Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मद्यासाठी केला हात फ्रॅक्चर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्यसेवनास पैसे दिले नाही, या कारणातून बेदम मारहाण करीत दोघांनी खासगी वाहनचालकाचा हात फ्रॅक्चर केला. ही घटना आनंदवली भागात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक शेवरे आणि चार्ली गायकवाड (रा. आनंदवली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महिंद्राचे कॅन्व्हॉय वाहने पोहचविणाऱ्या कैलास दगा धोंडगे (रा. आनंदवली) यांनी तक्रार दिली. धोंडगे हे शनिवारी (दि. ९) रात्री नेहमीप्रमाणे कॅन्व्हाय वाहन आपल्या घराकडे घेऊन येत असताना ही घटना घडली. घराजवळ दोघा संशयितांनी त्यांना अडवून मद्यसेवनासाठी पैशांची मागणी केली. धोंडगे यांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या दीपकने हातातील लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या हातावर मारून हात फॅक्चर केला. तर चार्ली गायकवाड याने शिवीगाळ करीत धोंगडे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. 'तू येथे कसा राहतो', दमबाजी सुद्धा संशयितांनी केली.

सातपूर कॉलनीमध्ये

४० हजाराची घरफोडी

कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सातपूर कॉलनीत घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भानूदास जगन्नाथ महांगडे (रा. आनंदछाया सोसा. बळवंतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महांगडे कुटुंबीय ४ ते ९ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले. या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

मांस विक्रेता ताब्यात

बंदी असतांना गोवंश मांस विक्री करणाऱ्या १७ वर्षांच्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलावर दंडात्मक कारवाई करून त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

बागवानपुरा भागात राहणारा हा युवक रविवारी सकाळी राजवाडा येथे भागात गोवंश मांस विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस शिपाई राजेश महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन दुचाकी लंपास

शहरात पार्क केलेल्या दोन दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मखमलाबाद येथील सोमनाथ हरिभाऊ पिंगळे यांच्या तक्रारीनुसार, २९ डिसेंबर रोजी कामानिमित्त पिंगळे सीबीएस भागात आले. प्रिया हॉटेल परिसरात त्यांनी आपली प्लेझर (एमएच १५ सीपी ४२२२) दुचाकी उभी केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. दुसरी घटना बनकर मळ्यात घडली. नंदिनी पूल परिसरातील स्वप्नील रमेश वारे (रा. झेप अपार्ट. नंदिनी पूल) यांची पॅशन (एमएच १५ बीझेड १५१३) दुचाकी शनिवारी (दि. ९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नामदेव आरोटेंची अध्यक्षपदी निवड

$
0
0

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिन्नर विधानसभा अध्यक्षपदावर नामदेव आरोटे यांची निवड करण्यात आली असून, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयंत जाधव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शांताराम ढोकणे, शोभा मगर, कविता कर्डक, संजय खैरनार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित अभ्यंकरांचे उद्या व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण व सोपे विवेचन सर्वांसमोर यावे, त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. अजित अभ्यंकर यांचे बुधवारी (दि. १३) 'सावाना'च्या औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. 'अर्थसंकल्प २०१९ घोषणांचा पाऊस, खोटं काय आणि खरं काय?' या विषयावर आधारित व्याख्यान होईल.

व्याख्यानात अर्थसंकल्प भारतीयांचे जीवनमान उंचवण्यासाठी फायदेशीर आहे किंवा नाही, अर्थसंकल्पातून सामान्यांना नेमके काय मिळाले, सरकारी धोरणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन या नव्या अर्थसंकल्पामुळे बदलेल का, यासह इतर प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानातून उलगडणार आहेत. कम्युनिस्ट नेते अॅड. वसुधा कराड, सिताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, डॉ. मिलिंद वाघ, सचिन मालेगावकर यांनी व्याख्यानाचे संयोजन केले आहे. व्याख्यानास नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढ कायमच!

$
0
0

काहीअंशी दिलासा; सर्वपक्षीय नगरसेवक तोंडघशी

...

- शेतीवरील कर आकारणीला स्थगिती

- सामासिक अंतरावरील कर रद्द

- पार्किंगवरील कर आकारणी कायम

- अनधिकृत ६०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांची दंडातून सुटका

- ६०१ ते १००० चौरसफुटांच्या सदनिकांना तीनऐवजी दीड पट दंड

…...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कायम ठेवली आहे, मात्र शेतीवरील करवाढीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच, अनिधिकृत ६०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना दंडातून सूट दिली, तर ६०० चौ. फुटांपुढील घरांची दंड रक्कम तीनहून दीड पट करण्याचा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली.

