Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेशीमगाठी जु‌ळविण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या, तरी गाठ बांधण्यासाठी लागणारे अनुभवी, सुसंस्कारित आणि विश्वासू हात भूतलावरचेच असतात. त्यामुळेच आपल्या पाल्याचे 'दोनाचे चार' करण्यासाठी पालकांना प्रतीक्षा असते ती 'अनुपमशादी डॉट कॉम' व 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या मेळाव्यांची. यंदाचा मराठा वधू-वर मेळावा शनिवारी (दि. २६) दुपारी दोन वाजता होत आहे. हॉटेल एमराल्ड पार्कच्या (मायको सर्कल) ग्रीन व्ह्यू हॉल येथे हा मेळावा होणार आहे.

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीचा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. हा क्षण अधिक आनंददायी बनविण्यासाठी पालक आणि वधू-वरांना प्रतीक्षा असते ती अनुपम शादी विवाह संस्था, महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित वधू-वर मेळाव्यांची. वधू-वर संशोधनात अनुपमशादी डॉट कॉम या संस्थेने राबविलेले मेळावे नेहमीच यशस्वी ठरले आहेत. नाशिकसह पुणे, ठाणे येथील मेळाव्यांतून अनेक संसार फुलले आहेत. नऊ मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनानंतर नाशिकमध्ये होणारा हा दहावा वधू-वर मेळावा आहे. सर्व मेळाव्यांमध्ये आयोजकांचे नियोजन अत्यंत काटेकोर असल्याने वधू-वरांना कार्यक्रमात सहभाग घेताना व मेळावा झाल्यानंतरही लग्न जमण्यासाठी सर्व मार्गदर्शन केले जाते. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उपवर-वधूंना विवाह निश्चित होईपर्यंत मदत, तसेच वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर नावनोंदणी करता येणार आहे.

येथे करावी नावनोंदणी...

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अनुपमशादी डॉट कॉम, शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, नाशिक-पुणे महामार्ग, द्वारका येथे, तसेच ८२७५०१६४९०, ७४४७७८७४४७, ८३७८९१०९९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणी www. anupamshaadi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलागुणांची मुक्त उधळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लष्करी जवानांच्या जीवनावरील नृत्यनाटिका, मलखांबची थरारक प्रात्यक्षिके, महिला अत्याचार विषयावर प्रकाश टाकणारे समूहनृत्य, लोककलेचे दर्शन घडविणारे गोंधळ अशा विविध कलाकृतींचे बहारदार सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

निमित्त होते, के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित 'इंद्रधनुष्य' या कार्यक्रमाचे. महाकावी कालिदास कलामंदिर येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी जल्लोषात पार पडला.

के. के. वाघ शिक्षण संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष सध्या साजरे करीत आहे. त्याअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांची मेजत्नी उपलब्ध करवून देण्यात आली असून, 'इंद्रधनुष्य' हा कार्यक्रमही सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता चिन्मय उदगीरकर, सिनेनिर्माता अमोल उतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चिन्मयने के. के. वाघ शिक्षण संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेली शिक्षण संस्था असल्याचे सांगत संस्थेचे कौतुक केले. उतेकर यांनी आपल्या जडणघडणीत एक विद्यार्थी म्हणून वाघ संस्थेचा फार मोठा वाटा आहे, असे सांगत एक माजी विद्यार्थी म्हणून संस्थेच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होणे विशेष आनंदाचे असल्याचे मत व्यक्त केले.

त्यानंतर गणेशवंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली. उपस्थितांनीही विद्यार्थ्यांना दाद दिली. याप्रसंगी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त अशोक मर्चंट, चांगदेव होळकर, समीर वाघ, प्रा. डॉ. केशव नांदूरकर, अजिंक्य वाघ, तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य, तसेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. पी. टी. कडवे व कृषी जैव तंत्रज्ञानचे प्राचार्य डॉ. एन एस पाचपोर आदी उपस्थित होते.

--

प्रेक्षकांची भरभरून दाद

इंजिनीअरिंग कॉलेजांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली मलखांबची प्रात्यक्षिके, बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले महिला अत्याचारावरील समूहनृत्य, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कथक नृत्य, परफॉर्मिंग आर्टच्या विद्यार्थ्यानी सादर केलेली चित्रपटगीते, सीनिअर कॉलेज चांदोरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले गोंधळ गीत नृत्य, तसेच लष्करी जवानांच्या कार्यावरील नृत्यनाटिकेलास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनादेखील तेवढीच भरभरून पसंतीची पावती दिली. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमाचा सर्वांनीच मनसोक्त आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस जातपडताळणी; पालिका कर्मचारी बडतर्फ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महापालिका सेवेत असलेल्या राजेंद्र रामदास ठाकूर या सहायक कनिष्ठ अभियंत्यास बडतर्फ करण्यात आले आहे. ठाकूर यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर करून पालिकेत मिस्तरी या पदावर नोकरी मिळवली होती. अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र सादर करून २३ जणांनी नोकरी मिळवली होती. परंतु, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या आदेशाचा आधार घेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. त्यातील ९ जणांनी न्यायालयात धाव घेवून नोकरी वाचवली होती, तर ठाकूर यांनी न्यायालयात खटला प्रलंबित असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडून माहिती मागवली होती. त्यात ठाकूर यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे समितीने पालिकेला कळविले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ठाकूर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकूर हे १९८६ पासून पालिकेच्या सेवेत होते. ते २०२६ मध्ये निवृत्त होणार होते. तत्पूर्वीच त्यांना बोगस प्रमाणपत्रामुळे नोकरीला मुकावे लागणार आहे. दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतही चाचपणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी मिळाल्यास उमेदवारीस तयार

