Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळावर रंगलेल्या पार्टी संदर्भात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्ककडून प्राप्त झालेला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पाठविला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी अहवालच सादर केलेला नाही. दरम्यान बांधकाम विभागाच्या भरारी पथकाने नाशकात येऊन चौकशी केल्याने पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर मंत्रालय स्तरावरूनच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.वाय. देशमुख यांच्या निवृत्तीनिमित्त ३१ जानेवारीला साग्रसंगीत पार्टी रंगली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल करून ठेकेदार विलास बिरारी यास अटक केली. ग्रामस्थांनी दिलेल्या वाहन क्रमांकावरून पार्टीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागानेही परवान्याच्या अटी-शर्तीचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधित अहवाल पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यांचा अहवाल सादरच केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडील अहवाल मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पाठविला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घातले आहे. या विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांचा या पार्टीमध्ये सहभाग असल्याने सर्वांवर मंत्रालय पातळीवरून कारवाई होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणात बांधकाम विभागाच्या भरारी पथकानेही नाशिकमध्ये येऊन चौकशी केल्याचे समजते. परंतु या चौकशीबाबात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या पथकानेही सचिवांना अहवाल सादर केल्याचे समजते.


निवडणूक प्रक्रियेत बदलाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

३५ वर्षांपूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक यात अमुलाग्र बदल झाला असून झालेला बदल अत्यंत काळजीचा आहे. निवडणूक प्रकियेत चांगले वातावरण करण्यासाठी पुन्हा काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रत्यर्थ दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वर्षीचा पुरस्कार बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप होते. मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेत अकरा हजाराची भर घालून ती रक्कम मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले, की १७५ वर्षांची परंपरा असलेल्या वाचनालयाकडून हा पुरस्कार मला मिळतो आहे हे माझे भाग्य आहे. हा सत्कार मला उमेद देणारा ठरेल. नाशिकचा आणि आमच्या घराण्याचा संबंध अनेक वर्षापासूचा आहे माझे अजोबा येथे शिक्षणासाठी रहात होते. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या पुरस्कारात माझ्या मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. मतदारांनी ७ वेळा मला निवडून माझ्यावरचा विश्वास सार्थ केला आहे. महसूल मंत्री असो, कृषिमंत्री असो अथवा शिक्षण मंत्री असो मनापासून काम करायचे ठरवले तर निश्चित प्रगती होऊ शकते.

नाशिकचे प्रश्न सोडवा

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा गौरव करतांना नाशिककडे लक्ष देण्याचेही आवाहन केले. यावेळी वाघ म्हणाले, की बाळासाहेब थोरात यांच्या विकासाची घोडदौड मोठी आहे. त्यांनी अनेकांसाठी शिक्षणाची दालने खुली केली, संगमनेर तालुक्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवला. ज्याप्रमाणे त्यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह साखर कारखानदारीचेही प्रश्न सोडवले. अशाच प्रकारे थोरात यांनी नाशिक जिल्ह्याचेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन वाघ यांनी केले.

BHR ठेवीदार घेणार पोल‌िस अध‌िकाऱ्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी, नाश‌िक

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने (बीएचआर) ठेवींच्या रकमा परत न देणे आण‌ि २० टक्के ठेवींच्या रकमेवर फसवणूक केल्या प्रकरणी महिन्याभरापासून ६३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तरीही पोल‌िस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप बीएचआरच्या ठेवीदारांनी हुतात्मा स्मारक येथे आयोज‌ित बैठकीत केला.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात इतर १४ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या धर्तीवर नाशिक शहर आण‌ि जिल्ह्यातही तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, या मागणीसाठी संस्थेचे त्रस्त ठेवीदार मंगळवारी (दि. १०) सकाळी ११.३० वाजता हुतात्मा स्मारक येथे जमणार आहेत. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून यावेळी ठेवीदार कैफियत मांडणार आहेत.

