Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वरानंदवनात श्रोते मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपंग असूनदेखील व्हीलचेअरद्वारे केलेले चित्तथरारक नृत्य, गतिमंद गायकाचा सुमधूर आवाज, मंददृष्टीकडे पाठ करून गिटार ढोलकीसह वाजविलेली वाद्ये आणि मराठी, हिंदी चित्रपटातील गीते, भावगीत सुमारे शंभराहून अधिक कलाकारांनी सादर केले. अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, आदिवासी, विकलांग कलावतींना बहारदार कला सादर करून नाशिककरांना मंत्रमुग्ध केले.

इन्फंट इंडियाच्या वतीने आनंदवन निर्मित स्वरानंदवन संगीत रजनीचा कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला. गीतांतून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रबोधनही करण्यात आले. आनंदवनातील ११० अपंग, मूकबधिर, कुष्ठरोगी, अनाथ कलावंतांनी गायन, वादन व नृत्य कलेच्या सादरीकरणाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'मुक्तांगणात यारे, आनंद सागरात या यारे' हे ग. दी. माडगूळकर लिखित गाणे अंध युवतींनी सादर केले. आनंदवनातील कुष्ठरोगी दाम्पत्यांच्या मुलींनी गणेशवंदना नृत्य सादर केले. दृष्टीहीन आणि गतिमंद कलाकारांनी 'दिल चीज क्या हैं', 'ही वाट दूर जाते..' ही गीते सादर केली. आनंदवन कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. 'डोला रे डोला' गीतावरील व्हीलचेअरवरील तरुणींनी सादर केलेल्या नृत्य पाहताना उपस्थितांचे भान हरपले होते. काही कलाकारांनी प्राणी, पक्षी तसेच सिनेकलावंतांचे हुबेहूब आवाज काढले. कार्यक्रमात व्हीलचेअरवर असलेले आनंदवन येथील सुधीर कदम यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनातून कार्यक्रमात रंग भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दानशूर काकूशेठ यांचे स्वप्न साकार

$
0
0

अशोक मर्चंट यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे योगदान मोलाचे आहे. दानशूर काकूशेठ उदेशी यांनी १९८७ मध्ये या संस्थेला २३ एकर जमीन ही शैक्षणिक उद्दिष्टासाठी दिली. त्याचे पुढील काळात सोने करीत असंख्य विद्यार्थ्यांना या संस्थेने ज्ञानदान करून काकूशेठ उदेशी यांचे स्वप्न साकार केले, असे गौरवोद्गार संस्थेचे विश्वस्त काकूशेठ उदेशी यांनी काढले.

वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शकुंतला वाघ, संस्थापक अध्यक्ष विजय मोरे, सुषमा मर्चंट, विश्वस्त चांगदेव होळकर, चंद्रकांत मथुरिया, समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, मुख्य-समन्वयक तथा प्राचार्य डॉ. के. एन.नांदूरकर, समन्वयक सुवर्ण महोत्सव समिती प्रा. एम. बी. झाडे, डॉ. व्ही. एम. सेवलिकर, डॉ. बी. जी. वाघ, डॉ. के. एस. जैन आदी उपस्थित होते.

अमृतधाम, पंचवटी येथील हिराबाई हरिदास विद्यानगरीच्या प्रांगणात सोमवारी सत्यनारायण पूजन होऊन सुवर्ण महोत्सवाचा दुपारी प्रारंभ झाला. यानंतर वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांच्या हस्ते माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, अॅड. दिलीप वनारेसे, माजी प्राचार्य आर. टी. मोरे, अॅड. रमेश जाधव आणि हेमंत वाघ आदींचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनावर आधारित लघुचित्रपट आणि सुवर्ण महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण मर्चंट आणि संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या वाटचालीत योगदान असल्याने मर्चंट कुटुंबीयांना यावेळी गौरविण्यात आले.

प्राचार्य डॉ. के. एन.नांदूरकर यांनी संस्थेच्या विस्तार व उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबाबत डॉ. बी. व्ही. कर्डिले यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. नांदूरकर यांनी प्रास्ताविक तर स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. टी. कडवे यांनी आभार मानले.

१९७० रोजी लावलेल्या के. के. वाघ शिक्षण संस्थारुपी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गेल्या ५० वर्षांत कै. रतनशी हरिदास उदेशी अर्थात काकूशेठ आणि त्यांचे सुपूत्र अशोक मर्चंट, चंद्रकांत मर्चंट यांच्यासारख्या अनेक धुरंधर सहकाऱ्यांची साथ लाभली.

- बाळासाहेब वाघ, अध्यक्ष

ग्रामीण भागातून चटाईच्या भिंतीपासून सुरू झालेल्या या संस्थेने ५० वर्षात यशाचे उच्च शिखर गाठल्याने अत्यांनद होत आहे. या संस्थेने अशीच गुणवत्ता राखत परदेशातही शिक्षण संस्थेची शाखा सुरू करावी.

- विजय मोरे, संस्थापक अध्यक्ष

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या बसचे टायर पेटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पंचवटीकडुन नाशिकरोडकडे जाणाऱ्या शहर बससेवेच्या एका बसच्या मागील चाकाच्या टायरने पेट घेतल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता बिटको चौकातील पवन हॉटेलसमोर घडली. हा प्रकार लक्षात आल्यावर पालिकेच्या मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील १४ प्रवासी सुखरुप वाचले.