$
0
0

धुळे लोकसभेसाठी रोहिदास पाटील यांचे सूतोवाच

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येत्या काही महिऱ्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण उमेदवारीसाठी तयार आहोत , असे सूतोवाच माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानी मंगळवारी (दि. २२) काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी रोहिदास पाटील बोलत होते. बैठकीस डॉ. हेमंत देशमुख, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, रामभाऊ माणिक, डॉ. एस. टी. पाटील उपस्थित होते. माजी मंत्री रोहिदास पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकार कोणाचेही असू द्या. एकवेळा आपल्याला संधी मिळाल्यास विकासाला गती देण्यात येईल. आपण लढण्यासाठी तयार आहोत. फक्त कार्यकर्त्यांची साथ हवी आहे, असे त्यांनी सांगितले.

काही गोष्टींची योग्य व स्पष्ट मांडणी करणे, वाचा फोडणे यालादेखील राजकारणात महत्त्व आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या कामाचे हे सरकार नाही, अशी टीका तर सभापती मधुकर गर्दे यांनी केली. जिल्हाध्यक्ष श्याम सनेर म्हणाले, सर्व कार्यकर्ते नेते मंडळींनी एकत्र यावे. काँग्रेसच्या विचारांच्या पाठीशी उभे राहावे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांना लोकसभेत उमेदवारी मिळणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. गावातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी सत्ता हवी आहे. रोहिदास पाटील हेच खरे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार ठरू शकतील, असे माजी मंत्री डॉ. देशमुख म्हणाले. माजी उपाध्यक्ष राजेंद्र देसले म्हणाले, प्रकाशा-बुराई योजनेचा खर्च ८०० कोटींवर गेला आहे. त्याला तत्त्वता मान्यता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातच मिळाली. पण, एकही काम शिंदखेडा तालुक्यात आताच्या लोकप्रतिनिधींचे नाही. ते रेटून खोटे बोलतात, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद; तीन जखमी

$
0
0

नाशिक

नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावकरनगर येथील वस्तीत सकाळच्या वेळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

सकळच्या वेळी भरवस्तीत बिबट्या शिरल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. पोलीस आणि वनविभागाला बिबट्याची माहिती मिळताच त्यांनी परिसरात धाव घेतली. आदित्य पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात बिबट्या शिरला होता. त्यानंतर तो झुडुपांमध्ये लपून बसला होता. बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त आर. आर. पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कुमक मागवावी लागली. अखेर एका इमारतीच्या परिसरातून थरारकपणे बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नगरसेवक संतोष गायकवाड आणि दोन पत्रकार जखमी झाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडेराव-म्हाळसादेवीचे शुभमंगल!

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडजवळील कर्णनगर येथील जय मल्हार मित्रमंडळातर्फे खंडेराव महाराज व म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा गोरक्षनगर येथे रंगला. हा दिव्य विवाह सोहळा अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तीन दिवस हळदी समारंभ, विवाह सोहळा, सत्कार सोहळा, महाप्रसाद वाटप असे भरगच्च कार्यक्रम यानिमित्त घेण्यात आले.
या विवाह सोहळ्यात हळदी समारंभ, देवीचे गाणे, गणेशस्थान, अभिषेक, आरती, मांडव सोहळा, खंडेराव महाराजांची हत्तीवरून पालखी, घोडा, काठी ध्वज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डोंगरी देव गुरू खांडवी पाडा गोपापूर यांचे कला नृत्य पथक सहभागी झाले होते. त्यांचे नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. कर्णनगर ते गोरक्षनगरातील खंडेराव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. रात्री पारंपरिक बोहडा आणि जागरण-गोंधळाचा कार्यक्रम झाला. या सोहळ्यास माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले आदी उपस्थित होते. लग्नसोहळा यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन सातपुते, उपाध्यक्ष महेश शेळके, अमित पवार यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतांच्या कार्यातूनच संस्कृती टिकून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे आपल्या श्री समर्थ आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या स्व. नानासाहेब धर्माधिकारी हे संतांच्या रूपानेच समाजात होते. त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने देश विदेशात सुरू असलेल्या बैठकीमधील निरुपणाच्या माध्यमातून धर्म व संस्कृती टिकून राहण्यास मोठा हातभार लागल्याचे प्रतिपादन निफाडच्या माजी आमदार मंदाकिनी कदम यांनी केले.

ओझर येथील ग्रामपालिकेत स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरणप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जान्हवी कदम, उपसरपंच मुल्ला रज्जाक शेख, वनश्री चंद्रकांत गोडसे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. देवकर, राजेंद्र महाले, सागर शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते. ओझर परिसरात त्यांचे शेकडो अनुयायी असल्याने तेथे त्यांच्या कार्याला पाठबळ मिळावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जाधव व मच्छिंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकल’ला ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिककरांसाठी दिल्लीला कमी वेळ व खर्चात पोहचणारी राजधानी एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर आता नाशिक-कल्याण लोकल धावणार आहे. ही सेवा १० फेब्रुवारीनंतर कधीही सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

