Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोकाभिमुख प्रशासन संहिता बासनात!

$
0
0

Gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक : सर्वसामान्यांचे प्रशासकीय काम सुलभतेने मार्गी लागावे यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये २००३ मध्ये लागू करण्यात आलेली लोकाभिमुख प्रशासन संहिता बासनात गुंडाळली गेल्याची बाब समोर आली आहे.

सेवा हमी कायद्याचा डांगोरा सध्या पिटला जात असला, तरी सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी ही संहिता लागू केली होती. दुर्दैवाने या संहितेची अंमलबाजवणीच झालेली नाही. त्यामुळे आजही सर्वसामान्यांवर महसूल विभागात वारंवार चकरा मारण्याची वेळ येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २००३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी झगडे यांनी लोकाभिमुख प्रशासन संहिता जारी केली होती. या संहितेत आपण समाजात चांगले कार्य घडवू शकतो, ती आपली जबाबदारी आहे. त्यांना उपयोगी पडतील असे कार्य केले पाहिजे, असे म्हटलेले होते. जनतेची कामे गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला होता. त्यात कृती कार्यक्रमही देण्यात आला होता. ग्रामपातळीवर तलाठी, तालुका पातळीवर तहसीलदार, उपविभागीय पातळीवर प्रांत व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्यावरील जबाबदारी निश्चित केली होती. त्यामुळे लोकांची कामे तालुकास्तरावर झाल्यास त्यांना जिल्ह्याची ठिकाणी येण्याची गरज पडू नये, हा हेतू यामागे होता. सर्व वैधानिक कामांची परिणामकरीत्या अंमलबजावणी झाल्यास नागरिकांना तक्रार करण्याचे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे त्यात अभिप्रेत होते. तक्रारींचे निराकरणसुद्धा अतिजलद होणे हे जबबादार प्रशासनाचे प्रमुख अंग आहे. त्यामुळे ही संहिता लागू करण्यात आली होती.

--

या ठळक बाबींचा समावेश

महसूल खात्यातील तक्रार निवारण करण्याचा तक्ताही या संहितेत तयार करण्यात आला होता. त्यात संबंधित पातळीवरील जबाबदार अधिकारी कोण, याची माहिती देण्यात आली होती. त्यात तक्रार निवारण अधिकारी व तक्रारीचे अनुषंगाने अपिल प्राधिकारी यांची माहिती होती. कोणता अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्यासाठीचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावेत आदी सूचनाही करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहणे आवश्यक असल्याचेही म्हटले होते.

--

नाशिकमध्ये २००३ मध्ये लोकाभिमुख प्रशासन संहिता लागू केली. त्यानंतरही जेथे मी जिल्हाधिकारी होतो तेथेही ती लागू केली. पुणे, सोलापूरबरोबरच इतर ठिकाणी त्याचे परिणाम दिसून आले. त्यामुळे लोकांची कामे तातडीने होण्यास मदत झाली. या संहितेची अंमलबजावणी आजही होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, याचे वाईट वाटते.

-महेश झगडे, तत्कालीन जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवनखेड ग्रामपंचायतीला स्वच्छ ग्राम पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीला प्रजासत्ताकदिनी (दि. २६) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिक विभागात या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे (१० लाख रुपयांचे) पारितोषिक पटकावले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीची सन्मान करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी सकाळी सव्वा नऊ वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिकासाठी अवनखेड ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक आणि चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी या ग्रामपंचायतींना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील वडनेरला तिसऱ्या क्रमांकाचे सहा लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. पोलिस महासंचालकांनी जाहीर केलेल्या सुरक्षा सेवा पदकासाठी सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांची निवड झाली आहे. विशेष सेवा पदकाने मालेगाव किल्ला पोलिस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव पठारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील अधिकारी दीपक गिऱ्हे, विजयकुमार चव्हाण, सुनील गोसावी, पुरूषोत्तम पाटील यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. शशांक वझे यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार तर मंगला शिंदे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सागर नागरे, सायली सूर्यवंशी यांना गुणवंत खेळाडू पुरस्काराने तर गौरव लांबे, सुश्मिता पवार यांना खेळाडू थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक आर्ट फेस्ट’मध्ये हरखले नाशिककर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्लोक, अलारिपू, जतिस्वरम्, गीतम्, कीर्तनम्, पदम् आणि तिल्लाना या भरतनाट्यम नृत्यशैलीतील सादरीकरणाला नाशिककरांची मिळणारी दाद. भरतनाट्यमसह पाश्चिमात्य गाण्यांच्या तालावर सादर होणारे एकाहून एक सरस कलाविष्कार. तसेच प्रत्येक बहारदार सादरीकरणाने कलाकारांनी रसिकांवर टाकलेली मोहिनी, अशा उत्साहाच्या वातावरणात अन् एक ना अनेक कलाकृतींनी भरलेल्या नाशिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिककर रमले.