शहर बससेवेची बस क्रमांक एमएच १५, एके ८०८९ ही सोमवारी सकाळी नाशिककडून नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना बिटको चौकातील सिग्नल ओलांडून पुढे जात असताना या बसच्या वाहकाच्या बाजूकडील मागील चाकाजवळून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. पवन हॉटेलजवळील चहाच्या दुकानापुढे चहासाठी थांबलेल्या पालिकेच्या मलेरिया विभागातील कर्मचारी सुरज सगर, महेंद्र अरिंगळे, जनार्दन घंटे यांच्या हा प्रकार लक्षात आला. सूरज सगर या युवकाने तत्काळ या बसच्या पुढे जाऊन चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला व आग लागल्याची माहिती दिली. बसचालक कदम यांनी तत्काळ बस थांबवली. या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व १४ प्रवाशांना प्रथम बसमधून खाली उतरवून घेतले. सगर, अरिंगळे, घंटे यांनी जवळच्याच हॉटेलमधून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. धुराचे प्रमाण वाढल्याने पालिकेच्या नाशिकरोड अग्निशमन दलाला फोनद्वारे माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान एम. एन. मधे, आर. व्ही. आहेर, एम. के. साळवे, आर. एम. दाते, एस. के. आडके आणि ए. वाय. मिलिमणी आदींनी घटनास्थळी बंब दाखल करून आग विझवली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकराचार्य भारती बुधवारपासून शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन होत असून ९ ते १५ जानेवारी यादरम्यान पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य राहणार आहे. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात प्रवचन, भजन याचा समावेश आहे.

काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ असलेल्या या शृंगेरी मठात २८ व २९ व्या शंकराचार्यांच्या समाधी असून त्याची रोज पूजा होते. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात येत असून नाशिकक्षेत्री तिचे वास्तव्य राहणार आहे. जगद्गुरू बुधवारी (दि. ९) सायंकाळी भाविकांना अनुग्रह प्रवचन देणार आहेत. तसेच रात्री श्री शारदा चंद्रमौलेश्वराची पूजा करणार आहेत. तसेच सोमवारी (दि. १४) शंकराचार्य संकुल येथे सायंकाळी ५ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन रामगोपाल अय्यर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकिपीडिया हे ज्ञानाचे आधुनिक माध्यम आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांना मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. विद्यार्थांनी आपल्या लिखाणात परिसरातील परंपरा, प्रथा, सांस्कृतिक ठेवा या माध्यमातून व्यक्त व्हायला हवे, असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे तज्ज्ञ विजय सरदेशपांडे यांनी केले.

नाशिकरोड येथील बिटको कॉलेजमध्ये आयोजित मराठी विकिपीडिया कार्यशाळेत ते बोलत होते. राज्य सरकारच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संजय तुपे होते. सरदेशपांडे म्हणाले, की मराठी विकिपीडिया हे मुक्त व्यासपीठ आहे. यामधील लेख, माहिती संदर्भासाठी कोणीही व्यक्ती संदर्भ देऊन वापरू शकतो. त्यासाठी पैसे लागत नाहीत. त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य विकिपीडिया संस्थेची माहिती सांगितली.

उपप्राचार्य तुपे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मराठी विभागप्रमुख प्रा. आर. टी. आहेर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी ६५ विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे विकिपीडियात माहिती समाविष्ट करण्याचे प्रत्यक्षिक घेतले. मराठी विभागप्रमुख प्रा. आर. टी. आहेर यांनी प्रास्ताविक केले. मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. रमाकांत कराड, डॉ. विजया धनेश्वर, डॉ. संभाजी शिंदे, प्रा. आर. बी. बागूल, डॉ. उत्तम करमाळकर यांनी संयोजन केले. यावेळी तन्वी अमित, भूषणभारती यांनी मराठी ब्लॉग लिहिण्यात विद्यार्थी व प्राध्यापक यांना प्रात्यक्षिक दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजा विक्रेत्यास जेलरोडला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या जेलरोडवरील चरणदास मार्केट मधील विक्रेत्यास क्राईम ब्रँचच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. संशयित विक्रेत्याकडून २४ हजार सहाशे रुपयांच्या नायलॉन मांजाचे ४१ गट्टु हस्तगत करण्यात आले.

बाळासाहेब खंडेराव राहिंज (३९, रा. सैलानी बाबा स्टॉपजवळ, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मांजा विक्रेत्याचे नाव आहे. युनिटचे हवालदार संजय मुळक, पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असताना त्यांना चरणदास मार्केटजवळ एक व्यक्ती नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती समजली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चरणदास मार्केटसमोर सापळला लावला. नायलॉन मांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयितास पोलिसांनी लागलीच अटक केली. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलम ५ आणि भारतीय दंडविधान कलम २९०, २९१ व १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पीएसआय पालक, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार प्रवीण कोकाटे, वसंत पांडव, विजय गवांदे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, पोलिस नाईक संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, पोलिस शिपाई निलेश भोईर, गणेश वडजे, विशाल देवरे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिका नवीन

$
0
0

विज्ञानाच्या कृतिपत्रिकेसाठी सरावावर भर द्यावा

अंजली ठोके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या परीक्षा पध्दतीत समाविष्ट करण्यात आलेल्या कृतिपत्रिकेमुळे विज्ञान विषयक कृतीला वाव मिळतो. परिणामी, कृतीपूर्ण शिक्षणामुळे मताच्या अभिव्यक्तीस पूरक संधी मिळून विषय सोपा आणि रंजक वाटतो. पण विज्ञान या विषयाच्या कृतिपत्रिकेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सरावावर भर द्यावा, असे मार्गदर्शन अध्यापनाचा दीर्घानुभव असलेल्या अध्यापिका अंजली ठोके यांनी केले.

