Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तोतया कर्नल बनला अन् चौकशीत फसला!

$
0
0

देवळालीच्या एअरफोर्समध्ये प्रकार उघडकीस

...

- फसवणुकीचा गुन्हा दाखल

- १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

....

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सध्या लष्कराच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील वातावरण निर्माण झालेले असताना मेरठ येथील लष्करी भागात काम करून सेवानिवृत्त झालेल्या क्लार्कने स्वतःची खरी ओळख लपवीत एअरफोर्स स्टेशनमध्ये प्रवेश मिळवला. मात्र ओळखपत्राबाबत समस्या निर्माण झाल्याने तो फसला आणि पकडला गेला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तीनही लष्करी दलाच्या विविध भागांत असलेली कार्यालय, निवासस्थाने आदी ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. असे असताना मेरठ येथील वीरेंद्रपाल सिंग याने देवळालीच्या साऊथ भागातील एअरफोर्स कार्यालय परिसरात स्वतःची खरी ओळख लपवून मी कर्नल व्ही. पी. सिंग असल्याचा बनाव केला. आपण लष्करी अधिकाऱ्यांच्या पॉलिसी व म्युच्युअल फंडाबाबत मार्गदर्शन शिबिरे घेत असल्याचे सांगत त्याने येथील एअरफोर्स स्टेशमधील एओसी यांची अपॉईन्मेंट घेऊन आलो असल्याचे गेटमधून प्रवेश करताना सहाय्यक सुरक्षा अधिकारी सत्येंद्रनाथ ठाकूर यांना सांगितले. त्यानंतर त्याचे ओळखपत्र तपासून आत सोडले. येथील एओसी यांचे सचिव सार्जेन्ट राज पुरोहित यांनी त्याचे ओळखपत्र तपासले असता, त्यात फेरफार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून त्याच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सखोल चौकशीदरम्यान त्याने आपले खरे नाव वीरेंद्रपाल सिंग हेच असून, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कार्यालयातून २०१५ साली सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. येथील लष्करी परिसरात असलेल्या अल्फा ऑफिसर मेसमध्ये ब्रिगेडियर एम. एन. मसूर यांच्या नावाने आरक्षित केलेल्या खोलीमध्ये राहत असल्याचे त्याने सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात लष्कराचा तोतया अधिकारी बनून फिरणाऱ्या या मसूर विरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केले असता, १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहितेचे अॅप, भलत्याच तक्रारींचा ताप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सजग नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करता याव्यात आणि प्रशासनानेही त्यावर त्वरित कार्यवाही करावी, याकरिता निवडणूक आयोगाने सी-विजिल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी त्यावर विषयानुरूप तक्रारींऐवजी भलत्याच तक्रारींचा ताप सहन करावा लागत आहे. स्वत:चे सेल्फी पाठविण्यासह शैक्षणिक तक्रारीही या अॅपवर मांडल्या जाऊ लागल्याने यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासनही आग्रही आहे. काळानुरूप निवडणूक आयोगानेही कात टाकली असून, निवडणूक प्रक्रिया राबविताना यंदा तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्यात येत आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे आयोगाला अपेक्षित आहे; परंतु तरीही आचारसंहिता भंगाचे प्रकार घडतातच. असे प्रकार सामान्य नागरिक, पक्षीय कार्यकर्त्यांच्या पटकन नजरेत भरू शकतात. म्हणूनच आचारसंहिता भंग होत असल्यास त्याचे फोटो, व्हिडिओसह अपडेट्स तातडीने निवडणूक शाखेकडे पाठवावे, यासाठी सी-विजिल अॅप विकसित करण्यात आले आहे. यंदा प्रथमच त्याचा वापरही या निवडणुकीत होतो आहे. या अॅपवरील प्रत्येक तक्रारीची दखल निवडणूक शाखेने घेणे अनिवार्य आहे. या अॅपवर तक्रार प्राप्त होताच जीपीएसच्या मदतीने संबंधित स्थळाची माहिती घेऊन १५ मिनिटांत भरारी पथक घटनास्थळावर पोहोचणे आवश्यक आहे. तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती १०० मिनिटांच्या आत आयोगाला पाठविणे बंधनकारक असल्याने 'सी-विजिल'वरील प्रत्येक तक्रार जिल्हा निवडणूक शाखेकडून गांभीर्याने घेतली जात आहे.

या शाखेला अॅपच्या माध्यमातून नऊ तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी त्यापैकी एकच तक्रार आचारसंहिता भंगाच्या प्रकारात समाविष्ट होत असल्याने त्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवडणूक शाखेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अन्य तक्रारींपैकी तीन तक्रारींमध्ये नागरिकांनी मोबाइलवर स्वत:चे सेल्फी काढून पाठविले आहेत. एक तक्रार शैक्षणिक विषयाशी संबंधित असून, एका पत्राचा आचारसंहिताभंगाशी संदर्भ लागत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एक तक्रार पेड न्यूजशी संबंधित असून, त्याबाबत कार्यवाही केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

तक्रारीऐवजी सेल्फी पाठवला!

एका व्यक्तीने आमच्या परिसरात पैसेवाटप सुरू असल्याची तक्रार केली असली तरी घटनास्थळाच्या फोटोऐवजी स्वत:चा फोटो पाठविला आहे. मात्र, या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे, शहानिशा करणे आणि कार्यवाही करणे यंत्रणेला अनिवार्य असून, अशा फालतू तक्रारींमध्ये यंत्रणेला बहुमूल्य वेळ आणि श्रमही खर्ची घालावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेटविलेल्या कचऱ्यात उभे राहून आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अपघातानंतरच्या नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने कचऱ्याचा ढीग पेटवून त्यात उभे राहून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महापालिकेच्या शाळा क्रमांक ५७ च्या मैदानाशेजारील एसटी महामंडळाच्या जागेवर घडली.

