Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्मार्ट सिटीतील प्रकल्प अडचणीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट नगर परियोजनेला शेतकऱ्यांचा विरोध होत असतानाच, स्मार्ट सिटी कंपनीचे 'प्रोजेक्ट गोदा' आणि गावठाण पुनर्विकासाचे स्मार्ट प्रकल्पही अडचणीत सापडले आहेत. प्राकलन दरापेक्षा तब्बल ६० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त मूल्याच्या निविदा प्राप्त झाल्याची माहिती स्मार्ट सिटी सल्लागार समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली. यामुळे दोन्ही प्रोजेक्टचा खर्च २२० कोटींनी वाढणार आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सभागृहनेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गुरुमीत बग्गा, सीईओ प्रकाश थविल उपस्थित होते. या कंपनीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गावठाण पुनर्विकास योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ३१८ कोटी ७१ लाखांच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पांसाठी निविदा मागविल्या असता ६० टक्के जादा दराने त्या प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. ठेकेदाराने तब्बल ५०९ कोटी ९० लाख रुपयांचा दर भरला आहे. सुधारित जिल्हा नियंत्रण दरानुसार ही निविदा ३८६ कोटींपर्यंत येणे कंपनीला अपेक्षित असताना त्यात १९० कोटींची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्याचबरोबर 'प्रोजेक्ट गोदा' प्रकल्पासाठी ७३.७० कोटी रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले होते. परंतु, या कामासाठीही तब्बल ३८.८८ टक्के जादा दराची म्हणजेच १०२ कोटी ३५ लाखांची निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे दोन्ही कामांच्या प्राकलनात तब्बल २२० कोटींची वाढ झाली आहे. पर्यायाने, हे दोन्ही प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. इतक्या जादा दराने काम केल्यास त्याचा भार पालिकेच्या तिजोरीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित मक्तेदाराशी चर्चा करून दर कमी करण्याची सूचना केली जाणार असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी पत्रकारांना दिली. ठेकेदारांशी चर्चा सरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अन्य प्रकल्पांच्या कामाच्या स्थितीचेही सादरीकरण करण्यात आले.

आचारसंहितेपूर्वी कामे करा

स्मार्ट सिटीचे प्रकल्प हे निविदेच्या फेऱ्यात अडकले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी भाजपला या प्रकल्पांच्या भूमिपूजनाची घाई झाली आहे. या बैठकीत भाजपच्या आमदारांनी स्मार्ट सिटीचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वीच पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सुरू असेलेले प्रकल्प व पालिकेच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला करायचे आहे. त्यासाठी हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी भाजपच्या आमदारांनी केल्या.

शेतकऱ्यांशी चर्चा करा

मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात स्मार्ट नगररचना परियोजनेच्या अंमलबजावणीला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधाबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. जागा मालक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सल्लागार समितीतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून पुन्हा नरमाईची भूमिका घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामचंद्र जाधवांचा शिवसेनेला पुळका

$
0
0

आयुक्तालय प्रशासनाकडूनही डोळेझाक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राप्त संपत्तीपेक्षा जास्त आर्थिक माया जमविल्याने गुन्हा दाखल झालेल्या नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरोधात विभागीय चौकशीस शिक्षण खात्याकडून विलंबाची मेहरबानी करून जाधव यांच्या सेवापुस्तिकेवर निष्कलंक सेवेचा शिक्का मारला आहे. जाधवांची सेवा वाचविण्याचा शिक्षण खात्यातील वरिष्ठांकडून हा खटाटोप केला गेल्याचे उघड झाले आहे. गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याला निवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेकडून तर होर्डिंगच उभारण्याचा प्रताप करण्यात आला आहे.

उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यावर अपसंपदा जमा केल्याचे चौकशीत उघड झाल्याने ऐन सेवानिवृत्तीच्या काही दिवस आधी पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. अशा प्रकारच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित विभागातील वरिष्ठांकडून त्यांच्याविरोधात खात्यांतर्गत चौकशी केली जाते. मात्र, जाधव यांच्याबाबतीत मात्र शिक्षण खात्याने मेहरबानी केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गुन्हा दाखल होऊनही जाधव यांच्याविरोधात खातेंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय अद्यापही शिक्षण खात्याने घेतलेला नाही. शिक्षण खात्याच्या या भूमिकेमुळे जाधव यांची सेवानिवृत्तीपूर्वी खात्यांतर्गत चौकशीच्या फेऱ्यातून सुटका झाली आहे. चौकशीसाठी समिती नेमली असती तर रामचंद्र जाधव यांच्यापुढील अडचणींत वाढ झाली असती. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या शासकीय लाभांनाही मुकावे लागले असते. या सर्व प्रकारांतून त्यांना वाचविण्यासाठी शिक्षण खात्याने त्यांना खात्यांतर्गत चौकशीच्या फेऱ्यातून निवृत्तीपर्यंत वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रवेशद्वारावरच कौतुकफलक

फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावरही नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर रामचंद्र जाधव यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग झळकले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याने उभारलेल्या या होर्डिंगवर शिवसेनेच्या नेत्यांचेही फोटो आहेत. होर्डिंग उभारणीकडे आयुक्तालय प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. पोलिसांनीही या होर्डिंगची दखल घेतलेली नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी (दि. ३१) साधेपणाने जाधवांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे.

नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याविषयी शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.

- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, पुणे

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एकलहरे बंद नव्हे सक्षम करणार’

$
0
0

नाशिक : एकलहरे येथील विद्युत प्रकल्प बंद पडणार नाही. त्यासाठी मुख्य अभियंत्याबरोबर बैठक घेण्यात आली. त्यात हा प्रकल्प आवश्यक क्षमतेनुसार चालविण्यात येईल. प्रकल्पातील जुने संच बदलून ६६० मेगावॅटचे नवीन संच बसविण्यात येतील, असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलहरे प्रकल्प बंद होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सुध्दा हा प्रकल्प बंद करणे अशक्य असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी चिमणीची अडचण होती. ती दूर झाली आहे. विदेशी कोळसा आणण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 'एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर' अशी योजना सुरू करण्याचा विचार आहे. हे ट्रान्सफार्मर छोटे असून, ते १० वर्षे बिघडत नाही. येत्या पाच वर्षांत ४७ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गर्भपात प्रकरणी सहावा आरोपी अटकेत

$
0
0

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील कौळाने येथील अवैध गर्भपातप्रकरणी सहावा आरोपी असलेला रवींद्र पवार यास किल्ला पोलिसांनी कॅम्प परिसरातून मंगळवारी ताब्यात घेतले. त्यास बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. राहुल गोसावी यास देखील अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीत देखील तीन दिवसांची वाढ झाली आहे. अवैध गर्भपात प्रकरणात सर्वच सहा आरोपी पोलिसांच्या हाती आले आहेत. या प्रकरणी अटकेत असलेला डॉ. गोसावी अप्रशिक्षित असून, या प्रकरणात अन्य कोणी डॉक्टर्स आहेत का? याचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट लांबणीवर ?

$
0
0

नाशिक : सत्ताधारी भाजपला महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेट मंजुरीची घाई झाली असताना प्रत्यक्षात बजेट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेट स्थायी समितीवर सादर होणे अपेक्षित असताना अद्यापही लेखा विभागाकडून आकडेमोड झालेली नाही. जमा खर्चाच्या आकडेमोडीतच वेळ जात असल्याने बजेट १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. छपाईसाठी किमान आठ ते दहा दिवस लागणार असल्याने बजेटसाठी उशीर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बजेटचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी सर्व विभागांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जमा-खर्चाचे आकडे अंतिम करणे, खातेप्रमुखांना वर्षासाठी उपलब्ध तरतुदीची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे बजेट वेळेत जाण्यासाठी प्रशासनाकडून लगीनघाई सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर मंदिराबाहेर आंदोलन

$
0
0

वारकऱ्यांच्या दिंडीतील ध्वनीक्षेप वाजवण्यास पोलिसांनी मज्जाव घेतल्यानंतर वारकऱ्यांच्या मदतीला विश्व हिंदू परिषद,बजरंग दलासह वारकरी संप्रदाय धावून गेला आहे. बजंरग दलाच्या प्रतिनिधींनी बुधवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. ध्वनीक्षेप वाजवण्यास बंदी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी विहिंप, बजंरग दलाच्या कार्यकर्त्यांनी निवृत्तिनाथ मंदिराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणात माफी मागावी, या मागणीसाठी बंजरग दल व विहिंपच्या प्रतिनिधींना रात्री मंदिराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ध्वनीक्षेपावरील बंदीचा विषय वादग्रस्त बनला आहे. विनोद थोरात, कैलास देशमुख यांनी यासंदर्भात दिवसभर वारकऱ्यांच्या भेटी घेऊन यापुढे असा प्रकार होऊ नये. यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायप्रोफाईल चोरीचा फंडा

