Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विश्वास बँक आणि महिला सहकारी बँकेला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्नाडस् बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नाशिकच्या दोन बँकांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात विश्वास बँक आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेचा समावेश आहे. विश्वास बँकेस तीन तर महिला बँकेस दोन पुरस्कार मिळाले आहेत.

कोल्हापूर येथे प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल राम गणेश गडकरी सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. कार्यक्रमास श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी अप्पर सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, राज्य सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक प्रमोद कर्नाड, शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्रमुख डॉ. विजय ककडे, किरण कर्नाड आदी मान्यवर उपस्थित होते. अर्बन बँक्स फेडरेशनचे व महाराष्ट्र राज्य सहकार बँक मुंबईचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना आणि महिला बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशी अहिरे यांना सर्वोत्तम अध्यक्ष या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वास बँकेच्या २०१७-१८ च्या आर्थिक अहवालास द्वितीय पुरस्कार मिळाला. विश्वास बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र हरिभाऊ जाधव यांना विशेष वसुली अधिकारी म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, महिला बँकेचे सीईओ धर्मराज महाजन यांना विशेष प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा प्रश्नी नेते नाशकात

$
0
0

कांदा प्रश्नी नेते नाशकात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याच्या प्रश्नाची दखल आता विविध नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते व स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव तसेच प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नाशिक जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे.

कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. याप्रश्नी विविध प्रकारचे आंदोलनही केले जात आहे. आता या आंदोलनात शेतकरी नेतेही सक्रीय होताना दिसत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते व स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले. आता त्यांनीही कांदा प्रश्नाची दखल घेतली आहे. कांद्याचा प्रश्न नक्की काय आहे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी ते शुक्रवारी (२१ डिसेंबर) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत ते येणार आहेत. याठिकाणी ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष ललित बाबर, राज्य सरचिटमीस अॅड सविता शिंदे, राष्ट्रीय नेते सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे आदी उपस्थित राहमार आहेत. हा प्रश्न जाणून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्वराज इंडियाकडून ठरविली जाणार असल्याचे सचिव अमोल गोरडे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलानेच केला वृद्ध पित्याचा खून

$
0
0

टेहरे येथील खून प्रकरणात उलगडा

...

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

टेहरे येथील साठ वर्षीय वृद्ध रखवालदाराच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सैन्यातील त्याच्या जवान मुलानेच जन्मदात्या बापाच्या जाचाला कंटाळून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मंगळवारी सायंकाळी छावणी पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी टेहरे गावाजवळील रिक्षा थांब्यापासून काही अंतरावर प्रकाश महादू बोरसे (वय ६०) या रखवालदाराचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात धारदार हत्याराने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस उपनिरीक्षक राहुल कोलते यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला होता

स्थानिक गुन्हे शाखा आणि 'छावणी'च्या पथकाने समांतर तपास केला. गुप्त माहितीच्या आधारे बोरसे यांचा लहान मुलगा ज्ञानेश्‍वर जो भारतीय सैन्य दलात शिपाई आहे, त्याचे घटनेच्या एक दिवसापूर्वीच वडिलांशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाच्या आधारे ज्ञानेश्‍वरला ताब्यात घेण्यात आले. उलटतपासणीत त्याने वडिलांचा खून केल्याचे कबूल केले. मंगळवारी संशयित आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री ऐकत नसतील तर कांदे फेकून मारा: राज ठाकरे

$
0
0

नाशिक: 'मंत्री तुमचं ऐकत नसतील. तुमच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा,' असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असता राज यांनी हा सल्ला शेतकऱ्यांना दिला.

राज ठाकरे आज कळवणला आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आमचं ऐकत नसल्याची तक्रार राज यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या या समस्या जाणून घेतानाच मंत्री ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारण्याचा सल्लाही राज यांनी दिला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी राज यांनी शेतकऱ्यांना मुंबई भेटीचं आमंत्रणही दिलं.