गेल्या अनेक वर्षांत करवाढ झाली नाही म्हणून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. या करवाढीचा ३१ मार्च २०१८ रोजी आदेश काढण्यात आला होता. यावेळी ही करवाढ ५ रुपये चौरस फुटांवरून २२ रुपये चौरसफूट इतकी करण्यात आली होती. याबाबत जनतेत क्षोभ उसळल्यानंतर, करवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र मुंढे यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करवाढ मागे घ्यावी, अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून मुंढे यांना शुध्दीपत्रक काढण्यास भाग पाडले. ही करवाढ २२ रुपयांवरून ११ रुपये प्रति चौरसफूट करावी, असे २७ ऑगस्ट २०१८ रोजी आदेश देण्यात आले. तरीही दरवाढ जास्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यानंतर मुंढे यांची बदली झाली. राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते याबाबत सकारात्मक बदल करतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. दोन महिन्यांत अभ्यास करून निर्णय घेऊ, असे गमे यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. पूर्वी इमारतीचे मूल्यांकन करताना चटई क्षेत्राप्रमाणे करण्यात येत होते. मात्र मुंढे यांनी ते बिल्टअप एरियावर केले होते. त्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, पुन्हा चटई क्षेत्रावर करण्यात आले आहे. मिळकतीचे निर्धारण करताना नाशिक महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार इमारतीभोवती सामासिक अंतर सोडणे बंधनकारक आहे. मात्र ज्या ठिकाणी जादा क्षेत्र आढळून आल्यास उर्वरित क्षेत्रावर नियमानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. पार्किंगवरही कर आकारणी करण्यात येणार आहे.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ५९ हजार मिळकती या अनधिकृत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर दंडात्मक करवाई करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यातील ६०० चौरस फुटापर्यंत बांधकाम असलेल्या सदनिकांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या सदनिकांचे क्षेत्र ६०१ ते १ हजार चौरस फूट आहे अशा सदनिकांना मालमत्ताकराच्या ५० टक्के दराने दंड आकारण्यात येणार आहे. या सदनिकांना तीन पट दंड आकारणी करण्यात येणार होती, आता ती दीड पट झाली आहे. सुमारे १००१ चौरस फुटावर असलेल्या सदनिकांना प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या दुप्पट दराने दंड आकारणी करण्यात येणार आहे.

…..

अधिकृत अन् अनधिकृत मालमत्ता

फेरसर्वेक्षणात ५९ हजार मालमत्तांपैकी २२ हजार ५६६ मिळकती या अधिकृत आढळल्या असून, २७ हजार मिळकती या अनधिकृत आढळल्या आहेत. ३ हजार ४५२ सदनिकांमध्ये त्रुटी आहेत, तर ६ हजार सदनिकांची पडताळणी सुरू आहे.

..

महापौरांचा काढता पाय

नाशिक महापालिकेने केलेली करवाढ सरसकट मागे घ्यावी, यासाठी महासभेत दोनदा ठराव करण्यात आले. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. हा ठराव म्हणजे नागरिकांची दिशाभूल करणारा होता, अशी जनतेची भावना झाली आहे. महापौरांना याबाबत विचारले असता उत्तर न देता त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

…..

शेतीच्या कर आकारणीचा चेंडू शासनाकडे

शेतीच्या कर आकारणीबाबत जमिनीच्या व्याख्येबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शेतीवरील कर आकारणी तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे. जमिनीची व्याख्या शासनाकडून आल्यानंतर शेतीवरील कर आकारणी होणार की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

…....

नाशिक महापालिकेने शेतीवरचा कर सध्या स्थगित केला आहे. बाकी कराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

- रंजना भानसी, महापौर

...

शहरात इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे असेल, तर निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. ज्या मिळकतीचे सर्वेक्षण चुकीचे झाले आहे, त्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी महिलांचे स्वयंरोजगाराकडे पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरी कुटुंबातील महिलांना कुक्कुटपालन व तत्सम स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. नव्या तंत्रज्ञान आणि पूरक व्यवसायाची माहिती तसेच प्रशिक्षण देण्याबाबतचा सामंजस्य करार गोदरेज ॲग्रोटेक आणि जिल्हा प्रशासन यांच्यात करण्यात आला.

करारावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि गोदरेज ॲग्रोटेक सीएसआर शाखेच्या व्यवस्थापक अनाहिता भटनागर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शेतकरी कुटुंबांनी उपजीविकेसाठी केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहाता शेती पुरक व्यवसायाद्वारे आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होतात. गोदरेज अॅग्रोटेकने या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील जांबुटके, खडकीजाम, रासेगाव, उमराळे (बु), धेरवाडी, जानोरी, आशेवाडी आणि तुंगलधारा या आठ गावांमधील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. विशेषत: अशा कुटुंबातील महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यात येणार आहे. याखेरीज सरकारच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

अपारंपरिक व्यवसायांचे प्रशिक्षण

गोदरेज ॲग्रोटेकशी संलग्न असलेल्या संपदा या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील युवकांपर्यंत आवश्यक माहिती पोहचविण्याचा विशेषत्वाने प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतीतील उत्पादनवाढ, मशरूम उत्पादनासारखे अपारंपरिक व्यवसाय, पशुपालन आदींकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे प्रयत्न प्रशिक्षणाच माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती भटनागर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावशिवारात रणधुमाळी

$
0
0

जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल ते जून २०१९ या काळात मुदत संपणाऱ्या राज्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ५१ ग्रामपचायंतीचा यामध्ये समावेश आहे.

