Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टीपी स्कीमवर कुंटे ठाम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीतील हरितक्षेत्र विकास योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी, ही परियोजना होईलच असा विश्वास स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला.

स्मार्ट सिटीतील हरितक्षेत्र विकास योजनेला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला असून, सर्वेक्षण बंद पाडले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आलेले सीताराम कुंटे या प्रस्तावावर ठाम राहिले आहेत. टीपी स्किमचे अहमदाबाद हे यशस्वी मॉडेल असून, ते डोळ्यांसमोर ठेवूनच ही योजना राबविली जात आहे. शेतकरी, जमीनमालकांच्या काही अपेक्षा असतील, तर त्यांच्याशी चर्चा करून सांमजस्याने मार्ग काढता येईल. सुनियोजित शहर साकारायचे असेल, तर कुठेतरी तडजोड करावीच लागेल. शेतकऱ्यांचा नगर परियोजनेला विरोध म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नाही. वाटाघाटीच्या माध्यमातून मार्ग काढता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यात जमीन वाटपात ६०:४०, ५५:४५ या पर्यायांचादेखील विचार होत आहे. राज्यात काही ठिकाणी याप्रमाणे जमीनवाटप झाल्याने कायदेशीर अडचणी निर्माण होणार नसल्याचे कुंटे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा वाढवून यातून तोडगा काढला जाईल असे सांगत, स्मार्ट सिटीच्या या प्रस्तावावर कुंटे ठाम राहिले आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्दळ वाढणार असल्याने त्याआधी स्मार्ट रोड होणे गरजेचे आहे. ठेकेदार कंपनीला ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत रोजच्या कामाचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरदार सरोवरालाही विरोध

धुळे जिल्हाधिकारी असताना सन १९९३ साली सरदार सरोवर प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध होत होता. हा प्रकल्प होईल की नाही असे त्यावेळी वाटले होते. परंतु, समजुतीने आणि चर्चेनंतर आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्या ठिकाणी काम करण्याचा आपणास आणि गमे यांनाही अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कितीही विरोध असला स्मार्ट सिटीअंतर्गत नगर परियोजना होईलच असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सरदार सरोवर प्रकल्पातील स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलकांनी रोखला महामार्ग

0
0

महामार्ग प्राधिकरणविरोधात नांदगावात रास्तारोको

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड-चाळीसगाव राष्ट्रीय मार्गावर पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आल्याने माणिकपुंज-नांदगाव दरम्यान पाइपलाइन वारंवार फुटत आहे. त्यामुळे नांदगावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी नवी लोखंडी पाइपलाइन करून देऊ, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाने नांदगाव पालिकेस दिले होते. मात्र ते पाळले नाही. त्यामुळेच नांदगावमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नांदगावात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी औरंगाबाद-मनमाड मार्ग तासभर रोखून धरला होता. नवी लोखंडी पाइपलाइन करण्याचे काम त्वरित हाती घेण्याचे आश्वासन महामंडळ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले,

माणिकपुंज पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन शासनाच्या चांदवड-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने हे काम करताना राष्ट्रीय रस्ते विकास विभागाने प्राधिकरणामार्फत नवी लोखंडी पाइपलाइन तयार करून देण्याचे मान्य केले मात्र. नंतर प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले. सदर काम न झाल्याने परिणामी माणिकपुंज नांदगाव पाइपलाइन वारंवार फुटत आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या पाणीटंचाईला प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप करीत नांदगावकरांनी शुक्रवारी हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान तातडीने पाइपलाइनचे काम न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांनी दिला आहे. प्राधिकरणाचे अभियंता चौधरी यांच्याशी आंदोलकांनी फोनवर चर्चा केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेना जिल्हाध्यक्ष कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, राष्ट्रवादीचे संतोष गुप्ता, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, नितीन जाधव, नगरसेविका कामिनी साळवे, सुनंदा पवार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणिकपुंजच्या पाण्यासाठी पुन्हा एल्गार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नारपारच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, तसेच माणिकपुंजचे पाणी प्राधान्याने नांदगाव तालुक्यासाठीच मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी नांदगाव येथे सर्वपक्षीय नारपार जलहक्क समितीतर्फे एल्गार रॅली काढण्यात आली. या रॅलीला तालुक्यातून शेतकरी, सर्वपक्षीय नेते यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

'जलहक्कांचा लढा लढू या, स्वाभिमानाने जगू या', असा नारा देत नारपारचे पाणी नांदगावला मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा निर्धार समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी व्यक्त केला. नांदगाव नगरपालिका येथून एल्गार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

नारपारचे पाणी नांदगावला मिळालेच पाहिजे, तालुक्यातील युवा पिढीसाठी औद्योगिक वसाहत झाली पाहिजे अशा मागण्या प्राधान्याने करण्यात आल्या. जुन्या तहसील येथे रॅलीचा समारोप होऊन सभेत रुपांतर झाले. अशोक परदेशी, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, राष्ट्रवादीचे संतोष गुप्ता, बहू वंचित आघाडीचे प्रा. वाल्मिक जगताप, रिपाईचे कपिल तेलोरे या ज्वलंत प्रश्नावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले.

८० ग्रामसभांमधून जलजागर

'नारपार'चे पाणी नांदगावला मिळावे, 'नारपार'च्या डीपीआर आराखड्यात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या साठी तालुक्यातील गावोगावी जाऊन लोकजागर करण्यात आला. पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी अशोक परदेशी यांच्या नेतृत्वाखाली खेडोपाडी जलजागर प्रबोधन करण्यात आले. एल्गार रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी व लढ्यात जनतेने सहभागी व्हावे यासाठी ८० गावसभा घेण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभरात ‘कांडला’शी कनेक्ट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उडान योजनेअंतर्गत नाशिक हे हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांशी शुक्रवारी (दि. १) जोडले गेले. त्याचा शुभारंभ सोहळा ओझर विमानतळावर झाला. मात्र, महिनाभरातच नाशिक हे गुजरातमधील कांडला बंदराशी अहमदाबादमार्गे जोडले जाणार आहे. तशी अधिकृत माहिती अलायन्स एअरच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दीपा महाजन यांनी 'मटा'ला दिली.

गेल्या वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर नाशिक हे अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन महत्त्वाच्या शहरांशी विमानसेवेद्वारे जोडले गेले. शुक्रवारी सकाळी ओझर विमानतळावर छोटेखानी शुभारंभ सोहळा झाला. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, एचएएलचे महाव्यवस्थापक शेषागिरीराव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., दिंडोरीचे प्रांत उदय किसवे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन केक कापण्यात आला. पहिल्या तीन प्रवाशांना मान्यवरांच्या हस्ते तिकीट देण्यात आले. पहाटे सात वाजता अलायन्स एअरचे ७० आसनी विमान हैदराबादहून २० प्रवाशांना घेऊन नाशिकला आले. त्यानंतर ४६ प्रवाशांना घेऊन हे विमान नाशिकहून ९ वाजून ३५ मिनिटांनी टेक ऑफ झाले. हेच विमान दुपारी १२ वाजता ४५ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून निघाले आणि नाशिकला दुपारी २ वाजता पोहचले. तर, दुपारी अडीचच्या सुमारास हे विमान ४१ प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाला. पहिल्याच दिवशी काहीसा विलंब झाल्यामुळे कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, सोमवार ते शनिवार नियमितपणे सेवा दिली जाईल, असे जाहीर केले आहे. सेवा शुभारंभानिमित्त कंपनीने तिकिटांच्या दरात मोठी सवलत दिली. त्यामुळे नाशिक ते अहमदाबाद हे तिकिट प्रवाशांना अवघ्या १४७० रुपयांना, तर नाशिक ते हैदराबाद हे तिकिट १९९५ रुपयांना खरेदी करता येत आहे. एका विमानसेवेद्वारे तीन राज्यांशी जोडले गेल्याने नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा खासदार गोडसे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांनी यावेळी व्यक्त केली. या विमानसेवेबाबत लवकरच नाशिकच्या विविध संस्था-संघटनांशी संपर्क साधला जाईल. तसेच, या सेवेचे ब्रँडिंग करुन पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे अलायन्स एअरच्यावतीने सांगण्यात आले. महिनाभरात अहमदाबादची सेवा पुढे कांडलापर्यंत नेली जाईल. त्यामुळे नाशिककरांना थेट कांडला गाठणेही शक्य होईल, असे महाजन यांनी सांगितले.

हे होते प्रवासी

प्रवासी ऋचा शहा म्हणाल्या की, 'माझे माहेर नाशिक असून सासर अहमदाबाद आहे. मी आणि माझे पती कॅलिफॉर्नियात असतो. पण, माहेरहून सासरला विमानाद्वारे जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे.' दुसरे प्रवासी अॅड. जितेंद्र राऊत म्हणाले, 'मी कायदेशीर सल्लागार असल्याने महिन्यातून काही वेळा अहमदाबादला जावे लागते. या सेवेचा मोठा फायदा होईल' निर्यातदार अशोक चोपडा म्हणाले, 'माझा भाजीपाल्याच्या निर्यातीचा व्यवसाय असून त्यासाठी अहमदाबाद, हैदराबादला सातत्याने जाणे असते. त्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे.' 'व्यवसायानिमित्त आपणास सतत हैदराबाद आणि अहमदाबादला जावे लागते. ही सेवा वेळ व पैसा वाचविणारी आहे', अशा प्रतिक्रिया व्यावसायिक शेरझाद पटेल आणि निफाडचे सुशील भालेराव यांनी दिली.

शिर्डीची स्पर्धा नाही, फायदाच!

शिर्डीला अनेक सेवा सुरू झाल्याने त्याचा फटका नाशिकला बसेल, असे अनेकदा बोलले जाते. मात्र, या सेवेचा फायदा होणार आहे. नाशिकहून अहमदाबादला गेलेल्या प्रवाशांना त्यांचे काही तासांचे काम आटोपून दुपारची शिर्डी फ्लाइट गाठता येते. शिर्डी सेवेचे तिकीटदर चढे असल्याने अनेक प्रवासी, पर्यटक नाशिकलाच पसंती देतील, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हैदराबाद ते शिर्डी या तिकिटाचे दर १५ हजारांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत नाशिकचे दर अल्प आहेत. त्यामुळे भाविक नाशिकहून शिर्डी गाठतील. तसेच, नाशिकहून अहमदाबादसाठी सकाळची सेवा असल्याने ती यशस्वी होईल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. येत्या १३ फेब्रुवारीपासून ट्रूजेट कंपनीची अहमदाबाद सेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून एकाचवेळी दोन सेवा मिळणार आहेत.

दिल्ली सेवेचे 'शतक'

नाशिक ते दिल्ली ही सेवा अतिशय जोमाने सुरू असल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. शुक्रवारी या सेवेचे शंभरावे उड्डाण ओझरहून झाले. दिल्लीहून १४१ प्रवासी नाशिकला आले तर १३८ प्रवासी नाशिकहून दिल्लीला गेले. ८० टक्क्यांहून अधिक तिकिटांचे बुकिंग होत असल्याने ही सेवा यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

स्वत:च्या मतदारसंघात खा. चव्हाण अनुपस्थित

ओझर विमानतळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्याचे नेतृत्व खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे करतात. मात्र, चव्हाणांच्या मतदारसंघात होत असलेल्या विमानसेवेच्या उद्घाटन समारंभाला ते स्वत: उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, सेवेचा शुभारंभ नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते केक कापून झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्यांवर नामनिर्देशित सदस्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्या आधीच निष्क्रिय झाल्या असतानाच, मनपा अधिनियमातील तरतुदीअंर्तगत प्रत्येक प्रभाग समितीमध्ये बिनसरकारी संघटना व समाजलक्षी संघटना यांचे तीन सदस्य नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. सहा प्रभागात प्रत्येकी तीन या प्रमाणे १८ सदस्यांचे प्रभागांमध्ये नामनिर्देशन केले जाणार आहे.

मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २९ (अ) अन्वये प्रभाग समित्यांमध्ये बिनसरकारी संघटना आणि समाजलक्षी संघटना यांचे प्रतिनिधी घेण्यासाठी निकष, नियम २००० मध्ये तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रभाग समित्यांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात. त्यासाठीची नियमावली करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी पालिकेने सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता येऊन दोन वर्षांनी या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीची सत्ताधाऱ्यांना आठवण आली आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत असलेल्या सहा प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन सदस्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करीत, इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभाग समित्यांवर सदस्य म्हणून जाण्यास इच्छुक असलेल्यांना १ ते १४ फेब्रुवारीदरम्यान अर्ज घेऊन तो १५ फेब्रुवारीपर्यंत संबंधित विभागीय कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हा अर्ज दाखल केला जाणार आहे. १६ फेब्रुवारीला अर्जाची छाननी केली जाणार असून, २० फेब्रुवारीपर्यंत हरकत नोंदविता येणार आहे. अंतिम यादी आयुक्त २२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करणार आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सहा प्रभाग समित्यांच्या विशेष सभेत सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

अशी होईल निवड

प्रभाग अधिकारी सर्व अर्जांची छाननी करून त्यांच्या पात्रतेबाबत आपल्या अभिप्रायासह प्रभाग समित्यांमध्ये निवडलेल्या नगरसेवकांपुढे ठेवतील. त्यानंतर हे नगरसेवक संबंधित अर्जदारांतून प्रभाग समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करतील. प्रभाग समित्यांवर कोणत्या सदस्याचे नामनिर्देशन करायचे, याबाबत एकमत होऊ शकले नाही तर निर्वाचित नगरसेवक त्यांची निवड बहुमताने करतील. हे नियम महाराष्ट्रातील सर्व महापालिका आणि तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांना लागू असतील.

