Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकरी सधन झाला तर तो देश महान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही. शेतकरी समृद्ध झाला तर देश महासत्ता होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांनी केले. नाशिककरांच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त रविवारी बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गंगापूर रोडवरील होरायझन अॅकॅडमी येथे हा कार्यक्रम झाला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना साळुंके बोलत होते. या वेळी साळुंके यांना स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. साळुंके म्हणाले, की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेती करणारा समाज एक कुटुंब आहे. २००० मध्ये शंभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आज तो आकडा देशात लाखाच्या वर गेला आहे. हे काळजी करण्याचे कारण आहे.

सिंधू संस्कृतीपासून शेतीत प्रयोग केले जात होते. वैदिक वाङ्मयात बळीराजाचे वर्णन आहे. यात अत्यंत समृद्ध शेतीचे वर्णन केले आहे. त्या बळीराजाची परंपरा आज आपण जपत आहोत. आज त्या बळीराजाच्या वारसदारांचे हाल होत आहेत. त्याच्या कष्टाची फळे त्याला मिळत नाहीत. आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. वस्तू वापरावी आणि फेकून द्यावी, तशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे.

नीलिमा पवार म्हणाल्या, की एकीकडे शेतकरी विकसित होतो आहे आणि एकीकडे आत्महत्या होत आहेत. आत्महत्येचे प्रमाण कमी करायचे असेल तर चळवळ उभारण्याची गरज आहे. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. का. का. वाघ शिक्षण संस्थेचे बाळासाहेब वाघ, नगरसेविका स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा तस्करांना कोठडी

$
0
0

गांजा तस्करांना

पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांजा तस्करी करताना देवळाली कँम्प परिसरात अटक करण्यात आलेल्या मंगेश भगत आणि राहुल भुजबळ या दोघा संशयित आरोपींना कोर्टाने आज, रविवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रेस्ट कॅम्प रोडवर शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने संशयितांना ६४ किलो गांजासह अटक केली होती.

दरम्यान, आज, रविवारी दोघा संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. संशयित आरोपींनी गांजा कोठून आणला, याची तस्करी कोठे होणार होती तसेच या गुन्ह्यात आणखी किती साथीदार सहभागी आहेत, याचा तपास करणे बाकी असल्याने संशयित आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने दोघा संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासार समाजासाठी प्रयत्नशील

$
0
0

राष्ट्रीय अधिवेशन समारोपप्रसंगी भुसे यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कासार समाजाने संघटित होऊन राबविलेला राष्ट्रीय अधिवेशनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या अधिवेशनात झालेल्या तसेच राज्य सरकारशी संबंधित ठरावांबाबत शासन दरबारी निश्चित प्रयत्न करीन, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नांदगाव येथे जागतिक कासार फाउंडेशनच्या वतीने आयोजित कासार समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक दगडे, अॅड संतोष भुजबळ, संजीव रासने, अॅड. सुधीर अक्कर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे आदी उपस्थित होते. यावेळी दादा भुसे यांनी कासार समाजाच्या एकत्रित येऊन काम करण्याच्या भूमिकेबाबत गौरवोद्गार काढले. समाजाचे संघटन आवश्यक असून त्या दृष्टीने अधिवेशनाच्या माध्यमातून पावले उचलले जात आहेत. समाजातील शैक्षणिक व वैवाहिक समस्यांबाबत चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो आहे. राज्य सरकारमधील मंत्री म्हणून कासार समाजाच्या सरकारकडून असलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करीन, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. कासार समाजाबाबत माहिती सांगून अधिवेशनमागचा उद्देश व समाजाच्या राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षा याबाबत पदाधिकारी अॅड. संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविकात विचार मांडले. अध्यक्ष अशोक दगडे यांनी स्वागत केले.

विविध ठरावांना मंजुरी

कासार समाज राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधवानी हजेरी लावली. चर्चा, परिसंवाद, मेळावे आदी उपक्रम झाले. कासार समाजाचा एन. टी. बी. मध्ये समावेश करावा यासह कासार समाजात या पुढील काळात सामूहिक विवाहावर भर द्यावा, शिक्षणाच्या प्रवाहात यावे, समाज संघटित करण्याचे प्रयत्न व्हावेत, आदी ठराव मंजूर करण्यात आले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रंगला ‘हास्यदरबार’

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

लोगो - सोशल कनेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'बाल हास्य, ओपन हार्ट लाफ्टर, टेन्शन भगाव' हास्ययोगाचे विविध प्रकार अन् कलाविष्कारांचे बहारदार सादरीकरण. हास्ययोगाची मिळणारी माहिती अन् हिंदी, मराठी गाणी ऐकण्यास जमलेले ज्येष्ठ नागरिक, अशा उत्साहाच्या वातावरणात 'हास्यदरबार' रंगला. हास्ययोग समन्वय समितीतर्फे 'हास्यदरबार'चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्समध्ये रविवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम झाला.