'रेषा एज्युकेशन सेंटर' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या वतीने आयोजित 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या विद्यार्थी मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी विज्ञान विषयाच्या भाग १ आणि भाग २ संदर्भात दहावीच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

विज्ञान विषयक कृतीपत्रिकेबाबत बोलताना ठोके यांनी सांगितले, कृतिपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, आकलन क्षमता, निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे, कृतिवरून प्रयोग ओळखणे, निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे, उपाययोजना सुचविणे, संकल्पना समजल्यास स्वत:च्या भाषेत उत्तर लिहीणे यासारख्या उद्दीष्टांसाठी नवी पध्दती उपयुक्त आहे. विद्यार्थी प्रयोगशीलतेकडे वळावा व त्याची तार्किक विचारशक्ती वाढावी, अभ्यासक्रमाची व्यावहारिक जीवनातील घटकांशी सांगड घालावी, विद्यार्थ्याने अवांतर वाचन करावे , विद्यार्थ्याला डोळस व शोधक बनविने, विद्यार्थ्यांना सृजनशीलतेकडे वळविणे हा कृतिपत्रिकेचा उद्देश ही संकल्पना समजावून घेतल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. विज्ञानातील मुलभूत संकल्पना समजावून घेण्यासह सराव कृतिपत्रिका सोडविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृतिपत्रिका सोडविण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. कृतिपत्रिकेतील ४५ प्रश्नप्रकारांवर यावेळी प्रकाशझोत टाकण्यात आला. रेषा एज्युकेशन सेंटरचे संचालक मिलींद कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. अर्चना कुलकर्णी यांनी अंजली ठोके यांचे स्वागत केले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

- - -

स्वमत अभिव्यक्ती गरजेची

रेषा एज्युकेशन सेंटर आणि मटाच्या 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या उपक्रमांतर्गत रविवारीच नाशिकरोड परिसरातील हॉटेल सेलिब्रेटा येथेही 'मराठी' विषयाचे मार्गदर्शन सत्र पार पडले. या उपक्रमात मराठी विषयाच्या अध्यापनाचा दीर्घानुभव असणाऱ्या अध्यापिका निर्मल अष्टपुत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कृतिपत्रिका सोडविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, कृतिपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिला पूर्ण वाव देण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिकेतील कृती शांतपणे वाचून पूरक अभिव्यक्ती केल्यास या विषयात चांगले गुण मिळविणे कठीण नाही. घोकंपट्टी किंवा कॉपी या गैरप्रकारांना पूर्णत: हद्दपार करणारी कृतिपत्रिकेची संकल्पना आहे. मराठीच्या कृतिपत्रिकेत आकलन आणि स्वमत अभिव्यक्ती असे महत्वाचे दोन भाग आहेत. १०० पैकी ५६ गुण हे स्वमत अभिव्यक्तीसाठी देण्यात आले आहेत. या विषयाचा अभ्यास करताना गद्य, पद्य, स्थूल वाचना, उपयोजित व्याकरण असे वर्गीकरण करून सू्क्ष्म नियोजनानुसार अभ्यास करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचे अंगभूत कौशल्य, आकलन, अनुभव प्रकटीकरण या गोष्टींना मराठीच्या कृतिपत्रिकेत चांगला वाव असल्याचे त्यांनी सांगितले. कृतिपत्रिकेची तयारी करताना प्रसंगी गाईड केवळ आधार म्हणून वापरावे पण मुख्य प्राधान्य हे पुस्तकालाच द्यावे , असेही अष्टपुत्रे यांनी सांगितले. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाची हाक, कामाची लागणार वाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाबाबत असंतोष पसरला असून, याबाबत जाब विचारण्यासाठी विविध संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून, त्यास आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रीयीकृत बँका, टपाल कार्यालये, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, आरोग्य विभागासह विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी असे विविध घटक संपामध्ये सहभागी होत असून, जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

संपाला आता पर्याय नाही ही जगण्यासाठीची लढाई आहे. ती शेवटपर्यंत लढावीच लागेल या त्वेषाने देशव्यापी संपाची साद घालण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली असून, या संपात हजारो कामगार सहभागी होणार असल्याचा दावा या समितीने केला आहे. महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचलावीत, बेरोजगारीवर नियंत्रण आणावे, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, कष्टकऱ्यांना किमान १८ हजार रुपये वेतन लागू करावे, शेतमजुरांसह असंघटित कामगारांना सहा हजार रुपये पेन्शन लागू करावे, बँकांचे विलीनीकरण थांबवावे यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०० औद्योगिक कारखान्यांमधील २५ हजार कामगार, इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी, टपाल कर्मचारी, आरोग्य विभागातील आशा वर्कर्स व अन्य कंत्राटी कर्मचारी, राष्ट्रीयीकृत बँकांमधील अधिकारी व कर्मचारी, वीज कामगार संघटना, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स विभागातील कर्मचारी यासारखे विविध घटक या संपात सहभागी होणार आहेत.

...

