Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

यंत्रमागधारकाकडून २० लाखांची वीजचोरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मालेगाव येथील यंत्रमागधारकाने थेट वितरण रोहित्रातून केबल टाकून विजेचा चोरून वापर केल्याचे उघडकीस आले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने ही वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधीतविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मोहम्मद फारुक मोहम्मद सुलेमान असे या यंत्रमागधारकाचे नाव असून मालेगाव तालुक्यातील महादले शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचे ११७ यंत्रमाग (पॉवर लूम) सुरू होते. मोहम्मदने जवळच्याच वितरण रोहित्रात अनधिकृतपणे केबल टाकून चोरी केलेल्या विजेवर त्याचे ११७ यंत्रमाग सुरू असल्याची बाब महावितरणच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. नाशिक शहर मंडळाच्या भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकला असता १ लाख ७० हजार ६ युनिट इतक्या वीजवापर झाल्याचे उघडकीस आले. जवळपास २० लाख रुपयांची वीज या यंत्रमागधारकाने चोरी करून वापरल्याप्रकरणी महावितरणने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे संचालक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक सुमित कुमार यांच्या नेतृत्वात उप सुरक्षा व दक्षता अधिकारी शमी अन्सारी, भरारी पथकाचे प्रमुख विनय काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलोत्पल तसेच पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांच्या पथकाचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घर पेटल्याने संसार उघड्यावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे भागातील अंबोडे पैकी कोडीपाडा येथील विधवा महिलेच्या घराला मंगळवारी (दि. १८) रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. यात घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, कपडे, भांडीकुंडी, अंथरुण पांघरून खाक झाल्याने महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे. घरासह साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

सखुबाई त्र्यंबक मोहरे (वय ५५) असे या पीडित महिलेचे नाव आहे. सखुबाई या घरात गाढ झोपेत असताना त्यांना अचानक गरम होऊ लागले. जाग आल्यावर आपले घर पेटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरडाओरडा केल्याने शेजारील मंडळींना त्यांनी जागे केले. मात्र, तोपर्यंत सर्व वस्तू जळून खाक झाल्या. त्यांचा मुलगा शांताराम कामानिमिताने पिंपळगाव परिरासतील द्राक्षेबागेत गेला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी रामदास गायकवाड, विष्णू भोये, सोन्या राथड, केशव भोये, सुरेश घांगळे, पांडुरंग घांगळे, जयराम भोये, नामदेव भोये, हरी मोहरे, सरपंच योगीराज पवार, पोलिस पाटील चिंतामण घांगळे यांनी प्रयत्न केले. अंबोडे सजाचे तलाठी पी. पी. वाघमारे यांनी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमल्यापेक्षा निफाडमध्ये अधिक कडाका!

0
0

तब्बल ६.६ अंश सेल्सिअसची नोंद

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तसे तर थंड हवेचे ठिकाण म्हणून हिमाचल प्रदेशातील सिमला हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. पण सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड सिमल्यापेक्षा काही कमी नाही. येथे बुधवारी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सिमल्याचे बुधवारचे तापमान ९.४ अंश सेल्सिअस होते.

निफाडमध्ये मागील वर्षी सर्वात कमी तापमान ६.४ होते. त्यामुळे निफाड तालुका बुधवारी ठंडा ठंडा कुल कुल होता. दरम्यान, अजून दोन ते तीन दिवस तापमान कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रब्बी पिकांना ही थंडी फायदेशीर असल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र, द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत या हवामानामुळे भर पडली आहे. शरद सीडलेस, परपल, जम्बो या वाणच्या द्राक्ष बागेतील द्राक्ष मण्यात फुगवण होऊन पाणी उतरले आहे. अशा घडातील मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. द्राक्षमण्यांचे आवरण पातळ असते. थंडी वाढत गेली तर द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढून उत्पादन कमी होण्याचा धोका वाढला आहे. ज्या द्राक्ष बागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत अशा बागांच्या द्राक्ष मण्यांची फुगवण थांबणार आहे. तर उशिराच्या द्राक्ष बागेतील फुलोऱ्यातील मण्यांची फुगवण एकसारखी होणार नाही थंडीचे प्रमाण वाढल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. औषध फवारणीचा खर्चही वाढणार आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षवेलींना ऊब देण्यासाठी शेतकऱ्यांनी बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. थंडीमुळे द्राक्षवेलींना अन्न पुरवठा करणाऱ्या पेशींचे कार्य थांबण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने देणे सुरू केल आहे.

शेकड्यांभोवती ऊबदार चर्चा

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.२ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत जाऊन बुधवारी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठले आहेत. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकही गारठले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील गारठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या कडाक्याच्या थंडीत आता आणखी भर पडली असून बुधवारी ७.९ अंश सेल्सियस या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्यामुळे शहरवासीयांना बोचऱ्या थंडीची जाणीव करुन देत आहे.

सकाळी उशिराने प्रकटणारी सूर्यकिरणे, प्रचंड गारठा यामुळे संपूर्ण शहर सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहे. शहराला असलेली थंड हवेच्या ठिकाणाची ओळख यंदाचा हिवाळा आणखीनच गडद करत आहे. दिवस-रात्र थंडीचा सामना नाशिककर करत आहेत. यामुळे साहजिकच आरोग्याच्या तक्रारीही वाढत असून सर्दी, खोकला, ताप या आजार बळावण्याचे प्रमाणही वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी सातत्याने उबदार कपडे घालणे, गरम पाणी पिणे, ताजे अन्न खाणे, व्यायाम करणे, यांतून शरीराची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

\Bपटसंख्येवर परिणाम

\Bकडाक्याची थंडी असली तरी, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे गरजेचेच असते. परंतु, शाळांच्या पटसंख्येवर मात्र थंडी परिणाम करत आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक या सकाळ सत्रातील वर्गांमध्ये उपस्थिती रोडावल्याचे चित्र आहे.