अटींच्या जंत्रीने दमछाक

प्रभाग समितीचा सदस्य नामनिर्देशित करण्यासाठी अर्हता ठरविण्यात आली आहे. असा सदस्य कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय संघटनेचा पदाधिकारी नसावा तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारचा कर्मचारी नसावा, अशी अट आहे. इच्छुक सदस्यांची संस्था मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम, १९५० अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण हवे. तो पीएचडीधारक असावा. त्याला सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, अशा अटी यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कागदपत्रांची पूर्तता करतांना दमछाक होणार आहे.

कार्यकर्त्याचींच वर्णी?

या स्वीकृत सदस्यपदासाठी अटी ‌व शर्ती अत्यंत कठोर असल्या तरी अंतिम नियुक्ती ही नगरसेवकांवरच अवलंबून असेल. त्यामुळे या ठिकाणीही कार्यकर्त्यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडे सामाजिक संघटनाही नोंदणीकृत असतेच. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते या प्रभाग समित्यांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १८ जणांची आपल्या माध्यमांतून वर्णी लावण्याची नामी संधी राजकीय पक्षांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नामदेव थोरात (वय ५५) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतात बोअरचे काम सुरू असताना पाणी लागले का?हे पाहण्यासाठी गेले असता

पाय घसरून विहिरीत पडले. व त्यात त्यांचा मृत्यू झाला. थोरात यांनी आपल्या शेतात नवीन ६० फूट खोलीपर्यंत विहीर खोदली. परंतु विहिरीस पाणी लागले नाही. म्हणून त्यांनी आडवे बोअर करण्याचे काम सुरू केले. काम सुरू असताना बोअरला पाणी लागले की नाही ते पाहण्यासाठी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विहिरीच्या कडेला उभे असताना त्यांचा पाय घसरुन ते विहिरीत पडले. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोव्हर सेन्स’ ठेवणार वाहनचालकावर नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या रस्ते अपघातांमध्ये बेशिस्तपणे वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन या बाबी सर्वाधिक जबाबदार असतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक समस्यांवर तंत्रज्ञानातून उपाय शोधण्यात आले आहेत. आता बेशिस्त वाहन चालविण्यावरदेखील करडी नजर ठेवणारे अॅप तयार करण्यात आले आहे. नाशिक फर्स्ट, नाशिक ट्रॅफिक पोलिस व आरटीओ यांच्या वतीने 'रोव्हर सेन्स' हे अॅप विकसित करण्यात आले असून ते चालकावर नजर ठेवणार आहे.

रस्ता वाहतूक अधिकाधिक सुरक्षित व्हावी, यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असतात. परंतु, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नाशिक फर्स्टतर्फे विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉलेज विद्यार्थ्यांवर भर दिला जाणार आहे. दुचाकी चालविण्याची पद्धत, आचरण, वर्तन, नियमांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी या अॅपद्वारे केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.roversense.com या वेबसाइटवरुन Rover sense हे अॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे. ४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत या अॅपद्वारे नोंदी ठेवण्यात येणार असून, त्यानुसार गुण देण्यात येणार आहेत. १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार असून दहा हजार, ७ हजार ५००, पाच हजार याप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त या अॅपद्वारे वाहतूक सुरक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास व ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे तीस मिनिटांचे वाहतूक सुरक्षा प्रशिक्षण घेतल्यास बोनस गुण देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा गाईड - पाणथळ दिन

0
0

मटा गाईड - पाणथळ दिन

--

पाणथळ जागांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जगभरात २ फेब्रुवारी हा दिवस पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. पाणवठे राहिले तरच तेथील जैविक विविधता राहणार आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपांमुळे पाणवठे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच पाणवठ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीच हा दिन महत्त्वाचा ठरतो. या दिनानिमित्त पाणथळांचा घेतलेला हा आढावा...

पॉईंटर्स

- 'पाणथळ जागा' म्हणजे नदी, समुद्राची खाडी, मिठागरे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव

- पाणथळांचा जैविक विविधतेशी घनिष्ट संबंध

- २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराण मधील 'रामसर' येथे परिषद झाली

- रामसर करारावर १६८ देशांनी स्वाक्षरी केली

- जगभरातील २१७७ पाणथळांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला

- यंदाच्या दिनाची संकल्पना - हवामान बदल आणि पाणथळ

- पाणथळांमुळे शेती व त्यापूरक उद्योग जोरात

रामसर स्थळे

'रामसर' स्थळे ही जगविख्यात संकल्पना आहे. १९७१ मध्ये इराणमधील रामसर शहरात जागतिक पर्यावरण परिषद झाली. त्यात पाणथळांच्या संरक्षणाविषयी विचारमंथन केले गेले. याच परिषदेत पाणथळांना रामसर हा दर्जा देण्याचे निश्चित झाले. ही स्थळे जगभरात नावाजली जातात. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील अभ्यासक, पर्यटक तेथे आकृष्ट होतात. तेथील विविध विकास आणि संरक्षण कामासाठी जागतिक पातळीवरुन निधी उपलब्ध होतो. तसेच, हे ठिकाण संरक्षित करण्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यासाला मदत होते. तसेच, याठिकाणी विविध प्रकारचे संशोधन कार्य होण्यासही चालना मिळते.

