Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘संदर्भ’मध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ सेवा हॉस्पिटलमधील रेडिओलॉजी विभागासाठी अत्याधुनिक १६० सीएलआयसीई सीटी स्कॅन मशीन दाखल झाले असून, १५ दिवसांमध्ये हे मशीन कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. यासाठी तब्बल पाच कोटी २० लाख रुपये खर्च केले असून, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक असे हे मशीन ठरणार आहे.

शालीमार येथील संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये हॉर्ट, किडनी यासारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये औरगांबाद विभागातील रुग्णांचीही मोठी गर्दी असते. संदर्भ सेवा हॉस्पिटलमधील सध्याचे सीटी स्कॅन यंत्र १० वर्षे जुने झाले होते. असे असले तरी या रेडिओलॉजी विभागाने या यंत्राच्या मदतीने तब्बल २५ हजार स्कॅनचा टप्पा पार करून विक्रमी सेवा दिली. सोनोग्राफी विभागानेही २५ हजार सोनोग्राफी / डॉपलर तपासणी केली. आतापर्यंत या विभागाने ५० हजार रुग्णांचे तपासण्या पूर्ण केल्या आहेत.

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. आजवर या विभागाने केलेले काम आणि भविष्यातील निकड लक्षात घेता संदर्भ सेवा हॉस्पिटलसाठी आधुनिक सीटी स्कॅन यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या यंत्रांमध्ये आधुनिक सॉफ्टवेअर्स, थ्री डी स्कॅनिंग, प्रेशर इंजेक्टर, लेझर प्रिंटग व लो रेडिअेशन डोस टेक्नोलॉजी उपलब्ध होणार आहे. या यंत्राद्वारे २०० किलोग्रॅम वजनापर्यंतच्या व्यक्तीचे स्कॅनिंग अत्यंत कमी वेळेत करणे शक्य होईल. यामुळे अॅडव्हान्स वर्कस्टेशनद्वारे एंडोस्कोपी व कार्डिअॅक स्कॅनिंग तसेच अँजिओग्राफीही सहज करता येणार आहे.

याबाबत बोलताना विभागप्रमुख डॉ. मंगेश थेटे म्हणाले,'हे मशिन गुरुवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यंत्राचे इन्स्टॉलेशन व प्राथमिक चाचण्यांनंतर १० ते १५ दिवसांनंतर ते सेवेत दाखल होऊ शकते. या आधुनिक यंत्रणेमुळे विभागाची सेवा अजून विस्तारीत होणार असून, अचूक निदान देण्यासाठी सहाय्यभूत होणार आहे.' या यंत्राबाबत संदर्भ सेवा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामपल्ली, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी प्रयत्न केले. संदर्भमध्ये सध्या केवळ दोन रेडिओलॉजिस्ट व चार क्ष किरण तंत्रज्ञ उपलब्ध असून, रिक्त पदे भरण्याबाबतही पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील ४ लाख मतदार वाढले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर गेल्या लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा ४ लाख ३३ हजार २९७ मतदारांची यात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यापैकी बहुतांश नवमतदार असून, त्यांचा कौल कोणाकडे झुकतो यावर या निवडणुकीचे भवितव्य असणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ३८ लाख ८२ हजार २८१ मतदार होते. आता हेच मतदार ४३ लाख १५ हजार ५७८ झाले आहे.

जिल्हयात १५ विधानसभा मतदार संघ असून, त्यातील १२ मतदार संघाचे नाशिक व दिंडोरी हे दोन मतदार संघ आहे. तर मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदार संघ हे धुळे लोकसभेला जोडले गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदार संघ व दिंडोरी मतदार संघावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष अधिक आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात १ लाख ९४ हजार १०४ मतदारांची वाढ झाली आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात हीच संख्या १ लाख ४७ हजार ७९९ मतदारांची वाढ झाली आहे.

२००९ मध्ये नाशिक लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या १४ लाख ४८ हजार ४१४ होती. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघाची यावेळी मतदार संख्या १४ लाख ३२ हजार ९३८ मतदार होती. आता दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पुरवणी यादीत अजूनही वाढ होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या वाढीचा आकडा उमेदवारांचे गणित बिघडवणारा असणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी योजनेसाठी चाचपणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज, (दि. १ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर होणाऱ्या एका मोठ्या कृषी योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील तीन गावांची निवड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव आणि उमराळे तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले यांचा त्यात समावेश आहे. यासंदर्भात गुरुवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग सुरू होती. ही योजना नक्की काय आहे आणि त्याचा काय लाभ होणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिल्लीत योजना तयार केली असून, त्याची चाचपणी नाशिकमध्ये गुरुवारी करण्यात आली. ही योजना काय असेल, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला. योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा डेटा किती वेळेत उपलब्ध होऊ शकतो, यासाठी ही चाचपणी होती. त्यासाठी विविध विभागाचे शासकीय अधिकारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. नाशिकबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यातही ही चाचपणी करण्यात आली. नाशिक जिल्हयात दिंडोरी तालुक्यातील खेडगाव व उमराळे तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहीले हे गाव निवडण्यात आले. या गावातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात या शेतकऱ्यांचे नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते, सातबाराबद्दलची माहिती आदी माहितीची समावेश होता. शासकीय कार्यालयातूनच ही माहिती गोळा करण्यासाठी अग्रक्रम देण्यात आला. सायंकाळी त्याची माहिती मुंबईत मुख्य सचिवांना देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