हास्ययोगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, तसेच विविध कलांच्या सादरीकरणाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला. माधुरी शिधये यांनी एकपात्री अभिनय सादर केला. राजेंद्र भंडारी यांनी हास्ययोगाची प्रात्यक्षिके सादर केली. गायिका गीता माळी यांनी हिंदी, मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले. या वेळी शहरातील बारापेक्षा अधिक हास्य क्लबचे सदस्य उपस्थित होते. समितीचे सचिव अॅड. वसंत पेखळे यांनी सूत्रसंचालन केले. अदिती आघारकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा पावसाने अवकृपा केल्याने पाणीटंचाईची झळ असह्य होऊ लागली आहे. टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत असून, अनेक गावे व वाड्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत. सारदे (ता. बागलाण) येथे पाणीटंचाईमुळे शनिवारी जिल्ह्यातील पहिला बळी गेला. पाणी भरण्यास गेलेली तरुणी विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

बागलाण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सुमारे २२ गावे व दोन वाड्यांची टँकर तहान भागवत असून, १३ गावांचे टँकर प्रस्ताव तयार आहेत. सारदे गावात पाणीटंचाईमुळे नकुशी विठ्ठल आहिरे (वय २२) या तरुणीचा पाणी काढताना पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. सारदे गावात एक दिवसाआड, तर अधून-मधून दररोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. घरात पाणी नसल्यानेच नकुशीला विहिरीवर जावे लागले. किमान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांची तहान भागवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, जनावरांच्या चाराप्रश्नही तीव्र होऊ लागला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकरी उभ्या पिकांत जनावरे सोडत आहेत.

टँकर प्रस्तावात होतेय वाढ

जिल्ह्यात यंदा पावसाने पाणलोट क्षेत्रात हजेरी लावल्याने धरणे भरली, मात्र इतर पाणीस्रोत कोरडेच राहिले. आजमितीस जिल्ह्यात १११ टँकरद्वारे सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १०९ गावे व ३३० वाड्या तहानलेल्या आहेत. यामध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. अनेक गावांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल होऊ लागले आहेत.

जिल्ह्यातील पाणीटंचाई

- टँकर संख्या : १११

- गावे : १०९, वाड्या : ३३० वाड्या

- लाभार्थी : २.३४ लाख लोकसंख्या



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षकारांनी स्वीकारावा मध्यस्थाचा पर्याय

$
0
0

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आपल्या हक्कांसाठी न्यायालयात जाणे वाईट नाही. मात्र, न्यायालयात जाण्यापूर्वी ‘मध्यस्थ’, लोकअदालत यांसारख्या माध्यमांचा पर्याय पक्षकारांनी स्वीकारावा. त्यातूनही चांगले सकारात्मक परिणाम पुढे येतील, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी येथे केले.

धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळ्यात रविवारी (दि. २०) ते बोलत होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती पुखराज बोरा हे प्रमुख अतिथी होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप पाटील उपस्थित होते.

मुख्य न्यायमूर्ती पाटील म्हणाले, सरकारने सुद्धा ‘मध्यस्थता’ हा पर्याय स्वीकारला आहे. औरंगाबाद, नागपूर येथे ‘मध्यस्थता’ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तेथे चांगले वकील, न्यायाधीश उपलब्ध असल्याने खटले निकाली काढण्यास मदत होत आहे. याबाबत पक्षकारांमध्ये प्रबोधन व जनजागृतीची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आता नागरिक भूसंपादन, मोटार वाहन अपघात, नुकसान भरपाई आदी खटल्यांमध्ये मार्ग काढण्यासाठी या पर्यायाचा वापर करीत आहेत. या व्यवस्थेनंतरही नागरिकांचा वकिलांवर विश्वास कायम आहे. हा विश्वास सार्थ ठेवण्याची जबाबदारी आता वकिलांवर आहे, असेही ते म्हणाले. धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाची नूतन इमारत चांगली असून, तेथे विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी सर्वच घटकांनी चांगले परिश्रम घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, न्या. बी. डी. कापडणीस, सुरेंद्र तावडे, न्या. आर. एम. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जे. ए. शेख, न्या. सय्यद, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे आदींसह बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या गर्दीने गोदाघाट खुलला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विविध भागातून येणाऱ्या साईबाबांच्या पालख्या रविवारी गोदाघाट परिसरात आल्याने हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रामकुंडापासून गौरी पटांगणापर्यंतच्या परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. तपोवनातील कपिला संगमावरही भाविक आणि पर्यटक येत होते. रामकुंडात स्नान करून पंचवटी परिसरातील मंदिरांत दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचेही दिसून आले. देशभरातील विविध भागातून येणाऱ्या साईबाबांच्या पालख्या शिर्डीला जात आहेत. या पालख्या रविवारी पंचवटी परिसरात दाखल झाल्या. शिर्डीला पायी जाणाऱ्या भाविकांचा त्यात मोठा सहभाग होता. सकाळपासूनच भाविकांचा रामकुंड परिसरात ओघ सुरू झाला होता. दिवसभर हा ओघ सुरूच होता. भाविक मोठ्या श्रद्धेने रामकुंडात स्नान करीत होते. गोदावरीची पूजा आणि दीपदान करण्यात येते होते.