दरम्यान, राज यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिंडोरीतही त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून राज यांचं स्वागत केलं. राज यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक कर्मचारी संपावर

$
0
0

मनमाड : डाक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे अस्त्र उपसले असून, मनमाड येथे मालेगाव विभागाच्या डाक सेवक संघटना कर्मचाऱ्यांचा संप सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील सुरू होता. या संपामुळे डाक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटना पदाधिकारी ए. पी. सोनार, प्रवीण गोसावी, सी. जे. सोनवणे, व्ही. डी. दुसाने, डी. बी. चिंचोले, एस. व्ही. जोशी यांच्यासह डाक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंची निवड

$
0
0

नाशिक : मविप्र संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कल्पंजय नाठे, सौरभ घुले व वैष्णव देशमुख या खेळाडूंची १९ ते २५ डिसेंबरदरम्यान वीर नर्मदा साऊथ युनिव्हर्सिटी सुरत गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ. डी. एस. गडाख यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकहो, ऐका हो ऐका...व्हीव्हीपॅट वापरून पहा

$
0
0

जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबरच विश्वास हे पटवून देण्यासाठी जिल्ह्यात जनजागृतीवर भर दिला जातो आहे. खेडोपाड्यांत चित्ररथांद्वारे पथके जनजागृती करीत आहेत. मालेगाव येथील न्यायालयातही वकिलांनी स्वत: व्हीव्हीपॅटचा वापर करून पाहिला.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडली जात असली तरी या प्रक्रियेवर राजकीय पक्षांकडून शिंतोडे उडविले जातात. म्हणूनच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नेमके कसे काम करते याबाबतची प्रात्यक्षिके लोकांना दाखवा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ३९ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांनी ठिकठिकाणी जाऊन जनजागृतीला सुरूवात केली आहे. यामध्ये बाजारपेठा, बसस्थानके, आठवडे बाजार व गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पथकांना दिल्या आहेत. त्यानुसार या पथकांनी जनजागृती सुरू केली आहे. मालेगाव येथे न्यायालयात याबाबतची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. वकील बांधवांनी स्वत: ही प्रात्यक्षिके करून पाहिली. तसेच, शंकांचे निरसनही करवून घेतले. १५ जानेवारीपर्यंत ही पथके जिल्हाभर फिरणार असून, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. पथकांमध्ये बीएलओंसह ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंचाळ्याला नवीन पोलिस स्टेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून चुंचाळे येथे नवीन पोलिस स्टेशन सुरू करण्याबाबत पोलिस प्रशासन सकारात्मक असून याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा आढावा घेतला. नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वित झाल्यास अंबड पोलिस स्टेशनवरील कामाचा बराचसा ताण कमी होणार आहे.

अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. अंबड स्टेशनच्या हद्दीमध्ये जुने आणि नवीन सिडको, कामटवाडे, अंबडसह विल्होळीपासून उंटवाडीपर्यंत आणि गणेश चौकापासून अंबडगावपर्यंतचा परिसर येतो. तर सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्येही सातपूर औद्योगिक वसाहतीसह शिवाजीनगरपर्यंतचा परिसर येतो. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुमारे सहा लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि तुलनेने अपुरे ठरणारे मनुष्यबळ यामुळे या दोन्ही पोलीस स्टेशनचे विभाजन करून चुंचाळे येथे नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती करावी असा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, तहसीलदार शरद घोरपडे आदी उपस्थित होते.

विभाजनाबाबत अहवाल पाठविणार

अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेमकी किती लोकसंख्या वास्तव्यास आहे? किती लोकसंख्येमागे पोलिस स्टेशन असायला हवे याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांनी महासंचालकांमार्फत गृह विभागाला पाठवावा अशा सूचना परदेशी यांनी यावेळी केल्या. त्यामुळे या दोन्ही पोलिस स्टेशनचे विभाजन करावयाचे झाल्यास कोणता भाग चुंचाळे या नवीन पोलिस स्टेशनमध्ये घेता येईल, लोकसंख्येचे नेमके विभाजन कसे असणार याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो गृह विभागाला पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुरकुलवाडीला भारत पेट्रोलिअमची साथ

$
0
0

शाळेसाठी पुरविणार पाणी, शौचालयाच्या सुविधा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम तेल कंपनीच्या सहकार्य व सौजन्याने जवळच असलेल्या बुरकुलवाडी येथील पालिका प्राथमिक शाळा क्रमांक सातचा चेहरा मोहरा बदलणार आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या मराठी शाळेत पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून ते स्वच्छ सुलभ शौचालयापर्यंत सर्व सुविधा भारत पेट्रोलियम कंपनी देणार आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी जलशुद्धीकरण यंत्रणा कंपनीतर्फे कार्यान्वीत करण्यात येत असून, सुलभ शौचालयाच्या कामांचे भूमिपूजन करून कंपनी प्रबंधक कुलदीप माने यांनी मनमाडनजीक मराठी प्राथमिक शाळेत विकास कामे करण्यात येतील याची ग्वाही दिली आहे. कंपनीच्या या स्थायी स्वरूपाच्या उपयुक्त उपक्रमाचे पानेवाडी परिसरात कौतुक होत आहे.