सकाळी राज्याच्या मुख्य सचिवांसह विविध विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याबाबतची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी तलाठी व सहकार विभागातील अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सुचना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुशल’ प्रकल्पग्रस्तांना एकलहरेत नोकरी द्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथील प्रगत कुशल प्रकल्पग्रस्तांना १९८०चे शासनाच्या परिपत्रकानुसार नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समीर भुजबळ यांनी त्यांच्यासोबात कुशल प्रकल्पग्रस्त कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांना हे निवेदन दिले आहे.

भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने ७४ प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी २०१० साली आयटीआय सारखे बीटीआरआय प्रशिक्षण दिले असून, त्यानंतर एक वर्ष प्रशिक्षण करून प्रशिक्षणार्थ्यांना दिल्ली बोर्डाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. राज्यातील इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. मात्र अद्याप नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रगत कुशल प्रकल्पग्रस्तांना (बीटीआरआय प्रशिक्षणार्थींना) १९८०चे परिपत्रकानुसार विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नोकरीत सामावून घेण्यात यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाच्या आसक्तीचा भावना हीच समस्या

0
0

विष्णूपंत गायखे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगात पैशांची समस्या नसून आसक्तीची भावनाच खरी समस्या आहे असे प्रतिपादन पळसे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विष्णूपंत गायखे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक पुस्तक मित्र मंडळाच्या वतीने अतुल कहाते लिखित पैसा या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्यानंतर २०१६ अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना पैशाचे महत्त्व उमगले. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर अतुल कहाते यांनी सुमारे ३७५ पानांच्या पैसा या पुस्तकाच्या माध्यमातून पैशाच्या उगमाचा शोध सुरू केला आणि तो शब्दबद्ध केला, असे सांगून गायखे म्हणाले, की पूर्वी चलन अस्तित्वात नव्हते, तेव्हा वस्तुंच्या देवाण-घेवाणीतून व्यवहार चालायचे. इ. सन ८०६ ते ८२१ या काळात हाईनसंग या राजाच्या कारकीर्दीत चीनमध्ये नोटा वापराची सुरुवात झाली. चीनने जगाला छपाई, दारुगोळा, दिशादर्शक यंत्र आणि नोटा या चार महत्त्वपूर्ण देणग्या दिल्या आहेत. तत्पूर्वी धातूची नाणी व्यवहारासाठी वापरले जायची. सोन्याच्या नाण्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर ब्रिटिश लोकांनी जगावर सोन्याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी आक्रमण केले. ब्रिटिशांनी १८३५ मध्ये सगळी नाणी मोडीत काढून रुपया हेच एकमेव ग्राह्य चलन गृहीत धरून व्यवहार सुरू केले. स्वीडन देशात १७२० मध्ये मध्यवर्ती बँकेचा जन्म झाला. न्युटन हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ १६९९ मध्ये एका टांकसाळीचा प्रमुख होता आणि त्यानेच बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शोध लावला होता. पैसा या गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रमच आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे तत्वज्ञान बरोबर आहे पण ते कधी म्हणायचे वा अंगीकारायचे हे समजणे आवश्यक आहे, असेही गायखे म्हणाले.

सुभाष सबनीस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते गायखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांनी प्रास्ताविक तर प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी परिचय करून दिला. संजय करंजकर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कडलग यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सकाळच्या सत्रात शाळा भरवावी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, �नाशिक

येत्या १ मार्चपासून जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात करण्याबरोबरच प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना निवेदन देण्यात आले. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

निवेदनानुसार शिक्षकांनी आपल्या मागण्या प्रकाशझोतात आणल्या आहेत. यामध्ये दुष्काळ व उष्माघाताचा विचार करून दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात, वरिष्ठ वेतनश्रेणीचे उर्वरित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत, विषय शिक्षकांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, प्रलंबित बिले त्वरित मंजूर करावीत, एकाच आवारातील शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळाच्या एकत्रीकरणास स्थगिती मिळावी, दरमहा वेतन १ तारखेलाच व्हावे, नियमित फंडाची प्रकरणे व इतर बीले महिन्याच्या आत अदा करण्याचे नियोजन करावे, नवीन शिक्षक भरती पूर्वी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, व पदवीधर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, विज्ञान प्रदर्शनासाठी तालुका स्तरावर अनुदान मिळावे, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना द्यावे, सर्व पंचायत समिती शिक्षण विभागासाठी दरवर्षी स्टेशनरीसाठी अनुदान मिळावे, स्वच्छतागृहाचे अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, केंद्रप्रमुख प्रवासभत्ता बील वेळेत मिळावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

या मागण्यांवर लवकर निर्णय घ्यावा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, राज्य संघटक नंदू आव्हाड, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब पगार आदींनी दिली आहे.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना फोनवर लाखोल्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील विविध पोलिस ठाण्यांत फोन करून 'तो' थेट पोलिसांनाच लाखोल्या वाहतो. विशेष म्हणजे एक-दोनदा नाही, तर गेल्या दोन वर्षांपासून 'त्याचा' हा प्रताप सुरू आहे. कसून शोध घेऊनही 'तो' सापडत नसल्याने 'त्याच्या' जाचाला पोलिस कंटाळले आहेत. सायबर पोलिसांनाही त्याने गुंगारा दिल्याने ही बाब सध्या चर्चेची बनली आहे.

कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांना अनेक ठिकाणी घटना घडल्यावर जावे लागते. पोलिस आल्यावर सर्वसामान्य व्यक्ती आदराने त्यांना घटनेची माहिती सांगतात. परंतु, त्याच पोलिसांना चक्क पोलिस ठाण्याच्या लँडलाइनवर संशयित व्यक्ती शिव्या घालत असेल तर? सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे प्रमुख होते. मात्र, असे असतानाही त्यांच्याच ठाणे अंमलदारांना गेल्या दोन वर्षांपासून संशयिताकडून शिव्या खाण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे, महिला पोलिसांनादेखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात असल्याने त्याही हैराण झाल्या आहेत. याबाबत सायबर क्राइम विभागाकडे माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने लँडलाइनवर ठाणे अंमलदारांना शिव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी संशयित संतोष खिल्लारे याच्याविरोधात 'एमआयडीसी'तील एबीबी कंपनीमागे असलेल्या सोमेश्वर कॉलनीतील नागरिकांनी तक्रारही दिली होती. परंतु, शिवीगाळ करणारा पोलिसांना मिळत नसल्याचे सांगण्यात आले. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनाच चक्क शिव्या ऐकाव्या लागत असल्याने त्यांची यातून सुटका कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

क्रमांक बदलून फोन

आपली बायको घरातून निघून गेली असल्याचे कारण सांगत संशयित व्यक्ती त्याला वेळ मिळेल त्यावेळी शहरातील पोलिस ठाण्यांतील लँडलाइनवर फोन करीत शिवीगाळ सुरू करते. त्यामुळे सर्वच पोलिस ठाण्यांचे ठाणे अंमलदार वैतागले असून, याबाबत सायबर शाखेकडे संबंधिताची तक्रारही पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. मात्र, असे असतानाही संशयित हाती लागत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून पोलिस ठाण्यांच्या लँडलाइन फोनवर कार्यरत असलेल्या ठाणे अंमलदारांना शिव्यांची लाखोली सहन करावी लागत आहे. संशयित खिल्लारे मोबाइल क्रमांक बदलून फोन करीत असल्याचे ठाणे अंमलदारांचे म्हणणे आहे.

--

नेत्यांच्या नावानेही धमक्या

पोलिस ठाण्यांतील फोनवर शिव्या देणारा संशयित खिल्लारे नेत्यांच्या नावानेदेखील धमक्या देत आहे. पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल रूमला फोन करीत आपल्याला पोलिस शिवीगाळ करीत असल्याचा आरोपही तो अनेक वेळा करतो. परंतु, प्रत्यक्षात तोच पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत असूनदेखील यंत्रणेच्या हाती लागत नसल्याने कर्मचाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता याप्रश्नी खुद्द पोलिस आयुक्तांनीच पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायप्रोफाइल चोरीचा सातपूरला गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नामांकित कंपन्यांचे मोबाइल, लॅपटॉप खरेदी करणार असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या हायप्रोफाइल चोरट्याविरोधात सरकारवाडापाठोपाठ सातपूर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश उर्फ नरेन मदनलाल शर्मा (वय ५५, रा. कोंडवा, पुणे) असे या संशयिताचे नाव आहे.

उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमधील टेक्स सिटी या गॅझेट स्टोअसच्या व्यवस्थापक हर्षदा दोंदे यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या मोबाइल शॉपमध्ये आल्यावर संशयित नरेशनले आपले नाव विनय राठोड असे सांगितले होते. यानंतर फोन करून त्याने त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये मोबाइल घेऊन या, असे सांगितले होते. त्यानुसार दोंदे यांनी आपले दोन कर्मचारी संबंधित ठिकाणी पाठविले होते. संशयित शर्माने मोबाईल शॉपच्या कर्मचाऱ्यांशी संवादसाधून 'साहेबांना मोबाइल दाखवून येतो' असे सांगत पोबारा केला होता. मोबाइलची मागणी नोंदविणारी सांगणारी व्यक्ती शर्मा हाच होता का, याची खातरजमा केल्यानंतर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक हरी सावंत अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावत्र बापाकडून कन्येवर अतिप्रसंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सावत्र पित्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार विहितगावातील सौभाग्यनगरात घडला आहे. या लाजिरवाण्या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईने नाशिकरोड पोलिसात पतीविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरिफ खान असे संशयिताचे नाव आहे. तो पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे काम करतो. परंतु, त्याचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी विहितगाव परिसरातील सौभाग्यनगर येथे वास्तव्यास आहे. आरिफ खान व त्याच्या पत्नीचाही दुसरा विवाह आहे. दोघांना पहिल्या पती-पत्नीपासूनची मुलगी व मुले आहेत. ही मुलगी व मुले सौभाग्यनगर येथेच वास्तव्यास आहेत. संशयित आरिफ हा नेहमीप्रमाणे पुणे येथून घरी आला असता त्याने २६ जानेवारीच्या रात्री आपल्या मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. असाच प्रकार त्याने दुसऱ्या दिवशीही करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुणे येथे निघून गेला. दोन दिवसांनी पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर घडलेल्या प्रकाराला वाचा फुटली. पीडितेला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधवांच्या निरोपाची आटोपती औपचारिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडलेल्या शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या थाटामाटात करण्याच्या शिक्षण संघटनांच्या नियोजनावर भ्रष्टाचार प्रकरणामुळे पाणी फेरले. उपसंचालक जाधव हे आपल्या ३४ वर्षांच्या 'सेवे'तून ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असल्याने संघटनांनी मोठ्या उत्साहात तयारीला सुरुवात केली होती. परंतु, त्यापूर्वी भ्रष्टाचाराचा ठपका बसल्याने व सर्वांच्या संपर्कातूनही दूर गेल्याने संघटनांसाठी हा विषय बंद करणेच पसंत केले आहे. मात्र, भविष्यात हा सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा बाळगल्याबद्दल भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव संपर्कातून 'आउट' झाले आहेत. ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. या निवृत्तीचा सोहळा थाटामाटात करण्याचा विचार शिक्षक संघटनांच्या मनी होता. ऐरवी विविध मागण्यांसाठी उपसंचालक कार्यालयांवर मोर्चे काढणाऱ्या संघटना उपसंचालकांचा निरोप सोहळा मात्र थाटात करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. परंतु, निवृत्तीच्या केवळ आठवडाभरापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने संघटनांनी हा विषय तूर्तास थांबविणेच योग्य मानले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केवळ पाच मिनिटात जाधव यांना औपचारिक निरोप दिला. आपल्या कार्यभारातून मुक्त होत त्यांनी काही वेळातच कार्यालयातून काढता पाय घेतला.

\Bपुष्पा पाटील प्रभारी उपसंचालक

\Bनाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या पुष्पा पाटील यांना शिक्षण उपसंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. या पदावर नवीन अधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत पाटील या पदाचा कारभार बघणार आहेत.

होर्डिंगही हटविले

रामचंद्र जाधव यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने उभारलेले होर्डिंगचे वृत्त 'मटा'मधून प्रसिद्ध झाले. त्यानंतर गुरुवारी सकाळीच ते होर्डिंग्स हटविण्याची नामुष्की शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आली. जाधव यांच्या निवृत्तीनिमित्त शुभेच्छा देणारे होर्डिंग उभारण्याचा आगाऊपणा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने केला होता. विशेष म्हणजे हे होर्डिंग थेट आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरच लावले होते.

लोगो : मटा इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीच्या घोळाने बजेटचा प्रवास रखडला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीबाबत सहा महिन्यांपासून सुरू असलेला तिढा सुटत नसल्याने आणि नगररचना विभागाकडून अपेक्षित उत्पन्नाची शाश्वती न मिळाल्याने महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेटच अडचणीत सापडले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात जवळपास तीन हजार कोटींची मागणी नोंदविली जात असताना उत्पन्नाचा आकडा जेमतेम दीड हजारापर्यंतही जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जमाखर्चाचा ताळमेळच बसत नसल्याने बजेटचा प्रवासच रखडला आहे. महापालिकेकडून सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटच्या तयारीचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या एकीकडे नवीन कामांचे प्रस्ताव धडाधड दाखल होत असताना दुसरीकडे मात्र चालू वर्षात जमेची बाजू लंगडी पडत चालली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात जीएसटी अनुदानासह घरपट्टी, पाणीपट्टीच्या महसुलासह नगररचना विभागाकडून मिळणाऱ्या विकासशुल्काची आकडेवारी मोठी असते. गेल्या वर्षी १ एप्रिल २०१८ पासून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्यात पाच ते सहापट वाढ केली होती. या करवाढीमुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्येही असंतोष निर्माण झाला होता. या करवाढीचा परिणाम म्हणून मुंढेंनाच नाशिकमधून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नूतन आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच महासभेत करवाढ रद्द करण्याचा ठराव केला. परिणामी या करवाढीच्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नसून, आयुक्तांकडून त्याबाबत अभ्यास सुरू आहे. या करवाढीच्या घोळाचा परिणाम आता बजेटवरही झाला आहे.

बजेटचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लेखा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत करवाढीच्या घोळामुळे उत्पन्नाचे उद्दिष्ट किती ठेवायचे याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे कर विभागाकडून उत्पन्नाचे आकडेच सादर करण्यात आले नाहीत, तर दुसरीकडे नगररचना विभागाबाबतही हाच घोळ सुरू आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नगररचना विभागाला अडीचशे कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत जेमतेम ६५ कोटीच जमा झाले आहेत. त्यामुळे करवाढीचा तिढा आणि नगररचनाच्या घोळामुळे जवळपास चारशे कोटींची घट होणार आहे. बजेट खर्चाची बाजू मांडण्यासाठी जमा बाजूदेखील गृहित धरणे गरजेचे असल्याने लेखा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. करवाढ कायम राहिल्यास त्यानुसार गेल्या वर्षाच्या जमा बाजूत दहा ते वीस टक्के वाढ गृहित धरून जमा बाजू मांडणे शक्‍य होईल. परंतु, करवाढ मागे घेतल्यास किंवा कमी केल्यास त्यानंतरच कर विभागाला जमा बाजूची आकडेवारी सादर करता येणार असल्याने तूर्त बजेटचा प्रवास रखडला आहे.

--

१५०० कोटींचा अंदाज

महापालिकेच्या जमा बाजूमध्ये तूर्त तरी जीएसटी व सरकारी अनुदानापोटी एक हजार कोटी रुपये दिसत आहेत. घरपट्टी, नगररचनासह इतर अनुदान धरून उत्पन्न चारशे ते पाचशे कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या बाजूत जेमतेम दीड हजार कोटी रुपयेच दिसत आहेत. परंतु, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी कामांच्या भल्यामोठ्या याद्या दिल्याने विभागाकडून तब्बल तीन हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयुक्त गमे यांनी कामांची मर्यादाही दीड हजार कोटींपर्यंतच ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगली अध्यक्ष चषक स्पर्धा

0
0

अध्यक्ष चषक जल्लोषात

विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण; दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा गुरुवारी समारोप झाला. श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी हा दिवस आकर्षक ठरला.

वक्तृत्व, चित्रकला, नृत्य, गायन, धावणे, खो-खो अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणवत्तेचे कौतुक करत त्यांनी प्रशासनालाच अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तर शीतल सांगळे यांनी शिक्षकांनी मुले घडवावीत, असे सांगितले. गुरुवारी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाचे सभापती यतिंद्र पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच शिक्षकांनी प्रदर्शित केलेल्या विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती व नवोपक्रमांनाही त्यांनी दाद दिली. परीक्षक नेहा कोथमिके यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी नृत्याबाबत मार्गदर्शन केले. कृती न नृत्य यातील फरकही समजावून सांगितला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, आदी उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

- -

या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविली चुणूक

लहान गट व मोठा गट अशा दोन गटात या स्पर्धा पार पडल्या. वक्तृत्व, चित्रकला, समूहनृत्य, वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, धावणे, खो-खो, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, बादलीत बॉल टाकणे अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखविली. तर शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बहुउद्देशीय साहित्य, हसत खेळत आनंददायी शिक्षण, डिजिटल पपेट शो, अक्षर ओळख, अप्रगत मुलांसाठी साहित्य निर्मिती, अंधश्रद्धा निर्मुलन विज्ञानाकडे वाटचाल, ज्ञानरचनावादी साहित्य या प्रकल्पांचे सादरीकरण केले होते.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी प्रकरणी तरुणास कारावास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी प्रकरणी तरुणास प्रथमवर्ग तथा सह न्यायदंडाधिकारी एस. आर. धानोरकर यांनी गुरुवारी (दि. ३१) दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. घरफोडीची घटना २९ जुलै ते १ ऑगस्ट २०१७ मध्ये सिडकोतील सुंदरबन कॉलनीत घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिल उर्फ गिन्या दशरथ पिठेकर (२३ रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुंदरबन कॉलनीत राहणारे मयूर प्रकाश साबरे एका अंत्यविधीसाठी अहमदनगर येथे गेले असता २९ जुलै ते १ ऑगस्ट २०१७ दरम्यान ही घटना घडली होती. चोरट्याने बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिने आणि मोबाइल असा सुमारे पाच लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी गिन्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदारास संशयावरून ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे यांनी करीत पुराव्यानिशी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. सरकारी वकील रेश्मा जाधव यांनी साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांची साक्ष ग्राह्य धरत तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी गिन्या पिठेकर यास कलम ४५४ व ३८० अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्हा सिध्दतेसाठी कोर्ट कर्मचारी तथा पोलिस शिपाई एस. एम. देशमुख आणि महिला शिपाई आर. एस. उगले यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजपयोगी प्रयोगांनी वेधले लक्ष

0
0

समाजपयोगी प्रकल्पांनी वेधले लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगातून समजावे व त्यातून संशोधन करत त्यांनी समाजपयोगी प्रकल्पांची निर्मिती करावी, या उद्देशाने आयोजित ८ वे जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या ९९२ प्रकल्पांतून उलगडलेले विज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष यानिमित्ताने बघण्यास मिळाले. आज (१ फेब्रुवारी) दुपारी दीड वाजता या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वे जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शन मेट, भुजबळ नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे प्रकल्प बघता यावे यासाठी शहरातील विविध भागांतून बसेसची व्यवस्था मेट कॉलेजतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला भेट दिली. मानवी जीवन सुकर होण्याच्या दृष्टीने येथे प्रकल्प सादर करण्यात आले असून वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती, स्वच्छ भारत, आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, आदी विषयांवरील प्रकल्प विद्यार्थ्यांनी येथे सादर केले आहेत. नवनवीन संकल्पनांचा आधार घेऊन तयार केलेले हे प्रकल्प आकर्षणाचे ठरत आहेत.