पार्किंगही झाले हाऊसफुल्ल

रामकुंडात स्नान केल्यानंतर भाविक कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सांडव्यावरची देवी, कार्तिक स्वामी मंदिर, सीतागुंफा आदी ठिकाणी दर्शनाला जात असल्याने या मंदिरांचे आवार भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. अनेक मंदिरांबाहेर दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. परगावच्या भाविकांच्या वाहनांमुळे येथील पार्किंगदेखील हाऊसफुल्ल झाले होते. तपोवन परिसरात ‘इन्कॉन’तर्फे भाविकांनी दिंडी काढण्यात आली. रामसृष्टी उद्यानात भाविकांना मार्गदर्शन करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे हत्या प्रकरणात आणखी एकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील सुपर मार्केटचे संचालक अविनाश महादेव शिंदे यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी शिताफिने अटक केली. एसटी बसमधून देवदर्शनासाठी निघालेल्या या संशयितास पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यातच अटक केली. या संशयितास इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

किरण उर्फ गोट्या रामदास म्हस्के (रा. नवनाथनगर, पंचवटी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याच्या तीन साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. लूट करण्याकरिता संशयित आरोपींनी ८ जानेवारी रोजी शिंदे यांची हत्या केली होती. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने हत्या आणि लूट करून संशयित परागंदा झाले होते. मात्र, शहर पोलिसांनी एक एक करीत तिघा संशयितांना जेरबंद केले. त्यांचा चौथा साथिदार म्हस्के मात्र फरारच होता. पोलिस त्याचा शोध घेत असताना पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या माहितीवरून म्हस्के पोलिसांच्या हाती लागला. सातारा येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला तो गेल्याची माहिती मिळल्याने पंचवटी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक कामाला लागले. या पथकाने पुणे बस आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधत या आगारातून बाहेर पडलेल्या बसची माहिती घेतली. तसेच बसचालकांचे मोबाइल क्रमांकही मिळविले. एका बसमध्ये संशयित असल्याची पक्की माहिती समोर येताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. चणकापूर टोल नाका भागात धावती बस थांबवून म्हस्केला बेड्या ठोकण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उत्सव कलेचा..’ पुन्हा नव्याने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरामधील उभरत्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, रसिकांची त्यांच्याशी ओळख व्हावी तसेच त्यांना भर मैफलीत सादरीकरणाचा हुरूप वाढावा, म्हणून विचारात आलेल्या या संकल्पनेला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. हे पुष्प विश्वास ग्रुपच्यावतीने गुंफण्यात येणार आहे.

उत्सव कलेचा-उगवत्या ताऱ्यांचा, विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून साजरा झालेला अभिनव उपक्रम होता. 'उत्सव'चे मिलिंद कुलकर्णी, मनोज कुलकर्णी आणि मारुती कुलकर्णी यांच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमात शनिवार-रविवार या जोडून येणाऱ्या सुटीची सुरुवात सुरेल संगीताने व्हावी असा विचार करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकूण बारा कलाकारांनी आपली कला सादर केली. या संकल्पनेला रसिक नाशिककरांनीही उपस्थित राहून भरभरून दाद दिली.

'ज्योत से ज्योत जगाते चलो' हा विश्वास नाशिकच्या कलाक्षेत्रात आहे आणि त्याच विश्वासाने या उगवत्या ताऱ्यांच्या पाठीशी आता 'विश्वास ग्रुप' उभा रहाणार आहे. या संकल्पनेतले पुढचे पुष्प विश्वास ग्रूपच्या सहकार्याने सादर केले जाणार आहे. गंगापूर रोडवरील उत्सव रेस्टॉरंटमध्ये १२ महिन्यांपासून सुरु झालेल्या उत्सव उगवत्या ताऱ्यांच्या मैफिलीची सांगता रसिका नातू हिच्या गायनाने पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आप्पासाहेब पवार यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामांकित स्त्री रोगतज्ज्ञ, रोटरीचे प्रांतपाल आणि विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांचे आधारवड डॉ. अमृतराव तथा आप्पासाहेब कृष्णाजी पवार (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

