म. टा. प्रतिनिधी, नाशिक स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सैनिकी शिक्षणासाठी देशात लौकिक असणाऱ्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसने आजवर देशातील दिग्गजांशीही ऋणानुबंध जुळवून ठेवले आहेत. देशातील नामवंत राजकारणी, नेते आणि विविध क्षेत्रात उंची गाठलेल्या अनेकांचे स्वागतही 'भोसला'च्या आवाराने केले आहे. मात्र, या सर्व दिग्गजांच्या मांदियाळीत गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या स्मृती जागविताना भोसला परिवार भावूक झाला. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पर्रीकरांनी भोसला शिक्षण संस्थेच्या आवाराला भेट देत सैनिकी विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली होती. भोसला कॅम्पसची पाहणी करताना संस्था पदाधिकाऱ्यांना त्यांच्या शब्दांनी दिलेले प्रोत्साहन अन् कॅम्पसमधील रामदंडी विद्यार्थ्यांबाबत व्यक्त केलेला आशावाद, अद्याप या संस्थेतील विविध घटकांच्या डोळ्यांसमोर चित्र बनून उभा आहे. काही वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये भोसला कॅम्पसमध्ये आले असता सीएचएमई सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंत बेडेकर, विद्यमान कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संस्थेचे नाशिक विभागाचे तत्कालीन सहकार्यवाह आणि विद्यमान सदस्य आशुतोष रहाळकर आदींनी त्यांचे स्वागत अन् सत्कार केला होता. सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदनाही दिली होती. पर्रीकर यांनी 'भोसला'चे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले होते. देशाच्या सामरिक क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेऊन सीएचएमई सोसायटीने काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने कान्होजी आंग्रे मेरीटाइम रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. या इन्स्टिट्यूटतर्फे मुंबईत 'अॅन अॅस्पेक्ट्स ऑफ ब्लू इकॉनॉमी ऑफ इंडिया इन ओशिनिक थिएटर' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनही देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर यांच्या हस्ते झाले होते. या मंचावरून त्यांनी विचार करताना भोसला परिवाराच्या योगदानाचाही गौरवास्पद उल्लेख केल्याच्या आठवणी संस्था पदाधिकाऱ्यांनी जागविल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट