Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व्हाईट रोझमध्ये चिमुलक्यांवर कौतुक वर्षाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित व्हाईट रोझ इंग्लिश मीडियम स्कूलचे सय्यद पिंप्री येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना या समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले होते. प्रास्ताविक करताना योगेश रोकडे यांनी करत शाळेविषयी माहिती सांगितली. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती, शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वधर्म समभाव अशा विविध विषयांवर नृत्य, नाटिकांतून प्रकाश टाकला. उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांनी विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये रुपयांची रोख पारितोषिके प्रदान केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अनिल ढिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढिकले, यशवंत ढिकले, भाऊसाहेब ढिकले विविध सहकारी संस्था चेअरमन, सरपंच विमल ढिकले, उपसरपंच सुरेश साळुंके, नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब गोसावी, पर्यवेक्षिका सुनंदा बोराडे, व्हाईट रोझ स्कूलचे विभागप्रमुख योगेश रोकडे, मुख्याध्यापिका प्रीती संधान उपस्थित होते. प्राची ढिकले व उर्मिला धोंडगवकर यांनी सूत्रसंचालन केले. मीना ढिकले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भक्ती रसात न्हाऊन निघाली ‘अभंगसंध्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, गुरू परमात्मा, खेळ मांडियेला वाळवंटी अशा एकापेक्षा एक अभंगांनी मंगळवारची सायंकाळी भक्ती रसात न्हाऊन निघाली. निमित्त होते. शिक्षण, धर्म, संस्कृती, अध्यात्म, भाषा, विज्ञान या क्षेत्रातील विचारवंत, तसेच बॉइज टाऊन स्कूलचे विश्वस्त प्राचार्य बेजन देसाई यांच्या जयंतीचे. यानिमित्ताने कालिदास कलामंदिरात बेजन देसाई फाउंडेशन व जयम फाउंडेशन यांच्यावतीने अभंगसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शांती माँ, बाबुशेठ सारडा, किसनलाल सारडा, नेमन मेहता, मनोज टिबरेवाल, व्ही. डी. झरेकर, माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. यावेळी बेजन देसाई यांच्या ज्येष्ठ शिष्या जयश्री शहा यांनी शंकराचार्य स्तुतीचे स्तवन केले. त्यानंतर बेजन फाउंडेशन व जयम फाउंडेशन यांच्या कार्यावर आधारीत ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. मनोज टिबरेवाल यांनी देसाई यांच्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की प्राचार्य देसाई हे बहुआयामी असे आदरयुक्त व्यक्तिमत्व होते. त्यांनी परिमल, द मास्टर, धस स्पेक द मास्टर, टू मिनिटास विथ रियालिटी, फस्ट वॉज द वर्ल्ड अशी पंधरापेक्षा जास्त पुस्तके लिहिली. त्यांनी गुजराथी, अवेस्ता, संस्कृत, प्राकृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी अशा सुमारे डझनभर भाषांवर प्रभुत्व होते. ते जोतिषविद्या, निमरोलॉजी अशा अनेक विषयांचे ते अभ्यासक होते. सुमारे ६० वर्ष अनेक संतमहात्माचा सहवास त्यांना लाभला. या संतांच्या सानिध्यात अनुभवलेले सत्य आचारण्यात आणण्यासाठी लागणारी तळमळ सरांनी आपल्या लेखनातून अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे.

शिल्पा टिबरेवाल यांनी बेजन देसाई यांच्या कन्या महारुख खराज यांचा संदेश वाचून दाखवला. नंतर अभंगसंध्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरिनामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर गुरू परमात्मा, सुंदर ते ध्यान, खेळ मांडियेला, राजस सुकुमार, हरी मेरी, रुप पहाता लोचनी, तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, सुनता है गुरुग्यानी, म्हारो प्रणाम, फिरत्या चाकावरती, देव देव्हाऱ्यात, निज रुप दाखवा, झाला महार पंढरीनाथ, कानडा राजा, आगा वैकुंठीच्या अशा एकापेक्षा एक अभंगांच्या रचना केतकी भावे, श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य यांनी सादर केल्या. त्यांना तबला साथ-अमेय ठाकूर देसाई, पखवाज- हनुमंत रावडे, संवादिनी अमित पाध्ये, की-बोर्ड झंकार कानडे यांनी केली. विघ्नेश जोशी यांनी निवेदन केले. यावेळी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांत ७४ लाखांची दंडवसुली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेने गतवर्षी रेकॉर्ड ब्रेक कारवाई करीत पाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईला अद्याप ब्रेक लागलेला नसून, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत वाहतूक विभागाने ७४ लाखांचा दंड वसूल केला आहे. २०१८ मध्ये पहिल्या दोन महिन्यांत हा आकडा ११ लाखांच्या घरात होता.