$
0
0

गॅझेट्स खरेदीच्या नावाखाली गंडा; संशयितास मुंबईतून अटक

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मोबाइल, लॅपटॉप यासारखे अत्याधुनिक गॅझेटस खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित करायची. अशा गॅझेट्सशी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना व्यवहारासाठी लक्झरियस हॉटेलमध्ये बोलावून घ्यायचे. हॉटेलमध्ये संबंधित प्रतिनिधींनी चहापान करायचे. हे गॅझेट्स साहेबांना दाखवून येतो, असे सांगत ते घेऊन पोबारा करायचा असा नवा फंडा अवलंबणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वस्तू खरेदी-विक्रीचे व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाइन होऊ लागले आहेत. यातून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचेही पुढे आले आहे. नव्या तर नव्या जुन्या वस्तूही ऑनलाइन साइटसवर विक्रीसाठी ठेवत अत्यंत खुबीने लांबविल्याचे गुन्हेगारांचे कारनामेही नाशिककरांनी अनुभवले आहेत. आता अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने नवनवीन महागडे गॅझेटस लांबविले जात असल्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी पुढे आला होता. मोबाइल शॉपीमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणीने विक्रीसाठी आणलेले दोन मोबाइल चोरट्याने शिताफीने लांबविल्याचे गाऱ्हाणे पोलिसांकडे मांडले होते. संशयिताने मोबाइल दुकानात फोन करून मार्केटमध्ये लेटेस्ट दाखल झालेले दोन मोबाइल खरेदी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मोबाइल घेऊन एका लक्झरियस हॉटेलमध्ये कर्मचारी पाठवा, असे शॉपमालकास सांगण्यात आले. शॉपमालकाने या कर्मचारी असलेल्या तरुणीला संबंधित हॉटेलमध्ये पाठविले. संशयिताने हॉटेलमध्ये तिची भेट घेऊन इंग्रजीत संवाद साधला. मोबाइल हॅण्डसेट्मधील फिचर्सची माहिती घेतली. आमचे साहेब मीटिंगमध्ये आहेत. त्यांना दोन्ही मोबाइल दाखवून येतो, असे सांगून तो मोबाइल घेऊन निघून गेला. बराचवेळ झाला तरी तो न परतल्याने तरुणीने हॉटेलमधील रिसेप्शन काउंटरकडे संबंधित व्यक्तीबाबत विचारणा केली. ती व्यक्ती लॉज बुकिंगसाठी आली होती. परंतु, काही न बोलता निघून गेल्याचे तिला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने शॉप मालकास घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्जही देण्यात आला. अशाच प्रकरणात एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती या तरुणीला मिळाली. सातपूर पोलिसांनी त्यास दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमाशा फडांची यात्रेकड पाठ

$
0
0

त्र्यंबकेश्वर : यात्रेच्या दरम्यान येणाऱ्या लोकनाटय तमाशा मंडळांच्या फडांची संख्या यंदा कमी झाली आहे. दरवर्षी यात्रेत १२ ते १५ नामवंत तमाशाचे फड हजेरी लावायचे. मात्र आता एखाद दुसरा फडावर हा आकडा आला आहे.

पूर्वी यात्रा संत निवृत्तिनाथ मंदिराच्या परिसरात भरत होती. शहराच्या बाजूस असलेल्या शेतांमध्ये मोकळ्या जागेवर तमाशाचे फड असायचे. रात्री आठ वाजेच्या पूर्वी तमाशाचा खेळ सुरू व्हायचा तो पहाटे दोनपर्यंत चालायचा. पहाटेपर्यंत तमाशाच्या फडात वेळ घालवल्यानंतर कुशावर्तावर स्नान करून दर्शनबारीत जाऊन भाविक उभे राहायचे. तेव्हा तमाशात चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी सादर केलेले संत तुकाराम महाराज यांच्या जिवनावरचे वगनाट्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आता काळ बदलला आहे. तमाशा फड तग धरून राहण्यासाठी आठवडे बाजार, छोट्या यात्रांमध्ये खेळ लावत असतात. यंदा मात्र एक किंवा दोनच फड रंगणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे मनपा अंदाजपत्रकाचे भिजत घोंगडे

$
0
0

धुळे मनपा अंदाजपत्रकाचे भिजत घोंगडे

स्थायीसह समित्यांची निवड न झाल्याने काम संथगतीने

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिका प्रशासनाकडून सन २०१८-१९ चे सुधारित व सन २०१९-२० चे संभाव्य अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. हे अंदाजपत्रक साधारण ३५० कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. परंतु, स्थायी समिती सदस्यांची अद्याप निवड झाली नसल्यामुळे अंदाजपत्रकाच भिजत घोंगडे कायम असून, ते तयार करण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेने गेल्यावर्षी २९० कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांचे अंदाजपत्रक महासभेत मंजूर केले होते.

धुळे महापालिकेचे संभाव्य उत्पन्न व खर्च आणि जमेची बाजू विचारात घेऊन हे अंदाजपत्रक बनविण्यात येत आहे. शिवाय, शासकीय अनुदान, विविध योजनांसाठी मिळणारा निधी याबाबींचाही विचार सुरू आहे. प्रशासनाकडून हे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीपुढे ठेवण्यात येते. परंतु, महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौरपदाची निवड झाली. पण, स्थायी समिती सदस्यांची अद्याप निवड झालेली नाही. यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी महासभा होणार आहे. सदस्य निवडीनंतर सभापती निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून, यात फेब्रुवारी महिना उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे.