मनमाड नांदगाव मार्गावर पानेवाडी येथे भारत पेट्रोलिअम कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. याच मार्गावर बुरकुलवाडी येथे मनमाड पालिकेची शाळा क्रमांक सात आहे.

या शाळेत मूलभूत सुविधा नसल्याचे भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याबाबत कंपनी वरिष्ठांकडे विकास कामांचा प्रस्ताव पाठवला. सदर प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आता भारत कंपनी तर्फे प्राथमिक शाळेत सुलभ शौचालय, शाळेसाठी स्वतंत्र बोअर वेल, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा, पोषण आहारासाठी गॅस व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा कंपनी प्रबंधक कुलदीप माने यांनी केली. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक महेंद्र शिरसाट, गालिब शेख, पालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी मनीष गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत शौचालय कामाचा भूमिपूजन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान विजय सोनवणे यांना अखेरचा निरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

'अमर रहे, अमर रहे वीर जवान विजय सोनवणे अमर रहें', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत डांगसौंदाणे येथील नागरिकांनी भूमीपूत्र लष्करी जवान विजय सोनवणे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. विजय सोनवणे (वय ३३) यांचा आसामच्या तेजपूर भागात सोमवारी (दि.१७)कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.

मंगळवारी (दि.१८) रात्री उशिरा विजयचे पार्थिव डांगसौंदाणे येथे आणण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी गावातील आठवडे बाजार, व्यापारी पेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत विजय सोनवणे यांच्या अंतिम संस्कारासाठी बाजार आवारतील मुख्य पटांगणात फुलांनी सजविलेला चबुतरा बांधून तयारी केली होती. अंत्यसंस्कारापूर्वी विजय यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विजय यांची पत्नी खुशाली, आई-वडील, त्यांची ४ वर्षाची मुलगी अनुष्का आणि १३ महिन्यांचा मुलगा वृषभ या सर्वांचा आक्रोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. फुलांनी सजविलेल्या रथातून विजय यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अंतिम दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. प्रत्येक घरासमोर विजय यांना रांगोळी घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारप्रसंगी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, सुरेश वाघ, कैलास बोरसे, पंढरीनाथ बोरसे, सोपान सोनवणे, उपसरपंच विजय सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे, पंकज बधाण, अंबादास सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रभारी पोलिस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, आसाम तेजपुरहून आलेले नायक सुभेदार गोरख कोरडे, नायक सुभेदार उत्तम सेंडगे, नायक कृष्णा सोनवणे, दादा जाधव, संपत चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, ग्रामपंचायत सरपंच जिजाबाई पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंचे दिंडोरीत जंगी स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दिंडोरी शहरात ढोलताशांच्या गजरात आणि त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात झाले. दिंडोरी शहरात तरुणांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने राज ठाकरेही भारावून गेले.

कळवण दौऱ्यावर जात असताना दिंडोरी येथे पालखेड चौफुलीवर सकाळी साडे नऊपासून तालुक्यातील मनसैनिक, युवक कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताशाच्या निनादात फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, उपाध्यक्ष सतीश मालसाने, रोशन दिवटे, प्रीतम गांगोडे, शहराध्यक्ष अभिजित राऊत, रमेश जोंधळे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, गुलाब जाधव आदींनी स्वागत केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला गराडा घालत ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी गर्दी केली. अखेर राज ठाकरे यांनी कारच्या फूटरेस्टवर उभे राहून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दौऱ्यात राज ठाकरे यांचे समवेत माजी मंत्री बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम आदी मान्यवर सहभागी होते.

तरुणाईत क्रेज कायम

युवकांमध्ये युवा नेते म्हणून राज ठाकरे यांची क्रेझ कायम असल्याचे आज दिंडोरीत दिसून आले. सकाळपासून शेकडो युवक राज ठाकरे यांच्या प्रतीक्षेत होते. राज ठाकरे यांचे आगमन होताच युवकांनी त्यांना बघण्यासाठी व मोबाइलमध्ये फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांनीही उभे राहून सर्वांना अभिवादन करीत प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत भाजपची ‘शोभा’!