आज तालुक्यांमध्ये निदर्शने

संयुक्त कृती समितीने केलेल्या नियोजनानुसार आज (दि. ८) जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मोर्चे काढण्यात येणार आहेत. हा मोर्चा त्या त्या तालुक्यांमधील तहसील कार्यालयांवर नेण्यात येणार असून, तेथे सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. बुधवारी (दि.९) सकाळी साडेदहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मायको, क्रॉम्पटन ग्रिव्हज यासारख्या अनेक कंपन्यादेखील या संपामध्ये सहभागी होत आहेत.

...

सर्वसामान्यांची होणार गैरसोय

या संपामध्ये आशा, आशा गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विमा कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या घटकांशी संबंधित कामकाज ठप्प होणार असून, नागरिकांना त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

...

कंत्राटी कर्मचारी कृती समितीचाही धडक मोर्चा

मेगा भरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी ९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता गोल्फ क्लब मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. समान कामास समान वेतन लागू करा, ठेकेदारी पद्धत तात्काळ बंद करा यासारख्या मागण्या त्यामध्ये करण्यात येणार आहेत. मनरेगा कर्मचारी संघटना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, स्वच्छ भारत मिशन, कंत्राटी मलेरिया संघटना, आत्मा कर्मचारी संघटना, पेसा संघटना, वनविभाग कंत्राटी कर्मचारी संघटना, वाहनचालक १०२ कंत्राटी संघटना, संपूर्ण शिक्षा अभियान, भूजल सर्वेक्षण, हातपंप कंत्राटी कर्मचारी संघटना, सुरक्षा रक्षक कामगार विभाग आदी संघटना यामध्ये सहभागी होणार आहे. ईपीएफ पेन्शनर्स देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

-

संपात सहभाग

औद्योगिक कर्मचारी : २५०००

टपाल कर्मचारी : ७००

कंत्राटी कर्मचारी : १० हजार

विविध क्षेत्रातील एकूण : ७५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोणता संप?

$
0
0

\Bजिल्हाधिकाऱ्यांचा अजब सवाल

..\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशव्यापी संपाद्वारे सरकारला घेरण्यासाठी डावे पक्ष आणि विविध कामगार संघटना एकवटल्या असताना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र कोणता संप अशी विचारणा करीत या संपाबाबत अनभिज्ञता दर्शविली. संपाबाबत मला कुणीही माहिती दिलेली नाही. असा काही संप होणार असेल, तर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी या विषयाला बगल दिली.

सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणाविरोधात देशात विविध संघटना एकवटल्या असून, त्यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्येही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती स्थापण्यात आली असून, यामध्ये विविध विभागांतील ७५ हजार कामगार सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार त्यामुळे ठप्प होणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही खबरदारी घेतली आहे का, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर असा काही संप होत असल्याबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनी ४ जानेवारीला महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा सन २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्कोप कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महानिर्मितीच्यावतीने संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे सिंचन व लाभक्षेत्र विकास मंत्री देविनेनी उमा महेश्वरराव, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला, केंद्र सरकारच्या जलसंसाधन नदी विकास गंगा शुद्धीकरणचे सचिव यू. पी. सिंग, केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष एस. मसूद हुसेन, सचिव व्ही. के. कांजिलिया तसेच देशभरातील विविध सार्वजनिक उपक्रम, राज्य विद्युत मंडळे व संस्थांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने मागील तीन वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाकडे पाठविली होती. औष्णिक वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेत उच्चस्तरीय परीक्षकांनी या पुरस्काराची निवड केली.

संच देखभाल दुरुस्तीची कामे नियोजित वेळेच्या आधी करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व किफायतशीर दरात वीज उत्पादन करणे, वीज उत्पादनातील तांत्रिक परिमाणे, निकषांवर नियंत्रण ठेवणे, कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यासाठी तांत्रिक सुधारणा व अभिनव संकल्पना राबविणे, मनुष्यबळ प्रशिक्षण व विकास, पर्यावरणभिमुख उपक्रम, पाण्याचा पुनर्वापर, काटकसर, बचत, पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून वीज उत्पादनाचा समतोल राखणे, सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत नवनवीन उपक्रम इत्यादी उल्लेखनीय कामांचा यामध्ये समावेश आहे.

सदर पुरस्काराने महानिर्मितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून हा सांघिक कार्याचा परिपाक असल्याचे गौरवोद्गार संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी काढले. या पुरस्कारामागे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे योगदान असल्याचे मुख्य अभियंता जयंत बोबडे म्हणाले.

विविध पातळ्यांवर कामगिरी

राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार महानिर्मिती विविध पातळ्यांवर भरीव कामगिरी करीत आहे. संचालक पाच सूत्री कार्यक्रम, माझी महानिर्मिती-माझे योगदान, पोल या सारखे संवादात्मक उपक्रम प्रभावी ठरले आहेत. तर कोळशाचे व्यवस्थापन, दुष्काळी परिस्थितीत पाणी बचत, पुनर्वापर, पाण्याचे व्यवस्थापन करून वीज उत्पादन कायम ठेवल्याने चंद्रपूर वीज केंद्राच्या कार्यक्षमतेत अधिकची भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशात वीज कर्मचारी संपावर

$
0
0

खान्देशात वीज कर्मचारी संपावर

महावितरणच्या खासगीकरणाविरोधात एकदिवसीय आंदोलन; कार्यालयीन कामकाज ठप्प

टीम मटा, जळगाव

खासगीकरणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ७) एक दिवसीय संप पुकारला. संपात खान्देशातील जळगाव, धुळे शहरासह जिल्ह्यातील चाळीसगावमधील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळे महावितरणचे कामकाज विस्कळीत झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