गेल्यावर्षी अडीचशे कोटींचे बजेट
महापालिका प्रशासनाने सन २०१८-१९ साठी २५४ कोटी ९७ लाख ६४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर अंदाजपत्रक २७५ कोटींवर पोहचले होते. महासभेतील तरतुदीनंतर २९० कोटी, २७ लाख, ९८ हजार रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या थकीत रक्कमांसाठी पाच कोटींची तरतूद, विकासकामांच्या प्रलंबित देयकांसाठी दोन कोटी, ई-गव्हर्नन्ससाठी एक कोटी, नवीन मिळकतींचे सर्वेक्षण (जीआयएस मॅपिंग), वृक्षलागवड मोहिमेसाठी आवश्यक निधीची तरतूद तसेच महिला बालकल्याण समितीसाठी १४ लाख २५ हजार, आर्थिक व दुर्बल घटकांसाठी १४ लाख २५ हजार आणि दिव्यांगांसाठी ८ लाख ५५ हजार इतक्या राखीव निधीची तरतूद करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिकट परिस्थितीवर लक्ष्मीचा जोरदार ठोसा

$
0
0

‘खेलो इंडिया’त ‘कांस्य’ मिळवित चमकदार कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील लक्ष्मी पाटीलने कांस्यपदक मिळवले. विशेष म्हणजे, तिला बॉक्सिंगचा सराव करण्यासाठी दररोज टोकरतलावाहून नंदुरबारला सहा किलोमीटर पायी चालत जावे लागायचे. अशा परिस्थितीतही तिने आपली बॉक्सिंग सरावाबाबतची तळमळ जराशीही कमी होऊ दिली नाही. कुटूंब प्रमुख तिचे वडील मोलमजुरीने कुटूंबाचा गाडा चालवितात. याची जाणीवच तिने डोळ्यासमोर ठेवून नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.

नंदुरबार तालुका विधायक समितीच्या यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील बॉक्सिंगपटू लक्ष्मी आनंदा पाटील हिने पुणे येथे पार पडलेल्या ‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग स्पर्धेत ४६ ते ४८ किलो वजनगटात कांस्यपदक मिळवले. या वेळी लक्ष्मीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हरियाणा, मध्य प्रदेशच्या नामांकित खेळाडूंना मागे टाकले होते. सध्या अकरावीचे शिक्षण घेत असलेल्या लक्ष्मी पाटीलने यापूर्वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे. तिने गेल्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
घरची परिस्थिती हलाखीची असताना लक्ष्मीने यश मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. लक्ष्मीचे वडील आनंदा दगा पाटील हे शासकीय गोदामात हमालीचे काम करतात. लक्ष्मीकडे टोकरतलाव येथून नंदुरबारला येण्यासाठी भाड्याचे पैसे नसल्याने ती रोज नंदुरबारला पायी जाते. घरी येताना ती वडिलांसोबत येते. लक्ष्मी पाटीलला क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. मयूर ठाकरे, राकेश माळी, जितेंद्र माळी, जगदीश वंजारी, आकाश बोढरे, आनंदा पाटील आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये पुरेपूर क्षमता आहे. मात्र, जिल्ह्यातील निरनिराळ्या खेळातील खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. सरकारने नंदुरबार जिल्ह्यासाठी क्रीडा अॅकॅडमी सुरू केल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील. लक्ष्मीच्या यशातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.
-प्रा. डॉ. मयूर ठाकरे, क्रीडाशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनच्या धडकेत रिक्षाचालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॅन आणि अ‍ॅटोरिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत रिक्षाचालक ठार झाला. हा अपघात शहरातील एन. डी. पटेलरोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

अशोक नारायण भास्कर (४० रा. रेणुका माता मंदिरासमोर, पंचशीलनगर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. अशोक भास्कर गुरुवारी (दि. ३१) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आपली रिक्षा (एमएच १५ झेड ६१०३) घेऊन व्यवसायासाठी मुंबई नाका येथे जात असतांना हा अपघात झाला. बीएसएनएल कार्यालयासमोरून ते प्रवास करीत असतांना समोरून भरधाव येणाऱ्या व्हॅनने (एमएच १५ सीएम ३३९०) रिक्षास धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक भास्कर गंभीर जखमी झाले. त्यांना मुलगा भास्कर याने तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुर्दैवाने उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला त्यावेळी वाहन भरधाव वेगात होते. त्यामुळे या अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून व्हॅनचेही मोठे नुकसान झाले.

..