लोकलच्या तयारीबाबत खासदार हेमंत गोडसे, मुख्य नियंत्रक प्रदीप अहिरे, नाशिकचे सेवानिवृत्त मुख्य लोको नियंत्रक वामन सांगळे यांनी चेन्नई येथील रेल्वे कारखान्याला भेट दिली. त्यावेळी कारखान्याचे मुख्य अभियंता शुभांशू यांनी लोकल गाडी ३० जानेवारीपर्यंत मुंबईतील कुर्ला वर्कशॉपमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. कुर्ला वर्कशॉपमध्ये पाच ते सहा दिवसांत या गाडीवर अखेरचा हात फिरवला जाईल व सात फेब्रुवारीनंतर ही लोकल धावण्यास सज्ज राहील, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

व्यवसायाला चालना

नाशिक-कल्याण लोकल सुरू झाल्यानंतर नाशिकच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळणार आहे. एकाच वेळी सुमारे दोन हजार प्रवासी या गाडीचा लाभ घेऊ शकतात. इगतपुरी, घोटी, लहवीत, देवळाली कॅम्प आणि नाशिक ही शहरे कल्याणला जोडली जाणार आहेत. या भागातील नागरिक, शेतकरी, उद्योजकांना दळणवळणाचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे. या लोकलबाबत खासदार गोडसे यांनी संसदेमध्ये, तसेच रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ही गाडी अखेर सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

घाटांचे आव्हान

राजधानी एक्सप्रेसपुढे घाटांचे आव्हान होते. राजधानीला पुश-पुल तंत्र वापरले आहे. म्हणजेच मुंबईपासूनच मागेही इंजिन जोडण्यात आल्याने गाडीला इगतपुरी, कसाऱ्यात बॅकर जोडण्यासाठी थांबावे लागत नाही. नाशिक-लोकलपुढेही घाटांचे आव्हान आहे. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, कसारा ते इगतपुरीदरम्यान पंधरा किलोमीटरचा घाट असून, सहा बोगदे आहेत. पहिला बोगदा पार करण्यासाठी एक मिनिट पाच सेकंद लागतात, तर इतर बोगदे पार करण्यासाठी पंधरा ते सतरा सेकंद लागतात. कर्जत ते लोणावळा या घाटांमध्ये लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. तिचा निकाल सकारात्मक आल्यानंतर कल्याण ते इगतपुरी आणि इगतपुरी ते नाशिकदरम्यान लोकलची चाचणी होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीत लोकल नाशिककरांच्या सेवेत दाखल होऊ शकते.

अडीच तासांचा प्रवास

कल्याण-नाशिक लोकलमुळे अडीच तासांत या दोन शहरांचा प्रवास होणार आहे. या गाडीचा वेग ताशी शंभर किलोमीटर राहील. मात्र, वेगाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. लोकलमध्ये महिलांसाठी फर्स्ट क्लास स्पेशल कोच, दिव्यांगांसाठी स्वतंत्र कंपार्टमेंट असेल. लोकलला बारा डबे राहणार असून, तीन कोचेस मिळून एक युनिट असेल. प्रत्येक युनिटमध्ये एक इंजिन असेल.

रस्त्यावरचा भार कमी होणार

नाशिक-कल्याण लोकल सुरू झाल्यानंतर कल्याण, कसारा, इगतपुरी, लहवीत, देवळाली आणि नाशिक जोडले जाणार आहेत. रेल्वेच्या महसूलातही वाढ होईल. लोकल सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. अपघात टळतील. लाखमोलाचे जीव वाचतील. सार्वजनिक वाहतूक सुखकर होईल. नाशिकच्या शेतकरी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थ्यांना फायदा होऊन नाशिकच्या विकास विकासाला चालना मिळेल.

नाशिक-कल्याण लोकलमुळे नाशिकरांचे स्वप्न होणार आहे. पूर्ण उपनगरीय रेल्वेची हद्दवाढ व्हावी यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई कसारापर्यंतची हद्दवाढ ही नाशिकपर्यंत व्हावी, नाशिक-कल्याण लोकल सुरू व्हावी असे प्रयत्न आहेत. लोकलचे काम पूर्ण होत आले असून, १० फेब्रुवारीनंतर ती कधीही नाशिककरांच्या सेवेत रुजू होईल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगांसंबंधी सर्व सुविधा ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवी हस्तक्षेप दूर करून उद्योगांसंबंधी असलेल्या सर्व सुविधा १५ फेब्रुवारीनंतर 'एमआयडीसी'च्या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

याअगोदर बहुतांश सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पण, एकाच ठिकाणी या सेवा असाव्यात यासाठी गेल्या काही महिन्यांपासून इझ ऑफ डुइंग बिझनेस हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती 'एमआयडीसी'चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) येथे 'एमआयडीसी'ने आयोजित केलेल्या 'वर्कशॉफ ऑफ इझ ऑफ डुइंग बिझनेस' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृष्णा यांनी 'एमआयडीसी'ने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी त्यांनी प्लॉट वाटप करतानाच आता विद्युत कनेक्शन घेण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात येईल. त्याचप्रमाणे अनेक ना हरकत दाखलेसुद्धा 'एमआयडीसी'च घेईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात अगोदर उद्योगांसाठी जमीन उपलब्ध नव्हती. पण, आता ती येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे सांगितले.

कार्यशाळेत 'एमआयडीसी'चे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक विनोद जाधव यांनी 'पीपीटी'द्वारे ऑनलाइनचा वापर करण्यासंबंधी माहिती दिली. 'एमआयडीसी'ने कोणत्या सेवा दिल्या आहेत त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली. यावेळी उद्योजकांचे काम सोपे व्हावे यासाठी घेतलेल्या काही निर्णयांची माहिती त्यांनी दिली. 'एमआयडीसी'च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव येथील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्योगांसंबंधीचे प्रश्न निमा, आयमा, लघु उद्योग भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. उद्योजकांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या.