जळगाव विभागातून तीन हजार कर्मचारी सहभागी

जळगाव : प्रलंबित मागण्यासांठी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीन वीज कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या महावितरणच्या जळगाव विभागातील सुमारे तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसह व सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (दि. ७) शासनाविरोधात संप पुकारल्याने विभागातील कामकाज ठप्प झाले होते. जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजेपासून कार्यालयात न जाता महावितरणच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयाजवळील रस्त्यावर थांबून जोरदार घोषणाबाजी केली. एकूण सहा संघटनांमधील विविध पदांवर काम करणाऱ्या ५ हजार २३० कामगारांपैकी ३ हजार १० कामगारांनी या संपात सहभाग घेतल्याने, कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला होता.

नियंत्रण कक्षाची स्थापना
महावितरणच्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी संपावर ठाम असल्याने महावितरणतर्फे वीज सेवा सुरळीत राहण्यासाठी मंडळ व विभाग कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, रविवारी (दि. ६) रात्री ११ वाजेपासूनच हे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. हा कक्ष उद्या (दि. ९) रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. संपाच्या काळात वीज ग्राहकांना गैरसोय झाल्यास तसेच काही अनूचित प्रकार घडल्यास संबंधित विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


धुळ्यात जोरदार निदर्शने
धुळे : वीज कर्मचारी अभियंता व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वीज कर्मचारी अभियंते सोमवारपासून संपावर गेले आहेत. हा संप राज्यव्यापी असून, धुळे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यात सहभागी झाले. या वेळी शहरातील अधीक्षक अभियंता कार्यालयाबाहेर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या वेळी संयुक्त कृती समितीचे बी. एन. पाटील, आर. एफ. पाटील, संतोष ठाकूर, चतूर सैंदाणे, दीपक सोनवणे, बी. डी. पाटील, आशिष कासार, एच. व्ही. अहिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या...
महावितरणने कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचनेत सूचनांचा अंतर्भाव करावा
अगोदरची एकूण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेटअप लागू करावे
व्यवस्थापनाने खासगीकरणाचे धोरण थांबवावे
२१० मेगाव्हॅटचे संच बंद करण्याचे धोरण तत्काळ थांबवावे
जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर कामगारांना पेन्शन योजना लागू करा
तीनही कंपनींतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत
कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी कामगार म्हणून सामावून घ्यावे
सर्वाच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘समान काम समान वेतना’ची अंमलबजावणी करावी


महावितरणच्या कार्यालयाबाहेर चाळीसगावात ठिय्या आंदोलन

चाळीसगाव : शहरातील लक्ष्मीनगर भागातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर सोमवारी (दि. ७) सकाळपासूनच सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. संपात एकूण २७२ कर्मचाऱ्यांपैकी २३८ कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष जयेश सूर्यवंशी, सौरभ शर्मा, आर. सी. सूर्यवंशी, पी. पी. चौधरी, जयंत गायकवाड, प्रवीण अमृतकार, वर्कर्स फेडरेशनचे नगराज निकम, नितीन पाटील, महादू कोल्हे, राजेंद्र मिस्तरी, संजय पावरा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या अधिपत्याखालील महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख संघटनेच्या नेतृत्वात कृती समितीतर्फे २४ तासांच्या संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार हा संप रविवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला. हा एक दिवसीय संप वीज कर्मचारी, अभियंते संघटनांच्या संयुक्त कृती समितीतील घटक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट इले. वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन, राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनांकडून करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हे’ तर पक्ष बडविणारे ‘राहू-केतू’!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मला कोणतेही ग्रहण लागलेले नसून ते आहे की नाही हे धुळेकर जनता ठरवेल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन हे पक्ष बुडवणारे राहू-केतू आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती झाले आहे, अशी टीका भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी (दि. ७) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना केली. धुळे महापालिकेत झालेल्या पराभवानंतर आमदार अनिल गोटेंवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यावर आता त्यांनी पुन्हा एकदा पक्ष स्वकीयांवरच निशाणा साधला असल्याने राजकारण पुन्हा तापले आहे.

गेल्या महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करीत मनपामध्ये ५० जागांवर विजय मिळविला. मात्र, हेच मतदान मतपत्रिकेद्वारे झाले असते तर भाजपलादेखील कळाले असते की, आपले काम शहरात कितपत आहे, अशी कोपरखळीही आमदार अनिल गोटे यांनी घेतली.

महापालिका निवडणूक निकालानंतर आमदार गोटेंनी भाजपच्या मंत्रीसह पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. ईव्हीएम घोटाळा, पैश्यांचा वापर करीत मंत्री महाजन यांनी धुळे मनपा निवडणूक जिंकली. या विजयाला आव्हान देत गोटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात लोकसभा मतदार संघ आढावा बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शहरात आले होते. त्यांनी या वेळी पक्ष आमदार गोटेंवर शिस्तभंगाची कारवाई करणार नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दानवे बोलले की, धुळे शहराच्या आमदारकीचे ग्रहण सुटले. यासर्व गोष्टींबाबत आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत समाचार घेत वरील आरोप केल्याने वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. मंत्री महाजन यांनी माझ्या तब्येतीची अजिबात काळजी करू नये, यापेक्षा तुम्हाला जास्त व्यायाम करून प्रकृती सांभाळायची गरज असल्याचेही आमदार गोटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने विश्वासघात केला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कोतवालांच्या मुख्य मागण्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या मानधनात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप कोतवाल संघटनेने केला आहे. करणी आणि कथनी यात फरक करणाऱ्या महसूलमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले यांनी केला आहे.

चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील कोतवालांचे दि. १९ नोव्हेंबरपासून येथील विभागीय आयुक्तालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत राज्य सरकारने कोतवालांच्या प्राथमिक मानधनात २५०० रुपयांची प्राथमिक वाढ केली आहे. याशिवाय ११ ते २० वर्षे सेवा झालेल्या कोतवालांच्या मानधनात ३ टक्के, २१ ते ३० वर्षे सेवा झालेल्यांच्या मानधनात ४ टक्के आणि ३१ वर्षांवरील सेवा झालेल्यांच्या मानधनात ५ टक्के अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय सरकारने मंगळवारी जाहीर केला. परंतु, हा निर्णय मान्य नसल्याने धरणे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय कोतवालांच्या संघटनेने जाहीर केला आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने कोतवालांची फसवणूक व विश्वासघात केल्याची संतापजनक प्रतिक्रिया आंदोलकांतून उमटली आहे. आज, बुधवारी राज्य कोतवाल संघटनेतर्फे सरकारच्या या निर्णयाची जाहीर होळी केली जाणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख बाळू झोरे यांनी दिली.

सेवाज्येष्ठतेनुसार राज्यातील कोतवालांना मानधन देणे ही लाजिरवाणी बाब आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोतवालांच्या मागण्या रास्त असल्याचे पुरावे सादर करूनही महसूलमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अशा प्रकारची वेतनवाढ मान्य नाही.

- गणेश इंगोले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना

ज्या मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कोतवालांचा संघर्ष सुरू आहे, त्यातील एकही मागणी सरकारने विचारात घेतली नाही. त्याऐवजी कोतवालांच्या श्रमाची अवहेलना करणारा निर्णय सरकारने घेतला आहे.

- भारत पवार, राज्य चिटणीस, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना

कोतवालांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष करून मानधनात अगदी तुटपुंजी वाढ करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. सर्व कोतवाल समान काम करतात. सरकारने श्रमात भेदभाव केला आहे.

- माधुरी हंकारे, राज्य अध्यक्ष, महिला कोतवाल संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल कांद्याची घसरण सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कवडीमोल विकल्या जाणाऱ्या उन्हाळ कांद्यापाठोपाठ आता लाल कांद्याच्या दरातही घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार रुपये हमी भावाने लाल कांद्याची खरेदी करावी, अशी विनंती लासलगाव बाजार समितीच्या सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे.

पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी उन्हाळ कांद्यात काहीही मिळाले नाही तरीही लाल कांद्यात तरी हाती काही लागेल या अपेक्षेने टँकरने पाणी देऊन उत्पादन घेतले. यासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला. मात्र पाणी कमी असल्याने उत्पादनातही घट झाली. प्रति क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपये खर्च आहे. मात्र आज लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत जास्तीत जास्त ८५२ रुपये सरासरी ६७० रुपये तर कमीत कमी ३५० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांदाही पाचशे ते सातशे रुपये तोट्यात विक्री करावा लागत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.

उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या मातीमोल दराने हैराण झालेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र सरकारने निर्यातवाढीसाठी ५ टक्के वाढवून सबसीडीही १० टक्के केली. यामुळे संपुष्टात येणाऱ्या उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याची निर्यातही वाढली. पण लाल कांद्याच्या बाजारभावात वाढ न होता घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. लासलगाव बाजार समितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार रुपये हमीभावाने कांद्याची खरेदी करावी अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.

आवक सुरू

लासलगाव बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याला ६७० रु क्विंटल असा भाव मिळाला. जिल्ह्यात लाल कांद्याची १ लाख १४ हजार ७५६ क्विंटल आवक झाली. वर्षाच्या शेवटी क्विंटलला ८०० ते ९०० रुपये सरासरी भाव असणारा कांदा, दर दिवशी घसरत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जास्तीत जास्त ८५०, सरासरी ६५० रुपये भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा सरासरी २०० रुपये भाव मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी समितीवरच आक्षेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाच्या संपादनापोटी स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय परस्पर अदा करण्यात आलेल्या उर्वरित २१ कोटींच्या मोबदला प्रकरणी तपासासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीवर सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला. उपायुक्त हे जिल्हाधिकाऱ्यांची कशी चौकशी करू शकतात, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, ही तांत्रिक चौकशी समिती आहे. ती केवळ कागदोपत्री पाहणी करून अनियमितता झाली की नाही, याची तपासणी करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आकाशवाणी केंद्राजवळील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडाच्या संपादनापोटी उर्वरित २१ कोटींचा निधी स्थायी समितीची मान्यता न घेता प्रशासनाने परस्पर अदा केला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरचे देयक थांबवले असतांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नूतन आयुक्त गमे पदभार स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला धनादेश काढून दिला होता. या प्रकरणी स्थायी समितीसह महासभेतही चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, आयुक्त गमे यांनी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ आणि नगररचना सहायक संचालक किशोर पाटील यांनी नियुक्ती केली होती. मात्र, या समितीबाबत पाटील यांनी आक्षेप घेत, जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी महापालिकेचे अधिकारी कशी करू शकतात, असा सवाल केला आहे. प्रशासनाने ही समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नव्हे तर देयक अदा करण्याच्या प्रवासात काही अनियमितता झाली काय, याची चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तांत्रिक मुद्द्यांच्या अभ्यासानंतर देयक प्रवासात त्रुटी आढळल्या तरच सरकारकडे याबाबत अहवाल पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात स्थायी आणि महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे.

