भाईदास बागले (२९) याच्यासोबत सीएट कंपनीसमोरून रविवारी (दि. १६) रात्री साडेदहा वाजता जात होता. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने अमोलने लोकेश या आपल्या मित्रास पेट्रोल घेऊन येण्यास सांगितले. पेट्रोल घेऊन गेल्यावर 'इतका उशीर का झाला', असे अमोलने लोकशला विचारले. यात त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. लोकश सोबत किरण व सुनील यांनी अमोलला पकडले. लोकेशने खिशातून बटनाचा चाकू काढून अमोलच्या पोटात वार केले. यानंतर घटनास्थळावरून तिघांनी संशयितांनी पोबारा केला. जखमी अमोलला त्याच्या चुलत भाऊ सचिन याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, अमोलला पोटात गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान अमोलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत संशयित आरोपींना ताब्यात घ्या, अशी मागणी केली. या प्रकरणी सातपूर पोलिसात सचिन बागले याच्या फिर्यादीवरून लोकेश, किरण व सुनील या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. एच. चव्हाण करत आहेत.

भाईगिरीच्या नादात गमवला जीव

अमोलहा हा खासगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मुख्य संशयित आरोपी असलेला लोकेश हा कॉलेजमध्ये एफवायबीएचे शिक्षण घेत आहे. तर किरण व सुनिल कंपनीत कामाला जात असल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. लग्नाला सोबत नेले नाही म्हणून अमोलचा त्याच्या मित्रांवर अगोदरचराग होता. अमोल अनेकदा त्याच्या मित्रांशी भाईगिरीच्या भाषेत बोलत असते. त्याच्या या भाईगिरीचा मित्रांना राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाईगिरीच्या नादात अमोलला जीव गमवला.

आरोपींसोबत घटनास्थळाची पहाणी

अमोलच्या खुनात मुख्य संशयित आरोपी असलेला लोकेश यास पोलिसांनी सोबत घेत घटनास्थळाची सोमवारी पाहणी केली. यावेळी सीएट कंपनीला लागून असलेल्या नाल्यात बटन चाकू फेकल्याचे लोकेशने कबूल केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस चाकूचा शोध घेत होते. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त पाटील, सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यासाठी धाव

$
0
0

नाशिक : प्रत्येकाने तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी व्यायामाची आस धरणे अपेक्षित आहे. हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी नाशिकच्या सुभाष जांगडा यांनी नाशिक ते शिर्डी हे १०० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव सुभाष जांगडा हे गेल्या चार वर्षांपासून वर्षातून एकदा नाशिक ते शिर्डी हे अंतर धावत पूर्ण करीत आहेत. त्यांनी यंदा 'स्वस्थ भारत' हा संदेश देण्यासाठी धाव घेतली. नाशिक ते शिर्डी हे अंतर त्यांनी १० तास १५ मिनिटांत पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौराष्ट्रचा बाद फेरीचा मार्ग मोकळा

$
0
0

महाराष्ट्रावर पाच गडी राखून विजय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयच्या वतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात आयोजित महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात सौराष्ट्र संघाने ५ गडी राखून महाराष्ट्र संघावर विजय मिळवला. या विजयामुळे सौराष्ट्रची गुणसंख्या सहा झाली आहे. सौराष्ट्र संघाचा बाद फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांना मुंबई येथील वानखेडे मैदानावर होणाऱ्या होणाऱ्या सामन्यात मुंबई संघाचा सामना करावा लागणार आहे.