..

दिनांक कमाल तापमान किमान तापमान

१४ डिसेंबर - २८.५ १०.४

१५ डिसेंबर - २६.६ १०.६

१६ डिसेंबर - २५.८ १०.५

१७ डिसेंबर - २५.८ ८.५

१८ डिसेंबर - २६.७ ९.५

१९ डिसेंबर - २६.८ ७.९

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी मंगळवारी संवाद

0
0

'आयाम'तर्फे आयोजन; मटा मीडिया पार्टनर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अस्सल कलावंताच्या आयुष्यातील कंगोरे समजावून घेणे अन् त्याच्यातील ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेची एका मोठ्या कालखंडानंतर तितक्याच ताकदीने मांडणी करणे हे काम वाटते तितके सोपे नाही. तरीही, '...आणि काशिनाथ घाणेकर' या चित्रसृष्टीवर शब्दश: अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ही किमया लिलया घडविणारे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हे नाशिककरांच्या भेटीला मंगळवारी, २५ डिसेंबर रोजी येणार आहेत.

'आयाम' तर्फे आयोजित हा उपक्रम दि. २५ रोजी शंकराचार्य न्यास, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. रसिकांना या कार्यक्रमासाठी मुक्त प्रवेश आहे. या कार्यक्रमासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. मराठी नाट्यसृष्टीस पाच दशकांपूर्वी सोनेरी स्वप्ने दाखविणाऱ्या नटाच्या व्यक्तिमत्वाचे गूढ पदर या चित्रपटात दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी तितक्याच ताकदीने उलगडले आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाला उत्तूंग कलाविष्कारातून या चित्रपटाचे नायक सुबोध भावे यांनीही तितक्याच ताकदीची साथ दिली आहे.

कलेसाठी हयातभर संघर्षरत असणाऱ्या कलावंताच्या आयुष्यातील उत्कट भावाविष्कार या चित्रपटात तितक्यात प्रभावीपणे मांडण्यात आल्याने वाचकांना खिळवून ठेवण्यात अन् अभिरुचीच्या कसोटीवर उत्तीर्ण होत नवे झेंडे कलाकृतीने मराठी चित्रसृष्टीत रोवले आहेत. अशा दर्जेदार कलाकृतीचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी कल्याणी पंडित या संवाद साधणार आहेत. या उपक्रमाच्या आयोजनासाठी जयंत जोगळेकर यांचे सहकार्य लाभले असून मीडिया पार्टनर म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहकार्य लाभले आहे. या संवाद सोहळ्यासाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. या पर्वणीचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 'आयाम'चे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, विश्वस्त शुभदा देसाई आणि आयाम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिका मार्गदर्शन शनिवारपासून

0
0

रेषा केंद्र-'मटा'चा उपक्रम

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bइयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीत कृतिपत्रिकेच्या माध्यमातून अमूलाग्र बदल यंदा विद्यार्थ्यांना अनुभवावा लागणार आहे. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यांच्यात नेमका फरक काय, कृतिपत्रिका सोडविताना काय काळजी घ्याल आदी मुद्द्यांबाबत विद्यार्थी व पालकांसाठी 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' हा शैक्षणिक उपक्रम शनिवारी (दि. २२) आणि रविवारी (दि. २३) गंगापूर रोडवरील रेषा शिक्षण केंद्रात पार पडणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चा या उपक्रम आयोजनात सहभाग आहे.

बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीला कृतिपत्रिकांचा आधार असणार आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाणार आहे. उपक्रमात पालकांशी शनिवारी (दि. २२) संवाद साधला जाईल. पालकांना या उपक्रमासाठी मुक्त प्रवेश असेल. तसेच उपक्रमात विद्यार्थ्यांशी रविवारी (दि. २३) संवाद साधला जाईल. विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. पालकांसाठी दि. २२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तर दि. २३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमातील आणि याच दिवशी दुपारी १ ते दुपारी ३ या वेळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र पार पडेल.

येथे साधा संपर्क

सर्व उपक्रम ३ बी, कौस्तुभ, एस.टी. कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक या पत्त्यावर होतील. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराचा बोजा उतरणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींबाबत महासभेने नागरिकांना दिलासा मोठा दिलासा दिला आहे. सहा वर्ष पूर्वलक्षी प्रभावाने तिप्पट दंडासहीत घरपट्टी वसुली नोटिसांचा निर्णयही महासभेने बेकायदा ठरवत, त्या नोटिसा रद्द केल्या आहेत. या मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला दिले.