...अशी आहे जागा

उद्योगांसाठी तळेगाव-अक्राळे येथील जागा एक महिन्यात वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मालेगाव टप्पा दोनच्या जमिनीचे दर कमी करण्यात आले आहेत. अजंग येथे जमीन संपादन झाले असून, सहा महिन्यांत येथे प्लॉट उपलब्ध होईल. सिन्नरचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध होणार असल्याचे कृष्णा म्हणाले. त्याचप्रमाणे विंचूर येथे फूड प्रोसेसिंगचा प्रस्तावही सरकारकडे पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. अंबड येथील आयटी बिल्डिंगचे दुरुस्तीचे काम करून येथील गाळेसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. या गाळ्यांचे दर त्यासाठी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटी उद्योगाला चालना मिळणार असल्याचे कृष्णा म्हणाले.

--

उद्योजकांनी कराव्यात सूचना

ऑनलाइन प्रक्रियेत उद्योजकांनी सुचना कराव्यात. त्यातून ही वेबसाइट अधिक प्रभावी करता येईल. त्याचप्रमाणे उद्योजकांनी आठवड्यातून एकदा तरी या साइटला व्हिजिट करावी. त्यात अनेक अपडेट व माहिती दिलेली असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

०००० ०००सर्वाधिक वाचलेली बातमी ०००० ०००० ००००

ट्रायच्या अॅपवर बजेटनुसार निवडा आवडीचे चॅनेल

ग्राहकांच्या मदतीसाठी ट्रायने वेब अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांना आपल्या आवडीनुसार चॅनेल निवडता येतील.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने शिवसैनिकांची एकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या सिनेमाचे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जोरदार स्वागत करीत सिनेमाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सोबतच या सिनेमाच्या निमित्ताने शहर आणि जिल्ह्यातील नवे व जुने शिवसैनिकांनी एकत्र आले. सर्वांनी एकत्रितपणे सिनेमाला हजेरी लावून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाशिक शिवसेनेच्या वतीने शहरातील चार सिनेमागृहांमध्ये शिवसैनिकांसाठी विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी या सिनेमाचे सर्व खेळ हाऊस फुल झाले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच 'ठाकरे' चित्रपटाबद्दल लोकांना उत्सुकता लागली होती. सिनेमाचा ट्रेलर व गाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही उत्सुकता ताणली गेली होती. आज अखेर हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्यामुळे बाळासाहेबांचा इतिहास पाहण्यासाठी शिवसैनिकांनाही पहिल्याच दिवशी या सिनेमाला जोरदार प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे नाशिकमधील सर्व सिनेमागृहात एकाच वेळी या सिनेमाला स्क्रीन मिळाले. शिवसैनिकांनाही दक्ष राहून सिनेमागृहांवर नजर ठेवली होती. त्यामुळे सर्व सिनेमागृहात एकाच वेळी हा सिनेमा प्रसिद्ध झाला. नाशिक शिवसेनेच्या वतीने शहरातील चार सिनेमागृहात शिवसैनिकांसाठी या सिनेमांचे बुकिंग करण्यात आले होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय कंरजकर, माजी मंत्री बबनराव घोलप, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, शाम साबळे, हर्षल केंगे यांच्यासह नवे जुने शिवसैनिकांनी एकत्रित येत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे अंतर्गत गटबाजी विसरत शिवसेनेतील आजी-माजी शिवसैनिकांनी एकत्रित येत या सिनेमाला प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य बालनाट्यचा निकाल सोमवारी

$
0
0

स्पर्धेचा जल्लोषात समारोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक संचलनालयाच्यावतीने आयोजित १६ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप शुक्रवारी करण्यात आला. कुसू आणि तात्या, अकलेनी लावली राज्याची वाट, केल्याने होत आहे रे, हुतात्मा, राखेतून उडाला मोर ही नाटके यावेळी सादर करण्यात आली. नाशिक केंद्रावर नाशिक व अहमदनगर मिळून २५ नाटके सादर करण्यात आली. नाट्य स्पर्धेचा निकाल सोमवारपर्यंत लावण्यात येणार आहे.

प्राजक्त देशमुख लिखित आणि राहुल गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेले 'कुसू आणि तात्या' हे नाटक, कुसुमाग्रजांच्या अवतरणावर आधारित आहे. कुसू या मुलीला तात्यासाहेबांनी तयार केलेली अंकलिपी सापडते आणि त्यातून ती शिकत असताना समोर अचानक तात्यासाहेब येतात. त्यातून त्या दोघांचा घडलेला संवाद, घटना यातून हे नाटक आकाराला येते. सचिन शिंदे अॅकॅडमी यांच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले.

'अकलेनी लावली राज्याची वाट' हे विनोदी नाटक होते. अंबादास जोशी यांचे लेखन व मनीषा एकबोटे यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक राजा हा जाणकार असावा नाहीतर राज्याची पुरती वाट लागते असा आशयाचे हे नाटक होते. श्री स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले.

'केल्याने होत आहे रे' हे नाटक माणसाने काम केले पाहिजे, हे जमत नाही असे म्हटल्यावर आपल्या विश्वासाचे खच्चीकरण होऊन खरोखरच ते काम जमत नाही. त्याउलट प्रत्येक कामात आपण विश्वास दाखवला तर ते काम नक्की होते अशा आशयाचे हे नाटक होते. ज्योतिराव कदम यांचे लेखन तर योगेश निळे यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभलेले होते. ओम गुरूदेव इंग्लिश मीडियम विद्यालय, कोकमठाण यांच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले.

