प्रोजेक्ट गोदाच्या पाच, तर गावठाण पुनर्विकासच्या दोन निविदा .... म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या 'प्रोजेक्ट गोदा' आणि 'गावठाण विकास' योजनेतील चढ्या निविदा दरांबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही कामांची वेगवेगळ्या भागात विभागणी करून शुक्रवारी नव्याने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. गोदा प्रोजेक्टच्या ११० कोटींच्या कामांची पाच भागांत, तर गावठाण पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. या कामांच्या स्वतंत्रपणे निविदा कंपनीने काढल्याने या कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत 'प्रोजेक्ट गोदा' व 'गावठाण विकास' असे दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आले होते. त्यासाठीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु, या प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या जादा दराच्या निविदांमुळे थेट कंपनीसह प्रकल्पही अडचणीत आले होते. प्रोजेक्ट गोदाची ७३ कोटींची निविदा ही ३८.८८, तर गावठाण विकासची ३२४ कोटींची निविदा ६० टक्के जादा दराने आली होती. स्मार्ट कंपनीला १४४ कोटींच्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागत असताना या जादा दराच्या निविदांमुळे आर्थिक तूट ३०४ कोटींवर गेली. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कर्जरोखे (म्युनिसिपल बॉण्ड) काढण्याचा विचार सुरू झाला होता. त्यावरून संचालकांसह नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. तसेच, थेट पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली होती. या कामांची विभागणी केल्यास निविदा कमी येतील, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे अखेर वाद टाळण्यासाठी कंपनीच्या वतीने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीने शुक्रवारी गोदा प्रोजेक्टच्या कामांचे पाच, तर गावठाण पुनर्विकास योजनेचे दोन भाग केले. प्रोजेक्ट गोदाच्या कामांचे ११० कोटींच्या पाच निविदांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. गावठाण पुनर्विकासमधील ३५० कोटींच्या कामांची दोन भागात विभागणी केली आहे. या कामांच्या स्वतंत्र निविदा जारी करण्यात आल्याने त्याला छोट्या ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळून दर कमी येतील, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. .... निविदा दर घटण्याची शक्यता या दोन कामांची आता स्वतंत्र भागात विभागणी केल्याने निविदा दर घटतील असा दावा कंपनीने केला आहे. गावठाण विकास प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, जलवाहिनी, रस्ते बांधणी, ड्रेनेज, पथदीप आदी कामांसाठी यापूर्वी एकत्र निविदा काढण्यात आली होती. आता रस्ते वेगळे करण्यात आले असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांची वेगळी निविदा केली आहे. प्रोजेक्ट गोदामध्ये गोदा सौंदर्यीकरणात आता गोदागार्डन, हेरिटेज वॉक, सायकल ट्रॅक, जे. टी. पॉईंटचा सहभाग केला आहे. .... प्रोजेक्ट गोदाच्या कामांची विभागणी गोदा सौंदर्यीकरण - ६७.८८ कोटी गोदा स्वच्छता - १४.८ कोटी मॅकेनिकल गेट - १९.८ कोटी गोदा सिवील - १४ कोटी गोदा गाळ काढणे - ११.१६ कोटी ... गावठाण पुनर्विकास कामाची विभागणी शहर अंतर्गत रस्ते - २४१ कोटी वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर - १०९ कोटी स्काडा प्रोजेक्ट - २८४ कोटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट