Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तीन घरफोड्यांतदोन लाखांचा मुद्देमाल चोरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, शनिवारी शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अंबड, सातपूर आणि पंचवटी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सिडकोतील पाटीलनगर येथे मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी ८७ हजार रुपयांचे दागिने व मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हेमांगी वाल्मिक पाटील (रा. पाटीलनगर) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घरात कोणी नसताना कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा ८७ हजाराचा मुद्देमाल चोरून. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक गांगुर्डे करत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना सातपूरच्या पाइपलाइन रोड परिसरात घडली. या प्रकरणी व्यंकटेश मोडक (गणेशनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोडक कुंटुंबीय बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ३२ हजारांची रक्कम घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक एच. डी. राऊत करीत आहेत. दरम्यान, पंचवटीतील लोखंडेमळा परिसरात अशोककुमार गुप्ता यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने व ५० हजारांची रोकड असा ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक डी. व्ही. गिरमे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सक्षमीकरणासाठी विधायक कार्याची गरज

0
0

सक्षमीकरणासाठी विधायक कार्याची गरज

मनन चतुर्वेदी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला सक्षमीकरणाची चर्चा ही वातानुकूलित सभागृहात घडते, हेच आपले दुर्दैव आहे. त्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे, महिला सक्षमीकरणावर केवळ चर्चा होते पण, त्यासाठी काम उभे केले जात नाही. त्यामुळे देश प्रगतीपथावर असूनही महिलांवरील अत्याचार रोखण्यास आपण कमी पडतो आहोत. त्यामुळे सक्षमीकरणासाठी आता विधायक कार्य उभे राहण्याची गरज असून, त्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राजस्थान पूर्व बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा मनन चतुर्वेदी यांनी केले. संदीप फाउंडेशनमध्ये आयोजित 'महिला सक्षमीकरण व समाज' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रच्या वतीने 'महिला सक्षमीकरण व समाज' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी संदीप फाउंडेशनच्या सेमिनार हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी राज्यस्थानच्या पूर्व बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा मनन चतुर्वेदी, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विजय सोनवणे, नाशिक उपक्रेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे व्यासपीठावर होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीत गायनाने व्याख्यानास प्रारंभ झाला. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चतुर्वेदी म्हणाल्या, की महिला आणि बालकांवर होणारे अत्याचारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संवेदनशीलता कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. माणसातील माणुसकी संपुष्टात आल्याचे काही घटनांमधून दिसून येते. या सर्व परिस्थितीला विचार आणि विचारप्रक्रिया जबाबदार आहेत. त्यामुळे प्रत्येकात संवेदनशीलता टिकवणे काळाजी गरज बनली आहे. महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांच्या हक्कांसाठी कार्य होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. वंदना शर्मा यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराच्या कल्याणा, वाढविल्या किमती!

0
0

मटा सीरिज- ऑपरेशन कायापालट - भाग : ३

vinodpatil@timesgroup.com

Tweet : vinodpatilMT

नाशिक : एखाद्या पुरवठादाराकडून एकापेक्षा अधिक वस्तू खरेदी केल्यास खरेदीदाराला किमतीत मोठी सूट दिली जाते. परंतु, आदिवासी विभाग खरेदी करीत असलेल्या फर्निचरची संख्या हजारोंच्या घरात असतानाही या वस्तूंचे दर मात्र बाजारपेठेतील किमतीपेक्षाही ३० ते ५० टक्क्यांनी जास्त आहेत. विशेष म्हणजे ठेकेदाराचा फायदा व्हावा यासाठी विभागाने कोट केलेल्या किमती बाजारभावापेक्षा अधिक आहेत. प्रस्तावात ठेकेदाराच्या भल्यासाठीच टप्प्या-टप्प्याने किंमत वाढवल्याचे समोर आल्याने ही खरेदीप्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आदिवासी विकास विभागाने नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या अप्पर आयुक्तालयामार्फत चार ठिकाणी ही खरेदीप्रक्रिया स्वतंत्रपणे राबवली आहे. परंतु, या चारही ठिकाणी विशिष्ट ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. 'जेम' पोर्टलवर ही खरेदीप्रक्रिया राबविल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी ठरवलेल्या ठेकेदारालाच पुरेपूर काम मिळेल, अशा पद्धतीच्या अटी ‌व शर्ती लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे निविदांसाठी टाकलेल्या दरांमध्येही मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. बेंच, खुर्च्या, बेड, डायनिंग टेबल, प्लास्टिक खुर्च्या, लॉकर, कपाट, मीटिंग टेबल अशा वस्तूंची संख्या ही हजारोंच्या घरात असतानाही, त्यांचे दर मात्र बाजारभावापेक्षा अधिक आहेत. बाजारात ८ हजारांपर्यंत लाकडी बेंच मिळत असताना विभागाने चक्क १२ हजार १३५ रुपयांत ते घेण्याची तयारी दर्श‌वली आहे. ठेकेदाराला अधिकचा दर मिळावा, यासाठी या बेंचची किंमत विभागाने निविदा काढताना १३ हजार ४८३ रुपये ठेवली आहे. बाजारात चांगल्या गुणवत्तेची खुर्ची चार हजार रुपयांपर्यंत असताना विभागाने मात्र ठेकेदारासाठी हा दर ६ हजारांपेक्षा अधिक लावला आहे. अन्य वस्तूंच्या दरातही बाजारभावापेक्षा तब्बल ३० ते ५० टक्क्यांपर्यंत फरक आहे. त्यामुळे ही खरेदी ठेकेदारांच्या चांगभल्यासाठीच केल्याचे दिसून येत आहे.