पहिल्या दिवशी झालेल्या खेळात सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे ३९८ धावांचे आव्हान उभे केले त्याला तोंड देतांना महाराष्ट्राच्या संघाने २४७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघावर १५१ धावांचा लीड झाला. दुसरा डाव खेळताना सौराष्ट्र संघाने महाराष्ट्राच्या संघाला खेळण्याची संधी दिली. रविवारचा खेळ संपला त्यावेळी महाराष्ट्राची धाव संख्या ३ बाद १५७ इतकी होती. महाराष्ट्र संघाने अवघ्या सहा धावांचा लीड केला. सोमवारी महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात रोहीत मोटवानेचा खेळ महाराष्ट्राच्या संघाला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत जाण्यास पूरक ठरला. रोहीतने १४ चौकार टोलवत १९० चेंडूंमध्ये १२० धावा केल्या. या सामन्यात शतक करणारा रोहीत हा एकमेव खेळाडू ठरला. सुरुवातीला खेळायला आलेल्या महाराष्ट्र संघाच्या जय पांडे याने ४ चौकार मारत ६० चेंडू मध्ये २६ धावा केल्या. चेतन सकारियाने टाकलेल्या चेंडूवर अर्पित वासवदाने त्याचा झेल पकडला. चिराग खुराना याने २४ चेंडूत १५ धावा केल्या. हार्दिक राठोडने टाकलेल्या चेंडूवर स्नेल पटेल याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या महाराष्ट्राचा उपकर्णधार रोहुल त्रिपाठी याला जम बसवता आला नाही. त्याने दोन षटकार, पाच चौकार मारत १६ चेंडूत ३८ धावा केल्या. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानंतर महाराष्ट्राचा कर्णधार अंकीत बावने मैदानात उतरला. एक षटकार, दोन चौकार मारत ७१ चेंडूत त्याने अवघ्या २५ धावा केल्या. हार्दिक राठोडने टाकलेल्या चेंडूवर स्नेल पटेल याने त्याचा झेल पकडला. त्यानंतर नौशाद शेख खेळायला आला. याने चार चौकार मारत ४२ चेंडू मध्ये २६ धावा केल्या. धमेंद्र जडेजाच्या चेंडूवर विश्वराज जडेजा याने त्याचा झेल टिपला. यानंतर महाराष्ट्राच्या संघाची अधोगती सुरू झाली. महाराष्ट्राचा अघाडीचा फलंदाज केदार जाधव मैदानात उतरला यावेळी त्याच्यात असलेला अती आत्मविश्वास त्याच्या फलंदाजीला मारक ठरला. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या पहिल्या चेंडूतच तो झेलबाद झाला. स्नेल पटेल याने त्याचा झेल पकडला. यानंतर अक्षय पालकर याने ३२ चेंडूत १ धाव केली. सत्यजीत बच्छाव आपल्या घरच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. पहिल्या चेंडूतच तो पायचित झाला. त्यानंतर अनुपम संकलेचा खेळायला आला. याला देखील पहिल्या चेंडूतच तंबुत परतावे लागले. धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर अर्पित वासवदा याने त्याचा झेल पकडला. समद फल्लाह याने एक षटकार, एक चौकार मारत १४ चेंडूत १२ धावा केल्या. यावेळीही धमेंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर हार्विक देसाई याने झेल पकडला. सामना महाराष्ट्राची फलंदाजी संपली त्यावेळी महाराष्ट्राचे सर्वबाद २६७ धावा झाल्या. दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या सौराष्ट्र संघाने अत्यंत आत्मविशावासाने खेळी केली. सौराष्ट्र संघाला ११६ धावा करण्याचे उद्दिष्ट होते. दुसऱ्या डावात हार्विक देसाई सौराष्ट्र संघाकडून मैदानात उतरला. त्याने चार चौकार मारत ८९ चेंडूत ४४ धावा केल्या. सत्यजीत बच्छाव ने टाकलेल्या चेंडूवर रोहीत मोटवाने याने त्याचा झेल पकडला. स्नेल पटेल याने ३३ चेंडूत १५ धावा केल्या समद फल्लाह याने टाकलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला. विश्वराज जडेजायाने २१ चेंडूत ३ धावा केल्या चिराग खुराना ने टाकलेल्या चेंडूवर तो त्रिफळा चीत झाला. शेलडॉन जॅक्सन याने सहा चेंडूत ७ धावा केल्या सत्यजीत बच्छाव ने टाकलेल्या चेंडूवर तोही त्रिफळा चीत झाला. अर्पित वासवदा याने २९ चेंडूत २८ धावा केल्या चिराग खुराना याने टाकलेल्या चेंडूवर नौशाद शेक याने झेल पकडला. कमलेश मकवाना ९ धावा, प्रेरक मंकड ७ धावा करुन नाबाद राहिले. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्रावर ५ गडी राखून विजय मिळवला. सौराष्ट्रची धाव संख्या ५ गडी बाद १२० झाली.