त्र्यंबक नामदेव लोहकरे (वय ६५, रा. गायकवाड मळा, मुक्तिधाममागे, मूळ गाव नायगाव, ता. सिन्नर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, प्रत्यक्षदर्शींनी हा सर्व बर्निंग थरार बघताच पाणी टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना अपयश आले. ही घटना समजताच उपनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रवीण बाकले आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह नगरसेवक रमेश धोंगडे आदींच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख निष्पन्न झाली. लोहकरे यांची पत्नी सुशीला लोहकरे, मुलगी मोनिका बनकर घटनास्थळी आल्यावर या घटनेचा अधिक उलगडा झाला. लोहकरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

त्र्यंबक लोहकरे रिक्षाचालक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता, तेव्हापासून ते नैराश्यग्रस्त होते. याच नैराश्यातून रविवारी सकाळी त्यांनी एसटी महामंडळाच्या जागेवर येऊन तेथे साचलेला कचरा पेटवला आणि त्यात उभे राहून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच शाळेच्या मैदानावरील नागरिकांनी लोहकरे यांच्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना यश मिळाले नाही. उपनगर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

आरक्षित जागा ठरतेय तापदायक

ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा एसटी महामंडळासाठी आरक्षित आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही जागा पडून असल्याने येथे रानटी झाडांचे जंगलच उभे राहिले आहे. त्याआडून येथे दिवसाढवळ्या अनेक गैरप्रकार सुरू असतात. येथे कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो. मद्यपी, जुगारी, टवाळखोरांचाही येथे कायम वावर असतो. या सर्व प्रकारांमुळे ही जागा स्थानिक नागरिकांसाठी तापदायक ठरत असून, एसटी महामंडळ मात्र या प्रकारांकडे डोळेझाक करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनात जिलेटिन, डिटोनेटरचा साठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू असताना जायखेडा पोलिसांनी जिलेटिन व डिटोनेटरच्या साठ्यासह पीकअप वाहन जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी लावून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे अधिकारी यांना सतर्कपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. याअंतर्गत अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या देखरेखीखाली जायखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत चिचलीबारी येथे नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाला मुल्हेरकडून गुजरातकडे जाणारी महिंद्रा पीकअप (आरजे ०६, जीसी २१८५) ही वेगाने जात असताना आढळली. पोलिसांनी या वाहनाला अडविले असता त्यातील एक व्यक्ती खाली उतरून अंधारात पळून गेली.

पाठलाग करून हे वाहन पकडल्यानंतर चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पीकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यात तब्बल २१५० नग जिलेटिनच्या कांड्या व १७५० नग डिटोनेटर विनापरवाना, बेकायदेशीर व मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आढळून आले. पोलिसांनी पीकअप चालक भवरलाल शंभूलाल गुर्जर (वय २८, रा. करणीपाडा, पंचायत छतरपुरा, ता. आसिन जि. भिलवाडा, राजस्थान) व पळून गेलेला साथीदार बुद्धलाल तुलसीराम गुजर यांच्याविरुद्ध भारतीय स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकला वेगळा नियम का?’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकीकृत विकास नियंत्रण नियमावली नाशिकसाठी जाचक ठरणार असून, राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकला वेगळा नियम का, असा प्रश्न बांधकाम व्यावसायिकांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उपस्थित केला.

बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिकांनी शहरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एफएसआयचा टेबल वगळण्यासाठी दुरुस्तीपत्र काढावे तथा सदर नियमावली अंतिम मंजूर होण्यापूर्वी सदरच्या सर्व अडचणी दूर करून नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला चालना द्यावी, अशी विनंती क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी केली. संपूर्ण राज्यासाठी प्रकाशित केलेल्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावली (युनिफाइड डीसीआर)मध्ये इतर शहरांपेक्षा नाशिकचा एफएसआय कमी केला आहे, तसेच अॅमिनिटी स्पेसचे नियम इतर शहरांपेक्षा नाशिकला वेगळे दिले आहेत. व्यापारी संकुलांसाठी प्रस्तावित पार्किंगचे नियमही अतिशय कठोर लावले असल्याने नाशिक शहरात बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. हे जाचक नियम बदलण्याची आग्रही मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले. मात्र, सध्या आचारसंहिता सुरू असल्याने त्याबाबत कुठलाही निर्णय आता घेता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यावर आचारसंहिता संपल्यानंतरच निर्णय होणार आहे.

माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी सांगितले, की महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एमआरटीपी कायदा, कलम ४६ हा सदर प्रकाशित एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीसाठी लागू होणार नसून, तो अंतिम मंजुरीनंरच अमलात येईल. तसे नियमावलीमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे स्ट्रक्चर टू हा नियम लागू होणार नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले असून, ते अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, क्रेडाईचे पदाधिकारी रवी महाजन, कृणाल पाटील, अनिल आहेर, ऋषिकेश कोते, अंजन भलोडिया, अतुल शिंदे, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनांशी पोलिसांचेही ‘मनोमिलन’!

$
0
0

फोटो - सतीश काळे

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नो पार्किंगमध्ये एरवी वाहन लावण्याचा अवकाश, तोच वाहतूक पोलिसांकडून वाहने टोइंग केली जातात. हे चित्र मात्र रविवारच्या भाजप-शिवसेना मनोमिलन मेळाव्याप्रसंगी दिसले नाही. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची वाहने चोपडा लॉन्स परिसरात नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आली होती. तरीदेखील पोलिसांनी टोइंग कारवाई केली नाही. त्यामुळे 'त्या' वाहनांचे टोइंग का नाही, असा सवाल आपसूकच सामान्यांच्या मनात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप- शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मनोमिलन मेळावा रविवारी (ता. १७) झाला. जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्समध्ये हा मेळावा झाला. मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी लॉन्सच्या आजूबाजूच्या परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क केली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा वेळ चार ते पाच तासांनी मंदावला होता. मुख्य गंगापूर रोडपर्यंत पदाधिकाऱ्यांची वाहने असल्याने तेथील वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवला. सामान्य वाहनधारकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागलाच, शिवाय लॉन्स परिसरात वाहने बेशिस्तपणे पार्क झाल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागला. अपार्टमेंट्स आणि बंगल्याच्या प्रवेशद्वारातच वाहने लावण्यात आल्याने रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागला.

विशेष म्हणजे, सामान्यांना होणारा प्रचंड त्रास आणि मोठा पोलिस बंदोबस्त, असे असूनही वाहतूक पोलिसांच्या देखरेखीतच पदाधिकाऱ्यांनी 'नो पार्किंग'मध्ये वाहने उभी केली. मात्र, त्या वाहनांवर कारवाई करण्यात आली नाही. मेळाव्याच्या प्रारंभी परिसरात लावलेल्या दुचाकींवर टोइंग कारवाई केली गेली; पण चारचाकी वाहनांवर साधी दंडात्मक कारवाईही झाली नाही. त्यामुळे राजकीय पदाधिकारी आणि सामान्य वाहनधारकांमध्ये कारवाईचा दुजाभाव का, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई न करण्याचा पोलिसांवर दबाब होता की, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याची भीती?, अशी चर्चा मेळाव्यादरम्यान परिसरात होती.