'टॅलेंट ऑफ नाशिक'तर्फे 'नाशिक आर्ट फेस्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या फेस्टचे तिसरे वर्ष आहे. बापू पूलाजवळील गोदा पार्क येथे हा फेस्ट २४ ते २७ जानेवारी या कालावधीत होणार असून, विविध कलाविष्कारांची मेजवानी यामध्ये नाशिककरांना मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता या फेस्टला प्रारंभ करण्यात आला. या फेस्टमध्ये प्रवेश करताच आकर्षक रांगोळीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत फेस्टमध्ये सादर झालेला रॉक बॅण्ड परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य गायन या कलांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी तरुणांनी गर्दी केली होती. फेस्टमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. गायनापासून तर शिल्पकलेपर्यंत सर्वच कलागुणांचा या फेस्टमध्ये सहभाग तरुणांना आकर्षिणारा ठरला. शुक्रवारी फेस्टमध्ये नवोदित कलाकारांनी कलांच्या पाश्चिमात्य छटा सादर केल्या. शनिवारी व रविवारी सायंकाळी ५ ते रात्री १० यावेळेत विविध कलांचे बहारदार सादरीकरण त्यासह चित्रकला, रांगोळी व फोटोग्राफी यांच्या कार्यशाळा आणि प्रदर्शन या फेस्टमध्ये होणार आहे. नाशिककरांनी फेस्टमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील दोघांना राष्ट्रपतिपदक

$
0
0

नाशिक : प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना मानाचे राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख जाकीर गुलाम हुसेन आणि सहायक उपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते अशी पुरस्कारयादीत झळकलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या संदर्भातील यादी दुपारच्या सुमारास जाहीर करण्यात आली. उपनिरीक्षक शेख सध्या इंदिरानगर, तर मोहिते भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी परतली; नाशिक @ ९.२

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात थंडी परतली असून, शुक्रवारी किमान तापमान ९.२ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवू लागल्याने आरोग्याच्या तक्रारींचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. या आठवड्यात किमान तापमान सात अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. संक्रांतीच्या दरम्यान वातावरणातील गारवा कमी होत गेला. परंतु, आता तो वाढू लागला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कमाल तापमान २६.६ अंश सेल्सियस तर किमान तापमान ९.२ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. त्यामुळे दिवसभर वातावरणातील हवेत प्रचंड गारवा असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतिपदक जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना मानाचे राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. यासंदर्भातील यादी दुपारच्या सुमारास जाहीर करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक शेख जाकीर गुलाम हुसेन आणि सहायकउपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते या दोघांना राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. उपनिरीक्षक शेख सध्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. १९८५ मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या शेख यांनी नाशिक शहरातील नाशिकरोड, पंचवटी, देवळाली कॅम्प, यानंतर सिन्नर या पोलिस ठाण्यांमध्ये काम पाहिले आहे. टिप्पर गँगसह इराणी गँगला पकडण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा देऊन ते उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले. ३३ वर्षांच्या सेवा कालावधीत वेळोवेळच्या कामगिरीमुळे त्यांना ४५० बक्षिसे मिळाली. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपतिपदक मिळाले आहे. सहायक उपनिरीक्षक विलास मोहिते सध्या भद्रकाली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शहर पोलिस दलात त्यांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. या दोघांच्या नावाची घोषणा होताच आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, सर्व सहायक आयुक्त, निरीक्षक नारायण न्याहाळादे, मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोक्सीचा २४ बँकांना गंडा