- -

लक्षवेधी प्रकल्प

मोनो रेल

शेतात किंवा जंगलात रस्ते नसल्यामुळे वजनदार वस्तू अंगावर घेऊन जाणे कठिण जात असल्याने वजनदार वस्तू ने आण करण्यासाठी मोनो रेलची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. वेळ, श्रम, खर्च वाचण्यासाठी ही रेल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना वाटतो आहे.

- -

ऑटो शेडमेट व रेन फॉल मेजरमेंट

अवकाळी पावसापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ऑटो शेडमेट व रेन फॉल मेजोरमेन्ट प्रकल्प यंत्रणा या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. पिकांचे नुकसान याद्वारे टाळता येते.

- -

स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती

स्पीड ब्रेकरच्या साहाय्याने वीज निर्मिती करण्यासाठी विद्युत उपकरणाची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवरुन वाहन गेल्यावर स्पीड ब्रेकरच्या खाली लावलेल्या जनरेटरच्या माध्यमातून वीज निर्मिती होते. अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठीदेखील हे उपकरण महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा रस्त्यावर ओतला

0
0

मातीमोल भावामुळे कसारेचे शेतकरी आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील कसारे येथे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. ३१) बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावरच तीन ट्रॅक्टर कांदा फेकला. शेतकऱ्यांच्या मालाला मातीमोल भाव मिळत असल्याने हा कांदा फेकल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्यावर कांदा दिसत होता. त्यामुळे काहीवेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

साक्रीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या कसारे गावातील शेतकऱ्यांच्या कांद्याला गुरुवारी बाजारपेठेत प्रतिक्विंटलला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी संप्तत होत गावातील मुख्य रस्त्यावर कांदा फेकल्याची घटना घडली. दुसरीकडे गावात नंदुरबार खासदार हिना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत ग्रामस्वराज्य मेळाव्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता कसारे गावात होणार होता. त्यासाठी बाजारपेठेजवळ मंडपही टाकण्यात आला होता. याची माहिती शेतकऱ्यांना समजताच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून गेल्या साडेचार वर्षांत खासदार या मतदारसंघात आल्याच नाही. मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. मग, त्यांना गावात येण्याचा काहीही अधिकारी नसल्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी एकत्र येत अखेर लोकप्रतिनिधींना विरोध दर्शविला. मात्र, दुपारी उशिरा लोकप्रतिनिधींनी गावात येऊन कार्यक्रम आटोपून माघारी परतलेत.

गावबंदीची दवंडी
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळ परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र योग्य भावदेखील मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. दरम्यान, याठिकाणी खासदार हिना गावित हे एका कार्यक्रमानिमित्त गावात येणार होत्या. मात्र, गावकऱ्यांकडून एकत्र येत लोकप्रतिनिधीला येण्यास गावात बंदी असल्याची दवंडी या वेळी देण्यात आली. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी ग्रामस्थ आग्रही होते.

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात
या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, उपपोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे, साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांना समजली. त्यांनी तातडीने पोलिसांच्या फौजफाट्यासह कसारे गावात दाखल होऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. या वेळी राज्य राखीव जवानांची एक तुकडीदेखील घटनास्थळी दाखल झाली होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांनी रस्त्यावर पडलेला कांदा एकत्र करीत उचलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावधान, ‘तो’ अजूनही आसपास...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहारालगत अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याच्या काही खुणा वन विभागाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पुरेशी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभाग, पश्चिम क्षेत्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील गंगापूररोड परिसरातील मध्यवस्तीत बिबट्याने काही दिवसांपूर्वी दाखल होत निर्माण केलेल्या दहशतीतून अद्यापही नागरिक बाहेर आलेले नाहीत. गंगापूररोड येथे आढळलेला बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले असले, तरीही आता पुन्हा शहरालगत बिबट्यांचा वावर असल्याची बाब नव विभागाच्या आवाहनामुळे अधोरेखित झाली आहे.