निवडणुकीसाठी गुरूवारी (दि. १४) प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अंतिम मतदार यादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार असून लोकसभा निवडणूकांपुर्वीच ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.११) जाहीर केला.

इगतपुरी तालुक्यातील ३३, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील १० ग्रामपंचयातींसह नाशिक तालुक्यातील चार, येवला तालुक्यातील दोन, मालेगाव आणि पेठ तालुक्यातील प्रत्येकी एका तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये रिक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार गुरुवारी मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर सोमवारपर्यत (दि. १८) हरकती नोंदविता येणार आहेत. दाखल हरकती व सुचना निकाली काढून २१ फेब्रुवारीला अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

तालुका संख्या

इगतपुरी ३३

त्र्यंबकेश्‍वर १०

नाशिक ०४

येवला ०२

पेठ ०१

मालेगाव ०१

एकूण ५१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसाधनगृहाचे शुल्क बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहाची व्यवस्था असूनही, महिलांकडून प्रसाधनगृह वापरासाठी शुल्क घेतले जाते. तरी अशी शुल्क वसुली त्वरित बंद व्हावी, असे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महामंडळाच्या विभाग नियंत्रक नितीन मैंद यांना देण्यात आले. शहरातील बस स्थानकात मोफत महिला प्रसाधनगृह, असे फलक लावावेत. तसेच प्रसाधनगृहाच्या सर्व ठेकेदारांना महिलांकडून शुल्क वसूल करू नयेत, असे सूचित करावे, अशा मागण्यांचे निवेदन शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी दिले. यावेळी गटनेत्या कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष शोभा मगर, डॉ. माधवी दहेकर, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, सलमा शेख, संगिता सानप, शकिला शेख, सरिता पगारे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींच्या मदतीला धावली एसटी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील वणी-मळाणे येथील सोनवणे कुटुंबातील मुलाचा विवाहसोहळा रविवारी (दि. १०) साक्री शहरात आयोजित करण्यात आला होता. यासाठी विवाहस्थळी जाण्यासाठी शहरातील एका ट्रॅव्हल्सकडून तीन खासगी बसेस बुकिंग आगाऊ रक्कम भरून दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र, विवाहाच्या दिवशी सकाळी आठवाजेपर्यंत बस वऱ्हाडीमंडळींना घेण्यासाठी न आल्याने ट्रॅव्हल्स कार्यालयाला विचारणा केली असता तीनही बस नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. यामुळे नवरदेवाच्या नातेवाइकांनी राज्य परिवहन महामंडळातील धुळे आगारप्रमुख भगवान जगनोर यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ विवाहस्थळी जाण्यासाठी दोन एसटी बस उपलब्ध करून दिल्याने वऱ्हाडींच्या मदतीला बस धावून आल्याचा प्रत्यय रविवारी आला.

धुळे तालुक्यातील वणी-मळाणे येथील संदीप सोनवणे यांचा साक्री शहरात रविवारी (दि. १०) विवाह होता. यासाठी त्यांचे बंधू सिद्धार्थ सोनवणे यांनी दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी धुळ्यातील एका टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सकडून तीन खासगी बसेसची बुकिंग केली होती. ठरल्याप्रमाणे ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकाने ३३ हजार रुपयांत तीन बस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी आगाऊ दहा हजारही देण्यात आले. मात्र, ऐन विवाहाच्या दिवशी सकाळी आठ वाजता वऱ्हाड घेण्यासाठी वणी-मळाणे गावात या बस आल्याच नाहीत. यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत वऱ्हाडीमंडळींची दमछाक झाली.

दुपारी चार वाजता लागले लग्न

तब्बल दोनशेहून अधिक जण बसची वाट पाहत बसले. मात्र, दहा वाजेच्या सुमारास व्यवस्थापकांशी संपर्क झाला आणि विवाहासाठी येणाऱ्या बसेस अचानक खराब झाल्या आहेत. पर्यायी व्यवस्था होणे शक्य नाही, असे सांगून फोन बंद केला. यामुळे विवाहासाठी जाणारे वऱ्हाडीची चांगलीच फजिती झाली. या वेळी धुळे बसस्थानकातील आगारप्रमुख भगवान जगनोर यांच्याशी संदीप सोनवणे यांनी संपर्क करून विनंती केली. पूर्ण व्यथा ऐकून घेत आगारप्रमुखांनी तत्काळ दोन बसेस उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, त्याचा सर्व खर्च हा ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकांकडून वसूल करण्यात आला. वसंतपंचमी असल्याने रविवारी मोठी लग्न मुहूर्त असल्याने बसेस उपलब्ध होणे शक्यच नव्हते. अशावेळी एसटीने वऱ्हाडींच्या मदतीला धावून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या एसटीच्या मदतीने वऱ्हाडी साक्रीला पोहोचले आणि दुपारी चार वाजता विवाहसोहळा पार पडला. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी असून, सुरक्षित व वेळेवर प्रवासाच्या सुविधा देणे आमचे कर्तव्य आहे, असे मत आगारप्रमुख जगनोर यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांच्या नावाशिवाय झोप नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पवारांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. त्यांना ‘मेनिया’ आजार झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी महाजन यांच्यावर टीका केली. आधी जळगाव जिल्ह्याचा विकास करावा मगच बारामतीचा विचार करावा, असा टोलाही सोमवारी (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत त्यांनी लगावला.