'हुतात्मा' हे नाटक ओम गुरूदेव माध्यमिक विद्यालय, कोकमठाण, अहमदनगर यांनी सादर केले. लेखन पांडुरंग घांग्रेकर, दिग्दर्शन दुर्गा काळे यांचे होते. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवले जाणे गरजेचे आहे, देशाचे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर हुतात्म्यांचे स्मरण ठेवावे हे या नाटकातून दाखवण्यात आले.

रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगाव, अहमदनगर यांच्यावतीने 'राखेतून उडाला मोर' हे नाटक सादर करण्यात आले. लेखन डॉ. सतिश साळुंके यांचे तर दिग्दर्शन डॉ. गोकूळ क्षीरसागर यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय समितीवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील सर्वे क्रमांक ७०५ च्या वादग्रस्त भूसंपादनापोटी उर्वरित २१ कोटींच्या मोबदला प्रकरणासह घंटागाडी ठेक्याच्या चौकशीसाठी उपसमिती नेमण्याची सदस्यांची मागणी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडकेंनी पुन्हा फेटाळून लावली आहे.

टीडीआर घोटाळा आणि घंटागाडी ठेक्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी प्रशासकीय समितीलाच प्राधान्य दिले आहे, तर टीडीआर व एआर प्रकरणांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांची द्विसदस्यीय, तर घंटागाडी ठेक्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त फडोळ यांच्यासह कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके व डॉ. मनोज चौधरी यांची त्रिसदस्यीय समिती आयुक्तांनी गठित केल्याने सदस्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घंटागाडी ठेक्याच्या चौकशीसह २१ कोटींच्या वादग्रस्त मोबदल्यावर चर्चा झाली. शिवसेनेचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी टीडीआर घोटाळा व घंटागाडी ठेक्यातील अनियमितते प्रकरणाच्या चौकशी समितीचे काय झाले, २१ कोटींच्या प्रकरणात नेमलेल्या निम्न अधिकाऱ्यांच्या समितीला जिल्हाधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार आहे का, असे प्रश्न उपस्थित केले. यावर सभापतींनी टीडीआर व घंटागाडी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समित्यांची माहिती सभेत सादर केली. चौकशी समितीत सदस्यांचा समावेश केल्यास मोठ्या प्रमाणावर टीडीआर घोटाळा उघडकीस येईल. त्यामुळे स्थायीच्या अधिकारात उपसमिती का नेमली जात नाही, असा सवाल मुशीर सय्यद, संतोष साळवे यांनी केला असता कायदेशीर सल्लागाराने सादर केलेल्या पत्रानुसार आरोपकर्त्या सदस्यांचा समावेश असलेली समिती वैध नसल्याचा पुनरुच्चार सभापतींनी केला. स्थायीने नेमलेल्या उपसमितीला चौकशी करण्याचा नव्हे, तर केवळ एखाद्या विषयावर अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल स्थायीला सादर करण्याचाच अधिकार असल्याचेही आहेर-आडके यांनी नमूद केले. त्यामुळे अखेरीस आता अधिकाऱ्यांचीच समिती या दोन प्रकरणांची चौकशी करणार आहे.

----

उद्धव निमसेंकडून खडेबोल

दरम्यान, २१ कोटींचा मोबदला, घंटागाडी ठेक्यांच्या चौकशीसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना भाजपचे उद्धव निमसे यांनी खडेबोल सुनावले. शेतकऱ्यांना टीडीआर दिलाच पाहिजे, असे सांगत वारंवार एकाच प्रकरणावर बोलल्याने लोकांनाही संशय यायला लागतो, असा टोला त्यांनी सदस्यांना लगावला. कोण कशासाठी बोलतो, हे मला इथे सांगायला लावू नका, असा गर्भित इशारा देत वारंवार एकाच विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नका, असा परखड सल्लाही त्यांनी विरोधी सदस्यांना दिला. लोक हुशार झाले असून, सदस्य कशासाठी भांडतात, हे त्यांना लगेच समजते. त्यामुळे तुमचा वेळ वाया घालवू नका, असे सांगत विरोधी सदस्यांच्या हेतूवरच त्यांनी आक्षेप घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडलेला मोबाइल रिक्षाचालकाकडून परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेला सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल रिक्षाचालकाने प्रवाशी महिलेला परत आणून दिला. सद्गुरूनगर ते जिल्हा टपाल कार्यालय या प्रवासादरम्यान बुधवारी (दि. २३) हा प्रकार घडला.