$
0
0

नाशिकच्या कंपनीवर तब्बल ३८१० कोटींचे कर्ज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याने नाशिकमध्येही नाशिक मल्टी ट्रेड सर्व्हिसेस सेझ लिमिटेड ही सहयोगी कंपनी स्थापन करून २४ बँकांकडून तब्बल ३ हजार ८१० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यासाठी गहाणखत आणि करारनामेही करण्यात आले असून त्यात अॅक्टिंग ट्रस्टी म्हणून आयडीबीआय ट्रस्टशिप सर्व्हिसेस कंपनीचे नाव आहे. त्यामुळे या सरकारी कंपनीवर या कर्जाचा भार येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सी याने स्थापन केलेल्या या सहयोगी कंपनीत अनेक बनावट कंपन्या असून त्यातील ९ सहयोगी कंपनी व उपकंपन्याचा पत्ता एकच आहे. त्यातील २० कंपन्यामधील एकच ट्रस्टी अनेक कंपन्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जानी यांनी केली. नाशिक मल्टी ट्रेड सर्व्हिसेस सेझ लिमिटेड कंपनीने इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे बळवंतनगर येथील जागा आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवली होती. पण, कर्ज थकल्यामुळे बँकेने नॅशनल कंपनी ट्रिब्युनलमध्ये दावा दाखल करून सदर जागेचा ताबा मिळवला. तसेच ही जागा एसबीआय बँकेकडे गहाण ठेवल्याचेही कंपनीच्या २०१५ च्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. ५.०३ हेक्टर असलेल्या या जागेतून वर्किंग कॅपिटलची सवलत मिळवण्यात आली. त्यानंतर ५२ कोटी चार्जेस रजिस्टार ऑफ कंपनीकडे वर्ग केले. तसेच अतिरिक्त ८४.१३ एकर जमीन गहाणखतासाठी देऊन ३२८० कोटीचे वर्किंग कॅपिटल घेण्याची कंपनीची तयारी होती. पण, त्याचे कागदपत्र तयार झाले नसल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटल्याचेही जानी यांनी सांगितले.

सेझमध्ये जमीन मंजूर

केंद्राच्या वाणिज्य विभागाने गितांजली जेम्स लिमिटेडलाला सेझमधून नांदेड येथे जेम्स व ज्वेलरीसाठी ५० हेक्टर, औरंगाबाद येथे १०२ हेक्टर, नागपूर येथे मल्टी प्रॉडक्टसाठी १००० हेक्टर, नाशिक येथे मल्टी सर्व्हिसेसाठी १०० हेक्टर जागा मंजूर केल्याचे म्हटले आहे. पण, त्याचे पुढे काय झाले, याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचेही जानी यांनी सांगितले.

मेहुल फरार; संचालक मोकाट

मेहुल चोक्सी फरार आहे. परंतु, त्याला आर्थिक गुन्ह्यात साथ देणारे संचालक अजूनही मोकाट आहे. गितांजली जेम्सच्या संयोगी व उपकंपन्यांनी हजारो कोटीचे कर्ज, लेटर ऑफ क्रेडिटची सुविधा घेतलेली आहे. त्यावर अद्याप काहीही कारवाई झाली नाही. चोक्सीचा घोटाळा पंजाब नॅशनल बँक पुरता मर्यादित नाही. तर सरकारी, पीएसयू बँके यात सामील आहे.

बँकेतील डिपॉझिटमध्ये जनतेचा पैसा आहे. त्याला भविष्यात बाधा निर्माण होणार नाही. यासाठी काळजी सरकार, रिझर्व्ह बँकेने घ्यावी, 'ईडी'ने दोषींवर त्वरित कारवाई करावी.

- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत रविवारी पोटनिवडणूक

$
0
0

दिंडोरी : येथील नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र १५ च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दि.२७ रोजी मतदान होत असून काट्याची तिरंगी लढत होत आहे. मनसेचे नगरसेवक सुनील भवर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. सुनील भवर यांचे पुत्र धनराज भवर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यात अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसेने उमेदवार न देता भवर यांना पुरस्कृत केले आहे. स्वतंत्र मजदूर संघाने भवर यांना पाठिंबा दिला आहे. तर भाजपने राकेश गुलाब गांगोडे यांना तर शिवसेनेने श्रीकृष्णा बाळू शेवरे यांना मैदानात उतरवले आहे. तिनही उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचत मताचे दान मागत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून नेतेही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली असून, रविवारी मतदान तर सोमवारी मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उघड्यावर मांसविक्रीला प्रतिबंध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध घालण्यासह मांसविक्रीसाठी स्वतंत्र परवाना धोरण ठरवण्याचा निर्णयाला स्थायी समितीने दुरुस्तीसह मंजुरी दिली. त्यामुळे शहरात आता बंदिस्त ठिकाणीच मांसविक्रीला परवानगी मिळणार असून, उघड्यावर मांसविक्री केल्यात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कत्तलखान्यांच्या ठिकाणीच मांसविक्री व्हावी, अशा सूचना सदस्यांनी केल्या आहेत. त्यानुसार शहरातील सहा विभागांत कत्तलखाने सुरू करण्याचे आदेशही स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका कार्यक्षेत्रात मांस, चिकन, मासळी विक्री दुकानांना व खाटिक व्यवसाय करीत असलेल्या व्यक्तांनी परवाना देण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला आला. स्थायीच्या सदस्यांनी विषय समजून न घेताच या विषयाला विरोध करण्यास सुरुवात केली. शहरात उघड्यावर मांसविक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे धोरण राबवू नये, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली. अगोदरच मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यात उघड्यावर मांसविक्रीला परवानगी दिल्यास त्रास वाढेल, अशी मागणी केली, तर उद्धव निमसे यांनी बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री व्हावी, अशी मागणी केली. रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये मांसविक्रीला परवानगी न देता ज्यांच्याकडे गाळा असेल व परवाना असेल त्यांनाच परवानगी देण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी या प्रस्तावाचे जोरदार समर्थन करीत कत्तलखाने वाढविण्याची मागणी केली. शहारातील ६० ते ७० टक्के जनतेशी निगडित हा विषय आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यत या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. स्मार्ट सिटीत कत्तलखाने वाढविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. भागवत आरोटे यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध करीत मांसविक्री बंदिस्त ठिकाणीच व्हावी, अशी मागणी केली. उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली, तर संतोष साळवे यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. संगीता जाधव, सुषमा पगारे यांनी प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे दिनकर पाटील यांनी सदरचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोध कायम ठेवला. परंतु, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सदरचा प्रस्ताव बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्यासाठी धोरण ठरविण्याचा असल्याचे सांगत उघड्यावर मांसविक्री होणार नाही, अशी ग्वाही सदस्यांना दिली. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, तसेच अन्य महापालिकांप्रमाणेच मांसविक्रीचे नियमन करता यावे यासाठी प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले.