'बीएचआर'ची मुदत पूर्ण होऊनही ठेवींचे पैसे परत दिले नाहीत अशा ठेवी परत न मिळालेल्या आणि २0 टक्क्यांच्या नावावर फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील ठेवीदारांची बैठक येथील हुतात्मा स्मारक येथे ठेवीदार संघटनेचे राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत संस्थेच्या फसवणूक झालेल्या त्रस्त ठेवीदारांनी आपापल्या समस्या मांडल्या. यावेळी विवेक ठाकरे व ठेवीदार संघटनेचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण शिरोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलिस तक्रारी देवूनही गुन्हे दाखल करत नसल्याचे अनेक ठेवीदारांनी नमूद केले. त्यावरून संस्थाचालक व जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक अधिनियम १९९९ भाग ३ नुसार आणि फसवणुकीच्या इतर प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून सर्व ठेवीदारांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेण्याचा न‌िर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला आनंद दाते, दिलीप जैन राजेंद्र नानकर, तुकाराम मेढे, करिष्मा मंधान, केशव रुपवते, सतीश बैरागी, संगीता संचेती, सुरेखा पुंड, अनिल मोरे, अरुण चव्हाण, अशोक पाटील, विना चंदावरकर,जयदीप चंद्रभे, देविदास भावसार,संतू मोरे,एकनाथ येवले, आदी ठेवीदार उपस्थित होते.

गॅस गळतीमुळे महिलेचा मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

येथील आनंदरोड कंवरम सोसायटीतील घरातील ​सिलिंडर गॅस गळतीमुळे आग लागून एका महिलेचा गुदमरून मृत्यू तर, एक जण ​४० टक्के भाजला आहे. त्यास उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कंवरम सोसायटीत खजान सिंग होतसिंगांनी (वय ५२) हे आपल्या पत्नी मनमीत कौर वय (वय ४६), मुलगी नवनीत (वय २०) व मुलगा करतार (वय १८) यांच्या​सह फ्लॅटमध्ये राहतात. खजान सिंग हे छोटा गुरुद्वारा येथे पुजारी आहेत. रविवारी सकाळी ते आपल्या पत्नीसह प्रसाद बनविण्याचे काम करीत होते. सकाळी ​सव्वादहाच्या सुमारास गॅस सिलिंडर अचानक ​गळती होऊन त्याचा भडका उडाला. यामुळे घरात संपूर्ण आग व धूर पसरला. घरातील बाथरूममध्ये असलेल्या मनमी​त कौर धुराने ​बेशुद्ध झाल्या. गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. खजानसिंग यांनी आरडाओरडा करता​च शेजारील बाळासाहेब गोडसे व बाळकृष्ण वटारे यांनी धाव घेतली. बाळकृष्ण वटारे यांनी धाडस करून जीवाची पर्वा न करता पेटता सिलिंडर उचलून पळत जाऊन दूर फेकला. सिलिंडर न फेकता तर त्याचा ​स्फोट होऊन मोठी जीवित व ​वित्तहानी झाली असती. त्यात वटारे हे जखमी झाले.

सावरकर स्मारकासाठी ८० लाखांचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

केंद्रीय निधीतून भूगरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ८० लाख तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्ता कामासाठी १०३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अंदाजपत्रकानंतर रस्ता कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. मतदारसंघातील बारा महत्त्वाच्या योजनांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इगतपुरी-भावली-वासाळी-टाकेद-भंडारदरावाडी या ४९ किलोमीटर रस्त्यासाठी ५० कोटी, ब्राह्मणवाडे-देशवंडी-बारागावपिंप्री या १६ किलोमीटरच्या मार्गासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आडगाव-म्हसरुळ-गिरणारे-ओझरखेड या २९ किलोमीटर रस्त्यासाठी ३७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

मतदारसंघातील प्रत्येक गावात खासदार निधीसह राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांचा निधी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे गोडसे यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी अर्थ खात्याने निधी वितरित करावा म्हणून केंद्राचा निर्णय प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. गोदाघाटाचे काम आगामी १२ वर्षांचा विचार करून केले जावे, घाटाचे सौंदर्य कायम राहील असे काम व्हावे यासाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्याचे गोडसे यांनी सांगितले.

चित्रपटनगरीसाठी प्रयत्न

दादासाहेब फाळके चित्रपटनगरी निर्माण करण्यासाठी मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील २०० एकर जागेत राज्य सरकारची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील साबरमतीप्रमाणे गोदावरी रिव्हर फ्रंट गंगापूर धरणातून सुरू करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

कर्जबाजारीपणामुळे खैरनार यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदगाव येथील संजय खैरनार या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची कैफियत त्यांच्या कुटुंबीयांनी तहसीलदारांकडे मांडली आहे. राज्य सरकारकडून खैरनार कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी निश्च‌ितच प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदारांनी खैरनार यांच्या कुटुंबाला दिले आहे.