$
0
0

सभागृह नेते-सभापतींदरम्यान कलगीतुरा; टीडीआरप्रकरणी अधिकाऱ्यांचे काढले अधिकार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील क्रीडांगणासाठी आरक्षित सर्वे क्र. ७०५ चा २१ कोटींचा रोखीने मोबदला देण्यावरून भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील आणि स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यातील वादाचा आणखी एक अंक महासभेत बुधवारी पार पडला. सभागृहनेते आणि स्थायी समिती यांच्यातील कलगीतुऱ्यामुळे भाजपची सभागृहातच 'शोभा' झाली असून, भाजपमधल्या गटबाजीने विरोधकांच्या चेहऱ्यावर मात्र हसू पसरले होते. या दोन पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे भाजपची बेअब्रू होत असल्याचे लक्षात आल्यावर सभागृहातील जेष्ठ नेत्यांनी खलबते करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांचे अधिकार काढण्याचे फर्मान काढत सविस्तर अहवाल पुढील महासभेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वे क्र. ७०५ चा २१ कोटींचा धनादेश देण्यावरून भाजपमध्ये दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. स्थायी समितीच्या १३ सदस्यांनी विरोधाचे पत्र दिल्यानंतरही प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या २१ कोटींचा मोबदला देण्यावरून महासभेत बुधवारी चर्चा झाली. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी २१ कोटी रुपये देवू नये यासाठी दहा पत्रे दिल्याचा दावा केला. आर्थिक परिस्थितीचे कारण देत एकीकडे १२ लाख रुपयांचा नगरसेवक निधी दिला जात नसताना जागामालकावर २१ कोटींची खिरापत का वाटली, असा आरोप पाटील यांनी केला. उत्कर्ष वाघ या मध्यस्ताच्या मदतीने या प्रकरणात नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांच्यावर दबाव आणला गेल्याचाही आरोप त्यांनी केला. दबाव टाकून एका तासात चेक काढण्यासाठी प्रयत्न झाल्याचे सांगत, सभापती आहेर-आडके यांच्याकडे पाटील यांनी अंगुलीनिर्देश केला. यावेळी महापौर, नगरसचिवांचेही सवाल जबाब झाले. त्यावर आहेर आडके यांनीही पाटील यांना जशास तसे उत्तर देत स्थायी समितीवर माझ्या कारकिर्दीत या संदर्भातील कोणताही ठराव आला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यासंदर्भात नगरसचिवांकडूनही त्यांनी स्पष्टीकरण घेत स्थायी समिती सदस्यांनी पत्र दिल्यानंतर विधी समितीकडून अभिप्राय मागवल्याचे आहेर-आडके यांनी स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणाशी आपला कोणताही संबध नसल्याचा दावा केला. त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संगनमताने ही गडबड केल्याचे सांगत चौकशी करून दोषींवर कारवाई करून रक्कम वसूल केली नाही तर सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. त्यामुळे महापौरांनी तातडीने पाटील यांच्या बाजूने निकाल देत संबंधित प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेण्याचे तसेच पुढच्या महासभेत या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चर्चेदरम्यान भाजपचे रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर आणि वर्षा भालेवराव या नगरसेवकांनी २१ कोटींतील गौडंबगालाबाबत तयार केलेले फलकच महासभेत झळकावले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच महापालिकेतील गोंधळाबाबत फलक झळकवून भाजपला आरसा दाखवण्याची ही महासभेतील पहिलीच वेळ असावी. यावेळी दोषींवर कारवाई मागणी या तीनही सदस्यांनी पाटील यांच्यासोबत केली.

विरोधकांना उकळ्या

भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सभापती आणि सभागृहनेत्यांदरम्यान आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीचा आनंद त्यांनी घेतला. या भूखंडाच्या प्रस्तावात भाजपच्याच काही जुन्या नेत्यांच्या सह्या असल्याने या विषयाच्या खोलात जावे, अशी मागणी विरोधकांनी महापौरांकडे केली.

'अण्णा' तर विरोधकांचेही नेते!