नो पार्किंग, हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष, सीट बेल्ट, राँग साइड अशा प्रमुख कारणांमुळे शहर वाहतूक विभागाच्या दंडाच्या आकड्यात दर वर्षी मोठी वाढ होत आहे. यावर्षी फक्त नो पार्किंग या एका कारणामुळे जानेवारी महिन्यात १०, तर फेब्रुवारी महिन्यात आठ लाख असा १८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यासाठी जानेवारी महिन्यात पाच हजार ११७, तर फेब्रुवारी महिन्यात चार हजार ६८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखने मागील दोन महिन्यांत ३२ हजार ५८० वाहनचालकांवर विविध नियमांनुसार दंडात्मक कारवाई करीत ७४ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल केला. २०१८ च्या तुलनेत यात मोठी वाढ झालेली दिसते. २०१८ मध्ये जानेवारी महिन्यात एक हजार ६३९ वाहनचालकांकडून तीन लाख २७ हजार ८००, तर फेब्रुवारी महिन्यात तीन हजार ९५२ वाहनचालकांकडून ७ लाख ९० हजार ४०० असा सुमारे ११ लाखांचा दंड वसूल झाला होता. शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, बहुतांश वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने रस्ते अपघातांमध्ये वाढ होते, असे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी स्पष्ट केले.

--

पाच वर्षांतील कारवाईची स्थिती

--

वर्ष दंडवसुली

--

२०१५ एक कोटी ३१ लाख

२०१६ एक कोटी ४२ लाख ३० हजार ८००

२०१७ चार कोटी ५३ लाख ५३ हजार ६१०

२०१८ पाच कोटी १५ लाख १७ हजार १००

२०१९ ७४ लाख ४००

--

(२०१९ मधील आकडेवारी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंतची.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांवर फसवणुकीचा आरोप

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी विश्वस्तांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा सोमवारचा मुहूर्त टळला असून, भाजपच्या तीन आमदार आणि महापौरांनी याकडे पुन्हा दुर्लक्ष केल्याचे सांगत आमदारांनी फसवणूक केल्याचा आरोप धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांनी केला आहे.

भाजपच्या तीनही आमदारांनी सुरुवातीपासूनच या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त विश्वस्तांनी शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आमदारांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा याचिकाकर्ते विनोद थोरात यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमी शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर ६४७ धार्मिक स्थळ अनधिकृत ठरवली आहेत. शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीचा आधार घेत महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे नियमित करण्याचा ठराव महासभेने संमत केला आहे. परंतु, गेल्या दोन वर्षापासून तो शासनदरबारी पडून आहे. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली 'रामायण' येथे झालेल्या बैठकीत भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी सोमवारी (दि. ११) मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सोमवारचा हा मुहर्त हूकला असून, आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांचा दुटप्पीपणा आता थेट मतदारासमोर उघड करण्याचा इशारा विश्वस्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी निघाले येवल्याला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाडसह मनमाड आणि येवला तालुकावासीयांची तहान भागविण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पालखेडच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. पाण्याचा बेकायदा उपसा होऊ नये याकरिता वहनमार्गावर गस्त घालण्यात येत असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

टंचाईच्या झळा असह्य होऊ लागल्याने येवला आणि मनमाडवासीयांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारी करण्यात आली. सायंकाळी सहानंतर आवर्तन सोडण्यात आले. तत्पूर्वीपर्यंत वहनमार्गावरील पात्रातून डोंगळे काढण्याची कार्यवाही सुरूच होती. पाणी सोडल्यानंतरही डोंगळे काढण्याची कार्यवाही सुरूच ठेवून बेकायदा पाणीउपशाला पायबंद करण्यात येणार आहे. टंचाईच्या झळांपासून काहीशी मुक्तता मिळावी, याकरिता पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन सोडावे, अशी मागणी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे होत होती. ही मागणी लक्षात घेऊन अखेर मंगळवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले. ९५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, १२ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. निफाडमधील काही गावांसह मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, येवल्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेला या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणीविना पीयूसी; १५ सेंटर निलंबित

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांची तपासणी न करताच त्यांना पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या पीयूसी सेंटरवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. १५ सेंटरचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले असून, चार केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. पीयूसी प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या सुमारे दीड हजार वाहनचालकांकडून साडेसात लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