सौराष्ट्रचा धमेंद्र जडेजा सामनावीर

सौराष्ट्रचा गोलंदाज धमेंद्र जडेजा याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या इनिंग मध्ये १ आणि दुसऱ्या डावात ७ असे एकूण ८ बळी घेतले.

…..

नाशिकमध्ये उत्तम प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना साथ देणारी होती. त्याचा आमच्या संघाने फायदा करून घेतला. एनडीसीएने जी व्यवस्था केली होती त्याच बरोबर येथील स्थानीक प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो.

--जयदेव उनाडकट, कर्णधार, कप्तान

…..

हा सामना आमच्या चागलाच स्मरणात राहिल. येथील खेळपट्टी अतिशय उत्तम होती. यापुढे मंबई विरुद्ध होणाऱ्या सामन्यावर आमचे लक्ष आहे. २२ डिसेंबर पासून हे सामने होणार आहेत.- सितांशू कोटक, सौराष्ट्र प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हजार नोटिसांचा खुलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बजावलेल्या घरपट्टीच्या नोटिसांबाबत सुमारे दहा हजार नोटिसांना उत्तर प्राप्त झाले आहे. नागरिकांनी जोडलेल्या पुराव्यांच्या आधारे हे लक्षात येत आहे की काही बाबी चुकीच्या घडल्या आहेत. त्यामुळे घरपट्टीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

सध्या शहरात ज्वलंत असलेला वाढीव घरपट्टी व ऑटो डीसीआर या विषयावर नरेडको पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गमे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. घरपट्टीतील वाढीव दर, चालू बांधकाम, चुकीची नावे, चुकीच्या कालावधी, चुकीच्या दराने आकारलेली घरपट्टी अश्या अनेक समस्यांकडे नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली. यामुळे शेकडो नाशिककर चिंतेत आहेत. बांधकाम क्षेत्रातील विविध संकटांमुळे नाशिकचा विकास खुंटला असल्याचे नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले. नोटिसांमध्ये चुकीच्या गोष्टी असल्याचे नरेडको पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत लवकरच नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विशेष बैठक घेऊन हा विषय निकाली काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. ऑटो डीसीआर विषयी ज्या महत्त्वाच्या त्रुटी आहेत त्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. हे अतीमहत्वाचे विषय असून त्यात तातडीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले. नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन स्वागत केले. या प्रसंगी नरेडको नाशिकचे अभय तातेड, सुनील गवादे, राजन दर्यानी, अमित रोहमारे, मयूर कपाटे, राजेंद्र बागड आदी पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच सहाय्यक संचालक नगर रचना मनपा नाशिक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परजिल्ह्यांसाठी चाराबंदी!

$
0
0

जिल्हाबाहेर किंवा परराज्यात चारा नेता येणार नाही

..

- जिल्ह्यात १२०० हेक्टरवर चारा लागवडीची तयारी

- ४८ हजार टन चारानिर्मितीचे ध्येय

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या झळा आणि दुष्काळाची दाहकता त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असला तरी भविष्यात चाराटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी घातली आहे.

पावसाने यंदा नाशिक जिल्ह्याकडेच नाही, तर राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या हंगामातही टँकरच्या पाण्याने जिल्हावासीयांची तहान भागविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. दिवसेंदिवस जिल्ह्यात टँकरची मागणी वाढतच असून, आजमितीस १०१ टँकरद्वारे अनेक गावांमधील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, जलाशयांमधील उपलब्ध पाण्यावरच जिल्ह्याची जूनपर्यंतची भिस्त असणार आहे. त्यामुळे पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करा, असे आवाहन यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न असल्याने चाराटंचाईदेखील उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धरणांच्या गाळपेरा क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्ह्यातही १२०० हेक्टरवर चारा लागवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या माध्यमातून रब्बी हंगामात ४८ हजार टनाच्या आसपास चारा मिळणार आहे. जिल्ह्यात मेंढ्या, शेळ्या वगळता १२ लाख ३७ जनावरे आहेत. या जनावरांना चारा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

..