गंगाधरी गावातील खैरनार यांनी रविवार (दि. १) स्वत:ला घरात पेटवून घेतले होते. ग्रामस्थांनी त्यांना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून दुपारी पावणेबाराच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, पोलिसांनी जबाब नोंदविण्यापूर्वीच खैरनार यांचा सोमवारी (दि. २) सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. कर्जबाजारीपणामुळे खैरनार यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्यांनी नांदगावचे तहसीलदार सुदाम महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. शेतीमध्ये काही पिकत नसल्याने त्यांनी सोसायटीचे कर्ज घेतले होते. कधी शेतमजूरीतून तर कधी भाजीपाला विक्रीतून ते कुटुंबाचा उदर निर्वाह चालवित होते. मात्र, या व्यवसायातही त्यांना यश येत नव्हते. नापिकी आणि कर्जबाजारीपणातून नैराश्य आल्याने त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. राज्य सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत दिली जाते. हीच मदत तुम्हालाही मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून पाठपुरावा करू, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.

५ लाख रुपयांची मिल्क पावडर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर जवळील माळेगाव एमआयडीसीतील कंपनीत छापा टाकून सुमारे पाच लाख रुपयांची मिल्क पावडरच्या गोण्या जप्त केल्या. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळच्या सुरू असलेल्या कारवाईत ही मोहिम राबविण्यात आली.

'एफडीए'चे आयुक्त खडतरे यांच्या आदेशावरून राज्यात ठिकठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी मोहीम सुरू आहे. याचाच भाग म्हणून सिन्नर येथील माळेगावत एमआयडीसीतील वारणा मिल्क व मिल्क प्रोडक्ट लिमिटेड, इ-१० येथे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून छापा टाकत 'आयएसआय' मार्क नसलेल्या १२० गोण्या ताब्यात घेतल्या. तसेच यावेळी कंपनीत तयार होणारे बटर, स्क्रिम आणि तुपाचे देखील नमुने घेण्यात आले. ते पुढील तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याचे 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक विभागाचे अन्न व औषध सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध अधिकारी विवेक पाटील व अमित रासकर यांनी ही कारवाई केली. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ कुणी करत असेल तर त्यावर कारवाई करणार असल्याचे 'एफडीए'च्या वतीने सांगण्यात आले आहे.

वाहन नोंदणीच्या नावाखाली लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

दुचाकी असो की चारचाकी वाहन आता ते शहरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सामान्यातील सामन्य व्यक्तीकडूनही वाहनांची खरेदी केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडून शहरातील शोरुम चालक वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आयटीओ) नोंदणी व हस्तांतरण करण्याच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा चार्जेस आकारणी करीत असल्याचे चित्र आहे.

शहरातील शोरूमचालकांकडून दुचाकी अथवा चारचाकी वाहने खरेदी केल्यानंतर होणारी ग्राहकांची लूट कोण थांबविणार असा सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. यात वाहनांच्या खरेदी व विक्रीवर नियंत्रण असणाऱ्या 'आयटीओ'ने लक्ष घालण्याची मागणी वाहने खरेदीदारांकडून केली जात आहे.

शहराची व्याप्ती चारही बाजूंनी झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रत्येकासाठी स्वतःचे वाहन आवश्यक झाल्याने दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदी केली जात आहेत. परंतु, यामध्ये शोरूम चालकांकडून 'आरटीओ'त नोंदणी व हस्तांतर चार्जेसच्या नावाखाली सर्रासपणे लूट केली जात आहे. दुचाकी किंवा चारचाकी गाडी खरेदी करतांना शोरूमचालकांकडून आरटीओमध्ये केली जाणारी वाहनाची नोंदणी व हस्तांतरण चार्जेसची पावती व भरलेली पावती यामध्ये हजारो रुपयांची तफावत दिसून येते.

दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी केल्यावर शोरुमचालक अनेक डिस्काऊंट ऑफर ग्राहकांना दिली जाते. परंतु, प्रत्यक्षात ही ऑफर केवळ नावापुरतीच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाहन खरेदी केल्यावर खिशाला सर्वात मोठी कात्री आरटीओ कार्यालयात वाहनाचे नोंदणी व हस्तांतरण चार्जेसच्या नावाखाली लावली जाते. वाहने खरेदी केलेल्या अनेक ग्राहकांना 'आरटीओ'त नोंदणी व हस्तांतरणाच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. परंतु, त्या पूर्ण पैश्यांची पावती ग्राहकाला दिली जात नाही. शोरुमचालकांकडून 'आरटीओ'त वाहनाची नोंदणी व हस्तांतरण चार्जेची किंमत जी सांगितली जाते ती प्रत्यक्षात आरटीओमध्ये भरणा केलेल्या पावतीत हजारो रुपयांचा फरक असतो. यामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची लूट शोरुमचालक करत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. यासाठी वाहनांच्या खरेदी, विक्रीत सर्वात महत्त्वाचा भाग असणाऱ्या ओरटीओ विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहन खरेदीदारांकडून केली जात आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या कंपन्या आकर्षक जाहिराती तयार करतात. ग्राहक यांना भुलून वाहने खरेदी करतात. मात्र, शोरुमचालकांकडून आरटीओत केली जाणारी नोंदणी व हस्तांतरण चार्जेसच्या नावाखाली होणारी लूट थांबविण्याची गरज आहे.

- रुपेश महाजन, वाहन खरेदी ग्राहक

शोरुमचालकाची हकालपट्टी

शहरातील एका नामांकित कंपनीच्या शोरुममध्ये 'आरटीओ'कडे वाहन नोंदणी व हस्तांतरणाच्या नावाखाली लुबाडले जात असल्याची तक्रार ग्राहकाकडून करण्यात आली. यानंतर संबंधित कंपनीने त्या शोरुमचालकाची हकालपट्टी केली. परंतु, अशा प्रकरणांमध्ये पैसे उकळल्यानंतर आरटीओकडून ठोस कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे.


टीपीसह आम्हाला डीपी द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास आराखड्यावरून वादविवाद सुरू असतांनाच आता महापालिकेने शहरात टाऊन प्लॅनिंग स्किम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या महासभेत शहरात टीपी स्किम लागू करण्याचा ठराव केला जाणार आहे. तो प्रशासनासह सहसचांलकांना पाठविला जाणार आहे. टीपीसह शहरात डीपी लागू केल्यास महापालिकेचा जास्त फायदा होईल, असा दावा उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी केला आहे.

सध्या शहर विकास आराखड्याचे काम अं‌तिम टप्प्यात असतांनाच आता महापालिकेच्या वतीने टीपीचा आग्रह धरला जात आहे. यासाठी महासभेचा ठराव करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. येत्या बुधवारी (दि. १८) आयोजित करण्यात आलेल्या महासभेत याबाबत सत्ताधाऱ्यांमार्फत ठराव मांडला जाणार आहे. शहरात टीपीसह डीपी द्यावा अशी सुधारित मागणी महापालिकेच्या वतीने प्रशासन व नगररचना विभागाचे सहसंचालकांना केली जाणार आहे. शहरात टीपी लागू झाल्यास नगररचना विभागाच्या वतीने झोनिंग करण्यात येईल. त्यामुळे महापालिकेला विकसित होणाऱ्या भागात जवळपास ५० टक्के जागा मिळणार आहे. त्यातून महापालिकेला काही जागा विकसितही करता येणार आहे. त्यामुळे टीपी स्किममध्ये महापालिका फायद्यात राहणार असल्याचा दावा उपमहापौर बग्गा यांनी केला आहे. यासाठी आपण स्वतःच ठराव मांडणार असल्याचे बग्गा यांनी सांगीतले आहे. त्यामुळे शहरात टीपी स्किम लागू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच हालचाली सुरू केल्या आहेत.

भाविक मार्गासाठी आज बैठक

$
0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आठ घाटांवर येणाऱ्या भाविकांचे मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुभंमेळ्यानिमीत्त दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने या मार्गांचे सादरणीकरण केले जाणार आहे.