सिन्नर महामार्गावर

जखमी तरुणाचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-सिन्नर मार्गावरील मोहदरी घाटात जखमी अवस्थेत मिळून आलेल्या वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज असून, या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी नोंद केली आहे. शरद अशोक सानप (२५ रा. वडगाव पिंगळा ता.सिन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शरद सानप हा बुधवारी (दि. ३०) दुपारी मोहनदरी घाटातील सूर्या ढाबा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आला. टोलनाका अ‍ॅम्ब्युलन्सचे चालक पंढरीनाथ गिते यांनी त्याला थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागातही आजपासून हेल्मेटसक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रवारीपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दळण वळणाची सुविधा चांगली असून, सर्वच भागात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. दुसरीकडे दरवर्षी वाहनांची संख्याही वाढते आहे. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी ६०० ते ८०० जणांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होतो. २०१८ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३७७ दुचाकीस्वारांचे बळी गेले. हेल्मेटचा वापर होत नसल्याने हा आकडा वाढलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिस दलाने हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. १ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम सुरू करण्यापूर्वी ग्रामीण पोलिस दलाने जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीही केली. ग्रामीण पोलिस दलाने नागरिकांच्या शंका समाधानासाठी विशेष हेल्पलाइन सेवाही सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या ०२५३- २२००४३४ किंवा नियंत्रण कक्षाच्या ०२५३- २३००३०८८ किंवा २२००४९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेल्मेट परिधान न केल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना, अपंगत्व व त्यावरील उपचारांसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च लक्षात घेता प्रत्येक दुचाकीस्वाराने व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील- संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विमानाचा ओझरलाच मुक्काम

$
0
0

मटा विशेष

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Twitter - @BhaveshBMT

नाशिक - केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने परवाना रद्द केलेल्या एअर डेक्कन कंपनीचे विमान ओझर विमानतळावरच पडून असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) ६० लाखांहून अधिक देणे थकविल्याचेही पुढे आले आहे. जोपर्यंत देणी चुकती होत नाहीत, तोवर हे विमान कंपनीला नेता येणार नाही. तसेच, जितके दिवस हे विमान विमानतळावर राहील तोवर पार्किंगची रक्कमही वाढत जाणार आहे.

उडान योजनेअंतर्गत नाशिक, जळगाव, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सोलापूर या शहरांना सेवा देण्यासाठी केंद्रीय हवाई मंत्रालयाने एअर डेक्कन या कंपनीची निवड केली. मात्र, या कंपनीकडून अतिशय ढिसाळ सेवा देण्यात आली. त्याच्या असंख्य तक्रारी मंत्रालयाकडे गेल्या. बेभरवशाची सेवा, भोंगळ कारभार आणि अव्यवसायिक पद्धतीने प्रवाशांशी वागणूक कंपनीकडून मिळत असल्याने उडान योजनाही बदनाम होण्यास प्रारंभ झाला. याची गंभीर दखल मंत्रालयाने घेतली. गेल्या २१ नोव्हेंबर रोजी कंपनीचा परवाना मंत्रालयाने रद्द केला. कंपनीने नाशिक विमानतळाला केंद्रीभूत ठेऊन सेवेची निश्चिती केली. बीचक्राफ्ट १९०० या १९ आसनी विमानाद्वारे कंपनी सेवा देत होती. मात्र, हे विमान गेल्या चार महिन्यांपासून ओझर विमानतळावरच पार्किंग केले आहे. कंपनीचा परवाना रद्द झाला असला तरी कंपनीने हे विमान घेऊन जाण्यासाठी अद्याप कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. मात्र, ओझर विमानतळावरील लँडिंग, टेकऑफ आणि पार्किंग हे सर्व चार्जेस आता कंपनीला द्यावे लागणार आहेत. काही दिवसांपर्यंत कंपनीकडे ६० लाखांहून अधिक रक्कम थकली आहे. यासंदर्भात एचएएल आणि एअर डेक्कन यांच्यात पत्रव्यवहार होत आहे. मात्र, हे विमान येथून घेऊन जाण्यासाठी जितका उशीर होईल, तितकी कंपनीकडील थकबाकी वाढतच जाणार आहे. हे पैसे चुकते केल्याशिवाय कंपनीला हे विमान घेऊन जाणे शक्यच होणार नाही.

बंद पडलेले मॉडेल

बीचक्राफ्ट १९०० हे विमानाचे मॉडेल जुनाट झाले आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या बीच एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने या विमानाची निर्मिती केली. २००२ मध्ये कंपनीने या विमानाचे उत्पादन बंद केले. विशेष म्हणजे उत्पादन बंद होऊन १७ वर्षे उलटली तरी एअर डेक्कन कंपनीकडून या विमानाचा सेवेसाठी वापर केला जात होता.