सेंट्रल जेलचा प्रस्ताव नाकारला

राज्यातील सरकारी खरेदीमध्ये सेंट्रल जेलमध्ये कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. विविध विभागांकडून आतापर्यंत अशी खरेदी करण्यात आली आहे. परंतु, आदिवासी विभागाला सेंट्रल जेलमधील कैद्यांनी कमी किमतीत तयार केलेल्या वस्तूंचेही वावडे आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाने ३० मे २०१८ रोजी आदिवासी आयुक्तांना पत्र लिहून साधा पलंग, बंक बेड, बेंचेस तयार करून आश्रमशाळांना पुरवठा करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, सेंट्रल जेलच्या खरेदीचा प्रस्ताव कोणतेही कारण न देताच नाकारण्यात आला. विशिष्ट ठेकेदाराला काम देण्यासाठीच हा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे.

नोकरभरतीचा घोटाळाही असाच दडपण्यात आला. त्यापाठोपाठ आता फर्निचर खरेदीतही घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार आहोत.

- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

वस्तू विभागाचे दर ठेकेदाराचे दर बाजारातील दर (अंदाजे)

बेंच १३,४८३ १२,१३५ ८,५००

रेस्टॉरंट टेबल २८,२३३ २७,५२७ १९,५००

मीटिंग टेबल ३९,४४७ ३५,५२९ २८४००

कपाट २४२८२ २३६६७ १८०००

स्टिल लॉकर ३४८११ ३३९४१ २३५००

मेटल बेड १२५९५ ११३३५ ८२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक लोकसभा मतदारसंघ

0
0

नाशिक लोकसभा मतदारसंघ

विद्यमान खासदार - हेमंत गोडसे (शिवसेना)

विधानसभा मतदारसंघ - नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्यम, देवळाली, सिन्नर, इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश - भाजप- ३, शिवसेना- २, काँग्रेस- १

एकूण मतदार संख्या २०१९- १८,५०,९४६

विधानसभा मतदारसंघ - विद्यमान आमदार - पक्ष - मतदार संख्या

नाशिक पूर्व - बाळासाहेब सानप - भाजप - ३,४८,३८४

नाशिक मध्य - प्रा. देवयानी फरांदे - भाजप - ३,११,५३५

नाशिक पश्चिम - सीमा हिरे - भाजप - ३,७९,५२८

देवळाली - योगेश घोलप - शिवसेना - २,५९,९०३

इगतपुरी - निर्मला गावित - काँग्रेस - २,५८,३४१

सिन्नर - राजाभाऊ वाजे - शिवसेना - २,९३,२५५

२०१४ लोकसभेचा निकाल

उमेदवार- पक्ष - मिळालेली मते

हेमंत गोडसे (शिवसेना) - ४,९४,७३५

छगन भुजबळ (राष्ट्रवादी) - ३,०७,३९९

डॉ. प्रदीप पवार (मनसे) - ६३,०५०

आतापर्यंतचे खासदार

१९५७-६२ - भाऊराव कृष्णराव गायकवाड (अनुसूचित जाती महासंघ)

१९६२-६७ - यशवंतराव बळवंतराव चव्हाण (काँग्रेस)

१९६७-७१- बी. आर. कवडे (काँग्रेस)

१९७१-७७ - बी. आर. कवडे (काँग्रेस)

१९७७-८० व्ही. जी. हांडे (शेतकरी कामगार पक्ष)

१९८०-८४ - डॉ. प्रताप वाघ (काँग्रेस)

१९८४- ८९- मुरलीधर माने (काँग्रेस)

१९८९-९१ - डॉ. दौलतराव आहेर (भाजप)

१९९१-९६ - डॉ. वसंतराव पवार (काँग्रेस)

१९९६-९८- राजाभाऊ गोडसे (शिवसेना)

१९९८-९९ - माधवराव पाटील (काँग्रेस)

१९९९-२००४ - उत्तमराव ढिकले (शिवसेना)

२००४-२००९ - देवीदास पिंगळे ( राष्ट्रवादी)

२००९- २०१४- समीर भुजबळ (राष्ट्रवादी)

२०१४-१९ - हेमंत गोडसे (शिवसेना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांवर बडगा

0
0

३० जणांवर पोलिस कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी टवाळखोरांविरोधातील कारवाई सुरूच ठेवली आहे. शनिवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३० जणांना मुंबई पोलिस अॅक्टला सामोरे जावे लागले. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत दोनशेहून अधिक जणांवर पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी भद्रकाली, इंदिरानगर, गंगापूर, मुंबईनाका पोलिस ठाण्यातंर्गत टवाळखोरांची शोध मोहीम राबविण्यात आली होती.