सिंहस्थात पर्वणीसाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रामकुंडावर येत असल्याने ही गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी आठ घाट उभारण्यात आले आहे. एकाच घाटावर गर्दी होऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या घाटांवर थेट नेवून जाण्याचे नियोजन आहे.त्यासाठी स्वतंत्र ४० ते ४५ भाविक मार्ग निश्चित करण्यात आले आहे. त्याचे सादरीकरण मंगळवारी महापालिकेच्या वतीने साप्ताहिक बैठकीत करण्यात येणार आहे. या मार्गांवर चर्चा होऊन त्यास अंतिम रुप दिले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ७५ कोटींचा निधी

$
0
0

नाशिक : सिंहस्थ कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालकडून महापालिकेला ७५ कोटीचा निधी जास्तीचा मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून यास दुजोरा मिळाला असून हा निधी लवकरच पालिकेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेला सिंहस्थाच्या कामांसाठी निधीची चणचण आहे. त्याच नगरसेवकांच्या विकास निधीवरून वाद सुरू आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जास्तीचा निधी उपलब्ध असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निधी महापालिकेला हस्तांतरीत केला जाणार आहे. हा निधी महापालिकेला मिळाल्यास सिंहस्थाच्या प्रलंबित कामांना गती मिळू शकेल.

काँग्रेसच्या आंदोलनामुळे ‘द्वारके’वर वाहतुकीचा खोळंबा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे तसेच महागाईसह जनतेचे विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी शहर काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीचे सचिव श्यौराज वाल्मिकी यांच्या नेतृत्वात अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे मुबंई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊन सर्वसामान्यांचे हाल झाले.

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. पोलिसांना काँग्रेसच्या सुमारे १०० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी व थेट भरीव आर्थिक मदत तसेच कच्च्या तेलाच्या घटत्या किंमतीच्या प्रमाणात इंधनाचे दर कमी करण्यासह इतर विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेसतर्फे राज्यव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजपष आणि शिवसेनेच्या केंद्र व राज्यातील सरकारकडे जनतेच्या विविध समस्यांकडे आणि मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत. जनतेमध्ये विशेषत: शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक आणि कामगार वर्गात प्रचंड नाराजी व फसवणुकीची भावना आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन पुकारण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

शहरात मुबंई-आग्रा महामार्गावर द्वारका चौकात वाल्मिकी यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार सुधीर तांबे, नगरसेवक उत्तम कांबळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. या आंदोलनामुळे प्रवाशांसह सामान्यांचा खोळंबा झाला. पुणे महामार्गासह सारडा सर्कलवरील वाहतूक ठप्प झाली.

सिंहस्थ, जिल्हा नियोजनासाठी अतिरिक्त १९० कोटींची मागणी

$
0
0

नाशिक : जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाने १९० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची सरकारकडे मागणी केली आहे. त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी केवळ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांनीच हा नियोजन आराखडा सादर केला.

नियोजन आयोगाच्या देखरेखीखाली आणि अर्थमंत्री आणि तत्सम मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन विकास आराखडा सादर केला जात असतो. सोमवारी मुंबईमध्ये बैठक झाली. त्यास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, नवनियुक्त जिल्हाधिकारी कुशवाह यांसह अनेक विभागांच अधिकारी उपस्थित होते. जानेवारीत जिल्हा नियोजन विकास आराखड्याची बैठक झाली. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यामध्ये विकास कामांसाठी १३५९ कोटींची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात ८२० कोटींच्या खर्चालाच प्रारुप विकास आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. सर्वसाधारण योजनांसाठी ५१७ कोटी ६४ लाखांची मागणी होती.

प्रवेशद्वारावरच अस्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

नाशिक शहरातून देवळाली कॅम्पमध्ये लामरोडमार्गे प्रवेश करावा लागतो. मात्र, या मार्गावरील उघड्या गटारी तुंबलेल्या गटारी आणि असह्य दुर्गंधी याचे देवळाली कॅम्पसह बाहेरून येणाऱ्या नागरिकांचा दर्शन होते. या समस्येवर कायमस्वरुपती तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

देवळाली कॅन्टोमेंट प्रशासनाला सर्वाधिक कररुपी महसूल उपलब्ध करून देणारा परिसर म्हणून लामरोडचा नावलौकिक आहे. परंतु, त्यांच्याच वाट्याला सर्वाधिक उपेक्षा असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रश्न केवळ स्वच्छतेचा नाही तर पिण्याच्या पाण्यासाठीही या परिसरातील महिलांना संघर्ष करावा लागत आहे. रात्री २ वाजेनंतर पाणी भरण्यासाठी महिलांना उठावे लागते. याशिवाय परिसरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे.