महापौर भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभा झाली. वाढीव घरपट्टी आणि नवीन मिळकतींना बजावण्यात येत असलेल्या नोटिसांवरून वादळी चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी महासभेत पत्र सादर करीत ५९ हजार मिळकतींना बजावलेल्या चुकीच्या नोटिसा तातडीने रद्द करून खासगी सर्वेक्षणाची फेरतपासणी करण्याची मागणी केली. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांनी रौद्रावतार धारण करीत खासगी मक्तेदाराने केलेल्या मिळकत सर्वेक्षणाची चिरफाड केली. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय कसा बेकायदेशीर होता, याचा पाढाच महासभेत वाचला. अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनीदेखील प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करीत चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या परसेवेतील अधिकाऱ्यांना मूळ शासन सेवेत पाठविण्याची मागणी केली. गुरुमित बग्गा यांनी करबुडवेगिरी करणाऱ्यांवर कारवाईला विरोध नसल्याचे सांगत, खासगी मक्तेदारामार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. लव्हाटेनगर भागात असलेल्या बंगल्याला बजावलेल्या नोटिशीवर अशोकस्तंभ येथील पत्ता असल्याचे अॅड. वैशाली भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, या सर्वेक्षणातील बनवेगिरी उघड केली. घरपट्टीच्या अवाजवी नोटिसांमुळे शहरात अराजकता माजण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करीत, नगररचना विभागाचा अभिप्राय न घेता मिळकतींना कशाच्या आधारे नोटिसा बजावल्या, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित करून त्या रद्द करण्याची मागणी केली.

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी अवाजवी करवाढीला विरोध दर्शवित शेतीवरील कर रद्द करण्याची सूचना मांडत वाढीव कराबाबतही पुनर्रचना करण्याची मागणी केली. करवाढीविरोधात शिवसेनेने यापूर्वी तीनवेळा लक्षवेधी सादर केल्याचे सभागृहाला स्मरण करून देत विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी अवाजवी नोटिसा रद्द करून मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी महापौरांकडे केली. या मिळकत सर्वेक्षणाच्या आधारे २.६९ लाख मिळकती अनधिकृत ठरविण्याची तत्कालिन आयुक्त मुंढे यांची कृती आततायीपणाची असल्याची टीका करीत यासंदर्भातील ठराव न्यायालयाला परस्पर सादर केला गेला नाही ना, याची शहानिशा करण्याची मागणीही बोरस्ते यांनी केली. करवाढ आणि मिळकतींना येत असलेल्या नोटिसांबाबत नागरिकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली. उद्धव निमसे, डी. जी. सूर्यवंशी, पुष्पा आव्हाड, हेमलता पाटील आदींनी या नोटिसांना विरोध दर्शविला. बोगस सर्वेक्षणाच्या आधारे प्रशासनाने बजावलेल्या घरपट्टी वसुलीच्या दंडात्मक नोटिसा रद्द करण्याची, तसेच विभागनिहाय अभियंते, तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करून मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मांडल्यानंतर महापौर भानसी यांनी मुंढे यांचा निर्णय बेकायदा ठरवला. या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या नोटिसांनी भंजाळून गेलेल्या मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे.

पाणीही परस्पर महागले

वाढीव करयोग्य मूल्य आणि मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींना मिळणाऱ्या लाखोंच्या नोटिसा बघून नागरिक चक्रावले असताना, घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परस्पर वाढ केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस गटनेते शाहू खैरे व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. महासभेला डावलून परस्पर हा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न बोरस्तेंनी उपस्थित केला. त्यावर महापौर भानसी यांनी पाणीपट्टी विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना खुलासा करण्यास सांगीतले. त्यावर मुंढेंच्या आदेश क्र. १३ मुळे पाणीपट्टीचा स्लॅब वाढवल्याचा खुलासा त्यांनी केल्याने सभागृहही अवाक् झाले. यावरही निर्णय घेण्याची मागणी बोरस्ते, खैरे यांनी केली.

सर्वेक्षणच बोगस

मिळकतींबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे आणि करसंकलन विभागाचे उपायुक्त महेश डोईफोडे यांनी या सर्वेक्षणातील त्रुटींची माहिती दिली. मे. जिओ इन्फोसिस टेक्नोलॉजी या खासगी मक्तेदारामार्फत आतापर्यंत ४.६० लाख मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना घरपट्टी वसुलीसाठी पूर्वलक्षी प्रभावाने नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या तपासणीत २१ हजार मिळकती अधिकृत आढळल्या असून उर्वरित ३७ हजार मिळकतीपैकी ५८७८ मिळकतींचे अद्याप बांधकाम सुरू असताना त्यांना कर लागू नसल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे त्यांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. २५७१ मिळकतींना घरपट्टी लागू असताना त्यांची कर लागू नसल्याची नोंद सर्वेक्षणात घेतली गेली, तर ७५२ झोपड्यांना देखील स्लम चार्जेसऐवजी वाढीव घरपट्टी लावण्यात आल्याचे आढळले आहे, असे नमूद करत हे सर्वेक्षणच बोगस असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच आयुक्त गमे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारींवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

नवीन मिळकतींना नोटिसा देऊ नये अशा सूचना यापू्र्वीच केल्या होत्या. परंतु, मुंढेंच्या दबावामुळे त्या देण्यात आल्या आहेत. या मिळकतींच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी असल्याने या सर्व नोटिसा रद्द करण्यात याव्यात. पालिकेच्या तज्ज्ञ लोकांकडून त्याचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे.