भाजपचे सोमवारी (दि. ११) शक्तिकेंद्र प्रमुखांचे संमेलन जळगावात पार पडले. या संमेलनात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषत घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, कल्पना पाटील, मंगला पाटील, अभिषेक पाटील, लीना चौधरी, ललित बागूल, अरविंद मानकरी, सलीम इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी रवींद्र पाटील यांनी सांगितले की, गिरीष महाजन यांना पवार यांचे नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. असे वाटते त्यांना ‘मेनिया’ नावाचा आजार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांचा सल्ला घेतात. अशा परिस्थितीत मंत्री महाजन यांनी पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे त्यांच्या बुद्धिची कीव कराविशी वाटते, अशा शब्दांत पाटील यांनी महाजन यांच्यावर टीका केली.

आधी जामनेर टँकरमुक्त करावे

बारामती जिंकण्याची भाषा करण्याआधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आधी जळगाव जिल्ह्याचा विकास करावा. त्यांचा जामनेर तालुका टँकरमुक्त करावा. जिल्ह्यात समांतर रस्ते, सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. भयावह पाणीटंचाई असून, चारा छावण्या नाहीत, शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. पिण्याचे पाण्याचीदेखील समस्या निर्माण झाली आहे. महाजनांनी आधी या प्रश्नांकडे लक्ष द्यावे मगच बारामतीचा विचार करावा, असा टोलाही अॅड. पाटील यांनी लगावला. जळगाव जिल्ह्यात विकास कामे करण्याचे सोडून महाजन यांच्यासह भाजपचे नेते राजकीय गप्पांच्या फुशारकीत मशगूल झाले आहेत. त्यांनी या राजकीय गप्पा मारण्यापेक्षा विकासकामांची वस्तुस्थिती सांगावी असेही पाटील म्हणाले.

उमेदवार जाहीर करायचे नसतात

विरोधकांना उमेदवार मिळत नसल्याची टीका माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही जागांसाठी उमेदवार तयार आहेत. पण ते उमेदवार असे लगेच जाहीर करायचे नसतात, असेही रवींद्र पाटील यांनी सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व जळगाव शहर युवक काँग्रेसकडून वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात उद्या (दि. १३) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवक अध्यक्ष ललित बागूल व अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

topchi 2019: तोपची २०१९; नाशिककरांनी अनुभवला थरार

$
0
0

नाशिक

धडाडणाऱ्या तोफा.... कानठळ्या बसविणारा आवाज.... आवाजाच्या वेगाने जाणारे तोफगोळे... काही सेकंदात भेदला जाणारे लक्ष्य... प्रत्यक्ष युद्धभूमीचा थरार देणारी प्रात्यक्षिके लष्करी जवानांनी मोठ्या साहसाने मंगळवारी प्रदर्शित केली. निमित्त होते लष्कराच्या देवळाली आर्टिलरी सेंटरच्यावतीने दरवर्षी 'तोपची' या शक्ती प्रदर्शनाचे.

लेफ्टनंट जनरल वाय. व्ही. के. मोहन आणि लेफ्टनंटर जनरल आर. एस. सलारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तोफची २०१९ संपन्न झाला. याप्रसंगी जवानांनी रशियन तोफ एम ४६, १०५ मिलीमीटर तोफ, सोल्टम तोफ, बोफोर्स तोफ, इस्राईलची सोल्टम तोफ, पिनाका रॉकेट, पर्शियन बनावटीचे स्मर्ज रॉकेट, १२२ मोटर, ईएलएम रडार, लोरो रडार, स्वाती रडार आदींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात लष्करात दाखल झालेल्या वज्र आणि होवेत्झर या दोन तोफांचे 'तोपची २०१९'मध्ये प्रथमच प्रदर्शन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष करीन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधील (रिपाइं) अंतर्गत गटबाजी दूर होऊन, ऐक्य येणार असेल तर प्रकाश आंबेडकर यांना पक्षाचा अध्यक्ष करण्यास मी तयार आहे. वंचित आघाडी करून सत्ता मिळणार नाही, माझ्यासोबत आलात तरच ती मिळेल, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपाइंच्या अभिवादन सभेत ते बोलत होते.

