Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘लयकारी’च्या रंगात रसिक रंगणार!

$
0
0

जानमाळी यांच्या अलंकारिक चित्रशैलीतील चित्रांचे जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रकार दिनकर जानमाळी यांच्या भारतीय अलंकारिक चित्रशैलीतील चित्रकृतींचे प्रदर्शन २ ते ८ एप्रिल या कालावधीत जहाँगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. 'रंग-रेषांची अनोखी बंदिश' म्हणता येईल असे जानमाळी यांचे चित्र आहे. आपण जे जगतो, आजूबाजूला पाहतो, त्याचे प्रतिबिंब कलावंताच्या कलाकृतीत सहजपणे पडत असते. जगणे म्हणजे काय? याचा हा शोधच असतो. प्रदर्शनाचे 'शीर्षकच' लयकारी आहे.

रंग-रेषातून आशय व विषयाची लय समोर येते आणि त्यातून चित्राचे वेगळेपण मनावर ठसते. कुठलीही रेषा आपला स्वभाव घेऊन येते. इथल्या संस्कृतीचं परंपरांचे दर्शन घडवणारी ही चित्र आहेत. अर्धनारी नटेश्वर, मंगळागौर, नागप्रणय, साजसंध्या, शकुंतला, पंढरपूर वारी, अयोध्या आगमन, सत्यवान सावित्री यावरून चित्रांचे वेगळेपण लक्षात येते. सौंदर्य आणि संस्कृतीतील कथा यांचा समन्वय येथे चित्रांतून समोर येतो. त्या काळातील वेशभूषा, दागिने, नृत्यप्रकार, गोंदण, वस्त्र यांचा वापर चित्राचे वैशिष्टे ठळक करतो. पुराणकथा व लोककथांतून इथे चित्रांचे विषय आले आहेत. त्यातून होणारा आविष्कार मनमोहक व माहिती पूर्ण आहे. 'बंदिश-रेषांची-एक रचनात्मक गुंफण, रंग रेषांची मैफल रसिकाला निश्‍चितच आनंद देणारी आहे.

...

संवाद साधण्याची शैली

चित्रकार दिनकर जानमाळी यांचा शेतकरी कुटुंबात जन्म आणि सोबत कलेची आवड यातून त्यांच्यातील चित्रकाराला वेगळं काही तरी करण्याचा ध्यास होता. त्यातून चित्रकलेचे त्यांनी रितसर शिक्षण घेतले. कला शिक्षणाची पारंपरिक चौकट मोडून इथल्या परंपरेशी, मातीशी नाते सांगणारे आपल्याला कलाकृतीतून काही मांडता येईल का? हा विचार त्यांच्या मनात होताच. नाशिक शहर, इथली मंदिरे, जुने वाडे, इमारती माणसे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि संवाद साधण्याची शैली यातून त्यांची जडणघडण झाली. नाशिक परिसरातील सण, उत्सव, परंपरा, जत्रा त्यांनी जवळून बघितले असल्याने त्याचे प्रतिबिंब चित्रात उमटले.

...

बालपण जुन्या नाशकात गेले. त्यामुळे तिथल्या चालीरीती, सण साजरे करण्याच्या पद्धती मनावर खोलवर बिंबले. काहीतरी सांगायचं ही ऊर्मी स्वस्थ बसून देत नव्हती. त्या जाणिवेतून कागदावर चित्रे आकार घेऊ लागली. स्वत:ची शैली शोधण्यासाठी फार धडपड करावी लागली नाही. ती आपसूकच चित्रांतून निथळत होती.

- दिनकर जानमाळी, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राण्यांसाठी कृत्रिम तलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नांदगावकर पुढे सरसावले आहेत. नांदगाव तालुक्यात पाण्यासाठी आसुसलेल्या वन्य जीवांसाठी विविध संस्था, संघटना तसेच वैयक्तिक रित्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. वन्य जीवांसाठी पाण्याच्या गव्हाणी, छोटे पाणी तलाव, अन्नासाठी पशू थांबे यांची नांदगाव तालुक्यात व्यवस्था केली जात आहे. नांदगाव शहरात वन्यजीव पाणपोई मदत कक्ष उभारण्यात आला आहे. युवा फाउंडेशनच्या वतीने दानशूरांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागापूर परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते राजेंद्र पवार यांनी आपल्या जागेत पशू थांबे व छोट्या पाणी तलावाची उभारणी केली आहे. नांदगाव शहरात तहानलेल्या वन्य जीवांसाठी पशुपक्षीमित्र व सर्पमित्र दीपक रमेश घोडेराव यांनी एका पाणी गव्हाणीची सोय केली आहे. कालिका चौकातील दानशूर मंडळींनी वर्गणी जमा करून दोन गव्हाणी तयार केल्या आहेत.