दरम्यान, चोपडा लॉन्स परिसरात रविवारी झेड प्लस सुरक्षा तैनात असल्याने त्या ठिकाणची दुचाकी वाहने उचलण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरक्षेला बाधा येईल, अशा पद्धतीने ती वाहने लावली होती. बंदोबस्त अधिकाऱ्यांनी तीन-चार वेळा वाहने काढण्यास सांगूनही वाहनधारकांनी ऐकले नाही. अखेर दुचाकी टोइंग केल्या, असे पोलिस प्रशासनाने सांगितले. मात्र, या कारवाईत पदाधिकाऱ्यांच्या चारचाक्यांना अभय दिले.

\B

वाहतूक कोंडीने मनस्ताप

\Bमेळावा संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांची लॉन्सबाहेर एकच झुंबड उडाली. पदाधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांचा ताफा एकाच वेळी निघाल्याने, वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या सामान्य वाहनचालकांना या कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांनी अगोदरच कारवाई केली असती तर ही कोंडी टाळता आली असती, असे मत नागरिकांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांमुळे सांस्कृतिक अध:पतन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडिया ही समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माध्यमांची मक्तेदारी सोशल मीडियाने मोडून काढली. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मूठभर लोकांच्या हाती कुणालाही समाजाच्या माथी थोपवण्याचे सामर्थ्य होते. ही मक्तेदारी सोशल मीडियाने उद्ध्वस्त केली. परंतु, दुसरीकडे माध्यमांमुळे सांस्कृतिक अध:पतन झाले आहे. अर्थात, माध्यमेही त्यासाठी अगतिक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराचे वितरण रविवारी करण्यात आले. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना नवी दिल्ली येथील प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना खांडेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे, 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचनालयाच्या टिळक पथावरील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा सोहळा झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. निवड समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी भूमिका मांडली. श्रीकांत बेणी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयप्रकाश जातेगावकर आणि बी. जी. वाघ यांनी परिचय करून दिला. संगीता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी आभार मानले.

--

विपरित गोष्टी प्रमाणित करण्याचे काम

खांडेकर म्हणाले, की आपण काही काळापूर्वी अनेक प्रश्न घेऊन हिरिरीने मांडत होतो. मात्र, राष्ट्राभिमान, देशभक्तीने या सर्वांची जागा एका क्षणात घेतली असून, इतर प्रश्नांचा विसर पडला आहे. अनंत बागाईतकर म्हणाले, की सोशल मीडियाच्या माध्यमातून विपरित गोष्टी प्रमाणित करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांमध्ये रेग्युलेशन राहिलेले दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांना निमातर्फे आजपासून मार्गदर्शन

$
0
0

उद्योजकांना निमातर्फे

आजपासून मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), जीआयझेड व आयजीटीआर, औरंगाबादतर्फे 'सीएनसी आणि व्हीएमसी प्रोग्रामिंग' उपक्रमांतंर्गत उद्योजकांना सोमवार (दि.१८) ते बुधवार (दि.२०) मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

'सीएनसी आणि व्हीएमसी प्रोग्रामिंग' या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक वाटचालीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 'सीएनसी आणि व्हीएमसी प्रोग्रामिंग'ची संपूर्ण माहिती उद्योजकांना देण्यात येईल. १८ ते २० मार्च या कालावधीत प्रत्यक्ष कंपन्यांना भेटी तर, २३ ते २५ मार्च या कालावधीत आयजीटीआर, औरंगाबाद येथे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येईल. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार असून, त्यांचे अनुभव व मार्गदर्शन श्रवण करण्याची संधी उद्योजकांनी मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, जीआयझेडचे सल्लागार परीक्षित जाधव यांच्याशी निमा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडला २६ दिवसांनंतर पाणी

$
0
0

मनमाड बचाव समितीने केले आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई असताना पालखेड धरणातून पाटोदा साठवणूक तलावात आवर्तन सोडण्यास तब्बल तीन ते चार दिवस उशीर झाल्याने शहराला रविवारी दुपारी तब्बल सव्वीसाव्या दिवशी पाणीपुरवठा झाला. शहरातील विवेकानंदनगर भागात रविवारी दुपारी पाणीपुरवठा झाला.

शनिवारी रात्रीपर्यंत पाटोदा तलावासाठी पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याच्या हालचाली दिसत नसल्याने अखेर रात्री उशिरा मनमाड बचाव समिती व शहर पत्रकार संघाने पाणी तातडीने सोडले नाही तर धरणे आंदोलनाचा इशारा दिल्याने व पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व गटनेते गणेश धात्रक यांनी देखील संभाव्य आंदोलनाची जिल्हा व पोलिस प्रशासनाला माहिती दिल्याने शनिवारी रात्री आवर्तनाचे पाणी मनमाडच्या पाटोदा तलावात सोडण्यात आले. हे पाणी मनमाडच्या वागदर्डी धरणात तातडीने घेऊन रविवारी मनमाडच्या विवेकानंद नगर, कॉलेज रोड भागात तब्बल सव्वीस दिवसानंतर नळाला पाणी आले. दरम्यान पाटोदा तलाव पूर्ण भरून देण्यात यावा, तलाव भरेपर्यंत पाणी सुरूच ठेवावे, किमान ४० एमसेफ्टीक पाणी मनमाडला द्यावे या मागणीसाठी रविवारी सकाळी मनमाड बचाव समिती व शहर पत्रकार संघातर्फे नगर पालिके जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

पालखेड डाव्या कालव्यातून येवला व मनमाडसाठी आवर्तन सोडण्यात आले. मात्र मनमाडला तीव्र पाणीटंचाई असूनही आवर्तन सुटल्यानंतर तीन चार दिवस उलटून देखील पाटोदा साठवणूक तलावाला पाणी दिले गेले नाही. त्यामुळे मनमाड बचाव समितीचे अशोक परदेशी व शहर पत्रकार संघाचे बब्बू शेख यांनी पाणी सोडावे या मागणीसाठी शनिवारी रात्री धरणे आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर शनिवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजता पाटोदा साठवणूक तलावासाठी पाणी सोडण्यात आले.

अवघे दोन पंप सुरू

वास्तविक उशिरा पाणी सोडल्यानंतर मनमाडसाठी पूर्ण क्षमतेने पाणी देणे अपेक्षित असताना पाटोदा येथे चार पंपांऐवजी अवघे दोन पंप सुरू राहतील एवढेच पाणी दिले जात असल्याने मनमाडकरांमध्ये रविवारी असंतोष पसरला. मनमाड बचाव समिती व शहर पत्रकार संघाचे रविवारी सकाळी ११ वाजता चार पंप सुरू राहतील, एवढे पाणी द्यावे यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. पालखेड धरणातून आवर्तन सुटले. पण येवला, पाटोदाच्या आणी येवल्याच्या पुढे असणाऱ्या काही गावांना पाणी दिले गेले. तिकडची छोटी मोठी धरणे भरण्यात आली. त्यानंतर येवला, व पाटोदा तलाव असे पाणी दिले गेल्याने. मनमाडमध्ये पाणीटंचाई तीव्रता वाढून थेट

२६व्या दिवशी नळाला पाणी आले.