अमरधाम रोड आणि खडकाळी सिग्नल अशा दोन ठिकाणी कारवाई करीत भद्रकाली पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस उपनिरिक्षकांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार खडकाळी सिग्नल चौक परिसरातील देशी दारू दुकानासमोर शुक्रवारी (दि.९) रात्री सहा व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवून जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. यात विनोद गायकवाड (पिंपळचौक), संजय चंदेल (अंबड), पप्पू शिंदे (वज्रेश्वरी झोपडपट्टी, पंचवटी), सोमनाथ लोखंडे (रामघाट, पंचवटी), आकाश धोंगडे (नागचौक, पंचवटी), मनोज लक्ष्मण वनिस (अंबड) यांचा सामावेश आहे. दुसरी कारवाई अमरधाम रोडवरील संत रोहीदास मंदिराजवळ करण्यात आली. या ठिकाणी ताफिक शहा (रा. नाईकवाडीपूरा, जुने नाशिक), अकिल शहा (नानावली), राधेशाम चव्हाण (शिवाजी चौक, अमरधाम रोड), सोनू चव्हाण (शिवाजी चौक), गुलशन प्रसाद, राजू मौर्या (शिवाजी चौक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत द्वारका सर्कलजवळ रात्रीच्या सुमारास समीर पटेल (इगतपुरी), नवनाथ सोनवणे (डोंगरगाव, निफाड), जैनुआबेद्दीने पठाण (ब्रह्मणगावरोड, निफाड), सद्दाम शेख (भारतनगर, नाशिक), प्रकाश अहिरे (सटाणा) या पाच तरुणांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस शिपाई गावयकवाड यांनी तक्रार दिली. गंगापूर पोलिसांनी आनंदवली येथील मनपा शाळेमागे कारवाई केली. या ठिकाणी रस्त्यावर थांबलेल्या मुंजाभाऊ ठोंबरे (सिरीन मेडोज, गंगापूररोड), प्रभाकर उकूंडे (नवश्या गणपती मंदिराजवळ), राजाराम कोरडे (पाईपलाईन रोड), राजेश काळे (काळेनगर), रामभाऊ खंडांरे (आयोध्या कॉलनी), विलास कांबळे यांना जमावबंदी आदेशाचे भंग केल्याबद्दल अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले. इंदिरानगर येथील सुरज सोनवणे, अभिजीत आखाडे, रोहित पाटील, अजित वाघ, सनी सिंग (रा. पाथर्डीफाटा) यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यांसह चौक्यांतही सीसीटीव्ही!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांसह पोलिस चौक्यांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन कमिटीमार्फत २५ लाखांच्या निधींची तरतूदसुद्धा करण्यात आली असून, यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

शहरात आजमितीस १३ पोलिस ठाणी असून, पोलिस ठाणे हद्दीतील झोपडपट्टी, दाट किंवा विरळ लोकसंख्या, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गुन्ह्यांच्या संख्येवर परिणाम होत असतो. पोलिस ठाण्यामध्ये सातत्याने तक्रारदार येतात. प्रत्येक तक्रारदाराचे समाधान होत नाही. त्यात ठाणे अंमलदारांकडून दिली जाणारी वागणूक, भ्रष्टाचार, गैरप्रकार हे मुद्दे सतत पुढे येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही बसविण्याची तरतूद महत्त्वाची ठरते. यापूर्वी सरकारवाडा आणि आणखी काही पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र, त्यांची मर्यादा पोलिस ठाण्यापुरतीच होती. या नवीन प्रणालीमध्ये सध्या पोलिस ठाण्यामध्ये कार्यान्वित असलेले सीसीटीव्ही पोलिस चौक्यांसाठी वापरले जातील. पोलिस चौकीबाहेर सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, त्यामुळे तो भागही सीसीटीव्हीच्या टप्प्यात येईल. बसथांबा किंवा वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोलिस चौक्यांवरील सीसीटीव्हींचा फायदा होणार आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सर्व पोलिस ठाण्यांमध्ये, तसेच पोलिस चौक्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित होणे ही चांगली बाब असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसू शकतो, असा दावा पोलिस सूत्रांनी केला.

--

वरिष्ठांसाठी ठरणार सुकर

पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांमधील या सीसीटीव्हीचे फुटेज एकत्रित पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना दिसेल. त्यामुळे एकाच वेळी सर्व घडामोडींवर वरिष्ठांना लक्ष ठेवणे सुकर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीसीटीव्हींबाबतचा प्रस्ताव माजी आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. त्याला जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २५ लाखांची रक्कम मंजूर केली. निधीची उपलब्धता झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्लोकलाझेशन’कडे झेप

सुखनवर : डॉ. अशोक पिंगळे

0
0

मयख़ानों का शायर

प्यार, मोहब्बत, इश्क़ याबरोबर साकी रिंद, मैकश, मय, मयख़ाना, पैमाना, मीना-शीशा, ख़ुम, सुबू, जाहिद (धर्मोपदेशक) हे उर्दू शायरीतील अत्यंत लोकप्रिय संकेत कारण प्रेम व मय (मद्य) हे प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. दोन्ही गोष्टी माणसांच्या जीवनात धुंदी आणणार्‍या असून त्यातील आणखी साधर्म्य म्हणजे त्या क्षणभंगूर आहेत. परंतु या क्षणभंगूर गोष्टींचा उर्दू शायरीमध्ये चपखल पद्धतीने ज्यांनी वापर केला ते प्रसिद्ध शायर अब्दुल हमीद अदम स्वत:बद्दल म्हणत

अदम रोज़-ए-अजल जब किस्मतें तक्सीम होती थी

मुकद्दर की जगह मै साग़र-ओ मीना उठा लाया

(रोज़-ए-अजल - जीवनाचा शेवट. तक्सीम- वाटप. साग़र-ओ मीना- ग्लास व सुरई)

*

आँखो से पिलाते रहो सागर में न डालो

अब हम से कोई जाम उठाया नहीं जाता

*

दूसरों से बहूत आसान है मिलना साकी

अपनी हस्ती से मुलाक़ात बड़ी मुश्किल है

*

पीता हूँ हादिसात के इर्फ़ान के लिए

मैं एक तजज़िया है ग़मे-रोजगार का

(हादिसात- घटना. इर्फ़ान-ज्ञान, तजज़िया- विश्‍लेषण)

*

ये भी जीने का सलीक़ा है कोई दुनियामें

मैं भी बदनाम नहीं आप भी बदनाम नहीं

या सर्व प्रकारच्या स्वगतामध्ये अदम यांनी मधुशाळेला इंद्रधनुष्याच्या विविध रंगछटांनी रंगविले आहे. त्यामुळेच मयख़ानों का शायर या नावाने ते उर्दू शायरीमध्ये सर्वमान्य आहेत .खरं तर अदम यांच्या मय व माशुकी या द्वंद्व शायरीचा सुरेख पद्धतीने वापर नुसरत फ़तेह अली खाँ, ग़ुलाम अली, मेहदी हसन, मुन्नी बेग़म सारख्या दिग्गज गायकांनी केला आहे.

पास रहता है दूर रहता है

कोई दिल में जरूर रहता है

जब से देखा है उनकी आँखो को

हल्का-हल्का सुरुर रहता है

ऐसे रहते है वो मेरे दिल में

जैसे जुल्मत में नूर रहता है

अब 'अदम' का ये हात है हर व़क्त

मस्त रहता है चूर रहता है

*

साकी शराब ला की तबीअत उदास है

मुतरिब रुबाब उठा कि तबीअत उदास है

(मुतरिब-गायक. रुबाल - वाद्य)

*

हल्का हल्का सुरुर है साकी

बात कोई जरुर है साकी

तेरी आँखो को कर दिया सज़दा

मेरा पहला कुसूर है साकी

*

जब तेरे नैन मुस्कराते है

ज़ीसत्त के रंग भूल जाते है

(ज़ीसत्त- जीवन)

*

जुल्फ़-ए- बहरम सँभाल कर चलिए

रास्ता देखभाल कर चलिए

मौसम-ए-गुल है अपनी बाँहो को

मेरी बाँहों में डाल कर चलिए

*

जिंदगी है कि इक हसीन सजा

ज़ीसत्तत अपनी है ग़म पराए हैं

हम भी किन मुफ़्लीसों की दुनिया में

क़र्ज की साँसे लेने आए है

(ज़ीसत्त- जीवन. मुफ़्लीसों - निर्धन)

*

रुह को एक आह का हक़ है

आँख को इक निगाह का हक़ है

एक दिन मैं भी लेके आया हूँ

मुझ को भी इक गुनाह का हक़ है

(आह - सुटकेचा नि:श्‍वास)

अ़ख्तर शीरिनी, हफ़ीज जालंदरी या समकालिन असलेल्या या शायरने गुलनार, अक्से जाम, सरे-सुमन खराबात, गर्दीश-ए-जाल, दो जाम सारखी काव्यसंग्रह लिहिले

हिज्र व विसाल, मोहब्बत व हुस्न जमाल बाबत शायरीमध्ये विविध रंग भरणारे अदम जीवनाबद्दल सुद्धा गंभीरपणे म्हणत -

जीस्त इक कहानी है मौत इक फ़साना है

आपकी मुरवत का ज़ख्म ग़ायबाना है

(जीस्त - जीवन. मुरवत- शील)

*

कभी कभी तो मुझे भी ख़याल आता है

कि अपनी सूरते-हालात पर निगाह करूँ

*

जिंदगी है इक किराए की खुशी

सुखते तालब का पानी हूँ मैं

जिन को दौलत हकीर लगती है

उफ़ वो कितने अमीर होते है

हकीर - तुच्छ

मरनेवाले तो ख़ैर है बेबस

जीनेवाले कमाल करते है

(लेखक गझलचे जाणकार व अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच धरणांनी गाठला तळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाची तीव्रता वाढत असतानाच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील जलाशयांनी तळ गाठण्यास सुरुवात झाली असून, पाच धरणांमध्ये १० टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे.

यंदा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक भागात सरासरीहूनही कमी पाऊस झाला. त्यामुळे पावसाळ्यापासूनच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत. यामध्ये सात धरणे मोठ्या आकाराची, तर १७ धरणे मध्यम आकाराची आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनमीटर एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, दिवसेंदिवस पाण्याचा वापर वाढत असून त्यामुळे धरणांमधील पाण्याचा उपयुक्त साठा कमी होत चालला आहे. आजमितीस जिल्ह्यात २० हजार ३३८ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध उपयुक्त पाण्याची टक्केवारी अवघी ३१ टक्के आहे. विशेषत: ग्रामीण भागात विहिरी व तत्सम जलाशयांमधील उपयुक्त पाणीसाठा तळाला जात असून, यामुळे रहिवाशांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पालखेड आणि गिरणा धरण समूहातील एकूण पाच धरणांमधील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेला आहे. यामध्ये पालखेड धरण समूहातील भावली, कडवा आणि भोजापूर या तीन धरणांचा समावेश आहे. गिरणा धरण समूहातील माणिकपुंज धरणातील पाण्याचीदेखील तळाकडे वाटचाल सुरू आहे. नागासाक्या धरण तर पाण्याअभावी कोरडे झाले आहे.