भावनिक साद

नांदगावच्या युवा फाउंडेशनने नागरिकांना भावनिक साद घातली आहे. नागरिकांनी मुक्या प्राणी व पक्ष्यांसाठी पाणी व्यवस्था करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन युवा फाउंडेशन सामाजिक संस्था नांदगांवचे सुमित सोनवणे, संदीप जेजुरकर, दीपक घोडेराव, शशी पाटील आदींनी केली आहे. मनमाड नांदगाव मार्गावर नागापूर येथे छोटे छोटे पाणी तलाव व अन्न पशु थांबे उभारून जि. प.चे माजी सदस्य, गटनेते राजेंद्र पवार यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कट्टा - युवक समन्वय समिती - प्रतिक्रिया

$
0
0

निवडणूका जवळ आल्या की, युवकांबाबत विविध घोषणाबाजी केली जाते. राजकारणी युवकांना केंद्रस्थानी ठेवून आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कार्य होताना दिसत नाही. दोन कोटी रोजगार देणार असे आश्वासन सत्ताधारी सरकारने दिले होते, मात्र ते प्रत्यक्षात उतरलेले नाही. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात इंजिनीअरिंग कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी एकही मोठी कंपनी शहरात आलेली नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

प्रसाद देशमुख

- -

निवडणुकांमध्ये तरुण व शेतकरी यांना समोर ठेवून प्रचार केला जातो. या प्रचारात मोठी आश्वासने दिली जातात. पण ते प्रत्यक्षात उतरत नसल्याने आमच्या भावनांचा खेळ होतो आहे. शहरी व ग्रामीण भागातील मुलामुलींचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हे प्रश्न जाणत कार्य होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा नाही, शहरात रहायचे म्हटले तर वसतिगृह नाही. या प्रश्नांना निवडणुकीच्या माध्यमातून वाचा फोडण्याची गरज आहे.

भूषण काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राची वाजेंवर शिस्तभंगाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या सदस्य आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यासंदर्भातील बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्यावरील दोषारोप निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाजे यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शारीरिक वा तत्सम मर्यादांमुळे दिव्यांग बांधव मतदानाचा हक्क बजावणे टाळतात. लोकसभा निवडणुकांत अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी मतदान करावे यासाठी अशा बांधवांना मतदानाच्या दिवशी घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची व पुन्हा त्यांना घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले आहेत. दिव्यांग बांधवांना मतदान प्रक्रियेत कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि आल्याच तर त्याचे तातडीने निराकरण करता यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन बैठक बोलावली होती. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वाजे या बैठकीला अनुपस्थित होत्या. अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. ती देखील घेतली नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत खुलासा मागविला असता अन्य महत्वाची कामे असल्याने बैठकीला येऊ शकले नाही असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला. वसतिगृहांची पाहणी करण्यासाठी जावे लागत असल्याने समाजकल्याण विभागाकडील दोन वाहने देण्यासही वाजे यांनी नकार दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या कामकाजात त्यांच्याकडून स्वारस्य दाखविले जात नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने दोषारोपपत्र तयार केले आहे. ते समाजकल्याण विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिव्यांग बांधवांना निवडणूक काळात सोयीसुविधा पुरविण्याच्या प्रक्रियेत समाजकल्याण विभागाची जबाबदारी मोलाची आहे. परंतु, या विभागाच्या अधिकारी बैठकीला उपस्थित राहात नाहीत. अन्य महत्वाची कामे असल्याचा खुलासा देतात. सरकारी कर्तव्य पार पाडण्यात त्यांची अनास्था दिसून आली. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली असून सचिवांकडे चार्जशीट पाठविले आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या निर्णयाचा ‘निमा’कडून निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लू रुग्णाचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्यास संबंधित खासगी वैद्यकीय व्यावसायिकावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा आदेश महापालिकेने नुकताच काढला आहे. या प्रकरणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

स्वाइन फ्लूबाबत आज लोकांमध्ये भीती आहे. आजार व त्याची लक्षणे तीव्र झाल्यावर रुग्ण डॉक्टरांकडे धाव घेतात. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. समाजाचा खासगी डॉक्टरांवर विश्वास आहे. नाशिक शहरातील बरीचशी आरोग्य व्यवस्था खासगी वैद्यकीय व्यावसायिक सांभाळत आहेत. परंतु, नाशिक महापालिकेने खासगी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीच दिली असून, ती अतिशय निंदनीय बाब असल्याचे निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

..