वैद्यकीय क्षेत्रात तत्त्वनिष्ठ व तत्पर रुग्णसेवा देऊन समाजसेवेचा आदर्श त्यांनी उभा केला होता. पन्नास हजारांवर शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांनी या क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केला. सन १९६० च्या दशकात नाशिक जिल्ह्यात रुग्णसेवेस प्रारंभ करून नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ घडविण्यात डॉ. आप्पासाहेब यांचा सिंहाचा वाटा होता. ज्ञान, कौशल्य, प्रामाणिकपणा, सचोटी आदी गुणसंपदेच्या बळावर त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. कुटुंबातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स घडविले. आपल्या जन्मगावी मानूर (ता. कळवण) येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची इमारत उभारली होती. त्यांच्या पश्चात पत्नी निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजीवनी पवार, पुत्र डॉ. समीर पवार, कन्या श्रीलेखा पाटील, डॉ. प्रतीक्षा सिदिड, डॉ. प्रविणा पवार, प्रणोती कवडे, बंधू डॉ. अभिमन्यू पवार, पुतणे डॉ. प्रदीप पवार असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गर्भपात’चे पुन्हा मालेगाव कनेक्श्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मनमाड चौफुली परिसरात चार महिन्याचे अर्भक पुरताना तरुण-तरुणी आढळून आल्याने मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तरुण-तरुणी पुण्याहून गर्भपात करण्यासाठी मालेगाव आल्याने अवैध गर्भपात टोळीचे कनेक्शन मालेगाव कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तसेच एखाद्या शेतातील बंद घराचा यासाठी उपयोग, तेथे पडलेले साहित्य, व्हिजिटिंग कार्ड, रक्ताचे डाग यावरून या घरात याआधीही अनेक गर्भपात झाले असल्याचा अंदाज आहे.

शहर परिसरात या आधीदेखील सटाणा नाका परिसरात ऑगस्ट २०१८ मध्ये चिंतामणी रुग्णालयात अवैध गर्भपात झाला होता. चिंतामणी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश करुन काही जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता हॉस्पिटलवर छापा टाकून एक स्त्री जातीचे मृत भ्रूण जप्त केले होते. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेकायदा गर्भपात प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. तोच फॉर्म्युला वापरून मालेगाव शहरातही बेकायदा गर्भपात होत असल्याच्या तक्रारी पेालिस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

तसेच बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान प्रकरणी २० जुलै २०१३ रोजी मालेगाव येथील देवरे बंधूंचे कारस्थान उघडकीस आले होते. शिव-मंगल सोनोग्राफी केंद्राचा संचालक डॉ. सुमीत देवरे व त्याचा भाऊ डॉ. अभिजित देवरे हे येथील सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान करीत होते. याबाबत ऑनलाइन तक्रार दाखल झाली होती. या तक्रारींची दखल घेत 'लेक लाडकी' अभियानाच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करत देवरे बंधूंचे कारस्थान उघडकीस आणले होते. मालेगाव आणि अवैध गर्भपात हे कनेक्शन वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे पोलिस आणि आरोग्य विभागापुढे या प्रक्रियामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कौळाणे शिवारातील या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घटनेचा तपास सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक शाखेच्या देवीकर यांची उचलबांगडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक एम. एस. देवीकर यांची आज, सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. देवीकर यांचा पदभार वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागातील पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला.

युनिट दोन अंतर्गत शहरातील महत्त्वाचा भाग येतो. येथील वाहतुकीचे प्रश्न मोठे आहेत. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक महेश देवीकर यांच्याबाबत मागील काही काळापासून सातत्याने तक्रारी येत होत्या. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी चौकशी केली. या चौकशीनुसार देवीकर यांच्या बदलीचा सोमवारी निर्णय घेण्यात आला. देवीकर यांना वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागात घेण्यात आले असून, त्यांच्या जागी प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, वाहतूक शाखेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचा समन्वय करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बडेवाल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिपत्रिकेसाठी पाठ्यपुस्तकांचा अभ्यास गरजेचा

$
0
0

हिंदी, संस्कृत विषयक मार्गदर्शनात तज्ज्ञांचा सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्याला आकलन झालेल्या ज्ञानाचे व्यवस्थितरित्या उपयोजन करता यावे, हा कृतिपत्रिका मूल्यमापन पद्धतीमागील प्राधान्याचा हेतू आहे. ज्ञान, आकलन, स्मरण आणि उपयोजन या पायऱ्यांद्वारे विद्यार्थी पुढे जातो. या पायऱ्या चढण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास हिंदी किंवा संस्कृत भाषेसारख्या विषयात गरजेचा आहे, असा सूर रेषा एज्युकेशन सेंटर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने आयोजित उपक्रमात व्यक्त झाला. सेंटरच्या गंगापूर रोड येथील केंद्रात रविवारी 'हिंदी' आणि 'संस्कृत' या दोन्ही विषयांवर स्वतंत्र मार्गदर्शन सत्र पार पडले.