देवळालीत प्रवेश करताच सर्वसामान्यांना लामरोड वरून वाहणाऱ्या गटाराच्या पाण्याचा दुर्गंधी येतो. त्यामुळे नागरिकांना चालतांनाही नाकाला रुमाल लावावा लागतो. बालगृह रोड, दस्तगीर बाबा रोड, ओम महालक्ष्मी मंदिर, गोल्ड कॉईन, सहा नंबर नाका, आर्क हेवन एरिया आदी परिसरात अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. लामरोड रुंदीकरणाचा घाट घातला; परंतु भविष्याची कोणतीही काळजी न करता आतल्या बाजूने भूमिगत गटाराचे पाईप टाकणे प्रशासनास जमत नसल्याने पुन्हा लामरोड त्या भूमिगत गटाराच्या कामाच्या वेळी रुंदीकरण करण्यात येत असलेला रस्ता खोदून पाइपलाईन टाकावी लागणार आहे.

वॉर्डात काही दानशुरांच्या मदतीने सार्वजनिक उद्यान उभारण्यात आले. पण त्याच्या देखभालीसाठी कामगाराची नेमणूक प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे उंच वाढलेले गवत, बसण्यासाठी असलेली बाकांची दुरवस्था, लाईटची पोल व त्यावरील दिवे मोडून पडले आहेत. प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी कुलुप लावले गेले आहे. नागरिकांसाठी ते उघडलेही जात नाही. परंतु, रात्री मद्यपी संरक्षक जाळी ओलांडून आतमध्ये सर्रासपणे मद्यपान करीत असल्याचे आढळून येते.

पाण्यासाठी कडवा संघर्ष

लामरोडवरील सर्वच भागात रात्री २ वाजता पिण्याचे पाणी येते. त्यामुळे गृहिणीना पाणी भरण्यासाठी रात्री उपरात्री झोपेतून उठावे लागते. पाण्याची वेळ बदण्यात यावी आणि महिलांची या जाचातून मुक्तता करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

निधी आला; कामांना विलंब

देवळाली कॅम्पसाठी सिंहस्थ निधी अंतर्गत ५.२३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून लामरोड रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. परंतु, रस्त्याला अडथळे ठरणारे विजेचे खांब अजूनही त्याच जागेवर आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता समजले की अजून नवीन बोर्डाची सभा झाली नसून त्यावेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल.

शहराच्या क्रीडा धोरणात तातडीने बदल करून आनंद रोड येथील मैदानावर खासदार निधीतून भव्य क्रीडा संकुलाची निर्मिती करणार आहे.

- आशा गोडसे, नगरसेविका

वॉर्डातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. अन्यथा मागील वर्षासारखे पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल.

- सुभाष खालकर, नागरिक

शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दूरस्थ शिक्षणाच्या नावाखाली बोगस विद्यार्थी दाखवून विदर्भातील शिक्षण संस्थाकडून बोगस शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २९ प्रकल्प कार्यालयांना या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दक्षता म्हणून विदर्भातील शिक्षणसंस्थापाठोपाठ आता उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांचीही चौकशी करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. गेल्या तीन वर्षात दिलेल्या शिष्यवृत्तीची चौकशी केली जाणार असून, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चौकशीत तथ्य आढळल्यास संबधित संस्थाचालकांविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्यामुळे बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती लाटणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याचा आकडा शंभर कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.

राज्यात दूरस्थ शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे २४ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. एक वर्षावरील या अभ्यासक्रमांना आदिवासी विकास आणि समाजकल्याणमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, विदर्भातील शिक्षणसंस्थानी बोगस विद्यार्थी दाखवून ३१ कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आदिवासी विभाग खडबडून जागा झाला आहे. अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व शिक्षण संस्थाची चौकशी करण्याचे