- रंजना भानसी, महापौर

वाढीव कर आणि ५९ हजार मिळकतींबाबत शिवसेनेने तीन वेळा लक्षवेधी दिली आहे. यासंदर्भात अनेकदा चर्चा झाली असून, आता हे सर्वेक्षणच बोगस असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे या नोटिसा रद्द करण्यात याव्यात. शहरवासियांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

करवाढीकडे आपण तटस्थ भावनेने बघत असून, कायदेशीर प्रक्रिया तपासून अंतिम निर्णय घेतला जाईल. या सर्वांबाबत येत्या १७ दिवसांत स्पष्टता येऊन नागरिकांचा संभ्रम दूर केला जाईल. परंतु, घरपट्टीबाबत लोकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

0
0

नामको मतदानासाठी

तयारी अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील अग्रगण्य सहकारी बॅँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को- ऑपरेटिव्ह बॅँकेसाठी २३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नाशिकमध्ये १६२, तर जिल्ह्यात १२५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

बँकेचे काही सभासद राज्याबाहेरही असल्याने हैदराबाद व सुरत येथे प्रत्येकी १ मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. १ लाख ७६ हजार २६२ मतदार असून, त्यापैकी ९३ टक्के मतदान हे नाशिकमध्ये आहे, तर उर्वरित ७ टक्के मतदान हे जिल्ह्याबाहेर आहे. या मतदान केंद्रात सकाळी ८ ते ५ या वेळात हे मतदान करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी फोटो असलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार २०० कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. पुरुष पोलिस ३०० तर महिला पोलिस १०० याप्रमाणे ४०० पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याबाहेर २६ जिल्ह्यांत ११ हजार ६७२ मतदान असले तरी जास्त मतदान असलेल्या ठिकाणीच हे मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. श्रीरामपूर येथे ३ मतदान केंद्रे असतील. त्यानंतर पुणे, अहमदनगर, राहता, संगमनेर येथे प्रत्येकी दोन तर धुळे, मुंबई, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, राहुरी, येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असेल. उर्वरित जिल्ह्यांतील मतदार मात्र त्यांना जवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५४ कोटींचा टंचाई आराखडा

0
0

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल सादर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गत मोसमात उत्तर महाराष्ट्रात ड्राय स्पेलने प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकल्याने भूजलपातळी घटून तब्बल ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. तेथील ८३ टक्के म्हणजेच १ कोटी ८६ लाख इतकी लोकसंख्या प्रभावित झाली आहे. या तालुक्यांमधील रहिवाशांना दुष्काळाच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी विभागीय महसूल प्रशासनाने राज्य सरकारकडे १५४ कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अहवाल पाठविला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत गत मोसमात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी या पाच जिल्ह्यांतील बहुतेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टंचाई अहवाल मागविला होता. नाशिक विभागीय आयुक्तालयाने नाशिक विभागाचा १५४ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. या आराखड्यानुसार विभागात टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करण, जनावरांच्या चारा टंचाईवर शेतकऱ्यांना सहाय्य करणे यासारख्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सरकारकडून निधी उपलब्ध होताच या उपाययोजना तात्काळ राबविल्या जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई या मानकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

धुळे-जळगावमध्ये शंभर टक्के टंचाई

विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार विभागातील धुळे जिल्ह्यातील सर्व ४ आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत टंचाईस्थिती गंभीर आहे. विभागात ८३ टक्के म्हणजेच १ कोटी ८६ लाख नागरिक दुष्काळाने प्रभावित झाले आहेत. तर प्रत्यक्षात १ कोटी ५५ लाख नागरिकांना तातडीच्या शासकीय मदतीची गरज आहे. विभागातील ५४ पैकी ४९ तालुक्यांतील भूजल पातळी १ ते ३ मीटरने घटली आहे. या तालुक्यांत ३४ लाख जनावरांच्या चारा टंचाईच्या समस्येनेही गंभीर स्वरुप धारण केले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कापसासारख्या नगदी पिकाचेही पाण्याअभावी मोठे नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना पिककर्जाच्या लाभ देण्याचा समावेश या अहवालात करण्यात आलेला आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती उद्धभवते त्यावेळी सरकारकडून दर चार महिन्यांनी टंचाई आराखडा मागवला जातो. या विषयीचा अहवाल राज्य सरकारला नुकतास सादर केला. पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे तात्पुरता पुरवठा, विहीर अधिग्रहण, चारा उपलब्धता याविषयीच्या उपाययोजना राबविण्यासाठी १५४ कोटी रुपरे खर्चाचा हा आराखडा आहे. पुढील टंचाई आराखडा एप्रिलअखेर पाठविला जाईल.

- राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीला पालिकेचा दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने खरडपट्टी काढल्यानंतर पालिकेच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) नोटीस बजावली आहे. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या दोन्ही वसाहतींतील ४० कारखाने प्रक्रिया न करताच नाल्यांमध्ये पाणी सोडत असल्याचे पर्यावरण विभागाने म्हटले आहे.