पाटील ऐवजी नलावडे

आयुक्त गमे यांनी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीमधील प्रभारी नगररचना सहायक संचालक आपल्या मूळ पदावर गेले आहेत. नगररचना सहायक संचालक सुरेश निकुंभे हजर झाले आहेत. परंतु, या प्रकरणात थेट नगररचना विभागाचाच संबध असल्याने आयुक्तांनी निकुंभे यांच्याऐवजी सार्वजनिक आरोग्य तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांची चौकशी समितीत नियुक्ती केली आहे. फडोळ यांच्यासोबत नलावडे काम करणार आहे. देयक अदा करताना नियमांची मोडतोड झाल्याबाबतची चौकशी करून ही समिती अहवाल सादर करणार आहे.

'एसीबी'कडे तक्रार

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आणि स्थायी समिती सदस्यांचा रक्कम देण्यास विरोध असतांना सर्व्हे क्रमांक ७०५ या जागेच्या भूसंपादन कार्यवाहीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रवीण तिदमे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी, जागामालक आणि उत्कर्ष वाघ यांच्या भ्रमणध्वनी, दूरध्वनीवर झालेल्या कॉल्सचे रेकॉर्ड तपासावे आणि या भूसंपादनाच्या कार्यवाहीची सखोल चौकशी करावे, असे पत्र दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहमदाबाद विमानसेवेला मुहूर्त

$
0
0

१३ फेब्रुवारीपासून सेवा, ट्रूजेटकडून लवकरच बुकिंग सुरू होणार

...

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

विविध कारणांमुळे लांबणीवर पडत असलेल्या नाशिक ते अहमदाबाद विमानसेवेबाबत 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेण्यात आली आहे. ही सेवा येत्या १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ट्रू जेट कंपनीने तसे लेखी पत्र हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. या सेवेचे बुकिंग येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे.

हैदराबादस्थित ट्रुजेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद या हवाई मार्गासाठी उडान या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली. सहा महिन्यात या कंपनीकडून सेवा सुरू होणे अपेक्षित होते. कंपनीने ३० ऑक्टोबरपासून सेवा देण्याचे जाहीर करून बुकिंग सुरू केले. अवघ्या काही दिवसातच कंपनीने हे बुकिंग बंद केले आणि सेवा लांबणीवर पडल्याचे घोषित केले. त्यानंतरही या सेवेसाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. अखेर यासंदर्भात 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध करीत तथ्यहीन कारणांकडे लक्ष वेधले. तसेच, हिवाळी वेळापत्रकासाठी कंपनीने अर्ज केला नसल्याचेही दिसून आले. या सर्व प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने आणि खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली. त्यानुसार कंपनीकडे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. आणि आता ही सेवा येत्या १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठीचे बुकिंग येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे.

...

अशी असेल सेवा

एकूण ७२ पैकी ३६ आसने उडान योजनेअंतर्गत राखीव आणि अल्प दरातील असतील. नाशिक ते अहमदाबाद हे अंतर ३६० किलोमीटर आहे. हा प्रवास अवघ्या एक तास दहा मिनिटांचा असणार आहे. रोज दुपारी १२ वाजता अहमदाबादहून नाशिकसाठी सेवा असेल. हे विमान दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ओझरला येईल. त्यानंतर दुपारी २ ते अडीच च्या दरम्यान हे विमान अहमदाबादकडे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतांचे जीवन जगकल्याणासाठीच

$
0
0

ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्यक्तिगत हा भाग संतांच्या जीवनात कधीही येत नाही, जे आहे ते जगाच्या कल्याणासाठी अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळेच तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा जन हे बुडते देखवेना डोळा यासारखे अभंग आहेत. संतांनी समष्टीच्या कल्याणासाठी आपले जीवन वाहून घेतले, असे प्रतिपादन ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या ५५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प देगलूरकर महाराज यांनी गुंफले. 'संतांना अपेक्षित समता समाज स्वीकारत का नाही?' या विषयावर ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही व्याख्यानमाला सुरू आहे. देगलूरकर पुढे म्हणाले की, भगवंतांने अर्जुनाला गीता सांगितली ते त्याचे कल्याण व्हावे म्हणून ती व्यक्तिगत होती. जगासाठी सांगतोय असा कोणताही भाव त्यात नव्हता. परंतु, त्याच भगवंताने जेव्हा ज्ञानेश्वर रूपी अवतार घेतला तेव्हा त्या गीतेची टीका करून भावार्थदीपिका सर्व जनांसाठी खुली केली. तेव्हा त्यात व्यक्तिगत भाव नव्हता. असाच प्रकार उध्दवगीतेचा आहे. भगवंताने उध्दवाला ही गीता सांगितली तेव्हा ती त्याच्या व्यक्तिगत जीवनासाठी होती, मात्र जेव्हा त्याचे एकादश स्कंध एकनाथ महाराजांनी केले तेव्हा ते भागवत झाले आणि सर्व जनांसाठी खुले झाले. संतांच्या जीवनात व्यक्तिगत असा भाग कधीच नसतो. त्यांनी जे आहे ते समाजासाठी वाहून दिले.