परवाना राहणार बंधनकारक

आयुक्तांप्रमाणेच अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनीही उघड्यावर मांसविक्री होऊ नये यासाठी हा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती आहेर-आडके यांनी सदरच्या प्रस्तावात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करीत बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्याच्या धोरणाला मंजुरी दिली, तसेच शहरात सध्या पूर्व आणि सातपूर या दोन विभागांतच कत्तलखाने असून, त्यात सातपूरचा कत्तलखाना बंद आहे. त्यामुळे सहा विभागांत कत्तलखाने कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. स्थायीच्या मंजुरीनंतर आता महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांसविक्री बंद होणार असून, मांसविक्रीसाठी शुल्क भरून महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक राहणार आहे.

-----

याप्रमाणे होणार शुल्क आकारणी

--

प्रकार शुल्क (रुपयांत)

--

मांस व चिकन एकत्रित विक्री परवाना - ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना- २५००

मांस विक्रीसाठीचा व्यक्तिगत परवाना- ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन गोवर्धन अनुभवण्याची संधी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची कधीकाळी मुख्य बाजारपेठ अन् जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे गोवर्धन गाव! सातकर्णीने महाराष्ट्र परकीयांच्या हातून मुक्त करण्यासाठी नहापानाशी गोवर्धन परिसरात युद्ध केले, या आठवणींना आजही पांडवलेणी साक्ष आहे. या प्राचीन गावाची सफर करण्याची संधी रविवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'मटा हेरिटेज वॉक'च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. गोवर्धन, गंगापूर व जलालपूर या तिन्ही गावांची सफर हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहे.

पांडव लेण्यातील शिलालेखांमध्ये गोवर्धनचा उल्लेख मिळतो. यातून गोवर्धन गावाला दोन हजार वर्षांचा इतिहास असल्याचेही स्पष्ट होते. गोवर्धन जिल्ह्याचे ठिकाण असल्याचा उल्लेखही अनेक ठिकाणी मिळतो. आंध्रभृत्य नावाच्या दिवाणाचे गोवर्धन मुख्य ठिकाण होते. पांडवलेणी कोरताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात महसूल व दाने याच गावातून व्यापारी मंडळींकडून मिळाल्याचा उल्लेखही आहे. सातवाहन व नहापान युद्धानंतर गोवर्धनचे नशीब पालटले. नाशिकचं जनअस्तित्व निर्माण होण्यापूर्वी गोवर्धन गावाने जगभरात आपले स्थान निर्माण केले होते. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही गोवर्धन, गंगापूर परिसरात पहायला मिळतात. हा रोमांच अनुभवण्यासाठी मटा हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या सफरीत ज्ञानसाधना शिक्षण प्रसारचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व अॅड. सुदर्शन पाटील आपल्याला गावची माहिती देणार आहेत.

हेरिटेज वॉकमध्ये काय पाहाल?