तीन महिने पुरेल पाणी

पाटोदा तलावात पूर्ण क्षमतेने पाणी दिल्यास व तलाव भरेपर्यंत पाणी सुरूच ठेवल्यास मनमाडला ४० ते ४५मे सेफ्टीक पाणी मिळून दिलासा मिळेल. हे पाणी पुढील आवर्तन मिळेपर्यंत अडीच ते तीन महिने पुरेल, असे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर व गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांची’ स्वप्ने फुलणार राखेतून...!

$
0
0

शुभवार्ता

---

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सण कोणताही असो, 'त्यांच्या' भाळी नेहमीचीच दारिद्र्य लिहिलेले...सणाच्या दिवशीही गोडधोड अन्नाचा घास त्यांच्या तोंडी जात नाही...हाताला काम अन् घामाला दाम मिळत नाही. परंतु, यंदाच्या होळीला हे चित्र बदलणार आहे. त्यात आर्थिक सक्षमतेचे रंग भरले जाणार आहेत. होळीसाठी तब्बल दोन लाख गोवऱ्या विक्रीतून वाड्या-पाड्यांवरील या आदिवासी स्त्रियांचे सबलीकरण होणार आहे. नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या या गोवऱ्यांची राखदेखील सेंद्रिय खत म्हणून वापरता येणार आहे. त्यामुळे यंदाच्या होळीलाआदिवासी महिलांची स्वप्ने राखेतून फुलणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित सेवा संकल्प समितीच्यावतीने 'गोमय होळी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील १८ व पेठ तालुक्यातील आठ पाड्यांवरील आदिवासी महिला गेल्या महिनाभरापासून गोवऱ्या बनवत असून, होळीच्या पार्श्वभूमीवर या गोवऱ्या शहरात आणण्यात आल्या आहेत. महिनो न् महिने हाताला काम न मिळाल्याने रानातील मेवा व घरातील किडूकमिडूक विकून त्यावर गुजराण करणाऱ्या आदिवासी स्त्रियांच्या हाताला यानिमित्ताने काम मिळाले असून, त्यांना त्याचा योग्य मोबदलाही मिळत आहे. गोवऱ्या विक्रीतून येणाऱ्या पैशातील अर्धा वाटा या महिलांना मिळणार असल्याने अत्यंत राजीखुशीने या गोवऱ्या बनविण्याच्या कामी त्यांनी स्वत:ला वाहून दिले. सेवा संकल्प समितीची सहा जणांची टीम या कामी लक्ष घालत आहे. गेल्या वर्षापासून सेवा संकल्प समिती हा गोमय होळीचा उपक्रम राबवत असून गेल्या वर्षी या महिलांनी तब्बल एक लाख गोवऱ्या विकल्या होत्या. आता सध्याही मुंबई, पुणे, गुजरातमधील बलसाड या ठिकाणाहून या गोवऱ्यांना मागणी वाढत असून त्यासाठी ट्रक रवाना झाले आहेत. नाशिकमध्ये श्री गुरूजी रूग्णालय व गोदाघाटावरील गौरी पटांगणावर या गोवऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

अशा आहेत गोवऱ्या

या आदिवासी स्त्रियांनी बनवलेली गोवरी १२ इंची असून, त्यात देशी गायीचे शेण, निर्गुडी व एरंडाच्या पाल्यापासून या गोवऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. या गोष्टींमुळे गोवरी जळायला कमी वेळ लागतो व त्याची राखही सेंद्रिय खत म्हणून वापरता येते. त्यासाठी त्यांना सेवा संकल्प समितीच्यावतीने १२ इंची बॉक्स देण्यात आला होता, त्यामुळे या गोवऱ्या थापणे त्यांना सहज शक्य झाले.

सणासुदीला दोन पैसे गाठीला हवे म्हणून या गवऱ्या थापण्याचे काम आम्ही गेल्या वर्षापासून करतोय. त्यात आमचा भरपूर फायदा होतो. सणासुदीला गोडधोड खाता येतं. लेकरांच्या तोंडी पुराणपोळीचा घास घालता येतो.

-मोगूबाई पलांडे, आदिवासी महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिंक सिस्टर्स’ची दौड

$
0
0

फोटो - पंकज चांडोले\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर झुम्बा नृत्य केल्यानंतर हाती 'पिंक सिस्टर्स'चे फलक घेऊन धावत असलेल्या हजारो महिला, सकाळच्या आल्हाददायक वातावरणात लहानमुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी ब्रेस्ट कॅन्सरसह व्यायामाचे प्रबोधन करण्यासाठी घेतलेली दौड, असे उत्साहवर्धक वातावरण रविवारी शहरात दिसले. निमित्त होते ते, 'पिंकेथॉन'चे.

'इंडिया गोइंग पिंक'अंतर्गत 'नाशिक गोइंग पिंक' ही संकल्पना राबविण्यात येत असून, महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात प्रबोधन करण्यासाठी तसेच, त्यांच्या आरोग्यासाठी काल, रविवारी (दि. १७) शहरात 'पिंकेथॉन'चे आयोजन करण्यात आले. त्यासाठी पहाटे पाचपासूनच महात्मानगरजवळील ठक्कर डोम येथे महिलांची मांदियाळी जमू लागल्याचे दिसून आले. सकाळी ५.३० वाजता झुम्बा नृत्य करीत वॉर्मअप सेशन घेण्यात आले. यामध्ये रनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. सकाळी ६ वाजता अभिनेता आणि पिंकेथॉनचा संस्थापक मिलिंद सोमण याच्या हस्ते रनला प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ यांसह नाशिक पिंकेथॉनची राजदूत आयर्न गर्ल रविजा सिंगल यावेळी उपस्थित होते.