पंचवटीतील श्री काळाराम मंदिर सत्याग्रहास ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रिपाइंच्या वतीने शनिवारी महामेळावा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाशेजारील ईदगाह मैदानावर सायंकाळी ६ वाजता या मेळव्यास प्रारंभ झाला. आठवले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांसह रिपाइंचे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत मंत्री जानकर म्हणाले, की बहुजनांची मते घेऊन फसवण्याची भूमिका यापूर्वीच्या सरकारची होती. पण, सध्याचे सरकार सर्वांच्या हिताचे निर्णय घेत असून, फसवण्याच्या वृत्तीला फाटा देत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपला नेता नक्कीच कॅबिनेट मंत्रीमंडळात असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होऊन बाइकवर स्वार, जगू बिनधास्त…

$
0
0

'मटा' पॉवर रॅलीचे १० मार्चला आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हटके वेशभूषा करून, बाइक सजवून, मोपेडसह स्पोर्ट्स बाइकच्या वेगावर स्वार होण्यासाठी वर्षभर वाट पाहिली जाते ती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'ऑल वूमन बाइक रॅली'ची. महिला दिनानिमित्त रविवारी (१० मार्च) ही रॅली नाशिकमध्ये रंगणार आहे.

महिला दिन साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम होत असले, तरी नाशिककर महिलावर्गाचे लक्ष 'मटा' बाइक रॅलीकडे असते. या रॅलीत सहभागी होत बक्षिसांची लयलूट करण्यासाठी महिला आतूर असतात. या बाइक रॅलीत सहभागी होण्याचा मोह आवरता येत नसल्याचे सांगत अनेक वयोगटातील महिला सध्या नोंदणीची वाट पाहत होत्या. अखेर या साऱ्याजणींची प्रतीक्षा संपली असून, यंदाच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीस सुरुवात झाली आहे.

महिला दिनाचा हा उत्साह साजरा करतानाच स्वतःला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करण्याची संधीही यानिमित्ताने महिलांना मिळणार आहे. पोषाखापासून बाइकच्या सजावटीपर्यंत प्रत्येक बाबतीत काहीतरी हटके करणाऱ्या महिलांना आपली कल्पकता रॅलीच्या माध्यमातून मांडता येणार आहे. फॅशनच्या ट्रेण्डप्रमाणे अत्याधुनिक पोषाख असो वा परंपरा जपणारा मराठमोळा साज, हवी ती वेशभूषा, त्याला आकर्षक दागिने अशी नटण्याची हौस करताना यामध्ये, मैत्रिणींनी एकत्र येत केलेली मॅचिंग थीम, सामाजिक विषयाचा दिला जाणारा संदेश अशीही शक्कल लढविता येणार आहे.

गेल्या वर्षी रॅलीत धम्माल करण्यासोबतच पर्यावरणसंवर्धन, स्त्रीभ्रूण हत्या, पाणी वाचवा यांसारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांना स्थान देत महिलांनी आपला वेगळा विचार ठामपणे व्यक्त केला. काहींनी पोषाखातून तर काहींनी सजविलेल्या गाडीच्या माध्यामातून आपले परखड मत मांडले. यंदाही हाच आनंद आणि उत्साह यांसह स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी महिलावर्ग सज्ज झाला आहे.

नाशिकमधील त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदान येथून 'बाइक रॅली' सुरू होणार असून, शहराच्या विविध रस्त्यांवरून फिरून याच ठिकाणी परतणार आहे. संपूर्ण सुरक्षित असलेल्या बाइक रॅलीचा हा थरार अनुभविण्याची संधी दवडू नका. वाट न पहाता जय्यत तयारीला लागा आणि टेन्शन विसरून कल्ला करीत यंदाचा महिला दिन अधिक खास करण्यासाठी सहभागी व्हा.

...

\B'गेट सेट गो'

\B'ऑल वूमन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

...

\B'ऑल वूमन बाईक रॅली'

कधी - \Bरविवार १० मार्च, २०१९

\Bवेळ -\B सकाळी ७.३० ते १०

\Bकुठे - \Bईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसिवे’कडून तरुणाला चोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्वागता संदर्भात फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर नाशिकमधील एका तरुणाने अश्लील शेरेबाजी केली, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित तरुणास चोप दिला.