गोवर्धन गावातील ११ किंवा १२ व्या शतकातील गोवर्धनेश्वराचे महादेव मंदिर आहे. त्याच्या शेजारीच बाणेश्वराचे पेशवेकालीन मंदिर आहे. बाणेश्वर मंदिरासमोर सुंदर घाट पेशवाईतील वैभवाची आठवण करून देतो. गोवर्धनच्या प्राचीन बाजारपेठेचे ठसे आजही पहायला मिळतात. ही बाजारपेठ सध्या गंगापुरात पेठगल्ली म्हणून अनुभवता येते. गावातील देवीचे मंदिर अनोखी परंपरा उलगडते तर पाटील वाडा, पंचवाडा, सोनवणी वाडा, देशपांडे वाड्याच्या रुपाने अनोखा इतिहास अनुभवता येतो. जलालपूरचे वैभव असलेले वऱ्हारेश्वराचे सुंदर मंदिर, दगडी कारंजे अन् पहिल्या मराठी महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणी या हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहेत.

नावनोंदणी आवश्यक

गोवर्धन गावातील मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसमोर सकाळी ८.५० वाजता एकत्रित जमायचे आहे. वॉक ९ वाजता सुरू होईल व साडेअकराला संपेल. नावनोंदणीसाठी रमेश पडवळ (८३८००९८१०७) यांच्याकडे आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या व्हॉटस् अॅप करावी.

लोगो : मटा हेरिटेज वॉक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल ऑपरेटरसाठी डिजिटल कंट्रोल रूम

$
0
0

शेअर घेण्याचे असोसिएशनतर्फे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा केबल ऑपरेटर्स असोसिशनच्या वतीने जिल्हाभरातील केबल व्यावसायिकांसाठी 'ना नफा ना तोटा' तत्वावर अद्ययावत डिजिटल कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी असोसिएशनने शेअर्स फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ग्राहकांच्या व स्वत:च्या फायद्यासाठी केबल व्यावसांयिकांनी शेअर फॉर्म भरून सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.

'ट्राय'ने जाहीर केलेली नवीन नियमावली आणि एमएसओंच्या जाचक अटी यामुळे केबल ऑपरेटर व ग्राहकांवर मासिक शुल्काचा अतिरिक्त भार पडणार आहे. हा भार कमी करण्यासाठी असोसिएशनने धडपड सुरू केली आहे. 'ना नफा-ना तोटा' या सहकारी तत्वावर शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वत:चा अद्ययावत डिजिटल कंट्रोल रूम सुरू करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. त्यासाठी असोसिएशनने शेअर फॉर्म बनविले असून ते भरून घेण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन केबल ऑपरेटर्सने शेअर फॉर्म भरून द्यावेत व स्वत:चा व ग्राहकांचाही फायदा करावा, असे आवाहन विनय टांकसाळे आणि संजय गुजराणी यांच्यासह असोसिएशनने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळ्यात कांदामाळा, सरकारविरोधी आवळला गळा

$
0
0

निफाडला स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे ऐवजी पाचशे ते सहाशे रुपये अनुदान द्यावे, दोन हजार रुपये हमी भावाने कांदा खरेदी करावा, निफाड व रानवड साखर कारखाने सुरू करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी आसूड मोर्चा काढला. निफाड तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली.

मोर्चाप्रसंगी युवा स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. उन्हाळ कांद्याच्या पाठोपाठ लाल कांदाही मातीमोल बाजार भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. तोटा सहन करून कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न बळीराजा पुढे उभा आहे. मात्र सरकार कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये अनुदान द्यावे, तसेच दोन हजार रुपये हमी भावाने कांद्याची खरेदी करावी अशी मागणी वडघुले यांनी केली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २८ फेब्रुवारी रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही वडघुले यांनी सांगितले. निफाड येथील मार्केट कमिटी आवारातून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. साहेबराव मोरे, संदीप जगताप, सोमनाथ बोराडे, सुधाकर मोगल, संजय पाटोळे आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे आर्किटेक्चर कॉलेजने उमटविला ठसा

$
0
0

रौप्य महोत्सवी वर्धापनदिनी मंत्री रावल यांचे गौरोवोद्गार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय डॉ. बळीराम हिरे यांनी स्थापन केलेल्या आर्किटेक्चर कॉलेजने गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठस्तरावर जसा आपला स्वतंत्र ठसा उमटवला; तसाच वास्तुशास्त्रातही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकीक निर्माण केला. स्वर्गीय डॉ. हिरे यांच्या कार्यकर्तुत्वाप्रमाणे संस्थेचा लौकिकही असाच वृद्धिंगत होत जावो, अशा शुभेच्छा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

मुंबई बांद्रा येथील डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात मंत्री रावल बोलत होते.