'बेटी पढाओ, बेटी बचाओ', 'नारीशक्ती जिंदाबाद', 'ब्रेस्ट कॅन्सर टाळू या, प्रबोधन करुया', अशा घोषणा देत महिलावर्गाने महात्मानगर मैदान, पारिजात नगर, जेहान सर्कलमार्गे धाव घेतली. दरम्यान तीन, पाच व दहा किलोमीटर स्पर्धेत 'पिंक सिस्टर्स' म्हणत महिलांचा उत्साह अधिक वाढत होता. मॅरेथॉनच्या मार्गावर महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी फिटनेस ट्रेनर्स उभे होते. महिलांना ते प्रोत्साहित करीत होते. तीन कि. मी. चे नेतृत्व विशेष मुलगी श्रुती राजगुरू, पाच किमीचे नेतृत्व अश्विनी अवधूत पाटील आणि १० किमीसाठी ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन डॉ. नमिता कोहोक यांनी नेतृत्व केले. पिंकेथॉनच्या माध्यमातून संकलित झालेला निधी ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त महिलांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असून, दरम्यान २ हजारापेक्षा अधिक महिलांनी पिंकेथॉनमध्ये धमाल, मस्ती आणि जल्लोष केला. पिंकेथॉनमध्ये करण सिंग, पूनम आचार्य, मानसी दीक्षित यांनी झुम्बा करवून घेतला. सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.

\B'सेल्फी' हवाय? '२० पुशअप्स' काढा

\Bपिंकेथॉनमध्ये स्पर्धा झाल्यानंतर अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिला वर्गाने गर्दी केली. त्यावेळी 'सेल्फी हवाय तर, २० पुशअप्स काढा', अशी अट सोमण यांनी घातली. महिलांनी देखील 'हम फिट है' म्हणत २० पुशअप्स काढत सेल्फी घेण्याची हौस पुरवून घेतली.

\Bहे आहेत विजेते

फिटेस्ट वूमन इन नाशिक : \Bकलावती पाटील (वय ८२)\B

१० किमी : प्रथम - आरती देशमुख, द्वितीय - निवृत्ती धनवड

५ किमी : प्रथम \B-\B \Bश्रिया के., \Bद्वितीय \B- रिया एम.\B

३ किमी : \Bप्रथम - रुक्मिणी जाधव, द्वितीय - रझीन सैय्यद, तृतीय - पूजा भगरे

\B३ किमी (विद्यार्थिनी) : \Bप्रथम - प्रणाली वानखडे, द्वितीय - ईश्वरी दरोडे, तृतीय - हर्षाली पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन सातबाऱ्याचा बोजवारा

$
0
0

बागलाण तालुक्यात कांदा उत्पादकांचे हाल

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील जोरण, कपालेश्वर, किकवारी खुर्द, तळवाडे, किकवारी बुद्रूक, देवपूर, निकवेल, कंधाणा, निरपूर, तिळवण, विंचुरे तसेच संपूर्ण बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील परिसरातील गावातील शेतकऱ्यांना ऑनलाइन सात बारा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

तलाठी कार्यालयात संगणक व प्रिंटर नसल्यामुळे गावांपासून २५ ते ३० किलोमीटरपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रागेत उभे राहून सातबारा काढावा लागत असल्याने शेतकऱ्याना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सर्व्हर डाऊन झाले तर दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या कांदा विक्री अनुदानाची तारीख वाढवल्यामुळे बाजार समितीत सातबारा सादर करावा लागत आहे. सातबारा तालुक्यात मिळतो व सही शिक्का हा तलाठी कार्यालयात मिळत असल्यामऊळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

अजूनही ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांना संगणकाचे ज्ञान नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी 'ऑनलाइन'च्या नावाखाली शेतकऱ्यांना वेड्यात काढण्‍याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. आधी गावातल्या गावात लिखित सातबारा मिळत होता. मात्र आता ऑनलाइन सातबाऱ्यामुळे शेतकऱ्याचे श्रम, वेळ वाया जात आहे. त्याचबरोबर आर्थिक भार देखील शेतकऱ्यांवर पडतोय. शेतकऱ्यांना एक सातबारा घेण्यासाठी दोन-दोन दिवस लागत आहेत. जर शेतकऱ्यांना सातबारा घ्याचा असेल तर आदल्या दिवशी तलाठी कार्यालयात जाऊन आपला गट नंबर व नाव देवून दुसऱ्या दिवशी तलाठी सातबारा मिळत आहे.

शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने सजाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सातबारा मिळेल यासाठी प्रतय्न करावेत. -केदा काकुळते, सरपंच किकवारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीच्या उत्सवात आवर्जून सहभागी व्हा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणूकरुपी लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मतदानप्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदारांनी योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यावरच समाजहित राखले जाईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सोमा दामोदरदास मोदी यांनी केले.

गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात रविवारी सकाळी ११.३० वाजता 'देशाची सद्य:स्थिती व भविष्यातील प्रगतीच्या योजना' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. मोदी म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमताने विजयी करायचे, हा सर्वस्वी मतदारांचा अधिकार आहे. गेल्या पाच वर्षांतील राजकीय परिस्थिती विचारात घेऊन, तसेच पुढील राजकीय परिस्थिती व धोरणांचा अंदाज बांधून मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे. निवडणूक हा लोकशाहीचा महत्त्वाचा उत्सव आहे. निवडणुकांच्या काळात ज्या प्रमाणे उमेदवारांमध्ये नवी धमक असते, अगदी त्याचप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही अधिक धमक मतदारांमध्ये असावी. पाच वर्षांत कोणतेही काम न केलेल्या उमेदवाराला निश्चितच घरचा रस्ता दाखवायला हवा. पण, ज्या उमेदवाराने खरोखरीच सामान्यांच्या हिताचा विचार करीत निर्णय घेतले असतील, त्याच्या पाठीशी मतदारांनी उभे राहायलाच हवे. शहरातील अनेक राजकीय नेते व नागरिक यावेळी उपस्थित होते.

--

हे सर्वांत मोठे सेलिब्रेशन

मोदी म्हणाले, की काही जण मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद उपभोगण्याला पसंती देतात. पण, आपलं हक्काचं मत लोकप्रतिनिधीच्या विजयासाठी पारड्यात टाकणं, हे सर्वांत मोठं सेलिब्रेशन आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा. त्यामुळे यंदाच्या लोकसभा व त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात सुवर्ण कारागिरीचे अभ्याक्रम सुरू

$
0
0

विद्यापीठात सुवर्ण कारागिरीचे अभ्याक्रम सुरू करावेत, यासह विविध मागण्या सराफ व्यावसायिकांनी 'मटा जाहीरनामा'च्या व्यासपीठावर केल्या. या वेळी डावीकडून कन्हैया आडगावकर, चेतन राजापूरकर, राजेंद्र शहाणे, राजेंद्र ओढेकर, सुनील महालकर, कृष्णा नागरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळीसाठी मजूर परतताय गावाकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात होळीच्या सणाची लगबग सुरू झाली आहे. रोजगारासाठी शहराकडे वळलेला मजूर आता गावाकडे परत फिरत आहे. दुकानांमध्ये होळीच्या सणाचा अविभाज्य भाग असलेले साखरेचे रंगीबेरंगी हारकडे खरेदीसाठी ग्रामस्थ गर्दी करत आहेत.

ग्रामीण भागात होळीचा सण हा पौर्णिमेच्या आदल्या दिवसापासून सुरू होतो आणि धुलीवंदनाला पूर्ण होतो. रंगपंचमीचे विशेष महत्व दिसून येत नाही. आदल्या दिवसाला कोकट होळी असे संबोधतात तर पौर्णिमेला मोठी होळी असे म्हणतात. धुलीवंदनाच्या दिवसाला धुळवड साजरी केली जाते. हा दिवस घराण्याचे विर नाचवणे, शिवारात असलेल्या देवदेवतांना तळी भरणे, शेंदूर लावणे, नैवद्य करणे आदी विधी केले जातात. कोकट होळीच्या दिवसाला देखील देवघरातील देवतांना तळी भरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये असते. होळीच्या सणाला, धुलीवंदनाला घरातील पुर्वजांचे टाक म्हणजेच विर नाचविण्याची प्रथा आहे.

यावर्षी होळीच्या सणावर दुष्काळाचे सावट आहे. गावात रोजगार नाही आणि शहरात देखील विविध व्यवसाय धोक्यात आल्याने बेरोजगारी वाढली आहे. ग्रामीण भागातील मजूर मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतरित होत असतो. दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे अकुशल मजूर रोजगाराला पारखे झाले आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना गावाकडे रोजगराची कामे सुरू झालेली नाहीत आणि शहरात देखील मजुरी नाही अशा दुहेरी कात्रीत सर्वसामान्य हातावर पोट असलेले मजूर कुटुंब सापडले आहेत.

'एक गाव एक होळी'

मालेगाव : पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व जलसंवर्धन करणे गरजेचे असून होळी निमित्ताने वृक्षांची तोड न करता ईको फ्रेंडली होळी करावी, तसेच जिल्ह्यात एक गाव-एक होळी अभियान शासनातर्फे राबविण्यात यावे या मागणीचे निवेदन निसर्गमित्र समितीतर्फे मालेगावचे प्रातधिकारी विजयानंद शर्मा तहसीलदार सी. आर. राजपूत यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशकात सुवर्ण क्लस्टर करावे

$
0
0

(लोगो - मटा जाहीरनामा. पान दोनसाठी. फाफ पेजपर्यंतच लेआऊट करावे. पुण्याचे पान दोनचे लेआऊट बघावे.)

फोटो - पंकज चांडोले

नाशिकमध्ये सुवर्ण क्लस्टर व्हावे

विद्यमान सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला प्रोत्साहन देत असून, त्यामुळे पारंपरिक सुवर्ण व्यवसाय धोक्यात आला आहे. सुवर्ण कारागिरांचा उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित समावेश करून त्यांना हस्त कारागिरांचा दर्जा देण्यात यावा, ४११ कलमान्वये सराफ व्यावसायिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी, नाशिक शहरात सवर्ण क्लस्टरची निर्मिती करण्यात यावी, या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने सरकारने पाहावे, असे मत शहरातील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केले.

-----------------

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा जाहीरनामा' उपक्रमाअंतर्गत राउंड टेबलमध्ये विद्यमान सरकारने सराफ व्यावसायिकांबाबत घेतलेली भूमिका आणि येणाऱ्या सरकारकडून व्यावसायिकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपस्थित व्यावसायिकांनी काही पर्यायदेखील सुचवले. केंद्र सरकारने साडेचार वर्षांत उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणे सोडून मोठ्या उद्योगांचे भले केले आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने जीएसटीबाबत चांगला निर्णय घेतला. व्यावसायिकांना अनेक कर भरावे लागत होते. त्यातून सुटका झाली आहे. मात्र, सरकारने सराफ व्यावसायिकांवर तीन टक्के जीएसटी लादला आहे. तो अन्यायकारक आहे. सोन्यावर आयातकर १० टक्के अधिक ३ टक्के सेस असा १३ टक्के कर भरावा लागतो. याबाबत सरकारने विचार करणे गरजेचे आहे. जीएसटी १ टक्का, आयातकर ५ ते ७ टक्के अशी १० टक्क्यांच्या आत कर आकारणी झाली तर या व्यवसायाला भरभराटी येईल व चोरट्या मार्गाने येणारे सोने बंद होईल. आज सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला वार्षिक एक ते दीड टक्का दराने कर्ज देते. तोच दर भारतातील सराफ व्यावसायिकांना दिला तर सराफ व्यवसायाला चालना मिळेल. आज व्याजाचे दर गगनाला भिडले आहेत. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. कर्ज काढून व्यवसायाचा डोलारा सांभाळताना नाकी नऊ येतात. अशा वेळी पारंपरिक व्यवसाय टिकवायचा असेल तर कमी व्याजदराने सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे. जे व्यावसायिक पूर्णपणे कर्जाचे हप्ते भरतील, अशांना सबसिडी देण्यात यावी. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पैठणी क्लस्टर तयार करण्यात आले, त्याप्रमाणे नाशिक शहरात सुवर्ण क्लस्टर तयार करण्यात यावे. नाशिक शहर हे मुंबईपासून जवळ आहे. शहरात क्लस्टरची निर्मिती झाली तर हिरे उद्योगामुळे शहरात रोजगारनिर्मिती होऊन जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.

मुक्त विद्यापीठाचा हवा कोर्स

शहरात मुक्त विद्यापीठ आहे. त्याच्याकडून या व्यवसायासाठी असलेले छोटे प्रमाणपत्र कोर्स तयार करण्यात यावे, त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर कोर्सची निर्मिती करण्यात यावी, सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, तळागाळातील व्यावसायिकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सरकारने व्यावसायिकांकडे सकारात्मकतेने पाहावे, अशी इच्छा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली.

(चौकट)

मटा जाहीरनामा वाचकांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. साहजिकच राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे, सरकारची त्याबद्दलची धोरणे, त्याचा विविध घटकांवर होणारा परिणाम आदींची चर्चा या व्यासपीठावरून होणार आहे. त्यामध्ये संबंधित क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या चर्चेची नाशिकच्या भावी खासदारांना त्यांच्या कामाची दिशा ठरविण्यासाठी मदत होईल, अशी आशा वाटते.