धरण उपयुक्त पाणीसाठा (टक्केवारी)

गंगापूर ३३

काश्यपी ९१

गौतमी गोदावरी ४०

आळंदी ४१

पालखेड २४

करंजवण ४५

वाघाड २३

ओझरखेड ४५

पुणेगाव २९

तीसगाव २४

दारणा २९

भावली ६

मुकणे ११

वालदेवी २५

कडवा ६

नांदूर मध्यमेश्वर ९६

भोजापूर ६

चणकापुर ५०

हरणबारी ३०

केळझर २६

नागासाक्या ०

गिरणा २८

पुनद ५९

माणिकपुंज ६

एकूण ३१

गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी

शहरासह नाशिक तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जूनअखेरपर्यंत शहरवासियांची तहान भागविण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार असल्याने त्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. ५ हजार ६३० दशलक्ष घनफूट एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात १ हजार ८४८ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी शिल्लक आहे. गंगापूर धरण समूहात काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या तीन धरणांचा समावेश असून, या धरणसमूहाची पाणी साठवण क्षमता १० हजार ३२० दशलक्ष घनफूट एवढी आहे. समूहात ४५ टक्के म्हणजेच ४ हजार ६७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

leopard attack: नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात ६ जखमी

0
0

नाशिक

इगतपुरी येथील आशाकिरणवाडी येथे रविवारी दुपारी बिबट्याने ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्यात त्यात ५ ग्रामस्थ आणि १ वन परिक्षेत्रअधिकारी जखमी झाले आहेत. या ६ रुग्णांवर रविवारी सायंकाळपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना खोलवर जखमा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. हल्लानंतर बिबट्या पळून गेला असून, बिबट्याला जेरबंर करण्यासाठी नाशिक येथून वन विभागाचे रेस्क्यू पथक रवाना झाले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथक गस्त घालत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

mahant sudhir das: महंत सुधीरदास यांना अटक

0
0

दुबई पोलिसांची कारवाई; ५० लाख रुपयांच्या व्यवहाराचा वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काळाराम मंदिराचे पुजारी आणि श्री महंत सुधीरदास पुजारी यांना दुबईत झालेल्या कथित अटकेच्या वृत्ताने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली. नवी दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले होते. सुमारे ५० लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याचे समजते.

धार्मिक कार्याबरोबर व्यावसायिक अशी ओळख असलेल्या महंत सुधीरदास पुजारी यांना गत गुरुवारी दुबईत अटक करण्यात आली. दुबईतील एका स्थानिक भागीदाराने पैशांच्या देवाण घेवाणीतून दुबई पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, महंत सुधीरदास पुजारी यांच्या अटकेनंतर दिल्लीतील परराष्ट्र खात्याने हालचाली सुरू करीत पुजारी यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सध्या ते शारजा येथे असून, त्यांचा पासपोर्ट गहाळ झाल्याची माहिती त्यांनी नाशिकमधील आपल्या नातेवाइकांना दिली.

काळाराम मंदिराचे पुजारी असलेल्या सुधीरदास यांना गत कुंभमेळ्या दरम्यान श्री महंत ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते. याच दरम्यान महंत सुधीरदास यांनी मुंबईसह दुबईत व्यवसाय विस्तार केला. दुबई येथे त्यांनी सुरू केलेल्या एका कंपनीत त्यांचा भागीदार असलेल्या एका व्यक्तीनेच महंत सुधीरदास यांच्याविरूद्ध तक्रार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गत गुरुवारी नेहमीप्रमाणे सुधीरदास महाराज दुबई येथे पोहचले असता दुबई पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अटक केली. यानंतर त्यांचा पासपोर्ट जमा करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, ५० लाखांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. दिल्लीतील इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्यानुसार सौदी अरबच्या राजघरण्याचा नावाचा वापर करून महंतांनी व्यवसाय वृद्धीचा प्रयत्न केल्याने ही कारवाई झाली. दरम्यान, दुबईतील दुतावासाने केलेल्या प्रयत्नांमुळे महंताना लागलीच जामीन मिळाला. या सर्व घडामोंडीबाबत जाणून घेण्यासाठी महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी संपर्क करण्यात आला मात्र तो होऊ शकला नाही.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत सुधीरदास पुजारी सध्या शारजा येथे आहेत. त्यांनी स्थानिक नातेवाइकांशी संपर्क साधून पासपोर्ट गहाळ झाल्याचे सांगितले. तसेच पासपोर्ट त्वरित मिळण्यासाठी पाठपुरावा व्हावा, असे सांगितले. त्यानुसार स्थानिक पातळीवर खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांनी सुद्धा परराष्ट्र खात्याला पत्र दिले असून, पुजारी यांच्या गहाळ पासपोर्टबाबत त्वरित कार्यवाही अशी विनंती दोघा खासदारांनी परराष्ट्र खात्यास केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कसमादे भूषण’ पुरस्काराचे वितरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील हृदयसम्राट प्रतिष्ठान व प्रबोधन फाउंडेशनतर्फे रविवारी सायंकाळी 'कसमादे भूषण पुरस्कार २०१९'चे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक समाधान हिरे होते. प्रमुख पाहुणे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, रत्नाकर पवार, विजयालक्ष्मी अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप पवार, सतीश कलंत्री, डॉ. एस. के. पाटील उपस्थित होते.