वाहनधारकांनी आर. सी. बुक, वाहन चालविण्याचा परवाना, विम्यासंबंधी कागदपत्रांबरोबरच पीयूसी प्रमाणपत्र बरोबर बाळगणे अनिवार्य आहे. ही कागदपत्रे सोबत न बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिला आहे. वाहनधारकांनी अधिकृत पीयूसी केंद्रामार्फतच वाहनांची तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन करण्यात आले. पीयूसी केंद्रधारकांकडून नियमांचे पालन होत नसल्यास पीयूसी केंद्रांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या वर्षभराच्या कालावधीत तीन वेळा पीयूसी केंद्रांची तपासणी करण्यात आली. ४५ केंद्रांच्या तपासणीत १९ पीयूसी केंद्रचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. वाहनांची तपासणी न करताच पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या १९ पैकी १५ केंद्रधारकांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे. चार केंद्रांनी अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याने या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यापुढेही पीयूसी केंद्र धारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास निलंबन किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा कळसकर यांनी दिला आहे. पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणाऱ्या १ हजार ४०४ वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत अशा वाहनधारकांकडून सात लाख ३७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

0
0

\Bमहिला तक्रार निवारण केंद्र \B

नाशिक : गौतमी महिला मंडळ बहुउद्देशीय मंडळ इंडो-तिबेटियन मैत्री संघाच्या वतीने महिला तक्रार निवारण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. यावेळी वैशाली जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांचा सन्मान केला. राजश्री शेजवळ, लक्ष्मी वानखेडे, हर्षाली उघाडे, काळे, सोनजे उपस्थित होते. महिलांनी दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांच्या विविध समस्या या मंचच्या माध्यमातून सोडविल्या जातील, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

\Bयुनिव्हर्सल अकॅडमीत सायबरचे धडे\B

नाशिक : युनिव्हर्सल अकॅडमीत महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अकॅडमीतील महिला शिक्षक, महिला कर्मचारी, महिला पालक यांचा सन्मान करण्यात आला. महिला पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी सायबर क्राइमची माहिती महिलांना सांगितली. सोशल मीडियामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून, खासगी माहिती ऑनलाइन माध्यमांद्वारे शेअर करु नका, असे त्यांनी महिलांना सांगितले. या क्रार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम खंदारे यांनी केले.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाथ बालकाश्रमचालकास बेड्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

महिला व बालकल्याण विभागाची मान्यता नसतानाही अनधिकृतपणे परजिल्ह्यांतील मुलांना बालगृहाच्या नावाखाली स्वत:च्या घरात ठेवून त्या मोबादल्यात नातेवाइकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर येथील अनाथ बालकाश्रमचालकास लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या अनाथ बालकाश्रमचालकाच्या या कारनाम्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून निधी मिळत असतानाही बालकांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे, हे यानिमित्ताने समोर येण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर शहरापासून जवळच असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाटा येथे असलेल्या शासनमान्य त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमात हा प्रकार घडला. या ठिकाणी तक्रारदार यांचा नातू राहत असल्याने त्यांच्याकडे त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमाच्या सचिव आशादेवी फकीरराव आहिरराव आणि परमदेव फकीरराव आहिरराव यांनी प्रतिमहिना ७०० रुपयांप्रमाणे जुलै २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील पाच हजार ९५० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तीन हजार १०० रुपये यापूर्वीच घेतले होते. उर्वरित दोन हजार ८५० रुपये तक्रारदार यांच्याकडे मागणी केल्याने त्यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यानुसार 'एसीबी'ने तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी सापळा रचला. त्यात त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमाच्या सचिव आशादेवी फकीरराव आहिरराव यांना दोन हजार ८५० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्र्यंबकराज अनाथ बालकाश्रमातच ही कारवाई करण्यात आली.

--

नियमबाह्य मुलांना संस्थेत ठेवले

या संस्थेस महिला व बालकल्याण विभागाने १३ मुलांना संस्थेमध्ये प्रवेश देण्यास मंजुरी दिली आहे. नियमानुसार सदर संस्था एवढ्याच मुलांना संस्थेत प्रवेश देऊ शकते. तसेच, सरकारदेखील त्याचनुसार अनुदान देते. मात्र, या संस्थेने या १३ बालकांव्यक्तिरिक्त आणखी सात मुलांना संस्थेत प्रवेश दिलेला आढळून आला आहे. विशेष म्हणजे यात एक मुलगा नाशिकमधील, तर उर्वरित परजिल्ह्यांतील आहेत. परजिल्ह्यांतील मुलांना बालगृहांमध्ये प्रवेश देता नाही. मात्र, नातेवाइकांकडून मिळणाऱ्या पैशांमुळे हा प्रकार घडला. दरम्यान, संस्थेत मंजूर पदांपेक्षा अधिक मुले ठेवली जातात, ही बाब महिला व बालकल्याण विभागाच्या लक्षात कशी आली नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे ज्या बालकांची शासनदरबारी नोंदच नाही, अशा मुलांच्या संरक्षणाबाबतसुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