सरकारला दहापैकी गुण

संरक्षणअंतर्गत सुरक्षा ७

परराष्ट्र धोरण ७

आर्थिक नीती ५.५

वाहतूक व दळणवळण ६

सामाजिक सलोखा ३

पर्यावरण ऊर्जा ५.५

कृषी ४.६

सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता ६.५

शिक्षण ५.५

महिला ५.३

आमचा जाहीरनामा

- जीएसटी ३ टक्क्यांवरून १ टक्का करावा

- कस्टम ड्युटी १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात यावी

- कमी व्याजदराने कर्जपुरवठा व्हावा

- व्यावसायिकांना कर्ज भरल्यानंतर सबसिडी देण्यात यावी

- सुवर्ण क्लस्टरसाठी नाशिकचा विचार व्हावा

- सुवर्ण कारागिरांना हस्तकलेचा दर्जा देण्यात यावा

- नाशिकमध्ये सुवर्ण कारागिरांसाठी राजकोटच्या धर्तीवर कॉलेजची उभारणी करण्यात यावी

- ऑनलाइन व्यवहार करताना जे चार्जेस लागतात, ते रद्द करण्यात यावेत

- संपूर्ण भारतात सुवर्ण व्यावसायिकांना त्रासदायक ठरत असलेले ४११ कलम जामीनपात्र करण्यात यावे

- विद्यापीठात सुवर्ण कारागिरीचे अभ्याक्रम सुरू करण्यात यावेत

- प्रत्येक सराफ बाजारात पोलिस चौकी उभारण्यात यावी

- उद्योग मंत्रालयाच्या वतीने इतर हस्त व्यावसायिकांना देण्यात येत असलेल्या सुविधा सुवर्ण कारागिरांना देण्यात याव्यात

- कॉर्पोरेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यापेक्षा छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे

- अवैध मार्गाने येणाऱ्या सोन्यावर निर्बंध घालावेत

- खडे, हिरे या व्यवसायाच्या उभारणीसाठी एमआयडीसीत जागा द्यावी

सर्वांत जास्त कर भरण्यामध्ये सराफ व्यावसायिकांचा वाटा आहे. मात्र, ज्या प्रमाणात या व्यावसायिकांना सोयी मिळायला हव्यात, त्या प्रमाणात सरकार या व्यावसायिकांना सोयी-सुविधा देत नाहीत. डिजिटल इंडियाकडे वाटचाल करताना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डावर सर्वांत जास्त कर आकारणी केली जाते. ती करू नये.

- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

या सरकारने संरक्षण, सुरक्षा, पर्यावरण, ऊर्जा, कृषी, शिक्षण या क्षेत्रात थोड्या फार प्रमाणात कामगिरी केली आहे. मात्र, सुवर्ण व्यावसायिकांना ४११ कलमान्वये होणारा त्रास कमी व्हावा यासाठी हे कलम रद्द करावे, जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण चांगले असल्याने सुवर्णकला केंद्र सुरू करून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सुरू करावे. त्याचप्रमाणे छोटे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावे.

- राजेंद्र शहाणे, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

मागील सरकारपेक्षा या सरकारने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, सुवर्ण व्यापाराकडे कानाडोळा होतो हे नाकारून चालणार नाही. या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. जो व्यावसायिक कर्जाची परतफेड करेल, त्याला सबसिडी देण्यात यावी.

- राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

सरकारने सुवर्ण कारागिरांसाठी ज्या योजना तयार केल्या आहेत, त्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. त्याचप्रमाणे जाहीरनामा तयार करताना सुवर्ण कारागिरांच्या मुलांसाठी विशेष योजना तयार करावी, तसेच शैक्षणिक धोरण सुकर करण्यात यावे. जो जाहीरनामा तयार कराल, त्याची अंमलबजावणी चोख करावी.

सुनील महालकर, सराफ व्यावसायिक

नाशिक शहराचा विचार केल्यास सराफ बाजारात अनेक गैरसोयी आहेत. हा बाजार अतिक्रमणाने वेढला आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका काही करीत नसून खासदारांनी यासाठी प्रयत्न करावेत. पूररेषेबाबत विचार करण्यात यावा. दरवेळी पूर आल्यानंतर सराफ बाजारात पाणी शिरते. येथील व्यावसायिकांचे नुकसान होते. त्याची भरपाई मिळत नाही. त्याबाबत विचार करण्यात यावा.

- कृष्णा नागरे, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

भारतात अत्यंत जाचक असलेले ४११ कलम रद्द करण्यात यावे. या कलमामुळे अनेक सराफ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. निदान हे कलम जामीनपात्र तरी करण्यात यावे. नाशिकमध्ये शैक्षणिक वातावरण चांगले आहे. त्याकरिता सुवर्ण व्यावसायिकांसाठी कॉलेज उभारावे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला मिळेल.

- कन्हैया आडगावकर, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक पालिका कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून सुरू केलेले उपोषण नगरसेवकांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. रविवारी तिसऱ्या दिवशी उपोषणावर तोडगा निघत नसल्याने नगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद अंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे रविवार तसेच मार्चअखेरची कामे असल्यामुळे कर वसुलीसाठी कार्यालय सुरू होते. मात्र कामबंद आंदोलनामुळे सगळीकडे शांतता होती. यासोबत सायंकाळी पथदिप सुरू करणे, ¸पाणीपुरवठा करण्यासाठी पंपिंगची कामे करणे, ¸कुशावर्तावर भाविकांना मागर्दशन करणे आदी कामे बंद राहीले.