व्यासपीठावर आर्किटेक्चर कौन्सिलचे अध्यक्ष आर्कि. विजय गर्ग, कलाभूषण पुरस्कार विजेते गायक श्रीकांथन नारायणन, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे, संस्थेच्या विश्वस्थ तथा समन्वयक गीतांजली हिरे, प्राचार्य आर्कि. सुनील मगदुम, युवानेते परीक्षित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

रावल यांनी आपले आजोबा दादासाहेब रावल व डॉ. हिरे यांच्या मैत्रीपूर्ण स्नेहसंबंधाचा उल्लेख करून हिरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वाटचालीत आपले सदैव सहकार्य असेल अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे म्हणाले, महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी विद्यापीठात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध, पुस्तक प्रकाशन, डॉक्युमेंटरी प्रेझेंटेशन, 'मिराकी २०१७' या आंतरराष्ट्रीय परिषदेचेही यशस्वी आयोजन केले. विजय गर्ग यांनी मार्गदर्शन केले. गायक श्रीकांथन नारायणन यांनी गीतगायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी 'पॉईंट-२०१९' या वार्षीक नियतकालिकांचे व ई-मॅगेझिनचे प्रकाशन आणि वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रणव भट, अनिल गांधी, परेश कपाडीया, अनिल परब, टी. आर. वेंकटरमण, सुलभा, उमेश मोरे, नाना अहिरे, सुनील खैरनार, हेमंत वाघ, तानाजी सुतार, दीपक जाधव आदींना महाविद्यालयाच्या २५ वर्षातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंदे दुमालातबिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील तानाजी पारू नाठे यांच्या मळ्यात अनेक दिवसांपासून दर्शन देणाऱ्या बिबट्या सोमवारी (दि. २८) पहाटे वनविभागाने लावलेल्या पिजऱ्यात जेरबंद झाला.

गेल्या दोन महिन्यांपासून गोंदे दुमाला येथील नाठे मळ्यातील वस्तीवर हा बिबट्या अनेकांच्या निदर्शनास आला असून, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येथील भाऊसाहेब जाधव यांचे एक पारडू तर तानाजी नाठे यांच्या गायीचे वासरू त्याने फस्त केले होते. शिवव्याख्याते विनोद नाठे यांनी याबाबत माहिती दिली. या परिसरात अजुनही बिबट्याचे दोन बछडे असल्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाठे वस्तीवर पिंजऱ्यात पकडण्याची बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरताच येथील औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. सदर बिबट्या जाधव वस्ती, मुकणे धरण परिसर, तसेच नाठे यांच्या मळ्यामध्ये सतत निदर्शनास येत होता. या वस्तीवर अनेक शेतकऱ्यांच्या म्हशी, गायी, शेळ्या, मेंढ्या तसेच लहान मुले देखील असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी विनोद नाठे, वनविभागाचे देशपांडे, श्रीमती पवार, साबळे, बाळू पागेरे, भगवान नाठे, गणेश वाजे, आदींसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यू पत्करला; हेल्मेट नाही!

$
0
0

९१ टक्के दुचाकीस्वारांची हेल्मेटला नकारघंटा

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहरात दुचाकीस्वारांची संख्या लाखोंच्या घरात असून, वर्षागणिक त्यात वाढ होते आहे. सुरक्षेसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या हेल्मेटकडे मात्र ९१ टक्के दुचाकीस्वार दुर्लक्ष करतात. हेल्मेटचा प्रभावी वापर होत नसल्याने एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दुचाकीस्वारांची संख्या तब्बल ५८ टक्क्यांपर्यंत आहे.

शहरात २०१६ मध्ये विविध अपघातांमध्ये २१३ जणांचा बळी गेला होता. २०१७ मध्ये हे प्रमाण घटून १७१ इतके झाले होते. गतवर्षी यात आणखी घट अपेक्षित असताना बळींची संख्या मात्र २१७ इतकी झाली. २०१८ मध्ये जीवघेण्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २१७ पैकी ५८ टक्के म्हणजे १२६ व्यक्ती या दुचाकीस्वार होत्या. यानंतर सर्वाधिक बळी हे पादचाऱ्यांचे गेले. २०१८ तब्बल ५९ व्यक्ती रस्ता ओलंडताना किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असताना वाहनांच्या खाली सापडलेत. १२६ पैकी ९१ टक्के म्हणजे ११२ दुचाकीस्वारांनी अपघातावेळी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. तर, १४ व्यक्तींचा हेल्मेट असताना मृत्यू झाला.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की शहरात हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांपेक्षा रस्त्यावर बळी जाण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यापुढेही हे प्रयत्न सुरू राहतील. पण, दुचाकीस्वारांनी सुद्धा आपल्या जीवाचे मोल ओळखयला हवे. मृत्यूमुखी पडलेल्या ११२ पैकी निम्याहून अधिक दुचाकीस्वारांकडे हेल्मेट असते तर हा आकडा निश्चित कमी झाला असता. यात बहुतांश तरुणांचा सहभाग आहे, हे अधिक गंभीर. तसेच सीट बेल्टकडे होणारे कारचालकांचे दुर्लक्ष देखील महत्त्वाचे ठरते. २०१८ मध्ये १५ कारचालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकानेही सीट बेल्टचा वापर केलेला नव्हता. प्राणांतिक अपघातांमध्ये होणारी वाढ आणि हेल्मेट वापराकडे होणारे दुर्लक्ष याकडे वाहतूक शाखेचे विशेष लक्ष राहणार असल्यात्ही त्यांनी सांगितले.