गंगापूररोडवरील एका बंगल्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या दिवशी मखमलाबाद परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा नागरिकांनी केला होता. या परिसरात एका वासरावरही हल्ला चढवून त्याला बिबट्याने ठार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय इतर घटनांत दोन कुत्र्यांवर हल्ला करून त्यांनाही बिबट्याने ठार केले, तर आणखी एका घटनेत गंगापूर गाव ते मुक्त विद्यापीठ परिसरातील मागील बाजूच्या परिसरातील रहिवासी विजय शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यालाही बिबट्याने ठार केले आहे. त्यामुळे गंगापूररोड, सावरकरनगर येथे जेरबंद केलेल्या बिबट्याव्यतिरिक्त आणखी बिबट्यांचा वावर शहर परिसरात असण्याची शक्यता बळावली असून, पुरेशा सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

या पट्ट्यात घ्यावी दक्षता
गिरणारे ते मखमलाबाद आणि गंगापूररोडपासून गोदावरी नदी या पट्ट्यातील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. नागरिकांनी फिरताना, वाहने चालविताना, अंधारात वावरताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभाग पश्चिम क्षेत्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’चा ऋण काढून सण!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीचा गोंधळ आणि नगररचना विभागातील घोळामुळे महापालिकचे बजेट कोलमडले आहे. असे असताना स्मार्ट सिटीतील प्रकल्पांचा बोजाही पालिकेच्या माथी मारण्याची तयारी सुरू आहे. स्मार्ट सिटीतील प्रकल्पांच्या जादा दराच्या निविदांमुळे ३०४ कोटींच्या भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे. स्मार्ट कंपनीची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पालिका कर्जरोखे आणण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा फुगा हळूहळू फुटण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील स्मार्ट सिटीतील प्रकल्प दृष्टिपथात येण्यापूर्वीच पालिकेला आर्थिक खड्ड्यात ढकलण्याची तयारी सुरू झाली आहे. हरित क्षेत्र विकासाचा गुंता कायम असतानाच, प्रोजेक्ट गोदा, गावठाण पुनर्विकासासारख्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट प्रकल्पांसाठी प्राकलन दरापेक्षा तब्बल ६० टक्क्यांपर्यंत जादा दराच्या निविदा प्राप्त झाल्याने कंपनीचे स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणीपूर्वीच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. ३०) झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली. कुंटे, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कामांचा आढावा घेण्यासह आर्थिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करण्यासाठी १०८४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठी ९४० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या आराखड्यातच १४४ कोटींची तूट दिसत असताना 'प्रोजेक्ट गोदा' आणि गावठाण पुनर्विकासाच्या निविदा अनुक्रमे ३८ आणि ६० टक्के अधिक आल्या आहेत. त्यामुळे १६० कोटींचा अतिरिक्त भार कंपनीवर आला आहे. हा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत कंपनीचे अधिकारी आहेत. हा वाढीव ३०४ कोटींचा भार पालिकेवर टाकण्याची तयारी केली जात आहे. पुणे व नागपूरच्या धर्तीवर 'म्युनिसिपल बॉण्ड'च्या माध्यमातून हा निधी उभा करण्याचा एक पर्याय समोर आला आहे. हे रोखे काढण्यासाठी पालिकेचे रेटिंग अर्थात खुल्या बाजारातील मूल्यांकन दरही तपासण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे काही भार पालिकेच्या येत्या बजेटमध्येही विभागण्याचा पर्याय असल्याचे कुंटे यांनी पत्रकारांना सांगितले. यावरून स्मार्ट सिटीमुळे पालिका आर्थिक गर्तेत जाईल, हा नगरसेवकांचा आरोप आता खरा ठरू लागला आहे. या दोन्हीही पर्यायांचा अवलंब शक्य न झाल्यास या दोन्ही कामांच्या जादा दराच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कुंटे यांनी स्पष्ट केले. संबंधित निविदाधारकाने इतक्या जादा दराच्या निविदा का भरल्या, याची तपासणी सुरू आहे. संबंधित मक्तेदाराशी दराबाबत वाटाघाटीही सुरू आहेत. तांत्रिक मुद्द्यांची पडताळणी केली जात आहे. यातून मार्ग काढून कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर उचित प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कर्जरोख्यांचा पालिकांना अधिकार

शहरातील पायाभूत सुविधा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीसाठी महापालिकांना 'म्युनिसिपल बॉण्ड' काढण्याचा अधिकार मिळाला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानेच स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपाय सुचविला आहे. कर्जरोखे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. कर्जरोखे बाजारात या रोख्यांची खरेदी-विक्री केली जाते. पुणे महापालिकेने या माध्यमातून दोन हजार कोंटीची उभारणी केली आहे.

महासभेत विरोध?

महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात तीनशे कोटींचे कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला होता. यातील दोनशे कोटींचे कर्जही घेतले होते. या कर्जाची परतफेड झाली असून, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकासकामांना कात्री लावत पालिकेला नुकतेच कर्जमुक्त केले आहे. परंतु, आता स्मार्ट सिटीतील प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी पुन्हा कर्ज उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने नगरसेवक निधीबरोबरच २५७ कोटी रुपयांच्या भाजपच्या ड्रीम प्रोजेक्टला कात्री लावल्याने आधीच संतापलेले लोकप्रतिनिधी स्मार्ट सिटीसाठी अतिरिक्त निधी देतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्मार्ट सिटीसाठी कर्जरोखे काढताना व्याजाचा भार मात्र महापालिकेला सोसावा लागणार असल्याने स्मार्ट कंपनीच्या या प्रस्तावास महासभेत जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पद्वारे शेतकऱ्यांचे माहिती संकलन