तत्काळ आदेश काढले आहेत. उपसचिव सु. ना. शिंदे यांच्या आदेशनंतर आदिवासी आयुक्तांनी २९ प्रकल्प अधिकाऱ्यांना आदिवासी शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांची गेल्या तीन वर्षांत घेतलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीत बोगस विद्यार्थी आढळून आल्यास संबधित संस्थाचालकांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करतानाच त्यांच्याकडूनच ही रक्कम वसूल केली जाणार आहे. पंधरा दिवसांत ही चौकशी करून अहवाल सादर करावयाचा आहे. अशा घटना टाळण्यासाठीच शिष्यवृत्तीसह प्रवेशप्रकिया अॉनलाइन केली जात असल्याचा दावा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुक्त विद्यापीठाची केंद्रेही रडावर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत दूरस्थ शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थाची चौकशीचाही यात समावेश आहे. विद्यापीठाचे अभ्यासक्रमक जवळपास चार हजार ३७२ शिक्षणंसस्थांमार्फत शिकविले जातात. या केंद्रामंध्ये शिक्षण घेणाऱ्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या शिक्षण संस्थांमध्येही गडबड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सिलिंडरच्या व्यावसायिक वापराबद्दल कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर केल्याप्रकरणी शहरातील २९ जणांवर पुरवठा विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने या परिसरातील सुमारे तीनशे पथारी व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली होती.

त्यापैकी २९ व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर केला असल्याचे या तपासणीत आढळून आले. या २९ जणांविरोधात विभागाच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार तहसीलदारांच्या पथकाची या तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये परिमंडळ अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, 'गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी नियमित तपासणीसह अन्य विविध पावले उचलण्यात आली आहेत. तसेच गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना (डीबीटीएल) देशभरात सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच बाजारभावाने गॅस खरेदी करावा लागणार असून, त्यामुळे गॅसचा काळाबाजार रोखण्यासही मदत होणार आहे,' असे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात गारपीट अन् अवकाळी पाऊस

$
0
0

निफाड, सिन्नर, कळवण तालुक्याला झोडपले

टीम मटा

नाशिक जिल्ह्यात गत वर्षाप्रमाणे यंदाही अवकाळी पाऊस व गारपीटला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मंगळवारी निफाड, सिन्नर व कळवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील इतर भागातही दिवसभर ढगाळ वातावरण होते तर, काही भागात रिमझिम पाऊस झाला.

गोदाकाठ परिसरात गारपीट

निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील काही गावांना मंगळवारी दुपारी गारपीटसह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. सायखेडा, करंजगाव, भुसे, चापडगाव, म्हाळसाकोरे यांसह काही गावांमध्ये मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास तुरळक गारपीटीसह अर्धा ते पाऊन तास अवकाळी पाऊस झाल्याने परिसरातील शेतपिके बाधित होऊन शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. द्राक्ष, लाल कांदा, लागवड झालेला उन्हाळ कांदा, गहू आदी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गेल्या वर्षीही फेब्रुवारी महिन्यात निफाडच्या गोदाकाठ भागातील अनेक गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार फटका बसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तर, पुढे वर्षातील प्रत्येक महिन्यात अधूनमधून गारपीट व अवकाळी पावसाचा कहर सुरूच राहिला होता. मंगळवारी दुपारनंतर अचानक गोदाकाठ परिसरात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर सव्वाचार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी अर्धा तास तर काही गावांमध्ये पाऊन तासांहून अधिक वेळ पाऊस सुरू होता. सध्या गोदाकाठ परिसरात लाल कांदा काढणीला वेग आला असून, उन्हाळ कांदा ऐन बहरात आहे. तर, द्राक्षाचा हंगामही जोमात सुरू झालेला आहे. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका या पिकांसह गहू पिकालाही बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

समुपदेशकांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या काही दिवसातच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील तणाव हलका व्हावा तसेच त्यांच्यातील परीक्षेची भीती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाने उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. पालकांकडून विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचा तगादा लावला जात आहे. तासनतास अभ्यास करण्यासह जवळ येवून ठेपलेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी भीती निर्माण होणे तसेच त्यांच्यावर दडपण येणे सहाजिक आहे. यातूनच काही विद्यार्थी अप्रिय निर्णयही घेतात. विद्यार्थ्यांना तणावरहित मुक्त वातावरणात परीक्षा देता यावी आणि त्यांच्यामध्ये परीक्षेविषयी असलेली भीती दूर व्हावी यासाठी नाशिक विभागीय मंडळाने यंदाही जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेसंबंधी काही तणाव किंवा समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांशी संपर्क साधावा. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही योग्य ते मार्गदर्शन लाभू शकणार आहे. येत्या २६ मार्चपर्यंत विद्यार्थी व पालकांना समुपदेशकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. परीक्षेपूर्वी आणि परीक्षा कालावधीत ही सुविधा रहणार असल्याने त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी अपेक्षा मंडळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी परीक्षेसंबंधी काही समस्या असल्यास किंवा दडपण आले असल्यास समुपदेशकांची त्वरीत संवाद साधावा, असे आवाहन विभागीय सचिवांनी केले आहे.