..

२०१८ मधील जीवघेणे अपघात

प्रकार.........बळी संख्या

दुचाकी - १२६

चारचाकी - १५

पादचारी - ५९

सायकलस्वार - ६

इतर - ११

एकूण मृत्यू - २१७

..

वर्ष जीवघेणे अपघात मृत्युमुखी गंभीर जखमी एकूण अपघात

२०१२ १६५ १७५ ५५६ ६०८

२०१३- १२६ -१३० -५७२ -६०५

२०१४- १६८ -१७४ -४४६ -५४९

२०१५- २२५ -२३४ -३९९ -६१८

२०१६- २०३ -२१३ -३५१ -६२८

२०१७- १५८ -१७१ -३९० -५०३

२०१८- २०९ -२१७ -३९६ -५८०

एकूण- १२५४ -१३१४ -३११० -४०९१

..

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणवाड्यांना ‘आधार’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्याचा दबाव वाढवल्यानंतर विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत मधला मार्ग काढला आहे. अंगणवाड्यांची पटसंख्या तपासण्यासाठी तसेच बनवेगिरी रोखण्यासाठी यातील बालकांची आधारनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. यानंतर अंगणवाड्यांतील पटसंख्या निश्चित केली जाणार आहे.

महापालिका हद्दीत सध्या २७७ अंगणवाड्या अस्तित्वात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात ४१३ अंगणवाड्या सुरू असतानाच, तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पटसंख्या कमी असल्याचे कारण देत, तब्बल १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अंगणवाड्यांमध्ये पाच ते दहाच मुले आढळून आली होती. एकाच बालकाचे नाव अनेक अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे या सर्वेक्षणाचा आधार घेत, मुंढे यांनी एका फटक्यात १३६ अंगणवाड्यांना टाळे लावून त्यातील मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरीत केले होते. सरकारी निकषांनुसार चार हजार लोकसंख्येला एक अंगणवाडी आवश्यक असते. परंतु, शहराची २० लाख लोकसंख्या लक्षात घेत नियमानुसार १२४० अंगणवाड्यांची आवश्यकता असतानाही, मुंढे यांच्या निर्णयाविरोधात पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी रान पेटवले होते. या अंगणवाड्यांमधील २७२ सेविका-मदतनिसांचे पुनर्वसन न करता कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. तीन महासभांमध्ये यावर चर्चा झाली. अंगणवाडीतील पटसंख्या वाढविण्यासाठी सहा महिने संधी द्यावी व त्यानंतर पटसंख्या न वाढल्यास बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असाही निर्णय झाला. मात्र मुंढे भूमिकेवर ठाम राहीले होते.

आता मुंढे यांच्या बदलीनंतर सत्ताधारी भाजपने नूतन आयुक्तांकडे या अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. १० डिसेंबर १९९३ मधील ठरावानुसार अंगणवाडी पटसंख्या किमान ४० असणे अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या वेळी ही ४० पटसंख्या दाखविण्यासाठी एकाच बालकाचे नाव दोन ते तीन अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे पटसंख्या फुगवून अंगणवाडी चालवली जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे आयुक्तांनी यातून मार्ग काढत आता पटसंख्या मोजण्यासाठी अंगणवाडीमधील बालकांना आधार नोंदणीची सक्ती केली आहे. बालकांचे आधार कार्ड काढण्यात येणार असून, ते अंगणवाड्यांना लिंक केले जाणार आहे. त्यानंतरच गरज पडल्यास पटसंख्या जास्त असल्यास नव्याने अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

मागीतले ३०, मिळाले ६ युनिट

महापालिकेने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आधारनोंदणीसाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० युनिटची मागणी केली आहे. पालिकेत सध्या सहा विभागांत सहा आधारकार्ड नोंदणीचे युनिट सुरू आहेत. परंतु, ते पुरेसे नसल्याने अधिकचे ३० युनिट देण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सहा युनिटच पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे बालकांच्या आधार नोंदणीची मोहीम आणखी लांबणीवर पडणार आहे. अधिकचे युनिट मिळावेत असा आग्रह पालिकेने धरला आहे.