उत्तर महाराष्ट्रातील पाणथळे

नाशिक जिल्हा

नांदूरमध्यमेश्वर, गंगापूर धरण, ओझरखेड, गिरणा धरण, भावली, चणकापूर

जळगाव जिल्हा

हतनूर धरण, वाघूर धरण, मेहरुण तलाव

नंदुरबार जिल्हा

नर्मदा, तापी, पांझरा, बोरी या प्रमुख नद्यांवरील उकाई, सरदार सरोवर, प्रकाशा आणि सारंगखेडा येथील बॅरेजेस

धुळे जिल्हा

नकाणे, डेडरगाव, सोनवद, निमडाले

भारतातील रामसर पाणथळे

ठिकाण...राज्य....घोषणा....क्षेत्र (चौरस किलोमीटर)

अष्ठमुडी...केरळ...१९ ऑगस्ट २००४....६१४

भितारकणिका..ओडिसा...१९ ऑगस्ट २००२....६५०

भोज....मध्यप्रदेश....१९ ऑगस्ट २००२....३२

चंद्रताल.....हिमाचल प्रदेश...८ नोव्हेंबर २००५.....४९

चिल्का सरोवर....ओडिसा...१ ऑक्टोबर १९८१....११६५

दीपूर बील....आसाम....१९ ऑगस्ट २००२....४०

पूर्व कोलकाता....पश्चिंम बंगाल....१९ ऑगस्ट २००२....१२५

हरिके....पंजाब.....२३ मार्च १९९०....४१

होकेरा....जम्मू व काश्मिर.... ८ नोव्हेंबर २००५....१३.७५

कांजली....पंजाब....२२ जानेवारी २००२....१.८३

किओलदेव राष्ट्रीय पार्क....राजस्थान.....१ ऑक्टोबर १९८१.....२८.७३

कोल्लेरु तलाव.....आंध्र प्रदेश.....१९ ऑगस्ट २००२.....९०१

लोकटाक तलाव.....मणिपूर......२३ मार्च १९९०.....२६६

नालसरोवर पक्षी अभयारण्य....गुजरात...२४ सप्टेंबर २०१२....१२३

पॉईंट कालीमेरे....तामिळनाडू....१९ ऑगस्ट २००२....३८५

पोंग डॅम तलाव...हिमाचल प्रदेश....१९ ऑगस्ट २००२....१५६

रेणुका तलाव....हिमाचल प्रदेश....८ नोव्हेंबर २००५.....२

रोपर....पंजाब....२२ जानेवारी २००२.....१३.६५

रुद्रसागर....त्रिपुरा....८ नोव्हेंबर २००५....२.४

सांभर....राजस्थान....२३ मार्च १९९०...२४०

संस्थमकोट्टा....केरळ....१९ ऑगस्ट २००२....३.७३

सुरिनसर मनसर...जम्मू व काश्मिर...८ नोव्हेंबर २००५....३.५

त्सोमोरिरि....जम्मू व काश्मिर...१९ ऑगस्ट २००२....१२०

अप्पर गंगा घाट....उत्तर प्रदेश....८ नोव्हेंबर २००५....२६५

वेंबनांद कोल...केरळ....१९ ऑगस्ट २००२....१५१२

वुलर......जम्मू व काश्मिर...२३ मार्च १९९०.....१८९

दिनाच्या संकल्पना

२०१८ शहरांच्या शाश्वत भविष्यासाठी पाणथळे

२०१७ आपत्तींचे धोके कमी करण्यासाठी पाणथळे

२०१६ शाश्वत जीवन आणि आपल्या भविष्यासाठी पाणथळे

२०१५ पाणथळे आपल्या भविष्यासाठी

२०१४ पाणथळे आणि शेती

२०१३ पाणथळे आणि जल व्यवस्थापन

२०१२ पाणथळे आणि पर्यटन

२०११ पाणथळे आणि जंगल

२०१० पाणथळे, जैवविविधता आणि हवामान बदल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुप्रिया तुपे ठरली ‘कुमार महाराष्ट्र केसरी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे २८ ते ३० जानेवारीदरम्यान झालेल्या ४१ व्या महाराष्ट्र महिला कुमार गट केसरी (सबज्युनिअर) राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत, बेलू (ता सिन्नर) येथील व गुरू हनुमान आखाडा साकूर फाट्याची पैलवान सुप्रिया बहिरू तुपे हिने महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत ६१ किलो वजनगटात कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती व पुण्याच्या महिला कुस्तीपटूंचा पराभव करून सुप्रियाने हा किताब जिंकला. कुमार महिला महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारी ती नाशिकची पहिली मल्ल ठरली आहे.

स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष नागनाथ देशमुख उपस्थित होते. सुप्रिया तुपे सध्या साकूर फाटा (ता. इगतपुरी) येथील गुरू हनुमान आखाडा या कुस्ती केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक प्रवीण सूर्यवंशी, वडील बहिरू तुपे आदींचे तिला मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णधवलाहुनि रंगीत उत्कट!

0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : एखादे चित्र बघत असताना ते कृष्णधवल असेल तर तितके सुखावह वाटत नाही. परंतु, तेच रंग भरून डोळ्यांसमोर आणले तर त्याचे सौंदर्य नजरेत भरते. ही किमया साधली आहे ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी. १९७० मध्ये एका कॉमिक्ससाठी त्यांनी रेखलेल्या कृष्णधवल बुद्ध चित्रकथेत २०१९ मध्ये रंगाच्या रुपाने प्राण फुंकले आहेत. त्यामुळे 'कृष्णधवलाहुनि रंगीत उत्कट' असा फिल या चित्रांना येत आहे.

रंग हे सृष्टीला मिळालेले एक वरदान आहे. रंग नसतील तर हे जीवन ओकेबोके झाले असते. हाच नियम साहित्यालाही लागू होतो. चौसष्ट कलांपैकी एक असलेले चित्रकला माध्यम हाताळताना चित्रांना रंग भरले जातात, तेव्हा ते अधिक आकर्षक दिसते. व्यंगचित्रकार सोनार यांनी एका कॉमिक्ससाठी बुद्धाची जीवनकथा रेखली होती. १९७० चा तो काळ. त्यावेळी प्रिंटिंग क्षेत्रात आजइतकी क्रांती झालेली नव्हती. छापील स्वरुपात जे बघायला मिळायचे ते कृष्णधवलच असायचे. इतकेच काय तर त्यावेळी चलचित्रेदेखील रंगविहीनच होती. पर्याय नसल्याने त्यालाच कलारसिक गोड मानून घ्यायचे. परंतु, काळ बदलला. संगणक आले, डिजिटायजेशनचे युग आले आणि माध्यमांनीही कूस बदलली. कृष्णधवलाचे रुपांतर सप्तरंगात होऊ लागले. 'मुगल-ए-आझम' हा दिलीपकुमार-मधुबाला अभिनीत चित्रपटदेखील रंग लेऊन पुन्हा दाखवण्यात आला.

पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली कृष्णधवल चित्रे ज्ञानेश सोनार यांनी चित्तवेधक रंग भरून पुन्हा समोर आणली आणि पुन:प्रत्ययाचा आनंद त्यातून झळकू लागला. माध्यमांची स्थित्यंतरे या रुपाने आपल्यासमोर सोनार यांनी आणली आहेत. सोनार यांनी त्यांच्या 'ऑथेल्लोचा मृत्यू' या कादंबरीसाठीही अशी रंगीत चित्रे रेखाटली असून, बुद्ध चित्रकथेप्रमाणेच ती अतिशय आकर्षक वाटतात.

अंदाजे सत्तर साली रेखाटलेली ही बुद्ध चित्रकथा. जवळपास बत्तीस पानांचे हे कॉमिक्स बुक होते. मुळात सर्व चित्रे 'ब्लॅक अँड व्हाइट' पण, मधल्या काळात थोडा वेळ मिळाला म्हणून रंगीत केली. त्यातली ही काही रेखाटने. रेषा सौंदर्य, कथासार, भाषामांडणी कशी असावी हे कळावे व प्रेरणा मिळावी हा हेतू.

-ज्ञानेश सोनार, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेतखेळाडूंच्या क्षमतेची कसोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ३९ वी राष्ट्रीय मास्टर्स मैदानी स्पर्धा १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान पंचवटी परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात सुरू असून, स्पर्धेत देशभरातील १६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून आयर्नमॅन तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली. स्पर्धेत दिल्ली, हरियाना, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर अशा १७ राज्यांमधील १ हजार ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेत १०० मीटरपासून १० हजार मीटरपर्यंत धावण्याची शर्यत, तसेच लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, तीन आणि ५ किलोमीटर चालणे, ४ बाय ४०० रिले, ४ बाय १०० रिले आदी प्रकार आहेत.

३५ वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग

स्पर्धेसाठी ३५ वर्षांपुढील वयोगटातील खेळाडू पात्र आहे. त्यामुळे स्पर्धेत १०० वर्षे वयोगटापर्यंतचे खेळाडू सहभागी होऊ शकतात. महिला खेळाडूंची निवासव्यवस्था विभागीय क्रीडा संकुलात, तर पुरुष खेळाडूंची व्यवस्था जनार्दन स्वामी आश्रम, स्वामीनारायण मंदिर व परिसरातील काही खासगी हॉटेलांमध्ये करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील २० पंच उपस्थित असून,, त्यांना नाशिकमधील २० पंच सहाय्य करीत आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी ७० स्वयंसेवकांची टीम कार्यरत आहे. स्पर्धेत श्रीलंकेतील ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एलआयसीचे वरिष्ठ विभागीय अधिकारी तुलसीदास गडपाले, रतन चावला, नीलेश गुरुळे, शिवाजीराव निरगुडे, शिक्षक नेते संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ विश्वात : अपर्णा शिंदे

0
0

शिस्त

"शिस्त.... नाही! ती लांबच ठेवायची." जेव्हा वस्तीतल्या मुलांसोबत असेल, तेव्हा हे वाक्य मनातल्या मनात कितीतरी वेळा घोकले होते. तरी ते अंमलात आणणे कठिण दिसत होते. "अरे यार, नीट बसा, मारू नका एकमेकांना, नाक पुसायला रुमाल आणायचा ना! एकमेकांवर थुंकू नका रे, अरे हे करू नका, अरे ते करू नका." सारखे असे बोलल्यामुळे आमच्या शिकवण्यात सारखा व्यत्यय येत होता. अर्थात, माझ्यामुळेच.

हो. खरंच. कारण आपण बसण्याचे, बोलण्याचे, वागण्याचे एवढे नियम लावून घेतलेत की आपल्याला जराही वर खाली झाले तर सहन होत नाही. माझेही सुरुवातीला असेच होत होते. लहानपणापासून घोटून घोटून स्वतःला लावून घेतलेली शिस्त. तीच शिस्त ही मुले थोड्याफार दिवसांत लावून घेतील अशी अपेक्षा केली तर होती. येथे मान्य करायला हरकत नाही की अशी अपेक्षा करणे जरा चुकीचेच होते.

शिस्त हा शब्द सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही आहे. जवळजवळ सगळ्या मोठ्या माणसांना असे वाटत असते की त्यांना खूप शिस्त आहे. लहानपणापासून आम्ही कसे शिस्तीत वाढलो, नियम कसे व्यवस्थित पाळले, वगैरे वगैरे आपण नेहमीच ऐकत असतो, याउलट लहानपणी आपण सगळ्यांनी काहीना काही नियम नक्कीच मोडलेले असतात. बेशिस्त वागून शिक्षकांच्या नाकी नऊ आणलेले असतात. पण हे आपल्या मुलांना शक्यतो कोणी सांगत नाही. मीसुद्धा असाच विचार करायचे. निदान भारतात तरी लहानांनी मोठ्यांचे ऐकायचे, उलट बोलायचे नाही, प्रश्न विचारायचे नाहीत अशी शिस्त असली तरी पुरे. पण अशी शिस्त मला बिलकुल आवडत नाही. नाहीच आवडत. मोठ्यांचा आदर असणे वेगळे आणि त्यांच्या 'हो ला हो' करणे वेगळे. मागेच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलाकडे विचार करण्याची क्षमता असते आणि जो विचार करतो त्याला प्रश्न पडतात आणि पडायलाच हवेत. मला मारून मुटकून शिस्त लावलेली आवडत नाही. कारण भीतीपोटी मुले आपले म्हणणे ऐकतीलही, पण त्याला काही अर्थ उरत नाही. कारण तिथे प्रेम आणि आदर असतोच असे नाही.

अर्थात यावर मला उपाय शोधणे गरजेचे होते. कारण शिकवण्यासाठी वेळ कमी पडत होता आणि आम्ही एकमेकांना लवकरच कंटाळलो असतो. यावेळी मदतीला धावून आले 'शुभदा जोशी' यांनी अनुवाद केलेले 'सकारात्मक शिस्त' हे पुस्तक. 'आनंद निकेतन' शाळा दरवर्षी शाळा सुरू होण्याआधी आपल्या ताईंसाठी (शिक्षिका) शिबिराचे आयोजन करत असते. त्यात वेगवेगळे विषय चर्चिले जातात. यावर्षी मलाही या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात 'मुलांची शिस्त' हा विषय शुभदा जोशींनी घेतला होता. त्यांची मांडणी खूप अभ्यासपूर्ण होतीच पण त्यांना मुलांबद्दल खुप प्रेमदेखील होते. तेच त्यांच्या कामात दिसत होते. मला हे जवळचे वाटत होते कारण त्यांची शाळाही झोपडपट्टीतील मुलांसाठी चालवलेली होती. त्यात त्यांनी यशस्वी असे शिस्तीचे प्रयोग केले होते. त्यातील पहिला मंत्र हा 'प्रेम आणि संयम' हाच आहे.