काही वर्षांपासून अशाप्रकारे समुपदेशक नियुक्तीचा मोठा फायदा विद्यार्थी व पालकांना होत आहे. विविध प्रकारच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थी समुपदेशकांशी संपर्क करीत असल्याचा अनुभव आहे. यंदाही विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, अशी खात्री मंडळाने व्यक्त केली आहे.



ऑनलाईन फसवणूक, बँकेला कळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ग्राहकांची ऑनलाईन बँकिंगद्वारे लूट होण्याच्या तक्रारींमध्ये वेगाने वाढ होत आहे. यासाठी ऑनलाईन बँकिंमध्ये ग्राहकाची फसवणूक झाल्यास तत्काळ संबंधित बँकशाखेला कळवावे, असे आवाहन आरबीआयच्या लोकपाल अधिकारी रोसमेरी सेबस्टीन यांनी केले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी एस. व्ही. नाडकर्णी व ऐ. ऐ. बंग उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय रिझर्व बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहकांसाठी आणले आहे. यात ग्राहकांच्या मागणीनुसार ऑनलाईन बँकिंग, एटीएम व क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर ग्राहकांकडून होत आहे. परंतु, यामध्ये ग्राहकांना खोटे अमिष दाखवत लूट होण्याच्या अनेक तक्रारी वाढल्या असल्याचे समोर आले आहे. यासाठी आरबीआयच्या लोकपाल अधिकारी सेबस्टीन यांनी पत्रकार परिषद घेत ग्राहकांनी जागृत राहण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता बँकेकडून त्या पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये ऑनलाईन बँकिंग, एटीएम व क्रेडिट कार्डची पूर्तता ग्राहकांना केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात ग्राहकांची ऑनलाईन बँकिंगमध्ये लूट होण्याच्या अनेक तक्रारी समोर आले असल्याचे सेबस्टीन पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या.

शौचालयासाठी आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड-पवारवाडी मार्गावरील श्रमिकनगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी महापालिकेने दोन मजली दोन शौचालये बांधली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही दोन्ही शौचालये उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. आठवडाभरात सुरू न झाल्यास या शौचालयांची कुलुपे तोडण्याचा इशारा स्था‌निक नागरिकांनी दिला आहे.

श्रमिकनगरची लोकसंख्या दीड हजार असून त्यांच्यासाठी जुने शौचालय आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जुन्या सहा सीट असलेल्या शौचालयात मद्याच्या बाटल्या, कापडी बोळे कोंबल्या. त्यामुळे यातील काही शौचालये बंद झाली आहेत. जी शौचालये चांगली होती, त्यावर दगडे टाकण्यात आली आहेत. या शौचालयांमध्ये विजेचे दिवे नाहीत. त्यामुळे महिला, युवतींची कुंचबणा होत आहे. वृद्धांचे हाल होत आहेत. नवीन दुमजली शौचालयात बारा पुरुषांसाठी तर बारा महिलांसाठी सीट आहेत. अपंगासाठी खाली तीन शौचालये राखीव आहेत. असेच शौचालय शेजारील वसाहतीसाठीही बांधून तयार आहे. नागरिक पैसे देण्यास तयार आहेत. चालविण्यासाठी कोणी ठेकेदार पुढे येत नसल्याने शौचालय सुरू करण्यात अडचण असल्याची माहिती प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया यांनी दिली.

लवकरच कार्यवाही

बचत गटाला हे शौचालय चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, रहिवासी दाद देत नाही. स्थानिक रहिवासी संस्था स्थापन करून ती चालविण्यास तयार आहेत. तसा प्रस्ताव महापालिकेला सादर केला असून ही शौचालये लवकरच सुरू होतील. ती सुरु झाल्यानंतर तिसरे शौचालय बांधण्यात येणार आहे.

- शोभा शिंदे, नगरसेविका



Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images