दोन महिने बंदी

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. जिल्ह्यात उत्पादित चारा येथील पशुधनास पुरेसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातून परराज्यात चारा वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. चाऱ्याच्या वाहतुकीतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील शिल्लक चारा अन्य जिल्ह्यात व परराज्यात जाऊ नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यापर्यंत जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला बंदी घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांना आता ‘वेळेतच’ भेटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दररोज भेटणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आयुक्त गमेंनी नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना भेटण्यासाठी वेळे निश्चित केली आहे. आयुक्त आता आठवड्यातील तीन दिवसच नागरिक आणि लोकप्रतिनिधींना भेटणार असून, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच भेटण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त गमे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांना भेटणाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दररोज नागरिकांसह नगरसेवक, लोकप्रतिनिधी येऊन त्यांना भेटतात. त्याचा परिणाम आयुक्तांच्या दैनंदिन कामकाजावर झाला आहे. गमे हे पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाचे ऐकून घेत असल्याने व त्याच्या तक्रारींची दखल घेत असल्याने भेटणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या सोयीने आयुक्त गमे यांनी आता नागरिकांसह लोकप्रतिनिधींना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे. पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांना आता सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३.३० ते ४ वाजेपर्यंत आयुक्तांना भेटता येणार आहे, तर याच दिवशी दुपारी ४ ते ५ दरम्यान नागरिकांना भेटता येणार आहे. प्रशासकीय दौरे व सुटी दिवस वगळून ही वेळ देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तरुणांवर कोयत्याने वार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पोलिसांत केलल्या तक्रारीचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून घेत कोयता व तलवारीच्या सहाय्याने तीन जणांवर शस्त्राने वार केल्याची घटना सातपूर, गणेशनगर भागात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. विशाल यशपाल शर्मा (रा. मुंबई नाका) यांच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश फलके, अजय बनसोड व करण नरेश धुळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तिघांसह त्यांच्या इतर मित्रांनी वाद असलेल्या तीन जणांना गणेशनगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे बोलावले. यावेळी संशयितांसह त्यांच्या मित्रांनी कोयता व तलवारीच्या सहाय्याने विशालसह तीन जणांना गंभीर जखमी केले. हल्ल्यात जखमी झालेले अर्जुन खरादे (रा. कामगारनगर), विरेंद्र शर्मा (रा. मुंबई नाका) आणि दीपक (पूर्ण नाव माहित नाही) यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ तक्रार नोंदवून घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरी राऊत अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काशिनाथ घाणेकर’चे दिग्दर्शक रसिकांच्या भेटीला

$
0
0

'आयाम'तर्फे २५ रोजी आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अस्सल कलावंताच्या आयुष्यातील कंगोरे समजावून घेणे अन् त्याच्यातील ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेची एका मोठ्या कालखंडानंतर तितक्याच ताकदीने मांडणी करणे हे काम वाटते तितके सोपे नाही. तरीही, '...आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रसृष्टीवर शब्दश: अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ही किमया लिलया घडविणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हे नाशिककरांच्या भेटीला मंगळवारी, २५ डिसेंबर रोजी येणार आहेत.

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत 'आयाम' या संस्थेच्या वतीने शंकराचार्य न्यासच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. मराठी नाट्यसृष्टीस पाच दशकांपूर्वी सोनेरी स्वप्ने दाखविणाऱ्या नटाच्या व्यक्तिमत्वाचे गूढ पदर या चित्रपटात दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी तितक्याच ताकदीने उलगडले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाला उत्तूंग कलाविष्कारातून या चित्रपटाचे नायक सुबोध भावे यांनीही तितक्याच ताकदीची साथ दिली आहे.

कलेसाठी हयातभर संघर्षरत असणाऱ्या कलावंताच्या आयुष्यातील उत्कट भावाविष्कार या चित्रपटात तितक्यात प्रभावीपणे मांडण्यात आल्याने वाचकांना खिळवून ठेवण्यात अन् अभिरुचीच्या कसोटीवर उत्तीर्ण होत नवे झेंडे कलाकृतीने मराठी चित्रसृष्टीत रोवले आहेत. अशा दर्जेदार कलाकृतीचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी कल्याणी पंडित या संवाद साधणार आहेत. या उपक्रमाच्या आयोजनासाठी जयंत जोगळेकर यांचे सहकार्य लाभले असून मीडिया पार्टनर म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहकार्य लाभले आहे. या संवाद सोहळ्यासाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. या पर्वणीचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, विश्वस्त शुभदा देसाई आणि आयाम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images