सत्ताधाऱ्यांना झटका

मुंढे गेल्यानंतर आलेले नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे बंद पडलेल्या १३६ अंगणवाड्या पुन्हा सुरू करतील, अशी सत्ताधारी भाजपची अपेक्षा होती. परंतु, मुंढे यांचा निर्णय हा सर्वेक्षणानंतरच घेतलेला असल्याने तो फिरवण्याऐवजी गमेंनी आधार नोंदणीचे आदेश देऊन भाजपलाच झटका दिला आहे. या आधारनोंदणीमुळे अंगणवाड्यांमधील पटसंख्येची बोगसगिरी उघड होणार असून, खरी आकडेवारी समोर येणार आहे. या सर्वेक्षणात पटसंख्या वाढली तर निर्णय घेऊ असे सांगत, गमे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदू असल्याने माझ्यावर टीका’

$
0
0

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या अमेरिकी काँग्रेसच्या खासदार तुलसी गब्बार्ड यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गब्बार्ड हिंदू राष्ट्रवादी असल्याची टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गब्बार्ड यांनी टीकाकार दुटप्पी असल्याचे म्हटले आहे. आपल्या अमेरिकेबद्दलच्या कटिबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक बिगर हिंदू नेत्यांवर प्रश्नचिन्ह लावत नाहीत. हा दुटप्पीपणा असल्याचे गब्बार्ड यांनी म्हटले आहे. ३७ वर्षीय गब्बार्ड यांनी अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे ११ जानेवारीला जाहीर केले होते. हिंदू राष्ट्रवादी असल्याची टीका माझ्यावर होते आहे. उद्या ती मुस्लिम किंवा ज्यू अमेरिकींबद्दल असेल? जपानी, हिस्पॅनिक किंवा आफ्रिकन अमेरिकींबद्दल असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारपार’साठी एल्गार रॅली

$
0
0

मनमाड : 'नार-पार'च्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, तसेच माणिकपुंजचे पाणी

प्राधान्याने नांदगाव तालुक्यासाठीच मिळावे, या मागण्यांसाठी येत्या एक फेब्रुवारी रोजी नांदगाव येथे शेतकरी व जनतेची एल्गार रॅली काढण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकरी, मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार असल्याचे नांदगाव तालुका सर्वपक्षीय नार पार जलहक्क समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

$
0
0

मन्सुरी कुटुंबीयांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीच्या मृत्यूस कारागृहातील अधिकारीच जबाबदार असल्याचा दावा करीत या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीच्या पूर्ततेसाठी संबंधित कैद्याचे कुटुंबीय बेमुदत उपोषणाला बसले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे उपोषण सुरू करण्यात आले. या प्रकरणाची मालेगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबाला करण्यात आली आहे.

शहानवाज मोहम्मद मन्सुरी यांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात १६ जानेवारी रोजी मृत्यू झाला. कारागृहाचे अधीक्षक साळी, जेलर कारकर आणि डॉ. कुमावत यांच्या हलगर्जीपणामुळे मन्सुरी यांना वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मन्सुरी यांचे कुटुंबीय सोमवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले आहेत.

शहानवाज मन्सुरी यांच्या समवेत मुलगा शोएब आणि अन्य तिघेजण कारागृहात बंदिस्त आहेत. प्रकृती ठीक नसल्याने शहानवाज हे उपचारासाठी कारागृहातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत होते. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, मोबदल्यात कारागृह प्रशासनाच्या काही अपेक्षा असल्याचा आरोप मुमताज मन्सुरी यांनी केला आहे.

उपचारांबाबत केलेल्या अर्जांच्या प्रती जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनासोबत जोडल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची व्यथा समजून घेतली. मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मन्सुरी यांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाला सहकार्य करीत उपोषण मागे घेण्याची तयारी या कुटुंबाने दर्शविल्याचे डॉ. मंगरूळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागवत कथा सोहळा

$
0
0

नाशिक : कालिकानगर येथील मयूरेश्वर गणेश मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद्भागवत कथा सोहळ्याचे शुक्रवार, दि. १ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील इस्कॉन ब्रह्मचारी श्रीमान जानकीनाथ दास कथेचे वाचन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, दुपारी ३.३० वाजेपासून ६.३० पर्यंत कथा सोहळा होणार आहे. दररोज दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत कथा सोहळा होणार आहे. मंगळवारी (दि. ५ फेब्रुवारी) महाआरतीने कथा सोहळ्याचा समारोप होणार असून, सायंकाळी ७.३० पासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब सोनवणे, मेघ:श्याम मोरे, विकास बागूल, मधुकर वाणी, राजेंद्र पाटील, यशवंत नेरकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>