भाजपच्याच सभापती आणि सभागृहनेत्यांमध्ये २१ कोटींच्या विषयांवरून सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची अडचण झाली असताना विरोधकांकडून मात्र यावेळी भाजपवर कोपरखळ्या मारल्या जात होत्या. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या विषयावरून तसेच शिवसेनेच्या विषयांची परस्पर चोरी करण्यावरून अण्णांना टोला लगावला. महासभेत अण्णा आपण भाजपसोबतच विरोधकांचेही नेते असल्याचा टोमणा मारल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. पाटील यांच्याकडून भाजपच्याच अडचणी वाढवल्या जात असल्याने विरोधकांसाठी हा मोठा आधारच असल्याची चर्चा शिवसेनेच्या सदस्यांमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल पार्कला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेलिकन पार्कच्या जागेत शासनाच्या मदतीने साकारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्क उद्यानाला महासभेत मंजुरी देण्यात आली असून, ३४ कोटींतून उद्यानाचे रुपडे पालटणार आहे.

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रशांत मगर यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला प्रशासनाचा विरोध असतानाही महासभेने हिरवा कंदील दाखवला आहे. मगर यांच्याकडील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता यामुळे स्वेच्छानिवृत्ती मंजूर करू नये अशी हरकत प्रशासनाने घेतली होती. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. सिडकोतील अंबड पोलिस स्थानकाच्या बाजुला महापालिकेचे बंद पडलेल्या अवस्थेत पेलिकन पार्कचे रुपांतर सेंट्रल पार्कमध्ये केले जाणार आहे. शासनाकडून प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी ३४ कोटी बारा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर सादर झाला. महापौर भानसी यांनी प्रस्तावाला मान्यता देत असताना सिडकोतील शिवसेनेच्या नगरसेवकांना मत मांडू दिले नाही. अंबड, मोरवाडी गावातील शेतकयांनी प्रकल्पांसाठी जागा दिल्याने भूमिहीन झाले आहेत. सेंट्रल पार्क उभारत असताना तेथे मोरवाडी येथील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याची मागणी नगरसेविका किरण गामणे यांनी केली. परंतु, महासभेत बोलू न दिल्याने सभागृहाबाहेर नगरसेवकांनी महापौरांचा निषेध केला. या गोंधळातच महापौरांनी त्याला मंजुरी दिली. मगर आणि मुंढे यांच्या जवळीकीमुळे पदाधिकाऱ्यांचे ते नावडते बनले होते. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव महासभेवर सादर होताच तत्काळ मंजुरी देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

ऑफलाइनला परवानगी द्या

महापालिकेच्या ऑटो-डीसीआर संगणक प्रणालीनुसार सिडकोतील बांधकामे मंजूर होत नसल्याने ऑफलाइन पद्धतीने प्रकरणे मंजूर करा. महापालिकेप्रमाणेच सिडकोसाठीदेखील वाढीव एफएसआय व टीडीआर मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी लक्षवेधीद्वारे महासभेत मांडली. सिडकोच्या सहा स्कीम महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्याने नवीन बांधकामे किंवा पुनर्निर्माणाच्या प्रकरणांचे प्रस्ताव महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे सादर करावे लागतात. परंतु, सिडको स्वतंत्र प्राधिकरण असल्याने स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली आहे. त्यामुळे पालिकेच्या डीसीपीआरशी ती जुळत नाही. त्यामुळे प्रस्ताव रद्द होत असल्याने सिडकोचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने देण्याची मागणी दातीर यांनी केली. त्यावर महापौरांनी पुढच्या महासभेत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

सहवासनगर वासियांना दिलासा

अधिकृत स्लम असूनही सहवासनगर झोपडपट्टी अनधिकृत ठरवून ती उठविण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा डाव उच्च न्यायालयाच्या स्थगितीने उधळला गेल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना या जागेवरून न हटविण्याची आग्रही मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी महासभेत केली. महापौरांनी या मागणीची तातडीने दखल घेत सहवासनगरवासियांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. त्यामुळे पुनर्वसन केल्याशिवाय झोपडपट्टीधारकांना आता हटवता येणार नसल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

बडगुजर-आढाव वाद

माजी विरोधी पक्षनेते बडगुजर यांनी २५७ कोटींच्या रस्ते विकासाचा प्रस्ताव जादा विषयात सादर करण्याऐवजी विषय पत्रिकेवर आणला असता तर त्याविषयी संशय निर्माण झालाच नसता, असा आरोप करत मुंढे यांच्या प्रभावाखाली येऊन सत्तारूढ भाजपने सभागृहाचे निर्णय फिरवल्याचा दावा केला. बडगुजर यांच्या वक्तव्याला दिनकर आढाव, शिवाजी गांगुर्डे यांनी आक्षेप घेतला. कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनीदेखील या वादात उडी घेत सभागृहातील वाढत्या भाषणांवर हरकत नोंदविली. वाद अधिकच वाढत असल्याचे बघून सभागृहनेते दिनकर पाटील आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या वादातच महापौर रंजना भानसी यांनी नूतन आयुक्त गमे यांना पुष्पगुच्छ देत स्वागत सोहळा उरकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या पंखांत बळ!