सदाशिवनगर परिसरात राहणाऱ्या उषा शिरसाट या ज्येष्ठ महिला गोविंदनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप हांडे यांच्या रिक्षाने (एमएच १५ ईएच ०८५४) प्रवास करीत होत्या. या प्रवासात त्या २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल रिक्षामध्येच विसरल्या. कामानिमित्त त्या टपाल कार्यालयात गेल्या. काही वेळाने मोबाइल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या घाई-घाईने बाहेर रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. संबंधित रिक्षाचा शोध घेऊ लागल्या. त्याचवेळी समोरून तो रिक्षावाला त्यांना येताना दिसला. त्याला पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. हांडे रिक्षातून खाली उतरले. त्यांनी शिरसाट यांचा मोबाइल त्यांच्याकडे सुपूर्द केला. मोबाइल परत मिळाल्याने शिरसाट यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढ रद्दचा आठ दिवसांत फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक करयोग्य मूल्य दरवाढीच्या माध्यमातून केलेली करवाढ रद्द करण्याचा निर्णय महासभेने घेतला असला, तरी हा अधिकार पूर्णत: आयुक्तांचाच असल्याचा दावा करीत उपायुक्त (कर) महेश डोईफोडे यांनी येत्या आठ दिवसांत करवाढ रद्द करण्याच्या ठराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या ठरावाबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे सांगत मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजारपैकी ४९ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्ष पडताळणी करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदस्य मुशीर सय्यद यांनी करवाढीविरोधात आक्रमक भूमिका घेत करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाची अद्याप प्रशासनाकडून अंमलबजावणी का झाली नाही, असा जाब सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला विचारला. गोरगरीब नाशिककर अवाजवी घरपट्टी कशी भरणार, असा सवाल करत भाजप नाशिककरांसोबत डबल गेम खेळत असल्याचा हल्लाबोल मुशीर सय्यद यांनी केला. ज्या नाशिककरांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकत बहुमताने महापालिकेची सत्ता दिली त्या नाशिककरांना न्याय कधी मिळणार, असा सवालही सय्यद यांनी उपस्थित करीत भाजपची कोंडी केली.

मुख्यमंत्र्यांच्या 'दत्तक नाशिक' घोषणेचे काय झाले, हाच काय भाजपचा पारदर्शक कारभार, असा सवाल करत भागवत आरोटे यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. महासभेचा अवमान होत असल्याचे सांगत खुलासा सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली. महासभेने करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी वार्षिक करयोग्य मूल्य दरनिश्चितीचे अधिकार आयुक्तांचेच असल्याचे ठामपणे सांगितले. मुंढेंच्या अधिकारातील निर्णयावर फेरविचारासाठी विद्यमान आयुक्तांकडे प्रस्ताव सादर झाला आहे. येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित असून, त्यानंतरच नियमानुसार करवसुली सुरू केली जाईल, असे डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे.

---

२७ हजार मिळकती अनधिकृत

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींपैकी आतापर्यंत ४९ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १७ हजार नोटिसांवर नागरिकांकडून हरकती प्राप्त झाल्या असून, त्यांची पडताळणी केली जात असल्याचेही डोईफोडे यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत १७ हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. ५९ हजारपैकी २७ हजार मिळकती अनधिकृत आढळल्या आहेत. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसल्याने अनधिकृत ठरलेल्या मिळकतींची संख्याही मोठी आहे. या मिळकतींची जोपर्यंत पूर्णपणे तपासणी होत नाही तोपर्यंत त्यांना घरपट्टी वसुलीचे अंतिम देयक बजावण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिले सूर मेरा तुम्हारा...!

$
0
0

\B११ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक देशभक्तीगान

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सत्तावीस शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाची पूर्वसकाळ देशभक्तीपर गीतांनी रंगवली.. निमित्त होते, झेप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व तपोवन ब्रह्मचारी आश्रम यांच्यातर्फे आयोजित देशभक्तीपर समूहगान कार्यक्रमाचे. आडगाव नाका येथील लंडन पॅलेसमध्ये शुक्रवारी (दि. २५) हा सुरेल कार्यक्रम पार पडला.

झेप या संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनापूर्वी समूहगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शालेय वयातच विद्यार्थ्यांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असून यंदाचे पाचवे वर्ष होते. आयर्न लेडी रविजा सिंगल यांच्या हस्ते व पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच आयर्नलेडीचा किताब मिळवू शकले. विद्यार्थीदशेतही आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचे ठरेल, असे रविजा सिंगल यावेळी म्हणाल्या. झेप मंडळाचे गुरुमीत बग्गा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापौर रजना भानसी, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक शाहू खैरे, सचिन ढिकले आदी उपस्थित होते.

राज्यघटनेचे वाचन

विद्यार्थ्यांनी 'झेंडा ऊंचा रहें हमारा', 'यापुढे यशाकडे झेप घ्यायची', 'तू नव्या जगाची आशा', 'भारत हमकों जानसें प्यारा है', गीतांचे गायन केले. संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होणार झाला. यावेळी राज्यघटनेच्या उद्दिशकेचे वाचनही करण्यात आले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोफत अंत्यसंस्कार योजनेचा प्रस्ताव मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत ठेकेदार मृतांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचा आरोप सदस्यांनी केल्यानंतरही स्थायी समितीच्या सभेत मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

विशेष म्हणजे भाजपच्याच सदस्यांनी या योजनेवर आक्षेप घेऊनही त्याकडे कानाडोळा करत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, दिनकर पाटील यांच्या पत्रानुसार श्री दशनाम गोसावी समाज, महानुभाव समाज व इतर समाजांसाठी शहरात पाच ठिकाणी नव्याने दफनभूमीकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सभेत देण्यात आली.