संत आपल्याला समजले असे विधान आपण करू शकत नाही. त्यांनी समष्टीकरिता वाहून घेतले आहे हा आयाम त्यांच्या जीवनाला आपण जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत ते आपल्याला समजले असे आपण म्हणू शकत नाही. एका दृष्टान्त यावेळी देगलूरकर यांनी सांगितला. महाभारताचे युध्द संपून गेल्यावर एकदा अर्जुन व श्रीकृष्ण निवांत बसलेले असताना, अर्जुनाने त्यांना विनंती केली की ती गीता तुम्ही परत सांगा, व्यवधानांमुळे मी ती ऐकू शकलो नाही. परंतु, श्रीकृष्णांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले की जो स्वस्थ असतो, त्याच्यासाठी तत्त्वज्ञान नाही. ज्याच्या मनात विचारांचे वादळ माजले आहे, त्याच्यासाठी ते आहे. त्यामुळे गीता आता सांगू शकत नाही. तेच तत्त्वज्ञान सामान्य माणसांसाठी ज्ञानदेवांनी खुले केले कारण माणूस विचारांच्या गोंधळात सापडलेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन औषध विक्री बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन औषध विक्री बंद करावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी औषध विक्रेते एकवटले असून, मंगळवारी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ऑनलाइन औषध विक्रीचे परिणाम औषध विक्रेत्यांसह विविध घटकांना भोगावे लागू शकतात. ती बंद व्हावी यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने केंद्र सरकारच्या प्रस्तावित अधिसूचनेच्या मसुद्याला अनेक आंदोलनांद्वारे विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित अधिसूचनेच्या मसुद्यात संघटनेचे मतही जाणून घ्यावे, अशी अपेक्षा निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याची सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने देशभरातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने मंगळवारी आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एकत्रित येत नाशिकमधील औषध व्यावसायिकांनी खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अतुल आहिरे, राजेंद्र धामणे, रवींद्र पवार, योगेश बागरेचा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन विक्रीत फसवणूक

$
0
0

नाशिकरोड : फायनान्स कंपनीचे वाहन कर्जाचे हफ्ते न चुकविता परस्पर चारचाकी वाहनाची विक्रीकरून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकरोड येथे घडला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर फायनान्स कंपनीच्या फ्रँन्चाईझीधारकास गुंडाच्या नावाने धमकावत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. झहिर शेख बनेमिया (वय ५१) रा. चिस्तिया कॉलनी, वडाळा रोड यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन रौलेट जुगाराचा पर्दाफाश

$
0
0

पाच संशयित आरोपींकडून दोन लाखांची रोकड जप्त

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन रौलेट जुगार खेळणाऱ्या संशयितांची पंचवटी पोलिसांनी धरपकड केली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी संशयितांकडून दोन लाखांची रक्कम व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

आकाश राजू परदेशी (वय २४, रा. अष्टविनायक नगर, मखमलाबादरोड), नरेश अतुल गांधी (वय २६, रा. जुनी तांबट लेन), किशन राजू कुमावत (वय २४, रा. श्रमनगर, उपनगर), जस्सी रवींद्र सिंग (वय २३, रा. रोहन अपार्टमेंट, शांती पार्क, उपनगर), मयूर राजेंद्र भालेराव (वय २२, रा. तिवंदा चौक) अशी पोलिसांनी तीन ठिकाणांहून अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मोबाइलवर ऑनलाइन रौलेट जुगार खेळला जातो. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, हा प्रकार ऑनलाइन असल्याने पोलिसांपर्यंत अशी प्रकरणे क्वचितच पोहचतात. पंचवटीतील मखमलाबाद रोडजवळ असलेल्या कुमावतनगर येथे एक संशयित मोबाइलवर ऑनलाइन रौलेट जुगार खेळत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर व के. डी. वाघ, तसेच गुन्हेशोध पथकाला सूचना करून संशयितावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोमवारी (दि.७) सायंकाळी सव्वासात वाजता पोलिसांनी कुमावतनगरमधील साईबाबा मंदिरासमोरून संशयित आकाश परदेशी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाइलची पडताळणी केली असता तो रौलेट जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पंचवटी पोलिसांनी शालिमार इन हॉटेलजवळील हर्ष कलेक्शन आणि राजीव गांधी भवनाजवळील साई एंटरप्रायजेस या ठिकाणी छापे टाकले. यात दोन्ही ठिकाणी ऑनलाइन रौलेट सुरू असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ, रघुनाथ शेगर, हवालदार विलास बस्ते, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, दशरथ निंबाळकर, सचिन म्हसदे, भूषण रायते, जितेश जाधव व महिला पोलीस शिपाई मयुरी गांगुर्डे यांनी केली. पुढील तपास एपीआय शेगर करीत आहेत.

...

तीन ठिकाणी छापे

पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच, एक लाख सात हजार रुपयांचे जुगाराचे इतर साहित्य असा तीन लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोबाइलवर गेमकिंग वर्ल्ड डॉट कॉम या वेबसाईटवर जुगार खेळून संशयित पैसे ट्रान्स्फर करीत होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेश्नमध्ये संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images