$
0
0

तीन राज्यांतील निकालाने उत्साह; उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची आज बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने काँग्रेसला संजीवनी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना आता बळ आले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही आता अॅक्टिव्ह झाले असून, बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात गुरुवारी (ता. २०) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार चेल्ला वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) व शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी दिली. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची बांधनी नसतानाही तीन राज्यांत काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे राज्यातही असे यश मिळू शकते अशी भावना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. त्यातूनच अनेक दिवसांपासून कोमात गेलेल्या नाशिक व शहर काँग्रेसलाही यामुळे ऊर्जा मिळाली आहे. जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभांचा आढावा पक्षाकडून घेण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी गुरुवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला रेड्डी यांच्यासह प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, आमदार निर्मला गावित, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते, काशिनाथ बहिरम, शंकर अहिरे, डॉ.तुषार शेवाळे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, तालुका अध्यक्ष, फ्रंटल प्रमुख, लोकप्रतिनिधी, सेल अध्यक्ष व सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जिल्हानिहाय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, बूथ कमिट्या, जनसंपर्क अभियान, पक्षाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरे व वेगवेगळे कार्यक्रम याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनीती या बैठकीत आखण्यात येणार आहे.

जिल्हाभर नियुक्त्या

काँग्रेसने जिल्ह्यातील जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी नवीन नियुक्त्यांची घोषणा केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष देण्यात आला आहे. रमेश काहंडोळे यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर नियुक्त्या पुढीलप्रमाणे : दिंडोरी- विनायक शिंदे, नाशिक- पांडूमामा शिंदे, सिन्नर- उत्तम भोसले, चांदवड- शांताराम लाठार, कळवण- दिगंबर गीते, बागलाण- भगवान खैरनार, इगतपुरी- नंदकुमार कर्डक, मालेगाव- अनिल पाटील, नांदगाव- उत्तम ठोंबरे, देवळा- किशोर कदम, त्र्यंबकेश्वर- रामदास चव्हाण, सुरगाणा- धर्मराज जोपळे, येवला- डॉ. विकास चांदर, मनमाड- सुखदेव देवरे व पेठ साठी जयश्रीताई नगरे यांच्या तालुका प्रभारीपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीची मागणी

$
0
0

नाशिक : नाशिक पश्‍चिम विभागात पाथर्डी फाटा परिसरात कमाल नागरी जमीन धारणा कायदा विभागाची (यूएलसी) जमीन मराठा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्यात आली. सरकारच्या ४ मे २०१६ च्या निर्णयानुसार यूएलसीच्या जमिनी प्रथम म्हाडा प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा विचार करून या नियमात बदल करण्याबाबत या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिमहत्त्वकांक्षेची वाताहत मांडणारे ‘डार्लिंग’

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B

अतिमहत्त्वकांक्षेपोटी प्रसंगी आपल्याच माणसांशी विक्षिप्तपणे वागणाऱ्या माणसांच्या आयुष्याची एका वळणावर कशी वाताहत होते, याचे रहस्यमय सादरीकरण 'डार्लिंग' या नाटकातून करण्यात आले. सिन्नरच्या कामगार कल्याण केंद्राने प. सा. नाट्यगृहात कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत बुधवारी हे नाटक सादर केले.

सत्ता-संपत्ती अन् खोट्या प्रतिष्ठेच्या नादाने वेडावून स्वत:चाच घात करून घेणाऱ्या तरुणीची कहाणी या नाटकातून लेखक विजय साळवी आणि दिग्दर्शक विक्रम गवांदे यांनी मांडली आहे. या कथेत रागिणी, राज आणि सुबोध ही तीन प्रमुख पात्र आहेत. यातील रागिणी ही राज या उद्योजकाशी विवाह करते. मात्र, तिचे विवाहापूर्वी एका तरुणाशी प्रेमसंबंध असतात. राजशी लग्न करण्यामागील तिचे हेतू त्याची संपत्ती बळकविण्याचे असतात. परिणामी, लग्नानंतर ती राजला एका गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवते. यानंतर ती अशाच सुबोध नामक धनवान माणसासोबत लग्न करून पुन्हा त्याचीही फसवणूक करू पाहते. पण अपघाताने सुबोधच्या घरात तिला तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर राज भेटतो. राजची स्मृती एका अपघाताच्या प्रसंगी गेल्याने तो तिला ओळखत नाही. तिचे म्हणणे ऐकू लागतो. पण सुबोध हा राजच्या डोळ्यावरील पडदा फाडून रागिणीचे खरे रुप त्याच्यासमोर आणतो. त्यानंतर ही दोघेही रागिणीच्या आयुष्यातून निघून जातात. ती एकटी पडते. अंतिमत: तिच्या हाती न माणूस मिळतो न त्याची संपत्ती.