स्थायी समितीच्या बैठकीत मोफत अंत्यसंस्कार योजनेचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्यावर मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत प्रत्येक मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी आठ मण लाकूड, पाच लिटर रॉकेल, गोवऱ्या आदी साहित्य पुरविणे अपेक्षित असताना केवळ पाच मण लाकूड, दोन लिटर रॉकेल देऊन मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार संबंधित ठेकेदारांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप समिती सदस्या शांताबाई हिरे यांनी केला. अमरधाममध्ये विद्युत दाहिनी विनावापर, तर डिझेल दाहिनी नादुरुस्त स्थितीत पडून असल्याचे उद्धव निमसे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. लिंगायत, गोसावी, नागपंथी, महानुभव समाजाकरिता दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याची नाराजी दिनकर पाटील यांनी व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी पाटील यांच्या मागणीपत्रावर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने अंमलबजावणी केली असून, दफनभूमीकरिता पाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती दिली. दफनभूमीची जागा बांधकाम विभागामार्फत विकसित करून देण्यात येत असून, नाशिक पूर्व विभागातील दफनभूमीचे कामही पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. अखेरीस सभापतींनी हिमगौरी आहेर-आडके यांनी सदरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

--------

सहा विभागांत वैकुंठ-जनाजा रथ

हिंदू समाजातील मृतदेहांसाठी महापालिकेने वैकुंठ रथ उपलब्ध करवून दिलेले आहेत. त्या धर्तीवर मुस्लिम समाजासाठीदेखील 'जनाजा रथ' उपलब्ध करून देण्याची सूचना समिती सदस्य मुशीर सय्यद यांनी मांडली. यावर सहा विभागांसाठी सहा वैकुंठ रथ व जनाजा रथ उपलब्ध करून देण्याचे आदेश सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले. त्यामुळे हिंदू, तसेच मुस्लिम बांधवांसाठी नव्याने स्वतंत्र रथ मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाण्यात शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सुरगाणा

सुरगाणा येथील पोलिस मैदानावर वीस ते बावीस हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पात्र दावेदारांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे हस्ते वनपट्यांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावित, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपविभागीय अधिकारी पंकज आशिया, तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, सभापती सुवर्णा गांगुर्डे, उपसभापती इंद्रजित गावित, नगराध्यक्ष सोनाली बागुल, जि. प. सदस्य ज्योती जाधव, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, हेमंत पाटील, नगरसेवक सुरेश गवळी, उत्तम कडू, हेमंत वाघेरे, भिका राठोड, धर्मेंद्र पगारिया आदींसह मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गावित म्हणाले, जे शेतकरी पूर्वीपासून जेवढी जमीन कसत आहे. तेवढी जमीन मिळावी अशी मागणी सरकारकडे केली होती. बारा हजार दावे पात्र झाले आहेत. त्याआधी वनखात्याने एक दोन गुंठे दिली होती. मात्र ती पूर्णपणे मिळाली पाहिजे. याआधीच्या जिल्हाधिकारींच्या कमी कार्यकाळामुळे दावे पूर्णपणे मार्गी लागत नव्हते. मात्र राधाकृष्णन बी. आल्यानंतर दावे मार्गी लागले. म्हणूनच त्यांना येथे येण्याची विनंती केली होती. याआधी एकोणीस हजार दावे पात्र झाले. आता बारा हजार पात्र झाले आहेत. अजूनही वीस हजार दावे बाकी आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. लाभार्थ्यांना पुरावे गोळा करण्यासाठी अडचणी येत होत्या. समन्वय साधून वेगवेगळे पुरावे गोळा केले. शासनाचे काम करताना कायद्याच्या पलीकडे काही करता येत नाही. ज्यांना एक दोन गुंठा मिळाली, त्यांची जीपीएस पद्धतीने मोजणी केली. ताब्याप्रमाणे शेतजमिनीची मोजणी करण्यात आल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गर्भपाताचासूत्रधार डॉक्टर ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कौळाणे येथील अवैध गर्भपात प्रकरणी मुख्य आरोपी असलेला डॉ. राहुल गोसावी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. किल्ला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मनमाड चौफुली येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुणे येथील प्रेमीयुगल २१ जानेवारी रोजी अवैध गर्भपात करून अर्भक बुजवताना आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी चौघांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता मुख्य सूत्रधार डॉ. गोसावीदेखील हाती लागल्याने अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. डॉ. गोसावीला किल्ला पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आणण्यात आले. दरम्यान अन्य एक पवार नामक आरोपीचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्कार्याचा ‘मटा’कडून विशेष सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्कार्याचे वर्तुळ रेखाटणारी व्यक्तिमत्त्वं समाजासाठी नेहमीच आदर्श ठरत असतात. या व्यक्तींच्या कार्याचा ठसा कळत-नकळत आपल्या मनावर उमटत असतो. देव, जात, धर्म यापलीकडे माणुसकी व आपल्या कर्मालाच देव मानत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सर्व समाजालाच प्रोत्साहन देणारा ठरत असतो. 'महाराष्ट्र टाइम्स'कडून समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींप्रति कायमच आदर व्यक्त करण्यात येतो. अशाच पाच समाजप्रेरकांचा 'मटा'तर्फे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला 'मटा विशेष' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