--

अनुदान असूनही लूट

त्र्यंबकेश्वर येथील अनाथ बालकाश्रम नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळवाडे फाटा भागातील तुपादेवी येथे थाटण्यात आलेला आहे. शासनाची मान्यता असल्याने या संस्थेस सरकारकडून निधी पुरविला जातो. मात्र, शासनाकडून पैसे मिळत असतानादेखील येथील बालकांचे नातेवाईक अथवा संबंधितांकडून संस्थाचालक पैशांची मागणी करतात. विशेष म्हणजे या किंवा यांसारख्या संस्थांना दानशूर व्यक्तीदेखील सढळ हताने मदत करतात. त्यामुळे अनाथ बालकांच्या माध्यमातून अशा प्रकारे देणग्या मिळविण्याची दुकानदारीच सुरू झाल्याची स्थिती आहे. यातील भ्रष्टाचाराच्या चर्चा वारंवार होत असतात. यापूर्वी प्रसिद्धिमाध्यमांतूनदेखील त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यात आता नातेवाइकांकडूनसुद्धा पैसे उकळण्याचा प्रकार समोर आल्याने संबंधितांनी या संस्था कोणाच्या कल्याणासाठी सुरू केल्या आहेत, याचा शोध शासनाने घेणे आवश्यक झाल्याची चर्चा त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टीचे दर स्लॅब कायम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी स्थायी समितीची परवानगी न घेताच शहरातील पाणीपट्टी दराचे बदललेले स्लॅब कायम राहण्याची शक्यता आहे. वाढविलेल्या पाणीट्टीचे दर आयुक्तांचा निर्णय येत नाही तोपर्यंत कायम राहणार असल्याचे कर विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना वाढीव दरानेच पाणीपट्टी अदा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घरपट्टी वाढविताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपट्टीच्या स्लॅबमध्ये देखील वाढ केली होती. ती वाढ तब्बल तीस पटींपर्यंत असल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी उघड केला होता. त्यावेळी पाणीपट्टीत नव्हे, तर स्लॅबमध्ये वाढ केल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले होते. आयुक्तांनी यावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आचारसंहिता असल्याने आता आयुक्तांकडून याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ही पाणीपट्टी कायम राहण्याचे संकट नाशिककरांवर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्री समर्थ बँके’तर्फे शुक्रवारपासून प्रदर्शन

0
0

'श्री समर्थ बँके'तर्फे

शुक्रवारपासून प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री समर्थ सहकारी बँक आणि देशस्थ ऋग्वेदी संस्था यांच्यातर्फे महिलांसाठी भव्य प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ मार्च या कालावधीत तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. उद्योगवाढीसह महिला सबलीकरणाला गती मिळावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महिलांनी बनविलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स येथे लावण्यात येणार आहेत. उद्योजिका चंद्रिका नवगण किशोर आणि बँकेचे चेअरमन डॉ. प्रशांत पुरंदरे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सायंकाळी पाच ते सात या वेळेत गीत रामायण स्पर्धा घेण्यात येणार आहे. १६ मार्च रोजी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहज हवन होते अंतर्गत धावपळीची दैनंदिनी या विषयावर डॉ. विनिता देशपांडे यांच्याशी सुप्रिया देवघरे संवाद साधणार आहेत. यामधून आजार प्रतिबंध आहार, जीवनशैली विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १७ मार्च रोजी बक्षीस समारंभ होणार असून, त्यास अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन यशस्वीतेसाठी दीप्ती पंडित, स्मिता घोटीकर, प्रणिता घाटपांडे, योगिता खांडेकर परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर काळाबाजारप्रकरणी४८ टाक्या जप्त; दोघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

घरगुती सिलिंडरमधून रिकाम्या टाकीत गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ४८ सिलिंडरसह एक टेम्पो असा सुमारे सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर परिसरात हा प्रकार सुरू होता.