आपला मुद्दा मुलांना प्रेमाने समजावून सांगायचा, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांना हे का नकोसे वाटते किंवा त्यांना हे का करावेसे वाटत नाही ते विचारायचे. मीसुद्धा तेच केले. अभ्यास सुरू करण्याआधी मुलांशी स्वच्छतेबद्दल बोलणे सुरू केले. ती का गरजेची आहे, ते मुलांना हळूहळू पटत गेले. अर्थात क्लासला येताना हात, चेहरा स्वच्छ धुवून यायचा हा नियम केला आणि जे आठवणीने धुवून यायचे त्यांचे कौतुक सुरू केले. हा उपाय लागू पडला. मुलांना स्वतःचे कौतुक केलेले आवडते आणि त्यासाठी ते नेहमी प्रयत्न करायला तयार असतात. एके दिवशी आम्ही अभ्यास झाल्यावर नियम लिहायला घेतले. स्वच्छता हा विषय घेतला. त्यात दात घासणे, नखे कापणे, रुमाल सोबत ठेवणे, असे लहान नियम बनवले.

(लेखिका चळवळीतील कार्यकर्त्या आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या पाऊलखुणा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर गावाच्या परिसरातील वसंत कानेटकर उद्यानाच्या समोरील भागात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले असून, सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला आहे. या भागात राहणाऱ्यांनी, तसेच फिरायला येणाऱ्यांनी रात्री व पहाटे एकट्याने जाऊ नये. बिबट्यापासून सतर्क रहावे, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.

गंगापूर, मखमलाबाद, वसंत कानेटकर उद्यान, मोतिवाला कॉलेज परिसर, गंगापूर रोड येथील नदीलगत या परिसरात आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. वन विभागाला गंगापूर गावाजवळील कानेटकर उद्यानाच्या समोरील भागात बिबट्याचे ठसेही आढळले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यापूर्वी गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगरात झालेल्या बिबट्याच्या थरारातून नागरिक अद्यापही सावरलेले नाहीत. या ठिकाणी बिबट्याला जेरंबद करण्यात वन विभागाला यश आले असले, तरी गंगापूर रोड जवळील सुयोजित गार्डन परिसरात गुरुवारी रात्री बिबट्या दिसल्याचे वन विभागाला नागरिकांनी सांगितले. या माहितीनुसार त्या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वन विभागाने सांगितले आहे. पुन्हा बिबट्या भरवस्तीत येऊ नये, यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभागाने गस्त वाढविली आहेत. बिबट्याला जेरंबद करण्यासाठी चांदशी शिवारात यापूर्वीच पिंजरा लावला असून, गुरुवारपासून गंगापूर शिवारातही पिंजरा लावण्यात आला आहे.

(संबंधित वृत्त... प्लस-४)

गंगापूर गावाच्या परिसरात आढळलेल्या बिबट्याने एक भक्ष्य फस्त केले आहे. त्या ठिकाणी तो पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. बिबट्या दिसल्यास अथवा चाहुल लागल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे.

- विजय शेळके, मुख्य वन संरक्षक

मुक्त विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या शेतांमध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. नागरिकांनीही त्या ठिकाणी बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे पिंजरा लावला आहे. वन अधिकारी येथे गस्त घालत आहेत.

- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् स्टेशनवर तपासणी झालीच नाही

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडसह प्रमुख रेल्वेस्थानकांमध्ये १ फेब्रुवारीपासून विमानतळाप्रमाणे गाडी सुटण्याच्या वीस मिनिटे अगोदर प्रवाशांची तपासणी करण्याचे रेल्वेने जाहीर केले होते. एकीकृत सुरक्षा प्रणाली (इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टिम-इएसएस) पुरेसे मनुष्यबळ आणि साधनांअभावी नाशिकरोडला सुरू झालीच नाही.

कुंभमेळ्यानिमित्त अलाहाबाद तसेच हुबळी रेल्वेस्टेशनवर अशी प्रणाली सुरू झाली आहे. देशातील दोनशे प्रमुख स्थानकांसह भुसावळ विभागातील भुसावळ, मनमाड, नाशिक, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा स्थानकात १ फेब्रुवारीपासून ही प्रणाली लागू करण्याचे नियोजन होते. परंतु, बहुतांश सर्वच स्टेशनवर पुरेशा तयारीअभावी ही प्रणाली लागू करण्यात आली नाही. नियोजन करताना रेल्वे प्रशासनाने अपेक्षित मनुष्यबळ आणि सुरक्षा साधने उपलब्ध केली नसल्याचे समोर आले आहे.

तथापि, पूर्वतयारी म्हणून ८५ सीसीटीव्ही कॅमेरे नाशिकरोड स्टेशनमध्ये बसविण्यात आले असून, सिन्नरफाटा येथे सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. मात्र, मेटल डिटेक्टर, स्कॅनर बसविण्यात आलेले नाहीत. स्टेशनच्या चारी बाजूला भिंत नाही. टीसी, पोलिसांसह मनुष्यबळही वाढवणे गरजेचे आहे. या गोष्टी झाल्यानंतरच चेकिंग प्रणाली कार्यान्वित करणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवीन प्रणालीनुसार गाडी येण्याच्या वीस मिनिटे आधी प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर पोहचणे अपेक्षित आहे. पोहचल्यानंतर त्यांची तपासणी सुरक्षा यंत्रणा करणार आहे. तपासणी झाल्यानंतरच रेल्वेगाडीत प्रवेश दिला जाईल. यासाठी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस बाम्ब शोध पथक आदींची मदत घेतली जाणार आहे.

प्रवाशीही अनभिज्ञ

आजपासून रेल्वेस्टेशनवर तपासणी होणार असल्याची कल्पनाच प्रवाशांना नव्हती. सकाळी पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी रेल्वेगाड्या येताच प्रवाशांची नेहमीप्रमाणे धांदल उडाली. गाडी पकडण्यासाठी चढाओढ लागली. जागा पकडण्यावरुन वाद झाले. या गाडीतून हजारावर प्रवासी प्रवास करतात. पुरेसे मनुष्यबळ आणि साधने नसल्याने सुरक्षा यंत्रणांनी या गर्दीपासून दूर राहणेच पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांचा कर्दनकाळ

0
0

गंगापूररोड : गंगापूर, गोवर्धन शिवारातही दोन बिबट्यांचा वावर असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. गोवर्धन शिवारात रमेश टिळे यांच्या शेतात बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली असून, ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वन विभागाने जागेची पाहणी करीत येथे पिंजरा लावला आहे. याआधीही वाइनरींकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. दाट वृक्षांचा परिसर असल्याने बिबट्या अन्न-पाण्याच्या शोधात पाळीव जनावरे व कुत्र्यांना लक्ष्य करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी जनावरांसाठी तारकपाऊंडची उभारणी सुरु केली आहे. टिळे यांच्या शेतात बिबट्याने ४ फूट उंचीच्या महागड्या श्वानावर ३० जानेवारीला रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी हल्ला केला. तब्बल ३ वेळा हल्ला केल्यावर कुत्रा बिबट्याच्या तावडीत सापडला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेताच्या बाजूला बिबट्याने फस्त केलेल्या जनावरांची हाडे सापडली आहेत. त्र्यंबकरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग परिसरात शेकडो एकरच्या दाट

झाडीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. अन्न, पाण्याच्या शोधात अनेकदा बिबट्याने पिंपळगाव बहुला शिवारातील जनावरे व श्वानांना लक्ष्य केले आहे. पिंपळगाव बहुला शिवारातील गणेश बोडके यांच्या शेतात बिबट्याने कुत्रा फस्त केला.

बिबट्या आला रे आला...

गेल्याच महिन्यात २५ जानेवारीला गंगापूररोडवरील ऋषिकेश रेव्हिरा इमारतीच्या समोर बिबट्या जेरबंद करण्यात आला. यानंतर बिबट्याचा शहरात अनेक भागात शिरकाव असल्याने रहिवाशांचे म्हणणे होते. शुक्रवारी पुन्हा गंगापूररोड भागातील कानेटकर उद्यानात बिबट्या आल्याची अफवा दिवसभर पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक येथे पाचपासून नेमबाजी प्रशिक्षण शिबिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखान्याच्या शूटिंग रेंजवर विनर्स शूटिंग क्लबच्या सहकार्याने पाच ते दहा फेब्रुवारीदरम्यान एअर रायफल पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षण शिबिर होणार आहे. शिबिरात आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रद्धा नालमवार मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण केंद्रावर १० मी. एअर रायफल व एअर पिस्तूल या दोन ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वय वर्षे ११ च्या पुढील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकते. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. महाविद्यालय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठीही या शिबिराचा फायदा होईल, असे नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व सचिव राधेश्याम मुंदडा यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी नाशिक जिमखाना कार्यालयाशी, तसेच ८५५१०४२२४६, ०२५३-२५८१०८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक टू गोवा’ हवाईसेवा दृष्टिपथात

0
0

मटा विशेष

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Twitter - @BhaveshBMT

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून गोवा विमानसेवेला असलेला अडथळा आता दूर होणार आहे. ओझर विमानतळावर नाइट लँडिंगच्या सुविधेची पाहणी करण्यासाठी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) पथक ओझरला येणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात स्पाइसजेट कंपनीची गोवा आणि हैदराबाद विमानसेवा सुरू होणार आहे.

उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून गोवा आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची विमानसेवा देण्यासाठी स्पाइसजेट या आघाडीच्या कंपनीची निवड झाली आहे. गोवा येथे रात्रीचा स्लॉट उपलब्ध झाला आहे. ओझर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा आहे. सुखोई व अन्य लढाऊ विमानांची चाचणी याठिकाणी सातत्याने घेतली जाते. मात्र, प्रवासी विमान वाहतुकीसाठी नाइट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी डीजीसीएचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सध्या ओझर विमानतळाकडे नाही. त्यामुळेच गोवा आणि हैदराबाद ही विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. याची दखल घेण्यात आली असून, आता डीसीजीएचे पथक येत्या २ ते ३ दिवसांत ओझर विमानतळावर येऊन येथील सुविधांची पाहणी करणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल डीजीसीएला दिला जाणार असून, डीजीसीएकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विमानतळाची मालकी आणि देखभाल हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे (एचएएल) आहे. हे प्रमाणपत्र आठवडाभरात प्राप्त होऊन महिन्याभरात गोवा आणि हैदराबाद सेवा सुरू होईल, असे हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एचएएलच्या अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

ओझर विमानतळाची वैशिष्ट्ये

- धावपट्टीची लांबी तीन हजार मीटर तर रुंदी ६०\B \Bमीटर

- धावपट्टीची लांबी चार हजार\B \Bमीटर तर रुंदी ७५\B \Bमीटर प्रस्तावित

- जगातील सर्वात मोठे विमान सध्या उतरू शकते किंवा टेक ऑफ घेऊ शकते

- नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध

ओझर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा आहे. त्याचे परीक्षण करण्यासाठी डीजीसीएचे पथक येणार आहे. त्यांनी त्याविषयी कळविले आहे. आजच मी एचएएल अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

ओझरला रात्रीही विमाने ये-जा करतात. पण, व्यावसायिक खासगी कंपन्या नियम पाळण्याला प्राधान्य देतात. हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमाणपत्र लवकरच प्राप्त होऊन गोवा विमानसेवा सुरू होईल.

- राधाकृष्णन् बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीजींनी जीवनाचे वेगळे तत्त्वज्ञान मांडले

0
0

ज्येष्ठ विचारवंत अरुण ठाकूर यांचे प्रतिपादन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांधीजी ब्रिटिशांच्या विरोधात नव्हते, तर ते ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात होते. व्यक्तीचे स्वायत्त होणे हा गांधीजींच्या चळवळीचा उद्देश होता. त्यांनी जीवनाचे वेगळे तत्त्वज्ञान मांडले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरुण ठाकूर यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महात्मा गांधी विचारमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या २ तारखेला ही विचारमाला आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेत पाचवे पुष्प ठाकूर यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उदयकुमार मुंगी यांची उपस्थिती होती.

ठाकूर पुढे म्हणाले की, गांधीजींनी समूहभावनेने कधीही कुणालाही आवाहन केले नाही. प्रत्येक व्यक्तीचे मनातून स्वतंत्र होणे त्यांना हवे होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक व्यक्तीसाठी लढण्याला प्राधान्य दिले. ते यंत्राच्या विरोधात कधीही नव्हते तर यंत्रवादाचा विरोध त्यांनी केला. ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत होते, त्यांनी तेथे वकिली केली असली तरी 'मी कधीही चांगला वकील नव्हतो' असे ते म्हणायचे. सरकारी बाबूचे जीवन आदर्श असते असे समजून ते सुटाबुटात वावरायचे परंतु, तेदेखील चूक होते हे त्यांना कळाल्यावर त्यांनी ते सोडून दिले. सन १९१५ मध्ये ते भारतात आले आणि दारिद्र्याने गांजलेल्या लोकांचे ते नेते बनले, असेही ठाकूर म्हणाले.

अॅड. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक केले. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. देवदत्त जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सावानाच्या माधवराव लिमये हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

...

...अन् गांधीजींचा अभ्यास सुरू केला!