कसमादे परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात डॉ. विनोद गोरवाडकर, राजेंद्र दिघे, नितीन चौधरी, नीलिमा पाटील, डॉ. मिलिंद पवार, संजीव निकम, सतीश जाधव, महेश पवार, युवराज पाटील, राम उदीकर, सचिन शिंदे, वैभव गांगुर्डे, नीलेश बाविस्कर, किरण शेवाळे, खुशाल पवार, नवनाथ शिल्लक, पल्लवी पवार, अमोल गांगुर्डे यांसह राजगड प्रतिष्ठान या संस्थेत उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थीच्या वतीने डॉ. विनोद गोरवाडकर व राजेंद्र दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शिल्लक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन विकेश अहिरे व महेश अहिरे यांनी तर अंकुश मयाचार्य यांनी परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सदस्यत्वाचा आज फैसला

0
0

- सदस्य संख्येबाबतची शिवसेनेची याचिका न्यायालयाकडून निकाली

- विभागीय आयुक्तांकडे आज सुनावणी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील तौलानिक संख्याबळ ठरविण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्तांचा असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेली याचिका निकाली काढली. तसेच, अन्याय झाल्याचे वाटल्यास पुन्हा दाद मागता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज (दि. १२) यासंदर्भात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याचिकेवर निर्णय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या गटनेत्यांसह आयुक्तांना पाचारण केले आहे. त्यामुळे स्थायी समितीत भाजपचा एक सदस्य कमी होणार, की शिवसेनेचा एक सदस्य वाढणार याचा फैसला आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० 'ड' मधील जागेसाठी पोटनिवडणूक वेळेत न झाल्याचा फटका भाजपला बसला असून, स्थायीमधील भाजपचे बहुमतच धोक्यात आले आहे. पालिकेत सध्या भाजपचे नऊ, शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. परंतु, प्रभाग क्र. १० मधील ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरेंच्या निधनामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ६६ वरून ६५ झाले आहे. त्यामुळे सध्या १२१ संख्याबळानुसार स्थायीतील शिल्लक गुणोत्तर प्रमाण हे ०.५९ आहे. शिवसेनेचे प्रमाण हे ०.६२ एवढे आहे. त्यामुळे ०.०३ चे गुणांकन शिवसेनेचे जास्त असल्याने भाजपचा स्थायीवर एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेचे विलास शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. तसेच, उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्या. रंजित मोरे यांच्या पीठासमोर गेल्या आठवड्यात सुनावणी होऊन न्यायालयाने भाजपच्या कोट्यातील एक जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही ११ मार्च रोजी ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.

....

आयुक्तांच्या निकालाकडे खिळल्या नजरा

विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आज, मंगळवारी शिवसेनेने दाखल केलेल्या आक्षेपासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर, आयुक्त, शिवसेना आणि भाजपच्या गटनेत्यांना पाचारण केले आहे. विभागीय आयुक्तांचा निर्णय समाधानकारक वाटला नाही, तर पुन्हा आमच्याकडे दाद मागू शकतात असे सांगत शिवसेनेला दाद मागण्यांची संधी न्यायालयाने राखून ठेवली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त आज, मंगळवारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशाकिरण वाडीत रेस्क्यू टीम सक्रिय

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आशाकिरण वाडी (ता. इगतपुरी) येथे भरदुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे जण, पंचायत समिती सदस्याचा मुलगा आणि वन अधिकारी असे सहा जण जखमी झाले. या घटनेची गंभीर दखल घेत नाशिकच्या वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नगदुम यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम आशाकिरण वाडीत दाखल झाली. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतरही बिबट्या आढळून आला नाही. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व जखमींवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन जखमींची विचारपूस केली.

नाशिकच्या सहायक वनसंरक्षक अधिकाऱ्यांसह १० ते १२ कर्मचारी तसेच इगतपुरी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी ढोमसे, परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पी. के. डांगे, गोरक्षनाथ जाधव वनपाल दीक्षित आदी वनकर्मचारी आशाकिरणवाडी परिसरात बिबट्याच्या शोधात आहेत. दरम्यान बिबट्याने भर दुपारी हल्ला केल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी इगतपुरीचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांनी केली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जागरुकता ठेवल्यास बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपयोग होईल. बिबट्याचा शोध घेतला मात्र तो दिसून आला नाही. वनविभागाने परिसरात पिंजरा लावला आहे.

- रमेश ढोमसे, वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या पिंजऱ्यात कैद

0
0

गंगाम्हाळुंगी ग्रामस्थांना चार दिवसांनंतर दिलासा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B

\Bगिरणारे शिवारात पाच वर्षे वयाची बिबट्या मादी अखेरीस सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाली. बिबट्या जेरबंद झाल्याने गिरणारे येथील गंगाम्हाळुंगी परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून असल्याने ग्रामस्थ प्रचंड दहशती खाली होते.

अनेक दिवसांपासून गोवर्धन, गंगापूर, गिरणारे व चांदशी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत होता. बिबट्याचा वावर तेथील शेतांमध्ये होत असल्याच्या पाऊलखुणा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. गोवर्धन शिवारात फेब्रुवारी महिन्यात एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर गिरणारे व गोवर्धन शिवारात अनेकदा बिबट्या दिसल्याचा दावा केला गेला. गिरणारे शिवारात राहणाऱ्या दीपक गणपत पिंगळे (वय ३९) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी (दि. ९) रोजी हल्ला केला. त्यानंतर परिसरात बिबट्या असल्याची वन विभागाची खात्री पटली. या घटनेत पिंगळे सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने पिंगळेंच्या डाव्या हाताला घट्ट चावा घेतला. त्यावेळी त्यांचा पुतण्या ओंकार याने काठ्यांच्या सहायाने आवाज केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत अधिक वाढली. ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन करत वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा बसवला. दरम्यान, सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भक्ष्याच्या शोधात असलेली बिबट्या मादी त्या पिंजऱ्यात अडकली. त्यानंतर वन अधिकारी एस. एन. हंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्या मादीची तपासणी केली असून, तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

\B

भय इथले संपत नाही! \B

गंगाम्हाळुंगी शिवारातील पिंजऱ्यात ५ वर्षे वयाची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे याच परिसरात त्या मादीची पिले व नर बिबट्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे बिबट्या मादी जेरबंद झाली असली तरी, तिची पिले आणि नराची धास्ती ग्रामस्थांमध्ये कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी वाऱ्यावर, खरेदी भराभर!