संशयित लहू रामभाऊ हेगरंगे (रा. गांधीनगर वसाहत) व महेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही उपनगर येथील नूतन गॅस एजन्सीत कामाला आहेत. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हे दोघे गांधीनगरच्या सरकारी वसाहतीत टाटा एस टेम्पोमधून (एमएच १५, एफव्ही ८७४६) सिलिंडर वितरणाच्या ड्युटीवर होते. त्यांनी आपल्याजवळील भरलेल्या गॅस टाक्यांमधून गॅस काढून तो गाडीतील इतर रिकाम्या टाक्यांमध्ये भरला. दोघांकडे गॅस भरण्याचे साहित्य होते. ही माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांना समजताच ते हवालदार महेंद्र जाधव, महिला उपनिरीक्षक भदाणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांना रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना रंगेहाथ पकडले. या दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच रस्त्यावर दोनदा मोबाइल चोरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल या दरम्यान दोघांचे मोबाइल दुचाकीस्वारांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशोकनगर येथील विजय महाकांत झा (वय ४४, रा. ओमसाई छाया रो हाऊस) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. झा हे २२ फेब्रुवारी रोजी सिटी सेंटरकडून एबीबी सर्कलकडे मोबाइलवर बोलत पायी जात होते. पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. दुसरी घटना याच मार्गावर घडली. शशिकांत येवलेकर याच वेळेत या मार्गावरून जात असतांना त्यांच्याही हातातील महागडा मोबाइल दुचाकीस्वार भामट्यांनी खेचून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.

घरातून कॅमेऱ्याची चोरी

उघड्या घरात घुसून चोरट्यांनी व्हिडिओ कॅमेरा चोरून नेला. ही घटना आनंदवलीतील माळीवाडा भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुकाराम सयाजी गलांडे (रा. गलांडे सदन, माळीवाडा) यांनी तक्रार दिली. फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे गलांडे शनिवारी (दि. ८) सायंकाळी आपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी शोकेशवर ठेवलेली व्हिडिओ कॅमेऱ्याची बॅग चोरून नेली. बॅगेत सुमारे ४० हजारांचा ऐवज होता. त्यात सोनी कंपनीचा कॅमेरा, बॅटऱ्या, एलइडी लाईट आणि मेमरी कार्ड असा मुद्देमाल होता. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

पंचवटीत जुगारी गजाआड

निमाणी परिसरात मटका जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रशांत चव्हाण (रा. वाल्मीकनगर), बालाजी रेखणे (रा. संजयनगर) व वाल्मीक कांबळे (रा. पाथरवट लेन) अशी जुगारींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस शिपाई भरत विठ्ठल राऊत यांनी तक्रार दाखल दिली. निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या आर्केड या इमारतीच्या परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीपी स्कीम’ला नकारघंटा!

0
0

शेतकऱ्यांचा जागा देण्यास नकार; पालिकेचे तीनही प्रस्ताव फेटाळले

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील नगररचना परियोजना (टीपी स्कीम) मार्गातील अडथळे कमी होत नसल्याचे चित्र आहे. जमिनी देण्यासाठी आयुक्तांनी सादर केलेले तीनही प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारले असून, हा प्रकल्पच नको अशी भूमिका घेतली आहे. साडेतीनशे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर, आयुक्तांची भेट घेऊन महासभेचा ठरावच रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे स्मार्ट सिटीसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.

स्मार्ट सिटी अभियानात हरितक्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकर क्षेत्रात स्मार्ट नगररचना परियोजना राबवली जाणार आहे. यासाठी येथील जागामालक शेतकऱ्यांची मनधरणी पालिकेकडून केली जात असली तरी, पालिका प्रशासनाला त्यात यश मिळत नसल्याचे चित्र आहे. जागामालकांनी प्रथम मोबदला काय यावरून पालिकेची अडवणूक सुरू केली होती. त्यासाठी पालिकेने सर्वेक्षणाची अट पुढे केली होती. शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करण्यास तोंडी होकार कळवला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जागामालकांना अधिकाधिक मोबदला मिळावा, यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मध्यस्थी करीत तीन प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर मांडले होते. त्यात ६०-४०, ५५-४५ आणि ५०-५० प्रमाण ठेवत बेटरमेंट चार्जेस आणि विकास शुल्कातही सूट देण्याचा पर्याय ठेवला होता. परंतु, या प्रस्तावातील तरतुदी पाहता त्या जागामालकांसाठी नुकसानीच्याच असल्याचा दावा करीत हे तीनही प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळले आहेत. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार सर्वसाधारण जागा विकसित केल्यास १०० टक्के मोबदला मिळतो, तर ५५ टक्के जागेसाठी ४५ लाख रुपये शेतकऱ्यांनी कशासाठी मोजायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रस्तावित क्षेत्रावरील घरे, विहिरी, बागायती क्षेत्राच्या नुकसानीबाबत कुठलाही बोध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भातील १९ जानेवारी २०१९ रोजीचा महासभेचा ठराव क्रमांक २३२ व त्यापूर्वीचा महासभा ठराव क्रमांक ६०६ व ७७६ ही रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे टीपी स्किम पुन्हा अडचणीत सापडली असून, थेट नकारच कळविल्याने पालिकेच्या पवित्र्याकडे लक्ष लागून आहे.