मी १९६९ मध्ये कॉलेजला असताना दंगली झाल्या होत्या. तेव्हा गांधीजींविषयी कुणीही चांगले बोलायचे नाही. मीदेखील त्यांच्याविषयी आगपाखड करीत असे. एकदा पटेल सरांसमोर मी गांधीजींविषयी काहीतरी बोललो तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. म्हणाले, 'गांधीजींना रोज हजारों पत्र यायची, त्यातील प्रत्येक पत्र हे दु:ख सांगणारे असायचे. गांधीजी त्या प्रत्येकाला एका ओळीचे का होईना उत्तर द्यायचे. त्या हजारों लोकांना गांधीजींशी आपली अडचण वाटून घ्यावी वाटायची, तुम्हाला कुणी स्वत:चे दु:ख सांगण्याइतके विश्वासार्ह समजते का?' त्याक्षणी माझे डोळे खाडकन उघडले. मी गांधीजींबद्दल विचार करावयास लागलो, तेथून पुढे अभ्यास सुरू झाला. अशी आठवण ज्येष्ठ विचारवंत अरुण ठाकूर यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, स्वाइन फ्लू परतला!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धोकादायक ठरणारा स्वाइन फ्लू दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या आजाराने २०१९ मध्ये अद्याप मृत्यू झालेला नसला तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिसून येत आहे. याचमुळे गेल्या वर्षीच्या अखेरीस बंद करण्यात आलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्ष जानेवारीपासून सुरू झाला असून, आजमितीस येथे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्दी-पडसे, डोकेदुखी अशी साधारण लक्षणे असलेल्या स्वाइन फ्लूमुळे २०१८ मध्ये तब्बल ९१ जणांचे मृत्यू झाले होते. २००९ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यूंची नोंद गेल्या वर्षी झाली होती. ऑक्टोबर २०१८ पर्यंत या आजाराने धुमाकूळ घातला. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मात्र स्वाइन फ्लूने विश्रांती घेतली. याचमुळे सिव्हिल हॉस्पिटलने सुरू केलेला स्वाइन फ्लू वॉर्डही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जानेवारी महिना उजाडताच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले. जानेवारीच्या २८ तारखेपर्यंत १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातील दोन रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर ११ रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. आजमितीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारीपर्यंत समोर आलेल्या रुग्णांमध्ये निफाड, नाशिक आणि येवला तालुक्यातील प्रत्येकी एक, नाशिक शहरातील पाच, मालेगाव शहरातील चार आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा १३ रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

सध्या वातावरणात आमूलाग्र बदल होत असून, थंडी आणि वाढते तापमान याचा थेट परिणाम एचवन एनवन स्वाइन फ्लू या आजारावर पडतो. दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत असल्याने आगामी काही काळात या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. सर्दी-पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

यांनी असावे सावध

हा आजार हवेमार्फत पसरतो. हा विषाणुजन्य आजार असून, पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण, यकृत मूत्रपिंड यांचे आजार, दीर्घकाळ औषध घेणाऱ्या व्यक्तींनी याबाबत सावध राहावे.

अशी घ्यावी काळजी

या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी-डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची अशी लक्षणे दिसून येतात. आजाराची लक्षणे समोर येताच रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असते. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लू हे प्रभावी औषध उपलब्ध आहे. हा आजार टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टिक आहार, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या असा आहार घ्यावा. हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलटतपासणी मिळकतधारकांची!

0
0

वादग्रस्त करआकारणीवर सुनावणी; हरकती नोंदविण्यासाठी उसळली गर्दी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींपैकी कर विभागाने वाढीव दरासह दंडात्मक करआकारणीच्या नोटीस बजावलेल्या ४९ हजार मिळकतींवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. महापालिकेने बजावलेल्या ४९ हजारपैकी १९ हजार मिळकतधारकांनी या नोटिसांवर कायदेशीरदृष्ट्या हरकत घेतली असून महापालिकेने या हरकतींची तपासणी सुरुवात केली आहे.

नाशिकरोड आणि शनिवारी नाशिक पश्चिम विभागातील मिळकतधारकांची सुनावणी कर उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्या उपस्थितीत झाली. महापालिकेने केलेल्या चुका नागरिकांनी निदर्शनास आणून देण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी केली. प्रातिनिधीक स्वरुपात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले जात असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात आदेश क्र. ५२२ काढत शहरातील कररचनेत पाच ते सहा पट वाढ केली होती. त्याचा सर्वाधिक मोठा फटका हा मिळकत सर्वेक्षणात आढळेल्या ५९ हजार मिळकतींना बसला होता. कराच्या जंजाळात न अडकलेल्या या मिळकतींना लाखांची बिले गेली. त्यामुळे एकच आगडोंब उसळला होता. महासभेने या करवाढीला मुंढे यांच्या कार्यकाळात दोनदा स्थगिती दिली. मात्र, मुंढेंनी ही स्थगिती फेटाळून लावत, मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. त्यामुळे कर विभागाने जवळपास ४९ हजार मिळकतींना नोटीस बजावली आहे. त्यात २२ हजार मिळकती या अधिकृत तर २७ हजार मिळकती या अनधिकृत असल्याचे कर विभागाच्या तपासणी आढळले आहे. दरम्यान, महासभेने आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच महासभेत करवाढीला पुन्हा स्थगिती दिली. परंतु, ५९ हजारपैकी नोटीस दिलेल्या ४९ हजार मिळकतधारकांना आलेल्या नोटिसांना उत्तर द्यावेच लागेल, असे स्पष्टीकरण गमे यांनी दिले होते. त्यामुळे महापालिकेने नोटीस बजावलेल्या ४९ हजार पैकी १९ हजार मिळकतधारकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

महापालिकेने स्थगिती दिल्याने हरकतींवर सुनावणी घ्यायची की नाही, याबाबत प्रशासन संभ्रमात होते. परंतु, कर विभागाने या आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयात शुक्रवारी ६०० मिळकतधारकांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर नाशिक पश्चिम विभागातील शनिवारी ४०० मिळकतधारकांची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत, महापालिकेच्या नोटिसा कशा चुकीच्या आहेत, हे पुराव्यासह सादर केले आहे. त्यामुळे महापालिकेसमोरील पेच अधिकच वाढला आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सिडको, सातपूर, नाशिक पूर्व आणि पंचवटीतील सुनावणी घेतली जाणार आहे.

या आहेत हरकती

प्रत्यक्ष आणि नोटीस यातील क्षेत्रफळात त्रुटी

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना नोटिसा

मिळकतीवर बिल्डराचेच नाव असणे

बिल्डरांकडून हस्तांतरण पूर्ण न होणे

सहा वर्षांच्या दंडाला आव्हान

कर विभागाकडून अन्यायकारक नोटिसा

महापालिकेने सर्वेक्षणात आढळलेल्या आणि नोटीस दिलेल्या ४९ हजारपैकी १९ हजार मिळकतधारकांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर प्रातिनिधिक सुनावणी घेतली जात आहे. या सुनावणींवरून अंदाज काढता येणार आहे. नागरिकांची बाजू ऐकून घेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- डॉ. महेश डोईफोडे,

उपायुक्त, कर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images