0
0

शंभर आश्रमशाळा आणि ३२५ वसतिगृहांना भरतात भाड्याच्या इमारतीत

...

vinod.patil@timesgroup.com

tweet- vinodpatilMT

..

नाशिक : राज्यातील शंभर आश्रमशाळा आणि ३२५ वसतिगृहांना स्वत:च्या इमारती नसून, त्या भाड्याच्या इमारतींमध्ये भरत असल्याचे भयावह वास्तव आहे. एकीकडे आदिवासी मुलांना जिथे स्वत:च्या मालकीच्या बंदिस्त आणि सुरक्षित शाळा मिळत नाही तिथे विशिष्ट ठेकेदारांच्या भल्यासाठी कोट्यवधींच्या फर्निचर खरेदीचा अट्टहास केला जात आहे. विशिष्ट ठेकेदारालाच ठेका मिळावा, यासाठी विभागाने खरेदी प्रक्रियेत असंख्य चुका केल्याचे समोर आले असून, काही छोट्या ठेकेदारांवर दबाव टाकल्याची चर्चा आहे.

आदिवासी विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ५०२ शासकीय आश्रमशाळा या ठेकेदारांसाठी, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळा या संस्थाचालकांसाठी कुरण ठरल्या आहेत. आदिवासी मुलांना पायाभूत सुविधांसह चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी या आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या तरी आदिवासी मुलांचा वनवास कायम आहे. आश्रमशाळांच्या खरेद्यांमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांचेच हात ओले होत असल्याचे चित्र आहे. असुविधांसह आश्रमशाळांमधील दरवर्षी किमान ३० ते ४० मुलांचा जीव जातो. सर्पदंश तर कधी आरोग्याच्या सुविधा मिळाला नसल्याने मृत्यू होत असतानाही विभागाला मात्र खरेदीतच रस असतो.

राज्यात ५०२ आश्रमशाळांपैकी केवळ २४८ आश्रमशाळांनाच स्वत:च्या इमारती आहेत. सुमारे १२२ आश्रमशाळांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. तसेच ९५ आश्रमशाळ अद्यापही भाड्याच्या इमारतीत भरतात. ४९१ पैकी ३२५ वसतिगृह हे भाड्याच्या इमारतीत भरतात. कायापालट अभियानात आश्रमशाळा सुरक्षित करणे अपेक्षित असताना विभागाकडून मात्र खरेद्यांचा बार उडवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...

छोट्या पुरवठादारांवर दबाव

विशिष्ट ठेकेदार समोर ठेवून राबविलेल्या या प्रक्रियेत स्टार्टअप आणि मेक इन इंडिया अतंर्गत नोंदणीकृत असलेल्या पुरवठादारांनी सहभाग घेण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा घाव वर्मी लागलेल्या एका अधिकाऱ्यांने थेट पोलिस यंत्रणेचा वापर करीत पुरवठादारांच्या घरी धाडी मारल्याची चर्चा आहे. आपण फर्निचरचे उत्पादक नव्हे, असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यासाठीचा दबाव टाकण्यात आल्याचीही चर्चा आहे.

...

रात्री ११ वाजता चर्चा

खरेदी प्रकरण उच्च न्यायालयात अडकू नये, यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत गंभीर त्रुट्या केल्या आहेत. नाशिकच्या लेखा विभागातील सहायक आयुक्तांनी तर निविदा प्रक्रियेत 'एल वन'वर आलेल्या एका कंपनीला पत्र लिहून ६ मार्चला सायकांळी ११ वाजता दरांबाबत चर्चेला या असे पत्रच लिहिले आहे. वादात अडकण्याआधीच ठेकेदाराला कार्यारंभ देण्यासाठी थेट रात्री ११ वाजता चर्चेसाठी पाचारण करण्याचा उद्देश काय, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सरकारी अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांसह त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात दिवसभर निवडणुकीशी संबंधित यंत्रणांच्या बैठकी सुरू होत्या. बैठकींना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस अधीक्षक आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, रागसुधा आर., पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणुकीसाठीची लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या वेळी राधाकृष्णन म्हणाले, की मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदानप्रक्रिया पार पाडण्याचे आमचे प्रयत्न आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसाठी तयार केलेल्या ई-सुविधांची माहिती संबंधिताना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. ते म्हणाले, की मतदानापूर्वी ४८ तास प्रचार बंद राहील. प्रचार मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मिरवणुकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्यानंतर एकावेळी १० वाहने सहभागी होतील. त्याहून अधिक वाहने असल्यास प्रत्येक १० वाहनांमध्ये १०० मीटरचे अंतर असेल. मतदान केंद्राबाहेर बूथ लावताना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्यास परवानगी असेल. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ तीन वाहने आणता येतील.