कुणाल मनिषा फालक असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असल्याचा दावा मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याने राज ठाकरे यांच्यासदर्भात असभ्य भाषेत पोस्ट टाकली होती. यावेळी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट हटविण्याची मागणी केली. परंतु, संबंधित तरुणाने नकार दिल्यानंतर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला गोविंदनगर परिसरात गाठत चोप दिला. यावेळी महिलांना त्याला चपलांनी मारहाण केली. संबंधित तरुणाने या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार केली नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवमहापुराण आजपासून

$
0
0

नाशिक : मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून सातपूर कॉलनीतील मौले हॉल जवळील महालक्ष्मी मंदिरात रविवारपासून (दि. ३) शिव महापुराण कथासारचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता या कथासारचा शुभारंभ होईल. यामध्ये दोन दिवस श्री हंस कल्याण धाम आश्रमच्या प्रबंधक साध्वी हिराजी, साध्वी मुक्तिकाजी यांचे अध्यात्मावर आधारीत सारगर्भीत विचार भाविकांना श्रवण करता येणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवारी (दि. ४) दुपारी दोन वाजता परिसरातून सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत शिव महापुराण भाविकांना श्रवण करावयास मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय नेत्यांची आज मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांना जोर आला आहे. शहरात रविवार, सोमवार आणि मंगळवारी राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी जमणार असून, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून राजकीय तोफा धडाडणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून कोणाचे रणशिंग फुंकले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकांसाठीच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून, यामुळेच राजकीय दौऱ्यांनाही जोर आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले शनिवारी सरकारी योजनांच्या आढावा बैठकीसह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकमध्ये होते. ईदगाह मैदानावर त्यांची सभाही झाली. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेदेखील दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून, नाशिक व दिंडोरी लोकसभा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील त्यांच्यासमवेत रविवारी नाशिकमध्ये असणार आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यादेखील गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी नाशिकमध्ये असतील. याशिवाय सदाभाऊ खोत, एकनाथ शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आम्ही मंदिरात जात नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकेकाळी आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हते; आता आम्हाला मंदिरात या, असे सांगितात. पण, आम्ही जात नाही कारण आता आम्हाला बौद्ध मंदिर आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काळाराम मंदिराच्या प्रवेश आंदोलनाच्या आठवणी जाग्या केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी हे आंदोलन नाशिकला केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, शाहू-फुले-आंबेडकर व संत रविदास पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होत. यावेळी त्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करतांना त्यांनी आपल्याला अद्याप तिकीट न मिळाल्याची खंतही व्यक्त केली. यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पक्षाला सांगावे, असा चिमटही काढला. अनेकांनी पुरस्कार मिळाले नसल्याचे मला फोन केले; पण मी त्यांना मलाच तिकीट न मिळाल्याचे सांगितल्याचा किस्साही सांगितला. पूर्वीचा भाजप व आताचा भाजप यात बदल झाला आहे. या पक्षाने आपल्या सर्व भूमिकेत बदल केले आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, भाजपने आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही पण त्यांना धक्का देऊ, असा सूचक इशाराही आठवले यांनी दिला.

या सोहळ्यात त्यांनी अनेक जण आठवले बरोबर कोणी नाही असे सांगतात; मात्र त्यांनी माझ्याबरोबर देशभर फिरावे, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. या सोहळ्यात सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सांगत साडेचार वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला.

मोदी म्हणतात, हॅलो कवीराज!

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला जेव्हा भेटतात तेव्हा ते मला 'हॅलो कविराज' म्हणून हाक मारतात, असेही आठवले यांनी सांगितले. यावेळी मी स्वत:ला कवी समजत नाही. पण, माझ्या चारोळ्याचे अनेक जण कौतुक करतात, असेही ते म्हणाले. यावेळी आठवले यांनी अनेक चारोळ्या म्हणत प्रेक्षकांची दाद मिळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा इतरत्र हलवा!

$
0
0

रेल्वे प्रशासनाच्या मनमाड रेल्वे विद्यालयाला सूचना

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील रेल्वे हद्दीतील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय अर्थात इंडियन हायस्कूलच्या मैदानावर रेल्वे पार्किंग झोन सुरू केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता शाळेची संपूर्ण इमारतच हस्तगत करून त्या ठिकाणी विकासकामांचा घाट घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शाळेतील १५०० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्ये रेल्वेने ही शाळा हलविण्याबाबत शाळा प्रशासनाला थेट सूचना दिल्या आहेत. या प्रश्नी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन रेल्वेविरुद्ध आंदोलन उभारावे, तसेच शाळा इतरत्र हलवू देऊ नये असा सूर सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे. तब्बल ९७ वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील सर्वात जुन्या अशा इंडियन हायस्कूलच्या रेल्वे हद्दीतील जागेचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर असताना पेटल्याचे चित्र आहे. रेल्वे हद्दीत शहराच्या मध्यवर्ती भागात हे विद्यालय असून रेल्वेचे अधिकारी शाळेच्या मॅनेजमेंट कमिटी वर वर्षानुवर्षे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील या शाळेला मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय असेही म्हटले जाते.

पार्किंगपासून वादाची ठिणगी

रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या या शाळेचे मैदान रेल्वे मैदान म्हणून काही महिन्यांपूर्वी रेल्वेने ताब्यात घेऊन तिथे रेल्वे पार्किंग झोन उभारले. आणि येथून शाळेचे संस्थाचालक व रेल्वे प्रशासन यांच्यात जागेबाबत संघर्ष सुरू झाला आणि तो थेट न्यायालयात जाऊन पोहचला.