....

एकरी ४५ लाख बेटरमेंट चार्जेस

शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींनुसार जागा विकसित करताना ओपन स्पेस ॲमिनिटी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोडलेल्या रस्त्याची जागा यातून जमीनमालकांना १०० टक्के मोबदला मिळतो. दुसरीकडे स्मार्ट नगररचना परियोजनेसाठी जागा दिल्यानंतर मात्र केवळ ५५ टक्के जागेचा परतावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. जागा विकसित करताना एकरी ४५ लाख रुपये बेटरमेंट चार्जेस मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शहर विकास नियंत्रण नियमावली आणि टीपी स्कीमच्या नियमावलीत मोठा फरक असून, एकरी ४५ लाख द्यायचे असतील तर हा प्रकल्पच नको, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगलकार्यालये रडारवर

0
0

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले फेरसर्वेक्षणाचे आदेश

...

- सर्वेक्षणात शहरात १६६ लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृत

- पंचवटीत ६५, नाशिकरोडला २४ आणि सिडकोत १९ लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृत

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील अनधिकृत मंगल कार्यालये पुन्हा रडारवर आली असून, वर्षभरापूर्वी स्थगित झालेली कारवाई विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. शहरातील अनधिकृत मंगल कार्यालयांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्त गमे यांनी नगररचना विभागाला दिले आहे. दरम्यान, कंपाउंडिंग पॉलिसीअंतर्गत प्रस्ताव दाखल केलेल्या मंगल कार्यालयांवर कारवाई होणार नसल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

महापालिका क्षेत्रात लॉन्स व मंगल कार्यालयांची परवानगी नवीन विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु, नियम धाब्यावर बसवत शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल १६६ लॉन्स व मंगल कार्यालये अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले होते. त्यात सर्वाधिक ६५ एवढी संख्या पंचवटीत आहे. त्या पाठोपाठ नाशिकरोड येथील २४ आणि सिडकोतील १९ लॉन्स व मंगल कार्यालयांचा समावेश आहे. नगररचना विभागाने या मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानुसार बहुतांश मंगल कार्यालये, लॉन्सचालकांनी आपापली अनधिकृत बांधकामे स्वत:हून हटवली. त्यानंतर उद्भवलेले गंगापूररोडवरील 'ग्रीन फिल्ड' प्रकरणानंतर अनधिकृत मंगल कार्यालयांविरोधातील पालिकेची मोहीम थंडावली होती. परंतु, आयुक्त गमे यांनी पुन्हा ही फाइल बाहेर काढत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या अनधिकृत मंगलकार्यालयांवर कारवाई अटळ मानली जात आहे. या लॉन्सचालकांना पुन्हा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील आत्महत्यांचे सत्र रोखण्यात अपयश आले याबाबत मावळते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी खंत व्यक्त केली. संधी मिळाली, तर पुन्हा नाशिकमध्ये काम करण्यास निश्चितच आवडेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मंगळवारी बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर राधाकृष्णन बी. यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राधाकृष्णन बी. म्हणाले, की बदली हा सरकारी नोकरीमध्ये अपरिहार्य भाग आहे. जालना, रत्नागिरी येथे काम केल्यानंतर नाशिकमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा जिल्हा मोठा असून, काम करणे आव्हानात्मक होते. परंतु, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळाल्यामुळे या जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. पॉवर ग्रीडसारखे काही प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावताना यश आल्याचे त्यांनी सांगितले. दाखले वितरण पद्धतीमधील एजंटगिरीला चाप लावण्यासाठी सेतू कार्यालये बंद करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयामूळे ऑनलाइन दाखले वितरण पद्धतीला अधिक गती मिळाली. सप्तशृंगगडावर प्लास्टिकबंदी, निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणीच्या कामालाही त्यांच्या कार्यकाळात गती मिळाली.

--

'समृद्धी'बाबत समाधान

नाशिकसारख्या जिल्ह्यात भूसंपादन करणे किती कठीण काम आहे हे समृद्धी महामार्गाकरिता भूसंपादन करताना प्रकर्षाने जाणवले. हा महामार्ग नाशिकऐवजी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमार्गे वळवावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी हा महामार्ग आवश्यक असल्याने भूसंपादन प्रक्रिया यशस्वी केली याचे मनस्वी समाधानही राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मातीच्या आरोग्याचे होईना निदान!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मातीचे नमुने तपासणी करून मृदा आरोग्य पत्रिकावाटपाचे शंभर टक्के उद्दीष्ट साध्य झाले आहे. मात्र, त्यातील शास्त्रीय भाषा आणि शिफारशींबाबत तांत्रिक सल्ला देण्यासाठी कृषी विभागाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या आरोग्य पत्रिका मिळूनही मातीच्या आरोग्याचे निदान शेतकऱ्यांकडून होत नसल्याचे चित्र आहे.

सन २०१५-१६ या वर्षापासून केंद्र व राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मातीचे नमुने तपासणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून देण्याच्या योजनेला सुरुवात झाली. नाशिक विभागात २०१८-१९ या वर्षासाठीचे मातीचे नमुने तपासणी आणि आरोग्य पत्रिका वितरणाचे लक्ष्य साध्य झाले आहे. मात्र, हे काम निव्वळ कागदोपत्री पार पाडण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नाशिक विभागात तब्बल ७ लाख ५२ हजार ४०६ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. या पत्रिका मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यातील शास्त्रीय भाषा समजण्यास अडचण येत आहे. मात्र, कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे तो एक सोपस्कारच ठरला आहे. मातीचे नमुने तपासणीसाठी विभागात केवळ तीन सरकारी तर २७ खासगी लॅब आहेत. यातील बहुतेक मृदा आरोग्य पत्रिका या खासगी लॅबमधुन तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी एका आरोग्य पत्रिकेसाठी शेतकऱ्यांकडून ३०० रुपये शुल्कही वसूल करण्यात आले आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास २० कोटी रुपयांहून अधिक खर्च झालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात पत्रिकांचा उपयोग मोजक्याच शेतकऱ्यांना झाला आहे.

कृषी विभागाने माती तपासणी करून मृदा आरोग्य पत्रिका दिली असली, तरी प्रत्यक्षात त्यानुसार शेती करणे सामान्य शेतकऱ्यासाठी व्यवहार्य नाही. आरोग्य पत्रिकेवरील भाषाही खुपच किचकट आणि सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरची आहे.

- नवनाथ गायधनी, शेतकरी

विभागातील मृदा आरोग्य पत्रिका वाटप (२०१८-१९)

जिल्हा-मृद नमुने लक्ष्य-साध्य-आरोग्य पत्रिका वितरण लक्ष्य-वाटप-टक्के

नाशिक-९१८०५-९०१४५-३७७७४६-३७३६७७-९९

धुळे-३०७१३-३००९३-८००००-१००४४६-१२६

जळगाव-६२६४७-६३३११-२१९३१७-२५०३२८-११४

नंदुरबार-२३३०२-१४४७८-५५०००-२७९५५-५१

एकूण-२०८४६७-१९८०२७-७३२०६३-७५२४०६-१०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चरस तस्कराला बेड्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या खडकाळीतील एकास पोलिसांनी अटक केली. मुंबई येथून त्याने या अमली पदार्थाची तस्करी केल्याची कबुली दिली असून, संशयिताच्या ताब्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचा आणि १२० ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा. पाटकरी लॉजसमोर, खडकाळी) असे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई युनिटचे सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. मुंबई येथून एक तरुण चरस नावाच्या अमली पदार्थाची विक्रीसाठी तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मध्यरात्री खडकाळी भागात सापळा लावण्यात आला होता. संशयित मुंबई येथून परतत असताना घरी पोहोचण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. रसूलबाग भागातून घराकडे जात असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत १२० ग्रॅम चरस आढळून आला. मुंबईत अल्पदरात खरेदी करून तो अमली पदार्थ शहरात विक्री करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो हा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. हवालदार प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात 'एनडीपीएस' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन खैरनार, महेश कुलकर्णी उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार रवींद्र बागुल, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, शिपाई नीलेश भोईर, विशाल काठे, विशाल देवरे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, रावजी मगर, प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला कारवास

0
0

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला कारवास

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक वादानंतर पत्नी माहेरी जात असल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी मंगळवारी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. वडाळा गावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी भागात १० एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती.