जनजागृती करावी

स्वाइन फ्लूबाबत जागरुकता व्हावी असे वाटत असेल, तर महापालिकेने विविध वैद्यकीय संघटना जसे निमा, आयएमए यांच्यामार्फत शिबिरे घ्यावीत. डॉक्टरांसाठी स्वाइन फ्लूबाबत नवीन नियमावली आली असल्यास त्याबाबत अवगत करावे, असे आवाहन डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक सापडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार माणिकराव गावित यांचे खासगी स्वीय सहायक भगवान रामचंद्र गिरासे हे शनिवारी (दि. ३०) सायंकाळपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी मुंबईपासून त्यांचा तपास सुरू केला असता ते सोमवारी (दि. १) सकाळी गुजरातमध्ये सापडले. गिरासे हे मुंबईच्या टिळक भवनाजवळून शनिवारी सायंकाळी बेपत्ता झाले होते. तेव्हापासूनच मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी गुजरामध्ये त्यांचा शोध लागला आहे. गिरासे यांची अवस्था पाहता त्यांचे अपहरण झाले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गिरासे गुजरातमध्ये सापडले तेव्हा त्यांचे केस आणि मिशी कापलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, पोलिसांनी भगवान यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले. पोलिस तपासात त्यांनी काहीही सांगितलेले नाही. ते बोलण्याच्या अवस्थेतच नाहीत. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मानेवर इंजेक्शन दिल्याने सूज झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी फक्त ‘मी रेल्वेतून पडलो’ एवढेच बोलले. त्यांच्यावर घरी वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

धुळ्यात ‘मै भी चौकीदार’
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांसह कोट्यवधी समर्थकांशी ‘मै भी चौकीदार हू’ या विशेष मोहिमेअंतर्गत रविवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे थेट संवाद साधला. शहरातील राम पॅलेस येथे रविवारी सायंकाळी या संवाद कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी युतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे, ज्येष्ठ संघ पदाधिकारी रवी बेलपाठक, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, लोकसभा विस्तारक शशिकांत वाणी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ मतदान केंद्रे संवेदनशील

$
0
0

केंद्रनिहाय पोलिसांचा आढावा

...

संवेदनशील केंद्रे

- शहरातील केंद्रे : ४३

- ग्रामीण भागातील केंद्रे : १७

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्हाभरात ६० मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यातील ४३ केंद्रे ही नाशिक शहरातील आहेत. संवेदनशील केंद्रांचा आढावा पोलिसांनी घेतला असून, त्या आधारे या केंद्रांची सुरक्षा, पोलिसांचा वाढीव बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदी बाबींकडे लक्ष पुरविले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. पोलिसांनी सध्या आपले लक्ष अवैध मद्य, शस्त्र तसेच पैशांची वाहतूक रोखणे तसेच समाजकंटकांना वेळीच आवार घालणे यावर केंद्रित केले आहे. दुसऱ्या पातळीवर पोलिसांकडून संवेदनशील मतदान केंद्राचा आढावा घेतला जात आहे. शहरातील एकूण ११०६ मतदान केंद्रे आहेत. सन २०१४ मध्ये हा आकडा १०५३ इतका होता. जवळपास दीडशे मतदान केंद्रांमध्ये यावेळी वाढ झाली आहे. यातील ४३ मतदान केंद्रे ही संवेदनशील ठरविण्यात आली आहे. यासाठी या मतदान केंद्रांवर यापूर्वी झालेल्या वादांचा, गुन्हेगारीचा निकष ठरविण्यात आला. जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये १७ संवेदनशील केंद्रे आहेत. संवेदनशील केंद्राची सुद्धा वर्गवारी असून, वादांची जास्त शक्यता असलेल्या केंद्रांचा पोलिसांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. या ठिकाणी आवश्यक तितका बंदोबस्त तैनात करणे, मतदान केंद्राजवळील इमारती, या ठिकाणाहून होणारी वाहतूक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पोलिसांकडून सूचनांचे अदान-प्रदान सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रतिबंधात्मक कारवाई, मतदान केंद्रांची सुरक्षा, राजकीय गुन्हेगारी मोडून काढणे, नाकाबंदी अशा बाबींवर पोलिसांचा फोकस राहिला आहे.

...