पहिल्या सत्रात कुमूदिनी फेगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की पूर्वीच्या परीक्षा पद्धतीत पाठांतरावर भर होता. पण कृतिपात्रिका पद्धतीत आकलन व उपयोजनावर भर आहे. विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त असेल, धडा-कविता नीट समजली तर कृतिपात्रिका सोडवणे सोपे जाईल. उतारा दिलेला असल्याने उत्तरे उताऱ्यातच असतात. ती पाहून लिहिता येतात. त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका कमी होऊन विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शुद्धलेखनाकडे लक्ष द्या

परीक्षेला अद्याप १ महिना १० दिवस शिल्लक आहेत. पाठांतराचे श्लोक रोज एकदा पुस्तकात पाहून म्हटले तरी आपोआप पाठ होतील. पाठांतरचे गुण सहज मिळतील. रोज एक धडा वाचत राहा. धडे त्यामुळे परिचयाचे होतील. परीक्षेत उताऱ्यात उत्तरे पटकन सापडतील. व्याकरणाचे प्रश्न लिहिताना शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष द्या, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

घोकंपट्टीला गुडबाय

हिंदी विषयाच्या कृतिपत्रिकेसाठी मार्गदर्शन करताना सुरेखा बोंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की कृतिपत्रिकेमुळे घोकंपट्टी करण्याच्या पद्धतीला गुडबाय करता येणार आहे. त्या ऐवजी नवीन पद्धती ही ज्ञान, आकलन, उपयोजनेची कसोटी बघणारी आहे. गद्य, पद्य, अपठीत, व्याकरण व रचना विभाग अशा विभागांमध्ये कृतिपत्रिकेची विभागणी आहे. सर्वच विभागांना समान महत्त्व द्यायला हवे. या बदलत्या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्याने अधिकाधिक प्रश्न हे धड्याखालील येण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील धडे नीट अभ्यासायला हवे. उतारा दिलेला असणार पण हा उतारा वाचून उत्तरे शोधण्यासाठी वाचन चांगले हवे. परीक्षेपर्यंत रोज एक धडा वाचला तरी दोन-तीनदा वाचन होईल. त्यामुळे धडे सुपरिचत होतील व उताऱ्यात उत्तरे पटापट शोधता येतील.

आकलनाचे उपयोजन नीट करा

व्याकरणाचा प्रश्न सोडवताना शुद्धलेखनाकडे कटाक्षाने लक्ष द्या. लेखन कौशल्यात पत्रलेखन, आकलन, वार्तालेखन, विज्ञापन, कहानी, निबंध हे प्रकार आहेत. पत्रलेखनाचा बदललेला पॅटर्न नीट लक्षात घ्या. शीर्षकावरून कथा, शब्दावरून कथा लिहिताना शीर्षकाचा अर्थ नीट लक्षात घ्या. तुम्हाला आकलन झालेल्या ज्ञानाचे उपयोजन नीट करता यावे, हाच या कृतिपत्रिका परीक्षा पद्धतीचा हेतू आहे, असे मार्गदर्शन बोंडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ काढा, जल वाढवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा जिल्हाच नव्हे, तर राज्याचा बहुतांश भाग दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. भविष्यात दुष्काळाची धग कमी व्हावी याकरिता गाळमुक्त धरण उपक्रमांतर्गत जलाशयांमधून एक कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट गतवर्षीच्या तिप्पट असून, ते पूर्ण करण्यासाठी कंपन्या, संस्थांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी केले.

दुष्काळाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवारसारखी योजना राबविण्यास सुरुवात केली. याखेरीज गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हा उपक्रमही राबविला जातो आहे. या योजनेंतर्गत गतवर्षी ३६ लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतांपर्यंत वाहून नेला. यंदाही दुष्काळ निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांना अधिकाधिक यश यावे, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलिटी) निधीबाबत बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीला भारतीय जैन संघटना, टाटा ट्रस्ट यांसह विविध कंपन्या आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जलाशयांना गाळमुक्त करून जलसाठा वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंदाही हा उपक्रम राबविण्यात येणार असून, एक कोटी क्यूबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गाळाच्या नावाखाली वाळू उत्खननाचा उद्योग ठेकेदारांसह कुणीही केला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

..

'सीएसआर'अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे मदतीचे आवाहन

जलाशय गाळमुक्त करण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर निधी द्यावा किंवा मशिनरी उपलब्ध करून दिल्यास इंधन व्यवस्था केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्या व संस्थांना केले.

...

३६ कंपन्या आणि संस्थांची मदतीची तयारी

भारतीय जैन संघटना तसेच टाटा ट्रस्टने प्रत्येकी ५० जेसीबी व तत्सम मशिन पुरविण्याची तयारी दर्शविली. एकून ३६ कंपन्या आणि संस्थांनी प्रशासनाला सीएसआर अंतर्गत मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामध्ये अशोका, सिएट, व्हीआयपी, मायलॉन, रामबंधू यासारख्या कंपन्यांचा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग, डॉक्टर्स असोसिएशन, सीए असोसिएशन यांसारख्या संस्थांनी मदतीची तयारी दर्शविली आहे.

...

अशी होणार कामे

- पाऊस कमी झालेल्या गावांत प्राधान्याने कामे हाती घेणार

- कामांचे जिओ टॅगिंग करण्याचेही विचाराधीन

- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढणार

- शेतकरी, ग्रामस्थांना गाळ उचलण्याची परवानगी

- गाळ इतरांना विकण्यास परवानगी नसणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकेदायक इमारतीमुळे विद्यार्थ्याचा अपघात

$
0
0

दळवट आश्रमशाळाप्रकरणी अहवाल सादर

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दळवट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्युप्रकरणी प्रकल्पाधिकारी, तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्या त्रिस्तरीय आपत्कालीन आढावा पथकाने अहवालात तयार केला आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा घातपात नसून अपघात असल्याचे म्हंटले आहे. प्रकल्पाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार कैलास चावडे तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी दळवट येथील आश्रमशाळेत भेट देत प्राथमिक अहवाल सादर केला.

आश्रम शाळेच्याच वर्गखोल्यांची बंद व धोकेदायक ठरलेल्या इमारत मात्र या विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे.

रविवारी चेतन संजय पवार हा मित्रांसमावेत क्रिकेट खेळत होता. त्यांचा चेंडू आश्रमशाळेच्याच धोकेदायक इमारतीच्या टेरेसवर अडकला. या इमारतीला जिना नसतानाही चेतन वर चढला. मात्र उतरत असताना तो खाली पडला. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला. तो डोक्यावरच पडल्याने त्याला उलटी झाली. हे लक्षात येताच त्याला प्राथमिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथून नाशिकला हलविण्यात तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी गेला. या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले. घटना घडल्यानंतर त्याला थेट नाशिकला हलविले असते तर कदाचित त्याला वाचवण्यात यश आले असते.

कुटुंबावर आघात

चेतनचे वडीलही वारले आहेत. त्याच्या विधवा आईवर या घटनेमुळे मोठा आघात झाला. त्याच्या आईला कळवण प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून तत्काळ दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना व अन्य कुठल्याही शासकीय निकषानुसार मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. पतीचे व आता मुलाचेही निधन झाल्यामुळे पवार कुटुंबातील त्या विधवा महिलेस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

इमारत धोकेदायकच

दळवट आश्रयशाळेतील ज्या इमारतीवर चेंडू काढण्यासाठी चेतन गेला ती इमारत धोकेदायक व बंदवस्थेत आहे. तिला चढणे-उतरण्यासाठी जिना नाही. असे असतानाही आश्रमशाळा प्रशासनाकडून या धोकादायक इमारतीबाबत गंभीरपणे घेतले गेले नाही. तशा सूचना विद्यार्थ्यांना केलेल्या नाहीत. ही बाबही या घटनेच्या निमित्ताने पुढे आली आहे. याच आश्रमशाळेत डिसेंबर २०१४ च्या कालावधीत शिवभांडणे येथील विद्यार्थी योगेश बागुल याने गळफास घेवून आत्महत्या केनर होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोवर-रुबेला’स २५ पर्यंत मुदतवाढ

$
0
0

शहरात ८४ टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवर रुबेलाचा नायनाट व्हावा यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबविली असताना नाशिक महापालिकेने राबविलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात ४ लाख ९० हजार पैकी ४ लाख ५ हजार २१४ बालकांना गोवर-रुबेलाची लस देण्यात आली असून ८३.६६ टक्के उदिष्ट्य पूर्ण केल्याची माहिती आरोग्यधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने विविध शाळामध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मात्र, शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या रहिवासी भागातील शाळांमध्ये या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. उर्दू शाळांमध्ये गोवर रुबेलाच्या लसीकरणाचे प्रमाण कमी होते. यासाठी शहरातील मान्यवर नागरिक, नगरसेवक, उर्दू शाळेतील मुख्याध्यापक, शहर-ए-खतिब, डॉक्टर्स यांची गेल्या आठवड्यातच विशेष बैठक घेण्यात आली. यात या लसीकरणाचे महत्त्व पटवून नागरिकांना प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.

पालकांचे मतपरिवर्तन

दारुल मदरसामध्ये एकूण १७२ विद्यार्थी होते त्यापैकी ५२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यश आले आहे. अजून १२० विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी असून त्यांच्या पालकांचे उद्बोधन करण्यात येत आहे. लीली व्हाईट या शाळेने लसीकरणास नकार दिला होता. या शाळेतील पालकांचे मतपरिवर्तन झाले असून ७६६ पैकी ४०६ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ३६० विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे.

... तर ९० टक्के यशप्राप्ती

अजूमन उर्दू हायस्कूलमध्ये २३० पैकी २१० विद्यार्थ्यांचे, एकरा प्रायमरी स्कूलमध्ये २४४ पैकी २३५ विद्यार्थ्यांचे, नॅशनल प्रायमरी स्कूलमध्ये ६४४ पैकी ६४४ विद्यर्थ्यांचे म्हणजेच १०० टक्के लसीकरण झाले आहे. सेंट सादिक स्कूलमध्ये ४३६ पैकी ३०९ विद्यार्थ्यांचे, रहेनुमा उर्दू स्कूलमध्ये ७९९ पैकी ६७२ विद्यार्थ्यांचे, सुलेमान स्कूलमध्ये २५९ पैकी २३२ विद्यार्थ्यांचे, रवींद्र मंडळ शाळेत ३३९ पैकी २७४ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या लसीकरणासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

..

शहरात उर्दू शाळा : ३५

एकूण विद्यार्थी : १६,०८४

डिसेंबर अखेर लसीकरण : ६,२९५

बैठकीपूर्वीचे बाकी लसीकरण : ९,७८९

बैठकीनंतर लसीकरण : ४,१०५

अद्याप बाकी लसीकरण : ५,६८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचं चांगभलं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला नाशिक शहरातील नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला असून, अवघ्या ६६० नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. नाशिकपेक्षा भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या मालेगाव शहरात ९९१ नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपल्या शहरात स्वच्छता कशी होते, हे जाणून घेण्यासाठी १९६९ या नंबरवर नागरिकांचे मत मागवले आहे. या नंबरला मिस्ड कॉल दिल्यानंतर तिकडून 'रिटर्न कॉल' येतो. त्यावरून आपल्या शहरात स्वच्छता कशी आहे, याची माहिती घेतली जाते. या माहितीवरून शहराचा स्वच्छतेतील क्रमांक ठरविला जाणार आहे. केवळ समितीच्या एका भेटीच्या आधारे शहराला नंबर न देता नागरिकांच्या सहभागातून हे मानांकन दिले जाते. मात्र, नाशिक शहरातील केवळ ६६० नागरिकांनीच या नंबरवर कॉल करून आपले मत नोदवले आहे. त्याच प्रमाणे https://swachhsurvekshan2019.org/CitizenFeedback या ठिकाणीही आपली प्रतिक्रिया नोंदविता येते. येथेही नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. नाशिक शहराच्या तुलनेत लहान असलेल्या मालेगाव शहरातून चांगला प्रतिसाद आहे. मालेगाव शहरातून आतापर्यंत ९९१ नागरिकांनी प्रतिसाद नोंदवला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करून त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यासाठी देशभरात दरवर्षी जानेवारीत सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पहिले सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये झाले. यात देशभरातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७४ शहरांचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी नाशिकचा ३१ वा क्रमांक होता. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात देशातील ४७३ शहरे सहभागी झाली होती. त्यात नाशिकची क्रमवारी १५१ व्या स्थानावर घसरली. त्यामुळे दत्तक घेतलेल्या नाशिकची ही घसरण मुख्यमंत्र्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन पहिल्या दहा शहरांत नाशिकचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. प्रत्यक्षात २०१८ च्या सर्वेक्षणांतर्गत पुरस्कारप्राप्त शहरांची यादी १६ मे २०१८ रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. यादीत पुरस्कारप्राप्त शहरांमध्ये नाशिकचे नाव नसल्यामुळे दत्तक नाशिककरांचा पुन्हा अपेक्षाभंग झाला होता. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मध्यप्रदेशातील इंदूर शहराला मिळाला होता. भोपाळ व चंडिगड हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर होते. देशात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला होता. महाराष्ट्रातील नऊ शहरांना विशेष पुरस्कार जाहीर झाले होते. त्यामध्येही नाशिकला स्थान मिळाले नाही. परभणी, भुसावळ यांसारख्या शहरांची स्वच्छता सुधारली असताना नाशिक मात्र उपेक्षित राहिले होते. आता अस्वच्छ शहरांमध्ये कितवा क्रमांक लागतो, हेच पाहणे नाशिककरांच्या नशिबी आले आहे.

अशी नोंदवा प्रतिक्रिया

१९६९ या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपल्याला भाषा निवडीचा पर्याय दिला जातो. मराठीसाठी ५ नंबर डायल केल्यानंतर आपण राहात असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर विचारला जातो. त्यानंतर आपले वय, स्त्री आहात की पुरुष हे विचारले जाते. त्यानंतर आपल्या शहरातील स्वच्छतागृहांबाबत आपण समाधानी आहात का? आपल्याकडे येणाऱ्या गाडीत ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जातो का? आपण राहात असलेल्या परिसरात स्वच्छतागृहांची संख्या योग्य आहे का? शहरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली जाते का, याची माहिती विचारली जाते. १९६९ या नंबरवर मत नोंदविता येते.

https://swachhsurvekshan2019.org/CitizenFeedback या ठिकाणीही प्रतिक्रिया देता येते.