पल्लवी ओढेकर, राजेंद्र लोणारे, श्रीराम गोरे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. संदीप महाजन यांनी संगीत दिले आहे तर रंगभूषा नाना कानडे यांनी केली आहे. ईश्वर जगताप यांनी प्रकाश योजना तर अंकिता मुळे व केतकी कुलकर्णी यांनी वेशभूषा केली. निर्मिती प्रमुख म्हणून अनिल बोरसे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलूस-ए-गौसिया उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना शुभेच्छा देत अन् एकात्मता आणि शांततेचा संदेश देत जश्न-ए-गौसे-आझम सण शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने शहरातील रोषणाई, पताके आणि कमानी यांनी जुने नाशिक परिसर अधिक सजले. तसेच जुने नाशिक परिसरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-गौसिया या भव्य मिरवणुकीची रौनक सर्वांना आकर्षित करणारी ठरली.

मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले गौस-ए-आझम हजरत शेख अब्दुल कादीर जिलानी रहेमतुल्लाअलैही यांच्या ग्यारवी शरीफ सणानिमित्ताने मंगळवारी सकाळपासून शहरात सर्वत्र उत्साह बघायला मिळाला. मानवता आणि एकात्मतेचा संदेश देत शहरातील सर्व मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यानिमित्ताने जुने नाशिक परिसरातील चौकमंडई येथून दुपारी ३ वाजता 'जुलूस-ए-गौसिया' मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ४ वाजता चौक मंडई येथून जुलूसच्या प्रारंभ करण्यात आला. बागवानपुरा, मरहूम सलीम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदमशाह चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, दखनीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाट या मार्गावरून जुलूसची मिरवणूक पुढे सरकत बडी दर्गा येथे पोहोचली. डोक्यावर इस्लामी टोपी आणि पारंपारिक वेश परिधान करून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जुलूसमध्ये सहभागी झाले.

गुलाबजलचा वर्षाव

जुलूसमध्ये डीजे वाजविण्यास बंदी असल्याने लाउड स्पिकरचा मंडळांकडून करण्यात आला. जुलूसच्या मार्गावर विविध सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. चिमुरड्यांनी पारंपरिक वेशभूषा करत अन् मिरवणुकीच्या वेळी एकमेकांवर गुलाबजलचा वर्षाव करत जुलूसची शोभा अधिक वाढवली.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेह केंद्राचे उद्या उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये घट करण्यासाठी आयएमए संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. २१) शहरात मधुमेह मुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिन्यातील चार दिवस रुग्णांना या केंद्रात मोफत उपचाराचा घेता येणार असल्याची माहिती आयएमएचे सचिव डॉ. नितीन चिताळकर यांनी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), मेडिकल वेलफेअर ट्रस्ट संचलित सविता देसाई हॉस्पिटल तसेच स्थूलता आणि मधुमेह निर्मूलन समिती (अॅडॉर ट्रस्ट) यांच्यातर्फे 'मधुमेह मुक्ती केंद्र' सुरु करण्यात आले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस हे केंद्र सुरु झाले असून, महिन्याभरात या केंद्रातर्फे १२५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या केंद्राचा उद्घाटन सोहळा सायंकाळी ४ वाजता शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. यासाठी अॅडॉर ट्रस्टचे संस्थापक डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित असणार आहेत. प्रत्येक बुधवारी दुपारी २.३० ते ६ यावेळेत, हे केंद्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुले असेल. \Bकेंद्रात नोंदणीसाठी \Bडॉ. रत्ना आष्टेकर (९४२२९२३८९८), डॉ. संदीप सोनवणे (९४२२२५६४५०) यांच्याशी संपर्क साधावा.