पोलिस बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीसाठी शहर पोलिस दलातील तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बाहेर ६१७ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ६८३ होमगार्ड्स असून, पोलिस आयुक्तालयातील ८० टक्के कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून अर्जस्वीकृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना आज (दि.२) प्रसिद्ध होणार असून, नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकृतीलाही सुरुवात होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी दिली.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावून तयारीची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, की 'रॅन्डमायजेशनची प्रक्रिया उत्तमप्रकारे पार पडली. नवमतदारांनी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला असून, ६३ हजारांहून अधिक उमेदवारांनी त्यास प्रतिसाद दिला. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात यावे लागेल. तेथे त्यांचे अर्ज बारकाईने तपासले जातील. त्यानंतर उमेदवारासह पाच व्यक्ती दालनात येऊन नामनिर्देशनपत्र सादर करू शकतील. याबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. आचारसंहिताभंगचे प्रकार रोखण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, समन्वयासाठी जिल्हाधिकारी प्रशासनासह पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, बँक अधिकाऱ्यांचा एकत्रित ग्रुपही तयार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजाच्या एकूण खर्चासाठी १० कोटींची वित्तमर्यादा आयोगाने घालून दिली असून, ती पुरेशी असल्याचे मांढरे यांनी सांगितले. मतदारांना निर्भयपणे उमेदवार निवडून देता यावा, शांततामय वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सूरू असून, त्यास राजकीय पक्षांसह नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मांढरे यांनी केले.

...

सुमारे ४७२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग

जिल्ह्यात ४ हजार ७२० मतदान केंद्रे असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यापैकी १० टक्के म्हणजेच ४७२ मतदान केंद्रांमधून लाइव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात बसून या ४७२ मतदान केंद्रांमधील प्रत्येक केंद्रावर नजर ठेऊ शकणार आहेत. सुरगाणासारख्या दुर्गम भागात मात्र शक्यतो वेबकास्टिंग केले जाणार नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.

..

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र वितरण व स्वीकृती - २ ते ९ एप्रिल

नामनिर्देशन पत्रांची छाननी - १० एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक - १२ एप्रिल

मतदानाचा दिनांक - २९ एप्रिल

मतमोजणीचा दिनांक - २३ मे

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक : २७ मे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा वर्षांनी आईला मिळाले कुटुंब

$
0
0

पोलिसांनी घेतला पुढाकार; समुपदेशननंतर मनोमिलन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रतिकूल परिस्थितीत रक्ताचे पाणी करून मुलांचा सांभाळ केला. मुले मोठे झाली. दोघांना सरकारी नोकरी मिळाली. संसार फुलला पण यात कधीकाळी कुटुंबाचे पालनपोषण करणारी आईच दूर झाली. सुना आणि मुलांबरोबर पटत नसल्याने त्या माऊलीने रस्त्याची चादर अन् आकाशाचे पांघरूण केले. सोशल मीडियामुळे आईची कैफियत समोर आली अन् पोलिसांनी पुढाकार घेत त्या वृद्ध माऊलीला हक्काचे घर मिळवून दिले.

प्रमिला नाना पवार (वय ६१, रा. नंदुरबार) असे या कष्ट सोसणाऱ्या मातेचे नाव आहे. वस्तू व सेवा कर कार्यालयात असणाऱ्या नाना पवार यांचे १९९५ मध्ये निधन झाले अन् पवार कुटुंबावर आभाळ कोसळले. अवघ्या १४ ते १५ वर्षांच्या मुलांना सोबत घेऊन प्रमिला पवार यांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आतिष या मुलास नंदुरबार येथेच कंडक्टरची नोकरी लागली, तर दुसरा मुलगा सतीश हा वस्तू व सेवा कर विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी पवार कुटुंबात नंदनवनच फुलले. मुलांचे विवाह पार पडले. मात्र, यानंतर सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रमिला पवार यांच्यावर नियतीने जणू आभाळाच कोसळवले. सुनांशी पटेना, मुलेही साथ देईनात. अशावेळी त्यांनी घराबाहेर पडून भटकंती सुरू केली. बऱ्याच वर्षांपासून त्या नाशिकसह इतर काही ठिकाणी फिरत राहिल्या. मागील आठवड्यात एका सोशल मीडियावर प्रमिला पवार यांचा कैफियत मांडणारा व्हिडीओ व्हायरला झाला. त्यात त्या आपला मुलगा फौजदार असल्याचे सांगत होत्या. या व्हिडीओची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यंत आली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी प्रमिला पवार यांचा आणि त्यांच्या मुलांचा शोध घेतला. नाशिकमध्ये राहणाऱ्या सतीश पवार यांना सहकुटुंब बोलावून घेऊन तिघांचेही समुपदेशन केले. झालेले गैरसमज दूर करीत नांगरे पाटील यांनी तिघांचे मनोमिलन घडवून आणले. यानंतर मायलेक आपल्या घरी रवाना झाले. पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेल्या कामामुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहीर अनुदानासाठी आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर आणि योगिता प्रकाश धनगर या दाम्पत्याने शासनाच्या योजनेतील सिंचन विहिरीच्या खोदकामाचे अनुदान मिळण्यास उशिर होत असल्याने सोमवारी (दि. १) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांचे गोपनीय पथक हजर असल्याने त्यांनी शेतकरी दाम्पत्यांकडून रॉकेलचा डबा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी दाम्पत्यांविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांची शेतजमीन असून, या जमिनीवर पंचायत समिती शिंदखेडामार्फत शासनाच्या योजनेतील सिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे नियमानुसार खोदकाम करताना गावातीलच न्हानू देवराम धनगर हे विहिरीच्या खोदकामास अडथळा करीत खोटे अर्ज पंचायत समितीमध्ये करीत आहेत. त्यामुळेच विहिरीचे अनुदान मिळण्यास उशिर होत असल्याची तक्रार प्रकाश धनगर यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. मात्र, प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे धनगर दाम्पत्याने संतप्त होऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर प्रकाश पोपट धनगर आणि पत्नी योगिता प्रकाश धनगर यांनी सोमवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