पर्यायांचा शोध

शाळेच्या संस्था चालकांनी विविध पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गावातील इमारत रेल्वेला दिली तर रेल्वेने पर्यायी जागा द्यावी अशी मागणी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मनमाड पालिका प्रशासनाला देखील शाळेसाठी जागा द्यावी असे साकडे घालण्यात आले आहे. शहरातील सरस्वती विद्यालयात इंडियन हायस्कूल वर्ग करण्याचा एक पर्याय देखील खुला असून त्या बाबत ही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विद्यालय रेल्वे इतरत्र हलवणार असल्याच्या हालचाली काही महिन्यांपासून सुरू असताना याबाबत संस्था चालकांनी पालक, नागरिकांना अंधारात ठेवले, असा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गस्तीत कुचराई नकोच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस रस्त्यावर दिसले की नागरिकांना दिलासा मिळतो. पोलिसांची दृश्यमानतासुद्धा अनेक गुन्ह्यांना पायबंद घालू शकते. त्यामुळे गस्तीत कुचराई नकोच, असा स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पहिल्याच बैठकीदरम्यान दिला. या वेळी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यासह शहरातील १३ पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून सूत्रे हाती येताच नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपला अजेंडा सांगितला. यानंतर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान यांनी सर्व पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांसोबत आढावा बैठक घेतली. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली. त्यात मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्तांनी पोलिसांची दृश्यमानता वाढण्याकडे लक्ष देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. गस्त, नाकाबंदी यामुळे संभाव्य गुन्हे रोखता येऊ शकतात, तसेच सतत पोलिस नजरेस पडल्याने नागरिकांनासुद्धा दिलासा मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशनचा आढावा घेतला. यात पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी, त्याची कारणे, संघटित गुन्हेगारी, मालमत्तेचे गुन्हे, सराईत गुन्हेगारांची स्थिती याबाबत जाणून घेतले. पोलिस ठाणे हद्दीतील याच माहितीच्या आधारे सेक्टरनिहाय काम करणार असल्याचे आयुक्तांनी सुरुवातीस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले होते. पोलिस आयुक्तांनी व्हिजिबिलीटी वाढवण्याबाबतच्या दिलेल्या आदेशाचा परिणाम रात्रीतून दोन ठिकाणी दिसून आला.

रात्री दहानंतरही तपासणी

नाशिक भागातील सिन्नर फाटा येथे दिवसा पोलिस असतात. मात्र, शनिवारी रात्री १० वाजेनंतरही येथे तपासणी सुरू होती. प्रथमच रात्रीच्या वेळी तपासणी सुरू असल्याचे या भागातील रहिवासी जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले. रात्री-अपरात्री या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा बंदोबस्त नियमित ठेवावा, अशी अपेक्षा सोनवणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, रविवारी सकाळी वडनेर गेट ते पाथर्डी फाटा या रस्त्यावर पोलिस तपासणी करताना आढळले. या महत्त्वपूर्ण रस्त्यावर प्रथमच पोलिस तपासणी सुरू झाल्याने शेतशिवारातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’ होणार दमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुणी बेभान होऊन घेतलेला बाइकस्वारीचा आनंद, तर कुणी उत्साहातही जपलेले सामाजिक भान, कुणी पोशाखावर घेतलेली मेहनत, तर कुणी स्त्रीमुक्तीचा दिलेला नारा, आनंद साजरा करण्याचा प्रत्येकीचा फंडा वेगळा असला तरी त्यातील जपली जाणारी एकी मात्र सारखीच. जुनी मैत्री जपत नव्याने भेटणाऱ्या सख्यांसोबत यंदाचाही महिलादिन अधिक दमदार ठरणार आहे. महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमेन पॉवर रॅली'चे आयोजन रविवारी (१० मार्च) करण्यात आले आहे.