इतरांचेही पैसे बुडाले

एअर डेक्कन कंपनीने केवळ एचएएलचेच पैसे थकविले नाही तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही काही महिन्यांचे पगार थकविले. तसेच, नाशिकमधील एका मोठ्या हॉटेललाही त्यांची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कंपनीने अनेकांना चुना लावला असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक म्हणूनच विज्ञानाची मदत घ्या

$
0
0

विज्ञान लेखिका माधुरी शानभाग यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसेंदिवस जगभरात विज्ञानामुळे होणारी क्रांती आणखी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. विज्ञानाच्या आधारे होणारी ही क्रांती मानवासाठी उपकारक असली तरीही विज्ञानाचा उपयोग सहाय्यक म्हणून व्हायला हवा. विज्ञानाच्या या उपयुक्ततेचे परिवर्तन अपायकारकतेमध्ये होण्यापासून रोखले पाहिजे, असे प्रतिपादन विज्ञान लेखिल माधुरी शानभाग यांनी केले.

केटीएचएमच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचा समारोप शानभाग यांच्या व्याख्यानाने झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ. प्रशांत देवरे होते. यावेळी शानभाग म्हणाल्या, की तंत्रज्ञानात अतिशय वेगाने क्रांती होते आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दरवर्षी ६६ टक्के दराने माहितीची वाढ होत आहे. विसाव्या शतकामध्ये पदार्थविज्ञान शाखेमध्ये संगणक,रसायन,जीवशास्र हि सर्व शास्रे एकमेकांमध्ये मिसळून गेली. आता २१ व्या शतकात नॅनो तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. या तंत्रज्ञानासाठी खर्चिक प्रयोगशाळा, उपग्रह प्रक्षेपण, हायड्रोजन पासून मिळवायची ऊर्जा, सौर ऊर्जा, अणूच्या एकत्र येण्याने होणारी उर्जा यातही मोठी क्रांती घडू शकते. ग्रीन केमिस्ट्री यामुळे पर्यावरणाची जपणूकही करता येते. वैद्यकशास्रात मानवाच्या क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानांची मोठी मदत होत आहे. नवनवीन संशोधनामध्ये प्राणीशास्त्र, समाजशास्र, मानस शास्र, शिक्षणकला आदींमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनात्मक प्रगती होत आहे.

संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी अध्यक्षीय मनोगत केले. प्रा. योगेशकुमार होले यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. विशाखा ठाकरे यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संगिता पानगव्हाणे यांनी करून दिला.

\Bफोटो : पंकज चांडोले \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीटीमध्ये उद्या शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाने नाशिक येथील अलब्डो फाउंडेशन यांच्यातर्फे जीआरएएम प्लस प्लस जीआयएस या विषयावर शनिवारी (दि. २) एक दिवसीय मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उपलब्ध माहितीचे सर्वेक्षण करून तिचा मानवाच्या फायद्यासाठी अधिकाधिक उपयोग कसा होईल, याचा अभ्यास करण्यामध्ये संशोधक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी मुंबई यांच्या मदतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात आयआयटी मुंबईचे प्रोजेक्ट इंजीनिअर दीपक चोक्सी, अल्बेडो फाऊंडेशनचे संस्थापक विक्रांत निकम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन विभागप्रमुख डॉ. एम. पी. कदम व आयोजन डॉ. एस. जे. कढभाने यांनी केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन सीईएसए आणि आयएई स्टुडंट्स चॅप्टर्सचे विद्यार्थी प्रतिनिधी करत आहेत, अशी माहिती संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ एन. एस. पाटील, प्राचार्य प्रा. एन. बी. देसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉल्फिनबरोबर सेल्फी’ची बालनाट्यात बाजी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युवा विहार कला व क्रीडा मंडळ नाशिक यांच्यातर्फे आयोजित आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत आनंदनिकेतन शाळेच्या 'डॉल्फिनबरोबर सेल्फी' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. रचना विद्यालयाच्या 'शेव बायोम'चा द्वितीय तर डे केअर मराठी मीडियम शाळेच्या 'काव काव' नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला.

'डॉल्फिनबरोबर सेल्फी' या नाटकाला उत्कृष्ट नाटकाबरोबरच उत्कृष्ट लेखक प्रथम, उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय, उत्कृष्ट कलाकार प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. उत्कृष्ट लेखकचा द्वितीय क्रमांक स्वामी नारायण शाळेने 'धडा' नाटकाने मिळवला. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रथम क्रमांक रचना विद्यालयाच्या 'शेव बायोज' नाटकाने मिळवला तर तृतीय क्रमांक डे केअर शाळेच्या 'काव काव' या नाटकाने मिळवला. उत्कृष्ट कलाकार मुलगी गटात द्वितीय क्रमांक शिशुविहार बालकमंदिर 'आम्ही सारे एक' नाटकाने तर तृतीय क्रमांक स्वामी नारायण स्कूलच्या 'धडा' या नाटकाने मिळवला. तर मुलगा गटात नवजीवन डे स्कूलच्या 'बदल' नाटकाने प्रथम तर रचना विद्यालयाच्या 'शेव बायोज' नाटकाने द्वितीय क्रमांक तसेच डे केअर इंग्रजी माध्यमाच्या 'या रे या सारे या' या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला.

सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे देवदत्त जोशी यांनी केले. पर्यावरण बालनाट्य स्पर्धेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार घडताना दिसत आहेत, असे प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केले. स्पर्धेत एकूण १८ शाळांचा सहभाग होता. प्राथिमक फेरीतून ९ शाळांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. परीक्षण सागर रत्नपारखी, नुपूर सावजी, यशश्री रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव पाटील यांनी केले.

हे आहेत यशस्वी कलाकार

गौरी पटवर्धन, मनिषा एकबोटे, धनयजय वाबळे, निलिमा कुलकर्णी, राजश्री चौधरी, दुर्वा उठाणे, यज्ञिका पाटोळे, तनिष्क चव्हाण, आशिष वैशंपायन, ओम खैरे या कलाकारांनी बालनाट्या स्पर्धेत आपल्या अभिनयाची छाप टाकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त

$
0
0

बांग्लादेशींसह राज्यातील नऊ तरुणींची सुटका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेला वेश्या व्यवसयाचा अड्डा शहर पोलिसांनी गुरुवारी सांयकाळी उद्ध्वस्त केला. या ठिकाणी महाराष्ट्रासह कोलकाता आणि बांग्लादेशातील नऊ तरुणी आढळून आल्या. या प्रकरणी एका महिलेसह दोन ग्राहकांना पोलिसांनी अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

विद्या साहेबराव पठारे (३०, व्यवस्थापक), फशन युसूफ शेख (२०, रा. मनमाड) आणि आनंद लक्ष्मण पाटील (५५, रा. गिरणारे) अशी पोलिसांनी छापा मारून अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. यातील विद्या पठारे ही व्यवस्थापक म्हणून काम करते. तर, उर्वरित दोघे हे ग्राहक आहेत. ही कारवाई सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील एसटी कॉलनीतील हॉटेल फुड कॅसलच्यावर तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या मॅझिक ऑफ रिलॅक्सेशन या ठिकाणी झाली. हॉटेल फूड कॅसेल असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक मसाज सेंटरसारखे दुकान सुरू असून, त्यात वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांना देण्यात आले. भगत यांच्या टिमने १५ दिवसात तीन वेळा प्रयत्न केले. मात्र, हा अड्डा तिसऱ्या मजल्यावर सुरू असल्याने त्यांना यश मिळत नव्हते. मात्र, निश्चित माहिती मिळाल्याने उपायुक्त पाटील, एसीपी पाटील, पीआय भगत व सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन्ही ग्राहक आणि व्यवस्थापक महिला यांच्यासह नऊ तरुणी पोलिसांच्या हाती आल्या.

पोलिसांकडून अड्डा सील

पीडित तरुणींना सुधारगृहात पाठवण्याची तर तिघा संशयिताविरूद्ध पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या अड्ड्याचा प्रमुख प्रवीण ठक्कर असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले असून, हा अड्डा सील करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर असल्याचे भासवून लग्न केले अन्...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अकरावी नापास असूनही डॉक्टर असल्याचे भासवत एकाने डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील संशयित तोतया डॉक्टरसह १० ते १२ जणांविरुद्ध कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळाल्यानंतर प्रमुख तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.

महेश संजय सूर्यवंशी, सासरा संजय शिवराम सूर्यवंशी आणि सासू शोभा संजय सूर्यवंशी (सर्व रा. तळवाडे, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे पोलिसांनी अटक केलेल्या प्रमुख तिघा संशयितांची नावे आहेत. संशयित आरोपी महेश हा आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करीत असल्याचे सांगत होता. याच दरम्यान मित्राच्या मदतीने त्याची ओळख दंत चिकित्सेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीशी झाली. कार्यरत डॉक्टर असल्याचे भासविणाऱ्या महेशने संशयाला जागाच ठेवली नाही. काही महिन्यांच्या ओळखीनंतर संशयित महेशने कोपरगाव येथे तरुणीचे घर गाठून तिच्या पालकांना विवाहाचा प्रस्ताव दिला. मुलगा डॉक्टर, वडील शिक्षक आणि नात्यातील इतर नातेवाईकसुद्धा सुशिक्षित असल्याने तरुणीच्या पालकांनी थोडीफार चौकशी केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संशयित महेशची गाठभेट घेतली. या ठिकाणी तो 'अॅप्रन' घालून आणि गळ्यात 'स्टेस्थोस्कोप' लटकवून फिरत होता. डोळ्यांना दिसले आणि महेशच्या नातेवाईकांनी सांगितले, त्यानुसार पालकांनी विवाह निश्चित केला. गतवर्षाच्या अखेरीस धूमधडाक्यात विवाह पार पडला. मात्र, विवाहानंतर महेश डॉक्टर पत्नीला नाशिकला येण्यास मज्जाव करू लागला. आपली बदली पुणे येथे होणार असल्याने तूसुद्धा तिथेच जॉब शोध, अशी मागणी तो करू लागला. पतीच्या हट्टानुसार पत्नीनेही पुण्यात जॉब शोधला. मात्र, येथे अधूनमधून येणारा संशयित महेश डॉक्टर पत्नीला बेदम मारहाण करीत होता. एक दिवस तर पुण्यातील एका रस्त्यावरच तिला मारले. यातच आडगाव परिसरातील एका डॉक्टर तरुणीचा फोन महेशच्या पत्नीला गेला. महेशबाबत विचारपूस करीत तिने तो आपल्याला विवाहाची गळ घालत असल्याचे सांगितले. यानंतर महेशच्या पत्नीने पालकांना हा प्रकार सांगितला.