पालिकेकडून जोरदार प्रयत्न

नाशिक शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात चांगला नंबर यावा यासाठी प्रशासन कामाला लागले असून, शहरातील सर्व स्वच्छतागृहांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्ते स्वच्छ करून दुभाजकांना रंग दिला जात आहे. सुलभ शौचालयांमध्ये आरसे व हात पुसण्यासाठी रुमाल ठेवण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीतील हत्या प्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधांमुळे उद्भवलेल्या वादातून अरबाज शेरू पठाण या युवकाची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितास अटक केली. यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या नऊच्या घरात पोहचली आहे. दरम्यान, संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या एका युवकालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.

अजिंक्य उर्फ सोनू प्रकाश धुळे आणि चेतन यशवंत इंगळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनू धुळे यास तपोवन परिसरातून तर, इंगळेला पंचवटी मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी अटक केली. हत्येचा प्रकार घडल्यानंतर संशयित आरोपी विराज उर्फ विक्की किरण काळे याने इतर संशयितांना पळून जाण्यास मदत केली. पोलिस तपासात ही बाब स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यालाही आरोपींच्या यादीत घेतले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयित आरोपींना अटक केली असून, चार विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. हत्येची घटना भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भीमवाडी झोपडपट्टी परिसरात संक्रांतीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांनी केली शिक्षण विभागाची गोची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक वृत्तीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेले इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. प्रदर्शन मांडणीसाठी आवश्यक साहित्य, विद्यार्थ्यांच्या चहा, नाश्त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये केवळ एकाच निविदेत निकषांची पूर्तता होत असल्याच्या अडचणीमुळे हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, येत्या ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शन आयोजित करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे आजपासून (दि. २२) इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील ९९२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून, त्यांचे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार होते. नोंदणी केलेल्या ९९२ विद्यार्थ्यांपैकी उपस्थित दहा टक्के विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरासाठी, तर पुढे साडेसात टक्के विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनातील निवडलेले विद्यार्थी ३ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे ३ फेब्रुवारीच्या आत जिल्हा स्तरावरुन विद्यार्थ्यांची निवड होणे आवश्यक आहे. परंतु, निविदांच्या अडचणीमुळे नियोजित इन्स्पायर प्रदर्शन तूर्तास रद्द करण्यात आले आहे. प्रदर्शनात आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण ‌विभागाची मात्र, धावपळ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्का प्रश्नी बैठक निर्णयाविनाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळालेले काम करण्यास नकार दिल्याने नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी सर्व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २१) कामागार उपयुक्त जी. जे. दाभाडे यांच्या उपस्थितीत कामगार उपयुक्त कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, स्थानिक कार्टिंग एजंटकडून परराज्यातील कंपनीचे काम केल्याबद्दल मारहाण करून धमकावल्याची माहिती समजते. या प्रकारानंतर संबंधित कामगारांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. या प्रकाराची पोलिसांकडूनही शाहनिशा सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावरील शासकीय धान्याचा ठेका न्यू हैद्राबाद मेडक ट्रान्सपोर्ट या कंपनीला मिळाला आहे. मात्र, या कंपनीचे काम करण्यास स्थानिक कामगारांनी विरोध दर्शविल्याने या कंपनीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. स्थानिक कार्टिंग एजंट कंपनी आणि कामगारांत दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका करारावरुन हा वाद उद्भवला होता. त्यानंतर पोलिस आणि कामगार यूनियन, कामगार उपायुक्त, रेल्वे पोलिस यांच्यात बैठकही झाली होती. या विषयावर कामगार उपायुक्त दाभाडे यांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक झाली.

या बैठकीत उपस्थित सर्व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कराराची मुदत संपेपर्यंत हैद्राबादच्या कंपनीचे काम करण्यास आपला नकार लेखी स्वरुपात कळविला आहे. त्यामुळे हैदराबादच्या कंपनीचा नवीन रेक आल्यावर पुन्हा कामगारांचा प्रश्न उपस्थित होणार आहे. स्थानिक नोंदनीकृत कामगार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने हैदराबादच्या कंपनीपुढे आता कामगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. या कंपनीने बाहेरून कामगार आणल्यास कदाचित त्यास देखील स्थानिक पातळीवर विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

कामगारांची गोची कायम

नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर चार कामगार युनियन आहेत. या कामगारांनी केवळ कथित कराराच्या भीतीपोटी परराज्यातील कंपनीच्या कामाला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्षात स्थानिक कामगारांना एका विशिष्ट कार्टिंग एजंट शिवाय इतर कार्टिंग एजंट कंपनीचे काम करण्यास बंधन असणारा अशा स्वरुपाचा कोणताही करार झाला नसल्याचा दावा कामगार उपयुक्तांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांचीच मोठी कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images