...अन् अनर्थ टळला
याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला पूर्वकल्पना असल्याने शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय पथकातील नरेंद्रसिंग कचवाह, चंद्रकांत पाटील, भूषण खेडवन, सुधाकर पाटील हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पहारा ठेवून होते. अचानक सकाळी अकरा वाजेनंतर धनगर दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन रॉकेलचा डबा उघडताच पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलचा डबा हिसकावून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी प्रकाश धनगर व पत्नीकडून सर्व माहिती जाणून घेत आंदोलनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजपने जर शिवसेनेला स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पालिकेच्या सत्तेत समाविष्ट केले तरच भाजपचे काम करू, असा अल्टिमेटम सोमवारी (दि. १) झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात देण्यात आला. दि. १० एप्रिलपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली असून, ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपविण्यासाठी काम केले, शिवसैनिकांवर अन्याय, अपमान केला. जिल्हा परिषदेत काँग्रेसला घेऊन सत्ता मिळविली अशा भाजपसाठी आम्ही काम करायचे का, अशा संतप्त शब्दात भाजप-शिवसेना युतीवर शिवसैनिकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात भावना व्यक्त केल्या. या वेळी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला रोष प्रकट केला.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (दि. १) जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी काम करायचे की नाही, याबाबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात शिवसेनेला साडेचार वर्षांत भाजपने दिलेल्या सापत्न वागणूकीचा पाढाच शिवसेनेच्या नेत्यांसमोर वाचला. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिकांना अडचणीत आणले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्यात शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचा सूचना पोलिसांना दिल्या. तसेच जळगाव महापालिकेत युती करणार असल्याचे सांगत शेवटपर्यंत युती केली नाही, असा आरोपही या वेळी करण्यात आला.

‘भाजपकडून मलाही त्रासच’
भाजपने जसा शिवसैनिकांना त्रास दिला तसाच मलादेखील दिला. आईचे निधन झाले असताना भाजपच्या नेत्यांनी मला तुरूंगात टाकले यापेक्षा मोठा अन्याय काय आहे, अशी बोचरी टीका राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली युती ही शिवसैनिकांसाठीच असून, पक्षाचे संघटन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिक हे आदेशावर चालणारे आहेत. मात्र, भाजपकडून निमंत्रण आल्यशिवाय प्रचाराला जावू नका, कार्यकर्त्यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच गुलाबराव देवकरांसंदर्भातील गोष्टी अफवा असल्याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला. आम्ही १० एप्रिलपर्यंत वाट पाहू असेही गुलाबराव पाटलांनी सांगितले. तसेच भाजपच्या उमेदवाराबाबत आमच्यापेक्षा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचा टोलाही राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