संशयितांना कोठडी

पालकांनी केलेल्या चौकशीत संशयित महेशचे फक्त अकरावीपर्यंतचे शिक्षण झाल्याचे स्पष्ट झाले. महेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, वरील तिघा संशयितांसह त्याच्या १० नातलगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज कोपरगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर महेशसह त्याच्या आईवडिलांना अटक झाली. सध्या त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिव्हिलच्या सुरक्षेचा प्रश्न

संशयित महेश हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातत्याने वावर ठेवायचा. कोणी ओळखीचे भेटले की आपण डॉक्टर असल्याचे सांगायचा. अॅप्रन आणि गळ्यात स्टेस्थोस्कोप ठेवणाऱ्या महेशने यापूर्वी अनेक तरुणींची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिव्हिल प्रशासनाने अशा मुन्नाभाईंना रोखण्यासाठी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट सिंगल

$
0
0

युवा दिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन

नाशिक : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शासकीय जिल्हा रुग्णालयातर्फे ३० जानेवारी रोजी एड्स जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर ४ किमी युवा मॅरेथॉनचे गोल्फ क्लब मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील बहुसंख्य शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्थांच्या युवक युवतींनी सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण केली. यात युवा महिला गटात शक्ती विकास अॅकॅडमीतील विद्यार्थिनीनी बाजी मारली. अॅकॅडमीतील मोनाली चव्हाणके (प्रथम)पूनम जोशी (द्वितीय), पूजा थालकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैदाने, पोलिस अधिकारी वाबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

संस्कृत संभाषण शिबिर

नाशिक : संस्कृतभारतीतर्फे १ ते १० फेब्रुवारी दरम्यान मोहिनीदेवी रुंगठा विद्यालय, अशोकस्तंभ, नाशिक येथे सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले आहे. या वर्गात सोप्या भाषेत संस्कृत संभाषण शिकविले जाईल. शिबिरासाठी वय, शिक्षण याची कोणतीही अट नाही. अधिक माहिती करीता संगीता आंभोरे ९४२३२२३७५० या क्रमांकावर संपर्क करावा.

पॉस मशीनचे वितरण

नाशिक : समर्थ बँकेच्या रौप्यमोहत्सवी वर्षानिमित्त बँकेतील ग्राहकांकरिता पॉस मशीनच्या वितरणाचा कार्यक्रम बँकेचे चेअरमन डॉ. प्रशांत पुरंदरे यांच्या हस्ते झाले. यावेळी चंदन भगवाने, दिशांत शाह, अमोल कातकाडे, प्रतीक भारद्वाज हे उपस्थित होते. तसेच बँकेचे चेअरमन प्रशांत पुरंदरे, संचालक व रौप्य मोहत्सव समिती अध्यक्ष अॅड. लक्ष्मण उगावकर म्हणाले,'पॉस मशीन ग्राहकारिता कॅशलेस व्यवहार करण्यासाठी उपयुक्त आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाभिक महामंडळातर्फे साताऱ्यातील घटनेचा निषेध

$
0
0

आरोपीला अटक करण्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातारा येथील पाटण तालुक्यातील कर्पेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने या नाभिक समाजाच्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या केल्याचा घटनेचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने निषेध व्यक्त केला. त्यानंतर आरोपींना अटक करा व माने कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्या अशी मागणी करणारे निवेदन महामंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले.

खुनाचा शोध पोलिसांनी ताबडतोब लावावा. या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचप्रमाणे माने कुटुंबीयाची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत मिळावी, असेही यात म्हटले आहे. हे निवेदन देतांना महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष नारायणराव यादव, विभागीय अध्यक्ष अशोक सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, दिलीप जाधव, संजय वाघ, अॅड. सुनील कोरडे, अरुण सैंदाणे, नाना वाघ, यासह महामंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images