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टात सुना‌वणी सुरू असून, कोर्टाने प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. निरीच्या अहवालानुसार अनेक उपाय करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिल्या आहेत. परंतु, त्यावर प्रगती झालेली दिसत नाही. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने याबाबत सरकारी यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा पाझर सुरू असल्याच्या तक्रारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पालिकेने एकीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या मलजल शुद्धीकरण केंद्रांची क्षमताही वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली असताना खासगी उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष केले होते. औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतील पाणी प्रक्रिया केल्यानंतरच बाहेर सोडावे, असे बंधन आहे. मात्र, अनेक कारखाने लगतच्या नैसर्गिक नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडतात. या नाल्यांद्वारे हे पाणी थेट गोदावरीत मिसळते. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास ४० कारखान्यांकडून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे समोर आले आहे. सोमेश्वर नाला, बारदान फाटा, नंदिनी, चिखली या नाल्यांत असे पाणी सोडले जात असल्याने त्यासाठी जबाबदार कारखान्यांवर तातडीने कारवाईचे आदेश या नोटिशीद्वारे पालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. त्यामुळे एमआयडीसीला आता या कारखान्यांवर कारवाई करावी लागणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळही झाले जागे

हायकोर्टाच्या दणक्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळही कारखान्यांची पाहणी करणार आहे. सातपूर, अंबड या दोन्ही एमआयडीसीतील रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार आहे. यामुळे प्रदूषण रोखण्यास हातभार लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम

0
0

वर्षभरानंतर घेतली अंगठी चोरीची तक्रार

चिंतामणी लॉन्समधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल वर्षभरापूर्वी गंगापूर रोडवरील एक लॉन्सच्या बाथरूममध्ये अंगठी हरवल्याचा गुन्हा गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी पोलिसांनी किरकोळ लेखी घेवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधिताने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने या घटनेची वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांनी दखल घेतली आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूररोडवरील पंपीग स्टेशनजवळील चिंतामणी लॉन्स येथे हा प्रकार घडला होता.

शरद किसन गावडे (रा. प्रतिक्षानगर, सायन पूर्व, मुंबई) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गेल्या वर्षी गावडे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा सागर याचा शहरात विवाह होता. वधू पक्षाच्यावतीने चिंतामणी लॉन्स येथे व्यवस्था करण्यात आली होती. गावडे कुटुंबिय ९ डिसेंबर २०१७ रोजी तेथे मुक्कामी होते. १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी शरद हे आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. आंघोळीनंतर २० हजारांची सोन्याची अंगठी ते बाथरूममध्येच विसरले. मात्र, ही बाब काही वेळाने त्यांच्या लक्षात आली. त्यांनी बाथरूममध्ये पुन्हा पाहणी केली असता अंगठी बेपत्ता होती. तत्पूर्वीच लॉन्समधील दोन मुले साफसफाई करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्याचे त्यांच्या पुतण्याचे निदर्शनास आले होते. लॉन्स चालकाशी संपर्क साधून त्यांनी पोलिसातही धाव घेतली होती. किरकोळ लेखी घेवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मात्र पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

वृद्धेच्या बॅगमधील रोकड, दागिने चोरी

बसच्या प्रतिक्षेत बसलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतील रोकड आणि दागिने असा सुमारे ७३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना निमाणी बसस्थानकात घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बकुबाई मारूती भाबड (६५, रा. भोकणी-खंबाळे ता. सिन्नर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बुधवारी आपल्या गावी जाण्यासाठी भाबड निमाणी बसस्थानकात बसच्या प्रतिक्षेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील १५ हजारांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. गर्दीच्या ठिकाणी फिरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

शिवाजीनगरला घरफोडी

एमआयडीसीतील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मिराबाई चिंधा सोनवणे (रा. सावन रो हाऊस, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोनवणे कुटुंबिय ५ ते १२ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील दीड हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे २६ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

--

दहा जुगारी गजाआड

अंबड एमआयडीसीसह इंद्रकुंड भागात पोलिसांनी छापे टाकून दोन जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाई दहा जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, अंबड आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड एमआयडीसीतील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी भागातील एका बंधिस्त पडक्या जागेत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी सायंकाळी अंबड पोलिसांनी छापा टाकला. भीमराव धुरंधर याच्यासह चार जण जुगार खेळताना सापडले. दुसरा छापा इंद्रकुंड भागात टाकण्यात आला. इंद्रकुंड येथील सिद्धी टॉवरवर सुरेश भंडारी व त्याचे चार साथीदार जुगार खेळतांना सापडले. बुधवारी दुपारी पंचवटी पोलिसांनी कारवाई केली.

--

दुचाकींची चोरी

शहरातील दोन दुचाकी चोरीस गेल्या असून, या प्रकरणी सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकरोड येथील जव्हार मार्केट भागात राहणारे यश रामप्रसाद राठी यांची अ‍ॅक्टीव्हा (एमएच १५ ईजे २८९९) गेल्या शुक्रवारी (दि.७) शास्त्रीनगर येथील एम. आर. ठक्कर रोडवर भिंतीलगत पार्क केलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना दोनवाडे रोडवरील नाणेगाव येथे घडली. काशिनाथ गणपत आडके (रा. नाणेगाव) यांची स्प्लेंडर (एमएच १५ डीजे ३२६२) गेल्या शनिवारी (दि.८) दुपारी त्यांच्या घरासमोरील कांद्याच्या चाळीत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. .