पूर्वतयारीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा या वेळी घेतला. उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत समन्वयाने नियोजन करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. प्रतिबंधक कारवायांबाबत विहित कार्यपद्धती अवलंबून प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानसभा मतदारसंघनिहाय मनुष्यबळ, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जागृती, मतदान केंद्र, जिल्हा निवडणूक संवाद आराखडा, वाहतूक आराखडा याविषयी आढावा घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राधाकृष्णन यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानाधारकांची शस्त्रे जमा होणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत कमिटी शस्त्र जमा करण्याचे काम हाती घेणार आहे.

निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. याबरोबरच देशात आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीदरम्यान बळ, पैसा, आमिष यांचा वापर होणार नाही, याकडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. शहरात पोलिस आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे काम पार पडते. शहरात आजमितीस १२४५ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. शस्त्र जमा करण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले, की यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त करण्यात येते. परवानाधारक शस्त्र असलेल्या व्यक्तींना नोटिसा बजावून शस्त्र जमा करण्यास सांगण्यात येते. यानंतर ती व्यक्ती कमिटीसमोर आपली बाजू मांडू शकते. संबंधित व्यक्तीला शस्त्राची गरज किती किंवा कसे, याबाबतचा निर्णय कमिटी घेते. यात त्या व्यक्तीच्या जिवाला असलेला धोका आणि त्याबाबतचा संबंधित पोलिस स्टेशनचा अहवाल, तसेच परिमंडलनिहाय उपायुक्तांचे मत विचारात घेतले जाते, असे चौगुले यांनी सांगितले.

आचारसंहितेसाठी २४ तास

आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिस दक्ष असून, महसूल आणि पोलिस विभागाचे संयुक्त फिरते पथक तैनात करण्यात येत आहे. नाकाबंदी आणि सातत्याने गस्त याद्वारे याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त चौगुले यांनी स्पष्ट केले. अवैध मद्य वाहतूक, पैशांची उलाढाल याकडे पोलिसांचे लक्ष असून, २४ तास याकडे लक्ष पुरविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हिडीओ सर्व्हिलन्सदेखील महत्त्वाचे असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॅबमुळे लेखकाचे विश्व दूर राहते’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'प्रत्येकाच्या हाती 'टॅब' आल्याने कपाटातील पुस्तकांचा गंध नेमका काय असतो, हे आजच्या नव्या वाचकांना माहिती नाही. टॅबमुळे पुस्तकातील शब्द वाचले जातात पण, त्यातील मर्म, अर्थ अवगत होत नाही. अनेकदा लेखकाला वेगळेच सांगायचे असते पण, टॅबच्या पुस्तकातून ते म्हणणे वाचकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे 'टॅब'मुळे लेखकाचे विश्व वाचकांपासून दूर राहत असल्याचे जाणवू लागले आहे', असे प्रतिपादन सुप्रसिध्द निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. 'दिलखुलास-गप्पांची मैफल' या कार्यक्रमात किस्से सांगताना ते बोलत होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक मिलिंद कुलकर्णी यांच्या 'दिलखुलास-मैफल गप्पांची' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. सावरकर नगरातील विश्वास हॉल येथे ही मैफल रंगली. मैफलीत कुलकर्णी यांनी कलाविश्वातले किस्से, घटना, घडामोडी, काही कविता, गाणी, काही लेख, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, ध्वनिमुद्रक, नट-नट्या, गायक-गायिका, वादक, संगीतकार, पटकथा लेखक, गीतकार या सगळ्यांच्या आठवणींची शिदोरी बांधून केलेला हा गप्पांचा फड रंगवला. कविवर्य कुसुमाग्रजांच्या आठवणींपासून मैफलीस प्रारंभ झाला अन् पु. ल. देशपांडे, गुलझार, ग. दि. माडगूळकर, विंदा करंदीकर यासह अनेक दिग्गजांच्या आठवणींनी ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन घरफोड्यांमध्ये साडेचार लाखांवर डल्ला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी चार लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, या घरफोड्यांप्रकरणी नाशिकरोड व उपनगर या पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जेलरोडच्या पंचक भागातील जागृतीनगरमधील दीपलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. १०) रात्री चोरट्यांनी घरफोडी करीत दोन लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबविले. या प्रकरणी दत्तात्रय फकिरा धात्रक यांनी फिर्याद दिली. धात्रक कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी साडेसहा ते रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान धात्रक यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात अडकवलेल्या कोटमधून चावी काढत लॉकर उघडून दोन लाख ९३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. यात एक लाख २५ हजार रुपयांचे एक तोळा वजनाच्या प्रत्येकी पाच नग वेढ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, २४ हजार रुपयांची एक तोळा वजनाची चेन, १२ हजार ५०० रुपयांची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दहा हजार रुपयांच्या अंगठ्या, ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे डोरले, १२ हजार ५०० रुपयांची ठुशी, २१ हजार रुपयांची रक्कम असा दोन लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलकर अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी जेलरोडच्या लोखंडे मळ्याजवळील पुष्पकनगर येथे घरफोडी करून दोन लाख दोन हजाराचे दागिने व रोकड पळवली. या प्रकरणी चंद्रकांत शेवाळे (६५, दुर्गा निवास, पुष्पकनगर) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेवाळे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील एक लाख रुपयांच्या ५० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, २२ हजार रुपयांची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दहा हजार रुपयांची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, ४२ हजार रुपयांची २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सहा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातील टॉप्स, सहा हजार रुपयांची तीन ग्रॅम वजनाची नथ, १६ हजार रुपयांचे अन्य सोन्याचे दागिने, असे दोन लाख दोन हजार रुपयांचे दागिने घरफोडी करीत लांबविले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images