महाजनांसोबत आज चर्चा
संजय सावंत यांनी सांगितले की, भाजप व शिवसेनेची युती देव, देश व धर्माच्या व्यापक जनहितासाठी केली आहे. गेल्या वर्षांत काय झाले हे विसरून आता काम करायचे आहे. आपण भाजपचे गिरीश महाजन यांची आज (दि. २) भेट घेऊन शिवसेनेच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून, काही सभापतिपद देण्यात यावीत. जळगाव महापालिकेत शिवसेनेला उपमहापौरपद द्यावे. पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे. अमळनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी अशा अनेक मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेचे भविष्य सांगा, २१ लाख मिळवा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा, असे आव्हान देशभराच्या ज्योतिषांना देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २१ लाखांचे बक्षीस सोमवारी नाशिक येथे जाहीर केले. या आव्हानप्रक्रियेचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल व ज्योतिष संस्था व व्यक्तींना ते व्यक्तिश: पाठवले जाईल, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१४ च्या निवडणुकीतसुद्धा हे आव्हान दिले होते; पण कोणीही हे भविष्य वर्तवले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

फलज्योतिषशास्त्र आहे, असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारण्याचा दावा करून वाद-संवाद झाला; परंतु प्रत्यक्षात आव्हानप्रक्रिया सिद्ध झाली नाही. भविष्य वर्तवणाऱ्यांना जर आपले नाणे खणखणीत असेल तर भीती कशाला, असा प्रश्नही पाटील यांनी केला. गेल्या वेळी एकानेही सहभाग घेतला नाही. आता त्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हानही दिले आहे. या वेळी त्यांनी फलज्योतिष हे शास्त्र नाही तर थोतांड आहे. ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी अंनिसने पुन्हा एकदा केली. यामुळे आपले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसानभरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

‘दारू पाजणाऱ्या उमेदवाराला पाडा’

या वेळी त्यांनी दारू पाजणाऱ्या उमेदवाराला पाडा, असे आवाहनही केले. निवडणुकीमध्ये व्यसन हा मुद्दा सर्वांनी घ्यावा. बिहारमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हा मुद्दा घेत दारूबंदी केली. त्यामुळे नंतर त्याचे परिणामही चांगले दिसले. पंजाबमध्येसुद्धा काँग्रेसने ड्रग्जचा मुद्दा घेतला व त्यानंतर त्यात नियंत्रणही आणले गेले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करीत देशातील संस्थेच्या स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप केला. अंनिसला ३० वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेत अंनिसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या मोरास जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील खोपडी खुर्द येथील पंडित दराडे यांच्या पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या मोरास स्थानिक तरुणांनी दोराच्या सहाय्याने बाहेर काढत जीवदान दिले. पाण्याच्या शोधात हा मोर विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वन परीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोराला ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या उद्यानात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमी मोराला मोहदरी वन उद्यानात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसानंतर मोर पूर्ण बरा झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. जंगल परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. वनविभागाने अशा तहानलेल्या जिवांसाठी परिसरात पाणवठे तयार करावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉलसमोरील खड्डा अखेर बुजवला

$
0
0

मॉलसमोरील खड्डा अखेर बुजवला

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या कॉलेजरोड परिसरातील मॉलसमोरील रस्त्यावर पडलेला खड्डा अखेर बुजविण्यात आला आहे.

या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. परिणामी वाहनचालकांना हा खड्डा चुकवत वाहने चालवावी लागत होती. त्यामुळे किरकोळ अपघात होऊन वादावादीचे प्रसंगदेखील उद्भवत होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागातील बांधकाम विभागाने येथील मॉलसमोरील खड्डा तात्काळ बुजवून रस्ता वाहनचालकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, आता ठिकठिकाणी रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्यादेखील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवाव्यात, जेणेकरून रस्त्यांना मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग विभागाकडूनही दखल

$
0
0

'आदिवासी विकास'मधील फर्निचर खरेदीचा मागितला अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाकडून कायापालट अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या फर्निचर खरेदीतील अनागोंदीची राज्याच्या उद्योग विभागानेही गंभीर दखल घेतली आहे. तिनशे कोटींच्या फर्निचर खरेदीच्या निविदा प्रक्रियेत शासन निर्णयाचे पालन करण्यात न आल्याने उद्योग विभागाने आदिवासी विकास विभागाकडून अहवाल मागितला आहे. त्यामुळे आदिवासी आयुक्तालयाची कोंडी झाली आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये मुलांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु, त्यात त्रुटी असल्याने कायापालट अभियान राबवून पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याअंतर्गत आदिवासी मुलांसाठी फर्निचर खरेदीचा निर्णय झाला. परंतु, विशिष्ठ ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून ही खरेदी प्रक्रिया ११२ कोटींवरून थेट तिनशे कोटींपर्यंत वाढविण्यात आली. तसेच विशिष्ट कंपन्यांनाच खरेदी प्रक्रियेत झुकते माप देण्यात आले. जेम्स पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी त्यात नामांकित कंपन्याच पात्र ठरतील अशा अटी ‌व शर्ती ठेवण्यात आल्या. परिणामी अन्य कंपन्यांचा पत्ता कट झाला.