घरफोडी करणारे अटकेत

मनमाड : मनमाड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन घरफोडीच्या घटनांचा तपास करून आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात मनमाड पोलिसांना यश आले आहे. मनमाड परिसरात पंचवटी कॉलनी तसेच नजराणा सोसायटी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिघांना अटक करून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनेश मोरे यांच्या नजराणा सोसायटी मधील बंगल्यात घरफोडी करून ८३ हजार चा तर पंचवटी कॉलनी मधील विजय सोमीने यांच्या कडील घरफोडीत १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या गुन्ह्यातील संशयितांचा पोलिस तपास करीत होते. पोलिसांनी सखोल तपास करत गुरुवारी रात्री या घरफोडी प्रकरणी सागर उर्फ मायासागर यशवंत गरुड वय (२१ रा. पंचवटी कॉलनी), अभिराज लक्ष्मण उबाळे (वय २६), सचिन पगारे (वय २३ रा. वृंदावन कॉलनी मनमाड) या तिघांना शिताफीने अटक केली. दोन्ही ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

0
0

\Bअनुदान योजनेसाठी

लाभार्थींना आवाहन

\Bनाशिक : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात मातंग समाज आणि १२ पोट जातीतील लाभार्थींसाठी बँकेमार्फत अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मातंग समाज बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

\Bहॉल तिकीट उपलब्ध

\Bनाशिक : १०८ व्या अॅप्रेंटिसशिपसाठी ऑनलाइन परीक्षा २७ डिसेंबरपासून होणार असून, परीक्षेसाठी हॉल तिकिट विद्यार्थ्यांनी संबंधित अस्थापनेकडून उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चव्हाणांची कृषिमंत्र्यांसोबत चर्चा

0
0

कांदाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची खासदार चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे कृषी मंत्रालयात भेट घेतली.

गेल्या २० वर्षांपासून कांद्याच्या मंदीचे नीट व्यवस्थापन होत नसल्याने प्रत्येक अडीच-तीन वर्षाआड मोठ्या तेजी-मंदीचे चक्र सुरू आहे. या मंदीकडे दीर्घकालीन व्यवस्थापनाची संधी म्हणूनही पाहता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत खासदार चव्हाण यांनी तात्काळ उपायोजना करण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली.

किमान दहा वर्षांसाठी कांदा निर्यात धोरण निश्चित करणे, केंद्र आणि राज्य सरकारने खासगी क्षेत्राच्या साह्याने किमान एक महिन्याच्या सुमारे १२ ते १५ लाख टन संरक्षित कांद्याच्या साठ्याची व्यवस्था उभारणे, खासगी क्षेत्राच्या माध्यमातून १२ ते १५ हजार टनाच्या कांदा शीतगृहे उभारणे, त्यासाठी अनुदान देणे, महाराष्ट्राखेरीज अन्य राज्यांत शेतकऱ्यांना कांदा चाळींसाठी अनुदान देणे, कांद्यातील सूक्ष्मसिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी किमान ५० टक्के अनुदान देणे, कांदा निर्यातीसाठी कायमस्वरुपी निर्यात अनुदान निश्चित करणे, अमेरिकेतील कृषी खात्याच्या धर्तीवर मासिक मागणी आणि पुरवठ्याचा अहवाल प्रसिद्ध करणे, देशांतर्गत कांदा लागवड आणि उत्पादनाची आकडेवारी देणारी यंत्रणा सक्षम आणि पारदर्शी करणे अशी मागणी त्यांच्याकडे केली.

सरकार सकारात्मक

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी खासदार चव्हाण यांची प्रमुख मागणी कायमस्वरूपी कांदा निर्यात सुरू ठेऊन अनुदान देणेबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच येत्या काही दिवसात सदरचा निर्णय होण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही सांगितले. या भेटीप्रसंगी नांदगावचे माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, सुदामराव थेटे-पाटील, बापूसाहेब जाधव यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटपुंज्या अनुदानाची टिमकी

0
0

कांदा उत्पादकांमध्ये संताप; शिल्लक कांद्याचा प्रश्न अनुत्तरितच

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मातीमोल दराने कांदा विकला जात असल्याने गल्ली ते दिल्ली अशी चर्चा कांद्यावर सुरू होती. कांदा उत्पादकांचे आंदोलन, गांधीगिरी, बाजार समिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची पंतप्रधानांशी भेट अशा घडामोडी घडत असताना कांदा उत्पादकांना सरकार काही ना काही दिलासा देईल अशी शक्यता होती. त्यानुसार राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र या तुटपुंज्या अनुदानावर कांदा उत्पादक समाधानी नाहीत. २०० ते २५० रुपये क्विंटल भावाने विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान मिळूनही खर्च निघणार नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. त्यामुळे कांद्याला अनुदान दिल्याची टिमकी सरकार वाजवत असले तरी उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी दीड रुपया किलोप्रमाणे विक्री झालेल्या कांद्याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डर केल्यामुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांच्या व्यथा दिल्लीपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला. यामुळे कांदा या विषयावर गेले दोन आठवडे ढवळून निघाले होते. त्यातच लासलगाव आणि चांदवड बाजार समितीचे प्रशासन मंडळ आणि आमदार अनिल कदम व आमदार राहुल आहेर. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून कांद्याला एक हजार रुपये अनुदान व बाजार हस्तक्षेप योजनासह इतर उपाययोजना राबवण्याची विनंती केली होती. यावेळी मोदी यांची भेट सकारात्मक असल्याचे या सर्वांनी सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी राज्य सरकारने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले.

सन २००० साली कांद्याचे भाव कोसळल्याने महाराष्ट्र सरकारने फेडरेशनच्या माध्यमातून ३५० रु क्विंटलने शिल्लक कांदा खरेदी केला होता. आज १८ वर्षानंतर २०० रुपये अनुदान दिले जात आहे. सन २००० साली कांदा पीक घ्यायला लागणारा खर्च, डिझेल- पेट्रोल खताचे, मजुरीचे भाव आणि आजचा खर्च याच्यात खूप वाढ झाली आहे. त्याप्रमाणत आजचे २०० रुपये म्हणजे मदतीचा उलटा प्रवास असून ही कांदा उत्पादकांची थट्टा आहे.

- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

उन्हाळ कांदा ३०० ते ३५० रुपये विकला गेला त्या शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदानाने काय लाभ होणार आहे. वास्तविक दोन हजार रुपये हमी भाव कांद्याला ठरवून लिलावात पुकारलेल्या भावाची उर्वरित फरकाची रक्कम सरकारने दिली तरच कांदा उत्पादकांना परवडेल. मंत्रीमंडळातील निर्णयात उन्हाळ की लाल कांद्याला अनुदान तेही संदिगध आहे. शिवाय आता लाल कांद्याचेही दर ७०० रुपयांच्या खाली आले आहेत. त्यांना काय देणार, सरकारने बाजार समित्यांकडून वर्गीकरण करून मागितले असते तर वस्तुस्थिती समजली असती, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे.

- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

कांदा अनुदानासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत लिलाव झालेल्या कांद्याची मुदत दिली आहे. माझ्याकडील उन्हाळ कांदा अजूनही चाळीत आहे. मग मी हा कांदा असाच फेकून द्यायचा का, तारखेची अट टाकून अनुदान देतानाही सरकारने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे.

- अनुरूप कुंभार्डे, कांदा उत्पादक

सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. इतका खर्च तर कांदे चाळीतून मार्केटला घेऊन जाताना भाडे, मजुरी, तोलाईसाठी येतो. उन्हाळ कांदा साठवल्याने त्याच्यात घट झाली आहे. जवळपास ५० टक्के नुकसान होऊनही भाव कमी त्यामुळे किमान हजार रुपये अनुदान दिले तरच दिलासा मिळेल.

- संपत व्यवहारे

कांद्याला २०० रुपये अनुदान जाहीर केले. पण चाळीत शिल्लक कांद्याचे काय? आज कमी भावाने कांदा विकला जात आहे. त्याचे काय? सर्वांसाठी योग्य निर्णय घ्यायला पाहीजे होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढायला हवा होता. शेतकऱ्यांनी अनुदान नाकारायला हवे.

- संजय साठे, कांदा उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व जागांवर बिनविरोध निवड

0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे गठन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेचे गठण झाले आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रतिनिधींची सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी तर विद्यार्थी परिषदेसाठी एक अध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन उपाध्यक्ष व दोन संयुक्त सचिव या कार्यकारी प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा पद्मसिंह जामकर, अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा विद्यार्थी अभिनंदन बोकरिया, शिरपूरच्या केव्हीटीआर आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी निखिल चौधरी या तीन विद्यार्थी प्रतिनिधींची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे आर. ए. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयाचा शिवराज काळे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी कोल्हापूरच्या कै. केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी पवनकुमार भोईर, नाशिकच्या श्रीमती के. बी. आव्हाड होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती जोशी यांची, सरचिटणीसपदी कोल्हापूरचे पी. एस. एम. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाचा सौरव मुळे यांची व संयुक्त सचिवपदी अहमदनगर येथील एसएमबीटी दंत महाविद्यालयाची प्रेरणा सूर्यवंशी आणि मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाची गायत्री कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी काम पाहिले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो आजपासून

0
0

अनेक आकर्षक योजना एकाच छताखाली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८' प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि. २१) या तीन दिवस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेनऊ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावर असणार आहे. यात १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, १५ पेक्षा जास्त गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व अन्य बांधकाम साहित्य कंपन्यांचे स्टॉल्स असतील. त्यासाठी दोन लाख चौरस फूट एवढ्या विस्तीर्ण परिसरात आकर्षक डोम उभारण्यात आले आहेत. ३०० गृह प्रकल्पातील १५ लाख ते २ कोटी पर्यंतच्या ५००० पेक्षा जास्त सदनिकांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप, राहुल आहेर, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके, विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते व सभागृह नेते दिनकर पाटील उपस्थित राहणार आहे.

क्रेडाई ही भारतातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था असून सुमारे ११००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेशी जोडले आहेत. अर्थपुरवठा करणाऱ्या नामांकित वित्तीय संस्था, बांधकाम साहित्यातील नामांकित कंपन्या, फूड, अपारंपरिक उर्जा, सेवा पुरविणाऱ्या विविध संस्था आदींचा या प्रदर्शनात सहभाग राहणार आहे. प्रदर्शनाचे संयोजन क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, मानद सचिव कृणाल पाटील, उपाध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर,अतुल शिंदे, राजेश पिंगळे, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर, ऋषिकेश कोते हे करीत आहेत. प्रदर्शन कालावधीत बुकिंग करणाऱ्या तीन भाग्यवंतांना 'हॅचिको किचन ट्रॉली'तर्फे किचन ट्रॉलीचे गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनासाठी ऑनलाइन तिकीट फ्री मिळणार आहे.

गृहखरेदीसाठी पोषक वातावरण

प्रदर्शनाबाबत क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी सांगितले, की अनेक आकर्षक योजनांसह विविध प्रकल्पात फ्लॅट, प्लॉट, फार्महाऊस,शेतजमीन, शॉप्स, ऑफिसेस, व्यावसायिक जागा, बांधकाम साहित्य, गृहकर्ज आदी सर्वच एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. 'रेरा' कायद्यामुळे या व्यवसायात आणखी पारदर्शकता आल्याने सद्यस्थितीत अर्थसहाय्य कारणाऱ्या संस्थांनीही कर्जाचे दर बरेच कमी केले असून कर्जाचा अवधीही वाढवला आहे. तसेच सरकारनेही पहिले घर खरेदी करण्यासाठी २.६७ लाखपर्यंत सूट दिली आहे. एकूणच, सध्या गृहखरेदीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे हे प्रदर्शन गृहखरेदीची महत्त्वाची संधी ठरणार आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीदीत दोन बिबटे पिंजराबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दहीदी शिवारात दोन बिबट्यांना दोन वेगवेगळ्या पिंजऱ्यात बंद करण्यात मालेगाव वनविभागाला यश आले आहे. वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हे दोन्ही बिबटे शुक्रवारी पिंजराबंद झाल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ४ डिसेंबर रोजी दहीदी परिसरातील समाधान कचवे यांच्या नर्सरीत काम करीत असताना लक्ष्मण धनाजी सोनवणे या शेतमजुरावर एका बिबट्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर वनविभागाने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले होते. शुक्रवारी या दोन्ही पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाल्याने परिसरातील बिबट्याची भीती नाहीशी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभागाकडून हे पिंजरे ताब्यात घेण्यात आले असून, या बिबट्यांना गाळणे येथील त्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धा

0
0

१५ तालुक्यांत होणार वॉटर कप अंतर्गत जलसंधारण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा होणार असून, त्यासाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ झाला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे यंदाच्या वॉटर कप स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्यभरातून २४ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या वतीने 'सत्यमेव जयते वॉटर कप २०१९' या स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, स्पर्धेचे यंदा चौथे पर्व आहे. राज्यातील गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, यासाठी या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाचे श्रमदान गावकऱ्यांमार्फत करण्यात येते. यंदा ८ एप्रिल ते २२ मे २०१९ या कालवधीत ही स्पर्धा होणार असून, प्रथक क्रमांक पटकविणाऱ्या गावास ७५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ५० लाख रुपये आणि तृतीय क्रमाकांस ४० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात जलसंधारणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रात यंदा दुष्काळामुळे गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, पाच जिल्ह्यांतील पंधरा तालुक्यांत यंदा ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पारोळा आणि जामनेर, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील धुळे व सिंदखेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत आणि संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरीत अल्पवयीन मुलगा!

0
0

सुमारे सव्वा लाख रुपयांचे १८ हॅण्डसेट जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांचा एका अल्पवयीन मुलांपर्यंत येऊन थांबला. या मुलाने दिलेल्या माहितीनुसार दोघा खरेदीदारांना पोलिसांनी अटक केली असून, चोरीचे दोन गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. संशयित आरोपीच्या ताब्यातून एक लाख ३७ हजार रुपयांचे १८ मोबाइल हस्तगत करण्यात आले. संशयितांच्या अटकेने अनेक गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह जुन्या नाशकातील वर्दळीच्या भागात सतत मोबाइल चोरीचे प्रकार घडतात. नाशिक-पुणे मार्गावरील सिद्धार्थ हॉटेल पाठीमागे राहणाऱ्या शीतल प्रमोद नेवासकर यांचाही मोबाइल काही महिन्यांपूर्वी चोरीस गेला होता. मेनरोड भागात खरेदीसाठी आलेल्या नेवासकर यांच्या पाठीवर असलेल्या बॅगची चेन उघडून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला होता. या घटनेची दखल घेत भद्रकाली पोलिस चोरट्यांचा माग काढीत होते. या दरम्यान बागवानपुरा भागातील १७ वर्षांच्या अल्पवयीन युवकाबाबत पोलिसांना माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी गत शुक्रवारी मुलाकडे चौकशी केली. यावेळी त्याने कबुली देत १८ मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, उपनिरीक्षक विशाल मुळे, हवालदार सोमनाथ सातपुते, पोलिस नाईक रवींद्र मोहिते, पोलिस शिपाई संतोष उशीर, उत्तम पाटील, एजाज पठाण, दीपक शिलावट, गणेश निंबाळकर आदींच्या पथकाने कारवाई केली.

दोघा खरेदीदारांना अटक

चोरी केलेल्या १८ पैकी तीन मोबाइल अक्षय बाळू तेजाळे व अक्षय कैलास शिंदे (रा. दोघे काळे चौक, मोठा राजवाडा) यांना विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघा खरेदीदारांना अटक करीत विविध कंपन्यांचे सुमारे एक लाख ३७ हजार ४८० रूपये किंमतीचे १८ मोबाइल हस्तगत केले आहेत. संशयितांच्या अटकेने भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले विद्यामंदिरात गाडगेबाबांना वंदन

0
0

फुले विद्यामंदिरात

गाडगेबाबांना वंदन

नाशिक : अंधश्रद्धा आणि अस्वस्थता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमातून समाजसुधारणा करणारे संत गाडगेबाबा २० व्या शतकातील आधुनिक संत होते, असे विचार संगिता महाजन यांनी व्यक्त केले.

पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी फडके होत्या. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ज्योती महाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश खैरनार यांनी प्रास्ताविक केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत गवळी यांनी आभार मानले. सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्या महाजन, जयश्री पवार, लक्ष्मण काशिद यांचे विशेष सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images