0
0

पायलट प्रोजेक्ट पूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय मोदी सरकारने अर्थसंकल्पातून घेतला असून यासाठी सर्व शेतकऱ्यांची नव्याने माहिती संकलित करण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पायलट प्रोजेक्टअंतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील तीन गावांमध्ये स्थानिक महसूल प्रशासनाच्या मदतीसह कॅम्पसारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी शुक्रवारी दिली.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांना शुक्रवारी खूशखबर दिली. दुष्काळ व नापिकी सारख्या समस्यांना तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा दावा केंद्र सरकारने केला असून याबाबतचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, उमराळे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले या गावांमध्ये शेतकऱ्यांचा डेटा संकलित करण्याचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा डेटा किती वेळात उपलब्ध होऊ शकतो, याची गुरुवारी तातडीने चाचपणी करण्यात आली. त्यासाठी विविध विभागांचे अधिकारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. संबंधित गावांमधील शेतकऱ्यांची ५० टक्के माहिती उपलब्ध झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आधारसाठी बळीराजाची मंजुरी गरजेची

योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आधारकार्ड लिंकिंग आवश्यक ठरणार आहे. परंतु, सरकारी यंत्रणेलाही शेतकऱ्यांच्या आधारवरील डेटा वापरण्याची परवानगी नसल्याने शेतकऱ्यांचे संमतीपत्र अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधारवरील तपशीलासह त्यांचे बँक खाते, सात-बाराबद्दलची सर्व माहिती संकलित करण्यात येणार आहे.

तलाठ्यांची मदत घेणार

शेतकऱ्यांच्या माहिती संकलनाच्या कामात तलाठ्यांची मदत घेण्यात येणार असून गावांमध्ये कॅम्प घेऊन शेतकऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचनाही राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. ही माहिती संकलित करण्यासाठी एका गावाला कमीत कमी दोन ते अधिकाधिक दहा दिवस लागू शकतात, असा अंदाज जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावात आजपासूनव्याघ्र संवर्धन कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

सातपुडा बचाव कृती समिती व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या वतीने शनिवारी (दि. २) व रविवारी (दि. ३) व्याघ्र संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागात ही कार्यशाळा होत आहे. पर्यावरण शाळा, न्यू कॉन्झरवर, वन्यजीव संरक्षण, ऑचिड नेचर, उपज या संस्थाचे सहकार्य लाभत आहे. कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या पर्यावरण शास्त्र विभागातील सभागृहात आयोजित परिषदेच्या माध्यमातून पश्चिम सातपुडा विशेषतः जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य आणि वडोदा वनक्षेत्रातील वाघांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधले जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात होत असलेले वाघांचा मृत्यू, व्याघ्र संवर्धनामध्ये यावल अभयारण्याचे महत्व, सातपुडा भूप्रदेश व व्याघ्र संवर्धनाचे महत्व, वन्यजीव संचार मार्ग, समुदायाच्या मालकीचे समुदायाद्वारे संचालित निसर्ग संवर्धन, डोलारखेडा व्याघ्र अधिवास आदी विषयांवर कायशाळेत चर्चा होणार आहे. वन्यजीव प्रेमींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन योजक राजेंद्र नन्नावरे आणि अभय उजगरे यांनी केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारांना दणका

0
0

हेल्मेट न वापरल्याने ७७५ चालकांना दोन लाखांचा दंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध ग्रामीण पोलिस दलाने सुरू केलेल्या कारवाईच्या पहिल्याच दिवशी तब्बल पाऊणेआठशे दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशन हद्दीत एकाच वेळी ही कारवाई झाल्याने दुचाकीस्वारांची चांगलीच तारंबळ उडाली. ही कारवाई यापुढे सातत्याने होणार असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी वाहनांनी सीटबेल्ट वापरास प्राधान्य द्यावे, असे आवहन ग्रामीण पोलिस दलाने केले आहे.

जिल्ह्यात दरवर्षी शेकडो वाहनचालकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडतात. यात दुचाकीस्वारांचा मोठा असतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १५ दिवस जनजागृती देखील करण्यात आली. आज, शुक्रवारी सकाळपासून पोलिस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी लावून दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात आली. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ७८५ दुचाकीस्वारांकडून दोन लाख २५ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईचे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि सुज्ञ नागरिकांनी जोरदार स्वागत केले. ही मोहीम आगामी १५ दिवस सातत्याने होणार असून, वाहनचालकानी नियम पाळून आर्थिक भुर्दंड बसणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक दराडे यांनी केले आहे.

हेल्मेटमुळे वाचले प्राण

आज, शुक्रवारी ग्रामीण पोलिस दलाची कारवाई सुरू असताना नाशिककडून चांदवडकडे जाणाऱ्या मालसाने- सोग्रस परिसरात दुचाकीस्वारांचा अपघात झाला. सकाळी १० वाजता झालेल्या अपघातात म्हसरूळ येथील बुलेटस्वार प्रतिक शिवाजी आहेर (२७) बालंबाल बचावला. आयशर ट्रकचा कट लागल्याने हा अपघात झाला होता. मात्र, प्रतिकच्या डोक्यात हेल्मेट असल्याने पुढील अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images