आश्रमशाळांसाठी खरेदी करण्यात येत असलेल्या साहित्याचे दर हे बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट असल्याचा आरोप करण्यात आला. फर्निचर खरेदीतील ही अनागोंदी 'मटा'नेही वृत्तमालिकेद्वारे जनतेसमोर आणली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या खरेदीबाबत आदिवासी मंत्री, मुख्यमंत्री तसेच उद्योग विभागाकडे तक्रार करत, भ्रष्टाचाराचा आरोप केला. १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार, स्टार्टअप, मेक इन इंडिया आणि लघु उद्योगांना शासन खरेदीत प्राधान्य देण्याचा निर्णय असतांनाही, तो विभागाने डावलल्याची तक्रार करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेविरोधात थेट उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. तरीही आदिवासी आयुक्तालयाने संबंधित खरेदीदार कंपन्याना बँकडेटेड आदेश दिले. 'मटा'च्या वृत्त मालिकेनंतर तसेच धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी या खरेदीप्रक्रियेला स्थगिती दिली. तसेच राज्याच्या उद्योग विभागाने या खरेदी प्रक्रियेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

'आदिवासी विकास'ची कोंडी

शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लघन झाल्याबाबतचा अहवाल उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांकडून मागितला आहे. नियमानुसार खरेदीप्रक्रिया राबविण्यात यावी; तसेच खरेदीचा मुद्देनिहाय अहवाल अभिप्रायासह उद्योग संचालनालयाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आदिवासी विभागाची कोंडी झाली आहे.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

आदिवासी विभागाच्या फर्निचर खरेदी प्रक्रियेसंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आक्षेप घेत, काही ठेकेदार कंपन्यानी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या याचिकांवर बुधवारी (दि. ३) न्या. ए. एस. ओखा यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांसह आदिवासी विभाग, राज्य सरकार यांच्यासह कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिटनेस दाखवा, पसंतीचे ठाणे मिळवा!

$
0
0

पुढील महिन्यातील पोलिस बदल्यांसाठी निकष

...

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

..

नाशिक : पुढील महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत पोलिसांच्या आरोग्याला महत्त्व देण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला आहे. पसंतीचे पोलिस ठाणे हवे असल्यास कर्मचाऱ्यांना धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारून आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे.

शहर पोलिस आयुक्तालयात अडीच हजारांच्या घरात पोलिस कर्मचारी आहेत. पोलिस ठाणे तसेच, वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दर सहा वर्षांनी बदल्या होतात. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बदलीसाठी अर्ज करू शकतात. क्राईम ब्रँच, एसबी, आर्थिक गुन्हे शाखा तसेच, इतर ठिकाणावरील कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होतात. बदली प्रक्रिया राबविताना पोलिस कर्मचाऱ्यांना तीन पोलिस ठाण्याचा पसंतीनुसार क्रमांक नमूद करावा लागतो. त्यानंतर कर्मचारी व प्रशासनाची निकड लक्षात घेऊन बदली प्रक्रिया अंतिम केली जाते. यंदा मात्र पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत मोठा टि्वस्ट निर्माण झाला आहे. पसंतीनुसार पोलिस ठाणे हवे असल्यास पोलिस कर्मचाऱ्यांना आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे. वीस ते तीस वयोगटातील कर्मचाऱ्यांना १० किलोमीटर, तर त्यानंतरच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांना किमान पाच किलोमीटर स्पर्धेत यशाचा झेंडा गाडावा लागणार आहे. यामुळे फक्त कर्मचाऱ्याच्या सोयीचा विचार होणार नाही, तर तो ज्या ठिकाणी कामास इच्छुक आहे, त्या ठिकाणी कितपत क्षमतेने काम करू शकेल, याचा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे. पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी याबाबतचे पत्रच कर्मचाऱ्यांना दिले असून, काही कर्मचाऱ्यांनी तर सराव सुद्धा सुरू केल्याचे सांगितले.

...

कर्मचाऱ्यांना पसंतीचे पोलिस ठाणे हवे असल्यास त्यांना आपले फिटनेस सिद्ध करावे लागेल. फिटनेस सिद्ध करणाऱ्यांना आपल्या आवडीनुसार पोलिस ठाण्यात नियुक्ती देता येऊ शकेल.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज -

$
0
0

\Bस्वामी समर्थ भजनी मंडळाचा वर्धापन दिन सोहळा

\Bनाशिक : जुन्या नाशिक येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा २९ वा वर्धापन दिन सोहळा ६ व ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कुंभारवाडा, पाटील गल्ली, बुधवार पेठ येथे साजरा होणार आहे. त्यासाठी लोकशाहीर सुरेश तसेच संपत खैरे, डॉ. झुंझार गवळी, डॉ. वसंत ठाकूर, संतोष खैरे उपस्थित राहणार आहेत असून, नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रघुनाथसिंग परदेशी, गणेश सोनवणे यांनी केले आहे.