जिवाजी भुजंग पहाडे (रा. सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, वडाळा गाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पहाडे दाम्पत्य मांगीरबाबा चौकात राहत होते. १० एप्रिल रोजी या दाम्पत्यात कौटुंबिक वादातून कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत झटापट झाली. त्यामुळे पत्नी सुरेखा जिवाजी पहाडे ही रागाने माहेरी निघाल्याने ही घटना घडली होती. पतीच्या रोजच्या मारझोडीमुळे सुरेखा माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडली असता दारातच पती जिवाजीने तिला गाठून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने संतप्त झालेल्या जिवाजीने शिवीगाळ करीत तिच्यावर चाकूने वार केले. यावेळी जखमी अवस्थेत सुरेखा जमिनीवर पडली असतानाही त्याने तिला मारहाण केली. या दाम्पत्यातील वाद नेहमीचेच असल्याने शेजाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले होते. जिवाजीने तेथून काढता पाय घेतल्याने नजीकच्या रहिवाशांनी धाव घेत जखमी सुरेखाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे आणि उपनिरीक्षक एच. आर. घुगे यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला चालला. सरकारतर्फे अ‍ॅड. योगेश कापसे यांनी काम पाहिले. खटल्यात फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे या आधारे न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय एल. यू. शेख आणि पोलिस नाईक संतोष गोसावी, हवालदार एम. के. माळोदे आदींनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इलेक्शन ड्युटी’चा फिव्हर

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जाणवत असून, अनेक कर्मचारी 'ऑन इलेक्शन ड्युटी'वर असल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला.

मंगळवार हा आठवडे बाजार आणि मजुरांचा साप्ताहिक सुटीचा वार असल्याने पंचयात समिती कार्यालयात तालुक्यातील ग्रामस्थ शासकीय कामांसाठी आले होते. त्यात घरकुलाचे लाभार्थी, कृषि विभागाच्या औजारे आदी योजनांसाठी, समाज कल्याण विभागचे लाभार्थी आले होते. मात्र अधिकारी आणि कर्मचारी इलेक्शन ट्रेनिंग अथवा मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने येथे रिकाम्या खुर्च्या आणि वर गरगरणारे पंखे असेच चित्र जवळपास सर्व विभागात पहावयास मिळाले.

यावर्षी पाऊस कमी झाला आहे. तालुका दुष्काळ यादीत घेतलेला नाही. मात्र दुष्काळाची परिस्थिती सर्वत्र असून मार्च प्रारंभापासून दाहकता वाढीस लागली आहे. धरण साठा कमी होत आहे. तर गावोगावच्या पाणीपुरवठा योजना अपुर्णावस्थेत रखडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधींसह अधिकारीही आता निवडणूक कामात व्यस्त असल्याने पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायाधीशांच्या घरावर दोंडाईचामध्ये दगडफेक

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दिवाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याची घटना जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे सोमवारी (दि. ११) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. दगडफेक करणाऱ्या माथेफिरूला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरातील न्यायाधीश संतोष गरड यांच्या निवासस्थानाशेजारी राहणाऱ्या विवेक अजय निकवाडे उर्फ विक्की निकवाडे (वय ३०) याने त्याच्या तीन ते चार साथीदारांसह सोमवारी (दि. ११) रात्री ही दगडफेक केली. तसेच यानंतर न्यायाधीश अण्णासाहेब गिऱ्हे यांच्या निवासस्थानाजवळ कार जाळण्याचा प्रयत्न केला, असे सूत्रांनी सांगितले. न्यायाधीशांच्या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना कळताच मोठा जमाव त्याठिकाणी जमला होता. त्यानंतर परिसरातील जमावाने विक्की निकवाडे यास पकडून बेदम चोप दिला. ही माहिती पोलिसांना समजताच न्यायालयातील पोलिस कर्मचारी, भरारी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून विक्की निकवाडे यास सोडविले. त्यानंतर उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही दगडफेक का करण्यात आली, या संदर्भात कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या प्रकारानंतर न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ट्रॉलीच्या धडकेत व्हॅनचालक ठार
धुळे : ट्रॉलीने समोरून जोरदार धडक दिल्याने पिकअप व्हॅनचा चालक जागीच ठार झाला. ही घटना साक्री शहरातील सुमालती हॉस्पिटलजवळ मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. तर ट्रॉलीचालकाने घटनास्थळावरून वाहन घेत पोबारा केला. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात ट्रॉलीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील मुसळे (रा. पिंपळनेर) असे ठार झालेल्या व्हॅनचालकाचे नाव आहे. किराणा व्यावसायिक असलेले मुसळे हे नागली विकण्यासाठी पिकअप व्हॅन (एमएच ४७ ई ०९०१) मधून जात असताना सुरत-नागपूर महामार्गावर ट्रॉली (जीजे ०५ एयू ७०६७) ने जोरदार धडक दिल्याने सुनील मुसळे वाहनात दाबले गेले. त्यांच्या पोटात पिकअप व्हॅनचे स्टेरिंग घुसल्याने ते जागीच मृत झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images