..............

डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. माधुरी किर्लोस्कर, डॉ. नितिन घैसास आणि डॉ. अजित कुमठेकर हे, चार मधुमेह तज्ज्ञ या केंद्रात रुग्णांची तपासणी करत उपचारपध्दती सांगणार आहेत. या केंद्राचा मधुमेहाच्या रुग्णांनी आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

\Bअसा घ्या लाभ

\Bमधुमेह मुक्ती केंद्रांतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णांना आयएमएने जाहीर केलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर नावनोंदणी करायची आहे. या क्रमाकांवर नाव नोंदविल्यानंतर रुग्णांना तज्ज्ञांकडून रुग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. रुग्णाच्या जीवनशैलीनुसार त्यात काही बदल करण्यास सांगितले जातील. त्याचे अपडेट व्हॉटसअॅपवर घेतले जातील. त्यानंतर तज्ज्ञांकडून मधुमेह मुक्ती केंद्रात येण्याची दिनांक आणि वेळ रुग्णांना सांगितली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार करणाऱ्या तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड तालुक्यात एकाच रात्री दोन घरांमधील व्यक्तींवर शस्त्रांनी वार करून सोने-चांदीचे दागिने लुटून नेणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दीड महिन्याने हा गुन्हा उघडकीस आला असून या टोळीने आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शुभम अनिल काळे (वय २१), विकास ज्ञानेश्‍वर पवार (वय २३, दोघे रा. श्रीरामपूर, जि. नगर) आणि संजय रावसाहेब चव्हाण (वय ३२, रा. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चांदवड येथील शेळके वस्तीमध्ये राहणाऱ्या समाधान पुंजाराम शेळके यांच्या घरात १० नोव्हेंबर रोजी चार दरोडेखोर घुसले. समाधान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची आई सुमनबाई व बहीण सुनिता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर संशयितांनी डावखरनगर परिसराकडे मोर्चा वळवला. कृष्णा लक्ष्मण पवार या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून पवार कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत दागिने लुटून नेले. या घटनेमुळे चांदवडमध्ये खळबळ उडाली होती.

चांदवड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी लुटमारीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. चांदवड-मनमाड मार्गावरील काही सीसीटीव्हींमध्ये संशयितांच्या हालचाली कैद झाल्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात धाव घेतली. परंतु, संशयित औरंगाबाद जिल्ह्यात गेल्याचे समजले. त्यानुसार, पथकाने औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील नवगाव परिसरात सापळा रचून शुभम काळे आणि विकास पवार या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांन भरत काळे आणि राहुल काळे यांच्यासोबत चांदवडमध्ये लुटमार केल्याची कबुली चौकशीदरम्यान दिली. दोघेही संशयित औरंगाबादमध्ये संजय चव्हाण याच्या घरात राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. सहायक निरीक्षक राम कर्पे, सहायक उपनिरीक्षक अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, शिपाई सुशांत मरकड, मंगेश गोसावी, रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संशयित सराईत

पोलिसांनी अटक केलेले संशयित सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी सिन्नर, चांदवड, पैठण या तालुक्यांमध्ये तसेच सातारा, नगर जिल्ह्यांमध्येही दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व मोटरसायकल चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. संशयित शुभम आणि विकास यांच्याकडे सापडलेली मोटरसायकल धुळे येथून चोरल्याचे उघडकीस आले आहे. तर संजय चव्हाण याने २००६ मध्ये सिन्नरमध्ये घरफोडी व चोरी केल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील संशयितांना सश्रम कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव स्कोडा कारने दिलेल्या धडकेत तीन महिला मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी न्यायालयाने संबंधित कारचालकासह आणखी एकास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शेख फैज फारूख, फारूख हबीब शेख (दोघे रा. आयेशानगर, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. २६ मे २०१७ रोजी मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला होता. विनापरवाना स्कोडा सुपर्ब ही कार भरधाव चालवित त्यांनी हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला धडक दिली होती. या अपघातात सरिता भामरे, रेखा पाटील व योगिनी भामरे या महिलांचा मृत्यू झाला होता. हर्षद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. कंडारे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे मिळविले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. आर. टंडन यांनी शेख फैज फारूख याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि २७ हजार ६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फारूख हबीब शेख याला तीन महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे चंद्रलेखा पगारे यांनी काम पाहिले. पोलिस कर्मचारी महेश मोरे यांनी संशयितांना शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images