समाजातील खरे आदर्श सर्वांपुढे यावेत, या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सतर्फे 'मटा विशेष' पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यानुसार गणेश बोडके, निवृत्ती लोहोकरे, भगवान मेंगाळ, संतोष मोसे, गोविंद तुपे या पाच जणांना 'मटा'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते 'मटा विशेष' पुरस्काराने गौरविण्यात आले. संदीप सांगळे यांनी गणेश बोडके यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. गोविंद तुपे गेल्या ३१ वर्षांपासून विनामोबदला जीवरक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या अपघातांतील तब्बल सातशे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून, नदीत बुडणाऱ्या ३३ जणांना जीवदान दिले आहे. सिन्नर तालुक्यातील बेलू या गावी राहणाऱ्या तुपे यांच्या कुटुंबाची शेतीवरच उपजीविका आहे. त्यांच्या या कार्याला राष्ट्रपतिपदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. गणेश बोडके, निवृत्ती लोहोकरे, भगवान मेंगाळ, संतोष मोसे या चौघा गँगमनच्या सतर्कतेमुळे मध्य रेल्वेच्या इगतपुरी-घोटी मार्गादरम्यान होणारा मोठा अपघात टळला. शेकडो व्यक्तींचे प्राण त्यामुळे वाचले. मुंबई एलटीटी-राजेंद्रनगर जनता एक्स्प्रस्च्या मार्गावर कडाक्याच्या थंडीमुळे दोन ट्रॅकवर वेगवेगळ्या ठिकाणी रुळांना तडे गेले होते. गस्ती घालताना गँगमनच्या या दोन पथकांच्या वेळीच ते लक्षात आल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी टळली. त्यांच्या या सतर्कतेचे मोठे कौतुक झाले. या पाचही जणांना 'मटा'च्या वतीने गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थी म्हणतात....

'मटा'चे अनमोल सहकार्य आम्हाला नेहमीच लाभले आहे. आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही 'मटा'चे आम्ही आभारी आहोत.

-गोविंद तुपे


मटा विशेष पुरस्कार हा माझा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे विशेष आनंदाचा हा क्षण असून, त्यामुळे आणखी चांगले कार्य करण्याचे बळ मिळाले आहे.

-निवृत्ती लोहोकरे


आमच्या कार्याची दखल घेतली जाते, याचे मोठे समाधान आहे. नाशिकचे नाव 'मटा'ने नेहमीच उंचावले आहे. या पुरस्कारातून आमच्या कार्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे.

-भगवान मेंगाळ


समाजापर्यंत आमचे कार्य पोहोचत आहे, याचा आनंद आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन ते सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'मटा'ने दखल घेतली याचे समाधान वाटते.

-संतोष मोसे

समाजात चांगले कार्य घडण्यासाठी प्रोत्साहन मिळणेदेखील गरजेचे असते. या पुरस्काराच्या माध्यमातून ते निश्चितच मिळत आहे.

-गणेश बोडके


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर क्राईम आटोक्यात; सोशल क्राईमला गती

$
0
0

पोलिस आयुक्तांनी मांडला वार्षिक गोषवारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाने २०१८ या वर्षात गंभीर वा मालमत्तेचे गुन्हे, गुन्हे शोध आणि गुन्हे सिद्धता अशा प्रमुख घटकांमध्ये बाजी मारली. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवताना यश मिळविताना पोलिसांना सोशल गुन्हेगारीच्या घटनांनी त्रस्त केले. जीवघेण्या अपघातात झालेली वाढ सुद्धा पोलिसांसह शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी २०१८ या वर्षातील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडला. २०१७ या वर्षाच्या तुलनेमध्ये गतवर्षी २०५ गुन्ह्यांची नोंद अधिक नोंदली गेले. मात्र यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, दुचाक्‍या चोऱ्या, सोनसाखळ्या चोऱ्या या गुन्हेगारी स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. दंगल, विनयभंग, मुलां मुलींना पळवून नेणे (अपहरण), घरगुती वादावादी यासारख्या सामाजिक गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. एकाच मुलीने तीनदा घर सोडले. प्रत्येकवेळी अपहरणासारखा गुन्हा नोंदविण्यात आला. अशा मुला-मुलींची संख्या १० च्या पुढे निघाली. बलात्काराच्या प्रकारणात सुद्धा अशा काही तांत्रिक बाबी तपासात समोर आल्यात. अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत पोलिस आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. हत्या, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांपेक्षा रस्ते अपघातांत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची अनेकपट अधिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला. २०१८ मध्ये शहर पोलिस दलाने गुन्ह्यांचा तपास लावण्याकडे गांर्भीयाने लक्ष दिले. त्यामुळे अनेक परराज्यातील टोळ्या जेरबंद झाल्या. यामुळे घरफोडी, चेन स्नॅचिंग यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना पायबंद बसला. याच काळात पोलिस दलातील काही झारीतील शुक्राचार्य समोर आले. त्यांच्यावर शक्य ती कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये वाहतूक, सोशल गुन्हेगारी याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेसाठी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

दोष सिद्धीत नाशिक दुसरे

गुन्हेगारास शिक्षा होणे हेच पोलिस यंत्रणेचे यश मानले जाते. २०१८मध्ये शहर पोलिसांनी यात बाजी मारली. तब्बल ८०.६७ टक्के गुन्हे सिद्ध झाले असून, राज्यात नाशिकचा दुसरा क्रमांक लागला आहे. गंभीर म्हणजे सात वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा होऊ शकतील अशा सेशन गुन्ह्यांत हे प्रमाण २९.८८ टक्के इतके आहे. २०१७ च्या तुलनेत यात चार टक्के वाढ झालेली दिसते.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये हे प्रमाण ५७.४२ टक्के इतके राहिले. सेशन गुन्ह्यात २०१७ मध्ये हे प्रमाण २५.७४, २०१६ मध्ये २१.५७, २०१५ मध्ये १५.५८ तर २०१४ मध्ये हे प्रमाण अवघे ९.४० इतके होते. जेएमएफसी कोर्टात २०१७ ते २०१४ या कालावधीत उतरत्या क्रमाने ४३.४७, ३९.५८, २५.३१ तर ३२.१० असे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images