मिळून साऱ्याजणी, चारचौघी, नारीशक्ती जिंदाबाद, आव्वाज कुणाचा असा थक्क करणारा उत्साह घेऊन त्या साऱ्या जणी शहरात दाखल होतात आणि न थकता प्रत्येक क्षणागणिक उत्साहाचा पारा चढाच ठरतो. दरवर्षी एक नवा ट्रेंड दाखविणाऱ्या या महिलादिन विशेष रॅलीत गेल्या वर्षीही सख्यांनी धमाल केली. पारंपरिक वेशभूषेची आधुनिक पोशाखाशी सांगड घालत काहींनी जीन्स आणि फेटा यांचे कॉम्बिनेशन केले, तर काहींनी तीन पिढ्यांनी एकत्र सहभाग घेत कौटुंबिक उत्साह दाखविला. 'हम भी किसी से कम नहीं' म्हणत ज्येष्ठांचा गट सहभागी झाला. पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूणहत्या, प्राणी वाचवा यांसारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांना स्थान देत प्रत्येकीने आपला वेगळा विचार ठामपणे व्यक्त केला. काहींनी पोशाखातून, तर काहींनी सजविलेल्या वाहनाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडले. उत्साह साजरा करतानाच महिलांचे विचार रॅलीच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी अनेकींनी दवडली नाही. आनंद, उत्साह यासह स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची प्रत्येकीत खटपट होती. त्यापैकी कलात्मक संकल्पना असलेल्या महिलांनी पारितोषिकावर आपले नावही कोरले. काहींनी एकट्याने, तर काहींनी भल्यामोठ्या संख्येने एकत्र रॅलीत सहभाग घेतला आणि रॅलीच्या अखेरीस प्रत्येकीला नव्या मैत्रिणी गवसल्या. हीच गंमत अधिक नव्या ढंगात अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. पोशाखापासून नव्या संकल्पनांपर्यंत प्रत्येकाचा विचार करा आणि सोबतीला आपल्या लाडक्या सख्यांसह रॅलीचा बेत आखण्यास सुरुवात करा.

\B'गेट सेट गो'\B

'ऑल वूमेन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड ५८८८८ या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल, तसेच ९४२२५ १३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

\B'ऑल वूमेन बाइक रॅली'\B

\Bकधी :\B रविवार १० मार्च, २०१९

\Bवेळ :\B सकाळी ७.३० ते १०

\Bकुठे :\B ईदगाह मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई, तुम्हीसुद्धा ‘गोदाई’कडे पाठ फिरवली?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पंकजाताई, तुमच्यात आम्हाला आमची थोरली बहिण दिसते हो. आम्हाला विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहीत करणारी. पाठीवर कौतुकाची थाप देणारी ताई! बड्या कार्यक्रमांमधील तुमचा सहज वावर आमचा आत्मविश्वास द्विगुणीत करतो. म्हणूनच तुमची भेट आम्हाला नेहमीच हवीहवीशी वाटते. ग्रामविकासचा झेंडा अटकेपार रोवण्याचा तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही झटतोय. पण तुम्ही पाठीवर शाबासकी देण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरविलीत. ताई, नाशिककरांप्रमाणेच तुम्हीसुध्दा आमची निराशाच केलीत. ही भावना आहे ग्रामविकास विभागातर्फे आयोजीत गोदाई महोत्सवात सहभागी महिलांची.

राज्य सरकारचा ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे डोंगरे वसतिगृह मैदान येथे 'गोदाई महोत्सव' भरविण्यात आला आहे. या महोत्सवात तब्बल २५० बचतगटांनी सहभाग घेतला आहे. नाशिकसह अगदी तीन चारशे किलोमीटरवरील खेडोपाड्यांतील बापुड्या महिला दोन पैसे गाठीला लागतील या आशेने महोत्सवात सहभागी झाल्या आहेत.

पंकजाताई आणि राज्य सरकारमधील हेवीवेट मंत्री गिरीश महाजन प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी वेळात वेळ काढून येणार असल्याने त्या सुखावल्या. परंतु कार्यबाहुल्यामुळे हे मातब्बर येऊ शकत नसल्याची उद्घोषणा होताच त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे त्यानंतरचा प्रत्येक दिवस 'प्रथमग्रासे मक्षिकापात'चा अनुभव देणारा ठरत असल्याचा अनुभव या महिला घेत आहेत. बनविलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, वस्तू या महिलांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचा प्रचार, प्रसार करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या सरकारी यंत्रणेने अनास्था दाखविली अन् सुरूवातीचे बहुतांश दिवस नाशिककरांनीही त्याकडे पाठ फिरविली. दिवसभर हातावर हात धरून बसून राहावे लागत असल्याने या महिला अक्षरश: वैतागल्या. निदर्शने करून त्यांनी आपल्या भावनाही यंत्रणेकडे व्यक्त केल्या. प्रदर्शन स्थळापासून हाकेच्या अंतरावरील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात रविवारी पंकजा ताई येत असल्याने या महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या. महोत्सवाला पंकजा ताईंचे पाय लागतील. शेवटचे दोन दिवस का असेना ग्राहकांचा ओघ वाढून आपण आणलेल्या उत्पादनांची विक्री होईल, अशी आशा या महिला व्यक्त करीत होत्या. परंतु याच विभागाचे खाते सांभाळणाऱ्या पंकजाताईंना महोत्सवाला भेट न द्यावीशी वाटल्याने महिलांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. ताईंच्या उपक्रमशीलतेला दाद देण्यासाठी आम्ही घरदार सोडून चार पाचशे किलोमीटरवरून येथे आलो. ताईंना आमच्यासाठी केवळ रस्ता ओलांडणेही शक्य नव्हते का? अशी भावना या महिलांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images