माजी नगराध्यक्ष ललीत लोहगावकर¸, धनंजय तुंगार, ¸बाळासाहेब सावंत आदींसह विद्यमान पदाधिकाऱ्यांनी वारंवार चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. अखेर सायंकाळी ५ वाजता आरोग्य सभापती माधवी भुजंग¸पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामायणे¸महिला व बालकल्याण सभापती भारती बदादे¸त्रिवेणी तुंगार-सोणवने आदिंनी या दोन कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय रजा मंजूर करणे व त्याचे वेतन अदा करणे आदी प्रश्न स्थायी समितीवर घेऊन सेडविणार असल्याचे अश्वासन दिले. माजी नगराध्यक्ष मांगीलाल सारडा, योगेश तुंगार आदींसह नागरिक उपस्थित होते. नगरपालिका कर्मचारी शाम गोसावी आणि प्रकाश देशमुख यांनी अर्जित रजा वैद्यकीय रजा नामंजूर करणे वेतन कपात करणे आदींबाबत प्रशासनाने न्याय द्यावा म्हणून उपोषण सुरू केले हेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजमध्ये रविवारी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०१७-१८पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कॉलेजच्या सर्व विभागांतील शंभरहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर अध्यक्षस्थानी होते. तर फिजिक्स विभागप्रमुख डॉ. वसंत वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी दिले. यात किरण सोनवणे, दिनेश बंदुरे, पुनीत जाधव, सुवर्णा कदम, हर्षल गावीत या विद्यार्थ्यांनी रोख स्वरुपात मदत दिली. तर काही विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातील असल्याने कॉलेजच्या क्रीडा विभागासाठी साहित्य देणार असल्याचे जाहीर केले. तर काहींनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी कॉलेजच्या ग्रंथालयासाठी पुस्तके देणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभवकथनही केले. कॉलेजने विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, अभ्यासिकेचा वापर वाढविला पाहिजे, व्यवसाय व स्वयंरोजगार, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सुरू केले पाहिजे आदी सूचना विद्यार्थ्यानी केल्या. यावेळी प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. दिलीप कुटे, माजी विद्यार्थी संघ प्रमुख डॉ. धनराज गोस्वामी, डॉ. संजय काळे, डॉ. रुपाली शिंदे, प्रा. नंदादेवी बोरसे, प्रा. सुदाम भाबड, सर्व विभागप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी अखिलेश घरटे, निशिगंधा सानप व सुवर्णा कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास नियमावली गाजवणार निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकास नियंत्रण नियमावलीत दत्तक नाशिकवर अन्याय केल्याने ही बाब विरोधकांकडून आक्रमकपणे निवडणुकीत मांडली जाण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यावरून युतीच्या उमेदवाराला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होणार असल्याने लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदार कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कपाट प्रश्नामुळे नाशिकमधील असंख्य बांधकाम प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. विविध कारणांमुळे अनेक इमारती पूर्णत्वाच्या दाखल्याच्या प्रतीक्षेत आहेत. रेडिरेकनरचे वाढलेले दर, बांधकाम परवानग्या मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. घरांच्या किमती अजूनही सामान्यांच्या तितक्याशा आवाक्यात नसल्याने शहरातील बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शहरासाठी दोन वर्षांपूर्वी विकास आराखड्याबरोबरच नवीन जाचक बांधकाम नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आल्याने व्यावसायिकांच्या अडचणीत भरच पडली. त्यामध्ये बदल व्हावा यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून मंत्रालयात पाठपुरावा सुरू होता. सर्व शहरांसाठी नवीन नियम करण्याच्या नावाखाली बांधकाम व्यवसायापुढे नवीनच आव्हान उभे ठाकले आहे. पार्किंगसाठी अधिकाधिक जागा सोडण्याची अट नव्या नियमावलीत घालण्यात आल्याने चटई क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी सदनिकांची संख्याही कमी होणार असून, खर्च मात्र कमी होणार नसल्याने त्याचा फटका आमच्यासह घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनाही बसणार असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

--

साइड मार्जिन व पार्किंग नॉर्म्सबाबत केवळ नाशिकवरच अन्याय झाला आहे. एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली नगरविकासने तयार केली खरी, परंतु त्यात नाशिक वगळून असा उल्लेख का, हे कोडे आहे. या निर्णयामुळे नाशिक गावठाणचा भाग विकासापासून दूर राहील. 'सर्वांसाठी माफक दरात घरे' ही केंद्राची संकल्पना शहरात पूर्णच होऊ शकणार नाही.

-छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

--

लहान रस्त्यांवर अधिक व मोठ्या रस्त्यांवर कमी एफएसआय ही चूक नगरविकास खात्याच्या प्रशासनाने मान्य केली असून, त्यात सुधारणा केली जाणार आहे. नवीन नियमावली नाशिकवर काहीअंशी अन्यायकारक आहे. मात्र, राज्यातील सर्व पालिकांसाठी समान नियमावली झाल्यास बांधकाम परवानग्यांत सुलभता येऊन शहराच्या विकासाला चालना मिळेल.

-प्रदीप काळे, आर्किटेक्ट

--

एका बाजूला दत्तक म्हणून फसवी घोषणा करायची आणि दुसऱ्या बाजूला क्रूर बापसुद्धा लाजेल असे अत्याचार करायचे, असा उद्योग गेली साडेचार वर्षे नाशिकच्या बाबतीत सुरू आहेत. नाशिकला वगळून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नियमावली हे काय गौडबंगाल आहे? नाशिकचे बांधकाम क्षेत्र आणि पर्यायाने संपूर्ण अर्थकारणच उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव सुरू आहे.

-नितीन शुक्ल, आम आदमी पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मिशन ऑल आउट!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात मिशन ऑल आउट मोहीम राबवून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. याबरोबरच टवाळखोर, रॅश ड्रायव्हिंग, वाहन तपासणी करण्यात आली. यापुढे आठवड्यातून एकदा शहरभर मिशन ऑल आउट मोहीम राबविण्यात येणार असल्याचे शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मिशन ऑल आउट मोहीम राबविण्यात आली. नांदूर नाका, सिन्नर फाटा, संसरी नाका, म्हसरूळ गाव, पिंपळगाव बहुला, एक्स्लो पॉइंट, मालेगाव स्टँड, त्रिकोणी गार्डन, द्वारका चौक, चोपडा लॉन्स, होरायझन अॅकॅडमी, डी. जी. पी.नगर, नारायणबापू चौक, सिडको, कामगारनगर अशा १५ ठिकाणी प्रत्येकी एक अधिकारी व सहा कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय आयुक्त नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौगुले-श्रिगी, सर्व सहायक आयुक्त, शहर वाहतूक शाखा, १९ पोलिस निरीक्षक, ५० सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, तसेच ४८२ पोलिस कर्मचारी आणि ५० होमगार्ड्स यांनी मिळून तपासणी मोहीम राबविली.

आयुक्तांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वच पोलिस दल यावेळी रस्त्यावर उतरले होते. या तपासणीत रेकॉर्डवरील ८५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. दोन तडीपार, पाहिजे असलेले नऊ संशयित यावेळी पोलिसांच्या हाती लागले. लॉजेस आणि हॉटेल्सचीही तपासणी करून मुंबई पोलिस अॅक्टनुसार पाच केसेस करण्यात आल्या. ड्रंक अँड ड्राइव्हच्या ३६, 'कोटपा'च्या ६, शस्त्रबंदीच्या दोन केसेस करून ३१ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. रात्री ११ ते २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी २० ठिकाणच्या झोपडपट्टी परिसराची पोलिसांनी कसून तपासणी केली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १११ वाहनचालकांवर कारवाई करीत २८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला, तर दहा वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.

--

गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या हेतूने मिशन ऑल आउट ही मोहीम प्रभावी ठरते. त्यामुळे शहरात आठवड्यातून एकदा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

-विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images