--

\Bसंगणकीय चित्रकला स्पर्धेत श्रावणी गितेचे यश

\Bनाशिक : ए. के. पटेल संगणक अकॅडमीच्या वतीने संगणकीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत लहान गट व मोठा गट अशी विभागणी करण्यात आली. यात लहान गटासाठी पेंटमध्ये, मोठ्या गटाने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये चित्रे काढावयाची होती. यात सेंट लॉरेन्सच्या श्रावणी गिते हिने लहान गटात यश संपादन करून पारितोषिक पटकावले. या यशासाठी तिचे मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे याप्रसंगी प्रमुख परीक्षकांनी सांगितले.

--

\Bमोफत स्थूलता निदान शिबीर\B

नाशिक : श्रीगुरुजी रुग्णालयाच्या वतीने मोफत स्थूलता निदान शिबिराचे आयोजन बुधवारी (३ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत श्रीगुरुजी रुग्णालय आयुर्वेद विभाग, आनंदवल्ली चौक, गंगापूररोड येथे करण्यात आले आहे. शिबिरात स्थूलपणावर नियंत्रण करण्यासाठी आयुर्वेदिय दृष्टिकोनातून आहार, विहार, व्यायाम, औषधे आणि पंचकर्म यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर, गोवर्धनमध्ये राजरोस जुगार अड्डा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात पोलिस आयुक्तांनी जुगाराच्या अड्ड्यांवर छापासत्र सुरू असले तरी शहराच्या हद्दीलगत ग्रामीण भागात गंगापूर, गोवर्धन शिवारात जुगार अड्डा सुरू आहे. विशेष म्हणजे शहर व ग्रामीण पोलिसांच्या सिमेवरच जुगाराचा अड्डा शक्कल लढवत संबंधिताने सुरू केला आहे. यामुळे तेथे कारवाई करणार कोण, असा सवाल आहे.

शहराच्या हद्दीत पोलिसांकडून जुगार अड्ड्यांवर छापेसत्र सुरू आहे. यात अनेक दिगजांचे जुगार अड्डे पोलिसांनी बंद केले. परंतु, आता जुगार अड्डे शहर व ग्रामीण पोलिसांच्या सिमेवर सुरू केले जात आहे. गंगापूर, गोवर्धन गाव शिवारात शहरातील एक जुगार अड्डा सुरू केला आहे. स्थानिकांचा विरोध असला तरी काही स्थानिक पुढाऱ्यांचे जुगार अड्ड्याला सहाय्यक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ग्रामीण व शहर पोलिसांनीच माहिती घेत कारवाई करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावादनाने निनादला गोदाघाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मंगळवारी महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या कामगिरीला समर्पित करण्यात आला. ढोलवादनाचे १५ ते ७ पर्यंत हात असून त्यातील पहिला हात, तिसरा हात आणि पाचवा हात मंगळवारी महावादनात वाजविला गेला. या महावादनाचा शेवट पुणे ढोलने झाला.

सन २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील ३५ ढोलपथके या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रत्येक पथकात ३०-३५ ढोल व ताशावादक होते. यावेळी मुख्यध्वज व इतर सहध्वज नाचविले गेले. सुमारे १५०० ढोलवादक, ताशावादक आणि तास-झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांनी घेतला. विक्रमांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. अभिजित वाघचौरे व रोहित गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. मनोज कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ढोलताशा महासंघ अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ ताशावादक राजन घाणेकर, श्रध्दा नालंगवार, प्रवीण व्यवहारे, हर्षल सदगिर, मोनिका आथरे, शैलजा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. पाडवा पटांगण, गोदाघाट येथे हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी महिला तलाठ्यास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या मुंढेगाव येथील महिला तलाठी यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला तलाठी यांना मदतनिसामार्फत रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने वाघेरे शिवारात शेतजमीन खरेदी केली होती. सातबारा उताऱ्यावर नाव नोंद लावण्यासाठी अनेकदा विनंती अर्ज केले. मुंढेगाव सजा येथील महिला तलाठी भाग्यश्री रावसाहेब धायताडक यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images